☆ शून्य आणि अनंत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
“तुला कसं कळतं की तू श्रीमंत आहेस?”
या प्रश्नाचं एक अद्भुत उत्तर
एका IIT विद्यार्थ्याकडून :
जेव्हा मी माझं B. Tech करत होतो, तेव्हा आमच्याकडे ‘Mechanics’ शिकवणारे एक प्राध्यापक होते.
त्यांची लेक्चर्स खूपच रंजक असायची, कारण त्यांची शिकवण्याची आणि संकल्पना समजावण्याची पद्धत वेगळीच होती.
एकदा वर्गात त्यांनी काही प्रश्न विचारले:
१. शून्य म्हणजे काय?
२. अनंत म्हणजे काय?
३. शून्य आणि अनंत एकच असू शकतात का?
आम्हाला वाटलं की आम्हाला उत्तरं माहिती आहेत आणि आम्ही म्हणालो:
शून्य म्हणजे काहीच नाही.
अनंत म्हणजे कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी संख्या.
शून्य आणि अनंत हे विरुद्ध आहेत आणि ते कधीच सारखे होऊ शकत नाहीत.
त्यांनी आम्हाला प्रतिवाद करत विचारलं – अनंत म्हणजे नेमकं काय? कोणतीही संख्या कशी काय कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते?
आमच्याकडे उत्तर नव्हतं.
मग त्यांनी अनंताची संकल्पना एका मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितली, जी मला आज ३५ वर्षांनंतरही आठवते.
ते म्हणाले – एखादा निरक्षर मेंढपाळ आहे, ज्याला फक्त २० पर्यंत मोजता येतं अशी कल्पना करा.
जर त्याच्याकडे २० पेक्षा कमी मेंढ्या असतील तर तो नेमकी संख्या सांगू शकेल. (जसं की ३, ५, १४ वगैरे).
पण जर संख्या २० पेक्षा जास्त असेल, तर तो म्हणेल – “खूप आहेत. ”
त्यांनी मग समजावलं की विज्ञानात “अनंत” म्हणजे ‘खूप आहेत’ (आणि मोजता न येण्याजोगं नव्हे) आणि त्याचप्रमाणे “शून्य” म्हणजे ‘फार कमी’ (आणि काहीच नाही नव्हे).
उदाहरण म्हणून ते म्हणाले – जर पृथ्वीचा व्यास सूर्यापर्यंतच्या अंतराशी तुलना केला, तर पृथ्वीचा व्यास फारच लहान असल्यामुळे त्याला शून्य म्हणता येईल.
पण हाच पृथ्वीचा व्यास जर एका धान्याशी तुलना केली, तर तोच व्यास अनंत म्हणता येईल.
म्हणून त्यांनी निष्कर्ष काढला की तीच गोष्ट शून्यही होऊ शकते आणि अनंतही, हे पूर्णपणे संदर्भावर, किंवा तुलना करण्याच्या मापदंडावर अवलंबून असतं.
श्रीमंती आणि गरिबी यांचं नातंदेखील शून्य आणि अनंत यांच्यासारखंच आहे.
हे सगळं तुमच्या इच्छांच्या तुलनेवर अवलंबून आहे.
जर तुमचं उत्पन्न तुमच्या इच्छेपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही श्रीमंत आहात.
जर तुमच्या इच्छा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही गरीब आहात.
मी स्वतःला श्रीमंत मानतो, कारण माझ्या इच्छा माझ्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी आहेत.
मी श्रीमंत झालोय ते खूप पैसा मिळवून नव्हे, तर माझ्या इच्छांना कमी करून.
जर तुम्ही तुमच्या इच्छांना कमी करू शकलात, तर तुम्हीही या क्षणी श्रीमंत होऊ शकता.
तुमचं आयुष्य नेहमी चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी, चांगल्या लोकांनी आणि सुंदर मित्रांनी श्रीमंत होवो.
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘ शून्य महत्वाचे की क्षण?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
☆
जीवनाचे 20 वर्षे वाऱ्यासारखी उडून गेली. मग सुरू झाली नोकरीची शोधमोहीम. हे नाही ते, ते नाही हे. अशी धडपड करत करत 2–3 नोकऱ्या सोडल्या, आणि एक ठरली. थोडी स्थिरता सुरू झाली.
हातात आला पहिल्या पगाराचा चेक. तो बँकेत जमा झाला आणि सुरू झाला खात्यात जमा होणाऱ्या शून्यांचा अखंड खेळ. 2–3 वर्षे पुन्हा उडून गेली. बँकेतले शून्य थोडे वाढले. वय 25 झाले.
आणि मग विवाह झाला. जीवनाची रामकथा सुरू झाली. सुरुवातीची 1–2 वर्षे मऊ, गुलाबी, स्वप्नाळू गेली. हातात हात घालून फिरणे, रंगीबेरंगी स्वप्नं पाहणे. पण हे दिवस पटकन उडून गेले.
आणि मग बाळ येणार ही चाहूल लागली. वर्षभरात पाळणा झुलू लागला. आता सारे लक्ष बाळावर केंद्रित झाले. उठणं, बसणं, खाणं, पिणं, लाड कोड…
वेळ कधी निघून गेला, समजलंच नाही.
या दरम्यान माझा हात तिच्या हातातून कधी निसटला, फिरणं-गप्पा मारणं कधी थांबलं, हे दोघांनाही कळलंच नाही.
बाळ मोठं होत गेलं. ती बाळात गुंतली, मी कामात. घर आणि गाडीच्या हप्त्यांची चिंता, बाळाची जबाबदारी, शिक्षण, भविष्याची सोय, आणि त्याचबरोबर बँकेत शून्यं वाढवायची धडपड. तिनंही स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं, मीही.
इतक्यात मी 35 चा झालो. घर, गाडी, बँकेत शून्यं, कुटुंब—सगळं होतं, तरी काहीतरी कमी जाणवायचं. पण काय, हे कळत नव्हतं. तिची चिडचिड वाढू लागली, मी उदासीन होऊ लागलो.
दिवस निघत गेले. वेळ सरकत गेला. मुलगा मोठा झाला. त्याचं स्वतःचं जग तयार झालं. कधी दहावी आली आणि गेली, कळलंच नाही. तेव्हा आम्ही दोघं चाळिशीत पोहोचलो. बँकेतली शून्यं वाढतच गेली.
एका निवांत क्षणी मला ते गेलेले दिवस आठवले. मी प्रसंग पाहून तिला म्हटलं,
“अगं, इकडे ये जरा. हातात हात घेऊन फिरायला जाऊ या. “
तिनं विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
“तुला काहीही सुचतं, इथे ढिगभर काम पडलंय आणि तुला फिरायचंय! “
कमरेला पदर खोचून ती निघून गेली.
मग आलं पंचेचाळिसावं वर्ष. डोळ्यांना चष्मा लागला. केसांनी काळेपणा सोडला. डोक्यात गुंतागुंत वाढू लागली.
मुलगा कॉलेजमध्ये. इथे बँकेत शून्यं वाढतच होती. बघता बघता त्याचं कॉलेज संपलं. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याला पंख फुटले आणि तो परदेशात उडून गेला.
तिचेही केस पांढरे होऊ लागले. कधी कधी डोकं साथ द्यायचं बंद करायचं. तिलाही चष्मा लागला. मी म्हातारा झालो. तीही वयस्कर दिसू लागली.
दोघं पंचावन्न–साठकडे जाऊ लागलो. बँकेतील शून्यांचा पत्ता नाही. बाहेर जाणं–येणं बंद झालं.
आता गोळ्या–औषधं ठरावीक वेळेला घेणं सुरू झालं. “मुलं मोठी झाली की सोबत राहतील, ” म्हणून घेतलेलं घर आता ओझं वाटू लागलं. मुलं केव्हा परत येतील, याच विचारात उरलेले दिवस जात होते.
एके दिवशी मी सोफ्यावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत होतो. ती दिवा–बत्ती करत होती. तेवढ्यात फोन वाजला. मी पटकन उचलला. समोर मुलगा होता. त्यानं सांगितलं की त्यानं लग्न केलंय आणि आता परदेशातच राहणार आहे.
त्याने हेही म्हटलं, “बाबा, तुमचे बँकेतील शून्य एखाद्या वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथे राहा. “
काही औपचारिक गोष्टी बोलून त्यानं फोन ठेवला.
मी परत सोफ्यावर येऊन बसलो. तीही दिवाबत्ती संपवून जवळ आली. मी हळूच म्हटलं,
“चल, आज पुन्हा हातात हात घालून बोलूया. “
ती लगेच म्हणाली,
“हो आले. “
माझा विश्वास बसला नाही. चेहरा आनंदाने उजळला. डोळ्यांत पाणी आलं. अश्रू गालांवर ओघळले. अचानक डोळ्यांची चमक हरवली आणि मी कायमचा शांत झालो.
ती पूजा संपवून माझ्या जवळ आली. म्हणाली,
“बोल, काय म्हणत होतास? “
पण मी काही बोललो नाही. तिनं माझ्या शरीराला स्पर्श केला. शरीर पूर्ण थंड झालं होतं. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो.
क्षणभर ती शून्य झाली.
“काय करू? “
तिला काही सुचेनासं झालं.
पण दोन मिनिटांतच ती सावरली. हळूहळू उठली, देवघरात गेली, एक अगरबत्ती लावली. देवाला नमस्कार करून परत आली.
माझा थंड झालेला हात हातात घेतला आणि म्हणाली,
“चल, कुठं फिरायला जायचंय तुला? काय गप्पा मारायच्या आहेत तुला? सांग! “
असं म्हणताना तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. माझं डोकं तिच्या खांद्यावर झुकलं. बाहेर अजूनही थंड वारा वाहत होता.
हेच का जीवन?
सगळे आपलं नशीब घेऊनच जन्माला येतात. म्हणून थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. जीवन आपलं आहे, तर जगण्याची पद्धतही आपली असली पाहिजे.
सुरुवात आजच करा, कारण उद्या कधीच येणार नाही…
” तुम्हाला काय वाटतं… बँकेतले शून्य महत्त्वाचे आहेत की एकत्र घालवलेले क्षण? “
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “एक गाय, ३३ कोटी देव = २० रु” – सुश्री आशा धनाले ☆ प्रस्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆
★★★
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर. केशवचंद व्यापाऱ्याचं दुग्ध भंडार. त्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल. केशवचंदचा धाकटा मुलगा या दुकानाचा मालक. त्याच्या शेजारी हिरव्या चाऱ्याचं एक लहानसं दुकान. त्यामध्ये चाऱ्याच्या लहान मोठ्या पेंड्या भरलेल्या. त्याचा मालक मोठा मुलगा.
आज त्यांच्या घरी मोठ्या मुलाची सोयरीक करण्यासाठी पाहुणे आलेले. पाहुण्यांना घराची, दुकानांची स्थिती अतिशय समाधानकारक दिसली. पण त्यांच्या मनात जी मोठी शंका होती ती त्यांनी बोलून दाखवलीच. “काय हो शेठ, मोठ्या मुलाचे चाऱ्याचे दुकान आणि धाकट्याचे दुग्ध भांडार. असे का? ” केशवचंदनी समजावून सांगितले, “अहो, खरे तर मोठ्या मुलाच्या दुकानावरच धाकट्याचा धंदा चालतो. म्हणून मोठ्याचाच फायदा जास्त आहे. ” ” आॅं, ते कसे काय? ” “अहो, हे काय, समोरच मंदिर आहे. प्रवेशदाराच्या बाहेर, उजव्या बाजूला दोन गाई हिरवा चारा खात आहेत ना, त्या गाई पण आमच्या आणि चारा पण आमचा आहे. ” शेठ नी सांगितलं.
पाहुण्यांच्या डोक्यात गोंधळ सुरू झाला. गाईंच्या चारा खाण्यापासून दुकानाचा फायदा कसा काय? केशवचंदनी हसत हसत पुन्हा समजावले, “पाहुणे, असं बघा, इथे त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी गाय फार महत्त्वाची आहे. कारण तिच्या अंगात ३३ कोटी देव आहेत. ‘२० रु. ची फक्त एक छोटीशी चारापेंडी गाईला खायला घालून ३३ कोटी देवांना तृप्त करता येते व मोठे पुण्यही कमावता येते. ‘ हे असे आम्हीच भक्तांना सांगतो. त्यामुळे दिवसभर गाईंना चारा खायला घालण्यासाठी प्रचंड रीघ लागते. प्रत्येक एका तासानंतर आम्हाला गाई बदलाव्या लागतात. अशा २० गाई आमच्याकडे आहेत. त्यांची पोटं भक्तगणच भरतात. या गाईंकडून रोज मिळणाऱ्या उत्पादनावर धाकट्याचे दुकानही चालते. जिथे गाई उभ्या आहेत त्या जागेचे भाडे नाही, चारा पेंडी देण्यात मेहनत खूपच कमी, फायदा मात्र दिवसभर आणि वारेमाप. तर काय पाहुणे? आहे ना तुमचा होणारा जावई लाखांचा धनी? मग जमवायची ना सोयरीक? अहो, इथे येणाऱ्या भक्तांच्या भक्तीचा प्रश्न आहे. ती भक्ती अबाधित ठेवली की झालं! पैसाच पैसा. काय समजलं? ”
“आता सगळं व्यवस्थित समजलं शेठ! आता सोयरीक जमवणार तर त्र्यंबकेश्वरच्या मुलाशीच. कारण इथं भोळ्या भक्तांना कधीच तोटा नाही. ‘जय भोलेनाथ! ‘ “
★★★
लेखिका : सुश्री आशा धनाले
मिरज
प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “टीचर… ते फटिचर…!” – संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतेय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.
त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.
तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God… Another is Teacher ! ते दोघेही खोटं बोलत नसतात… मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन… ” अशी आॕपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.
प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेंव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले.
तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने ‘आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा ? जाने दो उसे… ‘
वऱ्हाडकरांचे टीचर नांवाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.
कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात ‘आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, ‘ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना…
शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
☆
संकलक / लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “रोजचा दिवस तिचाच…!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
जेव्हा मी पावसातून भिजत घरी आलो…
बाबा ओरडले, “अरे गाढवा, छत्री का नेली नाहीस?”
बहीण म्हणाली, “आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल!”
आजोबा ओरडले, “पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले? एव्हढं भिजत यायची काय गरज होती?”
पण…
आई माझे केस पुसत म्हणाली, “मूर्ख आहे हा पाऊस! माझा मुलगा घरी येईपर्यंत याला थांबायला काय झालं होतं?”
★★★
बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. मी बाहेरुन आलेलो असतो. बाहेरच्या दाराच्या कोपऱ्यात भिजलेली छत्री ठेवतो आणि मागे वळतो. मधल्या दारात आई उभी असते, “उजव्या बाजूने पूर्ण भिजलायस… तिला उद्या घरी यायला सांग… मला भेटायचेय…”
★★★
मित्रांमधे खेळता खेळता उंबरठ्यावर बसलेल्या आपल्या आईला बघत तो दुडूदुडू धावत येतो आणि तिच्या कुशीत घुसतो.
“आई, तुझ्या पोटात येण्याआधी मी कुठे होतो गं?”
“तू ना… कुठे बरं होतास? हां… तू ना माझ्या स्वप्नात होतास… माझ्या डोळ्यात होतास… माझ्यातच माझ्यातला थेंब होतास…” (टागोरांच्या एका कवितेवर आधारित)
★★★
संध्याकाळची वेळ. गाडी चालवत घरी येतोय. समोर काचेवर पाऊस. बाहेर अंधार होत चाललाय. फोन वाजतो, “अरे कुठे आहेस? पाऊस पडतोय… सावकाश ये… लवकर ये… मी वाट बघतेय….”
डोळ्यात निरांजनं घेऊन दारात वाट बघत उभी असलेली आई….
★★★
“गाढवा, अक्कल कधी येणारेय तुला? बाबा इथं मर मर मरतायत आणि तुला शिकवतायत. तर तू गणितात वीस पैकी दोन मार्क आणून मला न दाखवता पेपर फाडून टाकलास? तुला काय वाटलं मला समजणार नाही? आयतं मिळतंय ना म्हणून हे सुचतेय…
जा स्टॅण्डवर जाऊन हमाली करून पाच रुपये कमवून आण. मग कळेल तुला कमावणं काय असतंय ते…
बाबा बोलत नाहीत म्हणून तुझी थेरं वाढलीत…
पण आता नाही चालणारेय हे…
जोवर तू आपण होऊन बाबांना हे सांगत नाहीस तोवर तू उपाशी बसायचं…
काही मिळणार नाही तुला…
भूक लागली तर बाहेर जाऊन भीक मागून खा…
पण घरातलं मी देणार नाही…”
रात्री न बोलता तसाच झोपलो. आई बाबा दोघंही बोलले नाहीत.
दुसरे दिवशी सकाळी उठून बाबा अ़ॉफिसला जायच्या वेळी धाडस करून त्यांना सांगितले. एक दणका पाठीत आणि एक गालावर बसला आणि न बोलता ते ताडताड निघून गेले.
आतून आई आली. पदराला हात पुसत होती. माझ्या रडक्या चेहऱ्याकडे बघत मला जवळ घेतले. केसातून हात फिरवत, “राजा, अभ्यास कर रे. अभ्यासाशिवाय काही खरं नाही रे! अरे बाबा एव्हढं कुणासाठी करतायत? आपल्यासाठी, तुझ्यासाठीच ना! मग, त्यांना बरं वाटायला तू अभ्यास करायला हवास, मार्क चांगले पाडायला हवेत. चल, आता रडणं बंद. आता अभ्यास करायचा आणि मार्क चांगले पाडायचे, हं!”
तोवर बाबा परत येतात, “जा, गाढवा. जा… ते रडकं तोंड धुवून घे आणि जेवण कर… कालपासून ती पण उपाशीच आहे… तुझ्यासाठी !”
★★★
पार्टीत बसलोय. वेळ झालाय. साडेबारा वाजलेत. पार्टी संपते. बाहेर येऊन मोबाईल बघतो. तेरा मिस कॉल्स. परत कॉल करायचा धाडस नसते.
गाडी अंगणात आत घेतो. मधला लाईट सुरूच असतो. गाडीचा आवाज ऐकून दार उघडले जाते. पेंगुळल्या डोळ्यांनी, दिवसभराच्या शिणवट्याने थकलेली ती दारात. “अरे, किती फोन करायचे रे. काळजी वाटते. एक फोन घ्यायला काय होतंय रे. म्हातारं झाल्यावर कळेल तुम्हाला… चल, ये आता आत. आत कट्ट्यावर थंड ताक ठेवलेय ते पी आणि झोप… नंतर सकाळी ॲसिडिटी झाली म्हणून जेलुसिल खात बसशील आणि आता हे जरा कमी कर… तूही पन्नाशी पार केलीयस आता. काळजी घे रे आता जरा स्वतःची.”
★★★
मुलाचं लग्न ठरलेलं. एक दिवस आईचा फोन. येऊन जा. मी जातो. आई बाबा समोर बसवून घेतात आणि हातामधे एक पाकिट कोंबतात. मी उघडून बघतो. मुलाच्या नावाने अडीच लाखाचा चेक!
“आम्ही तुला काही दिले नाही. पण नातवाला देऊ शकतोय आज. हे त्याच्यासाठी…!”
★★★
घराची थोडी दुरुस्ती करायचीय. पैसे असतात पण गंमत करायची म्हणून मी विचारतो, “तुम्ही किती देणार?”
ताडकन् आई बोलते, “द्यायचं ते सगळं दिलेय. आता फक्त सईसाठीचे पाच लाख आहेत ते मी मोडणार नाही. ते तिलाच तिचं लग्न ठरलं की देणार. इथे जे करायचेय ते तूच करायचेस. तुला एक पैसा देणार नाही. हां पण कैरीचं लोणचं देणारेय…”
★★★
शनिवारी संध्याकाळी अंगणातल्या मारुतीसमोर भीमरुपी, रामरक्षा, करुणाष्टके म्हणून झाली की आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत ‘ईडापिडा टळो’ म्हणत दृष्ट काढणारी… आई !
★★★
अशी आई असल्यावर आपल्याला दृष्ट लावायची कुणाची टाप आहे…
आणि म्हणूनच – –
आईचा दिवस वर्षातला फक्त एकच नसतो, तर सगळं आयुष्यच तिचं असतं… रोजचा दिवस तिचाच…!
★★★
लेखक : अज्ञात
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द!!
मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला. मला म्हणाला आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो.
मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो. मी काही बोलणार तेवढ्यात, मित्राची आई हातात पिशवी घेवून इथे स्वत: येवून पोहचली.
मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं, “भल्या माणसा, ही कसली चेष्टा करतोयस वेड्या, आई तर आहे तुझ्या बाजूला..”
मित्र आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला, अरे भाऊ,.आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्याऐवजी मी आईला जिवंतपणीच तृप्त करू इच्छितो. त्याचे असे मत होते कि, “जिवंतपणीच आई- वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द”.
तो पुढे म्हणाला, “आईला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते. म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून जातो, जे जे तिला आवडतं, ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात, अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’, आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला.
सकाळी आई “दासबोध” वाचायला बसते नियमित, मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे की, देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा, आईचा चष्मा साफ करण्याने अधिकच पुण्य मिळेल” आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला.
मी घरी येउन सुन्न मनाने पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो. मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटलं. रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरच ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, एवढे निश्चित.
अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही. त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते. खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल, पैश्यापेक्षा प्रेम, आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात.
आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरेपूर जाणीव असते. पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाहीत, त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतरी वृद्ध माता पिता, कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो यावर कवी धर्मेश ची ओळ आहे…
”आधी माता मग पिता.. मग घेईन प्रभू नाम… मला नकोय दुसरे तीर्थधाम”!!
संत कबीर असे म्हणतात,
जीते बाप को रोटी नां दे
मरे बाद क्यो पछतांये ॥
मुठभर चावल धाबेपर झोककर
कव्वे को बाप बनाये॥
संत तुकोबाराय असे म्हणतात…
भुके नाही अन्न ।
मेल्यावरी पिंडदान ॥
हे तो चाळवा चाळवि ।
केले आपणची ठेवी ॥
प्रिय मित्र-मैत्रिणीनो, मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका… जिवंतपणी आपण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा- अर्चा आणि पिंडदान केल्यास काय उपयोग त्याचा?
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈