डिसेंबरचे शेवटचे दिवस आले की आठवतं… अरेच्चा नवीन वर्षाच्या संकल्पनांची यादी करायला हवी. पहाटे लवकर उठायचं, नामस्मरण करायचं, फिरायला जायचं, योगासनं करायची, नवीन पुस्तकं वाचायची वगैरे वगैरे…
दरवर्षी हे करायचे ठरवून ठेवलेले असते. पहिल्यांदा खूप छान वाटतं.
आठ.. दहा दिवस त्याच कौतुक वाटतं. नंतर आपल्याच मनाला त्या संकल्पनांचं बंधन वाटायला लागतं.. कटकट वाटते.. करायचा कंटाळा येतो… हळूहळू मग ते मागचं पडत जातात… आणि काही दिवसात संकल्प विसरायलाच होतात… मध्येच त्याची आठवण आली की.. आपण ते पार पाडले नाही म्हणून मन दुखावतं.. खंत करतं.
पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? …
संकल्प न करताच मागच्या वर्षी अनेक चांगल्या गोष्टी सहजपणे आपण केलेल्या आहेत. त्या आठवायच्या.. अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा…
त्याचा आपला आपण आनंद घ्यायचा. दुसरे कौतुक करतील म्हणून वाट नाही पाहायची..
कोणाकडून अपेक्षा नाही ठेवायची
इथे कोणाला वेळ नाही
कोणाच्या काही लक्षातही येत नाही
त्यात काय विशेष…
असही इतरांना वाटत असेल
म्हणून आपणच आपली पाठ थोपटायची…
खळखळून हसून आनंद घ्यायचा.. आणि मन मोकळं करायचं
आपलं आपल्याशीच बोलून…
आपल्या हातून झालेल्या चुकाही आठवायच्या… त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची…
आपली आपण सुधारणा करायची..
चुकलं कुठे… हे पण समजून घ्यायचं…
ठीक आहे…
इतक आदर्श कोणी नसतं प्रत्येकाकडून होतातच…
असं म्हणून स्वतःला क्षमा करायची… तसंच दुसऱ्यांनाही क्षमा करायची…
त्यातून धडा मात्र घ्यायचा..
थोडं थोडं शहाणं व्हायचं…
स्वच्छ मनानी नववर्षाच्या स्वागताला तयार व्हायचं…
आपणच आपला हात हातात घेऊन स्वतःला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या…
हो… बरोबर वाचलतं…
करून बघा…
आपल आपल्याला आश्वासक तसचं आव्हानात्मक वाटतं…
खरचं…
नाहीतरी आपल्या वागण्यावरच पुढच वर्ष कसं जाणार आहे हे अवलंबून असतं… पटल ना तुम्हाला..
अरे हो… अजून एक सांगते..
मुख्य म्हणजे सख्या हरी विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं…
हे काय नवीन… आधी कधीच गेलो नाही म्हणताय…
मग आता करा की सुरुवात
लक्षात ठेवायच आपलं ऐकून घेणाऱा त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.
कधीही न बदलणारा जगात तोच एकमेव आहे.
त्याची साथ असली की पुढचं वर्षच नाही… तर आयुष्य सुखाचे जाणार आहे.
मग ठरलं तर…
या जाऊन कुठल्याही देवळात…
नाना रुपात तोच तर सगळीकडे असतो…
आपला तारणहार..
त्याच्या पायावर डोक टेकवून त्याचा आशीर्वाद घेऊन करा नवीन वर्षाची सुरुवात..
ऐंशी नव्वदीच्या वयातही काही माणसे एवढ्या कार्यक्षमतेने काम करताना दिसतात की त्यांचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही! लेखनामुळे माझा अशा अनेक व्यक्तींशी योगायोगाने संबंध आला. आणि त्यांच्यासोबतचे नाते कायमचे जोडले गेले. ही सगळी मंडळी पितृतुल्य आणि मातृतुल्य आहेत. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांची स्मरणशक्ती, त्यांचे लिखाण करणे या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी देखील आपली ऊर्जा त्यांनी राखून ठेवली आहे. आपल्या वागण्या बोलण्यातून आजही ते इतरांना आनंद देत आहेत. या मंडळींजवळ ज्ञानाचा आणि अनुभवाचा मोठा खजिना आहे आणि जो जो त्यांच्या जवळ जाईल त्याला ते मुक्तहस्ताने तो वाटत असतात. कधी कधी त्यांचे हे वागणे पाहून स्वतःचीच लाज वाटते की आपले वय त्यांच्यापेक्षा बरेच कमी असताना खूप काही विसरतो, अनेक गोष्टी करायच्या राहतात, अनेक गोष्टी करायचा कंटाळा करतो. पण जेव्हा या व्यक्तींशी बोलणे होते तेव्हा मात्र एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. मग मी नव्या उत्साहाने कामाला लागतो.
पाच सहा वर्षांपूर्वी माझा एक लेख इंदापूर येथील आदरणीय प्रतिभाताई गारटकर यांच्या वाचनात आला. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आज त्यांचे वय ९० वर्षांपेक्षा अधिक आहे. परंतु आजही त्या वाचन लेखनामध्ये आपला वेळ घालवतात. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांनी समर्थ रामदासांवर लिहिलेले श्रीसमर्थ रामदास जीवनकाव्य हे संगीत चरित्र अतिशय सुंदर आहे. यावरच आधारित असलेल्या रामदासायन याचे विविध ठिकाणी प्रयोग होत असतात. पुण्यात प्रयोग असला की त्या आवर्जून आम्हाला कळवतात. त्यांनी पती निधनानंतर आपले संपूर्ण कुटुंब सांभाळले, शेती सांभाळली, मुलांना वाढवले आणि हे करत असताना शिक्षिका म्हणून एक उत्तम असा नावलौकिक प्राप्त केला. त्या कधी पुण्यात आल्या तर मला आवर्जून कळवतात, फोन करतात. आम्ही त्यांना भेटायला जातो किंवा कधी कधी वेळ असेल तर त्यांना भेटण्यासाठी इंदापूरला देखील जातो. त्यांना भेटून आल्यानंतर एक वेगळे समाधान मिळते. या वयातही त्यांचे वागणे बोलणे पाहिले की हेवा वाटतो कुठेही काही विसरणे नाही, बोलताना समोरच्या व्यक्तीशी अत्यंत प्रेमाने बोलतील, त्याची प्रेमाने विचारपूस करणे, आदरातिथ्य करणे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्या मला आपला लहान भाऊ मानतात. त्यांचा मुलगा प्रदीप गारटकर म्हणजे इंदापुरातील एक लोकप्रिय नेतृत्व आहे. राजकारणात असला तरी तो संयमी आणि शांत व्यक्तिमत्त्वाचा आहे.
मराठवाड्यातील कवी बी रघुनाथ यांच्या कन्या आदरणीय सुधाताई नरवाडकर या लेखनामुळे अशाच माझ्या संपर्कात आल्या. त्या लातूरला अनेक वर्षे शिक्षिका होत्या. आता त्यांचा मुक्काम नांदेडला असतो. त्यांची मुले, सुना आणि मुली उच्चशिक्षित आहेत आणि डॉक्टर आहेत. बरेच लेखन त्यांनी केले आहे. आज त्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. परंतु या वयातही त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना जाणे, लेखन करणे सुरूच असते. त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. उत्कृष्ट कविता आणि गझल लेखन त्या करतात. मी जेव्हा या म्हणजे डिसेंबर (२०२५)महिन्यातील पाच तारखेला लातूरला एका लग्नासाठी म्हणून गेलो होतो त्यावेळी त्यांना मी इथे एका लग्नासाठी आलो आहे म्हणून मेसेज केला होता. योगायोगाने त्या देखील त्यावेळी तिथे एका लग्नासाठी आले होते परंतु ज्या मंगल कार्यालयात त्या लग्नासाठी आल्या होत्या ते कार्यालय आमच्या कार्यालयापासून बरेच लांब होते मी त्यांना म्हटले की आपण कुठे आहात आपला पत्ता कळवा मी आपल्याला भेटायला येतो परंतु त्यांनी मला माझा पत्ता विचारला आणि त्या स्वतः त्यांच्या मुलीसह मला भेटायला आल्या. त्यांच्या कवितेची दोन पुस्तके त्यांनी मला भेट दिली. माझे आणि त्यांचे आई- मुलाचे नाते आहे.
कालिंदीताई हिंगे. वय वर्षे ८६. मालेगावला असतात. तेथील प्रसिद्ध काकाणी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीनंतर वाचन लेखन त्यांनी सुरूच ठेवले. अनेक कार्यक्रमांना जाणे येणे, अनेक व्यक्तीची संपर्क साधणेही सुरूच होते. योगायोगाने माझेही लेखत्यांच्या वाचनात आले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्या माझ्याशी जोडल्या गेल्या. त्या कायमच्याच. मी त्यांना कालिंदी मावशी म्हणतो. साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या हेमंत सोमण या क्रांतिकारक भावाचे चरित्र सगळी माहिती मिळवून प्रसिद्ध केले. त्याने गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. त्यावेळीची सगळी कागदपत्रे मिळवून, अभ्यास करून त्यांनी हे चरित्र लिहिले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. नंतर एक दोन वेळा मालेगावला जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी घरी जाऊन त्यांना भेटूनही आलो. अत्यंत उत्साही असे हे व्यक्तिमत्व!
नाशिकचे अशोककाका धर्माधिकारी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन आजच्या या पदापर्यंत पोहोचले. आता वय ८५ वर्षे असेल. पण अजूनही उत्साहाने कार्यरत आहेत. नियमाने वाचन लेखन करतात. दरवर्षी एका विषयाला वाहिलेला दिवाळी अंक ते आणि सौ काकू असे दोघे मिळून काढतात. यावर्षी त्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांवर दिवाळी विशेषांक काढला आहे. त्यांचे दिवाळी विशेषांक अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य असतात. समाजसेवेची त्यांना विशेष आवड आहे. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास आदिवासी पाड्यांवर जाऊन भगिनींना साड्या वाटप करणे, मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवणे यासारखे उपक्रम ते राबवतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते चित्र काढायला शिकले आणि आता उत्कृष्ट चित्र काढतात. आपल्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत नाशिकला गेलो म्हणजे मी आवर्जून त्यांना भेटतो.
रमेशचंद्र कुलकर्णी. पितृतुल्य व्यक्तिमत्व! वय वर्षे ८८. आता कल्याणला असतात. ३५ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात प्रथम वर्ग अधिकारी, कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी सेवा दिली. लेखनामुळेच माझा आणि त्यांचा संपर्क आला. त्यांनी स्वतः माझ्याशी संपर्क साधला. २०२० मध्ये त्यांनी पत्रसंवाद एक व दोन अशी दोन पुस्तके प्रकाशित केली. यात त्यांनी विविध मान्यवरांना लिहिलेली अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वाचनीय अशी पत्रे आहेत. हा एक प्रकारचा खजिनाच त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. संतसाहित्याचे त्यांचे नियमित वाचन असते. साहित्य संमेलनास दरवर्षी उपस्थिती देतात. पर्यटन आणि बागकामाची आवड आहे सामाजिक कार्याची आवड आहे. संगीत ऐकणे, नाटक पाहणे, जुनी मराठी हिंदी गाणी ऐकणे ही त्यांची आवड आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत पुणे विद्यार्थी गृहात शिक्षण घेऊन ते मुख्य कार्यकारी अभियंता पदापर्यंत पोहोचले. ते एकटेच राहतात. आजही या वयात ते स्वतः सर्व कामे करतात. त्यांच्या सहवासात एक दिवस राहण्याचा योग आला. त्यांचा एकंदरीत उत्साह स्मरणशक्ती पाहून खरोखरच आश्चर्य वाटले. समर्थ रामदास स्वामी विचारधन या पुस्तकाचे त्यांनी संपादन केले आहे त्याचप्रमाणे कुलकर्णी कुलवृत्तांत व वंशावळ या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण लेखन या वयातही केले आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी त्यांनी मला आवर्जून आमंत्रित केले होते. त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे, त्या त्या रसिकांना त्यांनी स्वखर्चाने पोस्टाने आपली पुस्तके पाठवली आहेत.
वाचन लेखनातून असेच माझ्याशी जोडले गेलेले आणखी एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे अनिल नारायण कुलकर्णी, सांगली. आज त्यांचे वय साधारणपणे ८४ वर्षे तरी असावे. अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आणि हसतमुख! आधुनिकतेशी स्वतःला जोडून घेणारे, नव्या पिढीशी, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे असे हे व्यक्तिमत्व! भारत आणि जगभ्रमंतीचा अनुभव, कार्पोरेट विश्वातील काम या सगळ्यांमुळे त्यांच्या लेखनाला एक समृद्धी प्राप्त झाली आहे. समाजसेवेची आवड, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे काम ते अत्यंत आवडीने आणि उत्साहाने आजही करत आहेत. त्यांनी त्यांचे ‘ तरंग अंतरंग ‘ हे पुस्तक मला पाठवले. या पुस्तकात कथा, ललित लेख आणि व्यक्तीचित्रण आहे. जीवनावर आणि जगण्यावर भरभरून प्रेम करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित होते.
प्रवीण कारखानीस, मुक्काम पोस्ट अंबरनाथ, जिल्हा ठाणे. वय वर्षे ८० पेक्षा अधिक असावे. एकटे राहतात आणि उत्साहाने सर्व कामे करतात. महाराष्ट्र बँकेतून मोठ्या अधिकार पदावरून ते निवृत्त झाले. लेखनाच्या माध्यमातूनच माझा त्यांचा संपर्क झाला. एक दिवस त्यांचा मला भ्रमणध्वनी आला आणि मग आमच्यातील बोलणे सुरू झाले. त्यांनी मला त्यांचे पुस्तक दिव्यत्वाची जेथे प्रतीती हे पाठवले. अजून माझी त्यांची प्रत्यक्ष भेट नाही पण त्यांच्या पुस्तकातून मल जे समजले ते असे की ते अत्यंत उत्साही आणि हरहुन्नरी व्यक्ती आहेत. त्यांनी फार पूर्वी आपल्या मोटरसायकलवरून काही देशांचा प्रवास केला आहे. त्याचप्रमाणे पर्यटनानिमित्त विविध देशांची भ्रमंती त्यांनी केली आहे. या प्रवासाविषयी, प्रवासात भेटलेल्या माणसांविषयी, निसर्गाविषयी त्यांनी भरभरून लेखन केले आहे. अष्टचक्री रोमायण आणि भ्रमंती देशविदेशांची, ज्योतीने तेजाची आरती, हावडा ब्रिजवरून अशा पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी पाकिस्तानातही भ्रमंती केली. मंजिल ए मकसूद या पुस्तकात त्यांनी पाकिस्तानचे दर्शन घडवले आहे. अनेक खेळाडू, गीतकार, संगीतकार, गायिका, चित्रपट कलावंत इत्यादींवर त्यांनी लेखन केले आहे. अशा व्यक्तींबद्दल ते सुरुवातीला अधिकाधिक जाणून घेतात, त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क आला असेल तर त्याचाही उल्लेख आपल्या लेखात करतात. अशा रीतीने त्यांची व्यक्तिचित्रणे अत्यंत रोचक, अभ्यासपूर्ण आणि वाचनीय झाली आहेत. दरवर्षी साहित्य संमेलनाला हजेरी लावतात. यावर्षीही साताऱ्याला होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी ते जाणार आहेत. लवकरच त्यांना भेटायला जाण्याचा विचार आहे. त्यांच्याशी बोलता बोलता मी सहज दिव्यत्वाची जेथ प्रचिती असं म्हणालो. पण त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले की मूळ शब्द प्रतीती असा आहे. या सगळ्या मंडळींना आज या वयातही नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यांचे वय म्हणजे केवळ एक आकडा, एक संख्या. एज इज जस्ट अ नंबर. खरे तर अशा प्रत्येक व्यक्तींवर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो आणि ठरवले तर एक स्वतंत्र पुस्तक देखील!
अशा अनेक व्यक्ती आहेत. अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत. परंतु आज फक्त काही मोजक्या व्यक्तींबद्दलच लिहिता आले. अशा व्यक्तींना पाहिले किंवा भेटले की एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. झाडावरून खाली पडलेले पिकलेले पान सुद्धा सुंदर दिसते तसेच सौंदर्य आणि गोडवा या व्यक्तींनी आपल्या व्यक्तिमत्त्वात टिकवून ठेवला आहे. जाळीदार पिकलेले पान सुंदर दिसते, तशा अनुभवाच्या जाळीमुळे ही व्यक्तिमत्वे समृद्ध आहेत.
“तजुर्बा है उन्हें दुनिया का, वो धूप में सफेद हुए बाल नहीं,
वो तो उस रास्ते का नक्शा हैं, जहाँ अभी हमें चलना बाकी है।”
कविवर्य बा भ बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे दिव्यत्वाची जेथे प्रतीती, तेथे कर माझे जुळती अशी ही सगळी व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांना प्रणाम.
“व्यक्तिमत्त्व एवढे सरळ व तिखट ठेवा की चांगल्या माणसांना त्याची चव व वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे”. _
आज दादा वहिनीला श्री. श्रीधर कुलकर्णी यांचेकडे लग्नाचे आमंत्रण आहे. कुलकर्णी काका म्हणजे आमचे चुलत घराणे. खूप श्रीमंत. पैशाचा धबधबा पडतो की काय त्यांच्या घरी? ? असं वाटतं. त्यातच मुलांचीही बिझनेस मधे मदत झाली. म्हणतात ना, “पैसा पैशाला ओढतो” ते काकांकडे बघून पटतं.
म्हंटलं तर मुलं खूप शिकलेली नाहीत. पण पिढी दर पिढी चालत आलेला बिझनेस मात्र उत्तम सांभाळतात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेली ही मुलं, आपल्या बिझनेस मधे चोख आहेत. सरस्वती खूप प्रसन्न नसली तरी लक्ष्मीने मात्र आपला वरदहस्त त्यांच्यावर छान ठेवलेला आहे. श्रीमंतीची सर्व लक्षणे दिसतात. मोठा बंगला, दारासमोर चार गाड्या, घरात नोकर माणसे, म्हणजे घरच्या बायकांना साधारण बायकांसारखे काम करायची गरज पडत नाही. उठणे बसणे पण अशाच लोकांबरोबर.
पैशाचा माज चढला आहे, असं म्हणता येणार नाही. कदाचित ते सहज बोलत असावेत, वागत असावेत. पण ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना कुठे तरी खटकतं, मनाला लागतं, असे आमच्या दादाचे नेहमी म्हणणे असते. वहिनीला काही ते पटत नाही व आवडत तर त्याहुनही नाही.
मागे दादाच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला दादा वहिनी त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना मिळालेली वागणूक वहिनी अजूनही विसरलेली नाही. प्रत्त्येक भेटीची वहीनीची काहीतरी खास आठवण आहेच. नातं असलं तरी सांपत्तिक परिस्थिती मधे तफावत आहे. तरीही काही महत्वाच्या कार्यक्रमात दादा वहिनी जातातच. आपलं नातं टिकवण्यासाठी, कसलाही विचार न करता हजेरी लावतात.
तेंव्हा अनघा लहान होती, ती पण आई बाबांबरोबर जायची. काही प्रसंग तिच्या बालमनावर चांगले कोरले गेले होते. घरी अलमारी भरून क्रोकरी असताना, आम्हा तिघांना वेगवेगळ्या आकाराच्या स्टील प्लेट, वाटी मधे चिवडा दिल्याचा प्रसंग तिला आठवतो. दुर्लक्ष केलेले ही आठवते. त्यानंतरची आईची कुरकुर, वाईट वाटणे, कधी कधी आईचे रडणे, तिच्या चांगले लक्षात होते. एकदा पूजेला गेले असताना, पूजेचे महत्व कमी व श्रीमंत लोकांचा कौतुक समारंभच जास्त वाटत होता. वहीनी खूप खुशीने तेथे कधीच गेली नाही.
दादा ची परिस्थिती सामान्य होती. येथे लक्ष्मी नाही, पण सरस्वती मात्र खूप प्रसन्न होती. दादाची मुलं शिक्षणात हुशार होती, म्हणून त्यांच्या शिक्षणाकरिता दादा वहिनीने कधी काही कमी पडू दिले नाही.
अनघा ने ग्रॅज्युएशन नंतर स्टेट लेवल, नॅशनल लेवल च्या परीक्षा दिल्या. ‘UPSC’ पास केली. आज ती पोलीस खात्यात उच्च अधिकारी आहे.
आज कुलकर्णी काकांकडे लग्नाला जायचे आहे. अनघा म्हणाली “मी पण येईन. ” ती अशा एका दिवसाची वाट बघतच होती.
अचानक तिच्या समोर फ्लॅश बॅक सुरू झाला. आईच्या डोळ्यातील अश्रु आठवले. “आपण नेहमी चांगले वागायचे” असा बाबांचा नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने आई, बाबांबरोबर जात असे.
अनघा रंगाने सावळी व जेमतेम उंची, म्हणून तिच्या वर तेथे कटाक्ष व्हायचे. ‘कसं होईल हिचे??? ‘ ही काळजी तिच्या आई बाबांपेक्षा त्यांनाच जास्त होती. त्यांच्या घरी आई बाबांकडे दुर्लक्ष करतात, ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली होती. काही दुःखं सारखं आपलं डोकं वर काढतात. तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहतात व प्रत्त्येक आठवणीबरोबर ती सल वाढतच जाते.
आई बाबा लग्नाला जायला निघाले. अनघा ऑफिस मधून सरळ हॉलवर येणार होतं. तसं अनघाला सहज सुट्टी घेता आली असती व छान तयार होऊन लग्नाला जाता आले असते. पण तिला काळया सावळ्या अनघाचा ‘रूबाब’ दाखवायचा होता. खरं तर हे असे वागणे तिच्या स्वभावात बसत नव्हते. पण जून्या प्रसंगांची आठवण व आई बाबांना मिळालेली वागणूकही ती विसरली नव्हती. आज आई बाबांना, खासकरून आईला तिची प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती. त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता.
पोलिस अधिकारीच्या युनिफॉर्म मधे अनघा हॉलवर पोचली. मस्त कडक युनिफॉर्म, त्यावर ACP rank चे लागलेले स्टार्स, डोक्यावर लावलेली cap, हातात स्टीक, चकचकीत बूट, कमरेवर बेल्ट. डोळयांवर काळा चष्मा. तिला ऑफिसकडून मिळालेल्या गाडीतून अनघा आली. लगेच ड्रायव्हर ने कारचा दरवाजा उघडला. अदबीने बाजूला उभे राहून, एक कडक सॅलूट मारला.
व्वा!!! काय शान होती अनघाची. तेथील सर्व लोक बघतच राहिले. लहान मुले तर जवळ येऊन बघू लागली. अनघाचा मोबाईल कारमधेच राहिला होता, तेंव्हा ड्रायव्हर ने तो तिला आणून दिला व पुन्हा एकदा तसाच कडक सॅलूट मारला.
हाॅलमधील सुंदर महागड्या पैठणी नेसून, दागिन्यांनी लदलेल्या, ब्युटी पार्लर मधून सरळ हॉलवर आलेल्या so called smart, श्रीमंत बायका बघतच राहिल्या. आता आकर्षणाचा केंद्रबिंदू पोलिस अधिकारी ‘अनघा’ होती.
श्रीधर काका काकू व त्यांच्या घरचे इतरही सर्व, अनघाच्या स्वागतासाठी लगेच आले. अनघाने ‘वेळ कमी असल्यामुळे मी सरळ ऑफिसमधूनच आले व मला लगेच जावे लागेल’ असे सांगितले. ‘आज सर्वांशी भेट होईल म्हणून मी आले. पुर्वी लहान असताना मी आई बाबांबरोबर येत असे, पण या मधल्या काळात मला येणे जमलेच नाही’.
तिने सर्वांची विचारपूस केली. सर्वांना आनंदाने भेटली. वर वधू ला भेटली. फोटोग्राफर ने तिचे आवर्जून बरेच फोटो काढले. आपल्यामुळे वर वधू कडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून तिने लगेच निघायचे ठरविले.
लगेच अनघाच्या जेवणाची सोय झाली. तिच्या ड्रायव्हरला ही आदराने जेवण दिल्या गेले. आई बाबा हे सर्व डोळे भरून बघत होते. आजही आईच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण ते मुलीचे कौतुक बघून, तिचा होणारा मानसन्मान बघून.
अनघाच्या आई-बाबांना लग्न घरात सर्वांसमोर मान मिळाला. आईच्या मनातील सल दूर झाली होती. अनघाचा उद्देश्य पूर्ण झाला होता, तो ही बाबांचा नियम सांभाळून, “आपण नेहमी चांगले वागावे”…
निघताना अनघा आई बाबांना म्हणाली, “आई-बाबा जास्त उशीर करू नका. अंधाराच्या आत घरी पोहचा. ”
श्रीधर काकांची पंधरा वर्षांची नात ‘राधा’ अनघा जवळ येऊन म्हणाली, “ताई मला पण तुझ्या सारखे पोलिस अधिकारी बनायचे आहे. बाबा, माझा ताई बरोबर फोटो काढा ना. तो मी माझ्या स्टडी टेबल वर ठेवेन… ”
अनघा म्हणाली, “हो का? ? मग छान अभ्यास कर. मी तुला वेळोवेळी guidance देईन…
एकंदरीत अनघाचा प्रभाव जबरदस्त होता.
“वक्त वक्त की बात हैं।
वो भी एक वक्त था ।
आज भी एक वक्त हैं।”…
आज कुलकर्णी काकांच्या ड्रायव्हर ने आई-बाबांना घरी पोहचविले.
म्हणतात ना, “Your greatest test is how you handle people who have mishandled you. “…
☆ – A light take on ‘कंटाळा’– ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆
हल्ली ना, मला सगळ्याचाच कंटाळा येतो.
सकाळी उठायचा कंटाळा,
रात्री झोपायचा कंटाळा.
उडुपी नको, पंजाबी नको,
मिसळ नको, चायनीज नको.
फिरण्याचा कंटाळा…
पण, नुसतं बसून रहायचा देखील कंटाळा!
मन रमावं म्हणून म्हणाल तर…
गाणं ऐकण्याचा कंटाळा, गाणं गायचा कंटाळा,
चित्रपटाचा आणि नाटकाचा कंटाळा,
पुस्तक वाचायचा कंटाळा, काही लिहायचा कंटाळा.
जुनं चालू ठेवायचा कंटाळा, नवं सुरु करायचा कंटाळा
नवे जिन्नस करून पाहायचा कंटाळा,
नवे जिन्नस बाहेर कुठे खाऊन बघायचा पण अर्थात…
कोणाशी जुळवून घ्यायचा कंटाळा,
कोणाशी वाद घालण्याचा कंटाळा,
कोणाला काही पटवून द्यायचा कंटाळा.
आता तर मला, ‘कंटाळा’ या शब्दाचा सुद्धा कंटाळा आला आहे.
खरं तर, ‘कंटाळा’ म्हटलं की आयुष्य एकदम सोप्पं होऊन जातं, नाही का? कशाची बांधिलकी नाही, ना जबाबदारी. कोणाला काही कारणं किंवा समर्थन द्यायची गरज नाही. मग काय, मी आणि माझा कंटाळा, अक्सर बांते करते हैं!
आता त्याचाही कंटाळा येण्याची वाट बघते. तो पर्यंत सकाळी उठायचं, जेवायचं, फिरायचं, गाणं ऐकायचं, मग ott आहेच, घरातल्यांशी वाद घालायचे, नव-नवीन काही बाही चालू ठेवायचं. थोडक्यात, त्या कंटाळ्याला लिंपून ठेवायचं. म्हणजे त्याचं अस्तित्व तर आहे, पण दिसत नाहीये!!
– – – – – –
खरं सांगायचं तर, याचं मला वैषम्य अजिबात नाहीये. ही एक मनोवस्था असावी. बऱ्याच जणांची, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या कारणास्तव होत असणार. काही वेळा ती तात्पुरती पण असू शकते. ‘कंटाळा’ या शब्दाला एखाद्या आणखी चांगल्या पर्यायाच्या शोधात मी आहे.
दिवसभरात आपण वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातो. कधी आनंद होतो तर कधी त्रास. त्यातला आनंद सहज वाटला जातो परंतु अपमान, अवहेलना, इच्छेविरुद्ध घडलेल्या गोष्टी मनात ठेवल्या जातात. खरंतर बोलल्यानं भावनांची तीव्रता कमी होते पण हीच साधी बाब आजच्या जमान्यात फार दुर्मिळ झालीय कारण बिनधास्त बोलता येईल अशा जागा राहिल्या नाहीत. प्रत्येकाला स्वतःचचे प्रॉब्लेम्स इतके आहेत की दुसऱ्यांचं ऐकायला वेळ आणि इच्छा दोन्हीही नाही. सतत मन मारल्यानं शारीरिक, मानसिक त्रास सुरु होतात. ते कमी करण्यासाठी तकलादू आधार घेतले जातात हे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार. आजारांना आग्रहाचं निमंत्रण. बहुतेकांची हीच परिस्थिती आहे. त्यात मीसुद्धा आलोच पण माझ्याकडं ‘धोपू’ आहे.
—
हा ‘धोपू’ कोण? असा प्रश्न मनात आला असणार तर माझा जिवलग. ज्याला वाट्टेल ते सांगता येतं आणि हक्कानं मन मोकळं करता येतं. चुका कबूल करता येतात. त्याच्याशी बोलल्यावर एकदम रिलॅक्स वाटतं. थोडक्यात सांगायचं तर माझा कन्फेक्शन बॉक्स.
—
आज प्रत्येकजण बेचैनी, तणाव आणि अस्वस्थता यासोबत जगतोय. दिवसातला जास्त वेळ माणसांपेक्षा मोबाईल सोबत घालवतो. सतत काही ना काही चालू असतं. या फास्ट लाईफमधली त्रासदायक बाब म्हणजे हरवलेली शांतता. जो तो पळतोय. तडजोडी करत मन मारतोय. इच्छा नसताना त्रास सहन करतोय आणि हे सगळं मनात साठवतोय मग तो राग, संताप भलत्याच ठिकाणी निघतो. बऱ्याचदा घरातल्यांवर. आपल्या मराठीत म्हण आहे ना. वड्याचं तेल वांग्यावर काढणं तसाच काहीसा प्रकार.
सकाळीच गोष्ट, नाश्ता करताना रेणूबरोबर वादावादी झाली. खरंतर कालपासूनच डोकं फिरलेलं. बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडलेल्या. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन फेल गेलं. कंपनीला ऑर्डर मिळाली नाही. वास्तविक हे टीमचं अपयश पण बळीचा बकरा मात्र मी झालो. प्रचंड संताप आला तरी गप्प बसलो. नाईलाज. आतल्या आत धुमसत राहिलो. भाजीत मीठ जास्त पडल्याचं निमित्त झालं आणि भडका उडाला.
“ईssssssssssssssssss, हे काय बनवलय”
“काय झालं”रेणू.
“घरातलं सगळं मीठ टाकलेलं दिसतयं. ”
“सॉरी!! सॉरी!! दोन मिनिटं थांब दुसरी भाजी बनवते. ”रेणू.
“राहू दे. आजचा दिवस वाईट जाणार सकाळीच तोंड खराब झालं. ”
“ओव्हर रिऍक्ट होतोयेस. ”
“एवढी वर्ष स्वयंपाक बनवतेय. अजून अंदाज येत नाही. ”
“चुकून जास्त पडलं. कधी कधी असं होतं”रेणू.
“आजकाल हे नेहमीचच झालंय. लक्ष कुठं असतं. ”
“तुझ्याकडं पाहताना विचलित होतं अन त्याहीपेक्षा प्रेमळ बोलण्यानं वाहवत जाते. मग अशा घोडचुका होतात. ”रेणूचा टोमणा जिव्हारी लागला. डोकं सटकलं. रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोललो. शब्दाला शब्द लागून जोरदार वादावादी झाली. घरोघरी नवरा-बायकोच्या भांडणात होतं तसंच इथंही झालं. खारट भाजीचा विषय बाजूला पडून भलत्याच विषयावर खडाजंगी झाली. शेवटी रेणूच्या डोळ्यात पाणी आलं पण मला त्याचं काहीच वाटलं नाही. न खाताच तणतणत हॉलमध्ये आलो तर समोर बसलेला ‘धोपू’ माझ्याकडंच पाहत होता. त्याची रोखून पाहणारी नजर अस्वस्थ करत होती. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही उलट एकटक पाहण्याचा राग आला.)
“ए, असं बघू नकोस. नजर खाली घे”मी ओरडलो पण धोपूनं ऐकलं नाही उलट शेजारी येऊन बसला. तेव्हा मला हसू आलं. तोपर्यंत डोकंही बरंच शांत झालेलं. ‘धोपू’ अजूनही माझ्याकडंच पाहत होता.
“असं बघू नकोस. माहितीये, माझी चूक झाली. मोठठी चूक!! विनाकारण ऑफिसचा राग रेणूवर काढला. काय करू यार!! कालपासून टेंशनमध्ये आहे. प्रामाणिकपणे काम करूनही काही व्हॅल्यूच नाही. खूप मेहनत घेतली तरीही अपयश आलं. साहेबांनी गरज नसताना लुडबूड करून चुका केल्या आणि सगळ्यावर पाणी फिरवलं. दोष माझ्यावर टाकून स्वतः नामानिराळे झाले. खूप राग आला. कानफटात मारायची तीव्र इच्छा झाली पण… मी त्यांची चमचेगिरी करत नाही त्याचं फळ. असो. यामुळंच डिस्टर्ब होतो. त्याचभरात रेणूशी भांडलो. माय मिस्टेक”मी खरं खरं सांगितलं पण धोपूकडून काहीच प्रतिक्रिया नाही. शेपटी हलवत समोर जाऊन बसला. मी चिडलो पण त्याला काहीच फरक पडला नाही. हे नेहमीचच झालयं. माझा राग, संताप, आनंद ‘धोपू’ समोर आडपडदा न ठेवता व्यक्त करतो. तो सगळं पाहतो, ऐकतो कधी कधी जोरजोरात शेपटी हलवून किवा भुंकुन भावना व्यक्त करतो. अनेकदा काहीच प्रतिक्रिया देत नाही.
रेणूसोबत विनाकारण वाद घातल्याबद्दल अपराधी वाटत होतं. धोपूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो “आय एम रियली सॉरी!! आज जरा जास्तच विचित्र वागलो. बिचारीला विनाकारण दुखावलं. लगेच रेणूची माफी मागतो. ”मनापासून बोलत होतो पण ‘धोपू’ मात्र ढिम्म तरीही त्याच्याशी बोलल्यानं मन शांत झालं. ‘धोपू’चा फार मोठा आधार वाटतो कारण तो नेहमीच निमूटपणे ऐकतो आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचं मत किवा सल्ला देत नाही.
—
डिजिटल युगात लोक जवळ आले. संवाद वाढला तरी एकटेपणाही अतिप्रचंड आहे. मॉडर्न लाईफमधला हा विरोधाभास फार जीवघेणा आहे. कितीही स्मार्ट झाला तरी मोबाईल मानसिक आधार देऊ शकत नाही. म्हणून वेळच्यावेळी बोललं पाहिजे. त्यासाठी हक्काच्या जागा शोधल्या पाहिजेत.
ज्यांच्याकडे अशा जागा आहेत ते खरंच सुदैवी, नशीबवान…
☆ इयर एण्ड आणि न्यू इयर सेलिब्रेशन… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
इसवी सन २०२५ चा अखेरचा महिना… डिसेंबर बघता-बघता संपेल आणि २०२६ हे नवं वर्ष उजाडेल. जगभरात नववर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे.
परवा सोसायटीतली मुलं आली, म्हणाली,
“आजोबा! सोसायटीला २५ वर्षं पूर्ण होतायत. म्हणून यंदाचं इयर-एण्ड, ख्रिसमस आणि न्यू इयर आम्ही जरा हटके सेलिब्रेट करायचं ठरवलंय! मेंबर्सकडून कलेक्शन चाललंय. तुम्ही किती देणार? ”
हसलो, “कल्पना उत्तम आहे. वर्गणी नक्की देईन… पण एक सूचना आहे, समारंभ ख्रिसमसला नको, आपल्या नववर्ष म्हणजे पाडव्याला करू या का? कारण आपलं ‘भारतीय’ नवसंवत्सर तर चैत्र प्रतिपदेपासून सुरू होतं. इंग्रजी वर्षाचा शेवट ३१ डिसेंबरला असतो, पण ती त्यांची कालगणना, आपली नाही.”
साकेत म्हणाला, “पण आजोबा, जगभर डिसेंबरच वर्षाचा शेवट मानतात! ”
“हो रे! कारण इंग्रजी कॅलेंडर जगभर लोकप्रिय झालंय. का? तर एकेकाळी ब्रिटिश राजवट जगात सर्वत्र पसरली होती. ‘ज्यावर सूर्य मावळत नाही’ असं त्यांच्या साम्राज्याबद्दल म्हटलं जायचं. त्यामुळे त्यांच्या ख्रिस्ती कालगणनेचा प्रसार जगभर झाला. आता ते साम्राज्य कुठं उरलंय? तरीही ही कॅलेंडरपद्धती ‘गुलामगिरीच्या जुन्या खुणां’ जगभर टिकून आहेत. ”
मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल!
मयूर म्हणाला, “ओss, म्हणजे हे इंग्रजी कॅलेंडर आहे तर! ”
प्रिया चकित. “म्हणजे आपलं कॅलेंडर वेगळं? म्हणजे चैत्र, वैशाख असतं तेच काय? ”
साकेतचा उत्सुक प्रश्न, “आजोबा, इंग्लिश महिन्यांची नावे कशी पडली? अर्थ काय? ”
मीही उत्साहात—“अगदी सांगतो! आधी इंग्रजी कॅलेंडर समजू न घेऊ, मग आपलं. चालेल? ”
“वाss आजोबा, चालेल काय, पळेल! ”
सगळी मुलं पुढे सरकली.
इंग्रजी (ग्रेगोरियन) कॅलेंडर
पोप ग्रेगरी १३ वे यांच्या नावावरून ‘ग्रेगोरियन’ कॅलेंडर नाव पडलं. याचंच पुढे ‘न्यू स्टाईल’, ‘ख्रिस्ती’ किंवा ‘इंग्रजी’ कॅलेंडर असं नाव पडलं. आता यातील महिन्यांची नावं आणि त्यांचे अर्थ झटपट पाहूया…
इंग्रजी महिन्यांची नावे व अर्थ
१) जानेवारी (January)
लॅटिन Janurius →रोमन देव Janus (दोन तोंडे—मागे-पुढे पाहणारा). म्हणून नवीन वर्षाकडे पाहत जुने वर्षही आठवण्याचे प्रतीक.
२) फेब्रुवारी (February)
लॅटिन Februarius → ‘शुद्धीकरण’. रोमन लोक या महिन्यात प्रायश्चित्त आणि आत्मशुद्धीचे विधी करीत.
३) मार्च (March)
मार्स—युद्धदेव. या महिन्यात दिवस-रात्र समसमान होण्याचा काळ.
लॅटिन Septem—सात (जुन्या रोमन कॅलेंडरात हा सातवा महिना असे).
१०) ऑक्टोबर (October)
Octo—आठ.
११) नोव्हेंबर (November)
Novem—नऊ.
१२) डिसेंबर (December)
Decem—दहा.
“कळलं ना? ”
कौस्तुभ—“हो आजोबा, भारी! ”
मी: “आता भारतील कालगणा समजून घेऊ”.
भारतीय कालगणना
मी पुढे सांगू लागलो—
“आता आपलं भारतीय पंचांग—ह्यातली नावं खगोलशास्त्रावर आधारित आहेत. ज्या नक्षत्रात त्या महिन्याची पौर्णिमा येते, त्यावरून मासाचे नाव. ”
भारतीय महिने व नक्षत्रे
चैत्र – चित्रा
वैशाख – विशाखा
ज्येष्ठ – ज्येष्ठा
आषाढ – पूर्वाषाढा/उत्तराषाढा
श्रावण – श्रवण
भाद्रपद – पूर्वाभाद्रपदा/उत्तराभाद्रपदा
अश्विन – अश्विनी
कार्तिक – कृत्तिका
मार्गशीर्ष – मृगशीर्ष
पौष – पुष्य
माघ – मघा
फाल्गुन – पूर्वा/उत्तरा फाल्गुनी
“हे बघा, ही मांडणी तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि लक्षात ठेवायला सोपी वाटते ना? ”
मी तिथी समजावू लागलो—
“सूर्यापासून चंद्र १२° सरकला की एक तिथी. अमावस्या म्हणजे सूर्य-चंद्र एकत्र—‘अमा’+‘वस’ म्हणजे जवळ राहणं. दोन पक्ष—शुक्ल (चांद्रकला वाढते) आणि कृष्ण (कला कमी होते). ”
तिथी, पक्ष, पौर्णिमा—सगळं मुलांना अचंबित करून गेलं.
“वार कसे ठरतात? ”
अक्षयचा प्रश्न— “ही होरा काय भानगड आहे आजाबा? ”
मी हसलो— “‘अहोरात्र’ मधून ‘हो’ आणि ‘रा’ घेतलं की होतो—होरा! सूर्योदयाचा पहिला होरा ज्या ग्रहाचा, त्या ग्रहावरून दिवसाचं नाव पडलंय —
रवि → रविवार
सोम → सोमवार
मंगळ → मंगळवार
बुध → बुधवार
गुरु → गुरुवार
शुक्र → शुक्रवार
शनि → शनिवार
वार रात्री २ ते २:३० या काळात बदलतो—हे वेगळंच वैज्ञानिक वैशिष्ट्य! ”
संवत्सर
भारतीय संवत्सरांची नावं—प्रभव, विभव, शुक्ल… अशी साठ. अशा ६० वर्षांचा संच पूर्ण झाला की पुन्हा पहिलं वर्ष—‘प्रभव’ येतं.
शालिवाहन शक + ७८ = इसवी सन.
शेवटी मी म्हणालो—
“मित्रांनो, आपली कालगणना जगातली सर्वश्रेष्ठ का म्हणतात, ते समजलं? त्यामुळेच नववर्ष पाडव्यालाच साजरं करावं असं मी म्हणालो! ”
मुलं एकाचवेळी— “होss एकदम पटलं आजोबा! ”
सोसायटीचा रौप्यमहोत्सव चैत्र प्रतिपदेलाच साजरा करायचं एकमतानं ठरलं. विराजने माझ्या नावाची ५०१ ची पावती हातात देत म्हटलं—
“थँक्यू आजोबा! सी यू इन द कमिंग न्यू इयर… ‘ पराभव नाम संवत्सर, शालिवाहन शक १९४८! बाय! ”
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)☆
काही वर्षांपूर्वी चांदोबा मासिकात विक्रम आणि वेताळ अशा शीर्षकाच्या अंतर्गत कथा यायच्या….! त्या वाचताना मनुष्य अगदी मश्गूल होऊन जायचा….
त्याची सुरुवात वेताळ राजाच्या मानगुटीवर बसतो आणि त्याला एक कथा सांगून प्रश्न विचारतो…
प्रश्नाचे उत्तर दिले की हा गायब होतो असे त्याचे स्वरूप असे….
…. या कथेचा विचार करीत असताना मला काही सुचले ते इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे….
मनुष्य जेव्हा झोपतो तेव्हा तो कोणीच नसतो आणि कोणाचाही नसतो… , तो स्वतःचाही नसतो…
पण…
…. जेव्हा त्याला जाग येते, जेव्हा त्याचे जग त्याला पुन्हा आकळू तसतसे अनेक *”वेताळ”* त्याच्या मानगुटीवर येऊन बसतात….
थोडी कल्पना करून पहा…
अनेक *”वेताळ”* तुम्हाला लगेच आठवतील…
काही वेताळ चांगले असतात, काही नकोसे असतात, काही टाळता न येणारे असतात, तर काही कायमचे अर्थात आपल्या *”राशी”लाच* असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…
…. असे वेताळ आहेत आपल्या आयुष्यात….?
जरा डोक्याला ताण देऊन पहा…
– – अशा वेताळांचे काही प्रकार आपण पुढे पाहणार आहोत..
– – – –
मनामनातील वेताळ – – (लेख क्र. १)
सासू —
सासू शब्द ऐकून सर्वाचे कान एकदम तिखट झाले असतील….
अहो, आपली संस्कृती महान आहे असे आपण सर्वजण मानतो….
या महान संस्कृतीने आपल्याला कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंध बहाल केले आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी जी नाती निर्माण केली आणि त्यांना विशिष्ट अशी नावे (नामाभिदान) दिली त्यामागे विशेष प्रयोजन नक्कीच असेल. इतकी वर्षे एखादी प्रणाली अस्तित्वात आहे, याचा सरळ अर्थ हा आहे की ती उपयुक्त आहे….
व्यक्ती परत्वे अथवा कालपरत्वे त्यात काही दोष निर्माण झाले असतील….
बरेच वेळा व्यक्ती म्हणून ती व्यक्ती वाईट नसते, पण जेव्हा ती सासूच्या भूमिकेत शिरते तेव्हा ती एकदम *”कजाग सासू”* बनत असते…
मनुष्याने एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक नात्याची अमुक अशी प्रमाण (स्टँडर्ड) ओळख सांगता येणे जिकिरीचे ठरेल, कारण प्रत्येक नात्याला अनेक कंगोरे असतात आणि ते नाते परस्पर/ संबंधित व्यक्तींच्या वागण्यावर, संबंधावर जास्त अवलंबून असते…
**आपापल्या नात्याची जबाबदारी, हेतू, भूमिका, बांधिलकी, मर्यादा स्पष्ट नसेल तर मग ती ती नाती आणि संबंधित माणसं वेताळ बनतात आणि त्या त्या नात्याला कलंकित करतात…, पहा पटतंय का? “*
कथा, कादंबऱ्या आणि सध्या सुरू असलेल्या डेली सोप मधून सासूचे असे काही चित्रण दाखविले जाते की प्रत्येक सासूला असे वाटावे की मी जर अशी वागले नाही तर माझे अस्तित्व राहणार नाही…
…. कोणत्याही नात्याचे अस्तित्व त्या त्या व्यक्तींच्या उबदार संबंधावर अवलंबून असते…. , ते कोणा एकाची जबाबदारी नसते… नातं नेहमी जिवंत ठेवावं लागतं, तेव्हा ते फुलतं जातं…. त्यासाठी त्याच्यावर प्रेमाचे, स्नेहाचे शिंपण घालावं लागते आणि ते सातत्याने आणि निगुतीने घालावे लागते…. , तेव्हाच ते फुलून येते आणि मग ते कुटुंबातील इतरांना सुगंध देत राहते…..
माझी सासू अमुक प्रकारात मोडते, किंवा ती तशीच आहे असे समजून, थोडक्यात अशा पक्क्या गैर समजुतींचा वेताळ आपल्या मानगुटीवर बसला तर मात्र त्या घराचे, कुटुंबाचे काही खरे नसते…..
मी प्रस्तावनेत म्हटलं आहे की हे वेताळ अनेक प्रकारचे असतात….
– – काही वेताळ मनुष्य आपल्या मनाने निर्माण करता आणि त्यांना गोंजारत राहतो, मग कधीकधी असे वेताळ त्याच्या मानेवरून त्याच्या मनात कधी शिरतात आणि त्याच्या मनाचा ताबा कधी घेतात हे त्याला कळत नाही…
मानगुटीवर वेताळ झटकणे सोपे आहे, पण जर तो मनात शिरला तर आधीपासून बसून असलेले अनेक वेताळ त्याच्याशी युती करतात आणि आपल्या मनाचे *”भजे”* होते….
लोकं मात्र याचा खुबीने आनंद लुटतात, आणि प्लिज आपल्या कुटुंबांची मात्र नाचक्की होत राहते….
आजपासून असे कोणते वेताळ आपल्या मानगुटीवर बसलेले नाहीत ना याचा विचार करायला हवा…
आणि नजरचुकीने असा वेताळ मनात शिरला असेल तर त्याने वेळीच मनाची शुद्धी करून त्याला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा…
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली मी आता सासू होणार आहे…..! पण माझा विचार आहे की मला तिची आई व्हायला आवडेल….
– – तिच्या डोक्यात शिरणाऱ्या वेताळाची जाणीव लागलीच मला झाली, मी तिला सुचवले की गं तू उत्तम सासू होण्याचा प्रयत्न कर, त्यासाठी आवश्यक तशी मनाची धारणा करून घे….! अन्यथा ना तू उत्तम सासू होशील, ना आई….!
…. तिला माझा विचार पटला…. कदाचित आपल्यालाही पटेल..
हल्ली लाईट सारखे जातात म्हणून सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम, वरच्या टाकीत पाणी भरून घेणे. त्यासाठी बटन लावून मी मोटर चालू केली टाकी भरली की पत्र्यावर पाणी पडतं आणि लगेच बटन बंद करावे ही सूचना मिळते. त्यासाठी मी बाहेरच थांबले पण माहित नाही कोणत्यातरी विचारात गर्क झाले होते. खर तर पाणी भरायला सात ते आठ मिनिटे लागतात. इतक्यात जिन्याचा दरवाजा उघडून भाची वर आली तीने शांतपणे बाथरूम मधले बटन बंद केले आणि ती खाली निघून गेली मी म्हणलं, “सॉरी सॉरी, माझ्या लक्षातच राहिले नाही आणि मला पत्र्यावरचा आवाज ऐकू आला नाही खरंतर मी यासाठीच इथे बसले होते”…. तिने ते काहीच ऐकले नाही तिला कामाची घाई होती ती निघून गेली, पण मला मात्र ती गोष्ट खूप लागून राहिली. असे कसे चालू राहीले.. आपल्या लक्षात कसे राहत नाही? … आणि सहजच एका प्रसंगाची आठवण झाली….
मी सेवासदन मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते तेव्हाची गोष्ट मी आणि आई वरच्या मजल्यावर राहत होतो. एक खोली स्वयंपाकघर आणि एक खोली झोपणे बसणे उठणे अशा दोन खोल्यामोठ्या होत्या आणि समोरची मोठी गच्ची असा वावर आमचा असायचा. स्वयंपाक घराच्या खोलीत स्वयंपाक घर म्हणून व्यवस्था नव्हती मी एक रेडीमेड किचन टेबल ठेवले होते त्याला एक बेसिन होते पण ते पाईपला, गटरला जोडलेले नव्हते. पाणी एका बादलीत जमा करायचे आणि ते भरले की बाहेर जाऊन सांडून टाकायचे अशी हात धुण्याची व्यवस्था होती. टेबलवर एक पीप ठेवलेले होते. एके दिवशी रात्री आईने काहीतरी स्वयंपाक घरामध्ये केले बहुधा तीने हा त्या पिपाखाली हात धुतला आणि नळ पूर्णपणे बंद करायची विसरली तो थोडासा उघडा राहिला. सकाळची शाळा होती मला लवकरच पहाटे जाग आली पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात गेले तर बादली भरून अर्ध्या पाऊण स्वयंपाक घरात पाणी झाले होते मी कपाळाला हातच लावून घेतला आता हे पाणी काढल्याशिवाय गत्यंतर नव्हते भराभर ओंजळीने पाणी काढले मग एका जुन्या साडीने सगळे घर पुसून घेतले पंखा फास्ट करून सोडला हे सगळं करायला माझा एक तास गेला. घाईघाईने आवरून मी शाळेला निघाले तेवढ्यात आई उठली होती. ती म्हणाली काय झालं? मी काही बोलले नाही फक्त एवढेच म्हणाले, ” तू काही काम करत जाऊ नकोस ग… ” या वाक्यातला माझा स्वर बरोबर नव्हता हे तिला जाणवलं! पुन्हा आठ दिवसांनी अशीच घटना घडली शनिवारची शाळा सात वाजता मला मुख्याध्यापक म्हणून हजर होण गरजेचे मला जाग आली आणि मी उठले तर आई अंथरुणावर नव्हती म्हणलं बाथरूम मध्ये असेल तिथे नव्हते मग लक्षात आला रे स्वयंपाक घराची लाईट चालू आहे. पाहते तर परवा प्रमाणेच पाणी खाली सांडलेले आणि आई ते भरत होती… दिवस थंडीचे तिला खाली बसता येत नव्हत… 85 वय हे दृश्य पाहिल्यावर मला काय झाले मी लिहू शकत नाही मी फक्त आईला मिठी मारली आणि तिला पलीकडच्या खोलीत घेऊन आले… तिचे पाय पुसले गरम पाण्याचे पिशवी दिली… पांघरूण घातलं मी बोलले काहीच नाही माझे डोळे मात्र वाहत होते. मी त्या दिवशी न बोललेल्या गोष्टी तिला लागल्या होत्या तीच चूक पुन्हा तिच्या हातून झाली आणि ती सुधारण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न करत होती. मी तिला एवढेच म्हणाले, ” मी खूप वाईट आहे ना तुला समजून घेतलं नाही “… ती अक्षरही बोलली नाही मी भराभर खोली पुसून घेतली.. सगळ आवरलं… तिला गरम चहा दिला आणि शाळेला गेले….! आई
जाऊन पंधरा वर्षात झाली आता कधीकधी माझ्या हातूनही पिपाची तोटी उघडी राहते कुणीतरी आठवण करून देत… “आत्या नळ उघडा आहे” मी म्हणते, ” हं आमच्या आई साहेब आल्यात बर का हे सांगायला बघ तुझ्याकडून नळ उघडा राहतो… चुकलं चुकलं आईसाहेब “मनात मी त्या केलेल्या चुकीची कबुली देते आणि नळ बंद करते. चूक माणूस करत नाही… जी बाई आयुष्यभर इतक्या जणांच्या वेळा संभाळत संसारासाठी राब राब राबली ती कशी चूक करेल. तीच व्यवस्थापन हे फार सुंदर होतं अष्टावधानी असणारी ही माणसं म्हातारपणाने विस्मृतीच्या छायेत जायला लागतात आपण त्यांना समजून घ्यायला हवं. त्या क्षणी जर समजून घेता आले नाही तर ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर मनाला लागून राहते….! माझ्याकडूनही हल्ली नळ उघडा राहणे, दूध उतू जाणे, करपणे, मोटार चालू राहणे हे प्रकार घडत आहेत लक्षात येते बुद्धीचा प्रचंड वापर करणारे आपण मेंदूनी थकलोय.. हे समजून घेणार कुणीतरी हवंय पण कोण असणार आहे? …. पुढच्या पिढीला वेळ नाही ते म्हणतात तुम्ही करू नका ना… पण त्यांच्या हे लक्षात येत नाही तुम्ही करू नका म्हणण्यात तुम्ही आम्हाला अधिक म्हातारं करत आहात. लहानपणी तुम्ही केलेल्या असंख्य चुकांना तुमच्या आई बापाने पोटात घातलेले असते मग म्हातारपणीच्या घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नाही का पोटात घालून घेऊ शकत? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे… कारण काळाचा वेग वाढलेला आहे तो मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचा नेहमीच वाढतो पण इथे तो दुप्पट झालाय त्यांच्याबरोबर धावणे आपल्याला कठीण आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घ्यायला त्यांच्याकडे वेळच नाही कारण जगण्यासाठी चा त्यांचा संघर्ष वाढलेला आहे आपण उपभोगलेली जीवनातली शांती आज त्यांच्याकडे नाही…. सगळंच अवघड झाले पण यातून मार्ग काढण्यासाठी मी मात्र ठरवले…. एक पाटी आणायची त्यावर लिहायचं मोटार चालू केली आहे.. बंद केले की पुसून टाकायचं किंवा दूध तापायला ठेवले आहे… हे लिहायचं आणि दूध तापायला ठेवायचं खोलीतून बाहेर पडताना स्वतःला तीन प्रश्न विचारते…. नळ बंद आहे का? गॅस बंद केला आहे का? दूध फ्रीजमध्ये ठेवले आहे का? आणि त्यानंतरच मी बाहेर पडते. आता आपल्या प्रश्नावर आपणास सोल्युशन शोधायचे दिवस आले आहेत बाकी “तो पाठीशी आहेच” ही श्रद्धा ठेवायची आणि कामाला लागायचं फार वाईट वाटून घ्यायचे नाही मग काय मंडळी हे सगळं तुमच्या बाबतीत ही घडतं ना मग उपाय शोधा…. पटतंय का बघा….!
☆ माझी जडणघडण… एक अनोखा टाका – भाग – ७० ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
जगणं सोपं नसलं तरी सुंदर नक्कीच असतं. फक्त ती सुंदरता जाणून घेणं आणि अनुभवणं हे व्यक्तीच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर कायमच वेगवेगळ्या घटनांना, प्रसंगांना, सुखांना, दुःखांना, नवनवीन अपेक्षित आणि अनपेक्षित जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्यात नक्कीच एक आव्हान असतं. ते स्वीकारणं गरजेचं आणि अपरिहार्य असतं. अशावेळी मनातल्या भय, चिंता, आपल्याला हे जमेल का? यात यश मिळेल का? नाही जमलं तर? अयशस्वी झालो तर? वगैरे वगैरे अनेक प्रश्न मनात सळसळत असतात पण त्याच वेळी संयमाने, समंजसपणे त्या प्रश्नांच्या राशीतून स्वतःला सोडवून घेऊन सिद्ध होणं हेच गरजेचं असतं. त्यासाठी लागणारं मनोबळ आणि योजना यांचा ताळमेळ जमवून पुढचं पाऊल उचलायचं असतं. आयुष्याच्या या वळणावर मुलींचे विवाह जमवणे हा एक मोठा आणि काहीसा अवघडही प्रोजेक्ट आता आमच्यासमोर उभा होता.
“अहो! पहिलंच स्थळ पाहिलं आणि आमच्या शुभांगीचं लग्न जमलं. काहीच पायपीट करावी लागलीच नाही. किती छान! ”
“अहो! मुलींचीच काय आजकाल मुलांची लग्न जमवणंही खूप कठीण झालंय. पूर्वी पंचक्रोशीतच, थोरामोठ्यांच्या मदतीने आणि मतांनी लग्न जमायचे पण आता काय विविध मॅट्रिमोनीयल साइटवर ही मुलं अपेक्षांचं भलं मोठं सामान घेऊन वरवधू संशोधनाचा प्रवास करत असतात. मुलींना शहरातच राहणारा, बँक बॅलन्स भक्कम असणारा, स्वतःचा फ्लॅट, गाडी, शाश्वत नोकरी असणारा, पुरोगामी विचारांचा वगैरे वगैरे अगदी टेलर मेड जोडीदार हवा असतो. ”
“ त्यापेक्षा मुलांनी आणि मुलींनी स्वतःचे जोडीदार स्वतःच शोधावेत. कशाला हवे ते “कढईतले कांदे पोहे! ”
हे सगळे भोवताली ऐकू येणारे सामाजिक संवाद.
तर माझा सांगायचा मुद्दा असा की मुलींचे विवाह जमवण्याच्या निमित्ताने आम्ही जेव्हा या वर संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा प्रथम आमच्या भोवती असलेल्या पार्श्वभूमीचा विचार आम्हाला करणे गरजेचे होते. दोघीही परदेशस्थित, उच्चशिक्षित, करिअर माइंडेड, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी वगैरे वगैरे. शिवाय अजून पर्यंत तरी योग्य, त्यांच्या परिघात सामावणारा जोडीदार न भेटल्यामुळे “ठरवून विवाह” हा एकच पर्याय आमच्यासमोर होता आणि आता “याहून उशीर कशाला? योग्यवेळी योग्य गोष्टी झालेल्या बर्या या परंपरावादी रेषेवर आल्यानंतर वर संशोधनाची सुरुवात आम्ही आमच्या परीने केली मात्र.
आम्ही भारतात मुलं शोधत होतो आणि आम्हाला योग्य वाटणारे प्रोफाइल्स मुलींना पाठवत होतो. यादरम्यान आमची दोघांची प्रचंड भांडणेही होत. मतभेद, वादविवाद, आरोप प्रत्यारोप कधीकधी तर सारंच अगदी दोघांच्याही सहनशक्तीच्या पलीकडे जायचं. मूळातच “मुली” म्हणजे विलासचा अत्यंत हळवा कोपरा! प्रचंड वीक पॉईंट! लग्नानंतरपेक्षा, लग्न जमवण्याच्या प्रक्रियेतच तो एका प्रचंड वियोग पोकळीत हरवलेला होता. त्यामानाने मी अधिक व्यावहारिक पातळीवर विचार करत होते. माझ्यासाठीही “अंधारातलीच उडी असली” तरीसुद्धा सुवर्णमध्य साधूया, काही अगदीच किरकोळ, साधारण तडजोडी करायला काय हरकत आहे? सर्वच काही आपल्या मनासारखं घडतंच असं नाही वगैरे वगैरे मुद्द्यांचा विचार म्हणजे मला अविचार वाटत नव्हता.
विलास विरोधातही खूप वेळा माझ्यासोबत असल्यासारखा दाखवायचा. म्हणजे मला योग्य वाटलेल्या स्थळाविषयी तोही विचार करायचा. त्याबाबतीतल्या प्राथमिक बाबी, (जरी आमचा विश्वास नसला तरीही समोरच्यांसाठी पत्रिका वगैरे), भारतात त्याच्या आईवडिलांना तरी भेटूया वगैरे करण्यासाठी परवानगी- कम तयारी दाखवायचा पण ज्योतिकाकडूनच त्या स्थळाचे पूर्ण पोस्टमार्टम झाल्यावर मात्र मी, माझे विचार, माझी धडपड हे सगळं विलासकडून पार गाळात जायचं. निकालात निघायचं.
“तुला इतकी घाई काय आहे? माझ्या मुली अत्यंत गुणी आहेत. मला त्या मुळीच जड झालेल्या नाहीत. तू त्यांना प्रेशराईज्ड बिलकुल करू नकोस आणि त्या स्वतःचा निर्णय घेण्यास समर्थ आहेत आणि त्यांचं सगळं चांगलंच होणार आहे. ”
माझ्या बाजूने कुणीच नव्हतं मी एकटीच पडले होते. मैत्रिणी, बहिणी इतर हितचिंतक एकीकडे मला म्हणत, ”बरोबर आहे आता लग्न जमायलाच हवं” तर दुसरीकडे “विलासचेच म्हणणे किती बरोबर आहे” असंही म्हणत. माझ्या भावनांचा, माझ्या कृतींचा चुकीचा अर्थ लावला जातोय आणि नक्की कशाचं समर्थन करू हे माझं मलाच कळत नसल्यामुळे माझ्या भोवती फक्त एका अनामिक एकाकीपणाचं वर्तुळ आखलं जात होतं.
एक दिवस ज्योतिका मला म्हणाली, “हे बघ मम्मी! तू दुकानात जातेस, माझ्यासाठी तुझ्या आवडीचा, अगदी रंगसंगतीचा विचार करून तू एखादा ड्रेस अगदी प्रेमाने आणतेस गं! मला आवडलेला नसला तरीही मी केवळ तुझ्यासाठी एक दिवस तो घालते पण नंतर मात्र कपाटातून तो कधीच बाहेर येत नाही पण जोडीदाराच्या बाबतीत असं नाही ना होऊ शकत? संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो ना? ”
काही उपयोग नव्हता अशा वेळी मी तिला समजावत सांगण्याचा, ” की आम्ही नाही का तडजोडी केल्या? काही बिघडलं का आमचं? ”
कारण “बाबा” म्हणजे जगातला एकमेव आदर्श, सर्वगुणसंपन्न पुरुष” ही मुलींच्या मनातली दगडावरची रेघ!
परिस्थिती अशी होती की ते तिघंही अगदी मजेत, आनंदात, निश्चिंत होते आणि मी मात्र जेन ऑस्टिनच्या “प्राईड अँड प्रेजुडाईस” या कादंबरी मधली मुलींच्या लग्नाचाच सतत विचार करणारी आणि चिंताग्रस्त राहणारी, एलिझाबेथ बेनेट सारखी एक “मूर्ख” आई होते.
माझ्या जडणघडणीतला हा एक अत्यंत अनोखा आणि नवीनच टाका होता.