पदर या शब्दाला अनेक अर्थाचे पदर आहेत. बाईचे सारे आयुष्य या पदराभोवती गुरफटलेले असते. बालवयातून किशोर अवस्थेत ती पदार्पण करते तेव्हा ग्रामीण भागात आजही ती मोठी झाली, तिला पदर आला असे म्हणतात. बालपणातील अल्लडपणा एका क्षणात त्या पदरात परका होऊन जातो. तिथूनच बाईचे जीवन पदराभोवती गुरफटत जाते. ती पदराभोवती फिरत राहते. खरं तर साडीच्या एका बाजूचा नक्षीदार भाग म्हणजे पदर. पदराचे रंग काम, जरी काम उत्तम असते. पदरामुळे साडीची शोभा वाढते. साडीचा पदर सुंदर असावा ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पदर म्हणजे डाव्या खांद्यावरून खाली सोडलेला साडीचा एक लांब भाग. या पदरात बाईचे विश्व सामावलेले असते.
पूर्वी तर बायका डोक्यावर पदर कसा घेतात त्यावरून तिची शालिनता ओळखली जायची. खानदानाची ओळख पदरावरून व्हायची. हा पदर माणसाला जगण्याचं बळ देतो. हाच पदर वेगवेगळ्या अर्थानी जीवनात पुन्हा पुन्हा भेटतो.
लहानपणी आपल्या हातून एखादी चूक झाली आता आपल्याला मोठी माणसे ओरडणार हा अंदाज आला की आईच्या पदराआड लपून बसायचे. ओरडा चुकवायचा. आपली चूक आई पदरात घेईल याची खात्री असायची. आपल्या मुलांना कोणी विनाकारण त्रास देत असेल तर तोच पदर खोचून ती भांडायला तयार असते. जुन्या साड्यांचे सुरेख पदर नातवंडाच्या आंगडी-टोपडी, कुंची, दुपटी करण्यासाठी जपून ठेवले जायचे. हीच या पदराची मला नेहमी भारी गंमत वाटते.
जेवण झाल्यावर आईच्या पदराला हात, तोंड पुसल्याशिवाय जेवणाच समाधान मिळत नाही. कधी चुकून पावसात भिजून घरी आलो तर आधी एक धपाटा पाठीत बसायचा मग आई जवळ ओढून घेऊन पदरानेच डोकं पुसायची. किती किती माया, ममता होती तिच्या पदरात. तो सुती कपड्याचा मऊशार उबदार स्पर्श नेहमी स्मृतित जाणवतो.
प्रत्येक व्यक्तीचे पदराशी अनन्य साधारण महत्व आहे. त्याचं भरणपोषण या पदराआड झालेले आहे. पदर एवढा मोठा असतो की त्यात सारे विश्व सामावते. ओटी पदरात घेतात. ओटीभरणाचा अर्थ ही निराळाच असतो जो पदराशी निगडीत असतो. आपला स्वाभिमान सांगायचा असेल तर म्हणतात आजवर मी कुणापुढे पदर पसरला नाही. कुणाला आश्रय हवा असेल, क्षमा हवी असेल तर म्हणतात आम्हाला पदरात घ्यावे. मदत मागायची असेल तर म्हणतात आम्ही आपल्या समोर पदर पसरतो. चूक पदरात घ्यावी म्हणजे समजून घ्यावे. पदराला हात लावणे, पदरात हात घालणे याचा अजून वेगळा अर्थ समोर येतो. पदराचे प्रसंगावरूप किती कसे अर्थ बदलतात.
पदर या शब्दालाच अनेक पदर आहेत. एखाद्या विषयाला अनेक पदर असतात ते समजून घ्यावे लागतात.. चपाती भाकरीला ही पदर असतो. पदर हा एखादा स्तर ही होवू शकतो. या पदराची जादू आजवर टिकून आहे. साडी ऐवजी इतर पोषाख आज वापरले जातात. पण बाईचं ममत्व कुठं कमी होतं ? ममत्वाचा अदृश्य पदर तिला साथ देतोच….. पदराचं कर्तव्य पूर्ण करतोच.
आत्ताच हाती आलेल्या बातमीवरून यम लोकांमध्ये मुख्य यमदूत मृत्युधिशांक यमले आणि त्यांच्या समवेत असलेले त्यांचे असंख्य सहकारी यांनी आपले त्यागपत्र यमराज यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामध्ये ते नमूद करतात..
माननीय यमराजजी अनभिक्षित राजे यमलोक
यांचे चरणी सादर प्रणाम.
महाराज आजवर यम म्हणजे नियम यम म्हणजे धर्म अशी आमची धारणा होती. स्वर्गामधून येणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे उत्तम नियमांचे पालन करीत आपण आपला यमधर्म पाळतो असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे आम्हीही आपले दूत म्हणून आपण सांगाल त्याचे प्राण पृथ्वीवरून घेऊन येत असू. त्यामध्ये वृद्ध.. तरुण… बालके.. जर्रजर देहाचे वयस्कर स्त्री पुरुष… जे एकुलते एक आपल्या कुटुंबाचा आधार होते ज्यांचे.. काही तासापूर्वीच संसारात पदार्पण झाले होते… जे कोवळ्या वयात देश सेवेसाठी दिलेली कामगिरी बजावत असताना मरण पावले… आपल्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्या साऱ्यांचे प्राण ग्रहण केले व यमदूत म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. काही जणांचे प्राण हरण करताना आमच्याही मनात अनेक शंका निर्माण होत असत तरीही आम्ही त्याचे उच्चारण आपल्यासमोर केले नाही. आपली आज्ञा नेहमीच शिरसावंद्य मानली कारण…. आपण धर्माप्रमाणे नीतीने आणि नियमाने कार्य करतो असा आमचा विश्वास होता पण कालची घटना काळजाला लागून गेली. त्यामध्ये सुमारे त अडीच तीनशे लोक यांचे प्राणग्रहण करताना आम्हाला अति दुःख झाले. महाराज त्यांचा दोष काय होता हो? आभाळात उडायचे स्वप्न घेऊन आई-वडिलांबरोबर निघालेली निरागस कोवळी लेकरे.. त्यांचे आई बाबा… मुलाला, मुलीला नातेवाईकाना भेटायला निघालेली कुटूंब वत्सल माणसे वृद्ध दांपत्य जे पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन निघाले होते. काही जण भारत देशाला भेटी देऊन तेथीले अनेक चांगल्या गोष्टी बरोबर घेऊन ते जात होते ते विलक्षण आनंदी होते…. एका सामान्य कुटुंबातली मुलगी जिला आपल्या आई-वडिलांनी विलक्षण कष्टाने शिकवले होते आणि नोकरीच्या ठिकाणी तिने दाखवलेल्या हुशारीमुळे तिला परदेशात जाण्याची संधी प्रथम मिळाली होती. त्या मुलीचे त्या कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले वायुयान उड्डाणानंतर काही क्षणात त्याचा स्फोट व्हावा आणि क्षणभरात सर्वांची स्वप्न खऱ्या अर्थाने राखेत मिसळली जावीत.. वस्तीगृहात भोजन कक्षात भोजन करीत असलेल्या त्या वैद्यकशास्त्राच्या मुलांचा काय दोष? त्यांच्या घास हातातच आणि आम्ही त्यांचे प्राणग्रहण केले…. महाराज हे कार्य करताना आम्हालाही अतिव दुःख झाल…. खरे तर असे कधी घडले नव्हते.. त्या छोट्या मुलांसाठी जीव गलबलून आला.. अहो जगणं म्हणजे त्यांना काही माहित नव्हतं तोवरच त्यांना घेऊन या म्हणालात. कित्येक उड्डाणाचा अनुभव असलेल्या त्या हवाई यानाच्या चालकाच्या मनाची अवस्था दहा-पंधरा क्षणात काय झाली असेल? त्याला काय आठवलं असेल?… आपण तर जाणारच आहोत… हे दोन अडीचशे जीव हाकनाक जाणार… मरण सर्वात त्याला प्रथम कळले आणि तो काही करू शकत नव्हता हे दुःख होते. त्याच्यावर समवेत काम करणारे त्याचे 12 सहकारी हातात प्रवासाच्या बॅगा घेऊनआत आलेल्या त्या सुंदर उत्साही तरुणी… अहो कोवळ्या वयाची मुलं मुली ती… सारे सारे क्षणात कोळसा झाले… तीस पळात किती असंख्य विचार येऊन गेले असतील ?…. का काहीच कळले नसेल… ?.. असे असंख्य प्रश्न आम्हालाही पडले आहेत…. असो
महाराज, आम्ही कठोर आहोत निष्ठुर नाहीत फाशी देणाऱ्या जल्लादा पेक्षाही वाईट कृत्य आमच्या हातून झाले आहे. कारण तो न्याय निवाडा झाल्यानंतर दोषी ठरलेल्या माणसाला फाशी देतो. पण इथे तर कुठलाच न्याय लागला नाही… कुठलीच नीती अवलंबली गेली.. नाही कुठलाच धर्म आचारला गेला नाही… सबब आपल्या समवेत आम्ही काम करू इच्छित नाही… ! तेव्हा आमच्या सर्वांचे त्याग पत्र आपणापुढे ठेवीत आहे आपण त्यावर पुढील कारवाई करावी.
आम्हाला कल्पना आहे यानंतर आमचे काय…. ? महाराज आपली अवज्ञा झाली आहे असे आपणास वाटत असेल आणि त्याचा दंड म्हणून आपण आम्हाला पृथ्वीवर पाठवत असाल तर ते आम्ही आनंदाने स्वीकारतो कारण पृथ्वीवर सुद्धा निष्ठूर क्रूर असे वर्तन करणारी अनेक माणसे आहेत… पण पृथ्वीवर अनेक ठिकाणी आम्हाला मानवतेचे दर्शन घडते त्या मानवतेचे विलोभनीय रूप आम्ही पाहिले या अपघातानंतर संपूर्ण जग हळहळले भारतातल्या प्रत्येक कुटुंबात साऱ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. सारा देश दुःखात आहे अशा संवेदनाक्षम वसाहतीत आम्ही जमेल तशी गुजराण करू जागोजागी प्रेमाचे आणि मानवतेचे संदेश पोहोचू दुःखितांचे अश्रू पुसू… पण आता आपल्या समवेत काम करणे शक्य नाही… तरी कृपया आम्हा सर्वांचे त्याग पत्र त्वरित मंजूर करावे ही नम्र विनंती!
कळावे,
आता आपले नसलेले यमदूत.. (कारण आम्ही आता प्रेमदूत आहोत.)
🙏
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भूरभूर… भूरभूर पाऊस सुरू झाला. मी लगेच गॅलरीत गेले. समोरच्या घरातली छोटी मुलं बाहेर येऊन
” येरे येरे पावसा तुला देतो पैसा” म्हणत नाचायला लागली. दोघं अगदी गोड आहेत.
पाऊस वाढला. मुलं आत गेली. बराच वेळ पाऊस पडला. अंगणात पाणी साठलं होतं. थोड्या वेळाने पाऊस थांबला. मुलं आता काय करतील? कदाचित पावसाच्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडतील..
“पाऊस आला धो धो
पाणी व्हायलं सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली”
बोट बुडणार हे माहीत असलं तरी बोट सोडायचा मोह होतोच…
माझं मन माझ्या लहानपणात गेलं. त्या मुलांवरून आठवले शाळेचे दिवस.. नवीन रेनकोट घेतलेला. नेमका शाळेत जायच्या आणि यायच्या वेळी पाऊस पडायचाच नाही. कोरडा रेनकोट दप्तरातून न्यायचा आणि परत आणायचा. कंटाळून एके दिवशी रेनकोट घरीच ठेवला. त्या दिवशी शाळा सुटायच्या वेळी धुवांधार पाऊस सुरू झाला. भिजत घरी यायला आवडायचं पण त्यापेक्षा आपण आज नेमका रेनकोट घरी ठेवला याचं दुःख वाटत होतं.
तेवढ्यात शाळेच्या गेटपाशी हातात रेनकोट घेतलेली आई दिसली.. रेनकोट घालून मिरवत घरी येता आलं..
किती किती आनंद झाला होता..
शाळेतला मराठीचा तास. त्यादिवशी पाऊस खूप जोरात येत होता बाई वर्गात आल्या आल्या म्हणाल्या
“आज आपण फक्त कविता म्हणू” तासभर कवितांनी वर्ग चिंब भिजला. दिवस सुगीचे सुरू झाले, उघड पावसा ऊन पडू दे, ने मजसी ने परत मातृभूमीला, ऐल तटावर पैल तटावर एकामागोमागे कविता म्हटल्या..
शेवटी बाईंनी “बाई या पावसान… ” हे गाणं म्हटलं. बाईंचा आवाज किती गोड आहे हे तेव्हा कळलं. बाईंचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं. त्या गाण्यातील.
“जीवलग कोठे बाई पडे अडकून नच पडे चैन “.. ही ओळ आठवली.. त्यावेळी बाईंनी ते गाणं का म्हटलं.. ते आज इतक्या वर्षानंतर समजलं.
शाळेनंतर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर वेगळीच दुनिया समोर आली. त्यात पहिल्या ट्रीपचा अनुभव तर कितीतरी आठवणी देऊन गेला..
लोणावळा ते खंडाळा पायी जायची ट्रीप. वर्गातल्या तरुण मुलांबरोबर बाहेर पडायची आयुष्यातली पहिली वेळ.. गप्पा, गाणी, खोड्या आणि वरून पाऊस..
हळूच कोणीतरी दोघे मागे रेंगाळायचे. हातात हात घालून झाडाखाली उभे रहायचे.. खुळ्यासारखा कोणाचा तरी कुणावर तरी जीव जडायचा..
कॉलेज पुरती ती नाती..
अशा हळव्या पावसात ट्रीपला जी मजा येते ती आयुष्यात परत कधी येत नाही.
हुरहुरती मनं घेऊन ट्रिपहून परत यायचं असतं…
खरं म्हणजे तसं फारसं काही घडलेलं नसतं… पण म्हटलं तर खूप घडलेले असतं..
कॉलेजच्या त्या रमणीय जगातून बाहेर यावं लागतं. कॉलेजातले मित्र कॉलेज पुरतेच असतात. एखाद दुसरा तेवढ्या वेळापुरता जवळचा होतो इतकंच…..
नवरा मात्र दुसराच कोणीतरी होतो. तोही खूप आवडतो. लग्नानंतर वेगळे जग सुरू होतं. हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात काळेमणी आले की गृहिणी दिसायला होतं.. अल्लडपणा हरवतो. मंगळवारी मंगळागौरीचा मोठा थाट आईने मांडलेला असतो. सगळी जय्यत तयारी झालेली असते. पूजेला आठ मुली येणार आहेत. अस आई घोकत असते.
त्याच दिवशी धुवांधार पाऊस येतो. मुली येतात की नाही? पूजा होते की नाही? अशी आईला काळजी असते. पण भर पावसात मुली येतात आईचा जीव भांड्यात पडतो.
” जय देवी मंगळागौरी “
ही आरती म्हणताना आईचा तो नथ घेतलेला सात्विक चेहरा कृतकृत्य झालेला असतो. पाऊस म्हटलं की आईचा तो चेहरा आठवतो…
संसारचक्र पुढे जात राहते. बाकी काही असलं तरी नवऱ्याबरोबर पावसाची मजा मात्र लुटता येत नाही. तो बिचारा कर्तव्य तत्पर जबाबदार माणूस असतो.
दोघे बाहेर फिरायला जातात. अचानक आभाळ भरून येते. वारा सुटतो.. पाऊस येणार.. असं वाटतं..
मनात येतं आता पावसात दोघांनी हातात हात घेऊन मस्त भिजत मजेत घरी यावं…. वगैरे रोमँटिक कल्पना आपल्याला सुचायला लागतात. आपलं लक्ष जमिनीवर नसतच…
तेवढ्यात नवरा चटकन रिक्षा नाहीतर टॅक्सी थांबवतो. आपण काही न बोलता त्यात चढून बसतो..
शाहण्या बाई सारख्या..
बाहेर धो धो पाऊस सुरू असतो. अंग जरा ही ओलं न होता भर पावसात आपण कोरडे घरी येतो. पण त्यातही आनंद वाटायला लागतो. कारण आता संसारात मनापासून रमायला झालेलं असतं.
बाहेर पाऊस कोसळायला लागल्यावर नवरा मुलं घराच्या चार भिंतीत सुरक्षित असले की हायसं वाटतं. त्या क्षणी बाहेर पाऊस बघायला जायला वेळ नसतो. सगळ्यांसाठी खायला काहीतरी गरम करून देण्यात आनंद असतो. आता आईची जागा आपण घेतलेली असते.
घराच्या गॅलरीत खुर्चीवर अनेक पावसाळे पाहिलेले दोन जीव सासू-सासरे बसलेले असतात. गतजीवनाच्या कितीतरी आठवणी त्यांच्यासोबत असतात. त्यांचीच त्यांना साथ असते.
कधी कधी ते दोघे एकमेकांशी बोलतही नाहीत. नुसते पावसाकडे बघत बसतात…
पावसाकडे बघतात का अजून काही बघतात कळत नाही…
एक खुर्ची रिकामी झाल्यावर सासूबाईंचा एकटा जीव निःशब्द होऊन जातो. त्यांच्याकडे बघता बघता आपल्या डोळ्यात पाऊस उतरतो.
” पुढचा पावसाळा मी पाहिनं असं वाटत नाही “असं म्हणत पावसाकडे बघत बसलेल्या त्या आठवतात.. खरंच पुढच्या पावसाळ्यात दुसरी खुर्ची ही रिकामी होते. गॅलरी उदास सुनीसुनी होऊन जाते..
मनात विचार येतो.. आपलेही बरेच पावसाळे पाहून झाले. अजून किती आहेत कोण जाणे ?
पावसाचे हे असंच आहे. त्याच्याकडे बघताना आठवणींच्या सरी धावून यायला लागतात… भावनांनी भिजवुन टाकतात.. डोळे ओलावतात..
पावसाळ्यात कधीतरी असा एखादा दिवस येतो.. खिडकीतून, गच्चीतून, गॅलरीतून, दारातून कुठूनही आपण पाऊस बघत असतो. अशावेळी आपण एकटे असलो तर कुठली तरी आठवण मनात येतेच…
डोळे भरून येतात.
मन कातरं होतं… वेडबागडं होतं.. भूतकाळाचे दरवाजे अलगद उघडतात… आणि अनाकलनीय अशा आठवणीत आपण हरवून जातो जरा वेळाने आपणच आपल्याला सावरतो…….
म्हणूनच पावसाळ्यात एकदा तरी मनाला असं जरा वेळ भटकू द्यावं.. स्वैर सोडावं आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा..
काहीही म्हणा पण हिवाळे, ऊन्हाळे येतात आणि जातात… पावसाळा मात्र आर्त करून जातो….
☆ “प्राणीकोश …” – लेखक : स्व. मारुती चित्तमपल्ली ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆
☆
वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणांतच त्यांचे प्राण जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखविलेल्या या धर्यामागे ‘नवीन पिढीने तरी जगावे’ हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहानलाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो. पण प्रत्यक्षात प्राण्यांकडून ती कृतीत आणली जाते. माणसांसारखीच वानरेदेखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो. न पेटलेल्या या शेकोटीभोवताली ते अर्धाएक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही, तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली, हे जाणून घेतलं तेव्हा वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात, असं आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. ‘वानरांची लाकडे, चुलीला साकडे’ ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी. प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या, तर काहींची माहिती गोळा केली. आणि ती या प्राणीकोशाच्या निमित्तानं छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून लोकांसमोर येणार आहे.
मुंगसाला पिलांसह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते. म्हणून आधी मुंगूस बाहेर येऊन डोकावतो आणि मग पिलांना कशा पद्धतीनं रस्ता ओलांडायचा याचे संकेत देतो. त्या पिलांची आई त्यांना शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्लं एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलांडतात. अशा पद्धतीनं रस्ता ओलांडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो. त्यामुळे ते त्यांच्या वाटय़ाला जात नाहीत आणि मुंगूस त्याच्या पिलांसह सुरक्षितपणे रस्ता ओलांडून पलीकडे जातात.
‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेला होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरांसंबंधी तज्ज्ञ व्यक्ती भेटली. त्या माणसाने रात्री एक वाजता मला पाडय़ावर बोलावलं. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो. त्याच्याकडे एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो एक किलोमीटपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली. त्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल शंभर उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक-एक कणीस होतं. पारध्याने त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्याने उंदरांना कणसाची चोरी करण्यास शिकवलं होतं. या उंदरांच्या बिळापाशी रानकोंबडीचे अंडे होते. तेवढे मोठे अंडे या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं. मेळघाटातले उंदीरही फार हुशार! अर्ध्या एकरात त्यांची बिळे आढळतात. त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदराच्या उंचीएवढा असतो. बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रूपक्षी आहे का, हे पाहतो. शत्रूपक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तरच तो बाहेर पडतो. ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.
मोराला पिसारा असतो. पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्याला ‘मुकना मोर’ म्हणतात. मोरनाचीमध्ये या मुकन्या मोराला प्रवेश नसतो. हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी ‘मुकना हत्ती’ असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही. आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात. सर्वसामान्यांकरिता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे; परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांबाबत वस्तुस्थिती आहे. प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास-दौऱ्यांत हे अनुभवायला मिळालं. ‘मुकना’ हा शब्दही त्यातूनच कळला. हत्तींच्या कळपाचं नियंत्रण हत्तीण करते. कळपातले इतर तिच्या मागे चालतात. काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो. आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याच जणांना माहिती नाही. लता मंगेशकर यांना आपण ‘गानकोकिळे’ची उपाधी देतो, ते चुकीचं आहे.
☆
लेखक : स्व. मारुती चितमपल्ली
मराठी वन्यजीव अभ्यासक, पक्षितज्ज्ञ व निर्सग लेखक.
प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मी त्या दिवशी माझ्या गावी पाटनूरला होतो. काही नातेवाईकांना भेटण्यासाठी गाडीतून कच्च्या रस्त्याने भोकरकडे निघालो होतो.
डोक्यावर रणरणते ऊन. नांदेडचा उन्हाळा म्हणजे काही विचारू नका! इतके असूनही धरणांमुळे आमच्या भागात आताही नद्या वाहतात. कालवे काठोकाठ भरून वाहतात. किती कमाल आहे! जिथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे, तिथे आज पावसाळ्यासारखे पाणी वाहते. कोणत्या जन्माची ही पुण्याई असेल? अनेक ठिकाणी पाण्याचा गैरवापर होतोय. पाण्याची प्रचंड नासाडी होते, असेही चित्र दिसते.
मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. एका ठिकाणी असे चित्र होते की, नदीला छान पाणी होते. काही महिला नदीच्या काठावर धुणे धूत होत्या. लहान मुले पाण्यात खेळत होती. एका बाजूला काही गुराखी म्हशींना धुण्याचे काम करीत होते. माझ्यातले मूल पाण्याचा आनंद घेऊ पाहत होते.
मला राहावले नाही. एका झाडाखाली मी गाडी थांबवली आणि एका दगडावर टेकून नदीत पाय सोडून बसलो. वरून रणरणते ऊन आणि खालून नदी वाहते, असे केवळ काश्मीरमध्येच असू शकते का? तिथे वरून बर्फ वितळला, की खाली स्वच्छ पाण्याची नदी वाहते. माझे लक्ष पाण्याच्या आनंदाने होणाऱ्या प्रवासाकडे होते. तितक्यात आवाज आला, ‘माझे कपडे. माझे कपडे!”
त्या ओरडणाऱ्या महिलेकडे माझे लक्ष गेले. ती जिकडे हातवारे करत होती, तिकडे मी पाहिले. पाण्याच्या प्रवाहामध्ये हळुवारपणे लोखंडाचं एक टोपलं, भरलेल्या कपड्यांसह पुढे पुढे सरकत होतं. अंगावर नेसलेल्या साडीमुळे त्या बाईला फार खोल पाण्यात जाता येत नव्हते. कुणीतरी ते लोखंडाचं टोपलं बाहेर काढावं, यासाठी ती ओरडत होती. मदतीसाठी आवाहन करत होती.
क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धावत गेलो आणि ते वाहणारं टोपलं हातानं पकडलं. घाबरून गेलेल्या त्या महिलेला एकदम घाम फुटला होता. ‘धन्यवाद दादा, माझे कपडे वाहून गेले असते, तर सासू माझ्यावर खूप चिडली असती’ असे म्हणून ती महिला नदीपात्रातून वर निघाली. एका झाडाखाली तिने शांतपणे ते टोपलं ठेवलं आणि त्यातला एकेक कपडा काढून ती बाजूच्या दगडांवर वाळत घालू लागली.
मी पाण्याच्या बाहेर आलो, तेव्हा आकाशातून आग ओकणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता अधिकच जाणवली. मी पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी गाडीकडे वळलो. तेवढ्यात माझं लक्ष त्या महिलेकडे गेलं. ती महिला भाकर तुकडा काढून खाण्याच्या तयारीत होती.
जाता जाता तिने मला सहज हटकलं आणि म्हणाली, “दादा, या… दोन घास खाऊन जा. “
मला फारशी भूक नव्हती, पण तिच्या भाकरीवरील उडदाच्या डाळीचा खमंग वास माझ्या नाकात शिरला. उडदाची डाळ म्हणजे माझी कमजोरी. अजून एक विचार मनात आला, आपण या माउलीला नकार दिला, तर तिला काय वाटेल? शिवाय आपल्यावर बालपणी झालेला संस्कार, ‘समोर आलेल्या अन्नाला कधी नाही म्हणू नये’. मी त्या महिलेच्या बाजूला असलेल्या दगडावर बसलो आणि तिला म्हणालो, ‘द्या अर्धी भाकर…’
त्या माउलीने एका भाकरीवर डाळ आणि आंब्याचं लोणचं टाकून ती माझ्या समोर ठेवली. मग काय विचारता? मस्त जेवण सुरू झालं. तिची भाकरी आणि उडदाची डाळ मला अतिशय आवडली, हे तिच्या लक्षात आलं. मग तिनं तिच्याकडं असलेली दुसरी भाकर मला दिली. ती म्हणाली, ‘दादा, आता मी घरीच निघाले. घरी दुसरं काय काम हाय? भाकरी करायची न् खायची’.
काही तरी बोलायचं, म्हणून मी सहज विचारलं, ‘तुमच्या घरी कोणी नसतं का?’
‘असतात की, पण इथं कोणी राहत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी सगळे शहरात असतात’. त्या माउलीनं माहिती दिली.
तिनं दिलेली भाकरी – भाजी मी आवडीनं खात होतो. दरम्यान आमच्या गप्पा सुरू झाल्या.
ती महिला कोण होती? कुठून आली? तिच्या घरी काय परिस्थिती आहे? ती सध्या कुठल्या परिस्थितीत आहे? आणि तिच्या आयुष्यात ती एकटी का आहे? प्रत्येक महिलेच्या मनात एक गंभीर महाकाव्य दडलेले असते, तसे तिच्याही होते.
मी ज्या महिलेशी बोलत होतो तिचं नाव राधिका जाधव. राधिका जाधव त्या नदीपासून जवळ असलेल्या एका वाडीवर राहतात. तीन-चारशे घरांची ती वस्ती अजूनही विकासापासून लांबच आहे. राधिकाच्या घरी दहा एकर शेती. नवरा बऱ्यापैकी शिकलेला. राधिकाच्या लग्नाला आज तीस वर्षे पूर्ण झाली. पण या तीस वर्षांत राधिकाला मूलबाळ झालं नाही. डॉक्टरांच्या तपासणीनंतर लक्षात आलं, की राधिकामध्येच दोष आहे. त्यामुळे तिला मूल होणार नाही.
‘माझ्या वंशाचा दिवा पाहिजे, ‘ असा आग्रह राधिकाच्या सासूनं धरल्यावर, राधिकाच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. राधिकाच्या सवतीला दोन मुलं झाली. ती मुलं, राधिकाचा नवरा आणि तिची सवत लेकरांच्या शिक्षणासाठी नांदेडला राहतात. घरची शेती, सासू-सासरे, आर्थिक व्यवहार सगळं राधिकाच्या खांद्यावर आहे.
राधिकाचं व्यावहारिक कौशल्य फारसं शिक्षण नसतानाही अफाट आहे. बाजारपेठेचं ज्ञान, पाहुणचार, आलं गेलं, सोयरेधायरे, घरचे मानपान हे सगळं तिला सहज जमतं. व्यवहारातले चढउतार, नात्यांमधल्या अडचणींवर मात करण्याची प्रक्रिया यामध्ये ती तरबेज आहे. पण राधिका आई बनू शकली नाही, म्हणूनच तिच्यावर गणगोतात टीका होत राहिली.
खूप वेळ गप्पा झाल्यावर राधिका खुलून बोलायला लागली. ती म्हणाली,
‘आता राधिका ऐवजी ‘वांझोटी’ हा शब्द कानाला सवयीचा झालाय. त्याचं मला काही वाटत नाही. मी स्वतःहून वांझोटी झाले का? मला मूल होऊ नये, यासाठी मी काही केलंय का? नाही ना? मग समाजातल्या बोलण्याकडं मी लक्ष का द्यायचं?’
या जेमतेम शिक्षण असलेल्या बाईमध्ये इतका आत्मविश्वास आणि स्पष्टता कुठून आली असेल, हा विचार मला छळू लागला.
राधिकाचं आपल्या नवऱ्यावर अफाट प्रेम होतं. पण दुसरी बायको आल्यापासून त्याचं प्रेम आटून गेलं होतं. ती म्हणाली, ‘समाजाचं काय… काहीही बोलतो. पण तो (नवरा) आजही सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळा. कधीतरी प्रेमानं बघतो आणि त्या प्रेमाच्या नजरेसाठीच जगावंसं वाटतं. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. मी त्याचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही. तरी त्यांनी मला सांभाळलं, हे काय कमी आहे?’
मी आणि राधिका बोलत असताना आणखी एक बाई तिथे आली. ती म्हणाली, ‘आला का भाऊ तुला न्यायला? तुझं बरं आहे गं. जवा वाटलं तवा भावाला बोलवतीस’.
राधिका हसून म्हणाली, ‘हा माझा सख्खा भाऊ नाही. रस्त्यानं जाणारे दादा हायीत. त्यांनी पाण्यात वाहत जाणारं माझं टोपलं काढून दिलं. मग सुकादुकाच्या गप्पा झाल्या. जेवण झालं, बस इतकंच!’
ती दुसरी आलेली बाई माझ्या चमचमणाऱ्या बुटांकडे, पोशाखाकडे आणि गाडीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र अचंबा होता.
मी त्या दोघींच्या शेजारी दगडावर बसलो होतो. हातात भाकरी आणि गप्पा सुरू, हे बघून तिला आश्चर्य वाटलं. ती बाईही आमच्या गप्पांत सामील झाली. तिचं नाव नंदा.
नंदाला पाच मुली आहेत. सहाव्यांदा गरोदर आहे. नवऱ्याला ‘मुलगाच’ हवा आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मुलगी म्हणजे परक्याचं धन, अशा विचारानं नंदाचं सगळं कुटुंब झपाटलेलं आहे.
मी नंदाला विचारलं, ‘घरी वातावरण कसं आहे?’
ती म्हणाली, ‘काय वातावरण? राबराब राबायचं अन् मुलगा होत नाही, म्हणून रोज शिव्या खायच्या. माझी आई जिवंत होती, तवा तिला समदं सांगायचे. आता तीही नाही. वडील लहानपणीच गेले. भावाकडून काही आधार नाही.
ती म्हणाली, ‘पाच गर्भ पाडले. सगळे मुलीचेच. तीन-चार वैद्य म्हणाले, यांना मुलगा होणारच नाही. तरीही सासू-सासरे ऐकत नाहीत. डॉक्टर म्हणतात, ‘असं केलं, तर बाई वाचल कशी?’
एकीकडे राधिका तिचं दुःख सांगत होती, तर दुसरीकडे नंदा. जिवंत असूनही ती रोज कसे मरण अनुभवते, हे मला सांगत होती.
राधिका म्हणाली, ‘आता जगणं फक्त नवऱ्याच्या त्या एका नजरेसाठी असतं. तो कधीतरी एक प्रेमळ नजर टाकतो. माझा नवरा आजही प्रेम करत असेल. समाज काय… कुणालाही दोष देतो. कावळेच नुस्ते!’
नंदा पुढे म्हणाली, ‘खूप वेळा वाटतं, या नदीत उडी मारावी. जीव द्यावा. पण मग मुलींचा विचार येतो. माझ्या माघारी त्यांचं कसं होईल?’
त्या दोघींच्या बोलण्यातून जे जग समोर आलं, ते मी ना कधी पुस्तकात वाचलं होतं, ना पाहिलं होतं. दोन वेगवेगळ्या सामाजिक त्रासांमधून रोज मरत जगणाऱ्या ह्या दोन स्त्रिया, त्यांचं दुःख कोणत्याही मापात मोजता येत नाही.
मी उठलो आणि गाडीकडे चालायला लागलो. मी एकदा मागे वळून पाहिले, तेव्हा त्या दोघी अर्धवट वाळलेल्या कपड्यांवर दगड ठेवत होत्या, ते कपडे वाऱ्यावर उडून जाऊ नयेत म्हणून. पण समाजाने त्यांच्यावर केलेले आरोप, त्यांची कुचंबणा, त्याला थोपवायला त्यांच्याकडे कोणताच उपाय नव्हता. कोणतंच मनोभावे वजन नव्हतं.
राधिका आणि नंदा ह्या दोन्हीही दुखऱ्या वेली आहेत. त्यांचा कर्तृत्वाचा सुगंध दूरवर पोहोचतोय, पण आपण त्यांना आपुलकीचं पाणी घातलं नाही, तर एक दिवस ह्या वेली सुकून जातील, तो सुगंध हरवून जाईल. बरोबर आहे ना?
राधिका आणि नंदा यांच्यासारख्या दुखऱ्या वेली ग्रामीण भागात तुम्हाला पावलोपावली भेटतील. त्यांना आधार द्या. त्यांचं दुःख समजून घ्या. त्यांना जर आपण दोन क्षणाचा आनंद देऊ शकलो, तर आपण खरे ‘माणूस’ झालो म्हणायचं. अन्यथा काही खरं नाही !
☆ “माझा वाढदिवस आणि बायकोकडून सरप्राईज गिफ्ट” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
नुकताच म्हणजे २० मे ला माझा वाढदिवस सगळ्यांनी सुंदर सुंदर शुभेच्छा देऊन साजरा झाला. आता गिफ्ट हा प्रकार हळूहळू मागे पडत चालला आहे. आणि खरंतर ते छानच आहे.
माझ्या वाढदिवसाला बायकोने मात्र यावेळेस चक्क मला भले मोठे असे सरप्राईज गिफ्ट दिले. आणि मला नाही पण म्हणता येईना. कारण बायकोला नाही कसं म्हणणार!
जाणकार आणि अनुभवी मंडळी नेहमीच सांगतात की लग्न झाल्यानंतर ते आनंदात जगायचं असेल, तर बायकोला कुठल्याही गोष्टीकरता ‘नाही’ म्हणू नका. बायको समोर असली की फक्त हो.. हो.. हो… हो…. म्हणत राहायचं. आणि मी नेहमीच तसंच करत असतो.
आता बायकोने काय सरप्राईज गिफ्ट दिले असेल, हे कोणालाही ओळखता येणे मात्र अशक्य आहे. कोणाला वाटलं, शर्ट आणला असेल / पॅन्ट आणली असेल / घड्याळ, मोबाईल असेल / योगा मॅट असेल / वगैरे वगैरे. पण यामधले काहीही नव्हते.
त्याचे झाले असे —-
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सकाळी चहा पिताना बायको म्हणाली –
बायको : मला एकाला गुगल पे वर काही पैसे पाठवायचे आहेत. तुम्हाला नंबर दिला तर तुम्ही पाठवाल का?
कुणाला पाठवायचे आहेत ?
कशाला पाठवायचे आहेत?
आणि एवढे कशा करता?
यापैकी काहीही विचारणार नसाल तर सांगते. गुगल पे वर ऍड नोट च्या खाली माझं नाव टाकायचं.
मी (मनात) : बायकोला खुश करण्याकरता याच्याहून सोपा मार्ग काय असणार आहे ! तज्ञ नेहमीच सांगत असतात की बायकोला खुश करण्याची कुठलीही संधी सोडू नका. त्यामुळे मी पण कुठलीच संधी सोडत नसतो.
मी : नंबर सांग
बायको ने नंबर सांगितला. आणि अमाऊंट सांगितली ₹ १८,३००. मी बायकोने सांगितल्याप्रमाणे पेमेंट ची प्रोसिजर पूर्ण केली आणि विषय संपला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २० तारखेला वाढदिवस असल्यामुळे सकाळपासून फोन आणि मेसेजेस सुरू होते. त्यामुळे घरात इकडे तिकडे बघायला वेळच नव्हता. आंघोळी आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे वॉशिंग मशीन सुरू करायला मी धुण्याचे कपडे घेऊन वरच्या मजल्यावर गेलो. आणि बघतो तर जुन्या मशीनच्या ठिकाणी गोदरेज चे टॉप लोडिंग चकाचक नवीन वॉशिंग मशीन. मला समजेना – काल इथे आधीचं मशीन होतं आणि मी घरात असूनही मला काहीही पत्ता न लागता आज इथे एकदम नवीन मशीन कसं काय !
मी बायकोला वरती येण्याकरता हाका मारली. मी वर बोलावणार आहे ही कल्पना बायकोला असणार ! त्यामुळे लगेचच बायको वर आली
मी : मशीन कडे बघत – अगं, हा काय चमत्कार आहे
बायको : चमत्कार काहीही नाही. तुम्हाला हे वाढदिवसाबद्दल माझ्याकडून गिफ्ट आहे.
Happy birthday my dear Sudhir.
(बायको कडून चक्क इंग्रजीमध्ये शुभेच्छा, आणि आणि त्या पण सुधीर या एकेरी नावाने, हे ऐकून मी शुद्धीत आहे, ही खात्री करण्याकरता मी स्वतःला चिमटा काढला)
बायको : आजपासून नवीन मशीन मध्ये कपडे वॉश करत चला. छान वाटेल आणि मजा येईल.
मी : अगं, आपलं आधीचं मशीन छानच होतं. काहीही प्रॉब्लेम नव्हता.
बायको : आधीच मशीन छान होते हे मान्य आहे. पण त्याला घेऊन आता १५ वर्षे झाली होती. आपली स्कूटर जुनी झाली, की, ती चांगली असली, तरी आपण जुनी काढून नवीन घेतोच ना ! का ? तर नवीन स्कूटर चालवताना एक वेगळाच आनंद मिळतो. तुम्ही रोज कपडे धुण्याकरता वॉशिंग मशीन वापरता. जुनी मशीन बदलून नवीन घेतली तर तुम्हाला रोज मशीन लावताना वेगळाच आनंद घेता येईल. म्हणून मी तुमच्या वाढदिवसाचा योग साधून तुमच्याकरता हे नवीन मशीन मागवलं.
मी : अगं, पण मशीन मागवलं कधी आणि आलं कधी ! आणि हे ऑर्डरचं काम कोणी केलं?
मी : आणि मशीन चा बॉक्स कुठे आहे, थर्मोकोल, प्लास्टिक पिशव्या वगैरे कुठे आहे. कारण ते डिस्पोज ऑफ करणे हा पण एक प्रॉब्लेमच असतो.
बायको : ते मला माहित होतं. म्हणून मी तो प्रॉब्लेम पण आधीच सोडवला आहे. काल मशीन ऑर्डर करताना मी तिथल्या मॅडमना सांगितले होते, की नवीन मशीनच्या बॉक्समध्येच जुने मशीन घेऊन जायचं आणि त्यामध्ये सर्व थर्माकोल वगैरे पण घेऊन जायचं. आणि त्यांनी तसं केलं, त्यामुळे we have only new machine in the house and nothing else
मी (मनात) : आज बायको एकदम इंग्रजी मध्ये कशी काय ? इतक्या वर्षांमध्ये बायको इंग्रजी मध्ये कधीच बोलली नव्हती. काय प्रकार असावा !
मी : तू ऑर्डर कशी केली वगैरे सांगणार होतीस
बायको : सगळं सांगते. आजच्या दिवस मी मशीन सुरू करते कारण तुम्हाला या नवीन मॉडेलची बटनं वगैरे काहीच माहिती नसणार. आणि मग खाली चहा पिताना सगळे सांगते. आणि मशीन च्या बटनांबद्दल पण सगळी माहिती सांगते.
बायकोनी तिला मशीन ची सगळी माहिती आहे अशा थाटात निरनिराळी बटन दाबून मशीन सुरू केले. आणि आम्ही खाली आलो.
मी (मनात) : मशीन खरच सुंदर आहे. आत्ता मशीन सुरू आहे, पण आवाज अगदी नाही च्या बरोबर आहे.
चहा पिताना –
बायको : दोन दिवसांपूर्वी गोदरेज कंपनीचा माझ्या मोबाईलवर फोन आला. माझा नंबर त्यांना कसा मिळाला माहित नाही. तिकडच्या मॅडम म्हणाल्या – तुमचं मशीन २००८ सालचं आहे. आमच्याकडे छान एक्सचेंज ऑफर आहे. तुमचं मशीन आम्ही बाय बॅक करू. आणि त्याच स्टाईल मधलं लेटेस्ट मॉडेल तुम्हाला देऊ. वॉरंटी चार वर्षांची राहील.
मशीन घरी पोहोचल्यानंतर आमचे इंजिनियर येऊन तुम्हाला डेमो देतील. तुम्हाला पाहिजे असल्यास आम्ही तुम्हाला उद्याच डिलिव्हरी देतो. तुम्ही फक्त आम्हाला १८३०० गुगल पे वर पाठवायचे. मशीन एकदम उत्तम आहे, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही ही गॅरंटी.
मला त्यांचे बोलणे पटले. मी लगेच ओके म्हटले आणि आणि सांगितले की उद्या दुपारी दोन ते पाच या दरम्यानचं मशीन घरी आली पाहिजे आणि पूर्ण डेमो पण झाला पाहिजे. मला नवऱ्याला सरप्राईज द्यायचे आहे. मशीन वेळेमध्ये येणे आणि इंजिनीयर पण त्याच वेळेला येणे हे मात्र महत्त्वाचे आहे. उद्या सकाळी पैसे पाठवते गुगल पे वर. तिकडून ओके आला.
काल सकाळी तुमच्याकडून पेमेंट झाले, दुपारी दोन ते पाच या तुमच्या झोपेच्या वेळेत मशीन घरी येऊन डेमो पण झाला. मला मशीन खूपच आवडले.
लग्न झाल्यानंतर इतके वाढदिवस झाले पण तुम्हाला असे सरप्राईज गिफ्ट देण्याची ही पहिलीच संधी मला छान मिळाली.
सुंदर आणि आगळीवेगळी गिफ्ट दिल्याबद्दल मी बायकोचे आभार मानले. आणि मशीन खरोखरच सुंदर आहे हे पण तिला सांगितले.
आणि महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण डील एका आलेल्या फोन कॉलच्या आधारावर आणि तिथे लगेच पैसे पाठवून, तिने एकटीने कोणाचीही मदत न घेता फोनवर पाच एक मिनिटात केली / मी घरात असूनही मला मशीन बद्दल काहीही पत्ता न लागू देता केली / घरात मशीन येईल पण त्याबरोबरचे थर्माकोल, खोके वगैरे असे वेस्ट घरात राहणार नाही, हे पण प्लॅनिंग तिने केले, याबद्दल तिचे मी खास कौतुक केले. आणि तिच्या करता टाळ्या वाजवल्या.
बायको : Thank you very much my dear for your appreciation and compliments
मी बायकोला : तू रोज भजनाच्या क्लासला जातेस. हे मला माहित आहे. पण रोज भजनाचाच क्लास असतो, का एक दिवसाआड तू कुठे हाऊस मॅनेजमेंट मध्ये MBA पण करते आहेस का ! आणि स्पोकन इंग्लिश चा पण कुठला क्लास लावला आहेस का !
बायकोने हसत हसत यावर उत्तर इंग्रजीमध्येच दिले – Wait and watch.
नंतर बायकोने माझा मशीन बरोबर फोटो काढला. आणि मशीन मला हॅन्ड ओव्हर केले.
गेले काही दिवस मराठी न्यूज चॅनलवर आणि समाजमाध्यमांवर वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी मृत्यूची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने, मयुरी जगताप-हगवणे हिने सासरच्यांविरुद्ध केलेल्या आणि दाबल्या गेलेल्या पोलीस तक्रारीबाबतही बातम्या समोर आल्या आहेत. सगळे वाचून आणि ऐकून माझे मन गलबलले.
हुंडाबंदीचा कायदा येऊन साठ वर्षे उलटून गेली. तरीही आज अनेक कुटुंबांमध्ये, या ना त्या मार्गाने, लग्नाच्या वेळीच मुलीच्या माहेरून पैसे उकळले जातात. अनेक घरांमधून, मुलाचे लग्न झाल्यावरही पुढील बरीच वर्षे, सुनेच्या माहेरून पैसे, कापड-चोपड, सोने-चांदी यावी, अशी अपेक्षा असते. आजही भारतीय घरांमधून सुनांचा छळ होतो का? असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी म्हणेन, हो निश्चित होतो. घरोघरी होणाऱ्या छळाची तीव्रता कमी जास्त असते आणि स्वरूप निरनिराळे असते इतकेच. तो छळ भावनिक, मानसिक, शारीरिक किंवा काहीवेळा लैंगिक स्वरूपाचाही असतो. पण, एकदा का लग्न होऊन तू त्या घरची झालीस की तेच तुझे घर, माहेरी येऊन सासरचे काही सांगायचे नाही आणि सासरी जाऊन माहेरचेही सांगायचे नाही असेच ‘संस्कार’ कित्येक मुलींवर आजही केले जातात. ‘लग्न टिकवणे’ अत्यावश्यक आहे आणि ती तुझी जबाबदारी आहे हे अनेक घरातल्या मुलींच्या मनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बिंबवले जाते, हे दुर्दैव आहे. वैष्णवीची केस म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. अशा अनेक मुलींचा सासरी असह्य छळ होत असतो.
मी एक बालरोगतज्ज्ञ आहे. माझ्याकडे आपली लहानगी बाळे घेऊन तरुण आया येतात. सासरच्या घरामधे त्यांचा बारीक-सारीक छळ होत असतो, हे मला जाणवते. काहीवेळा त्या मला तसे सांगतातही. कित्येकदा माझ्याकडे बाळाला घेऊन एखाद्या घरची सून येऊन गेली की पाठोपाठ तिच्या सासूचा मला फोन येतो. सून खरोखरीच माझ्याकडे आली का, कधी पोहोचली, माझ्या क्लिनिकमधून कधी बाहेर पडली, असले प्रश्न मला त्या विचारतात. मला अतिशय राग येतो. पण कोणाच्याही खाजगी आयुष्यामधे मी लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे खरी ती उत्तरे देऊन मला गप्प बसावे लागते. अनेक सुशिक्षित घरातल्या सुनेला जर दुसरी मुलगीच झाली असेल तर तिच्या सासरचे लोक माझ्यासमोर त्या सुनेला टोमणे मारतात. शक्य असेल तेव्हा मी त्यांना रागावते. पण प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही.
वैष्णवीच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर यथावकाश कायदेशीर कारवाई होईलही. पण वैष्णवीच्या सासरी तिचा छळ होतो आहे हे माहिती असूनही माहेरच्यांनी तिला पुन्हा-पुन्हा सासरी पाठवून दिले, हेही अयोग्य होते असे मला वाटते. ‘शक्यतोवर आपल्या मुलीने सासरी नमते घेऊन, काहीतरी करून, जुळवून घ्यावे’ अशीच अनेक माहेरच्यांनी मानसिकता दिसून येते. मुलीचा घटस्फोट झाला आणि ती माहेरी परत आली, तर समाजामध्ये मुलीची आणि पर्यायाने तिच्या माहेरच्यांचीच जास्त बदनामी होते, हेही दुर्दैवाने खरे आहे. त्या दबावाला घाबरून, ‘कसेही कर आणि जुळवून घे’ असेच अनेकजण आपापल्या मुलीला सांगत असावेत, असे मला वाटते. ‘मुलं झाल्यावर होईल सगळं सुरळीत’ अशाही विचाराने मुलीला जुळवून घ्यायला सांगितले जाते. कधी-कधी तसे होतही असेल. किंवा काही मुली धीटपणे छळाला प्रतिकार करून सासरच्यांना गप्प बसवतही असतील. पण एकीकडे नवऱ्याची आणि दुसरीकडे माहेरच्यांचीही साथ नसेल तर त्या विवाहितेचा कोंडमारा होतो, ही वस्तुस्थिती आहे.
असे असले तरीही, समाजात हळूहळू काही चांगले बदल घडत आहेत. माझ्या अगदी जवळच्या दोन मैत्रिणींच्या मुली आपापल्या लहानग्या बाळांना घेऊन माहेरी परतल्या आहेत. सासरी परत जायचे नाही या निर्धारानेच त्या परत आल्या आहेत. या मुलींच्या आई-वडिलांनी माहेरचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे ठेवले होते, म्हणूनच हे शक्य झाले. या पालकांना समाजाची पर्वा नाही असे म्हणता येणार नाही. पण त्यांना आपल्या मुलींच्या मनःस्वास्थ्याची आणि सुखाची त्याहीपेक्षा जास्त पर्वा आहे, म्हणूनच ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. माझ्या माहितीतल्या त्या दोन्ही मुली सुसंस्कारित आहेत. सासरी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न असफल झाल्यानंतरच त्या सासर सोडून, आणि विवाहबंध तोडून स्वगृही परत आल्या आहेत. त्या मुली स्वतः कमावत्या आहेत, म्हणूनही कदाचित हे सुकर झाले असेल. पण एखाद्या न मिळवत्या मुलीवर असा प्रसंग ओढवला तरी तिलाही माहेरच्यांनी पाठिंबा द्यायला हवा.
समाजात असे काही चांगले बदल घडत असले तरी काही वाईट बदलही घडत आहेत. सासरच्यांनी सुनेला छळण्याच्या घटना जशा आहेत तशाच सुनांनी सासरच्यांचा आणि नवऱ्याचा अतोनात छळ केल्याचा घटना आज काही कमी नाहीत. ‘कौटुंबिक अत्याचार’ कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या काही सुनाही आज बघायला मिळतात. अशा सुनांच्या कारवायांना घाबरून राहणारे सत्शील आणि सद्वर्तनी कुटुंबीयदेखील माझ्या बघण्यात आहेत. दुर्दैवाने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय काही पर्यायच नसतो. अशाच प्रकारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणाची बातमीही नुकतीच वाचनात आली होती. पण सुदैवाने अजून तरी अशा घटनांचे प्रमाण कमी आहे, असे मला वाटते.
आज एका सुप्रसिद्ध डॉक्टर बाईंनी आपल्या सुनेच्या यशाचे कौतुक आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर सांगताना, सुनेचा उल्लेख ‘डॉटर इन लॉ’ असा न करता ‘डॉटर इन लव्ह’ असा केला. तसा उल्लेख त्यांनी मुद्दाम केला का त्यांच्या फोनने autocorrect केल्यामुळे तो झाला, हे मला माहिती नाही.
पण ‘डॉटर इन लॉ’ पेक्षा ‘डॉटर इन लव्ह’ हे संबोधन मला फार आवडले. घरोघरी आईबाप आपल्या पोटच्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढेच ते आपल्या सुनेवरही करू शकले तर आपला समाज किती सुदृढ होईल ही कल्पना काही काळ तरी मला सुखावून गेली. तसे खरोखर होईल तो सुदिन!
☆ प्रिय… भाग – २ – लेखक – श्री रमेश नागपुरे ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)☆
☆
(निधी रडत म्हणाली, “मै बहुत प्यार करती हूँ उनसे. लेकिन कभी कभार छः महिने, सालमे एक बार मिलते है. एक भाई तो यू के मे है. तीन साल हो गये, वो नही मिला. छोटा भाई भी दूर रहता है. छः आठ महिनेंमे मिलते है. पहले हम पुजाकी छुट्टीयोंमे हर साथ इकठ्ठा आते थे. अब सब अपने अपनामे काममे व्यस्त हो गये है.”) – इथून पुढे —
आता फळ्यावर मोजकी नावे शिल्लक होती.
तिचा जिवलग मित्र.
तिचे आईवडील.
तिचा पती.
दोन मुले.
सर म्हणाले, “अब छः नाम याने छः रिश्ते बचे है. आप कौनसे दो लोगोंको अपनी जिंदगी से निकालना चाहोगी ? हमेशाके लिए !”
निधी कासावीस झाली. ती रडतच फळ्याजवळ गेली. तिचं मन द्विधा झालं होतं. या सहा जणांमधून कुणाला आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचं ? तिच्या रडण्याचा उमाळा वाढला होता. दोन नावं पुसायला तिला धाडस होत नव्हतं. तिचे हात थरथरायला लागले होते.
तिने थरथरत्या हाताने आपल्या दोन मुलांची नावे फळ्यावरून पुसून टाकली आणि फुटू पाहणारा जोराचा हुंदका दिला. दुसरा हुंदका आवरण्यासाठी तिने तोंडावर हात ठेवून दाबून ठेवला.
सरांच्या अपेक्षेप्रमाणे घडत होतं. त्यांना निधीचे अश्रू आणि तिची मानसिक अवस्था पाहवत नव्हती पण गेम अर्धवट सोडूनही चालणार नव्हते. आम्हीसुद्धा निधीच्या विकल मनोवस्थेने काहीसे अस्वस्थ झालो होतो. आमच्या मनात हुरहूर दाटून आली होती.
आता चार नावे शिल्लक होती.
निधीचा जिवलग मित्र.
निधीचे आईवडील आणि
निधीचा पती.
सर तिला म्हणाले, “निधीजी, भावनेवर कंट्रोल करून मन घट्ट करा आणि अजून दोघांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा. कायमचं !”
निधी फळ्याजवळच उभी होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिच्या हाताची थरथर खूपच वाढली होती. कंप पावणा-या हाताने तिने आपल्या आईवडिलांची नावे पुसून टाकली आणि तिथेच खाली बसून ती ओक्साबोक्सी रडू लागली.
तिच्या रडण्याने सगळे सून्न झाले होते. एक जीवघेणी शांतता पसरली होती. तिच्या हुंदके देत रडण्याचा आवाज हाॅलभर पसरला होता.
सरांनी तिला आठ दहा मिनिटे रडू दिलं. मग ओडिशाच्या मिसेस महापात्राला हाताने खूण करून जवळ बोलावलं.
निधीजवळ जाऊन मिसेस महापात्राने निधीला सांत्वना देत तिच्या पाठीवर हात फिरवला. तसा निधीला पुन्हा दुखाःचा उमाळा दाटून आला. तिने त्यांना मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागली.
ते दृष्य पाहून सगळ्यांची मने हेलावली होती. बहुतेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.
निधीची अवस्था अशी झाली होती की जणू काही पाच दहा मिनिटांपूर्वी तिच्या प्रिय आईवडिलांचा मृत्यू झालाय.
पंधरा वीस मिनिटाने निधी त्या स्थितीतून बाहेर आली. तिने स्वतःला सावरलं. महापात्रा मॅडमला धन्यवाद देत ती उठून उभी राहिली.
निधीची झालेली अवस्था बघून सर एकदम स्तब्ध झाले होते. कदाचित हा खेळ पुढे चालू करायचा की नाही या विचारात पडले असतील.
माईक हातात घेऊन सगळ्यांवर नजर फिरवत निधी म्हणाली, “मला माफ करा. माझ्याबरोबर मी तुम्हालाही डिस्टर्ब केले. माझ्या बाह्य मनाला समजत होतं की हा एक फिक्टिशियस गेम आहे. वास्तव नाही पण माझं अंतर्मन मात्र हा गेम प्रत्यक्षात अनुभवत होतं. एक एक नावे डिलिट करताना मी प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावनांची अनुभूती अनुभवत होते. ऑफिसात ओळख झालेले, शेजारीपाजारी यांची नावे मी सहज पुसून काढली. नंतर माझ्या अंतर्मनाला जाणीव व्हायला लागली ती मैत्रिणींच्या नावापासून. काही बालपणीच्या मैत्रिणी होत्या. काही शाळा काॅलाजातल्या होत्या. त्या त्यावेळी आम्ही खूप इंटिमेट होतो. पण नंतर संपर्क कमी होत खेला होता तरी त्यांच्याबरोबरच्या आठवणी तर मनात होत्या ना ! नंतरचा माझा अनुभव माझ्यासाठी हळुहळू जीवघेणा होत गेला. बहीण भावांची नावे पुसताना माझं मन हेलावलं होतं पण ती माझ्यापासून प्रत्यक्षात दूर होती. संपर्कही मर्यादित होता आणि मला तर चार नावं पुसून टाकायची होती. माझ्या आयुष्यातून कायमची घालवायची होती.
थोडं थांबून ती म्हणाली, “नंतर दोन मुलांची नावे पुसताना माझं आईचं मन कासावीस, व्याकुळ झालं होतं. माझं काळीज थरथरत होतं. नऊ महिने मी त्यांना माझ्या उदरात वाढवलं होतं. सतरा अठरा वर्षे मी त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या होत्या. पण शिक्षणासाठी ती बाहेर पडली. पुढे नोकरीला लागली. मोठा मुलगा चेन्नईला आहे. त्याने एका तमीळ मुलीशी लव्ह मॅरेज केलंय. तो त्याच्या संसारात सुखी आहे. तशी त्याला आणि आम्हाला एकमेकांची गरज नाहीये. दुसरा मुलगा मुंबईला आहे. त्यानेही आयुष्याची जोडीदार म्हणून एक महाराष्ट्रीयन मुलगी शोधली आहे. त्या सहा नावात त्यांची नावे वगळणे क्रमप्राप्तच होते. दोन नावे मला पुसायची होती. पर्याय त्यांचाच होता. नंतर चार नावातली दोन नावे पुसायची होती. त्यांना माझ्या आयुष्यातून कायमचं घालवायचं होतं. आईवडील, माझा जिवलग मित्र आणि माझे पती. आईवडिलांच्या वयाचा विचार करून मी त्यांची नावे निवडली, पुसली पण त्या क्षणी माझ्या अत्यंत प्रिय आईवडिलांनी माझ्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतलीय या नुसत्या कल्पनेनंच मी मनाने कोलमडून पडले आणि ढसाढसा रडायला लागले. त्यांचा मृत्यू मी जीवंतपणी पाहिला अशी माझी अवस्था झाली होती. त्या अवस्थेतून बाहेर पडणं मला अजिबात सोपं नव्हतं. महापात्रा मॅडमनी मला सांत्वना देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा स्पर्श मला आपल्या प्रिय माणसाच्या मायेचा वाटला. मी त्यांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडले.”
निधी पुढे म्हणाली, “No, it was not a only simple game. It was a real and true experiment for me. My emotions are tested at an extreme level. It’s simply appalling.”
सरांबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. निधी बरीचशी भानावर आली होती. तिने सगळ्यांना हात हलवून धन्यवाद दिले.
सर म्हणाले, “निधीजी, can you conclude this game ?”
निधी म्हणाली, “Yes sir. आता दोन नावे उरली आहेत. एक बालपणापासून असलेल्या माझ्या जिवलग मित्राचे आणि माझ्या पतीचे. या माझ्या मित्रावर मी खूप जीवापाड प्रेम करते. दररोज आम्ही दोन मिनिटं तरी फोनवर बोलतो. रविवारी व सुट्टीच्या दिवशी आम्ही तास तासभर बोलत असतो. माझ्यासमोर माझा नवरा बसलेला असतो आणि त्याच्यासमोर त्याची बायको असते. दोघंही बोअर होत असणार याची आम्हा दोघांनाही कल्पना आहे. पण त्या दोघांनी आमची intimate मैत्री स्वीकारलीय. दोन दोन वर्षे आमची गाठभेट होत नाही पण आम्ही भेटलो की एकमेकांच्या मिठीत सामावून जातो. To be very honest, ती आमची ऊरभेट असते. माझे पती किंवा त्याची बायको सोबत आहे याचंही भान आम्हाला नसतं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे वास्तव व सत्य आहे. माझ्या पतीवरही माझं खूप प्रेम आहे पण माझा मित्र आणि माझे पती या दोघांच्या प्रेमाच्या त-हा, नातं वेगवेगळ्या पातळीवरच्या आहेत. माझ्या पतीपेक्षा मी माझ्या जिवलग मित्रावर जास्त प्रेम करते हे खरं असलं तरी आता eliminate करायचं शेवटचं नाव माझ्या मित्राचं असेल, पतीचं नाही ! माझ्या पतीआधी मला माझ्या मित्राला माझ्या आयुष्यातून घालवणं मला भाग आहे. माझा पती हा मला आयुष्यभर physically साथ देणार आहे. माझ्या सुख-दुःखात physically सहभागी असणार आहे. आम्ही दोघेच शेवटपर्यंत एकमेकांचे असणार आहोत !”
निधीने माईक धरलेला हात खाली केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
थोड्या वेळाने सर म्हणाले, “This is real priorities – elimination of don’ts.”
सर पुढे म्हणाले, “कुणाला काही बोलायचंय ?”
महापात्रा मॅडम म्हणाली, “सर, मला निधीजींचं खूप कौतुक वाटतं. बहि:र्मनात त्यांना माहीत होतं की हा एक fictitious गेम आहे. पण त्यांचं अंतःर्मन या खेळात इतकं एकरुप झालं होतं की त्या या गेमशी पूर्ण समरस होऊन प्रत्यक्षात जगल्या. आम्हीसुद्धा अनुभवत होतो की हे प्रत्यक्षात घडतंय. तसं आम्हीसुद्धा हा गेम आमच्या मनात खेळतच होतो पण निधीजींची भावनिक पातळी ही अतिशय हायेस्ट लेव्हलवरची आहे. आम्ही आयुष्यभर आजचं हे सेशन आणि निधीजींना कधीही विसरणार नाही.”
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
सर म्हणाले, “तुम्हाला कल्पना आली असेलच की आपलं आयुष्य जगताना, आपल्या कामाने देशाची सेवा करत असताना आपली priority काय असायला हवी आणि कोणती don’ts eliminate करावयाची.”
चार पाच yes sir चे आवाज आल्यावर ते म्हणाले, “मला कल्पना आहे की आपलं दररोजचं दोन तासांचं सेशन शेवटी शेवटी 10/15 मिनिटे कंटाळवाणं होत असतं पण आता साडेपाच वाजले आहेत. अडीच तास झाले तरी आम्ही जागेवर खिळून आहोत. निधीजींनी केलेले केलेलं elimination हेच खरे elimination of don’ts आहे. याचं श्रेय निधीजींना जातं. त्या पूर्ण भावनाधिन होऊन या खेळात समरस झाल्या होत्या. पुन्हा एकदा निधीजींसाठी टाळ्या वाजवून आपण आजचं सेशन इथेच संपवू या.”
निधीसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या आणि निधीजींचं अभिनंदन करून आम्ही बाहेर पडलो.
– समाप्त –
लेखक : श्री रमेश नागपुरे
मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे, मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आमची अक्कात्या, घरातली श्रेष्ठ, आदर्श, उंच पुरी, चंद्रासारख्या गोल चेहऱ्याची कणखर आणि,आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणारी, कर्तबगार स्त्री होती. जोगेश्वरी ते आमचं घर म्हणजे अंगण ओसरी. मोठे काका देवळाच्या अंगणात तर ही अक्कात्या ओसरीवर असायची. तिचे यजमान श्री. दिगंबर पंत गेल्यानंतर ती आमच्याकडेच राहयला आली. अक्का सगळ्यात मोठी.माहेरी कष्टातले बालपण संपत आले असतांनाच तिला बोहोल्यावर चढावं लागलं. पंत बीजवर आणि वयस्कर होते , नववधू अक्कात्या दागिन्यांनी नखशिखांत लगडलेली होती. इतके दागिने अंगावर होते की कोवळी अक्काआत्या, त्या दागिन्यांनी अक्षरशः वाकली होती. गरिबीतून वर आलेली ती, भल्या मोठ्या जहागिरीची मालकीण झाली .पोटी संतान नाही त्यामुळे त्या दोघांनी माझ्या मोठ्या बहिणींवर जीवापाड प्रेम केलं. पण अक्काआत्याच्या नशिबी संसार सुख नव्हतं.पंतांना दाढी करताना जखम झाली,ती आत तोंडापर्यंत पसरून त्या दुखण्यातच त्यांचा अंत झाला. एवढे हुशार, प्रेमळ, बायकोवर जीवापाड प्रेम करणारे पंत,व्यवहारात कमी पडले, बायकोवर जीव ओवाळून टाकतांना त्यांनी एक फार मोठी चूक केली अक्कात्याच्या नांवावर ईस्टेट, पैसा, वाडा कागदोपत्री काहीच लिहून ठेवलं नाही. आणि म्हणूनच अक्कात्याच्या आयुष्याची धूळधाण झाली.भाऊबंदांनी सारा वाडा सारी सारी इस्टेट तिचा विश्वासघात करून लांडी लबाडीने लुटली. आणि दुर्दैवी अक्का भावाच्या आसऱ्याला माहेरी आली. खूप खूप रडली ती. पण मग डोळे पुसून कष्ट करण्यासाठी तिने पदर खोचला आणि तो बांधलेला पदर शेवटपर्यंत बांधलेलाच राह्यला.
डेक्कन जिमखान्यावर आयुर्वेद रस शाळेत अवघ्या 20 रुपयात तिने नोकरी केली. त्या काळच्या 20 लाखाची मालकीण,वीस रुपयांसाठी घराबाहेर पडली, आणि तिने परिस्थितीशी लढा दिला. सकाळी सातलाच श्रीजोगेश्वरीचे दर्शन घेऊन ती घराबाहेर पडायची. बुधवार पेठ ते लकडी पूल पायी चालत जाऊन विठोबाचं मंदिर गाठायची. विठुरायाला आपलं गाऱ्हाण ती डोळे पुसत सांगायची. मागे वळून बघायची तर सभामंडपाच्या कोपऱ्यात चिमण्यांचा थवा तिची वाट पाहत माना वेळावत बसलेला असायचा. हो!अपत्य सुखाला वंचित झालेली अक्का शंभर चिमण्यांची आई होती त्या चिमण् पाखरांवर ती अबोल प्रेम करायची. नवल वाटतंय नां तुम्हाला! पणअहो, ही अगदी मी प्रत्यक्ष पाह्यलेली खरी गोष्ट आहे.अक्कात्याला उशीर झाला तर चिमण्या तिथे येऊन चिंवचिंवाट करून बाजार भरवायच्या. क्षणापूर्वी रडणारी ती दुसऱ्या क्षणी हंसायची, , ” आले ग बायांनो आले, नका कलकलाट करू.” असं म्हणून तांदुळाचा डबा त्या चिमण्या पाखरांपुढे रिता करायची. दाणे टिपल्यावर, पोटोबा शांती झाल्यावर थव्याने यायच्या तशा थव्याने पाणी प्यायला,भरलेल्या करवंटीकडे चिमण्या भरारी मारायच्या. अहो हो! त्यांची ही माय त्यांच्या करता पाणी पण भरून ठेवायची. वात्सल्य पूर्ण नजरेने अक्काआत्या त्यांच्याकडे बघत बसायची. चिमण्यांनी दाणान् दाणा टिपून तिच्यासाठी जागा स्वच्छ करून ठेवलेली असायची. मग अर्धा तास त्या जागेवर बसून तिचे पोथी वाचन, स्तोत्र वगैरे चालू असायचे. विठ्ठलमय होऊन समाधी लागायची तिची. घड्याळ्यात आठचे ठोके पडले की लगबगीने उठून विठुरायाला दंडवत घालून रसशाळेचा रस्ता अक्कात्या धरायची. रात्री बरोबर आठ ला तुळशीबाग राम मंदिरात आरतीसाठी तिची हजेरी नित्य नेमाने असायचीचं. अशा प्रकारे पूर्ण दिवस तिने बांधून घेतला होता. त्यामुळे दुःख उगाळायला दिवसा तिच्याजवळ वेळच नसायचा. तुळशी बागेतून आल्यावर जिन्या जवळच्या गँलरीत ती पथारी पसरायची. जाताना मला म्हणायची, ” कुंदाताई आम्ही चाललो आतां हाड पसरायला. ” मला तो शब्द कसातरीच वाटायचा मी रडकुंडीला येऊन विचारायची, “असं काय गं बोलतेस आत्या? म्हणजे तू मला सोडून जाणार?” हंसून मला जवळ घेत ती म्हणायची, “अगं वेडा बाई म्हणजे मी झोपायला जातेय गादीवर अगदी हातपाय पसरून झोपणं म्हणजे हाडं पसरणंच नाही का? अगं ती जोगेश्वरी बसलीय ना तिथे,तिने बोलावल्याशिवाय तुला सोडून मी थोडीच जाणार आहे .” अशी शब्दांची कोटी करून थकली भागलेली कृश झालेली आत्या दुसऱ्या दिवशी चिमणचारा देण्याकरता निद्रेच्या आधीन व्हायची. तिच्या आयुष्यातला एकएक दिवस ती असा संपवायची. झोपतांना देवी मातेला साकडं असायचंच “जोगेश्वरी माते किती दिवस राह्यलेत अजून? केव्हां बोलवतीस मला?” तिचं बोलणं ऐकून मला रडू यायचं. तेव्हा ती मला जवळ घ्यायची आणि मी तिच्या कुशीत विसावायची. माझी अक्काआत्या कुठे जाऊ नये म्हणून मी तिला घट्ट धरून ठेवायची. अशी होती आमच्यावर अलोट माया करणारी, ती पिढी,आमची जवळची माणसं..
अजूनही ह्या आठवणी ताज्या आहेत.आतां अश्रू भरल्या डोळ्यांच्या पडद्याआडून डोकावणाऱ्या ओळी समोर येतात.
… ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती…
मंडळी माझ्या मनातलं मी शब्दात उतरवते आणि शब्दातलं तुम्ही तुमच्या मनांत उतरवता, म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद..
☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. २ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
शाळेत गेल्यावर नेहमीप्रमाणे सर्व वर्गांत जाऊन आले. पहिलीतली एक मुलगी आपल्याच तंद्रीत बसली होती. तिला हाक मारली तरी तिचं लक्षच नव्हतं. शेजारच्या मुलांनी तिला हलवल्यावर ती जागेवरून उठली. झोपेतून उठून तशीच शाळेत आल्यासारखी वाटत होती.
हाताला धरून मी तिला ऑफिसमध्ये आणलं. तेलाची बाटली व फणी धरून घेऊन, भरपूर तेल लावून छान वेणी घालून दिली. तोंड स्वच्छ धुऊन पावडर लावली. छान टिकली लावून तिच्याकडे पाहिलं, म्हटलं, “चल, मोठ्या आरशात पाहू या. ”
पूर्व प्राथमिकच्या वर्गात मोठ्या आरशासमोर तिला उभं केलं. स्वतःचं सुंदर रूपडं पाहून ती खुदकन हसली. मला मिठी मारून म्हणाली, “बाई, मी किती छान दिसते नाही!”
म्हटलं, “होच मुळी. तू खूपच छान आहेस, तुझे केसही खूप छान आहेत. ”
उड्या मारत ती वर्गात निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे समाधानाने पहात मी ऑफिसमध्ये आले. स्वतःशीच हसत मी मनाशी म्हटलं, “दिवसाची सुरुवात छान झाली. ”
मुलं अशी छान प्रसन्न हसली ना की तो जणू काही परमेश्वरच आहे असा मला भास होतो.