मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “महान योद्धा राणी दुर्गावती…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “महान योद्धा राणी दुर्गावती…☆ सुश्री शोभा जोशी ☆

(२४ जून, राणी दुर्गावती बलिदान दिवस)

आपल्याला माहित आहे की ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी भारतावर कोणाचाच एकछत्री अंमल नव्हता. देशामध्ये छोटी मोठी स्वतंत्र राज्यं होती. छोटी मोठी संस्थानं होती. प्रत्येक राज्याचा, संस्थानाचा राजा आणि त्याचे सरदार, मंत्री असत ते आपल्या राज्याचा कारभार करत.

आपल्या राज्याचे संस्थानाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी अनेक वीर पुरूषांनी लढता लढता मरण पत्करले. त्यामध्ये स्रियाही मागे नव्हत्या. अशाच शूर स्रियांपैकी एक म्हणजे राणी दुर्गावती. आत्ताचा मध्य प्रदेश त्या वेळी गोंडवाना म्हणून प्रसिध्द होता. या गोंडवानातील माहोबाचे राजा कीर्तीसिंह हे चंदेल या रजपूत घराण्यातील होते. त्यांची दुर्गावती ही मुलगी. तिचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ मध्ये कालिंजर किल्ल्यात दुर्गाष्टमीला झाला म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले. ती नावाप्रमाणेच प्रसंगी दुर्गावतार धारण करायची. ती दिसायला खूप सुंदर होती. खूप हुशार तर होतीच पण खूप शूर आणि धाडसी होती. लहानपणापासूनच तिला धनुष्यबाण चालविणे, तलवारबाजी करणे, शिकार करणे या सर्वांची आवड होती. वाघ, चित्ता दिसला तर त्याला मारल्याशिवाय ती पाणीही पीत नसे.

माहोबाच्या राज्याच्या शेजारीज गढमंगला राज्य होते. या राज्याचा राजा संग्रामशहा गोंड जमातीचा होता. त्याचा मुलगा दलपत याच्याशी दुर्गावतीचे लग्न झाले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव वीरनारायण. तो चार वर्षांचा असतानाच दलपतचा मृत्यू झाला. राणीने छोट्या वीरनारायणला राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावाने ती स्वतः राज्यकारभार करू लागली.

चितोड, मेवाड, गोंडवाना अशी काही राज्यं सोडली तर आजूबाजूला सगळी मुस्लीम राज्ये होती. दिल्लीत अकबराचं राज्य होतं. राणीला कल्पना होती की ही मुस्लीम राज्यं आपलं राज्य बळकावण्यासाठी आपल्यावर नक्कीच हल्ले करणार. म्हणून तिनं पहिल्यांदा काय केलं तर आपलं सैन्य चांगलं तयार केलं. त्या सैनिकांना युद्धाचं चांगलं शिशण दिलं. त्यांना शूर वीर बनवलं. हेकरत असतानाच तिनं खूप मोठे मोठे तलाव बांधले. विहिरी खोदल्या. मंदिरं, मठ बांधले. धर्मशाळा बांधल्या. चांगले रस्ते तयार केले. तिनं आपलं राज्य समृध्द बनवलं. त्यामुळे राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे. ती एक कुशल प्रशासक होती. त्यामुळे प्रजा तिला देवी मानत असे. एक स्री राज्यकारभार चालवते आहे म्हटल्यावर मुस्लीम राजे आपल्यावर आक्रमण करणार हे तिला माहित होतं म्हणून तिनंच आधी काही राज्यांवर आक्रमणे करून, त्यांचा पराभव करून आपल्या राज्याचा विस्तार केला. तिनं बाजबहाद्दूरला सुध्दा हरवले.

तिच्या पराक्रमाची कीर्ती दिल्लीचा मोघल बादशहा अकबराच्या कानावर गेली. त्याने तिच्यावर आक्रमण करण्यासाठी दोनदा सैन्य पाठवले. पण राणीने दोन्हीवेळा त्यांचा पराभव करून त्यांना परत पाठवले.

अकबरानं दोन वर्षांनी प्रचंड सैन्यासह पुन्हा तिच्यावर हल्ला केला. राणीनं आपल्या तुटपुंज्या सैन्यानिशी अकबराशी निकराचा लढा दिला. राणीच्या दोन्ही डोळ्यांना बाण लागले. तिला दिसेनासं झालं. तरीपण दोन्ही हातात तलवारी घेऊन ती लढतच राहिली. तिच्या मानेत, गळ्यात बाण घुसले आणि ती बेशुध्द झाली. शुध्दीवर आली तेव्हा तिला कळून चुकलं होतं की आपण युध्द हरलो आहोत. आपण जिवंतपणे अकबराच्या हातात सापडलो तर तो आपला खूप छळ करेल आणि जन्मभर आपल्याला त्याच्या जनानखान्यात खितपत पडावं लागेल म्हणून त्या शूर विरांगनेनं आपली कट्यार आपल्या छातीत खुपसली आणि वीर मरण पत्करलं. १६ वर्षं कुशल राज्यकारभार केलेली ही पराक्रमी, शूर, वीर, धैर्यवान राणी अकबरासारख्या बलवान, शक्तीशाली राजाला शरण गेली नाही. त्याच्यापुढं हार न पत्करता तिनं सरळ मरण जवळ केलं आणि इतिहासात अजरामर झाली. अशा राणी दुर्गावतीला मानाचा प्रणाम आणि श्रध्दांजली.

माहिती संग्राहिका व लेखिका : सुश्री शोभा जोशी.

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अपभ्रंश आणि परभाषांच्या देणग्या…. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ अपभ्रंश आणि परभाषांच्या देणग्या…. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

आपल्या मायमराठीत रूळलेल्या अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असतात. पण त्या शब्दाचे कूळ / मूळ शोधण्यासाठी, त्या शब्दात असणाऱ्या शब्दांचा विग्रह केला तरी त्याची तार्किक व्युत्पत्ती चटकन ध्यानात येत नाही. आणि अर्थ ठाऊक असला तरी त्याचे मूळ न समजल्याने अस्वस्थता येते. मात्र बऱ्याच वेळी, ‘मूळ शब्दांचा झालेला अपभ्रंश’ किंवा ‘परभाषेतून आलेले शब्द’ ह्यांमुळे ती तर्कसंगती लागत नाही. कधीकधी, सध्या अस्तंगत झालेल्या पण पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या चालीरीतींमुळेही काही शब्द / शब्दप्रयोग निर्माण झालेले असतात. काही अश्याच शब्दांचा घेतलेला रंजक मागोवा. एखाद्या शब्दाबद्दल – इथे नमूद केलेल्या व्युत्पत्ती किंवा ‘मूळा’पेक्षा काही वेगळे आपणांस ठाऊक असेल तर जरूर निदर्शनास आणून द्यावे.

अगरबत्ती / उदबत्ती – नागालँड, मिझोराम, आसाम ह्यां प्रदेशांत अगरु नावाचा एक सुगंधी वृक्ष आढळतो. त्याच्या खोडापासून सुगंधी तेल काढतात. त्या अगरु ह्या संस्कृत शब्दाचे हिंदी व बंगालीत ‘अगर’ झाले आणि पंजाबीत ‘उद’.

अनवाणी – पायात पादत्राणे न घालता चालणाऱ्याला ‘अनवाणी’ असे म्हणतात. हा वाणी कोणी सत्यनारायणातील साधूवाण्याचा भाऊबंद नव्हे. तर तो मूळ शब्द आहे ‘अन-वहाणी. ‘

दक्षिणा – पूर्वी पूजा सांगणाऱ्या पुरोहितांना दक्षिणा म्हणून गाय द्यायची प्रथा होती. ती देताना गाय पुरोहितांच्या उजव्या हाताजवळ – म्हणजेच दक्षिण दिशेला उभी करत. त्यामुळे पुरोहितांनी दिल्या जाणाऱ्या मोबदल्यास नाव पडले ‘दक्षिणा’.

अनागोंदी – हा शब्द कन्नड भाषेतील शब्दांमुळे तयार होऊन मराठी भाषेत आला आहे. कानडी भाषेत ‘अन’ म्हणजे हत्ती आणि ‘गोंदी’ म्हणजे लहान रस्ताअरुंद गल्ली. त्यामुळे, अरुंद गल्लीतून हत्ती नेताना जो काही गोंधळ होईल त्यासारख्या कारभारास म्हणू लागले ‘अनागोंदी’ कारभार.

झोपडी झोप देते ती जागा म्हणजे झोपडी.

डबघाई – शाहीर लोक पोवाडा, कवने सादर करताना, त्याच्या शेवटास साहजिकच डफ वाद्याची लय वाढते. म्हणजे डफाची घाई सुरू झाली की कवन/ पोवाडा संपत आल्याचे ध्यानात येते. त्या डफघाईचे झाले डबघाई. कोणतीही गोष्ट शेवटास / लयास आली की त्यांस म्हणले जाऊ लागले ‘डबघाईला येणे’.

दिलासा – अरबी भाषेतून आलेला शब्द. दिल म्हणजे अर्थातच हृदय आणि आसा म्हणजे धीर, सांत्वन, उत्तेजना.

भुरटे चोर भुट्टा म्हणजे कणीस! त्याची चोरी करणारा तो ‘भुरटा’ म्हणजे किरकोळ चोऱ्या करणारा चोर.

अब्दागीर – सूर्य आणि त्याच्या उन्हाला फारशी भाषेत म्हणतात ‘आफताब’. त्यामुळे राजाच्या चेहऱ्यावर ऊन पडू नये म्हणून छत्र उभे धरून राहणारे ते ‘आफताबगीर‘. त्याचे मराठीत झाले ‘अब्दागीर’. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवलेला चपखल प्रतिशब्द म्हणजे ‘सूर्यपान’.

खांदेपालट – एखादी जबाबदारी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याच्या प्रक्रियेला ‘ खांदेपालट’ म्हणतात. हा शब्द आला थेट अंत्ययात्रेच्या विधीमधून. प्रेत तिरडीवरून घेऊन जात असताना, ती तिरडी खांद्यावर धरणारे ते ‘खांदेकरी’ आणि खांद्याला कळ लागल्यावर दुसऱ्या माणसाने पुढे येऊन आपल्या खांद्यावर तो भार घेतला की त्याला म्हणायचं ‘खांदेपालट‘.

उचलबांगडी – एखाद्या पदावरून एखाद्याला उचलणे / काढणे ह्याला म्हणतात ‘उचलबांगडी’. खरेतर ह्याचा बांगडीशी काही संबंध नाही. मूळ शब्द आहे तो ‘उचलपांगडी’.पाग‘ किंवा ‘पांग’ म्हणजे मासे वाहून न्यायचे जाळे. त्या उचलपांगडीची झाली उचलबांगडी.

घिसाडघाई – एखादी क्रिया अतिजलद किंवा भरभर करणे म्हणजे ‘घिसाडघाई’. ‘घिसाड’ म्हणजे लोहार. आणि त्याला लोखंड तापविल्यावर त्याला आकार देण्यासाठी ते थंड होण्याआधी पटापट घणाचे घाव मारावे लागतात – म्हणून घिसाडघाई.

पुराणातील वांगी – ही वांगी नव्हे तर वानगी (म्हणजे उदाहरण / दाखला / संदर्भ). ‘पुराणातील वांगी’ म्हणजे एखादी जुन्या किंवा कालबाह्य गोष्टीचा दाखला.

रुमाल – फारसी भाषेत ‘रु’ म्हणजे चेहरा आणि ‘माला’ म्हणजे फडके. चेहरा पुसायला वापरले जाणारे फडके.

घोडं पेंड खातं – एखादी गोष्ट घडण्यास वारंवार विलंब होऊ लागली की आपण म्हणतो – ‘घोडं कुठे पेंड खाते आहे तेच कळत नाहीये. खरेतर पेंड हे काही घोड्याचे खाद्य नव्हे. तो मूळ शब्द ‘पेंड’ नसून ‘पेण’ आहे. पेणं म्हणजे थांबणं. थांब्याला पेणी असेही म्हणतात. घोडेस्वारांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वारंवार थांबे घेतले की उशीर होणारच. त्या ‘घोडं पेण खाते’ ह्याचं झालं ‘घोडं पेंड खाते’.

सूप वाजणे – एखाद्या समारंभाची / कार्यक्रमाची सांगता होणे म्हणजे ‘सूप वाजणे’. पूर्वी लग्न सोहळ्यातील विविध विधी अनेक दिवस चालत असत व लग्नाचे देवक सूपात मांडलेले असे. सर्व विधी संपले की त्या सूपातील देवक विसर्जित करून घरातील स्त्रिया ते सूप जोरजोरात वाजवीत असत. त्यावरून शब्दप्रयोग आला ‘सूप वाजणे’.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’Strategic Planning’ शिकवणारी लढाई…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “’Strategic Planning’ शिकवणारी लढाई…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्रीमंत बाजीराव पेशवा 

(जयंती : १८ ऑगस्ट – पुण्यतिथी : २८ एप्रिल)

तुम्हाला ठाऊक आहे का ?? जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्याना Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून कोणत्या लढाई बद्दल शिकवले जाते.. ???

जगाच्या इतिहासात अशी लढाई पुन्हा झाली नाही…

– – २५ फेब्रुवारी १७२८ 

तो फक्त २८ वर्षांचा तरुण सेनापती होता. त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट वर कसलेला सेनापती. त्या तरुण वीराकडे सैन्य फक्त २५, ००० आणि त्याच्या शत्रूकडे ४०, ००० आणि ६५० तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.

नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…

शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल…. पण… पण… पण घडले भलतेच : तो तरुण सेनापती वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते… कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते.. त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार… शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना.

अन् तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरूण पोराने लुटून नेला… शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…

पाणीच तोडले,

आधीच दमछाक 

आणि आता पाणी तोडले.

अखेर व्हायचे तेच झाले… तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तो ही आपला एकही सैनिक न गमावता. आणि एकही तलवार ना चालवता……

जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही… आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांना ही लढाई Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते, ती लढाई म्हणजे..

पालखेडची लढाई

आणि..

तो बलाढ्य शत्रू :- निजाम उल मुल्क 

वय वर्ष :- ५७,

आणि

ते तरुण वादळ :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे 

वय वर्ष :- २८ फक्त….

त्यांना ही आदरांजली….

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ईश्वराची लीला अपरंपार आहे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ईश्वराची लीला अपरंपार आहे – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे

मानवी शरीराच्या बोटांच्या त्वचेवर या रेषा बनायला लागतात जेव्हा जीव आईच्या गर्भाशयात अर्भक जवळजवळ ४ महिन्यांचा असतो. तेव्हा या रेषा मांसावर जाळ्यासारख्या बनू लागतात. या रेषा बनण्याची माहिती डीएनए देते.

पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या रेषा कोणत्याही परिस्थितीत त्या मुलाच्या आई किंवा वडिलांशी किंवा जगातील कोणत्याही व्यक्तीच्या रेषांशी जुळत नाहीत.

रेषा बनवणारा इतका विशिष्ट परमात्मा आहे की, तो या जगात असलेल्या आणि जे या जगात नाहीत अशा अब्जावधी प्राण्यांच्या बोटांच्या रेषांची रचना करतो आणि त्यातील एकेका डिझाइनची ओळखही करतो.

म्हणूनच प्रत्येक वेळी तो त्याच्या बोटांवर नवीन प्रकारची रचना स्थापित करून सिद्ध करतो. आश्चर्य म्हणजे जर जळणे, जखम होणे किंवा कोणत्याही कारणाने हे फिंगरप्रिंट्स नष्ट झाले, तर ते परत तशाच रचनेच्या रेषांचे ठसे दिसतात, ज्यात एक डॉटचा देखील फरक नसतो. काहीतरी आहे जे हे सर्व करत आहे आणि हे जग चालवत आहे. त्या परमात्म्याने आपला हिशोब ठेवायला सर्वात पहिले ठसे तयार केले जे आज आपली ओळख ठेवायला आधार बनत आहे.. आधारकार्ड.

माझ्या मते, तोच भगवान तोच परमईश्वर आहे…

तोच सूक्ष्मातून सूक्ष्म आणि अनंतातील अनंत ब्रम्हांड आहे… 

नेहमी त्या परमपिता परमेश्वरावर विश्वास ठेवा……

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमती यास्मिन शेख – वय ??? फक्त शंभर वर्षे… – सुश्री शोभना आगाशे ☆ संपादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्रीमती यास्मिन शेख

💐 अ भि नं द न 💐

श्रीमती यास्मिन शेख … काल दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी काल वयाची शंभरी पार केली. त्यांना ई-अभिव्यक्ती साहित्य मंचाकडून आदरपूर्वक प्रणाम आणि मनःपूर्वक असंख्य शुभेच्छा. 

मराठी भाषेबद्दल, विशेषतः व्याकरणाबाबत त्यांना खूप आत्मीयता आहे हे तर सर्वज्ञातच आहे. त्या संदर्भात त्यांनी केलेल्या आणि अजूनही करत असलेल्या कामाचा  अल्पसा आढावा प्रस्तुत करत आहोत. 

पूर्व प्रकाशित आलेख 

👉  मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

👉  मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य :: यास्मिन शेख – लेखक : श्री मुकुंद संगोराम ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर☆

आजच्या अंकात वाचूया सुश्री शोभना आगशे ची प्रस्तुती वय ??? फक्त शंभर वर्षे….

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ वय ??? फक्त शंभर वर्षे… ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆

श्रीमती यास्मिन शेख नेहमीच म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. ज्या राष्ट्राने तुम्हाला आसरा दिला, ज्याने तुमची स्वतःची ओळख पटवून दिली, त्या राष्ट्राची भाषा हीच मातृभाषा असते.’

कागदोपत्री, वैचारिक किंवा वैज्ञानिक लेखनासाठीची मराठी ही प्रमाण भाषाच असली पाहिजे याबद्दल त्या आग्रही आहेत. भावभावना पोहोचवण्यासाठी बोली भाषा अवश्य असावी; पण त्यामध्येही इंग्रजी शब्दांचा वापर टाळला पाहिजे, याबाबतीत त्या ठाम आहेत. मराठीच्या दुर्दशेसाठी आपण सारेच कारणीभूत आहोत असे त्या मानतात. त्यावरच्या उपायांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला. व्याकरणावरील त्यांची पुस्तके ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्द लेखनकोश’ आदर्श मानली जातात. अतिशय रूक्ष वाटणारा हा विषय त्यांनी सहजतेने उलगडून सोपा केला. त्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

आजही तेवढ्याच जोमाने त्यांचे लेखन-वाचन सुरू आहे. वर्तमानपत्रात व्याकरणाचे सदर लिहितात. ‘अंतर्नाद’ मासिकात व्याकरण सल्लागाराच्या भूमिकेत भरीव कामगिरी करून उच्चतेचा एक मापदंड प्रस्थापित केला आहे. मुद्रिते तपासताना सकारात्मक राहून सतत कार्यमग्न राहणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे. आज वयाची शंभर वर्षे पार करताना शरीराबरोबरच त्यांच्या प्रसन्न, नम्र मनाचेही कौतुक वाटते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण अफलातून स्मरणशक्ती यांची दैवी देणगी त्यांना लाभल्याचे पुन्हा पुन्हा जाणवते. स्वतःच्या हाताने लिहिण्यातील आनंद त्यांना अनेक वर्षे लाभो. त्यांनी हाती घेतलेली ही व्याकरणाची दिंडी घराघरांत जावो आणि यास्मिन शेख यांना नव्या उमेदीने जगण्याचे बळ देवो.

दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी वयाची शंभरी पार केली. त्यांना हार्दिक शुभेच्छा. 💐🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुवर्णमंदिर राखणारे सेनानी – लेफ्ट. जनरल हरबक्ष सिंग  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णमंदिर राखणारे सेनानी – लेफ्ट. जनरल हरबक्ष सिंग ☆ श्री संभाजी बबन गायके 

५) इंद्रधनुष्य —

 “ सुवर्णमंदिर राखणारे सेनानी “ लेखक : संभाजी गायके 

 – लेफ्ट. जनरल हरबक्ष सिंग 

 

सुवर्णमंदिर राखणारे सेनानी !

…… भारतीय सैन्याला लाभलेली एक दैवी देणगी !

 

 अमृतसर म्हणजे अमृताचं सरोवर… या सरोवराच्या जलाशयात सुवर्णमंदिराच्या सोनेरी कळसांची प्रतिबिंबे जणू फुललेली कमलदलं! सुवर्णमंदिर.. आदि ग्रंथ साहेबांचे पवित्र स्थान.. त्यादिवशीही मत्था टेकवायला येणाऱ्या भाविकांची संख्या काही कमी नव्हती. पण मनात भलतीच भावना ठेवून काही हजार पावलंही अमृतसर शहराकडे आगेकूच करीत होती… त्यांच्या माथ्यांवर रुमाल नव्हते… लष्करी शिरस्राणे होती, आणि हातात बंदुका… ते सुवर्णमंदिरात माथा टेकवायला नव्हते येत… अमृत कायमचे सर करायला येत होते… एखाद्या टोळधाडीसारखे! काही वेळातच ते अमृतसरच्या वेशीवर धडकतील आणि सारं शहर त्यांच्या चामडी बुटांच्या खाडखाड आवाजाने दुमदुमून जाईल यात शंका नव्हती.

 लढाईच्या पटावर प्यादी, वजीर, हत्त्ती, घोडे, उंट इत्यादी गरजेनुसार स्थानांतरीत करावी लागतात… तात्पुरती माघार ही सुद्धा एक चालच असते युद्धात काहीवेळा. बुद्धीबळात पटावर राजा असला तरी त्याने कुठे जायचे हे बुद्धिबळ खेळणारा गडी ठरवतो.. आणि हा खेळाचा नियमच आहे. पण माणसांच्या लढाईत प्रत्यक्ष आघाडीवर तळहातावर शीर ठेवून उभा असणारा सेनानीच राजा… आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सेनानीला स्वत:चा विवेक, कर्तव्यपरायणता, मनगटातील बळावर विश्वास आणि सैनिकांच्या काळजातील अग्नि यांची सांगड घालून निर्णय घ्यावा लागतो….. ! 

 मागे सरका… दुसऱ्या दिशेला जा…. तिथे थांबून तयारी करा… शत्रू तुमच्या समशेरीच्या आवाक्यात आला की तुटून पडा… असा सेनानीस आदेश प्राप्त झाला होता असे म्हणतात… पण वयाची पन्नाशी पार केलेल्या, अनेक युद्धे लढलेल्या, शत्रूच्या काळकोठडीत कित्येक महिने मृत्यूशी गोष्टी करीत सूर्योदयाची प्रतिक्षा करीत जगलेल्या, आणि तिथून परतून पुन्हा देशाच्या सेवेत तितक्याच तडफेने परतलेल्या सेनानीस… हे कसे पटावे! आपले शहर, आपले मंदिर शत्रूच्या जणू हवाली करून गेल्यासारखे माघारी फिरायचे… न लढता? संघर्षात एकच जिंकणार… यावेळी कदाचित तो जिंकणारा म्हणजे आपण नसू… पण लढणारा तरी आपणच असावे…

 सेनानीने मनाशी निर्धार केला… अवज्ञा करायची वरिष्ठांची… परिणामांना सामोरे जाऊ नंतर… पण आता माघार नाही… ते फिरता बाजूस डोळे.. किंचित ओले… सरदार सहा सरसावून उठले शेले… रिकिबीत टाकले पाय… झेलले भाले! अशी स्थिती झाली आणि कृतीही.

 ‘जो बोले सो निहाल… सतश्री अकाल!’ या घोषणा अमृतसरच्या सीमेवर घुमल्या… या सीमेकडे येणारी पावले त्यांच्याच सीमेत जाऊन तिथल्या तिथे छाटली पाहिजेत….. गुरु गोविंदसिंह साहेबांचे शब्द खरे करून दाखवण्याची आणखी एक संधी दैवाने दिली आहे… सव्वा लाख शत्रूंशी केवळ एकटा वीर लढू शकतो… हा विश्वास त्यांनी दिला होता… तो या सेनानीने आणि त्याच्या आदेशापुढे प्राण म्हणजे क:पदार्थ मानणा-या वीरांनी सार्थ ठरवला….

 १९४७ मध्ये नानकाना साहिब गुरुद्वाऱ्याचे रक्षण करताना काहीशी अशीच स्थिती उत्पन्न झाली होती.. असं म्हणतो इतिहास.

 १९६५ मध्ये अशाच प्रकारची स्थिती उत्पन्न झाली होती… यावेळी स्थितीला उत्तर मात्र अस्सल मिळाले होते…. शत्रूला पायांत शेपूट घालून वाट फुटेल तिकडे पळावे लागले!

सुवर्णमंदिराच्या जलाशयात शत्रूच्या हल्ल्याचा एक साधा तरंगही उमटू दिला नाही नरबहाद्दरांनी… सेनानी होते हरबक्ष सिंग! 

 वरिष्ठ आरंभी नाराज झाले होते… परंतु यश प्राप्त झाल्यावर नाराजीची धार कमी झाली असावी… आणि खुद्द लाल ‘बहादूर’ पंतप्रधान महोदयांनी या महावीराची पाठ थोपटली… देशाने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले… पुढे पद्मविभूषण पुरस्कारावर सुद्धा नाव कोरले गेले!

 हरबक्ष या नावाचा अर्थ आहे… देवाची देणगी.. बक्षीस! ही देणगी पंजाब मधील एका अत्यंत श्रीमंत शेतकरी घराण्यात एका मुलाच्या जन्माच्या रूपाने अवतरली. त्यांचे पिताश्री डॉक्टर हरनाम सिंग हे त्या गावात डॉक्टर झालेले पहिले तरुण ठरले होते. त्यांनी जिंद इन्फंट्री नावाच्या सैन्य पलटनीमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा बजावताना, पहिल्या महायुद्धात सहभाग घेतला होता.

 १९५२ मध्ये जिंद इन्फंट्री स्वतंत्र भारताच्या सैन्यात पंजाब रेजिमेंट म्हणून जोडली गेली. हरबक्ष सिंग हे डॉ. हरनाम सिंग साहेबांच्या सात अपत्यांतले शेंडेफळ! शालेय जीवनात हरबक्ष हे अभ्यासात आणि खेळांत अतिशय निष्णात होते. हॉकी हा त्यांचा आवडीचा खेळ.

 १९३३ मध्ये हरबक्ष देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकादमी मध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले आणि १९३५ मध्ये अधिकारी झाले. पहिल्या वर्षी ब्रिटीश सैनिक असलेल्या तुकडीत सेवा बजावल्यानंतर त्यांना भारतीय सैन्य तुकडीत पाठवले गेले. काहीच वर्षांत ते दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले आणि जखमी सुद्धा. आणि दुर्दैवाने एके दिवशी जपानी सेनेच्या तावडीत सापडून युद्धबंदी झाले. भयावह छळ, उपासमार अवस्थेत त्यांनी जपान्यांच्या कोठडीत काही महिने काढले. त्यातच त्यांना टायफाईड आणि पुढे बेरीबेरी नावाचा अत्यंत दुर्धर आजार झाला. यातून केवळ दैव बलवत्तर म्हणून ते बचावले आणि १९४५ मध्ये अंबाला येथील सैन्य रुग्णालयात आणले गेले.

 त्यांचे मोठे बंधू लेफ्ट. जन. गुरुबक्ष सिंग हे त्यावेळच्या Indian National Army मध्ये commander होते.

 हरबक्ष साहेब पुढे १९४७ मध्ये क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेज मध्ये पुढील प्रशिक्षणासाठी रुजू झाले. भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर अगदी काहीच दिवसांत हरबक्ष सिंग साहेब ईस्टर्न कमांड मध्ये आले.

 काश्मिरात पाकिस्तानचे सैन्य टोळीवाल्यांच्या वेशात शिरले आणि त्यांनी प्रचंड गोंधळ माजवायला आरंभ केला… अगदी नवख्या असलेल्या भारतीय स्वातंत्र्याला सामोरे जावे लागणारा हा पहिला संघर्ष होता. यातील एका लढाईत आपले Commanding Officer लेफ्ट. कर्नल दिवाण रणजीत राय धारातीर्थी पडले. अशा नाजूक परिस्थितीत हरबक्ष सिंग यांनी commander म्हणून स्वयंस्फूर्तीने जबाबदारी मागून घेतली. परंतु त्यांंना 161, Infantry Brigade चे deputy commander बनवले गेले. आणि ही नवीन जबाबदारी हरबक्ष सिंग साहेबांनी मोठ्या प्रभावीपणे पार पाडून दाखवली… अशी की यामुळे त्या युद्धाचे पारडे भारताच्या बाजूस झुकले.

 एखादे सैन्याधिकारी जसजसे पदोन्नत होत जातात, तसतसे त्यांच्या गणवेशावर सन्मान-अधिकार दर्शक चिन्हे लावली जातात… त्याला stars म्हणतात… एक ते पाच तारे. ब्रिगेडीअर साहेबांना एक तारा, मेजर जनरल साहेबांना दोन तारे, लेफ्टनंट साहेबांना तीन, जनरल साहेबांना चार सितारे असतात. आणि फिल्ड मार्शल या सर्वोच्च मानद पदावरील साहेबांना Five Stars असतात. अर्थात यातील पहिला सितारा प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते, शौर्य गाजवावे लागते, उत्कृष्ट कामगिरी करावी लागते… पुढील सितारा मिळवायला त्यापेक्षाही जास्त कामगिरी जरुरीची असते…

 पुढे कारकीर्दीत हरबक्ष सिंग साहेब three stars पर्यंत पोहोचले होते…. पण एका प्रसंगामुळे त्यांनी त्यावेळी त्यांनी कमावलेल्या एका सिताऱ्याचा स्वत:हून त्याग केला… ते एक पायरी खाली उतरले… पण त्याला कारणही तसेच घडले… ! 

 १२ डिसेंबर, १९४७… 1, शिख बटालियनचे सैनिक काश्मीरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात मोठ्या प्रमाणात गमावले गेले, फार मोठे नुकसान झाले! हे समजताच हरबक्ष साहेब मोठ्या त्वरेने उरी येथे पोहोचले आणि स्वयंस्फूर्तीने त्यांनी त्या बटालियनचे commander हे पद स्वीकारले… बटालियनचे नेतृत्व करण्यासाठीची अर्हता निराळी असते…. म्हणजे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना खाली येऊन नेतृत्वपदी येता येत नाही बहुदा….. यासाठी त्यांनी आपल्या उच्चपदाचा एक तारा कमी केला असावा, असे वाटते…. आणि ते त्या बटालियनचे अधिकारी झाले… हा फार मोठा त्याग समजाला जातो… आपल्या सैनिकांसाठी वरिष्ठ पदावरून कनिष्ठ पदावर येणारे अधिकारी विरळाच! 

 साहेबांनी ती बटालियन श्रीनगर येथे आणली… आणि त्या बटालियनचे पुनर्वसन सुरु केले… एखाद्याच्या पित्याच्या आग्रही, निग्रही आणि प्रेमळ कार्यपद्धतीने त्यांनी ही बटालियन पुन्हा आपल्या पायावर उभी करायला प्रारंभ केला… पण त्यांचे हे काम जेमतेम पूर्ण होते न होते तोच….. हंडवारा खोऱ्याजवळची बर्फाच्छादीत ‘फारकीया की गली’ ओलांडून पाकिस्तानी सैन्याने हंडवारावर कब्जा केला असल्याची खबर आली!

 बटालियन संख्येने निम्म्यावर आलेली होती… संख्याबळ अतिशय तोकडे होते… तशाही परिस्थितीत हरबक्ष साहेबांनी शत्रूवर चाल केली… सैनिकांमध्ये स्वत:च्या नेतृत्वाच्या बळावर, स्वत: प्रत्येक मोर्चावर गोळीबाराच्या वर्षावाची पर्वा न करता भेटी देत देत प्रचंड उत्साह निर्माण केला… सवा लाख से एक लडाऊ… हे गुरु गोविंदसिंग साहेबांचे शब्दच जणू त्यांनी आचरणात आणले…. हंडवारामधून त्यांनी शत्रूला हुसकावून लावले! ही मोठीच कामगिरी मानली जाते! एक STAR कमी झाला असला तरी युद्धाच्या आकाशात भारताचा विजयी तारा प्रकाशमान झालेला दिसत होता!

 यानंतर १९४८ मध्ये साहेबांना ब्रिगेडीयर पदी बढती मिळाली आणि १६३, Infantry मध्ये जबाबदारी दिली गेली आणि शत्रू जिथून आपल्याविरुद्ध कारवाया करतो ते तिथवाल हे ठिकाण ताब्यात घेण्याचे आदेश दिले… केवळ सहाच दिवसांत साहेबांनी फत्ते मिळवली… पण ही कामागिरी अत्यंत कठीण होती…. शत्रू ताकदवान होता.

 साहेबांचे पायदळ सैन्य अत्यंत आवेशाने आणि वाऱ्याच्या वेगाने, कठीण डोंगर पार करीत, अकरा हजार फूट लांबीची निमुळती खिंड रात्रीच्या अंधारात पार करून पाकिस्तानी सैन्याच्या उरात धडकी भरवणारी गर्जना करीत पोहोचले… शत्रूने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की इतक्या वेगाने हल्ला होईल… शत्रू दाही दिशांना पळू लागला. पाकिस्तानी सैन्य सैरावरा झाले.. माघारी पळाले. पण पुन्हा चालून आले. तोवर साहेबांनी मोर्चे अत्यंत मजबूत करून ठेवले… शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता साहेब प्रत्येक सैन्य-खंदकात स्वत: पायी जात, प्रत्येक सैनिकाला प्रोत्साहित करीत… आपले इतके बडे अधिकारी प्रत्यक्ष लढाईच्या मोर्चावर सर्वांच्या पुढे उभे असलेले पाहून सैनिकांना त्वेष चढत असे! या कामगिरीसाठी हरबक्ष सिंग साहेबांना ‘वीर चक्र’ पुरस्कार प्रदान केला गेला!

 हरबक्ष सिंग साहेबांनी पुढे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या. इंग्लंडमध्ये जाऊन विशिष्ट सैन्य अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले. जर्मनीमध्ये विशेष कामगिरीसाठी ते निवडले गेलेले पहिले भारतीय अधिकारी ठरले होते.

 नंतरच्या काळात त्यांनी चीनने केलेल्या आक्रमणात त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली. या युद्धाचा परिणाम भारतासाठी फारसा सकारात्मक ठरला नाही. सैन्याचे मनोबल काहीसे खालावलेले होते! हरबक्ष सिंग साहेबांनी आपल्या सैन्याला आक्रमण करायला प्रेरित केले… जिंकण्याची सवय पुन्हा अंगीकार करायला लावली… आणि ही सवय आजही कायम राहिली आहे आपल्या सेनेत.

 आपल्या अलौकिक कार्यकाळात भारतीय लष्करातील जनरल या अतिशय उच्च पदा खालोखाल असलेल्या, लेफ्टनंट जनरल पदावर पोहोचून हरबक्ष साहेब सेवानिवृत्त झाले.

 अमृतसर येथील सेन्ट्रल सीख संग्रहालयात शिखांचे सर्व गुरु साहेब, संत, शूरवीर इत्यादी अनेकांच्या तसबिरी, स्मृतीचिन्हे जतन करून ठेवली आहेत… या संग्रहालयातील एका भिंतीवर हरबक्ष सिंग साहेबांचे तैलचित्र मोठ्या सन्मानाने लावण्यात आले आहे… हा एक मोठा पुरस्कारच म्हणावा लागेल! 

 १४ नोव्हेंबर, १९९९ रोजी साहेब ज्योती ज्योत सामावले गेले… गुरुंनी दाखवलेल्या शौर्याच्या मार्गावर चालत त्यांनी देशसेवा बजावली…. भारत देश नावाच्या ‘सुवर्णमंदिरा’ची राखण केली! ‘वाहे गुरु दा खालसा… वाहे गुरु दी फतेह… ‘ जय हिंद, साहब! 

 एवढे मोठे कर्तृत्व सांगायला किमान एवढे लिहावेच लागले.. ते सुद्धा अधिकार नसताना. पण हे कुणीतरी सांगायला हवे म्हणून हा लेखन प्रपंच. माहिती, फोटो, तपशील, कागदपत्रे विकीपिडीया, इंटरनेटवर उपलब्ध असतेच.. त्यातून पाहूनच लिहिली आहे.

 हरबक्ष साहेबांबद्दल पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शूरवीर कॅप्टन अमरिंदर साहेबांनीही खूप सविस्तर लिहिले आहे. आपणही असे करू शकता… किमान ही कथा इतरांपर्यंत पोहोचवू शकता. या लेखात संदर्भाच्या असंख्य चुका असतीलच.. जाणकार सुहृदांनी लक्षात आणून द्याव्यात… दुरुस्ती करून घेईन! जय हिंद।.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उर्मिला – लेख क्र. १ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ उर्मिला – लेख क्र. १ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

एक ! फक्त, एक निर्णय झाला किंवा घ्यावा लागला आणि आमचं सारं कुटुंब उध्वस्त झालं. मी फक्त निर्णय म्हणते आहे. आजही त्या शब्दाला मी कोणतंही विशेषण लावू शकत नाही. म्हणजे हा निर्णय योग्य होता की चुकीचा होता हे नियतीच जाणे ! पण आमच्या सगळ्या कुटुंबांनं जे भोगलं ते मला नाही वाटत इतर कोणी भोगलं असेल. गतजन्मी खूप हातून पापे घडलेली माणसे या जन्मात एकमेकाचे इतके जिव्हाळ्याचे सोबती बनून कां जन्माला आली असतील? आज या साऱ्यांचीच कैफियत घेऊन आले आहे.

मी उर्मिला, जनक राजा व राणी सुनयना यांची मुलगी! सीता, माझी मोठी बहीण फक्त दत्तक घेतलेली! मांडवी व श्रुतकिर्ती या माझे काका, कुशल ध्वज, यांच्या मुली! आमच्यावर बालपणीच फार चांगले संस्कार झाले. कारण जनक तात हे महान शिवभक्त होते. भौतिक संपत्तीची आसक्ती नसणारे तरीही राजा असणारे ते एक आदर्श उदाहरण होते. अध्यात्मिक प्रवचनात त्यांना अतिशय रस होता. निरनिराळे ऋषी, साधक यांच्याशी ते संवाद करीत असत. अशा वातावरणात आम्ही वाढलो, त्यामुळे ज्ञानाच्या भुकेल्या, कर्तव्य तत्पर, निर्भय, अनासक्त हे गुण तर आमच्यात असायलाच हवेत नं!.

सीतेचं स्वयंवर झालं, दशरथ राजांचा मुलगा राम, यांनी पण जिंकला व त्यांचा विवाह सीतेशी पक्का झाला. त्याचवेळी भरत यांचा विवाह मांडवीशी, शत्रुघ्न यांचा विवाह श्रुतकीर्तीशी व लक्ष्मण यांचा विवाह माझ्याशी म्हणजे उर्मिलाशी झाला. संबोधने वापरुन आपला गोंधळ होऊ नये म्हणून मी सगळ्यांना नावानेच संबोधते त्याबद्दल मला क्षमा करा.

आम्ही सगळ्याच लहान होतो त्यामुळे‌ लग्नानंतरची पहिली बारा वर्षे कशी भुर्रकन उडाली समजलंच नाही. राजा दशरथांनी आपला ज्येष्ठ पुत्र राम यांना राज्याभिषेक करण्याचं ठरवले, आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. अर्थात मी फार लांबवत नाही कारण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या बद्दल आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे त्यांनी जे काही सोसलं त्याची इथे चर्चा करायचं कारणच नाहीय.

राम सूर्य असेल तर सीता म्हणजे सूर्यप्रकाश त्यामुळे त्यांना एकमेकापासून वेगळे करणे शक्यच नाही. त्यांचं असं दिव्य नातं होतं. पण प्रत्यक्षात तसे ते कधीच फार काळ एकत्र राहू शकले नाहीत किंवा संसार सुख उपभोगू शकले नाहीत. फरक इतकाच की त्यांच्या त्यागाच्या संकटाच्या विजयाच्या कथा झाल्या आणि बाकी सारे कुटुंबीय हे मौनात गेले. ऐश्वर्य, कीर्ती, धैर्य, संपत्ती, ज्ञान व वैराग्य हे सहा गुण एकत्र असणारे भगवान श्रीराम एकमेव होते. या सर्व गुणांचे परमस्वरूप प्रकट करणारी सीता ही सर्वोच्च शक्ति होती. त्यामुळे हा शक्ती आणि नीती यांचा संयोग होता 

श्रीरामांचा वनवासात जाण्याचा निर्णय झाला सगळं कुटुंब, सगळी प्रजा शोकसागरात बुडून गेली. लक्ष्मण यांनी पण रामाबरोबर जाण्याचे ठरविले. त्यांचे तर, जेथे श्रीराम तेथे मी, हे ब्रीदच होते. मी ही तुमच्याबरोबर येणार असा मी हट्ट धरला. पण तात व तीन माता यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून ते गेले. जातांना असेही सांगून गेले की मी परत येईपर्यंत डोळ्यातून एक टीप सुद्धा गाळायचं नाही. पती सेवेपेक्षा पती आज्ञा महत्वाची नं? आणि माझा वियोग सुरू झाला. दोनच दिवसांनी दुःखातिरेकाने राजा दशरथ यांचे निर्वाण झाले. आणि पुन्हा एकदा सगळीकडे अश्रुंचा पूर लोटला. श्रीरामांनी परत येण्यास नकार दिला व भरत यांनी राज्याभिषेक करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे कैकयी माता पश्र्चाताप दग्ध झाल्या, कौसल्या माता व सुमित्रा माता दुःखात बुडाल्या. एकाच वेळी दोन वियोग सहन करणं कोणालाच शक्य नव्हतं. त्या तिघींनी सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेतला. घराचा एक आश्रम झाला. भरताने, राम परत येत नाहीत तोवर अयोध्येला येणार नाही, असे सांगितले व ते नंदीग्राम येथे जाऊन संन्यस्थ वृत्तीने राहू लागले. फक्त रामाची आज्ञा म्हणून अयोध्येत सिंहासनावर रामाच्या पादुका ठेऊन शत्रुघ्न च्या मदतीने राज्यकारभार बघू लागले. आणि माझ्याबरोबर मांडवी चा ही वियोग सुरू झाला. फक्त शत्रुघ्न व श्रुतकिर्ती नाही म्हणायला एकत्र होते. शत्रुघ्न यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. सैन्याचा युद्धाचा सराव, शस्त्रे, प्रत्यक्ष युद्ध यात बुडाले. त्यांनीही चांगला कारभार करून राज्याचा विस्तार केला. पण चौदा वर्षात एकाच्याही चेहऱ्यावर कधी स्मित रेषा उमटली नाही. त्यामुळे श्रुतकिर्ती सुखी होती असे म्हणणे चुकीचे आहे. सगळेच नाईलाज या शब्दाच्या आधीन होते. त्यातच लक्ष्मण यांनी राम सीता यांचे रक्षण करण्यासाठी निद्रा देवीकडे निद्रा न देण्याची विनंती केली. पण त्यांच्या वाटणीची निद्रा कुणाला तरी देणे आवश्यक होते. लक्ष्मणांनी माझी निवड केली. मला रोज निद्रादेवीची उपासना करावी लागे. नसलेल्या तिघांची काळजी तर जीव पोखरत होती 

दरवर्षी शिशिरात झडणारा आणि वसंतात फुलणारा, आज तर पक्षी आणि त्यांची पिल्ले यांनी चैतन्य भरलेला हा कदंब मी न्याहाळत राहते. मनात येतं, हे निसर्गाचं देणं आपल्याला का लाभलं नाही. चौदा वर्षे हा असाच झडलेला इक्ष्वांकु वंश पाहत राहायचं.

अशीच चौदा वर्षे लोटली. रावणाशी युद्ध करताना लक्ष्मण घायाळ झाल्याची बातमी नाही म्हणायला माझ्या जीवाचे पाणी करून गेली. त्यानंतर आनंदी आनंद येईल, खूप वर्षांनी हे घर हसेल असं वाटत होतं. पण सीतेचा सहवास या घराच्या नशिबातच नव्हता. अग्निपरीक्षा, मग पुन्हा वनवास, मग लव कुश यांना माझ्या ओटीत ठेवून, जीवनयात्रा संपवून धरणीच्या कुशीत विसावण झालं. हे सगळं कमी झालं म्हणून की काय दुर्वासांचा शाप रयतेला भोगावा लागू नये म्हणून स्वतः शिक्षा भोगण्याचा परस्पर निर्णय घेऊन लक्ष्मणांनी शरयू नदीत जलसमाधी घेतली. कां? मी कोणीच नव्हते कां त्यांची? त्यांना कदाचित दुसरा पर्याय नसेल पण मला होता नं! कां, माझा हात धरून मला म्हणाले नाहीत, ‘ चल! दोघे मिळून शरयू मातेच्या कुशीत विसावू. आता पुन्हा वियोग नाही सहन होत. ‘ माझा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नसेल? कां पुन्हा तेच!कर्तव्य, जबाबदारी हे शब्द वापरून आपली होणारी फसवणूक!

सगळे भाऊ आदर्श व्यक्ती, आदर्श भाऊ, आदर्श पुत्र, आदर्श प्रजा पालक होते. सगळ्या स्त्रिया आदर्श पतिव्रता, आदर्श सुना, आदर्श माता होत्या. सारे सदाचारी, सत्शील, कोणत्याही गोष्टीचा सहजपणे परित्याग करणारे! तरीही प्रत्येकाचे जीवन कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत दुःखी होते. नियतीला नेमकं काय शिकवायचं असतं, कोणता धडा द्यायचा असतो, हेच कळत नाही.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवे वृध्दाश्रम.. नवी यातनाकेंद्रे… !!!! – लेखक : सचिन मधुकर परांजपे ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ नवे वृध्दाश्रम.. नवी यातनाकेंद्रे…!!!! – लेखक : सचिन मधुकर परांजपे ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

— — स्वतःच्या घरातच बंदिस्त वृद्धाश्रम..

ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवले आहे… मोठे करुन स्वत:च्या पायावर उभे केले आहे.. अशा लोकांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवला नाही, पण स्वत:च्या मुलांच्या जबाबदाऱ्या… म्हाताऱ्यांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकवेळा गैरफायदा घेतला आहे.. आणि घरातच नवे वृध्दाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजऱ्यात आई बापांना बंद करुन टाकले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत….

आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की अक्षरश: अंगावर काटा उभा रहातो. माझ्या माहीतीमधील कित्येक मुलांनी म्हाताऱ्यांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन, त्यांना Taken for granted धरुन स्वत:ची मुले त्यांच्या जबाबदारीवर टाकून, स्वत:च्या करीअरकडे लक्ष दिले आहे.

साधारणत: साठी, पासष्ठी नंतर मनुष्य मग तो स्त्री असो की पुरुष, इतक्या वर्षांच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो. मुले मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरु झालेले असतात. या आयुष्याच्या संध्याछायेच्या कातरवेळी त्याला स्वत:साठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते… पण नकळतपणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदाऱ्या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो….

म्हाताऱ्या आजीआजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असते, नाही असे नाही. पण वयोमानामुळे, थकलेल्या शरीराने रोज नातवंडांना न्हाऊ माखु घालणे, जेवण देणे, त्यांच्या उस्तरवाऱ्या करणे, त्यांना हवे नको ते पहाणे हे शक्य होईलच असे नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्विकारणे भागच होऊन जाते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार होतो.

सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करीअरमधुन वेळ नसतो, मग आपल्या नातवंडांचे कसे होणार.. ? डे केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल.. ? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती मायेने करेल का.. ? असे अनेक प्रश्न म्हाताऱ्यांनाच पडतात आणि त्याभरात त्यांना स्वत:ला न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात…. एकदा जबाबदारी स्विकारली की, मग स्वत:चे आरामाचे वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधले जाते… लफ्फेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्याचा डबा भरुन देणे, त्याला स्कूल बस पर्यंत सोडायला जाणे, इथपासून ते दुपारी आडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वत:ची वामकुक्षी टाळून त्याला आंघोळ घालणे, जेवायला देणे, झोपवणे ही कामे करावी लागतात. नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठे काही कमी जास्त झाले किंवा त्याची तब्येत बिघडली की… “लक्ष कुठे असते हो तुमचे.. ?” किंवा ” तुमच्या आईनेच काहीतरी खाऊ घातले असेल माझ्या पोराला… ” असे खडे बोलही ऐकावे लागतात म्हाताऱ्यांना…

कधीकधी तर संध्याकाळी सून किंवा मुलगा आला की स्वत:चा लॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधीकधी रात्रीच्या वेळी जेवणाचेही सासुबाईंनाच बघावे लागते…. सून असते हाय-क्वालिफाईड… त्यामुळे तिला बोलून चालणार नसते.. एखादा शब्द जर कमी जास्त झाला तर स्वत:चाच मुलगा डोळे वटारुन बघतो…. वर वर छान दिसणा़ऱ्या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदीस्त वृध्दाश्रम आता जागोजागी दिसायला लागले आहेत. इथे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत, पण विश्रांती नाही, जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत. थकलेल्या शरीराला आराम नाही. अमेरिकेत मुलाकडॆ कौतुकाने गेलेले आईबाप चार महीन्यांनी उतरलेल्या चेहऱ्याने एअरपोर्टवर आलेले मी स्वत: बघितले आहेत. काल परवापर्यंत मुलाच्या अमेरीकन नोकरीचे कौतुक करणारे काका काकू यानंतर पुन्हा अमेरिकेला जायचे नावही घेत नाहीत, त्यामागेही हीच कारणे आहेत.

तुम्हाला मुले जन्माला घालून जर त्यांचे करणे झेपत नसेल तर एकतर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेऊन मुलांना डे केअर सेंटरवर ठेवावे. तुमचं करीअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे असेल तर मुलेच जन्माला घालू नका हे बेस्ट नाही का.. ? आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हाताऱ्या आईबापांवर सोपवून स्वत: करीअरच्या नावाखाली नामानिराळे राहीलेल्या सुनामुलांची मला अक्षरश: कमाल वाटते. हे नवे “बंदीस्त सोनेरी वृध्दाश्रम” – – 

आता साठीसत्तरीच्या वयातील वृध्दांसाठी यातनाकेंद्रे बनली आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. आणि यातील दुर्दैव म्हणजे या वृध्दांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता ही शब्दात व्यक्त करता येत नाही हा सर्वात मोठा त्रास आहे….!!!

लेखक : श्री सचिन मधुकर परांजपे (पालघर)

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर :: डॉ. राजेंद्र भारुड” – मुलाखत आणि शब्दांकन : सुश्री माधुरी पेठकर ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर :: डॉ. राजेंद्र भारुड” – मुलाखत आणि शब्दांकन : सुश्री माधुरी पेठकर ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती. 

पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं. 

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत  होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते. 

एम.बी.बी.एस.च्या  शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता. 

घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो  आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं. 

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.  

आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?

छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता. 

पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता. 

वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो. 

आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते. 

लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

मुलाखत आणि शब्दांकन : माधुरी पेठकर

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

“सा न कामयमाना निरोधरूपत्वात ॥ ७ ॥”

अर्थ : ती (भक्ती) कामनायुक्त नाही; कारण ती निरोधस्वरूपा आहे.

विवरण –  आपण भक्ति सूत्रांच्या दुसऱ्या भागात प्रवेश करीत आहोत. मागील भागात आपण भक्तीची व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. 

इच्छा नसलेला मनुष्य शोधूनही सापडणार नाही  आणि जर तो असलाच तर तो मृत असेल, नाही का ? सर्वसाधारण मनुष्य जेव्हा भक्तिमार्गात येतो, तेव्हा देवाने आपले अमुक अमुक काम करावे अशी त्याची सुप्त इच्छा असते. अशी इच्छा मनुष्य म्हणून असणे वावगे नक्कीच नाही, पण जर तो साधक असेल तर त्याच्या इच्छेत बदल झालेला असावा. भगवंताची भेट होणे ही यातील सर्वात आदर्श आणि उच्चकोटीचि इच्छा म्हणता येईल….! साधनेच्या अंतिम टप्प्यात तर ही इच्छा सुद्धा मरून जाते कारण साधकाच्या लक्षात येते की भगवंत आणि मी दोन नसून एकच आहोत. असो.

भक्ती ही प्रेमस्वरूप, अमृतस्वरूप, सिद्धिस्वरूप आहे, असे या पूर्वीच्या सहा सूत्रातून स्पष्ट केल्यानंतर पुन्हा ती कामनायुक्त नाही हे सांगण्याचे प्रयोजन काय ? याचे विवेचन आपण पाहू. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात देवाला म्हणतात,

“माझे मज कळों येती अवगुण । 

काय करूं मन अनावर ॥१॥

आतां आड उभा राहें नारायणा ।

दयासिंधुपणा साच करीं ॥२॥ 

वाचा वदे परी करणें कठीण ।

इंद्रियां अधीन जालों देवा ॥३॥ 

तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । 

न धरीं उदास मायबापा ॥४॥”

साधकाला साधन करू लागला की त्याला त्याच्यातले अवगुण तर समजू लागतात पण त्यांच्यावर मात  करता येतेच असे नाही. मनुष्याच्या वासना, इच्छा, आकांक्षा या अगदी खोलवर मुळं रुजलेल्या झाडासारख्या असतात. त्यांच्या मुळावर घाव घातला तरी त्यांना तोडणं काय सोपी गोष्ट आहे? ते झाडं तोडलं तर ते नव्यानं तरारून येऊ शकतं,  नव्हे ते येतच. साधकाला स्वतःला काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ हे सारे अवगुण जाणवत असतात. आपल्या वागण्यात ते नसावेत, असंही त्याला प्रामाणिकपणे वाटत असतं, पण मनाचा निश्चय वेळ येताच टिकत नाही. पूर्वीच्याच चालीप्रमाणे मनुष्य वागून मोकळे होतो आणि नंतर त्याला वाईट वाटतं रहात. 

श्रीमहाराजांना एकानं विचारलं,  माणसातला सर्वात मोठा गुण कोणता ? श्रीमहाराज म्हणाले, आपले अवगुण ओळखता येणं, हाच सर्वात मोठा गुण आहे! तेव्हा हा गुणही साधनेनंच आला आहे. हे भगवंता, मी वाईट आहे, पापी आहे, हे जाणवत आहे. पण काय करू. मन अनावर आहे. मनाला आवर घालता येत नाही. प्रसंग उद्भवताच हे मन अनावर होऊन जे बोलू नये ते बोलून जाते, करू नये ते करून जाते. माझी वाचा तुझे नाम घेते खरी, तोंडाने मी उच्च तत्त्वज्ञान बोलतो खरा, पण त्यानुसार जगणं, वागणं मला साधत नाही. मी तुझा नव्हे तर इंद्रियांचा दास आहे, हेच मला पदोपदी उमगतं. तरीही कसा का असेना, मी स्वतला तुझा दास म्हणवतोच आहे ना? मग हे मायबापा तू मला दूर करू नकोस. हे नारायणा, तूच आता आड उभा राहा आणि दयासिंधूपणा सार्थ कर. इथे जो आड शब्द आहे तो कशासाठी आला आहे? या आड शब्दाला दोन छटा आहेत. आपण एखाद्याच्या आड लपतो तेव्हा आड शब्द मागे या अर्थानं येतो आणि आपल्यात आणि एखाद्या गोष्टीत आडपडदा येतो तेव्हा आड हा मध्ये येतो! इथे ‘नारायणा’ला आड उभं राहायला सांगितलं आहे. म्हणजे या दुनियेच्या प्रत्येक गोष्टीच्या आड तू लपला आहेस, याची जाणीव मला करून दे. ते आकलन मला शक्य नसेल तर माझ्या मनावर प्रभाव पाडणाऱ्या, माझ्या मनाला अधिकच अनावर करून इंद्रियांच्या गळानं मला खेचणाऱ्या दुनियेच्या आणि माझ्या मध्ये तू उभा राहा, अशी ही विनवणी आहे. ही विनवणी कुणाला आहे? ती ‘नारायणा’ला आहे. नररूपात आलेल्या परमात्म्याला अर्थात श्रीसद्गुरूंना ही विनवणी आहे. कारण दयासिंधु हे विशेषण त्यांनाच तर लागू आहे. शब्द फार तोकडे असतात. दयासिंधु या चार अक्षरांतूनही त्यांच्या दयेची कल्पनाही येत नाही. तेव्हा महाराज, या दुनियेत तुम्हीच आहात, हे जाणण्याची दिव्य शक्ती तरी द्या नाही तर या दुनियेचा प्रभाव माझ्यावर पडू नये यासाठी तिच्या व माझ्यामध्ये उभे राहा!

{संदर्भ :- अभंग क्र. 1175, सार्थ तुकाराम गाथा (धार्मिक प्रकाशन संस्था)}

मनुष्य भक्ति करू लागला की त्याला अनेक प्रश्न पडू लागतात. सामान्य मनुष्याची एक वेगळीच खोड असते. भौतिक जगतात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी उशीर झाला तर तो धीर धरतो, पण अध्यात्मात मात्र त्याला लगेच फळ  हवे असते. एका हातात नाम आणि दुसऱ्या हातात मुक्ति……!

भौतिक जगतातील कायदे, आध्यात्मिक जगतात अधिक कठोरपणे आचरणात आणले जातात असे आपल्या लक्षात येईल. एखादा मुलगा नववीत आहे, तो त्यावर्षी अनुत्तीर्ण झाला तर त्याच इयत्तेत राहतो, पण अध्यात्माच्या शाळेत मनुष्य नववीत अनुत्तीर्ण तर त्याला पुन्हा बालवाडीत  प्रवेश घ्यावा लागतो…..! त्यासाठी समर्थांनी अखंड सावधान असावे असे सांगितले आहे.

मनुष्याच्या मनात सतत विचार येत जात असतात. ते कधी सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक असतात. गंमत अशी आहे की मनांत विचार येऊ नयेत यासाठी जेव्हा मनुष्य प्रयत्न करतो, अर्थात नामस्मरण करू लागतो, ध्यान लागावं म्हणून प्रयत्न करतो, तेव्हा हे विचार हटकून येत असतात, त्यांना थोपवणे शक्य होत नाही…..! मनुष्य त्या विचारांचेच चिंतन करू लागला तर विचारांचा प्रवाह कमी न होता वाढत जातो…..! आता यातून बाहेर कसे पडावे असा प्रश्न साधकाला पडतो. म्हणून वरील अभंगात संत तुकाराम महाराज प्रार्थना करतात की भगवंता तूच या सर्वांच्या आड ये आणि मला पुढील रस्ता दाखव.

साधना करून मनुष्याची बुद्धि शुद्ध होऊ लागते. त्याच्या मेंदूतून सात्विक विचार प्रगट होऊ लागतात. मनातील विचार ( बरेवाईट कोणतेही असोत) थोपविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. एक म्हणजे त्यांच्यावर बळजबरी करून बाहेर काढणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे अस्तित्व नष्ट करणे…..! थोडक्यात त्यांचा निरोध करणे… याचा विचार पुढील सूत्रात पाहू.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

!!! नारद महाराज की जय !!!

– क्रमशः लेख क्र. ७ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares