मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीची जाणीव… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीची जाणीव ☆ शीला पतकी 

अगदी बरोबर आहे. आपण करतो त्या मदतीची जाणीव समोरच्यांनी ठेवावी अशी साधारण अपेक्षा आहे. पण 90% लोकांना ही जाणीव नसते दहा टक्के माझ्यासारखे पामर फार जाणीवपूर्वक यावर काम करतात.

1989 साली तडवळकर ट्रस्ट या संस्थेची मी स्थापना केली. त्यापूर्वी एक वर्ष मी त्यासाठी रक्कम गोळा करीत होते. कोणी 50 कोणी शंभर पुढे 200 अशी रक्कम माजी विद्यार्थिनी, पालक, हितचिंतक यांच्याकडून मिळत होती. मी दरवर्षी दिवाळीत या सगळ्या देणगीदारांना शुभेच्छापत्र म्हणजे एक दहा पैशाचं कार्ड टाकत असे. पुढे त्याची किंमत एक रुपया झाली. बऱ्याच लोकांचे पत्ते वगैरे बदलले आणि कार्डही बंद झाली. डिजिटल जमाना आला. तेव्हा कोणाकडे फोन नव्हते आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे पण त्यांचे नंबर आमच्याकडे नाहीत. त्यामुळे ती गोष्ट थांबली… पण 51 रुपये देणाऱ्या माणसाला सुद्धा दिवाळीत तडवळकर ट्रस्टचे उत्तम मजकूर तयार करून दिलेलं ते कार्ड जात असे आणि हे कार्ड लिहिण्याचं काम माझी नापास शाळेतली मुलं करायची. पुढे पुढे त्या सगळ्याच लोकांना त्या कार्ड वरचा नाविन्यपूर्ण मजकूर वाचायची सवय लागली. पत्र जाणं बंद झालं त्यावेळेला कित्येक लोकांनी भेटून मला विचारलं ‘ दिवाळीतलं तुमचं कार्ड खूप छान असायचं कारण आमच्या घरी एकमेव येणार ते शुभेच्छांचे कार्ड होतं आणि ते आपण दिलेले 51 रुपये तुम्ही सार्थकी लावले. ‘ असं ते म्हणत असत.

जुनी गिरणी बंद असल्यामुळे आमच्या शाळेमध्ये जुन्या गिरणीतील कामगार वर्गाच्या मुलांचे पैसे म्हणजे एसएससी बोर्डाची वीस रुपये फी दयानंद महाविद्यालयाने भरली. त्या वेळेला वीस रुपयेही नव्हते. तीच कृतज्ञता म्हणून मी कितीतरी विद्यार्थ्यांची फी भरते. शाळेत असतानाही भरत होते, आताही देते. मला जागेची गरज होती कारण वडील खूप आजारी होते, वाड्यात निभाव लागणे अवघड होते तेव्हा सर्व मैत्रिणींनी मला मदत केली आणि राजेश्वरी आपटे हिने तर आपली विद्यानगर मधील जागाच मला देऊ केली.. अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये मी ती जागा घेतली, तेही दोनशे रुपये हप्त्याने.! पण आजही मी त्या मदतीबद्दल कृतज्ञ!!

लहानपणी आम्हाला मोफत शिकवणारे इटाई गुरुजी होते. ते चौपाडात रहात. ते गरीब किंवा हुशार, बऱ्याच विद्यार्थ्यांना घरी बोलवून फुकट शिकवत असत आणि दसऱ्याला आणि संक्रांतीला पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अर्धी पेन्सिल आणि वरच्या विद्यार्थ्यांना पूर्ण पेन्सिल भेट देत. आजही इटाई सरांनी दिलेली पेन्सिल आठवते किंवा मोफत शिकवणी वर्ग सुरू केला तेव्हा मला ईटाई सरांचीच आठवण झाली किंबहुना मी त्यांचाच वारसा पुढे चालवते असे वाटते.

आमच्या नगरपालिकेच्या दवाखान्यात शांताबाई सरोदे नावाच्या एक महिला ड्रेसर होत्या. जखमा वगैरे बांधणे त्यांचं काम. मी त्यांना म्हटलं “ मला डॉक्टर व्हायचंय, मला हे सगळं काम शिकवाल का ? “

मला वाटायचं डॉक्टर म्हणजे सगळं काम आलं पाहिजे ना! त्यांनी मला ड्रेसिंग करायचे, टॉन्सिल बोळा घशात फिरवायचा, कानामध्ये औषध टाकायचे, अशी अनेक कामं शिकवली. सुट्टीत मी त्यांच्या दवाखान्यात त्यांच्याबरोबर काम करत असे. त्या त्यांच्या नातीसाठी माझ्या नापास शाळेत प्रवेशाला आल्या. मी त्यांना खूप आश्वासक गोष्टी सांगितल्या.. ‘ तुमची नात नक्की पास होणार ‘ याचा दिलासा दिला. त्यांची फी बरीच कमी घेतली आणि त्यांची नात उत्तम मार्काने माझ्याकडून पास झाली.. ही कृतज्ञताच होती.

आमच्या वाड्यातल्या मालकिण बाई , हुंडेकरी वहिनी.. आम्ही त्यांच्या घरी अभ्यासाला जात असू.. म्हणजे अगदी शेजारच्या वाड्यात. वरच्या त्यांच्या एका खोलीत अभ्यास करताना त्या मधूनच आम्हाला खायला आणून देत, कधी कधी एक वाजता त्यांच्या मिस्टरांबरोबर आम्हालाही गरम भाकरी करून जेवायला घालत. आजही मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे आणि हे वेळोवेळी आमच्या कृतीतून आम्ही त्यांना जाणवून नदिले होते.

मात्र लोकांची मदत केल्यानंतर विसरून जाण्याची भावनाही अलीकडे जास्त प्रगल्भ झाली आहे… ‘मग त्यात काय झालं? केली असेल मदत’… हा भाव असतो. मदत केल्यानंतर विसरून जाणारी अनेक मंडळी मी आजही पाहते आहे.

माझा एक विद्यार्थी आहे. त्याला आई नसल्यामुळे प्रेमाचा भुकेला होता. शिक्षकांमध्येच आई पाहायचा. नापास झाल्यामुळे घरात जरा त्रास होता. घरातून लवकर निघून येऊन ट्रस्टमध्ये बसायचा. हळूहळू अभ्यास चांगला करायला लागला. हुशार होताच पण घरच्या वातावरणाने थोडासा भटकला होता. आमच्या ट्रस्टमधील शिक्षकांकडून त्यांना आईची माया मिळाली. माझ्याशी बोलण्यासाठी तर तो धडपडत असे. फर्स्टक्लासमध्ये पास झाला, ग्रॅज्युएट झाला. सध्या सोलापूरच्या कोर्टात नोकरीला आहे.. खूप छान झाले. जेवणाच्या सुट्टीत मधूनच केव्हातरी येऊन भेटून जातो. आता तो 40 च्या आसपास आहे पण आठवणीने येतो.. केवळ कृतज्ञतेच्या जाणिवेतून…

‘जाणीव’ नावाची गोष्ट जर टोकदार असेल ना तर माणसं कृतज्ञता व्यक्त करतात. नाहीतर त्यात काय झालं असं म्हणून सोडून देतात. मी माझे परवा प्रकाशित झालेले पुस्तक एका शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेसाठीच पाठवले… कोणतेही शुल्क न घेता. विचार केला की एका शाळेत पाठवल्यामुळे तो विचार अनेक शिक्षकांपर्यंत जाईल. माननीय मुख्याध्यापकाने साधी पोच सुद्धा दिली नाही कि फोन सुद्धा केला नाही की तुमचं पुस्तक मिळाले आहे. माझ्या मनात ती गोष्ट फार रुतून राहिली. माझ्या एका मैत्रिणीचे वाक्य मला आठवले.. ‘ मॅडम पुस्तक कुणालाही मोफत द्यायचे नाही. ‘.. तिचे नाव वसंती.

– – अगदी खरे आहे मोफत देणे, मदत करणे याला आजच्या जमान्यात काही अर्थ उरला नाही हे खरे आहे. मी वासंतीच्या मताशी सहमत आहे.

– – तरीही माझ्या बाबतीत जी जाणवलेली उदाहरणं होती ती मी या ठिकाणी लिहिली आहेत. आपल्यालाही असे अनुभव आले असतील आपण इथे मांडावेत.

सकाळी सकाळीच हा खूप सुंदर विचार सुचला – मांडावासा वाटला, कारण हा विचार इतकाही छोटा नाही… तो सरकारी यंत्रणेपर्यंत जाऊन पोहोचायला हवा… जिथे फुकट्यांचे राज्य आहे तिथे ते फुकटे अक्षरश:झालेले आहेत.. असो.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओटी अधिक मासातील — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? मनमंजुषेतून ?

☆ ओटी अधिक मासातील — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

अधिक महिना सुरू झाला आणि त्याचं माहात्म्य सांगणारे वेगवेगळे लेख सोशल मिडियावर धबाधबा कोसळू लागले आहेत. या अधिक महिन्याचं एक वेगळेपण म्हणजे या महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी असं म्हणतात. इतर वेळी कधीही मुलगी आईची ओटी भरत नाही. हं, आता ओटी भरायची म्हणजे ती खण-नारळ, साडी/वस्त्र

अशी जगरहाटी. मग ती सवाष्णीनी आणि सवाष्णीचीच/देवीची भरायची अशी आपली परंपरा.

पण ओटी भरणं म्हणजे केवळ सौभाग्याचा सन्मान एवढाच अर्थ अभिप्रेत आहे का? तर नाही. स्त्रीच्या मातृत्वाचा आणि सृजनतेचाही सन्मान करण्याची ही परंपरा आहे. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे. मग ती आई प्रत्यक्ष जन्म देणारीच असली पाहिजे असं नाही, तिच्या मातृत्व भावनेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी ही संधी आहे, असं मला वाटतं. याआधी माझ्या आईची शब्दरूप ओटी मी सादर केली होती.

आजही अशीच शब्दरूप ओटी भरणार आहे… मातृसमान माझ्या सासूबाईंची.

 सुमारे ३३ वर्षांपूर्वी लग्न होऊन मी सासरी आले. पण आजपर्यंत एकही दिवस माझ्या सासूबाईंनी मला सून म्हणून वागवलं नाही. आमचं नातं माय-लेकीचंच राहिलं. बऱ्याच घरात सुनेच्या आगमनानंतर स्वैपाकघराला युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त होतं. आता कोणत्याही दोन घरातील स्वैपाकाच्या पद्धतीत फरक हा असतोच. नव्याने आपल्या घरात आलेल्या सुनेला स्वैपाकाची नवीन पद्धत लगेच कशी स्वीकारता येणार?

तर आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरची एकूण सगळी मंडळी तर मूळ मध्यप्रदेशातील आणि मी महाराष्ट्रात वाढलेली. मला स्वैपाक येत होता. पण दोन्हीकडच्या पद्धतीत खूपच फरक. आमच्याकडे घडीची पोळी, यांच्याकडे टम्म फुगलेले गरम-गरम फुलके.

सालासहित मुगाच्या डाळीचं वरण जास्त आणि तुरीचं वरण केलं तरी ते चिंच/कोकम आणि गूळ न घालता. म्हणजे हे आपलं रोजच्या जेवणातला उदाहरण. दीर आणि सासऱ्यांना आंबटगोड भाजी-आमटी अजिबातच चालायची नाही. पण सासूबाई म्हणायच्या तू त्यांची भाजी-आमटी वेगळी काढून ठेव आणि बाकीच्यात घाल चिंच-गूळ, आम्हाला चालेल.. म्हणजे त्या आणि नणंद.

माझं लग्न झालं तेव्हा सासरेही नोकरीत होते. आम्ही दोघं, दीर, नणंद आणि सासूबाई, अशी सहा माणसं घरात. एकावेळी ४०-४० फुलके लागायचे. नणंदेला आणि मला एकत्र फुलके करायला लावून मला त्यांनी ते सहज शिकवले. तसेच इतर वेगळे पदार्थही.

लग्नानंतर चारच महिन्यांनी मला प्रमोशन मिळालं. माझी बदली वसईला झाली. डोंबिवली ते वसई.. व्हाया दादर जायचं म्हणजे येऊन – जाऊन, पाच तास प्रवासात जाणार… डोंबिवलीहून दादरला उतरायचं आणि मग पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलने, वसईला जायचं. प्रमोशन स्वीकारायचं की नाही, मी दुविधेत पडले होते. माझ्या आई-वडिलांचाही नकारच होता. नुकतंच लग्न झालेलं, त्यामुळे मी आधी घरात स्थिरस्थावर व्हावं असं त्यांना वाटत होतं. पण माझ्या सासू-सासऱ्यांनी मला सांगितलं, प्रवास त्रासदायक आणि वेळखाऊ आहे, तो तुला झेपेल का? हा विचार करून काय ते ठरव. बाकी घरातली काही जबाबदारी तुला घ्यावी लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. मी प्रमोशन स्वीकारलं. पोळ्यांना बाई ठेवली. मी घरातून सकाळी साडेसातला बाहेर पडायचे आणि रात्री आठच्या सुमारास घरी परतायचे. सकाळी आई माझा डबा सुद्धा भरून द्यायच्या. रात्री आल्यावर तर स्वैपाक झालेलाच असायचा. मागची आवरा-आवर तेवढी मी करायचे. कधीकधी मी खूप थकलेय असं दिसलं तर आई म्हणायच्या, राहू दे मी बघते ते. झोप तू, परत सकाळी उठून धावायचंय तुला!

… किती जणींना हे भाग्य लाभतं हो? असे तब्बल तेरा महिने काढले आणि मग माझी बदली डोंबिवलीला झाली.

दोन वर्षांनी मी गरोदर असतानाच माझे वडील गेले. त्यावेळीही त्यांनी मला खूप आधार दिला. माझ्या आईला पार्किन्सन होता. त्यामुळे माझं बाळंतपण सासरीच झालं. अर्थात माझ्या बहिणींनीही खूप मदत केली. पण त्याही नोकरी करणार्‍या आणि त्यांना त्यांचेही संसार होतेच, त्यामुळे मदतीला थोडी मर्यादा होती. आईंनी सगळं खूप मायेनं केलं, माझं आणि नातवाचंही.

सासरी थोडं धार्मिक वातावरण होतं. पण आई-दादांनी मला कधीच कोणत्या गोष्टीची जबरदस्ती केली नाही. किंवा अमुक एक पूजा आहे, तर मी सुट्टी घ्यावी अशी अपेक्षाही ठेवली नाही. काहीवेळा कार्यालयीन जबाबदारीमुळे रजा घेणं शक्य नसायचं, पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही.

दिराचं लग्न झाल्यावर आम्ही वेगळे झालो. पूर्वेला घर घेतलं. दोन्ही घरं म्हणजे दोन टोकं होती. पण मनात कधी अंतर निर्माण झालं नाही. रोज मी लेकाला पाळणाघरात ठेवायचे. पण माझ्या अडीअडचणीला आई-दादा कायम हजर असायचे. लेकाच्या तब्येतीच्या लहान-सहान तक्रारींसाठी मला कधी फारशी रजा घ्यायला लागली नाही. त्या माझ्याकडे येऊन राहायच्या नाहीतर मग लेकाला त्यांच्याकडे ठेवून घ्यायच्या. दादा तर रोजच संध्याकाळी आमच्याकडे यायचे, गौरवला सांभाळायचे, रात्री राहून, सकाळी माझ्याबरोबर बाहेर पडायचे. प्रशांतना सकाळी लवकर जावं लागायचं आणि रात्री पण नऊ वाजून जायचे घरी यायला. बँकेचं डबल टायमिंग होतं.

मला कधी बरं नसलं तरी आई आमच्याकडे येऊन राहायच्या. काही वर्षांपूर्वी तर मला खूप ताप आला होता, तोंडाची चव गेली होती. डॉ. च्या औषधाने ताप गेला तरी जेवण अजिबात जात नव्हतं. आई दिवसभर काहीतरी वेगवेगळं करून माझ्यापुढे ठेवायच्या, मी चार घास तरी खावे म्हणून. प्रसंगी स्वतःच्या हाताने त्यांनी मला भरवलंही आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं केलं तरी त्याचा त्यांनी चुकुनही उच्चारदेखील केला नाही कधीच. ना मला ऐकवलं ना इतर कोणालाही. कधीतरी छोटे – मोठे वादही व्हायचे आमच्यात. पण त्यांनी कधीच ते मनात ठेवलं नाही. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमोकळा आहे. घरात येणाऱ्या पाहुण्यांची आवड-निवड लक्षात ठेवून, त्यांना भरपेट जेवायला घालणं, ही तर त्यांची खासियत. सुगरण आहेत त्या आणि नवीन पदार्थ शिकण्यासाठी कायम तयार!

माझ्या मिस्टरांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र आई-दादा अगदी खचून गेले. त्यांचा जीवनातला रस संपून गेला. खरंच किती कठीण आहे उतारवयात हा आघात पचवणं! नंतरच्या काळात माझे सासरेही गेले. वयानुसार आईंचीही तब्येत खालावली. तसं त्यांना बी. पी. , डायबिटीस वगैरे काही नाही हं आधीपासून!

मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी लेकाला घेऊन ठाण्याला गेले होते. माझ्या हातातल्या चार सोन्याच्या बांगड्यांपैकी एक बांगडी चोरीला गेली. कशी काय ते कळलं नाही, गाडीला गर्दीही नव्हती. दुसऱ्या दिवशी फक्त एक मोठ्ठा ओरखडा दिसला हातावर. मी आईंना फोन करून सांगितलं, त्या पटकन म्हणाल्या, तुझ्या हाताला काही झालं नाही ना, हे महत्त्वाचं, बांगडी काय पुन्हा करता येईल!

असे किती म्हणून प्रसंग सांगावे. माझी शब्दसंपदा अपुरी आहे ते वर्णन करायला.

आजच्या घडीला मात्र त्यांच्याशी फक्त फोनवरून संपर्क आहे. माझ्या पाठीच्या आॅपरेशनमुळे मी त्यांचे तीन मजले चढून जाऊ शकत नाही आणि वयोमानानुसार त्यांनाही आता ते जिने उतरून येणं शक्य नाही. तरीही एकदा नणंदेला घेऊन त्या मला भेटायला येऊन गेल्याच. मी फोन केला की खूप आनंद होतो त्यांना. बरेच दिवस फोन केला नाही तर त्यांचा फोन हमखास येतो.

तब्येतीची काळजी घे, दगदग करू नकोस. काही लागलं तर सांग हं! हे त्यांचे शब्द किती मानसिक बळ देतात.

त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रेम, आदर आणि कृतज्ञता राहिल. आई, जीवेत् शरदः शतम्! याहून अधिक काय बोलू?

© प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ नाच ग घुमा नाच॥ ☆ कावेरी सुतार ☆

कावेरी सुतार

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ नाच ग घुमा नाच॥ ☆ कावेरी सुतार ☆

ती रोज येते.. अंगावरचे निळे वळ लपवून,

मालकीण बघते घड्याळाकडे, स्वतःचा तोरा जपून.

मोलकरणीचा उंबरठा रोज, नवऱ्याच्या मारहाणीने रडतो,

आणि इकडे मालकिणीचा चहा, फक्त वेळेअभावी अडतो.

नाच गं घुमा नाच, तू काळजावर दगड ठेवून नाच, 

त्याच्या मारहाणीच्या खुणा, पदराखाली झाकून नाच… 

*

मालकिणीला वाटतं, ही उशिरा येते आणि ‘नाटकं’ करते,

पण तिला काय माहीत, ती रोज मरणाशी झुंज देऊन घर भरते.

घर तिचंही आहे आणि काम या घराचंही तीच करते,

दोन घरांचा डोलारा, ती एकाच तुटलेल्या कंबरेवर धरते.

एके दिवशी पदर सरकतो, अन् वळ मालकिणीला दिसतात,

तिच्या मग्रुरीचे सगळे हिशोब, एका क्षणात विरून जातात.

ज्या हातांनी ती भांडी घासते, ते हात कुणीतरी सोललेत,

मालकिणीचे डोळे आज पहिल्यांदा, माणुसकीने ओले झालेत.

नाच गं घुमा नाच, आता सन्मानाचा गुलाल उधळून नाच, 

मालकिणीच्या डोळ्यांतलं ते, पश्चात्तापाचं पाणी घेऊन नाच…

*

मालकीण हळूच पुढे येते, तिची जखम हातात घेते,

आज मोलकरणीला नाही, तर एका ‘बहिणीला’ ती साथ देते.

ती मालकीण विसरते सत्ता, अन् मोलकरीण विसरते पीडा,

माणुसकीच्या नात्याने सुटतो, पिढ्यानपिढ्यांचा हा वेढा.

दुसऱ्याचं घर सावरणारी, ती कुणी ‘कामवाली’ नसते,

ती स्वतःला जाळून, दुसऱ्याचं घर उजळवणारी वात असते.

मालकिणीने झुकून आज, तिचे हात हातांत घेतले,

आणि खऱ्या अर्थाने मोलकरणीचे, उपकार आज मानले !

*

नाच गं घुमा नाच, आता मस्तक ताठ करून नाच, 

अन्यायाचा तो पिंजरा, पायाखाली तुडवून नाच.

.. अन्यायाचा तो पिंजरा, पायाखाली तुडवून नाच… 

© कावेरी सुतार

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”ऐकावे जनाचे.. पण..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ऐकावे जनाचे.. पण.. ☆ संध्या बेडेकर ☆

“Confident walking is better than confused running. ” 

मीरा माझी जीवाभावाची मैत्रीण. आमच्या दोघींचे छान जमतं. अगदी छत्तीस गुण जमतं नाहीत, पण चार सहा आवश्यक गुण एकमेकांचे एकमेकांना पटतात. त्यामुळे शाळेपासून ची आमची मैत्री अजूनही आहे. लग्नानंतर एकाच शहरात आहोत. तेंव्हा भेटी गाठी होत असतात.

तसं बघीतल तर आमच्या दोघींचा स्वभाव एकदम वेगळा. common असं काही नाहीच. तरीही मैत्री आहे. कारण आम्ही दोघींनी एकमेकींना जसे आहोत तसे स्विकारले आहे.

वेळ पडली तर सल्ला देणे, चूक दाखविणे, कधी ‘हो ‘कधी ‘नाही ‘ उत्तर सहज देणे जमते आम्हाला. आणि ते दुसऱ्याला सहज पटत. किंवा पटलं नाही तरी ते पचविणे जमतं आम्हाला.

पटल नाही म्हणून राग लोभ वगैरे नसतो. आता यापूढे हिला काही सांगायचेच नाही असं वगैरे मनात येत नाही.

जगातील कोणतीच गोष्ट परीपूर्ण नाही. सोनं आणि चाफा दोन्ही गोष्टी देवानेच जन्माला घातल्या. दोघांची किंमत /महत्व वेगळं आहे. सोन्याला चाफ्याचा सुगंध देता आला असता ना. पण तसे देवाने केले नाही. बहुतेक अपुर्णतेतही मजा असते. हेच सुचवायचे असेल. किंवा जसं आहे तसं स्विकारावे हे देवाचे सांगणे असेल.

‘No one is perfect ‘. हे सांगायचे असेल.

हे आम्हा दोघींना छान कळलय. पटलंय. आम्ही एकमेकींच्या ‘जाणीवा’ आणि ‘उणीवा’ समजून घेतल्या आहेत. आणि हेच आमच्या मैत्रिचे रहस्य असाव. बहुतेक.

घरातील प्रत्येक महत्वाच्या कामात सहभाग असतो आमचा.

मीरा थोडी भोळी, कोणाच्याही म्हणण्यात सहज येणारी. तिला सर्वांचे पटत, ते तिच्या वागण्या बोलण्यात लगेच दिसू लागतं. पण फार काळ टिकत नाही. कारण लगेचच दुसऱ्यांचे नवीन काही तरी पटलेल असत. सतत धर पकड चालू असते.

प्रत्येक वेळी काही तरी नवीन, सारख डॉक्टर बदलणे. औषध बदलणे. नक्की काय हवंय ?? हे ठरतच नाही. मन स्थिर नाही. एका ठिकाणी थांबायचेच नाही. सारखी पळापळ. स्वतः ठोस विचार असा काही करायचाच नाही.

खूप दा सांगून झाल.

अग !! ऐकायचे सगळ्यांचं पण करायचं आपल्या मनाचं. प्रत्येक घर, त्यांच्या घरच्या आवडीनिवडी, स्वभाव, वेगवेगळे असतात. ते ते घर त्या त्या पद्धतीने चालत. तब्येत व्यायाम केल्याने छान राहते. गोळी घेऊन वजन कमी होतं नाही. मेहनतीने घरात पैसा येतो. धागे दोरे बांधून नाही.

‘ ती ‘ पहाटे चार ला उठते आणि व्यायाम करते. म्हणून मी पण तसच करायला पाहिजे, असं नाही.

आपल्या ला काय झेपत??, काय आवडतं ?? ते करायचं ना. किती पसारा करायचा ?? व्यवस्थित विचार करून कुठे तरी थांबायलाही शिकावेच लागेल.

बरेचदा समजावून झाले. पण जैसे थे.

आता मी म्हणजे, माझा स्वभाव म्हणजे

मीराच्या एकदम विरुद्ध. मला माझंच पटत. एकदम कोणाच्या म्हणण्यात मी सहसा येत नाही. मी माझं माझं ठरवते. माझी चूक मीच ठीक करते. पडली तर पुन्हा उभी राहते.. सर्वांशी दोस्ती आहे. पण नियम माझे स्वतःचेच. जे मला, जे माझ्या परिवाराला आवडतील, झेपतील तेच.

माझा नियम म्हणजे,

“Follow no one, but learn from everyone. ”

‘ I follow myself. ‘ हा मुख्य नियम.

कारण व्यवहारात लोकांची लबाडी मला कळते. काही लोक आपल्या वर हावी व्हायचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये आम्ही कसे हुशार, कसे स्मार्ट, healthy डायट, देवधर्म, सर्व गोष्टींची त्यांना अचूक माहिती आहे. जणू काही सर्व गोष्टींमध्ये त्यांची मास्टरी आहे. असं एवढ्या confidently सांगतात, पटवून देण्याचा प्रयत्न असा करतात, की ते ऐकून समोरचा थोड्या वेळ का होईना गडबडतो. Confuse होतो. त्यांच्या तावडीत जातो.

ज्याला स्वतः चे मत नसते, ते येथे बळी पडतात. त्यांना follow करतात.

माझ्या मते

 “Confused running पेक्षा confident walking is better. “

आज मीरा कडे जायचे आहे. दोन दिवसांनी येणाऱ्या चतुर्थी ला ती आपल्या मुलीचे नाव विवाह संस्थेत नोंदविणार आहे. अशा महत्वाच्या गोष्टीं मध्ये तिचा हात मी सोडणार नाही.

काल फोन वर मला म्हणाली,

अग!!! तू विचारांची पक्की आहेस ग. तेंव्हा या कामात मला तुझी मदत हवी आहे. माझ्या मुलीसाठी योग्य वर शोधणे, ही आमच्या साठी खूप महत्वाची गोष्ट आहे. तेंव्हा मनातील शंका, चलबिचल सांगायला तुझ्या सारखी योग्य मैत्रिण दुसरी नाही. काल आमच्या घरी यावर चर्चा झाली, तेंव्हा तुला या मोहिमेत सामील करायचे असे प्रत्येकाचे मत आहे.

मला पण याबाबतीत सावध रहायची हिदायत मिळाली आहे.

आता तिला सांभाळायची जबाबदारी माझी आहे.

म्हणतात ना,

“मन शांत ठेवायला आणि शांतपणे विचार करायला शिकला, तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपले मनच आपल्याला देत असत. ”

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिओ तो जानो… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ पिओ तो जानो… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(काही देशात १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा झाला त्यानिमित्ताने…)

“दादा, इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला याल का ? ” माझी लेक आणि जावई मला पुण्यातील चांदणी चौकात असलेल्या इराणी कॅफेमध्ये जाण्यासाठी आग्रह करीत होते. मग परवा सकाळी आम्ही चौघं तिथं गेलो. पाहिलं तर तिथे तरुणाईची ही गर्दी. ! इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी सकाळी सकाळी एवढी गर्दी पाहून मला आश्चर्य वाटलं. मग मला कळलं की हे हॉटेल अष्टौप्रहर सुरु असतं. चहाच्या अशा काही ठराविक दुकानांवर प्रचंड गर्दी कायम असते.

मी विचार करू लागलो. प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरींनी ‘ एकच प्याला ‘ हे संगीत नाटक दारूचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी लिहिले आणि ते अजरामर झाले. त्या वेळी तळीरामांचे (दारू पिणाऱ्या मंडळींचे) प्रमाण समाजात वाढले होते. (आजची परिस्थिती मला माहिती नाही. कारण मी त्या वाटेला जात नाही. नाहीतर काही मंडळी उगीचच आज काय हे प्रमाण कमी आहे का असे म्हणतील.) शंभर दीडशे वर्षांपूर्वी भारतात फार कमी लोकांना चहा माहिती होता. इंग्रजांनी भारतात ज्या काही चांगल्या (?) गोष्टी आणल्या, त्यात चहाचा पण समावेश करायला हवा. तर शंभर दीडशे वर्षांपूर्वी ज्यांना चहा माहितीही नव्हता, अशी मंडळी खरोखर दुर्दैवी म्हणायला हवी कारण त्यांना क्षणात उत्साह, स्फूर्ती आणि तरतरी देणारे हे पेय माहिती नव्हते. गडकरींच्या काळातही फार कमी लोकांना त्याची आवड असावी नाहीतर त्यांनी त्यानंतर चहावर एखादे नाटक नक्कीच लिहिले असते.

ब्रिटिशांनी जो चहा भारतात आणला, त्या मूळ चहा नावाच्या पेयात भारतीयांनी बरेच बदल केले. खास दुधाचा चहा, आले, वेलची घातलेला चहा, गवती चहा असे अनेक प्रकार निघाले. त्यातील आले, वेलची आणि गवती चहाचा वापर करून बनवलेला चहा तर सर्दी, खोकला इ. आजारांवर आवर्जून घेतला जातो. सध्या तर ब्लॅक टी, ग्रीन टी यासारखे चहाचे अनेक प्रकार निघाले आहेत. खरे तर चहा पावडर, दूध आणि साखर हे चहाचे मूळ घटक. पण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चहा नावाचे एक वेगळेच रसायन तयार होते. चहाच्या दुकानांची नावे सुद्धा मोठी गमतीदार आहेत. अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, गुळाचा चहा इ. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची घोषवाक्ये सुद्धा भारी आहेत. एकदा प्याल तर पुन्हा याल, पिऊन तर पहा, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो वगैरे वगैरे. नुसत्या चहाच्या व्यवसायात तर आजकाल करोडोंची उलाढाल होते आहे.

आता तर हा एकच प्याला (चहाचा हो !) एवढा लोकप्रिय झाला आहे की त्याच्या लोकप्रियतेचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. आमचे पंतप्रधान सुद्धा त्यांना काही ‘ मन की बात ‘ सांगायची असली की ‘ चायपे चर्चा ‘ करतात. हिंदी सिनेमात तर नायकाला लग्नाची मागणी घालण्यासाठी नायिका त्याला ‘ चायपे बुलाया हैं ‘ म्हणून गाणंच म्हणते. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात बहुधा चहाने होते आणि शेवटही गोड (चहाने) होतो. कॉफी ही चहाची धाकटी बहीण ! पण चहाला जी लोकप्रियता लाभली, ती तिला लाभली नाही. जे खरे चहाबाज असतात, त्यांना वेळेला चहाच लागतो. त्या वेळी दूध, लस्सी, ताक, कॉफी असे विविध पर्याय उपलब्ध असले तरी खरा चहाप्रेमी निवड करतो ती चहाचीच.

आपल्याकडे लग्नाच्या वेळी मुलगी दाखवण्याचा जो कार्यक्रम होतो, त्या कार्यक्रमात प्रामुख्याने चहा, पोह्यांचा समावेश असतो. अस्मादिकांच्या लग्नात तर चहाने मोठीच भूमिका बजावली. एक कप चहा काय करू शकतो त्याचे प्रत्यंतर आले. त्याचे झाले असे की आमच्या सौ. चे वडील तिला दाखवण्यासाठी जेव्हा आमच्या घरी घेऊन आले, तेव्हा मी माझे वडील, तिचे वडील आदी मंडळी बाहेरच्या हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो. ही आतून चहा, पोहे घेऊन आली. चहा पिताना वृद्धापकाळामुळे तिच्या बाबांच्या हातातील कपबशी थरथरत होती. त्याच वेळी अस्मादिकांनी निर्णय घेऊन टाकला की आता यांना जास्त फिरवायचे नाही. आणि आम्ही आमची पसंती जाहीर करून टाकली.

मी शिक्षक म्हणून शाळेत काम करत असतानाचा चहाबद्दलचा गमतीदार अनुभव आहे. मी पडलो भाषाविषयांचा शिक्षक. मला प्रत्येक वर्गावर खूप बोलावे लागायचे. बोलून बोलून घसा कोरडा पडायचा. प्रत्येक तासाला घोट दोन घोट पाणी प्यायलं तरी गरमागरम चहाने घसा शेकावा असे वाटायचे. पण बाहेर जाता यायचे नाही. आमच्या शाळेत फक्त मधल्या सुटीत एकदा चहावाला यायचा. मग अस्मादिकांनी एक युक्ती शोधून काढली. आमच्या शाळेतील एक ज्येष्ठ शिक्षक जे अधिकारी होते (आणि मी विद्यार्थी असताना माझे शिक्षकही होते, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसायचो.) ते चहाचे फार चाहते होते. ते चहाला कधी नाही म्हणत नसत. (कोणीतरी असं म्हटलेलं मी ऐकलेलं आहे की बाईने कुंकवाला आणि पुरुषाने चहाला कधी नाही म्हणू नये.)

मी त्यांच्याकडे गेलो की ते बेल मारून शाळेच्या सेवकाला बोलवायचे आणि चहा आण म्हणून आज्ञा करायचे. मी आपला उगीचच ‘ राहू द्या हो सर ‘ म्हणायचो. पण सरांनाही चहा हवाच असायचा. त्यामुळे आमच्या दोघांच्या चहाचा प्रश्न अशा रीतीने सुटायचा.

एक कप चहाने काय होत नाही महाराजा ? एखाद्या तरुणाचे एखाद्या तरुणीवर प्रेम असले की तो प्रथम तिला चहाचे आमंत्रण देतो. चहाच्या एका कपाच्या साक्षीने त्यांची प्रेमकहाणी सुरु होते. अनेक महत्वाच्या चर्चा, बोलणी, सभा, वाटाघाटी चहाच्या साक्षीने सुरु होतात. परीक्षेसाठी रात्र रात्र जागून अभ्यास करणारे विद्यार्थी चहाच्या साहाय्याने झोपेवर नियंत्रण मिळवतात. एखाद्या सरकारी कचेरीत तुमचे काम होत नसले तर चहा ते काम सहज करून टाकतो. (तुम्ही भाग्यवान असाल तर तेथील कर्मचारीच तुमच्यासाठी चहा मागवतात. अर्थात आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या बाबतीत अशी शक्यता फार कमी असते.) पण तसे नसेल तर ‘ चहापाण्यासाठी ‘ हात जरा सैल सोडला की तुमचे काम होऊन जाते. चहापाण्यासाठी पैसे देणे हे काही लाच किंवा भ्रष्टाचार या प्रकारात मोडत नाही असे या कामातील काही तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे. तो एक शिष्टाचार असतो.

‘राम गावा राम ध्यावा, राम जिवीचा विसावा ‘ असं समर्थ रामदास म्हणतात. त्यात थोडा बदल करून आणि समर्थांची क्षमा मागून ‘ चहा घ्यावा चहा द्यावा, चहा जिवीचा विसावा ‘ अशीच भावना अट्टल चहाप्रेमींची असते. पूर्वीच्या काळी चहाच्या साधारणपणे दोनच वेळा असायच्या. एक सकाळी आणि दुसरी संध्याकाळी साधारण चार वाजता. पण काही हुशार लोकांनी प्रवासात रेल्वे स्टेशनवर, एस टी स्टॅण्डवर दिवसाचे चोवीस तास चहा विक्री करायला सुरुवात केली आणि त्यांना चहाप्रेमींनी निराश केले नाही. दिवस असो, रात्र वा पहाट असो, गाडी एखाद्या स्टेशनवर थांबली की खरा चहाप्रेमी चहा घेण्यासाठी खाली उतरतोच. आपल्या खासगी वाहनाने प्रवास करणारे लोकही तास दोन तासांनी चहाचा ब्रेक घेतातच. गाडी चालवताना पेंगुळलेल्या आणि कंटाळलेल्या ड्रायव्हरला चहा म्हणजे संजीवनी असते. त्यामुळे तात्काळ तरतरी, हुशारी वगैरे येऊन त्याची झोप कुठल्याकुठे पळून जाते आणि प्रवास सुरक्षित पार पडतो.

ऑस्टेलियातील लोक कॉफी पिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा ठिकाणी चहाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम भारतीय वंशाच्या उपमा बिरदी या तरुणीने केलं आहे. उपमा खरं तर वकील आहे. पण तिला चहाची प्रचंड आवड. भारतीय चहाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम तिने ऑस्ट्रेलियात केलं आहे. ती तिथे ‘ चायवाली ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. ती तिथे ‘ बिझिनेस वुमन ऑफ द इयर ‘ ठरली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून आलेला सोमनाथ गिराम या तरुणाची कथा वेगळीच आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. शिक्षणासाठी सुद्धा पैसे नाहीत पण शिकण्याची जिद्द अफाट. सोमनाथ शिक्षणासाठी पुण्यात आला. पैसे नाहीत म्हणून त्याने सदाशिव पेठेत टी स्टॉल सुरु केला. त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास केला. अपार कष्ट केले. त्याच्या कष्टाला फळ आले. सोमनाथ चक्क सी ए झाला. आता तो महाराष्ट्र शासनाच्या ‘ कमवा व शिका ‘ या योजनेचा ब्रँड अम्बॅसडर बनून तरुणांना प्रेरणा देतो आहे.

असे हे चहापुराण ! कितीही सांगितले तरी कमीच ! त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा आता गरमागरम मस्तपैकी एक फर्मास चहा घेऊ या.

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आम्रफूल पत राखत ! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ आम्रफूल पत राखत ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

मंडळी, सध्या बाजारात आम्रफल म्हणजेच आंबा आलेला आहे. अजून कुठे कुठे कच्च्या कैऱ्या आहेत, तर कुठे कुठे नव्हे सर्वत्र पिकलेले आंबे सुद्धा आपल्याला दिसू लागले आहेत. हा फळांचाच राजा. आंबा केवळ फळांचाच राजा नाही, तर तो सर्व तऱ्हेने राजा आहे असं मी म्हणेन.

आंबा आपण घराच्या अगदी जवळ लावू शकतो. कारण आंब्याचं मूळ हे दंडाकार असतं. म्हणजे ते जमिनीत खोलवर जातं. त्याचा घराला घराच्या पायव्याला त्रास होत नाही. धोका होत नाही. याउलट वड – पिंपळ – चिंच हे महावृक्ष ! यांची मुळे ही शाखाकार असल्यामुळे ती घराच्या पायव्याच्या खाली ही जाऊ शकतात. म्हणूनच कदाचित हे सर्व महावृक्ष आपल्याला गावाबाहेर / नदीकाठी / तळ्याकाठी किंवा जंगलात आढळतात. अर्थात यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात. कारण चिंचेवर – पिंपळावर भूत असतं म्हणून घाबरवलं जातं. ही भूते अर्थातच आपल्या घराशी संबंधित आहेत / सुरक्षेसाठी आहेत. हे खरं कारण आहे. जेव्हा शास्त्रीय कारण लोकांना पटत नाही, तेव्हा त्यांच्या मनाशी खेळ करून ही कारणं त्यांच्या गळी उतरवली जातात, हे आपल्याला ठाऊक आहे.

हे झालं मुळांबद्दल ! यापुढे जाऊन आंबा हा बारा महिने हिरवागार असतो. खरं तर आपला भारत देश हा मोसमी हवामानाचा प्रदेश आहे. म्हणजेच शिशिर ऋतू लागला की, पानझड सुरू होते. अगदी सागवानाची जंगलं बघितली तरी या ऋतूत पानांवर जाळी पडलेली आणि पुढे जाऊन ती सगळी पानं गळून पडलेली आपण बघतो. अर्थात पुढे वसंत ऋतू लागला की खरी पालवी येते हे खरे आहे. मात्र आंबा – आम्रवृक्ष आपल्या भरगच्च पानांनी बाराही महिने हिरवागार असतो.

सर्वांनाच ठाऊक आहे की आंब्याची पाने ही शुभ मानली आहेत. आंब्याचं खोड हे घरासाठी अवजारांसाठी असं वापरलं जातं. पण याही पुढे जाऊन आंब्याच्या संबंधात एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे.

आम्रफूल पत राखत / मोह फूल पत खोय 

नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय

वरील चरण मी लहान असताना एका कीर्तनात, कीर्तनकार बुवांच्याकडून ऐकलं होतं. अर्थात त्यावेळी जी समज होती त्याप्रमाणे मला त्याचा अर्थ लागला. पण आज त्याचा खरा खरा अर्थ कळतोय.

आपण प्रथम चरण बघूया ! “आम्रफूल पत राखत ” – म्हणजे ज्यावेळी आंब्याला फुले येतात म्हणजे मोहर येतो, त्यावेळी सुद्धा आंबा हा आपल्या हिरव्या गार पानांनी नटलेला असतो म्हणजे आंब्याची फुलं ही आंब्याची पानं यांचं रक्षण करत असतात. अर्थात पत या शब्दावर श्लेष अलंकार आहे. पत म्हणजे तुमची प्रतिष्ठा ! म्हणजे आंब्याची फुले तुमची – त्या झाडाची प्रतिष्ठा राखतात. आता दुसरं चरण बघूया !

मोह फूल पत खोय “ म्हणजेच मी आधी सांगितल्याप्रमाणे मोसमी हवामानाच्या प्रदेशामुळे आपल्याकडे मोह या वृक्षाला जेव्हा फुले येतात, त्यावेळेस मोहाची पाने झडतात पानगळीमुळे. म्हणजेच मोहाची पाने ज्यावेळेला झडू लागतात त्यावेळेसच मोहाची फुले येतात. याचा अर्थ असा की मोहाची फुले आपल्या वृक्षाची पाने घालवतात. म्हणजेच पत / प्रतिष्ठा घालवतात. आता पुढे बघा

नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय ?

ना पत का रस चाखत “ हे चरण घेऊ या ! म्हणजेच मोहापासून / मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते हे सर्वांना ठावूक आहे.. जी फुले आपल्या झाडांची पत – प्रतिष्ठा राखत नाहीत, अशा फुलांचा रस – म्हणजे दारू प्राशन केल्यानंतर त्या माणसाची पत कोणीही राखू शकत नाही.

सरळ भाषेत सांगायचं तर, दारू पिणाऱ्या माणसाची पत अजिबात राहत नाही. पण हे सांगण्यासाठी कवीने हे अतिशय सुंदर चरण सांगितलेले आहे.

या दृष्टीने आंब्याची पत राखणारा मोहर पुढे येणाऱ्या आंबा याची /आपल्या वृक्षाची / आपल्या घराची पत राखतात. प्रतिष्ठा जाणतात. लोकांना सावली देतात. आंब्याला नवीन पालवी फुटायला अगदी वसंत ऋतूची वाट बघावी लागत नाही. कालमानाप्रमाणे आंब्याची पाने सुद्धा जुनी झाली की ती गळतात आणि नवी पालवी उगवत असते. त्यासाठी कुठल्याही ऋतूची हवामानाची आंब्याला वाट बघावी लागत नाही. मात्र मोह वृक्षाचं नेमकं उलट आहे. त्याला फुलं येतात तेव्हा मोहाची सर्व पाने गळून गेलेली असतात.

त्यामुळे आपण स्वतः लक्षात ठेवायचे आहे की, जतन कोणाचं करायचं ? आपल्या घराचं की, आपल्या घराचं वाटोळं करणाऱ्या लोकांचं ? स्वतःच जगून पहा ! जगून घेताना एवढं मात्र लक्षात ठेवा की, तुम्ही कुठेही, कितीही दूर गेलात तरी मोहांच्या फुलांसारखे होऊ नका /तर आंब्याच्या फुलासारखं वागत चला. घराची प्रतिष्ठा वाढेल असंच वागत चला ! म्हणजेच जगणं सोपं होईल.

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “असं काही पाहिलं की छान वाटतं !!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “असं काही पाहिलं की छान वाटतं !!…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

आमची सोसायटी मुख्य रस्त्याला पासून थोडी आतल्या बाजूला असल्यानं गाड्यांचा आणि इतर आवाजांचा बिलकुल त्रास नाही. बऱ्यापैकी शांतता असते. त्यामुळेच थोडासा आवाज, गोंगाट सुद्धा सहन होत नाही. दुपारच्या वेळेला तर नाहीच नाही.

 दुपारी जेवण उरकून वामकुक्षीच्या अगोदर पुस्तक वाचत बसलेलो तेव्हाच मुलांचा गलका ऐकायला आला. खिडकीतून पाहिलं तर सोसायटीतल्या शेडमध्ये मुलं खेळत होती. जाम वैतागलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे डोक्याला ताप. त्यात शेड आमच्या खिडकीच्या जवळ असल्यानं सगळा गोंगाट थेट कानावर आदळत होता. शांततेची इतकी सवय झालीये की थोडासा आवाज सहन होतं नव्हता. चिडचीड आणि बेचैनी वाढली. दोनतीन वेळा खिडकीतून पाहत ओरडलो पण मुलांवर काहीही परिणाम झाला नाही. राग अनावर होऊन बडबडायला लागलो. ते ऐकून बायको म्हणाली.

“अति करताय” 

“त्रास होतोय म्हणून बोलतोय. उगाच नाही. ”

“मुलं खेळताना गोंगाट करणारच आणि आता तर सुट्ट्या आहेत. ”

“त्यांचे आईबाप निवांत आणि आपल्या डोक्याला ताप” 

“वयानं नाही पण विचारांनी पक्के म्हातारे झालात. पन्नाशीतच ही अवस्था. पुढं अवघडयं”

“काहीही काय बोलतेस. ”

“जरा स्वतःचे बालपण आठवा. तेव्हासुद्धा कुणाला त्रास होत असणारच की… ”बायकोच्या बिनतोड मुद्द्यावर मी निरुत्तर.

“मुलांचा गोंगाट यात नवीन काही नाही पण सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं. ”

“कशाबद्दल?”खिडकीतून पाहत मी विचारलं.

शेडमध्ये दहा-बारा वर्षांची मुलं-मुली ग्रुप करून खेळत होते. त्यांचे खेळ पाहून आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. जे दिसलं ते फारच अविश्वसनीय होतं. एक ग्रुप पत्ते खेळत होता, दुसरा नवा व्यापार आणि तिसरा ग्रुप चक्क ‘काचा-कवड्या’ खेळत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच्याही हातातच नाही तर जवळपास सुद्धा “मोबाइल” नव्हता आणि सगळेजण भान हरपून खेळण्यात तल्लीन झालेले. मोबाईल वेडाच्या काळात असं काही ‘हटके’ पहायला मिळणं हे खरोखर सुखद होतं. खूप कौतुक वाटलं. माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खिडकीतून पाहत मुलांच्या खेळात मीसुद्धा कधी गुंग झालो कळलंच नाही.

असं काही पाहिलं की छान वाटतं 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाम आणि शब्द… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ नाम आणि शब्द… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

 नाम आणि शब्द – – 

दोन्हीमध्ये फरक काय ?

शब्द…

शब्द बोचतात…

शब्द टोचतात…

शब्द लागतात…

शब्द गोड वाटतात…

शब्द बोलतात

शब्द आधार देतात

शब्द सांत्वन करतात

शब्द…

शब्द…

शब्द…


नाम…

नाम.. नाम घेणाऱ्याला या सर्व शब्दांच्या मायेतून अलगद बाहेर काढते…

नाम सर्व शब्दांचे सर्व अर्थ शोषून घेते आणि नाम घेणाऱ्याला सर्वांपासून अलिप्त करते…

श्रीराम

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आता फार काही अपेक्षाच नाही… ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ आता फार काही अपेक्षाच नाही☆ तृप्ती कुलकर्णी

फार काही नाही, फार काही नाही 

फक्त रोज एक छोटासा डोस घेत जाऊ 

एक छोटी टॅबलेट हिंसेनी भरलेली

खून, हाणामाऱ्या, अत्याचार यांची

मेजवानी पचवायला शिकवणारी

त्याशिवाय कसं आपण काही मनोरंजन करणार

 

फार काही नाही फार काही नाही 

एक चमचा सिरप रोज आधी घ्यायचं 

शिवराळ भाषेला त्याने पचवायचं 

त्याशिवाय कसं आपण काही ऐकणार, बोलणार 

संवादाची परिपूर्णता त्याशिवाय कशी होणार?

 

फार काही नाही फार काही नाही 

अहो जग मॉडर्न होतंय आता कुठे तुम्ही आहात

कसले संस्कार, सात्विकता का शोधत आहात?

खरंच गरज आहे का या जगाला तुमची,

तुमच्या विचारांची

नाही ना कळलं ????

बघताय का नुसते मग, एक पटकन सुई टोचून घ्या,

मन आणि मेंदू बधीर करण्याची! 

त्याशिवाय कसे तुम्ही इथे जगू शकणार

 

सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र

न चुकता बस इतकं रोज करत जा 

बाकी काही केलं नाही तरी,

हे करणं म्हणजे आत्ताच्या काळात योग्यच की

फार काही नाही फार काही नाही… ‌

 

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”चौकटीबाहेरचा विचार..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चौकटीबाहेरचा विचार.. ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक ‘out of the box’ विचार करतात.

आज खूप दिवसांनी देशपांडे आजी आजोबा भेटले. माझे आवडते आजी आजोबा आहेत ते. नेहमी उत्साहात असतात. अगदी ‘full of energy’. मागच्या वर्षीच पंचाहत्तरी झाली त्यांची. त्यांचे घर म्हणजे, आजी आजोबा, अजय, अनिता म्हणजे त्यांचा मुलगा सून व नातु अनय.

अजय अनिता दोघे ही नोकरी करणारे व अनय दुसरीत आहे. शाळेनंतर तो ‘डे केअर’ ला जातो. येताना अनिता त्याला बरोबर घेऊन येते. आजी आजोबांना दिवस भर बिझी ठेवायचा, अजिबात शांत बसत नाही अनय. म्हणूनच अजय अनिता ने त्याला ‘डे केअर’ मधे ठेवायला सुरुवात केली.

या घरची संध्याकाळ म्हणजे, अनिता ची धावपळ असते. स्वयंपाक, अनय चा अभ्यास, आजी आजोबांना वेळेवर जेवण देणे, त्यांचे औषधपाणी, अनयची दुसऱ्या दिवशीची तयारी, सकाळच्या डब्याची तयारी, त्यात येणारे जाणारे असतातच. आजी जेवढं जमेल त्यापेक्षा जास्त मदत करतातच. मुख्य म्हणजे दोघे ही जेष्ठ अजिबात घाई गडबड करत नाही. पण अनिता ची ओढताण बघून त्यांना वाईट वाटत. बायकांची नोकरी म्हणजे ‘double front’ वर काम करावे लागते. घर आणि ऑफिस. दोन्ही कामं सोप्पी नाहीत. अजय ही मदत करतो तिला. सकाळी मावशी येतातच. पण घरच्या बाईला लक्ष द्यावेच लागते.

आज शनिवार, अजय अनिता घरीच आहेत. आज आजी आजोबा कोणत्यातरी वेगळ्याच विचारात आहेत. आजोबा म्हणाले, “अजय !! आज तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुम्हाला वेळ मिळाला की बोलू आपण. “

अजय अनिता आपापली कामे पूर्ण करून येऊन बसले. आजोबा म्हणाले, “मी काय म्हणतो, ते शांतपणे ऐका. अरे!! आम्ही दोघे वृध्दाश्रमात रहायला जायचा विचार करत आहोत. ” आजोबा थेट विषयावरच आले.

एवढं ऐकलं, आणि अजय तर उठून चाललाच गेला. अनिता ढसाढसा रडू लागली. “आई!! माझी काही चूक झाली का ? मला माफ करा”. तिने आपल्या सासूबाईंचा हात हातात घेतला. तिला रडू आवरत नव्हते.

अजय पुन्हा आला. “काय झालं बाबा ? असं का म्हणाला तुम्ही ? काय चाललंय तुमच्या मनात ? हे असे विचार कसे आले तुमच्या मनात ? कोणी कान भरले का तुमचे ? एका नंतर एक प्रश्नांची झडीच लावली त्याने. त्याच्या डोळ्यात पण पाणी आले होते. आजी पण रडत होत्याच.

आजोबा मात्र शांत होते. अजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “अरे बाबा!! असं काही नाही. आम्ही दोघे खूप मजेत आहोत. खूप आनंदात व आरामात आहो. तुमचे रोजचे काम बघुन आम्हीच थकतो. सध्या तू आणि अनिता वेगळ्याच फेज मधुन जात आहात. करीयर पण बघायचं आहे. अनयकडे पण लक्ष द्यायचे आहे. आमची पण खूप कामं असतात. आम्हाला दिसतंय तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आणि आम्हाला आमचा वेळ कसा काढायचा??? हे कळत नाही. “

आजोबा पूढे म्हणाले, “अरे !! एखादे छानसे वृध्दाश्रम बघ. अगदी छान सोई असलेले. आम्ही तेथे राहू. आम्हाला पण मित्र मैत्रिणी भेटतील. अरे !! आजही तुमची जबाबदारी आहे आमच्यावर. तुमचा आनंद, तुमची तब्येतही महत्वाची आहे. आणि नवीन पिढी ला पण घडवायचे आहे ना. तेव्हा मी काय म्हणतो, ते लक्षात घे व विचार कर. आणि हो, लोक काय म्हणतील ? याचा विचार करायचा नाही. ते येतात का अनिता ला मदत करायला ? अनयला शिकवायला ?”

“बघू”, म्हणून‌अजय ऊठुन गेला. आज जेवताना डायनिंग टेबलावर सर्व शांत होते.

रविवारी सकाळी आजोबांनी अजयला चौकशी करायला सांगितले व स्वतः येऊन बसले. अजय ने नेटवर चेक करायला सुरुवात केली. ‘अजूनही विचार करा’ असं सारखं म्हणत होताच तो.

शेवटी एक वृद्धाश्रम मनाजोगे वाटले. तेथे जाऊन बघीतले. अजयने खूप चौकशी केली. नियम वाचले. खोली बघीतली. सोई बघीतल्या. डॉक्टर ची सोय आहे. मनोरंजन, जेवण हे सर्व बघून खात्री झाल्यावरच आजी आजोबा तेथे रहायला गेले. हे सर्व प्रत्येकासाठी खूप कठीण होते. पण आजोबांनी निर्णय घेतलाच होता.

आता प्रत्येक ‘weekend’ ला अजय अनिता अनयला घेऊन आजी आजोबांना भेटायला जातात. बरोबर दोघांची औषधं, फळं व इतर त्यांच्या आवडत्या वस्तू नेतात. चांगले दोन तास तेथे बसतात. चौघे बगिच्यात बसून खूप गप्पा मारतात. आता अनय ला एक नाही अनेक आजी – आजोबा मिळाले आहेत. आता सर्वांनाच अनयची सवय झाली आहे. अजय अनिता ही सर्वांना प्रेमाने भेटतात. विचारपूस करतात. आता सर्व weekend ची वाट बघतात. वृध्दाश्रमातील उत्साह वाढला आहे.

आज आजोबा गमतीत अजयला म्हणाले, “अरे !! एवढा वेळ तर आमच्याशी बोलायला, तुम्हाला घरी पण मिळायचा नाही. अरे !! आता वृध्दाश्रमात रहायला जाणे म्हणजे मुलं याना सांभाळत नाही असे राहिले नाही, असा अर्थ निघत नाही. नवीन पिढी, घरातले जेष्ठ, सर्वच महत्वाचे आहेत. काही निर्णय घेताना त्रास होतो. पण ते योग्य असतात. कधी कधी ‘out of box’ विचार करून बघावे. जमलं तर ठीक, नाहीतर आपलं घर आहेच ना. अजय रोज सकाळ संध्याकाळ फोन करतोच. “

आज अनयचा वाढदिवस सकाळी सर्व आजी आजोबांबरोबर झाला. आता संध्याकाळी मित्र मैत्रिणींबरोबर, म्हणुन आजी आजोबा परमीशन घेऊन घरी आले आहेत.

आजोबांचे हे bold decision ऐकुन त्यांच्या बद्दल माझा आदर वाढला आहे.

कधी कधी. “out of the box” विचार करून बघावा. त्याकरिता धाडस लागतं…

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares