मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सोलापुरी गड्डा जत्रेतील रम्य आठवण… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ सोलापुरी गड्डा जत्रेतील रम्य आठवण… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे मी पहिल्यांदा 1960 मध्ये टीव्ही मध्ये दिसले….

– – – वरील विधान वाचून तुम्हाला नक्की वाटेल की पतकी बाई धादांत खोटं बोलत आहेत 1960 साली सोलापुरात टीव्हीचे प्रसारण नव्हतं महाराष्ट्रात कुठेही नव्हतं मग मी 60 साली टीव्हीवर आली कशी ही बाई… त्याचीच गोष्ट ऐकूयात.. म्हणजे वाचूया.

साधारणपणे जानेवारी महिन्याचे दिवस असावे सकाळी थंडी असायची पण दुपारी रणरण ऊन शाळेला हुरड्यची सुट्टी होती त्या काळात सिद्धेश्वर जत्रेला धरून ती सुट्टी असायची… सिद्धेश्वर तळ पूर्णपणे आटलेलं होतं म्हणजे तिथे संपूर्ण तळ्याला भेगा भेगा पडलेल्या मला अजूनही आठवतात आणि मंदिरातून मार्केटमध्ये.. लक्ष्मी मार्केटमध्ये येण्यासाठी माणूस सहज चालत त्या मातीवरून येतो शेतात चालावं असं वाटत होतं चिखल वगैरे काय असेल पूर्वी तो वाळून वाळून गेलेला पूर्ण भेगा पडलेल्या आणि माणूस आरामात त्याच्यावरून चालत येत होता आणि मला ते स्पष्टपणे आठवते!

मी माझ्या आजीबरोबर सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते माझं वय तेव्हा 10 त्या 11 या दरम्यानच होतं आणि आजी आम्हाला देवळामध्ये मार्केटमध्ये भजनाला कीर्तनाला रथ बघायला चित्रपट बघायला तिला सिनेमाची खूप आवड होती त्यामुळे ती चित्रपट बघायला आम्हाला घेऊन जायची तिला चौफेअर ज्ञान होतं 19 व्या शतकाच्या शेवटाची बाई म्हणजे 1899 /98 चा जन्म असेल शिक्षण अजिबात नाही पण हुशार इतकी अफाट.. बघून बघून वाचायला शिकली आणि खूप पुस्तकं वाचत होती गोष्टी सांगायचं तिला छंद होता आणि सांगण्याची शैली पण होती आता आजीबद्दल जास्त सांगत नाही प्रसंगाबद्दल आपण बोलूयात तर ती मला सिद्धेश्वर च्या मंदिरात घेऊन गेली.. दर्शन वगैरे झालं.

आजी बरोबर जायचे त्यावेळेला कारण असं होतं की तिथून आम्ही लक्ष्मी मार्केटला जाणार होतो आणि त्या बाजूला गड्ड्याची दुकानात इथपर्यंत लागलेली होती तिथं आपल्याला आजी काहीतरी घेऊन देईल या विचाराने मी तिच्याबरोबर गेले होते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन तळ्यातून वाट काढीत आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या समोर ओबडधोबड पायऱ्या होत्या.. त्याच्यावरून वर आलो होतो आणि थेट लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केटच्या दोन्ही बाजूला आज जे लोक बसतात तिथेच लोक बसायचे तिथेच काहीतरी थोडेसे पाली वगैरे टाकलेले होत्या आणि त्याच भागांमध्ये काही चार दुकान भरलेली होती किंवा लागत होती आजी म्हणाली रस पिऊ यात का बारा वाजले आहेत उन्हात रस पिऊ नये इती.. मी..

तिथेच बाजूला एक स्टॉल होता एक पांढर कापड समोर खुर्ची टाकून एक माणूस बसलेला आणि तो ओरडत होता अपने खुद को टीव्ही पे देखो आपने को टीव्ही पे देखो तर आजीला ते जरा कुतूहल वाटलं काहीतरी नवीन होतं तर माझी म्हणाली काय आहे तर तो माणूस म्हणाला तुम्हाला टीव्ही वरती पाहता येईल म्हणून आम्ही आम्हाला दोघींना पाहता येईल का तुम्हाला नाही अकेला जायेगा और उसको दुसरा देखेगा पैसा कितना लगेगा तो म्हणाला चाराने कितना टाइम देखेगा तो मला दोन मिनिट आजी मला म्हणाली तू त्या टीव्हीच्या खोक्याच्या मागच्या बाजूला जा मशीन समोर उभे रहा मी तुला टीव्हीवर पाहीन मी म्हणलं काहीतरी काय मला तर मी दिसणार नाही तुला दिसून काय फायदा आहे तिचं उत्तर खूप छान होतं ती म्हणाली हे टीव्ही आपल्याकडे येईल पण तू मोठे झाल्यावर… तू हुशार आहेस त्यामुळे टीव्हीवर कुठेतरी दिसशील आहे त्यावेळेला मी कुठे असणार आहे? तेव्हा मी तुला आता डोळे भरून टीव्हीवर पाहते या इमोशनल ड्रामावर मला काहीच बोलता आलं नाही आणि मी खूप लहान होते. दहा अकरा वर्षाच्या मुलीला काय कळतंय? फक्त एवढं कळत होतं की चार आणे रक्कम खूप मोठी आहे, त्यात आपल्या घरची सगळ्यांची एक वेळची भाजी येते. पण तिचे हिशोब वेगळे होते तिने त्याला चार आणे दिले. मी त्या पडदा टाकला होता त्याच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि समोर एक टीव्ही सारखं खोक होत तिथे आजी खुर्चीवर बसली आणि ती मला बघत होती. मग त्या माणसाने मला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला सांगितल्या.. आपण फोटो काढताना घेत होतो तशा.. नाच म्हणाला, उड्या मार म्हणाला, मी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आजीने मला डोळे भरून बघितलं आणि चार आणे त्याला दिले.

मग रस कॅन्सल केला, भाजी घेतली आणि आम्ही घरी आलो आणि आजीनं सगळ्यांना सांगितलं की तिने मला टीव्हीवर बघितलं. मग टीव्हीवर बघितलं ही सगळी कथा दिवसभर वाड्यामध्ये सांगत होतो आम्ही… सर्वात महत्त्वाचं काय तर तिने आल्यावर माझी दृष्ट काढली. तिला माझ्याबद्दल फार प्रेम होत… मी खूप धीट, हुशार, भाषण करणारी, स्टेजवर उभी राहणारी.. वडिलांबरोबर काम करत होते ना…! अगदी गणपती उत्सवात आमचे दहा दिवस कार्यक्रम असायचे तर ती आमच्या दारापाशी झोपलेली असायची आणि आम्ही आलो की पहिल्यांदा माझी दृष्ट काढून ती तिच्या घरात जाऊन झोपायची. मामा आणि आम्ही सगळे शेजारीच राहत होतो.

अशा तऱ्हेने माझ्या टीव्हीवरचा पहिला शो त्याचा एकमेव प्रेक्षक माझी आजी होती आणि त्याची किंमत मला चार आणे द्यावी लागली. नंतर आपल्याकडे वृत्तदर्शन सुरू झालं. अनेकांच्या मुलाखती सुरू झाल्या. स्थानिक चॅनेल वरती येण्याचा योग अनेकदा आला. मला आठवते एक मुलाखत सुनेत्रा पंडित यांनी घेतली होती, एकदा एक मुलाखत रामतीर्थकर मॅडमनी घेतली होती. एकदा माझ्या शाळेमध्ये म्हणजे तडवळकर ट्रस्टच्या नापास शाळेमध्ये माझी मुलाखत माझ्या एका विद्द्यार्थीनीने घेतली होती. असं अनेकदा मग टीव्ही वरती स्थानिक प्रक्षेपणात दिसायचं…

पण चार आणे खर्च करून मी टीव्हीवर दिसण्याचा किंवा मला टीव्हीवर बघण्याचं सुख माझ्या आजीने त्यावेळेला गड्ड्याच्या जत्रेत घेतलं होतं आणि तिचं ते वाक्य नेहमी मला आठवतं…. “ अग तू मोठी झाल्यानंतर खूप ठिकाणी टीव्ही असतील. कदाचित तू त्यात दिसशील, पण मी त्यावेळेला असणार नाही ना? ” – – म्हणून परिस्थिती नसताना त्या माऊलीने माझ्यासाठी चार आणे खर्च केले. ती चरख्यावर सूत काढून ते पैसे कमवत असे आणि एक पूर्ण सुताचा बिंडा तयार झाला की त्याचे दोन आणे मिळत. खादी भंडारमध्ये आम्हीच नेऊन घालत असू.. इतक्या कष्टाने मिळवलेले चार आणे तिने माझ्यासाठी खर्च केले. आज लाखो रुपये खर्च होतात.. कोणी करतो.. मी कोणावर तरी करते.. पण हे प्रेमच वेगळं होतं आणि त्याच्या मागचा विचारही खूप मोठा. माणसं गरीब होती, पैसा नव्हता, पण माया पोटात खूप होती आज अगदी सहजच आठवण झाली आजीची आणि त्या निमित्ताने मला तो अगदी विस्मृतीत गेलेला प्रसंग आठवला. अशी प्रेमळ आजी मला मिळाली.. ‘ परमेश्वरा तू ते भाग्य आम्हाला दिलंस.. ‘खूप प्रेम करणारी माणसं म्हणजे आपण खूप श्रीमंत हे लक्षात ठेवा….!

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लिमिटेड माणुसकी… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ लिमिटेड माणुसकी… ☆ श्री मंगेश मधुकर

मे महिना, फक्त आणि फक्त उन्हाचं राज्य. जिकडं तिकडं त्याचीच चर्चा. ऑफिसच्या कामासाठी सकाळी लवकर बाहेर पडलो असल्यानं काम झाल्यावर भुकेची जाणीव झाली. जवळच्या हॉटेलमध्ये गेलो. ऑर्डर दिल्यावर मोबाइल पाहत होतो. इतक्यात तिथं आलेल्या एकानं लक्ष वेधलं. भर उन्हाळ्यात काळी टोपी, काळा टी शर्ट, काळा गॉगल, स्कीन फिट जीन, पांढरे स्पोर्ट शूज घातलेला किरकोळ अंगकाठीचा टोपीवाला समोरच्या टेबलावर बसला. प्रचंड अस्वस्थ होता. उजवा पाय हलवताना हाताची बोटं मोडणं सुरू होतं. ऑर्डरसाठी आलेल्या वेटरला दोनदा परत पाठवलं. त्याचं विचित्र वागणं सहज लक्षात येण्यासारखं होतं. शेवटी नाईलाजाने टोपीवल्यानं ऑर्डर दिली. वेटरनं आणलेला बनमस्का आणि दोन कप चहा अधाशासारखा संपवला नंतर बिल घेऊन तो नुसताच बसून राहिला. काउंटरवर बिल देत असताना मोठ्यानं बोलण्याचा आवाज आला म्हणून मी पाहीलं तर टोपीवाला आणि वेटरमध्ये वादावादी सुरू होती.

“काय झालं रे!! ”मालकांनी वेटरला विचारलं.

“पैसे नाहीत म्हणतोय”

“बिल कितीचयं” 

“सत्तर”

“पैशे नव्हते तर इथं झक मारायला आला का? ”मालक.

“साहेब, खूप भूक लागली होती. दोन दिवसांचा उपाशी आहे. ”टोपीवाला 

“तुझ्याकडं बघून वाटत नाही”मालक 

“हे सगळं लोकांनी वापरायला दिलंय. माझं काहीच नाहीये. ”

“आता तूच सांग काय करायचं”मालक 

“किचनमध्ये भांडी घासतो”टोपीवाला.

“ठीकयं. रघू याला तीन-चार तास सोडू नकोस. ” हा सगळा प्रकार पाहून मला टोपीवाल्याची कीव आली.

“मालक, सत्तर रुपये मी भरतो. त्याला जाऊ द्या. ”

“तुम्ही कशाला भरता. हा फुकटा आहे. ”

“चांगल्या घरातला आणि शिकलेला वाटतोय. परिस्थितीनं वेळ आणलेली दिसतेय. ”

“नशेडी असणार. कामं नको. ऐतखाऊ भाxxx” मालक.

“जाऊ द्या. आपल्याला काय करायचं”पैसे देऊन हॉटेलच्या बाहेर पडलो. बाईक सुरू करणार इतक्यात टोपीवाला आला. “थॅंक यू सो मच”

“इट्स ओके”

“आपली ओळख नसताना देखील तुम्ही मदत केलीत. ”

“त्यात फार काही विशेष नाही, चलो बाय!! ”

“आजकाल माणुसकी राहिली नाही. तुमच्या सारखे लोक फार कमीयेत. ”

“ठीकयं”

“एक रिक्वेस्ट होती”टोपीवाला 

“अजून काहीही मदत करणार नाही”मी स्पष्टपणे सांगितलं पण तो बर्फासारखा शांत.

“एकच छोटीशी मदत, पन्नास रुपये द्या. ”

“का? कशासाठी? ”

“संध्याकाळची सोय झाली असती. तुमच्यासारखे रोज भेटत नाहीत”

“म्हणजे मालक म्हणत होते ते बरोबर. तू फुकट्या आहेस. ”

“काहीही म्हणा. ”

“लाज वाटत नाही. ”

“नाही”

“जा बाबा मी काही मदत करू शकत नाही. ”

“असू नका करू. गरिबाची दुवा मिळेल. तुमचं मन फार मोठं आहे. ”

“हातीपायी धड आहेस. जरा कामधंदा कर की… ”

“कशाला उगीच जीवाला त्रास. थोडं डोकं चालवलं खायला मिळतं वर बिडीकाडीची आणि ह्याची पण सोय होते. ”अंगठा तोंडाला लावत तो म्हणाला.

“भाऊ, गप जा. एक रुपयासुद्धा मिळणार नाही”मी खेकासल्यावर अचानक गुडघ्यावर बसून हात जोडून मोठंमोठ्यानं बोलायला लागला. आजूबाजूच्या नजरा आमच्याकडं वळल्या. मला एकदम ऑकवर्ड वाटलं. तो मात्र निर्लज्जपणे हसत होता. डोकं सटकलं.

“काहीही कर. आता तर रुपया सुद्धा मिळणार नाही आणि हा तमाशा थांबव नाहीतर पोलिसांना बोलवतो”माझा ठामपणा बघून तो बिथरला.

“फुकटची शायनिंग मारायला मघाशी माझे पैसे दिले का. ”

“त्याला माणुसकी म्हणतात आणि ती माझी घोडचूक झाली. कळलं. ”

“मग एकदा चूक केलीय ना. आता पन्नास देऊन विषय मिटवून टाक”

“नाही”

“हॉटेलमध्ये चोंबडेपणा करायला कोणी सांगितलं होतं. माझं मी बघून घेतलं असतं. ”तो मुद्दाम चढया आवाजात बोलायला लागला तेव्हा नादी लागण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आलं. त्याच्या लेवलला जाणं आपल्याला जमणार नाही म्हणून गाडीला किक मारली अन सुसाट निघालो. पाठीमागून ओरडण्याचा आवाज येत होता.

लंच ब्रेकमध्ये खिडकीतून पाहत होतो. वाहत्या रस्त्याच्या बाजूला एक म्हातारा भिकारी डोळे बंद करून हात पसरून बसलेला. येणारे जाणारे समोरच्या वाडग्यात पैसे टाकत होते. पैसे टाकले की म्हातारबा ‘भला होगा’ म्हणून पुन्हा डोळे बंद करून बसायचे. तिथून चाललेल्या एका बाईंना म्हातारबाची दया आली. त्यांनी जवळच्या हॉटेलमधून जेवणाचं पार्सल आणलं अन ते म्हातारबांना देऊ केलं पण काहीच प्रतिसाद नाही. त्यांनी डोळेही उघडले नाहीत. बाईंनी हाका मारल्या पण उत्तर नाही. आजूबाजूचे हसायला लागले तेव्हा बाईंचा चेहरा उतरला. पुन्हा एकदा हाक मारली पण….. निराश मनानं बाईं पार्सल तिथंच ठेऊन निघून गेल्या.

माझ्या अनुभवावरून बाईंची मनस्थिती, वेदना समजू शकलो. चांगल्या भावनेनं मदत देऊ केली अन तीच अंगलट आली.

एक गोष्ट मात्र नक्की आजच्या काळात माणुसकी हवी पण लिमिटेड…… नाहीतर आपलाच मनस्ताप वाढतो. —-

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग- ३३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

 एक खट्याळ आठवण…

 श्रीजोगेश्वरी कट्ट्यावरील मौज मस्ती…

माझे धाकटे काका विठूकाका, विठ्ठल स. माजगावकर हे माझे अतिशय प्रेमळ मिस्कील असे लाडके काका होते. सदैव हंसतमुख असे हे काका तरुणपणी कमालीचे धीट होते अक्कात्या नेहमी कौतुकांनी सांगायची, माझी तिन्ही भावंड हणजे त्रिमुखी दत्ताचे अवतारच आहेत. मोठे अण्णा काका देश प्रेमी, माझे वडील विद्या प्रेमी, आणि हे धाकटे काका समाज प्रेमी होते. त्या प्रेमाने ह्या त्रिमूर्तीनां दामु दत्तू आणि विठू अशा नावाने अक्कात्या हाक मारायची. आम्ही मात्र गंमतीने मोठ्या काकांना दास माजगावकर (दामोदर स.), नानांना द. स. माजगावकर (दत्तात्रेय सखाराम) आणि विठू काकांना विस. माजगावकर असं म्हणायचो. आणि आमच्याच शब्द कोटीवर मी रमेश, सुरेश, चुलत भाऊ खळखळून हंसायचो. त्यांच्या तोंडावर नाही हं ही खुसूर पुसूर चालायची,! तर त्यांच्या मागेच चालायची. अहो! आमची काय बिशाद होती त्यांना नांवाने हाक मारायची.! एकदा मी रमेश ला विचारलं “काय रे रमेश! दा. स माजगावकर कट्ट्यावर बसलेत, द. स माजगावकर शाळेतून आले नाहीत. विस माजगावकर अजून प्रभात टॉकीज मध्येच आहेत कां रे? ” पण माझ्या कोटीवर नेहमीसारखी रमेशने हंसून दाद दिली नाही. त्याचा अगदी स्टॅच्यू झाला होता. सुरेश बंडखोर आणि खट्याळ, तो मला खुणाउन म्हणाला, “मागे वळून तर बघ कोण आलय ते! ” मी वेळावून बघितलं तर.. माझी मान वाकडीच राह्यली. बापरे! विठू काकाच, जीना चढत होते. माझी दातखिळीच बसली. काका साहेबांनी सगळ् काही ऐकलं होतं. घाबरून माझी मान खालीच गेली. रमेश तर आधीच पळाला होता. मला पळताही येईना, कारण काका पुढ्यात. त्यात तें, गरजले, “काय ग? मोठ्या माणसांचा मान राखायचा सोडून असा उल्लेख करायचा असतो का? लाज नाही वाटत अशी टिंगल टवाळी करायला? ” माझी मान खालीच होती. आता आली का पंचाईत,! भीतीने गाळण उडाली होती माझी. डोळेच मिटून घेतले, क्षणभर थांबून ते गडगडाटी हंसले आणि म्हणाले, दास, दस, विस माजगावकर आता विश्रांती गृहात माडीवर चालले आहेत. चालू द्या तुमच्या कोट्या”. नाना जेवढे गंभीर तेवढेच विठू काका मिश्किल आणि खेळकर होते. त्यांच्याशी माझी जास्त मैत्री होती. प्रभात टॉकीज (आत्ताच किबे) मध्ये ते ऑपरेटर होते. भल्या मोठ्या लांबलचक मशीन मधे फिल्मची गुंडाळी गुंडाळली जायची. आणि छोट्या चौकोनातून प्रकाश झोत थिएटर मधल्या मोठ्या पडद्यावर पडून मोठे चित्र दिसायचं. खिडक्या तीन होत्या काम संपवून विठू काका खिडकीत बसायचे तिथून पूर्ण अप्पा बळवंत चौक दिसायचा. उनाडक्या करून कंटाळा आला की आम्ही उगीचच आप्पा बळवंत चौक ते दक्षिणमुखी मारुती चकरा मारत टाईमपास करत होतो. काका खिडकीत दिसले रे दिसलें, की, थांबून त्यांना दोन बोटं नाचवत खूण करायचो, ‘आम्ही वर येऊ का? ‘ काका दोन बोटं करायचे म्हणजे दोघांनीच वर यायचं. आहे का आता! दोघांनी म्हणजे जायचं कुणी? मग काय तिथेच जुम्पायची. अखेर 10, 20, 30चीवाटाघाटी करून तडजोड होऊन माकडासारख्या उड्या मारत एका एकावेळी तीन तीन पायऱ्या ओलांडून धापा टाकत आम्ही केबिन गाठायचं. काय सांगू तुम्हाला! छोट्या खिडकी खाली स्टूल घेऊन डोळ्यात प्राण आणून, मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघतांना काय गंमत यायची! चेहरा मावेल अशी एवढीशीचं ती खिडकी, दोनच पावले मावतीलं असं बुटकं स्टूल होतं. पाऊले डगमगायची मान अवघडायची. सिनेमाच्या स्टोरीचा अंदाज लागायचा नाही. शेंडा ना बुडखा, पण पडद्यावरची चित्र तर दिसत आहेत ना, तोच केवढा मोठ्ठा आभाळा एवढा आनंद होता आमच्यासाठी.

… आत्ता थिएटरमध्ये आलिशान सुख असतं अगदी पाय पसरून आरामात, अर्धवट झोपून, थंडगार ए. सी मधली मोठ्या पडद्याची चकचकीत चित्रपटगृहे पाहिली ना की मनांत येत, नाही गड्या! पायाला रग लागून मान अवघडून छोट्याशा खिडकीतून बघितलेल्या जोगेश्वरी जवळच्या प्रभात टॉकीज मधल्या सिनेमाची मजा काही औरच होती त्याची सर नाही येणार आजच्या सिनेमाला. जास्त वेळ झाल्यावर विठू काका टप्पल मारायचे, आणि म्हणायचे, “बास आता! पळा घरी. मोठ्या कष्टाने पडद्यावरची नजर काढून छोट्या स्टूलावरून पायाला आलेल्या मुंग्या झटकत तोल सावरत आम्ही नाखुशीने खाली उतरायचो आणि मग मख्ख चेहऱ्याने विठू काकांसमोर उभं राहायचो. घरी जायचं नावचं नाही! काका म्हणायचे, “काय आहे आता? जा की घरी. ” खट्याळ सुरेश म्हणायचा, काका नाही म्हणजे खाली आणि जोगेश्वरी जवळ शेंगदाणे फुटाणे वाला उभा आहे तर.. खळखळून हंसत काका पायजम्याच्या खिशात हात घालायचे. खिशातली नाणी खुळखूळायची. आणि त्यातला एक एक आणा आम्हाला मिळायचा. ते वैभव हातात पडल्यावर मुठीतला आनंद सांभाळतं आम्ही धडपडत फुटाणेवाला गाठत होतो. मातीच्या मटक्या खालचे गरम गरम असे खारे दाणे चणेफुटाणे त्यातही असलेले चार खारे दाणे घेऊन आम्ही जोगेश्वरीचा कट्टा पकडायचो. कट्ट्यावर धाडकन बसून फतकल् मारून पाय हलवत रस्त्यावरची गंमत बघायला काही वेगळीचं मज्जा येत होती. एक एक दाणा तोंडात टाकत खात असलेल्या खाऱ्या शेंगदाण्याची लज्जत काही औरच होती. ते बालपण रम्य काय सुरम्य होत हो.! त्यात काकांच्या, मायेची ओढ होती. सुरक्षितआधार होता आणि प्रेमाची पांखर पण होती. आम्ही त्या हूड बालपणात, त्यांच्याकडून भरपूर लाड करून घेतले. पण आता.. हट्ट करायला, लाड पुरवून घ्यायला ही माणसंच राहिली नाहीतं हो! राह्यल्यात त्या, फक्त त्यांच्या सुखद आठवणी.. तर मंडळी असे होते माझे लाड पुरवणारे आमचे लाडके काका. धन्यवाद त्या सुखद आठवणींना. आणि धन्यवाद तुम्हालाही..

– क्रमशः भाग ३२.

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी वाचत जाते… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ मी वाचत जाते… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

(दि. १९ जून… जागतिक वाचन दिन… त्यानिमित्त लिहिलेला लेख)

मी वाचत जाते…

क्षणोक्षणी… काहीबाही…

मग त्यात कधी रस्ते असतात… झाडं असतात… पानं असलेली… पानं नसलेली… फुलांची… फळांची आणि मग ती झाडं उभी असलेल्या जमिनीकडेही माझं आपसूक लक्ष जातं, तिची विचारपूस सुरू होते ….

तीही सांगू लागते रस्त्याच्या गोष्टी…

हळूहळू माझं लक्ष जातंच रस्त्यावर… खूप काही घडतं तिथं. किती वाचावं आणि कसं वेचावं? धावणारी वाहनं… आजूबाजूला हा सगळा गोंधळ बघत घाबरून कशीबशी उभी राहिलेली घरं… दुकानं… आणि या सगळ्यांना अर्थपूर्णता देणारी ‘माणसं’?

… लहान-मोठी, गलेलठ्ठ-शिडशिडीत, श्रीमंत-गरीब मध्यमवर्गीय, थकलेली, बसलेली, उभी, चालणारी, बोलणारी, मोबाईलमध्ये डोकं खुपसलेली, आळस देणारी, काम करणारी, गप्पा मारणारी अशी कितीतरी माणसं… वेगवेगळ्या रंगातली, वेगवेगळ्या ढंगातली… हरवलेली, सापडलेली, हसणारी, बोलणारी, बोलता बोलता रडणारी, रडता रडता शांत होणारी… किती प्रकारची माणसं…???

… त्यांना वाचावं तरी कसं… सोपं नाही ते! फार फार कठीण. म्हणजे अगदी तिऱ्हाइत भाषेतलं पुस्तक वाचणंदेखील सोपं जावं एखादेवेळी. पण माणसं वाचणं अगदीच कठीण. किती सराव करावा. किती प्रकारे प्रयत्न करावा… किती लिपी गिरवाव्यात? पण छे! माणसं वाचण्याची लिपी काही केल्या गवसत नाहीच. पण तरीही निकरानं वाचत जावी माणसं! हळूहळू कळत जातात… एखादा कथेतल्या पात्रांसारखीच मग ती दिसू लागतात.

खरंच सतत पाहिल्यानंतर कुठल्यातरी एखाद्या पात्राशी जुळू लागते त्यांची नाळ. आणि मग वाटू लागतं ही त्या कहाणीतली अक्काच असावी… ती अक्का तशीच असेल सावरून उभी राहणारी, काहीतरी खरेदी करणारी… पैन पैचा हिशोब जपणारी, मनात मुलाबाळांचा विचार करणारी… आणि हा तो सदाशिव, नेहमीसारखाच स्थितप्रज्ञ… घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल जरासुद्धा सोयरसुतक नसणारा… उघड्या डोळ्यांचा पण मिटल्या ओठांचा… आणि ही शेजारची बायजा फतकल मारून सुरकुत्यांचा लेणं सांभाळून बसलेली, सारखी येणाऱ्याला जाणाऱ्याला वेळ विचारणारी… हिला वेळ कसाबसा काढायचा आहे…. तर तिच्या समोरच्या दवाखान्यातला डॉक्टरला जेवायला वेळ नाही. सतत पेशंट येत आहेत. आतमध्ये जात आहेत. तो उठतो, त्यांना तपासतो, औषध देतो‌. चालूच आहे हे सत्र… त्याच्या शेजारच्याला टपरीवाल्याला या दवाखान्याच्या गर्दीची जणू लागणच झाली असावी. पोरं म्हणू नका, पोरी म्हणू नका, बापे म्हणू नका सगळी जणं चहा, कॉफीचे कप हातात धरून निवांत गप्पा मारत उभी… कुणाला बस येईपर्यंत वेळ काढायचाय… कुणाला अभ्यासाच्या नोट्सबद्दल बोलायचंय… कुणाला मित्राची वाट बघायचंय… तर कुणाचं आणखीन काही आहेच…

… तो चहावाला मात्र भर पावसात स्टोव्हच्या गर्मीने भडकलाय… वाफाळलेल्या वाफा चेहऱ्यावर घेऊन घेऊन सारखा घाम पुसतोय. शेजारच्या उभ्या असणाऱ्या पोऱ्याला पटापटा ग्लास द्यायला सांगतोय. तो ग्लास देणारा पोरगा आपल्या बापूडवाण्या नजरेने माझी दृष्टी त्याच्याकडे खेचतो आणि हळूहळू चालत जरासा दूर जातो.

… तिथं एका नव्या इमारतीला लागून एक जुना पडका वाडा, त्याचं छान निळं दार… आकाशाशी स्पर्धा करणारं, लाकडी कोरीव काम असलेलं दिसू लागतं. त्या कोरीव कामाच्या इथूनच एक पिंपळाच्या छोट्याशा रोपानं बहरायला सुरुवात केलेली असते. दार किंचित आत ढकलल्यासारखं असतं. जरा धक्का दिला तर उघडेल आणि कदाचित आतलं काही दिसेल अशी शक्यता निर्माण करत राहतं. पण तसं काहीच घडत नाही. लेखकाला इतक्यात कथा रहस्य सांगायचं नसतं बर का! मग माझं मन उगाच वळतं आतमध्ये काय असेल विचारात डुबतं…

… तेवढ्यात डावीकडून अॅम्ब्युलन्सचा सायरन वाजायला लागतो. एखादा मोठ्या प्राण्यानं आपली दमदार पावलं टाकत यावं आणि त्याच्या आवाजाने किड्यामुंग्यांनी, कीटकांनी, छोट्याछोट्या प्राण्यांनी सैरावैरा धावपळ करावी तशी माणसं आपापल्या वाहनांना, सामानाला घेऊन मिळेल त्या ठिकाणी घुसू लागतात. क्षणभर आपली सगळी कामंधामं बाजूला टाकून माना वळवून वळवून ॲम्बुलन्समध्ये कोण? हे बघण्याचा चिवट प्रयत्न करतात… मृत्यूची एक खोल जाणीव त्या क्षणी सगळ्या रस्त्याला, इमारतींना, दुकानांना एक क्षण व्यापून राहते. जणू ‘स्टॅच्यू’ असं कोणीतरी म्हणावं. तसं क्षणभर सगळेचजण आहे त्या परिस्थितीत थांबतात. आणि ॲम्बुलन्स दूर गेल्याचा आवाज आला की कुठून तरी त्यांच्या अंगात संचारत आणि पुन्हा आपल्या वेगाने धावू लागतात. काही क्षण दो क्षण रेंगाळतात पण वेगळ्या विचारात पुन्हा गुंग होतात.

… हे सगळं कुठेतरी, कधीतरी कथेत, कादंबरी आलेलं असतं. आपण यापूर्वीच अक्षररूपात ते जगलेलो असतो. पुन्हा समोर प्रत्यक्ष वास्तवात जगताना ते मनात कोरलं जातं. आणि मग पुस्तकातल्या शब्दांवरून हळुवारपणे हात फिरवत जावं आणि एकेक ओळ पूर्ण करत त्याचा अर्थ लागत जावा, ती कथा समजू लागावी तशी ही दृश्यं दिसू लागतात. जाणवू लागतात. माणसं समजू लागतात. त्यांचं जगणं समजू लागतं. आणि मग आपल्यासह प्रत्येक गोष्ट, म्हणजे अगदी वस्तू असो वास्तू असो रस्ता असो किंवा आणखीन काही आकाश, झाड, पक्षी काहीही असो त्याची एक गोष्ट असते. हे आपण समजू लागतो. आणि गंमत म्हणजे आपल्याही नकळत ती वाचू लागतो.

… असं करता करता आपण किती, कधी आणि काय वाचलं ते आपल्यात किती झिरपलं हे आपल्यालासुद्धा उमगत नाही. जोपर्यंत आपण पुन्हा एखादी कथा, कादंबरी हातात घेऊन ती वाचायला सुरुवात करत नाही.

… वाचन आणि जगणं हे असं निराळं काही नसतंच.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुलांची आई… लेख क्र. ३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ मुलांची आई… लेख क्र. ३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

“मला माझ्या आईचा अभिमान वाटतो” हा इयत्ता चौथीतला शाळेतला वर्गाचा धडा शिकवण्याअगोदर, मी मुलांना त्यांच्या आईविषयी माहिती लिहून आणायला सांगितलं होतं. आज प्रत्येकाची माहिती वाचत होते. ऋजुता मोरेचा (नाव बदललेले) निबंध वाचायला घेतला. फक्त दहा ओळी माहिती लिहिली होती, परंतु ती सर्व माझ्यावर आधारित लिहिली होती.

सुरुवातच मुळी “नलावडे बाई माझी आई आहेत” अशी केली होती. मी कोणकोणते विषय शिकवते, कसे शिकवते, मुलांशी कसे वागते, शिक्षकांशी कसे वागते याचं वर्णन तिनं आपल्या मोडक्यातोडक्या भाषेत, पण व्यवस्थित केलं होतं.

तिला विचारले असता ती म्हणाली, “बाई, माझी आई नुकतीच वारली. मग मी कोणावर निबंध लिहिणार? तुम्ही नेहमी म्हणता – घरी जशी तुमची आई, तशी मी तुमची शाळेतली आई आहे. तुम्ही आमच्याशी आईसारखाच वागता म्हणून मी तुमच्यावर माहिती दिली. चालेल ना? ” 

तिचं स्पष्टीकरण ऐकून मन भरून आलं. मुलं किती छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवतात आणि त्याचा छान अर्थही काढतात.

ऋजुता दुसरीत माझ्या वर्गात आली कारण ती त्या वर्षी नापास झाली होती. तिच्या वर्गशिक्षिकेचं म्हणणं असं की “तिच्या घरी कोणी अभ्यासाकडे लक्ष देत नाही आणि तीही अभ्यास करत नाही म्हणून ते नापास झाली”. कारण खरं होतं. तिची आई स्टेशनजवळ फुलं विकायला बसायची, या मुली तिच्यासोबत बसायच्या. रात्री दहा वाजेपर्यंत ती फुलं विकायची. आई स्वतः शिकलेली नाही, मग ती अभ्यास कसा करून घेणार?

ऋजूता मात्र दिसायला छान होती. सावळी, उंच, तरतरीत, मोठे मोठे डोळे. मला तिच्या दोन लांब सडक वेण्या छान विंचरून वर बांधलेल्या फार आवडत. वर्ग आवरायला, कचरा काढायला तिला खूप उत्साह असे.

नेहमी हसरी आणि प्रसन्न, पण मग अभ्यासात घोडं कुठे पेंड खातंय याचा शोध घ्यायचा, असं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे प्रयोग सुरू केले.

दुसरीत ती प्रमोट पास झाली आणि पुढच्या वर्षी तिसरीत तिला खूप छान गुण मिळाले. माझा प्रयोग यशस्वी होत होता. आता तिचा ती स्वतः अभ्यास करत होती, छान गुण मिळवत होती. वेळोवेळी, न चुकता, तिच्या स्वच्छ व सुंदर उत्तरपत्रिका मी सर्व वर्गाला दाखवत होते.

आपलं कौतुक होताना पाहून ऋजुताच्या चेहऱ्यावर आनंदाचा चांदणं पसरलेलं पाहताना मी धन्य होत होते.

“मुलांना काहीच येत नाही” हे शिक्षकांनी म्हणणं याच्यासारखे लाजिरवाणी गोष्ट नाही. एका फ्रेंच तत्त्ववेत्याने म्हटलं आहे, “मुलांना खूप काही येत असतं परंतु मुलं शाळेत यायला लागली की त्यांची विचारशक्ती आम्ही खुंटवतो, आम्ही त्यांचे बोन्साय करतो”. प्रत्येक शिक्षकांनी याचा आवर्जून विचार करावा.

चार प्रेमाचे शब्द मुलांचा आत्मविश्वास जागृत करतात, त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देतात, ऋजूताच्या निबंधाने मला एक वेगळा पण सुखद अनुभव आला.

मी तिला आई वाटले यातच माझ्या शिक्षकी पेशाचं सार्थक झालं.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एक खेळ असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “एक खेळ असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमची राष्ट्र सेविका समितीची ” विश्वप्रभा” ही शाखा चार महिन्यांपूर्वी सुरू झाली. प्रारंभी ताईंनी आम्हाला सविस्तर माहिती दिली. त्यामुळे शाखेत काय असते याचा थोडा अंदाज आला. तसेच इतरत्र वाचनात आल्याने शाखेसंबंधी बरीच माहिती आधीच आम्हाला होती. इथे खेळ घेतले जातात ते समजले होते. ते कसे असतील बरं.. अशी उत्सुकता होती. आज शाखेतच खेळलेल्या एका खेळाविषयी तुम्हाला माहिती देते.

ताईंनी आम्हाला हा खेळ शिकवला. एका बाजूला चार बायका.. दुसऱ्या बाजूला चार बायका.. बाकीच्या सगळ्या काही अंतर सोडून मध्ये उभ्या राहणार. एका बाजूच्या चार बायकांनी एकमेकींशी बोलून एक वाक्य ठरवायचे. ते म्हणायचे.

त्या ते वाक्य म्हणत असताना त्याच वेळेस मधल्या बायकांनी आरडाओरडा करायचा. जेणेकरून पलीकडच्या चार बायकांना ते वाक्य ऐकू येणार नाही. तरीपण ते वाक्य परत परत सांगायचे. आणि पलीकडच्या त्या चार बायकांनी ते वाक्य ओळखायचे.

अरेच्या हा खेळ तर वेगळाच…

कधी न खेळलेला…

मजेशीरच आहे की…

मग झाली गंमत सुरू..

आम्ही चारजणींनी ” उद्या अक्षय तृतीया आहे हळदी कुंकवाला या” हे वाक्य ठरवलं. आणि ते सांगायला सुरूवात केली.

आम्ही जीव तोडून ओरडून सांगत होतो. त्याचवेळी त्या मधल्या बायकांनी, मुलींनी खेळात ठरल्याप्रमाणे ओरडायला सुरूवात केली. त्या गोंगाटामुळे आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता.

आम्ही ते वाक्य बोलतं होतो पण पलीकडच्या चार बायका काहीतरी वेगळचं समजत होत्या. दूसरेच शब्द सांगत होत्या.

 हातवारे करून झाले..

खुणा केल्या….. मग कसंबसं त्यांना ओळखायला आलं… त्यांची फजिती बघून आम्हाला हसू येत होतं.

नंतर दुसऱ्या गटाची टर्न…

त्यांनी त्यांचं वाक्य म्हटलं..

आता त्या काय म्हणतात… ते आम्हाला समजत नव्हतं. कारण मधल्या बायकांना, मुलींना चेवच आला होता.

त्यांनी आवाज वाढवला होता.

एकंदरीत धमालच चालु झाली…

मज्जा वाटत होती…..

खूप हसायला येत होते…

आमचा आवाज वाढला की त्याच्यापेक्षा मोठा आवाज मधले करत होते… आता वाक्य ओळखताना आम्ही फसत होतो…. अशा गमतीगमतीतच..

” खेळ संपला”

आमचं हसणं आणि गोंधळ चालूचं होता. तेवढ्यात शांतपणे ताई म्हणाल्या,

” खेळाचा अर्थ समजला का? “

” अर्थ “…. आम्ही एकदम शांत झालो..

त्यांनी बोलायला सुरुवात केली,

” चार जणांना जे सांगायचं आहे ते मध्ये जो समाज दंगा करतो आहे त्यांनी जो कोलाहाल माजवलेला आहे त्यांच्यामुळे तो आवाज दुसऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीये. ते त्याचा काहीतरी विपरीत अर्थ लावत आहेत. आज समाजाची तशीच अवस्था झाली आहे…. “

आम्ही स्तब्ध झालो…

एक वेगळाच विचार या खेळाच्या मागे होता तर.. अरेच्चा असं होतं का…

मग ताई म्हणाल्या,

” आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करत राहायचा. सांकेतिक खुणा करायच्या. तो आवाज कधीतरी त्यांना ऐकू येईल….

त्याचा नेमका अर्थ कळेल…. समजेल.. “

आज आमच्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळाली…

ताई शांतपणे म्हणाल्या,

” आपण त्या गोंधळाच्या आवाजाने गडबडून गेलो आहोत. आता जरा वेळ डोळे मिटून शांत बसू आणि ओंकार साधना करू.. “

लक्षात आलं त्या आवाजाचा परिणाम झालाच होता.

ओंकार साधनेनंतर….. सगळ्यांनाच खरचं त्या क्षणी थोडी शांतता हवी होती हे समजले.

नंतर ताईंनी एकात्मता मंत्र म्हणायला सांगितला.

अनेकजण निरनिराळ्या नावांनी परमात्म्याला साद घालत असतात. पण तो एकच आहे आणि अद्वितीय आहे.

असा त्या मंत्राचा अर्थ आहे.

 हा मंत्रही आम्हाला शाखेत गेल्यामुळेच समजला.

दुफळी माजवायचा अनेक जण उद्योग करत आहेत. त्यांना वटणीवर आणायचा प्रयत्न चालू आहे हेही ताईंनी आम्हाला सांगितले आहे.

आजच्या खेळातून एक धडा मिळाला.

समाजाची पण वेगळी अशी संस्कृती असते. आपले समाजाशी नाते असते… ते निभावताना भान ठेवायला हवे. एकमेकांशी बोलताना संवाद हवा…. मतं वेगळी असली तरी विसंवाद नको.

विरोध करताना संयमाचा तोल ढासळायला नको याची आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे.

आता तर पाच सेकंदात इकडची बातमी तिकडे करणारी विविध उपकरणे माणसांच्या हातात आहेत.. माध्यमं तर अनेक आहेत. त्यामुळे आपण अधिकच जागृत राहायला हवे आहे.

आपल्याशी पण कोणी खेळ खेळताय का हे पण तपासून बघायचे…..

सत्य सांगणारा ते सत्य आपल्यापर्यंत पोहोचवायचा येनकेन प्रकारे प्रयत्न करीत असतो. काही वेळा आपण ते जाणून घेत नाही. म्हणून कितीही गोंधळ चालू असला तरी सत्य लक्षात आलं की समजून घ्यायचं… त्याच्यापर्यंत जायचा प्रयत्न करायचा…

वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबतीतही हे लागू होत आहे. तिथेही हेच तत्व अमलात आणायला हरकत नाही. तरचं तिथे असलेले हेवेदावे आणि कलह कमी होतील.

अशा सहज मजेच्या खेळातुनही काहीतरी शिकत राहू.

हे खेळ आपल्याला अक्षय आनंद देणारे आहेत तसेच समाजाप्रती जागरूकता निर्माण करणारे पण आहेत. त्यातुनच समाजाला उपयोगी पडणारे सकारात्मक असे विचार मनात रुजवले जातील.

यातूनच विचारी, समंजस, प्रगतिशील असा समाज निर्माण होईल. शांतता नांदेल… आणि आनंद पसरेल…

आता राष्ट्राला याचीच फार गरज आहे…

तुम्ही सुज्ञ आहातच..

त्यामुळे ” खेळ “का सांगितला हे तुम्हाला निश्चितच कळले असेल.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी पहिली गिरनार यात्रा/वारी!! – लेखिका : सौ सारिका महेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

? मनमंजुषेतून ?

☆ माझी पहिली गिरनार यात्रा/वारी!! – लेखिका : सौ सारिका महेश कुलकर्णी, ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

श्री स्वामी समर्थ संजीवनतिथीच्या परमपवित्र दिवशी याविषयी लिहावेसे वाटले त्याबद्दल सर्वप्रथम श्री स्वामींना मनोभावे वंदन. 

2021 च्या जानेवारीमधील पौर्णिमेला पहिल्यांदा गिरनारला जाण्याचा योग आला. नुकताच लॉकडाऊन संपल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला आणि रेल्वेमध्ये अजिबातच गर्दी नव्हती.

सगळे नीट जमेल ना अशी थोडीशी धाकधूक मनामध्ये होती. पण माझ्या बरोबर अश्विनी कश्यप आणि अश्विन ब्रह्मे हे मित्र-मैत्रीण आधी दोनदा गिरनारला जाऊन आलेले असल्यामुळे, सर्व काही दत्तकृपेने छान होईल असा मनाला दिलासा मिळाला. योग असेल तर सगळ्या गोष्टी गुरुदेव दत्त जुळवून आणतात आणि निभावूनही नेतात याचा पुरेपूर अनुभव आला..

जुनागड रेल्वे स्टेशनला पोचल्यावर सर्वप्रथम आमच्या सगळ्या बॅग पूर्णपणे सॅनिटायझर मारून सॅनिटाइज करण्यात आल्या.

जुनागड स्टेशन हे छोटेसे पण अतिशय छान आहे. तिथून समोरच्याच बाजूला अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हॉटेल लोटस नावाच्या ठिकाणी आम्ही गेलो व थोडेसे फ्रेश होऊन गिरनार पायथ्याला आलो.

रोपवे ला गर्दी नसल्याने लगेच रोपवेने अंबामातेच्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचलो.

रोपवेमुळे 5000 पायऱ्यांचे अंतर न चालता किती आरामात पार करून अंबामातेच्या इथे येऊन पोहोचलो असे वाटले. जानेवारी महिना असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक होते. अंबा मातेच्या इथे कापूर वात लावून चालत पुढचा प्रवास चांगला होऊ दे अशी मनोमन प्रार्थना केली. पावलोपावली जाणवत होते की आपण गिरनार वारी करत नाही तर दत्तगुरुच आपल्याकडून करून घेत आहेत. कारण आधीचा संपूर्ण कोविडचा काळ असल्याने गिरनार ला जायची तयारी करण्यासाठी व्यायाम किंवा चालण्याची तयारी केली आहे असे झाले नाही.

संध्याकाळची वेळ असल्याने हळूहळू वातावरणात अजूनच छान गारवा वाटायला लागला आणि दत्तशिखरापर्यंतचा प्रवास सुरू झाला. मध्ये मध्ये वाटेत काही साधू शांतपणे उपासना करत बसलेले दिसले. हळूहळू अंधार पडायला लागला आणि पौर्णिमेचा चंद्र दिसू लागला. चंद्र आणि चांदण्यांचा मंद उजेड, त्यातच दत्तशिखरावरती जाणाऱ्या शांत पायऱ्या, मध्ये मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे भजन गात दत्तशिखरापर्यंत कधी येऊ पोहोचलो ते कळलेच नाही.

बारा हजार वर्षांहून अधिक काळ श्रीदत्तगुरुंच्या तपश्चर्येचे व ध्यानाचे स्थान असलेल्या श्री गुरुदत्त चरण पादुकांसमोर नतमस्तक झाल्यावर क्षणभर काही कळेनासे झाले आणि आनंदाश्रू वहायला लागले

हाच तो परमतृप्तीचा व आनंदाचा क्षण अशी मनोमन खात्री झाली.

गर्दी नसल्याने तिथे शांतपणे दर्शन घेता आले व जणू काही हा आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठी येत राहा असे दत्तगुरु खुणावत आहेत असे वाटले व गिरनारला अनेक वर्षे जाणारी मंडळी पुन्हा पुन्हा का बरे गिरनारला जात असावीत… त्यांना काय आनंद मिळत असेल याचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले.

अतिशय छान अशा दर्शनानंतर कमंडलू तीर्थ पर्यंतचा प्रवास चालू झाला. कमंडलू तीर्थाच्या इथली अतिशय मनमोहक अशी दत्ताची मूर्ती डोळ्याचे पारणे फिटवणारी आहे.

इथले तीर्थ व रुचकर प्रसाद घेतल्यावर पुढचा पायऱ्या उतरून येण्याचा प्रवास करण्यासाठी अंगात आपोआप एक प्रकारचे बळ निर्माण झाले. उतरताना भगवान नेमिनाथ व अनेक जैन मंदिरे, काली माता मंदिर, शंकर पार्वती मंदिर, हनुमान् मंदिर आणि अनेक देवतांची छोटी छोटी सुंदर मंदिरे आहेत.

या सगळ्यांचे दर्शन घेत अंदाजे चार तासांमध्ये पुन्हा गिरनारच्या पायथ्याशी येऊन पोचलो व संपूर्ण वारी दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले.

॥ श्री गुरुदेव दत्त॥ 

लेखिका : सौ सारिका महेश कुलकर्णी

कोथरूड, पुणे,  मोबाईल -९३२५६४१३३८

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे, मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील” – भाग – २ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील” – भाग – २ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

(उदाहरणार्थ, एखाद्या मावशीबाईंनी टोपलीभर करवंदं विकायला गडावर नेली तर दिवसभरात त्यातली निम्मीसुद्धा संपत नाहीत, पण एखाद्यानं “स्टिंग” च्या बाटल्या विकायला ठेवल्या तर त्याला एकाच दिवसात तीन चार वेळा खालून वर माल आणावा लागतो, इतकी भरपूर विक्री होते. अशी निरीक्षणं त्यांनी नोंदवली. तीच गोष्ट शेव, मसाला शेंगदाणे आणि वेफर्स च्या पाकिटांची होती.) इथून पुढे —

पूर्वी गडावर येणारी माणसं त्यांच्यासोबत डबा आणायची. सोबतीला गडावरच्या आया बहिणींकडून दही किंवा ताक घ्यायची. त्यामुळं, प्लॅस्टिक च्या कचऱ्याच्या भस्मासुराची चिंता कुठल्याच गडाला नव्हती. पूर्वी डबा घेऊन येणारी माणसं आता खिशात पैसे घेऊन येतात आणि तहानलाडू भूकलाडू जंकफूडच्या रुपात विकत घेऊन खातात. वाटाणे, फुटाणे, खारे शेंगदाणे खिशात घेऊन ते खात खात गड चढणं आता दुर्मिळ झालं आहे. गडाच्या वाटेवर चार जण एखाद्या झाडाखाली बसून भुईमुगाच्या शेंगा फोडून खात बसलेत, हे तर आता पाहायलाही मिळत नाही. शंभर रुपयांच्या शेंगा घेऊन ती पिशवी खालून वर आणत बसण्यापेक्षा दहा रुपयात वेफर्सचं पाकीट कुठल्याही स्टॉलवर मिळतंय, या ‘तथाकथित’ सोयीमुळे सगळा सत्यानाश होतोय.

वीस रुपये देऊन मूठभर करवंदं किंवा जांभळं घेण्यापेक्षा वीस रुपयांत वेफर्स घेणं चवीला आवडतंय आणि खिशाला परवडतंय, असा विचार गडावर येणारी माणसं करायला लागली. साहजिकच, चिंचा, बोरं, आवळे खाणारी मंडळीच उरली नाहीत तर विकणार कुणाला? या समस्येपोटीच गडावर पाकिटबंद पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे.

रायगड विकास प्राधिकरणानं पायरी मार्गावर किमान दहा ठिकाणी तरी नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन दिलं तर चहा सरबतांसाठीचे कागदी कप आणि ग्लास बंद करता येतील. काचेचे कप, ग्लास धुवायला पाणी असेल तर कागदी कप लोक कशासाठी विकतील? यावर्षी आम्ही पायरी मार्गावर साधारण दोन हजार चहाचे कागदी कप गोळा केले. एका नळ योजनेमुळे गडाच्या पर्यावरणात आणि स्वच्छतेत किती मोठा फरक पडेल पहा..

यावर्षी पायरी मार्गावर जागोजागी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत ORS ची पाकिटं वाटली जात होती. लोक घेत होते आणि पुढे जाऊन वाटेत ती पाकिटं तशीच टाकून देत होते. माझ्यापुढं एक दहा पंधरा तरुणांचा गट चालत होता. त्यांनीही ती पाकिटं “फुकट ते पौष्टिक” या न्यायानं घेतली. पण पुढं जाऊन त्यांनी ती कचऱ्यात टाकून दिली.. संपूर्ण पायरी मार्गावर आम्हाला अशीच न वापरलेली शेकडो पाकीटं कचऱ्यात टाकून दिलेली मिळाली..!

“ह्यातनं कसली एनर्जी मिळतीय, ह्याच्या जागी एक एक विमल ची पुडी द्यायला पाहिजे होती” असा डायलॉग मारणाऱ्या एकाला मी पाठमोरा ऐकला. आजन्म स्वतः निर्व्यसनी असणाऱ्या आणि व्यसन करणाऱ्याला जबर शिक्षा ठोठावणाऱ्या राजाच्या राजधानीच्या ठिकाणी असं बोलणारा हा गडी जर तानाजीरावांच्या किंवा हंबीररावांच्या हाती लागला असता तर त्यांनी त्याचं काय केलं असतं, याचा विचारच केलेला बरा. तानाजीरावांनी त्याच्या श्रीमुखात अशी काही लगावली असती की, गड्याची जीभ पुन्हा आयुष्यभर विमल म्हणायच्या अवस्थेत राहिली नसती.

पण एक विलक्षण तरुण मला दिसला. पहाटे पावणेसहा वाजता वाघबिळाच्या रस्त्यावर जे शिरकाई देवीचं मंदिर आहे, तिथं देवीपुढं बसून तो त्याच्या हातातल्या स्मार्टफोन मधून “मराठा म्हणावे अशा वाघराला” चे श्लोक डोळे मिटून ऐकत होता. मला फार आश्चर्य वाटलं. माझ्यासोबतचे सगळे पुढं निघून गेले होते, मी एकटाच होतो. पाच मिनिटं थांबलो. त्याचं ऐकून संपलं. तो उठला आणि मागे वळला, तसं मी त्याला या श्लोकांबद्दल विचारलं. तेव्हां तो म्हणाला, “हे भिडे गुरुजी कोण आहेत हे मला माहिती नव्हतं. मिडियावरच्या उलट सुलट बातम्यांमधून मी त्यांच्याविषयी ऐकत होतो. पण असे कुणी इतके वृद्ध आजोबा खरोखरच जर अशा विचारांचे असतील तर हजारो तरुण त्यांना फॉलो का करत असतील, असं मला वाटायचं. नंतर मला युट्यूबवर हे श्लोक मिळाले. शिवाजी महाराजांना “पुण्यश्लोक” म्हणणारे मी पाहिले ते केवळ हेच.. मी ते श्लोक ऐकले आणि विचार केला. तेव्हापासून मी रोज सकाळी देवापुढं बसून हे श्लोक ऐकतो. शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतो. “

असा एकलव्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. आमच्या थोड्या जुजबी गप्पा झाल्या. कानात इयरफोन्स लावून ते श्लोक ऐकत ऐकत तो नाणे दरवाज्याच्या दिशेनं झपाझप पावलं टाकत निघूनही गेला. आपापल्या आयुष्यात, आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात वज्रासारखी तत्त्वनिष्ठा आणि राष्ट्रीय चारित्र्य जगणारे कोट्यवधी तरुण उभे राहिले तर ह्या दुर्गराज रायगडावरच्या मराठी तख्ताला याहून आणखी काय हवंय ?

आज रायगडाचे तट अन् खालचे कडे प्लॅस्टिकनं भरून गेले आहेत. प्रचंड कचरा पडला आहे. तो भारतीय नागरिकांनीच केला आहे, यात शंका नाही. मराठी साम्राज्याची राजधानी प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकत चालली आहे. रायगडाचं पक्षीजीवन, वन्य प्राणीजीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. कुणाचंच तिकडं लक्ष नाही. येणाऱ्या कुणालाही त्याविषयी आस्था नाही.

माणसांना ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी वावरण्याचं भान नसतं, हेच सत्य आहे. हा केवळ कपड्यांच्या बाबतीतल्या आचारसंहितेचा मुद्दा नाही. आपली वाणीसुध्दा नियंत्रित असणं आवश्यक आहे. कोणत्याही ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणी कसं वागावं हे आजही लोकांना कळत नसेल तर, आजवरचं सगळं औपचारिक शिक्षण निरुपयोगीच आहे, असं मान्य करावं लागेल. नियमांच्या पाट्या लावून उपयोग होत नाही, किंवा दंड करुन उपयोग होत नाही. “स्वयंशिस्त” आणि “तारतम्य” हे दोन गुण अविरतपणे शिकवत राहण्याची गरज आहे. महाराजांच्या गडकोटांची आजची परिस्थिती चिंताजनक असली तरीही, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचं समग्र दर्शन घडवणारं आज्ञापत्र मात्र आजही उपलब्ध आहे.

शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही. तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा विषय आहे. आज्ञापत्र शाळांमधून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचा अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आज्ञापत्राचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर आधारित ज्ञान परिक्षा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. कारण, त्यातून शिकावं असं प्रचंड आहे.

लिहिण्यासारखं खूप काही आहे. व्यक्त करण्यासारखे अनुभव खूप आहेत. पण व्यक्त होण्यालाही शेवटी चौकट असतेच. ज्याला बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, त्यानं अखंड कृतिशील राहिलंच पाहिजे. “आचारशीळ विचारशीळ | दानशीळ धर्मशीळ | सर्वज्ञपणें सुशीळ | सकळां ठायीं ||” असं शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. त्याचंच आचरण करण्याची गरज आहे.

|| अधिक काय लिहावें, सर्व सूज्ञ आहेति ||

|| मर्यादेयं विराजते ||

— समाप्त —

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… नऊ आठ – भाग – ४७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… नऊ आठ– भाग – ४७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

मुंबईच्या लोकल ट्रेनला जीवनदायिनी म्हणतात. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर लाइनवर या गाड्या दिवसरात्र लाखो लोकांना घेऊन ये जा करत असतात. विरार ते चर्चगेट आणि कसारा ते व्ही. टी. (छत्रपती शिवाजी टर्मिनस) या मार्गावर त्या अक्षरशः कर्तव्य बुद्धीने धावत असतात. यातून प्रवास करणारा प्रचंड जनसमुदाय एकाच वेळी उदरनिर्वाहाबरोबर राज्याच्या विशाल औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आर्थिक, क्षेत्रात योगदान देत असतो. माणसांची ने आण करणारा हा लोकल ट्रेनचा प्रवाह मुंबई इतका सक्षम जगात कुठेही नसेल.

याच लोकल ट्रेनच्या माध्यमाचा मीही एक भाग होते. १९६४ते १९७४साल पर्यंत जवळजवळ दहा वर्षे मी महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर बँकेतली फोर्ट ब्रांच मधली नोकरी या निमित्ताने प्रवास केला. नऊ वाजून आठ मिनिटांनी ठाण्याहून व्ही. टीला(शिवाजी छत्रपती टर्मिनस) जाणारी गाडी या दहा वर्षात क्वचितच चुकली असेल. मात्र या नऊ आठच्या लोकलला माझ्या आयुष्यात फार महत्त्व आहे. माझ्या जडणघडणीच्या प्रवासात तिचेही योगदान आहे.

माझी जडणघडण या लेखमालेच्या अंतिम टप्प्यावर असताना मला सतत वाटत आहे की जडणघडणीची प्रक्रिया ही सातत्याची आहे. याची समाप्ती नाही. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत अव्याहत व्यक्तीची जडणघडण ही चालूच असते.

आज “नऊ आठ” या लोकलची आठवण झाली आणि सहजपणे मी ५० वर्षांपूर्वीच्या काळाची पायरी उतरले. सकाळच्या ऑफिस टाईमच्या वेळी माणसांनी फुललेलं ते ठाणे स्टेशन, उंच लाकडी बोर्डवर लावलेले ते गाड्यांचे वेळापत्रक, गोंधळातही गाड्यांची सूचना देणारी ध्वनीक्षेपणातून चाललेली शांत निवेदने, ब्रिजवर जाण्याचे पायऱ्यांचे आणि रॅम्प पद्धतीचे जिने आणि त्यावरून पलीकडे प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या किंवा येऊन ठेपलेल्या गाडीला पकडण्यासाठी चाललेली लोकांची प्रचंड धावपळ, तो गाडी सुटतानाचा वाजणारा हॉर्न, वेळ वाचवण्यासाठी रेल्वे लाईन क्रॉस करणारी धाडसी माणसं, हिरव्या लाल अग्नीरथ गमनागमनदर्शक पट्टीका माझ्या डोळ्यासमोर एक आठवणींचा भरगच्च कोलाज आकारतात. या साऱ्यांचा मी एक भाग होते.

शाळा कॉलेजची इमारत असते, त्या इमारतीतून आपण इतिहास, भूगोल सायन्स, गणित यापैकी कुठल्यातरी विषयात प्राविण्य मिळवून पदवी घेऊन जीवन जगण्यास आता समर्थ झालो असा विश्वास प्राप्त करतो. माझ्यासाठी “नऊ आठ” ही लोकल म्हणजे त्या पुढचा टप्पा होता. चालत्या फिरत्या, गर्दीच्या बंदस्त आठ डब्यांच्या, विजेवर चालणार्‍या गाडीत मला मानवी जीवनाविषयिची व्याख्या सांगणारं एक व्यापक दर्शन घडलं. युगंधराच्या मुखात पार्थाला विश्वदर्शन झालं पण या भूतली, जीवनाची एक सहस्त्रांगी गंगा मला “नऊ आठच्या” लोकलमध्ये दिसली.

अगदी विद्यार्थ्यांपासून ते निवृत्तीच्या पायरीपर्यंत पोहोचलेली सगळी तरुण, मध्यमवयीन, प्रौढ, उतार वयाची माणसं त्या पाऊण तासाच्या प्रवासात भेटत. विद्यार्थ्यांची किलबिल, गप्पांचे विषय वेगळे. हळूच कुजबुजलेली ती वाक्यं आठवतात. ” अगं! तुला कळलं का शिरीष ने शैलाला अखेर फसवलंच. आता कुणा अंजू नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलाय तो. बिच्चारी शैला! ”

एखादी स्कॉलर बसायला जागा मिळो न मिळो त्या गर्दीतही ऑरगॅनिक केमिस्ट्रीची समीकरणे लिहीत असायची. हा रंगीबेरंगी तरुणांचा लोंढा गोंगाट घालत घाटकोपर, माटुंगा येथे उतरून जायचा. यात अभ्यासू होते, महत्त्वाकांक्षी होते, उनाडटप्पू, प्रेमात पडलेले, फसलेले, काव्यात बुडालेले सारेजण होते.

आमच्या या “नऊ आठ”च्या गाडीत कल्याणहून येणारी एक बाई नेहमी तीच ठराविक खिडकी पकडून बसलेली असायची. तशी ती फारशी तरुण नव्हती पण तिच्या चेहऱ्यावर भडक मेकअप असायचा. अंगावरची साडी म्हणाल तर त्यात कसलीच रंगसंगती नसायची. गाडीत आमची सर्वांची इतकी कलकल, बडबड चाललेली असायची तरी तिला मी कधीही कुणाशी बोलताना पाहिले नाही. आणि कुणी तिच्या वाटेला जातही नसत. तिच्या नजरेला नजरही भिडवत नसत. व्ही. टीला उतरून ती कुठे गायब व्हायची ते कधी कळलंच नाही. तिच्याकडे प्रवासी पास होता की नव्हता याची आम्हाला शंका असायची पण चुकून कधी टिकीट चेकर आला तरी तिला मात्र तो कधीच विचारायचा नाही. “हे काय गौडबंगाल होते?”हा प्रश्न मात्र कायम मनात राहिला.

कुंदा, गुलाब, माणिक सारख्या नोकरी करणाऱ्या बऱ्याच महिला होत्या. गुलाब तर सतत धावत पळतच गाडी पकडायची. तिच्या रुंद कपाळावरची बारीक टिकली आणि त्यावरून केसांच्या गालावर लोंबकळणार्‍या दोन पातळ लांब बटा… काहीतरी मोहकता होती तिच्यात. माझ्यात आणि तिच्या वयात खूप अंतर होतं पण तरीही एक मैत्रीचा धागा तिच्याशी सहज गुंफला गेला होता. त्यावेळी नोकरी करणारी, दोन लहान मुलींची आई, नवरा, सासरच्या इतर माणसांची मनं राखून आनंदात राहणार्‍या गुलाबने त्या वयात एक छान ठसा मनावर उमटवला होता. कुंदा आणि माणिक या अविवाहित होत्या. त्यांनी विवाह का केले नाहीत ते कळले नाही कारण त्यांच्या वैयक्तिक बाबीत पडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. मी त्यांच्याकडे त्या काळातल्या अत्यंत सक्षम आणि ताठ मानेने जगणाऱ्या स्वावलंबी, निर्णयक्षम स्त्रिया म्हणूनच पाहिले.

एक बाई घाटकोपरला गर्दीच्या लोंढ्यात ढकलल्यासारखी रोजच डब्यात शिरायची पण तिच्या नाकाशी धरलेलं सोनचाफ्याचं फुल त्या गर्दीतही तिच्या हातून कधी निसटलं नाही. याची आम्हाला खूप गंमत वाटायची. आज आठवलं की माझ्या मनात सहज येतं, आजूबाजूला कुठल्याही प्रकारची विचारांची, वागण्याची, नजरेतली दुर्गंधी असू देत पण तिने मात्र एका शाश्वत सुगंधाची साथ कधी सोडली नाही.

अशीच आणखी एक महिला होती. ती अक्षरशः दरवाज्यात मांडी घालून खाली बसायची आणि ४५ मिनिटांच्या या प्रवासात त्या कलकलाटातही गाढ झोप काढायची. अक्षरश: तो तिचा हक्काचा, एकटीचा आणि विश्रांतीचा काळ असावा.

एकदा गाडीतून उतरताना नकळत माझे गॉगल्स पडले. दुसर्‍यादिवशी सकाळी आॅफीसमध्ये जाताना लक्षात आले. “आता काय ?हरवले. नवीन घ्यावे लागतील. ” “नउ आठ” च्या वेळेला स्टेशनवर पोहचले. तेवढ्यात मागून एक “नउआठ”चा माझ्यासारखाच नेहमीचा युवा प्रवासी हसतमुखाने जवळ आला आणि म्हणाला, ” गाडीतून उतरताना इतकी घाई करू नका हो! काल फक्त गॉगल्सच पडले…”मी पटकन् त्याच्या हातून गॉगल्स घेतले. “थँक्स” म्हणेपर्यंत गाडी आलीच. एक अति शॉर्टफिल्म म्हणून सहज आठवले.

याच गाडीत कौटुंबिक चर्चा घडत, वर्तमानपत्रातल्या ताज्या बातमीवर मतं नोंदली जात, सासूच्या सुनेबद्दल, सुनेच्या सासूबद्दल तक्रारी असत. मुलांची आजारपणं, शिक्षणं, अभ्यास ते अगदी थेट लग्नापर्यंतच्या काळजा असत. घरातल्या वृद्धांच्या समस्या असत. कामाच्या ठिकाणच्या गंमती, स्पर्धा, त्याचबरोबर विक्षिप्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विचित्र कहाण्या ऐकायला मिळत. इतकंच नव्हे तर सवाष्ण, हळदीकुंकवासारखे पारंपरिक समारंभही घडत. संक्रांतीची वाणं लुटली जायची. “तिळगुळ घ्या आणि गोड बोला च्या” घोषणा त्या खडखडणाऱ्या गाडीच्या गर्दीत, नादात मजेत व्हायच्या. कुणाची विणकामं, भरतकामंही चालायची. ”छंदाला धरबंध नसतो” याचंं चालतं बोलतं उदाहरण होतं ते. कधी ठरवून साऱ्याजणी एकाच रंगाचे कपडेही परिधान करायच्या. केवळ एक गंमत म्हणून. एक छान वाचक क्लबही होता बरं का! नामांकित पुस्तकांची देवघेव आणि त्यावर अभ्यासपूर्ण चर्चाही या “नऊ आठच्या” ४५ मिनिटाच्या वेळात व्हायच्या. पुल, वपु, रणजित देसाई, मंगेश पाडगावकर, विंदा अगदी सगळे सगळे असायचे आमच्या या प्रवासात. कितीतरी दिवस आमच्याबरोबर प्रवास करणारी “जया काळे” ही विंदांची मुलगी आहे हे आम्हाला माहीतही नव्हते. जेव्हा कळले तेव्हा आम्हालाच आम्ही तिच्या मैत्रिणी म्हणून भारी वाटले. “जया” हा एक संपूर्ण विषय असू शकतो पण या लेखापुरतं मी इतकंच म्हणेन की सदैव जमिनीवर पाय असणाऱ्या या बुद्धिमान व्यक्तीने आचार विचारांचं सौंदर्य आमच्यात पेरलं.

मुंबईचा पावसाळा आणि लोकल गाड्यांचं बंद पडणं यातही असलेलंं एक वेगळंच थ्रिल आम्ही त्यावेळी अनुभवलं. आमच्या या गाडीत कधीकधी ठाण्याच्या प्रसिद्ध समाजसेविका विमल रांगणेकर सौ रेगे ताई, हजारे बाई(विजय हजारे या क्रिकेट पटुची आई) असायच्या कधी कधी महिलांसाठी ट्रेनमध्ये विशेष सुरक्षा, वाढीव डबे किंवा गाडीत बंद पडणारे पंखे वगैरे तक्रारी, मागण्या घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर रेल्वेप्रशासनाविरोधी आंदोलनातही सहभागी झालोय. आतून काहीतरी उसळणं आणि त्यासाठी आवाज उठवणं म्हणजे काय याची किंचित झलक त्यावेळी आम्ही अनुभवली आणि या आठ-नऊ डब्यांच्या, लांबलचक, माणसांनी ठासून भरलेल्या गाडीत गळ्यात मोडकी पण सुरातली पेटी अडकवून गाणारे भिकारीही ऐकले. स्टीलच्या चार-पाच डब्यातून पोहे, ढोकळा, साबुदाण्याची खिचडी वगैरे विकणाऱ्या बायांकडून भूक शमवली. माळा, पिना, बांगड्या विकणारी छोटी निरागस शिक्षणास वंचित झालेली मुलेही पाहिली. एकीकडे या धावत्या गाडीत एक मोठा उद्योग समूह होता तर दुसरीकडे गरिबी, बेरोजगारी, महागाई, अनाथांचं एक करूण राष्ट्र दर्शनही होतं.

आजही मुंबईत या जीवनदायिनीचे हेच चित्र असेल पण आता जोडीला मेट्रोही आहे. समाजाचं थोडं फार वर्गनिहाय विलगीकरण झालं असेल पण ज्या ज्या वेळी “नऊ आठ” ची लोकल ट्रेन आठवते तेव्हा एक जाणवतं की ती नुसतीच माणसांची नेआण करणारी, रुळावरून धावणारी एक रेलगाडी नव्हती तर मानवी जीवनातल्या नऊ रसांचं भरभरून सत्यदर्शन देणारी ४५ मिनिटाची एक फिल्म होती आणि हो! याच फिल्ममध्ये मॅनेजमेंटचा गुरु, पांढरी टोपी घातलेला मुंबईचा वारकरी डबेवालाही होता.

५० वर्षापूर्वीचा काळ आणि त्यानंतर बदलत गेलेला काळ यांची तुलना करताना वाटतं प्रवासी तेव्हाही होते आजही आहेत पण तेव्हाचा प्रवास “सुखद होता” असं जरी म्हणता येणार नाही तरी आजच्या इतका भयावह नव्हता. क्वचित एखादी “मंदा पाटणकर” बलात्काराची घटना सोडली तर तशी असुरक्षितता फारशी कधी वाटली नाही. चोर्‍यामार्‍या असतील, अपघात असतील पण त्यावेळी दहशतवाद नव्हता. बॉम्बस्फोट नव्हते. माणसातला माणूस जागा होता. म्हणून म्हणते त्यामानाने आम्ही खूप भयमुक्त प्रवास केला. नव जुनं, संस्कृती, परंपरा स्नेहबंध जोडत मुंबईच्या या एका वेगळ्या चलत जगाचा अनुभव घेतला.

किती तरी वर्षं झाली. मी मुंबईला गेले तरी आता लोकलने कधी प्रवास करत नाही. एकेकाळी खिडकीची जागा पकडण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचे साहस सहजपणे करणार्‍या मला आता आपल्याला गाडीत चढता तरी येईल का? याविषयी शंका वाटते पण तरीही मनात एक इच्छा आहे एकदा तरी सकाळी ठाण्याहून सुटणाऱ्या “नऊ आठ”च्या गाडीची वेळ गाठावी. पुन्हा एकदा माणसांनी गच्च फुललेलं ते ठाणे स्टेशन पहावं आणि त्यात माझ्या अनेक हरवलेल्या आठवणी आणि माणसांना शोधावं…

– क्रमशः भाग ४७.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील” – भाग – १ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील” – भाग – १ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

भरजरी पोशाख करुन, फेटे बांधून, कमरेला तलवारी अन् पाठीला ढाली बांधून, जागोजागी फोटो-सेल्फी काढत शिवराज्याभिषेक सोहळ्यात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायला कुणाला आवडणार नाही हो? पण राजांची शिकवण आठवते अन् दरवर्षी मन आवरतं घेऊन प्रेक्षक व्हायचं सोडून “कार्यकर्ता शिवसेवक” म्हणून दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीम आम्ही काढतो..! कारण, दुर्गराज रायगड हा शिवचरित्रातल्या तलवारीपलीकडच्या देखील अनेक अभूतपूर्व घटनांचा साक्षीदार आहे.. !

ज्या मुलांनी आणि त्यांच्या आजच्याच काय, पण आधीच्याही पिढ्यांनी आजतागायत कधीही रायगडावर एक प्लॅस्टिकचा तुकडासुद्धा टाकला नाहीये, अशी १४ मुलंमुली घेऊन ९ जून, २०२५ रोजी पहाटेपासून आम्ही प्रत्येक पायरी प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या कामी होतो. पावसाचे दिवस आहेत, कोव्हिडच्या केसेस सगळीकडे वाढत आहेत, अशा परिस्थितीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं उष्टवलेल्या पाण्याच्या बाटल्या, कागदी कप, प्लास्टिकचे चमचे, रॅपर्स अशा गोष्टी गोळा करायच्या म्हणजे आजच्या परिस्थितीतलं वेडं धाडसच म्हणायला पाहिजे.. ! 

 दरवर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन रायगडी जातो अन् गडावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन खाली घेऊन येतो. या उपक्रमाचं हे विसावं वर्ष होतं.. गेली एकोणीस वर्षं हे व्रत आम्ही सगळे नित्यनेमाने करतो आहोत. माझे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यात आनंदानं सहभागी होत असतात.

एक दीड महिना आधीपासूनच आमच्या या स्वच्छता अभियानाच्या तयारीची सुरुवात होते. मे महिन्यात आमच्यापैकी काही जण गडावर येऊन नीट पाहणी करून जातात आणि मग अधिक कचरा जिथं जिथं असेल तिथून तो हलवण्याचं नियोजन सुरु होतं. सगळ्या नोंदी विद्यार्थ्यांचा गट करत असतो. मी फक्त निमित्तमात्र असतो. स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संस्कार याच वयात मुलांच्या व्यक्तिमत्वावर कोरला गेला तर त्याचे उत्तम परिणाम समाजात दिसून येतात.

कोण आहेत ही मुलंमुली? ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत आहेत, अशा कुटुंबातली ही मुलं. पण पुण्याहून निघून पायथ्यापासून ते वरच्या बालेकिल्ल्यापर्यंत प्लॅस्टिक च्या बाटल्या, त्यांची टोपणे, पिशव्या, फाटकी तुटकी पादत्राणे, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, चहाचे कप, कागदी प्लेट्स, द्रोण, पत्रावळी अशा कितीतरी प्रकारचा कचरा गोळा करायचा, तो व्यवस्थित पॅक करून त्याची नोंद करायची आणि तो गडाखाली पाठवायचा हे काम तसं पहायला गेलं तर मुळीच सोपं नाही. “हे असलं काम मी का करु?” आणि “बाकी लोकं वाट्टेल तसे वागतात त्याचा कचरा मीच का उचलायचा?” असे प्रश्न मनात येऊ न देता काम करत रहायचं, हे किशोरवयीन गटासाठी कठीण असतं. दोन दिवस सफाई कामगाराच्या भूमिकेत राहण्यापेक्षा ॲडलॅब्स इमॅजिका ला गेली असती तर कुणाला त्यात काहीही गैर वाटलं नसतं, अशा वयातली ही मुलं.. ! पण त्यांनी प्रेरित होऊन हे काम करावं, यातच खऱ्या महाराष्ट्र धर्माचं दर्शन घडतं.. ! 

आपल्या देशात शककर्ते राज्याभिषेकच मुळात झालेत एकूण चार.. ! केवळ चारच.. ! पहिला राज्याभिषेक चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिर यांचा.. ! दुसरा सम्राट विक्रमादित्य यांचा.. ! पुढचे दोन्ही राज्याभिषेक आपल्या महाराष्ट्रातले आहेत. सम्राट शालिवाहन याचा राज्याभिषेक आणि आजपासून ३५१ वर्षांपूर्वी चौथा राज्याभिषेक झाला तो रायगडावर छत्रपती श्री शिवाजीराजे यांचा.. ! महाराष्ट्र परमभाग्यवान आणि आपण सारे महाराष्ट्रात जन्म घेतलेले थोर पूर्वपुण्याईचे.. म्हणून आपल्याला हा एक नव्हे तर दोन शककर्त्या सिंहासनाधीश्वरांची परंपरा लाभलेली आहे..

ऐन शिवराज्याभिषेकाच्या दिवशीच ही रायगड स्वच्छता मोहीम का करायची? याचं उत्तरच इथं आहे. संपूर्ण देशभरात हिजरी कालगणना सुरु होती, तेव्हां शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक प्रारंभ करुन कालगणनेला लागलेलं परकीय ग्रहणच संपवून टाकलं. महाराष्ट्राची किंबहुना संपूर्ण हिंदुस्थानची नव्या सार्वभौमत्वाची कालगणना सुरु झाली ती इथं रायगडावरच.. !

राजांची वार्षिक कालगणना सुद्धा भारतीय संस्कृत महिन्यांनुसार होती. राज्याभिषेक शक शुद्ध पक्ष – वद्य पक्ष, प्रतिपदा ते पौर्णिमा, प्रतिपदा ते अमावास्या, संवत्सर या नुसारच चालत होता. रायगडावरच्या शिलालेखात सुद्धा हिंदू तिथीचाच उल्लेख आहे, हे आपण ध्यानी घेणार की नाही? 

मराठी साम्राज्याचं स्वतःचं असं वेगळं चलन सुरु झालं. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही ती दोन चलनं. परकीयांच्या चलनी वर्चस्वाचा पायाच शिवरायांनी उखडून काढला, तोही इथंच रायगडावर.. !

कुमारवयातच स्वतःची राज्यकारभाराची मुद्रा अस्खलित संस्कृत भाषेत करणारे शिवाजीराजे आजही अनन्यसाधारण महत्त्वाचे का ठरतात ? संपूर्ण राज्यकारभार, पत्रव्यवहार, खतावण्या, दस्त, खुर्दखतं असा लेखन व्यवहार जेव्हा उर्दू आणि फारसी भाषेतून चालत होता, तेव्हां तीच भाषा सामान्य जनतेच्या ओठी रुळली होती. राजांनी यात परिवर्तन घडवून आणलं. ही केवढी मोठी उपलब्धी.. ! पत्रव्यवहारापासून ते लेखी सनदांपर्यंत सगळा व्यवहार स्वभाषेत सुरु झाला, मराठी साम्राज्याचा राज्यव्यवहारकोश महाराजांनी करवून घेतला, तोही या रायगडावरच.. !

राजांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाचा वारंवार उल्लेख होत असतो. पण त्या सिंहासनाच्या स्थापनेसाठी केवळ लाखो वीरांचं रक्त सांडलेलं नाही तर, अनेकांच्या बुद्धिमत्तेचा, मुत्सद्दीपणाचा, विद्वत्तेचा, लेखणीतील कौशल्याचा देखील सहभाग आहेच. ते सिंहासन रणातल्या पराक्रमापासून ते दौलतीच्या ताळेबंदापर्यंत आणि महसुलापासून ते दंडनीतीपर्यंत विविध पराक्रम-व्यवहार-व्यवस्थापन यांच्या अभ्यासू चिंतनाच्या भक्कम पायावर उभं आहे. याची जाणीव नंदादीपासारखी अखंड तेवणारी मनं वाढली पाहिजेत. तेच तर शिवचरित्राचं तात्पर्य आहे.

एप्रिल महिन्याच्या १३-१४ तारखेला आमच्यातले काही जण रायगडावर जाऊन आले आणि कुठं, किती प्लॅस्टिकचा कचरा आहे, याचा आढावा घेतला. प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि त्यांची टोपणं हा कचरा सगळ्यात जास्त आहे, असं त्यांचं निरिक्षण होतं. त्यांनी नाणे दरवाजा ते महादरवाजा आणि चित दरवाजा ते महादरवाजा अशा दोन्ही पायरी मार्गांवरच्या १६ जागा शोधून काढल्या, जिथं सगळ्यात जास्त कचरा होता.

त्या टीमचं कौतुकच करायला पाहिजे. कारण, त्यांनी गडावर पसरलेल्या कचऱ्याची सविस्तर यादी केली. त्यात तीस प्रकारचा कचरा आहे, असं लक्षात आलं. चॉकलेट, गोळ्या, च्युइंग गम्स, वेफर्स, कोल्डड्रिंक्स, पाण्याच्या बाटल्या यांची कंपन्यांसहित यादीच केली. हे बहाद्दर एवढ्यावरच थांबले नाहीत तर, गड उतरल्यानंतर त्यांनी पायथ्याच्या प्रत्येक दुकान, हॉटेल, टपरीपाशी जाऊन तिथंही तेच पदार्थ विकले जातात का, याचीही पडताळणी केली. एकूण कचऱ्याचं प्रमाण आणि पायथ्याशी होणारी विक्री यांचं प्रमाण जुळतंय का, ते पाहण्यासाठी आणखी एक दिवस मुक्काम ठोकून निरिक्षण करत राहिले आणि नोंदी केल्या.

उदाहरणार्थ, एखाद्या मावशीबाईंनी टोपलीभर करवंदं विकायला गडावर नेली तर दिवसभरात त्यातली निम्मीसुद्धा संपत नाहीत, पण एखाद्यानं “स्टिंग” च्या बाटल्या विकायला ठेवल्या तर त्याला एकाच दिवसात तीन चार वेळा खालून वर माल आणावा लागतो, इतकी भरपूर विक्री होते. अशी निरीक्षणं त्यांनी नोंदवली. तीच गोष्ट शेव, मसाला शेंगदाणे आणि वेफर्स च्या पाकिटांची होती.

– क्रमशः भाग पहिला 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares