मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सार्थक… – कवी: डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती -सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? वाचताना वेचलेले ?

☆ सार्थक… – कवी: डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काळीज किती गलबलले

हातांची थरथर बघता

तो भास्कर ऐन दुपारी

क्षणमात्र थांबला होता ll

*

हे भागधेय नियतीने

तव लिहिले होते भाळी

स्पंदने मनातील तुझिया

मग शोधू लागल्या ओळी ll

*

मंदिरी ध्वनी घंटांचे

जाणीव जागवित होते

शतकांच्या संघर्षाला

रुधिराचे शिंपण होते ll

*

कोटी कोटी हिंदु हृदयांना

ध्वज भगवा परम पवित्र

ती मने जोडण्यासाठी

मी झालो निमित्तमात्र ll

*

काही न येथले माझे

करुणाघन तुम्ही सारे

मी बिंदू सागरतळीचा

तुम्ही गगनामधले तारे ll

*

मन भरून आले जेव्हा

ध्वज गगना जाऊन भिडला

उद्घोष दशदिशांना गेला

जाहला स्पर्श क्षितिजाला ll

*

तम सरले दुर्दिन गेले

आनंद नव्या विश्वाला

जोडले हात थरथरले

हा देह सार्थकी झाला ll

कवी : डॉ. श्रीकृष्ण जोशी

प्रस्तुती : सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नि:स्वार्थ दान…” – लेखिका : श्री गणेश केळकर ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “नि:स्वार्थ दान…” – लेखिका : श्री गणेश केळकर ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

दान… हा शब्द जितका साधा, तितका तो प्रसंगानुरुप रूपं बदलतो.

कधी हात देतो,
कधी आधार देतो,
आणि कधी जिवंत राहण्याची ताकद देतो.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन बॅग, नवीन वही, नवीन बॉक्स, ही गोष्ट काही मुलांसाठी नेहमीची आणि काही मुलांसाठी, स्वप्नासारखी.

एकदा एका शिक्षकाला दिसलं की वर्गातील छोटा दिनू नेहमी वहीच्या एका पानाच्या कोपऱ्यावरच लिहितो.

लिहायला सांगितलं की तो घाबरत म्हणायचा, सर, पान संपलं की आईस काय सांगू…?

दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी कुणालाही न सांगता वर्गातील काही मुलांना पुस्तके, वह्या, पेन्सिली दिल्या. दिनूचा चेहरा पाहण्यालायक होता.

त्याने वह्या हातात घेतल्या आणि उद्गारला, “सर, आता मी मोठ्ठा निबंध लिहीन.” शालेय साहित्य दान म्हणजे फक्त वही देणं नाही. ते मुलाच्या आयुष्याला ‘रिकामं पान’ न ठेवता, लिहायला प्रवृत्त करणं.

पूर आला, भूकंप झाला, एखादं कुटुंब अचानक रस्त्यावर आलं, तेव्हा दान म्हणजे फक्त पैशाचा विषय नसतो, तो वेळेचा आणि उपस्थितीचा असतो. गावात पूर किंवा भूकंप येऊन घरं उध्वस्त झाली तेव्हा, गावातील सगळे एकदिलाने उभे राहिले.

मुलं घराबाहेर रडत होती.

आणि तेव्हा एक म्हातारी आजी आली आणि म्हणाली, “बाळांनो, चला, माझ्या घरात ऊब आहे. कपडेही आहेत. या आत या.” कपडे महाग नव्हते, घर मोठं नव्हतं.
पण त्या क्षणी वेळेला तिच्या त्या कृतीने इतका आधार दिला की जणू संकटाचं वादळ जाणवलंच नाही.

आपत्कालातील दान म्हणजे, संकटाशी दोन हात करणे.

औषधांचं दान म्हणजे शरीर वाचवणं, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मनाला दिलासा देणं.

एकदा रुग्णालयात एका वृद्ध बाबांना महागडी औषधं लिहून दिली. पण महिना अखेर पेन्शन शिल्लक नव्हती.

ते औषधांच्या काऊंटरवर उभे राहून शांतपणे म्हणाले, “थोडं कमी देता येईल का? “

तेव्हा मागून कुणीतरी हात पुढे करून पूर्ण बिल भरलं.

तो माणूस नावही न सांगता निघून गेला. त्या वृद्धांचे डोळे पाणावले.

औषधाने शरीराला बळ मिळालं, आणि त्या अनोळखी व्यक्तीने दिलेल्या दयाळूपणाने मनाला.

औषधदान म्हणजे, तुम्ही जगलात तर आम्हा सर्वांचं चांगलं जगणं अधिक परिपूर्ण होणं, असा नि:शब्द संदेश.

गावात जत्रा भरते किंवा धार्मिक उत्सव असतो, त्यावेळी अन्नछत्र असतं. जेवण झाल्यावर म्हणजे प्रसाद भक्षण केल्यावर धन्यवाद म्हणू नये. यात आभार नसतात. तर यात आपलेपणा असतो.

आणि खरंच, जिथे एखादं लहान मूल प्रसादाचा द्रोण हातात घेऊन हसतं, जिथे एक वृद्ध ‘देवा, भरभराट होवो’ असं मनोमन आशीर्वाद देतो, तिथे देणाऱ्याला अचानक काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं. अन्नदान म्हणजे फक्त पोट भरत नाही, माणुसकीही भरभरून वाहते.

‘अवयवदान, रक्तदान’ या शब्दांचा रोज टीव्हीवर, वर्तमानपत्रात उल्लेख असतो. पण त्यातली खरी ऊब कळते ती एखाद्या कुटुंबाच्या डोळ्यांतून. एकदा एका ओळखीच्या कुटुंबात दुर्दैवी घटना घडली.

पण त्या घरातील मुलाने शेवटच्या क्षणी आईचा हात हातात घेऊन शांतपणे सांगितलं, “आई, तुझं हृदय कुणाचातरी ठोका वाढवेल, तुझे डोळे कुणाचातरी पहाट उजळतील.”

त्या वाक्यानं घरभर शांतता दाटली. दुःख होतंच. पण त्यावर जीवनाचा सुगंधही मिसळला. अवयवदान हा कृतज्ञतेचा सर्वोच्च आकार.

कारण यात देणारा निघून जातो, पण त्याचं हृदय, त्याचे डोळे, त्याचा श्वास कुणाच्यातरी आयुष्यात चालत राहतो.

दान म्हणजे फक्त काहीतरी देणं नाही. दान म्हणजे मनातून निघालेली सहज कृती. कधी एखाद्याला पावसात छत्री देणं, कधी शाळेतल्या मुलाला पुस्तक देणं,

कधी वृद्धाश्रमात शांतपणे बसून ‘काय सांगताय? ‘ विचारणं, हे सगळंही ‘दान’च. कारण दानाचं मूळ एका छोट्याशा भावनेत असतं : ‘मी तुला माझ्यातलं थोडं देतो, कारण तू आणि मी वेगळे नाही.’

आपत्कालातला आधार, गरीब मुलांना दिलेलं साहित्य, गरजूंना केलेली मदत,  रुग्णांना दिलेली औषधं, ही सगळी वेगवेगळी रूपं आहेत, पण मूळ एकच आहे… माणुसकी.

दान करताना माणूस मोठा होत नाही,  तो फक्त स्वतःला अधिक मानवी बनवतो.

दान हा एक छोटासा शब्द, पण अर्थ मात्र आकाशाएवढा. त्यात प्रेम आहे, करुणा आहे, त्याग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना सामावून घेण्याचे आपलेपण आहे. अन्नदानाने भूक भागते, अवयवदानाने ओआयुष्यच मिळतं.

एक जिवंत माणसाला ऊब देतं, दुसरं मृत्यूनंतरही अर्थ देतं. मात्र दोन्हींचा सूत्रधार एकच- ” माणुसकी. “

लेखक: श्री.गणेश केळकर

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आदिवासी लोकांची एक गोष्ट” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आदिवासी लोकांची एक गोष्ट” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांची एक शिकण्यासारखी गोष्ट…

त्या भागात त्या वेळी नेमणुकीवर असलेल्या “सेंट्रल बँक ऑफ इंडिया”च्या मॅनेजरने दै. सकाळच्या मुक्तपीठमध्ये लिहिली होती.

तो दुर्गम भागात पोस्टिंग असल्याने एकटाच रहात होता. बॅंकांच्यावरच रहाण्याची जागा होती.

– –एका अपरात्री कोणीतरी दरवाजा जोरजोराने वाजवत असल्याने पाहिलं तर बाहेर आदिवासी लोकांचा जमाव जमला होता. काही ओळखीचे चेहरे पाहून घाबरतच दरवाजा उघडला तर त्या लोकांनी सांगितलं की त्यांच्यापैकी एकजण मरण पावला होता. याला कळेना की त्याचा याच्याशी काय संबंध? ते म्हणाले की त्या मृताचा अंत्यसंस्कार लगेच करायचा आहे कारण त्यांच्यात रात्रभर मृतदेह ठेवत नाहीत. तरीही याचा काय संबंध हे कळत नव्हतं.

…. पुढे ते लोक म्हणाले की त्याने बॅंकेचं कर्ज घेतलं होतं आणि ते समाज फेडणार आहे. हा म्हणाला, “ठीक आहे. उद्या सकाळी बॅंक उघडली की हिशोब करूया‌. ”

…. त्यावर त्यांच्यापैकी एका वृद्धाने सांगितलं की “ जोपर्यंत मृताच्या डोक्यावर कर्ज आहे तोपर्यंत अंत्यसंस्कार करता येत नाही आणि अंत्यसंस्कार तर लगेच करायचा आहे. तेव्हा बॅंक उघडून हिशोब करा आणि पैसे घेऊन मृताची कर्जाची कोणतीही थकबाकी नसल्याचं लिहून द्या म्हणजे आम्हाला त्याचे अंत्यसंस्कार करता येतील. ”

हे ऐकून बॅंक मॅनेजरची वाचाच खुंटली.

– – – कुठे कोट्यवधी रुपये बुडवणारे अब्जाधीश आणि कुठे समाजातील मृताची कर्जफेड स्वतःच्या पैशांतून करणारे आदिवासी!!!

लेखक : अनामिक 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’वरणभात…’ – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ’वरणभात…’ – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

साधं-वरण-भाताच्या वासात आई शोधताना……

“आई, आज पण वरण-भात? ” – चिडून मी विचारलं.

कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूत भात आणि बाजूला साधं वरण त्यात हिंग आणि चिमूटभर साखर आणि वर एक चमचा साजूक तूप.

माझं चेहरा बघून आई थोडं हसली, म्हणाली, “झणझणीत पावभाजी हवी होती ना? किंवा मसालेदार रस्सा भाजी. पण आज पिठं नव्हतं रे, म्हणून वाटलं वरण-भात करावा. “

माझा मूड अजूनच खराब झाला. माझ्यासाठी साधं वरण-भात म्हणजे कंटाळवाणं जेवण. कॉलेजमधले मित्र सांगायचे – “आपल्याकडे पिझ्झा, पास्ता, बर्गर! “

आणि मी? रोज एकतर पोळी-भाजी, नाहीतर वरण-भात.

त्या दिवशी मी चिडून खाल्लंही नाही. बॅग घेतली आणि बाहेर पडलो.

वर्षं उलटली……

मी आता पुण्यात मोठ्या कंपनीत कामाला होतो.

रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं, झणझणीत चव, परदेशी पदार्थ……

पण मन काही भरत नव्हतं.

एका रविवारची गोष्ट –

खूप दमून घरी आलो. भाड्याचं घर, ओव्हरटाईम संपवून आलेलो.

पोटात कावळे ओरडत होते. डबा मेसवाल्याने आज दिला नव्हता.

फ्रिजमध्ये पाहिलं – काहीच नव्हतं. शेवटी थोडी तांदूळ आणि तुरीची डाळ डब्यात दिसली. मग काय! डाळ तांदूळ धुऊन घेतले. आणि कुकरला लावले.

तेच शिजवलं… एका छोट्या बाउलमध्ये वरण गरम केलं भात गरम होता. वर साजूक तूप नव्हतं – पण आठवण मात्र होती.

पहिला घास तोंडात गेला… आणि अचानक डोळे भरून आले.

– – त्या साध्या वरण-भातात मला आईचा पदर दिसला… तिचा तो स्वयंपाकघरात उभा असलेला आकृतीपणा…

तिचं ते “खाल्लंस ना नीट? ” असं विचारणं, आणि माझं “हे काय, पुन्हा वरण-भात? ” असं उत्तर.

आज ते वरण-भात “राजभोगासारखं” वाटत होतं.

आई गेली दोन वर्षांपूर्वी.

तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं कोमेजली होती… पण आठवणी ताज्या होत्या.

त्या दिवशी ठरवलं –

रविवारी जेवायला मी वरण-भात करणार. घरचं साजूक तूप कढवून..

आईला आठवण म्हणून नाही… तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी –

“सुख हे वरण-भातासारखं असतं – घरगुती, साधं, पण प्रेमानं भरलेलं! “

“मी आजही पिझ्झा, बर्गर, इटालियन, पास्ता थाई करी, चायनीज घरी खातो हॉटेलचं जेवणही खातो परदेशात राहिलो, पाश्चात्य चविष्ट खाल्लं, पण घरच्या वरण-भाताच्या घमघमाटानेच मन खरंच परत घरी येतं. “… पण पोट भरलं तरी मन वरण-भात शोधतं! “

फ्युजन फूडने जिभेला आनंद दिला,

पण वरण-भाताने मनाला निवांत केलं. “मॉडर्न स्वयंपाकघरात स्पेशल डिशेस शिजतात,

पण वरण-भात अजूनही घरपणाची ओळख करून देतो. “

काय जादू आहे ना वरणभातात आणि आईच्या हातात!

जग फिरलंत, पदार्थ बदलले, थाळी वाढली, पण मनाचा घास तोच राहिला – वरणभात.

जेव्हा आयुष्याच्या गर्दीत दम लागतो, तेव्हा सगळ्या रेस्टॉरंट मेन्यूज डोळ्यांसमोर नुसते फिरतात, पण मन मात्र शोधतं एक साधंसं वरण – आणि आईचा हात.

आईच्या हातात जादू असते का?

कदाचित नाही – ती फक्त भात शिजवते, वरण फोडते, तुपाची धार टाकते… आणि एक प्रेमळ नजर देते –

ही नजरच असेल ती जादू…

सगळ्या मसाल्यांच्या, चविष्ट पदार्थांच्या गर्दीत

वरणभात गप्प असतो – साधा, शांत पण मनावर राज्य करणारा.

आईनं भरवलेला पहिला घास म्हणजे जगातला पहिला safe space.

तोंडात वरणभात आणि कानात –

“हळू खा, गिळू नको, तोंड पुस… “

या वाक्यांमध्ये जादू आहे का?

हो… कारण त्यामागे मायेचा हात आहे.

आज स्वतः आई-बाबा झालो,

स्वतः मुलांना बर्गर-पास्ता बनवतो,

पण जेव्हा स्वयंपाकघरात वरणाचा वास येतो, तेव्हा अचानक मन परत पंधरा वर्षांनी मागं जातं – आईच्या हाताखाली.

आई कुठं गेली?

ती आजही आहे – आठवणीत, चवीत आणि त्या वरणभातात.

मनातलं दुःख, डोळ्यांतलं पाणी आणि ओठांवरचं हास्य –

सगळं सावरण्याची ताकद जर कोणाच्या हातात असेल,

तर ती केवळ आईच्या हातात असते… आणि तिच्या वरणभातातही.

जिवाला हवा असतो आपुलकीचा घास, टेबलवरच्या मेनूचा फोटो नाही! “

आई शिजवत असते तेव्हा म्हणते, “आज काही नाही गं, फक्त वरण-भात. “

पण तो “फक्त” मध्ये तिचं प्रेम, काळजी, थकवा विसरणारी ऊब असते.

हा वरणभात सांगतो –

“जेवण हे पोटासाठी नसतं फक्त, ते माणसांमध्ये जोडणारा एक धागा असतो. “

जेव्हा आपण खूप मोठं जग पाहतो, तेव्हा परत याच वरण-भातासारखं घरटं आठवतं –

शांत, मृदू आणि आपलंसं.

तो शिकवतो –

“सर्वसाधारण गोष्टी कधी-कधी सर्वात खास असतात! “

प्रत्येकाच्या घरात शिरणारा हा वरण-भात… पण मनात शिरतो तो आपुलकीनं! ” अगदी लहान पासून तर मोठ्यांपर्यंत.

लेखक : अनामिक

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीवनसाथी…” – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – मराठी अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीवनसाथी…” – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – मराठी अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

एकदा एक मित्र आमच्या घरी आला होता.

चहा, नाश्त्यासोबत गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या.

बोलता बोलता मी मधेच उठून उभा राहिलो.

“मी प्लेट्स धुवून लगेच परत येतो.”

मी असं म्हणताच तो माझ्याकडे अशा काही विचित्र नजरेने पाहत होता जणू मी त्याला सांगितलंय की 

‘मी रॉकेट बनवायला चाललोय.’

मग तो काहीसा गोंधळून कौतुकाच्या स्वरात बोलला.

“मला आनंद वाटला की तू तुझ्या बायकोला कामात मदत करतोस. मी नाही करत मदत. कारण माझ्या बायकोला त्याचं काही कौतुकच नसतं. आता हेच बघ ना, मागच्या आठवड्यात मी किती मेहनतीने फरशी धुतली…

तर तिने साधं छान ही म्हटलं नाही…”

मी किचनमधून परत आलो.

“मी बायकोला ‘मदत’ करत नाही. खरं तर तिला मदतीची गरजच नसते. तिला हवा असतो ‘पार्टनर’. आणि घरात, समाजात मी तिचा पार्टनर आहे.

पण मी काही घरतल्या कामात तिची मदत करत नाही.

घर स्वच्छ करण्यात मी तिला ‘मदत’ करत नाही,

कारण मीही याच घरात राहतो आणि त्याची स्वच्छता माझीही गरज आहे.

स्वैपाकात मी तिला ‘मदत’ करत नाही,

कारण जेवण ही माझीही गरज आहे आणि म्हणून स्वैपाक करणं माझंही काम आहे.

जेवणानंतर मी ताटं धुतो,

कारण ती ताटं मीही वापरत असतो.

मी मुलांना सांभाळण्यात तिला मदत करत नाही.

कारण ती माझीही मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे एक बाप म्हणून ते माझंही काम आहे.

कपडे धुणे, वाळवणे, घड्या घालून ठेवणे या कामात मी तिला मदत करत नाही.

कारण ते कपडे माझे अन माझ्या मुलांचे असतात.

मी घरात तिला ‘मदत’ करत नाही,

कारण मीही या घराचा एक हिस्सा आहे.

अन् मुद्दा राहिला तो तिने तुझं कौतुक करण्याचा तर आठवून बघ, तिने जेव्हा घर स्वच्छ केलं, कपडे धुतले, स्वैपाक केला, मुलांना संभाळलं तेव्हा तू तिला साधं ‘थँक्यू’ तर बोललास का?

बोलायला हवं.

अगदी कोणत्याही मर्यादांचा बाऊ न करता बोलायला हवं.

मी बोलतो.

पण थोडं वेगळ्या स्टाईलने.

जसं, “थँक्यू डार्लिंग…!!

तुझी खरंच कमाल आहे!!”

तुला हे मूर्खपणाचे वाटेल कदाचित.

जणू एखादी नवलाची गोष्ट मी तुला सांगतोय,

असे तुझे डोळे मोठ्ठे मोठ्ठे झालेत.

पण खरं तर असं काहीही नाही,

आयुष्यात एकदाच फारशी पुसून तू एका मोठ्या कौतुकाची अपेक्षा करत होतास. पण, खरं सांग तिच्यासाठी तू असा कधी विचार केला आहेस का?

तुझ्यासाठी म्हणून सांगतो,

या कामांसाठी फार मेहनत अन संयम लागतो.

जो आपल्यात नसतो.

आपल्याकडे कष्टाच्या कामांना मर्दानी काम म्हणतात. पण आपली आई, बायको जे काम करत असतात ते मर्दानी कामाहून मुळीच कमी नसते.

कदाचित आपल्याला हेच शिकवलं जातं की हे काम तितकं मेहनतीचं नसतं.

साधं बोटही फिरवावं लागत नाही.

खरं तर हे काम केल्यावर समजतं.

जर तू तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा करत असशील तर तिच्याही कामाचं कौतुक कर. अगदी मनापासून.

तिला हात दे, तिच्या ‘पार्टनर’सारखा.

एखाद्या पाहुण्यासारखा नको जो फक्त जेवण्यासाठी, झोपण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा केवळ इतर गरजा पूर्ण करण्यासाठी घरात येतो.

आपल्याला हे बदल आपल्या घरापासून सुरु करावे लागतील. आपण आपल्या मुलींना अन मुलांना ‘मैत्रीचं खरं मर्म’ शिकवायला हवं. तेव्हा ते एकमेकांचं कौतुक करतील अन त्याहून अधिक एकमेकांच्या कामाचा आदर करतील.

(‘The Bookoholics’ या इंग्रजी लेखाचा मराठी स्वैर अनुवाद. )

मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात 

अनुवादक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सुख माझ्या नजरेतून…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “सुख माझ्या नजरेतून…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..?

*

भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं,

सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं,

नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

*

साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं,

हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं,

डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

*

एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं,

वाटेत पडलेलं केळीच साल आपणच उचलणं,

टपरी वरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं…

*

एखाद्या चिमणीला जवळून बघणं,

हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं,

एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं…

*

खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं,

रातराणीचा सुगंध उरात साठवणं,

पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं,

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं…

*

तळहातीचा फोड हळुवार कुरवाळणं

जखमेवर हलकीशी फुंकर घालणं

दु:खाशिवाय सुख नाही हे कळणं

सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?

ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

कवी : श्री मंगेश पाडगावकर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मन शहाणं ठेऊन वाचा… लेखक : श्री संजय आवटे ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? वाचताना वेचलेले ?

☆ मन शहाणं ठेऊन वाचा… लेखक : श्री संजय आवटे  सुश्री नीलांबरी शिर्के 

मन शहाणं ठेऊन वाचा – – 

‘जगन रेप कर’ असं जगनला कोणी शिकवत नाही, हे खरं.

… पण, ‘तुला काय अक्कलय! गप्प बस’, असं बाप आईला चार-चौघात म्हणतो, तेव्हा पहिलीतल्या जगनला कळतं की बाईला काही सन्मान वगैरे नसतो.

बहिणीला ‘बघायला’ पाहुणे येतात. तेव्हा तिला शोरुमसारखं पाटावर बसवलं जातं. पाय दाखव. चालून दाखव, वगैरे सुरू असतं, तेव्हा तिसरीतल्या जगनला कळतं की गाडी वा टीव्ही विकत घेणं आणि लग्नासाठी बायको घेणं (आणि, इथं पैसे आपल्यालाच मिळतात! ) यात काही फरक नाही.

मैत्रिणींच्या गराड्यात रमलेल्या मावशीचा एकदा पदर पडतो आणि जगनलाही काहीतरी दिसू लागतं. मग, सहावीत असलेला जगनचा मावसभाऊ म्हणतो, ‘आई, पदर नीट घे. ‘ तेव्हा, मावशीच्या सगळ्या मैत्रिणी त्याचं कौतुक करायला लागतात. ‘पोरगं मोठं झालं बघ’, असं मावशीला सांगू लागतात. तेव्हा आपला मोठेपणीचा ‘रोल’ जगनच्या लक्षात येतो.

शाळेतल्या बाई चांगल्या शिकवतात, असं सातवीतला जगन आईला सांगतो, तेव्हा आई म्हणते, ‘नटवी मेली! दंड मोकळे ठेवते. बेंबीखाली साडी नेसते. ती रे कसली चांगली? ‘ तेव्हा, बाई म्हणजे शरीर हे जगनच्या लक्षात येतं.

मग तोही रस्त्यावरच्या पोरींकडं असंच बघत बसतो.

वर्गातल्या बाई असोत की त्याला तपासणार्‍या डॉक्टर, त्याला हे आधी दिसतं. मग कळतं की हे ‘शरीर’ शिक्षिका आहे किंवा डॉक्टर!

मूल होत नाही म्हणून त्याच्या मावशीला काकानं सोडल्यावर, ‘हीच कमनशिबी’ असं आजी म्हणते, तेव्हा ‘बायको म्हणजे पोरं जन्माला घालायची मशिन’ हे जगनला समजत जातं.

एके दिवशी शेजारच्या मालतीकाकू रात्री कोणाच्या तरी बाइकवर घरी येतात, त्यावर आई आणि इतर बायका करत असलेलं गॉसिप जगन ऐकत असतो. बाई पुरुषाच्या जवळ आली म्हणजे तसलंच काहीतरी घडतं, हे तर जगनला समजतंच, पण त्यात चूक फक्त बाईची असते. पुरुष तर मजा मारत असतात. हेही जगनला समजून चुकतं.

आठवीतल्या जगनला पहिल्यांदा हस्तमैथुन करावं वाटतं. आणि, आपण चूक केलं का बरोबर, हेही त्याला माहीत नसतं. पण, ते विचारायला कोणी नसतं. त्यामुळं अशा गोष्टी लपूनछपूनच करायच्या असतात, याची त्याला खात्री पटते.

एकदा रात्री धाकटी बहीण उशिरा येते. जगन नेहमीच त्याहून उशिरा घरी येत असतो. बहिणीला आई बडवते आणि म्हणते, ‘बाई म्हणजे काचेचं भांडं. पुरुषाला काय, तो काहीही करेल! ‘ तेव्हा, जगनला समजतंः बाईनं आपलं चारित्र्य जपायचं असतं आणि पुरुषानं पौरुष सिद्ध करायचं असतं.

‘आज तीन *** मारले. बायको घायल. नको, नको असं ती किंचाळतेय. मी थोडाच गप्प बसतोय’, असं नुकतंच लग्न झालेला त्याचा दादा मित्रांच्या कोंडाळ्यात सांगत असतो, तेव्हा पौरुष म्हणजे काय, हे जगनला समजतं.

काकू शेजारणीला सांगत असते, ‘ती प्रिया उगीच नाही झाली मेंबर. अण्णांपुढं दहादा पदर पाडल्यावर मग ते काय सोडतील का तिला? पुरेपूर किंमत वसूल केली तिनं. अण्णांना पाहिजे, ते त्यांनी मिळवलं. आपण नाही बाई असलं काही करणार. नाहीतर मीच झाले असते मेंबर! ‘ मग जगनला हा ‘व्यवहार’ समजतो.

गणेशोत्सवाच्या रांगेत किती पोरी दाबल्या, यावर गल्लीत पोरांची चर्चा सुरू असते, तेव्हा नववीतल्या जगनचे हात सळसळू लागतात.

*

कधीतरी कळतं, जगननं कोणावर तरी बलात्कार केलाय.

जगनला ‘रेपिस्ट’ कोणी केलं?

फासावर द्यायचं कोणाला?

जगनला द्यायचंच, पण या घराचं काय करायचं!

*

जगन तुमच्या घरातही आहे.

त्याला कसं वाढवायचं, ते आपण ठरवायचंय.

लेखक : श्री संजय आवटे

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्लो लिव्हिंग : थांबून श्वास घेण्याची कला…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्लो लिव्हिंग : थांबून श्वास घेण्याची कला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

दररोज सकाळी अलार्म वाजतो, आपण डोळे चोळत उठतो आणि धावपळ सुरू होते — नोकरी, फोन, ई-मेल, मीटिंग्स, ट्रॅफिक, सोशल मीडिया… आणि रात्री थकून कोसळताना आपल्यालाच प्रश्न पडतो.

… “आज दिवसभर धावलो, पण खरंच *जगणं* झालं का?”

याच ठिकाणी सुरू होते “स्लो लिव्हिंग” ही सुंदर संकल्पना —

थोडं थांबणं, शांत श्वास घेणं आणि *आता* या क्षणात जगणं.

 *स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही? *

हे “आळशीपणा” नाही, “काम टाळणं” नाही आणि “सगळं सोडून डोंगरात जाऊन बसणं” तर मुळीच नाही.

स्लो लिव्हिंग म्हणजे — आयुष्य थांबवणं नाही, तर *त्याचा वेग स्वतः ठरवणं. *

*स्लो लिव्हिंग म्हणजे काय आहे? *

स्लो लिव्हिंग म्हणजे —

  1.  जाणीवपूर्वक जगणं. 
  2.  महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ राखणं.  
  3.  प्रत्येक क्षणातलं सौंदर्य ओळखणं.  

उदाहरणार्थ –

सकाळी ऑफिसला जायचं आहे, म्हणून घाईत गाडी दामटतो. कारण उठायला उशीर झाला, रात्री मोबाईलवर स्क्रोल करत बसलो… पण जर थोडं लवकर झोपलो आणि सकाळी शांततेने उठलो, तर गाडीही हळू चालवता येते, मनही प्रसन्न राहतं. एवढं साधं आहे हे!

आपल्याला सगळं हवं असतं — नवी गाडी, नवा फोन, नवे कपडे…

पण एकदा मनाला विचारलं की, “खरंच ही गरज आहे का?”

उत्तर बहुतेक वेळा “नाही” असतं.

जसं ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक वस्तू कार्टमध्ये टाकतो, आणि शेवटी विचार करतो — “खरंच हे आवश्यक आहे का? ”

तो विचार आला की विषय संपतो.

… गरजा मर्यादित केल्या की मन मोकळं होतं, आणि तेव्हाच शांत श्वास घेता येतो.

*स्लो लिव्हिंगचा मजेशीर भाग*

कधी कधी हे खूप साधं असतं —

* सकाळी चहाच्या कपातून येणाऱ्या वाफेकडे बघत पावसाचा सुगंध अनुभवणं.

* मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणं.

* मित्राला भेटताना मोबाईल बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारणं.

– – या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचा खरा गोडवा आहे —

आणि त्यासाठी *एकही रुपया खर्च नाही. *

स्लो लिव्हिंग म्हणजे फक्त मंद गती नाही, तर *उद्देशपूर्ण गती* आहे.

आपल्याला का जगायचं आहे, काय महत्वाचं आहे — हे उमजलं की धावपळसुद्धा शांत वाटते.

जर तुमचा उद्देश आरोग्य राखणं असेल —

तर तुम्ही जेवण, झोप, व्यायाम यांना वेळ द्याल.

जर उद्देश मन:शांती असेल —

तर तुम्ही कामापेक्षा स्वतःकडे लक्ष द्याल.

आजच्या जगात स्लो लिव्हिंग का आवश्यक

आज “फास्ट” जगणं म्हणजे “स्मार्ट” समजलं जातं. “मला वेळ नाही” असं सांगणं म्हणजे प्रतिष्ठा वाटते. 

लोक सतत व्यग्र दिसतात, पण आतून थकलेली असतात.

फास्ट लाईफ देतं यशाचं बाह्य रूप, पण घेऊन जातं मन:शांतीचं मर्म. 

त्याउलट, स्लो लिव्हिंग करणारा माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून समाधानी असतो.

तो प्रत्येक क्षणात जगतो, आणि म्हणूनच त्याचं जगणं पूर्ण वाटतं.

स्लो लिव्हिंग म्हणजे आयुष्याचा वेग कमी करणं नव्हे,.. तर मनाचा वेग कमी करणं. 

स्लो लिव्हिंग म्हणजे झाडासारखं — शांत, स्थिर, पण तरीही सतत वाढत राहणारं.

स्लो लिव्हिंग म्हणजे — पावसाच्या थेंबात, मुलाच्या हसण्यात, आणि गप्पांच्या ओघात आनंद शोधणं.

आणि सर्वात महत्त्वाचं —

स्लो लिव्हिंग म्हणजे स्वतःसाठी थांबून श्वास घेणं. 

थोडं थांबा… डोळे मिटा… आणि श्वास घ्या. 

कदाचित तुम्हाला जाणवेल —

याच क्षणात संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. 

… Think about it.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆“तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?

ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?

गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला.

चित्रकलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे.

सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.

इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही – सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.

संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळीअवेळी पेटी बडवणाऱ्या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.

नाटकात पहिली भूमिका मिळाली, ती ‘नरवीर तानाजी मालुसरे’ ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी ‘डायरेक्शन’ केलेल्या प्रयोगात!

तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.

-“मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे, ” 

हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख!

तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत ‘डायरेक्शण’केलेले स्मरते.

सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.

असो; हे विषयांतर झाले.

विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही.

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे.

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक दु:खद सत्य… – कवी : एक अनामिक मास्तर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ एक दु:खद सत्य… – कवी : एक अनामिक मास्तर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

विद्यालयाच्या जागेपायी

कुणीच इथं भांडलं नाही

अन् देवालयाच्या जागेसाठी

रक्त कमी पडलं नाही…

*

माझाच देव मोठा म्हणण्यात

रक्ताच्या नद्या वाहिल्या

अन् ज्ञानगंगा कोरडी पडत

शाळा इथे ओसाड पडल्या…

*

शाळा अजुनही तशीच आहे

पडक्या, तुटक्या भिंतींची

गरीब माझ्या देशामध्ये

उभी मंदिरं सोन्याची…

*

शाळे मधली दानपेटी

भरलेली कधी पाहिली नाही

अन् मंदिराची दानपेटी

रिकामी कधी राहिलीच नाही…

*

शाळेतला पालक मेळावा

पालकांवाचून राहून गेला

देवालयात चेंगराचेंगरीत

माणुस मात्र तुडवून मेला…

*

विद्येचं ज्ञान देऊन

गुरूजी गरीबच राहीला

अन् अंधभक्तांचं’ दान घेऊन

पुजारी धनवान गब्बर झाला…

*

खरंतर धर्म नावाचं पुस्तक 

शाळेत कधीच उघडत नाही

पण धर्माच्या नांवाशिवाय

देशात पानही हालत नाही…

 कवी : एक अनामिक मास्तर

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares