मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

 पंढरपूरचा विठु काल

 अचानक आला घरी

आणि म्हणाला, आवर लवकर बयो

निघालेत वारकरी ।।

 

मी म्हणाले निघते हं विठु घरचं एकदा बघते।

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते।।

 

लगबग माझी सुरू झाली

नवऱ्याचे कपडे बघू की

मुलांसाठी खाऊ करु

एवढया कमी अवधीत

सगळं कसं आवरू ?

 

शेवटी एकदाची तयार झाले

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

 

काळजातली गलबल लपवु पाहत होते।

डोळ्यांमधले अश्रु थोपवू पाहत होते ।।

 

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी।

मीच मला समजावत होते परोपरी ।

 

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असु दे,बघु पुढे केव्हातरी ।।

 

माझा एक पाय आत,एक पाय बाहेर।

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।।

 

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना।

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना।।

 

मी म्हणाले, सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं।

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।।

 

उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी।

तूच आता काहीतरी दे बाबा हमी।।

 

कुणी म्हणतं ममत्व सोड ।

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

 

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे ।

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे।।

 

एकच भीती वाटते विठु,

प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक

तुटून जाईल ही श्वासाची दोरी ।

आणि कधीच घडणार नाही रे,

तुझ्या पंढरपूरची वारी ।।

 

माझ्या डोळ्यातले अश्रु त्याने अलगद पुसले ।

त्याच्याही डोळयांत कुठेतरी मला ते दिसले।।

 

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,

संसार सोडू नकोस,एक फक्त कर

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव।

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।।

 

इंद्रियांना करू देत त्यांचं काम ।

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।।

 

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही।

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही।।

 

तुझ्या हृदयातला माझाअंश ,त्याला ठेव साक्षी

 त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता ।

 

मग बघ मन, बुद्धी, चित्त, अहंकार..

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।।

 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल।

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।।

 

अहंकार गेला की ममत्वही सुटेल ।

रज-तमाचं कवाड एक एक करून मिटेल ।।

 

 हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश ।

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।।

 

 निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल।

आणि विश्वास ठेव पोरी!

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

 

 जय हरि

         

कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

मी कोण?

नोकरी संपली,

दिनक्रमही गेला,

घरातली गजबजही थांबली,

आणि शांततेच्या प्रतिध्वनीत

मी स्वतःला शोधायला लागलो.

 

मी कोण?

बंगलो बांधले,

फार्महाऊस उभारले,

मोठी-लहान गुंतवणूक केली,

आणि आता?

चार भिंतीत अडकून पडलोय.

 

सायकलवरून मोपेड,

मोपेडवरून मोटार,

मोटारीतून गाडी,

गती आणि स्टाईलच्या मागे धावलो,

पण आता?

हळूहळू पाय रेंगत रेंगत

आपल्या खोलीतच फिरतोय.

 

निसर्गाने विचारलं—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी म्हणालो,

“मी… फक्त मीच.”

 

राज्य, देश, खंड फिरलो,

पण आज

माझे प्रवास

हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच.

 

संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या,

पण आता माझ्या कुटुंबाने

मला समजून घ्यावं

अशी इच्छा आहे.

 

निसर्ग हसून म्हणाला—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी उत्तर दिलं,

“मी… फक्त मीच.”

 

पूर्वी वाढदिवस,

लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले,

पण आज

फक्त छान झोप लागली,

भूक लागली,

हेच साजरं करतो.

 

सोने, चांदी, हिरे, मोती

सगळं बँकेत गप्प बसलंय.

सूट-बूट कपाटात लटकलेले.

आता फक्त मऊ सुताचे कपडे,

साधेपणातला आराम.

 

इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो,

पण आता

माझ्या मायबोलीतच

सुख मिळतं.

 

व्यवसायासाठी

जगभर धावलो,

नफा-तोट्यांची गणितं केली,

पण आज

फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो.

 

व्यवसाय सांभाळला,

कुटुंब जोडलं,

खूप नाती केली,

पण आता?

शेजारचा साधा-सोपा माणूसच

माझा जिवलग सोबती आहे.

 

नियम पाळले,

शिक्षण घेतलं,

पण आता कळतंय—

खरं महत्त्वाचं काय आहे.

 

जीवनाचे चढउतार अनुभवून,

शांत क्षणी

माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं:

 

“पुरे झालं आता…

तयार हो प्रवासी,

अंतिम प्रवासासाठी…”

 

निसर्ग पुन्हा हसून विचारतो—

“कोण आहेस रे मित्रा?”

 

मी हळूच म्हणतो:

“अरे निसर्गा,

तूच मी…आणि मीच तू.

एकेकाळी आकाशात झेपावलो,

आता जमिनीलाही

प्रेमाने स्पर्शतो.

मला माफ कर…

एकदा पुन्हा जगू दे मला—

पैशाच्या यंत्रासारखा नव्हे,

तर खराखुरा माणूस म्हणून—

मुलांसह, कुटुंबासह, आणि प्रेमासह.”

 

वरिष्ठ नागरिकांना समर्पित

 संपत्ती एका झटक्यात,

सौंदर्य एका आजारात,

आणि प्रतिष्ठा एका चुकीत

नष्ट होते,

म्हणूनच या तिन्ही गोष्टींचा

कधीही गर्व नको ..!

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ भारतीय वैभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष ☆

वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भारतीय वैभव…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

आपल्यातील बरेच मित्र परदेश वारी आणि तेथील कौतुक सांगतात.

अमेरिकेला भेट देत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि सल्ला:

प्रिय मित्रांनो,

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही अमेरिकेतील सिएटल, वॉशिंग्टन येथे राहत आहोत. भारतातून निघताना माझ्या पत्नीला श्वसनाचा गंभीर त्रास होता. त्यामुळे तिच्या प्रकृतीचा विचार करून आम्ही भारतातून पुरेसा औषधसाठा सोबत आणला होता. अमेरिकेत ती औषधे घेतल्यानंतर तिची प्रकृती जवळजवळ पूर्णपणे सुधारली.

मात्र औषधे संपल्यावर मला काळजी वाटू लागली की प्रवासादरम्यान पुन्हा तिचा त्रास सुरू होऊ नये. म्हणून मी माझ्या मुलीला सिएटलमधील फुफ्फुसरोगतज्ज्ञ (Pulmonologist) यांची भेट ठरवण्यास सांगितले.

परंतु आम्हाला सांगण्यात आले की तज्ज्ञ डॉक्टरांना थेट भेटता येत नाही. आधी सामान्य वैद्यकीय तज्ज्ञ (General Physician) यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट मिळाली आणि तीदेखील फक्त व्हिडिओ कॉलद्वारे.

सुमारे १० मिनिटे डॉक्टरांशी संवाद झाला. भारतात पत्नी कोणती औषधे घेत होती, याची माहिती दिल्यानंतर त्यांनी ती समजून घेतली आणि आवश्यक औषधे लिहून दिली. ती औषधे जवळच्या औषधालयातून मिळतील, असे त्यांनी सांगितले.

मात्र औषधालयात गेल्यावर कळले की ती औषधे तात्काळ उपलब्ध नाहीत आणि ती यायला ४–५ दिवस लागतील.

शेवटी पाचव्या दिवशी औषधे मिळाली. विशेष म्हणजे ती औषधे ‘Cipla’ कंपनीची होती आणि त्यावर “Made in India” असे स्पष्ट लिहिलेले होते. अमेरिकेतील वैद्यकीय विम्यामुळे ५०% सवलत मिळाल्यानंतरही आम्हाला सुमारे ₹२१, ००० मोजावे लागले. म्हणजे भारतात सुमारे ₹२, ५०० किंमतीची औषधे अमेरिकेत जवळपास ₹४२, ००० इतकी महाग पडतात.

भारतात सहज उपलब्ध होणारी ही औषधे मिळवण्यासाठी आम्हाला अमेरिकेत तब्बल १२ दिवस वाट पाहावी लागली. त्यानंतर आठवडाभराने डॉक्टरांच्या सल्लामसलतीसाठी $283 (सुमारे ₹२३, ०००) चे बिलही आले.

निवृत्तीनंतर भारतात राहण्याचे भाग्य लाभले आहे, याची जाणीव ठेवा.

आपण अनेकदा “चांगल्या जीवनाच्या” शोधात परदेशाकडे पाहतो. पण जर शांतपणे विचार केला तर लंडन किंवा न्यूयॉर्कमधील अब्जाधीशांनाही सहज उपलब्ध नसलेल्या अनेक दैनंदिन सुविधा भारतातील मध्यमवर्गीयांना सहज मिळतात.

भारतातील सामान्य माणसाचेही जीवन “व्हीआयपी” का वाटते? — ७ उदाहरणे

१. स्वस्त आणि वेगवान इंटरनेट:

जगातील अनेक देशांमध्ये साध्या इंटरनेटसाठी दरमहा $50 (सुमारे ₹४, ०००) पेक्षा अधिक खर्च येतो. पण भारतात अवघ्या ₹३०० मध्ये हाय-स्पीड 5G डेटा उपलब्ध आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा भारतात आहे आणि त्यामुळेच डिजिटल क्रांती घडली.

२. १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी:

चहासाठी आले किंवा दूध संपले? Blinkit, Zepto किंवा Swiggy Instamart वर ऑर्डर करा आणि पाणी उकळण्याआधीच वस्तू घरी पोहोचते. युरोपमध्ये मात्र थंडीत चालत दुकानात जावे लागते आणि दुकान बंद असण्याची शक्यताही असते.

३. तत्काळ आरोग्यसेवा:

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास थेट रुग्णालयात जाता येते. रक्ततपासणीसाठी सकाळीच तंत्रज्ञ घरी येतो आणि दुपारपर्यंत अहवाल WhatsApp वर मिळतो. अनेक पाश्चिमात्य देशांप्रमाणे महिनोनमहिने प्रतीक्षा किंवा विम्याच्या मंजुरीसाठी धावपळ करावी लागत नाही.

४. मानवी मदतीची साखळी:

घरकाम, स्वयंपाक, वाहनचालक यांसाठी मदत मिळणे ही भारतात फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही; मध्यमवर्गीय जीवनाचाही तो महत्त्वाचा भाग आहे. यामुळे सर्वात मौल्यवान गोष्ट मिळते—वेळ.

५. UPI क्रांती:

₹५ च्या चहापासून ₹५०, ००० च्या लॅपटॉपपर्यंत—फक्त QR कोड स्कॅन करून पैसे देता येतात. पाकीट बाळगण्याची गरज नाही, कार्ड मशीन बंद असल्याचे कारण नाही आणि व्यवहार शुल्कही नाही. या बाबतीत भारत जगाच्या खूप पुढे आहे.

६. छोट्या पण महत्त्वाच्या सुविधा:

रेस्टॉरंटमध्ये मोफत पिण्याचे पाणी मिळते. गल्लीतच इस्त्रीवाला किंवा चहावाला सहज सापडतो. अशा छोट्या गोष्टी आयुष्य अधिक सोपे आणि सुखकर बनवतात.

७. सामाजिक नाती – एक मजबूत सुरक्षा कवच:

आपली संस्कृती न्यायालयीन नोटिसांची नसून नातेसंबंधांची आहे. अडचण आल्यास शेजारी कोर्टात जाण्याऐवजी प्रेमाने खिचडी करून पाठवतात.

निष्कर्ष:

भारत हा केवळ एक देश नाही; तो असंख्य सोयी-सुविधांनी परिपूर्ण असा जीवनाचा अनुभव आहे. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना लॉन कापण्यापासून प्लंबिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतः करावे लागते. भारतात मात्र सेवा-केंद्रित जीवनशैलीमुळे अनेक कामांसाठी सहज मदत उपलब्ध होते.

इथे आपण केवळ जगत नाही, तर आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेणारी एक व्यवस्था आपल्या भोवती असते. हेच “भारतीय वैभव” आहे—ज्याचा हेवा जगातील अनेक देशांना वाटतो.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पूर्वीचा काळ… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पूर्वीचा काळ… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

पूर्वीचा काळ बाबा,

खरंच होता चांगला,

साधे घरं, साधी माणसं,

कुठे होता बंगला?

*

 घरं जरी साधेच पण,

 माणसं होती मायाळू,

 साधी राहणी चटणी भाकरी

 देवभोळी अन श्रद्धाळू.

*

सख्खे काय चुलत काय,

सगळेच आपले वाटायचे,

सुख असो दुःख असो,

आपुलकीने भेटायचे.

*

 पाहुणा दारात दिसला की,

 खूपच आनंद व्हायचा हो,

 हसून खेळून गप्पा मारून,

 शीण निघून जायचा हो.

*

श्रीमंती जरी नसली तरी,

एकटं कधी वाटलं नाही,

खिसे फाटके असले तरीही,

कोणतंच काम रुकलं नाही.

*

 उसनं पासनं करायचे पण,

 पोटभर खाऊ घालायचे,

 पैसे आडके नव्हते तरीही,

 मन मोकळं बोलायचे.

*

कणकेच्या उपम्या सोबत,

गुळाचा शिरा हटायचा,

पत्रावळ जरी असली तरी,

पाट , तांब्या मिळायचा.

*

 लपाछपी पळापळी,

 बिन पैशाचे खेळ हो,

 कुणीच कुठे बिझी नव्हते,

 होता वेळच वेळ हो.

*

चिरेबंदी वाडेसुद्धा,

खळखळून हसायचे,

निवांत गप्पा मारीत माणसं,

ओसरीवर बसायचे.

*

 सुख शांती समाधान “ते”

 आता कुठे दिसते का ?

 पॉश पॉश घरामध्ये,

 “तशी” मैफिल सजते का ?

*

नाते गोते घट्ट होते,

किंमत होती माणसाला,

प्रेमामुळे चव होती,

अंगणातल्या फणसाला.

*

 तुम्हीच सांगा नात्यामध्ये,

 राहिला आहे का राम ?

 भावाकडे बहिणीचा हो,

 असतो का मुक्काम ?

*

सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,

कुणीच कुणाला बोलत नाही,

मृदंगाच्या तालावरती,

गाव आता का डोलत नाही.

*

 प्रेम, माया, आपुलकी हे,

 शब्द आम्हा गावतील का?

 बैठकीतल्या सतरंजीवर,

 पुन्हा पाहुणे मावतील का?

*

तुटक तुसडे वागण्यामुळे,

मजा आता कमी झाली,

श्रीकृष्णाच्या महालामधुनी,

सुदामाची सुट्टी झाली.

*

 हॉल किचन बेडमध्ये,

 प्रदर्शन असतं वस्तूंचं,

 का बरं विसर्जन झालं,

 चांगुलपणाच्या अस्थीचं?

कवी : अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.

एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.

त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.

ज्यामध्ये असे लिहिले होते की..

माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.

अर्थात ही वाटणी कशी व्हायची, असा सर्वांचाच गोंधळ उडाला.

 १९ उंटापैकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.

त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहिले.

त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?

 सगळेच खूप गोंधळले होते.

तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.

तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.

त्याने समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.

मग म्हणाला,” ठीक  आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.”

प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.तो म्हणतो की, “त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.”

तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.

असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.

आता एकूण उंट १९+१=२० झाले.

२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.

उरले १० उंट.

२० उंटापैकी एक चतुर्थांश  हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.

२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.

असे एकूण १०+५+४=१९ होतात.

त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता, तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.

अशा प्रकारे १ उंट मिसळल्यानंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.

त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.

५ ज्ञानेंद्रिये.

(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)

५ कर्मेद्रिंये.

(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुदद्वार)

५ पंचप्राण.

(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )

आणि…

४ अंतःकरण चतुष्ट्य.

 (मन, बुद्धी, चित्त, अहंकार)

असे एकूण १९ उंट आहेत.

माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.

आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात  “मित्र” रूपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा “मित्र” रूपी उंट सोबत ठेवा.

जोपर्यंत मित्ररूपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पावसाचे थेंब..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पावसाचे थेंब..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

ते पावसाचे थेंब ना… शेवटी एका ओळीत बसले….

शाळेतल्या बाई वर्गात आल्या की एका क्षणात कसा सगळा कल्ला थांबतो आणि सगळी मुलं एका रांगेत उभी राहतात, अगदी तसं…

 

मी गंमत म्हणून त्यातल्या एका थेंबाला विचारलं,

 “काय रे… सरीबाई ओरडल्या का?”

थेंब हसला. पानाच्या टोकावरून किंचित डोलला. मग म्हणाला,

“नाही हो… सरीबाई ओरडत नाहीत कधीच. त्या फक्त शिकवतात.”

मी चकित झाले…

तो पुढे म्हणाला,

“आम्ही आकाशातून उतरताना प्रत्येकजण आपापल्या मनाचे राजे असतो. कुणाला वाऱ्याबरोबर उधळून जायचं असतं, कुणाला मातीला कवटाळायचं असतं, कुणाला नदी व्हायचं असतं… पण जेव्हा एखाद्या पानावर येऊन विसावतो ना,तेव्हा कळतं— एकट्याने चमकण्यात फारसा अर्थ नसतोच . सोबत बसण्यात वेगळंच सौंदर्य असतं.”

 

त्याच्या त्या वाक्याने माझ्या मनात कितीतरी आठवणी हलक्या सरींसारख्या बरसू लागल्या.

लहानपणी आपणही असेच होतो ना… एकाच बाकावर बसणारे, एकाच डब्यातला घास वाटून खाणारे, शिक्षा झाली तर एकत्र उभे राहणारे. मोठं होत गेलो आणि प्रत्येकाने आपापल्या दिशेने वाहायला सुरुवात केली. कुणी यशाच्या डोंगरावर जाऊन थांबलं, कुणी जबाबदाऱ्यांच्या वाळवंटात हरवलं, कुणी गर्दीत असूनही एकटं पडलं.

 

थेंब पुन्हा म्हणाला,

“रांग म्हणजे शिस्त नाही गं…  रांग म्हणजे दुसऱ्याला जागा देण्याची संस्कृती. स्वतःचं अस्तित्व जपतानाही दुसऱ्याच्या अस्तित्वाला धक्का लागू न देण्याचं नाव रांग.”

मी त्या पानाकडे पाहिलं.

प्रत्येक थेंब स्वतंत्र होता. प्रत्येकाचं प्रतिबिंब वेगळं होतं. तरीही कुणी कुणाला ढकलत नव्हतं. कुणी दुसऱ्यापेक्षा मोठं दिसायचा प्रयत्न करत नव्हतं. सगळे एका अदृश्य मर्यादेचं भान ठेवून शांत बसले होते.

किती विलक्षण आहे निसर्ग!

जिथे माणसाला शिस्त शिकवण्यासाठी नियम लिहावे लागतात, तिथे पाण्याचा प्रत्येक थेंब कोणतंही पुस्तक न वाचता जगण्याचं तत्त्वज्ञान जगत असतो.

थेंब शेवटी अलगद म्हणाला,

“आम्ही पडतो ना म्हणून झाडं हिरवी राहतात. आम्ही थांबतो ना म्हणून पानं सुंदर दिसतात. आणि आम्ही निघून जातो म्हणून पुन्हा नव्या सरींना जागा मिळते. आयुष्याचं रहस्य एवढंच आहे— वेळ आली की बरसायचं, वेळ आली की थांबायचं, आणि वेळ झाली की शांतपणे निघून जायचं.”

एवढं बोलून तो थेंब अलगद पानाच्या टोकावरून निसटला…तेंव्हा

मातीने त्याला मिठीत घेतलं.

आणि मला जाणवलं—

शाळेतल्या बाई खरंच ओरडत नसत. त्या फक्त मुलांना एकत्र उभं राहायला शिकवत असत.

बहुतेक… पावसाच्या सरीबाईही तेच शिकवतात.

एकटं चमकणं म्हणजे मोठेपण नसतं;

एका ओळीत, एका मनाने, एकमेकांना न ढकलता जगणं— हीच खरी जीवनाची शाळा असते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मृत्युपत्र … कवी : स्वामी निश्चलानंद ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मृत्युपत्र … कवी : स्वामी निश्चलानंद ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

गांवकुसाला ओलांडत ये

लटलट कांपत एक आकृती

थरथरणारे हात सांगती

जगण्यासाठी साहले किती

टेकत काठी रस्त्यावरती

खटखट तालावरी पाउले

या वेगाने कशी फिरावी

गांवभराची चार राउळे? ||||

 *

रस्त्याकडल्या नळास पाणी

पाहुन स्वारी तिथे थांबली

ओंजळ भरुनी घेता घेता

हात कापुनी पुन्हा सांडली

खांद्यावरची पडशी उचकुन

पोचे पडला डबा काढला

तहान भागुन मिळे तजेला

वाट शोधुनी पुन्हा निघाला ॥२॥

 *

थोडे अंतर चालुन जाता

नदीकाठच्या देवळातले

घंटेचे स्वर कानावरती

पडता अवचित हात जोडले

चढत्या दिवसामुळे उन्हाची

तिरीप चमकुन डोळ्यावरती

भोवळ आल्यागत वाटूनी

फतकल घालुन बसे खालती ||||

 *

जरा सावचित होत बिचारा

खुरडत सरकत तसाच गेला

वठलेल्या झाडाच्या फुटक्या

पारावरती जाउन निजला

अंगावरचा सदरा ओला

चिकटुन दिसते पोट खपाटी

धोतर चिंध्या कश्याबश्या त्या

जुळल्या होत्या मारुन गाठी ||४॥

 *

पायावरती रक्त साकळे

खाजवलेल्या ओरखड्यांचे

लगेच संधी दिसे, फावले

भुणभुण करणाऱ्या माश्यांचे

बऱ्याच वेळानंतर कोणी

तरी जवळुनी जरा निरखले

कुजबुज झाली प्रेत पाहुनी

आले गेले बघे सटकले ||||

 *

पोलिस आले, पुन्हा चौकशी

माहित नव्हते कुणास काही

कुणी म्हणाले, दिसे भिकारी

घाटावरती पडून राही

भीक मागता देवळापुढे

चुकुन कुणाशी बोलत नव्हता

पोटापुरता घास लाभता

डोळे मिटुनी पुटपुट करता ॥६॥  

 *

उशाखालची पडशी काढुन

पोलिस पाही उलटुन सारे

काही बोळे, सुकी भाकरी

पुरचुंड्या अन्‌ दाणे खारे

गुंडाळीच्या मधून निघती

पाकिटातल्या नोटा काही

सोबत त्यांच्या एक चिठोरा

ओल लागुनी पसरे शाई ॥७॥

 ㅤ* 

मजकुर पाहुन गडबडले अन्‌

चकित होउनी पुन्हा वाचती

जगास उद्देशुनिया त्याने

अंतिम इच्छा लिहिली होती

“झालो नाही कधी कुणाचा

कुणावरी ना भार उरावा

जमवुन ठेवत गेलो पैसे

यातुन अंतिम खर्च करावा” ॥८॥

 

कवी: स्वामी निश्चलानंद

संग्राहक : सुहास सोहोनी

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपल्याला स्वातंत्र्य मिळालं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आपल्याला स्वातंत्र्य मिळालं – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

बरं झालं, आपल्याला  स्वातंत्र्य मिळालं.

ते गोरे, साले रस्त्यामध्ये थूंकू देत नव्हते!

वेड्यासारखे रोज पाण्याने रस्ते धूत होते.

आपण किती भाग्यवान!

गुटका पान तंबाकू खाऊन

रस्त्यात कुठेही थूंकू शकतो!

छान झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते इंग्रज, साले धान्यामध्ये भेसळ करू देत नव्हते.

मूर्खासारखे रेशनवर सकस धान्य देत होते.

आपण किती पुण्यवान!

दूध अन्न औषधामध्ये

बेमालूम भेसळ करू शकतो.

बेस्ट झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते ब्रिटीश, साले शिक्षणाचा धंदा करू देत नव्हते!

अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण फुकटामध्ये देत होते!

आपण किती विद्वान!

शिक्षणाचा बाजार मांडून

पिढ्या बरबाद करू शकतो!

चांगलं झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते जुलमी, साले अनाथ मुलांना भीक मागू देत नव्हते!

दळभद्र्यासारखे त्यांच्याकरिता अनाथाश्रम चालवित होते!

आपण किती दयावान!

अनाथ मुलांना पांगळे करून

भीक मागायला लावू शकतो!

झकास झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते मिशनरी, साले गरीब रूग्णांस हलाखीत मरू देत नव्हते!

ईश्वरसेवा समजून त्यांची सेवाशुश्रुषा करीत होते!

आपण किती करूणावान!

डाॅक्टरांचा संप घडवून रूग्णांचे हाल करू शकतो!

उत्तम झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते फिरंगी, साले आपणाला लाच खाऊ देत नव्हते!

गाढवासारखे लाचखोरांस बुटांच्या लाथा घालीत होते!

आपण किती सचोटीवान!

लाचखोरांच्या मिळकतीमध्ये आपला वाटा ठेवू शकतो!

*

बरं झाल, ते इंग्रज गेले!

पण जाता जाता, साले आपलं देशप्रेमही घेऊन गेले!

  • एक भारतीय नागरिक

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

प्रत्येकालाच कुठे जमते

सहज सुंदर बरसणे

​मनातली ओल जपत

पाऊस होऊन जगणे

 

​तो येतो तसाच

कोणताही मुखवटा न घालता

​धरेच्या कुशीत विरतो

स्वतःचे अस्तित्व न राखता

 

​आपण मात्र जगतो

हिशोबाच्या जगात भावनांच्या

​काठोकाठ भरूनही दाटतात

भिंती कोरड्या अहंकाराच्या

 

​पावसाकडे नसते कधी

भेदाभेदाची कोणतीच पट्टी

​तो सुवर्णमहालावरही बरसतो

आणि गरिबाच्या झोपडीवरही

 

​आपले प्रेम मात्र

शर्तींच्या चौकटीत अडकलेले

​माणसाचे दातृत्व नेहमी

स्वार्थाच्या तराजूत तोललेले

तो ढग होऊन येतो

आणि मुक्तहस्ते उधळतो

​आपण अमृताचा संचय करून

त्यालाच गळती लावतो

त्याच्या एका थेंबात

अंकुराचे प्राण हसतात

​आपल्या हजारो शब्दांत

नाते मात्र मुके राहतात

 

​निसर्गाचे हे देखणे रूप

कधीतरी माणसाला उमजावे

​पावसासारखे निखळ होऊन

फक्त देता देता उरावे…

कवयित्री : प्रा. राजश्री पाटील

प्रस्तुती : सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आषाढ तळावा… लेखक : डॉ.शिवानंद सासरे ☆ प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर ☆

प्रज्ञा गाडेकर

 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आषाढ तळावा… लेखक : डॉ.शिवानंद सासरे ☆ प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर ☆

 

लेखक: 

 

आषाढ तळावा.. श्रावण भाजावा..

भाद्रपद उकडावा..!

पण हे असंच का?

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. “तळणं, भाजणं आणि उकडणं..” या एकाच पावसाच्या तीन रूपांतरामागे लपलेलं आहे – आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ?

 

१) आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा.‌ आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात “तळलेलं” खाणं हा अफलातून उपाय आहे !

 

विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी “औषध” बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !

 

म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.

 

शिवाय पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा Instant Romantic अंतर्बाह्य “आषाढ डायट” जगात शोधूनही सापडणार नाही !

 

२) श्रावण म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयवांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचं, म्हणून श्रावणात “भाजलेलं” खाणं सर्वोत्तम आहे.

 

आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड,‌ तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.

 

आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी…” असं म्हटलेलं आहे.

 

३) भाद्रपद म्हणजे ‌परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो).

 

हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही क्षुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.

 

अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी भाद्रपदात “उकडलेलं” खाणं अगदी योग्य आहे.

 

जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.

 

कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?

लेखक:डॉ. शिवानंद बासरे

प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares