मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्र जिवांचे… – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ मैत्र जिवांचे… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

नेहा मॅडमनी सांगितलेलं काम पूर्ण करून पार्लरमधून बाहेर पडायला सोनलला थोडा उशीरच झाला होता. ठरलेल्या कॉर्नरजवळ सुरेखा तिची वाट पाहत होती. हातातली प्लास्टिक बॅग सोनल पुढे करत सुरेखा म्हणाली,

  ॓ आज शेठाणिच्या सुनेने दोन छान ड्रेसेस दिलेत. तुला आवडेल तो घे यातला.॔

 सुरेखा आणि सोनियाची बालपणापासूनची घट्ट मैत्री चाळीतल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होता. मैत्रीचा धागा अतूट होता. घेतलेली किंवा मिळालेली प्रत्येक गोष्ट वाटून घेण्याची दोघींची सवय कायम होती.

  ॓ बरं झालं तू इथे बोलावलंस ते! खूप दिवसांनी असं भेटायला, बोलायला मिळालं आपल्याला.॔

  ॓ एक बात कहूॅं क्या?॔ मूळची उत्तर प्रदेशची असल्यामुळे सुरेखाच्या तोंडून सहजपणे हिंदी येत असे.

  ॓हो. सांग ना.॔

॓ तुझा तो बॉयफ्रेंड मनोज अलीकडे दुसऱ्या एका मुलीबरोबर भटकताना दिसतो. ये नादान लडके भॅ॑वरे जैसे होते है.॔

  ॓चूक झाली. अगदी कंटाळले होते मी घरातल्या वातावरणाला! एकदा सुनील मार्गाला लागला की तुझ्या लग्नाचं बघता येईल असं घरातील लोक सतत सांगायचे.॔

  ॓पगली है तू. तुझा बॉयफ्रेंड, तुझे आई-बाबा, भाऊ सगळे तुला ब्लॅकमेल करताहेत. तुझी आई चार ठिकाणी घरकाम करते. पण तुझा पप्पा काय करतो? सुनील तरी कुठे स्टडी करतो? माझ्या बड्या भाईने सुनीलला दोन-तीनदा सांगितलं की मी तुला टॅक्सी चालवायला शिकवतो. रविवारी सकाळी येत जा. कुठे आला? मेहनत करायला नको त्याला. उलट तू सांगितलंस की आईकडून भांडून एक हजार रुपये घेऊन मित्रांबरोबर तिरुपतीच्या ट्रीपला गेला. काय बोलणार?॔

  ॓माझं लग्न होईल तेव्हाच मी या सगळ्यातून सुटेन. पण मी ही अशी काळी. सगळ्यांची माझ्या पैशावर नजर. पण रात्री झोपायला सुरक्षित जागा लागते ना म्हणून सगळं सहन करायचं.॔

  ॓माझ्या मॉ ने तर सगळ्यांना मेहनत करून कमवायला शिकवलं. सोनल, तू बारावी पास आहेस. सावळी पण स्मार्ट आहेस. पार्लरमध्ये नोकरीही करतेस. थोडे- थोडे तरी पैसे बँकेत जमा कर. वहीं तेरे काम आयेंगे.॔

 घर जवळ आल्यावर सुरेखा म्हणाली ॓आता मी या रस्त्याने जाते. इकडे नवीन बांधलेल्या टॉवरमध्ये एका घरी रात्रीचं बर्तन साफ करायचं काम करते हल्ली. मेरी पैसेवाली बात ध्यान मे रख. बाय.॔

 सुरेखाला बाय करायला सोनलनेही हात उंचावला. सुरेखाच लक्ष नकळत सोनलच्या उंचावलेल्या हाताकडे गेलं. त्या हातावरची भाजल्याची खूण अजूनही आपलं अस्तित्व दाखवत होती. क्षणभर त्याच्याकडे पाहून सुरेखाने चटकन पुढे होऊन सोनलला गळामिठी मारली. जिव्हाळ्याच्या मैत्रीचा आश्वासक ओलावा त्यात होता. दोघींच्या मनात तो प्रसंग जागा झाला होता. शाळेत असताना एका दिवाळीत सुरेखा नवीन ड्रेस घालून पणतीवर फुलबाजी लावत होती. फुलबाजीची ठिणगी ओढणीवर पडून तिने पेट घेतलेला सुरेखाच्या लक्षात आलं नव्हतं. त्याचवेळी आपला नवीन ड्रेस सुरेखाला दाखवायला आलेल्या सोनलने कसलाही विचार न करता हाताने ती पेटती ओढणी खेचून दूर केली म्हणून सुरेखा जीवानिशी वाचली होती. घाबरलेल्या दोघीजणी नंतर एकमेकींना मिठी मारून रडत राहिल्या. त्यांना शांत करायला, सोनलच्या भाजलेल्या हातावर औषध लावायला सुरेखाची मॉ॑ आणि शेजारी धावून आले होते.

 घराच्या दिशेने जाताना सोनलच्या मनात आलं,॓ गेल्या काही वर्षात किती भराभर बदल होत गेला. स्वप्नातल्यासारखे टॉवर्स उभे राहिले. मनोजच्या बाईकवरून भन्नाट वेगाने जाताना आपणही असाच संसाराच्या स्वप्नांचा टॉवर उभारला होता. मनोजनं बाईक दुसरीकडे वळविल्यावर तोसुद्धा कोसळला. आता काय म्हणे तर लोअर परळला अप्पर वरळी म्हणायचं. ज्यांच्या जीवावर हे टॉवर्स उभे राहिले त्यांच्या नशिबी फक्त माना उंचावून या टॉवर्सचं ॓ दूरदर्शन घेणं आलं.॔ विचारांच्या भोवऱ्यात गरगरत चाळीचा जिना चढून सोनल वर गेली. खोलीच्या दाराशी सँडल्स काढताना तिला आतलं बोलणं ऐकू आलं. रडवेल्या आवाजात आई म्हणत होती, ऀकिती वर्षं काम करतेय मी त्यांच्याकडे. त्यांचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे हो माझ्यावर. आता हे किल्लीचं असलं काम करायचं म्हणजे…

 ॓ काय झालं पपा?  ॔

॓काही नाही ग. माळ्यावरच्या एका जुन्या ट्रंकेची चावी शोधायला सांगितलय मी तुझ्या आईला.॔

 स्वतःचा विचारात गुंतलेल्या सोनालीचे आईच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले नाही.

 ताई आणि सुमन यांचं लग्न झालं तेव्हा घरातील परिस्थिती तशी ठीक होती पण बाबांच्या फॅक्टरीत संप सुरू झाला आणि आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मी आणि सुरेखाने तेव्हा नुकतिच दहावीची परीक्षा आटोपली होती.

 दहावीचा रिझल्ट लागायच्या आधीच सुरेखाचं तिच्या मनाविरुद्ध लग्न करण्यात आलं. जास्त शिकली तर बिरादरीमध्ये कोण लग्न करेल हिच्याशी! सुरेखाच्या वडिलांच्या जुनाट विचारसरणीमुळे, प्रचंड कर्ज काढून सुरेखाच्या लग्नाचा घाट घातला होता. सुरेखाच्या कोरड्या डोळ्यातली उदासी लपत नव्हती. जिवलग मैत्रीण दूर अलाहाबादच्या पुढे सासरी जाणार म्हणून आपण रडत आहोत असं वाटून सर्वजण आपलीही समजूत घालीत होते. सुरेखाला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं. तिने कॉलेज बघून येण्याचा हट्ट धरला. कॉलेजच्या आवारात हमसाहमशी रडणारी सुरेखा आपल्या डोळ्यापुढे येत होती. दहावीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच सुरेखा विवाह बंधनात अडकली. तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपण काही मदत करू शकलो नाही याचं दुःख त्यावेळी आपल्या डोळ्यातून वाहत होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाऊ बामण… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ भाऊ बामण… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

भाऊ बामण गेल्याची बातमी समजली आणि क्षणात मी हताश झालो. काही केल्या डोळ्यातून बाहेर यायला तयारच होईना भाऊ बामण. तसाच डोळ्यांच्या पापणीत घट्ट रुतून बसलेला. कधी काळी त्यानं म्हंटलेला कानात अजूनही तोच आवाज, “तुज्या बापाच्या लग्नाचा आंतरपाट म्याच धरला अन तुजा बी म्याच! तुमच्या आज्ज्या-पंज्ज्या सकट सगळ्यांचं महाळ बी म्याच केलं, पण कधी तुमच्याकडून एक रुपया बी घेतलेला नाय!” माणसं म्हणायची, “झोपलेला देव जागा करण्याची हिम्मत फ़क्त पांडोबाच्या हलगीत अन भाऊ बामणाच्या घंटीतच आहे. ” भाऊ बामण नुसत्या गावाचा बामण नव्हता तर अख्ख्या पंचक्रोशीचा बामण होता. तांबडं फुटायच्या आधीच जाग यायची त्याला. अगोदर भाऊ बामण जागा व्हायचा मग जाग यायची गावाला. अंधारात गोठ्यातली रिकामी बादली घेऊन मंदिरापुढच्या आडावर हजर व्हायचा भाऊ बामण. राहाटावरून खाली बादली सोडून साखर झोपेत असलेलं पाणी शेंदायचा भाऊ बामण. कितीही कडाक्याची थंडी असो, पावसाची कितीही उभी धार असो, तरीही थंड पाण्याने गावात पहिली अंघोळ उरकायचा भाऊ बामण. कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगावर दानवं घातलेला भाऊ बामण गावच्या देवळातली ठण-ठण आवाज घुमवत जेव्हा पहिली घंटा वाजवायचा, तेव्हा कुठे जाग यायची गावाला. माणसं म्हणायची, “गड्या भाऊ बामण उठला! पहाट झाली! उठा आता!”

गावात तशी बामणाची मोजून चार घरं. एकाच बुडक्यातली. एकाच रांगेत उभी. छोटीशी बामण गल्लीच. गावच्या प्रमुख मंदिरातील पूजा अर्चा यांच्याकडेच आळी पाळीने येई. कालमानानुसार यातील तीन घरे कायमची शहराकडे स्थलांतरित झाली. गावगाड्यात उरलेला भाऊ बामण मात्र गावाला चिकटून मागं राहिला. कशासाठी राहिला असेल? माहीत नाही. पण वडिलोपार्जित मिळालेल्या शेताच्या तुकड्यात आयुष्यभर तो राबला. नेमका कुणासाठी तो राबला असेल? माहीत नाही. त्यानं त्याचं अख्खं आयुष्य गावकी करण्यातच का घालवलं असेल? ते ही माहीत नाही.

भाऊ बामणानं सबंध आयुष्यात पायाला कधीही चप्पला घातल्या नाहीत. आयुष्यभर तो अनवाणी पायानं जमीन तुडवत आणि सायकलचं पायंडल मारीत राहिला. माणसं म्हणायची, “कोणताही विधी करावा तर भाऊनच!” घाई नाही की गडबड नाही. सगळं कसं त्याच्या हातून शांततेत पार पडणार. भाऊ बामणानं अख्ख्या पंचक्रोशीतील कित्येक पिढ्यांची लग्ने लावली. कित्येक घरात शांततेचे होमहवन पेटवले. कित्येकांचे अभिषेक घातले. कित्येक घरात सत्यनारायणाचे सकळ खंडाचे अध्याय वाचले. कित्येक घरांच्या कुंडल्या जुळवल्या. कित्येक घरांची साडेसाती घालवली. सत्यनारायणाची पूजा वाचताना त्याने एका विशिष्ट लयीत वाचलेली साधू वाण्याची कथा अजून माणसांच्या कानात तशीच घुमते. खरं खोटं माहित नाही पण अजून जुनी माणसं सांगतात, “भाऊ बामणाचा हात जर पिंडाला लागला नसेल तर कावळा सुद्धा शिवायचा नाही पिंडाला!”

बारशापासून ते चौदाव्या पर्यंतचे सर्वच कार्यक्रम अगदी यथासांग पार पाडायचा भाऊ बामण. पितृ पंधरावड्यात तर त्याची सायकल कधी थांबायचं नावच घ्यायची नाही. गावासोबत साऱ्या पंचक्रोशीत महाळ घालायच्या विधीचा मान हा भाऊ बामणालाच असणार. त्याशिवाय वाडवडील जेवले असं म्हणताच यायचं नाही. आता कदाचित तुम्हाला वाटेल की, भाऊ बामणानं त्याच्या आयुष्यात चिक्कार कमाई केली असेल. पण मंडळी, यातलं काहीच त्यानं केलं नाही. मिळेल त्या पसा-मूठ शिदोरीवर त्यानं आयुष्यभर गावगाड्यातली गावकी सांभाळली. मंदिराच्या दानपेटीत कधीही त्याच्या हाताची बोटे शिरली नाहीत की तिजोरीत असलेल्या देवीच्या जुन्या दागिन्यावर त्याची नजर रुतली नाही. की कधी त्याच्या बायकोच्या गळ्यातल्या काळ्या मण्यांचं, सोन्याच्या मण्यात रूपांतर झालं नाही. इतका प्रामाणिक आणि विश्वासू होता भाऊ बामण.

पण त्याचं दुर्दैव हे की भाऊ बामणाला फक्त पाच वर्षेच संसार लाभला. एका सकाळी आडावर धुणं धुवायला गेल्यावर पाणी शेंदताना त्याची बायको आडात पडली. आडावर ओरडून बायकांनी नुसता कल्लोळ उठवला. सगळं गाव आडाकडं पळत सुटलेलं. पण बिन पायऱ्याचा आड. कोणी उडी मारायचं धाडसच करेना. अखेर मातंगवाड्यात कोणीतरी पळत जाऊन निरोप दिला. क्षणाचाही विलंब न लावता पट्टीचा पोहणारा चंदू नाईक आडाच्या दिशेने धावत सुटला. त्याने आडात कपड्यासहीत उडी टाकली. काही वेळातच तळातून रहाटाच्या साखळीला बांधून भाऊ बामणाच्या बायकोचं प्रेत त्यानं वर काढलं. उशीर झाला होता. तिला वर काढल्यावर “आरं रं रं लई वाईट झालं गड्या! नांदनं कडंवर जायाला पायजे व्हूतं! बयो कशी ग घसरलीसं आडात! लेकरानं कुणाला गं आय म्हणून हाक मारावी आता!” म्हणत चंदू नाईक मुळातून हळहळला.

दिवस पुढे सरकले. भाऊ बामण हळूहळू या दु:खातून बाहेर आला. पण त्यानं दुसरं लग्न काही केलं नाही. त्याच्या आई वडिलांसोबत त्यानं लहान पोर वाढवलं. शिकवलं. पोरगं मोठं झाल्यावर ते कामधंद्यासाठी शहराकडे बाहेर पडलं. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण हळूहळू पोरगं गावाला यायचं कमी झालं. भाऊ बामण गावाकडून पत्र पाठवायचा. सुरुवातीला उत्तर यायचं. पण नंतर-नंतर पत्राला उत्तर येईनासं झालं आणि अशातच एक दिवस गावात कोणी तरी बातमी आणली. ‘भाऊ बामणाच्या पोरानं तिकडंच कुठल्यातरी पोरीशी लग्न केलयं. ’ भाऊ बामणाच्या कानांवर ही बातमी पडली. खात्री करण्यासाठी एक दिवस भाऊ बामण शहराकडे जाऊन आला. माघारी आल्यावर पोराचा नवा संसार सुरळीत आणि सुखाचा चालू असल्याचं त्यानं गावाला सांगितलं. खरं खोटं काय ते भाऊलाच माहीत. काही दिवसातच गाव भाऊच्या पोराला विसरून कामाला लागलं…

… एक-दीड वर्षे उलटलं असेल. अचानक भाऊचा पोरगा मतदानाला म्हणून एकटाच गावाला आला. महिना झाला. दोन-महिने झाले तरी परत जाण्याचे काही नावच घेईना. गावात हळूहळू कुजबुज सुरू झाली. रिकामी डोकी वळवळू लागली. आणि कुठून तरी गावाला खरी बातमी समजली. भाऊ बामणाची सून त्याच्या पोराला घटस्फोट देऊन निघून गेलीय. भाऊनं हळूहळू माणसात उठणं बसणं बंद केलं. अन्न पाण्यावरची त्याची वासनाच उडाली. आजूबाजूच्या गावात जाणंही त्यानं बंद केलं. गावातलं विधीकार्यही त्यानं कमी केलं. काही महिन्यांनी भाऊचा पोरगा पुन्हा शहराकडे वळाला. पण पुन्हा काही तो गावाकडे परतला नाही.

काळ हळूहळू पुढे सरकत राहिला. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे संपत गेली. भाऊचे आई-वडीलही कधीच गेले होते. भाऊ बामणही म्हातारपणाकडे झुकला. मावळतीच्या सावल्या त्याच्या अंगावर कधी चढून बसल्या गावाला कळले सुद्धा नाही आणि एके दिवशी दिवस उगवायला भाऊ बामण गेल्याची बातमी गावभर पसरली. गावातले व्यवहार थांबले. नव्या दुकानांची उघडलेली शटरे पुन्हा झाकली गेली. भाऊ बामणाच्या पडक्या घरापुढं माणसांची तुडूंब गर्दी. माणसं हळहळली. जुन्या आठवणी काढू लागली. काही वेळाने तिरडीवर बांधलेल्या भाऊ बामणाचं प्रेत गावानं उचललं. रडायला जवळचं कोणी आलंच नाही. गावाचा शेवटचा बामण स्मशानात जळून राख झाला. एक वटवृक्ष कायमचा उन्मळून पडला…

… डोक्यात नुसता प्रश्नांचा भडीमार. काळासोबत जे बामण गावगाडा सोडून शहराकडे वळाले ते स्थिरस्थावर झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्याचं घडलंही असेल आयुष्य? त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकून गेल्याही असतील देश-विदेशात? भलेही त्यांनी मोठमोठे प्रबंध लिहिले असतीलही. पण त्यात भाऊ बामणासारख्यांना किती स्थान? मंडळी, गावासोबत गावकीला जोडून घेत जे गावगाड्यातल्या प्रथा परंपरा जपत राहिले त्या भाऊ बामणासारख्यांची नेमकी नोंद तरी कुठे? भले नव्या जागतिकीकरणात त्यांनी केलेल्या पूजा अर्चा, होमहवन निव्वळ अंधश्रद्धाही ठरतील? पण त्यांनी ज्या निष्ठेने त्या श्रद्धा जपल्या असतील त्याचं काय?

आयुष्यभर भाऊ बामणानं साऱ्या गावाचे विधी पार पाडले असतील. कित्येकांच्या नावाने पिंड तयार केले असतील. कित्येकांचे चौदावे पार पाडले असतील. पण त्याच्याच मृत्यूनंतर त्याचा स्वतःचा विधी करायला गावाला बामण उरलाच कुठे? अख्ख्या गावाच्या मंडवळ्या भाऊ बामणानं बांधल्या असतील पण स्वतःच्या लेका-सुनाच्या मंडवळ्या बांधण्याचं भाग्य त्याच्या नशिबी आलंच कुठे? मंडळी, हे त्याचं भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य? मरून जाण्याआधी स्वतःच्या जमिनीची आणि घरादाराची मालकी त्याने पोराच्या नावावर करण्या ऐवजी गावाच्या मंदिर ट्रस्टीच्या नावे का केली असेल? आयुष्यभर त्याने कित्येकांच्या घरात शांततेचे होम पटवले असतील. तितकेच मंत्र म्हटले असतील. पण त्याच्या घरात शांतता नांदायला आलीच कुठे?

शेवटी, गावात आता पहाटेच्या वेळी “ठणsss ठणsss” वाजणारी घंटा नेहमीसारखी वाजत नसेल तेव्हा गावाला आणि मंदिरातल्या देवाला चुकल्या-चुकल्यासारखं वाटत असेल का? नव्या काळात पूजा आरत्या, होमहवन, पिंडदान हे सगळं कालबाह्य होईलही. पण हे सारं प्रामाणिकपणे आणि ज्या निष्ठेने त्यानं गावकीसाठी केलं म्हणून निदान त्याच्या आठवणी तरी कुणाच्या काळजात मागे उरतील का? की ऊठ सूठ आजूबाजूला बामणांना खच्चून शिव्या घालायच्या या नव्या जमान्यात तुम्हीही म्हणाल, “साला एक बामण मेलं म्हणून काय बिघडलं? देशात चिक्कार गर्दी बामणांची…!”

 

लेखक : ज्ञानदेव पोळ

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टॅटू… (अनुवादित) इंग्रजी लेखिका : मेलिसा म्याककिनी ☆ मराठी अनुवाद  – श्री मकरंद पिंपुटकर  ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ टॅटू… (अनुवादित) इंग्रजी लेखिका : मेलिसा म्याककिनी ☆ मराठी अनुवाद  – श्री मकरंद पिंपुटकर ☆

(परदेशामध्ये मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन या व्यसनांची तीव्रता भीषण आहे. अनेकजण यातून बाहेर पडण्यासाठी – व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. काहीजण यशस्वी होतात, तर काही पुन्हा पुन्हा त्या व्यसनांच्या विळख्यात सापडतात. आजची कहाणी या व्यसनमुक्तीच्या लढ्याबद्दलची…)

मी एक यशस्वी टॅटू आर्टिस्ट आहे – लोकांच्या अंगावर, त्याच्या आवडीप्रमाणे गोंदवून देतो. पुण्यात कँपात माझा स्टुडिओ आहे. भयंकर बिझी असतो मी. खोऱ्याने पैसा ओढतो, त्याहीपेक्षा महत्त्वाचं, म्हणजे मी अजरामर कलेला जन्म देतो. तुमच्या अंगावरचा मी कोरलेला टॅटू – माझी कला – तुमच्या शरीरावर कायम वास्तव्य करून राहते. एकदा टॅटूचं नक्षीकाम – डिझाईन ठरलं, रंगसंगती ठरली, मी कामाला सुरुवात केली आणि मी माझी सिगारेट शिलगावली, की मग मी माझ्याच धुंदीत असतो.

टॅटू तयार झाला की ग्राहकापेक्षा मलाच जास्त खुशी होत असते. मग ती खुशी सेलिब्रेट करण्यासाठी, सिगारेटचा आणखी एक झुरका ! माणसाला आयुष्यात आणखी काय पाहिजे ?

– – हां, माझ्या गर्लफ्रेण्डला माझं हे असं सिगारेट पिणं आवडत नाही. पण कलाकाराची आणि कलेची नशा काय असते, हे तिला काय समजणार ? आणि अर्थात, मला काही धूम्रपानाचे व्यसन नाहीये. माझा माझ्यावर पूर्ण ताबा आहे. असो.

आज दुपारी ४ वाजता एक महिला माझ्या टॅटू स्टुडिओमध्ये आली. अपॉइंटमेंट नव्हती घेतलेली तिनं. ‘मी तिच्या हातावर एक टॅटू काढू शकतो का ?’ असं तिनं विचारलं.

“कसा टॅटू हवा आहे तुम्हाला ?” थोडा मोकळा वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी विचारलं.

तिने मला तिच्या फोनवर एक फोटो दाखवला. त्यावर ३९२ आकडा लिहिलेला होता. “ ३९२. माझ्या मनगटावर. साधी काळी शाई. तुम्ही हे आत्ता करू शकता का? ”

– – मी तिच्याकडे पाहिले. ती रडत होती. रडून रडून डोळे लाल झालेले, सुजलेले. हात थरथरत होते.

“ हो, मी ते करू शकतो. पण मी विचारू का – हे ३९२ म्हणजे काय? ”

ती माझ्या खुर्चीवर बसली. तिने एक दीर्घ श्वास घेतला.

– – “ माझी मुलगी – चार दिवस गायब होती, काल मला ती सापडली. ड्रग ओव्हरडोसने तिचा मृत्यू झाला होता. पण मला याची आठवण ठेवायची आहे, की तिने व्यसनमुक्त राहण्याचे खूप प्रयत्न केले होते. तब्बल ३९२ दिवस तिने नशा केली नव्हती. प्रयत्नपूर्वक, संयम ठेवून, ती सलग ३९२ दिवस व्यसनमुक्त राहिली होती. ते ३९२ दिवस – तो निग्रह, ते प्रयत्न महत्त्वाचे होते. ”

काय बोलावे हे मला कळत नव्हते. मी फक्त मान डोलावली. मी टॅटू काढायची तयारी सुरू केली.

– – इकडे ती बोलतच राहिली. तिला मोकळं व्हायचं होतं.

“ बोलणारे बोलतील की तिने पुन्हा ड्रग्स घेतलीच, त्यातच ती मेली. ती अपयशी ठरली. तुम्ही कधीच नशा करणे सोडून देऊ शकत नाहीत. पण ते हे मान्य करणार नाहीत की तिने ३९२ दिवस ड्रग्सना स्पर्शसुद्धा केला नव्हता. ती व्यसनमुक्तीच्या बैठकांना – सभांना गेली होती. तिला नोकरी मिळाली होती. ती पुन्हा चित्रं काढू लागली होती. ३९२ दिवस ती पुन्हा एकदा माझी मुलगी होती. इतरांना फक्त तिचा शेवटचा एक व्यसनाधीन दिवस आठवेल. पण मला तिचे सोबर व्यसनमुक्त ३९२ दिवस आठवतील. ”

… तिचा आवाज कातर झाला. “ हा टॅटू मला तिच्या त्या ३९२ सोनेरी दिवसांची आठवण करून देईल. तिने लढा दिला. हे आकडे मला सांगतील – तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ”

मी टॅटू पूर्ण केला. साधे आकडे… ३९२. तिच्या मनगटाच्या आतल्या बाजूला. जिथे ती दररोज पाहू शकत होती.

तिने माझी फी दिली. आणि त्याशिवाय मला खूप जास्त टिप दिली. ती निघून जाऊ लागली. पण अचानक मागे वळली आणि तिनं विचारलं – “ माझं आणखी एक काम कराल का, प्लीज ? या टॅटूचं हे स्टेन्सिल तुम्ही तुमच्या शो-केसमध्ये ठेवू शकाल का? ३९२? आणि जर कोणी इथे व्यसनाशी झुंजत आला असेल किंवा एखाद्याने व्यसनामुळे कोणाला गमावले असेल, तर त्याला तुम्ही हे टॅटू कमी दरात गोंदवून देण्याची ऑफर देऊ शकाल का? मग तो किंवा ती कितीही कमी दिवस व्यसनमुक्त राहिला असला तरी… १०० दिवस. १० दिवस. १ दिवस. किती दिवस हे महत्त्वाचे नाही. पण मनापासून केलेल्या प्रयत्नांची नोंद घेतली जाते हे जगाला कळू द्या. “

– – मी उत्तर देण्यापूर्वीच ती निघून गेली.

मी ते ‘३९२’ चे स्टेन्सिल माझ्या काउंटरच्या मागे एका फ्रेममध्ये ठेवले. त्याखाली लिहिले :

” तुमचे / जीवलगांचे व्यसनमुक्त दिवस गोंदवून घ्या – मोफत. आकडा कितीही लहान असो वा मोठा असो. कोणताही आकडा. कारण तुमचा प्रयत्न महत्त्वाचा असतो, प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. “

… खरं सांगू, मला अजिबात वाटले नव्हते की कोणी या फोटोकडे गंभीरपणे लक्ष देईल.

एका महिलेने तिच्या मुलीच्या सलग ३९२ दिवस व्यसनमुक्त राहण्याची आठवण म्हणून हातावर ३९२ आकडा गोंदवून घेतला होता. तिच्या विनंतीवरून, कोणाला आपल्या / जीवलगांच्या व्यसनमुक्त राहण्याचे आकडे गोंदवून घ्यायचे असले तर ते मी मोफत गोंदवून देईन असा बोर्ड मी माझ्या टॅटू स्टुडिओमध्ये लावला.

– – – आणि तीन दिवसांनी, एक माणूस आत आला. त्याला तो बोर्ड दिसला. तो हमसून हमसून रडू लागला. मला समजेच ना तो का रडत आहे ते…

” तो बोर्ड – तुम्ही १, २७९ गोंदवून देऊ शकाल का? “.. त्याने मला विचारले.

” नक्कीच. कोणासाठी?”

” माझा सख्खा भाऊ. त्याला दारूचे व्यसन होते. पण त्याने शपथ घेतली होती, त्याने निर्धाराने दारू सोडली होती. सलग १, २७९ दिवस – जवळजवळ चार वर्षे त्याने दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. दारू सोडलेल्या माझ्या भावाला, एका दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने उडवले. माझ्या भावाने तिथेच प्राण सोडले. “

… मी मोफत टॅटू काढला. मला मिठी मारून तो ढसाढसा रडला.

– – – बातमी पसरली. इंस्टाग्राम, टिकटॉक, यु ट्यूब, लोकांनी या गोंदवण्याला अमाप प्रसिद्धी दिली.

प्रत्येकाचे वेगळे आकडे, प्रत्येकाची वेगळी कहाणी. ४७ दिवस. ६ दिवस. १, ८२३ दिवस. २ दिवस.

एका महिलेने “१४ तास” टॅटू काढला.

“१४ तास ?” मी आश्चर्याने विचारलं.

“ड्रग्सच्या ओव्हरडोसने मृत्यू होण्यापूर्वी माझ्या मुलाने सलग १४ तास ड्रग्स घेतली नव्हती. प्रत्येकजण म्हणतो की १४ तास हा काही मोठा कालावधी नाही. पण ते खरं नाही. त्याने प्रयत्न केला. १४ तास त्याने प्रयत्न केला. “…

… मी तिच्या खांद्यावर १४ तास टॅटू काढला. ती संपूर्ण वेळ रडत राहिली. काम संपवल्यावर, तिने टॅटू पहिला आणि कुजबुजली, “आता सगळ्या जगाला कळेल की त्याने प्रयत्न केला, त्याने प्रामाणिक प्रयत्न केला. “

काल कोणीतरी आले आणि म्हणाले “शून्य दिवस गोंदवता येईल का ?”

मी चक्रावलो.

“शून्य?”

त्याने होकार दिला.

… “ माझी मुलगी कधीच पूर्णतः व्यसनमुक्त झाली नाही. पण तिने अनेक वेळा ड्रग्स सोडण्याचा मन:पूर्वक प्रयत्न केला. चार वेळा ती व्यसनमुक्ती केंद्रात दाखलही झाली होती. पण तिला ते जमलं नाही. अवघ्या २३ व्या वर्षी तिचे निधन झाले. सगळे म्हणतात की तिने प्रयत्न केले नाहीत. पण तिने केले. तिने खूप प्रयत्न केले. लाखो प्रयत्न. अनंत प्रयत्न. त्या शून्य संख्येखाली एक छोटं इन्फिनिटी (अनंत) “” चिन्ह गोंदवू शकता का? कारण जरी लोकांना दाखवण्यासाठी तिच्याकडे व्यसनमुक्त दिवस नव्हते तरी तिचे प्रयत्न अनंत होते. “

… एरवी मी टॅटू काढायचो, आणि गोंदवून घेणारा रडायचा. आज तो टॅटू गोंदवताना मी रडलो. अनंत चिन्हासह शून्य…. अशा मुलीसाठी जी यशस्वी झाली नाही, पण जिने कधीही प्रयत्न करणे थांबवले नाहीत.

दोन दिवसांपूर्वी एक सतरा वर्षांची मुलगी आली – तिच्या वडिलांसोबत.

“ तुम्ही ९१ दिवस करू शकता का? माझ्यासाठी. मी ९१ दिवस ड्रग्स घेतली नाहीयेत. मला हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या वेळी जेव्हा मला ड्रग्स घ्यावीशी वाटतील तेव्हा मी हा टॅटू पाहीन. मी ९१ पर्यंत पोहोचले होते, मग मी ९२ पर्यंतही पोहोचू शकते याचं भान ठेवण्यासाठी. “

… टॅटू काढून झाल्यावर तिच्या वडिलांनी माझे हात हातात धरले. ” तुझ्या शाईने तू लोकांचे जीव वाचवत आहेस, त्यांना निर्व्यसनी राहण्यास प्रेरणा देत आहेस. “

– – ती मुलगी दर ३० दिवसांनी परत येते. मी तिच्या ९१ आकड्याच्या पुढे एक लहान टॅली मार्क जोडतो. ती आता १५१ दिवसांपर्यंत पोहोचली आहे.

– – – 

मी हे व्यसनमुक्तीचे टॅटू काढू लागलो त्याला वर्ष होऊन गेलं होतं. जिच्यामुळे या उपक्रमाला सुरुवात झाली, ती ३९२ टॅटूवाली आई काल परत आली.

… ” मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे होते, ” ती म्हणाली. तिने तिचे मनगट दाखवले, त्यावर मी गोंदवलेला ३९२ होता. त्याच्यावर एक नवा नंबर गोंदवला होता, “१. ” फक्त नंबर १.

मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.

ती अश्रू ढाळत हसली.

” माझी मुलगी वारली, त्याला एक वर्ष झाले. एक वर्ष मी तिच्याशिवाय जगले आहे. मला कोणीतरी सांगितले की मी आता माझ्या स्वतःसाठी टॅटू काढावा. लेकीच्या मृत्यूचं हलाहल मी वर्षभर पचवलं त्याची आठवण म्हणून. “

… ती गेली. मी समोरच्या भिंतीकडे पहात राहिलो. व्यसनमुक्तीच्या आकड्यांचे टॅटू – ० पासून, १४ तासांपासून ते ६, २४७ दिवसांपर्यंतचे आकडे… प्रत्येक आकडा अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याने प्रयत्न केला. त्यांच्या लढाईची कहाणी आहे. प्रत्येक आकडा महत्त्वाचा आहे. ज्याने व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठीही आणि त्यांच्या जीवलगांसाठीही.

… आणि ते व्यसनमुक्त दिवस, ते प्रयत्न, तो निर्धार – लक्षात ठेवण्यास पात्र आहेत. चिन्हांकित…. सन्मानित….

मी हे सुरू केले कारण एका दुःखी आईने मला तिच्या मुलीची ३९२ दिवसांची झुंज लक्षात ठेवण्यास सांगितले. आता मला असे शेकडो दिवस आठवत आहेत – अशा शेकडो झुंजी माझ्या मनावर गोंदवल्या गेल्या आहेत. प्रत्येक आकडा मला एकच गोष्ट सांगतो : प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. लढणे महत्त्वाचे आहे. जरी तुम्ही हरलात तरी लढा महत्त्वाचा आहे. फक्त तुमच्यासाठीच नव्हे, तुमच्या जीवलगांसाठीही.

… आणि हा सगळा प्रवास आठवताना, मी स्वतः काय करायला पाहिजे हे अचानक मला लख्ख लक्षात आलं. मी माझ्या गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं, ती आल्यावर तिला म्हटलं, ” मी एक स्पेशल टॅटू काढतोय, आणि तो काढताना मला तू साक्षीदार हवी आहेस. “

… मी माझ्याच हातावर गोंदवून घ्यायला सुरुवात केली – “१”. तिने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

“ सिगारेट फुंकणे हेही व्यसन आहे. आजपासून मी सिगरेट सोडली. आणि आजच्या दिवसाची आठवण म्हणून हा टॅटू. “

तिच्या डोळ्यातील अश्रू मला दाद देत होते…

… ३९२ ने सुरू झालेला प्रवास एका आणखी महत्वाच्या टप्प्यावर पोचला होता.

(मेलिसा मॅककिनी यांच्या फेसबुक वॉलवरील कथेचा स्वैर अनुवाद)

अनुवादक / लेखक : मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवळाबाहेरचे देव… — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ देवळाबाहेरचे देव…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(‘दुर्गे दुर्घट भारी.. तुजवीण संसारी…

टाळ, झान्जा जोरात खणखणायला लागल्या. त्याच्यात लोकांनी जोरात टाळ्या वाजवून आरती म्हणायला सुरवात केली.) इथून पुढे – – 

रेवतीच्या बाजूला मिसेस नाडकर्णी आणि त्यान्च्या बाजूला नाडकर्णी टाळ्या वाजवून आरती म्हणत होते…

‘जय देवी जय देवी महिषासुरवादिनी.. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी..

आरती टिपेला पोचली असताना मिसेस नाडकर्णी एकदम ओरडल्या.. ‘

‘अहो काय होतंय.. काय होतय…

रेवतीने पाहिले.. मिसेस नाडकर्णी खाली वाकल्या होत्या आणि खाली पडलेल्या नाडकर्णीना उठवत होत्या. रेवती पण खाली बसली आणि तिने पाहिले.. नाडकर्णी निपचित पडले होते आणि मिसेस नाडकर्णी मोठमोठ्याने ‘आरती थांबवा.. आरती थांबवा’ असे ओरडत होत्या. देवकीच्या लक्षात आले.. नाडकर्णीना जास्त बरे नाही आहे आणि त्याना मेडिकल मदत हवी आहे.. चटकन तिने आपल्या बॅग मधून पाण्याची बाटली काढली आणि पाणी हातावर घेऊन त्याचा फटकारा त्यान्च्या तोंडावर मारला. एक.

दोन.. तीन.. पण नाडकर्णी डोळे उघडत नव्हते.. तोपर्यंत त्यान्च्या आजूबाजूच्या लोकांना पण कळले.. एक माणूस आरती म्हणता म्हणता खाली बेशुद्ध पडला आहे.. पटकन त्यातील दोघे पुढे आले आणि त्यानी नाडकर्णीना उचलले आणि बाहेर घेऊन आले आणि बाहेरच्या बाकावर झोपवले आणि लोकांची गडबड सुरु झाली.. लोक ओरडू लागले तशी देवींची आरती आटोपती घेतली..

काही लोक म्हणू लागले.. देवीचे तीर्थ तोंडात घाला.. ते उठून बसतील. पुजाऱ्याने देवीचे तीर्थ नाडकर्णीच्या तोंडात घातले पण ते तोंडातच जाईना.. मिसेस नाडकर्णी मोठमोठ्याने रडू लागल्या आणि त्याचवेळी रेवतीने आपला मोबाईल बाहेर काढला आणि नवऱ्याला फोन लावला..

‘झाली काय आरती.. मी गाडी आणू का?

‘मधुर.. तू पटकन आत ये.. नाडकर्णी आरती म्हणता म्हणता खाली पडलेत बेशुद्ध.. लवकर ये..

मधुरने ऐकले आणि तो गाडीकडे धावला.. त्याने गाडी देवळाच्या बाहेर लावली आणि आपली डॉक्टरबॅग घेऊन तो धावला. गर्दी करुंन राहिलेल्या भक्त मंडळींना त्याने लांब केले आणि स्टेथो त्यान्च्या छातीला लावला… पटकन त्याने बॅगेतून एक गोळी काढली आणि नाडकर्णीचे तोंड उघडून त्यान्च्या जिभेखाली ठेवली आणि तो त्यान्च्या छातीवर बुक्के मारू लागला.

दोन मिनिटांनी नाडकर्णीनी डोळे उघडले तसा तो म्हणाला” तातडीने आयसीयू मध्ये न्यायला पाहिजे.. कुणीतरी यांना उचला आणि माझ्या गाडीत ठेवा..

पटकन दोन माणसे पुढे आली, त्यानी नाडकर्णीना उचलले आणि मधुरच्या गाडीत नेऊन झोपवले.. रेवती आणि मिसेस नाडकर्णीपण गाडीत बसल्या आणि गाडी चालवता चालवता मधुरने डॉ. भागवत हॉस्पिटलमध्ये फोन लावला आणि आयसीयू मध्ये कॉट ठेवायला सांगितली.

..

भागवत हॉस्पिटलच्या बाहेर ट्रॉली ठेवलेलीच होती.. वार्डबॉय तयारीत होते.. त्यांनी चटकन नाडकर्णीना गाडीतून बाहेर काढले आणि स्ट्रेचरवरुन आयसीयू मध्ये नेले, डॉ. मधुर सोबत होताच.. डॉ. भागवत आत आले, त्यांनी बीपी चेक केल आणि हृदयात तीन इंजेकशन मारली आणि मॉनिटरवर ठेवले. ऑक्सिजन जोडला. आता नाडकर्णी श्वस घेऊ लागले.

‘ओके.. मधुर, आता काळजी नाही, ट्रीटमेंट सुरु आहे.. काळजी नाही.. हे तुझे नातेवाईक की काय? स्वतः गाडीतून आणलंस म्हणून विचारले..

‘नाही डॉ. भागवत, हे माझ्या शेजारील बंगल्यात राहतात. आज माझी पत्नी या नाडकर्णीजोडी बरोबर देवीच्या देवळात गेलेली महाआरतीसाठी. मी त्याना सोडायला म्हणून गेलो होतो आणि आरती होईपर्यंत बाहेर कामत मेडिकलमध्ये थांबलो होतो, बहुतेक आरती चालू असताना नाडकर्णी बेशुद्ध झाले आणि खाली पडले.. आत गडबड उडाली.. मला बायकोचा फोन आला म्हणून मी आत गेलो.. माझ्या लक्षात आले अटॅक आलाय.. माझ्याकडे सोरबिट्रेट गोळी असतेच.. मी पटकन त्यान्च्या जिभेखाली ठेवली आणि छातीवर बुक्के मारले..

‘अरे वा.. त्यामुळेच नाडकर्णी वाचले. कारण या आधीपण त्याना अटॅक येऊन गेलाय, हा काय त्यान्च्या ecg मध्ये स्पष्ट दिसतोय. ब्लड प्रेशर वाढलेले होते.. मला वाटते ही मंडळी देवावर जास्त विश्वास ठेवातात आणि मेडिकल सायन्सवर कमी.

‘होय.. दुर्दैवाने हे मला पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये दिसते.

‘काय असते मधुर, यांचा कधीही न पाहिलेल्या देवावर इतका विश्वास असतो की समज आज तू योगायोगाने देवीच्या देवळाबाहेर होतास ते पण देवीच्या कृपेनें.. असे म्हणून परत देवींची दुप्पट आराधना करत बसतील.

‘पण डॉक्टर.. आपण काय करू शकतो.. वर्षानुवर्षे आपल्या समाजावर झालेले हे संस्कार हे पुसून टाकू शकत नाही ना?

‘नाही हे दुर्दैव आहे.. पण काही वेळा वाईट वाटते.. उदा. ही नाडकर्णी जोडी.. जर कालपासून नाडकर्णीना श्वस घ्यायला त्रास होत असेल.. तर आधी देवीच्या आरतीला जातील की डॉक्टरकडे जातील..

डॉ. भागवत यांचे मॉनिटरवर लक्ष होते..

‘ओके.. मधुर, आता त्त्यांचा Bp स्थिर होतोय, पल्सरेटपण खाली येतोय. पुढे तपासण्या कराव्या लागतील पण त्याला वेळ आहे, आता नाडकर्णी धोक्याच्या बाहेर आहेत.

 डॉ. भागवत बाहेर पडून आपल्या कॅन्सलटिंगरूममध्ये गेले आणि मधुर नाडकर्णीच्या बाजूला बसुन मॉनिटरवर लक्ष ठेवून होता.

डॉ. भागवतनी मिसेस नाडकर्णीना आत बोलावले.. त्यान्च्यासोबत रेवती पण आत गेली.

‘बस रेवती.. तूझ्या आणि मधुरच्या लग्नाला मी आलो होतो, त्यामुळे तुला ओळखले. या मिसेस नाडकर्णी ना.. मिसेस नाडकर्णी, तुमचे मिस्टर आता धोक्याच्या बाहेर आहेत. म्हणजे अजून काही टेस्ट कराव्या लागतील पण त्याला वेळ आहे.. जर टेस्टमध्ये काही सापडले तर पुढील गोष्टी. पण आज ते वाचले कारण डॉ. मधुर ने त्यान्च्या जिभेखाली गोळी ठेवली त्यामुळे. हार्टअटॅकमध्ये सुरवातीची काही मिनिटे महत्वाची असतात. त्यावेळी शांत डोक्याने घरी उपचार केले तर पेशन्ट वाचतो. आज तुमचे मिस्टर वाचले पण त्याना याआधी एक अटॅक येऊन गेलाय आणि त्त्यांचा Bp खूप वाढला होता..

‘हो का? मला..

‘कालपासून त्याना श्वस घयायला त्रास होत होता.. मग तुमच्या शेजारी डॉ. मधुर रहातो त्याला नाही का दाखवायचं? त्याला न दाखवता त्याना देवीच्या देवळात आरतीला घेऊन गेलात? त्या ठिकाणच्या गडबडीने, त्या अगरबत्तीच्या उग्र वासाने त्याना स्वास घेणे अशक्य झाले आणि ते खाली पडले आणि अटॅक पण आला. म्हणजे महत्वाचे काय देव की मेडिकल ट्रीटमेंट?

‘डॉक्टर.. मला एव्हडे सिरीयस असेल असे वाटले नव्हते..

‘त्याना श्वास घयायला जमत नव्हते तरी तुम्हाला वाटले हे फारसे गंभीर नाही. आणि तुम्ही देवीच्या देवळात त्यांना घेऊन गेलात? अशावेळी देवी नाही वाचवत आपल्याला.. तुमचा नवरा वाचला देवळाबाहेरील देवामुळे.

‘देवळाबाहेरचा देव? कोण डॉक्टर? रेवतीने विचारले.

‘देवळाबाहेर असे देव असतात.. ते धावतात अडचणीप्रसंगी. आजच्या प्रसंगात डॉ. मधुर होता देवळाबाहेरचा देव.

‘खरेच डॉ. आज डॉ. मधुर आजूबाजूला नसते तर..

‘मिसेस नाडकर्णी, असे देवळाबाहेरचे देव असतात. ते समाजासाठी झटत असतात. पण आपले दुर्दैव, आशा देवांना समाजाचा आणि लोकांचा पाठिंबा मिळतं नाही. त्यामुळे त्त्यांची शक्ती अपुरी पडते. मोठमोठे उद्योगपती आणि समाजातील बहुतेक मंडळी देवळाना देणग्या देतात, सोने देतात.. त्या पैशाचे काय होते कोण जाणे? कोट्यावधीचे सोने मंदिरात, मशीदीत पडून आहे. अनेक मालमत्ता नावे आहेत.. बहुतेक ठिकाणी त्त्यांचा वापर होत नाही.

‘पण देवळाबाहेरचे देव कोण?

‘आहेत.. अशा देवांना समाजाचा पाठिंबा हवा असतो, मग ते अजून बरेच काही करतील. असे आपल्या राज्यात बाबा आमटे होते, डॉ. अनिल अवचट होते.. डॉ. बाबा आढाव होते.. डॉ. अभय बंग आहेत.. दिनदुबल्या, अपंग लोकांसाठी धडपडले, पण त्त्यांची शक्ती कमी पडली.

‘मग आम्ही काय करावे डॉक्टर?

‘आपण सामान्य माणसे, अशी माणसे दिसतील त्याना मदत करणे.. आम्ही डॉक्टरमंडळी पण अशा उपक्रमाना पाठिंबा देत असतो.. आर्थिक आणि शारीरिक.. मी वर्षातील दहा दिवस डॉ. प्रकाश आमटे यांच्या हॉस्पिटलमध्ये फुकट सेवा देतो.. त्याने मला समाधान मिळते.

एव्हड्यात डॉ. मधुर आत आला..

‘डॉक्टर.. नाडकर्णी शुद्धीत आलेत..

डॉक्टर हसून म्हणाले.. ‘पाहिलेत मिसेस नाडकर्णी.. आपला दवाखाना कधीही बंद न ठेवणारा हा डॉ. मधुर आज आपल्या रोजच्या पेशन्टकडे दुर्लक्ष करून नाडकर्णी यांचा जीव वाचावा म्हणून धडपडतोय, यालाच म्हणतात ‘देवळाबाहेरचा देव…

अशी माणसे समाजात असतात, आपण त्याना ओळखायला हवे.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवळाबाहेरचे देव… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ देवळाबाहेरचे देव…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

रेवती आंघोळ करून तयार होत होती. तिचा नवरा डॉ. मधुर नाश्ता करत होता, त्याला रेवती म्हणाली..

‘मधुर, माझ्यासाठी आज एक काम कर..

‘काय?

‘बारा वाजता देवीच्या देवळात महाआरती असते, तू आता दवाखान्यात गेलास की साडेअकराला घरी ये आणि मला देवळात सोड..

‘अग पण मला कस जमेल?

‘जमेल.. बाकी पुरुष बघ आपल्या बायकोला घेऊन सायंकाळी फिरायला जातात, हॉटेलात जातात, मॉलमध्ये जातात आणि देवळात पण जातात, तू माझ्याबरोबर कुठे येतोस का?

“अग त्त्यांचे आणि माझे प्रोफेशन वेगळे आहे, मला सायंकाळी दवाखान्यात जायचे असते आणि..

‘आणि नाही बाणी नाही.. पुढचे सर्व मला माहित आहे.. तुला देवळात यायची फारशी इच्छा नसते.. मग आत येऊ नको ना.. मला आरतीला सोड आणि फक्त अर्ध्या तासाने घरी आण. एकदिवस पेशन्ट थोडी वाट बघतील..

‘अग पण.. तुला सोडायला जायला इथून वीस मिनिटे, परत घरी सोडायचे, म्हणजे मला अर्धा तास बाहेर वाट पहात राहायला हवी..

‘मग तू आत का येत नाहीस आरतीला? तेव्हडेच पुण्य…

‘प्रत्येकाची पुण्य मिळविण्याची कल्पना वेगवेगळी असते. तुला देवींची ओटी भरून, आरती करून पुण्य मिळते असे वाटते, मला तसे नाही वाटतं. मला माझ्या पेशन्टना रोगमुक्त करण्याने त्त्यांचे आशीर्वाद महत्वाचे वाटतात..

‘ठीक आहे.. तू येतोस की नाही साडेअकराला ते बोल…

‘मी येईन पण बाहेर बसेन तुझी वाट बघत.. त्या निमित्ताने तो परिसर पहाणे होईल आणि कोणी ओळखीचे भेटले तर..

‘गप्पा? बरोबर..

‘अग गप्पा पण मारायला हव्यात, त्यामुळे समाज कळतो, लोकांना सध्याच्या परिस्थितीबंद्दल काय वाटते हे कळते.. एक भारतीय नागरिक म्हणून लोकांचा आरसा पण पहायला हवा..

‘तू आरसा बघ किंवा आणि काय बघ.. मी साडेअकराला तुझी वाट पहात आहे..

‘ठीक.. मी येतो अकराला..

 डॉ. मधुरने स्कुटर स्टार्ट केली आणि तो दवाखान्यात गेला.

मधुर दवाखान्यात पोचला. आज कोणता तरी सण होता त्यामुळे नेहमीसारखी गर्दी नव्हती. त्याने एप्रन अंगात चढवीला आणि पेशन्ट तपासायला सुरवात केली. अधूनमधून त्याचे लक्ष हातातील घड्याळाकडे जात होते.. साडेअकराला रेवतीला घरी येतो म्हणून सांगितले आहे.. तसे रेवतीला पण फारसे बाहेर जात येत नाही.. एकतर आपले घर शहरापासून लांब आहे आणि दुसरे म्हणजे आपली आई आपल्यासोबत असते.. सध्या ती बहिणीकडे गेली आहे म्हणून नाहीतर तिला एकटीला घरी सोडून रेवती कुठे जात नाही.

सव्वाअकराला डॉ. मधुर बाहेर पडला.. जाताजाता तो मंदाला म्हणाला..

‘मंदा.. मी रेवतीला घेऊन देवीच्या देवळात जातोय.. एक पर्यत येतो.. पेशन्टना सांग डॉक्टर एकनंतर येतील.

आपले साहेब आज बायकोला घेऊन देवळात जात आहेत हे ऐकून मंदाला आश्यर्यच वाटले.

पण काही न बोलता तिने मान हलवली.

मधुर घरी पोचला. त्याने स्कुटर घराबाहेर लावली आणि मोठी चारचाकी बाहेर काढली.. एकतर देवीचे मंदिर सहा किलोमीटरवर होते आणि दुपारचे ऊन होते.. त्याने हॉर्न वाजवताच देवीसाठी ओटी घेऊन रेवती बाहेर पडली, तिने घराला कुलूप केले आणि ती गाडीत बसली.

‘किती दिवसापासून माझ्या मनात होते.. देवींची ओटी भरायची आणि महाआरतीला पण हजर राहायचे.. पण जमतच नव्हते.. माझी आई रोज फोनवर विचारत असते.. देवींची ओटी भरलीस का म्हणून.. पण वेळ यावी लागते म्हणतात ना..

‘आज योग्य वेळ आली काय?

‘अरे, ते बाजूच्या बंगल्यातील नाडकर्णी आहेत ना.. त्या नाडकर्णीना हल्ली बरे नसते.. म्हणून सावित्रीबाई म्हणजे मिसेस नाडकर्णीना देवीला गाऱ्हाणे घालायचे आहे आपल्या नवऱ्याच्या तब्येतीसाठी..

‘बरं मग?

‘आज त्या आपल्या नवऱ्याला घेऊन देवीच्या देवळात जायच्या होत्या.. म्हणजे सकाळीच गेल्या पण त्या.. त्यानी मला विचारले तुम्ही आज देवळात याल का? म्हणजे काय होत.. देवीच्या देवळात जाताना रिक्षा मिळते पण येताना काही वाहन मिळतं नाही, म्हणून त्या म्हणाल्या.. तुम्ही आणि डॉ. मधुर जर आज देवीच्या दर्शनाला आलात तर येताना गाडीची सोय होईल..

डॉ. मधुर हसत म्हणाला. , ‘असं काय? म्हणजे तुम्हाला आज घरचा ड्रायव्हर हवा होता तर..

‘तस नाही रे… मला पण देवीची ओटी भरायचीच होती.. लग्नाला चार वर्षे झाली आणि अजून…

‘त्या करिता डॉ. दीक्षित यांची ट्रीटमेंट सुरु आहे ना.. आणि मध्येच देवी..

‘असुदे.. माझा आहे विश्वास..

मधुरने देवीच्या देवळाजवळ गाडी उभी केली, रेवती त्यातून उतरली आणि देवळाच्या दिशेने चालू लागली, मधुरने गाडी कामत मेडिकलच्या दिशेने वळवली. अशोक कामत त्याचा कॉलेजमधील मित्र, त्याचे या भागात मेडिकल होते.. अशोकने दुकानात येणाऱ्या मधुरकडे पाहिले आणि तो ओरडला..

‘अरे मध्या.. आज दवाखाना बंद ठेवून इकडेकुठे?

‘आली आज मित्राची आठवण.. तुला कुठे येते माझी आठवण?

‘अरे बाबा रोज येते.. तुझे पेशंट या भागात पण आहेत, ते दुकानात येतात तू लिहून दिलेली औषधे घ्यायला.. पण तू या वेळी.. आणि ते पण पेशन्टना सोडून?

‘अरे आज रेवतीला देवीच्या महाआरतीला यायचं होत.. तिला सांगत होतो रिक्षाने जा.. पण तिचे म्हणणे दुपारी या भागात रिक्षा मिळतं नाहीत.. त्यामुळे आज थोडावेळ दवाखान्यातून वेळ काढला आणि तिला इकडे घेऊन आलो..

‘बर.. म्हणजे वहिनी देवळात आणि तू बाहेर..?

‘ज्याला जिथे आवडत तिथे त्याने जावे.. तिला देवळात जायला आवडते मला माणसात मिसळायला आवडते.. तूझ्या दुकानात दहा मिनिटे बसले तर दिल्ली पासून गल्लीपर्यतच्या बातम्या आणि माणसे भेटतात..

‘ये ये.. बर वाटल.. असं म्हणूं कामतने खुर्ची पुढे केली आणि टाळी वाजवून चहाची ऑर्डर दिली

रेवती देवळात गेली.. अजून फार गर्दी नव्हती, तुरळक माणसे होती, आरतीच्या वेळी देऊळ आणि परिसर भरून जायचा. रेवती देवीची ओटी भरायला म्हणून आत आली तेंव्हा तिला नाडकर्णी जोडी दिसली.. दोघे डोळे मिटून देवीचे स्तोत्र म्हणत असावी बहुतेक. रेवतीने देवीची ओटी भरली, पुजाऱ्याने तिला तीर्थ आणि प्रसाद दिला.. तो घेऊन ती मिसेस नाडकर्णीच्या बाजूला बसली.. मिसेस नाडकर्णी तिला बघून हसल्या..

 ‘एकटीच आलीस, डॉक्टर नाही आले काय?

‘आले आहेत, मला दारात सोडल त्यांनी आणि त्त्यांचा मित्र आहे ना कामत केमिस्ट त्याच्यकडे गेलेत..

‘मग आत आले नाहीत ते? ही डॉक्टरमंडळीना बहुदा नास्तिक असतात..

‘मधुरला नास्तिक नाही म्हणता येणार.. तो लहानपणापासून आंघोळ केल्यावर अथर्वशीर्ष म्हणतोच.. सकाळी बाहेर पडताना घरच्या देवांना नमस्कार करतो.. पण मग मात्र कुठल्या देवळात जात नाही की कसला उपास करत नाही. पण त्याचा मला विरोध नसतो. मी उपास करते त्याला तो कधीच काही म्हणत नाही उलट मेडिकल सायन्सच्या दृष्टीने उपास चांगला पण उपासाला साबूतांदूळ किंवा बटाटे खाणे योग्य नसते असे त्याचे म्हणणे.

‘आरती बारा वाजता सुरु होईल.. डॉक्टर बाहेर आहेत ना? इथे रिक्षा मिळतं नाहीत म्हणून विचारले?

‘तो कामतकडे आहे.. आरती झाली की मिसकॉल दे म्हणाला.. मग आपण जाऊ. मिस्टरांची तब्येत कशी आहे?

‘नरमच आहे.. आज देवीचा प्रसाद घेतला की बरे वाटेल..

‘अहो पण ट्रीटमेंट घयायला नको का? अंगावर काढू नका..

‘जाऊ दोन दिवसांनी.. माझा या देवीवर विश्वास आहे. तिचे चमत्कार ऐकलेत मी..

‘ते असुदे.. पण उद्याच त्याना चांगल्या डॉक्टरकडे न्या. मी मधुरला सांगते, तो तुम्हाला चांगला डॉक्टर सुचविल.

एव्हड्यात देवळातील घंटा मोठमोठ्याने वाजायला लागल्या.. मोठी आरती पेटवली गेली आणि झपझप माणसे आरतीसाठी जमा झाली.

आरतीसाठी भक्तमंडळी जमली.. टाळ मृदंग वाजू लागले, लोकांनी टाळ्या वाजून आरती म्हणायला सुरवात केली..

‘दुर्गे दुर्घट भारी.. तुजवीण संसारी…

टाळ, झान्जा जोरात खणखणायला लागल्या. त्याच्यात लोकांनी जोरात टाळ्या वाजवून आरती म्हणायला सुरवात केली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मुखवटे — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्यावर बरोबर कार नेली. एका सोसायटीमध्ये रो हाऊसच्या रांगेत एका बंगल्यासमोर कार उभी राहिली. बाहेरची पाटी मात्र सांगत होती, हे कोणा कर्नल पाटणकर यांचे घर आहे. श्री व सौ पाटणकर.)

इथून पुढे – – 

भार्गवने पुढे होऊन बेल वाजवली. बऱ्याच वेळाने एका मध्यमवयीन बाईनी दार उघडलं. नीटनेटक्या. अंगावर भारी साडी आणि उत्तम रहाणीमान असलेल्या बाईनी दार उघडलं.

“कोण हवंय आपल्याला? मृदु स्वरात त्यांनी विचारलं. भार्गव म्हणाला मकरंद साने इथेच रहातात ना? पत्ता हाच दिलायआम्हाला. ’

हो हो. या ना आत या. ”बाईनी दोघांना घरात घेतलं. हॉलमध्ये बसवलं.

“कोण आलंय ग ममा? ”विचारत आतून पूर्ण दिवस भरत आले असावेत अशी मुलगी बाहेर आली. तिने ढगळ गाऊन घातला होता. साधीसुधी दिसायला अगदीच बेताची पण सरळ वाटणारी मुलगी त्यांना म्हणाली या ना. कोण आपण? ”

भावना चमकलीच तिला बघून”. तुम्ही लीना साने का? मकरंद ची मिसेस? आम्ही त्याच्या पुण्याच्या ऑफिसचे सहकारी. मी भावना वझे आणि हे भार्गव परचुरे”लीनाच्या आईने त्यांना पाणी दिलं.

“ मकरंद जरा बाहेर गेलाय. येईलच इतक्यात. लीनाचे रिपोर्ट्स आणायला गेलाय तो.

फार काळजी घेतो हो तो आमच्या लीनाची. मी आई लीनाची. हा बंगला आमचाच आहे. लीनाचे कर्नल बाबा आता हयात नाहीत. लीना आमची एकुलती एक मुलगी. मकरंदशी लीनाने प्रेमविवाह ठरवला.

मकरंद अनाथ होता गरीबच होता. लीनाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं पण लेकीचा हट्ट.!

मग मकरंद घरजावई म्हणून इथे आला. लीना त्याच्या त्या चाळीतल्या एका खोलीत कशी राहू शकली असती? पण मुलगा चांगला आहे हो. ” ममा भडाभडा बोलत सांगत होत्या.

आता लीना म्हणाली, ”कधी बोलला नाही मकरंद मला, की इतकी सुंदर मुलगी त्याची कलिग आहे ते. ”

भावना संकोचून हसली.

लीना म्हणाली “मकरंदचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे. मला काही जरी झालं तरी तोच आधी कासावीस होतो. आत्ता सुद्धा स्वतः रिपोर्टस् आणायला गेलाय. म्हणूनच तर रजा घेतलीय त्यानं. फक्त माझ्यासाठी.

“मग लीना, तू कधी नोकरी नाही केलीस का? भावनाने विचारलं.

“ करत होते मी. पण मकरंदला मी नोकरी केलेली आवडत नाही. ‘तू घरी बस. मला बायकांनी बाहेर नोकऱ्या केलेल्या आवडत नाहीत. मी मिळवतोय ना भरपूर? ’ असं म्हणतो तो. ”अभिमानाने लीना म्हणाली.

भार्गव आणि भावनाने नकळत एकमेकांकडे बघितलं.

“ हाच मकरंद ऑफिसमध्ये तावातावाने वाद घालायचा. ‘घरी बायका नुसत्या बसतातच कशा? आपल्या शिक्षणाचा उपयोग नको का करायला? कसल्या या मुली हो. ’.. भावना, मला तुझं फार कौतुक वाटतं हं. आमच्या बरोबरीने पगार मिळवतेस तू. मला नवऱ्याच्या जिवावर आयते बसून खाणाऱ्या बायका अजिबात आवडत नाहीत. ”, मकरंदची सगळी वक्तव्ये आठवली भावनाला.

इथे लीना सांगत होती, मकरंदला तिने नोकरी केलेली आवडत नाही. तेवढ्यात मकरंद आला. त्याला बघूनही आश्चर्य वाटलं भावनाला.

ऑफिसमध्ये टिपटॉप असणारा मकरंद आत्ता गबाळ्या म्हणाव्या अशाच टी शर्ट पँट मध्ये होता.

“ममा, लीनाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हो. काळजीचे काहीच कारण नाही. मी डॉक्टरांना भेटून आलो. कारमध्ये पेट्रोल भरलं. आणखी काही आणायचं असलं तर यादी द्या. संध्याकाळी आणतो. ”

“मकरंद उरलेले पैसे ममाकडे दे”. लीना म्हणाली. रिपोर्ट्स आणि पैसे मकरंदने ममांच्या हातात ठेवले.

इतक्यात त्याचं लक्ष समोर सोफ्यावर बसलेल्या भार्गव आणि भावनाकडे गेलं. मकरंद दचकून उभाच राहिला.

… अत्यन्त खऱ्याखुऱ्या आश्चर्याने त्याने विचारलं “तुम्ही इथं कसे? ” त्याला शॉकच बसलेला दिसत होता. आता भार्गव म्हणाला,

“अरे. माझं आपल्या हेड ऑफिस मध्ये काम होतं. तू अशी मधेच अचानक का रजा घेतलीस काहीच समजलं नाही. तर म्हटलं भावनाला, चल भेटून येऊया मकरंदला. ”प्रांजलपणे भार्गव म्हणाला.

ममा म्हणाल्या “अहो. आता मकरंदला कसं जमेल ऑफिसला पुण्याला यायला? लाडक्या बायकोची डिलीव्हरी जवळ आली आता. मी तर म्हणते दे सोडून नोकरी” ममा म्हणाल्या. “काही गरज नाहीये त्याला नोकरीची. माझं ते सगळं लीनाचंच तर आहे. म्हणजे मकरंदचंच. अर्थात माझ्या पश्चात हं.. आत्ता नाही. ”

त्या घरात मकरंदची काय किंमत होती हे दिसलंच की मगाशी. लीनाने उरलेले पैसेही ममाना दे असं फर्मावलं तेव्हाच.

मकरंद घरजावई झाला होता. केवळ याच्या रूपावर भाळून लीनाने याच्याशी लग्न केलेलं दिसलं आणि मग ती म्हणेल, सासू म्हणेल तसं जगणं मकरंदने निमूट स्वीकारलेलं दिसलं भार्गवला आणि भावनाला.

एका नोकराने सगळ्याना चहा आणून दिला. मकरंदची अवस्था अत्यंत अवघड झालेली होती.

भावनाला त्याने सांगितलं होतं, “ माझी बायको दुर्मुखलेली आहे आमचं पटत नाही. मी घटस्फोट घेणार आहे. ”

… आणि आता प्रत्यक्ष चित्र वेगळंच दिसत होतं. चक्क दिवस गेलेले दिसत होते त्याच्या बायकोला.

म्हणे आमचा वर्षानुवर्षे संबंध येत नाही.

माय लेकींनी मकरंदचे अगदी पायपुसणे करून टाकलेले दिसले भावनाला. किती अपराध्यासारखं जिणं जगत होता मकरंद.

चहा संपवून भावना आणि भार्गव जायला निघाले.

“कळव ग लीना बाळ झालं की. ”… मकरंदकडे मुद्दाम बघत भावना खोचून म्हणाली.

“हो तर. येईलच की मकरंद पेढे घेऊन ऑफिसला. ” ममा म्हणाल्या. “ पण मला नाही वाटत तो नोकरी करील. नाही का ग लीना? ”

मकरंद गप्प उभा होता.

“बरंय मकरंद. छान वाटलं तुम्हाला भेटून. ”भार्गव म्हणाला.

त्यांना निरोप द्यायलासुद्धा मकरंद बाहेर आला नाही.

कार मध्ये बसल्यावर भावना आणि भार्गव निःशब्द होते.

भार्गवला मकरंदची दया आली

न राहवून तो भावनाला म्हणाला, ”काय ग हे. इतका चांगला मुलगा पण घरजावई होऊन सगळं गमावून बसलाय. किती सामान्य आहे ग ती लीना. दिसायला याच्या जवळपास तरी आहे का? मूर्ख आहे मकरंद. ”भावना काहीच बोलली नाही. येतानाचा तिचा उत्साह ओहोटीला लागला आता. अचानक भावनाला हसू आलं. ”भार्गव. किती रे गाढव असेन मी. पण मला आता सुटल्या सारखं का वाटतंय? म्हणजे मी खरी गुंतले नव्हतेच रे या मकरंदमध्ये.. ”

भार्गव म्हणाला”भावना, सहाजिकच आहे तुला हा शॉक बसणं. नशीब समज, थोडक्यात बचावलीस तू.

नाहीतर फसलीच असतीस या उनाड माणसाच्या जाळ्यात.

भावना म्हणाली” हो रे भार्गव. किती विश्वास ठेवला मी याच्यावर. काय वाटेल ते सांगत होता आपल्या बायकोबद्दल. प्रत्यक्ष तर ताटाखालचे मांजर आणि गुलाम झालाय त्या चढेल मायलेकींचा. बरं झालं मला तुझ्याबरोबर यायची बुद्धी झाली. म्हणे मी डिव्होर्स घेणार आहे. तोंड बघा. सोकावलाय तिथे रहायला. मग देतोय किंमत त्याची. त्या मायलेकींचा दास होऊन. हा कसला घेतोय डिव्होर्स. ”. भावना म्हणाली.

“भार्गव, मला पश्चाताप होतोय. अशी कशी मी याच्यात अडकले रे? तू परोपरीने सांगूनही माझा तुझ्यावर विश्वास बसला नाही. माझ्यावर विश्वास ठेवशील? मी त्याला मला आजपर्यंत हातसुद्धा लावू दिला नाहीये. बायकांना एक इनर सेन्स असतो, तो सावध करत होता मला, असं म्हण हवं तर. मला माफ कर भार्गव. ”खऱ्या खुऱ्या प्रांजलपणे भावना म्हणाली.

कार फूड मॉलला थांबली. ड्रायव्हर चहा प्यायला उतरला”. भावना चल कॉफी घेऊया मस्त पैकी”. भार्गव म्हणाला. भावना कॉफी टेबल जवळ बसली.

एक मिनिट. आलोच. तू ऑर्डर दे कॉफीची. भावना कॉफीची ऑर्डर देऊन आली.

भार्गव हातात गुलाबाच्या फुलांचा मोठा गुच्छ घेऊन आला. भर मॉल मध्ये गुडघ्यावर बसून तिच्या हातात तो गुच्छ देऊन म्हणाला will you marry me? ”

भावना लाजून लाल झाली. मॉल मध्ये एकच हशा उसळला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या.

भावना म्हणाली yes dear. i will, i will. ”

भावनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एक वृद्ध पारशी बाई म्हणाल्या “डिकरी लकी हायेस बाय. चांगला पोऱ्या आहे हा. बेस्ट लक. हो म्हणून टाक.”

लाजलेली भावना गाडीत जाऊन बसली. हसत हसत भार्गव मागून आला आणि म्हणाला”, माझी ऑफर कायम असणार म्हणालो होतो ना? आपलं पहिल्यापासून प्रेम आहे तुझ्यावर.. ”

त्याला घट्ट मिठी मारून भावना म्हणाली सॉरी. सॉरी माझ्या सगळ्या सगळ्या वेडेपणाबद्दल भार्गव. मला माफ कर मी चुकले. तुला ओळखलंच नाही रे मी. ”भार्गवने तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले. चला आता घरी म्हणाला. कार घराच्या दिशेने धावू लागली.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मुखवटे — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

भावनाला या ऑफिस मध्ये नोकरी मिळाल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. इतके दिवस तिला एमबीए असूनही मनासारखी नोकरी मिळत नव्हती. या ऑफिसचे जॉइनिंग लेटर आल्यावर भावना मनापासूम खूषच झाली.

पहिल्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर शेजारच्या क्युबिकल मध्ये बसलेला हसतमुख तरुण हिला बघून बाहेर आला.

हॅलो, मी भार्गव परचुरे. तुमच्या आधी सहा महिने जॉईन झालो. वेलकम टू होरायझन कंपनी.

आपल्याएवढाच असलेला हा हसतमुख तरुण बघून भावनाला हायसं झालं. त्याने सगळ्या स्टाफशी तिची ओळख करून दिली.

हे तुमचं टेबल. त्याने तिला तिचं टेबल दाखवलं आणि तो कामाला निघून गेला.

भावना मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातली मुलगी. चार खोल्यांचा साधासुधा फ्लॅट आणि आईवडील भाऊ आणि ही असं कुटुंब.

भावना दिसायला सुरेख स्मार्ट तर होतीच. जरा महत्त्वाकांक्षी आणि उच्च रहाणीची आवड असलेली सुद्धा.

ऑफिसमध्ये भावना चार महिन्यात रुळून गेलीसुद्धा. तिची आणि भार्गवची चांगली मैत्री झाली.

अचानक ऑफिस मध्ये मुंबईहून बदलून एक स्मार्ट तरतरीत तरुण जॉईन झाला. हॅलो मी मकरंद साने.

त्याने सगळ्याना आपली ओळख करून दिली.

किती स्मार्ट होता मकरंद. किती पॉश कपडे होते त्याचे. त्याच्या परफ्यूमने ऑफिसमध्ये सुंदर गंध दरवळला.

मकरंद पण होता एमबीए. भावनाच्या पलीकडेच त्याचे टेबल होते.

आता टिफिन च्या सुट्टीत भार्गव आणि भावनाबरोबर मकरंद पण त्यांना जॉईन झाला. , मकरंदचं घर मुंबईला होतं. इथे मात्र तो एका मित्राबरोबर रूम शेअर करून रहात होता.

“मी पुण्याला कायम नाही रहाणार रे बाबा. लवकर मुंबईला जातो बघ खटपट करून. माझं स्वतःचं सुंदर घर आहे मुंबईला. मकरंद म्हणायचा.

भार्गवपेक्षा भावना पटकन आकर्षित झाली मकरंदकडे. भार्गव ला टाळून बऱ्याच वेळा ती त्याच्या मोटर सायकलच्या मागे बसून लांब लंचला जाई.

भार्गव हे निमूटपणे बघत होता.

भार्गव एकदा म्हणाला”काय भावना,, काय म्हणतोय नवा मित्र?

 बरेच वेळा दिसतेस हल्ली मकरंद बरोबर. लग्न झालंय बरं का त्याचं.

सांगितलं असेलच तुला ना. ”

“भार्गव, बरीच माहिती आहे रे तुला बाकीच्या जगाची. हो, सांगितलं आहे बरं त्याने. ”भावनाला राग आला भार्गवचा.

भार्गव हसला म्हणाला” हे बघ. ते काहीही असो. माझं प्रेम आहे तुझ्यावर. ते काही कमी होणार नाही. करतेस का लग्न माझ्याशी?

आपलं बाबा सगळं सरळसरळ असतं. मी एकुलता एक आहे.. श्रीमंत नाही पण परिस्थिती मस्त आहे आमची. जबाबदारी नाही काही. बघ. विचार कर”.

भावना म्हणाली “, काही नको. मला नाही लग्न करायचं इतक्यात. ”

भार्गव म्हणाला ओके. पण विचार करशील तेव्हा माझं नाव लक्षात असू दे म्हटलं. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. ”भार्गव हसून तिथून निघून गेला.

भावनाला हसू आलं. तिला भार्गव मनापासून आवडायचा पण आता मकरंदने तिला चांगलीच भूल घातली होती.

त्या दिवशी मकरंद आणि भावना सहज लॉंग ड्राईव्हला गेले.

भावना म्हणाली, काय रे मकरंद, बायको कशी आहे तुझी?

सांगितलं नाहीस मला तिच्याबद्दल काहीही. ”

मकरंदचा चेहरा पडला. ”अग काय सांगायचं, सांगण्या सारखं काहीही नाही ग. अगदी दुर्मुखलेली आणि रडतराव आहे आमची लीना मॅडम. सतत तक्रारी.

मी म्हणून सहन करतोय बरं. पण आमचं अजिबात पटत नाही ग भावना. मला तुझ्यासारखी बायको मिळालीअसती तर किती भाग्यवान ठरलो असतो मी.

मी घटस्फोट घ्यायच्या विचारात आहे. ते सगळं झालं की करशील माझ्याशी लग्न? थांबशील ना माझ्यासाठी? ”मकरंद डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

भावना म्हणाली, ते बघू नंतर. आधी म्हणतोस तसा नक्की घटस्फोट तर घे”. मकरंद म्हणाला, गेले कित्येक वर्षे माझा तिच्याशी शारीरिक संबंध पण आलेला नाही. त्याही बाबतीत सगळा उजेडच आहे लीनाच्या बाबतीत. ” 

मला तुझ्यासारखी रसिक हुशार आनंदी मुलगी हवी होती ग बायको म्हणून. ”मकरंदने सुस्कारा सोडला. भावनाला त्याच्याबद्दल मनापासून वाईट वाटलं. देव तरी कशा विजोड जोड्या जमवतो ना. तिच्या मनात आलं.

त्या दिवशी ती घरी गेली तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

हॉलमध्ये भार्गव खुशाल तिच्या आईवडिलांशी गप्पा मारत होता.

चहा झालेला दिसत होता.

भावना आल्याबरोबर भार्गव म्हणाला “या या. तुमचीच वाट बघत होतो. आई, चहा द्या ना भावनाला. खूप काम असतं हो हल्ली आम्हाला ऑफिस मध्ये. ’ भावना ओरडून म्हणाली, तू इथं आमच्या घरी काय करतो आहेस भार्गव? ”

भावनाचे वडील म्हणाले, भावना ही काय पद्धत ग तुझी बोलायची?

सॉरी म्हण त्यांना आधी.

समोरच्या गुप्तेकाकांना त्यांचे पार्सल द्यायला आले होते हे. सहज आपलं नाव बघितलं आणि मग तुझं नाव घेऊन म्हणाले, हिच्याच ऑफिस मध्ये मी काम करतो.

आम्हीच बोलावलं त्यांना चहाला. ”

भार्गव हसत होता.

भावना अगदी ओशाळून गेली.

सॉरी हं. मला नव्हतं माहीत. ”ती नरमाईने म्हणाली. होतं असं कधीकधी भावना. भार्गव म्हणाला.

चलो बाय. भेटू पुन्हा म्हणत तो निघून गेला.

आई म्हणाली”, किती चांगला मुलगा आहे ग हा. गुप्ते काका आजारी असतात ना, त्याच्या वडिलांचे मित्र आहेत ते. हा मुलगा त्यांची औषधे न चुकता आणून देतो.

त्याला नव्हतं माहीत ग की हे तुझं घर आहे ते. ”

भावनाला अगदी गिल्टीवाटलं. सॉरी हो बाबा. चुकलंच माझं. ”

उद्या मी सॉरी म्हणेन त्याला पुन्हा. ”

त्या नंतर भावनाचे पंधरा दिवस अगदी गडबडीत गेले. वर्क लोड खूप होतं आणि मकरंद दोन आठवडे रजेवर होता. त्याचेही काम भावनालाच बघायला लागलं. हा मकरंद फोनसुद्धा का उचलत नाहीये म्हणून चिडचिड झालीच होती तिची.

त्या दिवशी लंचब्रेक मध्ये भार्गव म्हणाला, मला ऑफिसच्या कामासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईला जावं लागणार आहे आपल्या हेड ऑफिसला.

भावना येतेस का तू पण मुंबईला? टाक की एक दिवस रजा.

माझं काम झालं की मस्त हिंडू. आणि आणखी एक तुला आवडेल असं काम.

ऑफिसमधून मकरंदचा पत्ता घेऊ आणि त्याला सरप्राईज म्हणून भेटून पण येऊ. आवडेल तुला? ”भार्गवने तिला आवर्जून विचारलं.

भावनाला त्याचं मनापासून कौतुक वाटलं. किती सरळ आहे हा मुलगा. माझी मकरंदशी वाढत असलेली मैत्री बघूनही हा जेलस नाही होत.

भार्गव तिला आणखीचआवडायला लागला.

“खरंच की रे भार्गव. जाऊया का आपण? येते मी तुझ्याबरोबर. मस्त आऊटिंग होईल मला बघ. आणि खरंच भेटून येऊ मकरंदला. सरप्राईज देऊ त्याला. ”भावना आनंदाने म्हणाली.

भावनाने त्या दिवशी रजा टाकली.

भार्गवला ऑफिस मुंबईला जाण्यासाठी कार देणार होतं.

मग तर काय.

भावनाला न्यायला भार्गव तिच्या घरी गेला.

भावना तयार होऊन खाली आली. “माय माय. कसली ग वंडरफुल दिसते आहेस तू या ब्लॅक टाईट्स आणि मरून टॉप मध्ये. मार्व्हलस”.

भार्गवने दिलखुलास पावती दिली.

कार मुंबईच्या दिशेने धावू लागली.

वाटेत गप्पा मारताना भावनाच्या लक्षात आलं किती हुशार आणि बहुश्रुत आहे भार्गव. इंग्लिश आणि मराठीही तो अफाट वाचतो. त्याचे जनरल नॉलेज फारच छान आहे.

नकळत तिच्या मनात आलं, मकरंद किती कमी आहे याच्यापुढे.

सिनेमाशिवाय आणि त्यांच्या गॉसिपशिवाय त्याला कशातच इंटरेस्ट नसतो. फक्त छान कपडे हॉटेलिंग आणि खरेदी यापलीकडे जग नाही मकरंदचं.

भार्गवचं ऑफीसचं काम झालं.

त्याने भावनाला एका सुंदर हॉटेल मध्ये नेलं. समुद्रकाठी असलेलं ते सुंदर हॉटेल, नारळाच्या झावळ्यानी बनवलेल्या छोट्या हट्स. आणि सुंदर जेवण. बरोबर असलेला हा उमदा हुशार तरुण. इतका आनंद आपल्याला आजपर्यंत मकरंदच्या सहवासात अनेक वेळा राहूनही मिळाला नाही असं भावनाच्या मनात आलंच. पण तरीही मकरंद ची मोहिनी काही उतरत नव्हती भावनाच्या मनावरून.

“चला. आता जायचं ना मकरंदच्या घरी? मी ऍड्रेस घेतलाय त्याचा. ” भार्गव म्हणाला.

“हो जाऊया. किती आनंद आणि आश्चर्य वाटेल ना त्याला. ’ भावना म्हणाली.

भार्गव म्हणाला “, मला बघून नाही पण तुला बघून मात्र नक्की होईल आनंद त्याला. ” भावना हसली आणि म्हणाली, “ शेवटी पुरुष ते पुरुषच. चला आता मकरंदच्या घरी.”

ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्यावर बरोबर कार नेली. एका सोसायटीमध्ये रो हाऊसच्या रांगेत एका बंगल्यासमोर कार उभी राहिली. बाहेरची पाटी मात्र सांगत होती, हे कोणा कर्नल पाटणकर यांचे घर आहे. श्री व सौ पाटणकर.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुत्तरित प्रश्न… ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ अनुत्तरित प्रश्न… ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या, फेसाळणाऱ्या लाटा पाहत मृणाल निवांत बसली होती. समोरच्या क्षितिजकडेवर मावळणाऱ्या सूर्यदेवांची लाल सोनेरी आभा तरंगत होती. आज कितीतरी वर्षांनी मृणालला तिच्या माहेरच्या व्याडेश्वर दैवताचं दर्शन घडलं होतं. धूप- उदबत्त्यांच्या सुवासात, समयांच्या शांत, मंद प्रकाशात त्या अनादी- अनंतापुढे नतमस्तक होताना तिचे डोळे आपोआप पाझरू लागले होते.

मृणालच्या थोडा बाजूला बसलेला फिरोज, छोट्या झरीनबरोबर वाळूचा किल्ला करण्यात रमून गेला होता. झरीनसारखाच निरागस, आनंदी दिसत होता तो.

‘बरं असतं बाबा या पारशी लोकांचं! मनमोकळी, साधी, स्वच्छ विचारसरणी आणि आयुष्याचा भरभरून आनंद घेण्याची वृत्ती’. मनातल्या या विचारांनी मृणालच्या ओठांवर हसू उमटलं.

‘ फिरोज पारशी. मग आपण कोण? फिरोजशी लग्न केल्याला आता तीस वर्ष होऊन गेली. ही आपली नात झरीन आता चार वर्षांची होईल. हातातल्या वाळूबरोबर गतकाळातल्या अनेक आठवणी मृणालच्या मुठीतून ओघळू लागल्या.

‘गोऱ्या-घाऱ्या, नाकेल्या, सुशिक्षित कुटुंबात आपला जन्म झाला. नऊवारी साडीतली, कपाळावर चंद्रकोर रेखणारी आई अजूनही त्याच रूपात आठवते. बाकी सारी भावंड आई-वडिलांना शोभेशी. आपल्यावर मात्र निसर्गाने अन्याय केला. कसं कोण जाणे, पण नाकावर म्हशीने पाय द्यावा तसं नकट्यापेक्षाही नकटं नाक जन्मतःच आपल्या वाट्याला आलं. श्वास घेण्याची दोन भोकं तेवढी चेहऱ्यावर दिसायची. लहानपणापासून लोकांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि कीव पाहत आपण मोठे झालो. कित्येकदा आईच्या ओच्या- पदराचा तोंड लपवायला आणि मनसोक्त रडायला उपयोग केला. घरात कुणीच आपल्याला दुखावत नसे पण आरसा म्हणजे वैरी झाला होता.

नशिबाने शाळेत चित्रेबाई भेटल्या. त्यांनी आपल्याला खूप समजावलं. वाचनाची गोडी लावली. स्वतःतल्या चांगल्या गुणांकडे बघायला शिकवलं. हळूहळू मनावर दाटलेलं मळभ नाहीसं झालं. समाजात आत्मविश्वासानं वावरता येऊ लागलं. आजूबाजूला आपल्यापेक्षा अधिक व्यंग असलेली माणसं दिसायला लागली आणि दैवदत्त दान शांतपणे स्वीकारण्याचा शहाणपणा आला. स्वभाव आपोआप सहनशील झाला. बी. कॉम. झाल्यावर चांगल्या बँकेत नोकरी लागली, पण लग्नाच्या बाजारात घोडं अडलेलंंच राहिलं. लहान- मोठ्या सगळ्या भावंडांची लग्न झाली. वयानं तिशी ओलांडली. आई- बाबांची खंत आणि आपल्या लग्नाचे प्रयत्न संपत नव्हते.

एक दिवस आपण नेहमीप्रमाणे फिरोजच्या केबिनमध्ये कामासाठी गेलो होतो. हा अविवाहित, सज्जन, पारशी बॉस त्याच्या हसतखेळत काम करण्याच्या वृत्तीमुळे सगळ्यांचा आवडता होता. ‘टेन्शन नई लेवानू. काम थई जसे. ‘ असा त्याचा सर्वांना आश्वस्त करणारा मंत्र होता. आपल्याला बसायला सांगून फिरोजने आपण पुढे केलेलं रजिस्टर बाजूला सारलं आणि म्हणाला, ‘घणा दिवसथी तने एक वात पुछवी हती, पुछूं के? ‘ प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो पटकन म्हणाला, ‘मृणाल, विल यू मॅरी मी? ‘

फिरोजच्या या अनपेक्षित प्रश्नाने आपण एकदम दचकलो. फिरोज म्हणाला, ‘ टेक इट इझी. तू विचार कर. मला घाई नाही. तुझा शांत, समंजस स्वभाव, कामातलं कौशल्य कौतुक करण्यासारखं आहे. तू मला मनापासून आवडली आहेस, म्हणून मी तुला प्रपोज केलं आहे. काही कारणाने तू माझं प्रपोजल नाकारलंस, तरी माझी ही ऑफर मी कुणालाही कळू देणार नाही याबद्दल खात्री बाळग. थिंक इट ओव्हर अँड लेट मी नो, आय विल वेट फॉर युवर रिप्लाय. ‘

अंतर्बाह्य थरथरत आपण फिरोजच्या केबिनमधून बाहेर आलो. या दृष्टीने आपण कधी फिरोजचा विचारच केला नव्हता. मनात प्रचंड उलघाल सुरू झाली. फिरोज सर्वार्थाने चांगला होता, पण… पारशी. मनाचा हिय्या करून आपण ही गोष्ट रेखा आणि अनघाच्या- आपल्या खास मैत्रिणींच्या- कानावर घातली.

‘अरे वा! छान! अभिनंदन! चांगला आहे फिरोज. एक लक्षात घे, तुझ्या घरच्यांसाठी आणि बाकीच्यांसाठी ही शॉकिंग न्यूज असेल. तरी पण तू तुझ्या आयुष्याचा विचार करावा. फिरोजची ऑफर म्हणजे तुझ्यासाठी एक चांगली संधी आहे. तुझं आयुष्य मार्गी लागेल. लग्नानंतर माहेरची माणसं तर तुला दुरावतीलंच पण फिरोजच्या घरीही तुझा स्वीकार व्हायला वेळ लागेल. या साऱ्या परिणामांची मानसिक तयारी ठेव. ‘ रेखाने हे अवघड गणित सोडविण्यासाठी आपल्याला मदतीचा हात दिला.

॓आणि हे बघ लोकं काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नकोस. एक वेगळी घटना म्हणून काही दिवस त्यावर चर्चा होईल मग दुसरी वेगळी बातमी आली की लोक ती बातमी चघळंत बसतील. तुला माहित आहे की मी जॉर्जशी लग्न करायचं ठरवल्यावर सगळ्या नातेवाईकात मित्र मैत्रिणी खळबळ उडाली होती. आमच्या वाडीत राहणारा, लहानपणापासून आमच्याबरोबर खेळणारा जॉर्ज सर्वांना माहीत होता. पण मराठी मुलीचे ख्रिश्चन मुलाशी लग्न ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. माझ्या घरच्यांच्या मला पूर्ण पाठिंबा होता म्हणून सारं निभावलं. कालांतराने बाकीच्यांचा विरोधी मावळत गेला.

‘फिरोजचं प्रपोजल चांगलं आहे. गो अहेड. फक्त तुला घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं लागेल आणि मन घट्ट करावं लागेल. ही पारशी माणसं बाकी उदार, प्रेमळ असली तरी धार्मिक बाबतीत अगदी कर्मठ असतात. त्यांच्या अग्यारीत तुला प्रवेश मिळणार नाही. तसं बघितलं तर आपणही देवळात किती वेळा जातो? आता तुझी तिशी होऊन गेली. एकटीने आयुष्य काढण्यापेक्षा तुलाही तुझं हक्काचं माणूस, घरदार मिळेल. धाकट्या भावाला विश्वासात घे. आम्हाला वाटतं की तू या प्रपोजलचा जरूर विचार करावा. ‘अनघानेही आपल्याला ग्रीन सिग्नल दिला.

मैत्रिणींच्या सल्ल्याने आपल्याला धीर आला. मार्ग सापडला. फिरोजबरोबरच्या रजिस्टर्ड लग्नाला या दोघी मैत्रिणी आणि धाकटा भाऊ हजर होते. आई-बाबांनी नाईलाजाने मूक संमती दिली होती. लग्नानंतर दोन्हीकडचा समाज काही काळ ढवळून निघाला. मग परवेजच्या जन्मानंतर सारं स्थिरस्थावर झालं. परवेजच्या ‘नवजोत’ समारंभाला तर माहेरची खूप माणसं आली होती. सगळ्यांनी त्या समारंभात परवेजच्या टिपिकल पारशी दिसण्याचं आणि आपलं खूप कौतुक केलं. सकाळी अग्यारीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आपण अग्यारीच्या पायऱ्यांवर बसून डोळ्यात दाटलेले ढग अडवून ठेवले होते. संध्याकाळी माहेरच्या प्रेमळ गराड्यात डोळ्यात दाटलेले ढग आनंदाश्रूंमध्ये विरघळून गेले.

झरीनच्या आवाजाने मृणाल तंद्रीतून बाहेर आली. समुद्रावर फिरायला गेलेले परवेज आणि शिरीन परत येताना पाहून झरीन आनंदाने त्यांच्याकडे पळत गेली आणि हात धरून आई-बाबांना किल्ला दाखवायला घेऊन आली. हॉटेल मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परवेज फ्रान्सला गेला होता. तिथे त्याला शिरीन भेटली. लग्न झाल्यावर पाच वर्षांसाठी त्यांनी फ्रान्समध्येच जॉब करायचं ठरवलं आहे. थोडी सुट्टी घेऊन दोघं आली आहेत म्हणून तर हा कोकण ट्रिपचा कार्यक्रम आपण जमवला.

दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला जाताना, दोन्ही बाजूंच्या मागे पळणाऱ्या झाडांसारखं मृणालचं मन मागे पळालं. परवेजच्या जन्मानंतर आपण नोकरी सोडली तरी अनघा, रेखा आणि आपण महिन्यातून एकदा तरी गप्पांची मैफिल जमवतो. अशाच एका मैफलीत बोलता बोलता अनघा म्हणाली, ‘मृणाल तुझ्या मैत्रीचा खरंच अभिमान वाटतो आम्हाला. किती शांतपणे, सहज निभावतेस तू आयुष्यातले सारे प्रसंग! ‘ 

‘अगदी खरं! तुझ्यामुळे आम्हीही थोडं शांतपणे, संयमाने आयुष्यातल्या प्रश्नांकडे बघायला शिकलो आहोत. ‘ रेखाने अनघाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

‘आजचं हॉटेलचं बिल मी द्यायचं आहे का? ‘ या आपल्या मिश्किल प्रश्नावर हास्यलहरी उठल्या. रेखा म्हणाली, ‘ एक छोटसं वादळ आलंय आमच्याकडे. त्याला तुझ्या पद्धतीने तोंड द्यायचं ठरवलंय. आमचा संदेश जर्मनीत राहतो हे तुम्हाला माहित आहे. त्याने त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीशी लग्न करायचं ठरवलं आहे. ही मुलगी आहे भारतीय, पण एका अनाथाश्रमात वाढलेली आहे. अर्थातच आमच्या साने कुटुंबात हे लग्न कुणालाच पसंत नाही.

‘अगं, काळ कितीही पुढे गेला तरी समाजमन बदलायला खूप वेळ लागतो. आपली तरुण पिढी प्रॉमिसिंग आहे. त्यांचं वागणं आणि विचार अगदी प्रॅक्टिकल असतात. भूतकाळात रेंगाळायला त्यांना आवडत नाही. आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि असं वेगळ्या वाटेवरून जाताना त्या मुलांनाही टेन्शन असतं. अशावेळी आई-वडिलांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं की समाजातल्या अर्ध्या लोकांची वायफळ बडबड थांबते आणि मुलांनाही आधार वाटतो. ‘आपण रेखाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

”हो. असाच विचार करून आम्ही दोघांनीही घरच्यांची नाराजी पत्करून संदेशच्या लग्नासाठी जर्मनीला जायचं ठरवलं आहे. ‘

 ॓ ‘॓व्हेरी गुड. अभिनंदन. ‘अनघानेही दुजोरा दिला.॔

॓बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि आज हॉटेलचं बिल मी देणार बरं का! सुनबाईंचे स्वागत म्हणून! रेखा म्हणाली.॔ त्यावर आपण आणि अनघाने हसून दाद दिली.

मुक्कामाचं हॉटेल आलं आणि मृणाल तिच्या आठवणीतून बाहेर आली. हॉटेलमधलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण सर्वांना आवडलं. मनपसंत जेवून गाढ झोपलेल्या मृणालला मोबाईलच्या आवाजाने जाग आली. डोळे उघडून तिनं पाहिलं तर, फिरोज रूमच्या बाल्कनीत असलेल्या छोट्या झोपाळ्यावर बसून ‘टाइम्स’ वाचत होता. फोनवर अनघा होती. अनघाला ॓हॅलो॔ ॔म्हणताना मृणालच्या मनात आलं,  ॓आपल्या कोकण ट्रिपचे फोटो कालच आपण व्हाट्सॲप वर टाकले आहेत.. काय बरं अर्जंट काम असावं अनघाचं?

॓अगं रिटायरमेंटनंतर काहीतरी चांगले कार्यक्रम बघावेत, नवीन ओळखी व्हाव्या म्हणून आत्ता दुपारी मी आमच्या जवळच्या एका नावाजलेल्या महिला मंडळात सभासद होण्यासाठी गेले होते तर त्यांनी माझी मेंबरशिप चक्क नाकारली. कारण माझं आडनाव फर्नांडिस आहे ना, म्हणून! माझ्याबरोबर आलेल्या मैत्रिणीनं त्यांना माझं लव्ह मॅरेज, माझी मराठी कार्यक्रम बघण्याची आवड, मराठी वाचन सारं सांगितलं. त्यांना माझी बाजू पटत होती पण त्यांचे नियम आड येत होते. तू नेहमी म्हणतेस ना की समाजामध्ये आधीच खूप ताणतणाव आहेत. त्यात आपण भर घालू नये. तडजोडीचा मार्ग स्वीकारावा. ते आठवून मी अगदी शांतपणे त्यांच्याशी बोलत होते. नियमाप्रमाणे त्यांचं बरोबर होतं. आणि कालबाह्य नियम बदलायला हवेत हेही त्यांना पटत होतं. मी त्यांना माझ्या माहेरच्या नावानं सभासदत्व दिलं तरी चालेल असे सांगितलं. बघूया त्यांच्या पुढील मीटिंगमध्ये काय ठरते ते. मी एकदम खूप अस्वस्थ झाले म्हणून तुला फोन केला. तू आल्यावर बोलूया परत. एन्जॉय युवर ट्रिप.॔

फोन बंद केल्यावर मृणालच्या मनात उलट सुलट विचारांनी गर्दी केली ज्ञानविज्ञानाने माणसाची भौतिक प्रगती झाली पण माणूस म्हणून त्याची वाटचाल उलट दिशेने होते आहे का? काळ कोणताही असो, स्त्रीपुढचे प्रश्न संपत नाहीत. त्यांचं स्वरूप बदलतं एवढंच. या अफाट विश्वात प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग कोण ठरवत असेल? प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, समस्या वेगळ्या. आपल्या शेजारच्या झोपाळ्यावर जोडीदार म्हणून कोण असेल? की मनासारख्या जोडीदाराची वाट पाहात राहावी लागेल? आपलं फिरोजबरोबरच लग्न ही घटना अतर्क्यच नाही का? सारे देव सारखेच असं आपण म्हटलं तरी आपल्यालाही व्याडेश्वर दर्शनाचीच आस का लागली होती? अनपेक्षित घटना आणि अनुत्तरित प्रश्न यांना गृहीत धरून एकदाच मिळालेल्या या मनुष्यजन्माचा आनंद घेणं श्रेयस्कर नाही का?॔ मृणालच्या मनात विचारांचे आवर्तन उठले होते.

मृणालला उठलेली पाहून फिरोज बाल्कनीतून रूममध्ये आला. गंभीर चेहऱ्याने हातात मोबाईल धरून बसलेल्या मृणालकडे पाहून म्हणाला,

“एनी प्रॉब्लेम? ” 

“नाही रे. नेहमीचंच. चहाच्या पेल्यातलं वादळ. चल,! चहा पिता पिताच सांगते तुला काय झालं ते. ” 

“ओके! नो प्रॉब्लेम….. ” फिरोज हसत हसत म्हणाला. त्याला हसून साथ देत मृणालही उठली.

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लक्ष्मीपूजन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

🌸 जीवनरंग 🌸

☆ लक्ष्मीपूजन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

☆

पावसाळ्याचे दिवस. ६३-६५ चा औंधमधला काळ. त्याकाळी पाऊस पावसाळ्यातच पडे. त्यामुळे बाहेर धुवांधार पाऊस. दरदिवशी न चुकता येणारा रस्ता झाडण्याचा खराट्याचा खर्र-खर्र आवाज त्या मुसळधार पावसातही येतो. मग मात्र माझ्या बाबांचे कुतूहल चाळवते. या गावात येऊन काही काळ उलटून गेलेला असतो. गावाच्या लयीची, गतिची, नादाची हळूहळू सवय होवू लागलेली असते. त्यातलाच हाही एक आवाज. आईबाबांचा सकाळचा दुसरा चहा आणि हा आवाज यांची न चुकता एकत्र येणारी वेळ. एरवी याबद्दल कधीकाही वाटलेले नसते. आज मात्र या पावसात ते गरमागरम चहा पिताहेत आणि बाहेर कोणीतरी रस्ता झाडण्याचे काम इमानेइतबारे करते आहे याने थोडे अपराधी वाटते.

*ते उठतात. दुमजली घराच्या खिडकीतून वाकून खाली पाहातात. ६५-७० ची एक म्हातारी. भिजू नये म्हणून डोक्यावर नावापुरतेच घेतलेले कांबळे. ठिगळं लावून पण नीटनेटकी नेसलेली नऊवारी. हातात लांब दांड्याचा खराटा. पावसाचे वरुन ओतणारे पाणी. रस्त्याच्या कडेला जमलेला ओला पाचोळा. जमेल तसा गोळा करत उचलून पोत्यात गोळा करत पुढे निघालेली असते. *

*बाबांना राहावत नाही. ते वरुनच शुकशुक करून हाक मारतात. कधी कुणी बोलण्याची सवय नसलेली त्या म्हातारीला कुणी आपल्याला बोलावते आहे हेच समजत नाही. बाबा परत एकदा आवाज देतात. आता मात्र चमकून ती आजूबाजूला पाहाते. मग तिचे लक्ष वर जाते. बाबा तिला वर या म्हणून सांगतात. तिच्या चेहर्‍यावर भीती, उत्सुकता याचे मिश्रण पसरते. *

*जिना चढून ती वर येते. बाबा तिला आत बोलावतात. ती अतिशय अवघडून अंग चोरून भिंतीला टेकून उकीडवी बसते. बाबा आईला चहा आण म्हणून सांगतात. आई एक जादाची कपबशी घेऊन तिच्या समोर सारते. ती काहीच बोलत नाही. तिच्या गालावरून येणारे पाणी तिच्या डोळ्यातले की पावसाचे याचा पत्ता न लागू देता ती म्हणते, “ही कपबशी चालत नाय मला. म्हाराची आहे मी मास्तरा. “*

*बाबा हसून म्हणतात, “आम्हाला चालते, घ्या चहा” ती यावेळी मात्र थोडी जिद्दिने म्हणते, “तुमाला चालंल. पण म्यास्नी नाय चालत तुमची. पिचकी, कानतुटकी काडा एकादी. त्यातनंच मी घेतो बगा च्या. तुज्याबद्दल आयकून हाय मी मास्तर गावात. भला मानूस तू. तुला ईटाळ केला मी तर गावात नाव नाय र्‍हायचं बग” आता मात्र आई हसून म्हणते, “बाई, आजपासून ही तुमची कपबशी. आम्ही नाही वापरणार. हवं असेल तर कान मोडून ठेवते उद्याला. पण रोज आमच्या घरापाशी आलात की वर चहा घ्यायला येत जा, आणि मग पुढे जा. “*

*म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर अडकून राहिलेले उरलेले पाणी ओघळते. अंगावरच्या जीर्ण कपड्यासारखंच फिकं हसून ती मान डोलावते. *

*त्यादिवसापासून बायजाबाई आमच्या घरी नवाच्या सुमारास चहा घ्यायला येवू लागते. तिच्या खराट्याचा आवाज लांबरून येवू लागे. तो आला की आई चहाचे आधण टाके. ती घरापर्यंत पोचे तोवर चहा उकळलेला असे आणि ती जिना वर चढून येईपर्यंत तो कपात असे. आई, बाबा आणि बायजाबाई तिघेजण कधी मूकपणे तर कधी काहीबाही गप्पा मारत चहा संपवत. *

*बाबा शाळेला जात, बायजाबाई पुढचा रस्ता झाडायला आणि आई तिच्या पुढच्या घरकामाला. आई कधी तिला चहाबरोबर भाकरी – पोळीचा तुकडा नाहीतर इतर काहीबाही देई. ती तो आनंदाने खात असे. सणासुदीला तिच्यासाठी जेवणही बाजूल काढून ठेवले जावू लागले. या बायजाबाईचं गावाच्या बाहेर एक झोपडं. नावापुरतं रात्रीच्यावेळी झोपायला आसरा देणारं. तिच्या मागच्यापुढच्या कुणाचाच पत्ता तिला माहीत नाही. या जगात दिवसभर गावचे रस्ते झाडायला जन्मल्याप्रमाणे ती सारा दिवस गावात घालवी. कोणी शिळे-पाके कधी आंबलेले खायला देई. बस हेच ते काय आयुष्य बायजाबाईचे. कामाला मात्र चोख. गावातल्या रस्त्यावर कधीच कचरा दिसत नसे आणि त्याचे श्रेय बायजाबाईचेच. *

 

*अशीच ती एकदिवस नेहमीप्रमाणे चहा प्यायला वर आली. आईने चहा केला एकीकडे आणि दुसरीकडे दाण्याचं कूट करायचं म्हणून दाणे भाजायला घेतले. त्याचा खमंग वास घरभर पसरला. चहा पिऊन झाला, बाबा शाळेत गेले. तरी बायजाबाई आज थोडी घुटमळलीच. आईने शेवटी विचारलं, “काय गं बायजा, काही हवंय का? ” ती म्हणाली, “बाये, दाने लय आवडतात बग मला. वासानं जीब चाळवली, देतिस काय वायचं खायाला”. *

 

*आईनं “अगं त्यात काय एवढं” असं म्हणत भाजलेले, अजून गरम असलेले थोडे दाणे तिच्या समोर वाटीत ठेवले. तसं बायजा मान हलवत म्हणाली, “बाये, हे असले नगं. भाजतान काळे पडल्याले दे”. “अगं, असूदे हे चांगले खा की मी देते तर” असं म्हणत आई तिला आग्रह करू लागली. तसं बायजाबाई म्हणाली “अगं माय, तू देशील गं. आनि मंग माजी जिब सरावली ते खायाला की ते काळे जळलेल नाय की गं जानार. बाकीचे सगले ते तस्लेच देतात बग. तूही आपले तेच दे”*

 

*यावर काय उत्तर द्यावं, हे न सुचलेल्या आईनं मग जमतील तेवढे काळे दाणे बाजूला केले आणि तिला दिले. त्यादिवसापासून मग आई थोडे जास्तच दाणे काळे करायला शिकली. जेंव्हा आई दाणे भा़जे त्यावेळी बायजाबाईसाठी काळे दाणे बाजूला काढून ठेवू लागली. *

 

*शेवटी आयुष्याचा आखून दिलेला मार्ग पुढे जात असतो. मी आणि माझी बहीण यांच्या जन्मानंतर, लहान गावात शाळा नसल्याची तीव्र जाणीव बाबांना होवू लागते. आणि शेवटी औंध सोडून सांगलीला त्यांच्या मूळ गावी जायचे ठरवतात. बातमी गावात पसरायल वेळ लागत नाही. एव्हानाच्या ७-८ वर्षांच्या काळात आई-बाबांनी माणुसकीची बरीच पुण्याई गोळा केलेली असते. बातमी पसरल्यापासून गाववाल्यांच्या घरी चकरा सुरू होतात. मास्तरांनी गाव सोडून जाऊ नये म्हणून आर्जवे, नवस, अगदी प्रेमाच्या धमक्याही देऊन होतात. परंतू मास्तर बधत नाही हे पाहून राजासकट गावावर दु:खाचे सावट पसरते. *

 

*जायचा दिवस हळूहळू जवळ येवू लागतो. नेहमीप्रमाणे सकाळच्या चहाला बायजाबाई येतच राहाते. बातमी तिच्यापर्यंतही पोचलेली असते पण ती आईबाबांना “जाऊ नका” असे कधीच म्हणत नाही. “मास्तर, रस्ता जिकडं नेतो तिकडं जायलाच पायजेल की. खुश्शाल जा. सगळं भलंच होईल”, एवढंच म्हणत राहाते. *

 

*आईबाबांचा निघायचा दिवस उजाडतो. सकाळचा शेवटचा चहा प्यायला बायजाबाई नवाला हजर होते. मूकपणे समोर येवून बसते. आईनं चहाचा पुढं केलेला कप घेते, आणि एका चुरगळलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाची पुडी बाबांसमोर सरकवते. “हे काय गं बायजा”, म्हणत बाबा ती हातात घेऊन उघडतात. आणि त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य मावत नाही. ते न बोलता पुडी आईच्या हातात देतात. आई पाहाते तर चांदीचं उदबत्तीचं घर. *

 

*बाबा कसेबसे शब्द गोळा करत बायजाला विचारतात, “बायजाबाई, हे काय हो? कशासाठी? “*

 

*बायजा उत्तरते, ” माय आणि तू कायम मला देत आले. म्या कदीबी काय नाय दिलं तुमास्नी. म्हून. ते आप्ला राजा येडंच हाय. दिवाळीच्या वक्ताला मला चांदीचं नाणं दिल्तं बग कदी. आता म्या ते काय खाउ? प्वाट भरंल का माजं त्यानं, त्याचं हे करून आणलं गावात जाऊन. तुमि दोगंबी करताय की द्येवाचं मंग मलाबी आसिर्वाद मिळंल न्व्हं”? *

 

*बायजाच्या डोळ्यातला तो पहिल्या दिवशीचा पाऊस आज आईबाबांच्या डोळ्यात उतरतो. हे आम्हाला न देता विकलं तर त्याचे पैसे मिळतील, असे तिला सांगणे म्हणजे तिच्या प्रेमाचा आत्यंतिक अपमान हे बाबांना उमगते. ते न बोलता ती मोलाची भेट स्वीकारतात. बायजाबाई गडबडीनं निघते आणि म्हणते “आज रस्ते लवकर स्व्च करायचं हायती. माझ्या मास्तरचा टरक जानार नव्हं का त्यावरून”. *

 

*शेवटी दुपारचा ट्रक निघतो. बाबा ट्रकवाल्याला हळू चालवायला सांगताता. कारण गावातली शंभर एक माणसं ट्रकमागे चालत वेशीपर्यंत पोचवायल येत असतात. शेवटी ट्रक गती पकडतो, हात उंचावतात. त्यात टरकाला ओवाळून कानशिलावर बोटे मोडणार्‍या बायजाचेही हात असतात. *

 

*सांगलीला आल्यावर कित्येक दिवस आई भाजल्यावर काळे दाणे बाजूला काढत राहाते. त्याने एक बरणी भरून जाते. ते खाणारे मात्र नसते कोणी. शेवटी मात्र तिला लक्षपूर्वक दाणे कमी काळे करण्याची सवय लावून घ्यावी लागते. चांदीचे उदबत्तिचे घर देवघरात विराजमान होते. त्यात लावल्या जाणार्‍या उदबत्तीच्या धुरांच्या वलयाप्रमाणं काळाची वलयं उठत राहातात. त्या अस्पष्ट होत जाणार्‍या धुराप्रमाणं बायजाबाईही विस्मृतीच्या पड्द्याआड अस्पष्ट होत जाते. मधेच कधीतरी तिची गोष्ट बाबा कुणाला तरी सांगत राहातात. त्यावेळी तिच्या आठवणींचा सुवास उदबत्तीसारखाच सारे आसमंत सुगंधीत करत असतो. *

 

*२००८ मधे आईबाब इथे अमेरिकेत येतात. भडंग, भाजणी, गोडामसाला, मेतकूट असे सर्व काढून झाल्यावर बाबा एक मखमली डबी काढतात. म्हणतात काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. माझ्या बाबांना सोन्या-चांदीच्या वस्तू घडवून घेण्याची दांडगी हौस. तसेच काहीतरी असणार असे मनाशी म्हणत मी ती उघडते तर आत लक्ष्मीची चांदीची देखणी मूर्ति. *

 

*मी बाबांना म्हणते, “बाबा किती सुरेख घडवलेली आहे ही. पण कशासाठी हे इतकं महागाचं. शिवाय तुम्हाला माहीत आहे, मी पूजा वगैरे काय करत नाही”. *

 

*बाबा म्हणतात, “अगं लक्ष्मीची कुठाय ही? ही आहे बायजाबाईची. तिचं उदबत्तीचं घर आणि काही थोडी चांदी माझ्याकडची घालून बनवली मी ही. कष्ट करून मिळवलेले धन सढळपणे दुसर्‍याला देता यायला हवे हे शिकलो त्या लक्ष्मीकडून. म्हणुन तिची मूर्ति करुन घेतली. आता तुझ्याकडे सांभाळ”*

 

*मी निशब्द होते.. मी खरे तर बायजाबाईला कधी पाहिलेले नसते, त्यावेळी माझा जन्मही झालेला नसतो. त्या डबीत कापसात गूंडाळून ठेवलेल्या मूर्तिला मी हलकेच स्पर्श करते. त्या मखमलीत मला तिच्या खरखरीत हातांचा स्पर्श जाणवतो. ती डबी मी ठेवून देते. *

 

*तेंव्हापासुन दिवाळीत लक्ष्मीपू़जनाला आवर्जून पूजा करते ती बायजाबाईची. आणि या लक्ष्मीकडे मागणे मागते की “माये, तुझ्यासारखे नितळ मनाचे धन मलाही लाभू दे”. *

☆

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आनंदी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “आनंदी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

नमस्कार!! “मी आनंदी”

कोणी सेलिब्रिटी नाही.

तुमच्यासारखीच सामान्य माणूस.

आजचा दिवस एकदम खास,

माझा वाढदिवस,

सकाळी छान आवरलं.

रात्री आठवणीनं आणलेला केक स्वतःला भरवताना विचारचक्र सुरु झालं.

“आनंदीबाई, आतापवतो तब्येतीनं छान साथ दिलीय. डायबेटीस, बीपी हे पाहुणे अजून तरी लांबच आहेत. आज त्रेचाळीस पूर्ण, लवकरच पन्नास मग साठ 

बाप रे, इतकं आयुष्य नको.

हातीपायी धड आहे तेव्हाच कारभार उरकलेला बरा. त्यातही झोपेतच झालं तर सोन्याहून पिवळं. आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही. पुढेही नको. पुन्हा एकदा हॅपी बड्डे टु मी. ”आरशात पाहत स्वतःला भरभरून शुभेच्छा दिल्या.

—

खूप वर्षापूर्वी आई-वडील गेले.

तेव्हापासून एकटीच.

भाऊ-बहीण नाही.

जबाबदारी नको म्हणून नातेवाईकांनी अंतर राखलं.

ओळखी खूप आहेत परंतु मित्र-मैत्रिणी नाहीत.

लग्नाचा योग नव्हता.

एकदोन अनुभवानंतर त्या वाटेला परत गेले नाही.

असो.. जाऊ दे.

निदान आजतरी हे रडगाणं नको.

माझं जग फार छोटं.

राहती खोली आणि छोटी टपरी,

दोन्ही आई-वडिलांकडून मिळालेलं.

टपरी म्हणजे माझा जीव की प्राण…

कमाईचे एकमेव साधन.

सकाळी नऊ ते रात्री नऊ तिथचं.

२० वर्षे एकच रुटीन.

एकटेपणाची इतकी सवय झाली की आता सोबतीची भीती वाटते.

तशी मी एककल्ली, फटकळ, तापट स्वभावाची.

कोणाचाही मुलाहिजा न राखता बोलणारी,

खडूस, भांडखोर, फाटक्या तोंडाची म्हणून कुप्रसिद्ध..

म्हणूनच सगळे चार हात अंतर राखून.

खरं सांगायचं तर मी अशी नाहीये पण एकट्या बाईला जगात टिकायचं असेल तर 

काहीतरी मुखवटा घालावाच लागतो.

मी तेच केलं.

—

रोजच्याप्रमाणे दुकानात बसले होते.

वाढदिवसामुळे मन प्रसन्न अन छान मूड होता.

समोर दहा-बारा वर्षाची मुलं क्रिकेट खेळत होती.

दुकानाजवळच एकजण फिल्डिंग करत होता.

सहज मनात आलं. त्याला बोलावलं अन चॉकलेट दिलं.

अनपेक्षितपणे मिळालेल्या गिफ्टमुळे खुष झालेला पोरगा मनापासून हसला.

त्याचा खुललेला चेहरा पाहून मलाही मस्त वाटलं.

*आपल्यामुळं आनंदी झालेला चेहरा पाहणं यापेक्षा जगात सुंदर काहीही नाही. *

काही वेळानं लक्ष गेलं तेव्हा खेळ थांबलेला अन सगळे दुकानाकडे पाहत होते.

काय झालं असेल याची कल्पना आली.

सर्वांना बोलवून चॉकलेट दिलं. मुलं एकदम खुष.

‘बड्डे!!’एका पिटुकल्यानं विचारलं.

“हो, म्हणूनच चॉकलेट दिलं”

प्रत्येकानं शेकहँड करत ‘हॅप्पी बड्डे’ केलं.

फार फार भारी वाटलं. मुलं खेळायला गेली.

काही वेळानं घोळका परत आला.

“काय झालं. आता काही मिळणार नाही. ”मी विनाकारण डाफरले.

मुलं एकमेकांकडे टकमका बघायला लागली.

एकानं कुठून तरी तोडून आणलेलं पिवळं फुल पुढं केलं.

“माझ्यासाठी!!”मी हरखून विचारलं.

तेव्हा माना डोलावत सगळे म्हणाले “बड्डे गिफ्ट”

त्यावेळेस जे वाटलं ते सांगता येणार नाही.

खूप भरून आलं. मान फिरवून ओढणीनं डोळे पुसले.

प्रत्येकाला बिस्किट पुडा दिला. सगळे डबल खुष.

पुन्हा एकदा शेकहँड करत “हॅपी बड्डे”केलं अन खेळायला गेले.

मी मात्र बराच वेळ त्या फुलाकडे पाहत होते.

वाढदिवसाला मिळालेलं माझं पहिलंवहिलं गिफ्ट.

मुलांचं खूप कौतुक वाटलं. त्यांच्यामुळे माझा वाढदिवस स्पेशल झाला.

खूप सारं समाधान अन आनंद मिळाला.

मी आज फक्त नावापुरती नाही तर खरोखर *“आनंदी”* होते

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares