मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 – काळं पाणी आणि हिरवं पाणी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
काळं पाणी आणि हिरवं पाणी
अंदमान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि काळं पाणी या शब्दांचं नातं अतूट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शाने हे स्थान पवित्र झालं आहे. लोकमान्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात नेताना एका दिवसासाठी येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं. इसवी सन १९४२ साली सुभाषचंद्र बोस यांनीही या तुरुंगाला भेट दिली होती.
अंदमान व निकोबार हा दक्षिणोत्तर पसरलेला जवळजवळ ३५० बेटांचा समूह भारताच्या आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरात आहे. चेन्नई आणि कोलकता अशा दोन्हीकडून साधारण १२०० किलोमीटर अंतरावर ही बेटं येतात. पूर्वी तिथे बोटीने पोहोचण्यासाठी चार-पाच दिवस लागत. आता चेन्नई किंवा कोलकताहून विमानाने दोन- तीन तासात पोहोचता येतं. आम्ही चेन्नईहून विमानाने अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर विमानतळावर उतरलो. जेवून लगेच सेल्युलर जेल बघायला निघालो.
ब्रिटिशांनी १९०६ साली या जेलचं बांधकाम पूर्ण केलं. चक्राच्या दांड्यांसारख्या सात दगडी, भक्कम तिमजली इमारती व त्या इमारतींना जोडणारे मधोमध असलेले वॉच टाॅवर अशी या तुरुंगाची रचना...