मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनासारखे कुणी.. की समजून घेणारे कुणी..?” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

??

☆ “मनासारखे कुणी.. की समजून घेणारे कुणी..?” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा, समजून घेणारी व्यक्ती शोधा म्हणजे आयुष्य मनासारखं होईल. “••••••

आमचे ताई भाऊजी म्हणजे एक ‘perfect couple ‘. Made for each other. ••••

दिसण्यात, रंगरूपाने म्हणण्यापेक्षा, एकमेकांना छान समजून घेतात. म्हणजे आजच्या भाषेत त्या दोघांची ‘chemistry’ छान जमते, असं म्हणता‌ येईल. म्हणूनच कोणतीही ‘situation’ दोघे मिळून छान सांभाळतात. मुख्य म्हणजे दोघे एकमेकांचे शांतपणे ऐकतात. ऐकमेकाचा मान ठेवतात. सर्वांचा विचार करून डिसिजन घेतात. •••••

म्हंटल तर दोघेही काही उच्च शिक्षित, खूप श्रीमंत असे नाही. अगदी मिडिल क्लास परिवार. कपडे, वस्तू जरी ‘ branded ‘ वापरत नसले तरी, विचार मात्र ‘branded’ असतात. प्रत्येकाच्या गुणांचा मान ठेवतात, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. एक छान मध्यमवर्गीय आनंदी परिवार. ••••

बरोबर आहे, •••

“Happiness does not depend on what you have?? or who you are ??, It surely relies on what you think. “•••••

त्यांच्या सुखी संसाराचा, त्यांच्या लोकप्रियतेचे कारण, मग ते नातेवाईकांमधे असो, नाहीतर त्यांना ओळखणाऱ्यांमधे असो, फक्त एकच आहे, ते म्हणजे त्यांचे वागणे, बोलणे. दुसऱ्यांचाही मान ठेवणे, गरजूंना आधार देणे, कोणाच्याही घरातील फक्त चांगल्याच गोष्टी बघणे. खूप गोड बोलत नसतील, तरी स्पष्ट पण मृदू शब्दात आपल मत मांडण जमतं त्यांना. कारण दुसऱ्यांचाही मनाचा विचार करणं जमत त्यांना. •••

आपल्या घरचे प्रश्न शांतपणे सर्वांचा विचार करून सोडविणे. दुसऱ्यांच्या घरात मग ते भावाचे असो, नाहीतर दीराचे, किंवा शेजारच्या घरात लुडबुड करायची नाही. विचारल्या शिवाय सल्ले द्यायचे नाही. आपल्या घरच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही. मुद्दामुन दुसऱ्यांच्या घरातील नाजूक गोष्टींची चर्चा त्यांच्या समोर किंवा मागे करायची नाही. असं साधं, सोपं, सरळ गणित व नियम आहेत ताई भाऊजींचे. त्यामुळे कधीच वादात नसतात ते दोघे. ••• 

तस बघीतले तर असाच विचार प्रत्येकाने करायला हवा, हे कळत सर्वांना, पण तसं वागण जमतंच अस नाही. ••••

काही जण खूप सल्ले देतात. तुम्ही काय करा, काय करू नका, असं करा, तसं करू नका, हे करायलाच पाहिजे, ते का करता?? अजिबात बरोबर नाही ते. तुम्ही येथेच चूकताय. मग तो डॉक्टरी सल्ला असो, व्यायामाच्या बाबतीत असो, नाही तर साधी बटाट्याची भाजी करणे असो. ••••

आजपर्यंत आई सारखी मुलगी बघीतली नाही. व तिची मुलगी पण वेगळीच असते. प्रत्त्येक जण वेगळा विचार करतो. ••••

“प्रत्त्येक माणूस वेगळा 

विचारसरणी वेगळी

मनुष्य जन्मा तुझी 

कहाणीच आगळीवेगळी.” ••••

अरे देवा!! मग काय गरज आहे हे सर्व बोलायची ???प्रत्येकाचा स्वभाव, क्षमता, दृष्टिकोन, अनुभव, सवयी त्यांच्या अनुरूप ते ठरवतील ना. सल्ला नक्की द्या, पण विचारला तरच. ••••

आणि तुम्हाला प्रत्त्येक क्षेत्रातील सर्व कळत, असे सर्टिफिकेट तुम्हाला कुठुन मिळाले आहे का ?? आणि दुसऱ्याला मार्क्स द्यायला तुम्ही perfect 10 आहात का ? ••••

ताई नेहमी म्हणते, •••• ज्या घरच्या नवरा बायकोला सासरी व माहेरी एकमेकांचा मान ठेवता येतो. आपल्या घरच्या कोणत्या गोष्टी बाहेर च्या लोकांना सांगायच्या व कोणत्या नाही ? हे कळत. त्या घरात अर्धे प्रश्न उद्भवतच नाही. सगळ्यांना सगळंच सांगायचे नसते. सगळेच आपले नसतात. •••••

ताई नेहमी सांगते, ••••मी अनुभवाने शहाणी झाली आहे. माझी कमी उंची व सावळा रंग. यावर मी खूप टीकास्त्र झेलले आहेत. माझ्या जाडीवर लोकांचे बारीक लक्ष असायचे. ••••

सुरवातीला बरेच वेळा, मला हा रंग चांगला दिसत नाही. मला स्वयंपाक येत नाही, तुला वजन कमी करायची खूप गरज आहे, अशा अनेक गोष्टींची चर्चा माझ्या नवऱ्या समोर होत असे. •••• 

खर तर आमचं लग्न arrange marriage होते. लग्नाआधी सर्व गोष्टी बघूनच होकार दिलेला असतो ना, मग त्याची चर्चा नंतर करायची गरजच काय ?? •••

अशी चर्चा वरचेवर झाली, तर त्याकडे लक्ष जाऊन एखादा मानसिक दृष्ट्या कमजोर व्यक्ती त्यावर विचार करतो. सारख तेच ते ऐकून ती गोष्ट त्याला पटू लागते. हळूहळू विचार, वागणं बदलत. आणि येथेच वादाला सुरुवात होते. दुरावा निर्माण होतो. ••••

परंतु आमच्या बाबतीत, आम्ही दोघांनी एकमेकांना साथ दिली. आमचे प्रश्न आम्ही दोघांनी मिळून सोडविले. त्यामुळे दुसऱ्यांना माझ्या घरात जास्त लुडबुड करणे जमले नाही. याचे कारण आम्ही दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले होते. दोघे एकमेकांना साथ देत होतो. मानसिक दृष्ट्या मजबूत होतो. जर दोघांपैकी एक जण पण घाबरट असता, मनाने कमजोर असता, तर बाहेरच्यांचे फावले असते. म्हणतात ना, ••••

” मन हळव असावं पण दुबळ नाही. ” •••

एकदा का मनात एकमेकांबद्दल असे विचार येणे सुरू झाले की मग अनेक पूढच्या गोष्टी सहज घडत जातात दोघांमधे थोडी नाराजी येते, वाद होतात. न्युनगंड निर्माण होतो. ते बरोबर नाही. त्यामुळे नवरा बायकोने सावध असणं गरजेचे आहे. सहजीवन समाधानाने जगण्यासाठी एकमेकांना सांभाळून घेणे आवश्यक आहे. •••

म्हणूनच म्हणतात ना, •••”नवरा बायको एकमेकांचे पूरक असतात. “••••

“जो जसा आहे तसाच व्यक्त झाला तर आतल्या आत श्वास गुदमरणार नाही. “••••

‘ Be yourself. ‘ 

” Life is to express yourself not to impress others. ” •••••

छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले. एकमेकांची काळजी घेतली, आपापल्या मर्यादा सांभाळल्या, विश्वास ठेवला. की हेच प्रेम आपल ‘अभेद्य कवच ‘ बनत. व संसारात येणाऱ्या अनेक अडचणींवर सहज मात करता येते. •••

म्हणतात ना, ••••

” एक परवाह ही हैं जो बताती हैं कि ख्याल कितना है ??वरना कोई तराजू नहीं होता रिश्तों में ।” •••••

तसेच माणसं ओळखता आली पाहिजेत. कोणाचे किती ऐकायचे ?? किती मनावर घ्यायचे ?? कोणाला किती महत्व द्यायचे ?? हेही ठरवता आले पाहिजे. ••••

आपल्या घरचा ‘बॉस’ आपणच असाव. मी कोणाचे कधी ऐकलेच नाही, असं नाही. पण आम्हाला जे पटले तेच मी केले. ••••

नवरा बायको एकमेकांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले, आपल्या आयुष्याची किल्ली आपल्या हातात ठेवली, तर आयुष्य यशस्वी होईलच म्हणून समजा. व सुख म्हणजे नक्की काय ??? तेही समजत. व आंनदाने समाधानाने आयुष्यभर उपभोगता येत. ••••

दुसऱ्यांसमोर आपल्या माणसांने केलेला अपमान कोणालाच सहन होत नाही. •••

” लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तीत्व क्षणभर असतं. ” ••••

आयुष्य भर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा व नीती साफ असावी लागते. ” ••••

ताई नेहमी म्हणते, •••

” आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसे आधी भेटली असती, तर बर झालं असतं. आणि काही भेटली नसतीच तर बर झालं असतं. ” ••••

काही लोक मी खूप हुशार असल्याचा आव नेहमीच आणतात. त्यांचे त्यांच्या बद्दलचे ते मत असावे. यावर माझे काहीच म्हणणे नाही. पण समोरचा बुदधु आहे हे का समजावं ?? ••••

इतरांबद्दल यथायोग्य आदरभाव असावा, मान द्यावा. पण खूप झुकायची गरज नसते. आपला मान आपणच ठेवला नाही, तर मग दुसरे मान देणार नाही हे नक्की समजा. ••••

लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांकडून हेच आश्वासन घेणे गरजेचे आहे. की कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या पाठीशी उभे राहू. एवढं एक आश्वासन कोणत्याही दुसऱ्या आश्वासनापेक्षा महत्वाचे आहे. ••••

” मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा समजून घेणारी व्यक्ती शोधा म्हणजे आयुष्य मनासारखं होईल. “••••

एकमेकांच्या नजरेत चांगल असण महत्वाचं. दुसऱ्यांनी चांगलं म्हणाव हा आग्रह च नसावा. ••••

” आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवेल अशा व्यक्ती पेक्षा, कोणत्याही अडचणीत तुम्हाला एकट सोडणार नाही. अशी व्यक्ती महत्वाची. ” •••••

“रोशनी में तो आपको 

कोई न कोई मिली जायेगा,

लेकिन••••!!!

आप उसकी तलाश करो,

जो अंधेरे में आपका साथ ना छोड़े••••”

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पुन्हा दुबई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ पुन्हा दुबई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

कोरोनाच्या सुरुवातीला 2020 साली 12 मार्चला दुबई- पुणे प्रवास करून पुण्यात आलो आणि त्यानंतर पुन्हा दुबईला येणे झाले नाही! घरातील काही दुःखद प्रसंगांमुळे मुलीचेच पुण्याला वरचेवर येणे झाले. दुबईला ह्यांच्याशिवाय येण्याची ही पहिलीच वेळ होती. दुधावरच्या साईसारखी माझी नात – अनुश्री यावेळी आजीला दुबईला घेऊन यायचंच असं ठरवून आईबरोबर – प्राची बरोबर आली होती! आधी मनाची तयारी करणे आणि मग स्वतःची, यामध्ये माझे ८/ १५ दिवस गेले. एकदाची निघायची तयारी झाली आणि 21 जुलैला पुण्याहून मुंबईला येण्यासाठी गाडी ठरवली. बॅग भरणे तसे सोपेच होते – कपडे आणि औषधे इतकेच! मोठ्ठी यादी करून औषधे आणून घेतली – लागणारी आणि न लागणारी सुद्धा! आता ‘बाबा’ बरोबर नाहीत, तेव्हा सर्व औषधे व्यवस्थित आपणच घ्यायला हवी, असे मनाला बजावत होते. ब्लड शुगर टेस्ट, कोलेस्ट्रॉल टेस्ट वगैरे सर्व करून घेतल्या. त्यात काही नाहीये, कळल्यावर मनाला उभारी आली! पाऊस सोबत घेऊनच पुण्यातून सकाळी नऊ वाजता मुंबईला जाण्यास निघालो. फ्लाईट ३-४५ ची होती. पण पुणे- मुंबई प्रवास ट्रॅफिक आणि पाऊस यामुळे किती तास होईल सांगता येत नाही.. पावसामुळे बाहेरचे वातावरण अगदी ओलं ओलं होतं! पुण्यातून निघताना माझंही मन असंच ओलावलं होतं! नाही म्हटलं तरी तिथे कायम राहत असल्याने त्या घराचा लळा जास्तच! त्यातून मुलगा, सून, नातवंडे सगळी सवयीची झालेली! त्यांच्या वेळा बघणे, वाट पाहणे हे सगळं रोजचंच.. तेजस सोबत जेवणे, त्याला खाऊ घालणे हे माझेच विरंगुळ्याचे विषय! मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांना आपली फार गरज नसते हे बुद्धीला पटलं असलं तरी मनाला नाही ना… रोज ‘आजी किती खाऊ घालतेस!’ असा तेजस चा अभिप्राय ऐकला की माझंच पोट भरतं आणि तनु शाळा, क्लास करून दमून येते, तिने व्यवस्थित खाल्लं की मलाच बरं वाटतं! असो, तर असा हा लळा!

पण तिथून इथे येताना अनुश्री माझी अशी काळजी घेत होती की बस्स! विमानात बसेपर्यंत ‘आज्जू, आज्जू’ करून सतत आजीच्या दिमतीला होती. प्राची मोठेपणाने आम्हा दोघींना सांभाळत, पासपोर्ट, तिकिटे, लगेज याची व्यवस्था बघत होती. आतापर्यंत दुबईला माझ्या खूप फेऱ्या झाल्या, पण ही ट्रीप थोडी वेगळी होती. दरवेळी आम्ही दोघे बरोबर जात असू. आम्हाला बाबांची उणीव अर्थातच जाणवत होती. ह्यांना दुबईला खूप आवडत असे. दुबईचे घर, तेथील नवीन स्थळं पहाणे हे सगळं त्यांना आवडे. मनापासून खुश असायचे. लेक, जावई त्यांना साथ देत असत. नातवंडे लहान होती तेव्हा तर त्यांचा उत्साह खूपच असे, कारण लहान मुलांची त्यांना फार आवड होती.

एमिराएट्स ची फ्लाईट असल्याने आम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेच! फ्लाईट मध्ये मसाला काजू खात आणि इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत “फुलवंती” सिनेमा पाहता पाहता दुबई कधी आली कळलंच नाही! ढगांच्या गालीच्या वरून विमान हळूहळू खाली उतरू लागलं आणि सर्वांची लगबग सुरू झाली. विमानातून उतरून बेल्ट वरून सामान ताब्यात घेतानाही अनुश्रीची आईला मदत आणि ‘आज्जू, तू इथे स्वस्थ बसून रहा, आम्ही काय ते करतो.. ‘ ही आजीला ताकीद! बाहेर आल्यावर मंदार गाडी घेऊन आलेले होतेच. आपल्याकडे पाऊस असला तरी इकडे उन्हाळा चालू आहे आणि तो हवेचा फरक विमानतळातून बाहेर पडतानाच लक्षात येतो. यावेळी मी ज्या घरात आले आहे ते प्राचीचे नवीन घर आहे, त्यामुळे मी ते प्रथमच पाहत होते. फ्लॅट खूपच मोठा आहे. हॉल, चार बेडरूम, किचन, मेड रूम असे सर्व आहे. अनुश्रीने प्रथम मला सर्व घर फिरवले.. मला तर भुलभुलय्या च होता हा!

अवनीश ने आल्या आल्या मला सामान लावायला मदत केली. मुलांनी अक्षरश: आजीची सरबराई केली. प्राची कडच्या मावशी खरोखर ‘अन्नपूर्णा’ आहेत. येथे आले की माझा ‘किचन कट्टा’ बंदच मग “लेखन- वाचन कट्टा” चालू राहतो.

दुबईतील बरीचशी प्रेक्षणीय ठिकाणे पूर्वीच पाहून झालेली आहेत. अबुधाबी रोडवरील नवीन राम मंदिराचे स्थान पहावयाचे आहे. सध्या उन्हाळा खूप आहे. घरात ए सी त बसून बाहेरचे तापमान कळत नाही, पण प्रत्यक्षात हवा खूप गरम आहे. स्वतःचे वाढते वय आणि वजन पाहता, आता भरभर चालणे जमत नाही, पण तरीही जमेल तेवढे फिरायचे, स्वतःला आणि आपल्यामुळे येथील सर्वांना त्रास न होऊ देण्याची काळजी घ्यायची एवढेच!

दुबई चा पहिला दिवस तर साजरा झाला! हळूहळू येथील वातावरणाची सवय होते आणि ती सवय होईपर्यंत जायचे दिवस जवळ येतात… आत्तापर्यंत पुण्यात लेकीचे माहेरपण चालू होते. आता लेकीच्या घरी आईचे माहेर पण चालू आहे! हे केवढे भाग्य आहे माझे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवं स्वातंत्र्य… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ नवं स्वातंत्र्य… ☆ श्री मंगेश मधुकर

गेले काही दिवस टू बी ऑर नॉट टू बी अशीच अवस्था होती. एक विचार मनात घोळत होता अन त्याबाबत निर्णय होत नव्हता. आपली गरज अन त्यासाठी घालवत असलेला वेळ यांचं गणित मांडलं तेव्हा जमेपेक्षा वजाबाकीच जास्त भरली. व्यावहारिकदृष्ट्या कायमस्वरुपी असा निर्णय घेणं शक्य नव्हतं म्हणून तात्पुरच्या काळासाठी स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून १५ ऑगस्टला निर्णय घेतला अन………

“अरे, काय झालं रे”

“काही प्रॉब्लेम”

“एकदम अचानक”

“बरायेस ना”

“कसं शक्ययं”

“फार प्रॉब्लेम होतील”

“जगणार कसा?”

“बाबो, एकदम डेंजर निर्णय”

“टेपररी ईमोशन्समध्ये काहीही करतोस का?”

“प्रॅन्क चांगलाय”

“बघ बाबा विचार कर”

“वाटतं तितकं सोपं नाहीये”

“आयला, भारी निर्णय”

“लकी मॅन, मला पण ईच्छा आहे पण शक्य नाही. ”

“हे काय नवीन खुळं”

“वा!!”

“उत्तम”

“मूर्खपणा”

“फक्त काही दिवस नंतर येरे माज्या मागल्या”

“काहीही!!”

“आजच्या काळात शक्यच नाही”

“वेडा होशील”

“जगणार कसा”

“हे काय नवीन फॅड”

“आवडलं आपल्याला”

“असं करू शकतोस. ”

“एकदम फाडू डिसीजन”

“लेका नशीबवान आहेस. ”

“जगापासून वेगळा पडशील”

“ही थेरं जास्त दिवस चालणार नाहीत”

“अय्या, खरंच. कित्ती भारी!!”

“मी पण करणार”

“काहीही गरज नव्हती. उगीच आपलं…. ”

“सेल्फ कंट्रोल हवा”

“जगा सोबत रहा, नको तो वेडेपणा करू नकोस. ”

“वेगळा निर्णय”

“काहीतरी डिफरंट”

“अंमलबजावणी साठी शुभेच्छा ”

“आ!! हे का? कशासाठी?

“डोक्यावर पडला का?”

“डिफीकलट टू इंपलीमेंट ”

“बेस्ट विशेस”

“ऑल द वेरी बेस्ट”

“बघू किती दिवस हा खेळ चालतोय ते”

“खरंच ब्रेकिंग न्यूज”

— —

माझा निर्णय समजल्यावर नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून वरीलप्रमाणे प्रतिक्रिया आल्या.

अनेकांनी थेट फोन केला तर काहीनी sms केले. डॉक्टर मित्र दोनदा घरी येऊन बीपी चेक करून गेला. सगळं नॉर्मल होतं. या निर्णयावर प्रतिक्रिया येणार याची कल्पना होती पण इतक्या मोठ्या प्रमाणावर येतील असं वाटलं नव्हतं.

…. खरंतर अगदी छोटा, साधा अन खाजगी निर्णय होता. फार काही ग्रेट, क्रांतीकारक वगैरे तर अजिबात नाही…….

…… स्वतःसाठी वेळ आणि मनशांतीसाठी मी मृगजळापासून फारकत घ्यायचं ठरवलं.

रोजच्या जगण्यातला अस्वस्थपणा कमी करण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणा हवं तर.

म्हणून मी ठरवून, फोनमधून फेसबुक, व्हॉटसप, ईनस्टा सगळं डिलिट केलं.

सोशल मीडियावरुन व्हीआरएस घेतली.

फोन आणि मन दोन्हीही शांत झालं.

सुरुवातीला थोडं बेचैन वाटलं पण हळूहळू सवय होतेय….. शरीरासाठी जसा करतो तसाच 

मनस्वास्थ्यासाठी केलेला डिजिटल उपास….

तुम्हीही प्रयत्न करून बघा… 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेन ☆ माझ्या स्वप्नांच्या काही ओळी… — ☆ प्रा. डॉ. सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

☆ माझ्या स्वप्नांच्या काही ओळी…  ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

एकदा काय झालं? – – 

अशोकचक्र माझ्या स्वप्नात आलं, आणि थोड्याच वेळात दिसेनासं झालं.. त्याच्या अंधूक होत गेलेल्या.. आकाशासारख्या आणि समुद्रासारख्या निळाईकडं पहात मी म्हणालो,

” अशोकचक्रा, कुठं तू गेलास ? काही न बोलता गायब झालास “.

सिंहांची डरकाळी ऐकून मी घाबरलो, ‘ कुठं शस्त्र मिळतं का? ‘ हे शोधू लागलो.

तोच दुसरा आवाज आला, पण- तो मंद स्वरातला,

” भिऊ नकोस, मित्रा, मी दिसत नाही म्हणून.. मी असतो त्या स्तंभावर, मी वसतो त्या स्तंभावर..

तिथल्या तीन सिंहांचा तो आवाज आहे “.

परत माझी गाळण उडाली, हातापायातली शक्ति गेली; पुन्हा तो आश्वासक ध्वनि आला,

“ भिऊ नकोस “ म्हणाला. ” ह्या सिंहांमध्ये जरी असेल सामर्थ्य आणि शक्ति, आळवतात ते सदा माणसांचीच भक्ति; आणू नकोस मनात भिती, सिध्दांत त्यांचा असतो शांती; नकोस म्हणू की, मी दिसत नाही, मी आहे सर्वत्र.. का तू बघत नाही ? 

.. हमाल श्रमतो, तिथं मी आहे,

.. मजूर घाम गाळतो ना- तिथं मी आहे; 

.. शेतकऱ्यांच्या गळ्यात मी आहे, ते जिथं राबतात- त्या शेतमळ्यांत मी आहे; 

.. हुंडयासाठी लग्नाच्या होमकुंडात होरपळणाऱ्या ताईमध्ये मी आहे,

.. अश्रूंमध्ये भाकर भिजवून लेकरांना भरवणाऱ्या आईमध्ये मी आहे; 

.. एटीएममधून येणाऱ्या नोटांमध्ये मी आहे,

.. मतदानातून प्रकटणा-या नोटांमध्ये मी आहे; 

.. सोन्याच्या खाणीत मी आहे,

.. दुर्बलांच्या वाणीत मी आहे;

.. खपाटीला गेलेल्या पोटांमध्ये मी आहे,

.. पेटीवर झंकारणाऱ्या बोटांमध्ये मी आहे,

.. मंदिरांमधल्या जोडलेल्या हातांमध्ये मी आहे,

.. मशिदीत जाणाऱ्या पायांमध्ये मी आहे;

.. क्रिकेटच्या मैदानात भारतासाठी झुंजणाऱ्या वीरांच्या मस्तकावर मी आहे,

.. युद्धभूमीत विजयी शूरांनी रोवलेल्या डोंगरशिखरावर मी आहे; सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये मी आहे;

.. या देशासाठी लढलेल्या- स्वातंत्र्यसैनिकांमध्ये मी आहे,

.. चंद्रावर दिमाखात उतरलेल्या यानावर मी आहे;

.. अविद्येविरूध्द लढणाऱ्या तलवारीच्या म्यानावर मी आहे;

.. इथल्या मनामनांत मी आहे;

.. इथल्या कणाकणांत मी आहे;

भेटलास आज तू तर एक विनंती करतो,

” लोकशाहीची आठवण ठेवा, संविधानाने दिलाय तुम्हाला अमोल ठेवा; याच संविधानानं सिंहांना शांतीदूत केलंय, आणि-

.. गलितगात्र मेंढरांना सिंह केलं;

हक्कांचा आग्रह जरूर धरा, पण कर्तव्याचीही कास धरा. तेव्हा कुठं संविधानाच्या स्वप्नांना सत्याचे पंख मिळतील, आणि..

.. आणि लोकशाही चक्राचे सगळे आरे वेगाने फिरतील “.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- sks.satish@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीमंती… लेख क्र. १० ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ श्रीमंती… लेख क्र. १० ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

राहुल काळे हा माझा लाडका विद्यार्थी. त्याला नुकतीच जुळी मुलं (एक मुलगा, एक मुलगी) झाली हे समजलं आणि खूप म्हणजे खूपच आनंद झाला. लगेच त्याला अभिनंदनचा फोन केला. बाळांना बघायला जायचे मात्र काहीना काही कारणाने लांबणीवरच पडत होते, आज तीन महिन्यांनी तो योग आला होता.

शाळेत पोचल्यावर बाळांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी राहुलला फोन केला. तर तो म्हणाला, “बाई, मी आत्ता थोडा वेळ बाहेर चाललोय, पण तुम्ही आजच या. मी गाडी पाठवतो. ” 

डॉक्टर असलेला धाकटा भाऊ स्वप्निल गाडी घेऊन आला. स्वप्निलनं अदबीने गाडीचा दरवाजा उघडला, माझ्या हातातली पर्स मागच्या सीटवर ठेवली. गाडीत थोडा गप्पा झाल्या आणि स्वप्नील – राहुलच्या इमारतीच्या आवारात गाडी थांबली.

स्वप्निल पर्स घेऊन माझ्यापुढे, म्हटलं, “अरे, पर्स दे, ” तर म्हणाला, “राहू द्या, बाई. मी आणतो ना.”

त्याच्या वागण्याने खरंच भारावून गेले. राहुलला म्हटलं, “अरे, गाडी कशाला पाठवलीस? आणि तेही स्वप्नीलला यायला लावलंस. रिक्षाने आले असते. मी काही कोणी मोठी व्यक्ती नाही. ” 

तर तो म्हणतो, “तुम्ही मोठ्या आहात का नाही, हे आम्ही ठरवायचं, तुम्ही नाही. ” त्याच्या उत्तरावर मी निरुत्तर.

घरी तर स्वागताची जंगी तयारी. स्वप्नीलच्या बायकोने शिरा केला होता आणि राहुलच्या बायकोने पोहे. मी घरून येतानाच तुडुंब जेवून गेलेले. “निम्मं करा ग. एवढं सगळं नाही जाणार, ” असं म्हणत गप्पांना सुरुवात झाली.

“श्री दत्त स्नॅक्स” नावाने राहुलची अनेक ठिकाणी हॉटेल्स आहेत. मुंबई अहमदाबाद हायवेवर मनोरला आणखी एका हॉटेलचं बांधकाम सुरू आहे.

त्याच्या वडिलांनी, श्रीक्षेत्र परशुराम येथे एका शैक्षणिक संस्थेला 55 लाख रुपयांची मदत केली होती. त्या शाळेचे कामकाज, त्या शाळेचा रिझल्ट, त्याठिकाणी बाबांसाठी बांधलेलं स्वतंत्र ऑफिस, पनवेल येथे पटवर्धन हॉस्पिटलला त्यांनी दिलेली मदत, या सर्व गोष्टी राहुल – स्वप्नील मोठ्या कौतुकाने सांगत होते.

मुलांच्या कर्तृत्वाचा अभिमान आई-वडिलांना असतो, तर इथे मुलांच्या डोळ्यात आपल्या वडिलांच्या सत्पात्री दानाचा आणि दानशूरतेचा सार्थ अभिमान दिसून येत होता.

शैक्षणिक क्षेत्राला मदत केलेली असल्याने मलाही खूप उत्सुकता होती. राहुलच्या वडिलांचे हे कार्य पाहून कोणालाही आनंद झाला होईल. पैसेवाले बरेच असतात, पण देण्याची वृत्ती फार थोड्या लोकांकडे असते.

इथे तर लक्ष्मी आणि सरस्वती दोघेही आनंदाने नांताने दिसत होते.

राहुलच्या बायकोने दोन्ही बाळं बाहेर आणली. मुलगी आर्या म्हणजे अगदी ज्युनियर राहुल! हाक मारल्याबरोबर इतकी छान हसली की जगातील सर्व मौल्यवान गोष्टी त्यावरून ओवाळून टाकाव्यात. मस्तच हसू होते. अजूनही माझ्या नजरेसमोर तो हसरा चेहरा येतो आणि मन कसं प्रसन्न होऊन जातं. अंगदला (मुलगा) खोकला व ताप असल्यामुळे तो शांत होता. दोन्ही छोट्यांना बघून, मन समाधान आणि आनंदाने भरून गेलं.

तासाभरात शाळेत यायला निघाले तर पेढे बर्फीचे दोन बॉक्स राहुलने हातात ठेवले, म्हणाला, “एक शाळेत द्यायला सगळ्यांसाठी आणि एक घरी न्यायला. ” शाळेत सोडायला पुन्हा गाडी होती. स्वतः राहुल गाडीत गाडीत बसवायला आला. मला अवघडल्यासारखं झालं. ही कामाची मुलं आपल्यासाठी उगाच त्यांचा वेळ वाया नको जायला.

दुसऱ्या दिवशी, माझं एवढे अगत्याने स्वागत केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी राहुलला फोन केला, तेव्हा म्हणाला, “बाई, तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्यात. काल आई-बाबा त्या शाळेच्या भूमिपूजनाला गेले होते. तिथे तुमची आठवण आईने काढली ती वेळ होती सकाळी साडेअकराची आणि तुम्ही त्याच वेळेस साधारणत: घरी आलात, हा योगायोग. दुसरे, तुम्ही गेल्यावर माझ्या बायकोनं मला एक ग्रे कलरची पर्स आणून दाखवली. लग्नानंतर आम्ही दोघं तुम्हाला भेटायला आलो होतो, तेव्हा तुम्ही ती तिला दिली होतीत. “माझ्या विद्यार्थ्यासाठी देतेय” असं त्यावेळेस सांगितलं होतं. ती पर्स ती बाहेर कुठेही वापरत नाही. मी दिलेले पैसे त्यात ठेवते आणि पर्स जपून कपाटात ठेवते.

हे दोन्ही प्रसंग ऐकल्यावर काय बोलावं मला कळेना. करोडोंची उलाढाल करणारा राहुल, घरात लक्ष्मी पाणी भरते आहे. ती छोटीशी पर्स, तिची किंमत ती काय! पण त्या मागची भावना समजून तिने अजून जपून ठेवली.

राहुल माझा विद्यार्थी, त्याला माझ्याविषयी प्रेम असणे मी समजू शकते, पण त्याची बायको – तिची माझी जेमतेम पाच दहा मिनिटांची तेव्हाची भेट. पण तिने माझी भेट जपून ठेवावी, हे तिचं मोठेपण.

खरंच, डोळ्यात पाणी येणार नाही तर काय?

आपले विद्यार्थी इतक्या उंचीवर जाऊनही पाय जमिनीवर ठेवून आहेत हे पाहून सार्थ अभिमान वाटला.

राहुल, तुझ्या हसऱ्या – खेळत्या संसाराला कोणाची नजर लागू नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

खूप प्रेम आणि सन्मान दिलात बाळांनो, खूप खूप श्रीमंत केलंत मला!!

— लेख क्र. १० 

© सौ गीता वासुदेव नलावडे

(आज “मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दोन ठिकाणी, मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोर येथे दोन ठिकाणी, मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे येथे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर, मुंबई सातारा महामार्गावर वर्वे येथे, गोरेगाव पूर्व (मुंबई), मुंबई नाशिक महामार्ग पडघे येथे” अशा अनेक ठिकाणी श्री दत्त स्नॅक्स चोखंदळ ग्राहकांच्या सेवेत रुजू आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावण माझ्या मनातला… ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ श्रावण माझ्या मनातला… ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्रावण मासाच्या विविधांगी वर्णनाच्या पोस्ट प्रसार माध्यमांवर फिरताहेत.

माझ्या मनातही खोलवर दडून बसलेल्या श्रावणाचे रूप आपणांस निश्चित आवडेल असे वाटते ते खालील प्रमाणे…

भरभरून उत्साह ओसंडणारा मास म्हणजे श्रावण मास,

अविरत आनंद देणाऱ्या पर्जन्य धारा म्हणजे श्रावण मास.

गर्द तथा विविध छटांचे हळुवार हिरवेसे पांघरूण घेऊन पहुडलेली वसुंधरा म्हणजे श्रावण मास.

विस्तिर्ण पात्रांच्या दुथडी ओसंडून वाहणाऱ्या सरिता म्हणजे श्रावण मास.

धरित्री ने गिळलेल्या श्रावण सरींच्या अमृताने अंकुरित झालेली पिकं म्हणजे श्रावण मास.

कष्टकरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्य म्हणजे श्रावण मास.

महादेवाच्या भक्तीच्या गीतांची आर्त हाक म्हणजे श्रावण मास.

पचमढीचा डोंगर चढून शिवाचे दर्शन घेण्याचे पर्व म्हणजे श्रावण मास.

मुसळधार पाऊस पडत असताना घराच्या व्हरांड्यात बसून मनमुराद आनंद उपभोगतांना कृतज्ञ भावनेने जगन्मातेला वंदन करण्याचा मास श्रावण मास.

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अंकुर… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ अंकुर… ☆ श्री जगदीश काबरे ☆

एक पोरगं सतत प्रश्न करत होतं, हे असंच का अन तसेच का?

मी दम देऊन पाहिला… ते ऐकेच ना

मी धमकी दिली.. “नाही ऐकलंस तर शिक्षा करीन. “…. तरी ते विचारतच राहिलं.. शेवटी मी एक कानाखाली ठेवून दिली. पोरगं तिरमिरत जाग्यावर जाऊन बसलं… वर्गात भयाण शांतता.

मी मात्र खदखदून हसत होतो – – 

“कशी जिरवली एकेकाची… आता विचाराल का प्रश्न? आता कराल का चिकित्सा? हा हा हा हा हा!!”

…. मी गगनभेदी हसत होतो…

इतक्यात एक दुसरी पोर पुढं आली. म्हणाली, “तुमच्या हसण्याचं कारण समजलं नाही. “

तिला मधेच अडवत मी पुन्हा हसत राहिलो…

“ह्या ह्या ह्या, नाही समजलं ना… समजणारही नाही… मी रोज करेन तुमच्या प्रश्नांचे खून… छाटून टाकीन सर्व प्रश्नांच्या आवाजांचे देठ.. चिरडून टाकेन चिकित्सेचा प्रत्येक कोंब… हे असंच चालत आलंय.. अन

असंच चालत राहील… हाहाहाहाहा! “

पोर हसली अन् म्हणाली, “नीट ऐकून तर घ्या ना, तुमच्या हसण्याचा अर्थ आम्हाला समजला नाही असं नाही….. पण, मला प्रश्न पडलाय की बदलांना एवढं का घाबरता? का घाबरता प्रश्नांना? तुमच्याकडे यांची उत्तरं नाहीत हे स्पष्ट कबूल करा ना! ..

.. कबूल करा की, नवविचारांची भीती वाटते. तुम्ही नाही देऊ शकत आमच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं!

जे आहे ते तसंच राहील यावर आमचा विश्वास नाही. विवेकाच्या प्रवाहाला धरणांचा बांधही अडवू शकत नाही. आजवर कित्येकांना चूप बसवलंत तुम्ही, प्रश्न विचारला, चिकित्सा केली म्हणून धमक्याही दिल्या…

शिक्षाही केल्यात… अन् संपवलतही! पण आता बस्स!!

…. आता प्रत्येक आवाज उठेल.. आता प्रत्येकाला प्रश्न पडेल.. आता प्रत्येकजण वादात उतरेल.. प्रत्येकजण विवेकासाठी झगडेल…!

मी अवाक होऊन पाहत होतो….

मी कुणी फॅसिस्ट होतो..

अन ती कुणी विवेकवादी विचारांचा एक छोटासा अंकुर….!!

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लक्षणं जिवंतपणाची. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ लक्षणं जिवंतपणाची. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

कोणी पोरं क्रिकेट खेळताना दिसली की एक तरी ओव्हर खेळावीशी वाटते….

घरी जाताना टीव्हीच्या दुकानासमोर गर्दी दिसली तर रस्त्यावर थांबून चार बॉल मॅच बघावीशी वाटते….

ग्राउंडवर मॅच दिसली की बॅटला बॉल लागल्यावरचा आवाज ऐकावासा वाटतो…

रिक्षाचा पोंगा दिसला की वाजवावासा वाटतो…

वडाच्या पारंब्या दिसल्या की झोका घ्यावासा वाटतो…

चिंचेचं झाड दिसलं की एक तरी बुटुक हाताला येतं का बघावंस वाटतं…

लगडलेल्या कैऱ्या दिसल्या की दगड मारावासा वाटतो…

पाण्याचं तळं दिसलं की चपट्या दगडाने भाकऱ्या पाडाव्याश्या वाटतात…

मित्र भेटले की कोणाचा इन केलेला शर्ट मागून बाहेर काढावासा वाटतो…

कोणी खुर्चीवर बसायच्या आधी ती खुर्ची ओढावीशी वाटते…

मैत्रीणीला झुरळाची नायतर पालीची भीती दाखवायला आवडतं….

फ्रुटी पिऊन झाली तरी त्यातून शेवटचा थेंब येईपर्यंत फूड-फूड आवाज काढवासा वाटतो…

रिकामी प्लास्टिक ची पिशवी फुगवून अचानक कोणाच्यातरी मागे फोडावीशी वाटते….

वाढदिवस साजरा झाल्यावर फुगे उंच उडवावेसे वाटतात…

तेच फुगे नंतर फोडावेसे वाटतात…

जिन्याचा लाकडी कठडा दिसला की त्यावरून घसरावसं वाटतं….

शेजारची बेल मारून पळून जावसं वाटतं…

एखाद्या गाडीच्या टायरमधली हवा काढायचं नाटक, तोंडानी सुसुसू आवाज काढवासा वाटतो…

मॉल मधल्या ट्रॉलीची गाडी गाडी करावीशी वाटते…..

रिकामा फळा दिसला की त्यावर डोंगर, नदी, नारळाचं झाड, घर, पक्षी काढावेसे वाटतात….

गेलेले दिवे आल्यावर, मेणबत्ती सगळ्यात आधी विझवावीशी वाटते….

पेट्रोलचा, स्पिरिटचा वास छान वाटतो….

सोसायटीत कोणी सायकल चालवताना दिसलं की वाढलेल्या वजनासह एक तरी राउंड मारावीशी वाटते….

पहिल्या पावसानंतर गाडीवरचा वडापाव खावासा वाटतो….

रात्री काहीही कारण नसताना, भूक लागते आणि फडताळातले डबे ढुंडाळून क्रीम बिस्कीट खावंसं वाटतं, नायतर फ्रिजमधली चॉकलेट खावीशी वाटतात…. वेफर्सचा, फरसाणाचा डबा फस्त होतो…

मलई बर्फी, गुलाबजाम, जिलबी आणि असे गोड काही दिसले की ज्याचं एकावर समाधान होत नाही…. पैज लावून खावंसं वाटतं…

मोगरा, जुईचा गजरा दिसला की घ्यावासा वाटतो… घमघमाट मनात थेट पोहोचतो….

बिजेची कोर आकाशात दिसली तर रस्त्यात थांबून झूम करून फोटो काढवासा वाटतो….

ट्रीपला जाताना जुनी मराठी गाणी ऐकावीशी वाटतात….

कोकणात एक छोटं घर हवं असं वाटतं….

आणि

श्यामची आई सिनेमा बघताना आजही डोळ्यात पाणी येतं….

वाढणारं वय हा केवळ एक आकडा आहे…. नुसता श्वास चालतोय म्हणून माणूस जिवंत नसतो…. हे ज्यांना वाटतं, असंच करावंसं वाटतं, त्यांची जिवंतपणाची लक्षणं यापेक्षा वेगळी नसतात….

खरं ना!!!

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ५४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

खांदा 

चूक, विसरभोळेपणा, धांदरटपणा या गोष्टी कौतुकाच्या कशा होतील? फार तर कोणी काही बोलणार नाही पण नजरेतल्या प्रतिक्रिया स्वत:ला लज्जित करण्याकरता पुरेशा नक्कीच असतात.

एक दिवस मी भाजीत कोथिंबीर घालून नीट सजवायला विसरले, एक दिवस गॅसवर तापवायला दूध ठेवलं आणि वाचनाच्या नादात ते संपूर्ण उतू गेलं. भांड्याचा जळका वास आला तेव्हा घरातले सगळेच तिकडे जमले शिवाय संपूर्ण ओट्यावर दूधच दूध. ते निपटायलाच कितीतरी वेळ आणि पाणीही खर्च झाले आणि पुन्हा दूध आणण्यासाठी दिराची धावपळ झाली ती वेगळीच.

खाद्य संस्कृतीतले फरक हाही एक भेदाचा विषय. वास्तविक या इथे मला “आमच्याकडे” या शब्दरचनेला कोणता पर्याय आहे का हे शोधावेसे वाटते. जीवनामध्ये सासर आणि माहेर असे दोन विभाग करणे मला मनापासून टाळायचे आहे पण अगदी आतून हळुवारपणे स्पर्शत गेलेली एक कोवळी भावना. माहेर या विषयावर खूप कथा, कविता, ओव्या वाचल्या आहेत पण माहेर या शब्दात असलेला मऊ-मृदु अर्थ तेव्हाच जाणवतो जेव्हा स्त्री सासरी येते. संपूर्ण वेगळ्या वातावरणात आणि अनोळखी माणसात ती असते. ही माणसंही, प्रेमळ, सांभाळून घेणारी असली तरी धागे अजून विणले गेलेले नाहीत असेच वाटते.

खानदेशात घोसाळ्याला “गिलकी” म्हणतात. हिरवीगार, कोवळी, छोटी लांबट गिलकी अतिशय चवदार असतात. मला फक्त लांबट आकाराची जाडजूड घोसाळीच माहीत होती आणि आई त्यांच्या चकत्या करून कुरकुरीत खमंग भजी करायची. अहाहा! आताही लिहिताना माझ्या तोंडाला पाणी सुटले. तर सांगत होते की या कोवळ्या गिलक्यांची भाजी करायची वेळ आली तेव्हा मी फारच गोंधळले. मी त्यावरचे कोवळे साल खरवडून, फोडी केल्या आणि फोडणीत भाजी टाकली. हळद तिखट मीठ अंदाजाने घातले आणि झाकण ठेवले. दहा मिनिटांनी झाकण उघडले तेव्हा भाजीचे संपूर्ण गुळगुळीत अगदीच अनाकर्षक असे भरीत झाले होते. जेवताना कोणीही ताटातही ते वाढून घेतले नाही.

माझी मैत्रीण अंजू खानदेश रहिवासी होती आणि ती मला नेहमी म्हणायची “आम्हा खानदेशवासीयांचा सुरेख पोळ्या करण्यात कुणीही हात धरू शकणार नाही हे तू लक्षात ठेव, ” मला फक्त सरसर लाटून गॅसवर टमाटम फुगलेले फुलकेच माहीत होते. पोळ्यांचे तंत्र अजून जमलंच नव्हतं. आई म्हणजे सासूबाई पोळ्या फार सुरेख करत. एक तर त्यांचे सोन्याच्या आणि काचेच्या बांगड्यांनी भरलेले गोरे हात पोळी लाटताना इतके लयबद्ध आणि संगीतमय असायचे की माझे लक्ष तिथेच खिळलेले राहायचे. तेल लावून घडी केलेली, मागे मागे लाटत गोल गरगरीत पोळी, काहीशी दडसच (दडस हा एक नवा शब्द) तापलेल्या तव्यावर टाकली की चारी बाजूंनी टम्म फुगून यायची. पोळी भाजतानाचा एक सुगंध दरवळायचा आणि अशी ही तव्यावरची गरम पोळी तूप लावून, अलगद झटकून टेबलावर पुरुषांच्या पंगतीत बसलेल्या माझ्या नवऱ्याच्या ताटात वाढताना त्यांचा चेहरा कौतुक आणि मायेने ओथंबलेला असायचा. तेव्हा एक संस्कारशील जबाबदारी मला जाणवायची. ” या नात्यात कधीही दुरावा नको निर्माण व्हायला. ”

जसे पोळीचे तसेच भाकरीचे. तांदळाची पाण्याच्या सहाय्याने हातावरच गोल गोल पसरत केलेली भाकरी मी आत्तापर्यंत खाल्ली होती. खाल्ली होती या म्हणण्यातच केली कधीच नव्हती हे अभिप्रेत बरं का? पण ज्वारी किंवा बाजरीच्या पिठाची अगदी छान मळून सरसरीत गोळ्याची पिठावर थापत केलेली गोल गरगरीत भाकरी हा माझ्यासाठी एक नवा धडा होता. नयना (माझी नणंद) या विषयातली माझी गुरु ठरली. अशावेळी मला लहानपणची ती कविता हमखास आठवायची.

लहान माझी बाहुली 

तिची मोठी सावली 

भात केला करपून गेला 

पोळ्या केल्या कच्च्या झाल्या

वरण केले पातळ झाले 

तूप सगळे सांडून गेले …

क्षणभर मला या कवितेतली लहान बाहुली “मीच” तर नाही ना असे वाटायला लागले होते. कसं असतं ना तेव्हाची ही बालगीतं आपल्याबरोबर मोठी होत वेगळ्या अर्थाने गुणगुणायला लागतात.

हिरव्या मिरचीचा खर्डा, लसणाचा ठेचा, कच्च्या मेथीचा खुडा, पातोड्या, पेंढ्यावर वाफवलेले कानवले, वेगवेगळी पीठं मिसळून केलेल्या खमंग तिखट दशम्या त्याबरोबरची दाण्याची चटणी नाहीतर गुळातल्या गोड दशम्या, शेंगदाण्याची चटणी लावून केलेल्या भाज्या वगैरे अनेक पदार्थांची यादी या पाकशास्त्राच्या अभ्यासक्रमात होती. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा की वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी काही नियमबद्ध आवश्यकता असतात. वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी या शास्त्रातील पदवी फार महत्त्वाची आहे हे नक्कीच. “ मग काय? चला लागा कामाला, करा अभ्यास. ” असे मी मनाला बजावूनच टाकले. वैवाहिक जीवनातला तो एक पार करायचा गोल होता.

“नववधू प्रिया मी बावरते” असं काही काव्यात्मक म्हणण्यापेक्षा मी एकच म्हणेन की अजूनही आमचं लग्न हे प्राथमिक अवस्थेतच होतं. त्याचवेळी आई-आबांनी (सासू-सासरे) हरिद्वार, ऋषिकेश, बनारसला जाण्याचा बेत रचला. ही त्यांची दोघांचीच सहल होती. त्यावेळी माझी विवाहित मोठी नणंद जिला आम्ही मंगल ताई म्हणत असू ती औरंगाबादला राहत होती. तिला दहा पंधरा दिवसांसाठी अमळनेरला बोलावून घेतलं. ताई येणार म्हणून सारं घर आनंदलं होतं. एक वेगळाच उत्साह, चैतन्य जाणवत होतं. माझी ताई सुद्धा जेव्हा आजोबांकडून ठाण्याला आमच्या धोबी गल्लीतल्या घरात भेटायला यायची तेव्हा आम्हा बहिणींनाही असाच आनंद व्हायचा. तात्पर्य अशा उत्कट भावना वर्णनातीत असतात.

सहलीला निघायच्या अदल्या दिवशी आईंनी ताईला घरातल्या अनेक कामांचे आणि ती मदतनिसांकडून करून घेण्याची यथासांग माहिती दिली. कुठे काय ठेवले आहे हे नीट समजावून सांगितलं. आबांनी घर खर्चासाठी लागणारे पैसे तिच्याजवळ दिले. जाताना तिच्या खांद्यावर हात ठेवून आई म्हणाल्या, ” तुझ्या भरवशावर हा एवढा पसारा टाकून जातोय बरं का? ती अजून नवीनच आहे ना. सांभाळ बरं का सगळं नीट आणि निळू वैद्य कडे जाऊन तुझी तब्येत एकदा दाखवून दे. किती वाळलाय तुझा चेहरा. ”

खरं म्हणजे एक साधासुधा, सर्वसाधारण, विचारपूर्वक भूमिकेतला संवाद! पण मला किंचित वैषम्य जाणवलं. एखाद्याची पात्रता असतानाही बढती नाकारली गेली तर त्याला काय वाटेल अशी काॅर्पोरेट भावना नकळत स्पर्शून गेली. जाणवलं ते एकच की अजून आपल्या वैवाहिक कर्तबगारीवर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. पापण्यांच्या आतल्या कडांवर थोडा ओलसरपणा जाणवला. मी मुळीच रडकी नव्हते. उलट वादपटू होते. समोरच्याला प्रश्न विचारणारी होते. कशाला? भांडखोरच होते म्हणालात तरी चालेल पण संस्कारक्षम मनात आपोआपच तयार झालेले अंतस्थ उंबरठे असतात ते ओलांडता येत नाहीत. शिवाय प्रसंग आणि वेळेचं तारतम्य हे बाळगावं लागतं. बारीक-सारीक गोष्टींचा ऊहापोह नवऱ्याजवळ करून त्याचं मन दुखावून किंवा कलुषित करणार्‍यातलीही मी नव्हते आणि माझ्या मनात नकळत तरंगलेल्या विचारांनाही तसा निश्चित आकार कुठे होता? शिवाय स्वतःच्या मानसिक प्रश्नांवर समाधानकारक सिंचन कसे करायचे हे स्वतःच ठरवावे हे सूत्र माझ्या प्रवाहात मूळातच होते.

अर्थात तेव्हा जे मनात आलं ते विरूनही गेलं आणि त्याला एकमेव कारण म्हणजे ताईचा सहवास. वास्तविक आम्ही दोघी एकाच वयाच्या पण वैवाहिक अनुभवात ती माझ्यापेक्षा ज्येष्ठ होती.

लांब सडक केस, मध्यम उंची आणि चेहऱ्यावरचं मार्दव आणि सात्विकतेचं सुरेख प्रतिबिंब! मधुर बोलणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन समानतेनं सहृदयतेनं वागणं हे तिचं वैशिष्ट्य होतं. तिच्यावर कोणीही विश्वास टाकावा असंच तिचं व्यक्तिमत्व होतं.. आजही आहे. कसलाही गंड, अहंकार तिच्या वागण्यात कधीच डोकावला नाही. माझ्या मते आमच्या कुटुंबातलं अत्यंत समंजस आणि चौफेर रसिकत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मंगल ताई! तिच्याविषयी मी एक स्वतंत्र लेख पुढे कधीतरी लिहीनच पण त्यावेळी मात्र मला तिच्यात माझ्या कुमुद आत्याचाच भास झाला. ताईच्या रूपाने मला एक आश्वासक खांदाही मिळाला.

– क्रमशः भाग ५४.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ मैत्र… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ मैत्र… ☆ श्री जगदीश काबरे ☆

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मैत्री, नातेसंबंध आणि आपली तत्वे ह्या भिन्न गोष्टी आहेत. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. महात्वाचे म्हणजे जे संबंध अटीतटीवर उभारले जातात ते कधीच टिकाऊ नसतात. कारण प्रेम समोरच्याकडून कसलीही अपेक्षा न करता फक्त देणं जाणते. मी जर माझ्या तत्वांशी प्रामाणिक राहून लोकांशी प्रेमाने वागू शकतो तर, मला समोरचा माझ्याशी कसा वागेल याची भीती वाटायला नको. पण मित्र वा आप्त जर अटी घालत असतील की, ‘तू जर देवाधर्माचं करशील तरच तुला आम्ही साथ देऊ. ‘ तर त्याला emotional blackmailing म्हणता येईल, जे सर्वार्थाने चुकीचे आहे. त्याला बळी पडायचे की नाही हे सर्वस्वी तुमचे विचार किती ठाम आहेत त्यावर अवलंबून आहे.

माझ्या आयुष्यातही अनेक चढउतार आले, तेव्हा मित्रांनी असेच सांगितले की, ‘तू देवाधर्माचं करत नाही म्हणून तुझ्या मागे ही साडेसाती लागली आहे. ‘ पण मी माझ्या नास्तिक विचारांशी ठाम असल्यामुळे मी त्यांना सांगितले की, ‘मी तसे काहीएक करणार नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त होतच असतं. तुम्ही एवढी देवदेवस्की करता तरीही आजारी पडताच ना? देवपूजा करूनही तुमच्या आयुष्यातही मग का संकटं येतात? म्हणून संकटं येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच असे आपण का समजू नये? विपरीत परिस्थितीतही वैज्ञानिक विचारसरणीने आणि विवेकवादी वृत्तीने मार्ग काढता येतो. पण त्यासाठी परिस्थिती आहे तशी स्वीकारून न डगमगता परिस्थितीला शांतचित्ताने सामोरं जाणं हाच खरा उपाय आहे. अशी परिस्थिती का निर्माण झाली यावर साधकबाधक विचार करून त्यातून बाहेर पडण्याचा नेमका मार्ग आपल्याला शोधता आला पाहिजे. माझा ठामपणा पाहून त्यांनी तो विषय पुढे वाढवला नाही. अनुभवाने मला हे कळले आहे की, प्रवाहाविरुद्ध पोहतांना सुरुवातीला जरी आप्तमित्र विरोध करत असले तरी नंतर निदान समोर तरी काही बोलत नाहीत. म्हणजेच लोक चार दिवस बोलतात आणि नंतर ‘तू आणि तूझं आयुष्य’ असं म्हणून आपल्या कामाला लागतात.

तेव्हा आप्तमित्रांना प्रेम आणि तत्वे यातील फरक समजावून सांगा आणि हेही सांगा की, ‘आपले संबंध मतलबावर अवलंबून नसून निखळ प्रेमावर आहेत. प्रेम हे आपल्या माणसाला बंधनात अडकवत नाही, तर त्याला खुलेपणाने त्याच्या आयुष्यात त्याच्या तत्वानुसार वागण्याची मुभा देते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या नास्तिक्यामुळे जर संकटं येणार असतील तर मी त्यांच्याशी दोन हात करायला समर्थ आहे. आपली मैत्री ही मतलबावर नाही तर माणुसकीच्या पायावर उभी आहे, आणि तिच्यात काशामुळेही अंतर येणार नाही. निदान माझ्या बाजूने तरी…’ 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares