☆ अवघा तो शकुन ! हृदयी देवाचे चिंतन !! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
आज संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे. संत गजानन महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ यांच्या पालख्या मार्गस्थ आधीच झाल्यात. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही एक दोन दिवसात निघेल. असंख्य वारकरी ‘तन-मन- धनाने’ या सोहळ्यात वेगवेगळ्या प्रकारे सामील होतील. गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी निर्माण झालेली ‘ Nigativity’,विचित्र मानसिक अवस्था, भिती, ग्रह योग, या सगळ्या परिस्थितीला सामोरे जायची शक्ती मिळणार आहे ती भक्ती मार्गातूनच
म्हणूनच
तुका म्हणे हरिच्या दासां
शुभकाळ अवघ्या दिशा !
हा आलेला विचार मनाला उभारी देतो. भले शरीराने आपण देहू, आळंदी ते पंढरपूर नसू ही जात
तुका म्हणे
सोपी केली पायवाट !
उतरावया भवसागर रे !
सोशल मिडीया, न्यूज चँनेल्स, वृत्तपत्रे यातून हा अनुपम्य सोहळा आपण अनुभवणार आहोत
काय या संतांचे मानू उपकार !
मज निरंतर जागविती !!
*
पांडुरंग ध्यानी,पांडुरंग मनी !
जागृतीं स्वप्नीं पांडुरंग !!
मनाची एवढी एकरूपता २४x ७ सर्वांना जमेलच असं नाही पण वृत्ती तशी ठेवण्याचा प्रयत्न करावयाचा
तुका म्हणे जैसें दास केले देवा
तैसें हे अनुभवा आणि मज !!
आषाढी एकादशीपर्यंतचे अनेक खेळ या वाळवंटी रचत, या सोहळ्याची सांगता चंद्रभागेच्या तिरी , पंढरपूर या भक्तांच्या माहेरी होईल
☆ प्रिय… भाग – १ – लेखक – श्री रमेश नागपुरे ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)☆
☆
हल्ली एक व्हिडिओ viral होतोय. फळ्यावर आपल्या सगळ्या प्रिय व्यक्तींची नावे लिहिण्याचा आणि त्यातली कमी प्रिय असलेल्या व्यक्तीची एक एक नावे पुसण्याचा… त्यांना आपल्या आयुष्यातून घालवण्याचा… शेवटी एक नाव शिल्लक राहतं. अर्थात ते आपल्या जोडीदाराचं !
हा खेळ मी प्रत्यक्ष अनुभवलाय. अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावना हेलावून टाकणारा असा तो अनुभव होता.
सन 1993 साली मी दिल्लीला IIPA मध्ये पंधरा दिवसाच्या एका resident ट्रेनिंगला गेलो होतो तिथला हा अनुभव आहे. त्या ट्रेनिंगला सगळे चाळीशीच्या पुढचे साठीपर्यंतचे आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेले trainees होते.
एके दिवशी आधीची दोन दोन तासांची दोन सेसन्स झाली होती. नंतर लंच अवर होता. कॅन्टीनकडे वळताना थंडी जाणवत होती. डिसेंबरचा महिना होता. वातावरण खूप आल्हाददायी होतं.
कॅन्टीनमधलं जेवण खूपच रुचकर होतं. स्पेशल स्वीटच्या दोन पंजाबी डिसेस होत्या. एक खास राजस्थानी नमकीन मिठाई होती.
लंच घेतल्यावर आम्ही तीन वाजता पुन्हा क्लास रुममध्ये आलो.
साठीच्या घरातले प्रोफेसर अमीत सक्सेना आले. त्यांनी बघितलं, लंचला भरपेट झालेल्या जेवणाने बरेच लोक आळसावलेले होते.
ते म्हणाले, “Good afternoon…. So what is the topic today ?… Priorities – Elimination of Don’ts. “
थोडा गॅप घेऊन ते म्हणाले, “हरिकांत भैय्याजी तो हमे हर रोज अच्छाही खाना खिलाते है. लगता है आज वो हम पर ज्यादाही मेहेरबान थे. आज मै आपको लेक्चरसे बोअर नही करूंगा. “
थोडं थांबून ते म्हणाले, “चलो, आज हम एक गेम खेलते है. माॅनिटरींग करनेके लिए मुझे एक खूबसुरत चेहरा चाहिये, जो मन से भी खुबसुरत हो. “
मग ते हसत म्हणाले, “जेन्ट्सके चेहरे मुझे इतने खुबसुरत नही लगते. “
सगळे हसायला लागले.
ते पुढे म्हणाले, “हाँ, एक शर्त है. ज्यो भी खुबसुरत चेहरा प्लॅटफाॅर्मपर आये, वो पुरी प्रामाणिकता, सच्चाईसे और दिलसे परफाॅर्म करे. “
पाच मिनिटे गेली. कुणीच महिला उठत नव्हती. आमच्या क्लासमध्ये चौदा महिला होत्या. शेवटी प. बंगालची निधी सेन नावाची एक अभिजात बंगाली सौदर्याचं लेणं ल्यालेली, नजरेत भरणारी पन्नाशीच्या घरातली महिला उठून प्लॅटफाॅर्मपर आली.
सरांनी विचारलं, “तो निधीजी आप तैयार हो ?”
ती म्हणाली, “जी हाँ, सर. “
सरांनी विचारलं, “भावनेवर तुम्ही किती नियंत्रण ठेवू शकता ?”
ती म्हणाली, “फारसं नाही, मी खूप सेन्सेटिव्ह, इमोशनल आहे सर. “
सरांनी विचारलं, “गुड ! मला भावूक होणारी तरुणीच हवी होती. तुम्ही किती लोकांवर प्रेम करता ?”
विचार करून ती हसत म्हणाली, “मी खूप जणांवर प्रेम करते ! माझं हृदय सदैव प्रेमाने पूर्ण भरलेले असतं. “
सर म्हणाले, “good. त्या प्रेमाचा स्तर कमी जास्त असेल ना ?”
ती म्हणाली, “निश्चितच. व्यक्तीपरत्वे फरक पडणारच ना, सर ?”
सर म्हणाले, “good. आता तुम्ही या बोर्डवर तीस पस्तीस व्यक्तींची नावे लिहा ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता. एक काळजी घ्या. ज्यांच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्याचं नाव आधी लिहा. मग क्रमाने दुसरी तिसरी चौथी अशी नावे लिहा. “
सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रोखल्या होत्या हे ती पाहत होती. तिच्यासाठी खूप अवघड टास्क होता असं तिच्या चेह-यावरून जाणवत होतं.
पहिल्याच नावाला ती अडखळली, चार वेळा तिने आपल्या हातातला पेन बोर्डजवळ नेला व परत खाली घेतला. तिच्या मनात उलाघाल चाललीय, ती तिची सर्वात जास्त प्रिय व्यक्ती ठरवू शकत नाही किंवा लिहू इच्छित नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. ते सरांच्याही लक्षात आलं, तसं ते म्हणाले, “प्रामाणिकता, सच्चाई और दिलसे लिखना है ये याद रखो. यहाँ शायद तुम्हे पहचाननेवाला कोई नही होगा. अपने दिलसे लिख सकती हो. “
तिने फळ्यावर नाव लिहिलं. “आशुतोष. “
सरांनी विचारलं, ”ये कौन हे नसीबवाला ?’
ती म्हणाली, “माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र आहे. “
एक मित्र तिचा सर्वात जवळचा आहे हे ऐकून सगळे चकित झाले होते. मनातून तिच्या खरं बोलण्याला, धाडसाला दाद देत होते.
नंतर तिने आपल्या आईवडिलांची नावे लिहिली.
त्यानंतर एका भावाचे नाव लिहिले.
इथे सगळे पुन्हा चकित झाले. तिच्या भांगेत कुंकू होतं म्हणजे ती विवाहिता होती. मित्र, आई वडील, भाऊ यांच्यानंतर तिच्या नवरा की काय हा प्रश्न आम्हाला पडला होता. तिचा नवरा वारला असेल का अशीही शंका काही लोकांना आली असेल पण तिच्या भांगेतलं कुंकू तसं दर्शवत नव्हतं.
त्यानंतर तिने आपल्या पतीचे नाव लिहिलं.
इथपर्यंत नावं लिहिताना ती बराच विचार करायची हे आमच्या लक्षात आलं होतं.
पुढे ती एक एक नावे फारसा विचार न करता पटापट लिहित होती. जवळजवळ 38 नावे तिने फळ्यावर लिहिली. प्रत्येक नाव लिहिल्यावर ती त्यांची ओळख सांगायची.
सर म्हणाले, “आपने 38 नाव लिखे है और उनकी पहचानभी बतायी है. और भी कुछ नाम लिखना हो तो आप लिख सकती हो. “
तिने अजून चार नावांची भर घातली.
सरांनी विचारले, “अब आप कुछ कहना चाहोगे ?”
ती म्हणाली, “जी नावे लिहिली ती आणि त्यांचा क्रम मी मनापासून लिहिलाय. “
सर सगळ्यांना म्हणाले, “निधीजी बयालीस लोंगोंपर प्रेम करती है, एक क्लॅप तो निधीजी के लिए होनी ही चाहिये. “
सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या.
सर म्हणाले, “आता निधीजींची कसोटी लागणार आहे. खेळाला आता खरी सुरुवात होत आहे. “
खेळ खूप दिलचस्प होता. निधीजी फळ्यावर एक एक नावं लिहित होती. सगळे त्या खेळामध्ये मनाने सामिल झाले होते. तिच्याबरोबर सगळे खेळायला लागले होते. आपल्या मनःपटलावर आपण प्रेम करतो त्यांची एक एक नावे लिहित होते. काही लोकं वही पेनचा वापर करत होते.
सर म्हणाले, “निधीजी, तैयार हो, आगे खेलने के लिए ?”
निधी म्हणाली, “जी सर !”
सर म्हणाले, “आता चार जणांची नावे eliminate करा. तुमच्या आयुष्यातून त्यांना बाहेर काढायचे आहे. कायमचं !”
निधीने एका क्षणाचाही विलंब न करता फळ्यावरील चार नावे पुसली.
सर म्हणाले, “ओके, अजून काही अशी नावे असतील आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांनाही तुमच्या आयुष्यातून कायमचं घालवू शकता. “
निधीने अजून काही नावे फळ्यावरून पुसून टाकली.
सर म्हणाले, “आता अजून सात आठ नावे पुसून टाका जी तुमच्या आयुष्यात नसतील तरी तुम्हाला चालतील. “
निधीने अजून काही नावे फळ्यावरून पुसून टाकली.
सरांनी विचारले, “कोण होती ही सगळी ?”
निधी म्हणाली, “आमच्या संपर्कात आलेली आणि आमचे शेजारी पाजारी. “
सर म्हणाले, “good. You are on the right track. आता अजून चार पाच नावे फळ्यावरून पुसून टाका ज्यांच्या नसण्याने तुम्हाला विशेष फरक पडणार नाही. “
खेळ रंगत चालला होता. खेळात बहुतेक सगळे सामिल झाले होते. तेसुद्धा खेळाशी एकरुप झाले होते. फरक एवढाच होता की निधी फळ्यावरची नावे पुसत होती आणि आम्ही आमच्या मनःपटलावरची नावे पुसत होतो.
निधीने काही नावे पुसल्यावर सरांनी विचारले, “ये सब कौन थी ?”
निधी म्हणाली, “मेरी सहेलिया. “
आत्ता फळ्यावर मोजकी नावे उरली होती.
तिचा जिवलग मित्र.
तिचे आईवडील.
तिचा एक भाऊ.
तिचा पती.
तिची दोन मुले.
तिच्या दोन बहिणी.
तिचा अजून एक भाऊ.
पतीचे आईवडील.
पतीची एक बहीण.
सरांनी त्या नावांकडे नजर टाकून पुन्हा एकदा त्यांची ओळख विचारली. निधीने ओळख दिल्यावर सरांनी निधीला तीन नावे पुसायला सांगितली.
निधीने थोडा विचार करून पतीचे आईवडील व पतीच्या बहिणीचे नाव पुसून टाकले.
आतापर्यंत या खेळाचा शेवट बहुतेकांच्या लक्षात आला होता. निधीची चांगलीच कसोटी लागणार असल्याची कल्पना आम्हाला आली होती कारण तिचा priority चा क्रम काहीसा अस्वाभाविक होता.
निधी काहीशी तणावाखाली आली होती. सासूसास-याचे नाव पुसताना तिचे हात कापत होते. ती काहीशी उदास दिसत होती.
सरांच्याही लक्षात तिची स्थिती लक्षात आली होती. ते म्हणाले, “आता अजून चार नावे पुसून टाका. “
निधी भावनावश झाली होती. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. अश्रुंचे काही थेंब तिच्या डोळ्यांतून गालावर ओघळले होते.
तिने दोन भाऊ आणि दोन बहिणीची नावे पुसली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
सर म्हणाले, “आपने अपनी दो बहने और दो भाईयों को भी अपनी जिंदगीसे निकाल दिया ? क्यो ?”
निधी रडत म्हणाली, “मै बहुत प्यार करती हूँ उनसे. लेकिन कभी कभार छः महिने, सालमे एक बार मिलते है. एक भाई तो यू के मे है. तीन साल हो गये, वो नही मिला. छोटा भाई भी दूर रहता है. छः आठ महिनें मे मिलते है. पहले हम पुजा की छुट्टीयों मे हर साथ इकठ्ठा आते थे. अब सब अपने अपने काम मे व्यस्त हो गये है.”
– क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री रमेश नागपुरे
मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
– – संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे.
असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना?
मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?
तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो.
मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते.
तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची…
☆ ते माझे घर… ☆
☆
ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।
आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।
*
कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।
* भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।
* परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।
*
मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।
* ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।
* बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।
☆
– श्रीराम बाळकृष्ण आठवले
आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती.
याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा.
तिने घरासाठी लागणार्या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला.
घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे.
त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.
आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे.
घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.
मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते.
दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी, कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?
आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते.
मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून?
मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?
घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?
शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्याला त्याची बाधा होणारच ना?
उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड, असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?
आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?
प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली.
घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••
☆ माझी जडणघडण… मिस ढगे – भाग – ४६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
मिस ढगे
शाळा नंबर १२, गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल, एलफिन्स्टन कॉलेज ते बँक ऑफ इंडिया अशा २०/२२ वर्षाच्या आयुष्यात मी वेगवेगळ्या स्तरावरचे विविध रंगी, वेगवेगळे आयुष्य जगले. घरातल्या आणि भोवतालच्या माणसांच्या समुदायात वाढले, घडले. खरं म्हणजे वीस-बावीस वर्षाचा काळ लहान नसला तरी जीवनानुभवासाठी तो तितका मोठाही नव्हता. माझ्यासाठी तर हा काळ सक्षम, प्रेमळ, माझ्यात गुंतलेल्या प्रियजनांच्या हातात हात घालून चाललेला एक सुरक्षित काळ होता. आयुष्यातला खरोखरच रम्य काळ होता. भावनिक आंदोलने होती, अशा निराशा, यश अपयश, चुका, पडझड सगळं काही होतं पण त्यातही स्वातंत्र्य, मुक्तता, निर्भयता, आशावाद, विश्वास कायम होता. कुठेतरी अंतरात वसलेल्या “मी” ला धक्का पोहोचला नव्हता म्हणूनच समोर दिसणाऱ्या अथांग जीवनसागरात मी बिनधास्त उडी मारली होती.
या २१ वर्षाच्या काळात मला पोहायचं कसं हे अगदी शास्त्रोक्तपणे शिकवलं होतं. जणू काही एक अभ्यासक्रम माझा पूर्ण झाला होता. इथून पुढे पार पाडायचं होतं ते प्रात्यक्षिक आणि याच काळात मुख्यत्वे जाणवले ते संस्कार, नीती, कल्पना भल्याबुऱ्या कक्षा या सर्वांनाच फुटलेले अनंत आणि अदृश्य फाटे आणि इथून पुढे आता याच सर्वांशी आपल्याला हातमिळवणी करायची आहे हे लक्षात आलं होतं. आता उठसुठ कुणाच्या खांद्यावर डोके ठेवण्यापेक्षा या वळणावर आता सेल्फ स्टडी महत्त्वाचा आहे हे मी ओळखलं. तसा माझा मार्ग काही एकटीचा नव्हता. अजूनही माझे सशस्त्र संरक्षक सभोवताली होतेच पण मला आता स्वतः सैनिक बनायचं होतं. त्या क्षणी मी फक्त एकच ठरवलं होतं, ” जमत नाही म्हणून सोडून दिलं” ही आपली जीवनरेषा नाही आणि “उगीच फार काळ निरर्थकपणे कशाला तरी चिपकून राहणं हेही योग्य नाही” पण या दोन्ही विचारातला समतोल कसा सांभाळायचा हे मात्र आव्हान होतं आणि ते मी स्वीकारायचं ठरवलं.
मुळातच याची सुरुवात माझ्या नोकरी करण्याच्या निर्णयापासूनच झाली असावी. माझं पहिलं पोस्टिंग “बँक ऑफ इंडियाच्या” हँडलूम हाउस मधल्या रीकन्सीलेशन डिपार्टमेंटमध्ये झालं होतं. दहा ते पाच अशा कामाच्या वेळा होत्या. ठाण्याहून मी नऊ आठ ची जलद लोकल पकडून व्ही. टी. ला (त्यावेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) पावणेदहाला पोहोचले आणि दहाच्या ठोक्याला हँडलुम हाउसच्या भल्या मोठ्या लिफ्ट मधून शेवटच्या मजल्यावरच्या आमच्या ऑफिसमध्ये पोहोचले.
नोकरीचा पहिला दिवस. वेगळे वातावरण, वेगळी माणसे, वेगळे चेहरे. माझ्यातला “बिनधास्तपणा” मात्र मी धरून होते. याच बँकेतल्या “निवृत्त, प्रमुख लेखपालाची मी नात” हा शिक्का मात्र दडवून ठेवण्याचा मी निर्धार केला होता. माझी ओळख फक्त “मी” होते.
“मिस्टर रॉड्रिक्स” नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ या डिपार्टमेंटचे मुख्य होते. त्यांना मी माझे “नेमणूकपत्र” दाखवले. गृहस्थ चांगले होते,
GOOD MORNING MISS DHAGE
असे ते उजवा हात पुढे करून हसतमुखाने म्हणाले.
मराठी मिडीयममधली, बाळबोध मराठी मुलगी मी! इंग्लिश बोलण्याचा फारसा सराव नव्हता. तशी एल्फिन्सटन कॉलेजमध्ये असताना तिथल्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात झालेल्या अनेक मित्र-मैत्रिणींशी या माध्यमातून मी जोडली गेले होते पण तिथे होतं मैत्रीचं सुगंधी वातावरण. इथलं वातावरण त्यापासून कित्येक योजने दूर होतं. हे जग व्यवहारी होतं. या जगात “तुम्ही कोण आहात, कुठून आलात? ” यापेक्षा “तुम्ही कसे आहात, स्वतःला कसे सादर करू शकता” याला महत्त्व होतं. तुमच्या अॅकॅडॅमिक्सला इथे यत्किंचीतही मूल्य नव्हतं. इथे “आम्ही, आमचा अनुभव, आमचं इथलं ज्ञान आणि सिनिऑरिटी” याचा अहंकार होता.
मिस्टर रॉड्रिक्स यांनी माझी ओळख सर्व कर्मचाऱ्यांशी करून दिली. ओळख करून देताना,
“प्लीज वेलकम मिस ढगे इन अवर फॅमिली” असेही ते म्हणाले आणि नंतर फर्नांडीस नावाच्या एका सीनियर माणसाला मला रोजच्या, माझ्या कामाविषयी मार्गदर्शन करण्यास सांगितले.
“तुच्छता” हा या माणसाच्या व्यक्तिमत्त्वातला स्थायीभाव असावा असेच मला वाटले तेव्हा पण त्या दिवशी त्याच्याकडून मला शिकवणी घ्यायची होती हे अटळ होते. बरीचशी लेजर्स त्यांनी माझ्यासमोर उघडली. प्रत्येक लेजरवर “बँक ऑफ इंडियाच्या” निमनिराळ्या ब्रांचेसची क्षेत्रनिहित नावे होती. फर्नांडीसकडे जे क्षेत्र होतं त्या संबंधात ती सारी लेजर्स होती आणि काही व्हॉवचरचे गठ्ठे होते. त्याचं विलगीकरण करून त्या त्या ब्रांचेस मध्ये झालेल्या डेबिट क्रेडिट व्यवहाराच्या लिखित नोंदी लेजर मध्ये करण्याचे क्लिष्ट, कंटाळवाणे आणि किचकट काम होते. फर्नांडिसने मला कसे, काय, कुठे करायचे हे भराभर सांगितले आणि त्यानंतर तो गायबच झाला. जणू काही त्याच्या दृष्टीने तो दिवस सुट्टीचाच असावा. दिवसभरात एकदाही तो फिरकलाही नाही अथवा “मला काम जमतंय का, समजलं का हे तपासून बघण्याचा किंवा कामातल्या काही युक्त्या, खुब्या किंवा चुका होण्याचे संभव किंवा चुका होऊ नये म्हणून याविषयी काहीही सांगणे त्यास गरजेचे किंवा कर्तव्याचे वाटलेच नाही. पन्नास वर्षापूर्वीचे बँकिंग असे होते. त्यावेळेला संगणकीय, कोअर बँकिंग माहीतही नव्हते. मी आपली जीवाच्या आकांताने आकडेमोड करत बसले. लंच टाईमला मला बोलवायलाही कुणी आलं नाही मी एकटीनेच कोपऱ्यात बसून मुंबईच्या डबेवाल्याकडून आलेला “आईचा डबा” खात होते. एकटीने डबा खाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग असावा. डबा खाण्याच्या कार्यक्रमाभोवती माझ्या शाळा कॉलेजमधल्या कितीतरी रम्य, गंमतीदार आठवणी होत्या. आज डब्यातलं जेवण कसं बेचव वाटलं.
अगदी उठता उठता “जिनी भाडा” नावाची एक पारशी, चाळीशीतली बाई माझ्याजवळ आली आणि तिने विचारलं,
“Whtsuup miss Dhage.. if I am not mistaken your name right? ”
माझ्या डोळ्यात थोपवून धरलेले अश्रू होते. तोंडात घोळत असलेला घास होता आणि पोटात विचित्र कळमळ होती. तरीही मी पटकन म्हणाले,
“आय ॲम फाईन. थँक्यू. ”
माझ्या इंग्रजीवर असलेला तर्खडकरी प्रभाव माझा मलाच जाणवला. उच्चारातलं मराठीपण आणि कृत्रिमता माझं मीच टिपलं.
आतापर्यंत मी न विचारलेला एक प्रश्न संध्याकाळी घरी गेल्यावर मी पप्पांना विचारणारच होते, ” मला सेंट जॉन दी बाप्टीस्ट हायस्कूलमध्ये तुम्ही का नाही घातलं? ”
संध्याकाळपर्यंत मला दिलेलं काम मी कसंबसं संपवलं. पाच वाजून गेले होते. फर्नांडिसच्या टेबलवर मी प्रचंड पसारा करून ठेवला होता. जाण्यापूर्वी मला तो आवरायला हवा हे कळतही होतं.
एक “नायर” नावाचा शिपाई माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “मॅडम ये आपने क्या किया है? ये कितना फैलाव? कैसा काम किया आपने? ”त्याच्या बोलण्यात नक्की काय होतं? चिंता, आपुलकी, करुणा, सहानुभूती की टिंगल?
शिपायाच्या नात्याने मदत करणे तर बाजूलाच, पण “ये तो मेरा काम नही है! ” अशी मुजोर भावना चेहऱ्यावर ठेवत तो चालता झाला.
फर्नांडिस अचानक संध्याकाळी उगवला.
“HAVE YOU FINISHED THE WORK MAM? HOW WAS THE DAY? असे भराभर प्रश्न केले आणि माझ्याबरोबर आवराआवरही तो करू लागला.
मिस्टर रॉड्रिक्सने त्याला विचारलं,
“HOW IS SHE DOING? ”
फर्नांडिस लगेच एक विशिष्ट तुच्छ हसू चेहऱ्यावर बाळगून, खांदे उडवत म्हणाला, ” सोसो”
टेबलावरचा पेपरवेट उचलून त्याच्या डोक्यात घालावा असे मला त्या क्षणी वाटले. मिस्टर राॉड्रीक्स म्हणाले,
DO YOU KNOW SHE IS THE GRAND DAUGHTER OF OUR RETIRED CHIEF ACCOUNTANT MR. K. R. KEDARI. A GREAT PILLAR OF OUR BANK.”
त्यावर” धिस ईज नाॅट हर क्वालिफाकेशन. ”असा फर्नांडीसच्या चेहऱ्यावरचा भाव मी स्पष्टपणे वाचला.
“गेला उडत. ” मी असे मनातल्यामनातच म्हणाले पण मनावर प्रचंड उदासीनतेचा भार जाणवला.
संध्याकाळी लिफ्ट मधून खाली उतरले. रस्त्यावर आले. एकाच दिशेने व्ही. टी. कडे जाणारे, स्वतःतच व्यस्त असणाऱ्या माणसांचे थवेच्या थवे मी पाहिले आणि त्यातलीच मीही एक झाले. त्या क्षणी भांबावलेली, गोंधळलेली, रडवेलीही.
रिकन्सिलेशनचा खरा अर्थ, ‘सलोखा, समेट, मेळ’. आता या नव्या वातावरणाशी मला खऱ्या अर्थाने सलोखा करायचा होता. एका नव्या अनोळखी प्रवासाची सुरुवात होती आणि या प्रवासात मला एक नवी वेगळीच, रुक्ष ओळख मिळाली होती.
☆ एक समाधान देणारा विद्यार्थी… ☆ सुश्री शीला पतकी☆
साधारणपणे दोन वर्षांपूर्वी आमच्या कॉलनीतल्या शेजाऱ्यांनी मला फोन केला की, ” शीला तुझे मार्गदर्शन दहावीच्या संदर्भात हव आहे” मी म्हणलं, “त्या व्यक्तीला पाठवा” साधारण संध्याकाळच्या वेळेला दोघे नवरा बायको माझ्या घरी आले. त्यातले गृहस्थ आमच्या कॉलनीत पूजेला येणारे भटजी होते ते म्हणाले ताई येऊ का? मी म्हणाले या या गुरुजी त्यांच्या मागे एक स्त्री उभी होती साधारणपणे 35 वर्ष वयाची मध्यम उंचीचे निमगोरा रंग काळ्याभोर केसाचा अंबाडा गोल चेहरा कपाळावर मोठा कुंकू टोप पदराची हिरवीगार नऊवार साडी गळ्यात काळी पोत हातात बांगड्या पायात जोडवी. गुरुजी म्हणाले, ” ही माझी पत्नी” गुरुजी नेहमीप्रमाणे धोतर पंचा पांघरलेले… अक्षरशः लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभत होता. ते दोघेही मला नमस्कार करायला लागली मी झटकन मागे सरकले मी म्हणाले, ” तुम्ही कसला नमस्कार करता मलाच तुम्हाला नमस्कार करावा वाटतोय”. इतकं सोज्वळ सुंदर रूप त्यानंतर त्यानी त्यांची अडचण सांगितली ते म्हणाले, “माझी पत्नी ही ही शाळेत गेलेले नाही तिच्या घरीच संस्कृत पाठशाळा चालत असे त्यामुळे तिचे शिक्षण सगळ अनौपचारिक झालेले आहे संस्कृत ती बोलू शकते दहावी आणि बारावीला ती संस्कृत शिकवते पण तिच्याकडे दहावीचे सर्टिफिकेट नाही किंबहुना शिक्षणाचा कुठलाच भाग नाही तर त्यांना बाहेरून दहाविला बसता येईल का? ” आता 17 नंबर फॉर्म भरून बसायचा म्हणजे पाचवी पर्यंत तरी शिक्षण लागते ती अडचण होतीच मी म्हणाले, “नाही पाचवीचे सर्टिफिकेट असले तर आणा मग दहावीचा फॉर्म भरू शकतो “. त्या म्हणाल्या” नाही मी शाळेतच गेले नाही “…. आमच्या एका मुख्याध्यापक मित्रांच्या मदतीने मी चौकशी केली आणि एका शाळेमध्ये अशा तऱ्हेने वर्षभर नाव ठेवून पाचवीच्या परीक्षेला बसून घेतले जाते त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल मी त्यांना माहिती दिली की बाई तुमच्या इथल्या शिक्षकांपेक्षाही हुशार आहेत पण कोणतीही सर्टिफिकेट नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे त्यांनी खूप मदत केली आणि वर्षभरानंतर पाचवीचे सर्टिफिकेट मिळाले. त्यानंतर दुसरे वर्षी 17 नंबर फॉर्म भरला त्यांची कन्याही दहावीत होती त्यामुळे तिच्याबरोबर त्यांचा अभ्यास झाला मुळात बाई हुशार त्यामुळे प्रश्नच नव्हता त्यानी दहावीचा सगळा भाग जो होता परीक्षेचा तो पूर्ण केला 17 नंबर फॉर्म ला त्यांना परवानगी मिळाली परीक्षा पार पडली मुलीमुळे अभ्यासही चांगला झाला होता.
काल त्यांचा दुपारी मला फोन आला “मी गावाला गेल्यामुळे तुम्हाला माझा रिझल्ट कळवणे मला शक्य झाले नाही आज मी आले आहे आणि रिझल्ट पाहिला मी 70% गुणांनी पास झाले आहे “… त्यांच्या तोंडून ही वार्ता ऐकून मला कमालीचा आनंद झाला” मनःपूर्वक अभिनंदन वहिनी आता यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट व्हा संस्कृत विषयात एम ए पर्यंत शिका खूप खूप अभिनंदन! ! ! ” त्यांनी संस्कृतचे मार्क सांगितले ते 98 होते मला त्या भगिनीचे खूप कौतुक वाटले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी रिझल्ट अगदी आठवणीने मला कळवला आणि म्हणाले, ” बाई केवळ तुमच्या खटपटीमुळे आम्हाला परीक्षेला बसता आले अन्यथा एवढी माहिती आम्हाला कोणी दिली असती? ” मी म्हणलं, नाही हो तुमच्या भाग्यात होत ते तुम्हाला प्राप्त झाले आहे. “
मला त्या महिलेच्या धडपडीचे कौतुक वाटले आणि तिच्या यशाचे समाधान. तिच्यासाठी मी जी काही धडपड केली होती त्याबद्दल तिने व्यक्त केलेली कृतज्ञता तर आजकाल फार दुर्मिळ झाली आहे मी ज्या मुलींवर चार वर्ष मेहनत घेतली ती मुलगी रिझल्ट सांगायला आली नाही तिचे आई-वडील आले नाहीत तिच्या भावाने फक्त फोन करून सांगितले की दीदी पास झाली आहे तिचे मार्कशीट पाठवले आहे मला त्या दिवशी एवढा त्रास झाला की यानंतर आपण कोणाला काही शिकवायचे नाही कोणासाठी एवढी जीवतोड मेहनत घ्यायची नाही पण कालच्या त्या बाईच्या निकालाने पुन्हा एकदा मला खूप समाधान वाटले आणि वाटले की नाही आपल्या ओळखीने आपण केलेल्या कार्याचा लोक आदर करतात त्यायोगे आपल्याला असलेली माहिती त्या माध्यमातून एखाद्याला जर मदत झाली तर त्याचे जीवन फुलू शकते मग आपण आपले प्रयत्न का थांबवावेत…. खरंच त्यांच्या निकालाने मला खूप खूप समाधान दिले त्या बाईच्या जिद्दीचे आणि आमच्या गुरुजींचे खूप खूप कौतुक वाटले अशा जिद्दी महिलाच काहीतरी वेगळे घडवू शकतात कालचा हा अनुभव मला खूप समाधान देऊन गेला एवढे खरे…!!!
☆ स्वयंशिस्तीचे महत्व…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
स्वतःहून स्वतःवर लागू केलेल्या नियमांना ‘स्वयंशिस्त’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात स्वयंशिस्तीची अनेक उदाहरणे आपण बघतो. आपण स्वयंशिस्त किंवा अनुशासन असेही म्हणू शकतो. जवळचे उदाहरण मुंग्यांचे सांगता येईल. मुंग्या नेहमी एक रांगेत चालतात, एखादी मुंगी चुकून रांगेच्या बाहेर गेली तरी बाकीच्या मुंग्या कधीच रांग सोडत नाहीत आणि रांग चुकलेल्या मुंगीला परत रांगेत सामावून घेतात.
आपण घडून गेलेल्या काही घटना पाहू.
परवा मला सुट्टी होती, मामाच्या गावाला जायचे म्हणून मी अलिबागच्या एस टी आगारात गेले होते. सहज दोनतीन दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली. एक एस. टी. बस फलाटाला लागत होती. पण बरीच लोकं ती बस फलाटाला लागण्या आधीच, त्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. बसच्या दरवाजाचे आकारमान लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की एकाच वेळी एकच माणूस आत शिरू शकतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच बसच्या बाबतीत सारखीच होती.
आणिक एक दृश्य माझ्या मनात घर करून राहिले आहे. अलिबागला नुकतीच स्वयंचलित वाहतूक नियंत्रण संरचना कार्यान्वित झाली होती. पोलिस त्या रचनेची कार्यवाही सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्नशील होते आणि काही लोकं बिनदिक्कतपणे नियम मोडून वाहने चालवीत होते. माझ्या समोर एक अपघात होता होता राहिला.
सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा बळी गेला.
अगदी अलीकडील घटना म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन कार्यक्रम काही लोकं रेल्वे रुळावर उभे राहून पहात होती. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि जवळजवळ पन्नास लोकांना जीव गमवावा लागला.
– – – वरील सर्व घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या, प्रत्येक घटना जरी वेगळी असली, प्रत्येक घटनेचा आर्थिक/ सामाजिक परिणाम जरी भिन्न असला तरी आपल्या सर्वांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल ती म्हणजे या सर्वाला एकच मूलभूत कारण आहे. आपली उत्सुकता न ताणता मी ते कारण सांगतो, ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.
बिरबलाची एक गोष्ट आहे. भाकरी का करपली? घोडा का अडला? आणि पाने का नासली? असे तीन प्रश्न आहेत. या सर्वांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे फिरवले नाही म्हणून. आज आपल्या देशात असलेल्या आणि उद्या निर्माण होणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे किंवा असेल ते म्हणजे ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.
आपण स्वयंशिस्तीच्या दुष्परिणामांची काही उदाहरणे बघितली. त्यामुळे स्वयंशिस्त का पाळावी हे आपल्या लक्षात आले असेल. स्वयंशिस्त अंगिकारल्यामुळे मोठी झालेली अनेक राष्ट्रे आपल्याला सांगता येतील. यातील अग्रक्रमाने ज्यांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये ज्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य केले ते ब्रिटिश आणि अणुस्फोटाचे विदारक दुष्परिणाम भोगून, चटके खाऊन स्वयंशिस्त पाळून, अथक मेहनत करून आणि प्रखर राष्ट्रभक्तीच्या जोरावर जगातील प्रमुख झालेले एक राष्ट्र म्हणजे जपान. ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत असे मला वाटते.
आज आम्ही शालेय विद्यार्थी आहोत. बरीच मोठी माणसे असे म्हणतात की आम्ही उद्याचे नागरिक आहोत, पण मला उद्याचे नागरिक म्हटलेले आवडतही नाही पटतही नाही. आदर्श नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये आम्ही आजपासून च पार पाडायला सुरुवात केली तर ती आमच्या अंगवळणी पडतील, आमच्या अंगात मुरतील आणि आयुष्यभर आम्ही ती आचरणात आणू शकू. यात खासकरून स्वयंशिस्त अंगी बाणली गेली तर आमचे जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल असे मला वाटते.
आता बालमित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रास्ताविक पुरेसे झाले. स्वयंशिस्त म्हणजे काय ते आम्हाला कळले, स्वयंशिस्तीचे दुष्परिणाम कळले आणि फायदे ही कळले. पण आम्ही नक्की काय करायचे हे कधी सांगणार.
आपण त्याची घरापासून सुरुवात करूया. आपण सकाळी झोपून उठलो की किमान आपल्या पांघरुणाची घडी आपली आपण घालूया. काल पर्यंत आपण काय करीत होतो ते सोडून देऊ, पण आजपासून मात्र आपण या गोष्टी पाळूया. हात धुतल्याशिवाय आपण कोणताही पदार्थ खाणार नाही. हात पुसायला आपल्याकडे रुमाल असेल. सकाळी उठण्याची आपली वेळ पक्की असेल, ती आपण काटेकोरपणे पाळू. शाळेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा आपले एक वेळापत्रक असेल. घरी वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी विशिष्ठ जागा असेल. शाळेतून घरी गेल्यावर आपण आपले दप्तर योग्य ठिकाणी ठेऊ, त्यातील डबा, पाण्याची बाटली धुऊन ठेऊ. संध्याकाळी शुभंकरोती, काही देवांची स्तोत्रे म्हणू, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवू. शाळेतून दिलेला गृहपाठ आपला नेहमी पूर्ण झालेला असेल. शाळेत आपण वेळेत पोहचू. शाळेतील सर्व सूचनांचे, नियमाचे आपण पूर्णपणे पालन करू. रस्त्याने चालताना, प्रवास करताना आपण वाहतुकीचे नियम समजून घेऊ नी त्यांचे पालन करू. अयोग्य ठिकाणी थुंकणार नाही. लोकांनी अयोग्य ठिकाणी थुंकायाचे पन्नास टक्के कमी केले तर आपले सामाजिक आरोग्य पन्नास टक्के तरी नक्कीच सुधारेल. आपल्याला रांगेचे महत्व जरी कळले तरी आपली प्रगती किमान १०% नी वाढेल असा विश्वास वाटतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आपण सर्व सूज्ञ श्रोते आहात, आपापल्या अभ्यासाने यात अनेक गोष्टींची भर घालू शकाल.
एका मोठ्या वक्त्याने आपल्या भाषणांत सांगितले होते की आपल्या देशातील सर्वांनी दिलेली वेळ पाळली तर आपला GDP किमान चार टक्क्यांनी वाढेल. आपण सर्वांनी यावर चिंतन आणि त्यानुरूप कृती करण्याची गरज आहे, आपण प्रयत्न करू. देशाने, आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत, याची आपल्याला नित्य जाणीव असण्याची गरज आहे, आपण सर्व तसा प्रयत्न करीत असालच, पण समजा त्यात काही त्रुटी रहात असेल तर आजचे माझे मनोगत ऐकून आपण त्यात योग्य ती सुधारणा नक्कीच कराल या विश्वासाने माझे मनोगतास पूर्णविराम देते.
खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं, आणि आत बसलेली माणसं – कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजच… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती – “पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस. “
कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला. कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “Take off ✈” असा मेसेज टाकला… आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली – “सगळं नीट होऊ दे. “
पण त्या क्षणात, काळाने आपली योजना आखली होती.
एक मोठा आवाज, आगीच्या ज्वाळा, आणि एका क्षणात सगळं संपलं.
पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळं – सगळं जागेवर होतं… फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख, आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर…
त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत.
“Call me when you land… “
“Miss you already… “
“Take care… “
कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “Hello… Hello? ” म्हणणारा कोणी तरी.
कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल, शेवटचा शब्द कोणता असेल…
आज जे गेले, त्यांच्या हसण्याचे प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या आठवणीत जिवंत आहेत.
त्यांनी मागे ठेवलेली स्वप्नं, आवाज, माणुसकी – हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं…
“आयुष्य क्षणभंगुर आहे…
त्यामुळे प्रत्येक क्षण जगा – प्रेमाने, माफ करत, आणि अगदी मनापासून. “
एक नम्र श्रद्धांजली त्या सर्व आत्म्यांना –
ज्यांनी कालच्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले… जे अचानक काळाच्या प्रवाहात हरवले.
मृत्यू अटळ आहे… पण तो येईपर्यंत ‘मृत्यूशिवाय’ जगणं, हेच खरं आयुष्य आहे.
सहेली शब्द प्रांगण ग्रुप तर्फे…
भावपूर्ण श्रद्धांजली..
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
साधारणपणे मी पहिल्यांदा 1960 मध्ये टीव्ही मध्ये दिसले….
वरील विधान वाचून तुम्हाला नक्की वाटेल की पतकी बाई धादांत खोटं बोलत आहेत 1960 साली सोलापुरात टीव्हीचे प्रसारण नव्हतं महाराष्ट्रात कुठेही नव्हतं मग मी 60 साली टीव्हीवर आली कशी ही बाई… त्याचीच गोष्ट ऐकूयात म्हणजे वाचूया
साधारणपणे जानेवारी महिन्याच दिवस असावे. सकाळी थंडी असायची पण दुपारी रणरण ऊन. शाळेला हुरडयाची सुट्टी होती. त्या काळात सिद्धेश्वर जत्रेला धरून ती सुट्टी असायची… सिद्धेश्वर तळं पूर्णपणे आटलेलं होतं म्हणजे तिथे संपूर्ण तळ्याला भेगा भेगा पडलेल्या मला अजूनही आठवतात आणि मंदिरातून मार्केटमध्ये.. लक्ष्मी मार्केटमध्ये येण्यासाठी माणूस सहज चालत त्या मातीवरून येतो.. शेतात चालावं असं वाटत होतं. चिखल वगैरे काय असेल पूर्वी तो वाळून वाळून गेलेला, पूर्ण भेगा पडलेल्या आणि माणूस आरामात त्याच्यावरून चालत येत होता. आणि मला ते स्पष्टपणे आठवते!
मी माझ्या आजीबरोबर सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. माझं वय तेव्हा 10 ते 11 या दरम्यानच होतं आणि आजी आम्हाला देवळामध्ये, मार्केटमध्ये, भजनाला, कीर्तनाला, रथ बघायला, चित्रपट बघायला घेऊन जायची. तिला सिनेमाची खूप आवड होती त्यामुळे ती चित्रपट बघायला आम्हाला घेऊन जायची. तिला चौफेर ज्ञान होतं.
19 व्या शतकाच्या शेवटाची बाई म्हणजे 1899 /98 चा जन्म असेल. शिक्षण अजिबात नाही पण हुशार इतकी अफाट.. बघून बघून वाचायला शिकली आणि खूप पुस्तकं वाचत होती. गोष्टी सांगायचा तिला छंद होता आणि सांगण्याची शैली पण होती. आता आजीबद्दल जास्त सांगत नाही, प्रसंगाबद्दल आपण बोलूयात. तर ती मला सिद्धेश्वरच्या मंदिरात घेऊन गेली.. दर्शन वगैरे झालं. आजी बरोबर जायचं त्यावेळेला कारण असं होतं की तिथून आम्ही लक्ष्मी मार्केटला जाणार होतो आणि त्या बाजूला गड्ड्याची दुकानं इथपर्यंत लागलेली होती, तिथं आपल्याला आजी काहीतरी घेऊन देईल या विचाराने मी तिच्याबरोबर गेले होते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन तळ्यातून वाट काढीत आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या समोर ओबडधोबड पायऱ्या होत्या.. त्याच्यावरून वर आलो होतो आणि थेट लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केटच्या दोन्ही बाजूला आज जे लोक बसतात तिथेच लोक बसायचे, तिथेच काहीतरी थोडेसे पाली वगैरे टाकलेले होत्या आणि त्याच भागांमध्ये काही चार दुकान भरलेली होती किंवा लागत होती. आजी म्हणाली ‘ रस पिऊ यात का’ ‘ बारा वाजले आहेत उन्हात रस पिऊ नये ‘ इती मी..
तिथेच बाजूला एक स्टॉल होता. एक पांढरं कापड.. त्या समोर खुर्ची टाकून एक माणूस बसलेला आणि तो ओरडत होता ‘ अपने खुद को टीव्ही पे देखो.. अपने को टीव्ही पे देखो ‘.. तर आजीला ते जरा कुतूहल वाटलं. काहीतरी नवीन होतं तर आजी म्हणाली ‘काय आहे? ‘ तर तो माणूस म्हणाला तुम्हाला टीव्ही वरती पाहता येईल. म्हणून ‘आम्ही आम्हाला दोघींना पाहता येईल का? ‘ ‘तुम्हाला नाही, अकेला जायेगा और उसको दुसरा देखेगा ‘. ‘ पैसा कितना लगेगा? ‘ तो म्हणाला ‘ चाराने.. कितना टाइम देखेगा ‘ तो. ‘ मला दोन मिनिट ‘.. आजी मला म्हणाली ” तू त्या टीव्हीच्या खोक्याच्या मागच्या बाजूला जा, मशीन समोर उभे रहा, मी तुला टीव्हीवर पाहीन “. मी म्हणलं ” काहीतरी काय मला तर मी दिसणार नाही तुला दिसून काय फायदा आहे? ” तिचं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली ” हे टीव्ही आपल्याकडे येईल पण तू मोठे झाल्यावर… तू हुशार आहेस त्यामुळे टीव्हीवर कुठेतरी दिसशील आहे त्यावेळेला मी कुठे असणार आहे? तेव्हा मी तुला आता डोळे भरून टीव्हीवर पाहते ” या इमोशनल ड्रामावर मला काहीच बोलता आलं नाही आणि मी खूप लहान होते. दहा अकरा वर्षाच्या मुलीला काय कळतंय? फक्त एवढं कळत होतं की चार आणे रक्कम खूप मोठी आहे, त्यात आपल्या घरची सगळ्यांची एक वेळची भाजी येते. पण तिचे हिशोब वेगळे होते तिने त्याला चार आणे दिले. मी तो पडदा टाकला होता त्याच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि समोर एक टीव्हीसारखं खोकं होतं तिथे आजी खुर्चीवर बसली आणि ती मला बघत होती. मग त्या माणसाने मला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला सांगितल्या.. आपण फोटो काढताना घेत होतो तशा.. नाच म्हणाला, उड्या मार म्हणाला. मी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आजीने मला डोळे भरून बघितलं आणि चार आणे त्याला दिले. मग रस कॅन्सल केला, भाजी घेतली आणि आम्ही घरी आलो आणि आजीनं सगळ्यांना सांगितलं की तिने मला टीव्हीवर बघितलं.. टीव्हीवर बघितलं. तर सगळी कथा दिवसभर वाड्यामध्ये सांगत होतो आम्ही… सर्वात महत्त्वाचं काय तर तिने आल्यावर माझी दृष्ट काढली. तिला माझ्याबद्दल फार प्रेम होत… मी खूप धीट, हुशार, भाषण करणारी, स्टेजवर उभी राहणारी.. वडिलांबरोबर काम करत होते ना…! अगदी गणपती उत्सवात आमचे दहा दिवस कार्यक्रम असायचे.. तर ती आमच्या दारापाशी झोपलेली असायची आणि आम्ही आलो आहोत की पहिल्यांदा माझी दृष्ट काढून ती तिच्या घरात जाऊन झोपायची. मामा आणि आम्ही सगळे शेजारीच राहत होतो अशा तऱ्हेने माझ्या टीव्हीवरचा पहिला शो त्याचा एकमेव प्रेक्षक माझी आजी होती आणि त्याची किंमत मला चार आणे द्यावी लागली.
नंतर आपल्याकडे वृत्तदर्शन सुरू झालं. अनेकांच्या मुलाखती सुरू झाल्या. स्थानिक चॅनेलवरती येण्याचा योग अनेकदा आला. मला आठवते एक मुलाखत सुनेत्रा पंडित यांनी घेतली होती. एकदा एक मुलाखत रामतीर्थकर मॅडमनी घेतली होती. एकदा माझ्या शाळेमध्ये म्हणजे तडवळकर ट्रस्टच्या नापास शाळेमध्ये माझी मुलाखत माझ्या एका विद्यार्थिनीने घेतली होती. असं अनेकदा मग टीव्ही वरती स्थानिक प्रक्षेपणात दिसायचं… पण चार आणे खर्च करून मी टीव्हीवर दिसण्याचा किंवा मला टीव्हीवर बघण्याचं सुख माझ्या आजीने त्यावेळेला गड्ड्याच्या जत्रेत घेतलं होतं आणि तिचं ते वाक्य नेहमी मला आठवतं.. ” अग तू मोठी झाल्यानंतर खूप ठिकाणी टीव्ही असतील, कदाचित तू त्यात दिसशील, पण मी त्यावेळेला असणार नाही ना? ” म्हणून परिस्थिती नसताना त्या माऊलीने माझ्यासाठी चार आणे खर्च केले. ती चरख्यावर सूत काढून ते पैसे कमवत असे आणि एक पूर्ण सुताचा बिंडा तयार झाला की त्याचे दोन आणे मिळत. खादी भंडारमध्ये आम्हीच नेऊन घालत असू.. इतक्या कष्टाने मिळवलेले चार आणे तिने माझ्यासाठी खर्च केले.
आज लाखो रुपये खर्च होतात.. कोणी करतो.. मी कोणावर तरी करते. पण हे प्रेमच वेगळं होतं आणि त्याच्या मागचा विचारही खूप मोठा. माणसं गरीब होती, पैसा नव्हता, पण माया पोटात खूप होती. आज अगदी सहजच आठवण झाली आजीची आणि त्या निमित्ताने मला तो अगदी विस्मृतीत गेलेला प्रसंग आठवला. अशी प्रेमळ आजी मला मिळाली. परमेश्वरा तू ते भाग्य आम्हाला दिलंस.. खूप प्रेम करणारी माणसं म्हणजे आपण खूप श्रीमंत हे लक्षात ठेवा….!
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग- ३० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
धन्य ते गुरु शिष्याचे नाते..
जोगेश्वरी ते भावे स्कूल माझा आणि ति. नानांचा प्रवास खूप आनंदात चालला होता. माझे वडील भावेस्कूलला खूप मानत होते तन, मन, श्रद्धेनी त्यांनी विद्यादान केलं.
माझे परमपूज्य वडिल ति. स्व. दत्तोपंतस. माजगांवकर हे सुप्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर, पद्मभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे मुलांच्या भावेस्कूलमधले आदरणीय शिक्षक होते. पुण्यभूषण मासिकांत त्यांनी आवर्जून आपल्या सरांचा म्हणजे माझ्या वडिलांचा मानाने उल्लेख केला आहे.
बाबासाहेबांसारखा थोर माणूस आपल्या गुरुंना इतक्या वर्षांनंतर मानवंदना देतो. केवढी ही गुरुनिष्ठा आणि गुरुंवरील श्रद्धा. सारं जग, श्री. बाबासाहेबांपूढे मान देऊन झुकत. जगाची मानवंदना घेणारे हे शिवशाहिर. श्री. माजगावकर सरांचं नुसत नांव ऐकल तरी नम्रतेने त्यांना मानवंदना देतात. प्रत्येक मुलाखतीत आवर्जून सरांचा उल्लेख करायचे. ते म्हणाले, “शिवरायांनी इतिहास घडवला तर माजगावकर सरांनी माझ्या मनात इतिहास जागवला” केवढी ही शालीनता. आज माझे वडील असते तर ते कृतकृत्य झाले असते. बाबासाहेबांनी पण, कुठल्याही कार्यक्रमाला निघतांना पहिला मानाचा मुजरा सर्वप्रथम आपल्या सरांनाच केला असता
शिवाजी राजांची अढळ श्रद्धा आपल्या गुरुंवर श्रीसमर्थ रामदास स्वामींवर होती. तितकीच श्रध्दा या शिष्याची आपल्या गुरुंवर होती. जगापुढे शिवरायांचा आदर्श मांडणारे इतिहासकार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे आपले श्रेय माननीय सरांनाच देतात. त्यांच्या नम्रतेची, श्रध्देची, गुरुभक्तीची प्रचिती आम्हाला एका प्रसंगानें प्रत्ययास आली.
त्याच असं झालं. शरद जोशी हे बाबासाहेबांचे शालेय मित्र होते. आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे, माझ्या बहिणीची कमलची, जवळची बालमैत्रिण. शरद जोशींची एकसष्टी होती. आणि त्या कार्यक्रमाला बाबासाहेब आले होते. बाबासाहेबांनी आपल्या कर्तबगारीनें, सुस्वभावाने लोकांची मने जिंकून किर्तीचं शिखर गांठलं होत. आणि जनसागरांत मानाच पान पटकावल होत. त्यांना इतका मान होता की, त्यांचा प्रवेश झाला. आणि श्री. बाबासाहेब आले, असं नुसतं म्हणाल्यावरही लोकं जागेवरून उठून उभे राहयचे. तर सुप्रसिद्ध इतिहासकार असे हे माननीय, श्री शरद जोशींच्या ६१ ला आले. त्यांच्या उत्साही चपळ कणखर व्यक्तिमत्वानें, आगमनाने त्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली. माझी बहिण पण या कार्यक्रमाला हजर होती. सौ. जोशींनी माझ्या बहिणीशी ओळख करून देतांना बाबासाहेबांना सांगितले,
” बरं का बाबासाहेब, ही कमल, माझी बाल मैत्रिण. म्हणजे तुमच्या श्री. माजगांवकर सरांची मुलगी आहे”. हे ऐकताक्षणी, बाबासाहेबांनी काय करावं! ते ताड्कन उठले. आणि कमलच्या समोर आले. तिच्यासमोर उभे राहून त्यांनी तिला मुजरा केला. माझी बहिण गोंधळून गेली. कार्यक्रमाला आलेले सगळेच पाहूणे आश्चर्य चकित होऊन बघायलाच लागले. अवघडलेल्या माझ्या बहिणीकडे बघून ते म्हणाले, “तुमचे वडिल माजगांवकर सर म्हणजे माझे सन्मानीय, आदरणीय गुरु आहेत. दुदैवाने ते आता नाहीत. हा मानाचा मुजरा, सरांची मुलगी म्हणून तुम्हाला करतोय. पण हा त्रिवार मुजरा माझ्या सरांसाठी आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल. “
– – केवढी ही नम्रता. आणि केवढी ही गुरुभक्ती! ती बघून कमलचे डोळे वडिलांच्या आठवणीने भरून आले.
तर मंडळी असे होते हे गुरुशिष्याचे अलौकिक अढळ नाते. बाबासाहेबांना बघण्याची, भेटण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण योग येत नव्हता. म्हणून वाईट वाटत होते. आणि अचानक=अचानक
तो योग जुळून आला. मला कम्मालीचा आनंद झाला. खूप दिवसापासूनची माझी मनांतली इच्छा पूर्ण झाली. फोनवर, “बाबासाहेब, मी माजगावकर सरांची मुलगी बोलतेय ” अशी ओळख सांगून भेटण्याची इच्छा दर्शवली. माजगांवकर सरांच नांव ऐकून, श्री बाबासाहेबांनाही खूपच आनंद झाला. माझे जावई श्री. सुजित सु·जोशी खूप उत्साही आहेत. त्यांच्या ओळखीने हा सुवर्ण योग जुळून आला- ते आम्हांला बाबासाहेबांकडे घेऊन गेले. त्यांच्याबरोबर आमचा फोटो काढला. अतिशय दुर्मिळ आजकाल बघायलाही सापडणार नाही, अशी मोडी लिपीतली, बाबासाहेबांची वळणदार, सुरेख सही आम्हांला मिळाली. मी अगदी भारावून गेले होते. सारखा मनात विचार येत होता. बाबासाहेबांची ऐतिहासिक वास्तू, त्यांची कर्तबगारी, त्यांचा लोकसंग्रह आणि समाजांत मिळवलेला मोठ्ठा मानसन्मान बघायला या पट्टशिष्याचें गुरु ति. माजगांवकर सर माझे वडील आज हवे होते,. आज हवे होते.. हया गुरु शिष्याच्या नात्याचा शोध माझा भाचा सतीशमुळे लागला होता. आज तोही हयात नाही. शेवटी हात जोडून मी मनांत म्हणालें “कालाय तस्मै नमः”
निघतांना बाबासाहेब मला म्हणालें ” सरांचा शालेय जीवनातला फोटो असेल ना तुमच्याकडे? मला तो हवा आहे. मी माझे आत्मवृत्त लिहीतोय. त्याच्या मुखपृष्टावर मला माननीय सरांचा फोटो लावायचा आहे. सुदैवाने कोट टोपी धोतर असा ति. नानांचा फोटो भाच्याकडून चि. हेमंतकडून मला मिळाला. तो बघितल्यावर बाबासाहेब प्रसन्न हसले. सतीश माझा भाचा.. त्याच्यामुळे हया गुरु शिष्य नात्यांचा शोध लागला. आणि चि. सुजित जोशींमुळे मला श्री. बाबासाहेब प्रत्यक्ष भेटले. माझ्याशी प्रेमाने बोलले. तो आनंद, तो क्षण माझ्या आठवणीतल्या शिदोरीतला, अत्यंत मोलाचा,.. अत्यंत मोलाचा.. असा क्षण आहे.
तर मित्र-मैत्रिणींनो असे होते हे गुरुशिष्याचे महान, आदर्श आणि वाखाणण्यासारखं नातं, धन्य ते माझे वडील आणि धन्य ती गुरुभक्ती. श्री. बाबासाहेब तुम्हाला माझा मानाचा, त्रिवार मुजरा.
गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे सन्मित्र मंडळाच्या बैरामजी जीजीभाय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका.
महापौर पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
सध्या बोरिवली (मुंबई) व पुणे येथे वास्तव्य.
मनमंजुषेतून
☆ प्रेमाचे सिंचन… लेख क्र. १ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
विक्रांत मोरे (नाव बदललेले) काल माझ्याजवळ आला, अगदी शेजारी येऊन उभा राहिला. मी शिकवण्यात दंग होते. हळूच तो माझा पदर खेचत होता.
“काय रे? काही सांगायचंय का? ” असं विचारल्यावर अगदी अस्पष्ट आवाजात म्हणाला, “बाई, मला बक्षीस मिळालं. ”
मी हसून मोठ्याने म्हणाले, “अरे वा, छान! कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळालं? ” माझ्या वाक्यासरशी सगळा वर्ग त्याच्याकडे बघू लागला, बाईंनी दखल घेतली याचा त्याला खूप आनंद झालेला दिसला.
विक्रांत दोन बहिणीच्या पाठीवरचा. तो अगदी लहान असतानाच आई गेली. घरची अगदी गरिबी. वडील कुठेतरी वॉचमन. मोठी बहीण १४-१५ वर्षांची, तीही नोकरी करत होती. दुसरी बहीण असेल दहा-बारा वर्षांची, परिस्थितीने अकाली गृहिणी केलं होतं बिचारीला.
वर्गात अगदी पहिलीपासून “तो अभ्यास करत नाही” अशी बाईंची तक्रार आणि घरी अभ्यास न करता बहिणींना मारतो ही बहिणींची तक्रार. मला मात्र तो कधीच आगाऊ किंवा आक्रमक वाटला नाही. काही विचारलं की खाली मान घालून जमिनीकडे बघायचा.
गेल्या वर्षी नऊ मुलं चौथीच्या वर्गात नापास झाली होती, त्यात हाही होता. सगळेच एककाच्या मार्कांचे धनी. मी हा वर्ग घ्यायचा म्हणजे ७०चा पट होणार, पण पालकांनी खूप आग्रह केला आणि यावर्षी मी चौथीचा वर्ग घेतला. सर्वप्रथम मी नापास झालेल्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं. रोज मनापासून अभ्यास केलात तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्काने पास व्हाल या आत्मविश्वासाचं बीज त्यांच्याते पेरलं. मला जमेल तसं त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले आणि खरं सांगू, मुलांनीही मला निराश केलं नाही. एक ऋजुता सोडता (नाव बदललेलं) सर्व मुलं अत्यंत चांगल्या मार्कांनी पास झाली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना एवढे छान मार्क मिळाले होते सगळ्यांना.
विक्रांतही खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता आणि तेव्हापासून अबोल असणारा विक्रांत माझ्याजवळ बोलू लागला. घाबरत घाबरत बोलणाऱ्या विक्रांतच्या मनावर, आपल्यात काही चांगले नाही आपले कोणी कौतुक करणार नाही हे दडपण असावे हे माझ्या शिक्षकी नजरेने लगेच हेरले आणि मी त्याच्या छोट्या गोष्टींची खूप आत्मीयताने दखल घेऊ लागले.
“अरे वा, विक्रांत, अक्षर छान काढले आहे, ” असं म्हटल्याबरोबर त्याच्या लहान चेहऱ्यावर हास्याचे गुलाब फुलंत. कालच्या प्रसंगाने त्याला खूप आनंद झालेला दिसला.
आज कामाच्या डोंगरात मी बुडून गेले होते. १२:१५ ला ऑफिसच्या दाराशी कोण घुटमळते म्हणून पाहिलं तर विक्रांत. म्हटलं “आत ये रे. ” तो आला. त्याच्या हातात घड्याळाचा खोका होता.
“बाई, हे बघा ते बक्षीस. ” असं म्हणून त्याने खोका माझ्या हातात ठेवला. मी सर्व काम बाजूला सारून त्याचं घड्याळ सर्व शिक्षिकांना दाखवलं, म्हटलं, “बघा ग, माझ्या विक्रांतला बक्षीस मिळालं. छान आहे ना घड्याळ! ” घड्याळ सगळ्यांना दाखवून मी पुन्हा व्यवस्थित त्याच्याकडे दिलं. त्यावेळेचा त्याचा आनंदाने उजळून निघालेला चेहरा अजूनही माझ्या नजरेसमोर तरळतोय.
माझ्या या दोन वाक्यांनी त्याला दिला प्रचंड आत्मविश्वास. त्याच्यातील नकारात्मक भूमिका जाऊन सकारात्मक रोपांची वाढ सुरू झालेली दिसली. नकळत अत्यानंदाने दोन अश्रू बाहेर टपकलेच. खूप खूप आनंद झाला मला. आज माझं रोप सुकत चालले होते परंतु प्रेमाच्या खताने ते पुन्हा मूळ धरू लागले होते, चांगले तरारून वाढीला लागले होते. एका शिक्षिकेला (शिक्षिका कमी पण आईच जास्त) यापेक्षा दुसरं काय हवं?
दिवसभर हा प्रसंग माझ्याभोवती पिंगा घालत होता. आजच्या मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे ती प्रेमाची पण त्याचाच इतका तुटवडा आहे की विचारू नका. म्हणूनच आम्हा शिक्षकांचे काम जरा वाढलं आहे. शिकवण्याबरोबर थोडे प्रेमाचे खतही या रोपांना आवश्यक आहे, तरच ही रोपं निरोगी आणि टवटवीत होतील.
(हे प्रेम, आपुलकी, मायेचा ओलावा याची गरज आपल्या घरातील सदस्यांना देखील खूप असते. आपण आपल्या कामात मग्न असतो, गर्क असतो, खरंच वेळ नसतो. पण या नात्यांना जगवायचं, फुलवायचं, तर मनापासून घेतलेली दखल आणि प्रेमाच्या शब्दांचं सिंचन या दोन गोष्टींची नितांत गरज आहे.)