☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
एप्रिल महिन्यातलं कडक ऊन.. पारा चढलेला ..अंगाची लाहीलाही..जोरात फॅन सुरू केला तरी उकडतच होत.
काही वेळानंतर थोडं थोडं वातावरण बदलायला लागलं. हळूहळू वारा वहायला लागला. अचानकच काळे ढग दिसायला लागले. अंधारून आल्यासारखं झालं .आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला. झाडांच्या फांद्या हलायला लागल्या. धप्प धप्प आवाज करत दोन नारळ पडले. एक झावळी पण सुसू आवाज करत पडली..
फांद्या पुढे पुढे येत होत्या ..
त्या पावसाला आनंदानी हसत हसत ” ये ये “म्हणत आहेत असंच मला वाटायला लागलं …
वातावरण बदलूनच गेलं …
आलाच पाऊस वळवाचा… कोसळायलाच लागला ..बराच वेळ धो धो पाऊस बरसला .
काही वेळातच आला तसा निघूनही गेला…….
वातावरण शांत झाले .पाणी रस्त्यावरून वहात होते .खिडकीतून मी बघत होते .
बाहेर पडायचा मोह झालाच ..गेले.. मुलं जमली होती .शेजारच्या बिल्डींग मधल्या आंब्याच्या झाडाच्या खाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या .पोरांना भलतीच मज्जा वाटत होती .मुलं कैऱ्या गोळा करायला लागली.
काही कैऱ्या फुटल्या होत्या, काही पाण्यात चिखलात पडल्या होत्या ,रस्त्यावर सोसायटीच्या झाडांमध्ये पडल्या होत्या.
मुलांना फार गंमत वाटत होती.
” मला मिळाली ” “मला पण सापडली”
” अरे ही एक बघ केवढी मोठी आहे “
पोरं ओरडतच होती. एकाने चार कैऱ्या मला दिल्या .आजूबाजूचे लोकही जमा झाले होते .त्यांनाही त्या मुलांनी कैऱ्या दिल्या .खूप धमाल चालली होती .गार हवा आता फार सुखकारक वाटत होती.
इतक्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये नुकतेच ते लोक राहायला आले होते .
पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या. त्यांच्याकडे बघत ती उभी होती .डोळे भरून वाहत होते. जवळ जाऊन विचारलं ..
“काय झालं ग?”
तिचा चेहरा रडवेला झाला होता. ती म्हणाली …
“सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता .असाच पाऊस काल आमच्या शेतातही पडला म्हणे.आंब्याचं खूप नुकसान झालं आहे .पीकं तर पार आडवी झाली आहेत.”
आता तर तिचा बांधच फुटला .ती फारच जोरात रडायला लागली ….
मी नि:शब्द झाले ..काय बोलायचं याच्यावर ? सांत्वन तरी कसं करायचं? मला काही समजेना..
ती पुढे म्हणाली
” नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच हाता तोंडाशी आलेला घास घेऊन जातो”
मी नुसती उभीच..
” नको मला या कैऱ्या “
असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या .आणि शेजारच्या जीन्यानी वर निघून गेली.
इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते …
आता खाली बघितलं मगाशी ती पुढे येणारी फांदी कदाचीत पावसाला
” थांब थांब ” म्हणत असावी का?…
अस आता मला वाटायला लागलं…
प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो. वास्तव वेगळं असतं का?
अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही … तेवढाच आमचा संबंध..त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही … हे आज स्पष्टपणे कळलं..
मोठ्या ब्रॅण्डेड दुकानात वस्तूची जी किंमत असेल ती आम्ही देतो. आणि भाजी घेताना मात्र दहा वीस रुपयांसाठी घासावीस करतो.
आज तिच्यामुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली .
असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा..
खरं सांगू तेव्हापासून पूर्वी इतका वळीव आता आनंदाचा राहिलेला नाही .
असा पाऊस आला की आता आठवतो तो कष्ट करणारा शेतकरी
त्याच शेत ….
तिचा रडवेला चेहरा..
आणि खूप काही….
कधी आम्ही शहाणे होणार कोण जाणे… पण निश्चित विचार करूया आणि थोडं बदलूया…
आपल्या जीवनात सगळ्यात पॉवरफुल शब्द कुठला असा प्रश्न जर मला विचारला तर मी उत्तर देईन
‘अहोss’ …….
या शब्दाचं सामर्थ्य जाणून असलेल्या पिढीचा सध्या अस्त होत आहे. खरं म्हणजे हा शब्द, स्त्रीप्रधान संस्कृतीचा मेरुमणी आहे.
या शब्दात असं काय आहे ? असं विचारण्यापेक्षा या शब्दात काय नाही असे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल……
….. यात प्रेम आहे, यात धाक आहे, यात जरब आहे, यात आजारी माणसाची अगतिकता आहे, मदत याचना आहे, आज्ञा आहे, यात सर्व काही आहे. ही नुसती एक हाक सुद्धा आहे. हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याच्यासाठी हा उच्चारलेला असतो, ती व्यक्ती हातातलं सगळं काम सोडून धावत सुटते.
यामधली भावना, हा शब्द उच्चारण्याची पद्धती आणि स्वर यावर अवलंबून असते. या मधला अर्थ उच्चारणाऱ्याला आणि ज्याच्यासाठी उच्चारला आहे त्याला त्या दोघांनाच निश्चित समजतो.
यात परिचय ही आहे. हो, कुणाशीही परिचय करून देताना – ‘हे आमचे अहो’ असा परिचय करून दिल्यानंतर घरातील संपूर्ण परिस्थितीची जाणीव समोरच्याला येते.
हे माझे मिस्टर – हे अगदीच नाटकी वाटतं. हा माझा नवरा – हे वाक्य तर इतकं रुक्ष वाटतं की, कडक उन्हाळ्यात तापलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूच्या वठलेल्या संपूर्ण निष्पर्ण वृक्षा सारखं वाटतं.
अलीकडच्या मुलींना अर्थात आमच्या पिढीतील सुद्धा नवऱ्याला नावाने हाक मारणाऱ्या मुलींना या शब्दाच्या सामर्थ्याची कधी कल्पनाच आलेली नाही. त्यामुळेच अलीकडच्या मुलींनी घरामध्ये स्वतःचं महत्व कमी करून घेतल्याचे जाणवते.
माझ्या बायकोने जर मला ‘अरे सुनील जरा इकडे ये’ असे सांगितले असते तर मी तिला उत्तर दिले असते ‘हो थोड्या वेळाने येतो’ . पण ती जेव्हा अहोss म्हणते त्या वेळेला होss चा शेवटचा हेल संपायच्या आत मी हजर असतो.
प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा ‘अहो ss मला हरणाचं कातडं आणून द्या ना!’ असं म्हटल्या म्हटल्या लगेच धनुष्यबाण घेऊन त्या हरणा मागं धावले असतील, क्षण सुद्धा वाया घालवला नसेल. नाहीतर खरं म्हणजे त्यांनी लक्ष्मणाला सांगायला पाहिजे होतं की ‘जा रे त्या हरणाची शिकार करून ये’ पण नाही, ते अहो ऐकलं आणि सगळं संपलं!
प्रभू रामचंद्रांसारख्या ईश्वरीय व्यक्तिमत्त्वाला सुद्धा खरं म्हणजे चुकीच्या वेळेला, चुकीचं कृत्य करण्यासाठी भाग पाडणारा तो शब्द किती सामर्थ्यवान असेल त्याची कल्पना करा!
हा शब्द म्हणजे विवाहित स्त्रीचे घरातलं सामर्थ्य आहे.
नवीन पिढीतील सर्व तरुणींना प्रेम विवाहित असो किंवा लिव्हइन मधील सुद्धा, माझी एक विनंती आहे. एकदा अहोss हा शब्द प्रयोग वापरून तर पहा. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला एकदा कल्पना आली तर आपण काय मिस करत होतो याची कल्पना येईल.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-२☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
वैद्यकीय
रस्त्यावरच भिक्षेकर्यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पाय कापणे, छातीतून/ पोटातून पाणी काढणे, डोकं फुटणे, चेहऱ्यावर ब्लेड मारून गाल कापला जाणे, डोळ्यांचे /कानाचे ऑपरेशन करणे… वगैरे वगैरे….आता याविषयी फार चर्चा करत नाही… मी याविषयी एकही फोटो कधीही शेअर केला नाही….कारण ते वाचुन, फोटो पाहून, अनेक जणांना चक्कर येते, मळमळ होते….!
—- असो, तर अशांना बरं झाल्यानंतर आपण छोटा व्यवसाय टाकून देत आहोत; अर्थातच तुमच्या मदतीतून….हा मूळ मुद्दा… ! यातून बरं झाल्यानंतर आपण अशा लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवतो. जाण्याचा खर्च, तसंच तिथे सुरुवातीला राहण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा खर्च आपण करता….आपण म्हणजे “आपण”….मी नव्हे….!!! – करता आपणच….मी फक्त “सांगकाम्या”….!!!
एखाद्याकडून घेतलेली गोष्ट, दुसरीकडे पोचवायला काय अक्कल लागते….???
अपंग असणाऱ्या माझ्या एका बंधूला व्हीलचेअर हवी होती….मी मग एक मेसेज टाकला आणि 223 व्हीलचेअरच्या मला ऑफर आल्या….
एक अपंग आजी….जिचे पती अपंग होते आणि नुकतेच ते गेले, त्यांच्या स्मरणार्थ त्या आजीने मला त्या बाबांची व्हील चेअर देऊ केली…
या आजीची भावना समजून घेऊन, त्यांच्याकडून आपण व्हीलचेअर घेतली आणि इतर सर्वांना नम्रपणे सांगितले की पुढे कधी लागली तर तुमच्याकडून घेतो…
काय म्हणू मी समाजाच्या दातृत्वाला ?
दरवेळी आम्ही समाजाच्या पायावर कपाळ टेकतो….पण तरीही ते कमीच आहे… !
शैक्षणिक
भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांचे आपण शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.
….मला सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांच्या मदतीमधून, ज्या मुलांचे आपण पालकत्व स्वीकारले आहे, अशी सर्व मुलं यावर्षी उत्तम गुणांनी पास झाली आहेत….मुद्दाम मी काही गुणपत्रिका इथे शेअर करत आहे,..!
माझ्या एका मुलीला नववी मध्ये तर 92% मार्क पडले आहेत….पहिलीपासून दहावीपर्यंतची माझ्या मार्कांची टोटल केली तरी ती 92 भरत नाही….!
(तुम्ही घरातले म्हणून सांगतोय, बाहेर कोणाला सांगू नका….अर्थात माझ्या पुस्तकात ते सर्व जाहीर झालंच आहे म्हणा….)
असो, मी जे माझ्या आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या विक्रीतून या सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत आहे….! या सर्व मुलांच्या फीया जमेल तशा भरत आहोत.
आपण अनेक मंडळी भीक मागणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या एकाच हेतूने, माझ्याकडून माझं पुस्तक विकत घेत आहेत; (आवडो न आवडो ) – मी आपल्यासमोर नतमस्तक आहे….!
भीक मागणाऱ्या व्यक्तींना भीक द्यायची ? की मदत करायची ? भीक आणि मदत यात फरक काय ? त्यांच्याशी कसं वागायचं ? बिस्किट, पाणी, अन्नदान द्यायचं का नाही ? ते खरंच गरजू आहेत की धंदा म्हणून भीक मागत आहेत… ? गरजू आणि धंदेवाईक भीक मागणाऱ्या लोकांना आम्ही कसं ओळखायचं ? वगैरे वगैरे याविषयी मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे…..
हा मेसेज सर्वदूर पोहोचावा यासाठी मी ग्रंथालयांना मोफत पुस्तक देत आहे….!
आपल्या माहिती मधील ग्रंथालयांना जर पुस्तक हवी असतील तर मला कळवावे, मी ती मोफत स्वखर्चाने पाठवायला तयार आहे… !
अन्नपूर्णा
रस्त्यावर जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)
दिव्यांग कुटुंबाला आम्ही हे डबे तयार करण्याचे काम दिले आहे..It’s our win-win situationz
इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एक आजी भेटली….तिने हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाली माझ्याबरोबर जेव….छान चपाती होती, त्यावर हिरव्यागार मिरचीचा खर्डा आणि बाजूला लालेलाल लोणचं….सोबत थंडगार पाणी… ! जेवून तृप्त झालो….यानंतर तिने एका पूरचुंडीत बांधलेल्या….तिला कोणीतरी भिकेत दिलेल्या चकल्या मला खायला दिल्या….!
प्रत्यक्ष अन्नपूर्णा भेटली… मी तिच्यासमोर नतमस्तक झालो… रोज अशा अन्नपूर्णा दरिद्री नारायणाच्या रूपात मला भेटतात… आणि रोज मी तृप्त होतो….
खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team !
अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.
या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
मनातलं काही – –
आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दी असतं….तसंच उमेदीत असलेल्या आई-बापांना वापरून घेतलं, की त्यांची मुलंबाळ, नातवंडे, वृद्धापकाळात अशा लोकांना रद्दी समजतात आणि बाहेर फेकून देतात. माझे मित्र श्री केतन मराठे, यांच्या लहान मुलाने घरोघरी फिरून रद्दी गोळा केली आणि त्याचे 1400 रुपये आले, ते त्याने मला दिले.
… रद्दी झालेल्या लोकांसाठी, रद्दी विकून निधी गोळा करणे हा योगायोग म्हणू ? की श्री मराठे यांनी त्यांच्या मुलावर केलेला संस्कार म्हणू ?? की इतका लहान मुलगा आता खूप मोठा झाला आहे असं म्हणू… ???
कोणीही प्लास्टिक बॅग वापरू नये, त्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्या, यासाठी मी आणि माझे भिक्षेकरी लोक आम्ही प्रयत्न करत आहोत.
यासाठी पुणेरी टोमण्यांचे बोर्ड तयार केले आहेत. आम्ही आमच्या भिक्षेकर्यांच्या गळ्यात ते अडकवणार आहोत….. प्लास्टिक पिशव्या वापरू नये, कपडे पिशव्या वापरा असा गमतीशीर, पुणेरी सल्ला माझे हे लोक समाजाला देतील.
याच सोबत ज्यांच्या अंगात शिवणकला आहे, अशा सर्व लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे. पूर्वी भीक मागणाऱ्या अशा लोकांकडून आपण पिशव्या शिवून घेणार आहोत. जे लोक कापडी पिशव्या शिवतील किंवा विकतील अशा सर्वांना आपण दिलेल्या निधीमधून आपण पगार देणार आहोत.
स्वार्थातून परमार्थ….!!!
जे लोक पिशव्या शिवतील त्यांना त्या दिवसाचा पगार मिळेल, जे लोक पिशव्या विकतील त्यांनाही त्या दिवसाचा पगार मिळेल आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू का होईना, परंतु प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल आणि त्या जागी त्यांच्या हातात कापडी पिशव्या असतील…
तथाकथित भिक मागणारे लोक समाजाला प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणतील….कापडी पिशव्यांचा प्रसार करतील….पुढील पिढी वाचवण्याचा प्रयत्न करतील जगातील आपला हा पहिला प्रकल्प असेल… !
पुणेरी टोमण्यांचे बोर्ड मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम पाठवले आहेत.
मागच्या आठवड्यात एक मुलगी भेटली, जवळ येऊन लाजत म्हणाली, सर माझं लग्न ठरलंय….पोरगा तुमच्या वळकीचाच हाय… इतकं म्हणूस्तोवर पोरगा पुढे आला… या दोघांनाही पूर्वी आपण व्यवसाय टाकून दिला होता.
..छुपे रुस्तम म्हणत मी दोघांच्याही गालावर चापटी मारली. तितक्यात मुलगी म्हणाली, ‘सर सोलापूरला आमच्या मूळ गावात लग्न ठीवलंय, इतक्या लांब तुमी येणार नाही माहित आहे, म्हणून आहेर घेऊन आलोय… !’ यानंतर अक्षरशः टॉवेल, टोपी आणि पॅन्ट पीस असा भररस्त्यात मला त्यांनी आहेर केला. अशा आहेराला “भर आहेर” का म्हणत असावेत हे आज मला कळलं.
मला खूप आनंद झाला….तरी मी रागावून त्यांना म्हटलं हा असला फालतू खर्च करायचा कशाला….?
यावरती रडत पायाशी बिलगत ती म्हणाली, ‘सर तुमाला तर म्हाईत आहे, मला वडील नाहीत, वडिल म्हणून पयला आहेर तुमाला….!
……यार, पोरी कधी मोठ्या होतात बापाला कळत नाही….कळतच नाही राव….!
लेख खूपच लांबलाय….! मी तर काय करू ? सासरहून मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळी, आई बापाला काय सांगू आणि काय नको ? असं होतं….आज माझं सुद्धा तसंच झालंय… !
तुम्हीच माझे आई आणि बाप आहात….आता तुमच्याजवळ मन नको मोकळं करू….तर आणखी कुणा जवळ करू….?
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-१☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
कुणीतरी म्हटलंय, आयुष्य हे एक रंगमंचावरचं नाटक आहे…
पण मला वाटतं, आयुष्य हा एक खेळ आहे. या खेळात हरणं – जिंकणं, आनंद – दुःख, आशा – निराशा, मोह – स्वार्थ – त्याग – तिरस्कार, जिद्द, उपेक्षा, तगमग, तळमळ… पुस्तकात लिहिलेल्या या सर्व भावना प्रत्येक खेळात प्रत्यक्ष अनुभवाला येतात. आयुष्य यापेक्षा काय वेगळं आहे ?
खेळामध्ये मात्र एक नियम असतो, आपल्या टीम मधल्या / कुटुंबातल्या सदस्याला आपण त्रास द्यायचा नाही, हरवायचं नाही, हरू द्यायचं नाही… मग हा खेळ क्रिकेट असो की कबड्डी…!!
दुर्दैवाने आयुष्याच्या खेळात मात्र हा नियम पाळला जात नाही…!
अनेकदा आपलेच लोक, आपल्याच माणसांचे पाय ओढून, त्याला रिंगणा बाहेर फेकून देतात, कायमचं आऊट करतात… !
ज्या लोकांना असं रिंगणाबाहेर टाकलं जातं, त्या लोकांच्या काही चुका असतीलही, मान्य … पण ज्या पानावर चूक आहे, फक्त ते पान फाडायचं ? की आख्ख पुस्तकच फाडायचं….???
चुका होणं हि प्रकृती…. चूक मान्य करणं हि संस्कृती…. आणि चुका सुधारणं हि प्रगती…!
पण एखाद्या चुकीसाठी एखाद्याला कायमचं आउट करणं ही मात्र विकृती…!!!
एकदा ही माणसं आयुष्यातून आउट झाली… बाद झाली की लवकर सावरत नाहीत….बरोबर आहे, पाडणारे आपलेच असतील, तर सावरायला वेळ लागतोच..!!! असो…
उन्हाळा खूप वाढलाय असं सारखं कानावर येतं…
घरात पंख्याखाली सुद्धा अंगाची लाही लाही होते… मी तर उन्हात डांबरी रस्त्यावर एखाद्या गटार /उकिरड्याशेजारी किंवा इतर मिळेल त्या जागी बसलेलो असतो. (मला लोक त्यांच्या घरासमोर किंवा दुकानासमोर किंवा इतर चांगल्या जागी बसु देत नाहीत, त्यांच्या मते हे घाणेरडे लोक आमच्या नजरेसमोर नकोत)
तर…. रस्त्यावर बसल्यावर, खालून चटके आणि वरूनही चटके…!!!
रस्त्यावर भर उन्हात दिवसभर शे दिडशे किलोच्या बॅगा सांभाळत असतानाही, उन्हाळ्याचा त्रास मला मात्र जाणवत नाही….
रणरणत्या उन्हात, मी बसलेलो असताना, दोन तीन भिक्षेकरी माझ्यामागे नुसतेच उभे असतात…. मागे उभे का रे ? असे पुढे या… असं मी दटावलं तरी माझं ते ऐकत नाहीत…. दोन तासाने माझं काम संपतं …मी बॅग आवरायला घेतो आणि मग ते पुढे येतात… ते पुढे आल्या आल्या मला उन्हाची तीव्रता जाणवू लागते… मी पुन्हा दटावून विचारतो … असे वेड्यासारखे माझ्या मागे मागे काय घुटमळत होता रे ? त्यातला एक जण मग चाचरत म्हणतो, ‘डाक्टर तूमाला उन्हाचा लय चटका बसत हुता… आमी म्हागं हुबं राहून तुमच्यावर सावली धरली हुती ओ…!!!
.. .. दोन तास स्वतः उन्हात उभे राहून यांनी माझ्यावर सावली धरली होती…. भर उन्हातही मग डोळ्यामधून पूर येतो..!
स्वतः चटका सहन करून दुसऱ्यावर सावली धरणारा फक्त एक बापच असू शकतो…
ही प्रेमळ माणसं, बाप होऊन, माझ्या वाटेवरची झाडं होतात… डोक्यावर सावली धरतात… मग माझ्यासारख्या वाटसरूला ऊन कसं लागेल ?
मला उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
भर उन्हाळ्यात रस्त्यावर मी बसतो तेव्हा माझ्या आज्ज्या, आया, मावश्या माझ्या डोक्यावर पदर धरतात, कुणीतरी उकिरड्यातला एखादा पुठ्ठा घेऊन येतं आणि बाजूला बसून वारा घालतं… मध्येच कुणीतरी पदरानं घाम पुसतं…. तर मध्येच कोणीतरी थंडगार पाण्याची बाटली आणून देतं…. भिकेतून मिळालेल्या पैशातून कोणी ताक विकत आणतं….तर कुणी लस्सी…. तर कुणी उसाचा रस….
प्रेमाच्या आणि मायेच्या इतक्या शितल वातावरणात मी बसलेला असतो, की मला उन्हाळा जाणवतच नाही….. उन्हाची प्रत्येक लाट, माझ्यासाठी थंडगार वाऱ्याची झुळूक बनून येते… मला मग उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
मी आहे साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, पण त्यांच्यात गेलो की ते मला एखाद्या देशाचा राजा असल्याचा फील देतात…
काही तासातच ते मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवतात… रोज – रोज आणि रोजच…!
दुसऱ्याला श्रीमंत बनवणाऱ्या, आयुष्याच्या खेळात कायमस्वरूपी आऊट झालेल्या आणि रिंगणाबाहेर बसलेल्या या व्यक्तींच्या जखमांवर तुम्हा सर्वांच्याच सहकार्याने फुंकर घालत आहे आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर !
*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*
भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी
दारुड्या नवरा – मतिमंद मूल आणि अपंग आई… कंटाळून तीने शेवटी घर सोडलं; म्हणण्यापेक्षा नवऱ्यानेच तीला घराबाहेर हाकलून दिलं…!
पुण्यात आली… या तीनही पिढ्या, सातारा रोड येथील एका मंदिराबाहेर भिक मागू लागल्या…
ताई खमकी आहे पण त्यापेक्षा सुद्धा जास्त संवेदनशील…
मला भेटली आणि आपोआप भाऊ बहिणीचं नातं प्रस्थापित झालं…
तिला यानंतर नात्याचा उपयोग करून काही बाही विकण्याचा व्यवसाय रस्त्यावर टाकून दिला…. ती तो प्रामाणिकपणे करत होती… !
तिची आई पूर्णतः बहिरी आहे… ताईचा बारा वर्षांचा मुलगा मतिमंद…. दरवेळी मी मुलाला चॉकलेट घेऊन जातो… तिच्या आईला म्हणजेच आजीला मी खूप चिडवतो…. “ए बहीरे म्हातारे” म्हटल्यावर तिला खूप राग येतो (बरोबर हे तीला कसं ऐकू जातं हे मला अजून कळलं नाही)
.. ही आजी मला दाद्या म्हणते… तीच्या मुलीचा ती मला मोठा भाऊ समजत असावी कदाचित… ! बऱ्याच वेळा हक्कानं शिव्याही देते…
तर, हीच बहिरी आजी तासनतास माझ्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असते…. मी तीला प्रेमाने म्हणतो, ‘म्हातारे बस की आता थकली असशील…’
तिला मात्र, ‘ बहिरे, मर की आता थकली असशील…’ का कोण जाणे पण, असं ऐकू येतं… मी का मरू ? असं म्हणत, यानंतर ती छत्री घेऊन मला मारण्यासाठी माझ्या पाठी लागते… !
अशा सगळ्या गंमती जमती… जे ऐकायला यायला हवं तेच ऐकायला येत नाही….
तर ही ताई आता याच मोठ्या मंदिराच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागली आहे.
अत्यंत ओंगळवाण्या, दीनवाण्या अवतारात हिला पाहिली होती… आता जेव्हा हिला रुबाबदार युनिफॉर्म मध्ये पाहतो, तेव्हा मला काय वाटतं… ? मी शब्दात सांगू शकत नाही…!
एके दिवशी म्हातारी आली आणि माझ्या कानात ओरडून म्हणाली, ‘दाद्या आता मी मरायला मोकळी झाले…’
मी पण तेवढ्याच प्रेमानं तीला कानात ओरडून सांगितलं, ‘म्हातारे मरू नको इतक्या लवकर…’
बहुतेक तीला “म्हातारे मला मारू नको” असं ऐकू आलं असावं…. ती माझ्या गालाचे, हाताचे मुके घेत म्हणाली, ‘भयनीचं इतकं करतुस दाद्या, आता मी तुला न्हायी मारणार… न्हायी मारणार…!
.. .. असं म्हणत ती माऊली अश्रूंचा अभिषेक माझ्या हातावर करते… मी तीला कानात ओरडून म्हणतो, ‘ म्हातारे, काळजी करू नकोस, तीला मी बहीण म्हणून स्वीकारलं आहे…. तीचा हात मी कधीच नाही सोडणार.. तुज्या शप्पत…’
– ही संपूर्ण वाक्ये मात्र जशीच्या तशी बहिऱ्या म्हातारीला ऐकू जातात… शेवटी आईच ती….!
‘ न्हायी सोडणार ना भयनीचा हात….? न्हायी सोडणार ना भयनीचा हात….?? ‘ माझ्या पाठीवरून खरबरीत हात फिरवत ती दहा वेळा माझ्याकडून वदवून घेते… मला तिच्या चेहऱ्यावर माय दिसते…. डोळ्यात गाय दिसते….!
30 एप्रिल 2024….. भारतातील ‘स्क्रेपरबोर्ड चित्रकला’ या अत्यंत कठीण विषयातील अग्रगण्य मानले जाणारे चित्रकार – श्री. शंकरराव फेणाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा रंजक माहितीपट अवश्य पहावा असाच आहे.
जवळपास ५५ वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमधील फोटो व जाहिराती उत्तमरित्या छापून येण्यासाठी फोटोग्राफीचे तंत्रज्ञान फारसे विकसित न झाल्याने, ‘स्क्रेपर बोर्ड’ ही अत्यंत कठीण, ब्रिटिश शैलीची चित्रकला वापरली जाऊ लागली.
एका पुठ्ठ्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसचा जाड लेप देऊन, त्यावर काळी पेलिकन शाई ओतून ती वाळल्यावर, एका अत्यंत सूक्ष्म टोकाच्या ‘निब’ने, उभ्या – आडव्या रेषा कमीजास्त वजनाने कोरून, त्या तयार झालेल्या टिंबांच्या सहाय्याने चित्र निर्माण करत असत . शिल्प तयार करताना जसा दगडातील नको तो भाग काढून टाकतात त्याप्रमाणे अत्यंत ‘सूक्ष्मतम’ असे हे काम असे. एखादे टिंब जरी चुकले, तरी संपूर्ण चित्र वाया जाण्याची शक्यता असल्याने, लक्ष पूर्णपणे केंद्रित करून, काटेकोरपणे, अचूक चित्र त्यातून निर्माण करावे लागे. छापताना हे चित्र उलटे छापले जाणार, हे लक्षात ठेवून, बारकाईने लक्ष ठेवून हे अत्यंत कठीण काम तासन् तास म्हणजे सलग जवळपास 18…20 तास करावे लागे. यात माझे बाबा शंकरराव फेणाणी यांचा हातखंडा होता. त्यांचे नेमके काम पहायचे असेल तर … प्रत्येक फोटो मोठा करून पाहिल्यास प्रत्येक बिंदूची कल्पना येईल. आणि ही चित्रे काढणे हे किती अवघड, किचकट आणि वेळखाऊ काम आहे याचीही जराशी कल्पना येईल.
भारतातील अगदी तुरळक आणि उत्तम ‘ स्क्रेपरबोर्ड आर्टिस्ट’ पैकी ते अग्रगण्य मानले जात.
माझे वडील म्हणून तर मला ते सदैव वंदनीय आहेतच. आज एक उत्तम आणि दुर्मिळ कलाकार म्हणूनही त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माझे त्यांना शतश:प्रणाम.
मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत. मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.
आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात. काही कालपरत्वे स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात. घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत इतके जवळचे असतात ते!
मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.
अशी एक सर्वसाधारण भावना,समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल पण माझा मात्र अनुभव असा नाही. सत्तरीनंतर माझी अनेक परिवाराशी अॉनलाईन मैत्री झाली आणि काय सांगू? किती नावं घेऊ? प्रत्येक जण माझ्यासाठी जिवलग आहे. माझ्या हाकेला ‘ओ’ देणारी अनमोल रत्ना सारखी माणसं मला इथे भेटली आणि याची जाणीवच मला खूप सुखद वाटते.
पण तरीही भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात. पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे. स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री.’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.
कुठलीही समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन् पडून जखमी झाले, कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत. खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली. आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,
“ती गेली” अशा बातम्या कानावर येतात पुन्हा ती चिंचाबोरं, त्या लंगड्या, फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.
त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss”
या नावाने इथे मला हाक मारणारं कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.
“भारतीsss”
दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही भान आम्हाला राहिले नाही. वयाचेही नाही.
“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..!”
यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.
मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात, प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता. त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,
“मै हूँ ना!”
माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.
कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम् यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो, तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला, माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस.”
जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने,काळजीने, मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला.”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.
जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतेच. हे सारे संस्कार मित्र! यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या. कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.
माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.
तशी तोंडावर गोड बोलणारी,’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.
माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं. भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.
मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.
१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर मानला जातो. या निमित्ताने एक आठवण.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असताना आमच्या प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागातर्फे काही समाजाभिमुख उपक्रम चालवले जात असत. त्यापैकी ‘असंघटित कामगार’ या विषयाचा मी समन्वयक होतो. असंघटित कामगारांची अनेक वैशिष्ट्ये मी अभ्यासली होती.अनेक ठिकाणी ही सांगतही होतो. त्यापैकी एकाचा नेमका अर्थ मला एका घटनेतून समजला.
नवरात्रीनिमित्त बरीच खरेदी करायची होती. सारासार करून मी मंडईत गेलो.सायंकाळची वेळ होती.मंडईचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.हे टाळण्यासाठी मी बाहेर बसलेल्या एका बाईकडं गेलो.
” बोला दादा” मला पाहून ती बाई सावरत बसत मला म्हणाली. घट,माती,फुलं वगैरे यादीतल्या बहुतेक वस्तु मला तिथं मिळाल्याने मी खुष होतो.सगळं झाल्यावर ,” किती झाले?” असं विचारल्यावर तिनं आकडा सांगितला.
“नक्की द्यायचे किती?”
“पाच कमी द्या”.
” नाही मावशी.राऊंड फिगर देतो” असं म्हणून मी दहा रूपये वाचवले.
माझा हा आनंद पुढं टिकला नाही.
मला आठवलं माझ्या मोबाईलचं कव्हर अक्षरश: फाटलं होतं.एका दुकानात गेलो.
” बोलो सर”.
मी माझा मोबाईल दाखवून नवीन कव्हर मागितलं.दुकानदारानं किंमत सांगितली.
” नक्की द्यायचे किती “?
माझा प्रश्न ऐकताच त्यानं भिंतीवरच्या प्राईस लिस्टकडं बोट दाखवलं
” रेट फिक्स है|” हे वाक्य ” घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर फुटा” अशा टोनमध्ये म्हटलं. कव्हर बसवल्यावर त्यानं सांगितलेली रक्कम देऊन मी दुकानाबाहेर पडलो.
असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून एखादी वस्तु किंवा सेवा घेताना ग्राहकांची बार्गेनिंग पाॅवर जास्त असते.संघटित क्षेत्रात मात्र अशी घासाघीस करता येत नाही हे त्या घटनेतून मला समजलं.
☆ “भिकूसासेठ…” – संकलन : श्री माधव सावळे☆ श्री मोहन निमोणकर ☆
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी साडेसहाची वेळ. मित्राचं पेठेत दुकान आहे. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो. येता येता त्याच्याकडे डोकावलो.
आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो. दुकान चालतंय कसलं… पळतय.
नीचे दुकान ऊपर मकान.
जनरल कम किराणा.
दूध, ब्रेड, बटर, अंडी, केक, बिस्कीटं,
घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून गर्दी करायची.
दुकानापाशी पोचलो. दुकानासमोरचा डांबरी रस्ता. तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला. पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी बादली. मित्रानं पाण्याचा छान सडा घातला होता.
पाण्याचा छान ओलेता वास येत होता.
पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.
मी दुकानात शिरलो. पाठोपाठ वहिनी सुद्धा घरात शिरली. पाच दहा मिनटं गप्पा झाल्या. मग बेल वाजली.
दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला. बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.
घुटक घुटक चहा घेत होतो. एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला. पांढरा शुभ्र पायजमा. पांढरा बंडीसारखा शर्ट.
डोक्यावर गांधी टोपी.
“नमस्कार मालक. कसे आहात ?”
मित्र लगेच उठला. काऊंटरची फळी उघडून त्यांना आत घेतलं. बसायला खुर्ची दिली. पटकन वरची बेल वाजवली.
पाच मिनटात पुन्हा चहा आला. एकंदर बडी आसामी असावी.
“मालक एक विनंती आहे. वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते. तू देवाला हारफुलं वाहतोस. उदबत्ती लावतोस.
प्रसन्न वाटतं. पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावर. ते नको करत जाऊस बाबा. पाणी वाया जाते अशान्.
पाण्यामदी जीव असतो. पाणी देव हाये आमच्यासाठी. देवाचा अनमान करू नका माऊली… “
पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले.
” कोण हे ?” मी विचारलं.
‘तू ओळखलं नाहीस ?’
‘नाही बुवा.
‘भिकूसाशेठ. चोपडा ज्वेलर्सचे मालक. एकदम सज्जन माणूस. सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष. शून्यातून उभं केलंय सगळं. एम जी रोडवरची मोठी पेढी. उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच. घनो चोखो धंदो. पण म्हाताऱ्याला वेड लागलंय. सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो. कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला, की हात जोडून उभा राहतो. पाणी वाया घालवू नका म्हणतो. लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात.. तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले. आपला गाव कसाय तुला माहित्येय. बहुतेक नळांना तोट्याच नाहीत. पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात. शेकडो लीटर पाणी वाया जातं. भिकूसाशेटच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.
शेटच्या हातात एक पिशवी असते.
पिशवीत पान्हा आणि तोट्या. वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो. तोटी लावून देतो. स्वखर्चानं…!! मान्य की पाणी वाया जातं. पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते. जरा गारवा वाटतो. हे याला कोण सांगणार? बरं, इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात कसं पोचेल?म्हाताऱ्याची सटकलीय, झालं.
“मला हे माहितच नव्हतं. मला यात स्टोरीचा वास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला. तो आणखीन एका दुकानात शिरला होता. ” सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका हो. “
त्याची आर्जवं, त्याची विनवणी.
त्याच्या हातातली पिशवी, तोट्या.
सगळं रेकाॅर्ड केलं. न्यूज चॅनलला पाठवून दिलं.
पेपरमधे छापून आलं. म्हातारा एका रात्रीत फेमस झाला.
तरीही बदलला नाही. त्याची रोजची प्रभातफेरी चालूच राहिली.
आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली. डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले. उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.
ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला,
“‘मारवाडातलं गाव होतं माझं…. पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.
एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.
पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग…. !!*