सुधा कुलकर्णी या अत्यंत उत्साही तरुणीने टेल्को या कंपनीत पहिली स्त्री इंजिनियर म्हणून नोकरी पत्करून क्रांती घडवली होती. अतिशय बुद्धिमान; पण गंभीर प्रवृत्तीच्या आणि तत्त्वनिष्ठ अशा नारायण मूर्ती या तरुणाशी सुधा कुलकर्णी यांची भेट झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तेथपासून त्यांचा विवाह, दोन मुलांचे पालकत्व ही त्या दोघांच्या कथेची कौटुंबिक बाजू आणि ‘इन्फोसिस’ या कंपनीची स्थापना आणि तिची सुरुवातीची संघर्षमय प्रगती ही व्यावसायिक बाजू अशा दोन्ही बाजूंची अतिशय लक्षवेधक कथा प्रथमच पुस्तकरूपात वाचकांसमोर येते आहे आणि तीही कथाकथनात निपुण अशा चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी सांगितलेली !
ही तशी विजोड जोडी एकत्र आली कशी? एकत्रित आयुष्यातील एकटेपणा, अवघड आव्हाने यांना ती दोघे सामोरी गेली कशी ? देशात ‘लायसन्सराज’ सुरू असताना, उद्योगात पडणे हा ‘नसता उद्योग’ मानला जात असताना, नव्या उद्योगांना भांडवल पुरवण्याचा धोका पत्करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात नसताना त्यांनी नव्या क्षेत्रात नवी कंपनी सुरू केली कशी? एका बाजूला नोकरी, काम, एका बाजूला संसार, मातृत्व आणि एका बाजूला धाडसी उद्योजकाची पत्नी या बहुपेडी भूमिका सुधा मूर्ती यांनी सांभाळल्या कशा? नारायण मूर्ती यांच्या स्वप्नपूर्तीच्या वेडाचे बरे-वाईट परिणाम त्यांनी स्वतः सुधा मूर्ती यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सोसले कसे ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मूर्ती पती-पत्नी, त्यांचे कुटुंबीय यांच्या मनात शिरून, त्यांच्या हृदयांचा ठाव घेऊन, त्यांच्या भावपूर्ण तसेच तत्त्वनिष्ठ विचारांचा धांडोळा घेऊन चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी त्यांचे १९७०-८० या काळातील भारतातील कर्नाटक राज्यातील शहरे आणि गावे येथील वास्तव्य हे एक विश्व, त्यांच्या असाधारण कार्याचे एक विश्व आणि त्यांचे प्रत्येकाचे एकेक आणि पतिपत्नींचे एक भावविश्व जिवंत करून आपल्यासमोर ठेवतात.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘नंदादीपातील ज्योती’ या पुस्तकात एकूण १९ संतांचा परिचय करून देण्यात आला आहे. त्यापैकी १६ संत महाराष्ट्रातील आहेत. हे सर्व संत परिचित आहेत. पण यांच्या अर्धांगिनींबाबत फारच कमी माहिती मिळते. या पुस्तकात ती माहिती थोडीफार का होईना, वाचायला मिळते, हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. लेखिका वसुधाताई या सध्या ८८ वर्षांच्या आहेत. हे पुस्तक लिहून त्यांनी फार मोलाची माहिती वाचकांना करून दिली आहे.
त्यांनी ‘अलौकिक विभूती व त्यांच्या अर्धांगिनी’ हे ‘मनोगत’ लिहिताना म्हटलं आहे- सर्वसामान्यांच्या घरातून देशसेवा, राष्ट्रोन्नती यासाठी झटणाऱ्या देशभक्तांच्या धर्मपत्नींचा जीवनसंघर्ष आपण वाचला असेल. याच सामान्य, पण सात्त्विक, भक्तिमार्गी मायबापांच्या पोटी जन्मलेला वंशाचा दिवाच पुढे घराला मंदिराचं रूप देतो; स्वतः नंदादीप होतो. अशा नंदादीपातील भक्तिस्नेहात भिजून चिंब झाल्यानंतर नंदादीपातील ज्योत प्रकाशित होते. नंदादीप म्हटलं की, आठवते मंदिर, त्यातील गाभारा, परमेश्वराची मूर्ती, गंधफुले वाहून त्याची श्रद्धाभावनेने केलेली आकर्षक पूजा. भक्तिभावानं फिरवलेली उदबत्ती, तिच्या सुगंधाने सुप्रसन्न झालेले मन ! अन् स्वास्थ्य टिकावं
नैसर्गिक शक्तीनं अनेक जीव जन्माला येतात, पण वर शब्दांकित केलेलं वर्णन फक्त भाग्यवान माणसालाच अनुभवायला मिळतं. म्हणूनच की काय, श्री. शंकराचार्य म्हणतात,
‘दुर्लभं त्रयमेवैतत देवानुग्रह हेतुकम्।
मनुष्यत्वं, मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः।।’
या विश्वात तीन गोष्टी दुर्मीळ आहेत. एक म्हणजे मनुष्यत्व, मानवता; दुसरी मुमुक्षत्व म्हणजे मुक्ततेची ओढ; अन् तिसरी महापुरुष संश्रयः म्हणजे सत्संग, संतसहवास ! तुम्ही म्हणाल, माणसांना काय तोटा आहे ? लोकसंख्या तर वाढतीय ! शब्द लक्षात घ्या, मनुष्यजन्म दुर्मीळ नाही. मनुष्यत्व दुर्मीळ आहे! म्हणजे आकार, देह, माणसांचे पुष्कळ आहेत हो; पण त्यातलं मन राक्षसाचं, दहशतवाद्याचं, नक्षलवाद्याच किंवा दुसऱ्याचं चांगलं न पाहून त्याला खड्यात घालण्याची खटपट करणाऱ्या दुष्टाचं असतं. असं नकोय ! माणसाच्या मनात, आचार-विचारात दया, दान, प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता, परोपकाराची वृत्ती असेल तर, त्यात मनुष्यत्व असतं. असं मनुष्यत्व आजकाल दुर्मीळ झालेलं आहे. दुसरे म्हणजे मुक्ततेची ओढ माणसाला नाही. कारण आपण बांधलो आहोत, जखडले गेलो आहोत हेच त्याला कळत नाही. त्याचा ‘मी’पणा, सगळं मलाच हवं, नाही मिळालं तर मी ओरबाडून घेईन हा हावरेपणा व तो पुरवण्याकरता दुष्टपणा जे हवंय ते कष्ट करून न्याय्य मार्गाने मिळवावं. या कष्टार्जितातलंही थोडंसं दुसऱ्याला आपणहून द्यावं, ही सात्त्विक वृत्तीची माणसं आज दुर्मीळ आहेत.
एकनाथ म्हणतात,
‘धर्माची वाट मोडे। अधर्माची शीग चढे ।
ते आम्हा येणे घडे। संसार स्थिती ।।’
माणसाला स्वार्थीपणातून, अहंकारातून सोडवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी संताचा सहवास हवा असतो. तो आज दुर्मीळ झालाय. कारण ज्याला त्याला ओढ आहे ती नट-नट्यांच्या, स्वार्थी राजकारण्यांच्या सहवासाची! कारण तिथे स्वार्थ पोसला जातो, लोकेषणा प्राप्त होते! खरं संतत्व प्राप्त होणं हीसुद्धा सोपी गोष्ट नाही. ज्ञानेश्वरादी भावंडांचा धर्ममार्तंडांनी केलेला छळ तुम्हाला माहितीये, एकनाथांची जनार्दनपंतांनी घेतलेली वेगवेगळी परीक्षा आपल्याला आठवत असेल. तुकाराम महाराजांवर निसर्गानं किती आपत्ती कोसळवल्या हेही विदीत असेलच !
अर्वाचीन काळातही जे संत होऊन गेले त्यांच्या जीवनात आपण डोकावणार आहोत. संतांचे जीवन कर्तव्यनिष्ठा, सर्वांविषयी आत्मीयता, धर्मनीतीच्या मयदितील जीवन, मोठ्या आपत्तीतही मनाची शांतता, प्रसन्नता राखणं असं असतं ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !’ हेच त्यांचे ब्रीद ! हे सद्गुण आपल्यातही अंशाने का होईना प्रतिबिंबित व्हावेत, याच हेतूने आपण या नंदादीपांच्या ज्योतीप्रकाशात काही काळ घालवू, यात आपणास चिंचवडच्या मोरया गोसावींची प्रारब्धावर मात करण्याची जिद्द, शुकानंद संस्थानच्या उमाबाईंची भगवंतावरील निष्ठा, गाडगेमहाराजांच्या पत्नीची पतिनिष्ठा, संत तुलसीदासांना सहज प्रासंगिक छोटा दोहा म्हणून उपदेश करणारी त्यांची पत्नी, हरे कृष्ण, हरे कृष्ण जप करणाऱ्या गौरांग प्रभूची विष्णुप्रिया इत्यादींचा परिचय होईल. परिणामी आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व आपल्या ध्यानी येईल व आपणही थोडा वेळ एकांतात आत्मशोध घेण्याचा विचार व कृती करून प्रसन्नता प्राप्त कराल !
तुका म्हणे मुखे पराविया सुखे। अमृत हे मुखे स्तावन मे ।।
गुरुबोधाने ज्यांचे अंतःकरण उजळलेले राहून ज्यांनी त्या ज्ञानाचा चित्प्रकाश जगाला देण्याचे कार्य केले, अशा महान विभूतींची चरित्रे, परकीय विषयविलासी संस्कृतीच्या आक्रमणप्रसंगी महत्त्वाची ठरतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी! कारण त्यांनी सत्तत्त्वाची अनुभूती व्यक्तिगत न ठेवता लोकोद्धारासाठी वापरली. देशाच्या या आध्यात्मिक वैभवाचा पाया वसुधैव कुटुम्बकम् अर्थात आत्मने मोक्षार्थं जगत् हितायच, हा आहे!
संत मांदियाळी
१) पू. वामनभट शाळीग्राम व सौ. पार्वतीबाई (मोरया गोसावी वंश)
२) पू. कालदीक्षित व सौ. उमादेवी (शुकानंद संस्थान)
३) पू. चैतन्य प्रभु गौरांग व सौ. विष्णुप्रिया
४) पू. गोस्वामी तुलसीदास व सौ. रत्नावली (रामचरितमानसकर्ते)
५) पू. यशवंत देव मामलेदार व सौ. रुक्मिणीबाई
६) श्री. गुंडाजीबुवा देगलूरकर व सौ. राजाई
७) पू. रामकृष्ण परमहंस व सौ. शारदादेवी
८) पू. रामानंद बीडकर महाराज व सौ. जानकीबाई
९) पू. गोंदवलेकर महाराज व सौ. सरस्वती
१०) पू. टेंबे स्वामी (वासुदेवानंदव सरस्वती) व सौ. अन्नपूर्णाबाई
११) पू. गाडगे महाराज व सौ. कुंताबाई
१२) संतकवी पू. दासगणू महाराज व सौ. सरस्वतीबाई
१३) गोजीवन पू. चौंडे महाराज व सौ. लक्ष्मीबाई
१४) प्रज्ञाचक्षू पू. गुलाबराव महाराज व सौ. मनकर्णिकाबाई
१५) पू. बाबामहाराज सहस्रबुद्धे व सौ. दुर्गाबाई (स्वरूपसंप्रदाय)
१६) पू. दादा धर्माधिकारी व सौ. दमयन्तीबाई
१७) पू. अनंतराव आठवले व सौ. इंदिराबाई (वरदानंद भारती)
१८) पू. पांडुरंगशास्त्री आठवले व सौ. निर्मलाताई (स्वाध्याय)
१९) पू. चिंतामणी सिद्धमहाराज व सौ. पद्मावतीबाई (मायबाई)
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अजूनही चांदरात आहे – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
अभिनंदन ! अभिनंदन !!
‘पुणे मराठी ग्रंथालय ‘ या ११३ वर्षे जुन्या शासनमान्य ‘अ ‘ वर्ग ग्रंथालयाने जुलै २०२४ मध्ये ‘पुस्तक परीक्षण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या पुस्तक परीक्षणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नुकतेच प्रदान करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘अजून चांदरात आहे’ या ललित लेखांचा अंतर्भाव असलेल्या सुंदर वाचनीय पुस्तकाचे परीक्षण डॉ. मीना श्रीवास्तव यांनी लिहिले होते. या ग्रंथालयाच्या ११३ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात त्यांचा गौरवपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल डॉ. मीनाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकात वाचू या हे पुरस्कारप्राप्त पुस्तक परीक्षण……..
संपादक मंडळ,
ई – अभिव्यक्ती (मराठी विभाग)
पुस्तक- अजूनही चांदरात आहे
लेखक- श्री विश्वास देशपांडे
प्रकाशक- सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे
पृष्ठसंख्या- १६८ पाने
पुस्तकाचे मूल्य- २०० रुपये
(पुस्तक खरेदीसाठी लेखक श्री विश्वास देशपांडे यांच्याशी ९४०३७४९९३२ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा.)
श्री विश्वास देशपांडे
‘अजूनही चांदरात आहे’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे आकर्षक लक्षवेधी रूप प्रथम पाहताक्षणी नजरेत भरते. चवथीचा चंद्र, गर्द निळेभोर अस्मान, चांदण्यात न्हायलेल्या जलाशयाची शांत निळाई, काळोखात विसावलेली पर्वतराजी अन तेजस्वी धवल रंगांनी कोरलेले शब्द! पुस्तकात ३२ ललित लेख आहेत. त्यासोबतच ८ काव्यसुमने देखील जोडलेली आहेत. विविधरंगी अन विविधगंधी विषयांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले असे हे कोलाज आकर्षक वाटते. एक १४ पानी लेख वगळता (एक लढा असाही), इतर सर्व लेख ३-४ पानी आहेत. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो आणि आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर पुस्तक एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र त्यांच्या अंतरंगात डोकावून बघावे तर लेख पूर्णत्वास पोहचलेले असतात!
वेगवेगळ्या विषयांतून लेखकाचे गहिरे वाचन, चिंतन, कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप प्रकर्षाने जाणवतो. पुस्तकातील एका लेखाच्या ‘शब्दमाधुर्य, गीतमाधुर्य, नादमाधुर्य’, या शीर्षकास अनुसरून, लेखकाच्या भाषेत शब्दमाधुर्य आहे, तसेच ती साधी, सोपी आणि सहज आहे. ‘To be simple is the most difficult thing in the world’ हे लक्षात घेतल्यास या सरल आणि तरल भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. अलंकारांचा अतिरेक नसल्याने भाषा बोजड वाटत नाही. या अर्थवाही भाषेमुळेच प्रत्येक लेख वाचनीय झाला आहे, किंबहुना हाच या पुस्तकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
सामाजिक समस्यांवरील आणि विषमतेवरील भाष्य करणाऱ्या १० लेखांवरून लेखकाच्या सामाजिक जाणीवा किती प्रखर आणि दूरदर्शी आहेत याचा प्रत्यय येतो. मोजकीच उदाहरणे द्यायची तर ‘अजूनही चांदरात आहे’ मधील आजोबा आणि आधुनिकतेचे वेड असलेला नातू यांच्यातील संवादाचा अभाव, माणसा माणसातील विसंवादाचे वर्णन करणारे ‘अंतर’, गुगल स्पेस आणि डेटामधील जटिल माहितीच्या जंगलात अडकलेल्या माणसाविषयी मांडलेला ‘जो हुकूम मेरे आका’ हा यथार्थवादी लेख, ‘ये दिल मांगे (नो) मोअर’ मधील शीतपेयांचा बाजार आणि जाहिरातींच्या घातक अतिरेकी आक्रमणाबद्दल जनजागृती करणारा लेख ‘जागतो रहो’ हे लेख वाचनीय आहेतच, पण त्याचबरोबर ते वाचकास गहन विचारमंथन करण्यास प्रवृत्त करतात.
वाढत्या प्रदूषणाचे आणि हिरवाईच्या ऱ्हासाचे विदारक परिणाम आज दिसत आहेतच, पण पुढील पिढ्यांपुढे हा प्रश्न अधिकच ज्वलंत होत जाणार आहे. त्याच अनुषंगाने स्वच्छ हरित पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘एक लढा असाही’ या लेखात चिपको आंदोलनाचा सविस्तर आढावा घेत हरितक्रांतीविषयी सखोल विवेचन करण्यात आले आहे. ‘चला आपण आधुनिक कोलंबस होऊ या’ हा लेख देखील पर्यावरणाचा आणि वृक्षवल्लींचा झालेला ऱ्हास आणि नद्यांचे दूषित जल या समस्यांवर भाष्य करतो. या लेखातील शालेय शिक्षणात पर्यावरण या विषयाचा अंतर्भाव आणि इतर मौलिक सूचना विचारणीय आहेत.
‘कवितांच्या गावा जावे’ या लेखात लेखकाच्या कल्पनेची उत्तुंग भरारी अनुभवास येते. विंदा, दत्ता हलसगीकर आणि विदर्भातील कवी बोबडे यांच्या कवितांचे काव्यमय रसग्रहण अत्युत्तम झाले आहे. भारताच्या ऐश्वर्यसंपन्न संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे ४ लेख मला जरा जास्तच भावले. ‘मनोरथा चल त्या नगरीला’ या लेखाद्वारे कर्नाटकातील हंपी या पुरातन शहराची सफर अतिशय हृद्य आहे. व्यक्तिचित्रे आणि नातेसंबंधांचे विश्लेषण करणारे ३ लेख वाचनात आले. त्यातील काळजाला भिडणाऱ्या ‘गेले द्यायचे राहून’ या लेखात लेखकाने त्यांच्या अन त्यांच्या वडिलांच्या हृदयस्पर्शी नात्याचे अलवार पदर हळुवारपणे उलगडले आहेत.
‘दिगूची मुशाफिरी’ मधील सध्याच्या राजकीय, सामाजिक अव्यवस्थेचे भीषण वास्तव आणि पत्रकारितेची दांभिकता यावरचे लेखकाचे भाष्य मनावर कठोर आघात करून जाते. पूर्वग्रहदूषित माणसे एखाद्या व्यक्तीविषयी कसा गैरसमज करून घेतात याचे चपखल उदाहरणांसहित केलेले परिणामकारक लेखन ‘लेबल्स’ या लेखात आढळते. मला भावलेल्या दोन लक्षवेधी लेखांचा उल्लेख करते, एक आहे ‘होरेगल्लू’, सुधा मूर्ती यांच्या या लेखातील हे शीर्षक म्हणजे गावातील वडाच्या झाडाखालचा ‘बेंच’, म्हणजेच आपली सुखदुःखे हक्काने शेअर करायची जागा! याच विचाराचा आजच्या संदर्भाला अनुलक्षून केला गेलेला उहापोह अनवट विचार दर्शवतो. दुसरा लेख आहे ‘ब्रायटनची ब्राईट कहाणी’ ज्यात इंग्लंड येथील ब्रायटन या गावाजवळील पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृती जागवणाऱ्या स्मारकाची कथा रेखाटलेली आहे.
पुस्तकांतील लेख आणि कवितांचे वाचन केले असता लेखकाचा मूळ पिंड गंभीर आणि वास्तववादी साहित्यिक लेखनाचा आहे असे जाणवते. पण या पुस्तकांतील काही लेख वाचल्यावर त्यांची विनोदबुद्धी देखील तितकीच तल्लख आणि प्रखर आहे असे दिसून येते. नर्म विनोदाची पखरण करीत हास्याचे रंगीबेरंगी कारंजे फुलवण्याचे कसब त्यांच्या मोजक्याच ५ लेखांत दृष्टीस पडते. ‘हम बोलेगा तो’ यात बोलघेवडी माणसे आपल्याला भेटतात, उदाहरण द्यायचे तर वैचारिक दारिद्रय प्रकट करणारे राजनीतीज्ञ! मंचावर प्रवेश करताक्षणी यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला की प्रेक्षकांची किती म्हणून गोची होते ते त्या प्रेक्षकांनाच माहित असते. ‘तेच ते’ या उपरोधिक लेखात सरकारी पातळीवर नित्याची बाब असलेल्या कचेऱ्यांमध्ये मौक्याच्या स्थळी विजेत्याप्रमाणे स्थानापन्न असलेल्या ‘विहित नमुन्यांच्या’ गमती जमती वर्णन करतांनाच त्यांच्यापायी लोकांना होणाऱ्या त्रासाचे कष्टप्रद पण रंजक वर्णन पेरले आहे. त्यातून साधलेला अप्रतिम विनोद कोपरखळ्या मारीत आपल्या चेहेऱ्यावर स्मित आणतो.
मात्र या सर्वांवर मात करणारा मला सर्वाधिक आवडलेला लेख म्हणजे ‘महानायक आजारी पडतो तेव्हां’! हा लेख तर कल्पनेच्या भराऱ्या मारीत प्रासंगिक विनोदाचा जणू धमाल धबधबाच! त्याची पार्श्वभूमी अशी की आपला लाडका महानायक अमिताभ कोरोनाने ग्रस्त झाल्यावर दवाखान्यात भर्ती होतो. हे वृत्त कळताच त्याला भेटायला चित्रनगरीतील त्याचे अनेक सहकलाकार त्याला भेटायला येतात, त्यांचे ठेवणीतले डायलॉग हिंदीतच ठेऊन लेखकाने खूप मजा आणली आहे, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान येतात तेव्हांची दवाखान्यात उडालेली धांदल आणि गांभीर्याच्या मास्कखाली दडलेल्या चौफेर विनोदाच्या बहारदार लहरींचा आस्वाद घ्यायचा असेल तर संपूर्ण लेखच प्रत्यक्ष वाचावा!
प्रतिभा आणि प्रतिमेचे वरदान लाभलेले मराठी काव्यजगतातील शीर्ष कविजन जेव्हां एकत्रितपणे ‘नक्षत्रांचे देणे’ प्रदान करतात तेव्हां ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी लेखकाची अवस्था होते. त्याचा परिपाक म्हणजे ‘कधी कधी मला वाटतं’ ही नितांतसुंदर कविता! कवितेची सुरुवातच विंदा मास्तरांच्या वर्गापासून झालीय! सुरेश भटांच्या काव्यातील काटे खुपू न देता त्यांच्या ओल्या जखमा न्याहाळीत, बालकवींच्या आनंदाला हळुवारपणे स्पर्श करीत आणि शांताबाईंच्या हिरव्या अन बरव्या ऋतुसंहाराचे रंग ओळखत आपण भेटतो ताठ कण्याने जगायला शिकवणाऱ्या अन प्रेमाने पाठीवर हात ठेवीत लढायला सज्ज करणाऱ्या कुसुमाग्रजांना! या कवींच्या सुंदर भावस्पर्शी कवितांच्या रम्य आठवणी लेखकाने जाग्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे मातृभक्त कोमलहृदयी साने गुरुजी, निसर्गकवी बा. भ. बोरकर, तत्वज्ञानी तांबे आणि रोमँटिक पाडगावकर देखील या कवितेत विराजमान झाले आहेत. सदरहू कवींकडून काय काय घ्यावे अन घेता घेता त्यांचे हातच कसे घेऊन टाकावेत हे या कवितेचे गमक आहे. ही कविता म्हणजे या पुस्तकातील अभिजात आणि अनवट साहित्यनिर्मितीचा सर्वोच्च बिंदू आहे असे मला वाटते.
मला एक अजून भावलेली कविता ‘चष्मा’ वाचतांना स्वतःबद्दल राग, निराशा आणि अगतिकता वाटायला लागते. निरनिराळ्या राजकीय पक्षांचा तथाकथित जाहीरनामा, त्यांचे हिरवे, भगवे अन निळे झेंडे ही प्रतीकचिन्हे अतिशय वास्तववादी आणि प्रभावी वाटतात. स्वतःची राजनैतिक विचारसरणी सामान्य जनतेची देखील कशी आहे, हे ठासून सांगण्यातच या पुढाऱ्यांचा वेळ आणि शक्ती खर्ची पडतात. फिल्टर आणि चष्मा या दोन प्रातिनिधिक शब्दांत कवीने हा राजनैतिक खेळखंडोबा अभिनवरित्या चितारला आहे. बेरोजगारी आणि महागाईसारख्या जनतेला पोळत असलेल्या सध्याच्या गंभीर समस्या जिथल्या तिथेच राहणार हे माहित असल्याने अत्यंत दुय्यम अशा गोष्टींकडे जनतेचे लक्ष वळवणे हे राजकीय नेत्यांचे इप्सित इथे प्रकर्षाने मांडलेले आहे. कवितेच्या शेवटी सर्वधर्म समभावाच्या झेंड्याच्या प्रतिमेचा एल्गार ध्यानी-मनी खोलवर रुजतो. हाच या कवितेचा संदेश असावा अशी माझी धारणा आहे. लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव आणि भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप त्यांच्या काव्यलेखनात दृष्टीस पडतो दिसून येतो.
एकंदरीतच ‘अजूनही चांदरात आहे’ या श्री विश्वास देशपांडे लिखित पुस्तकाची गोळाबेरीज करतांना जाणवते की, ललित लेखांचे उच्च साहित्यिक मूल्य असलेले लेख आणि कविता, नवीन विषयांची अनवट माहिती, सामाजिक समस्यांचे सखोल चिंतन, तसेच त्यांच्यावर विचारपूर्वक मांडलेले उपाय, विनोद, परिहास आणि उपरोधिक भाष्य यांनी अलंकृत असे हे पुस्तक आहे. वाचकांना लेखकाच्या या ललित लेखनाच्या लालित्याचा लळा लागेल असे मला खात्रीपूर्वक वाटते. शेवटी एकच सांगावेसे वाटते की वाचकांनी हे वाचनीय पुस्तक तर फिरफिरुनि वाचावेच, पण आपला वाचनसंग्रह समृद्ध करायला ते संग्रही ठेवावे, तसेच वाचनसंस्कृतीचा प्रसार होण्याकरता पुस्तकभेट म्हणून या पुस्तकाची निवड करावी.
☆ “ऐलपैल” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : ऐलपैल (काव्यसंग्रह)
कवी : श्री. हरिश्चंद्र कोठावदे, 9423862226
प्रकाशक : मधुश्री प्रकाशन पुणे, 9850962807
मूल्य : रु. 300/-
☆ ऐलपैल —- मधुघटातून झालेले काव्यामृताचे शिंपण ☆
सुप्तकोषातील कवितेला जागृत करुन वृत्तबद्ध काव्याचा मधुघट हाती देणा-या श्री. हरिश्चंद्र कोठावदे यांचा ‘ ऐलपैल ‘ हा एकशेबावन्न कवितांच्या संग्रहाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यातील काही अमृतकण रसिकांपर्यंत पोहोचावेत याहेतूने केलेले हे लेखन ! खरे तर प्रत्येक ओळीचा आस्वाद स्वतः घ्यावा असा हा काव्यसंग्रह. मुक्तछंदाची वाट न चोखाळता वृत्तबद्ध, छंदोबद्ध काव्यलेखन करणारे पुण्याचे श्री. कोठावदे यांनी या काव्यसंग्रहाद्वारे काव्यानंदाचा लाभ घडवून आणला आहे.
श्री. हरिश्चंद्र कोठावदे
शब्दसाधना करता करता शब्दसिद्धी प्राप्त करुन कधी आत्मरंजनी तर कधी विश्वरंजनी रमणा-या या कविने पादाकुलक, हरिभगिनी, आनंदकंद, अनलज्वाला, बालानंद, समुदितमदना, केशवकरणी अशा विविध वृत्तांत तसेच छंदात केलेल्या रचना वाचताना त्यातील अंतर्गत लयीमुळे मन काव्यलतेवर नकळतपणे डोलू लागते. खरे तर कवीने मनाशी साधलेला संवाद काव्याच्या रुपाने शब्दबद्ध झाला आहे. यातील कविता म्हणजे आयुष्याने दिलेल्या अनुभवांचा काव्यात्मक आलेख आहे. या कवितेत काय नाही ?, उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर त्याचा मंजुळ नाद कानी पडावा असा अनुभव देणा-या या कविता आहेत. स्वतःला कवी म्हणून फारशा गांभीर्याने कधीच घेतले नव्हते असे कवीने मनोगतात म्हटले असले तरी छंद जोपासता जोपासता छंदोबद्ध कवितांचा नजराणाच कविने रसिकांना सादर केला आहे. कवितेतून आयुष्याचा सूर मिळवताना कविला कवितेचाही सूर सापडत गेला आहे. लयबद्ध शब्द रचनेने केवळ कवितेचीच नव्हे तर जगण्याची लयही सापडली आहे. स्वप्नात रंगताना, सत्याचे रंग कितीही भयावह असले तरीही त्यांच्या उग्र रूपाकडे काणाडोळा न करणा-या या कविता आहेत. या कवितांमधून वास्तवावर प्रखर प्रहार तर केले आहेतच पण लयबद्ध गेयता बहार वाढवणारी आहे. आशा, निराशा, खंत, खिन्नता, ध्येयपूर्ती, अपुरेपणा, सुसंगती, विसंगती अशा संमिश्र भावनांनी भरलेल्या जीवनाचे यथार्थ दर्शन या कवितांतून घडत आहे. ‘ ऐलपैल ‘ मधील कविता म्हणजे नवरसांचा शाब्दिक नवोन्मेश आहे. काव्यगंगेच्या ऐलतटापासून पैलतटापर्यंत अलंकारांची हिरवळ लेऊन सजलेलं वृत्तबद्ध काव्याचं बेट म्हणजे ‘ ऐलपैल ‘ हा काव्यसंग्रह!
कविने म्हटल्याप्रमाणे अश्रू असोत, पानझड असो, संकटाची घोर रात्र असो, उन्ह असो वा चांदणे, हार असो वा झुंजणे, एकांत असो वा कोलाहल कवीची कविता ही विदेह यात्रा आहे. दुःखाला भडकपणे रंगवून त्याचे प्रदर्शन करण्याचा आततायीपणा या कवितेत नाही आणि सुखाच्या लाटेवर आरूढ होतानाही कविच्या शब्दांत उन्माद नाही.
श्री. कोठावदे यांची कविता ही सुखदुःखाचा करुणरम्य उत्सव शब्दांनी रंगविणारी कविता आहे. कविने म्हटल्याप्रमाणे ती कविला नव्याने जन्माला घालणारी आहे. ती नित्य साधनेची जाणीव करुन देणारी कविता आहे. अनुप्रासात्मक शब्दांनी काव्यातून चिंब पाऊस पाडणारी कविता आहे. अश्रूत नाहलेल्या, कंठात दाटलेल्या आणि ह्रदयात पेटलेल्या प्रीतीची जखम गोंदणारी ही कविता आहे. ही कविता स्वार्थांध बेफिकीरी पाहून उद्विग्न होणारी आहे. भोंदुगिरीच्या जमान्यात संयम, तपस्या आणि अध्यात्म यांचे स्मरण करुन देणारी ही कविता आहे. उरात ओल जपत परदुःखाशी संवाद साधणारी आहे. मुखवट्याच्या जगात अविरत झुंजत राहण्याचे सामर्थ्य देणारी कविता ‘ऐलपैल ‘ मध्ये आपल्याला वाचायला मिळते.
सर्वच्या सर्व संग्रह आपल्यासमोर ठेवणे शक्य नाही. पण संग्रहाचे कोणतेही पान उघडावे आणि त्यावरील काही पंक्ती समोर ठेवाव्यातच असा मोह होतो.
*
सांगायाचे बरेच होते, बरेच काही सांगुन झाले
काळजातले सुरुंग काही, फुटावयाचे राहुन गेले
*
दिवसाढवळ्या डोळ्यांदेखत, इथे खलांचा नंगा नाच
संत महात्मे साधू सज्जन, किती उदासिन किती लाचार
*
ध्वस्त कराया तुझी अस्मिता
सुसज्ज सैनिक दहा दिशांचे
आरपारची अता लढाई
भय कसले रे शत मरणांचे
*
ध्यास असू दे नंदनवन पण, परसामधली बाग फुलू दे
नित्य नभाशी संभाषण पण, घरट्याशी संवाद असू दे
*
युद्ध लादले जर नियतीने
नियतीशीही झुंजत राहू
अखेरच्या अन् चिंधिलाही
निशाण बनवुन फडकत ठेऊ
*
जीवन ही तर गळकी घागर
किती भरावी तरी रिती रे
दैवाकडुनी शापालाही
उ:शापाची कधी हमी रे
*
तुटू पाहती तट तेजाचे,
तरीही जळती दिवट्या काही
अजून असतिल परंतु शोधा,
भांगेमधल्या तुळशा काही
*
कविते तुझीच बाधा, आजन्म भोवणार
वणव्यात चांदण्याची, मी गोष्ट सांगणार
*
मन ग्रासते मनांना, होऊन राहुकेतू
मन जोडते मनांना, होऊन दिव्य सेतू
*
एकावर एक वीट
जावी रचित दुःखांची
होत रहावी अभेद्य
तटबंदी काळजाची
परि नच काळजाला
कळा पाषाणाची यावी
परदुःखांशी संवादी
ओल उरात जपावी
*
आम्ही मेंढरे आंधळी
नाही बूड, नाही शेंडा
ज्याच्यामागे गर्दी त्याचा
खांद्यावर वाहू झेंडा
*
प्रीतीचा गंगौघ असा की
मनी मलिनता उरली नाही
विश्व प्रीतिचे दोघांचे जरी
कुंपण क्षितिजा उरले नाही
*
प्रतिसादाविण विदीर्ण हाका
तरी जळू दे दिव्यात ज्योती
थेंब स्वातिचा कधीतरी रे
शिंपल्यातला होइल मोती !
*
पहिलावहिला पाऊस उत्कट
सहस्त्र हस्ते धरेस कवळी
अशा बरसती धो धो धारा
जन्मांतरिचे वणवे विझती
*
क्षितिजकरांनी शिंपित जीवन
गगन धरेवर झुकले रे
किती दिसांनी आभाळाला
फुटला ऐसा पाझर रे
*
घ्यावे दत्तक दुःखांना
तुझे दुःख दुःख माझे
गच्च भरल्या गाड्याला
सुपाचे का होते ओझे
*
अशा किती काव्य पंक्ती सांगाव्यात? त्यापेक्षा त्या वाचून आनंद घेणे हेच श्रेयस्कर. कवीही म्हणत आहे,
” स्वान्तःसुखाय जरि ही कवने
दाद द्यावया दर्दी यावे
अज्ञेयातिल रानफुलेही
कुणी तयांना ह्रदयी घ्यावे “
वृत्तबद्ध काव्य रचना करत असताना येणा-या बंधनांचे व मर्यादांचे भान ठेऊन या कवितांचा आस्वाद घेणा-याला काव्यानंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अशात कसदार कवितांची अपेक्षा श्री. हरिश्चंद्र कोठावदे यांच्याकडून आहे. पुढील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “लिमिटलेस” – लेखक : जिम क्लिक — मराठी अनुवाद : डॉ. सुचिता नंदापुरकर फडके ☆ परिचय – श्री हर्षल भानुशाली ☆
पुस्तक : लिमिटलेस
मराठी अनुवाद: “अमर्याद “
लेखक: जिम क्विक
अनुवादक: डॉ सुचिता नंदापुरकर फडके
प्रकाशक: गोयल पृष्ठ:४४८ मूल्य:३९९₹
सवलत मूल्य:३६५ ₹
आपण आपल्या मेंदूचा अर्थात बुद्धिमत्तेचा कधी पूर्ण क्षमतेने वापर करून पाहिलं का?
व्यक्तीची शक्ती ही त्याच्या मेंदूत असते! जितका तल्लख मेंदू अर्थात बुद्धी तितका कार्यक्षम माणूस!
परीक्षा असो की नावीन्यपूर्ण विचार करून व्यवसाय वृध्दी करणे यात मेंदूची भूमिका अतिशय महत्वाची!
स्मरण म्हणजे ध्यानात राहणे!आकलन म्हणणे एखादी गोष्ट समजणे जसे कोडे उलगडणे!निर्णय क्षमता, तर्क, कल्पना, शोध या काही मेंदूच्या आधीन असलेल्या गोष्टी आहेत…. मग आपल्या मेंदूची क्षमता वाढवता आली तर नाही का ही कामे सोपी होणार?
मेंदूची क्षमता वाढवता येईल का?
व्यायाम आणि पोषक आहाराचा वापर करून शरीराची कार्यक्षमता वाढते!
ध्यान, योग, चिंतनाने मनाची सहनशक्ती वाढवता येते…
पण मग मेंदूची क्षमता वाढवता येईल का असे काही उपाय आहेत का?
मेंदूची क्षमता वाढवता येते की नाही हा प्रश्न थोडावेळ बाजूला ठेऊया… त्या आधी अजून एका प्रश्नाचे उत्तर शोधू!…..
आपल्या मेंदूची असलेली पूर्ण क्षमता आपण कधी वापरली का?
कदाचित आपल्याही मेंदूत तशी अमर्याद क्षमता असेल.. अगदी आईन्स्टाईन सारखी नाही, पण आपले कार्यक्षेत्र प्रभावित करण्या इतकी निश्चितच असेल…. पण तिचा पूर्णपणे उपयोग केलेला नसेल. नव्हे आपण आपल्या मेंदूचा किंवा बुध्दीचा पूर्ण उपयोग केलेला नसतोच. तो कसा करायचा हे समजून घ्यायचे ना?
आपल्या मेंदूच्या अथवा आपल्या बुध्दीच्या पूर्ण क्षमतेचा वापर करायला शास्त्रीय पद्धतीने शिकवणारे जिम क्किक आपल्यासाठी घेउन आले आहेत एक महत्वाचे पुस्तक…. “लिमिटलेस”!
ब्रेन कोच!
खेळाडूकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करवून घेण्याचे काम त्याचा कोच करत असतो. खेळाडू मधील असलेल्या क्षमतांचा तो पूर्ण वापर करून घेतो…. मूळात त्या क्षमता खेळाडू कडे आधीच असतात. तसाच हा ब्रेन कोच आपल्या बुध्दीच्या क्षमता पूर्णपणे वापरून घेण्यास मदत करतो आणि आपल्या मधील सर्वोत्तम बाहेर काढतो.
…. विल स्मिथ म्हणतो, “माझ्यातलं माणूसपण अधिकाधिक कसं बाहेर आणायचं हे जिम क्विक ला ठाऊक आहे!”
…. मार्क हायमन म्हणतात, “विद्वत्ता प्राप्त करून देणारं कुठलं औषध नक्कीच नसतं. मात्र आपल्या मेंदूचा सर्वोत्तम वापर करत झळझळीत भविष्य घडविण्याकरिता आवश्यक असणारी प्रक्रिया जिम आपल्यासमोर उलगडतात!”
…. लिसा मोस्कोनी म्हणतात, “मेंदू स्वास्थ्य, स्मरणशक्ती सुधारणा आणि मनाची तीक्ष्णता ; यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्राची वेगळी शाखा आहे. जिम क्विक हे त्यासंदर्भातले सर्वात योग्य मार्गदर्शक आहेत. “
शरीर स्वास्थ, मनःस्वास्थ्य हे शब्द आपल्याला माहिती आहेत. मनःस्वास्थ्य ही बाब आता गतीने रुजली जात असताना मेंदू स्वास्थ्य ही आपल्यासाठी नवीन संकल्पना उदयाला येताना दिसत आहे.
या पुस्तकाचा मला स्वतःला माझ्या क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकेल यावर शंका होती…. पण हे पुस्तक जसे जसे वाचत गेलो तसे तसे या पुस्तकाची उपयोगिता माझ्या लक्षात आली. आपण अशा अनेक गोष्टींपासून दूर आहोत हे मला स्वतःला समजले. त्यामुळे परिचय लिहिण्यासाठी वाचायला सुरू केलेलं पुस्तक मी अभ्यासणार आहे. त्यामुळे मी माझ्यासाठी माझ्या दुकानातून हे पुस्तक खरेदी केलं आहे. ज्याचा उपयोग मला आणि माझ्या मुलांना होणार आहे.
काय आहे या पुस्तकात?
स्वतःला मर्यादित करून टाकणाऱ्या सर्व गोष्टींना टाळून अमर्याद कसे करून घ्याल? आपल्या मेंदूची क्षमता कशी ओळखली पाहिजे? ती वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे याचे शास्त्रीय धडे या पुस्तकात वाचायला मिळतील.
सुरुवातीला आपल्याला आपला आणि आपल्या मेंदूचा परिचय करून घेता येतो.
बुद्धीवर्धन ! अर्थात बुद्धिमत्ता- वाढ!
झटकन शिकणे हे तंत्र अवगत करण्याची शक्ती!
स्मरण अधिक जलद आणि अधिक परिणामकारक करणे!
हे किंवा कोणतेही पुस्तक कसे वाचावे? त्याचा उपयोग कसा करून घ्यावा याचे तंत्र!
वाचनाची गती कशी वाढवता येईल?
नाही कडून होय कडे अर्थात नकारात्मक विचार बदलून सकारात्मक विचार आणि कृती!
सृजनशीलता अर्थात क्रियेटीव्ह!
लेखक जिम क्विक ज्यांच्या मेंदूला मार लागला. परिणामी मेंदूच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागले. मन हे मेंदूची प्रेरणा शक्ती असते. लेखकाने अतिशय कष्टाने स्वतःच्या मेंदूच्या विकासासाठी नवनवीन तंत्र आणि सराव पद्धती शोधून काढल्या. या पद्धती त्यांनी इतरांवर ही वापरून पहिल्या आणि त्यांना मेंदूच्या विकासासाठी शास्त्रीय आधार मिळाला. त्यात त्यांनी अधिक तपशीलवार अभ्यास केला. यातून त्यांचा प्रवास जगातील एक नामवंत “ब्रेन कोच” म्हणून सुरू आहे.
मागील पंचवीस वर्षे ते जागतिक पातळीवर विविध क्षेत्रातील असामान्य लोकांना अधिक परिणामकारक आणि अधिक उपयोगी बनवत असताना सामान्यांना देखील त्यांच्या मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचे कसब शिकवत आहेत.
या पुस्तकाच्या सुरुवातीला आकरा पेज हे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेल्या अभिप्राय ने व्यापले आहेत. ही सर्व दिग्गज मंडळी जिम क्विक च्या workshop चे विद्यार्थी आहेत. यातील एकेक अभिप्राय वाचत गेले की आपल्याला लेखकाच्या कार्याचा आदर वाटायला लागतो. “कोणताही मेंदू मागे राहणार नाही” या आशयाचे ब्रीद वाक्य घेऊन त्यांची संस्था जगभर काम करत आहे.
हे पुस्तक माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी अतिशय प्रभावी आणि उपयुक्त आहे. माझ्याकडे जर हे एकच पुस्तक असेल तर कदाचित मी ते कोणाला भेट देणार नाही… माझ्यासाठी आवश्यक आहे. माझा अभिप्राय एकच आहे, पुस्तकाने माणूस बदलतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. असे अनेक पुस्तकं आणि अनेक माणसं याला साक्ष आहेत.
या दसरा दिवाळी निमित्ताने आपण प्रत्येकाने या पुस्तकाचा विचार करावा. एक पुस्तक खरेदी करणारा नंतर अनेकांना हेच पुस्तक भेट देईल. विकत घ्यायला सांगेल याची मला खात्री झाली आहे.
परिचय : श्री हर्षल भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पुस्तक – रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले
लेखक – डॉ. एस. व्ही. भावे
परिचय : सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे
कवी कालिदासांनी रघुवंश या महाकाव्यात प्रभू रामचंद्रानी सीतेसह लंका ते आयोध्य केलेल्या प्रवासाचे वर्णन केले आहे. त्यांच्या या प्रवास वर्णनाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याकरिता डॉ. भावे यांनी त्याच मार्गांवरून त्याच तिथीला मार्गक्रमणा केली व कालिदासांनी रघुवंशात शेकडो वर्षांपूर्वी केलेली वर्णन कशी तंतोतंत आहेत हे या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवले आहे.
विशेष म्हणजे भावे हे व्यवसायाने डॉक्टर तरीही ते संस्कृत भाषा शिकले, वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आणि छोटेखानी विमान विकत घेतले. रीतसर सर्व परवानगी मिळवली. नवरात्री मध्ये राम–रावण यांच्यात युद्ध झाले. विजयादशमीला राम विजयी झाले. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी रावणाचे पुष्पक विमान घेऊन रामाने सीतेसह घेऊन उड्डाण केले होते. त्याच दिवशी डॉ. भावेनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. कारण कालिदासांनी केलेल्या वर्णनाचा त्यांना अनुभव घ्यायचा होता. यामुळे पुस्तक वाचताना रामायणातील काही प्रसंग व रघुवंश यातील वर्णन आपल्याला वाचता येतात.
पुस्तकात संस्कृत श्लोक फार सोप्या पद्धतीने समजावले आहेत. आश्चर्य वाटते ते म्हणजे वाल्मिकीनी लिहलेलं रामायण आणि कालिदासाचे रघुवंश यामधील पशुपक्ष्यांचे निरीक्षण, स्त्रियांचे रूप आणि वागणूक, हवामानशास्त्र, दिशा-शास्त्र व त्यातील गणितं ही गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. भावेनी खगोलशास्त्रतील गणिताचा वापर करून रामसेतू शोधून काढला. सुरवातीला विमानातून पाहिला नंतर तिथं पर्यंत बोटीने प्रवास करून त्यावरती उतरून उभे राहिले आहेत. हा सेतू रामेश्वर, पांबन, आयलंड आणि लंका यांच्या मधील समुद्रात आहे.
कालिदासांच्या एका श्लोकात मातंगनक्र हा शब्द आला आहे. याच्या शोधासाठी त्यांनी अनेक ग्रंथ हाताळले, तेथील लोकल लोकांना विचारले पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्या मार्गांवरून त्यांनी दोन -तीनदा विमान प्रवास केल्यावर त्यांना त्रिवेंद्रमच्या दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत जाणारी पर्वत राशीचा आकार क्रोकोडॉईल सारखा दिसतो, तेंव्हा त्यांना मातंगनक्रचा अर्थ कळला. लोणार सरोवराचे वर्णन वाल्मिकी मध्ये चौकोनी असे आहे तर कालिदासांनी वर्तुळाकार आहे असे अचूक वर्णन केले आहे. त्यावेळी आकाशमार्ग उपलब्ध नसतानाही हे अचूक वर्णन कसे केले असेल हे आश्चर्य वाटते. अजून एक महत्वाचे म्हणजे राम सीतेला शोधण्यासाठी जात असताना त्या मर्गावर अनेकांनी मदत केल्याने परतीच्या प्रवासात पुन्हा राम त्या ठिकाणी थांबले पण सीता विमानातून न उतरल्यामुळे त्या भागात कुठेही सीतेचे मंदिर नाही. फक्त राम -लक्ष्मण यांची मंदिर आढळून येतात.
अतिशय सुंदर फोटोग्राफी या पुस्तकात बघायला मिळते. एक आगळे – वेगळे प्रवास वर्णन तेही वाल्मिकी, कालिदास, भावे यांच्या लेखणीतून साकारलेलं. वाचनीय असेच हे पुस्तक आहे.
परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माझे दगडाचे हात” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री सुधाकर इनामदार ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : माझे दगडाचे हात (काव्यसंग्रह)
कवी : श्री सुधाकर इनामदार
संपर्क: 9421122017
मूल्य : रु. 200/_
प्रकाशक: तेजश्री प्रकाशन, कबनूर. 8275638396
परिचय : सुहास रघुनाथ पंडित
☆ माझे दगडाचे हात : दगडाच्या हातातून पाझरलेली काव्यगंगा ☆
… सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी तालुका म्हणजे साहित्यिकांची खाणच ! याच तालुक्यातील गोमेवाडीचे कवी श्री. सुधाकर इनामदार यांचा ‘ माझे दगडाचे हात ‘ हा काव्य संग्रह काही महिन्यांपूर्वी सांगलीत प्रकाशित झाला. हा त्यांचा चौथा काव्य संग्रह. उत्तम गझलकार म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच. पण या काव्यसंग्रहामुळे त्यांचे गझलेतर काव्य प्रकाशात आले आणि काव्य रसिकांना एक नवे लेणे प्राप्त झाले. त्या लेण्याचे यथाशक्ती दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न !
कविता काय असते, कवितेची ताकद काय असते हे सांगताना ते पहिल्याच कवितेत म्हणतात की कविता ही विश्वाला व्यापून उरणारी असते. ती मौनाला फुटलेला अक्षरपान्हा असते. करुणा, वेदना, भूक, तृप्ती अशी कवितेची अनेक रुप त्यांना दिसतात. एवढेच नव्हे तर आत्महत्येच्या अविचारापासून परावृत्त करण्याचे सामर्थ्यही कवितेत आहे असा विश्वास त्यांना कवितेबद्दल आहे. त्यामुळेच कुटुंबातील वातावरण काव्य निर्मितीला पोषक नसतानाही त्यांनी कवितेला दूर लोटलं नाही. कारण ज्या कवितेने विठूलाही बांधून ठेवलं आहे तीच कविता आपल्या रक्तातून वाहते आहे, ती दूर करता येणारच नाही याची जाणीव त्यांना सुरुवातीपासूनच झाली आहे. मग हा प्रवास अव्याहतपणे चालू राहीला आणि कवितेच्या हव्यासाने लाभलेली फकिरी ही सुद्धा अमीरी वाटू लागली. कविता गझल, अभंग, ओवी होऊन ह्रृदयातून पाझरु लागली. कधी ती गवतासारखी मुलायम बनली तर कधी तलवारीची धार होऊन तळपू लागली. कवितेच्या सामर्थ्यामुळे कवी इतका सामर्थ्यवान बनला की तो आत्मविश्वासपूर्ण सांगू शकतो की
“अंथरुनिया समुद्र अवघा
घेऊन निजलो चंद्र उशाला
पांघरुनी आकाश घेतले
पायाशी बसवले तमाला “
कविचा कवितेविषयीचा हा दृष्टीकोन, विश्वास म्हणजे कवीच्या रक्तात कविता किती भिनली आहे याचे द्योतक आहे.
झाड, पारध, चिमणे यांसारख्या काही रुपकात्मक कवितांतूनही कवीच्या भावना व्यक्त होतात.
सुखासुखी जीवन जगणं कुणाला नको असतं ? पण राजमार्ग सोडून संकटांना सामोरं जाणं ज्याला जमतं त्यालाच जगणं समजतं. वादळवा-याशी टक्कर देत उभं असलेलं झाड म्हणून तर कविला आकर्षित करत नसेल ना ? कविला झाड व्हायचय. ते इतक सोप नसतं हे त्याला माहित आहे. पण तरीही त्याला झाड व्हायचंय. बहरणं असणार तशी पानगळही असणार. पाऊस बरसणार. विजा झेलाव्या लागणार. सावली देऊनही कु-हाडीचे घाव सोसावे लागणार. पण हे सगळ्याला त्याची तयारी आहे. कारण स्वतः मातीखाली मुजून दुस-यासाठी वर फुलून येण्यातली सार्थकता कविला अनुभवायची आहे. कवीचं मातीशी असलेलं नातं कधीच तुटणार नाही हेच यातून स्पष्ट होतय.
‘पारध’ ही कवितेतून कवीने गावरान वातावरण निर्माण करत एक मोलाच इशाराही देऊन ठेवला आहे. रानाची राखण करता करता आपली पारध होणार नाही याची काळजी घ्यायचा सल्ला देताना काळाच्या बेरकेपणाची जाणीव करुन देऊन सर्वांनाच सावध केलं आहे. तरारलेल्या रानाची राखण करताना खडा पहारा तर हवाच पण त्याच रानाची भुरळ पडू देऊ नकोस, गाफील राहू नकोस ही रुपकात्मक भाषा ‘ ऊसाला लागलं कोल्हा ‘ ची आठवण करुन देते. ‘चिमणे ‘ या कवितेतून कवीने चिमणीशी साधलेला संवाद हा सावधानतेचा इशारा देऊन स्त्रीचे बळ वाढवणाराच आहे.
त्यांच्या अनेक कवितांमधून विठूमाऊलीचा उल्लेख आढळतोच. पण काही कविता या भक्तिरसात न्हाऊन निघाल्या आहेत. ’ धाव रे विठ्ठला, तुझा कैवल्याचा मळा ‘ यासारख्या कविता आपल्याला त्यांच्या सश्रद्ध मनाचे दर्शन घडवतात. तरी सुद्धा…..
“ज्यांच्या तळहाती घट्टे
आणि भाळावर घाम
कसा आठवावा त्यांना
सांज सकाळचा राम “
हा प्रश्न त्यांना पडतोच. या विठुरायाचे गुणगान गाताना ते दुस-या देवाला- देशालाही- विसरत नाहीत.
संतांची, शूरांची भूमी असलेल्या या भूमीचा जयजयकार करुन ते थांबत नाहीत तर वास्तवाचे भान ठेवून सांगतात ” सावध ठेवा सीमा अपुल्या करेल शत्रू मारा “. ही सावधानता डोळस भक्तीची द्योतक आहे.
‘जख्ख दुपारी ‘…. ही कविता म्हणजे एक उत्तम शब्दचित्रच आहे. भर दुपारच्या रखरखराटाचे केलेले वर्णन वाचून कवीच्या निरीक्षण शक्तीचा अंदाज येतो. पोरकी पेठ, सुनामुका माळ, कळसाची सावली, पडलेला वारा यासारखे संदर्भ दुपारच्या तीव्रतेचे नेमके चित्रण करतात. दुपार किती ‘ जख्ख ‘ आहे ते डोळ्यासमोर येते.
कवितेवर प्रेम करणारा असा कोणताच कवी नसेल की ज्याने प्रेमकवीता लिहीली नाही. कवी सुधाकर हेही याला अपवाद नाहीत. तिची उडणारी बट, फडफडणारी ओढणी, तिच्या पैंजणांचा नाद कवीला आकृष्ट करुन घेतातच. पण तिच्या मनाच्या समुद्रात वादळ उठतेय आणि इकडे त्याची ओली सळसळ त्याच्या इंद्रियात होतेय. या सळसळीतून नकळत मुरलीचे सूर झरे लागतात. कृष्ण कृष्ण रहात नाही. राधा राधा रहात नाही. कारण
“मी कृष्ण सावळा होतो
तू शुभ्र पिठोरी राधा
मज डसते शुभ्रता आणिक
तूज डसते सावळबाधा “
अशा एकरुपतेनेच मग तिच्या परिस स्पर्शाने त्याचे लोखंडी ओठही सोन्याचे होऊन जातात. तर कधी तिच्या येण्यानेच डोळ्यांना भाषा सुचते आणि मौनाचे अक्षर होते. ही प्रेमाची किमया त्याची खात्री पटवून देते की तिचं चंद्रकोरी लेणं आपल्या मिठीत लाभलं की आपले दगडाचे हात सुद्धा मेणाचे बनून जातील.
कविता संग्रहातील अनेक कविता कवीच्या चिंतनशील मनाची साक्ष पटवतात. दुःखाकडे पाहण्याचा कविचा दृष्टिकोन काय आहे हे ‘दुःख ‘ या कवितेत व्यक्त झाले आहे. शेवटी कवी म्हणतो…
“पडझडत्या सुखांना
दुःख घालते लिंपण
दुःख म्हणजे सुखाच्या
नाकामधली वेसण “
कवीच्या दुःखाविषयीच्या चिंतनातून आलेले हे नेमके शब्द आपल्यालाही विचार करायला लावतात. म. वाल्मिकींच्या महाकाव्यापासून वाहत आलेली ही दुःख सरिता आजच्या काव्यातही जीवंत आहे. पण कवी या दुःखाला कवटाळून न बसता मशाल होऊन दाही दिशा उजळण्याची जिद्द बाळगतो. कवी म्हणतो
“माझ्यातच माझी बीजे
मी रोज पेरती करतो
मी काळीज नांगरणारा
ह्रृदयाची शेती करतो “
मग असेच कधीतरी
“परसामध्ये स्मृती पेरल्या
त्याचे होते झाड उगवले
सुखदुःखाच्या फुलाफळांनी
अंगोपांगी पूर्ण लगडले. “
तर कधी कवी अंतर्मुख होऊन पाहतो तेव्हा त्याला स्वतःतील (खरे तर आपल्या सर्वांतील) दोष, दुर्गुण दिसू लागतात आणि कशासाठी जगतोय आपण असे वाटावे इतकी उद्वीग्नता मनात निर्माण होते. मला डोहात नेऊन बुडवा आणि तरंगलो तरी वाचवू नका असे बजावणारी ‘ मला बुडवा डोहात…. ‘ ही कविता सर्वांनी आवर्जून वाचावी अशी आहे. या चिंतनशिलतेमुळेच कवी पुढे एका कवितेत म्हणतो,
“ह्या मौनातील शब्दांच्या
मी रोज ऐकतो हाका
श्र्वासांच्या हिंदोळ्यावर
मी रोजच घेतो झोका “
आपण कोण आहोत, कसे आहोत याची जाणीव कविला असल्यामुळेच कवी म्हणतो
“मी फक्त धुलीकण आहे
ह्या संतांच्या पायाचा “
याहून दुसरी थोरवी कविला नको आहे. त्याची इच्छा एवढीच आहे,
“त्या पावन मातीमध्ये
माझाही शेवट व्हावा
इतकेच वाटते माझा
जळण्यातच जन्म सरावा “
दुस-यासाठी जळण्याचे हे बळ संतांच्या, संतसाहित्याच्या शिकवणुकीतूनच मिळाले आहे. त्यामुळे देहाचा आणि आत्म्याचा संवाद चालू आहे असे कवी म्हणू शकतो. माणूस म्हणजे भरवसा नसलेल्या देहाचा दास आहे, त्याचा श्वासही त्याच्या ताब्यात नाही हे संतांनी सांगितलेले तत्वज्ञान कवी सोपे करुन आपल्याला सांगू शकतो ते चिंतनशीलतेमुळेच !
‘पाऊलखुणा ‘ आणि ‘ह्याच अंगणात ‘ या कविता भूतकाळात घेऊन जाणा-या आहेत. धुळीची वाट, आमराई, पाखरे, गायी, गुरे कविला अजूनही खुणावत आहेत. गावाची, घरातल्या अंगणाची आठवण मनात घर करुन बसली आहे. या मातीनेच आपल्याला घडवले आहे याची जाणीव कवीला आहे. तो कृतज्ञतापूर्वक म्हणतो,
“आज सोहळा शब्दांचा जो माझ्या ओठी आला
अंगणातल्या ह्याच मातीने जन्माला घातला “
संग्रहात काही अभंग रचनाही आहेत. तुकोबाची शेती, दळण, लोकोद्धार, जन्माची चाहूल यासारख्या अभंगांतून तुकोबांचे कार्य, प्रपंचाचे चित्रण, वर्तमान स्थिती असे विविध विषय हाताळले आहेत. तर वैरीण होते नीज, विराणी या कवितांतून समाजातील उपेक्षित स्त्रीयांचे दुःख प्रभावीपणे मांडले आहे.
या संग्रहातील कविता वाचताना विषयांची विविधता आहे हे लक्षात येते. तरीही सभोवतालचे जग, परिसर, वर्तमान परिस्थिती या सर्वांकडे कवीचे लक्ष असल्यामुळे सामाजिक आशयाच्या कविता संख्येने जास्त आहेत. जवळ जवळ निम्म्या कविता या सामाजिक जाणिवेतून जन्माला आल्या आहेत. असे असले तरीही प्रत्येक कवितेची मांडणी भिन्न भिन्न असल्यामुळे सर्वच कविता वाचनीय आहेत.
अशा सर्व कवितांचा उल्लेख करण्यापेक्षा काही काव्य पंक्ती पाहिल्या तर कवीच्या मनातील अस्वस्थतेची कल्पना येईल.
… समस्यांचा डोंगर पार करत जगणं हे मुश्किल होऊन गेलं आहे. त्याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. कवी म्हणतो,
“लाख समस्या लाख प्रश्न
त्याचं द्याल का उत्तर
स्वप्नांवरती आश्वासनांच
शिंपडू नका अत्तर “
तुटणारी नाती पाहून तो अस्वस्थ होतो….
” घरांस आले कुंपण आणिक
बंद जाहली दारे
चार भिंतीच्या विश्व आतले
आम्हा वाटे प्यारे “
माणसाचे माणूसपण संपत चालले आहे हे पाहून कवी लिहीतो,
“मज नख्या सुळे फुटल्याने
मी क्रूर भयानक झालो
मी मनुष्य असलेल्याचे
नुसतेच कथानक झालो. “
चांगुलपणाची होणारी अवहेलना पाहून कवी लिहितो……
“इथला प्रत्येक चांगला माणूस
मेल्यावरती संत झालाय “
”जितके झेंडे तितक्या जाती “
ही वस्तुस्थिती आहे.
” सत्तेमधुनी मिळतो पैसा
सत्तेवरती टोळ्या जगती
लाल फितीचे नाल ठोकले
फक्त कागदी घोडे झुलती “
किंवा
“जन्माच्या सगळ्या वाटा
मरणाने मिंध्या केल्या
हे दलाल आले ज्यांनी
मातीच्या चिंध्या केल्या “
हे शब्द दाहक सत्य प्रभावीपणे मांडत नाहीत काय ?
अशा अनेक काव्यपंक्ती उद्धृत करता येतील ज्यातून कवीने समाजाचे वास्तव चित्रण नेमकेपणाने केले आहे. असत्य, दांभिकपणा, नीतीहीनता, भ्रष्टाचार यांनी समाज पोखरून निघाला आहे. सत्ता आणि संपत्ती यांचे साटेलोटे असल्यामुळे मूल्यहीन जीवनपद्धती फोफावत चालली आहे. आपल्या कवितांमधून कवीने हे स्पष्टपणे मांडले आहे.
कोणतेही पुस्तक म्हटले की प्रस्तावना आलीच. पण या कवितासंग्रहात मात्र स्वतः कविनेच कवितेआधीचा संवाद साधला आहे. हा संवाद ‘ऐकल्याशिवाय ‘ म्हणजेच वाचल्याशिवाय पुढे जाणे योग्य ठरणार नाही. कारण कवितेकडे प्रथमपासूनच अत्यंत गंभीरपणे पाहिले असल्यामुळे कवीची कवितेविषयीची भूमिका काय आहे, कविता निर्मिती मागची प्रेरणा काय आहे या प्रश्नांची उत्तरे या संवादात मिळतात. त्यामुळे पुढे कवीच्या रचना वाचताना प्रत्येक कवितेमागची भावना समजून घेणे सोपे जाते. या संवादात कवीने स्वतःचे अंतरंग उघडे करताना अनेक ठिकाणी, नकळतपणे, काव्य निर्मितीविषयी प्रकट चिंतन केले आहे जे सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. स्वतःचा खरा चेहरा असणारी कविता कशी आकारत जाते हे समजू शकते किंवा कवितेच्या आकृतीबंधाचे त्यांनी केलेले विश्लेषण वाचनीय आहे. स्वतःच्या अनुभवातून लक्षात आलेल्या काव्य निर्मितीच्या प्रमुख जागा त्यांनी दाखवून दिल्या आहेत. काव्यगंगेच्या एवढे खोलीपर्यंत शिरुनही ते नम्रपणे म्हणतात मी काव्य-वारीचा एक साधा पाईक आहे. काव्याच्या पेशी रक्तात भिनलेल्या असल्यामुळेच ते म्हणतात
” ह्या नव्हेत नुसत्या कविता
आत्माचे लेणे आहे “
फत्तरांनी गीत गावं त्याप्रमाणे दगडाच्या हातांनी कोरलेलं हे आत्म्याचं काव्यलेणं डोळे भरुन पहायला नव्हे वाचायलाच हवं. अशीच दुर्मिळ काव्यलेणी यापुढेही त्यांच्या हातून कोरली जावोत हीच सदिच्छा !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)” – संकलक / संपादक : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल — मराठी भावानुवाद – सुश्री शिल्पा शशिकांत वाडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)
संकलन / संपादन : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल
मराठी अनुवाद : शिल्पा शशिकांत वाडेकर
पृष्ठे: १३६ (मोठा आकार)
मूल्य : ३००₹
परिचय : हर्षल भानुशाली
आपल्यापैकी अनेक जण दररोज आंघोळ केल्यानंतर देवाला नमस्कार करतो. देवाचे नामस्मरण करत असताना काहीजण श्लोक, स्तोत्र म्हणत असतील.
‘भारत एकात्मता स्तोत्र’ हे एक असे पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्या देशातील नदी, पर्वत, तीर्थक्षेत्र, वेद, पुराण, उपनिषद, धार्मिक ग्रंथ, विद्वान, पराक्रमी महिला, पुरुष, संत, कवी, लेखक, वैज्ञानिक, क्रांतिकारक, शूरवीर राजे, समाजसुधारक आदींवर स्तोत्र रचण्यात आले आहे.
या पुस्तकात एकूण ३३ स्तोत्र आहेत. प्रथम सर्व ३३ स्तोत्र एकत्रित दिले आहेत. त्यानंतर प्रत्येक पानावर एक-एक स्तोत्र देऊन त्या स्तोत्राचा मराठी अनुवाद ठळक अक्षरांत विस्ताराने चित्रांसह दिला आहे. त्यातील पहिल्या स्तोत्रात ईश्वराचे स्मरण केले आहे. तो स्तोत्र आहे
ॐ ज्योतिर्मय स्वरूपाय विश्वमांड्ङ्गल्यमूर्तये ।।
ॐ सच्चिदानन्दरूपाय नमोऽस्तु परमात्मने।
अर्थ : ॐ ज्योतिर्मय स्वरूपसंपन्न अशा विश्वाचे कल्याण करणाऱ्या, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्यास नमस्कार असो.
दुसऱ्या स्तोत्रात पंचमहाभूत, ग्रह, स्वर, दिशा, काल याची माहिती आहे, तिसऱ्या स्तोत्रात भारतमातेला वंदन केले आहे. चवथ्या स्तोत्रात देशातील प्रसिद्ध अशा पर्वतांची, पाचव्या स्तोत्रात प्रमुख नद्या, सहाव्या आणि सातव्या स्तोत्रात तीर्थक्षेत्रांची माहिती देताना थोडक्यात त्यांचा इतिहासही सांगितला आहे. आठव्या स्तोत्रात विश्वविख्यात अशा चार वेद, १८ पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत भगवद्गीतांचा आदींचा उल्लेख आहे. नवव्या स्तोत्रात जैन, बौद्ध, शीख या पंथांच्या ग्रंथांचा उल्लेख आहे.
दहाव्या आणि अकराव्या स्तोत्रात प्राचीन विद्वान, संत, शूर अशा महिलांचा समावेश केला आहे. त्यांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
बाराव्या आणि तेराव्या स्तोत्रात प्रभू श्रीराम ते भगवान परशुराम, १४व्या स्तोत्रात समाजामध्ये आदराचे स्थान मिळविणाऱ्या प्राचीन व्यक्ती, पंधराव्या स्तोत्रात विविध पंथातील वंदनीय व्यक्तींचे स्मरण केले आहे. १६व्या, १७व्या व १८व्या स्तोत्रात विविध राज्यांतील संतांची माहिती देण्यात आली आहे. १९व्या स्तोत्रात देशभक्त बिरसा मुंडा, सहजानंद आणि रामानंद स्वामी यांची माहिती दिली आहे. २०व्या आणि २१व्या स्तोत्रात साहित्य, कला क्षेत्रातील, २२व्या आणि २३व्या स्तोत्रात – ऋषी, पराक्रमी राजांची माहिती देण्यात आली आहे.
२४व्या आणि २५ व्या स्तोत्रात देशातील प्रमुख प्रशा महापराक्रमी महाराजांचा परिचय, २६व्या आणि २७व्या स्तोत्रात- भारतीय परंपरेतील प्राचीन व आधुनिक वैज्ञानिक ऋषी, गणितज्ञ यांची माहिती, २८व्या आणि २९व्या स्तोत्रात १९व्या शतकातील संत, समाजसुधारक, ३०व्या आणि ३१व्या स्तोत्रात भारतीय समाजावर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांतील व्यक्तींचा परिचय देण्यात आला आहे.
३१व्या स्तोत्रात – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर (गुरुजी) यांचा परिचय देण्यात आला आहे. ३२व्या स्तोत्रात या भारतभूमीवर जन्म घेतलेल्या अनेक अज्ञात महापुरुषांचे स्मरण करण्यात आले आहे. तो स्तोत्र असा आहे-
वरील सर्व श्लोकांत ज्यांचा उल्लेख झालेला नाही, असेही ईश्वर चरणांवर जीवन समर्पित अनेक भक्त या भूमीवर झाले आहेत. असे अनेक अज्ञात वीर येथे झाले; ज्यांनी युद्धभूमीवर शत्रूचा विनाश केला तसेच अनेक समाजोद्धारक आणि लोकहितकारी विज्ञानाचे आविष्कर्ता येथे झाले. या सर्व सत्पुरुषांना प्रतिदिन आमचा नमस्कार असो.
शेवटच्या ३३व्या स्तोत्रात दररोज सर्व स्तोत्रांचे पठण करण्यास सांगितले आहे. तो स्तोत्र आहे-
इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत् ।
स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत् ।।३३ ।।
या सर्व स्तोत्रांमध्ये आपल्या देशातील सर्व वंदनीय गोष्टींचा समावेश केला गेला आहे. हे पुस्तक प्रत्येक कुटुंबात असावे, एवढे महत्त्वपूर्ण आहे.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक स्तोत्र म्हटला गेल्यानंतर त्याचा मराठी अर्थही वाचावा. जेणेकरून त्या-त्या स्तोत्रामध्ये कोणाकोणाचा उल्लेख आहे, ते कळेल.
आर्टपेपरवरील अतिशय सुंदर छपाई, रंगीत चित्रे आणि ठळक अक्षरात असल्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पेशवेकालीन समाज आणि प्रशासन ” – लेखक : गो. बं. देगलूरकर — परिचय – आनंद हर्डीकर☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆ ☆
पुस्तक : पेशवेकालीन समाज आणि प्रशासन
लेखक : गो. बं. देगलूरकर,
परिचय : आनंद हर्डीकर
पृष्ठ- ३१० +२०
मूल्य- ५००₹ फ्री होम शिपिंग
पेशवाईतील समाजाचे वस्तुनिष्ठ दर्शन
महाराष्ट्रातील वैचारिक प्रबोधनाचा ज्यांनी पाया घातला, त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जशा विविध संस्था स्थापन केल्या, तसे अनेक उपक्रमही चिकाटीने राबविले. ‘राईज ऑफ द मराठा पॉवर’ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच, पण लयास गेलेल्या मराठेशाहीच्या उत्तरार्धाचा इतिहास विस्मरणात जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारच्या ताब्यात असलेल्या पेशवे दफ्तरातील हजारो दस्तऐवजही प्रयत्नपूर्वक मिळवले. रावबहादूर जी. सी. वाड यांच्या सहकार्याने त्यांनी पार पाडलेली ही कामगिरी त्यांच्या इतर कार्याच्या मानाने तशी उपेक्षितच राहिली. न्यायमूर्तींनी पेशवे दफ्तरातले थोडेथोडके नव्हेत, तब्बल ५०, ००० कागद मिळवले होते आणि त्यातले निवडक ५००० कागद ‘डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ या स्वत:च पुढाकर घेऊन स्थापलेल्या संस्थेतर्फे प्रसिद्ध होतील, अशी तजवीजही केली. नऊ खंडांमध्ये प्रसिद्ध करावयाच्या त्या ऐतिहासिक साधनग्रंथाला साजेलशी सामायिक प्रस्तावनाही त्यांनी लिहिली. तथापि ‘पेशवे रोजनिशी’ चे ते खंड प्रकाशित होण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. थोड्याशा विलंबाने, पण त्या संस्थेने ते सर्व खंड प्रसिद्ध केलेदेखील. (पुढे यथावकाश संस्थेचे ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ असे नामांतर झाले. )
शंभर वर्षांपूर्वीच्या त्या घटनेची आज नव्याने दखल घेण्याचे कारणही तसेच महत्त्वाचे आहे. गेली कित्येक वर्षे दुर्मीळ असलेल्या त्या पेशवे रोजनिशीच्या आधारे संस्थेचे विद्यामान अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहिलेला ‘पेशवेकालीन समाज आणि प्रशासन’ हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासारख्या व्यासंगी विद्वानाने हा ग्रंथ लिहून न्यायमूर्तींच्या ‘त्या’ पायाभूत संकलन/ संपादनकार्याला यथोचित मानवंदना तर दिली आहेच, पण तसे करतानाच न्यायमूर्तींनी रोजनिशीच्या नऊ खंडांना लिहिलेल्या प्रस्तावनेत व्यक्त केलेली खंत लक्षात घेतली आहे; आणि ती दूर करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. ‘पेशवेकालीन इतिहासावर लिहिताना मुख्यत: राजकारण, लढाया यावरच अधिक भर दिला गेला, त्यावेळचे समाजजीवन आणि जनसामान्यांचे जीवन इकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, ’ ही न्या. रानडे यांनी व्यक्त केलेली खंत दूर करणारा हा ग्रंथ म्हणूनही दखलपात्र ठरतो. या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पेशवाईचे गुणगान करण्यासाठी जसा लिहिलेला नाही, तसाच तो मुद्दाम एखाद्या विविष्ट ज्ञातिसमूहावर आगपाखड करण्यासाठीही लिहिलेला नाही. तत्कालीन समाजाचे त्यांच्या गुणदोषासह पारदर्शक चित्र वाचकांसमोर उभे राहावे, याच दृष्टिकोनातून दोन भागांतील एकूण पंधरा प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. पेशवाईतील धार्मिक वातावरण, त्यात सांभाळली जाणारी परधर्मसहिष्णुता, जातिप्रथेचे किंवा गुलामगिरीचे अस्तित्व असतानाच अंगवळणी पडलेल्या माणुसकीच्या प्रथा, विद्वानांचा मान राखला जात असला, तरीही संस्थात्मक औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा जाणवण्याजोगा अभाव, जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी कायमची उपचारकेंद्रे उपलब्ध नसली, तरीही गोरगरिबांना मोफत औषधे पुरविणारे वैद्या सर्वत्र उपलब्ध असतील अशी तरतूद, बारा बलुतेदारांच्या मर्यादित ग्रामकेंद्रित अर्थव्यवस्थेवरचा वतनदारीचा प्रभाव, सर्रास रुढ असणारी लाचखोरी, संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी आवश्यकतेनुसार ‘जासूद’ किंवा ‘कासिद’ नेमण्याची पद्धत, आर्थिक व्यवहारांमध्ये सावकारांना दिली जाणारी प्रतिष्ठा व हमी, करदाते समाधानी राहतील अशी महसूलवसुलीची पद्धत, पेठा-वाडे-बागा-मंदिरे या सर्वांची यथायोग्य व्यवस्था पाहणारी नगररचना, महिलांच्या सुरक्षिततेविषयी विशेष दक्षता घेणारी न्यायव्यवस्था, राज्यविस्तार झाल्यानंतरही सह्याद्रीतील गडांवरचा बंदोबस्त कडक राखण्याची दक्षता, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच सुरू झालेले पुण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन… या आणि अशाच इतरही अनेक मुद्द्यांबद्दलचे साधार, सोदाहरण विवेचन आपल्याला या ग्रंथात वाचावयास मिळते.
पुण्यातली सुप्रसिद्ध सदाशिव पेठ म्हणजे पूर्वीचे मौजे नायगाव उर्फ सांडस नावाचे खेडेगाव ही ‘पेशवे रोजनिशी’त सापडलेली नोंद असो किंवा इ. स. १७५२ आणि १८०४-०५ मधील दोन नोंदींच्या आधारे महाराष्ट्रातील एकूण ३०५ किल्ल्यांची दिलेली सूची असो, ‘पेशवे रोजनिशी’ मधील १२६८ कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे परिशिष्ट असो किंवा महाप्रतापी थोरले बाजीराव पेशवे उत्तम ग्रंथसंग्राहकही होते, हे प्रकाशझोतात आणणारे तपशील असोत… या ग्रंथात पानोपानी विखुरलेल्या असंख्य बाबी पेशवाईच्या काळातील समाज आणि प्रशासन याबद्दलचे वस्तुनिष्ठ चित्र उभे करण्यात यशस्वी ठरल्या आहेत, असे जाणवते. डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे आणि या अभ्यासप्रकल्पात त्यांना साहाय्य करणाऱ्या अविनाश श्री चाफेकर व आनंद नी. दामले या दोघांचेही त्याबद्दल इतिहासप्रेमी अभ्यासक नेहमीच ऋणी राहतील. आणि या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ पुरवल्याबद्दल आयसीएचआरचेही आभार मानायला हवेत.
परिचय : आनंद हर्डीकर
प्रस्तुती : श्री हर्षल भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “महाभारत युद्धकाळ” – लेखक : श्री नीलेश ओक — भावानुवाद – सुश्री अलका गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक: महाभारत युद्ध काळ
लेखक : नीलेश ओक
मराठी अनुवाद:अलका गोडबोले
पृष्ठ:२१६ मोठा आकार
मूल्य:४५०₹
रामायण आणि महाभारत यांची ऐतिहासिक सत्यता सिद्ध करणारे अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी लिहिलेला हा ग्रंथ!
‘ऐतिहासिक राम‘ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक निलेश ओक यांचे हा महाभारताची ऐतिहासिकता सिद्ध करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुख्यतः त्यांनी खगोलीय घटना यांना केंद्रीभूत धरून लिहिला असला तरीही महाभारताचा कल्पना विलास म्हणून उपहास करणाऱ्यांना सप्रमाण उत्तर आहे.
(महाभारताचे युद्ध दिनांक १६ ऑक्टोबर ५५६१ ते २ नोव्हेंबर ५५६१ दरम्यान झाले आहे…. पण हा कालखंड Before Common Era असा वाचावा !)
आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांचा अभ्यास करणाऱ्यांना हा ग्रंथ म्हणजे अनमोल ठेवा आहे…. पण ज्या वाचकांना दृश्य खगोलशास्त्राचा परिचय नाही अशांसाठी प्रकरण तीन आणि चार मदत करतात आणि वाचकाला याबत साक्षर करतात.. विविध आकृत्या, तक्ते आणि कोष्टकांनी भरून गेलेला ग्रंथ!
महाभारत आणि रामायण यांचा जगावर प्रचंड प्रभाव आहे. या ग्रंथांनी भारतीय जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा पाया घातला आहे. हा आपला अभिमानास्पद इतिहास आहे….. पण भारतीयांची अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून रामायण महाभारत सारख्या इतिहासाला कल्पना विलास म्हणून हिणवलं गेलं. ही एक बाजू जरी खरी असली तरीही महाभारत वास्तवात होऊन गेलं आहे, असे म्हणणाऱ्यांनी देखील खगोलशास्त्रीय निरीक्षणं दुर्लक्षित केली आहेत. त्यात सर्वात महत्वाचं निरीक्षण म्हणजे “अरुंधती तारा !”
लेखक निलेश ओक म्हणतात, ” महाभारत युद्धाची तारीख निश्चित करण्यात जर अरुंधती हा सर्वात असंदिग्ध खगोलशास्त्रीय पुरावा म्हणून पात्र ठरत नसेल तर महाभारतातील खगोलशास्त्रीय पुराव्यांबद्दल बोलणेच थांबवले पाहिजे. “
पुस्तकातील उत्कंठावर्धक भागाची सुरुवात पाचव्या प्रकरणापासून होते. पण पहिली चार प्रकरणही तितकीच महत्त्वाची आहे. ही प्रकरणे खगोलशास्त्र समजून घेण्यासाठी फार मदत करतात. ज्यांना यात रस आहे, अशांना हा ग्रंथ फार मोठी मेजवानी!
प्रस्तुत ग्रंथ हा महाभारताची कथा सांगणारा नसून महाभारताचा कालावधी आणि तो कालावधी सिद्ध करणारा संशोधनात्मक अभ्यास आहे. ज्यांना कालगणना, अवकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र…. आदी गोष्टींची किमान तोंडओळख आहे, खगोलशास्त्र, ज्योतिष शास्त्र यांची तोंडओळख आहे, अशा वाचकांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक पर्वणी!
पहिल्या प्रकरणात लेखक मुख्य समस्या आणि विशिष्ट ध्येयांची यादी देतो. मुख्य समस्या म्हणजे “महाभारत युद्ध केव्हा झाले?”
दुसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाच्या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवरील गृहीतकांची यादी आहे. काही सिद्धांतांचा डळमळीतपणाही लेखकाने ठळकपणे मांडला आहे. याच प्रकरणात लेखकाचा सिद्धांत आणि तो सिद्धांत तपासून पाण्याची कार्यपद्धती दिली आहे.
तिसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाने खगोलशास्त्रीय निरीक्षणे आणि त्यांची स्पष्टीकरणे समजावीत या दृष्टीने खगोलशास्त्रातील मूलभूत गोष्टी दिल्या आहेत. जसे की पृथ्वीचे चलन संपातबिंदूची घटना, संपातबिंदूमुळे घडणारी उत्तर ध्रुवाची हालचाल, सूर्य आणि चंद्रग्रहणे, ग्रेगोरियन आणि ज्युलियन दिनदर्शिका… इत्यादी.
प्रकरण चार हे अद्वितीय अशी भारतीय आणि महाभारतातील खगोलशास्त्र आणि दिनदर्शिका यांच्या संकल्पना समजावून सांगते. या प्रकरणात भारतीय दिनदर्शिकेचे चांद्र सौरस्वरूप समजावले आहे. मास, पक्ष, तिथी आणि नक्षत्र समजून घेणे सोपे होते.
प्रकरण पाच मध्ये महाभारतातील अनेक निरीक्षणांपैकी एकाचा विचार केला आहे.
प्रकरण सहावे अरुंधतीच्या निरीक्षणाची समस्या आणि त्या समस्येवरील लेखकाचे उत्तर याची चर्चा करते.
सातव्या प्रकरणांमध्ये अरुंधती निरीक्षणाने परिभाषित केलेल्या कालखंडाचा शोध घेतला जातो. त्यासाठी महाभारतातील ग्रह आणि धूमकेतू यांच्या वर्णनाची मदत घेता येते.
आठव्या प्रकरणात महाभारतातील निरीक्षणे विशेषता महाभारत युद्धाच्या 18 दिवसातील चंद्राच्या कला आणि स्थिती यांचा उपयोग केला आहे.
नव्या प्रकरणात लेखकाच्या सिद्धांताच्या आणि त्यात केलेल्या अंदाजाच्या विरोधात असणाऱ्या महाभारतातील निरीक्षणांचा विचार केला आहे आणि पर्यायी स्पष्टीकरणे सुचवली आहेत.
दहाव्या प्रकरणांमध्ये स्वयंभूचे लेखक प. वि. वर्तक यांच्या सिद्धांताची रूपरेषा मांडली आहे.
अनुक्रम:
१. समस्या
२. सिद्धांत अनुमान आणि पार्श्वभूमीवरील ज्ञान
३. खगोलशास्त्राची तोंड ओळख
४. महाभारतातील खगोलशास्त्र
५. मत्सरी बहीण आणि अभिजीत चे पतन
६. अरुंधतीचे युग
७. ३६ गुण जुळले महाभारत युद्धाच्या वर्षाचा शोध
८. महाभारत युद्धाचा पहिला दिवस चंद्राच्या कला आणि स्थिती
९. परस्पर विरोधी निरीक्षणे
१०. प वि वर्तक यांचा सिद्धांत
११. अधिक चांगला योग्य सिद्धांत
१२. परिणाम भाकीते अंदाज आणि नवीन समस्या
१३. टिपणे, निवडक संदर्भ ग्रंथ, तक्ते आणि आकृत्या
लेखक परिचय : अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी रामायणासह महाभारताच्या कालनीश्चितीसंदर्भाने संशोधन केले असून सिद्धांत मांडला आहे. आपल्या सिद्धांतातून समोर आलेली माहिती या दोन ग्रंथात त्यांनी मांडली आहे. रामायणाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण १२, २०९ वर्षे आहे, तर ऋग्वेदाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण २४ हजार वर्षे असल्याचे त्यांनी खगोलशास्त्रीय पुराव्याच्या आधारे दाखवून देतात.
महाभारतासंबंधाने नीलेश ओक सांगतात “महाभारताची कालनीश्चिती करण्यासाठी मी जवळपास ३०० हून अधिक खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास केला. माझ्या संशोधनानंतर महाभारताचा काळ आजपासून ७५०० वर्षे आधीचा असल्याचे सिद्ध झाले. परंतु, आपल्यापैकी अनेकजण भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना ५ हजार वर्षे आधी असा करतात, जे चुकीचे आहे. कारण भारतीय संस्कृती त्याआधीपासून अस्तित्वात आहे. ”
यामध्ये अजून एक मुद्दा आहे आजवर आपल्या भारताचा इतिहास हा आधी इंग्रजांनी आणि त्यानंतर आलेल्या कम्युनिस्ट प्रणित इतिहास करते आणि आपला इतिहास हा हजार पंधराशेच्या वर्ष मागे नेला नाही आणि म्हणून आम्ही सगळे मागासलेले असं ठरवण्यात असा शिक्का मारण्यात ते पटाईत झाले आणि त्यांची ओढणारे इथले तथाकथित इतिहास तज्ञ त्यातच धन्यता मानू लागले. या सगळ्याला आता एक निश्चितच आळा बसून आपला इतिहास असंख्य हजार वर्ष जुना आहे आणि तो अतिशय समृद्ध असा आहे हे आपल्याला जाणून घेता येईल. या दृष्टीने या पुस्तकाचे खूप अतिशय महत्त्वाचं महत्त्व आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈