मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम…  ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

निवृत्त होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणे, हेच सर्वोत्तम….

एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता. तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते. ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता.

तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले. पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे. माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे—- आता मालक तर मालक असतात, जाताजातासुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलेच माहिती असते…

तेव्हा मालक त्या सुताराला म्हणतो, “ ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस. पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा. ते काम झाल्यानंतर तुझा छानपैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ.”  एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला.

पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते. आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते, पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली, पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते. कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता. कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो. झालं बाबा कसंतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. 

घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो, त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो, “ हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता.”

मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला…?? काय चालले असेल त्याच्या मनात…??—-

‘मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते. अरे ! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही. का मी असे केले…?? ‘ 

“नोकरीचे असो नाहीतर इतर कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजून करा….. त्यामुळे 

आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही…आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल…!! “

सुंदर आहे ना कल्पना…!!  कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा. चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते.                  

लेखक …अज्ञात…

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नोबेल ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ नोबेल… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

अंधार गडद होत जाताना —आकाशाचा फळा चमचम चांदण्यानी जातो भरत,

तसे शिक्षकाच्या खात्यात जमा होत जातात विद्यार्थी.

किती तरी भावी डाॅक्टर, इंजिनियर, व्यापारी, नेते, पत्रकार व गुंडसुद्धा 

अर्ध्या चड्डीत असतात त्याच्या धाकात समोर बसलेले….

त्याच्या चष्म्याचा नंबर बदलत जातो हळुहळु तसे,

अनेक चेहरे अस्पष्ट होत जातात…….

मात्र  प्रार्थनेसारखे शांत, कुशाग्र ,

फंडाच्या रकमेसारखे आजारी,

वेतनवाढीसारखी आनंदी , गुणी,

व शाळा तपासणीसारखी उपद्रवी मुले नोंदवली जातात ठळक.. .. .. 

सेवापुस्तकातल्या नोंदीसारखी ….

पुढे मागे भेटत राहतात, अनोळखी वळणांवरुन देत रहातात आवाज.

भर गर्दीत ,समारंभात, संमेलनात…………कुठेही.

“हे माझे सर बरं का !”

“या माझ्या मॅडम बरं का ! “.. .. ..

आपुलकीनं सांगतात सर्वांना….

गच्च भरलेल्या बसमधे

हात धरुन करतात आग्रह खिडकीपाशी बसण्याचा.

“नमस्कार करते हं !” म्हणत नव-यालाही लावतात वाकायला.. .. 

तेव्हा अधोरेखित होतो त्याचा पेशा…

कसलं गारुड करतो तो पोरांवर ? 

अन् स्वीकारत राहतो आयुष्यभर…

एखाद्या बुज-या आवाजाला दिलेल्या हिमतीचा…..जनस्थान पुरस्कार !

कविता शिकवतांना फुटलेल्या हुंदक्याची……  फेलोशीप !

सुंदर हस्ताक्षरासाठी  दिलेल्या शाबासकीची…….. साहित्य अकादमी !

पाठीवरुन मायेनं हात फिरवल्याबद्दलचे……… ज्ञानपीठ !

अन् फळ्यासमोर चोख भूमिका बजावल्याचे…. “नोबेल !”

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजी आजोबा — ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आजी आजोबा — ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

आजी आजोबा नसले की बालपण अधुरं राहतं,

आई बाबांनाच मग थोडं आणखी नरम व्हावं लागतं..

हक्काचा श्रोता नी कूस चोवीस तास मिळत नाही,

आई बाबांच्या कुशीत ‘ ती ‘ ऊब मिळत नाही..

शिस्तीला अल्पविराम मिळत नाही,

कारणाशिवाय उगीच लाड होत नाहीत..

रागावली आई तर हळूच लाडवांचा डबा येत नाही,

शिक्षा केली बाबांनी तर—

— त्यांना त्यांचंच बालपण आठवून दटावायला आजोबांची ढाल मिळत नाही..

आई बाबांची सावली तर नेहमीच असते, पण बुंध्यातला गारवा सापडत नाही,

आजी आजोबांशिवाय आठवणींची शिदोरी पूर्ण होत नाही …

आजी आजोबा दिनाच्या मुलायम शुभेच्छा… 🌹🙏🏻

संग्राहिका : जुईली अमोल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कैफियत ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ कैफियत  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत,

आपल्या अडचणींची कैफियत होता पोटतिडकीने मांडत |  

 

देवघरातून तू मला बाहेर का आणलंस ? 

तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक कशाला  चार-चौघात मांडलंस ? 

 

गायलास तू सुरुवातीला ताल-सुरात आरत्या,

केलीस साधी फुलांची आरास भोवती रंगीत बत्त्या.

 

खूप मस्त छान असायचं–आनंद वाटायचा येण्यात,

सुख-शांती-समाधान मिळे, चैतन्य तुला देण्यात.

 

दहा दिवस उत्सवाचे म्हणजे असे, दिव्यत्वाची रंगत… 

काल रात्री गणपती बाप्पा होता,  टिळकांशी  भांडत ||

 

पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने, मंगलमयी वाटायचे,

प्रबोधक, उद्बोधक  भाषणांनी विचार उंची गाठायचे.

 

आत्तासारखा हिडीसपणा मुळीच नव्हता तेव्हा,

शांताबाईच्याच नावाचा आता अखंड धावा.

 

पीतांबर, शेला, मुकुट, हे माझे खरे रुप,

शर्ट, पँट, टोपी, पागोटे– धिंगाण्याला फक्त  हुरूप.

 

शाडूची माती… नैसर्गिक रंग…. गायब आता झाले कुठे ? 

लायटिंग केलेल्या देखाव्याने मला दरदरून घाम फुटे ! 

 

श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा, गेला ना रे सांडत… 

काल रात्री गणपती बाप्पा  होता  टिळकांशी भांडत ||

 

माणसां-माणसांनी एकत्र यावे, एकमेकांना समजून घ्यावे,

देव-घेव विचारांची करतांना, सारे कसे एक व्हावे.

 

जातीभेद नसावा… बंधुभाव असावा,

सहिष्णुतेच्या विचारांनी नवा गाव वसावा.

 

मनातला विचार तुझ्या खरंच होता मोठा,

पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच, बघ मिळालाय फाटा.

 

पूर्वी विचारांबरोबर असायची खाण्यापिण्याचीही रेलचेल,

आता मात्र देखाव्यांमागे दडलेला असतो काळा खेळ.

 

पूर्वी बदल म्हणून असायचे पोहे-चिवडा-चहा-काॅफी… 

साग्रसंगीत जेवणासोबत लाडू-मोदक-पेढे-बर्फी.

 

आता रात्री भरले जातात पडद्यामागे मद्याचे पेले

डी. जे. वर नाचत असतात माजलेले दादांचे चेले.

 

नको पडूस तू असल्या फंदात तेव्हाच मी होतो सांगत… 

काल रात्री गणपती बाप्पा होते टिळकांशी भांडत ||

 

कशासाठी उत्सव असा सांग ना रे  बांधलास ? 

देवघरातून गल्लोगल्ली डाव माझा मांडलास ! 

 

दहा दिवस कानठळ्यांनी होतो मला आजार,

व्यवहारी दुनिया इथली, इथे चालतो लाखोंचा बाजार.

 

रितीरिवाज, आदर-सत्कार, मांगल्याचा नाही पत्ता,

देवघराऐवजी माझा रस्त्यावरती सजतो कट्टा.

 

जुगार-दारु-सट्टा-मट्टा – अनैतिकतेला येतो ऊत,

देवाऐवजी दैत्याचेच मग मानेवरती चढते भूत.

 

सामाजिक बाजू सोडून सुटतो राजकारणालाच इथे पेव,

गौरी-गणपती सण म्हणजे – गैरव्यवहाराची ठेव-रेव.

 

नको रे बाबा, नको मला हा मोठेपणाचा तुझा उत्सव, 

मला आपले तू माझ्या जागी परत एकदा नेऊन बसव.

 

कर बाबा कर माझी सुटका नको मला ह्यांची संगत… 

काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत ||

 

आपल्या अडचणींची कैफियत होता पोटतिडकीने  मांडत,

काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत ||

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 29 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 29 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४६.

मला भेटण्यासाठी केव्हापासून

तू माझ्याकडं यायला निघाला आहेस

तुझा सूर्य, तुझे तारे

माझ्यापासून तुला लपवू शकणार नाहीत

याची मला खात्री आहे.

 

तुझा पदरव सकाळ-संध्याकाळ मला ऐकू येतो.

तुझं गुपित तुझ्या दूतानं

माझ्या काना -मनात सांगून ठेवलंय.

 

आज माझं जीवन सर्वस्वी जागृत झालंय

आनंदाची एक क्षीण भावना

माझ्या ऱ्हदयातून स्फुरते आहे.

काम बंद करायची वेळ झाली असं वाटतं.

हवेत पसरलेल्या तुझ्या

मधुर अस्तित्वाचा मंद सुगंध मला जाणवतो आहे.

 

४७.

त्याची वाट पाहण्यात जवळजवळ

सारी रात्र वाया गेली.

 

थकून भागून रामप्रहरी मला डुलकी लागेल,

तेव्हा तो येईल अशी मला भिती वाटते.

 

मित्रांनो! त्याला अडवू नका,मना करू नका.

त्याच्या पदरवानं मला जाग आली नाही तर,

कृपा करा आणि मला उठवू नका.

 

पाखरांच्या कलकलाटानं तसंच

प्रांत:कालीन प्रकाश महोत्सवाच्या,

वाऱ्याच्या कल्लोळानं मला जाग यायला नको.

 

माझ्या दाराशी माझे स्वामी अचानक आले

तरी मला झोपू दे

त्यांच्या स्पर्शानेच मला जाग येऊ दे.

 

अंधकारमय निद्रेत पडणाऱ्या स्वप्नातून

तो येईल तेव्हा त्याच्या हास्य किरणांनी

मला जाग यावी,

पापण्या उघडताच तो समोर दिसावा,

प्रथम प्रकाशाच्या किरणात आणि आकारात

तो मला दिसावा.

माझ्या जागृत आत्म्याचा प्रथम आनंद आविष्कार

त्याच्या नजरेत मला दिसावा.

 

अशा वेळी माझे पुनरागमन

त्याच्या येण्यातच व्हावे.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय रे गजानना ?☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ काय रे गजानना ? ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

काय रे गजानना?

आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता,

आता कुठं ‘ ओवाळू आरत्या ‘ नंतर ‘ चंद्रभागे मधे सोडोनीया देती ‘ जमायला लागलं होतं,

आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती,

एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या,

रिमोटसाठी भांडणाऱ्या आमचं, टिव्ही बंद करून तुझ्यासमोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं,

भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते.

साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. 

आणि एवढ्यात…?

एवढ्यात हा दिवस आणलास पण?

काल तर आलास आणि आज निघालास पण….?

….कठोरपणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदिगुरू… 

जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालास….

तुझ्या जाण्याच्या विषयाने पावले जड होऊन मन भरून येतं रे….

पुढच्या वर्षीही लवकरच येशील या आशेने तुला निरोप तर द्यावाच लागणार….

पण गजानना जाताना एवढं कर —

फक्त तुझ्याच नाही, तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं साधं सरळ मन सर्वांना दे‌ —

भाजी भाकरी असो वा पुरणपोळी, सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे —

प्रत्येकाचं  घर आणि ताट नेहमी भरलेलं असू दे —

आणि त्या भरल्या ताटातलं अन्न पोटात जाण्याची सहजता दे —

लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे —

अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे —

अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे —

सूक्ष्मदृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे —

सार स्विकारून फोल नाकारणारे सुपासारखे कान दे—

भलंबुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे —

शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे —

सगळ्यात महत्त्वाचं— सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे—

बहुत काय मागू गणेशा..? 🙏🏻

🌸 गणपती बाप्पा मोरया 🌸

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वतःला कळू द्या — ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वतःला कळू द्या — ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या..!!

 

जेव्हा सगळं घर रडत असतं, 

तेव्हा तुम्ही सावरता,

जेव्हा घरभर पसारा होतो,

तेव्हा तुम्ही एकट्याच आवरता,

राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं,

केस विंचरणं , लिपस्टिक लावणं ,

आणि पावडर लावून नटणं ..

तुमचं हसणं महत्त्वाचं आहे, ते असंच फुलू द्या,

तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या..!!

 

डोळ्याखाली काळे डाग,

चेहऱ्यावरती रिंकल्स,

पांढरे झालेले केस आणि, 

गालावरती पिंपल्स,

असू द्या हो,

एक धाडसी आई आहात तुम्ही, 

साऱ्या जगाशी लढता,

एकावेळी एक नाही,

दहा दहा कामे करता,

या घाईत तुमचा मोर्चा स्वतःकडेही वळू द्या,

तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या..!!

 

स्ट्रेस आहे कामाचा,

हवं आहे प्रमोशन,

किराणा संपत आलाय, 

त्याचं वेगळंच  टेन्शन,

वाढदिवस, एनिवर्सरी सारं लक्षात ठेवता,

अगदीच कॉल नाही पण आवर्जून मेसेज करता,

तुमच्या कौतुकानं कूणी जळलं तर जळू द्या,

पण तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या…!!

 

वेळेत खा, वेळेत झोपा,

जरा जपा स्वतःला

तुमच्यामुळेच आहे

घरपण तुमच्या घराला,

नको सतत साऱ्यांची मनं जपणं,

” खूप छान असतं  कधीतरी आपणं आपलं असणं “

असा थोडासा “me time” तुम्हालाही मिळू द्या

तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या..!!!

 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्यातली यंदाची विसर्जन मिरवणूक … लेखक श्री विक्रम रजपूत ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यातली यंदाची विसर्जन मिरवणूक … लेखक श्री विक्रम रजपूत ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

कालची गणपती मिरवणूक म्हणजे आजवरचा कहर होता. टिळक रोड, अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक इथे लोकांचा अक्षरशः महापूर आला होता. 

मागच्या दोन वर्षांपासून तुंबलेले खास चेंगरून घेण्यासाठी बाहेर पडलेत असं वाटत होतं. निम्म्याहून जास्त लोक दारू प्यायलेले होते, तर काही जण रस्त्यावरच उभे राहून पीत होते. या पिणाऱ्यांमध्ये मुलीदेखील मागे नव्हत्या. दारू पिऊन बेभान नाचणे, नाचून नाचून रस्त्यावरच उलट्या करणे, आणि उलट्या करून झाल्या की पुन्हा नाचणे.

स्पीकर्सच्या आवाजाबद्दल तर न बोललेलं बरं. त्या बेसमुळे अक्षरशः छाती फुटून हृदय बाहेर येईल की काय असं वाटत होतं आणि ह्या सगळ्यात हाईट म्हणजे त्या मरणाच्या गर्दीत काही पालकांसोबत त्यांच्या कडेवरची लहान मुलं देखील रेटली जात होती. ती मुलं जीवाच्या आकांताने रडत होती.

कोरोनात घरटी एक माणूस दगावल्यासारखा दगावला आहे. त्या दुःखातून बरेच जण अजून नीट सावरले नाहीयेत आणि त्यांच्याच घरासमोर ‘ पोरी जरा जपून दांडा धर ‘ वगैरे सारखी गाणी कर्कश्श आवाजात लावून विचित्र हावभाव आणि ओंगळवाणे हातवारे करत नाचणारे, एकमेकांना रेटणारे आणि असा नाच पहायला गर्दीत चेंगरत वाहत जाणारे लोक बघून कोणत्याही स्थिर मानसिकतेच्या माणसाला मळमळल्याखेरीज राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती.

‘ बाप्पाच्या आगमनाची चाहूल ‘, ‘ बाप्पा गेला की घरात पोकळी जाणवते ‘  हे सगळं त्यांनाच होतं ज्यांच्या घराजवळ एखादं सार्वजनिक मंडळ नसतं. बाकी जे मुख्य शहरात किंवा मिरवणूक मार्गावर राहणारी मंडळी आहेत त्यांना, म्हाताऱ्या माणसांना, सलग तीस-छत्तीस तास त्या गर्दीत उभे राहून ड्युटी करणाऱ्या पोलिसांना, ज्यांना खरंच सामान्य माणूस म्हणता येईल अशा सर्व स्थिर मानसिकतेच्या लोकांना, आणि स्वतः गणपतीला देखील गणेशोत्सव संपला की हायसं वाटत असावं.

‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘, ‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘ म्हणत असे घाणेरडे प्रकार करणारे भक्त बघूनच गणपती बाप्पाने मागची दोन वर्षे ब्रेक घेतला असणार आहे … 

लेखक  : श्री विक्रम रजपूत, पोलीस उपनिरीक्षक

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरं प्रेम…? ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

 

?  वाचताना वेचलेले ? 

☆ खरं प्रेम……? ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकरी कुस्करून द्यायची.

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा… 

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.  

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहिलं . ‘ मेलं की काय ‘ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं. 

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघितलं, आणि चक्क ‘ शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..’ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टीपॉयवरचा चष्मा आणून दे…  अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘ अग मन्या दिसत नाही गं कुठं ? ‘ बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबली. 

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅनमधे बसला.  नवऱ्याने हे बघितले.  हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, ” मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरांसाठी आहे. तुझ्यासाठी नाही.

“ मला माहितेय..! पण मला जायचंय आता.”— मन्या शांतपणे बोलला.

” मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.  माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता.” काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, ” तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर? “

” म्हणजे काय शंका आहे का तुला? “

” मित्रा, अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेव्हा तोंड घालत होतो, तेव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा. पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो,  तुला हवं तसं करू लागलो…. तेव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय? ” 

नॉट सो स्ट्रेंज यार…!!   वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?  समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं. 

पण जेव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेव्हा त्याचं आपल्यासोबत असणंही आता नकोसं वाटतं. आपण त्याला टाळत राहतो—-भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

— आश्चर्य आहे ना ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?—–

— आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं, अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!

 

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ द टर्न ऑफ टाईड – ऑर्थर गार्डन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

द टर्न ऑफ टाईड – ऑर्थर गार्डन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे. 

त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली… शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले ……  ‘‘ मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची खात्रीही देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी. ’’ 

गॉर्डन तयारच होते…

त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले….  ‘‘ या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा. पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको. दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’ 

दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले… 

सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली… 

त्यावर लिहिले होते … ‘ ऐका.’ 

‘काय ऐकायचे… ?’  त्यांना प्रश्‍न पडला… 

ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले… एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…

झाडीतून वाहणारी हवा…… मध्येच समुद्रावरून येणारा वारा,….. विभिन्न पक्षांचे आवाज,….. दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्‍या पक्षांचे आवाज…, 

अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या… 

जणू काही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते… 

आपणही या निसर्गाचा असाच साधा, सहज भाग आहोत, हे त्यांना जाणवले… 

मनातला सर्व कोलाहल थांबला… एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता……. 

बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही… दुसर्‍या चिठ्‌ठीची वेळ झाली होती……. 

त्यावर लिहिले होते,… ‘ मागे वळून पहा.’……. त्यांना काय करायचे कळले नाही. पण सूचनांचे पालन करायचेच होते. त्यांनी विचार करणे सुरू केले……. भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला… आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,.. बालपणीचे सवंगडी,.. कट्‌टी आणि क्षणात होणारी दोस्ती,.. त्या हसण्या-रडण्यातील सहजता,.. अकृत्रिम वागणे,.. इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले……  भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले…. 

आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते, हे आठवून त्यांचा ऊर भरून आला…….  आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो. संबंधात कृत्रिमता, दिखाऊपणा, औपचारिकता जास्त आली. या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्‌ठी उत्सुकतेने उघडली……. 

त्यात लिहिले होते, ‘‘ आपल्या उद्दिष्टांची छाननी करा .’’

गॉर्डन म्हणतात, “ मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही. पण मी सखोल परीक्षण केले……  ‘ आपले उद्दिष्ट काय..? यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत…’ “  त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते…… 

सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्‌ठी उघडली….  

त्यात लिहिले होते, ‘‘ सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये.’’ 

त्यांनी एक शिंपला घेतला … आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या… आणि ते घरी जायला निघाले… 

समुद्राला भरती येत होती… त्यांनी मागे वळून पाहिले….  एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….

गॉर्डन म्हणतात, “ त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…”. 

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares