मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चालता चालता मन थबकले… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ चालता चालता मन थबकले… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

आज सकाळी फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्यापासून ५०० मीटर पुढे एक व्यक्ती खूप जलद गतीने चालत होती.

बहुदा रोज नेमाने चालत असणार.

निरखून पाहिल्यावर लक्षात आले, की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी. असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन, ही खात्री झाली. मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला अजून १ मैल चालायचे होते….. मग घरी परतायचे होते

व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू, याची पुरेपूर खात्री मला होती…

थोड्याच वेळात लक्षात आले, की आम्हां दोघांमधील अंतर कमी झाले आहे. मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते.

माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती पाहून… आणि तो क्षण आला, मी त्या गृहस्थाला पार केले, मागे टाकले.

हुर्र्ये..! हुर्र्ये…!! हुर्र्ये….!!!

मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलोच की आपण!

जिंकली आपण स्पर्धा!

स्पर्धा? कसली स्पर्धा? कुठली स्पर्धा? कोणाशी स्पर्धा?

याबद्दल त्या व्यक्तीला तर काहीच माहीत नव्हते. ती या स्पर्धेचा भागही नव्हती.

मात्र जिंकण्याच्या ईर्ष्येने मीच माझा नियमित रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो. जेथून वळायचे होते, ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते.

अचानक चिडचिड होऊ लागली,

अस्वस्थता वाढली. माघारी जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता.

असेच होते ना आयुष्यातसुद्धा?

सगळे लक्ष कोण पुढे आहे,

कोण पुढे जातो आहे,

कोण पुढे जाईल?

याकडेच असते.

सहकारी? शेजारी? मित्र? नातेवाईक? यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.

मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते. या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे

“हे न संपणारे दुष्टचक्र आहे. ”

ही नशा आहे, ही झिंग आहे,

हे ध्यानात येत नाही. कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे, हेही ध्यानात येत नाही.

विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व आपण सुख गमावून बसतो.

▪️कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की!

▪️कोणाच्या तरी मुला-मुलींची लग्ने लवकर होणारच!

▪️त्यांना सासर उत्तम मिळणारच!

▪️कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच!

▪️कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणारच!

▪️तो अगदी मोठ्या पदावर असणार. त्याचा पगार गलेलठ्ठ असणारच!

▪️कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच!

▪️कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच!

▪️कोणाजवळ तरी काही तरी वेगळे, अधिक असणारच!

कुणाशी तुलना करून काहीही होत नसतं. शेवटी आपली गती ती आपली गती. आहे ते कसे उपभोगता येईल, हे पाहावे. दुसऱ्याचा तिरस्कार, द्वेष, मत्सर, असूया करून, क्लेश करून घेऊन जगणे योग्य नव्हे. स्वतः शक्य आहे तेवढे चांगले करावे. जेवढी मदत करता येईल तेवढी करावी. जमत नसेल तर आपण स्वतः स्वतःसाठी जगावे आणि कायम आनंदी राहावे.

 ☆ ☆ ☆ ☆

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संवेदनशील पोलिस… – लेखक : श्री अजय पाटील ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ संवेदनशील पोलिस… – लेखक : श्री अजय पाटील ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

गोष्ट अमेरिकेतील आहे. बॉबी व्हाईट नावाच्या पोलिसाला मुलं रस्त्यावर दंगामस्ती करून गोंधळ घालत असल्याचा कॉल आला. हा पोलीस घटनास्थळी पोहोचला, तर त्याने बघितले की काही मुले रस्त्यावर बास्केटबॉल खेळत होती.

पोलीस आल्याचे बघून मुलं जरा घाबरली मात्र बॉबी व्हाईटने त्यांच्या हातातील बास्केटबॉल घेतला आणि स्वतः त्यांच्यामध्ये खेळू लागला. ते बघून त्याच्यासोबत आलेले पोलीस साथीदारसुद्धा मुलांसोबत खेळायला लागले. सुरुवातीला तिथे 4-5 मुले होती मात्र पोलिसांना खेळतांना बघून आजूबाजूच्या घरातील मुलेसुद्धा त्यांच्यात सामील झाली.

संध्याकाळी पोलीस डिपार्टमेंटच्या पी. आर. ने त्यांच्या वेबसाईटवर पोलिसांचा मुलांसोबत खेळतानाचा व्हिडिओ अपलोड केला.

आणि त्याखाली लिहिले “मुलांनी घरात बसून व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा किंवा टीव्ही बघण्यापेक्षा गल्लीत खेळलेले कधीही चांगले”.

हा व्हिडिओ तब्बल 50 लाख लोकांनी बघितला. तसेच दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओची अमेरिकाभरात चर्चा झाली.

अमेरिकन मीडियानेसुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि आपल्या संध्याकाळच्या प्रोग्राममध्ये चर्चासत्रं आयोजित केली.

पुढच्या वेळेला बॉबी व्हाईट आपल्या सोबत एक सरप्राईज घेऊन गेला. मुलं खेळत असताना पोलिसांच्या कारमधून प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर शकील ओनिल उतरला. मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शकील ओनिल मुलांमध्ये बराच वेळ खेळला. त्यातील एका छोट्या मुलाला त्याने 100 डॉलरही बक्षीस दिले.

या घटनेचे पडसाद अमेरिकेत उमटले आणि अमेरिकन जनतेने पोलिसांचे आभार मानले.

बऱ्याच ठिकाणी मुले घराबाहेर पडून गल्लीत खेळायला लागली. आणि लोकांनीसुद्धा त्यांच्याबद्दल तक्रार करणे सोडून दिले.

हा आमूलाग्र बदल फक्त एका संवेदनशील पोलिसामुळे घडला.

आपल्याकडेही भारतात आता मुलांनी गल्लीत खेळणे जवळपास सोडून दिले आहे. पालकांना सुद्धा मुलांचे घरातच राहणे आवडते. अशामध्ये मुलांना स्मार्टफोन किंवा टीव्हीची सवय लागते आणि त्यांच्यातील शारीरिक ऊर्जा कामात येत नाही.

यामुळे मुलांना अनेक मानसिक शारीरिक समस्या निर्माण होतात. लोकांनासुद्धा शांततेची एवढी सवय झाली आहे की गल्लीत मुले खेळली की लगेच त्यांना त्रास होतो.

योग्य काय, अयोग्य काय हे समजून घेण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही.

ज्या गल्लीमध्ये मुलं खेळतात, खरंतर त्या गल्लीमध्ये चैतन्य, आनंद नांदतात.

मुलांना स्मार्टफोनच्या विश्वातून बाहेर काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना बाहेर खेळू देणे.

अशा वेळेला सर्व पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त केले, तर याहून चांगली गोष्ट कोणती असणार!

लेखक: श्री. अजय पाटील

चाइल्ड काऊन्सलर, जिंदगी फाउंडेशन.

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “म्हणून मी नेहमी आनंदी असतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “म्हणून मी नेहमी आनंदी असतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

मी भूतकाळ चघळत नाही..

भविष्याचीही मी चिंता करत नाही…

त्यामुळेच मी वर्तमानात जगतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मी कुणाकडून काडीची अपेक्षा करत नाही..

मी कुणाबद्दल राग मनात

धरत नाही…

रागात असलो तरी मी लगेच सगळ्यांना माफ करतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही..

कोणाच्या भरभराटीने जळत नाही..

आहे त्यातच समाधानी राहून

दुसऱ्याच्या सुखातही सुख मानतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही..

कोणावर कधीच जळत नाही..

साधं राहून आपल्या नात्यांत सुखानं रमतो..

सगळीच नाती मी मनापासून जपतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही..

कोणी काहीही बोललं तरी

पुन्हा मी ते फारसं स्मरत नाही..

माझं जीवन स्वछंदी आहे

ते मी मजेत जगतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मला पदाचा वा ज्ञानाचा

अहंकार आला नाही..

कधी तुच्छतेचा विचार माझ्या मनाला भावला नाही..

पाय जमिनीवर ठेवून प्रसंगी अनवाणी चालतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

जगायला काहीच भौतिक

सुख लागत नाही..

म्हणून मी गर्वाने कधीच

वागत नाही..

सगळ्यांशी प्रेमाने आदराने

आपुलकीने वागतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

जन्म शाश्वत आहे

तसा मृत्यू देखील शाश्वत आहे

याची मला ही जाणीव आहे..

माझ्यातही दोष आहेत

आणि काहीतरी नक्कीच उणीव आहे..

याचीच जाणीव ठेवून

 मी माझं जीवन जगतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं तर खूप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो.

‘लोक काय म्हणतील’, या विचाराने आपणच आपल्या मार्गात स्पीड ब्रेकर घालून घेतो.

कोणाला भेटावेसे वाटले तर भेटा, बोलावेसे वाटले तर बोला. एखाद्याविषयी काही आवडले तर स्तुती करा, नाही आवडले तर स्पष्टपणे पण न दुखावता सांगा. हेच दिसण्याच्याही बाबतीत लागू होते.

पिकले केस आवडत नाहीत, कलर करावेसे वाटतात?

– तर करा.

वाढलेली ढेरी कमी करायची आहे?

– जिम सुरू करा, नसेल जमत तर रोज किमान तासभर चाला.

नव्या पिढीसोबत स्वतःला अपग्रेड करायचंय?

– तर लोकांचा विचार न करता खुश्शाल नव्या स्टाईलचे कपडे घाला.

लहान मुलांमध्ये मूल होऊन आपले शैशव पुन्हा जगावेसे वाटतंय?

-तर जगा ना! कुणी अडवलंय?

सर्वात आधी आरशात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसे स्वीकारायला शिका…

वय वाढत चाललंय, हे स्वीकारलं तरच आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. वाढत्या वयासोबत येणारी वेगवेगळी फेज स्वतःसोबत नवनवीन क्षण घेऊन येते. त्या त्या फेजचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. कुमार वयातील आठवणीत हरवून बसलात, तर प्रौढ वयात येणाऱ्या क्षणांना आणि आनंदाला मुकाल.

* कोणतही क्रिम किंवा फेसपॅक तुम्हाला गोरं करणार नाही.

* कोणताही शॅम्पू तुमची केस गळती रोखू शकणार नाही.

* कोणतेही तेल टकलावर केस उगवू शकणार नाही.

* कोणताही साबण बच्चों जैसी कोमल स्किन देणार नाही.

कोणत्याही टुथ पेस्टमध्ये नमक नसतं, व कोणत्याही साबणामध्ये निम नसतो.

सगळेच जण आपआपली दुकानं थाटून तुम्हाला मूर्ख बनवायला बसलेत. तेव्हा दिखावे पर न जाओ, अपनी अकल लगाओ.

तुम्ही विसाव्या वर्षी जसे दिसत होतात, तसेच चाळिशीत आणि साठीत दिसाल, अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. कोणत्याही वयात फिट राहणे मात्र महत्त्वाचे आहे.

पोट सुटलंय तर सुटू दे, त्यासाठी लाज वाटून घेऊ नका. आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहतं. वजन पण त्याप्रमाणे कमी जास्त होत राहतं. हे सगळे नैसर्गिक आहे.

आलेली परिस्थिती सर्वप्रथम स्वीकारा आणि ती बदलण्यासाठी स्वतःला तयार करा.

जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू हा तर निसर्गाचा नियमच आहे. आजपर्यंत कोणीही हे टाळू शकले नाही, हे स्वतःला आधी पटवून द्या.

जुन्या मशीनचा मेन्टेनन्स करून अपटूडेट करता येते; पण नवीन नाही करता येत. आपल्या शरीराचेही तसेच आहे. ऑरगॅनिक धान्य, ऍलोविरा, कारले, मेथी, जिरे,

ओवा वगैरेचे घरगुती उपाय व्हिडीओ यु ट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. इन्टरनेट, सोशल मिडीयावर वेगवेगळ्या उपदेशांनी नुसता उच्छाद मांडलाय.

“अमुक खा, तमुक खा. हे खाऊ नका, ते खाऊ नका. गरम खा. थंड पिऊ नका. कपालभाती करा. सकाळी निंबूपाणी, दुपारी ताक आणि रात्री गाईचं दूध घ्या. दीर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, ऊजव्या कुशीवरून ऊठा. हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात. ज्वारी खा, नाचणी खा, वगैरे वगैरे… “

वरील सारे उपदेश वाचले की, डोके गरगरु लागते. काय योग्य, काय अयोग्य तेच कळत नाही.

डिप्रेशनची भर पडते ती वेगळी….

अनेक देशी विदेशी कंपन्या जाहिरातींचा भडिमार करून डोक्याचा नुसता भुगा करतात. कोणते उत्पादन चांगले हेच कळत नाही.

आपण सर्वचजण कधीतरी मरणार आहोत, पण मरण्याआधी खऱ्या अर्थाने जगणंच विसरून चाललो आहोत, असं तुम्हाला नाही वाटत का? खरं सांगा..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजेत रहा. कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप करू नका. चुका सर्वांकडूनच होतात, तुम्ही काही देव नाही. स्वतःवर प्रेम करा. दोष देण्याचे काम करण्यासाठी आसपास भरपूर लोक आहेत. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. सकारात्मक विचारसरणीची लोकं जोडा, त्रासदायक लोकांपासून दूर राहा. आवडेल ते खा, पण प्रमाणात. थोडा का होईना, पण रोज नियमित व्यायाम करा. आनंदात रहा. शरीराला त्याचं कार्य करू द्या.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘नाही’ चा आदर करा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘नाही’ चा आदर करा –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एकदा एक पक्षीण पावसाळ्यात अंडी घालण्यासाठी घर आणि निवारा शोधत होती. तिला दोन झाडं दिसली आणि ती संरक्षण मागायला गेली.

तिने पहिल्या झाडाला विचारले असता त्याने तिला आसरा देण्यास नकार दिला. निराश होऊन ती दुस-या झाडाकडे गेली. आणि दुसऱ्या झाडाने होकार दिला.

तिने घर केले आणि अंडी घातली आणि मग पावसाळा आला.

पाऊस इतका मुसळधार होता की पहिले झाड पडले आणि पुरात वाहून गेले.

पक्ष्याने हे पाहिले आणि टोमणे मारत म्हणाली:

“हे बघ, हे तुझे कर्म आहे, तू मला आश्रय दिला नाहीस, आणि आता देवाने तुला शिक्षा दिली आहे.”

झाड शेवटच्या वेळी हसले आणि म्हणाले: “मला माहीत होते, की मी या पावसाळ्यात जगणार नाही, म्हणूनच मी तुला नकार दिला, कारण मला तुझा आणि तुझ्या मुलांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. ”

पक्ष्याला अश्रू आले कारण..

ती आणि मुलं जिवंत का आहेत हे तिला आता कळलं!

शिकवण:

  1. आपण नेहमी कोणाच्या “नाही” ला त्यांचा अहंकार समजू नये..
  2. तुम्हाला संपूर्ण चित्र माहीत नसते..
  3. इतरांचा निर्णय तुमच्या बाजूने असो किंवा नसो, त्याचा आदर करा.
  4. आपण आपल्या समस्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपण समोरच्या व्यक्तीचा मुद्दा बघायला विसरतो.
  5. त्यांचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न न करता, आपण आपले निर्णय घेत असतो.
  6. आम्ही इतरांना त्यांच्या ‘नाही’वर कधीही न्याय देऊ नये कारण आम्हाला त्यांची कथा माहीत नसते.
  7. त्यांच्या ‘नाही’मागे तुमच्यासाठी काय चांगले दडलेले आहे हे तुम्हाला माहीत नसते.

त्यामुळे नेहमी ‘नाही’चा आदर करा, विराम द्या आणि तुमच्या मनात त्याबद्दल वा त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा खोलवर विचार करा!

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कालाय तस्मै नमः… कवयित्री : सौ. नंदिनी देव ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कालाय तस्मै नमः… कवयित्री : सौ. नंदिनी देव ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले 

☆ आई.. ☆

 *

आई विचारी लेकीला

घालू का तुझा खोपा?

देऊ का गं तुला मी

छान श्रावण झोका?

 *

छानशी नेसवू का

साडी नऊवारी?

सजतील किती छान

तुमच्या मंगळागौरी॥

 *

तुझ्या गं जीवलग

सख्यापार्वत्या बोलाव ।

सणावाराचे दिवस

आनंदात घालव॥

 *

झेल बघ अंगावर

मस्त श्रावणधारा ।

घे श्वासात भरून

ताजा मोकळा वारा॥

 *

खीर पुरणपोळी

करते तुझ्यासाठी ।

ये की माहेरपणास

लेकी माझ्यासाठी!

 *

येता माहेरवाशीण

सवाष्ण मी घालीन ।

पुरणावरणाचं ताट

तुझ्यापुढे ठेवीन॥

 *

शुक्रवारच्या छान छान

कहाण्या मी वाचीन ।

पुन्हा एकदा तुझ्यासह

लहान होऊन जाईन॥

 *

झिम्मा फुगडी खेळू

करू थोडा दंगा ।

घालेन मग मी थोडा

आठवणींचा पिंगा॥

 *

लेक… ☆

नको गं आई तू

भलतंच बाई बोलू ।

नको बरं कसलाच

उगाच घाट घालू॥

 *

नोकरी महत्त्वाची!

कुठून मिळवू रजा?

कसले सणवार अन्

कसली आलीय मजा॥

 *

नको गं तो झोका

नको घालू खोपा ।

उगीच आठवत राहतो

माहेरघरचा सोपा॥

 *

काळ बदलला तशा

आम्हीही बदललो ।

त्या जीवनशैलीला

आम्ही दुरावलो।

 *

हौस आहे आम्हाला

वेळ नाही गवसत ।

आवडत असलं तरी

नाही काहीच जमत॥

 *

मनाच्या तळकोपऱ्यात

जरी आहे सारं जपलेलं ।

तरी काळापुढे धावणारं

आहे जग बदललेलं ।

 *

त्यापेक्षा तूच किनई

जरा बदल स्वतःला ।

घराबाहेर पड अन् जा

सहलीला देशाटनाला॥

 *

मुक्त हो स्वच्छंद हो

घे आनंद जीवनाचा ।

येतो सावरता तुला तोल

नव्या आणि जुन्याचा॥

 *

अगं! नको होऊ नाराज

काढीन बरं मी वेळ ।

तुझ्यासारखाच घालीन

नव्याजुन्याचा मेळ॥

 *

आपले मोलाचे संस्कार

मी नाही बरं विसरणार ।

जमेल तसा तो वारसा

पुढे पुढे मी नेणार॥

कवयित्री:सौ. नंदिनी देव

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपलाहार घातला. तो हार करून घेण्यासाठी एकेक पैसा जमवला होता. पण हार घरी आल्यावर दोन दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं, असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावे याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं. त्यानं ती दमून गेली होती. अनेक प्रकारचे दागिने, साड्या, क्रोकरी, गाडी मिळवूनही आपण आनंदी कसे नाही, हा विचार तिला सतावत होता.

काल परवा श्री नाना पाटेकर यांचं भाषण ती यु ट्युब वर बघत होती. ते म्हणाले, ” देवानं आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन हाताच्या ओंजळीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्याअगोदर लोकांना देऊन टाका. कारण ते नाहीतरी जाणारच आहे. ”

तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी एवढं काम करतात, कारण त्यांच्याकडे प्रसिध्दी आहे, पैसा आहे. आम्ही काही करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे? पण जो संचय केला आहेस त्यातले काहीही तुला बरोबर नेता येणार नाही, असे अंतर्मनाने परत परत ऐकवले आणि ती वैतागून उठली.

मन कुठे रमत नाही म्हणून उठली आणि चालायला बाहेर गेली. रस्त्यात एक १५ वर्षाचा मुलगा हेलिअम भरून फुगे विकत होता. “ताई घ्या की फुगा. आज काही विक्री झाली नाही. लई वर जातोय बघा हा फुगा. बघा तरी! ” तो काकुळतीला येऊन म्हणाला.

तिने त्याच्याकडून सहा हेलिअमचे फुगे घेतले. तो खूष झाला. “ताई, कधीही फुगे हवे असतील. वाढदिवसाला आणि कशाला तर सांगा, ” म्हणाला.

ती घरी आली. काय करू या फुग्याचं, म्हणत तिने कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला. तो आनंदाने उड्या मारू लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्याने आईला मिठी मारली. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली. “कशाबद्दल? ” म्हणाली. ती म्हणाली, “असंच. ” चौथा फुगा तिनं ॲाफिसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक “आज वाढदिवस आहे का कुणाचा? “ म्हणत एकमेकाशी नेहमीपेक्षा जास्त बोलू लागले. पाचवा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून चार जास्त लोकं तिच्याकडे भाजी घ्यायला आली. शेवटचा फुगा तिनं एका मर्सिडीजमधून उतरलेल्या सुट-बुटातील व्यक्तीला दिला. तो हसून “थॅंक्यू” म्हणाला.

ती घरी आली. साधे सहा फुगे पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात. म्हणून दुसरे दिवशी तिने त्याच्याकडून बारा फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटसना पाठवले. तिथून फोन आला, ” अजून थोडे फुगे पाठवा. “

तिने रस्त्यावरच्या मुलाकडून नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्याची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरूरीच्या व रोज लागणाऱ्या चार गोष्टी घरात ठेवून बाकी सर्व विकले. त्यातून तिच्या शहरातील सर्व हॅास्पिटल्समध्ये, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरूवात केली.

माहीत नसलेल्या बायका मुला-माणसांकडून तिला सुंदर पत्रे, मेसेजेस येऊ लागले. काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा, म्हणून देणगी देण्यास सुरूवात केली.

फुगेवाली मॅडम आता सर्वांना माहीत झाली होती. आता तिने एक एक बोध कथा लिहून ती फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली.

ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता तिची दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलावले.

त्यांनी विचारले, “मॅडम ही फुग्याची कल्पना कशी आली? ”

ती म्हणाली, “ मी पहिला फुगा विकत घेतला, तेव्हा त्या मुलाने साधं चपटं पडलेलं रबरी लेटेक्स घेतलं, ज्याला आपण न फुगवलेला फुगा म्हणतो. त्यात त्याने हेलिअम गॅस भरला. तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला. तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्यामागे काहीतरी कारण आहे. नाहीतर हा एका बॉक्समध्ये नुसता पडून तर होता.

जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल तर माणसाच्या आतदेखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे.

आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं, तेव्हा एकेक आयडिया आपोआप येत गेली! मी फक्त त्या आतल्या आवाजाने जे सांगितले ते केले. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता, पण त्याला गप्प बसवून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण बाहेरचे रंगीबेरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचे ऐकून तरी बघू म्हणून ऐकायला सुरुवात केली त्या गुलाबी फुग्याकडे बघत!

जे जमवले होते ते आताच देऊन टाकले, कारण कधीतरी द्यावे लागणारच आहे..

मग आताच का नाही, असा विचार केला.

आणि आता जे जमवले आहे ते संपत नाही. जुने होत नाही.

हा हेलिअम फुग्यालाच नाही, तर मलाही वर वर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात. प्रेमाने मिठी मारतात.

पत्र, मेसेजेस पाठवतात.

आशीर्वाद देतात.

म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका.

तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल.

आशीर्वाद, दुवा, शुभेच्छा ही आहे माझी आताची कमाई, हा माझा नवा संचय! आणि हो. हे सगळं मी माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस!

जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोण म्हणतं? अहो, आपल कार्यच आपल्याला लोकांच्या, आप्तस्वकियांच्या मनात जिवंत ठेवतं. मी प्रयत्न करतोय तुम्हीसुद्धा करा. पहा. किती आत्मीय सुख मिळत ते!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी पाहिलेला सर्वात सुखी माणूस…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी पाहिलेला सर्वात सुखी माणूस…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

१) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा पुरवायचा. तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण जर्मनीमध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बऱ्याच वेळा संपर्क होत असल्याने बऱ्यापैकी ओळख झालेली. त्यावेळी त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअर फूट इतके लहान आहे. परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे. तरीसुध्दा त्याचे घर हे लहान आहे. म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात. तो साधी कार व आयफोनचे साधे मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र.. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला.

२) महाग फोन : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व देखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाखपर्यंत मिळते. परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्सव्यतिरिक्त फोनचा वापर हा सोशल मीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्ये सुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व ऍप निरुपयोगी, काही कामाची नसतात.

३) महागडे घर : आजकाल मोठे मोठे बंगले आहेत बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा ड्युप्लेक्स खरेदी करण्याचे बऱ्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हफ्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.

४) महागडी कार : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रॅंडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईत तर, लोक कार तर घेतात. परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबीयांसोबत बाहेर प्रवास हा क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.

५) महागडे कपडे : उच्च, आधुनिक जीवन शैलीचा भाग म्हणून लोक ब्रॅंडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड महाग व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतु हे कपडे खूप कमी वापरले जातात. बाकी ते कपाटातच पडून राहतात. आपण घेतलेले महागडे कपडे हे ७०% निरुपयोगी असतात. ते फक्त ठराविक वेळीच वापरतो. नंतर ते कपाटात ठेवून देतो. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत.

६) मित्र/नातेवाईक : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात. जे आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्या सोबत सहभागी होतात, परंतु यातले ७०% नातेवाईक हे निरुपयोगी असतात, कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा आपले मित्र व नातेवाईकांपैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत नाही करत. गर्दीपेक्षा दर्दी लोकांत रहा.

७) कमाविलेला पैसा : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते, ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, केवळ ३०% संपत्तीचाच तो उपयोग करत असतो. आपल्याकडे खूप संपत्ती असेल, तर त्यापैकी ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमावतो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच खाणार. काही मूर्ख रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षांनी मरून जातात. शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधता का?

८) भांडी व साड्या : आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात. परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिक लाईफ स्टाईल म्हणून काही बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आजकाल फक्त ठरावीक कार्यक्रम- समारंभात साड्या वापरल्या जातात. त्यामुळे त्यांचा वापर ७०% ही होत नाही.

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तू वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तू खरेदी करण्याचे वेड असते. परंतु पाश्चात्य देशातील लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुध्दिमत्ता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते.

Do not collect assets… Collect happiness, achievement, experience & enjoyment in life… Earn honour… Earn respect… Earn Name.

CTO च्या वेतनाच्या तुलनेत त्याचा खर्च फक्त २०% होता. त्यामुळे तो ९९% तणावरहित काम करू शकत होता व खूप आनंदी होता.

त्याने एकच अत्यंत महत्वाचा संदेश दिला, “Do not buy, hold, own anything which you can’t use, consume, monitor. Do not carry any unnecessary weight or burdens on your head, mind and brain. “

जो चूक करतो तो माणूस… तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस… जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस… ज्याला आपण विजडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो. या लेख मालिकेद्वारे आपणास विजडम प्राप्त होण्यास मदत होईल.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णाचे कर्णाला उत्तर… – मूळ बंगाली लेखक: अज्ञात – मराठी अनुवाद: श्रीमती स्वाती दाढे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कृष्णाचे कर्णाला उत्तर… – मूळ बंगाली लेखक: अज्ञात – मराठी अनुवाद: श्रीमती स्वाती दाढे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

हे आजच पोस्ट करतीये, कारण अशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून आजपासूनच दक्ष राहूयात.

आज १६ ऑगस्ट. सकाळच्या वेळी रस्त्यातला कागद-कचरा गोळा करणाऱ्या त्या तरुणाची चौकशी करण्याच्या हेतूने कुतूहलाने मी त्याला विचारले, “नाव काय तुझं?”

तो क्षणभर उभा राहिला, हसला, म्हणाला, “खुदिराम..” आणि पुढे जाऊन कागद वेचत वेचत निघून गेला.

त्याच भर दुपारी पाहिलं, पोस्ट ऑफिसच्या समोरच्या कचराकुंडीत हात घालून तोच तरुण काहीतरी शोधत होता. थांबून विचारले, “काय शोधतोस खुदिराम?”

उत्तर मिळालं, “खुदिराम नाही… मी प्रफुल्ल …” माझ्याकडे बघून निरागसपणे हसला आणि कचरा चिवडण्याचे काम काळजीपूर्वक करू लागला. मी अवाक.

दुपारनंतर पुन्हा तो दिसला, तशाच एकाग्रपणे कचरा निवडत असलेला. मी विचारले, “प्रफुल्ल, चहा घेणार?”

तेव्हा माझ्याकडे आश्चर्याने बघत तो म्हणाला, “माझं नाव कानाईलाल…” आणि हसला निरागसपणे.

आता मात्र माझा विस्मय आणि कुतूहल वाढले. मी त्याच्याबद्दल चौकशी करू लागलो. तर कळले —

प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे १६ ऑगस्टला हा वेडा अचानक अवतीर्ण होतो. कुठून येतो, नाव काय, कुणालाच माहीत नाही. या गल्लीतून त्या गल्लीत, या रस्त्यावर, त्या रस्त्यावर, या वळणावर, त्या चौकात… कचराकुंडीत, गटाराच्या कडेला… सकाळपासून रात्रीपर्यंत कचऱ्यात काहीतरी शोधत फिरत असतो. पार शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, खांद्यावर पोतं घेऊन, उपाशी पोटी वणवणत असतो हा वेडा..!

संध्याकाळी घरी परतताना मोठ्या रस्त्याच्या वळणावर गोंधळ ऐकून थांबून बघू लागलो. लोकांची हीss गर्दी. एकाला विचारले, “काय झालं?”  एकजण म्हणाला, “एका चोराला धरलंय लोकांनी …”

शंका येऊन गर्दी हटवत पुढे जाऊन बघितलं, दिव्याच्या खांबाला बांधलेला तोच – सकाळचा खुदिराम, भर दुपारचा प्रफुल्ल आणि नंतरचा कानाईलाल…! शेजारी मालानं खच्चून भरलेलं पोतं, जे सकाळी रिकामं होतं.

एकजण म्हणाला, “या पोत्यात चोरलेल्या वस्तू आहेत … बघा, बघा…”

कसंतरीच वाटलं मला. त्याला दुखऱ्या स्वरांत विचारलं, “का चोरी करतोस?”

तो निरागस आणि निर्विकार हसला, आधीसारखाच. बाकी काहीच उत्तर दिलं नाही त्यानं.

लोकांना कसबसं थांबवून मी पोत्याचं तोंड खोललं. मातीत उलटं केलं. त्यातून बाहेर पडले… फाटलेले, तुटलेले, दुमडलेले, मोडलेले प्लास्टिकचे आणि कागदाचे तिरंगे झेंडे..! होय, फक्त आपले तिरंगे! आपला राष्ट्रीय अभिमान असलेले, स्वतंत्र भारताचे तिरंगी झेंडे!! रस्ता, कचराकुंडी, गटारं… जिथं दिसतील तिथून उचलून पोत्यात भरलेले..!

हे सर्व बघताच लाजिरवाणी होत गर्दी पांगली. डोळ्यांत दाटून आलेले पाणी आवरून भराभर त्याला बांधलेली दोरी सोडली. माझ्या तोंडाकडे पहात त्याच निष्पाप भावनेने म्हणाला, “कोणाच्या तरी पायांखाली येऊन तुडवले जाऊ नये म्हणून…!” हसला आणि खाली वाकून परत एकेक तिरंगा हळुवारपणे पोत्यात भरत राहिला … तो वेडा.

तो… खरंच वेडा?

मी स्तंभित होऊन उभा…पायांना खिळा ठोकल्यासारखा… अपार वेदना, दु:ख, लाज यांजबरोबर प्रेम, आदर आणि विस्मय डोळ्यांत, मनात दाटलेल्या अवस्थेत मी उभाच …!

मूळ बंगाली लेखक: अज्ञात

अनुवाद : श्रीमती स्वाती दाढे

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीराम आणि श्रीकृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्रीराम आणि श्रीकृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

हे दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत.

एकाने ‘अयोध्या ते रामेश्वर’पर्यंतचा

तर दुसऱ्याने ‘द्वारका ते आसाम’पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत, गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.

तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे, नाही का?

एकाने जन्म घेतला तो रणरणत्या उन्हात आणि तोही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो ही मध्यरात्री!

एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात!

साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिणीच…..

एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना!

शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते.

ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले, त्या दोघी म्हणजे कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या…

ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारले.

एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला!

एकाने लोकापवादाखातीर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.

एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबीयांवर शस्त्र उगारण्यासदेखील गैर मानले नाही.

एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.

एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.

एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.

एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.

पहिला Theory…. आहे. तर… दुसरा Practical आहे.

दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे ‘दीपस्तंभ’ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.

जय श्रीराम… जय श्रीकृष्ण!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares