मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रारब्ध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रारब्ध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

केलेली कर्म ही केंव्हा ना केंव्हा भोगल्या शिवाय त्यातून सुटका नाही. म्हणून उगाच असं झालं, तसं झालं,असं करायला हवं होतं. मग असं झालं असतं. वगैरे, वगैरे  सगळं विसरा.

– –  कारण जे झालं  ते तसंच  होणार होतं. ते आपलंच पूर्वीचं  केलेलं कर्म आहे.

*

कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा, श्री कृष्णाने, वसुदेव- देवकीची कारागृहातून सुटका केली तेव्हा देवकी त्याला म्हणाली,

“हे कृष्णा!! अरे तू स्वतः साक्षात् परमेश्वराचं रूप आहेस ना? तर मग तू कधीच कंसाचा वध करू शकत होतास…! मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष॔ का थांबलास?

यावर श्रीकृष्ण म्हणाले.

“माते, गेल्या जन्मात तू मला चौदा वर्षे वनवासात कां बरं पाठवलं होतंस?”

श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला.

देवकी म्हणाली मी?….अरे मी कधी तुला चौदा  वर्षं वनवासात पाठवलं  होतं….?_हे काय बोलतो आहेस तू….?

त्यावर कृष्ण भगवान म्हणाले,_

“माते  ही घटना  गतजन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही. पण गेल्या जन्मात तू कैकयी होतीस…आणि तूच मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस.

हे ऐकून देवकीला धक्काच बसला, आणि तिने आश्चर्याने विचारलं,

“कृष्णा मी गेल्या जन्मातली कैकयी..? तर मग त्या जन्मातली कौसल्या कोण…?”

यावर श्रीकृष्ण हसून वदले,__

माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौसल्या होय. जिला गेल्या जन्मात, माझी आई असूनही चौदा वर्षं पुत्रप्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं.  तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं…..आणि तुला पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं.

“माते, प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळं ही भोगावीच लागतात…..त्यातून देवांचीही सुटका होत नाही….!”

– – विचार करा मग आपण कां वाईट वाटून घ्यावं.? जे आहे ते भोगूनच संपवणे हे योग्य. कारण सुटका नाही….. ‘ गत जन्माची पापे. ती येती भोगरुपे…’

– – आणि भोग हे सोडूनच संपवावे लागतात.

श्रीकृष्ण:शरणं मम् ॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पण काहीतरी हरवलंय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “पण काहीतरी हरवलंय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

(५ सप्टेंबर शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.. त्या निमित्ताने….)

कुणी लिहिलंय माहित नाही परंतु मनाला भिडलं आतून पोखरलं आणि एक अदृश्य कळ हृदयातून उठली.

तुम्हाला काय वाटतं?

नवीन मुलांना जाणवेल की नाही माहित नाही परंतु आम्हा वयस्कर लोकांना मात्र याचं वैशम्य नक्की वाटतं.

समजत नाही; पण काहीतरी हरवलंय…

साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी…

नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन…

अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची.

“कसे आहात गुरुजी?’ वगैरे वास्तपुस्त व्हायची.

पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची.

विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे जुने टायर अशा खेळांच्या साऱ्या जिनसा जागीच सोडून!

त्या वेळी सातवी पास असलं की गुरुजी म्हणून नोकरी लागायची.

काही शिक्षक तर कुग्राम म्हणावं अशा खेड्यात जाऊन शाळा सुरू करायचे.

गुरुजींची उपजीविका गावावर अवलंबून असायची.

नंतर जेमतेम पगार सुरू झाला. खर्च असा नव्हताच.

अगदी गावात असलेला एखादा मोकळा वाडाही गुरुजींना मोकळ्या मनानं उघडून दिला जायचा.

सांज-सकाळी कुणाच्याही मळ्यातून हिरव्या पालेभाज्या यायच्या.

गुरुजींच्या घराचा कोपरा कडधान्यांनी भरून जायचा.

निरशा दुधाचा मोफत रतीब असायचा.

गुरुजी ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक असायचे.

कुणाच्या घरी पत्र आलं की त्या घराला गुरुजींची आठवण व्हायची.

पोरगं विजार सावरत पळायचं आणि गुरुजींना घेऊन यायचं.

तोपर्यंत घरातला बाप्या अंगणात गोधडी टाकायचा.

कारभारीण चुलीत तुराट्या घालून चहाचं आधण ठेवायची.

गुरुजी येऊन पत्र वाचायचे.

थाळाभर चहा समोर यायचा.

मग अंधार पडेपर्यंत शिवारगप्पा सुरू व्हायच्या.

त्यातच जेवणाची वेळ व्हायची. गुरुजी उठू लागल्यावर बाप्याचा आग्रह सुरू व्हायचा.

कारभारीण दाराच्या आतून पदर सावरत आदरानं म्हणायची: “आता दोन घास खाऊनच जावा की गुरुजी!’ ते ‘नको नको’ म्हणत असतानाच काठवटीत भाकरीची थपथप सुरू व्हायची कंदिलाच्या गढूळ प्रकाशात…

खरपूस पापुद्रा आलेली बाजरीची गरमागरम भाकरी, खापराच्या तवलीतलं झणझणीत कोरड्यास, लसूण, मीठ, लाल मिरची घालून पाट्यावर रगडलेला भेळा, गाडग्यात मुरलेलं खारट लोणचं…या अन्नाला मायेची चव असायची.

तृप्त पोटानं गुरुजी उठायचे.

झोपेनं पेंगुळलेल्या पोराच्या डोक्‍यावर हात फिरवायचे.

बाप्या कंदील घेऊन उठत म्हणायचा: “अंधार हाय…गरमासाचे किरकुडे निघत्यात…चला घरला सोडून येतो.’

कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडासारखं ते स्निग्ध प्रेम पाहून गुरुजी भारावून जायचे.

***

गावात मुलीला पाहायला पाहुणे येण्यापासून तिचं लग्न लागेपर्यंत गुरुजींची महत्त्वाची भूमिका असायची.

दुखणं-पाखणं, अंत्यविधी, सणवार, प्रवचनं-कीर्तनं अशा प्रत्येक ठिकाणी सूत्रं गुरुजींकडंच असायची.

त्या काळी शाळा ही देवळात, एखाद्या मोकळ्या घरात, नाहीतर झाडाखाली भरायची.

खोडाला खिळा ठोकून त्याला लाकडी फळा लटकवला जायचा.

फळ्यावर पुसट उमटलेली अक्षरं विद्यार्थ्यांच्या मनावर मात्र गडदपणे उमटायची.

गावभर पाढ्यांचा, बाराखडीचा आवाज घुमायचा.

नंतर पत्र्याच्या, कौलाच्या इमारती झाल्या.

गुरुजींना शाळेच्या खर्चासाठी दोन रुपये “सादिल’ म्हणून मिळायचा.

डुगूडुगू हलणारं लाकडी टेबल, लांब बाकडं, रेकॉर्ड ठेवायला लाकडाची मोठी पेटी…

गुरुजी तीच पेटी खुर्ची म्हणून वापरायचे.

पालक तर ठार अडाणी.

पोरगं पहिलीत घालायचं तर जन्मतारीख माहीत नाही.

मग मुलगा सहा वर्षांचा झाला आहे किंवा कसं हे तपासण्यासाठी गुरुजी त्याचा एक हात डोक्‍यावरून विरुद्ध बाजूच्या कानाला लावायला सांगायचे.

हात कानाला लागला तरच पहिलीत प्रवेश!

नावाची-आडनावाची अशीच बोंब असायची.

शिंपी, लोहार, सुतार, कुंभार असे व्यवसाय असतील तर तेच आडनाव हजेरीवर लावलं जायचं.

आईनं पोराचं नाव दगड्या सांगितलं तर ते तसंच लिहावं लागायचं.

लिहिताना गुरुजींनी “दगड्या’चा उच्चार “दगडू’ असा केला तर त्याची आई म्हणायची: “दगड्याच लिवा. दगडू म्हणल्यावर त्यो भोकाड वाशितो’!

शाळेची घंटा म्हणजे रुळाचा तुटलेला तुकडा असायचा.

घणघण असा ओळखीचा आवाज गावभर घुमायचा.

वर्गात फरशी नसायची.

साधी जमीन.

आठवड्यातून एक दिवस वर्ग शेणानं सारवावा लागायचा.

गुरुजींचा आदेश आल्यावर आम्ही विद्यार्थी शेण गोळा करायला निघायचो.

नदीवरून बादल्या भरून आणण्याचं काम थोराड शरीराच्या मुलांकडं असायचं.

तोपर्यंत मुली परकरांचे ओचे-कोचे खोवून सारवण्याच्या तयारीत वर्गाच्या चारही कोपऱ्यांत बसलेल्या असायच्या.

एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.

शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.

शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला…

करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला…

हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला…

तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला…

हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला…

जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला…

बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला…

तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला, हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला…

अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.

गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्‍चर्य वाटे.

शाळा अशा मजेत चालायच्या!

आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.

अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.

सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.

खतांच्या गोण्यांपासून दप्तराच्या पिशव्या शिवलेल्या असायच्या.

त्या खतांच्या कंपनीचे आम्ही विद्यार्थी चालते-बोलते प्रचारक होतो म्हणा ना!

अडचणी होत्या…

संकटं होती…

पण शिक्षण मात्र सकस होतं.

गुणवत्तापूर्ण होतं.

मात्र, गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी तेव्हा खंडीभर साधनं नव्हती.

डोक्‍यावर व्यवस्थेची जीवघेणी उतरंड नव्हती.

गुरुजींवर विश्वास होता.

***

काळ बदलला. समाज बदलला.

विद्यार्थी बदलले. गुरुजी बदलले.

सारवणाच्या जमिनी जाऊन फरश्‍या आल्या.

भिंती रंगल्या.

शाळा मेकअप केल्यासारख्या सजल्या…

देखण्या झाल्या!

संगणक आले.

शाळा डिजिटल झाल्या.

तंत्रज्ञानानं शिक्षण व्यापलं.

गुरुजींच्या खिशात डायरीऐवजी मोबाईल आले.

प्रोजेक्‍टरवर अभ्यासक्रम आला.

साऱ्याच कवितांना एकच सरकारी चाल पाहून मुलं बावरली.

हेडमास्तरांना बसायला देखणी खुर्ची आली; पण तिला असलेल्या अदृश्‍य काट्यांनी ते अस्वस्थ झाले.

मोठं टेबल आलं; पण ते अहवालाच्या कागदांनी गुदमरून गेलं.

पोरांच्या अंगावर इंग्लिश धाटणीचे ड्रेस आले.

शाळेला कंपाउंड आलं आणि गाव शाळेपासून दुरावत चाललं.

***

आता गावाचं गुरुजींवाचून काही अडत नाही.

वरून अफाट अनुदान येतं.

शाळेत पैसा आला: त्यामागं राजकारण आलं.

राजकारणामागं गाव आलं.

गावपुढारी शाळेत लक्ष घालू लागले.

आठवीपर्यंत कुणाला नापास करायचं नाही…

मुलांना मारलं तर गुरुजींना तुरुंगात टाकण्याच्या धमक्‍या सुरू झाल्या.

धाक, दरारा, भीती नष्ट झाली.

“आनंददायी’च्या नावाखाली जणू स्वैराचारच सुरू झाला.

कृतीपेक्षा प्रशिक्षणं जास्त झाली.

गुणवत्तेपेक्षा मूल्यमापनाची साधनं जास्त झाली,

शिक्षकांपेक्षा शिक्षणतज्ज्ञ जास्त झाले.

सारं काही जास्त झालं; पण नेमकं काहीतरी कमी असल्याचं जाणवू लागलं…

साऱ्या सुविधा असूनही शिक्षणव्यवस्थेत रितेपणा असल्याची भावना दाटून आली आहे…

भरल्या घरात एकटेपणा वाटावा तशी.

काय ते समजत नाही; पण काहीतरी हरवलंय…!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नकळत विसरली जाणारी गोष्ट…” – लेखक: श्री क्षणस्थ नील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “नकळत विसरली जाणारी गोष्ट… – लेखक: श्री क्षणस्थ नील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आज सर्वजण योगेश्वराला भजतात… पण एक गोष्ट नकळत विसरतात!!!

कुणालाही आठवत नाही की त्याच दिवशी जन्माला आलेली एक मुलगी जी कृष्णाऐवजी अदलाबदल केली गेली होती…

कृष्णाचे आयुष्य अनमोल होते.

पण ही मुलगी जणू त्याला जन्माला घालण्यासाठी जन्माला आली होती.

– – ‘ योगमाया ‘

आज केवळ कृष्णाचा वाढदिवस नाही तर योगमायेचाही वाढदिवस आहे. योगमाया कंसाच्या तावडीतून सुटली अन् स्वर्गाकडे उड्डाण केले आणि जाताना कंसाला आकाशवाणी करून सावध केले की ‘ तुझा मारेकरी जन्माला आला आहे.

शास्त्रात स्पष्टपणे नमूद केलेले नाही की ती सुद्धा कृष्णाच्या इतर भावंडांप्रमाणे मारली गेली.

Incarnation!

Twin flames!!

Soulmate!!!

योगमाया देखील आदिशक्तीचा अवतार होती. जी काही जुने वचन पाळण्यासाठी भगवान विष्णूच्या अवतारासह जन्माला आली. जेव्हा कंसाने तिचे पाय पकडले आणि तिला जमिनीवर फेकले तेव्हा ती स्वर्गाच्या दिशेने उडाली आणि म्हणाली,

“कंसा, तुझ्या मारेकऱ्याने आधीच जन्म घेतला आहे. मी तुला ठार मारू शकते पण तू माझ्या पायाला स्पर्श असल्याने मी त्याला तुझ्या विनम्रतेची अभिव्यक्ती मानते आणि तुला क्षमा करते.”

कृष्णाचा जन्म रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त जागेत झाला. तथापि, त्याच्या जन्माच्या क्षणी, सर्व रक्षक झोपले, साखळया तुटल्या आणि बंद केलेले दरवाजे हळूवारपणे उघडले.

त्याचप्रमाणे, कृष्ण  (चेतना, जागरूकता) आपल्या अंत: करणात जन्म घेताच सर्व अंधकार (नकारात्मकता) नाहीसा होतो.

.. सर्व साखळ्या (मी,माझा आदी अहंभाव) तुटल्या आहेत.

आणि तुरुंगातील सर्व दरवाजे आपण स्वतःमध्ये ठेवतो ते (जात, व्यवसाय, संबंध इ.) उघडले जातात.

जगातील सर्वात त्यागसंपन्न पुरुष म्हणजे कृष्ण!!!

.. आई,बाप,गावशीव, राज्य वंश,मैत्रिणी,गोपिका,गोप वेळप्रसंगी सॊडून द्याव्या लागल्या…

पण तो निर्मोही सहजपणे सोडत गेला…गुंतला नाही!!!

Non Judgemental होणे मी त्याच्याकडून शिकतोय!!!

.. त्या योगमायेपासून,कृष्णापासून हेच शिकतोय!!!

.. की गुंतू नका… कार्य करत राहा.

लेखक: श्री क्षणस्थ नील

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “धूसर…” – लेखक – श्री सचिन श. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “धूसर…” – लेखक – श्री सचिन श. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

जानकीबाई ‘घरकुल’ ह्या वृद्धाश्रमात, पोळ्या करायला जायच्या. रोज सकाळच्याच पोळ्या असत जानकीबाईंना, साधारण साठ – सत्तरच्या आसपास. एवढ्या पोळ्या पुरत असत कारण, कोणी एक खाई तर कोणीतरी कधीतरीच दोन. त्यामुळे पन्नासेक पिकली डोकी असलेल्या त्या वृद्धाश्रमात, इतक्या पोळ्या सहज पुरत असत. संध्याकाळी बरेचजण तसेही फलाहारच करत, तर अगदी काही जणच भात खात असत. पण म्हणजे थोडक्यात जानकीबाईंचं, एक वेळच कामावर जाऊन भागत असे.

तर आजही जानकीबाई नेहमीप्रमाणे पोळ्या करायला आल्या खर्‍या, पण नेहमीची तरतरी काही नव्हती चेहर्‍यावर त्यांच्या. वृद्धाश्रमाच्या संचालिकाबाईंच्या ते लक्षात आलं… नी त्यांनी विचारलं जानकीबाईंना, त्यांच्या अशा मुड आॅफचं कारण. जानकीबाईंनी पदर लावला डोळ्यांना नी म्हणाल्या… “लेकाला सांगितलं मी की आज एक दिवस इथल्या सगळ्यांना, पोळ्यांना छानपैकी तूप लाऊन देते… तशाही रोज कोरड्या नी पांढरटच पोळ्या खातात ही सगळी मंडळी… तर तुपाचा जो काही खर्च होईल तो देशील का?…”

तर लेक मला त्याचेच खर्च ऐकवू लागला… मलाही माहितीये की तो एका पतपेढीत शिपाई आहे… त्याची बायको घरीच शिवणकाम करुन, संसाराला थोडाफार हातभार लावते… आणि मला इथे जे काय मिळतात ते… आमची तशीही मारामारच असते गरजा भागवायची… पण म्हंटलं एखाद दिवस जरा काय हरकत आहे, तुपाचा खर्च करायला… करु आपलं आपल्यात अॅडजेस्ट “.

इतकं बोलून पुन्हा डोळ्यांना पदर लावला जानकीबाईंनी, आणि तेवढ्यात कसलासा खमंग नी गोडसर वास आला त्यांना स्वैपाकघरातून. जानकीबाईंनी प्रश्नार्थक बघितलं संचालिकाबाईंकडे… त्याही हसल्या नी खुणेनेच त्यांनी जानकीबाईंना, स्वैपाकघरात जायला सांगितलं. जानकीबाई घाईतच आत गेल्या… आणि हबकल्याच आपल्या लेकाला, सुनेला आणि काॅलेज शिकणार्‍या नातवाला तिथे बघून. सुन आणि नातू प्रत्येक ताटात पोळी… अ हं… पुरणपोळी वाढत होते. आणि लेक प्रत्येक पोळीवर तुप वाढत होता, अगदी सढळपणे. कोणाला तुप, कोणाला दूध आणि कोणाकोणाला तुप अन् दूध दोन्ही… हे आधीच विचारुन त्याप्रमाणेच ताटं वाढली जात होती. दूध हवं असणार्‍यांच्या ताटात, दूध भरलेली वाटीही होती. जानकीबाई अगदी पुरत्या भांबावल्या होत्या आता. आपल्या गोंधळलेल्या आईकडे बघून दिलखुलास हसतहसतच, लेक आईपाशी गेला. तोपर्यंत संचालिकाबाईही जानकीबाईंच्या पाठी येऊन उभ्या राहिलेल्या. त्या म्हणाल्या… “जानकीबाई… अहो मला कालच फोन आला होता तुमच्या लेकाचा, आणि त्याने मला सांगितलं होतं की तो हे सगळं घेऊन येणारेय आज इथे… तूम्हाला मात्र काहीही न सांगण्याबद्दल विनंती केली होती त्याने मला”.

जानकीबाईंचा लेक त्यांच्याकडे बघत बोलू लागला…

“आई अगं तू तुपाबद्दल बोललीस… तेव्हाच अगदी माझ्या मनात आलं होतं की, तुपासोबत तर मग पुरणपोळीच हवी… पण म्हंटलं तुला जरा धक्का द्यावा, म्हणून मग तुला नाही जमणार म्हणालो मी… आणि खर्चाचे पाढे वाचले तुझ्यासमोर”.

“अरे पण जे काही खर्च सांगितलेस मला, ते तर खरेच होते ना?… मग आता हा एवढा खर्च इथे झाल्यावर, तिथे कसं काय भागवायचं?”.

“अगं आपल्या घरापासून दोन गल्ल्या सोडून तो नवा टाॅवर झालाय ना, तिथेच मला रात्रीची सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी मिळतीये… रात्री आठ ते सकाळी आठ… बाराशे तरी सुटतील तिथून”.

“म्हणजे तू सकाळी नऊ ते चार पतपेढीत काम करणार… घरी येऊन सुनेनी शिवलेली कापडं लोकांकडे पोहोचती करणार, ते सहाला घरी येणार… आणि पुन्हा आठला  घराबाहेर पडणार रात्रीच्या ड्युटीला जायला?… अरे नको रे इतका ताण घेऊ”.

“अगं आई तुझी कुठलीही इच्छा अपुरी राहू नये म्हणून… मी मधल्या त्या सहा ते आठ वेळेतही, कुठे काय मिळतंय का ते बघतोय”.

जानकीबाईंनी डोळे वटारत, लेकाच्या दंडावर जोराची चापटी मारली. सुनेनी आणि नातवानी आत्तापर्यंत वाढलेली ताटं, टेबलवर नेऊन ठेवलेली. सगळी मंडळीही एकेक करुन येत, आता जागेवर बसलेली… ताटात पुरणपोळी पाहून खुललेली. टेबलावर मांडलेल्या खुर्च्यांपैकी, मधली खुर्ची मात्र अजूनही रिकामीच होती. कोणीच बसलेलं नव्हतं तिथे, समोर वाढलेलं ताट असूनही. जानकीबाईंनी काहीतरी उमजून, फक्त पाहिलं लेकाकडे… आणि लेकाने होकारार्थी मान हलवली. जानकीबाईंनी पुन्हा पदर लावला डोळ्यांना, नी त्या जाऊन बसल्या रिकाम्या जागेवर.

नेहमीप्रमाणे वदनी कवळ घेता म्हणायला उठलेले एक आजोबा, सगळ्यांना उद्देशून म्हणाले… “आपल्या सगळ्या लोकांतून… खर्‍याअर्थी सगळ्यात श्रीमंत अशा जानकीबाईंना, खूप खूप शुभेच्छा आजच्या ‘ज्येष्ठ नागरीक दिनाच्या’… आणि त्यांच्या लेकाकडील ही मनाची श्रीमंती त्याच्या लेकातही, म्हणजेच जानकीबाईंच्या नातवातही अर्थातच उतरली असेल… म्हणून जानकीबाईंच्या सुनेचंही आत्ताच अभिनंदन करतो, तिच्या नशिबी पुढे कधीही वृद्धाश्रम नाही म्हणून “.

…. इतकं बोलून रोज खणखणीत आवाज लावणार्‍या आजोबांनी, आज काहीशा दाटल्या आवाजातच वदनी कवळ घेता सुरु केलं होतं… ताटावर बसलेल्या जानकीबाईंच्या, अन् वाढायला उभ्या त्यांच्या सुनेच्या भरुन आलेल्या डोळ्यांतून… ‘धूसर’ होत जात.

लेखक: श्री सचिन श. देशपांडे

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’तृप्तता…’ – लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’तृप्तता…’ – लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

ते दोघे मूळचे नागपूरचे, सध्या पुण्यात कॉट बेसिसवर राहायला. सगळं रुटीन ठरलेलं… सकाळी लवकर उठून आवरायचं, नायतर टॉयलेटला गर्दी होते, मग कोपऱ्यावर जाऊन नाश्ता करायचा, कधी पोहे, कधी उपमा, साबुदाणा खिचडी, ब्रेड पॅटिस, अगदीच कंटाळा आला की इडली, वडा सांबार….. एक कडक चहा…. तिथून सरळ ऑफिसमध्ये. १ ला डबेवाला येणार. मग लंच, ४ ला चौकात जाऊन चहा….. ६ ला हॉस्टेल…. मोबाईल कुटणे, घरी फोन करणे, इस्त्रीचे कपडे आणणे, येताना एखादा कटिंग, क्रीमरोल नाहीतर वाटी केक….. ९ ला डबा येईल की डिनर….. रात्री बेडवर आडवं पडून एखादा सिनेमा, तोही अर्धवट…. ११ नंतर कधीही झोप…. सगळं अगदी ठरलेल्या प्रमाणे….

खरं तर तेच तेच खाऊन, धोपट मार्गाने जाऊन दोघांना प्रचंड कंटाळा आला होता. गोडधोड खावं, माणसांत मिसळून जावं, मनाला शांतता मिळावी असं आतून वाटत होतं… जसं कॉलेजमध्ये असताना अनोळखी लग्नात किंवा कार्यात जाऊन मस्त पोटभर जेऊन यायचं, असलं काहीतरी शिजत होतं…

रविवार होता… सकाळी निवांतपणे आवरून चक्कर मारायला बाहेर पडले. जवळच एक छोटा कार्याचा हॉल होता… लगबग दिसली, गजरे, लफ्फे नेसलेल्या बायका, झब्बे सुरवर, जॅकेट, पायात करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी घातलेले बापे….. परकर पोलक्यात आणि शिवलेल्या धोतरात बारकी पोरी पोरं…..

यांच्या डोक्यात सोडियम व्हेपर लागला… गडी खुश…. रूममध्ये येऊन कुर्ता, सुरवर घातला, डिओ ने अंघोळ केली….. अहहह, वऱ्हाडी जणू….

शून्य मिनिटात हॉल गाठला, सहजपणे दरवाजातून आत गेले… दारात एक तरुण उभा होता, अर्थातच यजमान घरातला… यांनी नमस्कार केला… त्यानेही नमस्कार केला… आत गेले…

हा तरुण त्यांच्या मागे गेला, म्हणाला “तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे, तुम्ही कोणाकडून आहात?…..”

यांची किंचित टरकली….. तरी ध्येयवादी होते त्यामुळे बिनधास्त सांगितलं…. “मुलाचे मित्र आहोत…”

“ओहहहह या या” म्हणत त्या तरुण मुलाने त्यांना बसायला सांगितलं…

हे बोलणं संपलं…..गुरुजींची आरोळी झाली, “ज्यांना पथ्यपाणी असेल त्यांनी जेऊन घ्यावं, मुहूर्ताला वेळ आहे….” एक हशा पिकला, सत्तरीच्या पुढची बरीच यंग इंडिया तिथे होती…. तशी मोजकीच माणसं उपस्थित होती, तीन पिढ्या एकत्र दिसत होत्या… हे दोघे मागे थांबले होते… अगदीच दगा फटका झाला तर कन्नी कापायची…

तो तरुण त्या दोघांच्या जवळ गेला, म्हणाला, “तुम्हाला घाई असेल तर वरच्या हॉलमध्ये जेवायची सोय केली आहे, मुहूर्ताला वेळ आहे, तुम्ही जेऊन घ्या…..”

“नको नको, आहे वेळ अजून. लग्न लागलं की जेवू….”

“अहो ऐका माझं, जेऊन घ्या….”

हो, नाही करत हे दोघे जेवायला गेले…. मोजक्या पदार्थांचा बुफे मांडला होता… सनईचे सूर, उदबत्तीचा घमघमाट होता… वरण, भात… छोटा बटाटावडा आणि हिरवी चटणी, सफरचंदाची कोशिंबीर, मटार उसळ अळणी आणि तर्री वाली, पोळी, दही बुत्ती, सीताफळ रबडी… अहहहहह कसला साधा पण रुचकर मेन्यू आहे असं म्हणत, पान वाढून घेऊन, टेबल खुर्चीवर आसनस्थ झाले….

“ए पाणी पिऊन घे रे, म्हणजे रबडी ओरपता येईल…”

“एक, दोन, तीन, चार…..”

“ए अस मोजू नये रे,” असले डायलॉग मारून, तड येइपर्यंत यथेच्छ जेवले, हात धुवून बनारस पान तोंडात….

तो तरुण इतर पाहुण्यांशी बोलत पुन्हा त्यांच्यापाशी आला…. “काय पोटभर झालं ना जेवण??… सगळं ठीक आहे ना?….”

इतकं आदरातिथ्य बघून या दोघांना गलबलून आलं, तोंडातले पान एका गालात सरकवून…. “वाह अगदी मोजके पदार्थ पण अप्रतिम चव आहे, तृप्त झालो” अशी पावती दिली….

तो तरुण म्हणाला, “चला आता मुहूर्त आला….”

जवळपास वरचा हॉल खाली आला…. गुरुजींनी आरोळी दिली, “नवरा मुलगा आणि नवरीला आणा…..”

सर्वत्र हशा पिकला…. या दोघांनी एकमेकांकडे बघितलं… काही कळायला मार्ग नाही… तो तरुण या दोघांच्या मागे उभा राहिला..

स्टेजवर नवरा मुलगा, मुलगी आले… लग्नी कपडे, मुंडावळ्या, हातात हार…. मंगलाष्टके झाली, सगळ्या मंडळींना कौतुक होतं या सोहळ्याचं….

मुहूर्तावर लग्न लागलं…. हार घातले गेले…. सर्वांच्या कडे तोंड करून दाम्पत्य उभं राहिलं… ७५ गाठलेला वर… सत्तरीची वधू… गोड दिसत होते दोघे..

त्यांना बघून हे दोघे अवाक झाले होते…. हे काय भलतंच सुरू आहे, पोबारा करायची वेळ आली आहे, असं मनात आणत होते…. इतक्यात तो तरुण, या दोघांना मागून म्हणाला, “नवरदेव तुमचा मित्र आहे ना… मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून आज पुन्हा तसाच सोहळा केला…. तुम्ही आत आलात आणि म्हणालात की नवरदेवाचे मित्र आहोत…. तेव्हाच मला समजलं की तुम्ही आमच्या कोणाचेच कोणी नाहीत. पण काळजी करू नका, तुमचा हेतू मला कळला…. मी पण याच वयात आहे….

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, देव कोणत्या रुपात येईल सांगता येत नाही आणि भोजनाने तृप्त झालेल्या माणसांचे आशीर्वाद, माझ्या आई वडिलांना मिळाले आहेत, यात मला समाधान आहे…”

काय बोलावं हे न समजता, त्या दोघांनी त्या तरुणाचे आभार मानले आणि नमस्कार करून बाहेर पडले, तृप्त होऊन….. आणि एक प्रकारची मानसिक शांतता त्या तरुणाच्या चेहेऱ्यावर होती….

लेखक: श्री पराग दामले

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कृष्णार्पण… कृष्णार्पण… कृष्णार्पण…” – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “कृष्णार्पण.. कृष्णार्पण.. कृष्णार्पण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

गोष्ट कधीची ते कुणी कधी नव्हतं सांगितलं …

पण  लहानपणच्या आजीच्या गोष्टीतली ही खूप आवडती गोष्ट… सांगायला आजीला आवडायची आणि ऐकायला आम्हाला… आजी कुठलीही असो… पण ही सवय असायचीच..

…. काहीही आपलं कृष्णार्पण म्हणायचं.. जेवण झालं की.. एखादं काम यशस्वी झालं की…  अगदी दारावर कुणी आलं आणि भिक्षा.. माधुकरी दिली तरीही कृष्णार्पण..

‘ असं का?? ‘ म्हटलं तर फक्त हसून द्यायचं.. आणि गोष्ट तशी साधीच होती…

एक कीर्तनकार देवळात कीर्तन करायचे तेव्हा देवळातल्या गर्दीत एक म्हातारी एका कोपऱ्यात वाती वळत कीर्तन ऐकायची..

.. एक वात करून बाजूला ठेवली की पुटपुटायची ओठातल्या ओठात… कृष्णार्पण…

कुणाच्या काय.. तिच्याही नकळत घडायचं हे… कीर्तन संपलं की देवाला नमस्कार करायचा,  बुवांच्या पाया पडायचं आणि आपलं सामान गुंडाळून घरी परतायचं.

दिवसामागून दिवस जात होते, आणि एक दिवस बुवांचं कीर्तन असं काही रंगलं… आजी ऐकता ऐकता मान डोलवत वाती वळत होती… कृष्णार्पण म्हणत होती…

…. आणि अचानक पुष्पक विमान की हो उतरलं देवळाच्या परिसरात.  सगळे अवाक्… कुणासाठी आलं.. बुवांसाठीच असणार..  बुवांनी गाभाऱ्याकडे वळून दंडवत घातलं आणि सगळ्यांचा निरोप घेतल्यासारखं करत पुष्पक विमानाकडे प्रस्थान ठेवलं…

…. विमानातून उतरलेले दूत शोधत होते कुणाला… बुवांना कळलं.. सगळ्यांना कळलं.. पुष्पक बुवांसाठी नव्हतं आलं…

बसलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांमधून वाट काढत दूत पुढे जात होते.. प्रत्येकाच्या मनात उमललेली, ‘माझ्यासाठी …?’ ही आशा क्षणात मालवत होती… ‘आपण नाही तर कोण???’ उत्सुकतेने नजर दूतांचा मागोवा घेत होती… कोण…?

‘आज्जी… आजी…’

‘ काय रे..? कृष्णार्पण..’  वात जुडीत ठेवत आजी विचारत्या झाल्या..

‘ तुम्हाला न्यायला आलोय…’

‘ थांब रे बाबा..  ह्या दोन वाती झाल्या की झालंच… बुवांचं कीर्तन का थांबलंय…? ’

‘ देवांनी बोलावणं धाडलंय… ‘

‘ बुवाsss ’…. आजींनी वर बघितलं तर बुवा हातात हार आणि कपाळावर नाम काढायची तार घेऊन नतमस्तक उभे होते…

‘आजी, चला…’

एव्हाना वातींची जुडी झाली होती.. कृष्णार्पण म्हणत आजींनी ती कनवटीला लावली… चष्म्याच्या भिंगातून बारीक डोळ्याने सगळं न्याहाळत बोलल्या,

‘ देवाचं बोलावणं … निघते आता…’

का..

कशाला..

कुठे..

कसलाच प्रश्न ना मनात आला आजींच्या ना चेहेऱ्यावर.. ना ओठांवर…

…. ‘ तुकारामांना आलं होतं विमान … तसंच त्या आजींना ही … नशीबवान गो बाय…कृष्णार्पण…’ माझी आजी सुस्कारायची..

खूप मोठी होईपर्यंत कधी कळलंच नाही… नक्की गोष्टीत काय घडलं आणि का घडलं…?

दरम्यान आजीही देवाघरी गेली…

…. एकदा अशीच गावी गेले होते… गावचं देऊळ आमच्या वाड्याच्या चौकात …

देवळात बुवा आजीचीच गोष्ट सांगत होते..

“कृष्णार्पण… कृष्णार्पण … कृष्णार्पण…”

.. मी क्षणात जीवाचा कान करून खांबाला टेकले… एव्हढ्या सगळ्यांमध्ये देवांनी पुष्पक आजींसाठीच धाडलं…

.. बुवा बोलत होते… आयुष्याचा प्रत्येक क्षण निरिच्छपणे जगत आजी कृष्णाला अर्पण करत होत्या… आयुष्य जसं येत होतं  तशा सामोऱ्या जात होत्या.. “का रे बाबा मीच.. “म्हणून विचारत नव्हत्या….. मिळाल्याची ना असोशी होती.. ना न मिळाल्याची खंत…  इतकं की देवाचं बोलावणंही कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य झालं…

…… कृष्णार्पण… श्वासातला श्वास तीच नेणिव… जाणिवेच्याही पलीकडची… कालानुगतिक… अव्याहत…

मी …

माझं..

मला …

कुठं मागं सुटलं आणि कधी..  तेही ना ठावे…

तो नेमून देत होता ते करणं आणि केल्यावर त्यालाच अर्पण करणं…  सहजी…

देवाला पोचतं ते हे …  असून नसणं…  तू देतोयस ते मान्य..  आणि तुझ्यातच विलीन करायचं तेही मान्य …

बुवा बोलत होते…

कित्येक वर्षांनी आज हे उत्तर मिळणार होतं … सहजी… अट्टाहासाने शोध न घेताही आत आत झिरपत होतं…

गोष्ट ना आजीची राहिली.. ना तिच्यासाठी आलेल्या पुष्पक विमानाची…

झिरपत गेलं … अणुरेणूत …कृष्णार्पण… कृष्णार्पण… कृष्णार्पण…

.. जे करतो त्याचं श्रेय मला हवं…  मला हवं…

‘ कशाला ग बाई…. म्हण कृष्णार्पण आणि हो मोकळी…अंतर्बाह्य रिकामी…’

…… श्रेय साचेल तिळातिळाने… अहंभाव वाढेल मणामणानं…

‘ देव आहे की नाही … हा भाग सोड.. तू तर आहेस ना…

.. मग करत रहा… आणि अवकाशात रिती होत रहा… रिती होत रहा …’

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुरुजी… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ गुरुजी… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

विसरलो नाही मी

तळव्यावरची जांभळी खूण

फोकाचा तो जाड व्यास

गणित म्हणजे काय अजून?

इतिहासाच्या सनावळी

एकाखाली एक शंभर ओळी

खाडाखोड केलीत तर

जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार

निबंधाचा साँल्लिड त्रास

वहीवरती लाल भोपळे

ओणवे रहा एक तास

आम्ल आणि अल्कली

सारी अक्कल बुडाली

शिवाय होती ठरलेली

शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर

पायाखाली तुडवीन

कोंबडीचे पाय काढलेत तर

वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे

इकडून तिकडे वाहून गेले

आमचे सारे बालपण

त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे

आपसूक शिकत गेलो

फटके खाल्ले थोडेफार

कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य

पाच आकडी पगार

कुणामुळे मिळाला

हा सुखी संसार?

ब्रँडेड शूज घेताना

तुटकी वहाण आठवते

कुणास ठाऊक कशासाठी

पापणी थोड़ी ओलावते!

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कवी : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अधिपत्य” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “अधिपत्य” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉल मध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे, सासू सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे, पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी, मुलांची बस येणार नव्हती, सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती, तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येतांना मुलांना घेऊन येऊ”

नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं, लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे, त्यानंतर बहुदा पहिल्यांदा दोघे बाहेर जात होते, एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना, तिने छानपैकी तयारी केली,  दोघेही निघाले, मुलांना शाळेत सोडलं, तिला खूप वेगळं वाटत होतं, स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागायची, पण मग सासू सासरे घरात नाही असं आठवलं की परत निर्धास्त होई,  त्याने मॉलकडे गाडी वळवली, मॉल मधली मोठमोठे शॉप बघत दोघे चालत होते, ती तिथल्या बायकाही बघत होती, वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस..मेकप मध्ये असलेल्या तिच्यातून अधिक वयाच्या बायका, एकदम मॉडर्न..अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती,जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती, पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…

एका दुकानापाशी थांबली, होम डेकोर चं साहित्य होतं तिथे, ती हात लावून एकेक बघत असतांना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे, काहीं कामाचं नाही, चल इथून” ते प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं  मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”

“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं..तू चल इथून..”

ती निघाली,

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,

चांगल्या धातूच्या सुंदर कढई बघू लागली,

पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला..

तो म्हणाला, “जड आहे खूप”

“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून”

“असं काही नसतं, तुला नाही कळत त्यातलं..चल”

तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली,

नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले,

ती म्हणाली मी मुलं खातात तसा पिझ्झा खाणार,

तो म्हणाला, मी ऑर्डर देऊन येतो..

“मी जाऊ का? तुम्ही बसा”

तो हसला,

“तुला नाही जमणार..मॉल मध्ये आहोत आपण, कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही..”

तो म्हणाला, तीही हसली..तिनेही आपलं “न जमणं” मान्यच केलेलं..

तो काउंटर वर गेला, गर्दी होती तिथे,

ती आजूबाजूला बघू लागली,

एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता,

मॉलमध्ये त्या फ्लोर च्या मधोमध एक छोटासा स्टेज होता, आजूबाजूला बरीच गर्दी होती, माईकवरुन आवाज येत हो..

काय असेल? तिला कुतूहल वाटलं..

नवरा लाईनमध्ये उभा होता, त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली,

“Now next contestant? Please step forward”

तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते, सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरीरीने भाग घेत होत्या, ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली तिला कळलंच नाही, तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला..

अरे देवा, हे कुठलं संकट…!

ती मागे फिरू बघत होती पण तो मुलगा ओरडला,

“ओह मॅडम, तिकडे कुठे, इकडे या”

ते ऐकून ती अजूनच घाबरली,

स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली, तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं…

त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता,

इंग्रजीमधले अवघड स्पेल्लिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते, ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता..

तिला दरदरून घाम फुटला,

सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, ला कुठे काय येत होतं?

त्यांना पहिला शब्द दिला..

लेफ्टनंट…

सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं,

तिला आठवलं,

सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता, त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली, तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं..

तिने बरोबर स्पेल्लिंग लिहिलं,

बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,

पुढचं स्पेल्लिंग, बुके..

तिला आठवलं, मुलांचे तापसलेले पेपर घरी आलेले तेव्हा मुलाने हे स्पेल्लिंग चुकवलं होतं, टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिले..ते तिच्या लक्षात होतं,

एक बाई आऊट झाली,

आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली,

पुढचं स्पेलिंग, रेस्टरन्ट..

तिच्या डोक्याला मुंग्या आल्या, सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं, डोळ्यात पाणी जमू लागलं..

नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोकून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात..फक्त नजर तीक्ष्ण हवी”

तिला येईना, तिने आजूबाजूला पाहिलं,

लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,

“कॉंटिनेंटल restaurant”

तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं..

दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,

ती जिंकली,

सर्वांनी टाळ्या वाजवल्या,

तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,

माईकवर तिचं नाव ऐकलं तसा तो ट्रे टेबलवर ठेऊन तिकडे पळाला,

त्याला सगळं समजलं, तो हैराण झाला..

सर्वांनी तिचं अभिनंदन केलं,

सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती, मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…

ती आनंदाने त्याच्यापाशी आली,

“तू आणि इंग्रजी स्पेल्लिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेल्लिंग विचारलेली की काय? हा हा हा” तो या गोष्टीकडे गम्मत म्हणून बघून हसत होता,

“अशी स्पेल्लिंग होती जी तुम्हालाही जमली नसती”

“मग तुला कशी जमली?”

“कसं आहे ना,

आजवर तूला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही हेच ऐकत होते आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला..तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी..पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले…कदाचित, उशिराच…”

तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..

नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला, सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला, काही जमेना..

तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,

“सोडा, तुम्हाला नाही जमणार”

जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, *अधिपत्य गाजवणं * म्हणतात.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “Less luggage, more comfort…” – लेखक : श्री सचिन मधुकर परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “Less luggage, more comfort…” – लेखक : श्री सचिन मधुकर परांजपे  ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

“Less luggage, more comfort…”

वयाच्या ८९ व्या वर्षी ती शेवटच्या ग्लानीत होती. काही शेवटचे क्षणच उरले असावेत बहुधा. तिने किंचित डोळे उघडले.

तो जवळच होता. नुकताच आला असावा कदाचित.“चला, निघूया का आपण? मलाही उशीर होतोय. काही उरलंसुरलं असेल तर….” तो किंचित हसला. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “तसं फार काही नाही पण मी काहींना माफ करणार नाही मरेपर्यंत…ती वाशीची कुमुद, माई सावंत, दिगंबर मुसळे आणि विद्याताई….”

“का बुवा?” मरणासन्न अवस्थेतही तिचा तो निर्धार बघून त्याला हसू आवरेना..

“का म्हणजे काय? या सगळ्यांनी आयुष्यभर छळलंय मला. अपमान, पदोपदी अपमान केलेत. तोंडाला येईल ते बोललेत. माझ्या माहेरचे उध्दार केलेत. प्रॉपर्टीवरुन वीस पंचवीस वर्षे कोर्टकज्जे चालवलेत हरामखोरांनी. त्या विद्याने तर माझा नवरा…. कधीच माफ करणार नाही”

तो उठला होता तो क्षणभर बसला. त्याने तिचा हात नीट धरला, “बरं…पण आता तुझ्या माफ न करण्यानं काय होईल? त्यावेळी तु प्रतिकार करु शकली नाहीस. नंतर कधी केला नाही. आणि आता माफ न करण्याचं ओझं शिरावर कोण घेऊन बसलंय? कुमुद याक्षणी वृध्दाश्रमात खितपत आहे. विद्याताई लंडनला मुलीकडे आहे मजेत असं तुला वाटतंय पण तिथे ती हक्काची मोलकरीण झालीये, वैतागलीये पण बोलणार कुणाला? दिगंबर मुसळे निजधामाला जाऊन दहा वर्षे झाली. माई सावंत अशाच कुठल्यातरी अज्ञातवासात…. नियती बघते काय ते? आणि तु तरी कुठे गं धुतल्या तांदळासारखी आहेस? तुझ्या हातूनही असंख्य चुका, अपमान झालेच आहेत की…. तु त्यांना माफ न करुन आता काहीच फरक पडत नाही. पण तुझ्या माथ्यावर ओझं मात्र झालंय खूप… ऐक एक, ते ओझं इथेच टाक, माफ कर आणि चल माझ्यासोबत”

“तुला काय जातंय बोलायला? मी सोसलंय”

“हो मान्य आहे. पण आता काय? एका ठराविक क्षणी याला काहीच अर्थ उरत नसतो. तु माफ न करुन आता काय होणार आहे नेमकं? तुला तर साधं बोटंही हलवता येत नाही. इथून जाताना ही विषारी आणि विखारी ओझी का नेतेयस? त्यावर पुढे खूप व्याज वाढतं. शिक्षा देणारी ती नियती आहे. तू नव्हेस…. तुला एक सांगू? प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. Less luggage, more comfort…”

ती अस्फुट हसली…. “करते रे बाबा माफ सगळ्यांना… ओझी कधीतरी उतरवायला हवीतच. हो ना?”

“परफेक्ट…” तो म्हणाला… आणि अर्धवट ग्लानीतला तिचा देह आता चिरनिद्रेत जाऊ लागला… तो एव्हाना तिला घेऊन खोलीबाहेर पडला.. आता ओझं हलके झाले होते…

 

लेखक: श्री सचिन मधुकर परांजपे

(पालघर)

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतरांच्या घरात भांडणं लावू नका… – लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ इतरांच्या घरात भांडणं लावू नका… – लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

इतरांच्या घरात भांडणं लावू नका….

एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते: “बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली? ”

मैत्रीण म्हणाली, “काहीच नाही! “

तेव्हा ती विचारते, “हे बरोबर आहे का? म्हणजे त्याच्या लेखी तुझी काही किंमतच नाही का? “

हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते.

संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि पाहतो की बायकोचा चेहरा उतरलेला आहे. मग दोघांमध्ये वाद होतो. एकमेकांना दोष दिले जातात.

शेवटी मारहाण होते आणि घटस्फोट होतो.

तुम्हाला माहितीये सगळ्याची सुरुवात कुठून झाली?

त्या एका निष्कारण प्रश्नातून, जो केवळ विचारपूस करण्यासाठी विचारला गेला होता.

रवि आपल्या जिवलग मित्र पवनला विचारतो: “कुठे काम करतोस? “

पवन – “अमुक एका दुकानात. “

रवि – “किती पगार मिळतो? “

पवन – “१८ हजार. “

रवि – “फक्त १८ हजार? इतक्यात कशी चालते तुमची रोजची जिंदगी? “

पवन – (खाली मान घालून) “काय सांगू रे… बस तसंच. “

या छोट्याशा संवादानंतर, पवनच्या मनात आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होतं.

त्याने पगारवाढीची मागणी केली, मालकाने नकार दिला. पवन नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो.

पूर्वी त्याच्याकडे काम होतं… आता काहीच नाही!

एका गृहस्थाने एका वृद्ध पित्याला विचारलं, “तुमचा मुलगा तुमच्याकडे फारसा येत नाही का? म्हणजे त्याला आता तुमच्याबद्दल प्रेम उरलेलं नाही वाटतं? ”

वडील म्हणाले, “तो खूप व्यस्त असतो. त्याला त्याची कामं, बायको, मुलं… वेळ मिळत नाही. “

ते गृहस्थ म्हणतात, “हे काय उत्तर झालं? तुम्ही त्याला वाढवलंत, सगळं दिलंत, आता तो म्हणतो त्याला वेळ नाही? “

त्या संभाषणानंतर, बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण झाली.

जेव्हा मुलगा भेटायला यायचा, तेव्हा त्याला बघूनही त्याच्या मनात असंच चालायचं.. “माझ्यासाठी वेळच नाही… “

एक गोष्ट लक्षात ठेवा:

आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनात खोल परिणाम करू शकतात. कधी कधी आपले प्रश्न निष्कपट वाटतात, पण ते दुसऱ्याच्या आयुष्यात विष पेरू शकतात. उदाहरणार्थ:

“तुम्ही हे का नाही घेतलंत? “

“तुमच्याकडे हे का नाही? “

“तुम्ही याच्यासोबत कसं राहू शकता? “

“तो तुमच्या योग्य आहे का? “

हे असले बिनधास्त प्रश्न, जे कधी कधी आपण नक्कीच चुकीच्या हेतूने विचारत नाही, पण हे विसरतो की, याचा परिणाम समोरच्याच्या आयुष्यावर किती खोल जाऊ शकतो. आज समाजात जे काही तणावाचे वातावरण आहे, त्याच्या मुळाशी गेलं, तर अनेकदा असं आढळतं की कोणाच्या तरी चुकीच्या बोलण्यामुळे हे निर्माण झालं आहे. जाणीवपूर्वक किंवा अज्ञानात, आपल्या शब्दांनी आपण कोणाच्या तरी आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो. म्हणून एकच विनंती….

लोकांच्या घरात अंधासारखं शिरा आणि मुक्यासारखं बाहेर या!

आपल्या शब्दांनी कुणाच्या घरी फूट न पडो, हीच खऱ्या माणसाची ओळख आहे.

लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares