☆ विसर्जन… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆
☆
तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात. जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते. पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं.आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी,’ असं म्हणायची. मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? तिला विचारलं, तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नाव माझं मेलीचं होतं’. आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी. वेडेपणा नुसता सगळा.
काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची. आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ये इकडे, तिचं संपायचं नाही’. सात दिवस हा हा म्हणता सरायचे. विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं, त्यात काय रडण्यासारखं आहे?
आता कळतं. आपलाही काळ आता सरत चाललाय.एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असं वाटत असावं का? आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या’. मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं.
दुस-या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करूनसुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं. आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.
माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मी तयार आहे. पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवालासुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही, तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा! प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे, ‘कधी?’ एवढाच काय तो जीवघेणा प्रश्न. चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय नाहीतर …
☆
लेखक:जयंत विद्वांस
प्रस्तुती: गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुयश गेल्या वर्षभरात कामात पूर्ण बुडून गेला होता. एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली तेव्हा तो किती आनंदात होता! नवीन शिकायचं, काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं, हे त्याचं स्वप्न होतं; पण प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, मिटिंग्ज आणि सततचा ताण वाढतच होता. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचा तजेला कमी होऊ लागला. तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. चिडचिड तर फारच वाढली होती.
एके दिवशी त्याची बायको शर्वरी त्याच्या समोर येऊन उभी राहिली. “सुयश, कितीही काम असलं तरी अर्णवसाठी वेळ काढावाच लागेल. हे बघ अर्णवनं काय लिहलंय ते! ” तिनं एक कागद पुढे केला. आठ वर्षांच्या अर्णवनं लिहलं होतं..
‘माझे बाबा सतत कामात असतात. ते हसत नाहीत.. काही विचारलं की ते ओरडतात.. ‘सुयश हताश झाला.
तेवढ्यात अर्णव खेळून घरी आला.. त्याचा बारीक झालेला चेहरा पाहून सुयशनं नाईलाजाने होकार दिला.
दुसऱ्या दिवशी तीन तासांनी ते नेपच्यून हॉटेलमध्ये पोचले. थंड हवा, मंद वारा, आणि पर्वतांवर उतरणारा तांबूस सूर्य बघून सुयशला हुशारी वाटली.
“सुयश, ” शर्वरी म्हणाली, “इथे झेन सेंटर आहे. उद्या डॉ. योशिनावा यांचं प्रवचन आहे. प्लीज, काम बाजूला ठेवून ये. ” सुयशने काही न बोलता मान हलवली.
दुसऱ्या दिवशी ते झेन सेंटरमध्ये पोचले. डॉ. योशिनावा शांतपणे बसले होते. डोळे मिटलेले, चेहरा इतका समाधानी की जणू काही वेळ त्यांच्याजवळ थांबला होता. त्यांना कशाचीही घाई नव्हती. त्यांनी माईक हातात घेतला.
“आज मी तुम्हाला जपानने मला शिकवलेली एक अमूल्य गोष्ट शिकवणार आहे.
या गोष्टीचं नाव आहे “युटोरी”
युटोरी म्हणजे मोकळी जागा.
घरातली, मनातली, नात्यांमधली, कामातली.
ही जागा निर्माण करण्याची कला म्हणजे युटोरी.
यासाठी काहीही लागत नाही.. फक्त थोडा वेळ… एक शांत कोपरा आणि स्वतःला भेटण्याची तयारी..
घरातील, बाहेरील, ॲाफिसमधील एक कोपरा निवडा. तिथे फोन, स्क्रीन, आवाज, गाणी काहीही नको.
तिथे बसायचं…
आणि काहीही करायचं नाही.
Do nothing.
१५–२० मिनिटं बसा. डोळे उघडे ठेवा.. वाटलं तर कपभर चहा प्या. याव्यतिरिक्त काही करायचं नाही.
फक्त शांतता. मनाला काही काम देऊ नका. कामांची लिस्ट बघू नका.
हळूहळू एक चमत्कार घडू लागेल..
मन स्वतःच स्वतःला दुरुस्त करू लागेल. ”
प्रवचन संपलं. सुयशला थोडा रागही आला“यांचं काय जातं सांगायला? ” पण त्याचा फोन तासभर बंद होता…आणि त्या शांततेने त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं. योशिनावांचे शब्द ऐकून युटोरी करून बघावं असं वाटत होतं..
घरी परतल्यावर त्याने सकाळी २० मिनिटं युटोरी व Do nothing आपल्या कॅलेंडरमधे लिहिलं आणि चहाचा कप घेऊन तो घराच्या एका कोपऱ्यात शांत बसू लागला. काही दिवसांनी त्याला त्या कोपऱ्याची ओढ लागली.
आणि मग चमत्कार घडला.. कामातली चिडचिड कमी झाली.
कोड लिहताना होणारा गोंधळ गायब झाला.
क्रिएटिविटी वाढली.
तब्येत सुधारली.
बॅास त्याचं काम बघून खूष झाला..
ऑफिसमधले लोकही म्हणू लागले, “सुयश, तू बदललास. नक्की काय केलंस? ” तो हसला..
असाच एका रविवारी सकाळी सुयश त्याच्या युटोरीच्या कोपऱ्यात बसला होता. अर्णव हळूच त्याच्या शेजारी येऊन बसला. दोघेही शांत बसले.. दहा मिनिटांनी अर्णवनं बाबाच्या गळ्यात हात घालून त्याला घट्ट मिठी मारली..
“बाबा… तुम्ही आता मला जास्त आवडता. कारण तुम्ही आता माझ्यासोबत काहीही करत नाही…पण मला ओरडत नाही. फक्त जवळ बसता. आणि मला तेच खूप आवडतं. ”
सुयशच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्याला अचानक जाणवलं की युटोरी म्हणजे फक्त स्वतःसाठी स्पेस नव्हे तर आपल्या प्रियजनांसाठीही आपल्या मनात मोकळी जागा निर्माण करणं.. ज्यामुळे त्यांना आपल्याजवळ बसायला, मन मोकळं करायला भीती वाटणार नाही.. काम सतत असणार आहेच पण त्यात वाहून जायचं कारण नाही. हे कळण्यासाठी कुठेतरी थांबावं लागतं.. मनाला वेळ द्यावा लागतो.. सतत धावणारं मन त्याला जे हवं ते करू दिलं की विसावतं..
शर्वरी त्यांच्याकडे कौतुकाने बघत होती.. योशिनावा असेच एका मोठ्या कंपनीतले इंजिनिअर होते.. तिथल्या ताणाने त्रस्त होऊन त्यांनी युटोरी वापरायला व शिकवायला सुरूवात केली होती.. तिनं मनोमन त्यांना हात जोडले!
त्या दिवशी सुयशनं कॅलेंडरमध्ये कायमस्वरूपी लिहून ठेवलं, ‘युटोरी – माझ्यासाठी, माझ्या मनासाठी, आणि माझ्या लोकांसाठी.. रोज २० मिनिटं! ‘
आपणही कितीही गडबड असेल, कितीही डेडलाईन्स असतील तरी स्वतःला पंधरा वीस मिनिटं युटोरी द्या. जपानमधील मोठमोठ्या कंपनींमधे आता युटोरी रूम्स आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढत आहे!
फक्त पंधरा मिनिटं.. रोज.. युटोरी करून काय फरक पडतो त्याची नोंद करा!
☆
लेखिका : ज्योती रानडे
प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘कौन बनेगा करोडपती’च्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की ज्यामुळे अमिताभ बच्चननाही धक्का बसला.
कधी कधी थांबणे हेसुद्धा मनाला विलक्षण समाधान देऊन जाते…
‘कौन बनेगा करोडपती’च्या सीझन १६ मधील एपिसोड क्रमांक ४९ मधील एका भागात डॉ. नीरज सक्सेना यांनी ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीत सर्वात जलद उत्तर देत हॉट सीटवर स्थान मिळवले.
विशेष म्हणजे, हॉट सीटवर पोहोचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ना उत्साहाचा गोंधळ, ना नाचणे, ना आरडाओरड, ना भावनिक प्रदर्शन… ते अगदी शांतपणे बसले होते.
डॉ. नीरज सक्सेना हे शास्त्रज्ञ, पीएच. डी. धारक आणि एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. कलाम साहेबांच्या सहवासामुळे त्यांच्या विचारांमध्ये झालेला बदल ते स्वतः मान्य करतात—
“सुरुवातीला मी फक्त माझा विचार करायचो; पण कलाम साहेबांकडून इतरांचा आणि राष्ट्राचा विचार करायला शिकलो. ”
खेळ सुरू झाला आणि नीरजजींनी अत्यंत शांतपणे, आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देत ₹३, २०, ००० जिंकले. त्यांना बोनस रक्कमही मिळाली. त्यांच्या हातात अजूनही अनेक लाईफलाईन्स शिल्लक होत्या आणि पुढे मोठी रक्कम जिंकण्याची संधी होती.
कार्यक्रमाला ब्रेक झाला.
ब्रेकनंतर अमिताभ बच्चन म्हणाले,
“चला डॉ. साहेब, पुढे जाऊया. हा आहे अकरावा प्रश्न…”
तेवढ्यात नीरजजी शांतपणे म्हणाले—
“सर, मला खेळ सोडायचा आहे. ”
क्षणभर अमिताभ बच्चनही थक्क झाले.
इतकी चांगली कामगिरी करणारी व्यक्ती, अजून लाईफलाईन्स शिल्लक असताना आणि करोडपती होण्याची मोठी संधी असताना अचानक खेळ का सोडते?
अमिताभजींनी विचारले,
“असं तर आधी कधीच घडलं नाही…”
नीरजजींचं उत्तर मात्र मनाला स्पर्शून जाणारं होतं—
“सर, इतर लोकही वाट पाहत आहेत. ते माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळायला हवी. मी आधीच भरपूर पैसे जिंकलो आहे. माझ्याकडे जे आहे, ते माझ्यासाठी पुरेसे आहे. मला यापेक्षा जास्त काही नको. ”
किती साधं उत्तर… पण किती मोठा विचार!
जिथे प्रत्येकजण “आणखी थोडं… अजून थोडं…” या हव्यासाच्या शर्यतीत धावत आहे, तिथे एखाद्या व्यक्तीने स्वतःहून म्हणावं—
“माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे; आता दुसऱ्याची पाळी. ”
यापेक्षा मोठं समाधान कोणतं?
नीरजजींनी खेळ सोडल्यानंतर पुढची स्पर्धक हॉट सीटवर आली. तिने आपली कहाणी सांगितली. ती म्हणाली की, “आम्ही मुली आहोत, या एका कारणामुळे माझ्या वडिलांनी आम्हा तिन्ही बहिणींना आणि आईला घरातून काढून दिलं. आता आम्ही अनाथाश्रमात राहतो…”
हे ऐकल्यावर मनात एक विचार आला—
नीरजजींनी जर खेळ सोडला नसता, तर कदाचित त्या मुलीला त्या दिवशी हॉट सीटवर बसण्याची संधीच मिळाली नसती.
एका व्यक्तीने स्वतःसाठी मिळू शकणारी संधी सोडली… आणि दुसऱ्याच्या आयुष्यात संधी निर्माण झाली.
हीच खरी श्रीमंती आहे!
आज आपण पैशाच्या, मालमत्तेच्या आणि अधिकाधिक मिळवण्याच्या शर्यतीत इतके पुढे आलो आहोत की, “आपल्याकडे किती आहे? ” यापेक्षा “दुसऱ्याकडे आपल्यापेक्षा जास्त का? ” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे.
वारसाहक्काच्या एका पैशासाठी नाती तुटतात.
मालमत्तेसाठी भाऊ-बहिणी एकमेकांचे शत्रू होतात.
स्वार्थापायी प्रेम, आपुलकी आणि माणुसकी मागे पडते.
पण आयुष्याचा खरा अर्थ कदाचित याच्या अगदी उलट आहे.
सगळं मिळवणं म्हणजे यश नाही;
कधी कुठे थांबायचं, हे समजणं म्हणजे समाधान.
आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतरही दुसऱ्याच्या वाट्याची संधी आपण घेत राहिलो, तर आपल्याकडे संपत्ती कितीही असो—मन मात्र गरीबच राहील.
आणि जेव्हा आपण म्हणतो—
“माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे… आता दुसऱ्याला पुढे जाऊ दे, ”
तेव्हा आपण केवळ एखादी संधी सोडत नसतो;
आपण कुणाच्या तरी आयुष्यात आशेची एक खिडकी उघडत असतो.
कदाचित म्हणूनच देव मंदिरातच नाही, तर अशा माणसांच्या विचारांत आणि कृतीतही दिसतो.
डॉ. नीरज सक्सेना यांच्यासारखी माणसं आपल्याला एक अत्यंत साधा, पण विसरलेला धडा शिकवतात—
‘जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतील, तेव्हा थांबायला शिका…कारण तुमचं थांबणं कदाचित दुसऱ्याच्या पुढे जाण्याची सुरुवात असेल.
स्वार्थ कमी करा… समाधान वाढवा…
आणि शक्य असेल तिथे स्वतःसाठी मिळालेली संधी दुसऱ्यालाही द्या.
कारण आयुष्याच्या शेवटी आपण किती मिळवलं, यापेक्षा
आपल्यामुळे किती जणांना मिळवण्याची संधी मिळाली—
हेच कदाचित अधिक महत्त्वाचं ठरेल. ‘
मनापासून नमन अशा विचारांना आणि अशा माणुसकीला!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘नाही’ची शिकवण… – लेखक : श्री रविंद्र दातार ☆ रमा मोडक ☆
ध्रुव सिएटलमधील Costco स्टोअरमध्ये गेला होता.
स्टोअरच्या बाहेर त्याला एक छोटा मुलगा दिसला, जेमतेम पाच वर्षांचा. हातात चिप्सची पाकिटं आणि एक छोटा बोर्ड – त्यावर लिहिलं होतं, “स्काऊट चॅरिटी फंडसाठी – एक पाकीट $20”
लोक त्याच्या बाजूने जात होते.
पाच वर्षांच्या मुलाच्या निरागसतेने आणि आत्मविश्वासाने तो एक-एकाला थांबवत होता:
“तुम्हाला एक पाकीट हवंय का? “
काही जण घेत होते.
बरेच जण हसून नम्रपणे म्हणत होते, “नको, थँक्यू. “
पण तो छोटा मुलगा निराश दिसत नव्हता.
तो फक्त हसायचा, पुढच्या व्यक्तीकडे वळायचा आणि पुन्हा प्रयत्न करायचा.
ध्रुव थांबला आणि त्याच्याकडून एक पाकीट विकत घेतलं.
मुलगा आनंदाने हसला आणि म्हणाला, “थँक्यू! “
कुतूहलाने ध्रुवने त्याला विचारलं,
“अजून किती पाकिटं विकायची आहेत? आणि तू इथे किती वेळ थांबणार आहेस? “
त्याचं उत्तर ध्रुव आणि कदाचित आपण सगळेच कायम लक्षात ठेवू.
“100 जण ‘नाही’ म्हणतील तोपर्यंत. “
ध्रुवला आश्चर्य वाटलं.
तेव्हा त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या शिक्षिका म्हणाल्या:
“त्याने किती पाकिटं विकली हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की, या वयात त्याने ‘नाही’ ऐकायला शिकावं… ते स्वीकारायला शिकावं… आणि तरीही पुढच्या व्यक्तीला विचारायचं धाडस ठेवावं. “
काय धडा होता हा!
आपण आपल्या मुलांना यशस्वी कसं व्हायचं, हेच शिकवण्यात किती वेळ घालवतो.
मन लावून अभ्यास कर.
पहिला नंबर आण.
स्पर्धा जिंक.
सिलेक्ट हो.
अजून जास्त मिळव.
पण कदाचित आपण त्यांना देऊ शकणारी सगळ्यात मोठी भेट म्हणजे त्यांना अपयश कसं पचवायचं, हे शिकवणं.
आत्मविश्वास न गमावता ‘नाही’ कसं ऐकायचं.
हरल्यासारखं न वाटता नकाराला कसं सामोरं जायचं.
पडूनही पुन्हा उठायला न घाबरणं.
एक नकार म्हणजे आपली किंमत संपली नाही, हे समजणं.
कारण आयुष्य नेहमीच ‘हो’ म्हणणार नाही.
कधी परीक्षा नापास होऊ, कधी संधी हुकतील, कधी मुलाखतीत नाकारले जाऊ, नाती तुटतील आणि स्वप्नांना वेळ लागेल.
यश आपल्याला आनंदी करतं.
पण अपयश हाताळायला शिकणं आपल्याला मजबूत करतं.
तो पाच वर्षांचा छोटा मुलगा Costco बाहेर फक्त चिप्स विकत नव्हता.
तो धाडसाचा सराव करत होता.
तो ‘नाही’ गोळा करत होता.
तो जिद्द शिकत होता.
तो आयुष्यासाठी तयार होत होता.
म्हणून आपल्या मुलांना फक्त,
“तू जिंकलास का? ”
असंच न विचारता, कधी तरी हेही विचारूया,
“तू अपयशानंतर पुन्हा प्रयत्न केलास का? “
फक्त यशासाठी तयार असलेलं मूल घडवू नका.
अपयशाला न घाबरणारं मूल घडवा.
त्या शिक्षिकेला सलाम.
त्याच्या आई-वडिलांना सलाम.
आणि त्या छोट्या मुलाला सलाम, ज्याने मोठ्या जगाला खूप मोठा धडा शिकवला:
कधी कधी, एका ‘हो’ पेक्षा शंभर ‘नाही’ जास्त शिकवून जातात.
लेखक: श्री रविंद्र दातार
प्रस्तुती : रमा मोडक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गणपती बाप्पांचं विसर्जन…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
एकदा माझ्या एका ख्रिश्चन मित्राने मला सहज विचारलं,
“तुम्ही गणपती बाप्पांना इतक्या श्रद्धेने घरी आणता, दहा दिवस पूजा करता, आरती करता, नैवेद्य दाखवता… आणि मग त्याच बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन का करता? “
प्रश्न अगदी मनापासून विचारलेला होता.
मी त्याला म्हणालो,
“मित्रा, गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे देवाला निरोप देणं नाही; तर एका गहन सत्याची जाणीव करून घेणं आहे. “
परंपरेत गणपतीची मूर्ती मातीची बनवली जाते. आपण त्या मूर्तीत देवत्व अनुभवतो, तिची श्रद्धेने पूजा करतो आणि शेवटी ती मूर्ती पुन्हा पाण्यात विलीन होते. म्हणजेच जे निसर्गातून आलं, ते पुन्हा निसर्गात विलीन होतं.
मूर्ती विरघळते… पण श्रद्धा विरघळत नाही.
रूप नष्ट होतं… पण देवत्व नष्ट होत नाही.
यात आपल्या जीवनाचाही एक सुंदर संदेश दडलेला आहे.
आपण या जगात येतो, काही काळ जगतो, घर बांधतो, पैसा कमावतो, नाती जोडतो, सुख-दुःख अनुभवतो… आणि शेवटी हे शरीरही पंचमहाभूतांत विलीन होतं.
मग कशाचा अहंकार?
कशाचा गर्व?
कशासाठी द्वेष?
कशासाठी मनात राग आणि वैर?
गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला सांगतं—
“आलो आहोत… एक दिवस जायचं आहे. “
म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत—
प्रेमाने जगा.
आनंदाने जगा.
२०२६शक्य असेल तिथे माफ करा.
नाती जपा.
आणि शक्य तितका दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करा.
कारण उद्या आपल्याकडे वेळ असेलच, याची खात्री नाही.
म्हणूनच गणपती बाप्पांचं विसर्जन हा केवळ एका मूर्तीचा निरोप नाही…
तो आपल्या जीवनाला दिलेला एक सुंदर संदेश आहे —
“रूप तात्पुरतं आहे, पण प्रेम, श्रद्धा आणि चैतन्य शाश्वत आहेत. “
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!
*
लेखक:अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
☆ “एक खास बर्थडे पार्टी…” – लेखक – व.पु.काळे☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
एका मित्राच्या बर्थडेची पार्टी होती.एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती.मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते..”हाय हॅलो “वगैरे सगळं झालं.मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले..पार्टी रंगात येऊ लागली होती.मग जेवणाच्या आधी ‘ड्रिंक्स & डान्स ‘चं आयोजन होतंच.
सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले..डी.जे. चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं..नाचायला पूर्ण तयार झालेली लोकं, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती.आणि गाणं सुरु झालं..
“गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया ..मंगलमूर्ती….” सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले.बर्थडे पार्टी,हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? ‘ गजानना गणराया ‘? लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली..शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, “ए,हे काय..?पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार “- तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला..
“मित्रांनो..माझी बर्थडे पार्टी आहे.आता पार्टी म्हटली की त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना? अर्थात असणारच..पण जसं एखाद्या पार्टीत, हे ‘गजानना गणराया ‘ गाणं शोभत नाही ना,तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवातदेखील एखादं पार्टी सॉन्ग शोभत नाही..पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही.. ‘आपल्याला काय करायचंय ‘ म्हणून सोडून देतो..पण हे चुकीचं आहे..गणेशोत्सव हा ‘उत्सव ‘आहे आणि गणपती हा आपण देव मानतो.त्याला Show -Piece करून ठेवू नका..आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना,तसाच विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा..D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो..उत्सवाची नाही..हे लक्षात ठेवा..हातात दारूचे ग्लास,पार्टीत बरे वाटतात..गणपतीच्या मिरवणुकीत नाही..विरोध दर्शवा.आपण गप्प बसतो, म्हणून हे खूळ बोकाळलंय..सगळीकडे दारू आणि डी.जे. चालणार नाही, हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना..
अशा उत्सव मंडळांना वर्गणी,देणगी जाहिरात देऊ नका, जिथे असला थिल्लरपणा चालत असेल..मग बघा परिवर्तन होतं की नाही ते..आणि..सो सॉरी.मला ही गोष्ट खटकते..गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत..आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती.म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं..Now enjoy your Party, Friends ..” -म्हणत हा खाली उतरला..टाळ्यांचा कडकडाट झाला..
मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं ..हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “काळे, लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं..कशी वाटली आयडिया ? ” -तसं मी हसत म्हटलं, ” साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट!चियर्स “..
लेखक:व. पु. काळे
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈