मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे  ✈️

टंगमर्गवरून आम्ही गुलमर्ग इथे गेलो. पायथ्याशीच थंडीचे कोट व बूट भाड्याने घेतले. गोंडेला राइड ( केबल कार राइड ) जिथून सुरू होते त्याच्या दीड किलोमीटर आधी आपल्या गाड्या थांबतात. तिथून बर्फावरील स्लेजने, स्थानिक सहाय्यकांच्या मदतीने गोंडेला स्टेशनवर पोहोचता येते किंवा बर्फ बाजूला केलेल्या चांगल्या रस्त्यावरून थोडासा चढ चढून चालत जाता येते. आम्ही रमतगमत चालण्याचे ठरवले. प्रवाशांचे जत्थे कुणी चालत तर कुणी स्लेजवरून गोंडेला स्टेशनला जात होते .प्रवाशांना ओढत नेणाऱ्या स्लेज गाड्यांची उजवीकडील बर्फातील रांग आणि डावीकडील अर्धी बर्फात बुडलेली घरे पाहत गोंडेला स्टेशनवर पोहोचलो. खूप मोठी रांग होती. चार- चार प्रवाशांना घेऊन गोंडेला (केबल कार्स ) जात होत्या. त्यात धावत्या गाडीत बसल्याप्रमाणे पटकन बसल्यावर दरवाजे बंद झाले. खालीवर, सभोवती पांढरे शुभ्र बर्फच बर्फ. काही धाडसी ट्रेकर्स ती वाट चढून जाताना दिसत होते. त्यांच्या गुडघ्यापर्यंत आत गेलेल्या बुटांच्या खुणा गोंडेलातून स्पष्ट दिसत होत्या. बर्फात बुडालेली मेंढपाळ गुराखी या गुजर जमातीची घरे रिकामी होती. हे लोक बर्फ वितळेपर्यंत गुरे, शेळ्यामेंढ्यांसह खाली सपाटीवर येऊन राहतात व नंतर परत आपल्या घरी येतात. पश्मिना या एका विशिष्ट जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीच्या पश्मिना शाली हलक्या, उबदार असतात. महाग असल्या तरी त्यांची नजाकत और असते.

गोंडेलाने पहिल्या टप्प्यापर्यंत म्हणजे कॉंगडोरीपर्यंत गेलो. त्यापुढचा अफरबटचा टप्पा इथून धुक्यात हरवल्यासारखा दिसत होता. पण हौशी, धाडसी प्रवासी तिथेही जात होते. पहिल्या टप्प्यावर उतरून तिथे बांधलेल्या लाकडी कठड्यांवर निस्तब्ध बसून राहिले. नगाधिराज हिमालयाचं दर्शन म्हणजे विराटाचा साक्षात्कार! ते भव्य- दिव्य, विशाल, थक्क करणारं अद्भुत दर्शन आज युगानुयुगे तिथे उभे आहे.  अभेद्य कवचकुंडलासारखे आपले संरक्षण करीत चिरंजीवित्वाने ताठ उभे आहे. अशावेळी वाटतं की, आपण असणं आणि नसणं ही फार फार क्षुल्लक गोष्ट आहे. हे सनातन, चिरंतन वैभव आहे म्हणून आपल्या अस्तित्वाला किंचित अर्थ आहे.

थोड्याच दिवसात तिथे स्कीईंग कॉम्पिटिशन सुरू होणार होत्या. त्यात भाग घेणारी तरुणाई तिथे उत्साहाने प्रॅक्टिस करीत होती. हौशी प्रवासी स्कीईंगची मजा घेण्यासाठी तिथल्या लोकांच्या सहाय्याने धडपडत होते. आम्ही स्लेजची राइड घेतली. छोट्याशा लाकडी चाकवाल्या फळकुटावरून, मागेपुढे मदतनीस घेऊन बर्फाच्या गालीच्यावरून थोडे चढून गेलो आणि त्यांच्याच मदतीने घसरत परतलो.  आल्यावर गरम- गरम छान कॉफी प्यायल्यावर थोडे उबदार वाटले. गरम चहा, कॉफी, भेळ, सँडविच सारा नाश्ता अगदी तयार होता.स्वित्झर्लंडला जुंगफ्रा येथे लिफ्टने वर जाऊन बर्फात जायच्या आधी गरम- गरम टोमॅटो सूप घेतले होते तेव्हा त्या व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. तेही आता उरले नाही. ‘हम भी कुछ कम नही’ हे सप्रमाण सिद्ध  झाले.

जम्मू ते श्रीनगर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची जोरदार उभारणी सुरू आहे. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे बरेचसे काम झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर काश्मीर खोऱ्याच्या गरजा द्रुतगतीने पूर्ण होतील आणि पर्यटनातही चांगली वाढ होईल.

असे सतत जाणवत होते की सर्वसामान्य काश्मिरी माणसाला असे तणावपूर्ण आयुष्य नको आहे. गरिबी आणि अज्ञान यामुळे त्यांच्यापुढील  मार्ग बदलले आहेत. अजूनही तरुणांची दिशाभूल करून त्यांना  दहशतवादाच्या मार्गाला लावले जाते. राजकीय परिस्थितीमुळे या देवभूमीतून ज्यांना विस्थापित व्हावे लागले त्यांचे दुःख फार मोठे आहे. या भूप्रदेशाची कथा आणि व्यथा खूप वेगळी आहे. त्यामुळे  सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय अशा अनेक समस्या इथे ठाण मांडून उभ्या आहेत. आपले ‘सख्खे शेजारी’ हर प्रयत्नांनी ही परिस्थिती अशीच ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मदत करणारे ‘विषारी ड्रॅगन’ त्यात भर घालतात.  दहशतवादाची काळी सावली आज साऱ्या जगावर पसरली आहे.

वैष्णोदेवी, कारगिल, लेह- लडाख, अमरनाथ, काश्मीरचे खोरे अशा अनंत हातांनी हिमालय आपल्याला साद घालीत असतो. आपल्या आवडीप्रमाणे, सवडीप्रमाणे या हाकेला आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. शांततापूर्ण सौंदर्याची, समृद्धीची बहुरंगी ट्युलिप्स इथे बहरतील अशी आशा करुया.

भाग ४ आणि श्रीनगर समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पहलगाम इथे खूप मोठी छावणी उभारलेली आहे. यात्रेकरूंची वाहने इथपर्यंत येतात व मुक्काम करून छोट्या गाड्यांनी चंदनवाडीपर्यंत जातात. तिथून पुढे अतिशय खडतर, एकेरी वाटेने श्रावण पौर्णिमेच्या यात्रेसाठी लक्षावधी भाविक सश्रद्ध अंतकरणाने पदयात्रा करतात. हिमालयाच्या गूढरम्य पर्वतरांगांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या आदिशक्तींची अनेक श्रध्दास्थाने आपल्या प्रज्ञावंत पूर्वजांनी फार दूरदृष्टीने उभारलेली आहेत.(चार धाम यात्रा, अमरनाथ, हेमकुंड वगैरे ). हे अनाघ्रात सौंदर्य, ही निसर्गाची अद्भुत शक्ती सर्वसामान्य जनांनी पहावी आणि यातच लपलेले देवत्व अनुभवावे असा त्यांचा उद्देश असेल का? श्रद्धायुक्त पण निर्भय अंतःकरणाने, मिलिटरीच्या मदतीने, अनेक उदार दात्यांच्या भोजन- निवासाचा लाभ घेऊन वर्षानुवर्षे ही वाट भाविक चालत असतात.

सकाळी उठल्यावर पहलगामच्या हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून बर्फाच्छादित हिमशिखरांचे दर्शन झाले. नुकत्याच उगवलेल्या सूर्यकिरणांनी ती शिखरे सोन्यासारखी चमचमत होती. पहलगाम येथील अरु व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी, बैसरन म्हणजे चिरंजीवी सौंदर्याचा निस्तब्ध, शांत, देखणा आविष्कार! बर्फाच्छादित पर्वतरांगांमधील सुरू, पाईन, देवदार, फर, चिनार असे सूचीपर्ण, प्रचंड घेरांचे वृक्ष गारठवणाऱ्या थंडीत, बर्फात आपला हिरवा पर्णपिसारा सांभाळून तपस्वी ऋषींप्रमाणे शेकडो वर्षे ताठ उभी आहेत. दाट जंगले,  कोसळणारे, थंडगार पांढरे शुभ्र धबधबे आणि उतारावर येऊन थबकलेले बर्फाचे प्रवाह. या देवभूमीतले  सौंदर्य हे केवळ मनाने अनुभवण्याचे आनंदनिधान आहे.

पहलगामला एका छोट्या बागेत ममलेश्वराचे (शंकराचे) छोटे देवालय आहे. परिसर बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला होता. शंकराची पिंडी नवीन केली असावी. त्यापुढील नंदी हा दोन तोंडे असलेला होता. आम्ही साधारण १९८० च्या सुमारास काश्मीरला प्रथम आलो होतो. त्या वेळेचे काश्मीर आणि आजचे काश्मीर यात जमीन- अस्मानाचा फरक जाणवला. सर्वत्र शांतता होती पण ही शांतता निवांत नव्हती. खूप काही हरवल्याचं, गमावल्याचं  दुःख अबोलपणे व्यक्त करणारी, अविश्वास दर्शविणारी ,  संगिनींच्या धाकातली, अबोलपणे काही सांगू बघणारी ही कोंदटलेली उदास  शांतता होती.

श्रीनगर भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

वेरीनाग इथल्या निर्झरातून झेलमचा उगम होतो. ‘श्री’ च्या आकारात वाहणाऱ्या झेलमच्या दोन्ही तीरांवर श्रीनगर वसले आहे. श्रीनगरमध्ये फिरताना सफरचंद आणि अक्रोड यांचे पर्णहीन वृक्ष दिसत होते.  बदाम, जरदाळू यांची एकही पान नसलेली सुंदर मऊ पांढऱ्या मोतीया आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेली झाडे दिसत होती. लांबवर पसरलेली मोहरीची शेतं हळदी रंगाच्या फुलांनी डोलत होती तर अजून फुलं न आलेली शेतं काळपट हिरव्या रंगाची होती. थंडी खूपच होती.पायघोळ झग्याआड पोटाशी शेगडी घेऊन जाणारे स्त्री- पुरुष दिसत होते. सर्वत्र तणावपूर्ण शांतता जाणवत होती. रस्तोरस्ती लष्कराची वाहने आणि बंदूकधारी जवान मनातल्या अस्वस्थतेत भर घालीत होती. दुकानांमध्ये कलिंगडे, संत्री, केळी, कमलकाकडी, इतर भाज्या दिसत होत्या. कहावा किंवा कावा या काश्मिरी स्पेशल चहाची दुकाने जागोजागी होती. अस्सल काश्मिरी केशराच्या चार काड्या आणि दालचिनीच्या तुकडा असं उकळत ठेवायचं. त्यात साखर घालायची. एका कपाला एक सोललेला बदाम जाडसर कुटून घालायचा आणि त्यावर केशर दालचिनीचे उकळते मिश्रण ओतायचं. झाला कहावा तयार!

गाईडने दिलेल्या या माहितीमुळे ‘कावा’ पिण्याची इच्छा झाली पण बस मध्येच थांबविणे अशक्य होते.

जहांगीरच्या काळात साधारण चारशे वर्षांपूर्वी निशात बाग, शालीमार बाग, व चष्मेशाही अशा सुंदर बागा बांधण्यात आल्या. तळहाताएवढ्या सुगंधी गुलाबाच्या फुलांचा हंगाम अजून सुरू झाला नव्हता, पण वृक्षांसारखे झाड बुंधे असलेली गुलाबाची झाड लालसर पानांनी बहरून फुलण्याचा तयारीत होती. उंचावरून झऱ्यासारखे वाहणारे पाणी पायऱ्या- पायऱ्यांवरून घरंगळत होते. मध्येच कमळाच्या आकारातली दगडी कारंजी होती. सगळीकडे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर चालू होती.

चष्मेशाहीमध्ये मागच्या पीर- पांजाल पर्वतश्रेणीतून आलेले झऱ्याचे शुद्ध पाणी आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आले. डेरेदार काळपट- हिरव्या वृक्षांना चोचीच्या आकाराची पांढरी फुले लटकली होती. ती नासपतीची झाडे होती.  हिरवा पर्णसंभार असलेली मॅग्नेलियाची (एक प्रकारचा मोठा सुगंधी चाफा ) झाडे फुलण्याच्या तयारीत होती. निशात बागेजवळ ‘हजरत बाल श्राइन’ आहे. हजरत मोहमद साहेबांचा ‘पवित्र बाल’ इथे ठेवण्यात आला आहे. मशीद भव्य आणि इस्लामिक स्थापत्यकलेचा नमुना आहे.मशिदीच्या आत स्त्रियांना प्रवेश नव्हता. मागील बाजूने थोडा पडदा किलकिला करून स्टेनगनधारी पहारेकर्‍याने ‘पवित्र बाल’ ठेवलेल्या ठिकाणाचे ‘दूरदर्शन’ घडविले. स्वच्छ आवारात चिनारची झाडं होती. दल सरोवराच्या पश्चिमेकडील काठावर असलेल्या या मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

श्रीनगरपासून तीन किलोमीटरवर पांडेथ्रान गाव आहे आणि साधारण १४ किलोमीटरवर परिहासपूर नावाचं गाव आहे. या दोन्ही ठिकाणी राजा ललितादित्याच्या कारकिर्दीत म्हणजे आठव्या शतकात उभारलेल्या बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत. अनंतनागपासून चार-पाच किलोमीटरवर मार्तंड देवालयांचा समूह आहे.  डावीकडचे कोणे एकेकाळी भव्य दिव्य असलेल्या सूर्यमंदिराचे भग्नावशेष  संगिनींच्या पहाऱ्यात सांभाळले आहेत.

पहेलगामच्या रस्त्यावर खळाळत अवखळ वाहणारी लिडार नदी आपली सतत सोबत करते. नदीपात्रातील खडक, गोल गुळगुळी दगड यावरून तिचा प्रवाह दौडत असतो. गाईड सांगत होता की मे महिन्यात पर्वत शिखरांवरील बर्फ वितळले की नदी तुडुंब पाण्याने उसळत वेगाने जाते. त्यावेळी तिच्यावरील राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी अनेक देशी-विदेशी प्रवासी येतात. तसेच नदीपलीकडील पर्वतराजीत ट्रेकिंगसाठी अनेक प्रवासी येतात. त्याशिवाय घोडदौड, ट्राउट माशांची मासेमारी अशी आकर्षणे आहेत. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर पोपटी हिरवळीवर वर्ल्डक्लास गोल्फ कोर्टस आहेत. त्यासाठीही हौशी खेळाडू येतात.

पहलगाम रस्त्यावर प्राचीन काळापासून केशराच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं पांपूर( पूर्वीचं नाव पद्मपूर ) लागतं. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जमिनीलगत उगवलेल्या जांभळ्या सहा पाकळ्यांच्या फुलांनी शेतेच्या शेते बहरतात. या फुलांमधील सहा केसरांपैकी केसरिया रंगाचे तीन केसर हे अस्सल केशर असतं. उरलेले तीन हळदी रंगाचे केसर वेगळ्या पद्धतीने वापरले जातात.

श्रीनगर भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी – 23 – राइट हैंड ड्राइव/लेफ्ट हैंड ड्राइव ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं. श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं. तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है. आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है. आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”.)

? यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी – 23 – राइट हैंड ड्राइव/लेफ्ट हैंड ड्राइव ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ?

लक्ष्य की ओर बढ़े चलना जीवंतता है । अमेरिका सहित अधिकांश पश्चिमी देशों में गाडियां सड़क के दायीं ओर चलती हैं और कार की स्टेयरिंग बायीं ओर होती है जबकि भारत में अंग्रेजी शासन के चलते इंग्लैंड के ही नियम लागू रहे, अर्थात भारत में गाड़ियों की स्टेयरिंग दायीं ओर होती है (Right hand driving in India) और गाड़ियाँ सड़क की बायीं ओर चलायीं जातीं हैं.

यूनाइटेड नेशंस आर्गनाइजेशन यूक्रेन युद्ध या कश्मीर समस्या जैसी बड़ी समस्याएं तो सुलझा नहीं पाता कम से कम सारी दुनियां में एक सी ड्राइविंग, एक से बिजली साकेट, एक सरीखी वोल्टेज पर बिजली प्रदाय, एक से मोबाइल चार्जर, वगैरह पर ही कोई सर्वमान्य योजना ले आए तो भी इस वैश्विक दुनियां में आम लोगों को कुछ राहत मिले और यूएनओ अपनी उपयोगिता सिद्ध कर सके। इंटरपोल के जमाने में यदि ग्लोबल ई-वीजा बनने लगें तो युवा पीढ़ी को विज्ञान, व्यापार के सिलसिले में दुनियां एक कर रही है उसे लाभ हो सकता है.

अस्तु, आज नहीं तो किसी दिन यह होगा, इस आशा में प्रसन्न रहना चाहिए.

1792 में सर्वप्रथम अमेरिका के पेन्सिल्वेनिया प्रान्त में सड़क पर दायीं ओर चलने के नियम को लागू किया गया और 18वीं शताब्दी के अंत तक यह नियम पूरे संयुक्त राज्य अमेरिका और कनाडा में अनुसरण किया जाने लगा.

आज दुनियां भर अधिकांश क्षेत्रों में यही दाहिने ओर से चलने का नियम है, इससे भारत, इंग्लैंड या अन्य बाईं ओर से चलने वाले देशों के लोगों को यहां ड्राइविंग में कठिनाई होती है. यद्यपि भारत सहित अन्य देशों के ड्राइविंग लाइसेंस के आधार पर यहां कार चलाने की वैधानिक अनुमति है. रेंटल कार सहजता से मिल जाती हैं. एक शहर से कार लेकर दूसरे शहर में ड्राप किए जाने की सुविधाएं भी आसान हैं. ज्यादातर गाडियां आटोमेटिक गेयर वाली हैं, मतलब बिना क्लच पैडल के केवल दाहिने पैर से ही एक्सेलटर   और ब्रेक के नियंत्रण से कार मजे में दौड़ती हैं. टोल पर कोई बैरियर नहीं है, यदि बिना ई पास के गाड़ी टोल पार करती हैं तो कैमरा नंबर प्लेट की फोटो लेकर ई बिल बना देता है. सड़के चिकनी चौड़ी हैं. लेन पर सभी नियम पूर्वक पर्याप्त दूरी बनाकर चलते हैं. रेलवे क्रासिंग पर भी बैरियर नहीं मिला, केवल लाइट सिग्नल ही हैं. भले ही कोई ट्रैफिक न हो पर कोई भी लाइट सिग्नल की अनदेखी नहीं करता. यहां ड्राईविंग आनंद देती है.

विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

समोर नगाधिराज हिमालयाची झबरबन पर्वतराजी, मागे तीन बाजूच्या निळसर हिरवट पर्वतरांगांच्या कोंदणात  नीलपाचूसारखा चमकणारा दल सरोवराचा विस्तीर्ण जलाशय आणि यामध्ये पसरलेलं ट्युलिप्सच्या अनेकानेक रंगांचं लांबवर पसरलेलं स्वर्गीय  इंद्रधनुष्य! अवाक होऊन आम्ही ते अलौकिक दृश्य नजरेत साठवत होतो. रक्तवर्णी, हळदी, शुभ्र मोत्यासारखी, गुलाबी, जांभळी, सोनपिवळ्या रंगावर केशरकाडी लावल्यासारखी कमळकळ्यांसारखी ट्युलिप्सची असंख्य फुलंच फुलं! साक्षात विधात्याने विणलेला अस्सल काश्मिरी गालिचा पुढ्यात पसरला होता. त्यांच्या मंदमधूर मोहक सुगंधाने वातावरण भारून टाकलं होतं

कुणाच्या कल्पनेतून, प्रयत्नातून साकार झालं असेल हे अनुपम सौंदर्य? या प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी काश्मीर गव्हर्मेंटचे डिस्ट्रिक्ट फ्लोरिकल्चर ऑफिसर डॉक्टर जावेद अहमद शाह यांची मुद्दाम भेट घेतली. इथे ट्युलिप्स फुलविण्याच्या कल्पनेला सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळाला. दल सरोवरासमोरील हिमालयाच्या झबरबन टेकड्यांच्या उतरणीवर थोडं सपाटीकरण करून मोठ्या गादीसारखे वाफे तयार करण्यात आले. ॲमस्टरडॅमहून ट्युलिप्सचे फक्त कंद आयात करण्यात आले. बाकी सारी मेहनत, तंत्रज्ञान हे इथल्या फ्लोरिकल्चर डिपार्टमेंटचे योगदान आहे.

एकूण ७० एकर जागेवर ही फुलशेती करण्यात येते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ट्युलिप्सच्या कंदांची लागवड करण्यात येते. साधारण डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारी संपेपर्यंत साऱ्या श्रीनगरवर बर्फाची चादर पसरलेली असते. लागवड केलेला हा संपूर्ण भूभाग बर्फाने अच्छादलेला असतो .जमिनीच्या पोटातले कंद लहान शाळकरी मुलांसारखे महिनाभर तो भला मोठा बर्फाचा गोळा चोखत बसलेले असतात. साधारण फेब्रुवारीत बर्फ  वितळतं आणि कंदांच्या बालमुठीला हिरवे लसलशीत कोंब फुटतात. त्यांची मशागत करावी लागते. शेळ्या- मेंढ्या, गाई, खेचरं यांचं शेणखत ठराविक प्रमाणात घालतात. तसंच जंतुनाशकं, रसायनिक खतं यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. मार्च अखेर रोपांची वाढ पूर्ण होते.निरनिराळ्या प्रजातीप्रमाणे ही रोपं दीड ते अडीच फूट उंच वाढतात आणि मग बहरतात. या रंगपऱ्यांचं आयुष्य किती? तर तीन ते चार आठवडे! साधारण मार्चअखेर ते एप्रिलअखेर एक महिना हा सारा बहर असतो. अवेळी पाऊस पडला तर तीन आठवड्यातच त्यांच्या पाकळ्या गळून पडतात.

बहर संपल्यावर एक महिना ती झाडं तशीच ठेवतात. जून महिन्यात जमिनीतले कंद नेटकेपणे अलगद काढलेले जातात. ते जपून ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. साधारण १७ ते २३ सेंटीग्रेड उष्णतेत निर्जंतुक करून त्या कंदांना सांभाळण्यात येतं. जरुरीप्रमाणे काही नवीन जातीचे, रंगांचे कंद ॲमस्टरडॅमहून आणण्यात येतात. ऑक्टोबरपर्यंत सारं नीट सांभाळत, जमिनीची मशागत करून पुन्हा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. भारतीय व परदेशी प्रवासी आवर्जून हा अलौकिक नजारा पाहायला गर्दी करतात.

विस्तीर्ण दल सरोवरातून शिकारा सहल करताना शंकराचार्य टेकडीवरील मंदिर, हरी पर्वताची रांग दिसते. सरोवरामध्ये झाडांचं वाळकं गवत, वेली व माती यांचा एकमेकांवर थर बसून इथे अनेक छोटी बेटं तयार झाली आहेत. त्यावर तरंगती घरं, मीना बाजार आहे. पाणथळ जागेतील लहान- मोठ्या झाडांवरून गरुड, खंड्या, बुलबुल यांनी दर्शन दिलं. चार शाळकरी मुली होडीत दप्तरं ठेवून स्वतःच ती  छोटी होडी वल्हवत दल सरोवराकाठी असलेल्या त्यांच्या गावाकडे जात होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्यांना रोज एक तास जायला आणि एक तास यायला  वल्हवावं लागतं तेव्हा त्या श्रीनगरच्या शाळेत पोहोचतात.

श्रीनगरहून पहेलगामला जाताना दुतर्फा चिनार आणि सफेदा यांचे प्रचंड घेरांचे वृक्ष दिसत होते.  चिनारच्या वठल्यासारख्या वाटणाऱ्या पोकळ, प्रचंड घेरांच्या बुंध्यातून चिनारची हाताच्या पंजासारखी पान असलेली कोवळी पालवी लवलवत होती. सफेदा वृक्षांच्या फांद्या घरांच्या उतरत्या छपरांसाठी वापरल्या जातात. विलो, देवदार, फर असे अनेक प्रकारचे वृक्ष होते. विलोच्या झाडांपासून क्रिकेटच्या बॅट बनविल्या जातात.

आठव्या शतकातील ललितादित्य या राजाच्या कालखंडात इथे मंदिर वास्तुकला बहरली होती. त्यानंतरच्या अवंतीवर्मन आणि जयसिंह यांनी ही मंदिर वास्तुकला वैभवसंपन्न केली. राजा जयसिंह याच्या काळात राजकवी कल्हण याने आपल्या ‘राजतरंगिणी’ या दीर्घ काव्यग्रंथात काश्मीरमधील शिल्पवैभवाने नटलेल्या अनेक देवालय समूहांचं सुंदर वर्णन केलेले आहे. ब्रिटिश संशोधक सर ऑरेट स्टेन यांनीही आपल्या संशोधनामध्ये या मंदिरशिल्पांवर प्रकाश टाकला आहे. श्रीनगर- सोनमर्ग रस्त्यावर कनकिनी नदीच्या तीरावरील नारंग येथे भव्य देवालयांचा शिल्पसमूह ग्रानाईटच्या लांबट- चौकोनी दगडांमध्ये इंटरलॉक पद्धतीने बांधलेला होता. त्याच्या अखंड काळ्या दगडातून कोरलेल्या घुमटाचं वर्णन ‘राजतरंगिणी’मध्ये केलेलं आहे. तिथल्या नैसर्गिक नितळ झर्‍यांचं, त्यातील माशांचं वर्णनही त्यात आहे. सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने २००० वर्षांपूर्वी बांधलेलं शिव-भूतेश देवालय याचा उल्लेखही ‘राजतरंगिणी’ मध्ये आहे. आज त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.

श्रीनगर भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 31 – भाग 4 – कलासंपन्न ओडिशा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 31 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

पुरीपासून ५० किलोमीटर अंतरावर ‘सातापाडा’ नावाचं ठिकाण आहे. तिथून चिल्का सरोवराला फेरफटका मारण्यासाठी जाता येतं. चिल्का सरोवराची लांबी ६५ किलोमीटर असून त्याचं क्षेत्रफळ ७८० चौरस किलोमीटर आहे. चिल्का सरोवराच्या ईशान्य भागात दया व भार्गवी या नद्या येऊन मिळतात. हे खाऱ्या पाण्याचं विशाल सरोवर आहे.  समुद्राच पाणी ज्या ठिकाणाहून सरोवरात येतं ते समुद्रमुख बघण्यासाठी मोटार लाँचने दोन तासांचा प्रवास करावा लागतो. सरोवरातील डॉल्फिन दिसतात. हे सरोवर जैव विविधतेने समृद्ध आहे. इथे जवळजवळ २०० प्रजातींचे हजारो स्थलांतरित पक्षी येतात.

संबलपूरहून १६ किलोमीटर अंतरावर महानदीवरील हिराकूड धरण आहे. महानदीचं पूर नियंत्रण, वीज निर्मिती, शेतीसाठी पाणी या उद्देशाने हे मोठं धरण बांधण्यात आलं आहे. पाणी अडविल्यामुळे इथे निर्माण झालेला प्रचंड मोठा तलाव हा आशियातील सर्वात मोठा तलाव समजला जातो.

संबलपुरी नृत्य व संबलपुरी साड्या प्रसिद्ध आहेत. राउरकेला इथला स्टील  प्लॅ॑ट हे ओडिशाचं आधुनिक वैभव आहे. नंदनकानन इथल्या प्राणी संग्रहालयात पांढरे वाघ बघायला मिळतात. इथे मगरींचे प्रजनन सेंटरही आहे.

ओडिशामध्ये मिळणारे ताज्या मासळीचे विविध प्रकार प्रवाशांना आवडतात. मैद्याच्या पारीमध्ये खोबरं व ड्रायफ्रूट्स घालून बनविलेल्या चौकोनी आकाराच्या, वर लवंग टोचलेल्या लवंग लतिका चविष्ट लागतात. दूध नासवून त्या घट्ट चौथ्यापासून जिलबी बनविली जाते. त्याला ‘छेना पोडा’ असं म्हणतात.

पुरीपासून जवळ भुवनेश्वर रस्त्यावर पिपली नावाचं गाव आहे. या गावात कापडाचे आणि आरशाचे तुकडे शिवून खूप सुंदर तोरणं, कंदील, पिशव्या, ड्रेसची कापडं बनविली जातात. त्याला ‘चंदोवा’ कला म्हणतात. अनेक  पर्यटकांची पावले खरेदीसाठी या गावाकडे वळतात. ही कला आता जगप्रसिद्ध झाली आहे.

पुरीहून साधारण दहा किलोमीटरवर रघुराजपूर आहे. या गावातली प्रत्येक व्यक्ती कलावंत आहे. इथल्या सर्व घरांच्या बाह्यभागावर सुबक नक्षी कोरलेली असते. उत्तम शिल्पकार, चित्रकार, लाकडावर नक्षी करणारे कारागीर, रंगकाम करणारे आणि ओडिशाचे वैशिष्ट्य असलेली ‘पट्टचित्र’ या खास कलेत पारंगत असलेले अनेक कलाकार इथे आहेत. साबुदाणा भिजवून त्याची खळ कापडाला लावून त्यावर रामायण, महाभारत आणि जगन्नाथ (श्रीकृष्ण ) यातील प्रसंगांवर चित्रं काढली जातात. त्यासाठी फक्त नैसर्गिक रंग वापरतात. हिंगुळ या नावाचा एक दगड असतो. त्याची पावडर करून लाल रंग मिळवितात. निळ्या रंगासाठी काही स्फटिक आणून ते दळून त्याची पावडर केली जाते. हळद, समुद्रफेस, खडूची भुकटी, काजळ, चिंचेचा डिंक अशांसारख्या वस्तू पट्टचित्र कलेमध्ये वापरल्या जातात. डॉ. जगन्नाथ महापात्रा यांनी ‘जात्रीपाटी’ ही शैली विकसित केली आहे. पट्टचित्राचं काम बरंचस या शैलीप्रमाणे केलं जातं. ओडिशा सरकारने या गावाला ‘ऐतिहासिक वारसा ग्राम’ असा विशेष दर्जा दिलेला आहे. बरेच परदेशी कलाकार ही कला शिकण्यासाठी इथे येतात.

ओडिसी शास्त्रीय नृत्यकलेला दोन हजारांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. इसवीसन पूर्व २०० मध्ये लिहिलेल्या भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात ओडिशी नृत्यकलेबद्दल लिहिलं आहे. ओरिया कविराज जयदेव यांचं ‘गीत गोविंद’ हे काव्य प्रसिद्ध आहे. कलिंग राजा खारवेल याने संगीत व नृत्यकलेला राजाश्रय दिला. आदिवासी लोकगीतं तसंच शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची परंपरा ओडिशामध्ये आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचं जन्मगाव रघुराजपूर आहे. संयुक्ता पाणिग्रही, सुजाता मोहपात्रा, रतिकांत मोहपात्रा यांनी गुरुवर्य केलुचरण यांची परंपरा पुढे चालविली आहे.

मनोज दास, मोनालिसा जेना, कुंतला कुमारी असे अनेक प्रसिद्ध साहित्यिक ओडिशाला लाभले.न्यूयॉर्कला राहणाऱ्या आणि खूप वेगळ्या विषयांवर चित्रपट बनविणाऱ्या मीरा नायर या मूळच्या राउरकेलाच्या. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या डॉक्टर प्रतिभा राय या साहित्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तरुण शास्त्रीय संगीत गायिका, स्निती मिश्रा ही मूळची ओडिशाची आहे.

महानदीच्या उदंड प्रवाहातील ओडिशाची अनेक अंगानी बहरलेली कलासंपन्न सांस्कृतिक परंपरा अखंडित आहे

भाग ४ व ओडिशा समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – यात्रा-संस्मरण ☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? यात्रा-संस्मरण ?

☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर

आज आमच्या ग्रँड कॅन्यन टूरचा शेवटचा टप्पा होता.

आज आमाही सेडोना या जवळच्याच नगरीला भेट द्यायचे ठरवले.

फ्लॅगस्टाफ ते सेडोना हा एकतासाचा ड्राईव्ह आहे. म्हणजे साधारण आमच्या हाॅटेलपासून वीस मैलाचा प्रवास.

अॅरीझोना स्टेट म्हणजे जगातले एक नंबरचे वाळवंट.

रुक्ष, रेताड, रखरखीत. मात्र सेडोना हे येथील अतिशय नयनरम्य ,निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.

ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. घाटातला ,वळणा वळणाचा रस्ता. दुतर्फा उंच सुचीपर्णी (पाईन)चे उंच वृक्ष. आणि पलीकडे अजस्त्र कॅन्यन. अॅरीझोना म्हणजे पर्वतीय, भूगर्भीय आश्चर्यच.. आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आम्ही पर्वत राशीवर वारा, पाणी आणि खचणार्‍या मातीमुळे तयार झालेली ही नैसर्गिक विवीध आकारांची लाल पांढरी कधी पिवळी अशी असंख्य शिल्पे पाहिली. आणि प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध झालो. आजच्या प्रवासातही आम्ही अनेक वेळा न राहवून थांबलो. फोटो काढले. आणि निसर्गोत्सवाचा आनंद ऊपभोगला. इथेच आम्ही नवरात्री देवीची असंख्य रुपेच पाहिली जणू…

सेडोना येथील अमिताभा स्तुप आणि शांती वनाला आम्ही भेट दिली. जवळ जवळ १४ एकर मध्ये वसलेलं आणि उंच उंच लाल खडकांनी वेढलेलं थंडर माउन्टनच्या पायथ्याशी असलेलं. मनाला  अगाध शांती देणारं हे स्थान आहे. जेट्सुमा या न्यूयाॅर्कर लामाने ही जागा स्तुपासाठी निवडली. तिबेटीयन पद्धतीचा हा स्तुप आहे.

इथे सर्वधर्मीय लोक ध्यान धारणा (meditation) आणि प्रार्थने साठी येतात.नतमस्तक होतात.

अखंड महागनी लाकडात कोरलेली बुद्धाची मूर्ती इथे एका खडकावर स्थित आहे. ही मूर्ती इंडोनेशीयाहून या स्तुपास भेट म्हणून दिली गेली आहे. आणि जवळ जवळ ३६ फूट उंच अशी ही सुंदर मूर्ती आहे.

त्या ठिकाणी पोहचल्यावर खरोखरच माणूस हळुहळु तणावमुक्त होतो. तिथल्या वातावरणात अशी काही उर्जा आहे की सार्‍या चिंता,विकार झाडावरच्या पानाप्रमाणे गळून पडतात. इश्वर एक आहे,चराचरात त्याचं वास्तव्य आहे हे जाणवतं. माझ्या मनाने जो गारवा इथे अनुभवला तो शब्दातीत आहे. खरोखरच इथे मला तो भेटला.त्याच्या चरणी मी लीन झाले.एक अद्वैताचीच अनुभूती मला मिळाली…

सेडोना येथील चॅपल आॉफ होली क्राॉसला आम्ही भेट दिली. हे दुसरं भक्तीमय वातावरणाचं स्थान.अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत.

हे चॅपल कोकोनिनो नॅशनल फाॅरेस्ट लँडवर, उंच अशा टेकडीवर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे. हे बांधण्यास केवळ अठरा महिने लागले. १९५६साली या चॅपलचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ जवळ ३००, ३००यु एस डाॅलर्स या बांधकामासाठी लागले.

उंच गाभार्‍यात धातुची येशुची क्रुसावरची मूर्ती आहे.

भिंतींवर ,येशूला ज्या खिळ्यांनी क्रुसावर ठोकले त्यांची प्रतिकात्मक म्युरल्स आहेत. शांत मेणबत्यांच्या प्रकाशात त्या मूर्तीकडे पाहताना नकळतच आपल्या कानात शब्द ओतले जातात, “हे! प्रभु! यांना क्षमा कर. कारण त्यांना कळत नाही ते काय करत आहेत..!”

मन अंतर्मुख होते.

समोरच्या ऊंच लाल खडकात हातात लहानग्या येशुला घेतलेली मदर मेरी दिसते. प्रार्थनेसाठी उंचावलेले भक्तीमय करांचे दर्शन होते…

सारेच अलौकिक. कल्पनेच्या पलीकडचं. सूक्ष्मतेतून विशालतेकडे नेणारं.. द्वैतातून अद्वैताकडे जाणारं.. परमात्म्याची वाट दाखवणारं.

सेडोना मधल्या लाकीपाकी या आर्ट्स आणि क्राफ्ट विलेजला आम्ही भेट दिली. हे एक कलाकार आणि त्यांची कलाकारी प्रस्तुत करणारं,ओक क्रीकच्या किनारी वसलेलं असं देखणं  गाव. सुंदर पायवाटा, कारंजी,विवीध रंगांची फुलझाडे,कलात्मक रितीने रंगवलेल्या भिंती पाहताना खूपच मजा वाटत होती. इथे पन्नास पेक्षा अधिक दुकाने आहेत. विवीध कलात्मक वस्तुंचे सुंदर प्रदर्शनच म्हणा ना.

अनेक क्युझीनची रेस्टारंट्स इथे आहेत. आम्ही एका मेक्सीकन रेस्टाॅरंट मध्ये दुपारचे जेवण घेतले…

किती पाहशील तू.. किती घेशील तू अशीच आमची स्थिती झाली. पाय दुखत होते. मन भरत नव्हतं. खिसाही रिकामा होत होता..अखेर नाईलाजानेच बाहेर पडलो त्या सौंदर्य नगरीतून..

आमच्या या ग्रँड कॅन्यन सफरीतला अत्यंत आकर्षक आणि एक्सायटींग कार्यक्रम म्हणजे फ्लॅगस्टाफ शहरातील वेधशाळेची (observatory) भेट.

फ्लॅगस्टाफ हे खगोल शास्त्रज्ञांचे प्राचीन संशोधन पीठ आहे. १८९४ मध्ये ही लाॅवेल वेधशाळा स्थापीत झाली.

१९१२ साली ब्रह्मांडात होणारे बदल आणि विस्तार यांचा विस्तृत अभ्यास ,संशोधकांनी या वेधशाळेत केला.

 १९३० साली इथे प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.

सूर्यमाला,ग्रह तारे, आकाशगंगा,आणि अंतराळ या विषयीचे संशोधन इथे  सातत्याने होत असते.

तीन ते चार मीटर उंच असलेले LDT आणि DCT हे जगातील अत्यंत कार्यक्षम असे टेलीस्कोप इथे आहेत.

जगातील सर्व खगोलप्रेमी लोक इथे भेट देउन ग्रहतार्‍यांच्या राज्यातला आनंद भोगतात. आज आम्हीही त्यापैकी एक होतो हे अहोभाग्यम्.!! लहानपणी माझे वडील आम्हाला पहाटे किंवा रात्री खुल्या मैदानावर केवळ तारे पहायला घेऊन जात.आज जगप्रसिद्ध टेलीस्कोपमधून हे ब्रह्मांड पाहताना कोण आनंद होत होता हे कसे सांगू?

रिंग असलेला तो डौलदार शनी आणि त्याचे ८२ चंद्र तसेच केवळ वायुरुपी भला मोठा गुरु हा ग्रह आणि चार चंद्र इतक्या जवळून डोळ्यात  साठवताना देवाने दृष्टी दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले….

बघावं तितकं थोडं..लिहावं तितकं थोडं..

तर अशीही अमेरिकेतल्या अॅरोझोना राज्यातील आमची मनमौजी सफर साठा उत्तरी सफल संपूर्ण झाली.

© सौ. राधिका भांडारकर

२८/०९/२०२२

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 30 – भाग 3 – कलासंपन्न ओडिशा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 30 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

महानदीच्या तीरावर वसलेलं ‘कटक’ हे शहर पूर्वी ओडिशाच्या राजधानीचं शहर होतं. तेराव्या शतकात बांधलेला इथला बाराबतीचा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून जिंकून घेतला होता. इसवी सन १८०३ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. आता हा किल्ला बराचसा उध्वस्त झाला आहे. मात्र त्याचं पूर्वीचं प्रवेशद्वार अजून शाबूत आहे. हे अवशेष चांगल्या रीतीने जपले आहेत. किल्ल्याजवळ बांधलेलं भव्य  बाराबती स्टेडिअम कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे.

कोणार्क येथील सूर्यमंदिर म्हणजे उडिया शिल्पकाव्याची अक्षयधारा आहे. भुवनेश्वरहून ६२ किलोमीटर अंतरावर असलेलं हे सूर्यमंदिर कलिंग शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.  कोणार्क मंदिर दीर्घ काळ रेतीत बुडालेलं होतं. १८९३ मध्ये ते प्रथम उकरून काढण्यात आलं. पुरातत्त्व विभागाने त्यावरील वाळूचं आवरण दूर करण्याचं काम हाती घेतलं. आज या भग्न मंदिराचे गाभारा व बरेचसे भाग उध्वस्त अवस्थेत आहेत. कोणार्क समुद्रकाठी असल्याने हवामानाचाही बराच परिणाम होऊन मंदिराची खूप झीज झालेली दिसून येते. शिवाय मोंगल आक्रमणामध्ये मंदिराची खूप तोडफोड झाली.

१२०००हून अधिक कारागिरांनी १६ वर्ष अथक परिश्रम करून हे मंदिर उभं केलं होतं. त्यासाठी अमाप खर्च झाला. हे मंदिर रथाच्या रूपात आहे. दोन्ही बाजूंना दहा- दहा फूट उंचीची  १२ मोठी चाकं आहेत. या चाकांवर आणि देवळावर अप्रतिम कोरीव काम आहे. सात दिमाखदार अश्व, सारथी आणि सूर्यदेव असे भव्य मंदिर होते. मंदिराच्या शिल्लक असलेल्या भग्न अवशेषांवरून पूर्वीच्या देखण्या संपूर्ण मंदिराची कल्पना करावी लागते.

या दगडी रथाच्या वरील भागात मृदुंग, वीणा, बासरी वाजविणाऱ्या पूर्णाकृती सूरसुंदरींची शिल्पे कोरली आहेत. त्याखाली सूर्यदेवांच्या स्वागताला सज्ज असलेले राजा, राणी, दरबारी यांची शिल्पे आहेत. योध्दे, कमनीय स्त्रिया व बालके यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत. त्याखालील पट्टयावर सिंह, हत्ती, विविध पक्षी, फुले कोरली आहेत. रथावर काम शिल्पे, मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. त्यातील स्त्री-पुरुषांच्या चेहऱ्यावरील भाव लक्षणीय आहेत. आकाशस्थ सूर्यदेवांच्या अधिपत्याखाली पृथ्वीवरील जीवनचक्र अविरत चालू असते. त्यातील सातत्य टिकविण्यासाठी आदिम नैसर्गिक प्रेरणेनुसार सर्व जीवसृष्टीचे वर्तन असते असे इथे अतिशय कलात्मकतेने शिल्पबद्ध केलेले आहे.

भारतीय पुरातत्त्व खात्याची निर्मिती ही ब्रिटिशांची भारताला फार मोठी देणगी आहे. ब्रिटिश संशोधकांनी भारतीय संशोधकांना बरोबर घेऊन अतिशय चिकाटीने अजिंठा, खजुराहो, मोहनजोदारो, कर्नाटकातील शिल्पस्थानं यांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण व दस्तावेजीकरण केले. कोणार्क येथील काळाच्या उदरात गडप झालेले, वाळूखाली गाडले गेलेले सूर्यमंदिर स्वच्छ करून त्याचे पुनर्निर्माण केले. त्यामुळे ही सर्व शिल्परत्ने जगापुढे येऊन भारतीय समृद्ध संस्कृतीची जगाला ओळख झाली. आज हजारो वर्षे उन्हा- पावसात उभ्या असलेल्या, अज्ञात शिल्पकारांच्या अप्रतिम कारागिरीला प्राणपणाने जपणे हे आपले कर्तव्य आहे.  दरवर्षी १ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान कोणार्कला नृत्यमहोत्सव आयोजित केला जातो. त्यात प्रसिद्ध नर्तक हजेरी लावतात .

कोणार्कहून ३५ किलोमीटरवर ‘पुरी’ आहे. सागर किनाऱ्याने जाणारा हा रस्ता रमणीय आहे. आदि शंकराचार्यांनी आपल्या भारतभ्रमणाअंतर्गत भारताच्या चारी दिशांना जे मठ स्थापिले त्यातील एक म्हणजे पुरी. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या बहिण भावंडांचं हे मंदिर जगन्नाथ (श्रीकृष्ण ) मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. बाराव्या शतकात बांधण्यात आलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आणि कलात्मक आहे. १९२फूट उंच असलेलं हे मंदिर इसवी सन अकराशे मध्ये अनंत वर्मन राजाने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्याचा मुलगा अनंत  भीमदेव याच्या काळात ते पूर्ण झालं.

आषाढ शुद्ध द्वितीयेपासून त्रयोदशीपर्यंत साजरी होणारी ‘पुरी’ येथील रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. साधारण ३५ फूट रुंद व ४५ फूट उंच असलेले तीन भव्य लाकडी रथ पारंपारिक पद्धतीने अतिशय सुंदर तऱ्हेने सजविले जातात. जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या रथांना वाहून नेण्यासाठी प्रचंड जनसागर उसळलेला असतो. हे लाकडी रथ दरवर्षी नवीन बनविले जातात. त्यासाठी वापरायचं लाकूड, त्यांची उंची, रुंदी, कारागीर सारे काही अनेक वर्षांच्या ठराविक परंपरेनुसारच होते. हिंदूंच्या या पवित्र क्षेत्राचा उल्लेख  ‘श्री क्षेत्र’ किंवा ‘पुरुषोत्तम क्षेत्र’ म्हणून ब्रह्मपुराणात आढळतो. चैतन्य महाप्रभूंचं वास्तव्य या क्षेत्रात बराच काळ होतं.

महाराजा रणजीत सिंह यांनी या मंदिराला भरपूर सुवर्णदान केलं. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात ‘कोहिनूर’ हिराही या मंदिरासाठी लिहून ठेवला होता पण त्याआधीच ब्रिटिशांनी पंजाबवर आपला अंमल बसविला व आपला कोहिनूर हिरा इंग्लंडला नेला .

ओडिशा भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – यात्रा-संस्मरण ☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 4… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? यात्रा-संस्मरण ?

☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 4… ☆ सौ राधिका भांडारकर

आजची सफरही वैशिष्ट्यपूर्ण होती. Lower Antelope canyon ..

आम्ही अँन्टीलोप कॅन्यन व्हीजीटींग सेंटरपर्यंत फ्लॅगस्टाफहून कारने आलो. जवळ जवळ अडीच तासाचा ड्राईव्ह होता. ही जागा नोवाहा कम्युनिटीच्या राज्यात येते.

अॅन्टीलाॅप  कॅन्यनचे दोन भाग आहेत. खालचा आणि वरचा..

वरचा अँन्टीलाॅप २००मीटर आहे आणि खालचा भाग ४०७ मीटर (१३३७फूट)  पसरलेला आहे.आठ ते साठ मिलीअन वर्षांचे ते आहेत. आम्ही खालच्या अँन्टीलाॅप ला भेट दिली.

व्हीजीटींग सेंटर पासूनच प्रत्यक्ष टूरला सुरवात होते. ज्योतिकाने आधीच टुर बुक केली होती. सेंटरवर तिने  तिचे बुकींग दाखवले.

आमचे तिघांचे बुकींग होते. मात्र जी सेंटरवरची मदतनीस होती ती म्हणाली,। इथे दोघांचच बुकींग दिसतय्” .सायराचे नावच नव्हते.  ज्योतिकाला इंटरनेट मिळत नव्हते. त्यामुळे तिला कंपनीशी संपर्क साधता येत नव्हता. शेवटी तिने सायराचे तिथल्या काउंटरवरच परत तिकीट काढले. आॅनलाईनपेक्षा इथले तिकीट थोडे कमीही होते. टेक्नॉलॉजीचे जसे फायदे तसे तोटेही…असो!

साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.

आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला.

ही सफर अवघड,साहसी असणार याची कल्पना  होतीच.

संपूर्ण पायी सफर होती. आमच्याबरोबर टुर  गाईड होता.

आम्हाला सफरपूर्वी अनेक सूचना दिल्या गेल्या. कुठल्याही सॅक्स,काठी कॅमेरा बरोबर नेता येणार नव्हत्या.मोबाईलला परवानगी होती. 

आमचा दहा बारा जणांचा गृप होता. काही वृद्ध ही होते.

अमेरिकन, जपानी चायनीज सारेच होते. मी सर्वात ज्येष्ठ असेन. पण ही सारी मंडळी अतिशय सहकार्य देणारी होती.

सर्वांच्या मनांत एकच स्वप्न होतं,या जमीनीच्या  पोटात दडलंय् तरी काय? हे बघण्याचं..

अक्षरश: आम्ही  धरतीच्या उदरात चाललो होतो. अतिशय सरळ अशा शिड्या होत्या.सांभाळून उतरावे लागत होते.

असे सहा टप्पे आम्ही ऊतरलो. सातवा फारच कठिण होता. भूमिकन्या सीतेची मला आठवण झाली. धरतीने तिला जसे कुशीत घेतले तसे ती आम्हालाही घेत होती.

आता आम्ही प्रत्यक्ष कॅन्यनजवळ पोहचलो. आणि जे नजरेला दिसलं ते या दोन डोळ्यात मावणारं नव्हतंच.अरुंद,चढउताराची,वालुकामय अशी पायवाट तुडवत आम्ही त्या भूगर्भातल्या खिंडीत चालत होतो.

कुंभाराने बनवलेल्या मडक्यासारखं ते अनंत आकार घेउन पसरलेलं होतं.  धरतीच्या वर एका बाजूला या कॅन्यनचं उघडं द्वार होतं. तितपर्यंत आम्हाला जायचं होतं.बाहेर येण्याचा रस्ता फक्त तोच होता. आता no come back.

चालायचे. वळसे घेत .बघत बघत. वरुन सूर्यकिरण पाझरत होते. छाया प्रकाशाचा अत्यंत मनोरम खेळ आम्ही पहात होतो. त्या दगडांमध्ये शार्क,ईमो,सी हाॅर्सचे आकार दिसत होते. एक लेडी विथ द विंड नावाचंही शिल्प तयार झालं होतं.तिचा चेहरा आणि तिचे उडणारे केस .हे सगळं आमच्या नजरेसमोर आमचा टूर गाईड आणण्यास मदत करत होता. आणि मग “अय्या! खरंच” “ओह माय गॉड” सारखे  ऊद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते.ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवरुन पावसाळ्यात पाण्याचा

प्रचंड लोट वाहतो. सगळी वाळु वाहून जाते.तेव्हां ही सफर बंद ठेवावी लागते.इथे मन्सुन एप्रील ते जुनपर्यंत असतो.

आणि तसंही पावसाचा नेम नसतोच. आमचे भाग्य म्हणून आम्हाला हे पहायला मिळाले. आतमध्ये चालत असताना मधून मधून आम्हाला वाळुतला ओलसरपणा जाणवतही होता.

जवळ जवळ एक दीड तासाने आम्ही धरतीच्या उदरातून बाहेर आलो. सूर्यप्रकाशात आलो. आता आम्ही जमिनीवर होतो.डोक्यावर रणरणतं ऊन होतं. पण हवेत सुखद गारवा होता.

जे पाहिलं,अनुभवलंं ते वर्णनातीत होतं.

निसर्गासमोर माणूस म्हणून जगताना मी फक्त एक कण आहे असेच वाटले.

मनोमन त्या किमयागाराला मनापासून वंदन केले.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २९ – भाग २ – कलासंपन्न ओडिशा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २९ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

भुवनेश्वर मधील मुक्तेश्वर म्हणजे शंकराचे मंदिर हे कलिंग शैली मंदिर कलेचा उत्तम नमुना आहे. प्रवेशद्वारावरील तोरणशिल्प अजोड सौंदर्याचा नमुना आहे.  प्रदक्षिणा मार्गावरून जाताना मंदिराबाहेर कोरलेल्या अतिशय सुंदर मूर्ती पाहता येतात.

परशुरामेश्वर मंदिराची निर्मिती सातव्या शतकात झाली असे मानण्यात येते. या छोट्याशा, सुबक मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत यातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. वेताळ मंदिरात आठ हातांची उग्र आणि भयकारी अशी चामुंडाची मूर्ती आहे. तांत्रिक पंथीयांच्या या उपासना देवतेला कपालिनी असे म्हणतात.

अनंत वासुदेव मंदिर हे भुवनेश्वर मधील आणखी एक प्रसिद्ध देवालय आहे. तेराव्या शतकात बांधलेल्या या मंदिरात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या पूर्णाकृती  मूर्ती आहेत. भानुदेव राजाच्या कारकिर्दीत बांधलेले हे मंदिर वैष्णव पंथीयांचे एक प्रमुख तीर्थस्थान आहे.

भुवनेश्वरहून आठ किलो मीटर अंतरावर उदयगिरी आणि खांदगिरी या जुळ्या टेकड्यांवर गुहा कोरण्यात आल्या आहेत. गंग घराण्यातल्या राजा खारवेल याच्या जीवनातल्या काही घटना हत्ती गुंफेत कोरल्या आहेत. इथली ‘राणी गुंफा’ दुमजली असून भव्य आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धता जपणाऱ्या या नगरीने आता अत्याधुनिक बदल स्वीकारलेले आहेत .जर्मन वास्तुविशारद ओ.एच्.किंग्जबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वरचा विकास झाला. सॉफ्टवेअर पार्कस्,उत्तुंग आधुनिक इमारती, इंजिनिअरिंग कॉलेजेस, शॉपिंग मॉल याबरोबरच टाटा, जिंदाल, वेदांत, रिलायन्स अशा नावाजलेल्या उद्योगधंद्यांनी इथे मोठी गुंतवणूक केली आहे.  ओडिशा खनिजसमृद्ध असल्याने त्यावर आधारित उद्योगधंदे तसेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया(SAIL ) कलिंगनगरीत आहेत. महानदीच्या मुखावरील पारादीप या बंदराचा विकास करून तिथून ही खनिजे निर्यात केली जातात.

भुवनेश्वर येथील कलिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जागतिक स्तरावरील हॉकी, फुटबॉल यांचे सामने भरविले जातात. भुवनेश्वरपासून २०० किलोमीटर असलेल्या बालासोर इथे रॉकेट लॉन्चिंग सेंटर आहे. तसेच भुवनेश्वरपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या भद्रक येथील डॉक्टर अब्दुल कलाम आयलंड ( पूर्वीचे व्हिलर आयलंड ) इथून ‘अग्नी १,’ अग्नी २’ या लहान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचं उड्डाण झालं. आत्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास’ संस्थेतर्फे डॉक्टर अब्दुल कलाम आयलंडवरून लांब पल्ल्याच्या ‘इंटरसेप्टर’  क्षेपणास्त्राची  यशस्वी चाचणी करून भारताने संरक्षण क्षेत्रात नवी भरारी घेतली आहे.

भुवनेश्वर हे ओडिशाच्या हस्तकौशल्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथल्या दुकानातून दगडात कोरलेल्या वस्तू ,मूर्ती, पट्टापेंटिंग, वाळलेल्या पानांवरील रंगीत कलाकुसर, सिल्व्हर फिलीग्रीच्या (चांदीच्या बारीक तारांपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या) सुंदर वस्तू व दागिने मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध असतात.         

इथल्या म्युझियममध्ये प्राचीन नाणी, शस्त्रास्त्रे, ताम्रपट, शिलालेख, पारंपरिक वाद्ये,  जुन्या पोथ्या, ओडिशात सापडणाऱ्या खनिज संपत्तीचे नमुने,   भुसा भरून ठेवलेले ओडिशातील प्राणी उत्तम तऱ्हेने मांडले आहेत. ओडिशातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे एक म्युझियम इथून जवळच आहे.

ओडिशा भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print