मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवकाळी… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ अवकाळी…  ☆ सौ. प्रांजली लाळे

ह्या वर्षी उन्हानीही जोर धरलेला. पाण्यासाठी पाणवठे शोधत बाया बापड्या दारोदार भटकल्या. वीस रुपयाला एक बादली विकत घेतली. घरात अन्नाचा कण नसला तरी पाण्याला पैसे मोजावेच लागले. पै पै साठी कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांना पाण्यासाठी तरसावं लागलं..

दिनेशच्या गावाकडल्या घरात आईबाप रहायचे त्याचे. तो मात्र शहरात रहायचा ऐटीत.. ए.सी. रुमचा आरामदायक वेल फर्निश्ड फ्लॅट.. सुंदर बायको, मुलं.. रमला होता संसारात. वर्षाकाठी गावाकडून येऊन शेतावरचे वर्षभराचे धान्य भरून द्यायचे बापू.. माई-बापूने कष्ट करून त्याला शिकवून मोठा सायब बनवलं.. पण तो परत गावाकडे फिरकला नाही. माय-बापू फोन करायचे पण हा टाळून द्यायचा गावाकडे यायचं.. इतका स्वार्थी कसा होऊ शकतो कोणी? 

ह्या वर्षीचा दुष्काळ फारच परीक्षा घेत होता. बापू आता थकले होते.. माय माऊली बिचारी कोंड्याचा मांडा करत होती. बापूंनी फोन केला दिनेशला.. सत्य परिस्थिती सांगितली.. ” ह्या वर्षी म्या काय बी पिकवू शकलो नाय बग.. तुला ह्या वर्साला बाहेरून इकत घ्यावं लागंल सर्व ..त्वा काय आला नाय मदतीला.. म्या आता हतबल झालो बग.”

दिनेशही हे ऐकून थोडा हतबुद्ध झाला खरा, पण शहरातील वारं लागलेला शहरी नागरिक झाला होता तो.. बायकोही म्हणाली, “काय फरक पडणार आहे? घेऊ इथून शॉपिंग मॉलमधून विकत.” वर्षभराचे बजेट बिघडताना दिसत असले तरी गावाकडे जाणं मान्य नव्हते.. 

उद्या बापूंना जमीन विकण्याचा प्रस्ताव देणार होता तो.. भरघोस पैसा मिळाला की माय बापूंना शहरात घेऊन येणार.. तेवढीच बायकोला मदत !! सर्वतोपरी निर्णय बापूंचा होता अर्थातच…. आर्थिक बजेट बिघडतंय वाटायला लागलं तसं दिनेशनं गावाकडं दोन-तीन दिवस जायचं ठरवलं.. बायकोला हा स्वार्थी निर्णय पटल्याने तीही चक्क निघाली त्याच्याबरोबर..

दारासमोर गाडी उभी राहिली. बापू खाटेवर बसून होते आणि माय काय तरी निवडत बसलेली. लेकरं अचानक दारात दिसल्यावर कोण आनंद झाला तिला.. थकलेल्या हातांनी नातवंडाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवताना आकाश ठेंगणं झालं होतं.. बापू मात्र थंड नजरेनं शुन्यात बघत बसले होते.. शेतकऱ्याचं आयुष्य असंच असतं.. वरुणराजा कोपला आणि धरणीमाय तप्त झाली की काय बी खरं नसतं.. शेतीवर असलेलं अमाप प्रेम त्यांना अस्वस्थ करत होतं.. 

दिनेश बापूंजवळ जाऊन बसला.. मायनं तांब्याभर पाणी आणलं.. गटगटा प्यायला.. ‘तृप्त!!’ असा त्याच्या मनातला आवाज ऐकू आला स्वतःलाच.. हातपाय धुवून अंगणात चटई टाकून पहुडला. बायको, मुलं सवय नसल्याने आतमध्ये झोपले.. दिनेशला अंगणातल्या सावलीत गाढ झोप कधी लागली ते कळलंच नाही.

दिनेश झोपला तसं बापू शेजारी येऊन बसले असावेत.. की भास होता कोणास ठाऊक !! डोळे उघडले तसे बायको, मुलं सुद्धा अंगणात येऊन बसलेले दिसले.. मायनं सर्वांसाठी चहा आणला होता.. बापू वावराकडं चक्कर मारायला गेले होते. 

मायजवळ विषय काढलाच त्यानं.. “काय ठेवलंय ह्या गावात आता?? ना पाऊस ना शेती !! बापूंना म्हणावं विकून टाकूया शेती आता.. तुम्ही चला माझ्या बरोबर शहरात..”

माईच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या कुठे पळाला.. अनपेक्षित होते सर्व.. “नाही रे बाळा, ही जमीन आपली आई आहे.. तिच्याशी प्रतारणा कशी करायची? बापू कधीही मान्य नाही करणार. बापूंनी पै पै गोळा करून ही जमीन विकत घेतली आहे.. तु विचारशील, पण जरा जपून.. बापू आणि मी इथेच राहिल, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ‘आमचं भागतयं.” नजर चुकवून माय बोलली..

बापू आले संध्याकाळी.. पाहुणे आले म्हटले की गोडधोड व्हायला हवं ना.. गावातील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन आले येताना.. थोडेफार तरी लेकरांच्या हातात टेकवायला म्हणून.. हातपाय धुवून देवासमोर हात जोडून जेवायला बसले.. पिठलं भाकरी.. वरण भात वरपून खाल्ला सर्वांनी. पोरांनाही हा नवीन पदार्थ आवडला.. आजी आजोबांचे घर भारी आवडलं. शेणाने सारवलेले अंगण, ओसरी, स्वयंपाक घर आणि एक खोली.. हवेशीर, शुद्ध हवा..  बायकोही सासूच्या हातचे पदार्थ खाऊन खुश !! 

“माई हे पदार्थ आम्हाला रोज खाऊ घालायला चला नं आमच्या बरोबर..”  माईच्या डोळ्यात आसू तरळले. ती खुश होती लेकरं आली तर.. भोळी होती ती.. खरंच वाटले तिला.. ती रात्री बापूंना हा विषय बोलणार होती..

बापू बाहेर खाटेवर आकाशात पहात पहुडलेले.. माईनं सुपारी कातरुन आणून दिली.. तशी अस्वस्थता अधिक गहरी होत गेली तिच्या मनातली.. ” लेकाचा मनसुबा कळलाय नव्हं तुम्हाला??”  बापू तसे समजून चुकले होते.. त्यांनी इतके उन्हाळे पावसाळे पाहिले होते की ही गोष्ट लगेच लक्षात आली होती. पण बोलून फायदा नव्हता.. पोटाची भूकही महत्वाची होती.. निर्णय घ्यावा तर लागणार होता.. 

‘हो किंवा नाही’ ह्या मनस्थितीत रात्र न झोपता सरली.. माईला तो दिवस अजूनही आठवत होता ज्या दिवशी ती बापूंचा हात धरुन मापटं ओलांडून ह्या गावात आली. एक छोटसं खोपटं होतं बापूंचं.. रुबाबदार दिसायचे बापू.. दिलदार मनाचा रांगडा गडी.. .. माई तशी साधी, सालस. दिसायला सोज्वळ आणि सोशिक. घरात सासु सासरे, नणंद.. सर्वांचे निमूटपणे केले.. बापूही जमिनीच्या एका तुकड्यावरुन वीस एकर जमिनीवर आले.. घोर मेहनतीचे फळ !! एकमेकांच्या साथीने संसार उभा राहिला.. आणि आज अशी वेळ यावी.. दोघांचेही डोळे ओलावले..

झुंजुमुंजू झाल्या. बापू सकाळधरनं गायब झाले ते कोणाला दिसलंच नाही.. दिनेश, सुनबाई सगळेच  उठले.. माईनी डोळ्याला पदर लावला.. काही विपरीत तर घडलं नसलं ना? ” दिनेश.. अरं आपलं बापू कुठं बी न्हाय दिसत..”

दिनेश वैतागून “काय गं माई, काय झाले? असतील शेतावर..”

“नाही ना.. शेजारचा म्हादबा बी येऊन गेला आत्ता.. तो शेतावरनंच आला. तो बी हेच विचारत होता..कुठे गेले बापू म्हणून..”

दिनेशची चांगलीच तंतरली. त्याचं प्रेम होतं बापूंवर.. पण स्वार्थही होताच थोडा.. पैसा महत्त्वाचा वाटायचा त्याला.. पण जे घर, जिथं तो लहानाचा मोठा झाला.. जी जमीन, जिने त्याला महागाचे शिक्षण मिळवून दिले. तो बाप, ज्यानं त्याला घाम गाळून शिकवले.. त्यालाच तो विसरला?? माई धायमोकलून रडायला लागली.. आता मात्र दिनेश हलला.. गावभर मंदिरं, नातेवाईक, शेजारी, सारं सारं शोधलं.. दिनेश हतबल झाला..  ‘कुठे आहात तुम्ही बापू? तुमच्या विना घर कसे वाटतेय?’  सूनबाई माईजवळ बसून राहिली.. लेकरं घाबरली बिचारी.. घर पोरकं तर होणार नाही ना?? एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत होती..

अचानक पावसाची थेंबं टपटप पडायला लागली.. सगळीजणं एकमेकांना सांभाळत होती. माईंना दिलासा देत होती. तो दिवस सांत्वनाचा होता की अजून काही?? पण एकत्र राहण्याचे महत्त्व समजत होते दिनेशला.. हरवलेल्या बापूंना शोधायचेच होते.. पण माईलाही सावरायचे होते. सतत पडणाऱ्या पावसानं तप्त जमीन तृप्तं झाली होती.. पाऊस अवकाळी का होईना, धरणीमाय शांत झाली होती. बापूंसाठी प्रार्थना करत सर्वजण कधी झोपले कळलंच नाही.. 

सकाळी फटफटल्यावर दिनेशला बाहेर गडबड ऐकू आली. पोलीस दिसले चार-पाच. पोटात भितीचा गोळा आला.. ब्रम्हांडं आठवले.. बापू?? बायकोला आवाज देत बाहेर पळालाच.. पाहिले तर बापू माणसांच्या गराड्यात बसलेले मान खाली घालून.. 

पोलिसांनी जुजबी चौकशी करुन दिनेशच्या खांद्यावर थोपटले.. ” सांभाळा आपल्या वडिलांना..काल पहाटे हायवेवर मोठ्या ट्रकसमोर आले होते. पण ट्रकवाल्याने एअरब्रेकने गाडी थांबवली..” 

बापरे हायवे तर इथून एक गाव ओलांडून आहे.. कसे गेले असतील बापू?? दिनेश मनातल्या मनात बोलला. काहीच बोलत नाहीयेत.. नशीब त्यांच्या एका ओळखीच्या माणसानं ओळख पटवली. ” सांभाळा.. वडील पुन्हा मिळत नसतात कधीच..” इन्स्पेक्टर बोलले..

सर्वजण निघून गेल्यानंतर बापूंना जी मिठी मारली ना दिनेशने, ती आयुष्यात कधीच मारली नव्हती.. स्काॅलरपणाचा अहंकार बाळगत बापाच्या अडाणीपणाला तुच्छ समजत जगत होता तो.. सर्व अहंकार विरघळला होता त्या मिठीत !!! जोरदार हंबरडा फोडत म्हणाला “बापू तुम्ही मला हवे आहात “…

बापूंच्या निस्तेज डोळ्यात एक चमक दिसली.. डोळ्यातून घळघळा पाणी आलं.. ” चला बापू आपल्या घरात.. तुम्ही कुठेही नाही जायचं.. आम्हीच येणार. दर सहा महिन्याला.. तुम्हाला आणि तुमच्या धरणीमायला, दोघांनाही भेटायला…”

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ३ अनुवादित लघुकथा – प्रेशरकुकर/यातनांचं गाठोडं/अहिंसावादी पार्टी – मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ ३ अनुवादित लघुकथा – प्रेशरकुकर / यातनांचं गाठोडं / अहिंसावादी पार्टी – मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

☆ (१) प्रेशरकुकर… ☆

खचाखच भरलेली चर्चगेट-विरार लोकल मीरा रोड स्टेशनवर थांबताच लोकांची गर्दी, कोंडलेला श्वास सोडत बाहेर पडली. जणू त्यांना एखाद्या गॅस चेंबरमधून मुक्त केलंय आणि आता ते मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. 

त्यात शांतिलालही होते. ट्रेनमधून उतरून लांब लांब टांगा टाकत शांतिलाल सरळ जाऊन रिक्षाच्या रांगेत थांबले. जवळजवळ दहा मिनिटांनी त्यांचा नंबर लागला. 

बेल वाजवली. दरवाजा उघडता उघडता पत्नी म्हणाली,” आज पुन्हा उशीर झाला?परवा माझं उद्यापन आहे. सगळं सामान आणलंय ना? की नेहमीसारखाच आजही वेळ नाही मिळाला?” 

पत्नीला बाजूला  सारून शांतिलालजी आत सोफ्यावर डोळे मिटून बसले.

काही वेळाने पत्नीला म्हणाले,” ऐक.ऑफिसात कामाचं खूप प्रेशर आहे. बॉसकडून उलटसुलट बोलणी आणि ओरडा खाण्यापेक्षा उशिरापर्यंत बसून मी आपलं काम कसंबसं पुरं करतो. टार्गेट पुरं झालं नाही, म्हणून बॉस आपली भडास स्टाफवर काढतो. तू तर दिवसभर घरातच असतेस ना? मग आवश्यक ती खरेदी आटपून घेत जा.”

“असं कसं? दोघांनी मिळून केलं,तर पूजेचं सगळं आयोजन व्यवस्थित होईल ना! लग्न करून आले,तेव्हापासूनच  तुमच्या ऑफिसचं रडगाणं ऐकते आहे. मल्टिनॅशनल कंपनीची नोकरीआणि मुंबईचं नाव ऐकून मी लग्नासाठी होकार दिला होता. आमचे बाबा सरकारी ऑफिसात साहेब होते. माझ्या आईला कधी बाजारहाट करावा लागला नाही. दुकानदार नाहीतर बाबांच्या ऑफिसातला प्यून घरी सगळं सामान आणून द्यायचे. तसंही आमच्याकडे बायका बाहेरची कामं करत नाहीत. कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न असतो तो.” 

त्याच वेळी प्रेशरकुकरची शिटी वाजली. शांतिलाल स्वतः किचनमध्ये गेले. पहिल्यांदा त्यांनी लक्षपूर्वक कुकरकडे बघितलं आणि मग ते विचार करायला लागले,’ या कुकरकडे तरी बघा . वरून प्रेशर आहे आणि खालून आग लागते आहे ,तरीही शिटी वाजवत काय मस्त काम करतो आहे! अनावश्यक वाफ बाहेर टाकायची ,हे त्याला बरोबर माहीत आहे.’ 

मग काय? पुढच्याच क्षणी ऑफिसची चिंता सोडून शिटी वाजवत ते पत्नीला सामोरे गेले. 

मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव 

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (२) यातनांचं गाठोडं ☆

हलतडुलत  बस आली आणि वृद्धाश्रमासमोर थांबली. आतापर्यंत पिकनिकच्या मूडमध्ये असणारी मुलं अचानक शांत झाली. 21 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून पिकनिक स्पॉटनंतर त्यांना या वृद्धाश्रमात स्टडीटूरसाठी आणण्यात आलं होतं. वृद्धाश्रमाचे पदाधिकारी त्यांची वाट बघत होते. वही आणि पेन सांभाळत मुलं बसमधून खाली उतरली. एकमेकांची ओळख करून देणं, थोडा खेळ, खाणंपिणं झाल्यावर पाच-पाच मुलांचा गट बनवण्यात आला आणि त्यांना वृद्धांच्या खोलीत त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवण्यात आलं. 

निकिता आपल्या गटाबरोबर ज्या खोलीत गेली, तिथे एक आजी झोपल्या होत्या. कर्मचार्‍याने सांगितलं की या आजी हल्लीच आल्या आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही,म्हणून त्या बाहेर आल्या नाहीत. त्या खोलीत शिरताच मुलांनी आजींना नमस्कार केला. त्यांची चाहूल लागताच आजी उठून बसल्या. आजीचा चेहरा बघताच निकिता सुन्न झाली.दोघींची नजरानजर झाली आणि त्यांच्या अंतःकरणातून प्रेमाचा लाव्हा फुटला. धावत जाऊन निकिता आजीला बिलगली आणि हमसून हमसून रडू लागली. आजीही तिचे पापे घेऊ लागली. समोरचं दृष्य बघून सगळे चकित झाले. रडण्याचा आवाज ऐकून टीचर आणि इतर लोकही तिथे आले.हे काय झालं अचानक? कोणालाच समजत नव्हतं. प्रयत्नपूर्वक टीचरनी दोघींना शांत केलं. 

पाणी पिऊन निकिताने सांगितलं,” टीचर, ही माझी आजी आहे. घरच्यांनी मला सांगितलं की आजी गावी गेली आहे. हा वृद्धाश्रम म्हणजे आजीचा गाव आहे,का टीचर? “

हे ऐकताच खोलीत विलक्षण शांतता पसरली. एकमेकींपासून दूर राहण्याची वेदना निकिता आणि आजी -दोघींच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. 

“टीचर,मला घरी नाही जायचं. मी आजीबरोबर इथेच राहीन आणि आजीची काळजी घेईन. जेव्हा मी आजारी पडायचे, तेव्हा आजीला दिवस-रात्र एक करताना पाहिलंय मी. मम्मी-पापा तर ऑफिसात निघून जायचे. टीचर,ही माझी फक्त आजी नाही, माझी मैत्रीणही आहे. जिथे  कुठे राहू, आम्ही दोघी एकत्र राहू .मम्मी-पापा माझ्याशी खोटं का बोलले कोणास ठाऊक! ” 

निकिताचा दबलेला ,घुसमटलेला आवाज शांततेला चिरून जात होता. बालमनाला लागलेल्या  ठेचेने सगळ्यांच्या  यातनांचं गाठोडं उघडलं गेलं होतं. 

मूळ हिंदी कथा: ‘पीडा की गठरी’

मूळ लेखक : डॉ. रमेश यादव

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (३) अहिंसावादी पार्टी ☆

जंगलात निवडणुकीचा धूमधडाका चालू होता. त्यामुळे प्राणी आणि प्राणिनेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. लहानसहान पुढारी आपली रोटी भाजून घेण्यासाठी अचानक सक्रिय होऊन मांड्या ठोकत होते. लोकांना आकर्षित करण्यासाठी हिंसक पुढार्‍यांनी अहिंसेचा जप सुरू केला होता. एकजूट करून निवडणूक लढण्याच्या इराद्याने लहान पक्षांच्या काही प्राणिनेत्यांनी जंगलाबाहेर तलावाकाठी गुपचूप भेटायचं ठरवलं होतं. कोल्हा,अस्वल,लांडगा, बोका,बगळा वगैरे पुढारी अगोदरच पोहोचले होते. दुसर्‍याची विचारपूस करता करता आपलंच घोडं पुढे दामटत होते. या सर्वपक्षीय पार्टीचा नेता कोण होणार आणि जनतेला आपल्याकडे कसं वळवायचं , यावर चर्चा चालली होती. स्वतःविषयी सांगत नेतेपदासाठी आपणच कसे पात्र आहोत,हे सांगत होते. अस्वलानंतर  लांडग्याने आपली बाजू मांडली,” मित्रांनो, आमच्या टोळीने शिकार करणं पूर्णपणे बंद केलं आहे. शिळंपाकं खाऊन आम्ही कसंबसं भागवतोय. खरं सांगायचं तर परस्परांचा आदर-सन्मान करत आपण सर्वांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे.त्यामुळे गरीब आणि असाहाय्य लोकांवर जुलूम होणार नाही. या त्यागामुळे या दलाचा नेता आमच्या समाजातीलच असला पाहिजे. ” सर्वांनी लांडग्याच्या समाजाच्या त्यागवृत्तीची प्रशंसा केली. 

हे ऐकून बोका म्हणाला,” बंधूंनो, माझ्याबरोबरच माझ्या समाजानेही शपथ घेतली आहे,की आता आम्ही उंदरांची शिकार करणार नाही. लोककल्याणासाठी एवढा त्याग तर केलाच पाहिजे. म्हणून नेता आमच्या समाजातीलच असायला हवा.”

आता बगळ्याची पाळी होती. आपलं समर्थन करताना तो बोलला,” मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. मेलेले मासे खाऊन आणि पाणी पिऊन आम्ही गुजराण करत आहोत. त्यामुळे नेतेपदाचा आम्हालाही अधिकार आहे. “

संयुक्त दलाच्या नेतेपदाविषयी एकमत होत नाही, म्हटल्यावर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि सिटांचं वाटप यावर चर्चा सुरू झाली. या मुद्द्यांवरून खूप बाचाबाची झाली; पण ते ठाम निर्णयापर्यंत पोहोचले नाहीत. 

तेव्हा बगळाभगत म्हणाला,” मित्रांनो,तुम्ही चर्चा चालू ठेवा. मी पटकन तलावाचं ताजं पाणी पिऊन येतो.” आणि तो तलावाच्या दिशेने चालू लागला. थोडं लांब गेल्यावर त्याने मागे-पुढे बघितलं आणि एका पोहोणार्‍या माशावर पटकन आपल्या चोचीने झडप घातली. पोटपूजा झाल्यावर तो पुन्हा सभास्थानी आला. त्याच्या चेहर्‍यावरची टवटवी बघून लांडगाही पाणी प्यायला म्हणून तिथून निघाला. थोडं पुढे गेल्यावर एक कोंबडी त्याच्या नजरेस पडली. त्याने पुढचामागचा विचार न करता लगेच तिला पकडलं. मागून कोल्हा येत होता,हे बघून शिकारीचा थोडा हिस्सा त्यालाही दिला. ढेकर देत दोघेही सभास्थानी पोहोचले. बोका थोडाच मागे राहणार होता? “जरा जाऊन येतो,” म्हणून थोडा पुढे गेला, तोच त्याला शेतात काही उंदीर दिसले. सफाईदारपणे त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि दोन उंदरांना गट्टम केलं. जेव्हा तो सभास्थानी पोहोचला,तेव्हा बघितलं तर,झाडावर तीन कावळे कावकाव करत आपल्या भाषेत ओरडत होते,” राज की बात कह दूं तो…” 

सगळ्यांना धक्का बसला.मग सर्व नेत्यांनी मिळून त्यांना आश्वासन दिलं,” बंधूंनो, काळजी करू नका. तुमच्या समाजासाठीही काही खास व्यवस्था करण्यात येईल.” 

यानंतर सर्वसंमतीने संयुक्त मोर्चाची घोषणा करण्यात आली. पार्टीचं नाव ठेवलं-अहिंसावादी पार्टी’.त्याबरोबरच सगळ्यांना सांगण्यात आलं,की सर्वोच्च नेतेपदाची निवड निवडणुकीनंतरच केली जाईल. या घोषणेनंतर प्रेस नोट जारी करण्यात आली.

मूळ हिंदी कथा: डॉ.रमेश यादव 

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऑक्सिजन… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ऑक्सिजन… ☆ डॉ. शैलजा करोडे

मटार धुवून चाळणीत निथळत ठेवले . बटाटे उकडून घेण्यासाठी कुकरला लावले . कढीपत्ता , कोथिंबीर , हिरव्या मिरच्या , आलं , लसूणाचं वाटण केलं .पीठ मळण्यासाठी परातीत घेतलं .हे सगळं करतांना दमछाक व्हायला लागली . अशावेळी पाणी प्यावं म्हणे , कारण पाण्यातून आँक्सिजन मिळतो .So water is the first remedy for any health issue .माझी मैत्रिण डाॅ.वृषाली जोशी मला नेहमी सांगायची ” कामं तर कधी संपायचीच नाहीत , पण त्रास व्हायला लागला तर थोडावेळ बसायला हवचं . एक दीर्घ श्वास घ्यायचा , क्षणभर डोळे मिटायचे . आपली श्वासाची गती स्थिर झाली कि पुढील काम हाती घ्यायचं . लक्षात असू दे , श्वासाची गती स्थिर होणं म्हणजे आँक्सिजन लेव्हल स्थिर होणं , ह्रदयाची गती स्थिर होणं ” .एक मंद स्मित माझ्या चेहर्‍यावर आलं , आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर याची गरज पडते वेळोवेळी, पण ऐन तारूण्यात तर , ” लाथ मारीन तिथे पाणी काढीन ” अशी परिस्थिती . क्षणाची उसंत नसली तरी थकवा कधी जाणवला नाही . दहावीच्या शालांत परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाने अनेक माध्यमांनी माझ्या मुलाखती घेतल्या होत्या . ” कसा अभ्यास केला ? वेळेचं नियोजन कसं केलं ? कोणते क्लासेस लावले होते काय ? त्याचा कितपत फायदा झाला ? वगैरे

मी क्लासेस तर लावले नव्हतेच , शाळेत जे शिकवलं ते ज्ञान व काही स्वतः अभ्यास करून आत्मसात केलेलं ज्ञान उपयोगी आलं . अंगी एक झपाटलेपण होतं तेव्हा .वेळेचं नियोजन म्हणाल तर एका विषयाचा कंटाळा आला तर दुसरा विषय घ्यायचा हाती .change of work is my rest .तिच विश्रांती , तोच आँक्सिजन होता माझ्यासाठी .” “वाह ग्रेट , खूपच छान .तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी असं तुझं यश तरआहेस पण ते साध्य करण्यासाठी तुझं साधनही प्रेरकचं .” म्हणत पेढ्यांचा बाॅक्स माझ्या हाती दिला होता .

आयुष्यात असा वेळोवेळी ऑक्सिजन लागतोच … प्रेमाचा , मायेचा , कौतुकाचा ..

चला थोडी वामकुक्षी घेऊया म्हणत मी पलंगावर लवंडले . झोप यावी म्हणून सकाळचं वर्तमानपत्र दुपारी हाती घेतलं . आज शनिवार चित्रपट व नाटकांची वेगळी पुरवणी होती .” नृत्य हा माझा प्राणवायू ” अभिनेत्री अर्चना जोगळेकर शीर्षक वाचलं आणि 1980 ते 1990 च्या दशकातील नितळ चेहर्‍याची , घार्‍या डोळ्यांची , गौरवर्णाची , शेलाट्या बांध्याची अर्चना डोळ्यासमोर तरळली .चित्रपट , नाटक करीत असतांनाच नृत्याचेही धडे तिने गिरवलेले . ” अर्चना नृत्यालय ” ची स्थापना आई नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे समवेत करून न्यू जर्सी ( अमेरिकेत ) इथे तिने शाखा उघडली . यातून अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नृत्यात पारंगत होत आहे .खरंच माणसाच्या अंगी असे झपाटलेपण हवं , डेडिकेशन हवं .हा प्राणवायूच आम्हांला ऊर्जा देतो , लक्ष्यपूर्तीत सहाय्यक ठरतो .वाचता वाचताच वर्तमानपत्र हातातून गळालं , मी निद्रेच्या आधीन झाले होते .

” आई , चहा घेतेस काय ? मी बनवलाय ? इथे किचनमध्ये येतेस की तिथे आणून देऊ “

सुरेखा , माझी मुलगी विचारत होती

” नको , इथे नको , मी येते किचनमध्ये .नसत्या सवयी लावून घेऊ नये माणसानं . उद्या तू सासरी गेल्यावर कोण देणार आहे मला “

” काय आई , किती विचार करतेस . मी काही कोठे जात नाही. नवर्‍यालाच येथे घेऊन येईन “

” वेडी कुठली ” आणि आम्ही दोघी खळाळून हसलो .

मनावरची मरगळ जाऊन मन प्रफुल्लित झालं . खरंच हसण्याने किती गोष्टी साध्य होतात .रक्तदाब नियंत्रणात राहातो . स्वतः आनंदी असल्याने इतरांनाही आनंदीत करता येते , दुःख हलके होते . जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते . चिंता , तणाव दूर होतो .या सकारात्मकतेचे परिणाम शरीरावरही दिसून येतात .पचनसंस्था सुधारते. शांत झोप येते . बापरे किती फायदे आहेत हसण्याचे .उगाचच कोणी हास्यक्लब नाही काढत . कारण हसणे हा जीवनदायी प्राणवायूच तर आहे ना .

मनाच्या या प्रसन्नतेनं मन हलकं फुलकं झालं .आणि कवितेच्या प्रदेशात हिंडावसं वाटू लागलं . होय , कविता ही त्या कवीचा जीव कि प्राण असते . जीवात प्राण ओतणारी ती कविता म्हणजे कवीचा आँक्सिजन म्हटली पाहिजे .क्षणात आकाशात भरारी घेणारी तर क्षणात समुद्राचा तळ गाठणारी , कधी क्षितिजावर हिंदोळे घेणारी तर कधी मनाच्या खोल डोहात दुःखाने बुडालेली , अशी ब्रम्हांडाची सफर घडविणारी कविता कवीला दुःखात सोबत करणारी , आनंदाने उचंबळणारी ,संकटकाळात धैर्य देणारी , काळोखातही प्रकाशकिरण शोधण्याची शक्ती देणारी .. प्राणवायूच म्हणायला पाहिजे टेबलवरचं रायटिंग पॅड घेतलं आणि काव्यकामिनीची मी पूजा आरंभली .जीवन मार्गातील खाच खळगे , काट्यांवरुन वाटचाल करतांना मनोधैर्य खंबीर हवं .मार्ग सुगम होतो , फक्त तो सुखाचा पासवर्ड शोधता आला पाहिजे .

ऊन सावलीचा खेळ

शिकवण निसर्गाची

दुःखामागे येई सुख

धरी कास ही आशेची

 

निराशेत दडलेला

शब्द असतो आशेचा

मना खंबीरता देई

पासवर्ड तो सुखाचा

काव्य प्रदेशात हिंडतांना मला अशी नवऊर्जा मिळत असते .

डोअरबेल वाजली . कोण असेल , विचार करतच मी दरवाजा उघडला .माझी मैत्रीण आरती तिचा मुलगा सुहाससह आली होती .सुहासचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं होतं, पण तो नोकरीपेक्षा स्वतःचा काही व्यवसाय सुरू करू इच्छित होता आणि या इच्छेला मूर्तरूप देण्यासाठी त्याने माझ्या बँकेतून मुद्रा योजनेअंतर्गत कर्जही घेतलं होतं .त्याने उद्योग सुरू केला पण ज्या कंपनीला तो पुरवठा करणार होता तो वेळेत करू शकला नाही . एक तर अकुशल कामगार , कामगारांची काम करण्यातील दिरंगाई , सुहासचं poor management , बाजारातील गळेकापू स्पर्धा .यामुळे हे घडत गेलं . त्या कंपनीला पुरवठा दुसर्‍यानेच केला . कामगारांचे पगार , बँकेचे EMI मात्र चालुच होते . सुहासला हे सगळं नवीन होतं किंबहुना त्याच्या प्लॅनप्रमाणे झालेलं नव्हतं . तो भांबावला होता .

” शोभना यासाठीच आज सुहासला घेऊन आलेय . बघ तुला काही मार्गदर्शन करता आलं तर . मदत कर बाई माझ्या मुलाची” .

“ अग होय , पण तू चिंता नको करूस आणि पॅनिकही होऊ नकोस . सुहास व्यवसाय करतांना प्लॅनिंग , मार्केट स्ट्रॅटेजी महत्वाची तर आहेच , पण वक्तशीरपणाही तितकाच महत्वाचा.  किंबहुना वक्तशीरपणा हा प्राणवायू आहे उद्योग व्यवसायातला . प्रत्येक उद्योगामध्ये उत्पादन, वाहतूक, विक्री किंवा वसुलीसारख्या प्रत्येक कामासाठी वेळेचं एक गणित असतं. ते गणित मिनिटांनी जरी चुकलं तरी व्यवसायाचं गणित लाखांनी चुकण्याची ती सुरुवात ठरू शकते. वेळा पाळण्याचं काम जसं उद्योजकाला करावं लागतं तसं त्याच्याकडे काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍यालाही करावं लागतं. ‘इंडियन टाइम’ नावाचा एक विचित्र प्रकार आपल्याकडे आहे. तो उद्योग-व्यवसायासाठी अतिशय घातक असतो. असा घात होऊ नये अशी इच्छा असणार्‍या सर्वच उद्योजकांनी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी वक्तशीरपणा अंगी बाणवण्याला पर्याय नाही; अन्यथा, काळ कोणाहीसाठी थांबत नाही हे लक्षात असलेलं बरं.  वक्तशीरपणा बाणवण्यासाठी वेळेचं नियोजन आवश्यक असतं. त्यासाठी आपल्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवता यायला हवा. म्हणजे वेळेच्या नियोजनाचा विचार करताना दोन महत्त्वाचे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत. एक म्हणजे माझ्या आयुष्यात मला जे साध्य करायचं आहे आणि दुसरा म्हणजे रोजच्या जगण्यातला वेळ मी कसा वापरतो? थोडक्यात वेळेचं नियोजन करायला शिकायचं असेल तर आधी वेळेबद्दल आणि स्वतःबद्दलही आदराची भावना हवी. नाहीतर कल करे सो आज कर, आज करे सो अब हे वचन सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते अमलात आणणारे मात्र कमी असतात. वेळेवर कामं निपटायची सवय अनेक बाबतीत फायदेशीर ठरते. कामात सुटसुटीतपणा येतो, गोंधळ टळतात, मनावरचा ताण नाहीसा होतो. गेलेला वेळ परत येत नाही ही ध्यानात घेऊन कामातल्या व्यक्तशीरपणाची सवय अंगी बाणवणं म्हणूनच आवश्यक असतं. 

आता तुझ्या काय चुका झाल्या , कोठे आणि केव्हा झाल्यात याचं बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण कर . मेहनत तर तू करतोच आहेस . पण हिंमत हारू नकोस . एकदा आलं अपयश . पण यातून तुला खूप शिकायला मिळणार आहे हे लक्षात घे आणि पुढील वाटचाल करत राहा . मग यश तुझंच आहे .” 

“ होय आँटी ” सुहासच्या चेहर्‍यावर हास्य उमललं आणि नकळत माझ्या आणि आरतीच्याही चेहर्‍यावर हास्य आलं .

” अग शोभना तुझ्या कानावर काही आलंय काय ग ” माझ्या शेजारच्या फ्लॅटमधील वीणा बोलत होती 

” नाही ग , आणि कशाबद्दल म्हणत आहेस तू .” अग त्या मातृरक्षा बिल्डिंगमधील कालिंदीचा मुलगा अशोक अमेरिकेत मिशिगनला होता बघ . छान नोकरी मिळाली , तिकडेच स्थायिक झाला . लग्न झालं , दोन मुलं झाली . सगळं कसं सुरळीत चालू होत. ” .. ” बरं मग झालंय तरी काय “..  ” जागतिक मंदीची लाट आली आणि अशोकची नोकरी गेली . उच्चपदस्थ असुनही त्याला ही झळ बसली कारण तो परदेशातील होता . स्थानिकांना झुकतं माप मिळालंच . अशोकने जवळची जमापुंजी खर्च करुन सहा महिने काढले . नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण अपयशच आलं आणि त्याचा व्हायचा तोच परीणाम झाला .अशोकने आत्महत्या केली ” .. ” काय ? आत्महत्या ? हे कसं शक्य आहे?” . “ होय , असेलही कारण आपण मुलांना यशाचे मार्ग दाखवतो .प्रेरणा , प्रोत्साहन देत राहतो .यशस्वीतेच्या वाटेवरील तो झगमगीतपणाही सुखकर वाटतो . पण आपण अपयश पचवायला शिकवित नाही .परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपणच धैर्य , हिंमत धरली पाहिजे , प्रतिकूलतेवर मात कशी मात करायची आपणच शिकवत नाही .त्याने हे दुःख आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता आपल्या आई वडिलांना , आपल्या माणसांना सांगायला हवं होतं .होय आपली माणसं ..  आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायु म्हणजे आपली माणसं .. …. रक्ताच्या नात्याचीही आणि आपल्याशी ऋणानुबंधानं जुळलेलीही ..अशा कठीण प्रसंगी हीच माणसं कामाला येतात . भावनांचा निचरा होतो . मनातलं मळभ नष्ट होऊन लख्ख उजाडतं आणि अशा अप्रिय निर्णयापासून माणूस परावृत्त होतो . हा प्राणवायू हवाच .जाऊ आपण कालिंदीकडे ..” 

ऊं ऊं ऊं ऊं हाताने डोळे पुसत आजी आजी करत अक्षय माझा नातू झोपेतून उठला होता , मला शोधत दरवाज्यापर्यंत आला होता . ” ओ ले माझ्या राजा , झोपा झाली वाटतं ,रडू नाही , काय हवं तुला .मी त्याला उचलून कडेवर घेतलं .”  माझा आँक्सिजन माझ्या कुशीत होता .

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चित्रकार… भाग-२ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चित्रकार… भाग-२ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

(इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…) इथून पुढे … 

भूत ही संकल्पना किती क्रूर,नकारात्मक रंगवली आहे ना लोकांनी??….कदाचित ते कधी कमला काकूंना भेटले नसतील….त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती आजूबाजूला फिरून गोळा केली….त्या एकट्याच ह्या बंगल्यात राहत होत्या….सुधाकर काका 60 व्या वर्षीच कमला काकूंना एकटे सोडून देवाघरी गेले होते….ह्या आधी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना एका अपघातात सोडून गेला….काकू अगदी एकट्या ह्या घरात राहत होत्या…ह्यातच एका दिवशी त्यांना ह्रदयविकाराने गाठले आणि हे घर अगदीच रिकामे झाले…..सुधाकर काका आणि कमला काकूंनी मोठ्या मेहनतीने हे घर बांधले होते ते त्यांनी जिवंतपणी कुणालाही विकलं नाही  त्यामुळे अजूनही कमला काकूंचा वावर ह्या घरात आहेत असे आजूबाजूचे लोक म्हणतात…त्यामुळे हे घर कुणी विकत घेत नाही..आणि हे खरेच आहे….खरोखर त्या इथे वावरतात….माझ्याशी बोलतात……मलाही त्या खूप आवडतात…..

त्या दिवशी शाळेतून मी घरी येत होतो तर वाटेत हा बंगला होता….गेटच्या आतल्या बाजूला एका झाडावर एक पोपट बसला होता…..मला तो पोपट निरखून रेखाटायचा होता त्यामुळे विचार न करताच मी आत गेलो आणि इथल्या एका धुळकट पायरीवर बसून तो पोपट रेखाटू लागलो….मी एकदा चित्र काढायला बसलो की माझं कशात लक्ष नसत…..काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला सांगितले होते इथे जास्त उशीर थांबू नको ही जागा भूतीया आहे…..भूत हा शब्द ऐकून घाबरून मी इथून काढता पाय घेतला होता पण आता त्या पोपटाच्या मागे मी इथे कसा आलो मला कळलंच नाही…..मी चित्र काढू लागलो पण न राहून अस वाटत होतं की मागे कुणीतरी उभं आहे….अचानक कानात एक कुजबुज ऐकू आली….

“खूप छान चित्र काढलं आहेस बाळा”

मी थबकून मागे बघितलं….मागे कुणीच नव्हतं…..नंतर लक्षात आलं आपण तर त्याच भूतीया घरात आहोत….अगदी धावत पळत तिथून आलो…..खूप घाबरलो होतो तेव्हा…..पण नंतर त्या बाळा शब्दाने मला विचार करायला भाग पाडलं…..खूप दिवसांनी तो शब्द ऐकत होतो……कुणीतरी माझ्या चित्राचीही तारीफ केली होती….एकेदिवशी शाळेतून येताना अचानक एक नजर त्या बंगल्याकडे गेली…..आज तो बंगला कमालीचा स्वच्छ आणि नीटनेटका वाटत होता….मी येताच तिथल्या गार्डन मध्ये मंद वाऱ्याची झुळूक वाहू लागली न जाणो अस वाटत होतं कुणीतरी आपल्याला त्या घरात बोलवत आहे….आज्जीच्या घरी आल्यावर जसा आनंद होतो तस काहीसं मनात वाटत होतं त्यामुळे थोडा धीर एकवटून बंगल्यात शिरलो…..परवा कुलूप असलेले दार आज उघडे दिसत होते…..दारात उभं राहून आत जाऊ की नको?? हाच विचार मनात चालू होता…..दारातून मला आतली हॉल मधली मोठी तैलचित्रे स्पष्ट दिसत होती…..ती चित्रे बघून आत शिरलो…..कमालीचा जिवंतपणा होता त्या चित्रात जणू प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उभे आहोत असं वाटत होतं…..सगळी चित्रे फिरून फिरून बघत होतो….चित्राच्या खाली कमला असे नाव आणि सही होती 1996 हे साल देखील होते आपण एका भूतीया घरात आहोत हे जणू विसरूनच गेलो….अचानक थोडी सळसळ जाणवली चमकून तिकडे बघितले तर एका पॅड वर एक कोरा कागद अडकवला होता बाजूला पेन्सिल,ब्रश काही रंग आणि समोर एक खोटे सफरचंद ठेवलेले दिसत होते…..जणू सगळा सेटअप माझ्यासाठीच होता अस वाटत होतं…..कोणताही विचार न करता समोर ठेवलेल्या सफरचंदाचे चित्र रेखाटू लागलो…..ह्या वेळी मला ती भीती नव्हती जी इतर वेळी चित्र काढताना असायची…..माझी चित्रे आगीत फेकणारे माझे पप्पा पाठीत धपाटा मारणारी माझी मम्मी सगळ्यांच्या विसर पडला होता…..माझ्या पेन्सिल पकडलेल्या हातात एक वेगळेच बळ आले होते….समोरच्या सफरचंदाचे हुबेहूब चित्र,आउटलाईन वैगेरे माझ्याकडून रेखाटली जात होती….कानात कुणीतरी मला मार्गदर्शन करत होते….त्या दिवशी पहिल्यांदा मी मुक्तपणे जगल्याचा भास मला झाला…..मन अगदीच प्रसन्न झाले होते…..माझे आवडते काम करायची संधी मला मिळाली होती…..मग काय शाळा सुटल्यावर ITP च्या क्लास ना जाता भूतीया बंगल्यावर जाऊन चित्रे रेखाटू लागलो….रोज रोज माझ्यासाठी नवीन पेपर समोर एखादा नवीन ऑब्जेक्ट आपोआप तयार असायचा…..त्या कमला काकू मला मार्गदर्शन करीत होत्या….त्याची अगदी काळसर आकृती दिसत होती….वाऱ्याबरोबर हलणारी….पण त्यांचा खरवरीत मोठी नखे असलेला हात जेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाने फिरायचा तेव्हा मायेचे एक वेगळीच अनुभूती येत होती…..तिथे भय,किळस असले भाव गळून पडत असत….मग त्या मायेच्या स्पर्शासाठी घरी येऊन पप्पांचा मार सुद्धा अगदी किरकोळ वाटत असे……कमला काकू माझ्या चित्रांची खूप तारीफ करायच्या माझं जिथं चुकत असे तिथे आपोआप एखादी आउटलाईन यायची…..माझ्या चुकीच्या वेळी  त्यांच्या सांगण्यात कुठेही आरडाओरडा नव्हता….त्यांचा इतरांच्यासाठी भयानक दिसणारा काळा हात माझ्या पाठीत बसत  नव्हता…  उलट तो हात माझ्या डोक्यावरून फिरवून त्या मला प्रोत्साहन देत होत्या…..जवळपास महिनाभर इथे आलो….आईचा अबोला नको म्हणून ITP चा दिवसरात्र जागून अभ्यासही केला तरी जिल्ह्यात 9 वा आलो……साहजिक मार तर पडणारच होता…..आईनेही अबोला धरला होता पण मी जेव्हा भूतीया बंगल्यात आलो आणि कमला काकूंना रिझल्ट बद्दल सांगितलं तर त्यांनी टाळ्याच वाजवल्या….आपल्या खरवरीत हातात माझा हात घेऊन अभिनंदन देखील केले……खूप बर वाटलं…..दिवसरात्र केलेली मेहनत सफल झाल्याची अनुभूती आली…..दोन वेगवेगळ्या टोकाच्या मध्ये मी होतो….एक माझे जन्मदाते असून सुद्धा मला त्यांची पुढची पैसे कमावण्याची मशीन बनवू पाहत होते आणि एक जी काकू माझी कुणी नसून सुद्धा माझ्या आवडत्या कामात मला साथ देत होती….मुलांनी मोठं व्हावं हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते हे मान्य आहे पण मुलांचे छंद,त्यांच्या कला,त्यांची स्वप्ने ह्याचा विचार कोण करणार??…..त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे….कायमच कमला काकूंच्या बरोबर रहायचं…..पण त्यांच्या जगात जाण्यासाठी मला हे जग सोडावे लागेल…..हरकत नाही…..तसही ह्या जगात ते वजनदार दप्तर,अभ्यासावरून मारझोड करणारे माझे आईवडील,शाळेचा निकाल टॉप ला रहावा म्हणून मुलांच्यावर सक्ती करणारे दिवसभर शाळेत बसवून घेणारे ते शिक्षक,ज्यादाचे क्लासेस अजून बरच काही  माझी वाट बघत असतील……नकोच ते सगळं….आताच मी कमला काकूंचे ते त्यांच्या अमानवी रूपातले चित्र रेखाटले आहे ते बघून त्यांच्या विद्रुप चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत आहे….त्यांनी जवळपास मला प्रेमाने मिठीच मारलीय…..हेच प्रेम मला हवं आहे म्हणून आता त्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारणार आहे…..ह्या दुनियेतली शेवटची उडी…..सरळ कमला काकूंच्या दुनियेत……तिथे गेल्यावर मला त्या प्रेमळ स्त्रीचे खरे रूप बघता येईल…

— समाप्त — 

लेखक:- श्री शशांक सुर्वे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चित्रकार… भाग-१ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चित्रकार… भाग-१ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

एखाद्या चौथीच्या प्राथमिक वर्गात असलेल्या मुलाकडून अस काही ऐकणे तुम्हाला नवल वाटेल पण हो करतो मी जास्ती विचार… माझी आज्जी पण नेहमी म्हणते “पुष्कर लहान आहे पण एखाद्या मोठ्या व्यक्ती पेक्षा जास्त समज त्याच्यात आहे” आता ह्याला वरदान म्हणावे की श्राप??….. श्रापच…. अवेळी आलेली गोष्ट तशी धोकादायकच…. मग ते अवेळी आलेलं प्रौढत्व का असेना….. असो….. ह्या सगळ्या दुनियादारी गप्पा तुमच्या सोबत ह्यासाठी मारतोय कारण हे जग सोडण्याचा मी निर्णय घेतला आहे….. कारण??….. मी स्कॉलर ITP परीक्षेत जिल्ह्यात 9 वा आलो म्हणून?? अजिबात नाही….. कारणे खूपशी आहेत…. ती सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईन….. माझ्याबद्दल विचाराल तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत रमणारा मी आहे… मी रोज पेपर वाचतो… तो पेपर तिथल्या मोठ्यांच्या गोष्टी….. पण पेपर मधल्या न समजणाऱ्या गोष्टी शेजारच्या काकांना विचारतो ते सगळं समजावून सांगतात मला…. त्यात किनी बातम्या येतात बघा “मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या”….. आता मी युवक तर नाही….. शाळकरी मुलगा आहे…. पण खरं सांगू का लहान मुले सुद्धा विचार करतात…. त्यांना सुद्धा मानसिक त्रास येतो ह्याचा विचार कदाचित पालक करत नसतील पण ते खरे आहे… लहानमुले म्हणजे मातीचा गोळा… मातीचा गोळा…. त्यांना आकार देण्यासाठी एवढं बदड बदड बदडलं जातं की हे मडकं तुटू शकतं ह्याचा कुणी विचारच करत नाही… लहान मुलांना पण मन असत… त्यांच्या सुद्धा मनावर परिणाम होत असतो.. कोण करणार विचार??… बरं.. ते सगळं जाऊ द्या.. कुठे होतो आपण….. हा तर ITP स्कॉलर परीक्षेत माझा 9 वा नंबर आला…. बाकी हा सगळा नंबर्सचा खेळ माझ्या डोक्या बाहेरचा आहे…… इथे फक्त 1 ह्या नंबरलाच मानाचे स्थान आहे….. कारण मागच्या वेळी ITP परीक्षेत मी 4 नंबर वर होतो तरीही बाबांचा मार खाल्ला आणि आता ह्या वर्षी तर थोडा जास्तच….. पप्पा आणि मी शाळेत गेलो निकाल हातात आला आणि तिथेच लक्षात आलं की घरी गेल्यावर फुल्ल धुलाई होणार आहे आणि तसच झालं… पप्पांनी अगदी हात दुःखेपर्यंत मला धोपटून काढलं….. साहजिक मार खाताना ओरडायच नाही हा एक कायदा आमच्या घरी होता त्यामुळे हुंदके देत सगळा मार खाऊन घेतला….. मम्मी कोपऱ्यात उभी राहून बघत होती….. दिवस सगळा रडण्यात गेला…. रात्री पप्पा आले काहीवेळ त्यांनी मोबाईल बघितला आणि परत येऊन धोपटून काढलं…… नक्कीच त्यांनी बाजूच्या प्रतीकच्या वडिलांचे स्टेटस बघितले असेल….. प्रतीक 3 रा आला होता….. बाकी माझ्या पप्पांना स्टेटसचे जाम वेड आहे….. पण आपल्या मुलाचा प्रथम 3 क्रमांकात येणाचे स्वप्न मी काही पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे ते एक दुःख त्यांच्या मनात सलत असावं परिणामी माझी बारीकसारीक गोष्टीसाठी होणारी धुलाई, शिव्या देणे हे सगळं चालूच असायचं….. पण पप्पांच्या मारापेक्षा जर कोणती गोष्ट मला जास्त वेदना देते ती म्हणजे मम्मीचा अबोला….. माझा रिझल्ट लागला की माझी पप्पांच्या कडून येथेच्छ धुलाई होणार हे मला माहित होतं आणि त्याची जराही भीती वाटायची नाही कारण मार खाऊन खाऊन मी पुरता धीट झालो होतो पण मम्मीचा अबोला??….. तो मात्र अगदी आत मनापर्यंत वेदना द्यायचा…. वास्तविक मी प्रथम 3 क्रमांकात नाही आलो तर आई अबोला धरेल कित्येक दिवस बोलणार नाही ह्या विचाराने मी अभ्यास करायचो….. माराचं काही विशेष वाटत नव्हतंच….. पण काय करू?? अभ्यासात माझं मनच लागत नाही….. मला चित्रे काढायला खूप आवडतात….. मला आजूबाजूचा निसर्ग रेखाटायला जाम आवडतो…. शाळेत देखील माझं लक्ष बाजूच्या बगीच्यात असत….. म्हणून तर वर्गातल्या मुलांशी भांडून मी खिडकी कडेची जागा घेतली….. बगीच्यातले पक्षी, खारुताई, फुलझाडे सगळं काही मला आनंदित करून सोडत…. ती फुले, खारुताई वैगेरे मी वहीच्या मागच्या बाजूला रेखाटायचो… माझ्या चित्रकलेच्या मॅडमांना माझी चित्रे खूप आवडायची…. त्यांनी पप्पाना किती वेळा सांगितलं की ह्याची चित्रे खूप चांगली आहेत ह्याला चित्रकलेची आवड आहे तर चित्रकलेच्या क्लासला घाला….. पण त्या दिवशी घरी आल्यानंतर मात्र पप्पांनी माझी सगळी चित्रे जाळून टाकली…… परत तीच धुलाई….. त्यांनी दमच भरला…. “परत चित्र काढताना दिसलास तर तंगड मोडीन”…….. म्हणून तर वहीच्या मागे पेन्सिलने चित्र काढून खोडून घरी जात होतो….. खर सांगू का….. माझं मन नाही लागत अभ्यासात…… मला चित्रे काढायला आवडतात….. शाळेतली मुले जेव्हा एकत्र जमून अभ्यासाच्या चर्चा करतात तेव्हा खूप वेगळं वेगळं वाटत.. कमीपणाचा भाव येतो…. म्हणून तर मी एकटा राहण्याचा प्रयत्न करतो…… आजूबाजूचा निसर्ग पशु पक्षी माझे मित्र बनले आहेत….. आता मला समजून घेणारं कुणीच नाही एवढंच काय तर माझे आई वडील सुद्धा मला समजून घेत नाहीत…. कधी कधी अस वाटत की त्यांनी मला एका मिशन साठी जन्माला घातलं आहे….. मिशन कलेक्टर….. मला ते झालंच पाहिजे असं ते सतत बोलतात….. ते त्यांचं स्वप्न आहे म्हणे पण मग माझ्या स्वप्नांचे काय??…… मला जगप्रसिद्ध चित्रकार व्हायचं आहे…… ज्याचा ह्या वास्तविक जगाशी काहीही संबंध नसेल तो आपल्याच काल्पनिक जगात हरवून वेगवेगळ्या रंगानी चित्र रंगवत जाईल….. पण असो…. आजकल मुलांच्या स्वप्नांना कुठे किंमत आहे म्हणा…… पालकांनी शाळेत अभ्यासात एवढं गुंतवून टाकलं आहे की आधीच्या पिढी सारखं फिरावं, खेळावं, पोहवं हे सगळं आमच्यासाठी स्वप्नवत आहे.. आमच्या उन्हाळी सुट्या सुद्धा क्लासेस आणि स्कॉलर परिक्षमध्येच जातात…. उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील आमच्या कडून एखादा पेपर किंवा पुढच्या वर्षीची तयारी ते क्लासेस सुरूच असत….. पालकांच्या स्वार्थात आमच्या स्वप्नांचा बळी जातोय ह्याचा विचार कोण करणार आहे??…… मी तरी त्या दप्तराचे आणि घरच्यांच्या स्वप्नांचे ओझे वाहून अक्षरशः थकून गेलो आहे….. खरंच

अजून दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सगळेच लोक माझ्या विरुद्ध किंवा माझ्यावर ओरडणारे नाहीत बरं….. काही लोकांना माझे जाम कौतुक देखील आहे…. आता तिला “लोक” ह्या कॅटेगरी मध्ये गणले जाऊ शकत नाही… ती फक्त जाणवते तिचा आकार नेहमी बदलत असतो एखाद्या कंपना सारखा तिचा घोगरा आवाज समजण्यासाठी थोडे कष्ट पडतात पण ठीक आहे ना…… अशी ती जरी जिवंत नसली तरी माझ्या आयुष्यात जेवढी जिवंत माणसे आली त्यांच्यापेक्षा ह्या कमला काकूंनी मला खूप प्रेम दिलं आहे….. इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…

– क्रमशः भाग पहिला 

☆☆☆☆☆

लेखक:- श्री शशांक सुर्वे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रभाव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ प्रभाव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(एकदा पूजाला तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले.आधी मोहिनी त्यांना जाऊन भेटली होती. या मुलीवर वडिलांचा असलेला प्रचंड प्रभाव तिने डॉक्टरांना सांगितला.) इथून पुढे — 

आणि मग ती सहज म्हणून पूजाला त्यांच्याकडे घेऊन गेली. डॉक्टरकाकांनी तिला हळूहळू बोलते केले आणि तिचे   councelling केले…. “ पूजा, काही वर्षांनी तू मोठी होशील, तुला लग्न करावेसे वाटेल,तेव्हाही तू आपल्या बाबांसारखा जोडीदार शोधणार का? नाही ना? तुझे आयुष्य हे फक्त तुझे आहे बाळा.वडिलांचा आदर्श असणे वेगळे आणि त्यांना चिकटून रहाणे वेगळे.तुला हवे तेच करिअर तू कर पूजा.” डॉक्टर काकांनी तिला समजावून सांगितले… होतात मुली अशा वडिलांकडे आकर्षित. त्याला फादर  फिक्सेशन म्हणतात.पण सहसा आई नसलेल्या किंवा घरात फक्त वडीलच असलेल्या मुलींचा वडील हा आदर्श असतो आणि त्यांच्यावर वडिलांचा फार दबावही असतो. तुमच्याकडे तुझी आई एक आदर्श आई आहे पूजा. हे बघ तू तुला हवे तेच कर यापुढे.” पूजा डॉक्टरांसमोर मोकळी होत गेली.

एकदाच मोहिनीने उमेश नसताना पूजाला समोर बसवून विचारलं होतं, “ बाळा,तुला मनातून काय करायचं आहे? तुझी काय इच्छा आहे? न घाबरता सांग.” पूजा गडबडून गेली. “ आई , पण बाबा….” 

“ हे बघ पूजा,हे आयुष्य तुझं आहे ,बाबांचं नाही. तुला काय करायचं आहे ते तू ठरवायचं आहेस.बाबांनी नाही. तुझा कल कुठे आहे? “ पूजा म्हणाली “ आई, मला नाही ग आवडत ते मेडिकल. मलाही दादासारखं इंजिनीअर होऊन  मग परदेशात पण जावंसं वाटतं.” आज इतक्या वर्षात प्रथमच पूजा मोहिनीशी इतक्या जिव्हाळ्याने बोलत होती. “ हो ना? मग तू तुझ्या मनाचा कौल घे आणि तेच कर. करिअर म्हणजे काही गंमत नाही पूजा. तुझ्या मनाविरुद्ध तू तुला आवडत नसलेले मेडिकल करिअर करणार का? केवळ बाबा म्हणतात म्हणून? आणि का? तुला तुझं मत नाही का? हे बघ पूजा ! आई आहे मी तुझी. मी राहीन तुझ्या पाठीशी उभी. मी तुला बाबांच्याविरुद्ध भडकवत नाहीये, पण असं बाबांच्या ओंजळीने नको कायम पाणी पिऊ. आम्ही तुला जन्मभर पुरणार नाही बाळा.” मोहिनीने पूजाला कळकळीने सांगितलं. आणि मगच तिला डॉक्टर काकांकडे नेलं  . 

केवळ उमेशच्या हट्टाखातर पूजाने p c m b चारही  विषय घेतले. परीक्षा झाली आणि उमेश तिच्या रिझल्टची तिच्यापेक्षाही आतुरतेने वाट बघू लागला. पूजाचा रिझल्ट लागला. तिला बायॉलॉजीमध्ये जेमतेम पास होण्याइतके मार्क्स होते आणि फिजिक्स आणि मॅथ्समध्ये मात्र अत्यंत उत्तम रँकस्. अर्थात आता मेडिकलची दार बंदच होती तिला.

उमेशने खूप धिंगाणा केला, तिला वाट्टेल ते बोलला. “ दोन्ही मुलांनी माझी निराशा केली. तू तरी माझं स्वप्न पूर्ण करशील असं वाटलं होतं मला. माझी सगळी मेहनत वाया गेली. कर आता काय हवं ते.” उमेश तिथून निघूनच गेला. पूजा बिचारी कावरीबावरी झाली. इतके सुंदर मार्क्स मिळूनही कौतुक तर सोडाच पण बाबांची बोलणी मात्र खावी लागली तिला. 

न बोलता तिने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि तीही मुंबईला निघून गेली  प्रसाद उत्तम मार्कानी इंजिनीअर झाला आणि त्याला सिंगापूरला छान जॉबची ऑफर आली. पूजा सुट्टीवर घरी आली होती. प्रसाद तिला म्हणाला, “ काय मस्त कॉलेज ग पूजा? डायरेक्ट पवई?ग्रेट ग तू.”.

 “ अरे पण दादा,बाबांना हे आवडलं नाही ना. ते बोलत नाहीत माझ्याशी.” पूजा रडवेली होऊन म्हणाली. प्रसाद खो खो हसला आणि म्हणाला  “ मॅडच आहेस. लहानपणापासून सारखी बाबांच्या पंखाखाली राहून तू स्वतःचे आयुष्यच विसरलीस पूजा. सारखं काय बाबा आणि बाबा. गाढव आहेस का? याला ना, फादर  फिक्सेशन म्हणतात वैद्यकीय भाषेत. तुला फक्त बाबा हेच आदर्श वाटायचे लहानपणापासून. त्यात वाईट काहीच नाही ग पूजा. पण किती त्यांचा इम्पॅक्ट तुझ्यावर? ते म्हणतील ते कपडे घालायचे, ते म्हणतील ते वाचायचे,ते म्हणतील तेच सिनेमे बघायचे. तुला स्वतःचं मत नाही का? काही मुली तर लग्न करताना, नवराही आपल्या वडिलांसारखा असावा अशी अपेक्षा ठेवतात.नशीब यावेळी तरी आपल्या मनाचा कौल घेतलास,आणि मेडिकलचं  खूळ झुगारून दिलंस.” प्रसादने तिला जवळ घेतलं… “ मस्त कर करिअर तुझं. कसली हुशार आहेस तू. आगे बढो. मी आहे तुझ्यासाठी.”  पूजाने प्रसादला मिठीच मारली.” दादा आई, सॉरी हं. मी तुम्हाला  ओळखलंच नाही नीट. पण बाबानीही खूप प्रेम केलंय रे माझ्यावर. त्यांना  दुखावलं मी खूप.” पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. 

“ अग ठीक आहे पूजा. तू काहीही गैर केलेलं नाहीयेस. उलट पवईसारख्या ठिकाणी प्रवेश मिळणं चेष्टा आहे का? तू नको वाईट वाटून घेऊ बाबांचं. आपल्या अपेक्षा मुलांच्यावर लादणे हे अत्यंत चुकीचेच आहे.तू निर्धास्तपणे जा बरं आता.” 

मोहिनीने पूजाची समजूत घातली.जाताना पूजा नमस्कार करायला वाकली तर उमेश तिथून न बोलता निघूनच  गेला. पूजा पवईला गेली. अत्यंत सुरेख करिअर चाललं होतं तिचं. शेवटच्या वर्षात ती घरी आली ती हातात नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर घेऊनच. ”बाबा,बघा ना. किती छान जॉब मिळालाय मला. राग सोडा ना आता “ .उमेशने ते लेटर बघितले आणि छान आहे म्हणून तिथून निघूनच गेला.पूजा आईजवळ बसली आणि म्हणाली, “आई ,सगळं लहानपण मी बाबांच्या मर्जीनेच  वागून घालवलं ना? ते म्हणजे माझा आदर्श होते. तुलाही मी कधीही महत्व दिलं नाही.. उलट दुखवलंच ग तुला मी. आता आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी लग्न ठरवतेआहे. फार छान मित्र आहोत आम्ही. माझ्याच वर्गात आहे … आशिष तिवारी.आपल्या जातीचा नाहीये पण अत्यंत हुशार आणि लाखात एक मुलगा आहे. आता मात्र मी चूक करणार नाही.आणि आशिषमध्ये बाबा शोधायचा वेडेपणा करणार नाही आई. मी मोठी आहे आणि माझं भलं मला समजतं. दादाचे आणि तुझे खूप उपकार आहेत ग माझ्यावर, वेळीच डोळे उघडलेत माझे तुम्ही.” 

उमेशला पूजाने हे लग्न ठरवलेले अजिबात आवडले नाही. त्याने खूप आकांडतांडव केले पण यावेळी मोहिनी आणि प्रसाद तिच्या पाठीशी उभे राहिले. प्रसाद म्हणाला, “ तुम्ही नसला येणार तर नका येऊ लग्नाला. आई आणि मी लावून देऊ त्यांचं लग्न. लाखात एक मुलगा आहे आशिष. कसली जात घेऊन बसलाय हो तुम्ही?”   

पूजाचं लग्न प्रसाद आणि मोहिनीने थाटात लावून दिलं. केवळ नाइलाज म्हणून उमेश लग्नाला उपस्थित होता. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. “बाबा,मला माफ करा तुम्ही. पण अभिमान वाटावा अशीच तुमची दोन्ही मुलं आहोत ना आम्ही? आता तर मी आशिषबरोबर अमेरिकेला चाललेय. राग सोडून द्या बाबा.” पूजा म्हणाली. उमेशच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.” पूजा प्रसाद ,माझं चुकलं.कोणालाही लाभणार नाहीत अशी मुलं मला देवाने दिली. मी जन्मदाता आहे,पण तुमच्या आयुष्याचा मालक नाही हे मला फार उशिरा समजलं. कदाचित मला जे लहानपणी मिळालं नाही ते मी तुमच्याकडून पुरं करायला बघत असेन. यात मी मोहिनीवरही खूप अन्याय केला. पूजाला कधी आईजवळ जाऊच दिलं नाही. यात पूजाची काहीही चूक नाही पण माझं चुकलं… मला माझी मुलं गमवायची नाहीत रे. आता तर तुम्ही दोन्ही मुलं दूरदेशी चाललात. मला माझी चूक कबूल करू दे. मोहिनी,मला माफ करशील ना? मी खूप स्वार्थीपणाने वागलो ग तुझ्याशी..पूजा आशिष, सुखात संसार करा आणि प्रसाद माफ कर मला.” 

प्रसाद म्हणाला.. “  काय हे बाबा?असं नका बोलू. आपण पूजाला आनंदाने निरोप द्यायला एअरपोर्ट वर जाऊया .. .येताय ना? “ डोळे पुसत उमेश आणि मोहिनी ‘हो’ म्हणाले आणि प्रसादची कार एअरपोर्ट कडे धावू लागली..

— समाप्त —   

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रभाव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ प्रभाव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काल  पूजा लग्न होऊन  सासरी गेली. घर किती रिकामे रिकामे झाले मोहिनी बाईंचे.. त्यांना त्या उदास घरात बसवेनाच. बंगल्याच्या अंगणात सहज आल्या आणि बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या क्षणभर. शेजारच्या बंगल्यातल्या पद्माची हाक आली, “ मोहिनी,ये ना ग जरा.मस्त चहा पिऊया दोघी.” मोहिनी बाई म्हणाल्या “अग तूच ये पद्मा. मी चहा केलाच आहे तो घेऊन येते .ये गप्पा मारायला.”

मोहिनीने चहाचा ट्रे आणला. पद्मा तिची अगदी सख्खी शेजारीण. लग्न होऊन दोघी जवळपास एकदमच सासरी आल्या आणि चांगल्या मैत्रिणी झाल्या. दोघीही एकमेकींच्या मदतीला तत्पर असत,एकमेकींची सुखदुःख शेअर करत. पद्माची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झाली होती. दुर्दैवाने पद्माचा नवरा फार लवकर कॅन्सरने गेला आणि पद्मा फार एकटी पडली. पण त्यावेळी मोहिनी आणि तिच्या नवऱ्याने – उमेशने तिला खूप आधार दिला. मुलं अमेरिकेहून महिनाभर आली,आईला तिकडे घेऊन गेली.चार महिन्यांनी पद्मा इकडे परत आली. म्हणाली, “ मी इथेच रहायचा निर्णय घेतलाय  मोहिनी. थोडे दिवस तिकडे ठीक आहे ग, पण माझं सगळं विश्व इथे भारतातच नाही का? मी मुलांना तसं समजावून सांगितलं आणि त्यांना ते पटलं देखील.आता पुढचं पुढे बघू.” मोहिनीने तिला दुजोरा दिला आणि पद्मा बंगल्यात एकटी रहायला लागली.  .

आत्ताही पद्मा मोहिनीला म्हणाली “ खूप सुंदर केलंस ग लग्न पूजाचं. सुटलीस ग बाई. प्रसाद सुद्धा आलाय सिंगापूरहून ते उत्तम झालं.कुठे गेलाय ग? “

 “अग कालच मुंबईला गेले सूनबाई आणि तो तिच्या माहेरी. आता मी आणि हे दोघेच आहोत  हा आठवडाभर.”. पद्मा म्हणाली “ मोहोनी,प्रसादच्या लग्नाला नाही तुला काही त्रास झाला, पण पूजाच्या लग्नाला केवढा विरोध ग उमेशचा? मला सांग,एवढी शिकलेली मुलगी,आपल्याला आवडेल,योग्य वाटेल तोच जोडीदार निवडणार ना? नाहीतरी उमेश अतीच करतात. जणू काही पूजावर मालकी हक्कच आहे यांचा. तीही वेडी बाबा बाबा करत किती ऐकायची ग त्यांचं.”

“ मोहिनी, इतकी आदर्श आई असूनही ही मुलगी लहानपणी तुला नव्हती कधी attached. पण मग काय जादू झाली तेव्हा की आई आणि दादाचे महत्व समजले. मलाच काळजी वाटायला लागली होती.पण बाई, झालं सगळं नीट. देवाला असते काळजी./’ पद्मा म्हणाली.

मोहिनी म्हणाली “ हो ना ग “ .. .पण खरी गोष्ट  फक्त आणि फक्त मोहिनीलाच माहीत होती. मोहिनीचं मन झोपाळ्याच्या झोक्याबरोबरच मागं गेलं.मोहिनीला लग्नानंतर वर्षभरात प्रसाद झाला.अगदी शहाणं बाळ होतं ते. कधी हट्ट नाही कधी खोड्या नाहीत. आईवडिलांचे लाड करून घेत प्रसाद मोठा होत होता. तो सहा वर्षाचा झाल्यावर ध्यानीमनी नसताना मोहिनीला दिवस गेले. हे गर्भारपण आणि  बाळंतपण जडच गेलं तिला. मोहिनीला सुंदर मुलगी झाली तीच ही पूजा. तिची आई येऊन राहिली दोन महिने म्हणून मोहिनीला खूप विश्रांती मिळाली. उमेशचे लेकीवर जगावेगळं प्रेम होतं. प्रसाद लहान असताना त्याने फारसे त्याला जवळ घेतले, फिरायला नेले असं कधी झालं नाही, पण उमेश पूजाला मात्र खूप खेळवायचा, बागेत न्यायचा. पूजा मोठी व्हायला लागली.उमेश म्हणाला, “आता ही शाळेत जाईल ग.आपण हिला जवळच्याच शाळेत घालू म्हणजे आपल्या नजरेसमोर राहील “ मोहिनी उमेशकडे बघतच राहिली.

“ हे काय उमेश?प्रसादच्याच शाळेत मी तिचं नाव घालणार आणि जाईल की स्कूल बसने. सगळी मुलं नाही का जात? भलतंच काय सांगता? मी ऍडमिशन घेऊन टाकलीय तिची.” पूजा  शाळेतून आली की आधी बाबांच्या गळ्यात पडे. “बाबा ,आज शाळेत असं झालं, मी पहिली आले. “ सगळ्या गोष्टी पूजा बाबांशी शेअर करी. आई आणि भाऊ तिच्या गावीही नसत. मोहिनीला हे फार खटके. विशेष म्हणजे जेव्हा तिच्या मैत्रिणी सांगत की आई मुलीचं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं असतं, तेव्हा तर मोहिनीला वाटे,हे आपलं आणि पूजाचं का नाही?ही मुलगी इतकी कशी वडिलांनाच attached? नाही, त्यात काही चूक नाही,पण  आपणही हिच्यासाठी सगळं करतो, प्रसाद किती लाड करतो, पण हे म्हणजे अजबच आहे हिचं. उमेशला आपली मुलगी फक्त आपलं ऐकते,आईला अजिबात महत्व देत नाही याचा कुठेतरी सूक्ष्म आनंदच व्हायला लागला. हौसेने मोहिनीने एखादा सुंदर फ्रॉक आणावा आणि तिने तो बाबांना धावत जाऊन दाखवावा.उमेश म्हणे .. ‘ छानच आहे ग बेटा हा फ्रॉक पण तुला निळा रंग आणखी सुंदर दिसला असता.’ हट्ट करून पूजा तो  फ्रॉक बाबांबरोबर जाऊन बदलून आणायची आणि मगच तिचे समाधान व्हायचे. उमेश मोहिनीकडे मग जेत्याच्या नजरेने बघायचा. हे असं का व्हावं हेच मोहिनीला समजेनासे झाले. प्रसादच्याही हे लक्षात येऊ लागलं होतं. “आई, तू आणलेली कोणतीच गोष्ट कशी ग पूजाला आवडत नाही? किती सुरेख चॉईस आहे तुझा. माझे मित्र तर नेहमी म्हणतात ‘प्रसाद, तुझे सगळे कपडे मस्त असतात रे.छानच आहे काकूंचं  सिलेक्शन. ’पण मग तू कोणतीही गोष्ट आणलीस की बाबा ती बदलून का आणतात ग? “ मोहिनी त्याला जवळ घेऊन म्हणे, “ अरे,नसेल आवडत त्या दोघांना माझी निवड. जाऊ दे ना. तुला आवडतंय तोपर्यंत मी आणत जाईन  तुझे कपडे हं.” काय होतंय हे समजण्याचं प्रसादचं वय नव्हतं. 

प्रसादला बारावीत फार सुंदर मार्क्स मिळाले. उमेश प्रसादजवळ बसला आणि म्हणाला,” वावा,जिंकलास रे प्रसाद. आता तू मेडिकलला जा. तुला हसत मिळेल ऍडमिशन.मग तू मोठं हॉस्पिटल काढ. माझं स्वप्न आहे तू  डॉक्टर व्हावंस असं.” त्यावेळी प्रसादने त्याच्या नजरेला नजर देऊन सांगितलं होतं .. . ” पण माझ्या स्वप्नांचं काय बाबा? मला अजिबात व्हायचं नाहीये डॉक्टर.मी इंजिनिअरच होणार.मी तिकडेच घेणार प्रवेश. बोलू नये बाबा,पण तुम्ही माझा विचार कधी केलात का लहानपणापासून? माझी आई भक्कम उभी आहे आणि होती म्हणून मी इथपर्यंत आलो. तुम्हाला तुमच्या पूजाशिवाय दुसरं जग आहे का? ती करील हं तुमची स्वप्नं पुरी. मी नाही तुमच्या अपेक्षा पुऱ्या करणार !” प्रसाद तिथून निघूनच गेला.आपल्या या मुलाकडे  उमेश बघतच राहिला.असं आजपर्यंत त्याला कोणी बोलले नव्हते. मोहिनी हे सगळं ऐकत होतीच.

ठरल्याप्रमाणे प्रसादने इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतली आणि तो  गेला कानपूरला.आता उमेशने आपलं सगळं लक्ष पूजावर केंद्रित केलं. तिचं एक वेळापत्रकच आखून दिलं. स्वतः तिच्याबरोबर अहोरात्र बसून तिची तयारी करून घेऊ लागला. सतत मनावर बिंबवू लागला ‘ पूजा,तुला डॉक्टर व्हायचंय. इतके इतके मार्क्स पडलेच पाहिजेत तुला.’  पूजा जिद्दीने अभ्यासाला भिडली. मोहिनी हे नुसतं बघत होती. तिला पूजाची अत्यंत काळजी वाटायला लागली. पूजाचा कोंडमारा होतोय हेही लक्षात आलंच तिच्या. एकदा पूजाला तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले.आधी मोहिनी त्यांना जाऊन भेटली होती. या मुलीवर वडिलांचा असलेला प्रचंड प्रभाव तिने डॉक्टरांना सांगितला

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुखाचा चहा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ सुखाचा चहा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं. आधीच सकाळ पासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली. रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबावं लागलं नव्हतं. ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला, पत्र्याच्या शेड खाली. छोटीशी चहाची टपरी होती. तसही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं. हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता.

टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं. ते मूल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं. मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसून बघत होते. त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला. एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला. त्याचं त्यालाच छान वाटलं. समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर. चिंब पावसात धूसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले, हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला, बायकोचाच होता. त्याने कट केला. सकाळ पासून हा पाचवा फोन तिचा. काही तरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते. लग्नाला अजून चार महिने नाही झाले, पण बोअर झालं हे सहजीवन, या भावनेने त्याने फोन कट केला.

तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला. आणि तितक्यात त्या बाई कडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला. ते मुल क्षणभर थबकलं पाण्यात खेळताना. तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला, काही नाही खेळ तू. आणि तो काचा भरू लागला. तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली. तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला. एकूण चार पाच ग्लास फुटले होते, म्हणजे आजची कमाई नक्की शून्य, पण तो माणूस शांत होता. 

आता ह्याची बेचैनी अजून वाढली. ह्याला सकाळचा प्रसंग आठवला. आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो. बोललो तिला, पण ती शांत होती. ह्या वातावरणा सारखी आणि आपण ह्या चहासारखं गरम. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या. आपलं तर फारसं नुकसानही नव्हतं. पण आपण किती रिॲक्ट झालो. त्यामुळे दिवसभर देखिल आपला मूड खराब होता. आणि हा माणूस चिडण्या ऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला. खूप काही शिकल्या सारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून. तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला. वीसची नोट देताच चहावाला म्हणाला, “सर सुट्टे नाही माझ्याकडे १० रु द्यायला. तुमच्याकडे असतील तर बघा.” त्याने खिसा तपासला पण सुट्टे नव्हते. “चॉकलेट देऊ” चहावाला म्हणाला. त्यावर हसून याने नकार दिला आणि म्हणाला, “असू द्या, नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली. ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात. मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात.”

चहावाला हसून म्हणाला, “तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते. कधीतरी चूक होणारच. आपल्या कडूनही होते. फक्त आपल्याला रागावणारं कोणी नसतं. आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर अस रागवत राहिलो तर प्रेम करायचं तरी कधी? आयुष्य क्षणभंगूर आहे. होत्याचं नव्हतं कधी होऊ शकतं. आता हिलाच बघा ना, लग्नाच्या वेळी डोळस होती ती, आणि एकाएकी दृष्टी गेली. डॉक्टर म्हणाले, येईल दृष्टी परत. पण कधी ते नक्की नाही. खूप वाईट वाटलं. माझी चिडचिड होत होती. एक दिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणाली, आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा. मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे. त्या दिवसा पासून ठरवलं किती नुकसान झालं तरी तिला रागवायच नाही. माणूस नेहमी स्वतःच्या बाजूनी विचार करतो ना सर? थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येतं सगळं.”

ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं. अंध बायको असून किती शांतपणे स्वीकारलं आहे हे सगळं. आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे, अश्या अविर्भावात असतो सतत. आपली बायको सकाळी किती घाबरली होती. त्याला आठवलं. खरंतर रात्रभर पाय दुःखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती. तिला चार दिवसाच्या पाळीने अशक्तपणा येतो. मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते. पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो. त्यालाच एकदम भरून आलं. त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली, “दहा रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या. कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही. तसही कपाने महाभारत झालं म्हणता घरात, ह्या गजऱ्याने मिटवून टाका.

कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं, तर संसारात, मजा असते नाही का? इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला, तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का? साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा. अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला.”

तो बघतच राहिला त्या जोडप्याला. एकमेकांना शारीरिक गुणांनी विसंगत असलं, तरी समजून घेणारं जोडपं. आता मुलाला आंनदी होड्या बनवून देत होतं आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती. हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं. त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खूप काही मिळालं ह्या भावनेने निघाला. गाडीला किक मारताना सहजच टपरीची पाटी बघितली, त्यावर नाव होतं.. ‘सुखाचा चहा !’

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा — रमा / मेसेज ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ दोन लघुकथा — रमा / मेसेज ☆ श्री मंगेश मधुकर 

(१) रमा

तीन महिन्यांपूर्वी दोघांची लग्न जमवणाऱ्या साइटवर ओळख झाली.प्रोफाइल आवडल्यानं तिनं पुढाकार घेतला.व्हरच्युल भेटी,मेसेजेस सुरू झाले.गप्पा मारताना इंटरेस्ट निर्माण झाला.हळूहळू एकमेकात गुंतत होते आणि प्रत्यक्ष भेटल्यावर प्रेमात पडले.त्यानंतर नियमित भेटीगाठीचं नवीन रुटीन सुरू झालं.दोघं नेहमीच्या हॉटेलमध्ये भेटले.

“एक दिवस भेटलो नाही तर करमत नाही.आता एकटं रहावत नाही.”

“पुढ बोलू नकोस.सेम हिअर”ती लाजली. 

“क्या बात है.लाजताना खूप सुंदर दिसतेस.”हनवटीवर हात ठेवून एकटक पाहत तो म्हणाला.

“असं का पाहतोयेस”

“जगातला सर्वात सुंदर लाजणारा चेहरा”

“बास,मुद्दयाचं बोल.”ती लाडीकपणे म्हणाली.

“थोडावेळ थांबायचं ना.मस्त स्वप्नांच्या दुनियेत होतो.धाडकन जमिनीवर आणलसं”

“बोल ना.पुढे काय” 

“माझ्याशी लग्न करशील”गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला तेव्हा ती पुन्हा लाजली. 

“जमाना कितीही मॉडर्न होऊ दे.‘लाजणं’ अजूनही वेड लावतचं.”

“आज आई-बाबांना आपल्या लग्नाविषयी सांगते.” 

“मी पण डॅडींशी बोलतो.तसंही आपले फोन सारखे चालू असतात यावरून सगळ्यांना कल्पना आलीय.”

“आमच्याकडेही तीच परिस्थिती आहे.जावई पसंत आहे.”

“तुझा फोटो दाखवला तेव्हाच ममीनं सूनबाईना पसंत केली.” 

पुन्हा भेटल्यावर तो म्हणाला “रविवारी पुढची बोलणी करायला घरी येतो.चालेल ना.”

“पळेल.”

“अजून एक महत्वाचं”

“रमा की रीमा”

“म्हणजे.समजलं नाही”ती गोंधळली. 

“तुला कोणतं नाव आवडतं”

“अर्थात माझंच”

“तसं नाही गं.रमा की रीमा”

“रमा,मस्तयं”

“ठरलं मग,‘रमा’ हेच लग्नानंतर तुझं नाव.” तो उत्साहानं म्हणाला पण तिचा चेहरा पडला.

“म्हणजे माझं नाव बदलणार” तिनं नाराजीनं  विचारलं.”

“हो.”

“का”

“सगळेच असं करतात.”

“माझंच का तुझं नाव बदल की..” 

“जोक करतेस”तो मोठमोठ्यानं हसायला लागला.

“सुरवात तू केलीस”

“लग्नानंतर मुलींची नाव बदलतात.तशी पद्धत आहे.”

“ऐक ना.एकतर अशी पद्धत बिद्धत काहीही नाहीये आणि जरी असलीच तरी माझं नाव बदलायचं नाही”

“असं कसं!!,उगीच नको तो हट्ट करू नकोस.”

“माझं नाव मला खूप आवडतं.काहीही झालं तरी ते बदलू देणार नाही”

“हे बघ.फालतू विषय ताणू नकोस.” 

“जन्मापासून सोबत असलेलं नाव बदलणं ही गोष्ट तुझ्यासाठी फालतू असेल पण माझ्यासाठी नाही.नाव बदलणं म्हणजे आतापर्यंतची ओळख पुसून टाकणं.यामागची वेदना तुला समजणार नाही आणि तसंही माझ्या परवानगी शिवाय हा निर्णय तू घेऊ शकत नाहीस.”तिच्या बोलण्यानं तो चिडला. 

“‘रमा’ हे नाव फायनल.आता यावर चर्चा नाही”

“मी नाव बदलणार नाही.”

“विनाकारण इश्यू करतीयेस.लग्नानंतर मुलींचं नाव बदलणं हे फार कॉमनयं.” 

“नाव न बदलणाऱ्यासुद्धा खूप जणी आहेत आणि हा निर्णय पूर्णपणे मुलीच्या इच्छेवर आहे. त्यासाठी जबरदस्ती नको.तसंही माझं नाव बदललं नाही तर काही फरक पडणार नाही.”

“लोक काय म्हणतील”

“लोकांपेक्षा तू माझ्या मनाचा विचार करावा असं वाटतं.”

“विनाकारण वाद नको.”

“एकमेकांचे स्वभाव,विचार आवडले म्हणून लग्नाचा निर्णय घेतला तर आता तू………”

“वा रे वा.म्हणजे माझीच चूक.अजूनही सांगतो,विषय ताणू नकोस.आमच्या घराण्यात असलं काही चालणार नाही.”

“सोयीस्कर भूमिका घेताना त्याला प्रथा,परंपराचं नाव द्यायचं अन आमच्या घराण्यात वगैरेच्या फुशारक्या मारायच्या ही टिपिकल मेंटॅलीटीयं.”

“माझ्या बायकोचं नाव ‘रमा’ असेल हे फायनल..” 

“मी पण पुन्हा सांगते काहीही झालं तरी नाव बदलणार नाही.मान्य असेल तरच रविवारी या.नाहीतर.. ”

“काय!!!”तो जोरात ओरडला.

“ओरडू नकोस.शांतपणे विचार कर मग पुढचा निर्णय घेऊ”डोळे पुसत ती म्हणाली.पुढचे काही दिवस  अजिबात संपर्क नसल्याने त्यामुळे दोघंही प्रचंड अस्वस्थ होते.घरी कळल्यावर वडीलधाऱ्यांनी दोघांना समजावलं आणि मान्य होईल असा तोडगा काढला.मनातली काजळी दूर झाली.मनापासून प्रेम असल्यानं दोघांनीही आपापला हट्ट सोडला अन तीन महिन्यांपूर्वी ‘लग्न’ थाटामाटात पार पडलं.प्रेमाच्या सारीपटात आपल्या माणसासाठी केलेली तडजोड प्रेमाची लज्जत वाढवते.ती जिंकली पण तो सुद्धा हरला नाही. तिनं नाव बदललं नाही पण तो मात्र बायकोला ‘रमा” म्हणतो अन तिलाही ते आवडतं.

लेखक : मंगेश मधुकर     

==========================================================

(२) मेसेज

रोजच्याप्रमाणे नाश्ता करत असताना रेणू केक घेऊन आली.ते पाहून बाळूनं विचारलं 

“हे काय गं”

“बाबा, रिक्षा ड्रायव्हिंगला आज पंचवीस वर्षे झाली म्हणून सेलिब्रेशन..”

“कशाला उगीच खर्च..”

“पोरीची हौस आहे तर करू द्यात की…..”बायको. 

“पै न पै महत्वाचीय.अजून लेकीचं लग्न करायचयं.”केक कापत असतानाच राईड बुकिंगचा मेसेज आला.जवळचं पिकअप असल्यानं  बुकिंग कन्फर्म करून बाळू रिक्षा घेऊन निघाला.पहिल्या कस्टमरला सोडल्यानंतर लगेचच बुकिंग मिळत गेली.बाळू सलग ड्रायव्हिंग करत होता नंतर लांबचं भाडं नसल्यानं थांबावं लागलं.जवळच्या ठिकाणची होती म्हणून तीन बुकिंग बाळूनं नाकारली.अखेर मनासारखं लांबच्या ठिकाणचं बुकिंग आलं.कन्फर्म केल्यावर लगेच कस्टमरचा फोन “दादा,कुठं आहात.रिक्षा बुकिंग केलंय.येताय ना”

“पाच मिनिटांत पोचतो.ट्राफिकमध्ये आहे.”बाळू. 

“लवकर या ”कस्टमरनं फोन कट केला.पोचल्यावर बाळूनं फोन केला “सर,बिल्डिंगच्या गेटसमोर उभायं”

“ओके,आम्ही खाली येतोय परंतु पाच मिनिटं थांबावं लागेल.मिसेस तयारी करतीये.झालं की येतो”

बाळू वाट पाहत थांबला.दहा मिनिटांनी पुन्हा कस्टमरचा फोन “सो,सॉरी!!आमच्यामुळे तुम्हांला थांबांव लागतेय”

“जरा लवकर.”

“असं करा.बुकिंगप्रमाणे एकशे ऐंशी होतात.मी तुम्हांला दोनशे ऑनलाइन ट्रान्सफर करतो”

“त्याची गरज नाही.तुम्ही या” बाळू.

“दादा,आमच्यामुळे तुमचा बराच वेळ वाया गेला.मिसेसची आवराआवर अजून किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. म्हणून मी दोनशे रुपये पाठवलेत ते जमा झाले का तेव्हढं चेक करा.”बाळूच्या मोबाईलवर दोन हजार जमा झाल्याचा मेसेज आला होता. एवढे पैशे कशाचे? असा विचार डोक्यात असताना पुन्हा कस्टमरचा फोन आला. 

“साहेब आलात का?कुठे आहात”बाळूनं विचारलं.  

“अजून थोडा वेळ लागेल”

“तुम्ही भाड्याचे पैसे आधीच दिलेत तेव्हा नाईलाजये.या!!”

“दादा,एक घोळ झालाय..”

“आता काय झालं??”बाळू वैतागला.

“मी चुकून तुम्हांला दोन हजार पाठवलेत.”

“चुकून म्हणजे”

“अहो,दोनशेच्याऐवजी दोन हजार ट्रान्सफर झालेत.”

“मग”

“आम्ही येईपर्यंत मी पाठवलेले जास्तीचे पैसे परत पाठवा.प्लीज..”

“हंssम,बघतो.”

“पैसे जमा झाल्याचा मेसेज बघून खात्री करा मगच ट्रान्सफर करा”

“हा,मेसेज आलाय”

“गुड,आधी आठशे पाठवा ते मिळाले की पुढचे हजार पाठवा आणि पुन्हा एकदा सॉरी.खूप त्रास देतोय”

“जाऊ द्या.नुसतं सॉरी म्हणू नका.लवकर या.पैसे पाठवतो”कस्टमरनं सांगीतल्याप्रमाणे बाळूनं आधी आठशे मग एक हजार ट्रान्सफर केले.पैसे ट्रान्सफर केल्याचे सांगण्यासाठी कस्टमरला बाळूनं फोन केला तर लागला नाही.पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण फोन बंदच येत होता.चालू असलेला फोन अचानक बंद झाल्यानं बाळूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.बँकेत फोन केला तेव्हा समजलं की खात्यात जमा काहीच नाही मात्र अठराशे रुपये वजा झाले होते.गोड गोड बोलून कस्टमरनं केलेली फसवणूक लक्षात आल्यावर संतापलेला बाळू बिल्डिंगच्या आत गेला पण शोधणार कोणाला??फक्त कस्टमरचा मोबाईल नंबर होता आणि तोही बंद.थोडावेळ बिल्डिंगच्या इथं घुटमळून निराश,हताश आणि चिडलेला बाळू कष्टाचे पैसे गेल्यानं प्रचंड अस्वस्थ होता.डबल खात्री करण्यासाठी बँकेत गेला.मेसेज दाखवला पण बँकवाल्यांनी कानावर हात ठेवले.घडलेला प्रकार कळल्यावर बायकोनं कस्टमरला शिव्यांची लाखोली वाहिली आणि बाळूलाही अतिशहाणपणाबद्दल सुनावलं.

संध्याकाळी कामावरून आल्यावर वडलांना घरात पाहून रेणूला आश्चर्य वाटलं.“बाबा.आत्ता यावेळेला चक्क घरी!!”बाळू काहीच बोलला नाही पण पडलेल्या चेहऱ्यावरून काहीतरी घडल्याचं रेणूच्या लक्षात आलं.सगळी हकीकत समजल्यावर ती म्हणाली 

“जे झालं ते झालं.सोडून द्या.जास्त विचार करू नका”

“पैशा परी पैशे गेले वर फालतूचा डोक्याला त्रास..”

“आपण पोलिसांकडे जाऊ”

“तक्रार कोणाविरुद्ध द्यायची”

“सायबर सेलची मदत घेऊ” 

“नको.उगीच नसती लफडी नकोत.अठराशे रुपये अक्कलखाती जमा करून गप्प बसू”

“ हा फसवण्याचा नवीन प्रकार आहे. तक्रार करायलाच पाहिजे.मोबाईल नंबर आणि ज्या अकाऊंटला पैसे गेले असतील तिथून काहीतरी मिळेल.पोलिस मदत करतील.”

“एक कळत नाहीये.भामट्यानं पैसे पाठवले नाहीत मग दोन हजार जमा झाल्याचा मेसेज कसा काय आला”

“एकदम सोप्पंयं”

“आ!!काय बोलातियेस” बाळूला रेणूकडून असं उत्तर अपेक्षित नव्हतं.  

“मेसेज आल्यावर तुम्ही काय पाहिलं ”

“दोन हजार जमा झाले एवढंच”

“सर्रासपणे लोक किती पैसे जमा झाले एवढचं बघतात.कधी आले,कोणत्या खात्यावर जमा झाले हे तपासत नाही”

“आता मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला म्हणजे माझ्याच खात्यावर पैसे आले ना”बाळू. 

“तिथंच तर भामट्यानं चलाखी केली”

“त्याच्याकडचा दोन हजार जमा झाल्याचा जुना मेसेज पाठवला अन तुम्हाला वाटलं की…..,”

“असं फसवलं होय.माझ्या मूर्खपणामुळे नुकसान झालं” 

“बहुतेकजण असंच वागतात.मेसेज आल्यावर बँकेत किती क्रेडिट आणि डेबिट झाले एवढंच बघितलं जाते.अकाऊंट नंबर पाहीला जात नाही.सवयीचा परिणाम!!.”

“आता काय करायचं”

“आधी तक्रार करू आणि इथून पुढे पैशाचे व्यवहार काळजी घ्यायची.एवढी एकच गोष्ट आपण करू शकतो.” 

“फुकटचा अठराशेला बांबू….”

“जाऊ दया.त्यावर आता जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नका” बराच वेळ बायको आणि लेकीनं समजावल्यावर बाळूची उलघाल कमी झाली तरी शेवटचा ट्राय म्हणून त्यानं पुन्हा एकदा त्या कस्टमरला फोन केला पण नंबर स्वीच ऑफ होता. तितक्यात मोबाईलवर नवीन मेसेज आला “अभिनंदन!!तुम्हाला पन्नास हजाराची लॉटरी लागली आहे.पैसे पाठविण्यासाठी सोबत दिलेली लिंक ओपन करून माहिती द्या”मेसेज वाचून बाळूनं कपाळावर हात मारला

— (सत्यकथेवर आधारित) 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अत्रंगी… लेखक : रवीकिरण संत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ अत्रंगी… लेखक : रवीकिरण संत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

तीन हा माझा अत्रंगी आतेभाऊ! वयाने माझ्याहून चार वर्षे लहान. बालपण त्याने आणि मी पुरेपूर एन्जॉय केले. आमची जाॅइंट फॅमिली नव्हती, पण घरे जवळ होती. त्यामुळे बरेचदा एकत्र रहाणे,जेवणे व्हायचे.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे त्याचे उद्योग आम्हाला चढत्या क्रमाने पहायला मिळाले. घरातील वातावरण बऱ्यापैकी धार्मिक. संध्याकाळी नितीन दिवेलागणीला हातपाय धुवून देव्हाऱ्यासमोर हात जोडून ‘शुभंकरोती’ म्हणायचा. कारण ह्यामुळे देव चांगली बुद्धी देईल, असे आत्याने त्याच्या मनावर बिंबवले होते.

नितीन अजिबात अभ्यास करत नसे. पहिलीत असताना सहामाही परीक्षेत नापास झाला, म्हणून आत्याने त्याला चांगलेच बदडले. त्यानंतर रात्री निजानीज झाल्यावर स्वयंपाक घरातून खलबत्त्याने कुटण्याचा आवाज येऊ लागला. आत्याने उठून, दिवा लावून पाहिले, तो काय, हा देव्हाऱ्यातल्या देवांना खलबत्त्यात घालून कुटत होता !

“अरे हे काय करतोस?” असे आत्याने विचारल्यावर ,” ह्यांचं इतकं केलं,पण काही जाण आहे का बघ! ” हे आत्याने नणंदाना कधीतरी उद्देशून बोललेले वाक्यच त्याने चपखलपणे तिला ऐकवले.

व्हा नितीन सात वर्षांचा झाला, तेव्हापासून जास्तच मस्ती करू लागला. माझी आत्या त्याच्या उपद्व्यापांनी हैराण व्हायची. त्यावरून त्याला ओरडाही मिळे. एकदा तो आत्याला म्हणाला,” आई, तूझ्या अशा आरडाओरड्याने चाळीत मला वेडीचा मुलगा म्हणतात!” ह्यावर आत्याला हसावे की रडावे हे कळेना.

तो चौथीत असताना, १९७० सालच्या १४ नोव्हेंबरला शाळेत बालदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. एकामागून एक मुले चाचा नेहरूंबद्दल भरभरून बोलत होती. पण नितीनचे भाषण हे स्वयंभू होते. नितीन बोल्ड तर होताच, पण सभाधीटही आहे हे मला त्यावेळी कळले. मी तेव्हा आठवीत होतो.        नितीन स्टेजवर उभा राहिला. एक नजर सर्वांवर फिरवून तो बोलू लागला –

“आज मी आपल्या सर्वांचे लाडके चाचा नेहरू यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे.

चाचा नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबरला झाला. त्यांना मुले फार आवडायची. मुले दिसली की सर्व कामे सोडून ते मुलांत खेळत बसायचे. ते मोठे असल्यामुळे मुलेही त्यांना चाचा चाचा असे म्हणायची.

ते मुलांची खूप मस्करी करीत,” पुढे नक्कल करत नितीन सांगू लागला –

“चाचा त्यांना जीभ काढून वेडावून दाखवत.

त्यांचे केस ओढत.

त्यांचे गालगुच्चे घेत.

त्यांना टपला मारीत.

त्यांचे नाक ओढत.

त्यांच्या पोटाला चिमटे काढत.

त्यांच्या काखेत गुदगुल्या करत.

त्यांचे कान ओढून लांब करत.

त्यांना उचलून सूर्याची पिल्ले दाखवत.”

– – अशा रीतीने स्वतः करत असलेले सर्व चाळे तो नेहरूंच्या नावावर खपवू लागला तसतसे सर्व शिक्षक खो खो हसू लागले.हसण्याच्या गदारोळात आम्हाला पुढचे महत्त्वाचे मुद्दे ऐकूच आले नाहीत!

नितीनला बक्षीस मिळाले नाही, पण पुढचे बरेच दिवस ते भाषण आठवून सर्वजण, विशेषतः शिक्षक हसत होते.

त्यानंतर तो पाचवीत असताना १ ऑगस्टला टिळक पुण्यतिथीनिमित्त शाळेने वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. गतवर्षीच्या अनुभवानंतर एक अट ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांनी स्पर्धेसाठी  घातली होती, ती म्हणजे कोणीही भाषणात शेंगा-टरफले आणि संत-स न त-सन्त हे शब्द जरी आणले तर याद राखा, इतर काहीही चालेल. याला कारण असे होते की बहुतेक सर्व मुले हेच किस्से अगदी अजीर्ण होईपर्यंत सांगत.

त्यामुळे प्रथमच मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’सारखा अग्रलेख वगैरे नवी माहिती मिळाली.

मग नितीनचा भाषणासाठी नंबर आला. नेहमीच्या सहजपणे त्याने “लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली ह्या गावी झाला,”अशी दमदार सुरवात केली. – –  ” टिळकांची आई त्यांना रोज जेवणाचा डबा द्यायची. पण काही मुलांच्या आयांनी एकदा तो दिला नाही. मग त्या मुलांना खूप भूक लागली. शेवटी नाईलाजाने शाळेबाहेर गाडी लावून बसणाऱ्या भय्याकडून ते काही खाण्याच्या वस्तु घेऊन आले. त्या कोणत्या ते मी तुम्हाला सांगणार नाही.(असे म्हणून त्याने एकदा ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांकडे पाहिले.) त्या वस्तू खाल्ल्यावर साहजिकच वर्गात कचरा झाला. सरांनी ‘हा कोणी केला’, असे दरडावले. कोणीच कबूल करेना, तेव्हा त्यांनी सर्वांना छडीने मारायला सुरवात केली. टिळकांपाशी येताच ‘मी तर डबा आणला होता’ असे म्हणून आपला रिकामा डबा त्यानी दाखवला व छडी घ्यायला नकार दिला. तसेच ‘इकडे तिकडे लक्ष न देता जेवण खाली मान घालून जेवावे अशी आईची शिकवण आहे म्हणून मी कचरा करणाऱ्यांकडे पाहिलेही नाही’ असेही ते म्हणाले.”

पुढे तो सांगू लागला, “एकदा मराठीच्या तासाला निबंध लिहीत असताना एकच शब्द तीन वेळा आला. तो कोणता हे मी तुम्हाला सांगणार नाही.( इथे पुन्हा एकदा नितीनने ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांकडे पाहिले तर ते रागाने थरथर का कापताहेत हे त्याला कळेना ) पण टिळकांनी तीनही वेळेला तो वेगवेगळ्या प्रकाराने लिहिला. तेव्हा त्यांचे सर रागावले आणि त्यांनी फक्त पहिला बरोबर ठरवून पुढचे दोन शब्द चुकीचे ठरवले. पण टिळकांनी विक्रमादित्यासारखा आपला हट्ट सोडला नाही. ते म्हणाले, ” जर माझे पुढचे दोन शब्द चुकीचे असतील, तर माझ्या डोक्याची शंभर छकले होऊन माझ्याच पायावर लोळू लागतील.” यावर सरांनी पाच मिनिटे वाट पाहिली. पण तसे काही न झालेले पाहून पुढचे दोन्ही शब्द बरोबर ठरवले. तर मुलांनो, यातून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद.”

यावेळीही त्याला बक्षीस मिळाले नाही. पण त्यानंतर त्याच्या भाषणाला सर्व शिक्षक आवर्जून हजेरी लावू लागले.

नितीन नेहमी ऐकीव गोष्टीत आपला मालमसाला मिसळून ठोकून भाषण करीत असे. 

सातवीत असताना एकदा तर त्याने कहरच केला आणि त्यानंतर त्याची शाळेत मुख्याध्यापकांनी यथेच्छ धुलाई केली.

त्याचे असे झाले की २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.

नितीनने, “अध्यक्ष महोदय, उपस्थित गुरूवृंद आणि वर्गमित्रांनो,” अशी छान सुरुवात केली.

महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबरला पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना आदराने बापूजी म्हणायचे. ते अभ्यासात हुशार होते.  वकिली परीक्षा पहिल्या फटक्यात पास झाले.

त्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात होता. इंग्रजांचे राज्य होते. इंग्लंडच्या कारखान्यात बनलेल्या वस्तूंनी बाजार भरले होते. अशावेळी बापूजींनी गावोगाव हिंडून स्वदेशीचा प्रचार केला. पॅण्ट- शर्ट घालणे सोडून ते फक्त पंचा वापरू लागले. एका हातात काठी आणि कमरेला पंचा अशी त्यांची मूर्ती पायी फिरून जनजागृती करू लागली. पंचाचा एक फायदा असा की प्रवासात सामानाचे ओझे नको. आंघोळ केली की आदल्या दिवशी घातलेल्या पंचाने अंग पुसायचे मग तो ओला झालेला पंचा वाळत टाकायचा आणि दुसरा वाळलेला गुंडाळला की झाले!   

लोकांना त्यांनी निर्भय होऊन इंग्रजांशी सामना करा, पण अहिंसा पाळा असे सांगितले. इथे लोक थोडे विचारात पडले, की मग काठी कशासाठी? बर्‍याच विचाराअंती लोकांच्या लक्षात आले की रात्री- अपरात्री फिरताना जर भटकी कुत्री मागे लागली तर त्यांना हाकलण्यासाठी ते योग्य साधन होते. 

बापूजी नेहमी बकरीचे दूध पित. कारण सतत बाहेर राहिल्यामुळे घरची गाय त्यांना ओळखेनाशी झाली. ते दूध काढण्यासाठी समोरून गेल्यावर ती शिंगे उगारू लागली व पाठीमागून गेल्यावर लाथा झाडू लागली. मग कंटाळून त्यांनी बकरीच्या दुधाचा पर्याय निवडला. 

आता भाषण ऐकणार्‍या शिक्षक वृंदात थोडी चुळबुळ सुरू झाली. मुख्याध्यापक अस्वस्थपणे ह्या हातातील वेताची छडी त्या हातात फिरवू लागले. आणि अचानक नितीनने बाॅम्ब टाकला !

” गांधीजींना दोन पत्न्या होत्या, एक कस्तुरबा आणि दुसरी विनोबा…” नितीनचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत चार ढेंगात मुख्याध्यापक त्याच्यापर्यंत पोहोचले. सपकन् वेताची छडी त्याच्या पायावर बसली. तसा तो कळवळून खाली बसला. पुढे त्याची यथेच्छ धुलाई झाली. पालकांना बोलावण्याचे फर्मान सुटले. 

नंतर त्याला कोणत्याही विषयावर भाषण करण्याची मनाई केली गेली, असे कळले.

पुढे मी SSC होऊन काॅलेजला गेलो. त्यानंतर इंजिनीअर होऊन नोकरीसाठी बाहेरगावी गेलो. नितीनच्या भेटी कमी झाल्या. माझ्या लग्नाला मात्र तो आत्यासह आला होता. पुढे तोही B.Com होऊन महाराष्ट्र बँकेत नोकरीला लागल्याचे कळले. 

एकदा गणपतीत १० दिवसांची सुट्टी घेऊन घरी आलो असता नितीनच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे कळले. मी लगोलग आत्याच्या घरी गेलो. तेथे आत्या चार- सहा मुलींचे फोटो व माहिती घेऊन बसली होती. ती शनिवारची दुपार होती. नितीनचे वडील ऑफिसातून घरी आले नव्हते. नितीनला सेकंड सॅटरडेची सुट्टी होती. घरात आत्या, नितीनची आजी आणि नितीन ह्यांच्याबरोबर मीही फोटो बघण्याच्या कार्यक्रमात सामील झालो.

त्यातील एक मुलगी फोटोवरून नितीन आणि आत्याला आवडली. तिची माहितीही चांगली वाटली. कुणास ठाऊक, पण नितीनच्या आजीला ती फारशी आवडल्याचे दिसले नाही. आत्या सांगू लागली, 

 “मुलगी गोरीपान आहे.”

 ” रंग काय चाटायचाय?”आजी उत्तरली.

” मुलीचे डोळे किती सुंदर आहेत!”

 “डोळे काय चाटायचेत ?” आजी नाक मुरडत म्हणाली.

 ” मुलीकडे फर्स्ट क्लास डिग्री आहे.”

” डिग्री काय चाटायचीय?” आजी तिरसटपणे म्हणाली.

आता मात्र नितीनचा संयम सुटला. वळून तो म्हणाला, ” आज्जी, नक्की काय चाटायचं असतं, ते जरा सांगशील का?” 

या अनपेक्षित प्रश्नाने आजी कावरीबावरी झाली.

पण लगेच माझ्या आत्याने पुढे सरसावत त्याच्या साटकन् कानाखाली वाजवली आणि तिथून चालते व्हायला सांगितले. 

मी हळूच काढता पाय घेतला. माझ्यामागून नितीनही गाल चोळत बाहेर पडला. रस्त्यात मला म्हणाला, ” दादा, पुढे बायकोसमोरही आई मला असेच मारेल का रे?” 

मी गंभीरपणे म्हणालो,

” पुरुषाची कधीही मारापासून सुटका नसते. शहाणा असेल तर शब्दाने, मूर्ख असेल तर व्यवहारात, नेभळट असेल तर समाजात आणि चावट असेल तर असाच कधीतरी मार तो खातो.”

“दादा, तू यातल्या कोणात बसतोस?” नितीनने मौलिक प्रश्न केला, पण मला उत्तर द्यायचे नव्हते !

लेखक :श्री. रविकिरण संत

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares