मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

☆

वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली. प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली, असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला. मात्र कोणीच नाव सांगितलं नाही.

सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले, ”आपला आजचा तास इथेच संपतो आहे. पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो. “

किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले.

“काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती. वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ, असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं. पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली. रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक, सुंदर ललना उभी होती. मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का? हो, मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल. गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली. वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो. सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन.

तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे. मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली. एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं. निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली. अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो, त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं. त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल…

‘तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो. ‘

प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला.

प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले, ” माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे.

निघ बाहेर वर्गाच्या… “

*

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

लग्न म्हणजे फक्त फोटोमध्ये हसणाऱ्या दोन चेहऱ्यांची गोष्ट नाही. ती एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी आहे, ज्या हजारो वेळा तुटतात, पण जगाला न कळता पुन्हा स्वतःला जोडून घेतात.

पती-पत्नीच्या नात्यात फक्त प्रेमच नसते. त्यात राग असतो, अहंकार असतो, दुःख असते. असेही दिवस येतात की दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. पत्नीच्या मनात वेदना असते की, “हे कधीच बदलणार नाहीत. ” तर पतीच्या मनात खंत असते की, “ही मला कधीच समजून घेत नाही. ”

पण गंमत बघा…

तोच पती उशिरा घरी आला की पत्नी दाराच्या आवाजाने जागी होते. आणि तोच पती रागात असला तरी पत्नी जेवली नाही, हे कळल्यावर तिच्यासमोर ताट वाढतो.

यालाच विवाह म्हणतात.

मुलं लहान असताना घर गजबजलेलं असतं. आई-वडील स्वतःला मुलांच्या शिक्षणात, लग्नात, नोकरीत, नातवंडांत पूर्णपणे झोकून देतात. पण एक दिवस मुलं आपापल्या आयुष्यात रमून जातात. हळूहळू घर रिकामं होतं.

आणि मग फक्त दोघेच उरतात.

एकेकाळी त्रासदायक वाटणारे घोरणे, एखाद्या दिवशी ऐकू आले नाही तर डोळे पाणावतात. “इतकं बोलू नकोस, ” म्हणून ज्याला रागावलं होतं, तो आवाज कायमचा शांत झाला तर घराच्या भिंतीसुद्धा ओसाड वाटतात.

एखादा माणूस गेल्यावर सांत्वनासाठी अनेकजण येतात. पण रात्री पलंगावरील रिकामी जागा कोणी भरून काढू शकत नाही. औषध देणारा हात, “जेवलास/जेवलीस का? ” असे विचारणारा आवाज, रागामागे दडलेली काळजी दाखवणारे डोळे — हे सगळं परत आणता येत नाही.

म्हणून लक्षात ठेवा…

सर्वोत्तम जोडपे ते नसते, जे कधीच भांडत नाही.

सर्वोत्तम जोडपे ते असते, जे भांडणानंतरही एकमेकांची साथ सोडत नाही.

 वैवाहिक जीवनात प्रेमापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो.

समजूतदारपणापेक्षा संयम मोठा असतो.

आणि संयमापेक्षाही मोठं असतं ते मन, जे शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतं.

खोडकरपणा, लाज, भांडणं, शांतता, संघर्ष, आनंद, अश्रू, हसू, तडजोड — या सगळ्यांनी मिळून विवाह पवित्र बनतो.

आपला जोडीदार जिवंत असतानाच त्याची किंमत ओळखा. कारण जिवंतपणी दिलेला सन्मान हा मृत्यूनंतर गाळलेल्या अश्रूंहून अधिक पवित्र असतो.

हे नेहमी लक्षात ठेवा…

आयुष्यात परिपूर्ण जोडीदार कधीच मिळत नाही. पण तुमच्या अपूर्णता स्वीकारून शेवटपर्यंत तुमची साथ देणारा जोडीदार मिळणे, याहून मोठे भाग्य दुसरे नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संक्रमण..  – कवी – ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे ☆

ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ संक्रमण..  – कवी – ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

☆

सूर्योदय तो पूर्वेला अन्

 पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

 त्रिकालाबाधित सत्य असे ।

 *

रवि जरासा अवखळ भारी

 एका जागी स्थिर नसे

 एका जागी नित्य उगवणे

 हेच तया मंजुर नसे ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

 जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

 मजला येईल कंटाळा ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

 उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

 पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेव ही हसले किंचीत

 हट्ट पाहुनी सुर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

 हा मेळ कसा साधायचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

 ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

 पश्चिमेस जा अस्ताला ।।

 *

परी उगवता पूर्व दिशेला

 उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

 दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

 उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

 जागा बदले नित्याची ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

 उत्तरायनी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

 दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

 गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

 नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

 बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

 हे देवाचे दान असे ।

☆

कवी – ॲड .समीर आठल्ये

प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिऊताई, दार उघड…” – लेखक : दत्ता कुकडे ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिऊताई, दार उघड…” – लेखक : दत्ता कुकडे ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

बाल्कनीत बसून सकाळचा चहा घेत होतो. बाहेर पाऊस रिमझिम सुरू होता. समोरच्या वायरवर एक कावळा बसला होता. अंगावर पडलेले थेंब झटकत तो इकडे तिकडे पाहत होता. त्याला पाहताच अचानक बालपणात ऐकलेली गोष्ट आठवली.

“एक होती चिऊ, एक होती काऊ… “

मोठा पाऊस आला. चिऊचे घर मेणाचे होते, काऊचे घर शेणाचे. पावसात काऊचे घर वाहून गेले. मग ती चिऊच्या दाराशी आली.

“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “

आणि मग चिऊचे नेहमीचे उत्तर…

“थांब गं, माझ्या बाळाला अंघोळ घालते. “

थोड्या वेळाने…

“थांब गं, माझ्या बाळाला जेवू घालते. “

पुन्हा थोड्या वेळाने…

“थांब गं, माझ्या बाळाला झोपवते. “

लहानपणी ही गोष्ट गोड वाटायची. चिऊ शहाणी आणि काऊ थोडी भोळी, एवढाच तिचा अर्थ वाटायचा. पण आज त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहावेसे वाटते.

आता मला चिऊचे घर मेणाचे वाटत नाही. ते सिमेंट-काँक्रीटचे, मजबूत घर वाटते. आणि काऊचे घर म्हणजे एखादी मातीची झोपडी वाटते. पाऊस आला की चिऊच्या घरातील माणसे खिडकीतून पाऊस पाहतात. काऊच्या घरातील माणसे मात्र आकाशाकडे पाहत काळजी करतात.

चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला अंघोळ घालते. “

मला प्रश्न पडतो, काऊला बाळ नसते का?

चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला जेवू घालते. “

काऊची पिल्ले उपाशी नसतात का?

गोष्ट पुढे जाते आणि एक वाक्य येते, “कोणत्या पोत्यात बसशील? “

लहानपणी हे वाक्य गंमतीशीर वाटायचे. आज त्याचा अर्थ वेगळा जाणवतो. ज्याच्या घरात पोती आहेत, धान्याचा साठा आहे, त्यालाच हा प्रश्न पडू शकतो. ज्याच्याकडे दोन दिवसांपुरतेही धान्य नाही, त्याला पोत्याचा पर्यायच नसतो.

कदाचित ही गोष्ट नकळत समाजाचे चित्र दाखवत असावी.

एकीकडे सुरक्षित घरे, बँकेतली बचत, विमा, साठवणूक आणि उद्याची चिंता कमी असलेले लोक.

दुसरीकडे रोज कमावून रोज खाणारे, पावसाने काम बंद झाले की चूल विझणारे लोक.

पाऊस मात्र दोघांच्या छपरावर सारखाच पडतो.

निसर्ग भेदभाव करत नाही. पण माणसांची परिस्थिती मात्र सारखी नसते.

या गोष्टीतला खरा प्रश्न चिऊ वाईट आहे की काऊ भोळी आहे हा नाही. खरा प्रश्न असा आहे की काऊ दाराशी आली तेव्हा चिऊने तिची भीती, तिचे दु:ख, तिची असुरक्षितता समजून घेतली का?

आज आपल्या सभोवताली अनेक “काऊ” दिसतात. पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, बेघर, बेरोजगार, संकटात सापडलेले लोक. आणि अनेक “चिऊ” देखील दिसतात. ज्यांच्याकडे साधनसंपत्ती आहे, सुरक्षितता आहे, साठा आहे.

प्रश्न एवढाच आहे की काऊ दाराशी आली तर आपण तिला किती वेळ थांबवणार?

कारण शेवटी माणुसकीचा अर्थ एवढाच असतो की आपल्या घराचे दार बंद करून सुरक्षित बसणे नव्हे, तर संकटात सापडलेल्या दुसऱ्यासाठी ते दार उघडणे.

बालपणीची ती साधी गोष्ट आजही कानात घुमते…

“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “

आणि वाटते, प्रत्येक पावसाळ्यात हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला हवा. संपत्तीची खरी परीक्षा साठा किती आहे यावर होत नाही; दार किती उघडे आहे यावर होते.

 “लहानपणी आपण चिऊचे कौतुक करतो, मोठे झाल्यावर काऊचे दु:ख समजू लागते, आणि आयुष्याचा खरा धडा तेव्हा मिळतो जेव्हा आपण स्वतः चिऊ असूनही काऊसाठी दार उघडतो. “

लेखक: दत्ता कुकडे

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

एकदा पत्नीने मला सहज विचारले…

“सांगा ना, जर कधी अशी वेळ आली की तुझी आई किंवा मी… आमच्यापैकी एकीचीच निवड करावी लागली, तर तू कोणाला निवडशील?”

 

प्रश्न साधाच होता…

पण उत्तर देताना अनेक नात्यांचे ओझे मनावर येऊन बसले.

 

मी काही क्षण शांत राहिलो…

आणि मग हळूवार पणे म्हणालो,

“मी… माझ्या आईची निवड करीन.”

 

क्षणात तिचा चेहरा उतरला.

ती हळव्या आवाजात म्हणाली..

“ज्याच्यासाठी मी माझे माहेर सोडले…

आई-वडील, भाऊ-बहीण सोडले…

सगळे आयुष्य तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या घरी आले…

त्याच माणसाच्या आयुष्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे…?”

 

तिच्या डोळ्यांतील दुःख मला दिसत होते.

मी तिचे हात हातात घेतले आणि शांतपणे म्हणालो…

“अगं वेडे… माझे उत्तर तुझ्यावरच्या प्रेमाचे मोजमाप नाही.

ते माझ्या संस्कारांचे प्रतिबिंब आहे.

आज जर मी माझ्या पत्नीसाठी माझ्या जन्मदात्या आईला दूर केले…

तर, उद्या आपला मुलगाही त्याच्या पत्नीसाठी स्वतःच्या आईला… म्हणजे तुलाच… दूर करणे योग्य समजेल.

आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यांतले अश्रू मी कधीच पाहू शकणार नाही.

म्हणून मला माझ्या मुलांना एवढेच शिकवायचे आहे—

आईचा सन्मान करताना पत्नीचा अपमान करू नका…

आणि पत्नीवर प्रेम करताना आईला विसरू नका.

कारण प्रेम म्हणजे कोणाला जिंकणे नाही…

तर प्रेम म्हणजे कोणालाही न हरवता सगळ्यांना जपणे.”

 

हे ऐकून तिच्या डोळ्यांतले अश्रू अलगद ओघळले…

पण त्या अश्रूंमध्ये पराभव नव्हता…

होता तो माझ्या विचारांचा स्वीकार…!

आणि दोन्ही नात्यांचा सन्मान करणाऱ्या एका घराचा सुंदर पाया…!

 

लक्षात ठेवायला हवे…

आई ही जीवनाची सुरुवात आहे…

पत्नी ही जीवनप्रवासाची साथ आहे…

 

एकीने जन्म दिला…

दुसरी आयुष्याला अर्थ देते…

या दोघींपैकी कोण मोठे? कोण जवळचे? कोण अधिक प्रेमाचे? हे प्रश्नच चुकीचे आहेत.

 

कारण घर तेव्हा स्वर्ग बनते, जेव्हा तिथे तुलना नसते…

अहंकार नसतो…

तर असतो फक्त परस्परांचा आदर, प्रेम आणि जपणूक.

 

खरा पुरुष तो नाही जो एका नात्यासाठी दुसरे नाते तोडतो…

खरा पुरुष तो आहे, जो दोन्ही नात्यांना न्याय देतो, दोघींच्या डोळ्यांत विश्वास ठेवतो आणि पुढच्या पिढीला नात्यांचा खरा संस्कार देतो.

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

☆

 पंढरपूरचा विठु काल

 अचानक आला घरी

आणि म्हणाला, आवर लवकर बयो

निघालेत वारकरी ।।

 

मी म्हणाले निघते हं विठु घरचं एकदा बघते।

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते।।

 

लगबग माझी सुरू झाली

नवऱ्याचे कपडे बघू की

मुलांसाठी खाऊ करु

एवढया कमी अवधीत

सगळं कसं आवरू ?

 

शेवटी एकदाची तयार झाले

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

 

काळजातली गलबल लपवु पाहत होते।

डोळ्यांमधले अश्रु थोपवू पाहत होते ।।

 

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी।

मीच मला समजावत होते परोपरी ।

 

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असु दे,बघु पुढे केव्हातरी ।।

 

माझा एक पाय आत,एक पाय बाहेर।

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।।

 

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना।

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना।।

 

मी म्हणाले, सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं।

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।।

 

उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी।

तूच आता काहीतरी दे बाबा हमी।।

 

कुणी म्हणतं ममत्व सोड ।

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

 

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे ।

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे।।

 

एकच भीती वाटते विठु,

प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक

तुटून जाईल ही श्वासाची दोरी ।

आणि कधीच घडणार नाही रे,

तुझ्या पंढरपूरची वारी ।।

 

माझ्या डोळ्यातले अश्रु त्याने अलगद पुसले ।

त्याच्याही डोळयांत कुठेतरी मला ते दिसले।।

 

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,

संसार सोडू नकोस,एक फक्त कर

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव।

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।।

 

इंद्रियांना करू देत त्यांचं काम ।

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।।

 

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही।

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही।।

 

तुझ्या हृदयातला माझाअंश ,त्याला ठेव साक्षी

 त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता ।

 

मग बघ मन, बुद्धी, चित्त, अहंकार..

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।।

 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल।

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।।

 

अहंकार गेला की ममत्वही सुटेल ।

रज-तमाचं कवाड एक एक करून मिटेल ।।

 

 हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश ।

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।।

 

 निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल।

आणि विश्वास ठेव पोरी!

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

 

 जय हरि

         

कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

☆

मी कोण?

नोकरी संपली,

दिनक्रमही गेला,

घरातली गजबजही थांबली,

आणि शांततेच्या प्रतिध्वनीत

मी स्वतःला शोधायला लागलो.

 

मी कोण?

बंगलो बांधले,

फार्महाऊस उभारले,

मोठी-लहान गुंतवणूक केली,

आणि आता?

चार भिंतीत अडकून पडलोय.

 

सायकलवरून मोपेड,

मोपेडवरून मोटार,

मोटारीतून गाडी,

गती आणि स्टाईलच्या मागे धावलो,

पण आता?

हळूहळू पाय रेंगत रेंगत

आपल्या खोलीतच फिरतोय.

 

निसर्गाने विचारलं—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी म्हणालो,

“मी… फक्त मीच.”

 

राज्य, देश, खंड फिरलो,

पण आज

माझे प्रवास

हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच.

 

संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या,

पण आता माझ्या कुटुंबाने

मला समजून घ्यावं

अशी इच्छा आहे.

 

निसर्ग हसून म्हणाला—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी उत्तर दिलं,

“मी… फक्त मीच.”

 

पूर्वी वाढदिवस,

लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले,

पण आज

फक्त छान झोप लागली,

भूक लागली,

हेच साजरं करतो.

 

सोने, चांदी, हिरे, मोती

सगळं बँकेत गप्प बसलंय.

सूट-बूट कपाटात लटकलेले.

आता फक्त मऊ सुताचे कपडे,

साधेपणातला आराम.

 

इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो,

पण आता

माझ्या मायबोलीतच

सुख मिळतं.

 

व्यवसायासाठी

जगभर धावलो,

नफा-तोट्यांची गणितं केली,

पण आज

फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो.

 

व्यवसाय सांभाळला,

कुटुंब जोडलं,

खूप नाती केली,

पण आता?

शेजारचा साधा-सोपा माणूसच

माझा जिवलग सोबती आहे.

 

नियम पाळले,

शिक्षण घेतलं,

पण आता कळतंय—

खरं महत्त्वाचं काय आहे.

 

जीवनाचे चढउतार अनुभवून,

शांत क्षणी

माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं:

 

“पुरे झालं आता…

तयार हो प्रवासी,

अंतिम प्रवासासाठी…”

 

निसर्ग पुन्हा हसून विचारतो—

“कोण आहेस रे मित्रा?”

 

मी हळूच म्हणतो:

“अरे निसर्गा,

तूच मी…आणि मीच तू.

एकेकाळी आकाशात झेपावलो,

आता जमिनीलाही

प्रेमाने स्पर्शतो.

मला माफ कर…

एकदा पुन्हा जगू दे मला—

पैशाच्या यंत्रासारखा नव्हे,

तर खराखुरा माणूस म्हणून—

मुलांसह, कुटुंबासह, आणि प्रेमासह.”

 

वरिष्ठ नागरिकांना समर्पित

 संपत्ती एका झटक्यात,

सौंदर्य एका आजारात,

आणि प्रतिष्ठा एका चुकीत

नष्ट होते,

म्हणूनच या तिन्ही गोष्टींचा

कधीही गर्व नको ..!

 ☆

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ भारतीय वैभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष ☆

वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भारतीय वैभव…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

☆

आपल्यातील बरेच मित्र परदेश वारी आणि तेथील कौतुक सांगतात.

अमेरिकेला भेट देत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि सल्ला:

प्रिय मित्रांनो,

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही अमेरिकेतील सिएटल, वॉशिंग्टन येथे राहत आहोत. भारतातून निघताना माझ्या पत्नीला श्वसनाचा गंभीर त्रास होता. त्यामुळे तिच्या प्रकृतीचा विचार करून आम्ही भारतातून पुरेसा औषधसाठा सोबत आणला होता. अमेरिकेत ती औषधे घेतल्यानंतर तिची प्रकृती जवळजवळ पूर्णपणे सुधारली.

मात्र औषधे संपल्यावर मला काळजी वाटू लागली की प्रवासादरम्यान पुन्हा तिचा त्रास सुरू होऊ नये. म्हणून मी माझ्या मुलीला सिएटलमधील फुफ्फुसरोगतज्ज्ञ (Pulmonologist) यांची भेट ठरवण्यास सांगितले.

परंतु आम्हाला सांगण्यात आले की तज्ज्ञ डॉक्टरांना थेट भेटता येत नाही. आधी सामान्य वैद्यकीय तज्ज्ञ (General Physician) यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट मिळाली आणि तीदेखील फक्त व्हिडिओ कॉलद्वारे.

सुमारे १० मिनिटे डॉक्टरांशी संवाद झाला. भारतात पत्नी कोणती औषधे घेत होती, याची माहिती दिल्यानंतर त्यांनी ती समजून घेतली आणि आवश्यक औषधे लिहून दिली. ती औषधे जवळच्या औषधालयातून मिळतील, असे त्यांनी सांगितले.

मात्र औषधालयात गेल्यावर कळले की ती औषधे तात्काळ उपलब्ध नाहीत आणि ती यायला ४–५ दिवस लागतील.

शेवटी पाचव्या दिवशी औषधे मिळाली. विशेष म्हणजे ती औषधे ‘Cipla’ कंपनीची होती आणि त्यावर “Made in India” असे स्पष्ट लिहिलेले होते. अमेरिकेतील वैद्यकीय विम्यामुळे ५०% सवलत मिळाल्यानंतरही आम्हाला सुमारे ₹२१, ००० मोजावे लागले. म्हणजे भारतात सुमारे ₹२, ५०० किंमतीची औषधे अमेरिकेत जवळपास ₹४२, ००० इतकी महाग पडतात.

भारतात सहज उपलब्ध होणारी ही औषधे मिळवण्यासाठी आम्हाला अमेरिकेत तब्बल १२ दिवस वाट पाहावी लागली. त्यानंतर आठवडाभराने डॉक्टरांच्या सल्लामसलतीसाठी $283 (सुमारे ₹२३, ०००) चे बिलही आले.

निवृत्तीनंतर भारतात राहण्याचे भाग्य लाभले आहे, याची जाणीव ठेवा.

आपण अनेकदा “चांगल्या जीवनाच्या” शोधात परदेशाकडे पाहतो. पण जर शांतपणे विचार केला तर लंडन किंवा न्यूयॉर्कमधील अब्जाधीशांनाही सहज उपलब्ध नसलेल्या अनेक दैनंदिन सुविधा भारतातील मध्यमवर्गीयांना सहज मिळतात.

भारतातील सामान्य माणसाचेही जीवन “व्हीआयपी” का वाटते? — ७ उदाहरणे

१. स्वस्त आणि वेगवान इंटरनेट:

जगातील अनेक देशांमध्ये साध्या इंटरनेटसाठी दरमहा $50 (सुमारे ₹४, ०००) पेक्षा अधिक खर्च येतो. पण भारतात अवघ्या ₹३०० मध्ये हाय-स्पीड 5G डेटा उपलब्ध आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा भारतात आहे आणि त्यामुळेच डिजिटल क्रांती घडली.

२. १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी:

चहासाठी आले किंवा दूध संपले? Blinkit, Zepto किंवा Swiggy Instamart वर ऑर्डर करा आणि पाणी उकळण्याआधीच वस्तू घरी पोहोचते. युरोपमध्ये मात्र थंडीत चालत दुकानात जावे लागते आणि दुकान बंद असण्याची शक्यताही असते.

३. तत्काळ आरोग्यसेवा:

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास थेट रुग्णालयात जाता येते. रक्ततपासणीसाठी सकाळीच तंत्रज्ञ घरी येतो आणि दुपारपर्यंत अहवाल WhatsApp वर मिळतो. अनेक पाश्चिमात्य देशांप्रमाणे महिनोनमहिने प्रतीक्षा किंवा विम्याच्या मंजुरीसाठी धावपळ करावी लागत नाही.

४. मानवी मदतीची साखळी:

घरकाम, स्वयंपाक, वाहनचालक यांसाठी मदत मिळणे ही भारतात फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही; मध्यमवर्गीय जीवनाचाही तो महत्त्वाचा भाग आहे. यामुळे सर्वात मौल्यवान गोष्ट मिळते—वेळ.

५. UPI क्रांती:

₹५ च्या चहापासून ₹५०, ००० च्या लॅपटॉपपर्यंत—फक्त QR कोड स्कॅन करून पैसे देता येतात. पाकीट बाळगण्याची गरज नाही, कार्ड मशीन बंद असल्याचे कारण नाही आणि व्यवहार शुल्कही नाही. या बाबतीत भारत जगाच्या खूप पुढे आहे.

६. छोट्या पण महत्त्वाच्या सुविधा:

रेस्टॉरंटमध्ये मोफत पिण्याचे पाणी मिळते. गल्लीतच इस्त्रीवाला किंवा चहावाला सहज सापडतो. अशा छोट्या गोष्टी आयुष्य अधिक सोपे आणि सुखकर बनवतात.

७. सामाजिक नाती – एक मजबूत सुरक्षा कवच:

आपली संस्कृती न्यायालयीन नोटिसांची नसून नातेसंबंधांची आहे. अडचण आल्यास शेजारी कोर्टात जाण्याऐवजी प्रेमाने खिचडी करून पाठवतात.

निष्कर्ष:

भारत हा केवळ एक देश नाही; तो असंख्य सोयी-सुविधांनी परिपूर्ण असा जीवनाचा अनुभव आहे. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना लॉन कापण्यापासून प्लंबिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतः करावे लागते. भारतात मात्र सेवा-केंद्रित जीवनशैलीमुळे अनेक कामांसाठी सहज मदत उपलब्ध होते.

इथे आपण केवळ जगत नाही, तर आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेणारी एक व्यवस्था आपल्या भोवती असते. हेच “भारतीय वैभव” आहे—ज्याचा हेवा जगातील अनेक देशांना वाटतो.

☆

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पूर्वीचा काळ… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पूर्वीचा काळ… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

☆

पूर्वीचा काळ बाबा,

खरंच होता चांगला,

साधे घरं, साधी माणसं,

कुठे होता बंगला?

*

 घरं जरी साधेच पण,

 माणसं होती मायाळू,

 साधी राहणी चटणी भाकरी

 देवभोळी अन श्रद्धाळू.

*

सख्खे काय चुलत काय,

सगळेच आपले वाटायचे,

सुख असो दुःख असो,

आपुलकीने भेटायचे.

*

 पाहुणा दारात दिसला की,

 खूपच आनंद व्हायचा हो,

 हसून खेळून गप्पा मारून,

 शीण निघून जायचा हो.

*

श्रीमंती जरी नसली तरी,

एकटं कधी वाटलं नाही,

खिसे फाटके असले तरीही,

कोणतंच काम रुकलं नाही.

*

 उसनं पासनं करायचे पण,

 पोटभर खाऊ घालायचे,

 पैसे आडके नव्हते तरीही,

 मन मोकळं बोलायचे.

*

कणकेच्या उपम्या सोबत,

गुळाचा शिरा हटायचा,

पत्रावळ जरी असली तरी,

पाट , तांब्या मिळायचा.

*

 लपाछपी पळापळी,

 बिन पैशाचे खेळ हो,

 कुणीच कुठे बिझी नव्हते,

 होता वेळच वेळ हो.

*

चिरेबंदी वाडेसुद्धा,

खळखळून हसायचे,

निवांत गप्पा मारीत माणसं,

ओसरीवर बसायचे.

*

 सुख शांती समाधान “ते”

 आता कुठे दिसते का ?

 पॉश पॉश घरामध्ये,

 “तशी” मैफिल सजते का ?

*

नाते गोते घट्ट होते,

किंमत होती माणसाला,

प्रेमामुळे चव होती,

अंगणातल्या फणसाला.

*

 तुम्हीच सांगा नात्यामध्ये,

 राहिला आहे का राम ?

 भावाकडे बहिणीचा हो,

 असतो का मुक्काम ?

*

सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,

कुणीच कुणाला बोलत नाही,

मृदंगाच्या तालावरती,

गाव आता का डोलत नाही.

*

 प्रेम, माया, आपुलकी हे,

 शब्द आम्हा गावतील का?

 बैठकीतल्या सतरंजीवर,

 पुन्हा पाहुणे मावतील का?

*

तुटक तुसडे वागण्यामुळे,

मजा आता कमी झाली,

श्रीकृष्णाच्या महालामधुनी,

सुदामाची सुट्टी झाली.

*

 हॉल किचन बेडमध्ये,

 प्रदर्शन असतं वस्तूंचं,

 का बरं विसर्जन झालं,

 चांगुलपणाच्या अस्थीचं?

☆

कवी : अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.

एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.

त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.

ज्यामध्ये असे लिहिले होते की..

माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.

अर्थात ही वाटणी कशी व्हायची, असा सर्वांचाच गोंधळ उडाला.

 १९ उंटापैकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.

त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहिले.

त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?

 सगळेच खूप गोंधळले होते.

तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.

तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.

त्याने समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.

मग म्हणाला,” ठीक  आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.”

प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.तो म्हणतो की, “त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.”

तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.

असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.

आता एकूण उंट १९+१=२० झाले.

२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.

उरले १० उंट.

२० उंटापैकी एक चतुर्थांश  हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.

२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.

असे एकूण १०+५+४=१९ होतात.

त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता, तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.

अशा प्रकारे १ उंट मिसळल्यानंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.

त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.

५ ज्ञानेंद्रिये.

(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)

५ कर्मेद्रिंये.

(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुदद्वार)

५ पंचप्राण.

(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )

आणि…

४ अंतःकरण चतुष्ट्य.

 (मन, बुद्धी, चित्त, अहंकार)

असे एकूण १९ उंट आहेत.

माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.

आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात  “मित्र” रूपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा “मित्र” रूपी उंट सोबत ठेवा.

जोपर्यंत मित्ररूपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares