मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

झोपडीच्या दारासमोर आज

हजारो दुर्गा उदास बसल्यात

बंगल्यातल्या दुर्गा नवरात्रीला

नऊ रंगाच्या साड्या नेसल्यात …. 

 

नऊ दिवसाला नऊ रंगाच्या

साड्या नेसणे गुन्हा नाही

हजारो साड्या कपाटाची

शोभा बनणं बरं नाही …. 

 

अंगाची अब्रू झाकण्या,

हजारो दुर्गा आहेत बेजार

कपाट तुमचं रिकाम करून

बना त्यांचा तुम्ही आधार …. 

 

देवळातील देवीला वाहता

हजारोचे भरजरी पातळ

कधीतरी डोळे उघडून बघा

गरीब महिलांच्या साडीचे ठिगळ …. 

 

श्रद्धेला तुमच्या विरोध नाही

तुम्ही तुमच्या जीवावर करता

मी  बिचारा आपला

तुम्हाला सांगण्यापुरता …. 

 

झोपडीत एकदा डोकावून पहा

तुमची साडी तिला नेसवा

नक्कीच सांगतो मिळणारा

आनंद नसेल फसवा …. 

 

गरिबांच्या झोपडीत उधळा

नवरात्रीचे नऊ रंग

कधीच होणार नाही

तुमच्या भक्तीचा बेरंग …… 

 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आताशा कनेक्ट होणं शिकलेय मी. नव्हे, फारच एन्जॉय करतेय म्हणा ना हवं तर.आणि हो. या कनेक्ट होण्याच्या खेळात सुरेख रिटर्न गिफ्ट पण मिळतं ते वेगळंच.

आता म्हणाल, हे काय नवीन? 

खूप सोप्पंय हो हे सगळं.

‘मॉर्निंग वॉक’ला जाताना प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या फुलांच्या गालिच्यातील  नारंगी देठ असलेली दोन शुभ्र फुलं हलकेच हातावर घेऊन नाकाजवळ नेली.त्यांचा सुवास थेट मनाला भिडला आणि कनेक्ट झाले मी त्यांच्याशी!

माहीत नाही, कशा कोण जाणे,मस्तिष्कातून मनापर्यंत चेतातंतूनी संवेदना वाहिल्या आणि पुढचे चार पाच तास त्या परिमलाने दरवळून टाकले.

मिळाले नं मला रिटर्न गिफ्ट…!

अशा शेकडो गोष्टी होत असतात; चांगल्या वाईट.

आपल्या सभोवताली. फक्त आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. बस्स!

परवा कामवाली सुजलेले डोळे आणि रडलेला चेहरा करून आली कामाला. तिच्या डोळ्यात पाहिलं तर नजर चुकवली तिने. काहीच न बोलता वाफाळलेला चहाचा कप आणि दोन बिस्कीट ठेवली तिच्या समोर, तशी चहाचा घोट घेत मोकळी झाली. मनात साचलेली सल बाहेर निघाली.

तिच्याशी कनेक्ट होताना हलकेच माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण जातांना हसून “येती व्ह ताई,”म्हणून माझं रिटर्न गिफ्ट मला देऊन गेली.

बरं या कनेक्ट होण्याला जात, पात, धर्म, वर्ण, शिक्षण, सुबत्ता, सुंदरता या कशाचीही गरज नसते. फक्त लागते ती मनाची थोडी वेगळी मांडणी.

खेड्यातून शहरात आलेली मी, रमते थोडी गावाकडच्या वातावरणात. मग आठवडी बाजाराच्या दिवशी कधी मावशी, कधी मामा तर कधी दादा भेटतो त्या अनोळखी माणसांच्या गर्दीत. “कश्या आहात मावशी..?” एवढे दोनच शब्द पुरतात कनेक्ट व्हायला!

मग त्या गर्दीतून कुठूनतरी आवाज येतो, “ताई मेथीच्या ताज्या जुड्या ठेवल्यात गं.घेऊन जा.”

बळेच कडीपत्त्याच्या चार काड्या, भरलेल्या भाज्यांच्या पिशवीत खोचतात कोपऱ्यात बसलेले आजोबा, तर माप झाल्यावरही एक पेरू हलकेच सरकवत, “ठिवा ओ ताई लेकरांना.” म्हणणारा मामा सापडतो, घरी परतताना पिशवीसारखं मनही भरून जातं!

मुलांच्या क्लासबाहेर त्यांची वाट पाहत थांबलेले असतो आपण, मधूनच आठ दहा मुलांचा घोळका गोंधळ घालत येतो बाहेर. हसी मजाक, आरडाओरड, एकमेकांना चिडवत स्वतःतच रमलेली असतात ती.

हळूच आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो अन् मनाच्या कोपऱ्यातील आपला ब्लॅक अँड व्हाइट कॉलेज कट्टा समोर येतो, नकळत त्या कट्ट्यावर चहाचा ग्लास घेऊन आपण बसतो. मग आपोआपच हात मोबाईल कडे जातो.

जुन्या मैत्रिणीचा नंबर डायल केला जातो. मग तासभर झालेल्या गप्पांमध्ये आपणही वय विसरून त्या घोळक्यातील एक होऊन जातो. मग पुढचे कित्येक दिवस हे रिटर्न गिफ्ट सांभाळतो आपण.

आयुष्य तेवढं रटाळ नक्कीच नाही.थोडंसं हरवून बघा.काढून टाका हा ‘शहाणपणाचा मुखवटा’.थोडे वेडेच व्हा कधीतरी.

म्हणजे बघा.

ऑफिसमधून घरी परतताना पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांसोबत फुटबॉलला किक मारून बघा आणि उडवून टाका सगळ्या चिंतांना.

कधीतरी चाखून बघा थंडगार आईस-गोळा. लागू द्या तो नारंगी, लाल, पिवळा, हिरवा रंग ओठांना.

नकाच राहू एक दिवस टापटीप.होऊ द्या केसांना अस्ताव्यस्त, घाला तोच घळघळीत पण मनाला रिलॅक्स करणारा जुना ड्रेस.

वाचत पडा एखादं सुंदर पुस्तक आणि भिडू द्या मनाला बॅकग्राऊंडमधील लतादीदींच्या सुरेल सूर.

नाटक पाहताना आवडलेल्या एखाद्या डायलॉगला उठून दाद देऊन पाहा.

जगून पाहा एखादा उनाड दिवस आपल्या स्वतःसाठीच!

आवडली का कल्पना कनेक्ट होण्याची?

तर सुरू करा मनाचा योगा मग बघा किती सुंदर सुंदर रिटर्न गिफ्टस् मिळतात ते.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवरात्री जागर… — लेखिका : सुश्री मीनल सरदेशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नवरात्री जागर… — लेखिका : सुश्री मीनल सरदेशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

मैत्रिणींनो नवरात्रोत्सव सुरू होतोय.  घरोघरी घटस्थापना होईल. अनेक मैत्रिणी आटापिटा करून कुलाचार जपण्याचा प्रयत्न करतील. हे करताना एक लक्षात ठेवा: मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी तर घर आनंदी. त्यामुळे तेवढंच करा, जेवढं तुम्हाला मनापासून करावंसं वाटतंय, शारीरिक दृष्ट्या झेपतंय!

एखादीची भक्ती तिच्या सुंदर रांगोळीत दिसेल तर एखादीची भक्ती देवीची स्तोत्र पठण करण्यात असेल. एखादीला मनापासून रांधून देवीला तृप्त करण्यात समाधान मिळेल. एखादीला माणसाच्या सेवेत आपली देवी भेटल्याचा आनंद मिळेल. दिवसरात्र माळ हातात घेऊन, एका डोळ्याने सुनेने सगळं केलं ना इकडे लक्ष असेल, तर ती जपमाळ काय कामाची?

जे कराल ते मनापासून पटतंय, म्हणून करा. मनावर ओझं देवी देत नाही. तिला तुम्हाला आनंदी बघायलाच आवडतं. पिढी दर पिढी चालत आलंय ते करावंच लागतं, म्हणून ओझं घेऊन करू नका. प्रेमाने सुंदर सजवलेली चार फुलं सुध्दा देवीच्या दरबारी नक्की रुजू होतात.

एक गोष्ट सांगते. कोणतीही गोष्ट करताना पुढच्या पिढीने तस्संच केलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवू नका.कदाचित त्या पिढीच्या भक्तीच्या संकल्पना वेगळ्या असतील.

बकरीच्या गोष्टीसारखं एकीने उडी मारली म्हणून दुसरीने मारली असं नको. सजगतेने सण  उत्सव साजरे करा.

माझे बाबा मला सांगत असत. दोन हस्तक आणि तिसरं मस्तक एकत्र आलं की मनोभावे नमस्कार कर. फक्त ते मनापासून वाटू दे. एक मात्र कर. अडल्या नडल्याला मदत करताना हात आखडता घेऊ नकोस. माणसातल्या देवाला शोध. त्याची आरास कर, पूजा मांड. तिथे देवी नक्की येईल खात्री बाळग!

पूजा मीही करणार आहे. पण माझ्या मनातल्या देवीची. छान ताज्या फुलांची आरास करून.प्रसन्न देवघरात. मला जमेल तशी. कदाचित श्रीसूक्त तोंडपाठ नसेलही पण तरीही घरची गृहलक्ष्मी प्रसन्न असली की तिने घातलेली साद ऐकून माझ्याकडे आनंदाने वास करील माझी अंबाबाई, हो ना!

सूचना: नऊ  दिवस मिळालेच पाहिजेत म्हणून पाळी मागे पुढे करायला गोळ्या खाऊ नका.देवी घरातल्या सगळ्यांची आहे आणि आता बाजारात  सहज सर्व उपलब्ध असल्याने नैवेद्य करणं फार अवघड नाही.

लेखिका :मीनल सरदेशपांडे,रत्नागिरी.

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिंतामुक्त कसे व्हावे?…” – लेखक : स्वामी विज्ञानानंद ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिंतामुक्त कसे व्हावे?…” – लेखक : स्वामी विज्ञानानंद ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

बायको घरात फार कटकट करते म्हणून एखाद्या माणसाने घर सोडून रानात जावे, यासारखे मूर्खपण कोणते? अरे, तुला एका अबलेची कटकट वाटते, तर रानातला लांडगा तुझ्याकडे टकमक पाहात राहील, तेव्हा तुझे काय होईल? भातात खडा सापडला, म्हणून तू घरातून निघून जातो आहेस, त्या जंगलात तुलाच खाऊन टाकण्यासाठी वाघ खडा आहे.

संकटामध्ये पलायनवाद हा सोपा वाटतो; पण तो तसा नसतो. तुकाराम महाराजांच्यासारखे संत म्हणूनच सांगतात,

नको गुंतो भोगी

नको पडो त्यागी।

लावूनि सरे अंगी देवाचिया॥

सुख मिळत नाही म्हणून त्रागा करण्यापेक्षा, सुखाच्या वेळीसुद्धा तू देवाला भागीदार करून घे. म्हणजे दुःख आपोआप भागले जाईल. देवमातेच्या खांद्यावर, कडेवर तू सुरक्षित नाहीस, ही भावनाच खोटी. देवमातेच्या कडेवर एकदा बसले म्हणजे मखमलीवरून चालण्याचे सुखही त्या मातेलाच आणि मध्ये काटेरी वाटेचे बोचरे दुःखही तिलाच. यापेक्षा अधिक उत्तम मार्ग शिल्लक नाही.

 संकटे काय ती सामान्य माणसाला असतात, ही समजूत खोटी आहे. संकटे भक्तांना जास्त असतात. आणि देवाच्या आयुष्यात संकटांचा कळस असतो. राम, कृष्ण, शिव, सगळ्यांच्या जीवितामध्ये संकटांचे कळस झाले. आणि तसे ते झाले म्हणून लोकांनी त्यांच्या मूर्तीवर कळस चढवून, देवमंदिरे बांधली.

संकटे यावी लागतात, ती सोसावी लागतात, त्यातच पुरुषार्थ असतो. छोट्या चमत्कारात नव्हे.

लेखक :स्वामी विज्ञानानंद

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी मस्त आहे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी मस्त आहे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

   वय झाले अजून मस्ती गेली नाही 

   विचार धावतात पण शरीर साथ देत नाही

   कळते आहे पण वळत नाही 

   कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

  काय होतय सांगता येत नाही 

  दुखतात गुडघे सांगायचे नाही

  कुणाकडे जाता येत नाही 

 सावकाश चालायचे हेच आता उरले 

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

  थकले शरीर जरी 

  नजर अजून शाबूत आहे

  थकल्या जीवाला 

  थोडी उभारी देत आहे

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

   दात पोखरून टोप्या घातल्यात

   तेव्हा कुठे दुःख थांबले 

   कुस्करून खाल्ले 

   तेव्हां पचायला लागले  

   तरी पण मी मस्त आहे….. .

 

   वाचायला घेतले धुरकट दिसते 

   चष्मा लावला तर पाणी सुटते 

   डोळे पुसत वाचण्यापेक्षा 

    न वाचलेले परवडते 

   तरी पण मी मस्त आहे….. 

 

   लिहायला घेतले तर हात कापतात

   शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात 

   साधी स्वाक्षरी पण धड येत नाही 

   चेक परत का येतात तेच समजत नाही 

   तरी पण मी मस्त आहे….. 

 

   काळेनिळे मोजे उलटून सुलटून पहातो 

   तरीसुद्धा कधीतरी रंग धोका देतो 

   उलटा बनियन तर नेहमीच असतो 

   तरी बरे तो आत झाकला जातो 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

   कानात हुंकार वाजत असतात 

   शब्द अस्पष्ट ऐकू येतात 

   अनुभवाने समजून  घेतो 

   आणि मगच उत्तर देतो 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

    वाचयला घेतले तरी लक्ष लागत नाही 

    वाचलेले सुद्धा काही लक्षात रहात नाही 

    मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही 

    समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही 

    तरी पण मी मस्त आहे….. 

 

    बरेच आयुष्य जगून घेतले 

    अजून थोडे बाकी आहे 

    उरलेले मात्र सुखात जावे 

    एवढीच इच्छा बाकी आहे 

    तरी पण मी मस्त आहे…. 

 

   संसाराचे सारे पाश 

   आता पूर्ण सोडायचे आहेत

   उरलेली पुंजी संपेपर्यंत

   आनंदी जगायचे आहे

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

   आपल्याच धुंदीत जगलो आहे 

   पाहिजे ते मिळवले आहे

   उपभोगून आयुष्य सारे

   गात्रे शिथिल होत आहेत

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

  आयुष्यात ज्यांनी साथ दिली 

  काहींनी मधेच साथ सोडली 

  कोणाचेच काही अडलं नाही

  तरी सर्वांचा मी आभारी आहे

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

  प्रत्येक जण एकटाच जन्म घेतो आणि मरतो

  जन्म घेतांना स्वतः रडतो बाकी खुश होतात

  मरतांना आपण शांत असावे

  बाकी काय करतात त्यांची चिंता नाही

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

   भार कोणावर टाकायचा नाही 

   झटपट मात्र बोलावणे यावे 

   इतरांना हवे हवे वाटतांना 

   आपण निसर्गात विलीन व्हावे 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

  आणि  तिथे पण मी मस्त रहावे….

 

कवी : अज्ञात 

(सर्व वरिष्ठ नागरीकांना समर्पित… (मी पण)) 

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टक टक…” – लेखक : श्री अविनाश देशमुख ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “टक टक…” – लेखक : श्री अविनाश देशमुख ☆ श्री मोहन निमोणकर ☆

…काळीज पिळटवून टाकणारी एक घटना….

एका घरामधे पेपर टाकायला मुलगा गेला होता, पण त्या गृहस्थाची बाहेर लावलेली टपालपेटी बंद करून टाकलेली होती. म्हणून त्या मुलाने दरवाजावर टक टक केले. एका वयस्कर व्यक्तीने लटपटत्या पायाने चालत हळुवारपणे दरवाजा उघडला. मुलाने विचारले, “टपालपेटी का बंद ठेवली आहे. ती व्यक्ती उत्तरली, “मी ती मुद्दामच बंद ठेवली आहे.” आणि पुढे हसून सांगितले, “मला तू वर्तमानपत्र रोज दरवाजा वाजवून अगर बेल वाजवून माझ्या हातात द्यायला हवं.

तो मुलगा विचारात पडला व म्हणाला, “आपल्या दोघांनाही ते गैरसोईचे आहे आणि माझा जास्त वेळ जाईल”. ते गृहस्थ म्हणाली, “मी तुला जादा रू.५००/- दरमहा दरवाजा वाजवणे किंवा बेल वाजवण्याचे देईन”. त्या व्यक्तीने पुढे म्हटले, “जर असा एखादा दिवस आला की, तू दरवाजा वाजवलास व मी उघडला नाही, तर तू पोलिसाना कळव”.

त्या मुलाला धक्का बसला व त्याने विचारले, “का”? ते गृहस्थ म्हणाले, “माझी बायको हल्लीच वारली, मुलगा परदेशी असतो व म्हणून मी एकटाच आहे. कुणास ठाऊक माझा नंबर कधी येईल ते”! मुलाला त्या गृहस्थांच बोलण हे जड मनाने व डोळ्यात अश्रू आणून केल्याच दिसल. त्या गृहस्थाने पुढे सांगितले, “मी कधीच पेपर वाचत नाही व फक्त दरवाज्यावरील टकटक ऐकण्यासाठी किंवा बेलचा आवाज ऐकण्यासाठी, तसेच ओळखीच्या माणसाला पाहणे व त्याच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी पेपर सुरू केला आहे”. पुढे त्या गृहस्थाने त्या मुलाचे हात हातात घेऊन व त्याला आपल्या मुलाचे कार्ड देऊन सांगितले, “जर एखाद्या दिवशी मी दरवाजा उघडू शकलो नाही तर, पोलिसांना सांग व माझ्या मुलालाही कळव”.

म्हणजे जगात अशी एकटे राहणार्‍या बर्‍याच वृद्ध व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील. तुम्हाला वाटेल की, अशा व्यक्ती तुम्हाला रोज सकाळ-संध्याकाळ व्हाट्स ॲप वर का संदेश पाठवीत असतील? खर तर हे दरवाजावर टकटक करण किंवा दरवाजावरील बेल वाजवण्यासारखेच आहे. आपण अजून सुखरूप असण्याचा संदेश देणेच आहे.

आपण आपल्या आसपासच्या वृद्ध गृहस्थांना व्हाट्स ॲप वापरायला शिकवा, म्हणजे एखाद्या दिवशी संदेश आला नाही तर ती व्यक्ती आजारी असू शकेल किंवा त्या व्यक्तीच काही बरवाईट झाल असेल अस वाटून तुम्ही चौकशी तरी करू शकाल. आता तुम्हाला रोज संदेश पाठवण्यामागच कारण लक्षांत आल असेलच!

लेखक : अविनाश देशमुख,  शेवगाव

सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शास्त्रीजी…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘शास्त्रीजी…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

 … फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी 

…  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी

… गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी

… वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी

… पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी

… एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी

… गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी 

… पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी

… पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी 

… पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी.

मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नीकडून वसूल केले.

साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी, ….  त्यांना अनंत दंडवत….

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ळ‘ चा लळा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ळ‘ चा लळा…☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.

त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, * ल * व  *ळ * च्या मधला करतात. तर काही वेळेस  ल  करतात. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.

पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त  नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.

भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृतमधे सध्या ळ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे.

ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणामुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते ? असे अनेकांना वाटत असेल कदाचित. हिंदीत कमल व मराठीत कमळ … ल काय , ळ काय..काय फरक पडला?

पण तसे मराठीत होत नाही. ल की ळ यावरून अर्थामध्ये  फरक पडतो.

काही शब्द पाहू…. 

अंमल – राजवट // अंमळ – थोडा वेळ

वेळ  time //  वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा खलबत्ता मधील खल //  खळ- गोंद

पाळ – कानाची पाळ //  पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी // 

नाळ – बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल – निवडणूकीचा कल, झुकाव //  कळ – वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण

लाल – लाल रंग // लाळ – थुंकी

ओल – पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा // ओळ – रेघ

मल – शौच //  मळ – कानातला, त्वचेचा मळ ..  यापासून गणपती झाला.

माल – सामान //  माळ – मण्यांची माळ, हार

चाल – चालण्याची ढब .. त्याची चाल ऐटदार आहे वगैरे // चाळ –  नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना .. जनता दल, पुरोगामी लोकशाही दल // 

दळ – भाजी अथवा फळाचा गर , वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट //  छळ – त्रास

काल – yesterday //  काळ – कालखंड वगैरे, मृत्यु

गलका – ओरडा आरडा //  गळका – पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

 

…. तरी आपली भाषा जपा… इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.

खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,

हिंदीत.खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते.. खाली होत नाही.

 

ळ अक्षर नसेल तर पळ वळ मळ जळ तळ .. ह्या क्रिया कशा करणार ?

तिळगुळ कसा खाणार ?.. टाळे कसे लावणार ?.. बाळाला वाळे कसे घालणार  ?

चाळे कसे करणार ? .. घ डया ळ नाही तर सकाळी डोळे कसे  उघडणार  ?

वेळ पाळण।र कशी ?

मने जु ळ ण।र कशी ?.. कोणाला गळ कशी घालणार ?

तळे भरणार कसे ?.. नदी सागराला मिळणार कशी ?

हिवाळा उन्हाळा पावसाळा .. नाही उन्हाच्या झळा.. नाही पागोळ्या

 

कळी कशी खुलणार  ?.. गालाला खळी कशी पडणार ?.. फळा शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा

सगळे सारखे.. कोण  निराळा ?

दिवाळी होळी सणाला  काय ?.. कड़बोळी पुरणपोळी ओवाळणी पण नाही ?

भोळा सांब सावळा श्याम.. जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ?

मातीची ढेकळे नांगरणार कोण.. ढवळे पवळे बैल जोततील कोण ?

निळे आकाश , पिवळा  चाफा.. फळा फुलानी बहरलेला .. नारळ केळी जांभूळ  आवळा 

 

काळा  कावळा पांढरा बगळा

ओवळी बकुळी वासाची फुले.. गजरा  माळणे होईल पारखे

अळी मिळी गुपचिळी .. बसेल कशी दांतखिळी

नाही भेळ नाही मिसळ.. नाही जळजळ नाही मळमळ

पोळ्या लाटल्या जाणार नाहीत .. टाळ्या आता वाजणार  नाहीत

जुळी तिळी होणार नाहीत.. बाळंतविडे बनणार नाहीत

तळमळ कळकळ वाटणार  नाही.. का ळ जी कसलीच  उरणार नाही.. 

.. पाठबळ कुणाचे  मिळणार  नाही

 

* ळ * जपा .. !

मराठीचे सौंदर्य जपा…!  

“ ळ “ शिवाय सगळेच  * बळ * निघून जाईल आणि काहीच कळेनासे होईल..!! 

” कळलं ” ?? 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !!!… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !!!… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !.. बघा ना…

शिक्षण घेत असताना ‘ विद्या ‘

नोकरी उद्योग करताना ‘ लक्ष्मी ‘

अंतसमयी ‘ शांती ‘! 

सकाळ सुरु होते तेव्हा ‘ उषा ‘

दिवस संपताना ‘ संध्या ‘!

झोपी जाताना ‘ निशा ‘

झोप लागली तर ‘सपना’!

मंत्रोच्चार करताना ‘ गायत्री ‘

ग्रंथ वाचन करताना  ‘ गीता ‘ ! 

आपुलकीच्या काळी ‘ नम्रता ‘ 

उद्विग्न पणात ‘ शितल ‘

मंदिरात ‘ दर्शना ‘ ‘ वंदना ‘ ‘ पूजा ‘ ‘आरती ‘अर्चना

…. शिवाय ‘ श्रद्धा ‘ तर हवीच !

वृद्धपणी  ‘ करुणा ‘ .. पण ‘ ममता ‘ सह बरं

आणि राग आलाच तर  ‘ क्षमा ‘ !

जीवन उजळविण्यासाठी ‘उज्ज्वला’ 

कठोर परीश्रम म्हणजे कांचन व साधना ! 

आणि सर्वात महत्वाचं …. 

प्रश्न सोडवायचा असेल तर सुचली पाहिजे ती “कल्पना” 

आनंद मिळविण्यासाठी  ‘कविता’ आणि कविता करण्यासाठी ‘प्रतिभा’ ! 

आणि .. अशा “कविता” रचण्यासाठी असावी लागते जवळ ती “प्रज्ञा”

लेखक : अज्ञात

संग्रहिका : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वाधार प्रकल्प – पर्यावरण उत्सव – इको मेला… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

स्वाधार प्रकल्प – पर्यावरण उत्सव – इको मेला… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

दिनांक ३० सप्टेंबर २०२३ यादिवशी पर्यावरण उत्सव स. ८:०० ते दु. ३:०० या वेळेत झाला. या उत्सवात एकुण ३२ गावातून १८२ जण सहभागी झाले. वेल्हे तालुक्यातील जैवविविधता समजून घेत असताना ही विविधता सर्वांपर्यंत पोहचावी असा उद्देश ठेवून पहिल्या पर्यावरण उत्सवाचे नियोजन करण्यात आले. हा उत्सव पासली येथे सुरू होऊन वेगवेगळ्या ५ गावांमध्ये जाऊन संपला. 

सकाळी ८:३० वाजता पासली येथे शुल्क देऊन आलेले साधारण १०८ पाहुणे व आपल्या ५० कार्यकर्त्या + स्थानिक १५-२० असे १८० जण पोहचल्यावर सर्वांसाठी नाचणी उपमा, घावन चटणी, पोहे असा ज्यांना जो हवा त्याप्रमाणे नाष्टा झाला. 

एकीकडे २१ रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ते बघण्याचा आणि माहिती घेण्याचा आनंद सर्वजण घेत होते. त्याचबरोबर बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. तिथे ही कोणी बांबूच्या वस्तू खरेदी केल्या तर कोणी गावरान तूप, नाचणी लाडू, मिश्र धान्य लाडू, नाचणी रवा, हळद, थेपला, पर्स, शेवई… अशी एकुण साधारण १५०००/- रुपयांची विक्री झाली. त्यानंतर सर्वांना एकत्र करुन प्रबोधिनी व प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर सगळा गट केळदची देवराई बघण्यासाठी गेला. तिथे अमृता जोगळेकर व मेधावी राजवाडे या दोघींनी सर्वांना देवराईची माहिती दिली. दु. १:०० या सर्वांचे गट करून ५ गावांमध्ये व्हेज व स्थानिक नॉनव्हेज जेवणासाठी गेले. 

कोफोर्ज मधून ६ जणांचा गट आला होता त्यांनी पुढे निगड्यात जाऊन गटाने वृक्षारोपण केले व जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्या त्या गावात समारोप झाला. *या उत्सवात एकुण ९०,०००/- रुपयांची उलाढाल झाली.

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares