मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खडू आणि फळा! ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ खडू आणि फळा! ☆ शीला पतकी ☆

☆

नव्याने लग्न झालेली मुलगी जेव्हा माहेरी येऊन बोलायला लागते आमच्या घरी असं आहे, आमच्या घरी तसं करतात, आमच्या घरी हे चालत नाही, तेव्हा समजावे ती मुलगी तिच्या संसारात पूर्णपणे रुळली आहे तसे शिक्षकी पेशात नव्याने शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर फलक लेखन सुरू होते, सुरुवातीच्या फलक लेखनात लिहिलेले लिखाण तिरके तिरके तिरके होत जाते… जेव्हा फलकावरचे लिखाण सरळ रेषेत येईल तेव्हा समजावे आपण आता पूर्ण शिक्षक झालो आहोत. ही खरी शिक्षक होण्याची पहिली पायरी आहे.

खडू आणि फळा ही नुसती दोन साधने नाहीत तर विद्यार्थ्याच्या मेंदूवर दृश्य स्वरूपात काहीतरी साठवण्याचा तो भाग आहे. की बाईंनी किंवा सरांनी अशी आकृती काढली होती त्याला इथे नावे दिली होती आणि मग तो सगळा भाग आठवतो त्यामुळे हा दृकश्राव्य प्रकारातला अत्यंत साधा आणि पहिल्या पायरीचा प्रकारचा शोध लागला आणि तीच अनेक वर्षे शिकवताना वापरली जाऊ लागली 

ज्या शिक्षकाचे फलक लेखन उत्तम त्याचे पाठही सुंदर होतात. काही शिक्षकांची सवय असते की वर्गात गेल्याबरोबर फळा स्वच्छ पुसणे आपला विषय, आजच्या शिकवण्याचा विषय काय आहे तो फलकावर लिहिणे आणि शिकवायला सुरुवात करणे. नकाशा काढणे भूमितीच्या आकृत्या फलकावर काढणे हे शिक्षकाचे कौशल्य त्यामुळे तुमचे शिकवणे प्रभावी ठरते.

काही शिक्षकानी फलकावरती लिहिलेले किंवा फलकावरती काढलेल्या आकृत्या या आजही आपल्या स्मरणात असतील सुंदर हस्ताक्षराचे शिक्षक हे नेहमी मुलांच्या स्मरणात राहतात जिल्हा परिषद शाळेतअसंख्य शिक्षकांचे अक्षर, फलक लेखन हे पाहण्यासारखे असते. त्याला जर चित्रकलेची जोड असेल तर फळा उत्तम सजतोच.

प्रत्येक शिक्षकाच्या सवयीनुसार त्याचे फलक लेखन असते काही शिक्षक फळ्यावर न लिहिता लिहिले आहे असे समजून शिकवतात आमचे कॉलेजमधील एक शिक्षक पिरॉडिक टेबल एका बाजूला आहे असे गृहीत धरून आम्हाला मेटल शिकवत असत आणि पिरॉडिक टेबल मध्ये त्याचे स्थान सांगताना वारंवार त्या बाजूच्या कोपऱ्याला येरझाऱ्या घालत असत. काही शिक्षक मुद्दे फलकावर मांडून… काही जण उगाचच गोल खुणा मांडून… रेषा ओढवून टिंब देऊन गोल करून फलक लेखन कैल्याचे समाधान मिळतात ती त्यांची सवय असते

दारचे अंगण घराची कळा दाखवतात असे म्हणतात तसे शाळेच्या इमारती भोवती असलेले फळे हे शाळेचे वैभव सिद्ध करतात. आमच्या शाळेच्या बाह्य भागात तीस-पस्तीस फळे होते व सर्व शिक्षकांना आठवड्यातून तीन वेळा लेखन करणे कंपल्सरी असे आमचे मुख्याध्यापक रोज लिहीत असत तेव्हा google youtube असल काही नव्हतं त्यामुळे माहिती वाचून मिळवून लिहावी लागे. आमची एक विद्यार्थिनी माझ्याकडून कविता घेऊन लिहीत असे आज ती फार मोठी लेखिका आणि कवयित्री झाली आहे. तिच्या अनेक पुस्तकांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. हा फलक लेखनामधून निर्माण झालेल्या आवडीचाआणि संस्काराचा भाग आहे. वर्ग मॉनिटरला फळ्यावर लिहिण्याची मुभा असे. एकदा एका वर्गात एका मुलीने सुविचार लिहिला… एक रुपया चांदीचा सारा देश गांधींचा… मी कपाळावर हात मारून घेतला अगं हा कुठला सुविचार.. पण मला आता कळतंय हा सु नसला तरी विचार नक्की होता असो

फलक लेखनाच्या काही शिक्षकांच्या गमतीजमती आजही आठवतात दयानंद महाविद्यालयामध्ये झूलॉजीचे एक शिक्षक होते झूलॉजीच्या वर्गामध्ये एकावर एक दोन फळे होते म्हणजे एक फळा लिहून झाला की तो वर ढकलायचा दुसरा फळ खाली येत असे त्यावर कुणीतरी टारगट विद्यार्थ्यांनी मोठा बेडूक काढला त्या बेडकाला चश्मा दाखवला बेडकाच्या शरीराच्या मधल्या मोठ्या भागात लिहिले… सर इज अ बिग फ्रॉग… वर्ग शांतपणे शिकत होता सर बेडका संबंधी बोलत होते त्या फलकावर लिहून झाल्यावर तो फळा त्यांनी वर ढकलला आणि पाठीमागचा फळा खाली आला विद्यार्थी मोठ्यांना हसायला लागले. सर ही आकृती पाहून क्षणभर रागावले आणि मग त्या आकृतीचे कौतुक करीत मधले नाव पुसून त्यानी रंगीत खडूने बेडूक सजवला आणि म्हणाले धिस इज फ्रॉक आणि त्यांनी आपला चष्मा नेहमीच्या स्टाईलने सरळ केला… फळ्यावरील लेखनाच्या कितीतरी आठवणी आहेत आमच्या कॉलनीतील फळ्यावर दररोज एक सुविचार लिहीत असे सवय जात नाही ना कॉलनीतले एका गेट समोरून बिडी घेऊन जाणाऱ्या बायका कॉलनीतून ये जा करीत असतात त्यातील एक महिला आपल्या टोपलीतील छोटी वही काढून त्यात मी फलकावर लिहिलेला सुविचार लिहून घेऊन जात असे. ” तू फळ्यावरचे बघून काय लिहून घेतेस आणि कोणासाठी? ” ती लोधी समाजाची होती ती म्हणाली, ” आपका सुविचार बहुत अच्छा होता है बच्चों के लिए लिखके ले जाते है” आपल्या मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी सकाळच्या गडबडीच्या वेळेतही एका छोट्या वहीत ते लिहून घेऊन जाणाऱ्या त्या महिलेचे मला कौतुक वाटले पुढे पुढे तर मी तिच्यासाठीच लिहीत होते.

सोलापुरातील हदे प्रशाला सेवासदन प्रशाला सुयश विद्यालय सरस्वती मंदिर ज्ञानप्रबोधिनी कुचन प्रशाला अशा कितीतरी शाळा आहेत की गेटमधून आत गेल्याबरोबर उत्तम हस्ताक्षरातले आणि सुंदर चित्रांनी सजवलेले फळे स्वागत करीत असतात. त्या शाळेतील विद्यार्थी हे फलक लेखन कधीच विसरू शकत नाहीत ते दृक असल्यामुळे मेंदूच्या पटलावर छापून गेले आहे.

महाराष्ट्रातील कित्येक शिक्षक उत्तम फलक लेखनात माहीर आहेत त्या त्या दिवशी चे वैशिष्ट्य जाणून घेऊन फलकावर रंगीबेरंगी चित्रे काढण्यात प्रसिद्ध आहेत त्यापैकी हिरे सर हे नाव… हे शिक्षक फार सुंदर फलक लेखन करतात आमच्या शाळेतील पोरे सर यांचे फलक लेखन कोणीही विद्यार्थिनी कधीच विसरू शकणार नाही इतके सुंदर असे आणि ते फार आत्मीयतेने लिहीत असत 

फळा आणि खडू यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोरआपला विषय शिकवणे हे कौशल्य पूर्वीच्या शिक्षकांकडे होते कारण कोणती आधुनिक उपकरणे हाताशी नव्हती या दोन साधनाने उत्तम आणि संस्कारक्षम पिढ्या घडविल्या केवळ खडू आणि फळा या माध्यमातून शिकवणाऱ्या शिक्षकांच्या या पिढीने या माध्यमातून खूप संस्कार दिला त्या समस्त शिक्षकांच्या पिढीला आदरपूर्वक नमस्कार.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तुकाराम! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मीनल केळकर ☆

मीनल केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ मी, तुकाराम! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मीनल केळकर ☆

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज तपासण्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. कुठे गेले की पाहणी, पाहणी म्हणजे पाहणी, नुसतं वरवर बघायचं नाही, तर त्याच्या मुळापर्यंत जायचं! त्यांच्या या नो-नॉन्सेन्स वृत्तीचा घरात एक छोटासा प्रयोग करावा, असा विचार माझ्या मनात आला.

… आणि घरात तपासणीसाठी सगळ्यात योग्य जागा कोणती?

फ्रीज! 

फ्रीज ही घरातली अशी जागा आहे की तिथे काय सापडेल याचा अंदाज स्वतः फ्रीजच्या मालकिणीलाही नसतो. किंबहुना, ब्रह्मांडातल्या तमाम गोष्टी *‘कधीतरी उपयोगी पडू शकतात’* या सिद्धांतावर फ्रीजच्या मालकिणीची अढळ श्रद्धा असते. त्यामुळे जिचा ‘आत्ता उपयोग नाही’ ती गोष्ट फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी सर्वात पात्र समजली जाते!

मी दार उघडलं आणि माझ्या डोळ्यांसमोर अन्नपदार्थांचा नव्हे, तर एका समांतर विश्वाचा दरवाजा उघडला!

महिन्यांपूर्वीचा मंदिरातला प्रसाद होता. मागच्या महिन्यातली खिचडी होती. टोमॅटो होते, जे आधी उन्हात वाळले होते आणि नंतर फ्रीजमध्ये वाळण्याचा मान त्यांनी मिळवला होता. अर्धं लिंबू होतं. ते लिंबू आहे की पुरातत्त्व खात्याने जतन करावा असा नमुना, याचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी लागली असती.

एक गूढ बरणी होती. तिच्यात काय आहे? हा प्रश्न विचारण्याचं धाडस मी केलं नाही. कारण काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. एका कोपऱ्यात एक हिरवी मिरची पडली होती. ती इतकी एकटी होती की तिला पाहून वाटलं, तिनंही जगण्याची आशा सोडली असावी.

आणि मग सापडला चॉकलेटचा डबा!

कधीतरी कुणीतरी प्रेमाने दिलेला. ‘एखाद्या खास दिवशी खाऊ’ म्हणून ठेवलेला. तो खास दिवस अजून आला नव्हता. चॉकलेट मात्र फ्रीजमध्ये बसून त्या दिवसाची वाट पाहत होतं. आता त्या डब्याला पाहून वाटलं, हा चॉकलेटचा डबा नसून आपल्या संयमाचं स्मारक आहे!

पण एवढ्यावरच हा विषय संपत नाही.

फ्रीजमध्ये अशा अनेक गोष्टी सापडतात ज्यांचा फ्रीजशी दूरदूरपर्यंत संबंध नसतो.

उदाहरणार्थ …. रवा!

रवा हा स्वयंपाकघरातल्या कपाटात राहणारा नागरिक. पण काही काळाने तो अचानक फ्रीजमध्ये स्थलांतरित झालेला आढळतो.

शेंगदाणेही तसेच. सुकामेवा तर फ्रीजमध्ये इतक्या अधिकाराने वावरतो की तो तिथला कायमस्वरूपी रहिवासी असावा!

खरंतर किचनच्या कपाटात असायला हव्या अशा अनेक जिनसांनी बाहेरील नागरिकांप्रमाणे फ्रीजमध्ये अवैध घुसखोरी केलेली असते.

या घुसखोरांना हुसकावून लावावं की नाही, यावर फ्रीजची मालकिण मात्र ठाम असते

“ठेवू दे! लागतात कधीतरी! ”

हे ‘कधीतरी’ नेमकं कधी येतं, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.

कधीतरी म्हणजे उद्या, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात की पुढच्या जन्मी याचा खुलासा आजवर झालेला नाही.

मी मात्र तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला मनात साक्षी ठेवून कारवाई करायचं ठरवलं.

नोटीस काढायची.

दोषींवर गुन्हे दाखल करायचे.

आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर फ्रीज सील करायचा!

पण तेवढ्यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय अडथळा माझ्या लक्षात आला.

मी तुकाराम मुंढे नाही. 

तुकाराम मुंढे कारवाई करून पुढच्या ठिकाणी जाऊ शकतात.

मला मात्र इथेच राहायचं आहे.

आणि मुख्य म्हणजे…

या सगळ्या फ्रीज साम्राज्याची मालकीणही याच घरात राहते!

म्हणून चौकशीला वेगळं वळण मिळालं.

आमच्यात वाटाघाटी झाल्या.

काही गोष्टींची मुदत वाढवण्यात आली. काहींना तातडीने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. काही संशयास्पद पदार्थांचा पंचनामा झाला. काहींची ओळख पटली नाही म्हणून त्यांना ‘अज्ञात’ म्हणून विल्हेवाट लावण्यात आली.

अखेर तपासणी बंद करण्यात आली.

फ्रीजला माफ करण्यात आलं.

फ्रीजच्या मालकिणीला जाब विचारण्यात आला नाही.

आणि शेवटी आम्ही एकमताने ठरवलं

या प्रकरणावर पडदा टाकूया.

कारण घर चालवताना प्रत्येक गोष्ट नियमाने चालत नाही.

काही गोष्टी प्रेमाने चालतात.

काही सवयींनी.

आणि काही…

मी, तुकाराम!

‘जाऊ दे, पुढच्या वेळी फ्रीज साफ करू’ या शाश्वत आश्वासनावर तह केला.

पुढची वेळ कधी आली का? 

हा प्रश्न विचारू नका.

फ्रीज अजूनही भरलेला आहे!  

लेखिका : अज्ञात 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोणता नवरा खरेदी करू? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ कोणता नवरा खरेदी करू? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

शहरात एका मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं, ज्यावर लिहिलं होतं –

“इथे तुम्ही नवरे खरेदी करू शकता.”

हे वाचून बायका वेड्यासारख्या दुकानाकडे धावू लागल्या. दुकानात प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली.

मुख्य दरवाजावर सूचना लिहिलेली होती –

१. या दुकानात प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल. आधार कार्ड आवश्यक आहे.

२. दुकानात एकूण ६ मजले आहेत, आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्यांचे गुणविशेष लिहिलेले आहेत.

३. कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावरून नवरा निवडू शकते.

४. पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही – केवळ दुकानाबाहेर जाता येईल.

एक देखणी तरुणीला दुकानात प्रवेश मिळाला…

पहिल्या मजल्यावर लिहिलं होतं –

“या मजल्यावरचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत.” ती पुढे गेली…

दुसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –

“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि मुलांना आवडतात.”

ती पुन्हा पुढे गेली…

तिसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –

“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि देखणेही आहेत.”

हे वाचून ती थोडा वेळ थांबली, पण विचार केला, “वर काय आहे ते पाहूया…”

चौथ्या मजल्यावर लिहिलं होतं –

“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन, देखणे आहेत आणि घरकामात मदतही करतात.”

हे वाचून ती थक्क झाली. विचार करू लागली –

“खरंच असे नवरे आजकाल असतात का?”

तरीही मन नाही मानलं आणि ती वर गेली…

पाचव्या मजल्यावर लिहिलं होतं –

“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत, देखणे आहेत, घरकामात मदत करतात आणि आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करतात.”

आता तिचं डोकंच फिरू लागलं… विचार केला –

“यापेक्षा चांगलं काय असू शकतं?”

पण तिचं मन अजून समाधानात नव्हतं…

ती शेवटच्या ६ व्या मजल्यावर गेली…

 सहाव्या मजल्यावर लिहिलं होतं –

“आपण या मजल्यावर येणाऱ्या ३३३९ व्या महिला आहात. या मजल्यावर एकही नवरा नाही. हा मजला केवळ सुप्रीम कोर्टाला हे दाखवण्यासाठी तयार केला आहे की महिलांना पूर्णतः समाधानी करणं अशक्य आहे.

आमच्या स्टोअरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! डावीकडे ८ पायऱ्या आहेत, त्या थेट दुकानाबाहेर जातात.”

सारांश –

आजकाल समाजात अनेक कन्या आणि वरपक्षाचे पालक “आणखी चांगला… आणि अजून चांगला… ” याच्या मागे लागून आहेत, आणि त्यातच लग्नाची योग्य वेळ हातातून निघून जाते आहे…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “ते शेवटचं गळणारं पान…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “ते शेवटचं गळणारं पान…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

खूप वर्षांपूर्वी वाचलेली एक कथा, आज मुद्दाम इथे सारांश देत आहे…

एक लहान मुलगी दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून असते, ती काहीच दिवसांची सोबती आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं.

पानगळीचा ऋतू येतो, मुलीला खिडकीतून दूरवर एक झाड दिसत असतं, या झाडाची एक एक करून रोज पानं गळून पडत असतात.

का कोण जाणे, पण या लहान मुलीला वाटतं, गळणाऱ्या या एकेक पानाप्रमाणे माझं आयुष्य सुद्धा एक एक दिवसांनी कमी होत आहे. जेव्हा या झाडाची संपूर्ण पाने गळून पडतील तेव्हा माझा सुद्धा मृत्यू झालेला असेल.

मुलीचे आई वडील सुद्धा मुलीसाठी दररोज झुरत असतात…

एके दिवशी “तो” दिवस येतो, झाडाची सर्व पानं गळून आता फक्त एकच पान शिल्लक राहिलेलं असतं…

मुलीला वाटतं माझा सुद्धा एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे. झाडावरचं हे शेवटचं पान आता उद्या सकाळी गळून पडणार आणि त्याचबरोबर मी सुद्धा…!

या विचाराने, ती खचून जाते, आई-वडील आणि हे सर्व जग आपण कायमचं सोडून जाणार या विचाराने अस्वस्थ होते… तळमळते… खचून जाते, धाय मोकलून रडते…!

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुलगी झाडाकडे पाहते, पान गळून पडलेलं नसतं, ते तिथंच असतं. पान गळून पडलं नाही म्हणजे आपण अजून जगणार… या विचाराने तीच्या मनातल्या आशा आणि जगण्याची उमेद प्रफुल्लित होते…

पुढे दुसरा तिसरा चौथा पाचवा… दिवसांवर दिवस जात असतात, परंतु शेवटचं ते पान कधीच गळून पडत नाही…

मुलीचा जगण्याचा उत्साह वाढतो…

कित्येक महिने जातात, निसर्ग नियमाप्रमाणे झाडाला पुन्हा पालवी फुटते, नवीन पानं येतात… पुन्हा पानगळ होते, तरीही शेवटचं ते पान गळून पडत नाही…

जितकी नवीन पानं फुटली आहेत, तितक्या दिवसांचं माझं आयुष्य मला पुन्हा मिळणार, असा विचार मुलगी करायला लागते… पानगळीनंतर जशी नवीन पाने फुटली, तसे माझ्याही आयुष्यातले दिवस वाढतील, या एका विचाराने मुलगी पुढे अनेक वर्ष आई-बाबांबरोबर जगली…

मुलीच्या आईने एके दिवशी मुलीच्या बाबांना प्रश्न केला, ‘हा चमत्कार घडला कसा? शेवटचं ते पान पानगळीत सुद्धा गळून पडलं नाही आणि इतक्या वर्षानंतर, जीर्ण होऊन सुद्धा झाडावर अजून कसं टिकून आहे?

“बाप” नावाचा तो “माणूस” उलगडा करतो…

शेवटचं ते पान राहिलेलं असताना, मुलगी रडून झोपी गेल्यानंतर, भल्या पहाटे तो त्या झाडाजवळ जातो, झाडाला मनापासून नमस्कार करतो. आणि शेवटचं जे एक पान राहिलेलं असतं, त्या पानाला तो फांदीला डिंकाने चिटकवून टाकतो, सुतळीने घट्ट बांधून टाकतो, अशाप्रकारे की ते पान कधीही पडू नये…!

दोघेही मग एकमेकांच्या गळ्यात पडून हमसून रडायला लागतात…!

कथा इथे संपते… कथा वाचून आपलेही डोळे भरून येतात…!

कथा इथे संपते परंतु विचार चक्र सुरू होतात…

आपण फक्त श्वास, अन्न आणि पाण्यावर जगत नाही, तर जगण्यासाठी लागते एक आशा – उमेद नावाची ज्योत…!

पराभूत होणं, म्हणजे हरणं नसतं…!

लढायच्या आधीच माघार घेणं, म्हणजे हरणं…!!

पडल्यानंतर उठून उभंच न राहणं, म्हणजे हरणं…!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात पानगळ येते, आणि ते शेवटचं गळणारं पान सुद्धा…

अशावेळी गळणाऱ्या पानाबरोबर आपण गळून जायचं नसतं…

आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी येऊन पान फांदीला चिटकवेल याची वाट न पाहता, गळणारं ते पान, स्वतःच उठून, फांदीला चिटकवून, हसत हसत जगायचं…!

परंतु आशा आणि उमेद हरवलेल्या, दुसऱ्याचं गळणारं ते पान मात्र पुढे होऊन आपणच चिटकवायचं… आणि एका क्षणी बाप होऊन जायचं… कुणासाठी आपणच आनंदाचं झाड व्हायचं…!!!

आपण ते दर वेळीच करता, दरवेळी आपणही कुणाचे तरी आईबाप होता… आनंदाचे झाड होता… मी अशा घटनांचा फक्त साक्षीदार असतो.

आपण सर्वांनी मिळून केलेल्या आणि मी प्रत्यक्ष पाहिलेल्या या घटना लेखाजोखाच्या स्वरूपात आपणास सविनय सादर!

  1. या महिन्यात अनेक गंभीर रुग्णांबरोबरच, त्याहून गंभीर असणारे दोन तरुण… या सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. दोघांपैकी एकाला मदर तेरेसा होम मुंबई येथे काही दिवसांकरिता आरामासाठी (Recovery) ठेवले आहे, दुसऱ्याला त्याच्या मूळ गावी सोलापूर जिल्ह्यात पाठवले आहे.

त्यातला एक जण बऱ्यापैकी शिकलेला आहे, आश्रमात पोहोचल्यावर तो म्हणाला, ‘डॉक्टर आता बरा झालो की माझा बोजा मी तुमच्या डोक्यावर ठेवणार नाही… ‘

त्याला म्हणालो, ‘तू माझा बोजा किंवा भार कधीच नव्हतास, हां, तुझी जबाबदारी मात्र माझ्या डोक्यावर होती. ‘

‘भार आणि बोजा लादलेला असतो, जबाबदारी मनापासून स्वीकारलेली असते…! ‘

  1. रस्त्यावर भेटलेल्या, हातापायाने अधू झालेल्या आई-वडिलांना कमरेचे – मानेचे पट्टे, औषध गोळ्या, कुबड्या, काठ्या, वॉल्कर अशी सर्व वैद्यकीय साधने देऊन उपचार केले आहेत.
  2. घरातून बाहेर काढल्या गेलेल्या किंवा त्रासाला कंटाळून स्वतःहून बाहेर पडलेल्या अनेक प्रौढ आणि वृद्ध मावश्यांना एकत्र करून त्यांच्याकडून अस्वच्छ भागाची स्वच्छता करून घेत आहोत, अशा सर्वांची आम्ही टीम तयार केली आहे या टीमला “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे. या महिन्यातील सणवार लक्षात घेता, स्वच्छता करणाऱ्या या लोकांच्या मुखी काहीतरी गोडधोड जावे, या भावनेने प्रत्येकाला पाच पाच किलो साखर दिली आहे.
  3. या वेळच्या पावसाने धरणं भरली, तसे अनेकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी भरलं… रस्त्यावरचे अनेक संसार उध्वस्त झाले. अशा अनेकांना आपल्या सर्वांच्या वतीने किराणा, तसेच छत्री आणि रेनकोट दिले आहेत.

वर सांगितलेल्या लोकांच्या आयुष्यात जशा अवघड वेळा आल्या तशा, आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अशा अवघड वेळा, कधी ना कधी येतच असतात. त्याच्या घटना – प्रसंग – स्वरूप – गांभीर्य वेगवेगळं असू शकतं.

आयुष्यात आलेली ही अवघड वेळ “काट्यासारखी” खुपते… पण आलेली ती वेळ मात्र त्यावेळी मारून न्यायची असते…

कारण सर्वात जास्त घाई कुणाला असते तर ती वेळेला…

“वेळ” कधीच खूप वेळ थांबत नसते, मग ती चांगली असो की वाईट…!

वेळ दाखवणाऱ्या घड्याळात सुद्धा फुलं नाही, तर “काटेच” असतात… हे जळजळीत सत्य आहे…

म्हणजे वेळेला सुद्धा “काटे” चुकलेले नाहीत…!

आणि म्हणून… आती रहेंगी बहारे… असं गुणगुणत, पुढं फुलंही वाटेत भेटतील, या आशेनं, काट्यासारखी खुपणारी तेव्हढीच ती वेळ, निभावून न्यायची बस्स…!

  1. या महिन्यात डॉ. सलीम शेख सर म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय डॉ APJ अब्दुल कलाम सर यांचे नातू (त्यांच्या बंधूंच्या मुलाचे चिरंजीव) यांची अत्यंत जवळून आणि भावपूर्ण अशी भेट झाली. या भेटीचा सविस्तर वृत्तांत ग्रुप वर अगोदरच दिला आहे.
  2. या महिन्यात, मधूनच शाळा सोडलेल्या तीन मुला मुलींना त्यांच्या पालकांशी संवाद साधून पुन्हा शाळेत घातलं आहे. यातील एका मुलीला नर्सरी मध्ये घातलं आहे. शाळेत जाताना ही चिमुरडी, हसत हसत जाते. शाळेत जाताना कायम रडा रड करणारा मला मात्र मी आठवतो.
  3. याच महिन्यात अनेक जीवाभावाच्या वृद्ध व्यक्ती कायमच्या सोडून निघून गेल्या. आयुष्य हे भाड्याची खोली आहे, कधीतरी खाली करावीच लागणार…! हे वारंवार सिद्ध होतं…

मरणाने सुटका केली… जगण्याने छळलं होतं…!!!

या ओळी जणू यांच्यासाठीच लिहिल्या गेल्या…

पण पोटच्या लेकराप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, माया केली, मी त्यांना कधी विसरू शकणार नाही…

 “काळ, जात” राहील… मात्र “काळजात” कायम राहतील, त्यांच्या त्या सुगंधी आठवणी…!

  1. ज्यांना भारताचा नागरिक सोडाच, माणूसही समजलं जात नाही, अशांना एकत्र करून, आम्ही सर्वांनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजाच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता करून, ध्वजाला वंदन केले.

देश प्रेमाची ही ज्योत त्यांच्याही मनात अखंड तेवत राहील.

खरंतर आमच्याकडच्या या सर्व लोकांना रस्त्याकडेचे दगड धोंडे समजलं जातं, हरकत नाही…

झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याला एक मधुर नाद असतो, पण हा नाद निर्माण होतो, झऱ्यात असलेल्या त्या दगड धोंड्यांमुळेच…!

  1. रस्त्याकडेला जे पडून होते त्या सर्वांना रोज जेवण दिले आहे. अति गरीब रुग्ण ज्यांना डबा आणून देणारं कोणीही नाही अशा सर्वांना हॉस्पिटलमध्ये जाऊन जेवण दिलं आहे.

असो,

कुणाला तरी सोडणं, कुणाला तरी ढकलून पाडलं हा “क्षणाचा खेळ” आहे…!

पण कुणाला तरी जोडणं, कोणालातरी उचलणं हा “आयुष्याचा मेळ” आहे…!!

ज्यांना कधी पाहिलेही नाही, अशा सर्व बांधवांसाठी आपण आपल्या घासातला घास काढून देत आहात, त्यांना हात देत आहात. खऱ्या अर्थाने आपण आयुष्याचा मेळ घातला आहे!

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुरलीच्या स्वरांतला कृष्ण… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ मुरलीच्या स्वरांतला कृष्ण… ☆ संगीता कुलकर्णी ☆

☆

नभाच्या निळाईहून गहिरे तुझे नयन नीलकमल

अमावस्येच्या कुशीत जणू उमलले शशिकिरण निर्मल

कुंतलांच्या काळ्या मेघांत मोरपिसांची इंद्रधनू-रेष

तुझ्या एका स्मितात दडले सृष्टीचे सगळे अविनाश गूढविशेष

*

यमुनेच्या यौवनलाटांवर चांदण्यांची चंदेरी पाल

कदंबाच्या कुशीत विसावला तो सावळा नंदलाल

मुरलीच्या अधरामृताने निशेची झाली नादमयी

स्वरांच्या त्या सरींत विरघळली राधेची अंतरीची तृषामयी

*

तुझी मुरली की विरहिणीच्या हृदयाची हाक होती?

की अनंताच्या ओंजळीतील प्रेमाची पहिली चाहूल होती?

एक स्वर तुझा पडता कानावर काळही थबकून राहिला

आणि जीवाचा प्रत्येक कण श्यामरंगात न्हाऊन निघाला

*

गोपींच्या नयनी चंद्र उगवले अधरी थरथरले गान

पैंजणांच्या प्रत्येक नादात धुंद झाले वृंदावन

प्रेमाला जेव्हा शब्द उरले नाहीत तेव्हा  तू मुरली झालास

आणि मौनाच्या मंदिरामध्ये स्वतःच परमेश्वर झालास

*

राधा म्हणजे तुझ्या प्रेमाची निःशब्द लिहिलेली गाथा

तिच्या एका अश्रूबिंदूत सामावली युगांची व्यथा

भेट झाली क्षणभराची तरी जन्मोजन्मींचा सुगंध

दोन देहांच्या पलीकडले ते एकात्मतेचे चिरंतन छंद

*

पण रणांगणी जेव्हा अर्जुनाच्या हातून गांडीव गळाले

तेव्हा तुझ्या अधरांवरचे हास्य गीतेत रूपांतरले

“कर्म” तुझ्या ओठी आले अन्, मोहाचे मेघ विरले

अज्ञानाच्या अंधःकारातून आत्मज्ञानाचे सूर्य उगवले

*

सारथी तू तरी विश्वाचा नियंता तुझ्या मुठीत

रथाच्या चक्रांमधुनी जणू फिरती युगांची गती

विश्वरूपाच्या एका दर्शनात दिशा झाल्या दीपमाळा

अणुरेणूत अनंत दिसले विराट झाला नंदलाला

*

कधी गोकुळचा माखनचोर कधी करुणेचा सागर

कधी सखा कधी योगेश्वर कधी प्रेमाचा अमृतझर

तुझ्या लीलांना सीमा नाही तुझ्या रूपांना अंत नाही

तूच प्रश्न आणि तूच उत्तर तुझ्यावाचून सत्यच नाही

*

आजही मनाच्या मंदिरात तुझी पाऊले ऐकू येतात

विरक्त झालेल्या भावनांना तुझे स्वर पुन्हा जागवतात

जगण्याच्या या रणभूमीवर जेव्हा मी हरवून जातो

तेव्हा अंतरीचा सारथी होऊन तूच मला पुन्हा सावरतोस

*

म्हणून नको वैकुंठ मला नको मुक्तीचा मान

नको स्वर्गीय सुखांची माळ नको मोक्षाचे दान

फक्त एवढीच कृपा कर श्वासात तुझा स्वर राहू दे

हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला, “श्याम” म्हणण्याची ओढ राहू दे

*

माझ्या अश्रूंना यमुना कर माझ्या भावांना भक्ती

माझ्या शब्दांना मुरली कर माझ्या मौनाला शक्ती

जीवनाच्या अंतिम संध्येला जेव्हा सारे रंग विरतील

तेव्हा माझ्या मिटलेल्या नयनांत फक्त तुझेच सावळे आकाश उरेल…

☆

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पालकत्व अपग्रेड व्हायला हवं… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ पालकत्व अपग्रेड व्हायला हवं… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

पालक मित्रांनो, नमनाला पळीभरसुद्धा तेल न घालता थेट मुद्द्याचं बोलूया..

आपली मुलं कॉलेजमध्ये, कोचिंग क्लासेस मध्ये नेमकी कुणाच्या सहवासात असतात याची व्यवस्थित आणि खरी माहिती दोन्ही पालकांना (आई आणि वडील दोघांनाही) असणं नितांत आवश्यक आहे. दोघांपैकी एकाच कुणालातरी माहिती असणं पुरेसं नाही. दोन्ही पालकांची आपल्या मुलांविषयीची मतं, दृष्टिकोन वेगवेगळी असतात, त्यामुळं अर्थातच मुलांच्या कोणत्या वागण्यात कुणाला गैर वाटेल आणि कुणाला गैर वाटणार नाही याची काय खात्री?

आपली मुलं शिक्षण किंवा नोकरी निमित्तानं परगावी राहत असतील तर, ती नेमकी कुठं राहतात, कुणासोबत राहतात, त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत, हे मित्र मैत्रिणी काय काय करतात, त्यांचे पालक कुठे राहतात याची खरीखुरी माहिती पालकांना असायलाच हवी.

आपला मुलगा किंवा मुलगी फावल्या वेळात नेमकं काय करतात, सोशल मीडिया वर नेमकं काय करतात, कशी व्यक्त होतात, कुणाला फॉलो करतात, त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मते काय आहेत, स्वतःचे मत असण्याएवढी आणि ते चारचौघात किंवा सोशल मीडियावर व्यक्त करण्याएवढी परिपक्वता त्यांच्यात आली आहे का, याची खरी आणि पूर्ण माहिती दोन्ही पालकांना असायलाच हवी.

आपल्या मुलामुलींवर नेमका कुणाचा प्रभाव आहे? हा प्रभाव अचानक निर्माण झाला आहे का? अचानकच आपल्या मुलाचे किंवा मुलीचे विचार बदलले आहेत का? आपल्या मुलांची भाषा अचानकच विखारी झाली आहे का? आपली मुलं अचानकच जास्तीत जास्त वेळ नव्याने झालेल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवायला लागली आहेत का? ती सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायला लागली आहेत का? त्यांच्याकडे आपल्या माहिती व्यतिरिक्त वेगळे सिम कार्ड, वेगळा लॅपटॉप किंवा वेगळे सोशल मीडिया अकाऊंट आहे का? याची खरी आणि पूर्ण माहिती दोन्ही पालकांना असायलाच हवी.

त्यातल्या त्यात आपली मुलं कलेची आवड, मीडियाची आवड, नाटकात काम करण्याची आवड, क्रिएटिव्ह रायटिंग ची आवड, मोठं मित्रमंडळ, सोशल मीडियावर भरपूर कनेक्शन्स, हजारो पेजेस फॉलो करत राहणं, सतत ऑनलाईन असणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा, ‘माय लाईफ माय रुल्स’ असा नियम सतत बोलून दाखवणं, कोणत्याही प्रश्नांची धड उत्तरं न देणं अशा वर्तन प्रकारातली असतील तर… पालक मित्रांनो, मुलांपेक्षा आपणच जास्त सावध व्हा.. कारण, या प्रकारच्या मुलांवरच कुणाचं तरी जास्त लक्ष असण्याची शक्यता आहे.

नाकासमोर सरळ चालणाऱ्या, आपल्या करिअरवर अत्यंत क्लिअर फोकस असणाऱ्या, जिवाचं रान करुन अभ्यास करणाऱ्या मुलांकडे कुणी बघणार नाही. कारण, त्यांचा बुद्धिभेद करणं फार कठीण असतं. आपल्या भावंडांच्या, नातेवाईकांच्या सहवासात रमणाऱ्या, सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होणाऱ्या, सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नसणाऱ्या मुलामुलींकडे कुणी बघणार नाही. पण कौटुंबिक मतभेदांमुळे त्रासलेल्या, पालकांशी न पटणाऱ्या, कष्ट, परिश्रम, अभ्यास यांवर विश्वास नसणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत वादाचे मुद्दे काढून भांडणाऱ्या, वाद घालणाऱ्या, कुठं काय बोलावं याचा अजिबात पाचपोच नसणाऱ्या मुलामुलींकडे मात्र आता विशेष लक्ष दिलं जाईल, अशी दाट शक्यता आहे. त्यांच्या याच वागण्याचं राजकीय भांडवल करण्याचे प्रयत्न होतील.

‘आम्हाला कुणी समजूनच घेत नाहीय’, असं आपली मुलं मुली सतत म्हणतात का? पालक म्हणून आपण जे वागतो, त्यातलं काहीच आपल्या मुलामुलींना पटत नाही का? आमच्यावर अन्याय होतोय असं आपली मुलंमुली सतत बोलत राहतात का? असं असेल तर हीच मुलं मुली भविष्यात रडारवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्या मुलामुलींना त्यांच्या मनातलं सगळं ऐकून घेणारा कुणी गुड लिसनर हवाय का? आणि कुणी त्यांना “आम्हीच तुमचे गुड लिसनर आहोत” असं ठासून पटवण्याचा प्रयत्न करतंय का? जर असं असेल तर आपल्या मुलामुलींच्या याच अस्वस्थ, अशांत मनस्थितीचा गैरफायदा कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी करुन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०२६ मध्येच २०२९ च्या निवडणुकांविषयी पत्रकार प्रश्न विचारायला लागले आहेत. अनेक विचारवंत “देशाचे निर्णय संसदेत नाही तर रस्त्यांवर व्हायला हवेत” असं स्पष्ट म्हणत आहेत.

कुणीतरी इतक्यातच भारताला “मनहूस देश” म्हटलं आहे. देशाच्या पंतप्रधानांना मोकाट सुटलेला सांड म्हणून झालेलं सगळ्या देशानं पाहिलेलं ऐकलेलं आहे. त्यांना “घटिया प्रधानमंत्री” म्हणून झालेलं आहे. “त्यांना मूलबाळ, संसार नाही, त्यामुळं त्यांना तरुणांची मनं कळणार नाहीत” हेही बोलून झालं आहे. एकूण काय तर, तुमचं भवितव्य चांगलं नाही आणि त्याला कारण देशातला सत्ताधारी पक्ष आहे, असं तरुणांच्या मनांवर नव्हे तर, बुद्धीवर बिंबवण्याची सुरुवात झाली आहे. तरुण पिढीला रस्त्यांवर आणून सरकारवर दबाव टाकून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे प्रयत्न मोठ्या ताकदीनं सुरु झाले आहेत.

आता पालकांना असं वाटेल की, यात आमचा आणि आमच्या मुलांचा काय संबंध? आम्हाला तर आमच्या मुलांबद्दल पूर्ण खात्री आहे, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण, इथेच तर पूर्ण सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आपल्या मुलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या फावल्या वेळेचा, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्यांच्या मतं व्यक्त करण्याच्या पद्धतीचा अन्य कुणीही गैरफायदा घेता कामा नये. त्यांना अन्य कुणीही वापरुन घेता कामा नये.

आपणच आपल्या मुलांशी चांगला, मनमोकळा सहज संवाद वाढवणं गरजेचं आहे. आपणच आपल्या मुलांचे गुड लिसनर व्हायला हवं. वात्रटपणा आणि वाह्यातपणा यांच्यात फरक असतो. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी मांडण्याची सुद्धा एक वेगळी योग्य पद्धत असते, हे मुलांना सांगायला, शिकवायला नको का?

देशातली कायदे व्यवस्था आपल्या मुलामुलींच्या पूर्ण परिचयाची नाही. सोशल मीडिया संदर्भातले कायदे मुलामुलींना अद्यापही ठाऊक नाहीत. हक्क आणि स्वातंत्र्याची घोषणाबाजी करणं फार सोपं आहे, पण कायद्याच्या चौकटीत न वागण्याचे फटके आपल्या मुलामुलींनी सोसावेत, इतकी त्यांची शारीरिक, मानसिक क्षमता आहे का? अगदी स्वच्छ सांगायचं तर – अजिबात नाही.

आपल्यापैकी बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमधल्या मुलामुलींना स्वतःचं बरं वाईट नीट कळतं का? स्पष्ट सांगायचं तर – नाही. मग “कुणीही यावं आणि टिकली लावून जावं” इतकं आपल्या मुलांचं आयुष्य वाऱ्यावर सुटलेलं आहे का? नाही ना..

आंदोलन करताना ब्रिटिशांची लाठी खाऊन हुतात्मा झालेल्या लाला लजपतराय यांचं नाव आजचे सो कॉल्ड जेन झी आंदोलक घेतही नाहीत आणि ह्यांचे तथाकथित नेते स्वतःसुद्धा अंगाला झळ बसवून घेत नाहीत. पण ह्यांच्या बोलण्याला भुललेल्या मुलामुलींना कायदा हातात घेतल्यामुळं पोलिसांचा प्रसाद खावा लागला आहे. दोन तीन तास एअर कंडिशनर नसेल तर उन्हानं चक्कर येऊन पडणारे लोक अख्खा देश बदलण्याची वल्गना करतात, तेव्हा त्यावर हसू सुद्धा येत नाही, फक्त कीव येते.

देश बदलण्यासाठी कुणीकुणी आयुष्यं झिजवली आहेत, हे आपल्या मुलांना माहिती तरी आहे का? त्यांना बाबू गेनू, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस ही मंडळी ठाऊक नाहीत. अमरेंद्रनाथ चटर्जी, अतुलकृष्ण घोष, भूपेंद्रनाथ दत्त, धनसिंग गुर्जर, राणी कित्तूर चन्नम्मा, मदनलाल धिंग्रा, राजा नाहर सिंह, सांगोली रायण्णा, वेलू नचियार, यातली किती नावं आपल्याला किंवा आपल्या मुलांना ठाऊक आहेत?

‘देश बदलण्यासाठी ऐंशी-नव्वद तास काम करायला हवं’ असं नारायण मूर्ती म्हणाले की, आपल्याला ते नको वाटतं. ‘पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलूया’ असं दिलीप कुलकर्णी म्हणाले की, आपल्याला ते नको वाटतं. व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला अक्षयकुमारने दिला की, आपल्याला ते नको वाटतं. वयाच्या ९३ व्या वर्षी सुद्धा एकदम खणखणीत प्रकृती असणारे, रोजच्या रोज दणकून व्यायाम करणारे मधुकर तळवलकर आपण आपल्या मुलांना दाखवतो का? रघुनाथ माशेलकरांनी देश बदलण्यासाठी पन्नास वर्षांहून जास्त काळ स्वतःला झोकून दिलं, त्यांची गाथा आपण आपल्या मुलांना सांगतो का? अमेरिकेनं स्वतःच्या नावावर करुन घेतलेलं हळदीचं पेटंट पुन्हा भारताकडे आणण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले, हे नव्या पिढीला आपण सांगतो का? पर्यावरणाच्या जतन, संवर्धनासाठी आजही रोज मातीत अक्षरशः घाम गाळणारे जुन्नरचे रमेश खरमाळे सरकारवर टीका करत बसण्यापेक्षा स्वतःपासून बदलाची सुरुवात करणं जास्त योग्य मानतात. त्यांचा आदर्श घ्यावा, असं आपण आपल्या मुलांना सांगतो का?

म्हणजे, देशात ज्या उत्तम गोष्टी घडतायत, त्यांची चर्चाच आपल्या घरात होत नाही. आपण आपल्या मुलांशी अशा विषयांवर बोलतच नाही. “आम्हाला वेळ नसतो आणि मुलांनाही वेळ नसतो” हे वाक्य आता पर्मनंटली डिलिट करुन टाका. आईवडील हे फक्त पैसे आणि सोयी पुरविण्यासाठीच असतात, हे तत्त्वज्ञान तद्दन बिनडोकपणाचं आहे.

पोलिसांचे फोन येणं, आपल्याला किंवा मुलांना पोलिस चौकीत बोलावलं जाणं आणि तिथं आपल्याला मुलांच्या अनेक दिव्य कृत्यांचे साक्षात्कार होणं, हे आपण निगेटिव्ह मार्कांनी नापास होण्याचं लक्षण असतं. मुलांकडे अक्षम्य दुर्लक्ष किंवा अज्ञान या कॅटेगरी मधून तात्काळ बाहेर पडा. आणि सकारात्मक गोष्टी आवर्जून शोधून काढा. त्याची चर्चा सुरु करा, वाढवा.

आपल्या मुलांच्या मनात नेमकं काय खदखदतंय याचा शोध घेणं, हे पालकांचंच मूळ काम आहे. आणि त्यांच्या पोटातली खदखद त्यांचीच आहे की कुणा दुसऱ्याचाच पोटशूळ ह्यांनी आपल्याला लावून घेतला आहे, याचाही शोध घ्यायला हवा. कुणाच्या तरी स्वार्थाची मळमळ आपल्या घरात कशासाठी हवी? त्यासाठी आपल्याला आपल्या देशानं आजवर काय काय दिलं, हेही पालकांनी आठवून पहावं. त्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी नक्की सापडतील. आणि त्याचबरोबर आणखीही एक आत्मपरीक्षण करावं – ‘मी इतकी वर्षं या देशात नांदतो आहे. मी माझ्या देशासाठी आजवर काय काय केलं? देशासाठी किती वेळ दिला? काय काय त्याग केला? देशासाठी किती झिजलो? ‘ देशासाठी वेळ, बुद्धी द्यायला हवी, हे मुलांना शिकवलं का?

देशाची सेवा करण्याचे, देशाला मोठं करण्याचे आणि देशातल्या त्रुटी सुधारण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. रतन टाटांचा मार्ग, रघुनाथ माशेलकरांचा मार्ग, सुधा मूर्तींचा मार्ग, आनंद देशपांडेंचा मार्ग, अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत. यांच्यापैकी कुणीही गैरसमज, पूर्वग्रह यांचं माध्यम वापरलं नाही. तरुणांना उलटे सल्ले दिले नाहीत. सरकारी किंवा राष्ट्रीय साधन संपत्तीचा गैरवापर केला नाही आणि नुकसानही होऊ दिलं नाही, हे जास्त महत्त्वाचं आहे.

वेळ हातात असणं, हीच अनेकदा फार मोठी शक्ती असते. वेळ निघून गेली आणि नंतर योग्य-अयोग्यतेची जाणीव झाली तरी उपयोग नसतो. ११ वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी पेनाचं निब बदलण्यासाठी ज्या मुलाच्या खिशात २५ पैसे नव्हते, त्याच मुलानं ५०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करणारी कंपनी उभी केली, ते पद्मश्री अशोक खाडे आपल्या देशानं पाहिले आहेत आणि देशात आंतरराष्ट्रीय परिषद सुरु असताना, हजारो परदेशी उद्योजकांच्या कार्यक्रमात कपडे काढून धिंगाणा घालणारे तरुणही आपल्या देशानं पाहिले आहेत. जे आज आपल्या देशाच्या पंतप्रधानांना मोकाट सुटलेला सांड म्हणत आहेत, त्यांनी या तरुणांना कुठलीच विशेषणे लावली नाहीत, हेही आवर्जून लक्षात घ्यायला हवं.

आता पालकांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा काय तर, आपण त्या कपडे काढून उघडा नागडा गोंधळ घालणाऱ्या तरुणांना विसरलो असू, पण कायदा त्यांना विसरत नाही. कोणत्याही समाज विघातक किंवा अयोग्य कृतीसाठी आपलं नाव रेकॉर्डला लागलं की, त्या नावाचा विसर कायद्याला आणि न्याय व्यवस्थेला काही केल्या पडत नाही. कायद्याची स्मरणशक्ती फार विलक्षण. त्यामुळं, आपल्या देशातल्या कायदे व्यवस्थेच्या क्षमतेची परीक्षा आपणही घेऊ नये आणि आपल्या मुलांनाही घेऊ देऊ नये. आपल्या मुलामुलींनी अजाणतेपणी काहीतरी करुन कायद्याच्या कात्रीत अडकण्यापेक्षा आपणच आपलं पालकत्व अपग्रेड करुन हा धोका टाळूया ना..!

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आई म्हणजे भेटीला आलेला देव…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आई म्हणजे भेटीला आलेला देव…“ ☆ संध्या बेडेकर ☆

“आई म्हणजे भेटीला आलेला देव असतो. तर पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट असते. ”

आज ताई कडे गेले होते. सध्या ताई कडे खूप आनंदी, उत्साही वातावरण आहे. गप्पांमध्ये कसा वेळ जातो कळतच नाही. तरी गप्पा संपतच नाही. म्हणून पुन्हा पुन्हा जायचे. असच सुरू आहे.

अजय चे लग्न ठरले आहे. त्यामुळे काम पण भरपूर आहेत व गप्पा पण. एकंदरीत सर्व आनंदात आहोत.

आज जेंव्हा मी पोचले, तेंव्हा भाऊजी जरा वेगळ्याच मूड मधे दिसले. मी जाऊन त्यांच्या मीटिंग मधे सामिल झाले. आपलंच घर आहे. म्हणून संकोच न करता मी बसले. सर्वांनी नेहमी प्रमाणेच माझ्या येण्याची दखल घेतली. भाऊजी म्हणाले,

अग!! अजय चे ‘Training ‘ सुरू आहे. पूढच्या महिन्यात त्याचे लग्न आहे ना. तेंव्हा त्याला काही गोष्टी सांगणे गरजेचे आहे, असे मला वाटले. आमचा अनुभव, आम्ही केलेल्या चूका, ज्या आम्हाला बऱ्याच उशिरा कळल्या. तेंव्हा त्याला, त्याच्या पूढच्या जबाबदारी करिता तयार करावे. म्हणून आम्ही बोलत बसलो होतो.

भाऊजी म्हणाले, अरे!! लग्न म्हणजे तुझे नवीन जबाबदारी चे काम सुरू होणार आहे. आपण नेहमी लग्न म्हणजे सासू, सून हीच मुख्य पात्रे आहेत असं समजतो. यांच्या बाबतीत बोलतो. पण माझ्या मते ज्या घरात सून येणार असते तेथे नवऱ्याचा (पुरुषांचा) रोल महत्वाचा असतो. जबाबदारीचा असतो. त्याचे ‘ Balanced ‘ वागणे, घराला जोडून ठेवते. एकीकडे आई वडील तर दुसरीकडे बायको. दोघे ही महत्वाचे. दोघांना सांभाळायचे असते.

आपणच तिला आपल्या घरी आणले आहे. दुसऱ्या घरातून आलेली ही मुलगी, आपल्या विश्वासावर आली आहे. आपले आई-वडील सोडून, दुसऱ्या घरात जाणे ही सोप्पी गोष्ट नाही. तेंव्हा तिला मानाने सांभाळणे. आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. आजपर्यंत तुम्ही दोघे जे भेटत होता, ती एक झलक आहे. ‘ just introduction ‘ आहे ते. जेंव्हा बरोबर राहू लागाल, तेंव्हा अनेक गोष्टी स्वभावाच्या, सवयीच्या तुझ्या लक्षात येतील. सर्व चांगलेच, तुला आवडणाऱ्या गोष्टी असतील, असं नक्कीच नसणार. पण हळूहळू त्यांची सवय होते. तसेच तिचे पण असणार आहे. तेंव्हा ‘patience ‘ हीच एक लग्न successful होण्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. शांत राहणे शिकावे लागेल. , लगेच ‘reaction ‘ देणे, remark देणे, समजूत करून घेणे, चूकीचे आहे. ते टाळावे लागेल. एकमेकांना समजण्यात पूर्ण आयुष्य निघून जात. एकमेकांना सांभाळणे महत्वाचे आहे. लहान सहान वाद टाळणे. एकमेकांच्या चूकांकडे दुर्लक्ष करणे, अपेक्षा कमी ठेवणे. गरजेचे आहे. तिला ‘Protect ‘ करणे हे तुझे कर्तव्य आहे. तिने असेच वागावे, तसेच करावे. असे हट्ट चूकीचे आहेत. बाहेरच्यांसमोर तिचा मान ठेवायचा. तिच्या माहेरच्या लोकांचा अपमान, खिल्ली उडवणे वगैरे कधीच करायचे नाही. भांडण, वादविवादाचे कारण नेहमी अगदी शुल्लक असते.

ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू म्हणजे, आम्ही, आई-वडील, बहिण भाऊ. आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर असणार आहोत. तू आमच्या बरोबर जसं वागशील तसंच ती वागणार. काही सवयी सुरवातीपासून लावायच्या असतात. दिवसांतून एकदा तरी सर्वांनी एकत्र बसून जेवायचे. गप्पा मारायच्या. संवाद साधायचा. हळूहळू प्रेम वाढत. तिचा बरोबर आईचाही मान ठेवायचा. हळूहळू तिच्या वर जबाबदारी टाकायची. तूला समजत नाही. तुला येणार नाही, जमणार नाही. ही भाषा वापरायची नाही.

आमच लग्न झालं तेंव्हा आजी आणि तुझ्या आईचा वादविवाद कधी झाला नाही असं नाही. पण ती गोष्ट माझ्या पर्यंत आणायची नाही हे मी दोघींना सांगितले होते. मी त्या मधे कधी पडलो नाही. दोघींनी कधी अबोला धरायचा नाही. हे ही मी निक्षुन सांगितले होते.

घरच्या बायका नेहमी आनंदात असाव्यात. त्यांना मान मिळाला पाहिजे. त्यांची तुलना आपापसात किंवा अजून कोणाबरोबर कधी करायची नाही. प्रत्त्येक व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. घरच्या गोष्टी घरातच असाव्यात. दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकुन तस आपल्या घरात वागायचा प्रयत्न करायचा नाही. प्रत्त्येक घरची समीकरण वेगळी असतात.

माझ्या जवळ जे आहे ते उत्तम आहे. असं समजलं तर सर्व गोष्टी जमतात. घरात बायकांचे मत महत्वाचे असते. त्यांना ‘त्या ‘गोष्टी समजतात ‘ज्या ‘ कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही. घरचे वातावरण प्रसन्न ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याकरिता दोन पावलं मागे घ्यावी लागली, तर ती हार नसते. आपल्या माणसांसाठी गरज पडल्यास असे केले तर तुमचा मान वाढतो. कमी होत नाही.

बाकी पैशाचे व्यवहार, व्यवस्थापन या गोष्टींची, एकमेकांच्या सल्ल्याने सुरवातीपासून च काळजी घेतली, तर पूढील आयुष्यही मजेत जाते. हे सर्व तुम्ही तुमच्या हिशोबाने करावे. घरातील खर्चाचा हिशोब आई जवळ असल्यास, सवयीप्रमाणे ती उत्तम पार पाडेल याची खात्री आहे.

आम्ही दोघे काही चूका करणारच नाही असे नाही. जसजसे वय वाढत जाईल तसतसे ‘ चूकांचे प्रकार व प्रमाण ‘ दोन्ही वाढायची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा वेळोवेळी आम्हाला पण सांगत रहा.

सर्वांनी एकमेकांना धरून राहणे महत्वाचे. सर्वांमध्ये स्पष्ट संवाद असावा. आनंद घरातच असतो. लहान सहान गोष्टींत घ्यायचा असतो.

मला भाऊजींचे कौतुक वाटले. आयुष्याचे गणित किती सोप्या भाषेत समजावून सांगितले. काही गोष्टी आधीच बोलायच्या असतात. नंतर बोलून त्याचा उपयोग नसतो. प्रत्त्येक कामाची सुरवात कशी होते हे नेहमीच महत्वाचे असते. त्यावरच शेवट अवलंबून असतो.

मी हसून म्हंटले,  “भाऊजी!! नवरा संस्कार केंद्र उघडा की तुम्ही. खूप चालेल. “

भाऊजी हसले व म्हणाले,  आपलं कर्तव्य वेळेवर पार पाडणे, ही आपली जबाबदारी असते.

भाऊजी म्हणाले, अरे, अजय लक्षात ठेव,

“आई म्हणजे भेटीला आलेला देव असतो, तर पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट असते. “

म्हणतात ना,  

“संबंध, प्रेम, ‘वर्षा ‘ जैसा नहीं होना चाहिए, जो बरस कर खत्म हो जाए।

बल्कि संबंध ‘शीतल हवा ‘ की तरह होना चाहिए, जो खामोश हो, परंतु सदैव आसपास हो ।” 

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वार्डरोब… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ वार्डरोब… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

परवा शांता शेळके यांची सुप्रसिद्ध पैठणी नावाची कविता पुन्हा एकदा वाचली. यावेळी केलेलं तीचं, अर्थात कवितेच माझ्याकडून होणार हे कितवं वाचन असेल, माहिती नाही. कवितेतील आजी कितीतरी प्रसंगांमध्ये फडताळात ठेवलेल्या गाठोड्यातील धानी रंगाची पैठणी नेसून मिरवली. पैठणीने आजीच्या आयुष्यातील कितीतरी उन्हाळे पावसाळे बघितलेत. ती कितीतरी प्रसंगांची साक्षीदार होतांना नकळतपणे वेगवेगळ्या मंगल प्रसंगातील दरवळ तिच्यामध्ये कायमचे भिनलेत, इतके की कवयित्री आजही त्यांना अनुभवते व आजीच्या आयुष्याचा संपूर्ण कालपट पैठणीच्या निमित्ताने कवयित्री समोर उलगडतो. अशा आशयाची अगदी पैठणी इतकीच तलम व सर्वांग सुंदर असलेली ही आशयघन कविता. ती वाचून संपली तरी मला मात्र डोळे मिटून पैठणीच्या नारळी पदरासोबत बराच वेळ रेंगाळावं असं वाटत असतानाच, हाताशी असलेला मोबाईल वाजला व फोनवर पलीकडे असलेल्या माझ्या मैत्रिणीशी बोलायला लागले. दोन्हीकडून सलामीची एक दोन वाक्ये झडली आणि मैत्रिणीने मूळ विषयाला हात घातला. मैत्रीणीला माहेरच्या नातेवाईकांकडील एका लग्नसोहळ्यात केवळ हजेरी लावायची नसून, लग्न निकटस्थ नातेवाईकांकडचे असल्यामुळे हौसेने भरपूर मिरवायचं होतं. मिरवण्यासाठी लागणाऱ्या विशेष महत्त्वाच्या बाबींपैकी एक बाब म्हणजे विविध वस्त्र प्रावरणे. म्हणूनच हल्लीच्या लग्न समारंभातील वेगवेगळ्या प्रसंगानुरूप निरनिराळ्या साड्या, काही देशी तर काही विदेशी पद्धतीच्या कपडे (Indian and western style outfits) खरेदीसाठी तिला माझी मदत हवी होती. मदत अर्थातच केवळ एक सोबत म्हणून आणि एखादवेळी निवड करतेवेळी उद्भवणाऱ्या अत्यंत बिकट किंवा निर्णायक प्रसंगी माझं मत देखील द्यायला हरकत नव्हती परंतु ते स्वीकार्य असेलच असे मुळीच नाही. मुळात या सगळ्या खरेदीच्या खटाटोपालाच मी नापसंती दर्शवत म्हटले, अगं सहा महिन्यापूर्वीच तर तुझ्या सासरच्या नातेवाईकांकडे झालेल्या लग्नप्रसंगासाठी तू बरीचशी खरेदी केलीय. आता आणखी कशाला वेगळी करायचीय तर ती म्हणते कशी; अगं तुला कसं कळत नाही, लग्न जरी माझ्या माहेरच्या नातलगाकडचं असलं तरी माझ्या सासरचे काही लोक तिकडे येणारच आहेत आणि मग बरं दिसत का, तेच ते कपडे घालून मिरवलेलं. य़ा युक्तिवादावर मी तिला परत आठवण करून देत म्हणाले, अगं मागे दीडेक वर्षांपूर्वी नाही का, आपल्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा तू बरंच काही नवीन घेतलं होतंस, तेही चालेल ना गं यावेळी वापरायला कारण इकडे आपल्या मैत्रिणीकडच्या लग्नातलं कुणीही असणार नाही तुला बघायला, मी हसतच म्हणाले. ती आवाजाचा पोत जरा चिडका करंत म्हणाली अगं अशी काय म्हणतेस, वर्षाभरापूर्वीच्या कपड्यांचा आणि साड्यांचाही ट्रेंड आता बदललाय, आहेस कुठे, तेव्हाचे कलर कॉम्बिनेशन, डिझाईन, मटेरियल आता आउटडेटेड झालेत, म्हणून तर नवीनच घ्यायचं म्हणतेय. माझ्या डोक्यातून आपली कवितेतली धानी रंगाची पैठणी काही निघता निघेना, मी आपली नेटाने किल्ला लढवतच राहिले आणि तिला म्हणाले, अगं कसला आलाय ट्रेंड वगैरे आपण जे घातलं किंवा नेसलं त्यालाच आज घडीचा ट्रेंड म्हणायचं, नाहीतर काय वर्षभरापूर्वी आवडीने खरेदी केलेल्या महागड्या साड्या आणि ड्रेसेस कसे काय हद्दपार करायचे. सहाएक महिन्यात अगदी मोजून एखादे वेळेस वापरलेली कापडं पुन्हा नकोत, केवळ ती आपल्या अंगावर आधी कोणीतरी बघितलेली आहेत म्हणून, का ग बाई. हे ऐकल्यावर तिने ठीक आहे म्हणून बहुतेक रागानेच फोन बंद केला. तो दिवसच तसा होता, एक वेगळच वळण घेतलेला, पहिले पैठणी कविता आणि नंतर हे फोनवरचं संभाषण. दोन्ही प्रसंग मला एकमेकांपासून वेगळे करताच येईनात, नुसती सरमिसळ चाललेली. एवढे कमी होते की काय, म्हणून वस्त्र प्रावरणे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी अनुभवलेल्या जुन्या नव्या प्रसंगांची मालिकाच जणू, एका मागून एक सरकायला लागली.

कोणे एके काळी सर्वसाधारणपणे ठेवणीतले कपडे ठेवायला कापडाचे गाठोडे पुरेसे असावे, हे पैठणी कवितेवरून अगदी स्पष्टपणे लक्षात येतं. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे गाठोडे जाऊन पेटी किंवा ट्रंक आली आणि नंतर कुठे भिंतीतील तर कुठे वेगळ्या लाकडी वा लोखंडी कपाटांची ठेवणीतल्या कपड्यांचा रूबाब सांभाळायला मदत व्हायला लागली. मला आठवतं, माझ्या शाळकरी वयामध्ये घरातील सगळ्यांचे दररोज वापरायचे कपडे मागच्या ओसरीमध्ये बांधलेल्या दोरी वा आडव्या बांबूवर नीटपणे घड्या घालून तर काही भिंतीतील खुंट्यांवर टांगलेले असायचे. आताशा ओसरीवरची ही दोरी कुठेच दिसेनासी झालीयं. कुठे भिंतीतील लाकडी फळ्यांचे कप्पे असलेली उघडी वा क्वचितच पटं असलेली कपाटंही दिसंत. गाठोडे, पेटी, कपाट… असा हा मजल दर मजल करीत वर्षानुवर्षे चाललेला प्रवास, अख्खा ड्रेस वा सूट जसाच्या तसा घडी न घालता किंवा, रेशमी भरजरी, कडक खळाच्या सुती, कृत्रिम धाग्यांच्या सुळसुळीत; अगदी कांजीवरंमपासून ते बनारसी, गढवाली पर्यंत तर कलकत्ता, मणिपुरी पासून ते सुरत, इचलकरंजी मीलपर्यंत, कितीतरी प्रकारच्या साड्यांच्या लांबलचक घड्या सामावून घेणाऱ्या आताच्या वॉर्डरोब या मुक्कामी येऊन ठेपलाय. हा विचारांचा प्रवास कधी कालच्या ट्रंका, पेट्यांशी घुटमळे तर कधी आजच्या वार्डरोब या संकल्पनेशी येऊन थबकायचा. विचारांची आंदोलनं कधी मागे तर कधी पुढे हेलकावू लागली.

रागावलेल्या मैत्रिणीच्या फोनच्या पार्श्वभूमीवर, आठवणींच्या खोल डोहात पार तळाला जाऊन बसलेली ही एक हकीगत नकळत उसळी मारून वर आली. वर्षाकाठी हंगामावर कापसाच्या बंड्या अमरावतीच्या कापूस बाजारात विकल्यानंतरच, एक ना दोन पातळांच्या जोड्या खरेदी होत, त्याही परस्पर कापसाच्या बंडीसोबत गेलेल्या पुरुष मंडळींकडून. एखादवेळी म्हणजे अगदी अपवादात्मक प्रसंगी, जसे की घरच्या लग्नकार्यासाठी आणखी एखादं बऱ्यापैकी पातळ वाट्याला येत असे. आणि हो, घरच्या प्रत्येक शुभमंगल प्रसंगी तर नाहीच नाही. त्याकाळी एका पाठोपाठ मंगलकार्ये उरकतांना कर्त्या माणसांची चांगलीच दमछाक होत असे. त्यामुळे मागच्या वर्षी पुतणीच्या लग्नात सगळ्यांनी पाहिलेलं पातळ यावर्षी परत लेकाच्या लग्नात नेसलं तर बरं दिसेल का? हा असला विचार कुणाच्या गावीही नव्हता किंवा तसली चैन बहुसंख्य लोकांना परवडणारीही नसे म्हणा. लहान भावंडांच्या कुंडलीमध्ये तर मोठ्यांना आखूड झालेले कपडे वापरण्याचा तो कुठलासा योग कायमच ठाण मांडून बसलेला असायचा. परंतु अशाही आर्थिक ओढाताणीच्या दिवसांत अगदी सहजपणे घडणारी गोष्ट अगदी लख्खपणे आठवली. नवीन कोरं करकरीत पातळ किंवा साडी स्वतः नेसण्याआधी घरातल्याच दुसऱ्या कुणाला म्हणजे जावेला, सुनेला नंणंदेला किंवा अगदी शेजारणीला वा दोन घराआड राहणाऱ्या आपल्या सखीला प्रथम नेसायला द्यायचे. याला घडी मोडायला देणे असे म्हणत. तिने ते दिवसभर अंगावर मिरवायचे दुसऱ्या दिवशी धुवून मूळ मालकिणीला घडी घालून नेऊन द्यायचे. त्या ओढगस्त काळातील हा मनाच्या श्रीमंतीचा पदर आज जरा आणखीच जरतारी भासला, तेव्हा तो कधीही तितकासा ध्यानीही आला नव्हता. वाऱ्याच्या सुखद झुळकेसारखी ही आठवण विरण्याचाच अवकाश तर तेवढ्यात दारावरची बेल वाजली. जाळीच्या दारातूनच पलीकडे उभ्या असलेल्या माझ्या शेजीबाई, कुंदाताई आल्याचं कळलं. त्या आत आल्या, जरा थकलेल्याच दिसल्या. त्या कुठलेसे परदेश पर्यटन करून दोन दिवसापूर्वीच परत आल्या होत्या. प्रवासाच्या दगदगीने थकल्यात या जाणिवेने त्यांना उल्हासित करावे म्हणून मी सहजच विचारले काय छान झालाय ना तुमचा फॉरेन टूर तर त्या अगदी उसळल्याच, अहो कसलं काय इतकी तयारी केली होती या टूरची पण बाई त्या वाह्यात टूर मॅनेजरचा सारखा धोशा लागलेला की बघून घ्या सगळं नीट. प्रत्येक ठिकाणी स्वतःचे फोटो काढण्यात फार वेळ घालवू नका, त्यात म्हणे फार वेळ वाया जातो आणि वेळापत्रक बिघडतं. फार फार तर नेमक्या स्थळांना जसे की तिथली स्मारकं, सृष्टीसौंदर्य, वास्तुशिल्प वगैरे वगैरे कॅमेरातून टिपत चला. मी बोलण्याला वेगळं वळण द्यावं म्हणून मध्येच विचारलं, पण झालं ना तुमचं सगळं नीट बघून तर त्या म्हणतात कशा, ते झालं म्हणा पण टूरसाठी म्हणून कितीतरी कपडे, त्यावर वेगवेगळ्या मॅचिंग एकसेसरीजची खरेदी केली होती हो, पण नीट फोटोच काढता आले नाहीत. त्यामुळे काही मजाच आली नाही. मी समजावणीच्या स्वरात म्हटले अहो यावेळी असं झालं असेलही पण पुढल्या सहलीला तुम्हाला कामी येईल, ही नवीन खरेदी, तर त्या आणखीच वैतागल्या आणि माझा निरोप घेता घेता म्हणाल्या नको ग बाई पुन्हा नवीन घेईल सगळे, नकोच यावेळीचे ते नाट लावे कपडे.

मैत्रिणीची संपूर्णपणे नवीन खरेदी करून लग्नात मिरवण्याची हौस तर शेजीबाईंचा पुढील फिरस्तीसाठी पुन्हा नवीन खरेदीचा मनसुबा, वार्डरोबमध्ये नवनवीन भर पडण्याची ही पण निमीत्त्ये असावीत, असतीलही कदाचित आणि मन परत आजीच्या जीवनपटातील नानाविध गंधात मुरलेल्या धानी रंगाच्या, नारळी पदराच्या पैठणीमध्ये गुंतले.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिळक, मला माफ करा… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ टिळक, मला माफ करा… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

त्या दिवशी तुम्ही स्वप्नात आलात आणि म्हणालात बाप्पाने तुम्हाला एक दिवसासाठी पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली आहे.

म्हणून मी मुद्दाम आमच्या गणेशोत्सव कमिटी मध्ये मीटिंगसाठी गेलो होतो.

मी घाबरत घाबरत हळूच विषय काढला आपण टिळकांचे व्याख्यान ठेवू, ते यायला तयार आहेत. बाप्पाने सुद्धा त्यांना परवानगी दिली आहे. त्यावर कुणी काही बोलेना सर्वांचा गोंधळ दुसऱ्या कुठल्यातरी कार्यक्रमाबद्दल चालू होता.

मी म्हटलं टिळक जर जुने वाटत असतील तर आपण आगरकर किंवा कर्वे किंवा किमान पक्षी दाभोळकरांना तरी पाठवण्याबद्दल बाप्पाला विनंती करू या का?

“ए बामना, तुझी अक्कल तुझ्याकडेच ठेव, या सर्वांसाठी कुणीतरी एक रुपया सुद्धा दील का? आणि किती टाळकी जमतील याचा विचार केलाय का?

हे बघ तुझी अक्कल तुझ्यापाशी ठेव. एक तर गप गुमान कोपऱ्यात बसून रहा. नाहीतर बाहेर जा.

अध्यक्ष साहेब, गौतमीचा कार्यक्रम फायनल करा. संत्या दादा दहा लाख रुपये देतो म्हणलाय! ” 

बहुमताच्या प्रचंड गजरात माझा प्रस्ताव बुडून गेला. टिळक मला माफ करा. तुम्हाला कल्पना नाही की आता पारतंत्र्य नाही, त्यामुळे चांगल्या कार्यक्रमांना माणसे आणि पैसे यांचे गणित जमवता येत नाही. दुर्दैवाने पुन्हा कधी पारतंत्र्य आल्यास मी प्रयत्न करीन.

☆

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या मनातील सल : एक न घडलेली भेट☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

??

☆ माझ्या मनातील सल : एक न घडलेली भेट ☆ विभावरी कुलकर्णी ☆

आयुष्याच्या प्रवासात अनेक गोष्टी घडतात आणि अनेक घडायच्या राहून जातात. ज्या घडतात त्या आठवणींच्या कप्प्यात जमा होतात; पण ज्या राहून जातात, त्या मनात एक हलकीशी कळ आणि अस्वस्थता सोडून जातात. त्यालाच आपण ‘सल’ म्हणतो. नशिबाचा खेळ, वेळेचे गणित आणि स्वतःचा आळस किंवा दुर्लक्ष यामुळे अनेकदा आपण अशा काही क्षणांना मुकतो, ज्यांची भरपाई आयुष्यभरात कधीच होऊ शकत नाही. माझ्याही आयुष्यात असाच एक सल कायमचा घर करून राहिला आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, आमचे दैवत ‘भाई’ अर्थात पु. ल. देशपांडे यांची न घडलेली भेट.

‘पुलं’ हे नाव केवळ महाराष्ट्रासाठी एक लेखक, नाटककार किंवा कलाकार नाही, तर तो एक आनंदोत्सव होता. आमच्या पिढीचे बालपण आणि तारुण्य पुलंच्या समृद्ध लेखनाने, त्यांच्या निखळ विनोदाने आणि त्यांनी निर्माण केलेल्या जिवंत पात्रांनी नटलेले होते. ‘बटाट्याची चाळ’, ‘व्यक्ति आणि वल्ली’, ‘अपूर्वाई’ यांसारख्या कलाकृतींमधील माणसे वाचनात आली की मनातील सगळा ताण पळून जायचा. आजही निराशेच्या मनस्थितीत त्यांचे जादूचे लेखन वाचले किंवा ऐकले की, मनस्थिती बदलून जाते.

पुलंचे शब्द म्हणजे निव्वळ कागदावरची शाई नव्हती, तर तो मनाला तजेला देणारा आणि जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा अमृतप्रवाह होता.

माझ्याबाबतीत सर्वात दुर्दैवाची आणि मनात टोचणारी गोष्ट म्हणजे, मी कित्येकदा त्यांच्या पुण्यातील घराच्या अगदी जवळून गेले आहे. त्यांच्या निवासस्थानाजवळून जाताना दरवेळी मनात यायचे, “आज आत जावे, भाईंना लांबून का होईना एकदा डोळे भरून पहावे, त्यांच्या चरणांना स्पर्श करावा. ” पण दरवेळी मनात एक संकोच आडवा यायचा. इतका मोठा माणूस, आपण अचानक कसे जायचे? किंवा “अरे, आजही वेळ घाईचा आहे, पुढच्या वेळी नक्की जाऊ, ” असा विचार करून मी तो बेत पुढे ढकलत राहिले.

“आज भेटू, उद्या भेटू” असे म्हणत दिवस निघून जात होते. घर अगदी जवळ असूनही आणि मनात अलोट प्रेम असूनही, केवळ ‘उद्या’वर ढकलण्याच्या वृत्तीमुळे ती भेट लांबणीवर पडत गेली. आणि मग एक दिवस ती दुर्दैवी बातमी आली… भाई हॉस्पिटल प्रयाग मध्ये एडमिट आहेत. हे खात्रीने सांगणारी व्यक्ती म्हणजे आमच्या वाड्यात राहणारी सख्खी शेजारीण, जी त्या हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. तिथेही त्या दिवसात त्यांना बघायला आलोट गर्दी व्हायची. मोठे दिग्गज (पुढारी, नट, वक्ते) व सामान्य व्यक्ती ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केले असे सगळेच दवाखान्यात गर्दी करायचे. आणि पुढच्या चार दिवसात ती पोकळी निर्माण करणारी बातमी आली, भाई आपल्याला सोडून गेले.

त्या दिवशी मला स्वतःचा खूप राग आला. मनात एक प्रचंड मोठी चूक घडल्याची जाणीव झाली. ज्या माणसाने आपल्या लेखनाने लाखो-करोडो लोकांच्या आयुष्यात आनंदाचे कारंजे फुलवले, ज्याच्या एका वाक्याने चेहऱ्यावर हसू फुलत होते, त्याला प्रत्यक्ष भेटण्याची, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी माझ्या हातात होती; पण मी ती गमावली होती. ती न घडलेली भेट माझ्या मनावर असा एक कायमचा ओरखडा उमटवून गेली, जो आज इतक्या वर्षांनंतरही तसाच ताजा आहे.

आपण अनेकदा म्हणतो, “जाऊ दे, नशिबात नव्हते, आपला योग नव्हता. ” स्वतःचे समाधान करण्यासाठी किंवा मनाला समजावण्यासाठी हे शब्द ठीक आहेत; पण अंतरात्म्याला ठाऊक असते की, तिथे नशिबापेक्षा आपलाच हलगर्जी कारणीभूत होतो. ती रुखरुख आयुष्यभर मनात राहते. “माझ्याकडून असे कसे घडले? मी का नाही गेले? ” ही स्वतःला दिलेली दूषणे आणि हीच चूक पुन्हा पुन्हा आठवून होणारी घालमेल म्हणजेच हा सल.

पुण्यात त्यांच्या नावाचे एक उद्यान आहे. त्यांच्या साहित्यातील व सांस्कृतिक योगदानासाठी त्यांचे नाव या देखण्या उद्यानाला देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्या उद्यानात जेव्हा जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा मनातील सल जाणवत राहतो 

पुलंच्या या न घडलेल्या भेटीने मला आयुष्याचा एक खूप मोठा धडा शिकवला. आपल्या जवळच्या, प्रिय किंवा आपण आदर करत असलेल्या माणसांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘उद्या’ची वाट पाहायची नसते. कारण काळ कोणासाठीच थांबत नाही आणि निघून गेलेली वेळ किंवा माणूस कधीच परत येत नाही.

आजही जेव्हा जेव्हा मी पुलंचे पुस्तकाचे पान उघडते किंवा त्यांचे भाषण ऐकते, तेव्हा त्यांचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि त्याच वेळी मनातील ती जुनी जखम पुन्हा ओली होते. घराच्या दारापर्यंत पोहोचूनही आत न जाण्याची ती चूक, ती न घडलेली भेट… हा माझ्या मनातील असा सल आहे, जो आयुष्यभर माझ्यासोबत राहील आणि मला वेळेचे अन् माणसांचे महत्त्व सातत्याने आठवून देत राहील.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares