मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचा गर्भ… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ आईचा गर्भ… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.

________

स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.

_________

एकटाच मी अन् माझं जग तूच होतीस.

________

या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.

________

तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.

________

तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.

_________

तुला मला जोड़णारी एक कोमल दोर आत होती.

________

तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.

_________

तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.

_________

कान माझे फक्त़ तुझ्या आवाजाला तरसायचे.

_________

तू स्वतःला किती किती जपायचीस.

_________

एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.

_________

जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.

_________

पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.

_________

गर्भातले ते महिने पुन्हा येणार नाहीत.

_________

पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणार नाही.

 

            – माझी आई..

 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाकळ…श्री.दि.इनामदार ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

वाकळ…श्री.दि.इनामदार ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ

कुण्या घरचे दळण, आला दळुन विठ्ठल

 

पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर

पीठ हुंगले दुज्याने, म्हणे सुगंधी कापुर

 

कुणी शेला झटकला ,पीठ उडुन जाईना

बुचकळला पाण्यात, पीठ धुऊन जाईना

 

झाली सचिंत पंढरी, वाढे राऊळी वर्दळ

ठिगळाच्या  पांघरुणा, शेला म्हणती सकळ

 

फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ

विठ्ठलप्रेमे भरुन आले, जनी रडे घळघळ…

 

संत जनाबाईला  दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून  तिची वाकळ घेऊन जातो.

ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार यांनी लिहिलेली  “वाकळ” नावाची एक सुंदर कविता . 

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वभाव पदार्थांचे— ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वभाव पदार्थांचे— ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात. तसेच पदार्थांचेही असते, असं माझं मत आहे.

इडली ही मवाळ प्रवृत्तीची. अगदी लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी. तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं.

तुपाबरोबर नि दुध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते. कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही. पण एक नंबरची लहरी बरं का ही! कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल.

मिसळीचं अगदी उलटं. ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या ! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही. फक्त तरुणांची सोबत हिला आवडते. बालके नि वृद्ध  हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत. रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना केवळ दर्शनाने नि गंधाने लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ!

भेळ नटरंगी. चिंचेच्या चटणीचा आंबटगोडपणा, कांदा – कोथिंबिरीचा स्वाद, फरसाणाचा खमंगपणा, मिरची ठसका लेवून पातेल्यात नाचली की पब्लिकने शिट्ट्या मारत भोवती पिंगा घातलाच पाहिजे.

उप्पीट नि पोहे हे “सामान्य जनता” या वर्गात मोडणारे. म्हणजे अगदी सहनशील! यांच्या वाट्याला कधी कौतुकही येत नाही नि कधी टीकाही येत नाही. ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही. पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरीबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.

गोडाचा शिरा मात्र जरा खास व्यक्तीमत्त्व… खास प्रसंगांना उपस्थित राहणारं! सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी “नशीबवान”. महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ “कडा प्रशाद” नावाचं. तर कुठे “सुजी हलवा” नावानं मिरवणारं.. बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा “शिरा”.

वडा, भजी हे पदार्थांमधले हिरो. लोकप्रिय… पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे. हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल! पावाशी लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!

पावावरून आठवण आली ती पावभाजीची. सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव! बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात 

गुण्या – गोविंदाने नांदवून आपला स्वत:चा चवीचा ठसा उमटवणारी खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!

गोड माणसांची दुनियाही अशीच रंगरसीली!

प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर! अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी. कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली! शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच…

“मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी” म्हणत बालपणीच परिचीत झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही. पण नसली तर मात्रं नाडवते.

लाडू हा चराचरातून तयार होणारा.

तूप आणि साखर हे याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा. बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा. रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि लक्षात येण्याआधी संपून जाणारा. साध्या पोळीपासून ते राजेशाही डिंकापर्यंत कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे! हा बच्चेकंपनीचा लाडका!

पुरणपोळी ही पक्वानांची राणी!

नाजुक-साजुक स्वभावाची.. महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी  हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!

जिलेबी…नटरंगी.. पण बिनभरवशाची.. कधी आंबट तर कधी गोड.. आज कुर्र्यात असणारी कुरकुरीत पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस..

वर्ण काळा असला तरी अंगी गुण असले की साऱ्याचे आपण लाडके होतो…हे शिकवणारा गुलाबजाम!

ओठाला मुरड घालून पोटातला आनंद पोटातच ठेवणारी करंजी!

सगळे गुणीजन भोवताली असताना आणि पटकन सांगता येईल असा एकही गुण अंगी नसताना  ज्याच्याशिवाय पान वाढलच जात नाही ते म्हणजे  पोळी,भाकरी … आत्मविश्वासाचा वारसा घ्यावा तर त्यांच्याकडून..ना रूप, ना रंग, ना ठसा उमटवणारी चव..पण वर्षानुवर्षे त्यांचं महत्त्व अबाधित आहे.

भाताची मात्र कथा आगळीच…

भात मनमिळावू.

भाता तुझा रंग कसा?….

ज्यात मला मिसळाल तसा…

वरणात रंगून पिवळाधम्म होणारा, साखरभातात केशरात केशरी होऊन जाणारा, पुलावात 

रंगीबेरंगी तर दहीभातात पांढराशुभ्र! याला कशाचच वावडं नाही. दहीभात होऊन महादेवाच्या पिंडीवर विराजमान होतो नि चिकन किंवा मटणाशी दोस्ती करून इफ्तार पार्टीतही शामील होतो. सर्वधर्मसमभाव याच्याकडून शिकावा. चटकदार मसालेभाताच्या रूपात, तिखट बिर्याणीच्या थाटात सादर होणारा भात हा  गोड केशरी  साखरभाताच्या रूपातही प्रकट होतो. रूप, रंग, स्थळ, काळ, वेळ, प्रसंग… कशालाच न जुमानणारा हा भात माणसाला आयुष्याच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत आणि  त्यांनतरही प्रामाणिक साथ देतो.

म्हणूनच दक्षिण भारतात त्याला “अन्न” म्हणतात. अन्न बनून एकट्याने माणसाला संपूर्ण आयुष्यभर पोसायचं सामर्थ्य भातात आहे. म्हणून तर जन्मापासून सहाव्या महिन्यात भाताच्या पेजेने सुरू होणारी खाद्ययात्रा मेतकूट भात, वरणभात, आमटीभात, मसालेभात, वडाभात, पुलाव, बिर्याणी करत पुन्हा वरणभात, मेतकूटभात, पेज या क्रमाने माघारी येते नि भाताच्या पिंडाने संपते… इहलोकीच्या प्रवासानंतरही वारसदारांनी ठेवलेल्या दहीभाताच्या रूपाने ती अनंतकाळ तशीच सुरू राहते.. …. 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 11 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 11 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१८.

आभाळ गच्च भरून आलंय,

अंधार दाटला आहे

अशा वेळी घरधन्या मला एकट्याला

दाराबाहेर तिष्ठत का ठेवतोस?

 

भर दुपारच्या कोलाहलात

मी जनात असतो

पण या एकाकी आणि अंधाऱ्या दिवशी

फक्त तुझीच आठवण मला येते

 

माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून

आपला चेहरा फिरवीत असशील तर

हा पावसाळा व अंधारी दिवस

मी कसा बरं घालवावा?

 

या उदास आकाशाकडं

मी एकटक नजर लावून बसतो

चंचल वाऱ्याबरोबर माझं ह्रदय

मूक रुदन करीत राहणं

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साहेब, ही बाई हरवली आहे… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ साहेब, ही बाई हरवली आहे… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

काय चेष्टा करता ताई,

हा फोटो तुमचाच आहे,

वीस वर्षांपूर्वीचा.

 

हो साहेब

वीस वर्षांत मीच हरवले आहे.

 

नात्यांच्या घोळक्यात

मुलांच्या गलक्यात

सासरच्या धाकात

अखंड स्वयंपाकात

 मी हरवले आहे

 

स्वत:च्या घरात

प्रपंचाच्या चाकात

प्रेमहीन संसारात

वासनेच्या अंधारात

मी हरवले आहे

 

मृगजळाच्या फंदात

हव्यासाच्या नादात

सुखाच्या शोधात

नशिबाच्या सौंद्यात

मी हरवले आहे

 

नवऱ्याच्या मर्जीत

मागण्यांच्या गर्दीत

अपेक्षांच्या झुंडीत

उपेक्षेच्या गंजीत

मी हरवले आहे

 

साहेब

ती सागरगोटे खेळणारी मुलगी शोधा

ती स्वप्न पाहणारी मुग्धा शोधा

ते उगाचच फुटणारे हास्य शोधा

ती हृदयाची धडधड

ती पापण्यांची फडफड

ती अर्थहीन बडबड

कुठे गेली शोधून काढा साहेब

 

ती शृंगाराची ओढ शोधा

ती समर्पणाची उर्मी शोधा

तो स्वच्छंद पक्षी

निळ्या नभावरील केशरी नक्षी

सात पावलांची अग्निसाक्षी

कुठे गेली ते शोधून काढा साहेब?

 

🌺 (Forwarded)

 

संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 10 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 10 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१७.

सरतेशेवटी प्रेमाने त्यांच्याशी समर्पण व्हावे

ही एक इच्छा माझ्या मनात आहे 

सारा विलंब,

इतर साऱ्या गोष्टींकडं दुर्लक्ष याचसाठी

 

त्यांच्या नीतिबंधनात आणि कायदेकानू यात

ते मला गुंतवू पाहतात

सरतेशेवटी ‘त्या’च्यात माझं समर्पण व्हावं यासाठी

त्यांच्या प्रेमाची प्रतीक्षा करीत

त्यांची बंधनं मी चुकवीत आहे

 

हे सारे जण मला निष्काळजी म्हणतात,

दोष देतात, नि:संशय हे योग्यच आहे.

 

इथला बाजाराचा दिवस आटोपला आहे

उद्योगी माणसांची कामं संपली आहेत

मला माघारी बोलावण्याचा

 व्यर्थ प्रयत्न करणारे रागावून गेले आहेत.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत – ॥ आंबा ॥ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत – ॥ 🥭 आंबा 🥭॥ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

ऐका ऐका थांबा थांबा ।

कोण फळ म्हणविले बा ।

सकळां फळांमध्ये आंबा ।

मोठे फळ ॥१॥

 

त्याचा स्वाद अनुमानेना ।

रंग रुप हे कळेना ।

भूमंडळी आंबे नाना ।

नाना ठायी ॥२॥

 

मावे हिरवे सिंधुरवर्ण ।

गुलाली काळे गौरवर्ण ।

जांभळे ढवळे रे नाना जाण ।

पिवळे आंबे ॥३॥

 

आंबे एकरंगी दुरंगी ।

पाहो जातां नाना रंगी ।

अंतरंगी बाह्यरंगी ।

वेगळाले ॥४॥

 

आंबे वाटोळे लांबोळे ।

चापट कळकुंबे सरळे ।

भरीव नवनीताचे गोळे ।

ऐसे मऊ ॥५॥

 

नाना फळांची गोडी ते ।

आंब्यामध्ये आढळते ।

सेपे कोथिंबिरी वासाचे ।

नानापरी ॥६॥

 

आंबे वाकडेतिकडे ।

खर्बड नाकाडे लंगडे ।

केळे कुहिरे तुरजे इडे ।

बाह्याकार ॥७॥

 

कोयी लहान दाणे मोठे ।

मगज अमृताचे साटे ।

हाती घेतां सुख वाटे ।

वास येतां ॥८॥

 

सोफ सालीहि असेना ।

नासक वीटक दिसेना ।

टाकावे वस्त्रावरी नाना ।

कोरडे आंबे ॥९॥

 

एक आंबा वाटी भरे ।

नुस्ते रसामध्ये गरे ।

आतां श्रमचि उतरे ।

संसारीचा ॥१०॥

 

आंबा तणगाऊ नासेना ।

रंग विरंग दिसेना ।

सुकतां गोडी हि सांडिना ।

कांही केल्या ॥११॥

 

भूमंडळी आंबे पूर्ण ।

खाऊन पाहतो तो कोण ।

भोक्ता जगदीश आपण ।

सकळां ठायी ॥१२॥

 

नाना वर्ण नाना स्वाद ।

नाना स्वादांमध्ये भेद ।

नाना सुवासे आनंद ।

होत आहे ॥१३॥

 

आंबे लावावे लाटावे ।

आंबे वाटावे लुटावे ।

आंबे वांटितां सुटावे ।

कोणातरी ॥१४॥

 

नाही जळ तेथे जळ ।

कां ते उदंड आम्रफळ ।

परोपकाराचे केवळ ।

मोठे पुण्य ॥१५॥

 

पुण्य करावे करवावे ।

ज्ञान धरावे धरवावे ।

स्वये तरावे तरवावे ।

एकमेकां ॥१६॥

 

मी तो बोलिलो स्वभावे ।

यांत मानेल तितुके घ्यावे ।

कांही सार्थक करावे ।

संसाराचे ॥१७॥

 

दास म्हणे परोपरी ।

शब्दापरीस करणी बरी ।

जिणे थोडे ये संसारी ।

दो दिसांचे ॥१८॥

– श्री समर्थ रामदास स्वामी

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अक्षय… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ अक्षय…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

कंठातून गाण्यात आणि

गाण्यातून अंतरंगात जे नेतात

ते सूर….. अक्षय

 

अनुभवातून वाक्यात आणि

वाक्यातून डोळ्यात जी चमकते

ती बुद्धी… अक्षय

 

वर्दीतून निश्चयात आणि

निश्चयातून सीमेवर उभे असते

ते धैर्य…. अक्षय

 

एकांतातून शांततेत आणि

शांततेतून आनंदात जो लाभतो

तो आत्मविश्वास… अक्षय

 

सुयशातून सातत्यात आणि

सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते

ती नम्रता… अक्षय

 

स्पर्शातून आधारात आणि

आधारातून अश्रुत जी ओघळते

ती माया…. अक्षय

 

हृदयातून गालावर आणि

गालावरून स्मितेत जे तरंगते

ते प्रेम… अक्षय

 

इच्छेतून हक्कात आणि

हक्कातून शब्दात जी उमटते

ती खात्री… अक्षय

 

स्मृतितून कृतित आणि

कृतितून समाधानात जी दिसते

ती जाणीव…. अक्षय

 

मनातून ओठावर आणि

ओठावरून पुन्हा मनात जाते

ती आठवण….. अक्षय

अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Yesssss….2 mint’s… – सुश्री उन्नती गाडगीळ ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ Yesssss….2 mint’s…– सुश्री उन्नती गाडगीळ ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

आपल्या भुकेल्या मुलाला दोन मिनटात मँगी खाऊ घालणारी आई.फक्त कमी वेळेचे गणित मांडते.पौष्टिक घटक, गुणवत्ता लक्षात घेत नाहीं! तोच प्रकार खेळात.. पाच दिवसांची मँच..एक दिवसावर…वीस षटकांवर आली. कमी वेळात ..जास्त मँचेस असे गणित मांडले जाते.

खेळाडूंचा ..ताण..तणाव..गुणवत्ता घसरण..याकडे दुर्लक्ष !!!

….रंगमंचावर पण तेच चित्र. पाच अंकी नाटक. तीन…दोन…एकांकीवर आले. नंतर पंधरा मिनिटांची नाटुकली. संख्यात्मक विचार .काळाचे भान ठेऊन वेळेची बचत करणे. ही सोय ठरली !

८ मार्च चे औचित्य साधून..भारतात प्रथमच रंगमंचावर रुजणार …दोन मिनटांच्या नाटिका. अन् त्या ही महिलांद्वारे..

आता फक्त  दोन मिनटात.. साभिनय स्वत:ला सिद्ध करणे. एकपात्री / सामुदायिक, संपूर्ण मुभा आहे!

सामाजिक विषयांचे अनेक पदर फक्त दोन मिनटात गुंफायचे… आशय महत्वपूर्ण.

विषयात खोलवर डुंबायचे नाहीं!! शिवाय कमी वेळात अनेकांना संधी मिळणार ! तोंडाचा रंग पुसण्याची जरुरी नाहीं. दोन मिनटाचा खेळ खेळून.. एका दिवसात अनेक भरा-या घेऊन उच्चांक गाठु शकता. चला तर मग… बांधा पदर… व्हा ..अभिनेता 🎭 / अभिनेत्री 🎭 …

आपण एकेक गंमती बघत रहायचे.

“मी दोन मिनटांचे एका दिवसात पन्नास प्रयोग केले”

 नटाने फुशारकी मारायची ..

आणि आपण त्या दोन मिनिटाच्या प्रयोगासाठी इंधन, वेळ, पैसे खर्चून जायचे.

आपली किमान 20 मिनिटे घालवायची…….असो.

आपण शुभेच्छा देऊया.

लेखिका उन्नती गाडगीळ

संग्राहिका –  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 9 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 9 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१५.

 गीत गाऊन तुझं रंजन करण्यासाठी

 मी आलो आहे

 तुझ्या प्रसादाच्या एका कोपऱ्यात

 माझी बैठक आहे

 तुझ्या जगात मला काम नाही

हेतू नसलेलं माझं जीवन कोलमडून पडेल

रात्रीच्या समयी, तुझ्या नि: शब्द आराधनेच्या वेळी

हे धन्या, तुझ्यासमोर उभं राहून

‘गा’ अशी आज्ञा मला कर

प्रभात समयी, शांत स्वरात,

सुवर्ण वीणेचे सूर जुळावेत

आणि तुझ्या आज्ञेने मी सन्मानित व्हावे.

 

१६.

 या जगाच्या महोत्सवात सहभागी होण्याचं

 निमंत्रण मला मिळालं

 आणि माझं आयुष्य कृतार्थ झालं.

हे किती थोर भाग्य!

मी डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो

 

या महोत्सवात

माझी वीणा वाजवणं हेच माझं काम,

ते मी माझ्या परीने केलं

 

या मैफिलीतून मी आत यावं,

तुझं दर्शन घ्यावं

आणि मूकपणे तुझ्यासमोर नतमस्तक व्हावं.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares