मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवं नातं… भाग-१ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

 

? जीवनरंग ?

नवं नातं… भाग-१ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

एप्रिल महिना होता. उन्हाळा मी म्हणत होता, अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. आभाळात ढग यायचे पण पावसाचा पत्ता नव्हता. त्यातच वीज गेल्यामुळे झोपही पूर्ण झाली नव्हती तरी ही रमा उठली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात आलेल्या दूधवाल्या कडून दुधाची पिशवी तिने आत घेतली. दूध तापत ठेवून दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण ठेवून दात ब्रश करायला गेली. दात घासून येईपर्यंत चहा तयार झाला होता. तो तिने दोन कपात ओतला. आणि एक कप आईला देऊन आली. आईची तब्येत बरी नसल्यामुळे पोळी भाजी करून तिला ऑफिस गाठायचे होते. ती कणिक मळून आंघोळ करून आली. पटकन एकीकडे भाजी टाकून पाच पोळ्या करून घेतल्या आपला डबा भरून पर्स मध्ये टाकला तोपर्यंत घड्याळाच्या काट्याने दहा वाजलेले दाखवले.

तिने पटकन गाऊन बदलून निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस चढवला. कंगव्याने केस विंचरून केसांचा पोनी बांधला, चेहर्यावर पावडरचा पफ फिरवला, ओठांवर हलकंस लिपस्टिक लावून पर्समध्ये घड्याळ आणि इअररिंगज टाकून पर्स खांद्याला अडकवली”आई, येते ग! ” म्हणत धावतच घराबाहेर पडली. बस स्टॉप वर आली. प्रवाश्यांची बरीच मोठी रांग होती. आज बहुतेक उशीर झाला त्यामुळे मोठी रांग असावी असा विचार करत ती रांगेमध्ये जाऊन उभी राहिली. आजूबाजूला कोणी ओळखीचे दिसते का? हे पाहण्यासाठी मागे मान वळवली आणि अचानक समोर पाहिले तर तिच्यापुढे चार पाच प्रवासी सोडून एक तरुण उभा होता. त्याच्याकडे तिचे लक्ष जाताच त्याने तिच्याकडे पाहून स्मितहास्य केले.

हा तरुण कोण असावा? पूर्वी शेजारी राहत होता का? शाळेत आपल्या वर्गात होता का? असातिने डोक्याला खूप ताण देऊन विचार केला पण तिला काही संदर्भ लागेना. तेवढ्यात बस आली. ती पटकन बस मध्ये चढली. तिने पाठीमागे वळून पाहण्याचे धाडसही तिने केले नाही\विलिंगडन कॉलेजचा स्टॉप येताच पटकन खाली उतरून झपाझप चालायला सुरुवात केली. रसायन शास्त्राचा पहिला तास पहिल्यावर्षाच्या वर्गावर असल्यामुळे तिला बरोबर अकरा वाजता वर्गात पोचायचे होते.

रमाने गेल्या वर्षी याच कॉलेजमधून एम. एससी. ची पदवी घेतली होती. तिची हुशारी, कामावरील तत्परता पाहून व्याख्याती म्हणून कॉलेजने तिची निवड केली होती. तिच्या भावाने, रोहनने दोन वर्षांपूर्वी वालचंद कॉलेजमधून कॉम्प्युटरमध्ये बी. ई. केले होते. गेल्या वर्षी रोहन एम. एस करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि एम. एस. होतास त्याला तिथे नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे रमा व तिची आई सांगलीमध्ये दोघीजणी राहत होत्या. राधाकृष्ण वसाहतीत त्यांचा छोटासा बंगला होता. मधुरभाषिणी व विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे रमा लवकरच विद्यार्थ्यांमध्ये प्रिय झाली.

डिसेंबरमध्ये मामे बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवस रजा काढून रमा नागपूरला गेली. लग्नघरातील उत्साही वातावरणात आठ दिवस कसे गेले समजलेच नाही. बहिणीची सासरी बिदाई करून रमा. सांगलीला परत यायला निघाली. सांगलीला जाणाऱ्या गाडीत बसता क्षणीच तिला पुन्हा त्या बस स्टॉपवर दिसणाऱ्या तरूणांची आठवण झाली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी ती बस स्टॉप वर आली तेव्हा बस स्टॉप वर तो तरुण उभा होताच. तो दिसायला रुबाबदार, उंच, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा. अगदी सभ्य होता. दोघांनाही एकच बस मिळाली, बस मध्ये बरीच गर्दी होती. त्याला बसायला जागा मिळाली पण रमाला उभ्याने प्रवास करावा लागणार होता हे पाहताच त्याने उभे राहून, ” तुम्ही इथे बसा” असे खुणेने सांगून तो स्वतःउभा राहिला. रमाने प्रथम दुर्लक्ष केले पण त्याने दुसऱ्यांदा विनंती करताच ” “काय शिष्ट मुलगी आहे ” असा इतरांच्या नजरेतील भाव पाहताच तिने त्याच्या विनंतीचा स्वीकार केला आणि त्याने दिलेल्या सीट वर ती बसली. स्टॉप येताच मात्र मागे न पाहता उतरून चालू लागली. असे बरेच दिवस चालले होते. तो कधीही तिच्याशी बोलला नव्हता की त्याने तिची चौकशीही केली नव्हती.

काही दिवसांनी अचानक आज “बस बंद “असा निर्णय घेतला गेला. रमाला या गोष्टीची कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी रमा बस स्टॉप वर आली, पाहते तो काय सर्व बस ओळीने उभ्या होत्या. आता काय करायचे? “अशा संभ्रमात रमा उभी असताना तो तरुण तिच्या जवळ येऊन म्हणाला, “मी रिक्षाने जात आहे तुम्ही येत असाल तर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या थांब्याजवळ सोडून मी पुढे जाईन, आज बस सुरू होतील असे वाटत नाही. “तिने जाणून-बुजून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि घरी निघून गेली कामावर न जाता. तो मात्र रिक्षामध्ये बसून निघून गेला. आपल्याबद्दल काहीही माहिती न देता ओळखत नसूनही हा तरुण आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न का करतोय? हे रमाला उमजत नव्हते. आईला त्याच्याबद्दल सांगून तिला अडचणीत टाकायचे हे रमाला पटत नव्हते. त्यामुळे ती एकटीच होणारा मनस्ताप सहन करत होती.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आपले मनआपल्या मैत्रिणीकडे मोकळे करायचे तिने ठरवले. मैत्रिणीला म्हणाली, “अगं माझ्या बस मध्ये दररोज एक तरुण चढतो. माझी लक्ष त्याच्याकडे जाताच तो माझ्या कडे बघून हसतो, मला मदत करण्याची एकही संधी तो सोडत नाही. मला त्याचा खूप राग येतो अगं तो स्वतःला समजतो तरी कोण? अगदी दुर्लक्ष करुनही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही”

अगं तो कोणीतरी ओळखीचा असेल किंवा त्याचा चेहरा तसा असेल. तो “तुझ्याशी बोलत नाही किंवा त्याने तुला तुझे नाव विचारले नाही. स्वतःबद्दल काही माहिती सांगितली नाही, तुला त्रासही देत नाही. मग तू त्याचा एवढा राग राग का करतेस? “या प्रश्नांची रमाकडे उत्तरे नव्हती.

हनुमान जयंती दिवशी हनुमान जन्मोत्सवाला रमा आईसह मारुती मंदिरात गेली होती. जन्मसोहळा झाल्यावर प्रदक्षिणा घालून प्रसाद घेण्यासाठी रमा थांबली होती. प्रसाद घेऊन वळल्यावर तो तरुण तिला दिसला. तिला एकदा वाटले या तरुणांबद्दल आईला सांगावे पण काही न बोलता ती आईसह घाईघाईने देवळातून बाहेर पडली.

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तथास्तु… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ तथास्तु… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“अरे विनय, कमालच करतोस तू. मी काय लहान बाळ आहे का एवढी काळजी करायला? उलट मला मस्त स्वातंत्र्य मिळतंय त्याचा उपभोग घेऊ दे की. जा खुशाल. रोज आपण फोनवर असूच की. अरे आठच दिवस तर जातो आहेस ना? मी नाही जात आता सांगलीला. तू आलास की मग दोघेही जाऊया.

जा तू. चल बॅग भरते तुझी मी. ” दुसऱ्या दिवशीच विनय विमानाने दिल्लीला गेला.) – इथून पुढे —-

सुजित जपानला अगदी मजेत होता. रोज आईला फोन यायचे आणि गप्पा मारायचे माय लेक.

विनयला जाऊन पाच दिवस झाले आणि सकाळपासून वैशालीच्या पोटात थोडं थोडं दुखत होतं. असेल किरकोळ म्हणून तिने इनो घेतलं, पेन किलर घेतली.

संध्याकाळी मात्र वैशालीला कळा सहन होईनात. असह्य झाल्यावर तिने कविताला फोन केला.

“कविता, कुठे आहेस? ”काकू घरीच आहे मी. आज माझा ऑफ आहे. ”

“बाळा, जरा वर येतेस का? मला पोटात फार वेदना होत आहेत ग”

कविता एका क्षणात वर आली. तिने वैशालीला तपासले. ”काकू घाबरू नका. याआधी कधी असं दुखलं होतं का? नाही ग. हे पहिल्यांदाच होतंय. ”

कविताने तिची कार काढली. हळुवार बोलत बोलत तिला लिफ्ट मधून खाली आणलं.

“ काकू, मला हा युरेटरीक स्टोन चा अटॅक वाटतोय. मी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल मध्ये नेते. मी आहे ना जवळ? घाबरू नका अजिबात. ”

वैशालीच्या सगळ्या तपासण्या, स्कॅन एमआरआय झालं. सगळीकडे कविताने फॉर्मवर सह्या केल्या. वैशालीला ऍडमिट करून घेतलं. कविताला वाटलं तसा वैशालीला युरेटरिक स्टोनच होता.

वैशालीला सलाईन मधून औषधे सुरू केली. उद्याच तिची तो खडा काढायची लिथोट्रिपसी सर्जरी करणार होते.

वैशालीने कण्हत विचारलं,

“ कविता, विनयला बोलावून घ्यायचं आहे का? ”कविता म्हणाली तशी जरूर नाहीये पण मी काकांना कालच फोनवर सगळं सांगितलंय काकू. त्यांचं काम झालंय तिथलं. उद्या ते येतीलच. ”

वैशालीच्या डोळयांत पाणी आलं. न बोलता तिने कविताचा हात कृतज्ञतेने दाबला. विनयची दिल्लीची फ्लाईट तीन तास उशिरा आली. विनय यायच्या आत वैशालीची सर्जरी झाली होती. कविताने फॉर्मस् वर सह्या केल्या, हॉस्पिटलचे ऍडव्हान्स पैसे भरून टाकले. विनय धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोचला तेव्हा वैशालीला स्पेशल रूममध्ये हलवले देखील होते.

ऑपरेशन करणारे डॉ मित्रा म्हणाले, “सगळं छान पार पडलं आहे मिस्टर रानडे. या आमच्या गोड कविताचे आभार माना. माझी हुशार स्टुडंट आहे बरं ही. किती शांतपणे तिने सगळं मॅनेज केलं बघा. अगदी छान आहे तुमची पेशंट आता. तुम्ही पेशंटला भेटू शकता. ”

विनय वैशालीजवळ बसला. अर्धवट गुंगीत असलेली वैशाली म्हणाली, “ कविता, बाळा किती आभार मानू ग तुझे मी. ”

वैशालीला छान बरं वाटायला लागलं. रोज कविता सकाळी रात्री चक्कर मारून जायची.

“ काकू, उद्या तुम्हाला घरी सोडणार आहेत. आता मस्त वाटतंय ना? ”

वैशालीच्या डोळ्यातून धार लागली. “ कविता, अग सख्खी मुलगी करणार नाही इतकं तू केलंस माझ्यासाठी. तुझे आभार कसे मानू समजत नाहीये ग ”

“ ते राहू दे हो काकू. उद्या घरी या आता मस्त. ”

– – वैशाली घरी आली.

नंतरचा आठवडा कविताला तिच्याकडे जायला अजिबात वेळच झाला नाही. त्या नंतरच्या आठवड्यात ती लिफ्टची वाट बघत खाली उभी होती. लिफ्ट खाली येताच तिला मागे सारून मोठी बॅग घेऊन एक तरुण लिफ्ट मध्ये घुसला. ” अहो मिस्टर, आधी मी जाणार आहे. एवढी प्रचंड बॅग घेऊन खुशाल मला ढकलून घुसताय हो? ”

हे ऐकायच्या आत तो तरुण लिफ्ट मध्ये घुसून वर गेलाही. अवाक होऊन रागाने बघत कविता धुमसत परत लिफ्टची वाट बघत उभी राहिली. लिफ्ट खाली आली आणि कविता घरी गेली.

पुन्हा तोच मुलगा दुसऱ्या दिवशी तिला खाली भेटला.

“ सॉरी हं. मी त्यादिवशी तुमच्या आधीच घुसलो लिफ्टमध्ये. माफ करा हं. पण माझी मनस्थिति नीट नव्हती. माझ्या आईचं स्टोनचं ऑपरेशन झालं आणि मी नव्हतो इथं. कशीतरी रजा घेऊन आलोय तिला भेटायला. लगेच मला चार दिवसांनी जपानला जावं लागणार आहे. सॉरी हं. ”असं म्हणत तो गडबडीने निघून गेला.

… ‘ अरेच्या. तर मग वैशाली काकूंचा सुजित तो हाच की. ’ मनाशी हसत कविता म्हणाली.

आज कविताला सुट्टी होती म्हणून कविता वैशालीकडे गेली.

“ ये ग ये कविता. ”

वैशाली म्हणाली. ” काकू बऱ्या आहात ना? अगदी उत्तम आहे ग मी. तुझी कृपा. ”

“ काहीतरी काय काकू? डॉक्टरचं कर्तव्यच नाही का ते? ”

सुजित हातात कॉफी घेऊन आला.

“ या? या तुझ्या डॉक्टर आहेत? ”

कविता हसत म्हणाली “ हो. मग डॉक्टर कशा दिसतात तुझ्या मते? “

सुजित तिच्या सुंदर स्मार्ट हसऱ्या चेहऱ्याकडे बघतच राहिला.

“ती कॉफी माझ्यासाठीच आणली आहे ना? दे ती. गार होईल. ” कविता हसत म्हणाली. नकळत सुजितने कॉफीचा मग तिच्या हातात ठेवला. वैशाली हे सगळं गमतीने बघत होती. कविता वैशालीचा निरोप घेऊन बाय करून निघून गेली.

“ आई, या पोरीने सगळं हँडल केलं? एकटीने? मी, बाबा कोणीही नसताना? पार स्वतः पैसे भरण्यापर्यंत? कमालच आहे हिची. ” सुजितने वैशालीला विचारलं.

“ हो सुजित. अतिशय हुशार तर ती आहेच पण अत्यंत खरी माणूस पण आहे. किती पटापट निर्णय स्वतः घेऊन तिने तुमची वाट सुद्धा न बघता माझं ऑपरेशन करूनसुद्धा घेतलं. नाही तर काय झालं असतं? मोठा होता तो स्टोन. धोका होता माझ्या युरेटरला. अतिशय धीट आहे ही मुलगी. नक्कीच तिचं भविष्य उज्ज्वल आहेच. ” वैशाली भारावून म्हणाली.

त्या संध्याकाळी सुजित कविताच्या फ्लॅटवर गेला.

कविता म्हणाली ” ये ना. कशा आहेत काकू आणि कसा आहेस तू? ”

सुजित म्हणाला ” मी अजिबात ठीक नाहीये. मला नीट तपासा डॉक्टर. सारखं छातीत धडधडत आहे. नीट झोप लागली नाही गेले दोन दिवस. ”

कविताने हसत हसत त्याच्या डोक्यावर टपली मारली.

“ चूप बस. समजतंय मला तुला काय होतंय ते. ”

“ हो ना? मग कविता, माझ्याशी लग्न करशील का? तरच मी बरा होईन”हसत सुजित तिला म्हणाला.

कविताने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली ” पण चालेल का अशी डोईजड बिझी डॉक्टर तुला?

मी माझं करिअर सोडणार नाही. मी घरी बसणार नाही. वाटेल तेव्हा वाटेल त्या वेळी मला कॉल आला की जावं लागेल. मी नुसती घरी बसणारी मुलगी नाही. मी हाऊस वाईफ मटेरियल तर नाहीच. ”

“बाई सगळं मान्य. कविता, मला अशीच मुलगी हवी होती. हो म्हण मला. ”

कविता हसत म्हणाली ” एक सांगू? ज्या दिवशी मला चक्क ढकलून तू लिफ्ट मध्ये घुसलास ना, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले. मला नव्हतं माहीत की तू वैशाली काकूंचा लाडका मुलगा आहेस ते. ”

सुजित चार महिन्यांनी जपानहून परत आल्यावर कविता आणि सुजितने त्यांचं गुपित सगळ्याना सांगितलं.

वैशाली म्हणाली ”, सुजित, कविता आपल्या घरी केव्हाच आलीय. म्हटलं होतं ना मी तुला, अचानक हा फ्लॅट मिळाला तशी अचानकच तुझी बायको समोर येऊन उभी राहील? ” वैशालीने कविताला जवळ घेतलं.

“ तुझ्याहून दुसरं कोणी या घरात येऊच शकत नाही ग कविता. ” म्हणत तिने सुजित आणि कविताला जवळ घेतलं. ‘ तथास्तु ‘ म्हणत विनयनेही दोघांना जवळ घेतलं. आणि ते चार हसरे चेहरे मोबाईल मध्ये कैद केले.. “

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तथास्तु… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ तथास्तु… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नीताकडे काल खूप दिवसांनी वैशाली गेली. खूप दिवस सगळ्या मैत्रिणी तिला बोलावत होत्या पण वैशालीला कुठे जावसंच वाटायचं नाही. सगळीकडे गेलं की एकच प्रश्न… 

‘ठरलं का सुजितचं लग्न? मिळाली का सूनबाई? बघ बाई. तिशी गाठली की सुजितने. फार उशीर नको ग बाई करू. मग मुली तरी कुठे चांगल्या उरतात? ‘ 

सुजितचं लग्न हा डोकेदुखीचा विषय झाला होता वैशालीला.

सुजित गुणी मुलगा. नाव ठेवायला जागा नव्हती त्याला. चांगल्या मोठ्या नोकरीत हा इंजिनीअर आयटी मध्ये भरपूर पगार असणारा मुलगा. , पण लग्न ठरताना कुठे घोडं पेंड खात होतं देव जाणे. विवाहमंडळात नाव नोंदवून झालं. , बऱ्याच मुली येत आणि मग पुढे गाडी सरकतच नसे. फोन केले की मुलीची आई म्हणे, “ अजून विचारलं नाही हो तिला. दमून येते ऑफिसमधून उशीरा. , कळवते हं चार दिवसात. ” – ते चार दिवस काही उगवत नसत.

आता मात्र वैशालीला समजेनासं झालं की काय चुकत आहे आपलं.

मग मागच्या आठवड्यात एक मुलगी सांगून आली. चांगली शिकलेली, दिसायला ठीकठाक. नोकरीही चांगली. जन्म शिक्षण सगळं खेड्यात बाहेरगावी झालेलं त्यामुळे तिच्या रहाणीमध्ये शहरी सफाई नव्हती.

आधी सुजित तिला भेटायला तयारच नव्हता. पण नाईलाजाने तो तिला कॉफी शॉप मध्ये घेऊन गेला. मग 

दोघेही त्याला चांगले कपडे हवे होते म्हणून मॉल मध्ये गेले. सुजितने ब्रँडेड टी शर्ट्स, ऑफिससाठी शर्ट्स घेतले. सहज नऊ हजार बिल कार्डने देऊन दोघे बाहेर आले.

ही म्हणाली, “बाप रे. एवढा खर्च करतोस तू? नऊ हजार? यात साधे शर्टस् आठ आले असते. मला नाही असली उधळपट्टी आवडत. असाच नेहमी खर्च करतोस का तू?”

सुजित चिडून म्हणाला, ” हो. याहून जास्त सुद्धा. मला रहावं लागतं बरं असं. ऑफिस मध्ये सतत परदेशी लोक येत असतात, मीटिंग्ज असतात. माझे हे शूज पण नऊ हजाराचे आहेत बरं का ”

“हो का? मला असलं आवडत नाही. माणसानं साधं रहावं अशा मताची आहे मी. ”

सुजित म्हणाला, ”हो का? ते दिसलंच की. हा ड्रेस जो घातला आहेस ना तो अगदी वाईट गबाळा आहे. स्टिचिंग अगदी बंडल आहे. असेल तुमच्या गावाकडचा. खेडवळ दिसते आहेसच. ”

तिथल्या तिथे पाठ फिरवून सुजित घरी निघून आला.

घरी येऊन वैशालीला चिडून म्हणाला, ”आई, कसल्या ग मुली बघतेस आणि मला पाठवतेस त्यांना भेटायला? माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण असली खेडवळ ध्यानं आणत जाऊ नकोस. कसला तो भिकार चुडीदार घालून आली होती. भयानक रंग आणि शिवलेला तरी किती गावरान. वर ओढणी.. शी”

आई बाबा हसले.

“हसू नको आई. काय ती पोरगी ग. अग, सीसीडी मध्ये कॉफीचं बिल आलं नेहमीसारखंच सातशे रुपये तर ही म्हणाली, त्यापेक्षा त्या समोरच्या उडप्याकडे चाळीस रुपयात येते कॉफी. आई, कृपा कर. असली मुलगी मला नकोय ”

सुजित तणतणत आत गेला.

आईबाबा म्हणाले, ”अरे मग तू स्वतः शोध की ऑफिस मधली तुझ्या पसंतीची. आमची परवानगी आहे की. उलट आमचा त्रास वाचेल रोज त्या मंडळात वेबसाईटवर पोरी शोधत बसायचा. ”

सुजित म्हणाला, “ हो. त्या तर एक से एक नकचढ्या. या खेडवळ मुलीपेक्षा उलटीच तऱ्हा त्यांची. नुसत्या शॉपोहोलिक. जणू काही मॉडेलिंग करायला निघाल्यात. जाऊ द्या. असेल माझ्या नशिबात ते येईल समोर ग. नाही तर करणार नाही लग्न. त्यात काय मोठं? ”

सुजित चिडचिड करत झोपला आणि वैशाली आणि विनय हताश होऊन बघत राहिले.

वैशालीच्या खालच्या मजल्यावरचे प्रधान कायमचे परदेशात चालले होते मुलाकडे.

प्रधानबाई वैशालीकडे आल्या आणि म्हणाल्या, ”वैशाली, सगळ्यात आधी तुला विचारते. आम्ही हा फ्लॅट विकतोय. तुला हवाय का? आम्ही मुलाकडे कायमचे अमेरिकेला जातोय. बघ. विचार करून सांग. काय दोन लाख कमी दे पण तू घ्यावास असं वाटतं मला. ”

सुजित आणि विनय ऑफिस मधून आल्यावर वैशालीने हे त्यांना सांगितलं. ”अरे. मग घेऊन टाकूया की हा प्रधानकाकूंचा फ्लॅट आई. मस्तच आहे की.

बाबा, तुम्हाला काय वाटतं? आणि स्वस्तही पडेल आपल्याला. मला हसत लोन देईल माझी कंपनी.

देऊ काही दिवस भाड्याने. नंतर मग बघूया. यावर मात्र सगळ्यांचं एकमत झालं. दोनच महिन्यात ते डील करून आणि फ्लॅटचा ताबा देऊन प्रधान काका अमेरिकेला गेले देखील.

सुजित आईला म्हणाला” बघ आई. गोष्टी नशिबात असल्या की अशा समोर येऊन उभ्या रहातात बघ. स्वप्नात तरी वाटलं होतंका, अचानक आपला दुसरा फ्लॅट होईल? मस्त मिळाला ग आपल्याला. आणि स्वस्त पण. ”

वैशाली म्हणाली, ” हो रे सुजित. अशीच अचानक तुझी बायको समोर येऊन उभी राहील बघ. ” तथास्तु. असं म्हणत विनयने सुजितच्या डोक्यावर टपली मारली आणि सगळे हसायला लागले.

त्या दिवशी अचानक वैशालीकडे सुजाता आली.

”वैशू, तुम्ही म्हणे खालचा फ्लॅट पण घेतला विकत? भाड्याने देणार आहेस का? सहज विचारते हं. आग्रह नाही. माझी भाची मुंबईला आहे. ती पुण्यात एमएस करायला आलीय सर्जरीत. तिला दोन वर्षासाठी देशील का फ्लॅट रेंट ने? माझी बहीण श्रीमंत आहे आणि ही कविता फार हुशार डॉक्टर आहे बघ. तिला स्वतंत्रच फ्लॅट हवाय. तू म्हणशील ते भाडे हे लोक देतील. पण कविता इथे एकटीच रहाणार. तिचे आईबाबा जमेल तसे येत राहतील. बघ. विचार कर. विनय सुजितला पण विचार. ”

सुजाता निघून गेली.

सुजित म्हणाला, आई, तुला सांगणारच होतो, मला कंपनी सहा महिन्या साठी जपानला पाठवतेय. पुढच्याच महिन्यात मी सगळ्या फॉरमॅलिटीज करून जाईन. तर मग बघा. तुला योग्य वाटलं तर देऊन टाक खात्रीच्या लोकांना भाड्याने. ”

पुढच्याच महिन्यात पेठे नवरा बायको येऊन विनय वैशालीला भेटून गेले. फ्लॅट बघून गेले आणि म्हणाले,

”कविता आमची एकुलती एक मुलगी आहे. तिला एकटीला फ्लॅट मध्ये ठेवणं जरा अवघड वाटत होतं. पण तुम्हाला बघितल्यावर काळजी नाही. अर्थात ती डॉक्टर आहे आणि धीट पण आहे. तरीही लक्ष राहू दे”

सुजित जपानला निघून गेला आणि नंतर कविता पेठे खालच्या फ्लॅट मध्ये रहायला आली. दिवसदिवस ती हॉस्पिटल ड्यूटीत आणि अभ्यासात मग्न असायची आणि क्वचितच तिची गाठ पडायची वैशालीशी.

त्या दिवशी विनय ऑफिस मधून घरी आला आणि म्हणाला, अग वैशाली, ऑफिसचं ऑडिट आहे. मला आठ दिवस दिल्लीला जावं लागतंय. मी खूप सांगितलं की मुलगा नाहीये इथे आणि मग बायको एकटीच राहील घरी. पण नाईलाज आहे ग. आठच दिवसांचा प्रश्न आहे. का जातेस माहेरी? सांगलीला? तशीही तू बऱ्याच दिवसात गेलीच नाहीस की”

वैशालीला हसूच आलं. “अरे विनय, कमालच करतोस तू. मी काय लहान बाळ आहे का एवढी काळजी करायला? उलट मला मस्त स्वातंत्र्य मिळतंय त्याचा उपभोग घेऊ दे की. जा खुशाल. रोज आपण फोनवर असूच की. अरे आठच दिवस तर जातो आहेस ना? मी नाही जात आता सांगलीला. तू आलास की मग दोघेही जाऊया. जा तू. चल बॅग भरते तुझी मी.” दुसऱ्या दिवशीच विनय विमानाने दिल्लीला गेला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओळख – मूळ रशियन कथाकार : एंतोन चेखव – मराठी अनुवाद : सुश्री मेधा देव ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ओळख – मूळ रशियन कथाकार : एंतोन चेखव – मराठी अनुवाद : सुश्री मेधा देव ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

ओळख!!! ….

एका शहरात एका आडवळणाच्या बसस्टॉपवर आज मात्र दोघेच होते. एक साधारण सव्वीस – सताव्वीस वर्षांची प्रेग्नंट युवती आणि दुसर्‍या कोपर्‍यात एक वयस्कर साठी पासष्ठीकडे झुकलेला इसम. दोघेही बसची वाट पहात बसस्टॉपवर उभे होते.

तो इसम मघापासून त्या प्रेग्नंट युवती कडे नी तिच्या त्या गोल वाढलेल्या पोटाकडे बघत होता अतिशय कुतूहलाने!! ती युवती मात्र थोडीशी विचलित, पण तरीही शांत!

मघापासून बघत असलेल्या त्या वयस्कर इसमानी थोडसं पुढे होत धीरानेच विचारलं, ” अशा स्थितीत किती दिवस झाले तुम्हाला? ” त्या युवतीचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती आपल्याच विचारांत हरवून गेली होती. तिच्या मनावरचा ताण, तणाव तिचं ते फ्रस्ट्रेशन सगळं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होतं. त्या सगळ्या विचारात ती गढून गेली होती. आधी तिने काहीच उत्तर दिलं नाही, मग एकदम भानावर येत थोड्या शांततेने ती अगदी हळुवार पुटपुटली, ” तेवीस आठवडे झाले. “

त्या माणसाने पुन्हा थोडे कुतूहलाने विचारले,

” पहिलीच वेळ आहे? ”

” हो “, ती इतक्या हळू आवाजात म्हणाली की त्याला जेमतेमच ऐकू गेलं.

” काही काळजी नाही करायची, सगळं छान होईल, ” त्यानी तिला धीर दिला. आपला एक हात अलगद आपल्या पोटावर ठेवत तिने समोर कुठेतरी बघितलं. तिच्या डोळ्यात एकीकडे थोडीशी चमक तर दुसरीकडे येणार्‍या अश्रूंना थोपवण्याचा निष्फळ प्रयत्न, तरीही ती उत्तरली, “होप सो “.

तिच्याकडे बघत तो माणूस म्हणाला ” कधीकधी आपण आपल्यावरच्या ताण तणावामुळे खूप भारावून जातो, पार दबून जातो त्याच्याखाली, खूप बाऊ करतो त्याचा, खरंतर काहीच गरज नसते त्याची.

” असेलही तसे, ” दुःखी आवाजात ती पुटपुटते. तिचा तो दुःखद स्वर ऐकून त्याला तिची खूप दया वाटली. अतिशय करूण नजरेनी त्याने तिच्याकडे बघितले. ती खूप अस्वस्थ आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो हळुवार बोलला, ” तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. मनावर खूप ताण आलाय तुमच्या. तुम्हाला हे सारं सहन होत नाहीये. तुमचा नवरा तुमच्याजवळ नाही आहे का? ” तिने तितक्याच निर्विकारपणे पण तुटलेल्या स्वरात उत्तर दिले, ” त्याने चार महिन्यांपूर्वीच सोडलंय मला. ” ” का? “, त्याने विचारले. ” ते सांगणं फार क्लिष्ट, काॅप्लीकेटेड आहे”, ती म्हणाली.

” ओह, साॅरी, पण मग तुमच्या कोणी अगदी जवळचं, तुमच्या जिव्हाळ्याचे मित्र, मैत्रीण, कदाचित तुमच्या कुटुंबातील!! कोणीच नाहीये का तुमच्याजवळचं, तुम्हाला सांभाळून घेणारं? ” तो विचारतो.

ती एक खोल श्वास घेते नी म्हणते, ” नाही, मी एकटीच रहाते माझ्या डॅडी.. , साॅरी वडिलांबरोबर. पण ते आजारी असतात.

खरंतर आता ती खूप कंटाळलेली असते. बसलासुद्धा नेमका उशीर. दोघांचंही लक्ष आता बस येण्याकडे. त्यामुळे कोणीच बोलत नाही. काही काळ दोघांमधे शांतता. पण त्या माणसाच्या मनात अनेक प्रश्न??

तो एकदम विचारतो, ” तुम्हाला लहानपणी वाटायचे तसेच आजही तुमचे वडील, डॅडी तुम्हाला तितकेच खमके.. तुम्हाला पूर्णपणे सांभाळणारे, आधार देणारे वाटतात? “.

” हो, ते आजही माझे आधारस्तंभ आहेत, ” ती सांगते.. आणि त्याचवेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटून ते गालावर ओघळतात. ” 

त्यांच्या ह्या अशा आजाराच्या स्थितीतही? “.. तो माणूस आश्चर्याने विचारतो, ” काय झाले आहे त्यांना? “

” त्यांना विस्मरण झालंय. आता काहीच आठवत नाही. ते हे ही विसरलेयत की मी कोण आहे? “.

ती एवढं बोलते तेवढ्यात बस येते. ती त्या बाकावरून उठते. आपल्याच विचारात तीन चार पावलं पुढे जाते नी एकदम आठवून मागे वळते… त्या वयस्कर माणसाच्या अगदी जवळ जाऊन प्रेमाने त्याचा हात आपल्या हातात घेत त्याला उठवत हळुवार म्हणते,

” डॅडी चला, आपली बस आलीय. “…….

मूळ रशियन लेखक : एंतोन चेखव 

अनुवाद : सुश्री मेधा देव

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्ट्रॉबेरी… भाग १ – अंग्रेजी कथाकार : जेम्स हेरियट ☆ स्वैर मराठी अनुवाद – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ स्ट्रॉबेरी… भाग १ – अंग्रेजी कथाकार : जेम्स हेरियट ☆ स्वैर मराठी अनुवाद – श्री मकरंद पिंपुटकर ☆

संतोष बारटक्के – गुरांचे डॉक्टर, मुक्काम पोस्ट सांगली. एका लग्नासाठी आज पुण्याला आले होते आणि त्यांच्या सरांचे सर डॉक्टर विष्णू दांडेकर यांना भेटण्यासाठी ते खास वेळ काढून आले होते. दांडेकर सरसुद्धा गुरांचेच डॉक्टर. ७० – ७५ वर्षे वय झालं होतं, परंतु अजूनही स्मृती पूर्णपणे शाबूत होती. त्यांची भेट झाली की त्यांच्या आठवणींच्या पोतडीतून काही ना काही किस्से ते काढायचे आणि त्यातून संतोषला खूप शिकायला मिळायचं.

आजही भेट झाल्यावर दांडेकर सर जुन्या आठवणीत रममाण झाले होते.

“१९८५ – ९० च्या सुमारासचा काळ. भारतामध्ये परदेशी गाई (अधिक दूध देणाऱ्या exotic breed च्या गाई) आणणं हे खूप common झालं नव्हतं. तुला तर माहितीच आहे की देशी गाय जर आठ ते दहा लिटर दूध दिवसाला देत असेल तर या परदेशी गाई जर्सी, एचएफ (होलस्टेन फ्रेशियन) या दिवसाला ८० लिटरपर्यंत दूध देतात. आजची आठवण ही त्या काळच्या अशाच एका परदेशी गायीची आहे, ” दांडेकर सर सांगत होते.

“तुकाराम भोसले हे सासवडचे प्रगतिशील शेतकरी. त्यावेळी तेसुद्धा माझ्यासारखेच २५ – ३० वर्षांचे असतील. आर्थिक परिस्थिती ठीकठाक, परंतु त्या काळातला एक प्रयोगशील आणि विज्ञाननिष्ठ असा शेतकरी. घरची थोडी गुरं होती परंतु जातिवंत गुरं नसल्याने दुधाचे उत्पन्न फारसं नव्हतं. एके दिवशी त्यांनी आवर्जून मला त्यांच्या शेतावरती बोलावलं, मी गेलो, गोठ्यात डोकावलो आणि पाहतच राहिलो. तिथे एक लालचुटूक रंगाची, अतिशय देखणी shorthorn प्रजातीची परदेशी गाय बांधलेली होती. मी अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहतच राहिलो, ” दांडेकर सर सांगत होते,

“मला तसं बघताना बघून तुकारामदादा हसले आणि म्हणाले, डॉक्टरसाहेब हिलाच तर बघायला तुम्हाला बोलवले आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसारखी लालचुटूक दिसते म्हणून आमच्या कारभारिणीने हिचं नाव स्ट्रॉबेरी ठेवलंय.

या अशा महागाच्या गाईसाठी दादांनी पैशांची सोय कुठून केली होती काही कल्पना नव्हती, कारण त्याकाळी अशा जातिवंत विदेशी गाई सहजी उपलब्ध होत नसत. मला कल्पना होती की माझी जबाबदारी वाढली होती, कारण आता हिचा औषधोपचार करण्याची जबाबदारी माझ्यावर येणार होती आणि ती आणि तिच्या कालवडी धष्टपुष्ट आणि दुभत्या कशा राहतील ही काळजीसुद्धा मलाच घ्यायची होती.

नंतर मग मला छंदच लागला, दर आठ दहा दिवसांनी त्या परिसरात गेलो की आवर्जून तुकारामदादांना भेटायचं आणि राजबिंड्या स्ट्रॉबेरीची भेट घ्यायची.

काही कारणाने महिनाभर माझं तिथं जाणं झालं नाही आणि एका दिवशी तुकारामदादांचा मला फोन आला. आवाज काही प्रसन्न वाटत नव्हता. थोड्याशा चिंतातूर आवाजात त्यांनी मला सांगितलं, “डॉक्टरसाहेब, जमेल तेव्हा चक्कर मारून जाल का? थोडं स्ट्रॉबेरीला तुम्हाला दाखवायचं होतं”.

स्ट्रॉबेरीचं काहीतरी बिनसलं आहे म्हटल्यावरती मी दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांच्या शेतावर गेलो. पाहिलं तर तसं सकृत्दर्शनी काळजीच काही दिसत नव्हतं. श्वास घेताना आणि सोडताना स्ट्रॉबेरीच्या घशातून थोडी घरघर ऐकू आल्यासारखं वाटत होतं, तिला लाळ गिळता येत नव्हती.

“डॉक्टर साहेब, दोन दिवस झालेत थोडं खाणं कमी झाल्यासारखं वाटतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय, काळजी वाटली म्हणून तुम्हाला बोलवून घेतलं”, तुकारामदादा.

“हरकत नाही, बरोबर केलंत तुम्ही. वेळीच बोलवले आहेत. तिच्या खालच्या जबड्याच्या मागच्या बाजूला बहुधा काही गळू (post pharyngeal abscess) झाला असावा आणि त्यामुळे तिला थोडा श्वास घ्यायला त्रास होतोय असं वाटतं, ” मी त्यांना सांगितलं – दांडेकर सर सांगत होते. “तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक पोटीस बांधून देतो, ते तिच्या मानेला असं बांधून ठेवा. दोन मलमं देतो, ती दिवसातून तीन वेळा लावत जा आणि चोळत जा. म्हणजे ते गळू आतल्या आत फुटेल आणि तिला पुन्हा पहिल्यासारखं चांगलं वाटेल”.

मी त्यांना सोबत आणलेली औषधं दिली आणि तिथून निघालो. आठ दिवसांनी त्या भागात गेलो होतो म्हणून पुन्हा एकदा स्ट्रॉबेरीला भेटायला गेलो आणि गोठ्याच्या दारातच थबकलो. अख्ख्या तालुक्यातली देखणी गाय म्हणून जी प्रसिद्ध होती, ती आता चांगलीच हडकली होती, श्वास घेताना तिला लागणारा दम आणि घरघर इतक्या दूरवर ऐकू येत होती.

माझी चाहूल ऐकून तुकारामदादा तिथे आले आणि मला म्हणाले, ” डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगितलेला इलाज करत आहे पण अजून सुधारणा दिसत नाहीये तेवढी. ” तुकारामदादांनी बहुदा होती नव्हती ती सगळी पुंजी ही गाय विकत घेण्यासाठी पणाला लावली होती आणि तिच्या प्रकृतीची जबाबदारी माझ्यावर सोडली होती. आठ दिवस झाले होते तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, अन्न गिळायला त्रास होत होता, तिचं वजन निम्म्यावर आलं होतं, माझ्या औषधाचा काडीचाही उपयोग होत नव्हता आणि एवढं सगळं असतानासुद्धा माझ्यावर दोषारोप न करता, माझी अक्कल न काढता, तुकारामदादा फक्त एवढंच म्हणत होते, “अजून सुधारणा दिसत नाहीये. ”

त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी काही सार्थ ठरवत नव्हतो, परंतु तरीही ते मला बोल लावत नव्हते.

मी मग आणखीन काही स्ट्रॉंग औषधं लिहून दिली, काही इंजेक्शनं दिली. चार दिवसांनी पुन्हा आलो. पण या नव्या औषधांचाही काही उपयोग झाला नव्हता. स्ट्रॉबेरी आता अगदीच हडकली होती, तिच्या अंगावरचं मांस जणू गळून गेलं होतं, खाणंच नसल्यामुळे प्रकृती अतिशय बिघडलेली होती, हाडांचा अगदीच सापळा उरला होता म्हणाना.

मला काहीच सुचेना.

अशा परिस्थितीतसुद्धा तुकारामदादाच माझं सांत्वन करत होते. “डॉक्टरसाहेब, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तुम्ही तुमच्यापरीने सगळे उपचार केले आहेत. नाही एखाद्या वेळेला यश मिळत, त्याला तुम्ही कसे काय दोषी ठरणार? ” 

हा मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार होत होता, त्यापेक्षा तुकारामदादांनी मला चार सणसणीत शिव्या घातल्या असत्या तर मला ते परवडलं असतं.

मी क्लिनिकला परतलो, डोक्यात एकच विचार की हे गळू फोडायचे कसे? हे गळू जर फुटले नाही तर स्ट्रॉबेरी अजून तीन चार दिवससुद्धा जगू शकेल का नाही याचाही भरोसा नव्हता.

दोन दिवसांनी मी चक्कर मारली, स्ट्रॉबेरी आता उभीसुद्धा राहू शकत नव्हती. ती कुशीवर पहुडली होती. प्रत्येक श्वास घेणं हे तिच्यासाठी संकटासमान होतं.

तुम्हा आजच्या मुलांना हे कळणार नाही, ” दांडेकर सर संतोषला सांगत होते, “क्षयरोग (TB) हा त्याकाळी अतिशय प्राणघातक रोग मानला जायचा. त्याच्यावरची औषधं तेव्हा परदेशातही धड विकसित आणि प्रचलित झाली नव्हती. त्यामुळे भारतात ही रामबाण औषधं यायला अजून बराच काळ होता.

त्याकाळी मला हे गळू फोडण्याचा एकमात्र उपाय सुचला तो म्हणजे शस्त्रक्रिया करून जबड्याच्या मागे एक छेद करून स्काल्पेलने (धारदार चाकू) ते गळू फोडणे. पण यात एक मोठ्ठा प्रॉब्लेम होता – मानेच्या – गळ्याच्या त्याच भागात दोन प्रमुख रक्तवाहिन्या वाहत असतात आणि स्कालपेलचं धारदार टोक जरासं जरी त्या रक्तवाहिन्यांना लागलं असतं, तर क्षणार्धात प्रचंड रक्तस्त्राव होऊन ती गाय जागीच मृत झाली असती.

मनाचाही हिय्या करून, दुसऱ्या दिवशी मी तुकारामदादांकडे गेलो. स्ट्रॉबेरीचे डोळे आता खोल गेले होते. प्राण्यांमध्ये, विशेषतः गाईंमध्ये डोळे असे खोल जाणं हे मृत्यू अगदी समीप आल्याचं लक्षण असतं. तुकारामदादांना मी बोलावलं. आज पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावरती हार आणि हताशा मला स्पष्ट दिसत होती. मी त्यांना सांगितलं, “दादा, या घडीला मला एकमात्र पर्याय दिसतोय, तो म्हणजे शस्त्रक्रियेने ते गळू फोडण्याचा. परंतु हे करताना रक्तवाहिनी कापली गेली तर स्ट्रॉबेरी जागच्या जागी मृत होण्याची भीती आहे. काय करू? ” 

तुकारामदादांनी माझ्याकडे पाहिले, “डॉक्टरसाहेब, असाही आता जेमतेम २४ तासांचा खेळ उरलाय. मला नाही वाटत आजची रात्र स्ट्रॉबेरी काढू शकेल. अशी ना तशी ती मृत्यू पावणारच आहे. तुम्ही शस्त्रक्रिया करा, मी तुम्हाला मदत करतो. ” 

मी तिची खालच्या जबड्याच्या मागची बाजू स्वच्छ करून घेतली आणि स्कालपेलने तिथे एक छोटंसं छिद्र पाडलं. परंतु तो धारदार स्काल्पेल त्या छोट्याशा छिद्रातून आत सोडण्याची मला हिम्मत होईना. मग, मी एक चिमटा (फोर्सेप) घेतला आणि तो त्या छिद्रातून आत सोडला. थोडं अंतर आत गेल्यावरती, त्या चिमट्याला काहीतरी अडथळा लागला. त्या अडथळ्यावरती मी चिमट्याने थोडासा जोर दिला आणि फोर्सेपवरून चिकट पिवळसर द्रव बाहेर येऊ लागला. बहुधा मी जिंकलो होतो, मी त्या गळूला फोडलं होतं. मी तो चिमटा रुंदावला. पू बाहेर येऊ लागला, दोन-तीन मिनिटं ती गळती चालू होती आणि मग पू बाहेर येणं थांबलं. आतून आलेली ती घाण बघून तुकारामदादांचे डोळे विस्फारले.

“डॉक्टरसाहेब, किती हो ही घाण. बरोबर आहे, एवढी घाण घशात असताना तिला त्रास होणारच. ” 

मी अँटीसेप्टिकने जखम स्वच्छ केली, ड्रेसिंग केलं, औषधं लिहून दिली. “दादा, उद्या सकाळपर्यंत आपल्याला स्ट्रॉबेरी छान उठून उभी राहिलेली दिसेल, ” दादांना सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या उत्कंठेने मी तिथे गेलो. गोठ्याच्या दारातच पडलेल्या चेहऱ्याने तुकारामदादा उभे होते. मी आत डोकावलो. स्ट्रॉबेरी अजूनही तशीच कुशीवर पडलेली होती, अजूनही श्वास घेताना घरघर ऐकू येत होती, डोळे तसेच निस्तेज होते.

“दादा, अजून आशेचा एक किरण आहे. कदाचित ते गळू इतकं जुनं झालं होतं की त्याच्या ज्या भिंती टणक झाल्यामुळे अजून तशाच राहिलेल्या आहेत पण २४ तासात त्या भिंती कोसळतील आणि तिचा श्वास घ्यायचा त्रास कमी होईल, असं मला वाटतं. ” मी म्हणालो.

“डॉक्टरसाहेब, मी आजवर कधी बोललो नाही परंतु स्ट्रॉबेरीला आणखीन त्रास द्यावा असं मला वाटत नाही. तुम्ही तिला इंजेक्शन देऊन तिची कायमची सुटका करा. ” तुकारामदादांकडून आलेलं हे उत्तर माझ्या हृदयात रुतलं.

मी त्यांच्या हातापाया पडून म्हटलं, “दादा एक दिवस द्या मला. आपण उद्या या विषयावरती बोलू. ” 

मी मुदत मागून घेतली खरी पण ती बरी होईल याबद्दल माझी मलाच खात्री नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी काही आतुरतेने दादांच्या गोठ्यावर गेलो नाही. हातातली कामं संपवत बाकीच्या पेशंटना तपासत मी दादांच्या शेतावर पोचलो, तेव्हा दुपार होऊन गेली होती. काय वाढून ठेवलं असेल पुढ्यात? सांगता येत नव्हतं. स्ट्रॉबेरीचा मृत्यू झाला असण्याचीच शक्यता खूप जास्त होती. ओढत्या पायाने मी गोठ्याच्या दाराशी गेलो आणि पाहतो तर काय!

स्ट्रॉबेरी चक्क उभी होती. समोर ठेवलेलं गवत मानेला हिसडा मारून खात होती. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. म्हणजे त्या गळूच्या भिंती कोसळल्या होत्या तर, श्वास घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

तिचा चेहरामोहराच बदलला होता अजूनही ती बुजगावण्यासारखी हाडांचा सापळाच दिसत होती, परंतु आता तिच्या डोळ्यात तेज होतं, तिला लाळ गिळता येत होती तिला भूक लागत होती, उभं राहण्याचा ताकद तिच्यात होती.

स्ट्रॉबेरी जिंकली होती, तुकारामदादा जिंकले होते, मी जिंकलो होतो.

एवढ्यात दादांनी माझ्या पाठीवर थाप मारली, माझे हात हातात धरले. त्यांनाही शब्द फुटत नव्हते, मलाही बोलवत नव्हतं.

दोन महिन्यानंतर काही कारणासाठी मी पुन्हा एकदा दादांच्या गोठ्यावरती आलो होतो आणि स्ट्रॉबेरी पुन्हा एकदा पहिल्या दिमाखात धष्टपुष्ट होऊन उभे होते.

दांडेकर सरांनी गोष्ट संपवली, “खरंतर ही शस्त्रक्रिया मी आधीच करायला हवी होती, परंतु मी हिम्मत दाखवली नव्हती. माझं नशीब चांगलं म्हणून स्ट्रॉबेरी वाचली. नंतर पुढे दहा एक वर्षांनी अँटिबायोटिक आले, आधुनिक शस्त्रक्रिया आल्या आणि अशा गळूमुळे गायींचा मृत्यू होणं जवळपास शून्यवत झालं. परंतु आमची स्ट्रॉबेरी मात्र मृत्यूच्या दाराला दारावर टकटक करून परत आली होती. ” 

संतोष ऐकत होता, आजही सरांच्या पोतडीतून आठवणींचा एक हिरा त्याच्या ओंजळीत पडला होता.

– क्रमशः भाग पहिला 

(जेम्स हेरियट यांच्या कथेचा स्वैर अनुवाद)

अंग्रेजी कथाकार : जेम्स हेरियट

स्वैर अनुवाद : श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ममत्व …’ – भाग- २ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘ममत्व …’ – भाग- २ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(भांडे धुण्यासाठी ठेवत असताना, डिंपलने तिथे उभ्या असलेल्या निष्पाप चेहऱ्यांकडे दुर्लक्ष केले. “जा, तुमच्या खेळण्यांशी खेळा. मला खूप काम आहे, ” असं म्हणत दोघांनाही तिथेच सोडून ती तिच्या खोलीकडे निघाली.) – इथून पुढे —

खोली व्यवस्थित आवरल्यानंतर, तिने पुस्तकांच्या आणि फाईल्सच्या ढिगाऱ्यातून काही फाईल्स काढल्या आणि त्यात ती कामात बुडून गेली. काही वेळाने तिला खोलीत कोणीतरी आल्यासारखे वाटले. मागे न वळताच ती म्हणाली, “हं, काय हवंय? “

पण काहीच उत्तर न मिळाल्याने तीने मागे वळून पाहिले तर प्रांजल आणि प्रार्धना तिथे उभे असलेले दिसले. प्रांजल हळूच म्हणाला, “प्रार्थनाला गाणं ऐकायचं आहे. ” 

डिंपलने एक दीर्घ श्वास घेतला आणि खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्टीरिओकडे पाहिले, नंतर तिच्या फाईल्सकडे. तिला एका आठवड्यात नवीन प्रोजेक्टच्या फाईल्स तयार करायच्या होत्या. विचार करत असतानाच तिच्या तोंडातून “नाही” हा शब्द बाहेर पडला, मग तिने स्वतःला सावरले आणि त्यांना समजावून सांगताना म्हणाली, “आता मला खूप काम आहे, नंतर तुम्हाला गाणी ऐकवेन. “

दोन्ही मुले एकमेकांकडे पाहू लागली. त्यांना वाटले की त्यांच्या आईने त्यांना कधीही असा नकार दिला नव्हता. पण ते हे उघडपणे सांगू शकले नाहीत आणि शांतपणे त्यांच्या खोलीत गेले.

डिंपल पुन्हा फाईलींमध्ये बुडून गेली पण पुन्हा पुन्हा वाचूनही तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. डिंपलने पेन आपटला आणि ती उठून उभी राहिली. तिने मुलांच्या खोलीत डोकावले, तिथे पूर्ण शांतता होती. प्रार्थना उशी मांडीवर घेऊन, तोंडात अंगठा घेऊन बसली होती. प्रांजल सुटकेसमध्ये खेळणी भरण्यात मग्न होता.

“काय चाललंय? “

“आता आम्ही इथे नाही राहणार, ” प्रांजलने त्याचा निर्णय जाहीर केला.

त्या रात्री डिंपल तिच्या पतीला दुःखी आवाजात म्हणाली, “मी अजून काय करू शकते, आशिष? ते त्यांच्या नाराज नजरेने माझ्याकडे पाहत राहतात. मला ते पाहणे सहन होत नाही. मला त्यांना आनंदी बघायचं आहे, त्यांना समजावलं की आता हेच त्यांचं घर आहे, पण ते ऐकतच नाहीत. ” डिंपल चा सगळा राग तिच्या डोळ्यांतून बाहेर पडला.

प्रांजल आणि प्रार्थना यांच्या शांत रहाण्याने ती मनातून हादरली होती, तिला ते तिचे अपयश वाटत होते. तिला त्यांना स्वीकारायचे होते पण त्यांनी तिला नाकारले होते.

“मला माहित आहे, हे एक कठीण काम आहे, पण अशक्य नाही. आईने त्यांना हे देखील समजावून सांगितले की त्यांची आई खूप दूर गेली आहे आणि आता परत येणार नाही, आणि त्यांचे वडील देखील खूप आजारी आहेत. पण त्याचे कोमल मन हे स्वीकारण्यास तयार नाही. पण हळूहळू सर्व काही ठीक होईल. “

“कदाचित आपण त्यांना इथे आणायला नको होते. यातून जर चांगल्या ऐवजी काही वाईट घडले तर मला खूपच वाईट वाटेल. ” 

“नाही, डिंपी, आपण असा विचार करू नये. सध्या त्यांचे खूप लाड करणं, प्रेम देणं आणि त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण त्यांना जितके जास्त प्रेम देऊ तितके ते आपल्या जवळ येतील. ते आपल्यावर प्रेम करोत किंवा ना करोत, आपण त्यांना प्रेम देत राहिले पाहिजे. “

“असं वागणे मला कदाचित कठीण जाईल. मला त्यांना स्वीकारायचे आहे, पण तरीही मला एक विचित्र भावना, एक विचित्र अंतर आमच्यात जाणवते. ही मुलं जवळ असताना आणि नसतांनाही माझे ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाही. माझं मन द्विधा अवस्थेत फसलं आहे. “

“मी इतका खोलवर विचार केला नव्हता. जर तुला इतका त्रास होत असेल तर मी त्यांना हॉस्टेल ला ठेवण्याचा विचार करेन. असंही मुलं अजून तुझ्यात भावनिक गुंतलेली नाहीत, ” आशिष डिंपलला धीर देत म्हणाला.

“नाही नाही, मला त्यांना परत पाठवायचे नाही, मला त्यांना खरोखर स्वीकारायचे आहे. मला ती आपली व्हावेत अशी मनापासून इच्छा आहे, आपल्याला त्यांची मनं जिंकावी लागतील, आशु, मी नक्कीच पुन्हा प्रयत्न करेन. ” 

डिंपलने दुसऱ्या दिवशी सकाळी गाणी लावली. स्वयंपाकघरात काम करत असताना तिने मुलांना हाक मारली, “मुलांनो, तुम्ही मला थोडी मदत कराल का?”

प्रांजल उत्साहाने भरला होता आणि तो मामीला वस्तू उचलून द्यायला लागला, पण प्रार्थना जमिनीवर बसून फक्त चमचा आपटत राहिली. तिच्या निष्पाप आणि उदास चेहऱ्यात काहीही बदल झाला नाही, तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाली होती, जणू ती रात्रभर झोपलीच नव्हती.

त्या रात्री डिंपल त्यांच्या खोलीत बघायला गेली तेव्हा भाऊ आणि बहीण शांत चेहऱ्याने एकमेकांना मिठी मारून झोपले होते. एक मिनिट शांतपणे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, ती आवाज न करता हळूवारपणे तिच्या खोलीत परतली.

दुसरा दिवस खरोखरच चांगला गेला. डिंपलने दोन्ही मुलांना एकत्र आंघोळ घातली. ते बाथटब मधल्या पाण्यात खूप खेळले. मग सर्वांनी एकत्र नाश्ता केला. ती त्यांना खरेदीसाठी बाजारात घेऊन गेली आणि त्यांच्या आवडीचे नूडल्सचे पाकीट आणले. खरंतर डिंपलला नूडल्स अजिबात आवडत नव्हते तरी तिने त्या दुपारी नूडल्स बनवले. आशिष कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. मुलांना झोपवण्यापूर्वी तिला त्यांना मिठी मारून प्रेम करायचे होते, पण ती विचार करू लागली, “माझ्यानं असं उत्स्फूर्तपणे का होत नाही? माझं मन का कच खातंय? मी त्यांच्यावर प्रेम करेन, मी त्यांच्यावर प्रेम करेन, ” आणि तिने लगेच त्यांच्या दोन्ही गालांचे मुके घेतले आणि त्यांना अंथरूणावर झोपवले.

तिच्या खोलीत येऊन अंथरूण पाहून डिंपलला शांत झोपून जावेसे वाटले, पण काही झालं तरी तिला तीची कामाची फाईल पूर्ण करायची होती. ती मन मारून उठली, पाय ओढत टेबलाजवळ पोहोचली आणि फाईलच्या पानांमध्ये अडकली.

बाहेर वातावरण अगदी शांत होते, फक्त पहारेकऱ्याचा शिट्टी आणि काठी आपटल्याचा आवाज येत होता. डिंपल ला वाटले की थोडी कॉफी प्यावी म्हणजे कामाला उत्साह येईल पण जशी ती वळाली, तीने बघितले की दारात एक छोटीशी आकृती उभी दिसली. “अरे, प्रार्थना? काय झालं बाळा? तू अजून झोपली नाहीस? ” डिंपलने पेन टेबलावर ठेवत विचारले.

पण प्रार्थना शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात असे काही भाव होते की डिंपल स्वतःला रोखू शकली नाही. ती गुडघ्यावर बसली आणि तीने प्रार्थनाला मिठी मारली. त्या छोट्या मुलीनेही स्वतःला तिच्या मांडीवर झोकून दिले आणि मोठ्याने रडू लागली. डिंपल तिथेच बसली आणि तिने प्रार्थनाला मिठी मारली आणि तिला गोंजारु लागली.

बराच वेळ डिंपल प्रार्थनाला छातीशी कवटाळून तिच्या डोक्यावरून हात फिरवत बसली. प्रार्थना तिच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, “आई आता खरंच येणार नाही का?”

आता डिंपलची पाळी होती. मोठ्या प्रयत्नांनी तिने आपले अश्रू आवरले आणि जड आवाजात म्हणाली, “नाही बेटा, ती आता कधीच येणार नाही. म्हणूनच आम्हाला तुम्हा दोघांची काळजी घ्यावी लागत आहे. चल, काहीतरी खाऊया. मला पण खूप भूक लागली आहे आणि तुलाही लागली असेल. चल नूडल्स बनवूया. हो, आणखी एक गोष्ट, आपण ही मज्जा केली ते कोणालाही सांगायचं नाही, अगदी मामांनाही नाही. ” प्रार्थना च्या डोक्यावरून हात फिरवत डिंपल म्हणाली.

‘‘मामी, प्रांजल ला ही नाही सांगायचं, ’’ प्रार्थना हसत म्हणाली.

‘‘ठीक आहे, प्रांजल ला ही नाही. तु आणि मी जागे आहोत, तर फक्त आपणच दोघं खाऊ मजेदार नूडल्स, ’’ डिंपल च्या उत्तराने प्रार्थना खूश झाली.

नूडल्स खाताना डिंपल प्रार्थनाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. आता तिला स्वीकारले गेले होते. तिने या छोट्या मनांवर विजय मिळवला होता. इतक्या दिवसांनी, प्रार्थनाने तिचे प्रेम स्वीकारले होते आणि तिच्या स्त्रीत्वाला शांती दिली होती. आता डिंपल चा थकवा गायब झाला होता आणि तिची झोप उडाली होती.

अचानक तिचे लक्ष तिच्या फाईलींकडे गेले की जर हे पूर्ण झाले नाही तर तिची स्वप्नेही अपूरी राहतील… पण डिंपलने हा विचार झटक्यासरशी तिच्या मनातून काढून टाकला. तिला मुलीची मिठी, तिचे रडणे आणि तिचा प्रेमळ स्पर्श आठवला. ती विचार करू लागली, ‘प्रत्येक गोष्टीची स्वतःची ओळख असते, स्वतःची गरज असते. यावेळी फायली इतक्या महत्त्वाच्या नाहीत, त्या त्यांची वेळ येण्याची वाट पाहू शकतात, पण मुले… ‘

जेव्हा डिंपलने प्रार्थनाला तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहताना बघितले तेव्हा ती म्हणाली, “ठीक आहे, मला सांग, उद्या रात्री आपण काय करायचे? ”

“मामी, आपण उद्या पुन्हा नूडल्स खाऊ, ” प्रार्थनाने झोप आल्याने जड झालेले डोळे मिचकावत म्हटले.

‘‘मामी नाहीं बेटा, आई म्हण, आई, ’’ म्हणत डिंपल ने तीला कडेवर उचलून घेतले.

– समाप्त –

मूळ हिंदी कथाकार – सुश्री मीता प्रेम शर्मा.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

नाशिक, मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ममत्व …’ – भाग- १ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘ममत्व …’ – भाग- १ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

आशीष जाताच डिंपल दरवाजा बंद करून स्वयंपाक घराकडे पळाली. घाईत डबा बॅगेत ठेवत ड्रेसिंग टेबल समोर उभी राहून तयार होत स्वतःशीच बडबडत होती, ‘आज पुन्हा मला ऑफिसला जायला उशीर होईल. आधी घरकाम, मग नोकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तोच वादविवादाचा विषय… ‘५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात पहिल्यांदाच नवरा-बायकोमध्ये एवढा गंभीर वाद निर्माण झाला होता. प्रत्येक वेळी एक बाजू हार मानायची, पण यावेळी प्रकरण असे होते की ते असे सोडून देणे शक्य नव्हते.

‘अरे, आशिष, तू पुन्हा त्याच गोष्टीबद्दल बोलत आहेस. तुला माझा निर्णय आधीच माहित आहे, मी हे करू शकणार नाही, ‘ डिंपल म्हणाली, तिचा ताबा सुटला होता आणि टेबलावर तिचा हात आपटला. ‘ठीक आहे, ठीक आहे, मी ते असेच म्हणत होते, ‘

आशिषने अखेर शरणागती पत्करली. मग तो खांदे उंचावून म्हणाला, ‘प्रिया माझी बहीण होती आणि मुलेही तिचीच आहेत, म्हणून त्यांनीही… ‘

डिंपल त्याला मध्येच थांबवत म्हणाली, ‘मी हे समजू शकते, पण आपल्याला सध्या मुलं नको आहेत. मला या त्रासाला तोंड द्यायचे नाही. आपल्या दैनंदिन व्यस्त दिनचर्येत मुलांसाठी वेळ आहे कुठे? माझ्या करिअरसाठी तू नेहमीच मला साथ देशील हे वचन तू विसरलात का, सध्या मुले आवश्यक नाहीत?’ शेवटच्या शब्दांवर खरंतर तिचा आवाज नरमला होता. डिंपलला माहित होते की आशिषला मुलं खूप आवडतात. जेव्हा हे समजले की ती मुलांना जन्म देऊ शकत नाही तेव्हा दोघांनीही एखादं मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता, पण…

‘ठीक आहे डिंपी’ आशिषने तिच्या विचारांचा प्रवाह मध्येच खंडीत करत, वर्तमानपत्र आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवले आणि म्हणाला, ‘आई आणि मी मिळून काहीतरी करू. तू काळजी करू नकोस. सध्या मुलं शेजाऱ्यांकडे आहेत, काहीतरी व्यवस्था करावी लागेलच. ‘

‘आई मुलांना सोबत ठेवू शकत नाहीत का?’ डिंपलने चहाचे रिकामे कप उचलत विचारले.

‘तुला तर माहित आहे की ती किती अशक्त झाली आहे. खरं तर तिचीच काळजी घेण्याची गरज आहे. तिला इथे आपल्याकडे करमत नाही, तिला तिचे गावच जास्त आवडतं. मग त्या दोन लहान जीवांचे संगोपन… असो, मी जातो. मी तुला ऑफिसमधून फोन करून काय ठरलं ते सांगेन. ‘

तयार होताना, डिंपलचे डोळे भरुन आले, ‘अरेरे प्रिया आणि रवी, हे काय होऊन बसलं… बिचारी मुलं… पण मी तरी काय करू, ती सारखी डोळ्यापुढे फिरतात’, तिचे वाहणारे अश्रू पुसत, मेकअप करत ती साडी नेसू लागली.

दोन दिवसांपूर्वीच एका कार अपघातात प्रियाचा जागीच मृत्यू झाला होता व रवी गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल होता‌. त्यांची दोन्ही लहान मुलं आपल्या आई वडिलांची वाट पाहत असताना इकडे डिंपल विचारात पडली होती. तसं बऱ्याच काळापासून डिंपलने त्यांना बघितलंही नव्हतं. तीन वर्षांपूर्वी जेव्हा ती त्यांना भेटली होती तेव्हा तर ते खूपच लहान होते.

चंद्रासारखा सुंदर मुलगा आणि फुलासारखी सुंदर मुलगी झाल्यानंतर रवीला जीवनात आणखी काहीही नको असं‌ झालं होतं. प्रिया तर नेहमीच त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळत त्या स्वर्गीय आनंदात न्हाऊन निघायची. पण घरातील बिघडलेल्या वातावरणाने दोघांनाही हादरवून टाकले होते. म्हणूनच मूल दत्तक घेण्याच्या केवळ विचाराने डिंपल घाबरली आणि तिने हा निर्णय घेतला होता.

‘तुझं बरोबर आहे डिंपी, ही घाई आणि गोंधळ माझ्यासाठीही असह्यच असेल आणि तुझं करियर…. ‘ आशिष ने तिचा हात हातात घेत म्हटले.

दोघेही त्यांच्या निर्णयावर खूश होते, परंतु तिला माहित होते की मुलांचे संगोपन केल्याने कुटुंबाचे विघटन होतेच असे नाही. ही एक वैयक्तिक प्रक्रिया आहे. पण ती तिचे भविष्य पणाला लावण्याच्या बाजूने अजिबात नव्हती. तिला हे चांगलेच माहीत होते की आशिषने हा निर्णय फक्त तिला आनंदी ठेवण्यासाठी घेतला होता. पण उलट, डिंपल मुलांचे नाव घेण्यासही धजावत नव्हती.

डिंपल घाईतच निघाली आणि तिने एक रिक्षा केली व ऑफिसला पोहोचली. अर्ध्या तासाने तिचा फोन वाजला, “मी आता मुरादाबादला जात आहे. वाटेत मी आईला माझ्यासोबत घेऊन जाईन, ” पलीकडून आशिषचा आवाज आला.

“मला तुमच्यासोबत येण्याची खरोखरच गरज आहे का?”

“नाही, तसं नाहीये, आई आली तरी चालेल. आणि काही दिवसांपूर्वीच मुले त्यांच्या आजीला भेटली होती. ते तिला ओळखतात. तुला तर ते ओळखतही नाहीत. असो, मीही त्यांना कधीचं भेटलेलो नाही. काळजी करू नकोस. ठीक आहे, मी फोन ठेवतो… “

दोन दिवसांनी, प्रवास व दगदगीने थकलेला आशिष तिथून परतला आणि म्हणाला, “रवी अजूनही बेशुद्ध आहे, दोन्ही मुले त्यांच्या शेजारच्या घरी आहेत. शेजारी खूपच चांगले लोक आहेत व ते दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतात. पण त्यांना तिथे जास्त वेळ ठेवणे योग्य दिसत नाही. मुले त्यांच्या आई वडिलांबद्दल विचारत राहतात, ” आशिष चेहरा ओंजळीत झाकून घेत म्हणाला. त्याचा स्वर भरून आला होता. “आई मुलांची काळजी घेण्यासाठी तेथे आली होती, पण दवाखान्यात रवीची अवस्था पाहून तीच अस्वस्थ झाली, ” आशिषने एक दीर्घ श्वास सोडला.

“मी आज किशोर साहेबांशी बोलले. ते एका आठवड्यात डबल बेड पाठवतील. “

“आणखी एक डबल बेड ? कशासाठी?” आशिषच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले.

“त्या दोघांसाठी एक डबल बेड तर लागेलच ना. आपण त्यांना असे वाऱ्यावर सोडू शकत नाही, त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. ती काही झाडावरून गळून पडालेली पाने नाहीत, जी काळाच्या भोवऱ्यात उडून जातील. ” डिंपलच्या डोळ्यांत पहिल्यांदाच ममत्वाचे भाव बघून आशिषचे मन रोमांचित झाले आणि तो उत्साहाने उडी मारुन तिच्याजवळ आला व म्हणाला, “खरंच डिम्पी, तू त्यांना सांभाळायला तयार आहेस? अगं, डिंपी, कसं सांगू, तू मला द्विधा मनःस्थितीतून बाहेर काढलंस, तुला कदाचित समजणार नाही. मी तुझा कायमचा ऋणी राहीन. ” त्याने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून कृतज्ञता व्यक्त केली.

डिंपल शांतपणे आशिषकडे पाहत होती. भावनिक अवस्थेत घेतलेला हा निर्णय किती काळ टिकेल हे तिला स्वतःलाच माहित नव्हते.

सर्व तयारी करून डिंपल मुलांच्या येण्याची वाट पाहत होती. रात्री १० वाजता बेल वाजली. आशिष दारात उभा होता आणि त्याने सामान जमिनीवर ठेवले होते. त्याचे एक बोट एका मुलाने धरले होती आणि दुसरे दुसऱ्या मुलाने. त्यांना समोर पाहून डिंपल स्तब्ध झाली. तिला मुलांविषयी काहीच ज्ञान किंवा अनुभव नव्हता. एकीकडे तिचे करिअर आणि दुसरीकडे मुले, ती थोडी गोंधळलेली होती. आशिष आणि मुले तिच्या बोलण्याची वाटच पाहत होते. वरवरचे हास्य आणि कोरड्या स्वराने, डिंपलने शांतता भंग केली आणि म्हणाली, “या या, कसा झाला प्रवास ?”

“खूप छान, मुलांनी प्रवासात काही त्रास दिला नाही. ही प्रार्थना आहे आणि हा प्रांजल. मुलांनो, ही तुमची मामी, ” आशिष हसत म्हणाला. पण चारही डोळे निर्विकारपणे या नवीन वातावरणाकडे पाहत राहिले, कोणीही काहीही बोललं नाही.

डिंपलने मुलांची खोली तिच्या आवडीनुसार सजवली होती. तिने कपाटात गोंडस कार्टून प्रिंट पेपर पसरवले होते आणि बिस्किटे व टॉफीचे बॉक्स रचून ठेवले होते. पलंगावर नवीन खेळण्या ठेवल्या होत्या.

प्रांजल खेळण्यांशी खेळण्यात मग्न झाला आणि त्याने या नवीन वातावरणाशी जुळवून घेतलं, पण प्रार्थना पलंगावर मांडीवर उशी घेऊन आणि अंगठा तोंडात घेऊन शांतपणे बसली होती. ती निष्पाप मुलगी तिच्या डोळ्यांत हरवलेले भाव तरळून या नवीन वातावरणाशी जुळवून घेऊ शकली नाही.

आशिषने ऑफिसमधून सुट्टी घेतल्यामुळे पहिले ४-५ दिवस इतके कठीण गेले नव्हते. दोन्ही मुलं एकत्र खेळायची आणि जेवल्यानंतर शांत झोपायची. तरीही डिंपलला भीती होती की ती नाराज तर होणार नाहीत. संध्याकाळी आशिष त्यांना बागेत फिरायला घेऊन जायचा. तिथे दोघेही झोक्यांवर झुलायचे, आईस्क्रीम खायचे आणि कधीकधी त्यांच्या मामांकडून गोष्टी ऐकत असत. आशिष मुलांमध्ये स्वाभाविकपणे मिसळला होता आणि मुलांनीही सर्व संकोच आणि लाजाळूपणा सोडून दिला होता. पण डिंपलशी ती मोकळ्यापणे मिसळू शकली नव्हती, कदाचित हे डिंपलला तसे भासत असेल.

एका आठवड्यानंतर, डिंपलने मुलांसोबत मिसळता यावे म्हणून ऑफिसमधून सुट्टी घेतली. ही एक अशी परीक्षा होती जी आशिषने उत्तीर्ण केली होती. आता डिंपलला तिची क्षमता दाखवायची होती. नेहमीप्रमाणे आशिष तयार झाला आणि ९ वाजता ऑफिसला निघून गेला. दोन्ही मुलांनी नाश्ता केला. डिंपलने त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला होता.

“ठीक आहे मुलांनो, आता तुम्ही जा आणि खेळा, मी थोडी साफसफाई करते, ” नाश्त्यानंतर मुलांना हे सांगत असताना, तिच्या आवाजात उपजत प्रेमभाव नव्हता, उलट मुलांना तिच्या आवाजात कडकपणा आणि आज्ञा जाणवली होती.

भांडे धुण्यासाठी ठेवत असताना, डिंपलने तिथे उभ्या असलेल्या निष्पाप चेहऱ्यांकडे दुर्लक्ष केले. “जा, तुमच्या खेळण्यांशी खेळा. मला खूप काम आहे, ” असं म्हणत दोघांनाही तिथेच सोडून ती तिच्या खोलीकडे निघाली.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथाकार – सुश्री मीता प्रेम शर्मा.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

नाशिक, मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग २ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग २ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री भगवान वैद्य `प्रखर’

(मागील भागात आपण पाहिले- भद्रजींना आयुष्यात पहिल्यांदाच या शहरात राहिल्याचं दु:ख झालं. त्यांनी विचार केला, मी दिल्लीत, बनारस, अलाहाबाद किंवा लखनौमध्ये असतो तर…. आणि ’अमरकृती’ तिथून प्रकाशित झाली असती तर… आज कुठच्या कुठे गेली असती. माणसाने स्वत: बनवलेली आपली मनोहर प्रतिमा खंडीत होते, तेव्हा तो त्याचा दोष आपल्या आसपासच्या परिवेशावर थोपत असतो. भद्रजींनी हेच केले.) आता इथून पुढे — 

एक दिवस हताश होऊन त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उरलेल्या पुस्तकांचे गठ्ठे बांधले आणि आपला बेड किंवा दिवाण किंवा सोफा…. तुम्ही काहीही नाव द्या, त्याखाली सरकवून ठेवले आणि दुसर्‍या दिवसापासून हे विसरण्याचा प्रयत्न केला, की त्यांनीही एक पुस्तक प्रकाशित केलय, ज्याच्या चारशे प्रतींचा एक गठ्ठा, त्यांच्या बारा बाय दहा, बाय दहाच्या संसारात, चार बाय चार, बाय तीन फुटाची जागा घेरून आकसून बसलाय. पण भद्रजींची बायको अशी, की ती काही त्यांना पुस्तकांची आठवण करून देण्याची संधी सोडत नव्हती. तिचं दु:ख हे होतं की सकाळ संध्याकाळ झाडू मारताना तो गठ्ठा मधे मधे यायचा. ती काही क्षण त्यांच्याकडे टवकारून बघायची. मग या कोपर्‍यातून त्या कोपर्‍याकडे, त्या कोपर्‍यातून या कोपर्‍याकडे आपटायची. कधी त्यावर बसून बैठ्या स्टुलासारखा त्याचा उपयोग करायची. तर कधी भेटीसाठी घरी येणा-यांच्या लहान मुलांसाठी सिंहासन बनवायची.

भद्र–निवास स्थित या पूर्णत: उपेक्षित वस्तूला (अमरकृतीचा गठ्ठा) अगदी प्रथम बाहेरच्या ज्या व्यक्तीने जवाहर्‍याच्या नजरेने पाहिले, तो एक रद्दीवाला होता. त्याने भद्रजींची एकमात्र साहित्यकृती आपल्या नजरेने तोलली आणि भद्र–निवासवरून जाताना रद्दीच्या वाढलेल्या भावाची घोषणा केली. भद्रजी संध्याकाळी घरी परत आले, तेव्हा त्यांच्या बायकोने अर्थपूर्ण जिज्ञासा प्रगट केली,

‘असं ऐकलं, की रद्दीचे भाव आज-काल वाढलेत. ’

‘तुला कसं कळलं?’

‘आज रद्दी खरीदणारा आला होता. तो म्हणाला. ’

‘रद्दी खरीदणारा इथे कशाला आला होता? ‘अमरकृती’च्या प्रकाशनानंतर तंगीमुळे आपण वर्तमानपत्रसुद्धा विकत घ्यायचं थांबवलय. ’

‘ या मेल्या गठ्ठयाकडे बघून आला होता. सकाळी खोली साफ केली, तेव्हा हा दरवाजाशी उन्हात म्हणून ठेवला होता. वीस…. तीस किलो तरी असेलच. मांजराचा गू लिंपण्यासाठी उपयोगी नाही, ना सरवाण्यासाठी. ’

‘अमरकृती’च्या उरलेल्या प्रतींच्या बाबतीत श्रीमती भद्रचे स्पष्ट मत आणि त्यात लपलेला गठ्ठा-निवृत्ती प्रस्ताव ऐकून भद्रजींचं मन खिन्न झालं. त्यांनी भरल्या गळ्याने पत्नीला म्हंटलं, ‘भानुमती, काय वाटेल ते होऊ दे. मी माझी ‘अमरकृती’ रद्दीच्या भावात कधीच विकणार नाही. माझ्या ‘अमरकृती’च्या बाबतीत समाज जसा वागलाय, तसं प्रत्येक महान साहित्याकाराच्या महान कृतीबाबत होत आलय. त्यामुळे मला आशा आहे की तो दिवस कधी तरी उजाडेल, की ज्या दिवशी लोक मला शोधत या गल्लीत येतील आणि खाटेच्या खाली असलेले ‘अमरकृती’चेगठ्ठे कारमध्ये घालून घेऊन जातील. ’

भानुमतीच्या दृष्टीने भद्रजींच्या बाकीच्या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या होत्या, पण ‘काय वाटेल ते होऊ दे’, हा शब्दबंध तिने अगदी घट्ट पकडून ठेवला आणि दुसर्‍या दिवसापासून त्यावर अंमल करायला सुरुवात केली. तिने पुस्तकांच्या गठ्ठयाची घराच्या शेगडीशी ओळख करून दिली. हळू हळू हा परिचय घनिष्ठतेत बदलत गेला आणि लवकरच अमरकृती आणि शेगडी हे एकमेकांची गरज बनले. एक दिवस भद्रजींनी आपल्या डोळ्यांनी, अमरकृतीची पाने अग्नीबाणांप्रमाणे शेगडीत उपयोगात येताना बघितली, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्यांना या कल्पनेने अतिशय दु:ख झालं की त्यांचं अमर साहित्य त्यांच्याच घरात, त्यांच्याच जीवनासाठी, शेगडीत जळत जळत हुतात्मा होतय. याबरोबर अमरकृतीला ‘होम’ होण्यापासून कसं वाचवावं, याचा विचार ते करू लागले.

भद्रजींनी अनेक प्रकारे विचार करून बघितला, पण पुस्तके वाचवायचा कुठलाच मार्ग सापडला नाही. सगळ्यात मोठी अडचण ही होती, की शेगडीला पुस्तकांच्या पानांचं व्यसन लागलं होतं. जोपर्यंत शेगडीला पुस्तकाची चार-पाच पाने चाटवत नाही, तोपर्यंत ती धूर ओकणं चालू ठेवायची.

या दरम्यान भद्रजींच्या परिवारात एक घटना घडली. त्यांना पुत्ररत्न झाले. या पुत्राचं वैशिष्ट्य हे होतं, की त्याला शेगडीत पेटलेली आग खूप आवडायची, पण धूर मात्र आजिबात सहन व्हायचा नाही. त्यामुळे थोडासा जरी धूरउठला, तरी सिंहासन बत्तिशीच्या पुतळीप्रमाणे अमरकृतीची एक प्रत पटकन बाहेर येऊन शेगडीची भक्ष्य बनायची.

आठवडाभर विचार केल्यानंतर भद्रजींच्या मनात आलं, जोपर्यंत शेगडीरूपी शमा आणि पुस्तकरूपी परवाना एकाच जागी असतील, तोपर्यंत परवाने शहीद होत रहाणारच. गृहस्थाच्या घरात शेगडीचं स्थान म्हणजे सुवासिनीच्या कपाळावरील कुंकवासारखं अटळ आहे. भद्रजींनी मग एक अशी अनोखी युक्ती शोधून काढली, की दररोज शेगडीवर बळी चढणारी त्यांची अमरकृती चार भिंतींच्या बाहेर पडून एकाच वेळी अनेक हातात पोहोचेल आणि सामाजिक संपत्ती बनून चिरकाल जीवित राहील.

लगेचच भद्रजींच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम ठरवला गेला. शेजारी-पाजारी, गल्लीवाले अशा अनेक लोकांना बारशाचे आमंत्रण दिले गेले. त्यावेळी बत्ताशांबरोबर अमरकृतीची एकेक प्रत वितरित करायची योजना ठरवण्यात आली. अजूनही दोन-अडीचशे पुस्तके शिल्लक होती. त्यामुळे खूप लोकांना निमंत्रणे दिली गेली. तेवढेच बत्तासेही मागवण्यात आले.

शेवटी एकदाचा तो क्षण आला. अमरकृतीवर एकेक बत्तासा ठेवून ते वाटण्यात आले. बघता बघता दहा किलो बत्तासे आणि अमरकृतीचा पुरा गठ्ठा वाटला गेला. भानुमती खुश होती. तिच्या वन रूम फ्लॅटमध्ये दोन-चार फुटाची जागा रिकामी झाली. भद्रजी खुश होते, कारण त्यांचं पुस्तक सामान्य माणसांपर्यंत पोचलं, ज्यांच्या भावनांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शब्द दिले होते, किंवा असंही म्हणता येईल, की ज्यांचं प्रतिनिधीत्व ते पुस्तक करत होतं.

नामकरणाचा समारंभ संपला. आमंत्रित लोक आपापल्या घरी परतले. जमिनीवर हांतरलेली सतरंजी उचलण्यासाठी भद्रजी वाकले, आणि…. आणि त्यांना दिसलं, त्यांच्या अमरकृतीच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती सतरंजीवर इथे-तिथे विखरून पडल्या आहेत. बत्ताशाचा मात्र एक तुकडाही नजरेला पडत नव्हता.

– समाप्त –

मूळ हिन्दी लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर’

30, गुरुछाया कालोनी, साईंनगर, अमरावती  444607

संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mailvaidyabhagwan23@gmail.com *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग १ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग १ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

भद्रजी, स्थानीय स्तरावरील श्रेष्ठ कवी होते. त्यांच्याकडे कोणत्याही वेळी, कोणत्याही प्रकारची कविता तयार असायची आणि तयार नसेल, तर ऑर्डर ‘प्लेस’ करताच चोवीस तासाच्या आत वृत्तपत्राच्या कार्यालयात ती पोच केली जायची. त्यांची अशी ‘प्रॉम्प्ट सर्व्हिस आणि ‘होम डिलिव्हरी’ यामुळे शहरातील एखादंच अपावादात्मक वृत्तपत्र असेल, की ज्यात त्यांची कविता छापली गेली नसेल. असं असलं, तरी एक दु:ख भद्रजींना सलत असायचं. गल्ली-बोळातल्या नाव असलेल्या, नसलेल्या वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता छापल्या जात असल्या, तरी अजून कोणी माईचा लाल प्रकाशक त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करत नव्हता. पुस्तकरूपात काही प्रकाशित न झाल्यामुळे कुणी साहित्यिक संस्था भद्रजींना साहित्यिक मानायला तयार नव्हती. अखेर एक दिवस भद्रजींनी ‘काला अक्षर भैंस बराबर’; साहित्यिक समज असणार्‍या आपल्या बायकोशी याबाबत चर्चा केली आणि आपलं पुस्तक आपण स्वत:च काढायचं असा निर्णय घेतला.

श्री भगवान वैद्य `प्रखर’

दुसर्‍या दिवसासून भद्रजींचा ‘ पुस्तक प्रकाशन यज्ञ’ सुरू झाला. भविष्य निर्वाह निधी आणि सोसायटीतून घेतलेल्या कर्जाची त्यात आहुती पडू लागली. दुकान-न्- दुकान स्वत: बघत त्यांनी कागद खरेदी केले. डोळ्यात तेल घालून प्रूफ रीडिंग केलं. बाईंडिंग करताना हात काळे करून घेतले आणि आपल्या बारकाईने केलेल्या देखरेखीखाली, ‘अमरकृती’ नावाने आपला अनोखा काव्यसंग्रह तयार केला.

भद्रजींना खात्री होती, की त्यांचा कविता संग्रह छापला जाताच सगळ्या शहरात खळबळ उडेल. लोकांची गर्दीच गर्दी होईल. सगळ्या वर्तमानपत्राचे वार्ताहर बगलेत फोटोग्राफरना घेऊन, घराच्या दरवाजाशी धूळ खात उभे रहातील. पुस्तकाची पहिली प्रत तयार होताच, प्रेसवाला स्वत:च पळत पळत वर्तमानपत्राच्या कार्यालयात ही गुप्त बातमी पोचवून येईल, की शहरात एका महान कवीच्या महान कविता संग्रहाने, ‘न भूतो न भविष्यति’ असा जन्म आत्ता आत्ता एवढ्यातच घेतलाय. पण झालं काही वेगळंच. पुस्तकांचे गठ्ठे रिक्षावर लादताच, प्रेसवाल्याने भद्रजींच्या चालणार्‍या कमी पण हलणार्‍या जास्त मार्का सायकलीत आपली तंगडे अडकवले आणि म्हणाला, ‘महाशय आपली पुस्तके छापली गेली आणि आपण त्याच्या सगळ्या प्रती रिक्षावर चढवल्यातसुद्धा, पण माझे बील काही दिले नाहीत. आधी बील चुकते करा. मगच रिक्षा पुढे जाईल. भद्रजींनी आपली दुचाकी मागे घेत घेत म्हंटलं, ‘यार, जरा लाज बाळग. ही तुझ्या छापखान्यात छापलेली निवडणुकीची पोस्टर्स किंवा साड्यांच्या रीडक्शन सेलची पॅम्प्लेट्स नाही आहेत. ही साहित्यातील सर्वोत्तम विधा ‘कवितांची’ पुस्तके आहेत आणि तीही माझ्या कवितांची. थोडा धीर धर. ही पुस्तके तुला एवढी कीर्ती मिळवून देतील, जेवढी वीस वर्षात तुला हजारो टन कागद छापून मिळाली नसेल. केवळ तूच नाही, तर तुझ्या सात पिढ्यांना सांगताना अभिमान वाटेल, की ‘अमरकृती’ पुस्तक तुझ्या छापखान्यात छापले होते. राहता राहिली गोष्ट बिलाची. तर मी या महिनाअखेरीपर्यन्त तुझे बील चुकते करीन. पुस्तके दुकानात ठेवायचाच अवकाश. प्रती हातोहात खपतील. सहा महिन्यात जर दुसरी आवृत्ती नाही निघाली, तर माझं नाव भद्र नाही, अभद्र ठेव. ‘

प्रेसवाला म्हणाला, ‘तुझं साहित्य गेलं खड्ड्यात आणि हवं तर तू पण जा. जाण्यापूर्वी माझं बील मात्र चुकतं करून जा. अरे, तुम्ही कविता छापून घेणार्‍या लोकांपेक्षा छात्रसंघाच्या मतपत्रिका छापणं चांगलं. हजार-पाचशे छापल्या आणि गठ्ठा फेकला की पैसे हजर. छात्रसंघाच्या मतपत्रिकांच्या तूलनेत कविता छापणं किती महत्वाचं आहे, हे सांगण्यासाठी भद्रजींनी त्याच्यापुढे डोकं फोडलं, पण त्यांना वाटलं, सारी गीता म्हणजे म्हशीपुढे बीन वाजवण्यासारखं आहे. तेव्हा त्यांनी संतापून, आपल्या एकुलत्या एका बायकोची, तर्जनीत अडकवलेली अंगठी आणि आपल्या मनगटात बांधलेलं घड्याळ काढलं आणि प्रेसवाल्याकडे जवळ जवळ फेकत म्हणाले, ‘आज तुला या भद्रची कद्र नाही. पण बघ. पुस्तक मार्केटमध्ये जाण्याचाच उशीर. आठ दिवसात माझ्या प्रेमाची ही निशाणी तुझ्याकडून सोडवून घेऊन जाईन, तेव्हा तुला कळेल, भद्र नावाचीही कुणी चीज आहे. ‘

पुस्तके रिक्षावर लादून नेता नेता भद्रजींना शंका आली, की प्रेसवाल्याशी वाद घालता घालता लोकांना कुणकुण लागली की भद्रजी पुस्तक रुपात छापले गेले आहेत. लोकांनी हातांनी पैशाची बरसात करत, ते रिक्षावर तुटून पडले आहेत आणि घरी पोहोचे पोहोचेपर्यंत रिक्षा पुस्तकांच्या जागी नोटांनी भरलीय. पण असं काही अघटित घडलं नाही. नेहमीप्रमाणे रस्त्यावर लोकांची ये-जा चालू होती. लक्ष्मी वाटसरूंच्या खिशामध्ये आणि सरस्वतीची अस्मिता रिक्षामध्ये सुरक्षित राहिली. भद्रजी आपल्या रिक्षातील सहाशे प्रतींसकट सही सलामत घरी पोचले. दरवाजात बायकोने पुस्तकांचे गठ्ठे बघितले, तेव्हा चकित होऊन भद्रजींना म्हणाली, ‘हाय दय्या! आपण तर म्हणत होतात, एक पुस्तकच लिहलं आहेत आपण, पण इथे तर इतकी सारी पुस्तके दिसताहेत. ही सगळी आपणच लिहिलीत?’ ही पांडित्यपूर्ण प्रशंसा कॅश करत भद्रजींनी संधीचा फायदा उठवला आणि पुस्तक –प्रकाशनासाठी बायकोची परवानगी मिळवली.

तिसर्‍या दिवशीच एक साधासा पण महत्वाचा, श्रेष्ठ, दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला गेला. साधासा अशासाठी की तो आर्थिकदृष्ट्या ‘गरिबाची गोधडी’ वाटत होता आणि महत्वाचा, श्रेष्ठ, दर्जेदार अशासाठी, की ज्या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते, ते कवितांचे पुस्तक होते. आणि त्या काळात दर्जेदार हा शब्द कवींच्या कैदेत किंवा कवेत म्हणूयात हवं तर, होता. त्यामुळे तो शब्द ज्याला हवा तेव्हा आणि हवा तसा तो वापरू शकत होता. असो.

भद्रजींना खात्रीच होती की प्रकाशन होताच शे-दोनशे प्रती हातोहात खपतील जसं काही कवितेचं पुस्तक नाही, रिलायन्स कंपनीचा शेअर आहे. म्हणून त्यांनी चालू महिन्याचं सगळं बजेट प्रकाशन समारंभावर कुर्बान केलं होतं. प्रकाशन समारंभाच्या वेळी त्यांनी काही पुस्तके मंचावरील पाहुण्यांना वाटली, तेव्हा उपस्थितांना वाटलं की बत्तासे वाटणं चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाने हात पुढे केला. एकाच वेळी अनेक हात पुस्तकापुढे होताहेत, हे दिसताच भद्रजी भावविभोर झाले आणि मुक्त हस्ते पुस्तके वाटू लागले. पण थोड्या वेळाने भावनेची तीव्रता कमी झाली आणि ते धरातलावर उतरले, तेव्हा त्यांनी उपस्थितांचे लक्ष पुस्तकाच्या त्या हिश्श्यावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला, जिथे पुस्तकाचे मूल्य छापले होते. पण लोक तर असे, पूर्ण पुस्तक समजून घेऊ इच्छित होते, पण त्या किंमत छापलेल्या भागाकडे डोळे उचलून बघायलादेखील तयार नव्हते.

समारंभ संपल्यावर भद्रजींनी हिशेब केला, दोन-अडीचशे प्रती वाटल्या गेल्या होत्या. त्यांनी ही आपली ‘इन्व्हेस्ट्मेंट’ मानली. आणि विचार करू लागले, दोन-अडीचशे लोक माझी ’अमरकृती’ एकदम वाचतील, तेव्हा शहरात अशी काही खळबळ माजेल, प्रत्येकाच्या जिभेवर पुस्तकाची चर्चा असेल. गल्ली-बोळातला प्रत्येक जण मला आदराने नमस्कार करेल आणि त्याचा परिणाम असा होईल, की पुस्तक विक्रेते स्वत:च माझं घर शोधत इथे येतील आणि ’अमरकृती’च्या उरलेल्या प्रती मी म्हणेन त्या रॉयल्टीवर विक्रेते घेऊन जातील. पण हाय रे नशिबा, न खळबळ माजली, न धूळ उडाली. ज्या शहराने मोठमोठ्या योद्ध्यांना त्यांच्या तीरंदाजीसकट पचवलं आणि ढेकरसुद्धा दिली नाही, त्या शहराने ’अमरकृती’च्या दोन-अडीचशे प्रती सहज पचवल्या.

ही घटना भद्रजींनी गंभीरपणे घेतली. त्यांनी प्रथमच आपल्या आतील तथाकथित महान साहित्यकाराच्या देहाची ऊंची खरवडून कमी केली. आणि स्वत: पुस्तक विक्रेत्यांकडे जाऊन त्यांचा अनुनय – विनय करत म्हणाले ‘ आपण माझं अभिनव पुस्तक ’अमरकृती’च्या काही प्रती आपल्या दुकानात ठेवा. विकली गेल्यावर किमतीच्या तीस टक्के आपले आणि सत्तर टक्के माझे. पण इथेदेखील भद्रजींच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. कुठलाही दुकानदार तीस / सत्तरच काय, सत्तर / तीसनेही त्यांची पुस्तके दुकानात ठेवायला तयार झाला नाही.

भद्रजींना आयुष्यात पहिल्यांदाच या शहरात राहिल्याचं दु:ख झालं. त्यांनी विचार केला, मी दिल्लीत, बनारस, अलाहाबाद किंवा लखनौमध्ये असतो तर…. आणि ’अमरकृती’ तिथून प्रकाशित झाली असती तर… आज कुठच्या कुठे गेली असती. माणसाने स्वत: बनवलेली आपली मनोहर प्रतिमा खंडीत होते, तेव्हा तो त्याचा दोष आपल्या आसपासच्या परिवेशावर थोपत असतो. भद्रजींनी हेच केले.

– क्रमश: भाग १ 

मूळ हिन्दी लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर’

30, गुरुछाया कालोनी, साईंनगर, अमरावती  444607

संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mailvaidyabhagwan23@gmail.com *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हातातोंडाशी आलेला घास ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवन रंग ☆ हातातोंडाशी आलेला घास ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

आठवडाभर पाठपुजा, रुद्राभिषेक आणि आज समाप्तीचे होमहवन, उत्तम प्रसाद, ब्राह्मणभोजन सर्व काही अगदी मनासारखे यथासांग पार पडले. सदाशिवने कशात काहीच उणीव भासू दिली नाही. यामुळे तृप्त झालेल्या यजमानांनी भरघोस दक्षिणा, त्याला धोतर उपरणे, त्याची बायको आणि आईला साडी चोळी असा घसघशीत आहेर केला. दक्षिणेचे पैसे तृप्त भावनेने, सदाशिवने देवळात महादेवापुढे ठेवले. डोके ठेवून मनोभावे दंडवत घातला…

“देवाधिदेवा महादेवा तुझीच कृपा. माझ्यासारख्या सामान्य भक्ताची तुलाच काळजी. मोठ्या विवंचनेतुन सोडवलेस देवा.. कोटी कोटी प्रणाम केले तरी पुरणार नाहीत एवढे उपकार केलेस.” डोळे मिटून शांतपणे प्रार्थना केली.

दुर्गम भागातील डोंगरावर असलेले ते देऊळ -महादेवाचे जागृत स्थान होते. फार जाहिरातबाजी नाही आणि येणे जाणे तसे कष्टाचे म्हणुन भक्तांची वर्दळ तशी मर्यादित. या वर्षी तर तीही रोडावली.

आता पावसाळा तोंडावर आल्याने भक्तांचे येणे केंव्हाही बंद होईल अशीच परिस्थिती होती. दर वर्षीच्या मानाने यावर्षी मिळकत तर खुपच कमी झाली. वर्षभर कसे निभावायचे ही विवंचना. शहरात शिक्षणासाठी रहाणार्‍या दोन मुलांची फी – रहाण्याचा खर्च, देवळाच्या सुधारणेसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते. आईच्या औषधपाण्याचा खर्च. घराची थोडी डागडुजी करावी लागणार तो खर्च. सदाशिवच्या तब्येतीची पण

अधूनमधून तक्रार असायची पण पैशासाठी तपासणी करुन घेणे तो टाळत होता. सगळे कसे काय भागवायचे हीच काळजी सदाशिवच्या मनात सतत होती. जमिन गहाण ठेवुन आणखी कर्ज काढले तरी भरमसाठ व्याजामुळे फुगणारे हप्ते कसे द्यायचे?आणि जमिनीचा तुकडा विकून पैसे उभे करायचे तर म्हातारपणी काय खाणार? २, ४ यजमान येऊन जरा काम मिळाले तर ठीक. नाहीतर काही खरे नाही.

पाठपुजा, अभिषेक, प्रसाद नैवेद्य —सगळे काही अगदी शास्त्रशुद्ध विधीवत सोवळ्यात करायचे ही पारंपारिक प्रथा काटेकोरपणे करणे, यजमानांचे समाधान करणे या बाबतीत सदाशिव कधीच हयगय करत नव्हता. पदराला खार पडली तरी चालेल पण शास्त्रोक्त विधीत तडजोड तो कधीच करत नसे.

त्यामुळे त्याच्याकडे येणारे यजमानही तसे धार्मिक, कर्मठ असायचे. हातातोंडाची गाठ पडण्यास एवढी मिळकत होत असे. पण या वर्षी जरा नव्हे तर चांगलीच ओढग्रस्त परिस्थिती त्याच्यापुढे उभी होती. महादेवच निभावून नेईल असे त्याला वाटत होते.

आणि महादेवाच्या कृपेने एक चांगले यजमान आले. ७ दिवस लघुरुद्र, रोज दुग्धाभिषेक, रोज ब्राह्मण भोजन, होमहवनाने समाप्ती. –सर्व काही शास्त्रशुद्ध पध्दतीने यथासांग पार पडल्यामुळे यजमान संतुष्ट झाले. मिळकतही चांगली झाली. सदाशिवची थोडी का होईना काळजी कमी झाली आणि नेहमीच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने याचे श्रेय महादेवाला दिले. त्याच्या डोळ्यातुन घळघळ वहाणार्‍या पाण्याने त्याने जणु महादेवाला अभिषेक घातला.

शांतपणे, डोळे मिटून, नतमस्तक होऊन नमस्कार करणारी त्याची आई आणि भांबावलेल्या नजरेने त्या दोघांकडे बघणारी, काहीशी कावरीबावरी झालेली त्याची बायको –उमा-मागे उभ्या होत्या. उभे राहुन, डोळे पुसत सदाशिवने वळुन पाहिले. आईच्या पायावर डोके टेकुन नमस्कार केला. उमाकडे बघत, “उमा, तुमची अडचण आली नाही म्हणुन हे सर्व सुखरुप पार पडले. नाहीतर शक्यच नव्हते. हातातोंडाशी आलेला घास गेला असता. महादेवाची कृपाच. “

हातातोंडाशी आलेला घास गेला असता हे ऐकल्यावर उमाने भरल्या डोळ्याने सासूकडे बघितले. तिला जे पाप वाटत होते ते करायला लावताना काल रात्री सासू हेच म्हणाली होती. “हातातोंडाशी आलेला घास जायला नको. ” सदाशिवने ७ दिवसांचा हा कार्यक्रम पत्करला तेंव्हाच उमाला धाकधुक वाटत होती. पाळी जाण्याचे वय झाल्यामुळे आताशा ती नियमित होत नव्हती. ऐनवेळी अडचण नको म्हणुन सदाशिवच्या कानावर घालुया असे उमा सासुला म्हणाली. पण सासूने, “अग, पैशाची आपल्याला किती गरज आहे माहित आहे ना. तु गप्प रहा. महादेव आहे पाठीराखा. अडचण आली तर पुढचे पुढे बघु, ” म्हणुन सासूने तिला काही बोलु दिले नाही.

सासु-सुन दोघीही “आजचा दिवस पार पडु दे रे देवा, ” म्हणुन रोज देवाला साकडे घालत, देवावर श्रध्दा ठेवुन सर्व करत होत्या. रोजची पुजापाठाची, अभिषेकाची तयारी, १०, १५ माणसांचे चहापाणी, नाष्टा, फराळाचे, जेवणाचे –त्यासाठी सामानाची, धान्याची, दुधातुपाची जुळवाजुळव –एकंदरीत बरेच काम-त्यात दिवस कसे गेले हे समजले नाही. होता होता ६वा दिवस उजाडला. उमाला जरा थकल्यासारखे वाटत होते. तरी दुपारपर्यंत सगळे काही रेटले. पण संध्याकाळी ज्याची भिती होती तेच झाले.

सासूबाईंना सांगितल्यावर त्या आधी थोड्या चिडल्या. पण सुनेवर चिडुन उपयोग नाही. हे त्यांनी जाणले. संध्याकाळचे फारसे सोवळे नव्हते म्हणुन जे काही करायचे ते करुन त्यांनी ढकलून नेले. “उमा कुठे आहेत? “म्हणुन सदाशिवने विचारल्यावर “उद्याची तयारी करते” म्हणुन वेळ मारुन नेली.

नंतर सायंप्रार्थनेसाठी देवळात गेल्या. सायंकाळी तशा त्या गाभाऱ्यात जात नसत. पण आज जाऊन महादेवाच्या पिंडीच्या बाजुला जरा लांब बसल्या. डोके शांत ठेवुन बराच वेळ विचार केला. त्यांचे सनातन मन हो-नाहीच्या चक्रात फिरत होते. पुढील वर्षभराचे दारुण चित्र डोळ्यापुढे उभे राहिले, मुख्य म्हणजे सदाशिवची वरचेवर बिघडणारी तब्येत. पैशासाठी तो चालढकल करतो. पण त्याची तपासणी होऊन वेळेवर औषधपाणी व्हायला पाहिजे. आता उद्याची समाप्ती व्यवस्थित झाली नाही तर तो यजमानांकडुन एक पैसाही घेणार नाही. उलट प्रायश्चित्त घेणार.. त्याचा त्रास करुन घेणार. मदतीसाठी कुणाला बोलावणे त्याच्या तत्वात बसणार नाही. हा सर्व विचार त्यांनी केला. डोके टेकुन नमस्कार करुन झटक्यात उठून घाईघाईने, पण निश्चयी मनाने, त्या घराकडे परतल्या.

“उमा, उमा, तिकडली कामे पुरेत. इकडे ये — विरजण घालायचे, डाळी भिजत टाकायच्या –मीठमसाला काढून ठेवायचा, विडे करायचे – किती कामे पडलीत, आत ये आणि भराभर आवर. पाच पंचवीस माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक म्हणजे सोपे काम नाही. लवकर उठुन कामाला लागायला पाहिजे. नैवेद्याचे ताट घेऊन तुलाच देवळात वेळेवर जायला पाहिजे. “

आत आलेल्या उमाच्या मनात सदाशिवचा विचार आला. भांबावलेल्या उमा काही बोलणार विचारणार, त्याआधीच सासू दबक्या आवाजात, “हे बघ महादेवाला मी सांगीतले, आता तुझे आढेवेढे नकोत, हातातोंडाशी आलेला घास थोडक्यासाठी घालवु नकोस. “

आता सदाशिव तेच म्हणाला –“हाता तोंडाशी आलेला घास”.

— तो आपण वाचवला खरा. पण हे बरे केले का? का पाप घडले आपल्याकडून?याची देव शिक्षा देतील. याचे प्रायश्चित्त कसे करुन घ्यावे. ? हा विचार करत ती खाली मान घालुन घराकडे निघुन गेली.

सासूने ते पाहिले, तिच्या डोळ्यात आता मात्र पाणी आले. भरले डोळे मिटून, महादेवाला नमस्कार करत ती, ” देवा महादेवा, तु सर्वज्ञ.. तुझ्यापासून काय लपून रहाणार? तिने या परिस्थितीत आज शेवटच्या दिवशी तुझ्या प्रसादाचे भोजन तयार केले. म्हणुन ती भांबावलीआहे. पण यात तिची काहीच चुक नाही. सदाशिवला चालणार नाही म्हणुन ती करायला तयारच नव्हती. पण मीच तिला हे करायला भाग पाडले. या पापाची जी काय शिक्षा असेल ती मला दे. आता निदान माझ्या मुलाला औषधोपचार करता येईल, माझ्या नातवंडांचे शिक्षण थांबणार नाही. मुलाची विवंचना थोडीफार तरी कमी होईल, यातच मला समाधान आहे”

मनातील विचार बाजुला सारून, सदाशिवच्या आईने डोळे पुसले. स्थिर मनाने देवळातून घराकडे गेली. ओटीवर रडत बसलेल्या सुनेकडे – उमाकडे कपड्याचे गाठोडे टाकत, ” हे घे,. जा आता परसदारी. घरातले बाकीचे मी आवरते. महादेवाची माफी मागुन आले. आता काळजी करु नकोस. डोळे पुस आता. ” म्हणून स्वतःचे डोळेही हळूच पुसले.

– – आपल्या सनातनी पण तितक्याच व्यवहारी, करारी सासूकडे पहात तिने भरल्या डोळ्यांना पदर लावला…. दोघीनी मंद हसत एकमेकींकडे बघितले.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares