मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – – ७८ – जोहार मायबाप जोहार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ७८ – जोहार मायबाप जोहार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

“माझी जडणघडण” ही मालिका मी जवळजवळ गेली दीड वर्षे लिहीत आहे. सुरुवातीला हे एक आव्हान म्हणून स्वीकारताना मी खूप साशंक होते. मूळातच मी, ” हे का लिहावं? ” हा प्रश्न माझ्या मनात होता. कारण स्वतःविषयी काही लिहावं आणि ते वाचकांकडून वाचलं जावं इतकी मी कुणी प्रसिद्ध अथवा वलयांकित व्यक्ती नाही. चार चौघींसारखंच माझं जीवन. पण आयुष्यातील अनुभवांविषयी, जीवन जगताना जे जे जाणवले ते लिहावं असं वाटलं आणि मी तसा प्रयत्न करायचं ठरवलं.. ”

मग अक्षरशः मी माझा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळही जवळ घेऊन बसले. अदृश्यपणे माझ्याच आयुष्याचं गाठोड सोडवलं आणि मग त्या प्रवाहात लिहिता लिहिता स्वतःला खरोखरच झोकून दिलं.

– – वास्तविक “माझी जडणघडण” ही ७७ भागांची मालिका म्हणजे माझे आत्मवृत्त आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आलेल्या कडू, गोड, आंबट, तुरट अनुभवांचं भेटलेल्या अनेक व्यक्तींचं माझ्या जडणघडणीत काय योगदान ठरलं याचं मी बारकाईने निरीक्षण केलं, काहीसं चिंतनही केलं आणि माझ्या दृष्टीने मला जे वाटलं ते तुम्हा वाचकांसमोर अगदी प्रांजळपणे ठेवलं.

ही मालिका लिहिताना आणि विशेषतः भूतकाळात शिरताना मला सुद्धा नक्कीच खूप आनंद मिळाला. तेव्हा न जाणवलेलं लिहिताना जाणवलं. हरवलेलं कितीतरी, दडून बसलेलं काहीतरी गवसत गेलं आणि जीवन पुन्हा नव्याने कळत गेलं. प्रत्येक लेख लिहिताना मला हे वाटायचं की, ” यात तसं विशेष काय आहे? ” पण ज्या ज्या वेळेला वाचकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचे त्यावेळी मी मनोमन हरखून जायचे. वाचकांचा या मालिकेला खरोखरच उदंड प्रतिसाद मिळाला. कुठेतरी वाचकही माझ्या या लेखनाशी रिलेट व्हायचे. त्यांच्या जीवनातलेही संदर्भ ते या लेखनात पडताळून बघायचे. अभिप्रायासोबत तेही त्यांच्या आयुष्यात आलेले अशाच प्रकारचे अनुभव मला सांगायचे. कित्येकांचे फोनही यायचे. काहीजण वैयक्तिक मेसेजेसमधून त्यांच्या भावना व्यक्त करायचे आणि हे सगळंच माझ्यासारख्या सामान्य लेखिकेसाठी खूपच भारी होतं. माझ्या अनुभवात त्यांचेही अनुभव मिसळत माझ्या जडणघडणीचा आणखी एक नवाच प्रवास त्यामुळे सुरू व्हायचा.

“पुढील भागाची प्रतिक्षा करत आहोत. ”हे वाचकांचं वाक्य माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असायचं.

या लेखनानिमित्ताने अनोळखी ओळखींमधून त्यांच्या हृदयीचे खरेखुरे बोल वाचून, ऐकून मीही प्रत्येक वेळी खरं म्हणजे अधिक समृद्ध होत गेले. अनेक नवी दालनेत जणू काही माझ्यासाठी उघडली गेली. त्यामुळे माझ्या या वाचक वर्गाची मी खूप ऋणी आहे. माझ्या लेखनातून मी त्यांना काय दिलं यापेक्षा त्यांच्या प्रांजळ मनापासून लिहिलेल्या प्रतिक्रियेतून मला मात्र खूप आनंद मिळाला. सुरुवातीला जे वाटत होतं की “मी हे का लिहावं? ” ही भावनाच गळून गेली. या लेखनाच्या माध्यमातून मला खूप मोठा मित्रपरिवार लाभला आणि मी अक्षरशः त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या. माझ्या मनातल्या अनेक प्रश्नचिन्हांनाही मी वाट मोकळी करून दिली. हा साराच आनंद खरोखरच अवर्णनीय होता.

खरं सांगू का? तसा हा जडणघडणीचा प्रवास न संपणाराच आहे. याचं शेवटचं स्थानक म्हणजे आपला शेवटचा श्वास. आज मागे वळून पाहताना ज्यांनी माझं बोट धरून जीवनरूपी आकाशातले तारे मला पाहायला शिकवलं ते हात लुप्त झालेले जाणवत असले तरी आयुष्याची उरलेली वाट नव्या पिढीच्या हाताला धरून चालतानाही पुन्हा एकदा जडणघडणीचाच प्रवास सुरू असल्याची भावना मनात प्रबळ होते. जगत असताना संस्कार म्हणून सहजपणे ज्यांना मी माझ्यातलं दिलं त्यांच्याच सोबतीने पुन्हा माझ्यावरच संस्कार होत असल्याचं अनुभवते तेव्हाही हेच वाटतं की हे संस्काराचं पात्र केवढं मोठं आहे! अनंत आहे, न संपणारं आहे म्हणूनच म्हणते ही जडणघडणीची मालिका न संपणारी आहे. सांगायचं असं काहीतरी खूप बाकी आहे आणि पुढेही ते बाकीच राहणार आहे. काल घडलं, आजही काही घडणार आहेच आणि पुढेही घडेल.. म्हणून आता इथेच थांबायचं मी ठरवलंय. तुमचा प्रेमळ निरोप घेत आहे. या संपूर्ण मालिकेच्या प्रवासात वाचकहो! तुम्ही दिलेली साथ माझ्यासाठी केवळ अनमोल आहे. धन्यवाद तरी कसे देऊ? तुमच्या कायम ऋणातच मी राहीन. हेच नम्रपणे म्हणावसं वाटतं..

।।जोहार मायबाप जोहार

तुमच्या महाराचा मी महार

बहु भुकेला झालो

तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।

तेव्हा मित्रहो! आता निरोप घेते. चूक भूल द्यावी घ्यावी. सदैव एकमेकांच्या स्मरणात मात्र नक्कीच राहू.

बाsssय!

– समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द, श्रद्धा, आणि शोक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ शब्द, श्रद्धा, आणि शोक… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

शब्द, श्रद्धा आणि शोक – – 

 – – – मृत्यू, संदेश आणि आपण!

परवा सकाळी अचानक मोबाईल वाजला.

पटलावर एकच अभद्र ओळ…

“आपल्या सोसायटीतील ज्येष्ठ सभासद श्री ××××× यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ”

बस्स…

त्या एका ओळीत त्यांचे अख्खे आयुष्य थांबले होते.

क्षणभर शांतता.

मग व्हॉट्सॲप समूह हलला… जागा झाला…

आणि पटलावर भावनांचा पूर उसळला.

 

हात जोडले गेले 

अश्रू वाहू लागले 

फुले अर्पण झाली 

दिवे पेटले आणि क्षणात विझले 

 

शब्द कमीच…

भावचिन्हेच जास्त.

RIP…

ॐ शांती…

ईश्वराची इच्छा…

अरेरे…

 

प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेच्या चौकटीतून…

दुःखाला आकार देत होता.

व्यक्ती तितक्या अभिव्यक्ती.

 

शोक सगळ्यांचाच;

पण त्याची मांडणी मात्र

व्यक्तिमत्त्वानुसार—

कुणी कृपण,

कुणी रुक्ष,

कुणी सवंग,

कुणी उथळ;

कुणी शिष्ट, संयमित,

कुणी दयार्द्र,

कुणी प्रगल्भ

*मृत्यूनंतर व्यक्तीला*

*त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार*

*आदरांजली वाहिली जावी, *

*तो त्याचा अधिकार आहे. *

हिंदू मन मृत्यूला पूर्णविराम मानत नाही.

इथे शरीर पडते; आत्मा नाही.

तो अजर, अमर, अविनाशी, नित्य.

तो पुढच्या—अनंताच्या प्रवासाला निघतो.

म्हणूनच अशा वेळी ओठांवर सहज उमटते—

“मृतात्म्यास सद्गती लाभो, ”

“आत्म्यास मोक्ष मिळो. ”

हे शब्द मृत्यूनंतरच्या प्रवासावर

अढळ विश्वास ठेवणाऱ्यांचे.

इस्लाम आणि ख्रिश्चन परंपरेत

जीवन एकदाच मिळते.

मृत्यूनंतर शरीर मातीच्या कुशीत विसावते,

आणि आत्मा अंतिम दिवसाची वाट पाहतो.

म्हणून तिथे सद्गती नसते,

तिथे असते चिरशांती…

चिरनिद्रा…

Rest in Peace.

किंवा अल्लाहकडे केलेली क्षमायाचना.

त्या शब्दांत आक्रोश नसतो,

असतो शांत स्वीकार.

बौद्ध विचार मृत्यूकडे

‘थांबा’ म्हणून पाहतो—

कर्मांच्या प्रवाहातून

मुक्त होण्याची एक शक्यता.

म्हणून “निर्वाणाची प्राप्ती होवो”

असे म्हणताना शब्द हलके होतात…

श्वासासारखे.

शीख धर्मश्रद्धेत

आत्मा ईश्वरात विलीन होतो.

“वाहेगुरूच्या इच्छेत सर्व आहे”

हे वाक्य दुःखाला तर्क देत नाही,

ते फक्त त्याला धरून ठेवते.

प्रत्येक श्रद्धा मृत्यूला वेगळा अर्थ देते,

आणि…

तोच अर्थ

शोकसंदेशात उतरतो.

म्हणून शोक व्यक्त करताना

आपले शब्द आपल्यासाठी नसतात.

ते त्या गेलेल्या माणसासाठी असतात –

आणि उरलेल्यांच्या मनासाठी.

धर्म माहीत नसेल,

तर मौन…

किंवा मोघम, मृदु शब्द—

“त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, ”

“या दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत, ”

“माणसं जातात… आठवणी राहतात. ”

 

शोक मिरवायचा नसतो,

तो जपून ठेवायचा असतो—

योग्य शब्दांत.

कारण

अचूक, समर्पक शब्दयोजना

हीच खरी श्रद्धांजली असते.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “महिलांचे मायक्रो फायनान्स…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “महिलांचे मायक्रो फायनान्स…” ☆ सुश्री शीला पतकी 

महिलांचे मायक्रो फायनान्स

 – – हिंग डबी ते बचत गट महिलांचे मायक्रो फायनान्स……..

सुधा मूर्तींच्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या “नारायण मूर्ती ने जेव्हा नविन कंपनी काढायचे ठरवले तेव्हा काही रक्कम कमी पडत होती मग ती माझ्याकडे आहे का? अशी विचारणा झाली. माझ्या तांदळाच्या डब्यातून साडेसातशे रुपये मी त्यांना दिले आणि सांगितले की ही रक्कम मला परत करावयाची आहे “…. हा किस्सा ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की बायका अशा तऱ्हेने घरात बचत करून पैसे जमा करीत असत आणि घरच्या कर्त्या माणसाला संकटकाळी त्या पैशाचा खूप उपयोग होई आणि मला आठवण झाली आमच्या घरच्या हिंगाच्या डबीची…..! साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे…. त्याकाळी नागछाप हिंगाच्या पत्र्याच्या डब्या असत. त्या डब्या रिकाम्या झाल्यावर त्या व्यवस्थित धुवून पुसून उन्हात वाळवून त्यांचा वापर इतर कामासाठी होत असे. त्याच्या झाकणाचा उपयोग साल काढण्यासाठी म्हणजे बटाट्याचे साल दोडक्याचे साल…. तोपर्यंत अजून साल काढण्याची ते छोटे यंत्र आले नव्हते. म्हणजे हिंगाची डबी नंतर साल काढण्याचे यंत्र होई आणि त्यानंतर नवऱ्यापासून एकेक पैसा वाचवून तो गोळा करून जतन करावयाचा ती तिजोरी म्हणजे हिंगाची डबी…! . हिंगाच्या डबीत सगळी चिल्लर असायची. पैसा, दोन पैसे, आणा… 16 आणे जमले की त्याचा बंदा रुपया व्हायचा! … मग हा रुपया त्यापेक्षा मोठ्या बँकेत जायचा तो म्हणजे फिरकीच्या तांब्याचा पेला…! फिरकीच्या ताब्यात आत मध्ये एक छोटा पेला असायचा. रुपया रुपया साठवून बायका वाड्यातल्या वाड्यात चाळीत भिशी करत असत. भिशी असायची शंभर रुपयाची.. त्या काळात शंभर रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. दहा बायका भिशीमध्ये असत. जमा झालेले दहा, दहा रुपये एकत्र करून मग त्याची ज्या बाईला भिशी लागायची ती बाई त्या शंभर रुपयात घरासाठी कधी कॉट खरेदी करायची कपाट घ्यायची अशा संसार उपयोगी वस्तूची खरेदी होत असे किंवा घरात अडीअडचणीला धान्य भरण्याला त्याचा वापर व्हायचा असा बचतीतून संसाराला हातभार लावणे हे काम ह्या हिंगाच्या डबीने खूप केले.

मला वाटतं हेच मायक्रो फायनान्सचे तत्व बंगाल मधल्या नंतर येणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यानी वापरले असावे, जे पुढे एका अर्थतज्ज्ञाच्या प्रयोगात सामील झाले आणि त्याला नोबेल पारितोषिकही मिळाले (असे म्हणतात मला नक्की माहिती नाही हे ऐकीव माहितीवर मी लिहिते आहे यापुढील माहिती मात्र सत्य आहे) यामध्ये कलकत्त्यामधील समुद्रकिनाऱ्यावरच्या लोकांना शंभर रुपये या कंपन्या सकाळी देत असत दहा रुपये कट करून 90 रुपये हाती ठेवायचे म्हणजे त्या माणसाला शंभर रुपयाचे कर्ज दिले जायचे. तो माणूस त्यातून मासे खरेदी करायचा, खोबरे घ्यायचा कोथिंबीर आले हे सगळे तुकडे माशासकट विक्रीला एका साध्या पुठ्ठ्यावर किंवा कापडावर ठेवले जायचे. तेच त्याचे दुकान! संध्याकाळपर्यंत दीडशे रुपये त्याच्या हाती लागायचे तो फायनान्स कंपन्यांमध्ये 100 रुपये भरून उरलेला नफा घरी घेऊन जात असे असा मायक्रो फायनान्स च्या शंभर रुपयांच्या कर्जावर व्यवसाय चालत असे. कर्ज घेणारे हजारो लोक होते त्या कंपन्यांनाही चांगला फायदा मिळत असे. लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला…. म्हणजे रोजगाराला कर्ज मिळाले छोट्या छोट्या हातांना काम मिळाले मायक्रो फायनान्स ची ताकद अनेकांनी ओळखली होती… आता तो काळ पैशाना किंमत असण्याचा होता. तिथंपासून आज तागायत बायका बचत करीत आहेतच. बायका त्या काळात घरात असायच्या. नवऱ्याने दिलेले रुपये दोन रुपये त्यातून आणा दोन आणि वाचवून केलेली हिंगाचे डब्यातली ती बचत तुम्हाला कल्पना येणार नाही इतकी मोठी ठरली. त्याचा एक उदाहरण देते…. माझी आई अशा बचतीमधून अर्धा तोळे सोने घेत असे. कारण तिला वाटायचं आपल्याला चार मुली आहेत, नवऱ्याला नोकरी नाही, काहीतरी तरतूद करायला हवी ना? बरं सगळे शिकणारे… त्या पद्धतीने तिने 25 तोळे सोने जमा केले होते तेव्हा सोन्याचा भाव १५० ते १६० दरम्यान होता कोणत्याही मुलीला सोने द्यावे लागले नाही त्यामुळे पुढे साधारण75 ते 80 स*** त्याची किंमत वाढत गेली ती आठशे रुपये पर्यंत गेली…. ती घर बांधताना खूप मोठी ठरली. हिंगाच्या डबीतील ही बचत संसाराला अनेक वेळा उपयोगी तर ठरलीच. त्याशिवाय कुणी आजारी पडलं, कुणाची फी भरावी लागली, घरात एखादी वस्तू घ्यावी लागली, वर्षभरासाठी धान्य भरावं लागलं तर या रकमेचा आधार पुरुष माणसांना खूप मिळत असे. कोणतेही आधार कार्ड नाही कुठेही बँक खाते नाही कुठलेही पासबुक नाही त्यावरचे कर्ज नाही जामीनदार नाही पण या हिंगाच्या डबीतील आणि फिरक्याच्या तांब्यातील, तांदळाच्या डब्यातील, बचत बँकेने त्या काळाच्या मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या अडचणीच्या काळात तसेच त्याच्या काही प्रापंचिक गरजा पुरवण्यात किंवा थोडीशी वस्तुरूपी हौसमौज करण्यात खूप मोठा वाटा उचलला आहे. बायका कदाचित बाहेर मिळवायला गेल्या नाहीत पण आपला संसार उत्तम सांभाळून मुलांवर संस्कार करून सासू- सासऱ्याचा सांभाळ करून काटकसरीने पैसा दोन पैसे वाचूनत्यानी हिंगाच्या डबीत पतपेढी उभी केली, बचत गट उभे केले, भिशीगट उभे केले, मायक्रो फायनान्स कंपन्या उभ्या केल्या आणि बँका सुद्धा उभ्या केल्या…! मला त्या काळाच्या या चतुर बायकांच खूप कौतुक वाटतं. आज परिस्थिती अशी आहे घरातल्या चार बायका असतील तर सहा हजार रुपये सरकार मदत द्यायला लागले. घरातल्या महिला कामाला जात असल्यामुळे त्याच्या मदतनीस म्हणून अव्वाच्या सव्वा पगार घेऊन बायका काम करतायेत प्रसंगी अडवणूक करतायेत. चार पोळ्या लाटायचा पगार हजार रुपये मागतात. कारण त्यात व्हिजिट फी

असते. पण त्यांच्या बचत गटाने मात्र आता मोठे मोठे उद्योग आणि बँका उभारल्या आहेत. मध्यमवर्गीयाला घरामध्ये दोन खुर्च्या एखाद टेबल एखादा टेबल फॅन एखादी कॉट दही दुधाचे कपाट, हळदी कुंकवाला घालण्यासाठी एखादा गालीच्या ही स्वप्न पुरी करायला ती हिंगाची डबी नक्कीच कारणीभूत ठरली आहे. मी बरेच दिवस अशी हिंगाची डबी जपून ठेवली होती कारण त्यात तत्कालीन महिलांनी आपली स्वप्न साठवली होती आणि पूर्ण केली होती खूप शोधली पण ती हिंगाची डबी आता हरवली ती हिंगाची डबी नव्हती तर मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातल्या बाईंच्या स्वप्नाची जादुई डबी होती. ति डबी हरवली आणि हिंगाच्या डबीत बचत करणारी आणि पैशाचं मोल असणारी ती माणसंही काळाच्या ओघात हरवून गेली…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर

मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लास ला सोडणे / आणणे वगैरे, याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिस मधून घरी आले, की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण ६ – ६. ३० ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कुटरनी असते. कधी कधी बायको बावधनहून स्कुटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस, मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसनी व पुढचे पायी जातो.

एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मला बसनी घराकडे जायचं होतं.

मुलीकडून ६. ३० ला निघालो. साधारण ५ – ७ मिनिटे चालत गेलो, की मेन रोड लागतो. रस्ता ओलांडला, की, समोरच बसचा थांबा आहे. ट्रॅफिकच्या पीक- आवर्स मध्ये पुण्यात कुठलाही रस्ता ओलांडणे हे एक दिव्यच असते. मी जाऊन रस्त्याच्या अलीकडे उभा राहिलो व ट्रॅफिक मध्ये गॅप पडण्याची वाट बघत थांबलो. त्या दिवशी ट्रॅफिक जरा जास्तच होता. या रोडची खासियत अशी आहे, की, पुणे विद्यापीठ ते व्हाया पाषाण रोड – व्हाया चांदणी चौक – पौड डेपोपर्यंत, म्हणजे साधारण ५ – ६ किमी अंतरामध्ये कुठेही सिग्नल नाही. त्यामुळे सगळ्याच गाड्या, म्हणजे कार/ स्कुटर/ मोटर सायकल/ बसेस आणि ऑटो, रस्त्याच्या दोन्हीकडून सुसाट स्पीडनी धावत असतात. बहुदा, ४-५ मिनिटे गेली, की, छोटीशी गॅप मिळते व त्यामध्ये जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करता येतो. आज काय प्रकार होता माहित नाही, मधे गॅपच येत नव्हती. बाजूला बघितलं, तर काही तरुण मंडळी गॅप नसतांना पण, धावून रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात एक अंध व्यक्ती समोरून आरामात रस्ता ओलांडून आली. अज्ञानात सुख असतं, असं म्हणतात, ते असं!

मी बऱ्याच वेळेला ४ – ५ पावले पुढे जायचो आणि वेड्यावाकड्या येणाऱ्या गाड्यांना घाबरून परत मागे यायचो. पण पुढे जायची हिम्मत होत नव्हती. वाट बघता बघता १० मिनिटे झाली, पण ‘नो चान्स’. अशा वेळेस वाटतं, की, काहीतरी घडून ट्रॅफिक जॅम व्हावा, त्यामुळे आपोआपच क्रॉस करणाऱ्यांची सोय होते. पण तसही आज काही घडत नव्हतं. १५ मिनिटे झाली, तरी मी होतो त्याच ठिकाणी होतो.

तेवढ्यात माझी नजर मागे गेली. मागे एक तगडी म्हैस उभी होती व तिच्या गळ्यातली दोरी धरून मुलगा उभा होता. म्हशीकडे बघताच मी मनातल्या मनात ‘युरेका’, ‘युरेका’ (म्हणजे ‘सापडले’, ‘सापडले’) असे ओरडलो. मी लगेच त्या मुलाकडे गेलो.

मी : दादा, म्हैस घेऊन पलीकडे चलणार का?

मुलगा : कशाकरता? काय करायचं आहे?

मी : करायचं काहीच नाही. फक्त पलीकडे माझ्याबरोबर चलायचं आणि लगेच परत यायचं. ५ रुपये देईन.

(मुलाला काहीच अर्थबोध झाला नसावा. पण ५ रु मिळणार आणि करायचं काहीच नाही, हे त्याला समजलं 

मुलगा : काका, चला 

मुलगा म्हैस घेऊन निघाला. मी म्हशीची ढाल करून, तिच्या उजव्या बाजूनी रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. इतका धुव्वाधार ट्रॅफिक असूनही मी मजेत रस्ता ओलांडत होतो. काही वाहन चालकांनी म्हशीकरता कर्कश्य हॉर्न वाजवले, काहींनी म्हशीला मनात शिव्या दिल्या असतील. आम्ही थाटात पलीकडे पोहोचलो. मी मुलाला ५ रु दिले आणि आभार मानले. पलीकडे ४ वयस्कर रस्ता क्रॉस करायला उभेच होते. मला इतक्या आरामात रस्ता ओलांडतांना बघून, सगळेच मुलाला म्हणाले – अरे आम्हाला पण पलीकडे सोड. आम्ही २ – २ रु देऊ. लगेच मुलानी म्हैस मागे वळवली आणि सगळे म्हशीच्या आडोश्यानी पलीकडे निघाले. मला हे बघतांना मजा वाटली. मी जवळच्या बस थांब्यावर जाऊन बस ची वाट बघत बसलो.

रस्त्यावरचा ट्रॅफिक मगाशी होता, तसाच टॉप गिअर मधे होता. सहजंच माझं लक्ष पलीकडून येणाऱ्या म्हशीकडे गेलं. २ वयस्कर म्हशीच्या आडोशाने रस्ता क्रॉस करत होते. म्हशीच्या फेऱ्या सुरु झालेल्या बघून मला मजा वाटली आणि लक्षात आलं, की, म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, या सारखा सुरक्षित पर्याय नक्कीच नाही. तेवढ्यात त्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं व त्यानी आनंदानी हात हलवला. बहुदा मनामध्ये मला थँक्स म्हटले असेल. मी पण हात हलवून त्याच्याशी संवाद साधला. तेवढ्यात माझी बस आली आणि मी आत चढलो.

नंतर साधारण महिनाभर माझी जा- ये स्कुटरनीच सुरु होती. स्कुटर असली, की, माझा जाण्यायेण्याचा रस्ता थोडा बदलतो.

आज बायको स्कुटर घेऊन बावधनहून लवकर घरी गेली, त्यामुळे मला बसनी जायचे होते. मुलीकडून निघालो आणि चालत मेनरोडला पोहोचलो. साडेसात ची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या दोन्हीबाजूनी सुसाट गाड्या धावत होत्या, सगळीकडून हेडलाईट डोळ्यावर येत होते, कर्कश्य हॉर्न वाजत होते. काही टू व्हीलरवाले उलटीकडून येत होते. काही फुटपाथवरून येत होते. थोडक्यात म्हणजे, पुण्यातल्या कुठल्याही हमरस्त्याचं चित्र समोर होतं. चित्रातला एक रंग मिसिंग आहे, हे पटकन लक्षात आलं. जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करतांना कुणीच दिसत नव्हते. मी मनात म्हटलं, हे गेले कुठे? तेवढ्यात माझं लक्ष थोडं पलीकडे उभ्या असलेल्या म्हशीकडे गेलं आणि म्हशीबरोबरच्या मुलाचं माझ्याकडे गेलं. मला बघताच मुलांनी हात उंचावला आणि ओरडला, ‘काका, चला पलीकडे सोडतो. फ्री मध्ये, पैसे द्यायचे नाही’.

माझ्या डोक्यात महिन्यापूर्वीच्या घटनेची ट्यूब पेटली, आपण याला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचे ५ रु दिले होते.

मुलगा मला थांबा म्हणाला आणि धावत जवळच्या फुलवाल्याकडून एक फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आला. मला गुच्छ देऊन त्यानी खाली वाकून मला नमस्कार केला व म्हणाला, काका चला.

आम्ही म्हशीच्या आडोशाने रस्त्यावर उतरलो आणि चालायला लागलो. महिन्यापूर्वी गेलो होतो, तेव्हा म्हैस थोडी बिचकत होती. आज ती एकदमच कंफर्टेबल वाटत होती. आपल्याकडे सिग्नल तोडणारे, उलटे येणारे, फुटपाथवर गाड्या घालणारे जेवढे कंफर्टेबल असतात तेवढीच.

चालता चालता —

मी : अरे म्हशीला घेऊन इकडे काय करत होतास? आणि मला हा गुच्छ कशाकरता?

मुलगा : काका, गेल्या वेळेला आपण भेटलो होतो, त्या दिवसापासून मी रोजच इथे असतो. आणि रोजचं तुमची वाट बघत होतो.

मी : कशाकरता?

मुलगा : तुम्हीच मला हा मार्ग दाखवला. संध्याकाळी रोज म्हशीला घेऊन इथे येतो आणि रस्ता क्रॉस करणाऱ्यांची मदत करतो, मला पण छान पैसे मिळतात. गेल्या १० दिवसांपासून ह्याच रोडवर आता ८ म्हशी सोडल्या आहेत. घरचे सगळेच म्हशींबरोबर इथे निरनिराळ्या चौकात येतात, व २- ३ तास थांबतात. रोजचे म्हशीमागे ८० – १०० रु मिळतात. ह्या वेळेला म्हशींना काहीच काम नसते. त्यांची खाण्यानंतरची शतपावली होते. रात्री त्यांना झोप पण छान लागत असेल. त्यामुळे दूध पण वाढले आहे.

मी : ट्रॅफिक कमी असेल तर ट्रिपा मिळत नसतील!

मुलगा : काका, क्रॉस करणारी पब्लिक कायमच असते. आणि ट्रॅफिक कमी असतांना गाड्यांवाले जास्तच स्पीडनी आणि वेड्यावाकड्या गाड्या मारतात. त्यामुळे माझ्या ट्रिपांना मरण नाही. अगदीच दुपारी किंवा रात्री ९ नंतर मीच येत नाही.

मी : वा, क्या बात है!

तेवढ्यात आम्ही पलीकडे पोहोचलो. तिथे ५- ६ वयस्कर स्त्री – पुरुष उभे होतेच. मुलानी लगेच त्यांना माझी ओळख करून दिली – ह्या काकांनीच मला ही म्हशीची कल्पना दिली. वगैरे.

मी मनातून आनंदलो व देवाचे आभार मानले.

सगळ्यांनीच मला थँक्स दिले. त्यातल्या तिघा जणांनी मला बाजूला घेतले व मुलाला सांगितले, ‘आम्ही पुढच्या ट्रिप ला येतो. तू जा पुढे’.

एक जण (मला) : तुम्ही आमचा व आमच्या घरच्यांचा फार मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. आता घरून बाहेर पडतांना बायको बजावते, ‘म्हैस असेल तरच रस्ता क्रॉस करा. २ -५ रु जाऊ देत’.

दुसरी व्यक्ती : पूर्वी रोज रस्ता ओलांडताना समोर म्हशीवर बसलेले यमराज दिसायचे. आता त्यांची म्हैसच बरोबर असते, त्यामुळे एकदम ‘बी – न – धा – स’.

तिसरी व्यक्ती : आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढच्या मीटिंगला आम्ही तुम्हाला बोलावू. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्हाला नक्की यायचे आहे. तुमची म्हशींची कल्पना म्हणजे – तोड नाही. फोन नंबर ची देवाण घेवाण झाली.

त्यांना बाय करून मी बस स्टॉप वर पोहोचलो. तिथे बसायला नवीनच बाक केले आहेत. बाकावर बसलो आणि कल्पनेच्या दुनियेत पोहोचलो ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

पुढच्या काही दिवसांनंतरची वर्तमानपत्रे मला दिसायला लागली ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

# ‘सिनियर सिटिझन्सच्या मदतीला म्हशी सरसावल्या’

पुण्यातल्या रस्त्यांवर चालणे ‘मौत का कुंवा’ मधे गाडी चालवण्याइतके धोकादायक होते. तुम्हाला कोण आणि केंव्हा उडवेल, ही चालणाऱ्यांच्या मनात सतत धास्ती असायची. म्हशीचा आडोसा घेऊन चालतांना लोकांची ही धास्ती आता संपली आहे. खाली निरनिराळ्या चौकातले वयस्कर मंडळींना घेऊन रस्ता क्रॉस करणाऱ्या म्हशींचे फोटो होते.

 # ‘रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्स ना रामराम’

बहुतेक रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स हद्दपार झाले आहेत. रस्त्यांवर ठराविक अंतरांवर म्हशींची जा – ये सुरु असल्यामुळे वाहनांच्या वेगावर आपोआपच वचक बसला आहे. ‘वाहने सावकाश चालवा, पुढे स्पीड ब्रेकर आहे’ ह्या पाट्या जाऊन, ‘म्हशी पुढे आहेत’ अशा पाट्या आल्या आहेत.

# ‘आर्थोपेडीक क्लिनिक मधली गर्दी ओसरली’

रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स काढल्यामुळे वाहन चालकांचे पाठीचे व कंबरेचे दुखणे यात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

# ‘शाळा चालकांची म्हशीला पसंती’

शाळा सुटल्यानंतर लहान मुले रस्ता ओलांडताना वाहनांची नेहेमीच दशहत असायची. शाळेनी शाळा सुटतांना शाळेसमोर २ म्हशी तैनात कराव्या, अशी पालकांनी शाळा चालकांकडे मागणी केली आहे. बहुतेक शाळा चालकांनी याला मंजुरी दिली आहे.

# ‘म्हशींना सर्वच शहरांमध्ये डिमांड’

सर्वच मोठ्या शहरांमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकरता म्हशींची मदत घेणार. पाहणी पथके पुण्यात दाखल.

# वर्षातली सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

मीडिया संशोधकाच्या शोधात!!!

काहीतरी गोड आवाजामुळे माझी तंद्री मोडली. शेजारी बसलेली मुलगी सांगत होती, बस येतेय, चला. लांब बस दिसत होती. मी उठून पुढे आलो. बाजूला म्हशीच्या ट्रिप सुरु होत्याच. तेवढ्यात बस आली. मी म्हशीकडे बघून तिला बाय केलं आणि बसमध्ये चढलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम भी चलो… हम भी चले… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘तुम भी चलो… हम भी चले…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

तुम भी चलो, हम भी चले ••• 

आज वर्ष झालं. तो एक धाडसी निर्णयच होता. थोडा वेगळा समजायला, पचायलाही. खर तर तारेवरची कसरतच होती सर्वांची. ते एक जगावेगळ आव्हानच होत. अगदी शिवधनुष्य पेलण्याएवढे कठीण.

खरच या निर्णयात निर्णय घेणारे आणि त्या निर्णयाला संमती देणारे, कोणा कोणाचे कौतुक करावे कळतच नाही. सर्वांचेच कौतुक.

यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे सर्वांनी एकमेकांचा विचार केला, मुख्य म्हणजे मुलांचा विचार केला. शेवटी आई वडीलच ते. जेथे मुलांचा प्रश्न येतो तेथे सहज तडजोड करण जमत त्यांना. अनेक न पटणारे विचार सहज पटतात. आपला कम्फर्ट झोन सोडून या वयातही * adjust * करायला तयार होणे, म्हणजे कौतुकच आहे. नाही का?

आज देशमुखांकडे *celebration* आहे. अजय अनिता अनय खास अमेरिकेहून आले आहेत.

अनय खूप खुश आहे. दोन आजी, आजोबा सर्व एकत्र भेटले, म्हणून आनंदात आहे. दिवसभर दोन्ही आजींबरोबर *पाच तीन दोन* पत्त्यांचा खेळ सुरू आहे.

अजय अनिता बाबांबरोबर बसून घरात काही चेंन्जेस करण्यात बिझी आहेत.

उद्या सर्वांना अष्ट विनायक दर्शनाला जायचे आहे. त्याआधी काही काम उरकरायची आहेत.

हीच ती तारीख १ जानेवारी २०२३ 

माझ्या चांगली लक्षात आहे.

ताईचा फोन आला होता, आणि तिने अजय अनिताच्या प्रस्तावाबाबत सांगितले होते.

ताईने जे सांगितले होते, ते असे••• ती म्हणाली••••

आज सकाळी सकाळी अजयचा फोन आला.

फोन घेता घेता आत्ता अमेरिकेत किती वाजले असतील? हा हिशेब नेहमी प्रमाणेच मनातल्या मनात झाला.

अजय म्हणाला, ••••

आई!! बाबा आहेत ना. मग फोन स्पीकर वर टाक. तसेही आम्ही नेहमीच फोन स्पीकर वर टाकतोच. कारण मुलाचा, सूनेचा आणि त्याहून महत्वाचा म्हणजे नातवाचा आवाज ऐकायचा असतो. अर्धवट मराठी, इंग्रजी एक्सेंट मधील मराठी ऐकायचे असते. हा एनर्जी डोज मिळाला की आमचा दिवस मजेत जातो.

बरे असो,

मी म्हटलं, ••• काय रे काही विशेष? सर्व ठीक आहे ना.

अनिता म्हणाली, ••• 

आई बाबा!! सर्व ठीक आहे. एका महत्वाच्या विषयावर तुमच्या बरोबर बोलायचे आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आम्ही विचार करतोय. आज विषय काढायचाच, अस ठरवलंय.

आता ही मुलं काय बोलणार आहेत?

आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघीतल.

बाबा म्हणाले, ••••

अग!! बोल बेटा. बिनधास्त सांगा / विचारा.

काय बोलायचे आहे?

अनिता म्हणाली, ••••

बाबा! माझ्या आईचा प्रश्न आहे हो. आता वर्ष झालं माझ्या बाबांना जाऊन, पण आई अजूनही सावरलेली नाही. अबोल स्वभावामुळे मैत्रीणी नाही. एकटेपणा जाणवतोय तिला. सारख काही तरी सुरूच असत. बरं! येथे यायला तयार नाही. आम्ही सारखं तेथे येऊ शकत नाही.

आम्हाला तुमच्या दोघांची, आईची काळजी असते. आमच्या समोर आमचा वर्तमान, भविष्य आणि तुम्ही सर्व, अशा तीन प्रकारच्या गोष्टी नेहमीच महत्वाच्या असतात. आमची जबाबदारीच आहे ती.

आज आम्ही पैसा भरपूर कमवतोय, पण तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. याचा खेद आहे.

अजय ही खूपदा अस्वस्थ होतो. पण आता या middle of the phase मध्ये काय धरावं?? आणि काय सोडावं?? कळत नाहिये.

खूप दिवसांपासून आमच्या मनात एक विचार येतोय, की तेथे म्हणजे भारतात एक मोठे घर घ्यावे. तेथे तुम्ही दोघे आणि माझी आई, तुम्ही सर्व एकत्र राहाल, तर आमची काळजी कमी होईल.

आम्ही तशी एक सोसायटी शोधली आहे, जेथे ज्येष्ठांच्या वयाप्रमाणे, गरजेप्रमाणे सर्व सोई उपलब्ध आहेत. Residential doctor आहे. इतर चांगल्या दवाखान्यां बरोबर त्यांचं टाय अप ही आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ज्येष्ठांच्या अनेक activities पण तेथे आहेत.

तुम्ही दोघे *आनंदवन * ही सोसायटी बघून याल का??

आज आम्ही तुमच्या बरोबर हा विषय बोलतोय, उद्या परवा आई बरोबर बोलू. तुमच्या सर्वांचे मत महत्वाचे आहे. तुम्हाला आणि आईला पटलं तर तसं करता येईल. तुम्ही दोघांनी विचार करावा.

ताई भाऊजी विचारात मग्न झाले. ते मधून मधून अनिताच्या आईला भेटायला जातात. त्या एकट्याच असतात, म्हणून त्यांची काळजी सर्वांनाच असते. एकदा ताई अनिताला म्हणाली ही होती, •••

अग!! आम्ही सारखं जाऊ शकत नाही. तेंव्हा एखादा फ्लॅट येथेच आमच्या सोसायटीत तुझ्या आईसाठी घेतला तर बरे होईल.

आता एकदम एकत्र रहायचा प्रस्ताव??

आता किती तरी वर्षांपासून आम्ही दोघेच आहोत. खरं सांगू का?

कोणाकडे दोन दिवस राहणे किंवा कोणी दोन दिवस घरी रहायला आले, तरी सर्व रूटीन गडबड होत. केंव्हा एकदा आपल्या घरी जातो असं वाटतं.

आणि येथे तर नातं आहे. तेही नाजूक. दूर राहून विचार पूस करणं वेगळं पण एकत्र राहण. जमेल का? चोवीस तास एकत्र राहण सोपं नक्कीच नाही. कोणाबरोबर ही नाही. या वयात प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत सेट झालेली असते. ती बदलणे जमेल का?

हा प्रश्न मंगलाताईंनाही पडेलच. नाही का?

भाऊजी म्हणाले, •••

मुलांच्या दृष्टीने त्यांनी सुचवलेला निर्णय तसा बरोबर आहे. आता आपली काळजी त्यांना आहेच.

अग!! तू आजूबाजूला बघतेस ना, परिस्थिती कशी बिकट आहे ते?

आपली मुलं आपल्याला विचारतायेत. हे कमी आहे का? विचार करूया.

खरंय, ••••

*घरात जिवंत माणसाबरोबर नीट बोलायला मुलांना वेळ नसतो. आणि मेलेल्या माणसाला हलवून हलवून विचारतात तू बोलत का नाहीस म्हणून?? मेल्यानंतर दान धर्म पण भरपूर करतात. **

समाजातील हे एक कटू सत्य तर आहेच.

बरे असो,

बघूया मंगला ताई काय म्हणतात ते??

पूढच्याच आठवड्यात सर्वांची एकत्र video conference झाली. आपापसात चर्चा झाली. एकत्र राहण्याचे प्लस माइनस पोइंट डिस्कस झाले.

मुलांच्या दृष्टीने, त्यांच्या सोईसाठी, ताई भाऊजी, मंगलाताई सर्वांनी होकार दिला.

लगेचच येथे चार बेडरूम चां मोठा फ्लॅट घेतला. सर्व सोयी केल्या, स्वयंपाकाला मावशी, इतर कामांना मावशी, एका ड्रायव्हरची सोय झाली. सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. सर्व सुख सोयींनी सज्ज घर अजय अनिताने ताईच्या हातात दिले.

काही झालं तरी अनिताच्या आईकडे लक्ष देणे गरजेचे आहेच.

म्हणतात ना, •••

**Communicating is one thing but your tone and your way while communicating is everything. ** 

हे सर्व व्यवस्थित पार पडल‌, कारण अजय अनिताने योग्य पद्धतीने हा प्रश्न हाताळला. योग्य शब्दात सद्य परिस्थिती, प्रश्न व त्या प्रश्नाचे समाधान सांगीतले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांच्या दृष्टीने हा निर्णय कसा बरोबर आहे, हे समजावून सांगितले.

तसंही म्हणतात ना, •••

Every one goes through bad days/difficult phase in life. Don’t give up. Pause, Rest, Rethink, Reset and Restart. Always choose the best option and move on.

It is your decision not condition which shape your life.

तसेही आपण सर्व नेहमीच तडजोड करत असतोच. घरी, बाहेर, नोकरीत सर्व ठिकाणी. त्याशिवाय आपण समाजात आनंदाने जगूच शकत नाही. आयुष्याचे गणित सोडवताना आपण असे बरेच निर्णय घेतो, ज्याचे side effects आपल्याला नंतर फेस करावेच लागतात.

आज उच्च शिक्षित अजय आपल्या बुद्धी, शिक्षणाच्या जोरावर अमेरिकेत नोकरी करातोय. जेंव्हा अजय अमेरिकेत गेला, तेंव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला होता ताईला. एका मध्यम वर्गीय कुटुंबासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तर त्याच आनंदाचा side effect ताई भाउजींना आज दिसतोय.

माझ्या म्हातारपणी माझी मुलं माझ्या जवळच असावी, हा विचार आपल्या स्वार्थासाठी कोणतेही आईवडील कधी करतील का‌??

भारतात नोकरी करणारी मुलं तरी नेहमीच आईवडिलांच्या सेवेला हजर असतात का? कसं शक्य आहे ते?

अशी अपेक्षा करणे बरोबर आहे का?

तेंव्हा आज अजय अनिताने आपल्या आईवडिलाना जो alternate option दिला तो सर्वांनी सहर्ष स्वीकार केला.

खूपदा *वेळ/ काळ / वय * आपली परीक्षा घेत असत.

आता पूढे काय? या प्रश्नाने आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य, अनेक ज्येष्ठांचे जीवन चिंताग्रस्त करून ठेवले आहे.

मग हा निर्णय बरोबरच आहे.

अस म्हणता येईल का? निर्णय धाडसी आहे. पण सर्वांच्या प्रश्नाचे समाधान होत असेल तर काय हरकत आहे?

भाऊजी म्हणजे एक Balanced व्यक्तिमत्व सद्य परिस्थितीला ओळखून, दुसऱ्यांना समजून, समजावून योग्य निर्णय घेणार.

आज त्याच धाडसी निर्णयाचे *success Celebration* आहे.

*आत्मविश्वास *तडजोड * माझ्या बरोबर तुम्ही पण आनंदी रहाव. * 

*तुम भी चलो हम भी चले. चलती रहे जिंदगी।**

 हा विचार कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. समाधान शोधू शकतो.

This Positive approach/ attitude and confidence can solve any problem.

शेवटी असंच म्हणावस वाटत, •••

**ए वक्त तू कितना भी परेशान करले हमें, पर याद रख••• किसी मोड़ पे तुझे भी बदल देंगे हम। **

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभं करोती की मालिका…? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ शुभं करोती की मालिका…? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

शुभं करोती कल्याणं

आरोग्यम धनसंपदा..

हातपाय धुऊन देवासमोर दिवा लावण्याची, शुभंकरोती म्हणण्याची संध्याकाळची वेळ आजकाल कुणी पाळत नाही. कारण यावेळी घराघरातील ‘इडियट बाॅक्स’ रंगीबेरंगी प्रकाशाच्या दिव्यानी भिंती उजळवून टाकतो. त्यातील भावना प्रेक्षकांच्या हृदयात घर करतात. नायकांबरोबर रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळीक निर्माण करतात. एखाद्या करमणूकप्रधान मालिकेतील कलाकार हसतात तेव्हा प्रेक्षकही हसतात. मालिकेत नायिका रडते तेव्हा प्रेक्षक भगिनींचा पदर, रूमाल डोळ्याला लागतो. खलनायिका कट कारस्थान करते तेव्हा प्रेक्षक रागाचं टोक गाठतात. मध्यमवर्गीय कौटुंबिक कथानक भाव खातं. तर भक्तीचं कथानक भक्त तयार करतं. संतांच्या मालिका सुरू झाल्या की भक्तगणात पूर्वीच्या तुलनेत नक्कीच वाढ झाली. त्याचबरोबर ऐतिहासिक मालिका प्रचंड लोकप्रिय होतात. याचं कारण भारतात दूरदर्शन पाहणार्‍यांची संख्या खूपच जास्त आहे. इथं दूरदर्शन हे मनोरंजनाचं सर्वात मोठं माध्यम आहे. भारतातील प्रेक्षकांच्या भावनांचा ‘रिमोट कंट्रोल’ मालिकातील पात्रांच्या हातात आहे. पात्रांच्या उद्याच्या स्वप्नाबरोबर आपलं स्वप्न रंगवणं हे भारतीय प्रेक्षकांकडून सवयीने घडतं. प्रेक्षकांचा स्वभाव घडण्यात मालिकांचा प्रचंड मोठा हात आहे.

‘रामायण’ ‘महाभारत’ ‘मालिका यायच्या तेव्हा प्रेक्षक दूरदर्शन संचाला हळदी कुंकू लावायचे. रामाचा प्रवेश झाला तर औक्षण करायचे. तेव्हा लोक घराबाहेर पडत नसत. भक्ती उफाळून यायची. रावण आणि कौरवांचा राग मनामनात रूजला गेला.

काही वर्षांपूर्वी सासू सुनेवर आधारीत एक मालिका सुरू होती, तेव्हा मालिका सुरू असताना नवरा घरी आला तर त्याने त्याला हवं ते आपापलं घ्यायचं. त्यावेळी चहा, पाणी असं काहीही मागायचं नाही. असा कित्येक घरातला नियम होता.

अलिकडच्या काही मालिकांमधील घरात ज्याचं चुकतं त्याला शिक्षा करण्याचा नियम असतो. प्रत्यक्षात एका सुनेने कामात असल्याने सासर्‍यांचा फोन उचलला नाही तर त्यानी दहा दिवस तिचा फोन काढून घेतला.

अशा गंमतीजमती आजूबाजूला घडतात तेव्हा प्रेक्षकांची मानसिकता बदलली की बिघडली असे प्रश्न पडतात. मोबाईलवर मालिका पाहणार्‍यांची संख्या सुद्धा मोठी आहे. सतत हा आरशासारखा दिसणारा दूरदर्शन, त्याचंचं प्रतिबिंब प्रेक्षकांच्या मनावर पडावं याची पुरेपूर काळजी घेतो. मग प्रेक्षकांची मानसिकता बिघडली तर…?

पात्रांची चिंता – मालिकेतील पात्राचा अपघात झाला. पात्र बदलण्याची वेळ आली, आर्थिक अडचणी आल्या तर प्रेक्षकांची चिंता वाढते. त्याचं आता काय होणार या विचाराने ते चिंताग्रस्त होतात.

मानसिक शक्तीचा र्‍हास – स्वत:च्या वास्तव दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष होतं. मालिका बघून दैनंदिन जीवनातील कडवट आठवणीना विसरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं वास्तवापासून दूर पळण्याची सवय लागते. खर्‍या आयुष्यातील समस्या हाताळण्याचं कौशल्य विकसित होत नाही. मानसिक शक्तीचा र्‍हास होतो.

भावनांचा उद्रेक – मालिकातील आरडा ओरडा, सतत रडणं, सततची षडयंत्र बघून विनाकारण भावना तीव्र होतात. विशेषकरून याचा ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम होतो. तसेच मालिकांमधे दिसणारी घरं, कपडे, उदयोग, करोडो रूपयांमधील व्यवहार सगळं ऐकून समाधानाची भावना निर्माण होत नाही. ईच्छा अतृप्त राहायला लागतात. कारण मालिकांमधील सर्व भौतिक सुखांबरोबर प्रेक्षक तुलना करायला लागतात. नात्यातलं प्रेम कळेनासं होतं. धारणांचं निश्चयीकरण व्हायला लागतं. सासू अशीच असते. सून तशीच असते. अशा धारणा तयार होतात.

मालिका म्हणजे बाजारपेठ – मालिका प्रेक्षकाना गुंतवून ठेवतात. मधेमधे येणार्‍या जाहिराती प्रेक्षकांच्या मनात घर करतात. जाहिरातीत असणारी नायिका मुलाना भरपूर प्रोटीन मिळावं, त्याचे कपडे पांढरे शुभ्र असावेत म्हणून काळजी घेते. पाळण्यातल्या बाळापासून आजोबांपर्यंत सगळ्यांचा मोह वाढतो. बाजारातून आपसूक त्या वस्तू घरोघरी येतात. मालिका या जणू बाजारपेठेचं एक साधन होय. खरतर मालिकांमधून एखादी कथा जितकी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेते. तितकीच ती प्रेक्षकांची तार्किक विचार करण्याची क्षमता नष्ट करते. मालिका पाहण्यात महिलांचा वेळ वाया जातो असं प्रत्येकीला वाटतं पण तरीही मालिका पाहणं कुणी बंद करत नाही. म्हणून मालिका आपल्या खिशावर राज्य करते. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकते. आपण काय पाहतो त्यापेक्षा कंपन्याना काय विकायचं आहे हे मालिकांची बाजारपेठ ठरवते.

टी आर पी – मालिकांमधे सगळ्याच भावनांचं अतिभयंकरीकरण केलेलं दिसतं. एक नायिका असते. एक खलनायिका असते. एक अति सुसंस्कृत, तर दुसरी टोकाची वाईट असते. एकटीचे निर्णय कधीच चुकत नाहीत. ती नेहमी अति सहनशील असते. दुसरी सतत कट कारस्थानच करत असते.

उदा: ठरलं तर मग मधील सायली आणि प्रिया. आपल्या आजुबाजुला सायली इतकं सहनशील, विचारी, कार्यतत्पर, कधीही न चुकणारी अशी सून आणि प्रिया इतकं टोकाचं कट कारस्थान करणारी अशी सून कुठल्याच घरात नसते. पण अशा सुना, त्यात सासू अशी जिला एक सून प्रचंड आवडती असते. दुसरी प्रचंड नावडती असते. असं वास्तवात नसतं. पण घराघरात तसंच दिसायला हवं असतं. म्हणून मालिकांचा टी आर पी वाढतो.

उपाययोजना –

मालिकांची निवड – स्क्रीनच्या मालिकांच्या ढिगार्‍यातून आपल्या आवडीची, सोयीची एखादी मालिका निवडायला हवी. सगळ्या मालिका बघायलाच हव्यात का याचा सारासार विचार करायला हवा. त्यामुळे वेळ वाचेल. चुकीची मानसिकता, भावनिक गोंधळ, विचारांचा ओव्हर लोड कमी करता येईल.

उत्तम समीक्षक व्हा – मालिकांतील पात्रांचा अभ्यास करता येतो. मालिका समीक्षकाच्या भुमिकेतून बघता आली पाहिजे. तार्किक विचार जागृत ठेवले पाहिजेत. भावनांच्या आहारी जाणं थांबवता आलं पाहीजे.

नो टी. व्ही डे – आठवड्यातून किमान एक दिवस टी व्ही न बघण्याचा निर्णय घ्यावा. त्या दिवशी इतर छंदाना वेळ द्यावा. नैसर्गिक डोपामाईन वाढीवर लक्ष द्यायला हवं.

चांगली वाईट मालिका – मालिका बघताना त्यातून चांगलं काय घेता येईल याचा विचार करावा. त्यातील पात्रांवर चर्चा करावी. पात्र वाईट असेल तर ते का वाईट आहे. अशा विचारांची मुलांबरोबर देवाणघेवाण व्हावी.

काय टाळायचं – रडक्या मालिका बघणं बंद करावं. एकटं बसून मालिका बघू नये. झोपण्यापूर्वी थ्रिलर मालिका बघू नये.

च्युईंगम जसं चव संपली तरी चघळली जाते अगदी तसंच मालिका ‘मानसिक च्युईंगम’ सारख्या चिवट होईपर्यंत चघळल्या जातात. शेवटपर्यंत चिकटून राहतात. रबरासारख्या ताणतात. तशी प्रेक्षकांची नाती पण ताणली जातात. नात्यातील कडवटपणा चिघळला जातो. त्यामुळं मानसिक वेळ खर्ची पडतो. वेळ कधीच उलट चक्र फिरवत नाही. वेळ, विचार याना मालिकांच्या ताब्यातून या स्वत:च्या हातात घ्यायला हवं. तरच मन खर्‍या दिव्यातील प्रकाशात तेजोमय, भक्तीमय होईल हेच खरं..!!!

२०२४ – २५ मधील विविध मीडिया रिपोर्ट्स नुसार…

॰ भारतात सुमारे ९० कोटी लोक टी व्ही पाहतात.

॰ भारतात जवळपास २३ कोटी कुटुंबाकडे टी. व्ही आहे.

॰ भारतात ‘स्मार्ट टी व्ही आणि इंटरनेट’ असं जोडून पाहणार्‍यांच्या संख्येत ८५% वाढ झाली आहे.

॰ भारतातील ग्रामीण भागात सध्या प्रेक्षकांची संख्या ४८ दशलक्ष कुटुंबाच्या पार गेली आहे.

॰ भारतातील ६०% पेक्षा जास्त मालिका या नकारात्मक भावनांवर आधारीत असतात.

॰ भारतात पुरुषांच्या तुलनेत मालिका बघण्याचं महिलांचं प्रमाण साधारणपणे ७० ते ७५ % जास्त आहे.

॰ महाराष्ट्रात मराठी मालिका पाहणार्‍यांचे प्रमाण ९०% आहे.

॰ एक सामान्य भारतीय कुटुंब दिवसाला सुमारे ३. ५ तास टी व्ही पाहतं.

॰ विशेषत: जवळजवळ ७५ % महिला प्रेक्षक दुपारी १ ते ५ या वेळेत टी. व्ही पाहतात.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उरते फक्त आमसुलाची चटणी… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ उरते फक्त आमसुलाची चटणी…  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

दुपारचा चहा करताना खट् खट् खट् आवाज आला म्हणून खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या कंपाउंडमधील भरगच्च हिरव्या पिसाऱ्याच्या फणसाच्या फांद्या तोडण्याचं काम चाललं होतं. झाडावरची पाखरं आजूबाजूला आसरा घेऊन भयचकित नजरेने पाहत होती. थोड्या वेळाने झाडाची भलीमोठी, फणस लगडलेली, जाडजूड फांदी कडाकडा आवाज करत कोसळली. जमीन शहारली. पाखरं भीतीनं दूर उडून गेली. साठ- सत्तर वर्षांचं भारदस्त भक्कम झाड रीतं मुकं झालं. कावळेबुवांनी चार दिवस उरलेल्या झाडावर बसून कर्कश्श निषेध व्यक्त केला. धिटुकल्या चिमण्यांनी पुन्हा काडी- काडी जमवून राहिलेल्या बुंध्यावर घरटी बांधायला घेतली.

सत्तर वर्षांची जुनी घनदाट हिरवी सोबत आठवून काही जण हळहळले. तर खिडकीसमोरची जागा मोकळी झाली म्हणून काही जण सुखावले. काही जण ट्रकभर ओंडके घाईघाईने घेऊन गेले आणि मी माझ्या कामाला लागले.

अनेक दिवस पुढे- पुढे ढकललेलं कपाट आवरायचं काम काढलं होतं. किती ॓पसारा ॔ साठवलाय मी त्यात! आवडलेल्या कवितांच्या जुन्या वह्या, ज्ञानेश्वरीच्या निरूपणाची वर्तमानपत्रातील कात्रणं, मैत्रिणींची पत्र, काही अर्धवट लिहिलेले लेख, काही छापून आलेले लेख, वाचकांची खुशीपत्र… सगळं हाताळताना जाणवलं ॓संध्याकाळ ॔ झालीय. हा मनाचा हिरवा पिसारा आता त्या समोरच्या झाडासारखा छाटून टाकायला हवा. आठवणींच्या फांद्यांवरचे फणसभरले भार कमी करायला हवेत. या साऱ्या पसाऱ्यातून मोकळं व्हायला हवं… सारं कळतंय, पण…

फोन वाजला म्हणून उठले. मैत्रिणीचा फोन होता. मगाशी कपाट आवरायला काढायच्या आधी तिलाच फोन केला होता सहज गप्पा मारायला म्हणून. पण तो उचलला गेला नव्हता. ती म्हणाली,  ॓अगं गाढ झोप लागली होती सुस्तावून. आज आमच्या पुतणसुनेच्या वडिलांचा तेरावा दिवस होता. हल्ली क्रिया कर्म सगळं बाहेरच उरकून घेतात आणि जेवायला हॉलवर बोलावतात. घरात कुणी पसारा घालत नाहीत .॔

 ॓आजारी होते का ते ?॔

 ॓ फार नाही. पण वृद्ध होतेच. सगळा संसार झाला होता आणि लोळत पडण्यापेक्षा… त्यांच्याबद्दलच्या आठवणींची थोडीफार उजळणी झाली आणि सगळेजण जेवायला बसले. इथले तांबे केटरर्स प्रसिद्ध आहेत. अळूच्या भाजीपासून आमसुलाच्या चटणीपर्यंत सगळे पदार्थ अगदी उत्तम झाले होते. सगळेजण मुकाट्याने पण मनापासून जेवले.

 हल्लीच्या धावपळीच्या गतिमान जगात गेलेल्या माणसाच्या थोड्याफार आठवणी तेवढ्या उरतात. कुणाला घराचं म्हातारपण संपल्याचा आनंद वाटतो. झाड तुटल्याची हळहळ असली तरी मोकळं झाल्याची भावना असतेच!॔ मी म्हटलं.

दोन दिवसांनी संध्याकाळी फिरताना वाटेत एक बाई भेटल्या. त्यांचे शेजारी आमच्या चांगल्या परिचयाचे. ते आजोबा नुकतेच गेल्याचं कळलं होतं. त्यांचा एक मुलगा- सून अमेरिकेत असतात. सहज म्हणून त्या बाईंना विचारलं की, ते गेले तेव्हा मुलगा- सून आली होती का?

  ॓छे हो, इतक्या लांबून, एवढा खर्च करून कसं येणार? रजेची व्यवस्थाही व्हावी लागते ना. इकडच्या नातवंडांनी त्यांना तिकडे सगळं काही व्हिडिओवर दाखवलं. त्यांनी तिथून नमस्कार केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा. शिवाय इथेही लोकांना ताटकळत बसावं लागलं नाही.

  ॓आता आलीत का ती दोघं? बऱ्याच वर्षात या दोघांची भेट झाली नाहीये म्हणून विचारलं .॔

  ॓आली आहेत. कालच आम्ही तेराव्याला जाऊन आलो. सगळं कॉन्ट्रॅक्टच दिलं होतं. कॉन्ट्रॅक्टरनेच फोल्डिंग टेबलं मांडून, त्यांच्या मोठ्या हॉलमध्ये पानं वाढली.

  ॓चांगलंच की. आता आपल्यालासुद्धा वाकून वाढायला होत नाही.॔

  ॓ पण जेवण मात्र छान होतं.

आमसुलाची चटणी इतकी टेस्टी झाली होती आणि अळूची भाजी… .॔

माझा आपोआप वासलेला आऽऽ बंद करून त्यांना अडवून मी म्हटलं,  ॓एकदा सवडीने भेटायला जाईन त्यांच्याकडे. मुलगा- सून आहेत ना अजून?  ॔

  ॓ हो तर. अहो, आता आईचा प्रश्न सोडवावा लागेल. वाटण्या होतील. थोडी रजा घेऊनच आलीत ती दोघं .॔

मनात म्हटलं ॓बरोबर. तिकडे अमेरिकेत समृद्धीचा भरगच्च हिरवा फणस दारात डोलत असला, तरी इथल्या फणसाचे गरे हक्काचेच.. .॔ 

चालता- चालता एका मैत्रिणीच्या बहिणीची आठवण झाली. तिच्या बहिणीने आयुष्याच्या उत्तरार्धात घरच्या दोन साड्यांव्यतिरिक्त बाहेर जाण्यासाठी फक्त एकच साडी ठेवली होती. नाटकाला जायचं असो की कुठे समारंभाला, तीच एक साडी आणि एक पर्स. बस्.. बाकी सारं तिनं स्वहस्ते वाटून टाकलं होतं.

  ॓नाही बाई… इतकं निरिच्छ व्हायला जमणार नाही.॔ माझ्या मनानं प्रांजळ कबुली दिली. लगेच दुसऱ्या मनानं फटकारलं

॓ इतकं नाही, पण तो गोतावळ्यासारखा इतक्या वर्षांचा पसारा जमवला आहेस, तो तरी मार्गी लावायला हवा. कळलीय ना किंमत? उरते काय तर फक्त आमसुलाची चटणी! ती सुद्धा चविष्ट झाली असली तरच थोड्याफार आंबट गोड आठवणी… .॔ 

दुपारचा चहा करताना सवयीनं खिडकीतून बाहेर पाहिलं तर, समोरच्या फणसाच्या एका उंच गेलेल्या शेलाट्या फांदीवर एक फणस वाऱ्याने डुलत होता. त्याच्या खालची भक्कम फांदी तोडल्यामुळे आता तिथे पोचून फणस काढणं अशक्य होतं,  ॓असू दे. डुलू दे त्याला. त्याची वेळ झाली की तो अलगद गळून पडेल. मग होईल फांदी मोकळी.॔ मनात म्हटलं.

॓आज आत्ता चहा झाल्यावर तीऽऽऽ कपाटाची आवराआवरी करायची ना?॔ दुसऱ्या मनानं आठवण करून दिली.

  ॓बरं आठवलं. उद्या ऑफिस- ग्रुपमधल्या एका मैत्रिणीच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला जायचं आहे. लवकरच निघायला हवंय. खूप दिवसांनी सगळ्याजणी भेटल्या की मजा येते. आत्ताच सगळी तयारी करून ठेवायला हवी .॔

आणि तेऽऽऽ आवराआवरीचं काम? दुसऱ्या मनानं थोपवलं.

असू दे. बघू नंतर. होईल ते कपाट मोकळं, त्याची वेळ झाली की. नाही तरी चटणीसाठी आमसूलं भिजत घालायला अजून किती वेळ आहे ते कुणाला माहितेय?

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चुस्कीत… ☆ सौ राधिका – माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका – माजगावकर- पंडित

??

☆ ‘चुस्कीत…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

अ बाले-अ मालेची गोड पोरगी… चुस्कीत‘..

” आता तुमीच सांगा ताई हिला, कार्टी साळंला जायाचं नाई म्हणतीया. हीचा बाप जाताना मला बजावून गेलाय, पोरीला खूप शिकव आनी शानी कर म्हणून. पण ही बया रोज काईनाकाई कारण सांगून, दांडी मारतीया. साळा जवळ तर हाय ” सावित्रीची तक्रार चालूच होती.

सुंद्रीचे गाल फुगले, नाक उडवून ती म्हणाली, “मला चालायचा लई म्हणजे लई कंटाळा येतो बाई.”

सावित्रीचा स्फोट आणि सुंद्रीची पळवाट ऐकून, मी तेव्हां काहीच बोलले नाही. पण दुपारी शेजारच्या उनाडक्या करणाऱ्या पोरांना मी म्हणाले, “चला रे पोरांनो मी तुम्हांला एक गोष्ट सांगते.” 

टाईमपास करणाऱ्या सुंद्रीने कान टवकारले आणि ती पळतच मुलांच्या घोळक्यात येऊन बसली. काऊचिऊ, भोपळा म्हातारी गोष्टी ऐकण्याचं वय सरलं होतं मुलांच.

काल वाचनात आलेली ‘चुस्कित’ माझ्या मनांत रेंगाळत होतीच.

“ऐकताय ना मुलांनो? मी तुम्हांला चुस्कीत नावाच्या, तुमच्या एवढ्या मुलीची गोष्ट सांगणार आहे. नऊ वर्षाची चिमूरडी गोड पोरगी आहे ही.. पण-पण-आपल्या सारखे पायच नाहीत हो तिला ” 

हे ऐकल्यावर गंभीर झालं बालमंडळ. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

“ अरेरे! असं कसं झालं? मग ती चालणार कशी? शाळेत जाणार कशी? “ नीरज कळवळला.

 माझं गुऱ्हाळ मी पुढे चालूच ठेवलं. “ असं बघा, तुम्ही आम्ही सुंद्री सगळे धडधाकट आहोत. हातपाय दिलेत देवानी आपल्याला. दुर्दैवाने चुस्कितला जन्मतःच पाय नव्हते. ‘अ मची’कडे म्हणजे तिबेटी वैद्याकडे लेह मधल्या डॉ. कडे पण तिचे आई-बाबा तिला घेऊन गेले होते.

“मग झाले कां बरे तिचे पाय? “ मकुची उत्कंठा वाढली होती.

“नाही रे बाळा! उपचाराच्या पलीकडची केस होती ती” माझ्या उत्तरातही दुःख होतं.

दिवसामागून दिवस चालले होते. चुस्कीत बाळ मोठी होत होती. तिच्या दुःखी मनाला तिचे ‘अ बाले’ म्हणजे तिचे बाबा दिलासा देऊन म्हणायचे, ” बेटा चित्र किती सुंदर काढतेस तू, तुझ्या ‘अ मालेने, ‘ आईने शिकवलेली शिवणकला आहे नां तुझ्या अंगात.. ती तू वाढव. ” 

बाबांच्या प्रोत्साहनाने तिची उमेद वाढली. तिच्या मनाने पुढचं पाऊल उचललं. खिडकीतून दिसणारं आभाळ, आकाशपक्षी तिला खुणाऊ लागले आणि ओहोळाचं नितळ पाणी तिच्या निळ्या डोळ्यात सळसळू लागलं. उत्साहाचं वारं अंगात शिरलं आणि चुस्कीतने पेन्सिल उचलली. मग काय! कागदावर चित्ररेषा उमटू लागल्या. आणि बोलबोलता निसर्ग चित्र तयार झाली. टाईमपास करीत, इकडे तिकडे वेळ न घालवता त्या पोरीने उत्साहाने आपल्या बोटातली कला कागदावर साकारली.

– – हे सांगताना माझी नजर सुंद्रीकडे गेली. तिची मान खाली गेली होती. “समझनेवाले समझ गये थे l”

मी तिच्याकडे बघत गालांतल्या गालांत हसून म्हणाले, ” मला कुठे देवानी पाय दिलेत असं म्हणून रडत न बसता या पोरीने वेळ वाया न घालवता, शिक्षणही घेतलं आणि आपल्या अंगातले, कलागुण वाढवून उमद्या मनाने ती पुढेपुढे चालतच राहिली. बाबांनी आणलेल्या व्हीलचेअरवर बसून ती आसमंतातला आनंद घेत असताना मे-लेले म्हणजे तिच्या आजोबांकडे येणारा अब्दुल तिचा जिगरी दोस्त झाला होता. कारण त्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून चुस्कीतची शाळेत जाऊन शिकण्याची, परीक्षा देण्याची स्वप्नकहाणी सरांना सांगितली. शालेय जीवनाची चुस्कीतची ओढ अब्दुलने जाणली. त्या हुशार मित्रानी तिच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचे उपायही शोधले.

.. अब्दुलची आणि तिची निर्मळ मैत्री म्हणजे नितळ निसर्गझराच होता. शालेय जीवनाची चुस्कीतची ओढ अब्दुल जाणून होता त्या हुशार मित्रानी तिच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचे नुसते उपायच शोधले नाहीत तर काय सांगू तुम्हाला! तिच्या वर्ग मित्रांनी सळसळत्या उत्साहाने हा उपक्रम, यशस्वी रीतीने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, पारही पाडला होता बरं का मित्रांनो!

ओवीने विचारले, ” म्हणजे काय केलं हो बाई त्यांनी? “

“ सांगते ना! हंसतखेळत ही बालमंडळी म्हणजे तिचे वर्गमित्र एकत्र आले. चुस्कीतच्या घरासमोरच्या ओहोळाच्या बाजूचे दगड धोंडे साफ करून त्यांनी सपाट रस्ता तयार केला. हो! त्यांची गोड मैत्रीण त्या सपाट रस्त्यावरून सहजपणे व्हीलचेअर वरून शाळेत जाणार होती ना! आणि शाळेचं, शिक्षणाचे तिचं स्वप्न पूर्ण करणार होती. सपाट रस्त्यावरून सहजपणे तिला जाता यावं म्हणून, “साथी हाथ बढाना” हे गाणं म्हणत मित्रांनी तिला ही सप्रेम भेटच दिली होती.

कोपऱ्यातली एक चिमणी चिवचिवलीच.. ” पण बाई तो ओहोळ! व्हीलचेअर घेऊन पाण्यावरून कशी काय जाणार चुस्कीत? ”

तिचा प्रश्न ऐकून माझ्या मनाने कौल दिला, ‘ रंगतीय! रंगतीय चुस्कीतची गोष्ट चांगलीच रंगतीय ‘. कारण मुलं कान देऊन ऐकत होती. माझ्या लक्षात आलं बालश्रोतृवर्ग पोहोचलाय चुस्कीतच्या जगात.

सुजाता पद्मनाभन आणि अनुवादक उत्कर्षा महाजन यांना मनोमन हात जोडले. कारण त्यांनीच तर ही सुंदर बालकथा आपल्या कसदार लेखणीतून उतरवलीय.

ती मी वाचली म्हणून तर मला मुलांपुढे मांडता आली होती. सुजाताताईंची कथा सांगताना मला आणखीनच हुरूप आला.

चिवचिवणाऱ्या चिमणीला जवळ घेऊन मी म्हणाले,

“बरं का चिमणे, तुझं म्हणणं बरोबर आहे रस्ता तर छान तयार झाला. एक काम पूर्ण झाले पण ओहोळावरून जायला लाकडी पूल सुद्धा तयार केला तिच्या दोस्तांनी. ”

हे ऐकून सगळ्या चिमुकल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

“ आणि बरं का मित्रांनो! मे-लेलेच्या मदतीने अशा प्रकारे चुस्कितचा शालेय प्रवास महाराणीसारखा व्हीलचेयरवर बसून सुरू झाला. पण दोस्तांनो! आधी मला सांगा मे-लेले म्हणजे कोण हो? “

मुद्दामच मी प्रश्न विचारला होता. मुलांची स्मरणशक्ती जागृत करून ही मंडळी किती गोष्टीशी समरस झाली आहेत हे मला बघायचं होतं. तर काय दणदणीत कोरस आवाज आला… “मेमे -ले म्हणजे आमच्या आजोबांसारखे चुस्कितचे आज्जोबा, हो नां बाई?

– – – मी धन्य झाले, ‘ सुजाता पद्मनाभन’ ह्यांच्या कसदार लेखणीतून, ‘उत्कर्षा महाजन’ ह्यांच्या अनुवादातून सादर झालेली ही भावस्पर्शी बालकथा बालकांच्या नसानसांत भिनली होती. माझ्या सांगण्याचे सार्थक झालं कारण माझ्याजवळ येऊन सुंद्री माझ्या कानांत कुजबजली, “बाई मी पण उद्यापासून शाळेत जाईन.

तिला जवळ घेत मी म्हणाले, ” सुंद्राताई पटलं ना तुम्हाला शाळेचं महत्त्व? अगं शाळा नुसती साक्षर नाही तर परिपूर्ण खऱ्या अर्थाने शहाणं करते. नुसती माहिती नाही तर आपल्या रोजच्या आणि पुढच्या आयुष्याचं महत्त्व पटवून देते. मनातली भीती जाऊन आपल्यात आत्मबळ आणि आत्मविश्वास निर्माण करते. ” 

सुंद्रीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मी पुढे म्हणाले “बेटा खूप शिक. ज्ञानाने मनाने मोठी हो. वडिलांचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण कर आणि आईचे पांग फेड “ 

कोपऱ्यात उभी राह्यलेली सावित्री पुढे येऊन माझ्या कानाची लागून म्हणाली, “बाई तुमची मात्रा बरोबर लागू पडली बघा! बाकी सोनारानं कान टोचलेले बरे पडतात म्हणायचे. चला आता आणखी नवीन काम शोधते. तेवढेच चार पैसे मिळतील, पोरीला शिकवाया पदर बांधायाच हवा मला. ” 

तिची लगबग, उमेदबघून माझ्याही नजरेत कौतुक उमटलं. मी चुस्कीतचे मनोमन आभार मानले.

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंग प्रेमाचा… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ रंग प्रेमाचा… ☆ श्री सुनील देशपांडे

“माझा चॉईसच चुकला”

‘प्रेमा तुझा रंग कसा’ या वसंत कानेटकारांच्या नाटकामध्ये बबडी जेव्हा स्वतःच्या वडिलांना असे म्हणते तेव्हा ते उत्तरतात..

“रोमियो ज्युलीयटने सुद्धा लग्न करून संसार थाटला असता तर त्यांनाही असंच वाटलं असतं की आपला चॉईसच चुकला” 

जगातील अनेक मोठमोठ्या प्रसिद्ध प्रेमकथा सांगितल्या जातात त्या बहुतेक प्रेमकथांमध्ये त्या दोन्ही प्रेमिकांचे लग्न आणि संसार झाल्याचा त्यात उल्लेख नाही.

… आम्ही ४८ वर्षे आमच्या आयुष्याचा सहप्रवास एकत्रितपणे केला. हुssश्शsss…

जवळपास पहिली चाळीस वर्षे आमची (अर्थात दोघांचीही) सुद्धा बबडीच्या मानसिकतेमध्येच गेली.

चाळीसाव्या वर्षानंतर हळूहळू बदल घडत गेला. आता आम्हाला सहवासाची, एकमेकांच्या बरोबरच रहावे अशी जाणीव प्रकर्षाने होऊ लागली… प्रेमाचा साक्षात्कारच झाला म्हणा ना!

बहुधा अजून दोन वर्षे अशीच प्रेमाच्या साक्षात्कारात जातील.

.. त्यापेक्षा जास्त प्रेम उचंबळून येऊ नये म्हणूनच बहुतेक ५० व्या वर्षानंतर, त्याच दोन्ही नवरा बायकोने पुन्हा लग्न करण्याची पद्धत असते असे म्हणे!

ठीक आहे.

… वाट पाहू अजून चार वर्ष.

… मग पुन्हा चॉईस चुकल्याची भावना आणि भांडणे यांना तोंड द्यायचं आहे? नवीन लग्न झाल्यासारखं?

ठीक आहे. त्याआधी लग्नापूर्वीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून घेऊ!

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ८ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ८ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

वेळ…

वेळ (Time) या विषयी अनेकांचे अनेक समज आणि गैरसमज आहेत. हल्ली तर लोकं वेळ मिळत नाही असे न म्हणता वेळ भेटतं नाही असे म्हणताना पाहतो…! काही ठिकाणी ती बोलीभाषा असू शकेल, पण ते खरे बोलतात असे मला आता वाटायला लागले आहे… , कारण लोकांना अनेक गोष्टी करायला वेळ मिळत नाही, पण गर्दी मात्र सर्वत्र आहे…

वाहतुकीच्या माध्यमांमध्ये प्रचंड वैविध्य आणि प्रगती झालेली असताना, दोन शहरांमधील अंतर कमी झालेले नसले तरी या माध्यमांमुळे प्रवासाचा वेळ नक्कीच कमी झाला आहे…

तरीही लोकांना एकमेकांकडे जायला, भेटायला, बोलायला, आपुलकीने चौकशी करायला, शिळोप्याच्या गप्पा मारायला वेळ नाही…

आज इतकी भयानक परिस्थिती आहे की कित्येक दिवसांत लोकांनी आपल्या शेजाऱ्याचे तोंड पाहिलेले नाही… , कित्येक दिवसांत मनुष्य आपल्या प्रियजनांना भेटलेला नाही, कित्येक दिवसांत त्याने मित्रांसोबत टपरीवर किंवा एकमेकांच्या घरी जाऊन चहा प्यायलेला नाही, अशा अनेक न केलेल्या गोष्टी आपल्याला आता आठवतील… , हो न? हातात फोन आहे, म्हणून मनुष्याने दूरच्या माणसांची सोडून देऊ, शेजारच्या माणसाची चौकशी केली आहे असे म्हणणे आता धाडसाचे ठरू शकेल…

पटतंय ना?

पूर्वी आळीमध्ये, चाळींमध्ये गप्पांचे फड पडायचे, मग एकेकाच्या घरातील लाडू, चिवडाचे, पोह्याचे डबे रिकामे व्हायचे, इकडे डबे रिक्कामे होत असताना, तिकडे माणसांची मने मात्र भरून पावायची… , माणसांना माणसांचा उबदार सहवास लाभायचा… , यातून मनुष्याच्या मनात असलेल्या अनेक गोष्टींचा, तणांचा आणि तणावांचा कळतनकळत निचरा व्हायचा…!

– – कारण… तेव्हा वेळ मिळत होता असे नाही, तर लोकं एकमेकांसाठी वेळ काढत होती… , त्यांना माणुसकीतील आनंद अत्यावश्यक वाटतं होता…

… आज लोकं वस्तू, त्यांचा संग्रह आणि त्याची जाहिरात करण्यात आनंद मानत आहेत… , असो…!!

आज आपल्या लक्षात येत आहे की मनुष्य, त्याने स्वतःच निर्माण केलेल्या जीवघेण्या स्पर्धेच्या चक्रव्यूहात आणि वेळेच्या कचाट्यात अडकत चालला आहे… , तो इतका अडकला आहे की तो आता फक्त घडाळ्याच्या काट्याप्रमाणे नुसता पळत चालला आहे… , त्याने जगायचे कधीच सोडून दिले आहे…

अनेकांची वेळ साधता साधता मनुष्य त्याच्यासाठी, खऱ्या स्वार्थासाठी, वेळ काढणे विसरून गेला आहे…

.. बरेच दिवसांत त्याने सूर्योदय पाहिलेला नाही…

.. द्वितीयेच्या चंद्राची कोर पाहिलेली नाही…

.. लेकराला कुशीत घेऊन चांदोमामा दाखवलेला नाही…

.. पतीचा किंवा पत्नीचा हात हातात घेऊन मूक संवाद साधलेला नाही…

.. आईच्या कृश झालेल्या मांडीवर डोके ठेवलेलं नाही…

.. बाबा, तुम्ही खूप कष्ट केलेत आता तुम्हाला हवे ते करा असे म्हटलेले नाही…

कारण…

कारण.. वेळ नाही..

या वेताळाला वेळीच आवर घालून आपण आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढू…

चालेल ना?

– लेख क्र. ८

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares