मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “यशाची गुरुकिल्ली…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

 

??

☆ “यशाची गुरुकिल्ली…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

प्रसिद्ध टेनिसपटू जोकोविक म्हणतो,

“मी अजून निवृत्त झालो नाही. कारण माझ्यात अजूनही रॅकेट हातात घेऊन खेळण्याची उर्मी आहे, खेळाबद्दल प्रेम आहे. माझ्यात अजूनही ते लहान मूल दडले आहे ज्याला जिंकायची इच्छा आहे.”

जे मला करायची ओढ आहे ते करण्याची माझी मनापासून इच्छा हवी. तीव्र भावना, जिद्द, तळमळ हवी. स्वतःला झोकून द्यायची तयारी हवी.

ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, किंवा आपला चालू व्यवसाय वाढवायचा आहे, कंपनी नावारूपाला आणायची आहे त्यांच्यासाठी मी माझ्या अनुभवातून जे शिकले, ज्यांना मी आदर्श मानले, त्यांच्याकडून जे शिकले ते सांगू इच्छिते.

सर्वात महत्वाचे म्हणजे जे उत्पादन आपल्याला करायचे आहे त्याचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

नसेल तर त्याचा अभ्यास करा. शिकून घ्या. जे आपल्याला येतंय त्यातच शक्यतो हात घालावा.

उदाहरणार्थ जर एखाद्या स्रीला उत्तम स्वयंपाक येत असेल व विविध पाककृती करून बघायची हौस असेल तर तिचा केटरिंगचा व्यवसाय उत्तम चालेल. माझी धाकटी बहीण निशा हिने केटरिंगचा व्यवसाय कसा असावा याचा आदर्श घालून दिला. ग्राहकाची तृप्ती, समाधान हे तिचे उद्देश्य असायचे. त्यामुळे तिच्याकडे बनणारा पदार्थ हा चवीने उत्कृष्ट, दिसायला चांगला आणि आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध असायलाच पाहिजे हा तिचा कटाक्ष असे परंतु मला एखादे विद्युत उपकरण बनवायचे आहे.

माझ्याकडे पुरेसे ज्ञान नाही तर वाचून, अभ्यास करून मी माहिती मिळवू शकते. ज्याला त्याचे ज्ञान आहे अशा व्यक्तीची पगारी नेमणूक करू शकते.

काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, तळमळ महत्वाची. ती असेल तरच अंतीम ध्येयाचा पाठपुरावा केला जातो. अर्थात ही कळकळ माझ्या एकटीत असून चालणार नाही. मी समूह प्रमुख असेन तर माझ्या सहका-रांमधे सुद्धा तितकीच तीव्र भावना असायला हवी. त्यांच्यात ती निर्माण करण्यासाठी, सतत तो अग्नि जळता ठेवला पाहिजे. त्यांच्यात स्फूर्ती, प्रेरकता निर्माण करता आली पाहिजे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त.

शिस्त अंगात बाणावी लागते.

उदा. माझे ऑफीस सकाळी नऊ वाजता उघडायचे. मी सकाळी लवकर उठून, घरातली कामे उरकून नऊच्या आधी ऑफीसला पोहचायचे.

मला कुठे मस्टर साईन करायचे होते?

परंतु मी वेळेवर पोचले की सहकर्मचारी वर्ग, मदतनीसांना आपोआप शिस्त लागते.

शिवाय नेमलेली दैनंदिन कामेही झालीच पाहिजेत. उदा. इमेल्स चेक करणे, प्रत्येकाला उत्तर देणे, स्टाॅक चेकिंग, अकाउंट्स, लेजर वगैरे.

तसेच स्टाफचा पगार, सप्लायर्स ची देणी, कर भरणे.. सर्व वेळेवर झालेच पाहिजे. ग्राहकाला दिलेल्या “डेड लाईन्स” सांभाळणे ही जबाबदारी असते. त्यासाठी शिस्त लागते. “हो जायेगा” ही वृत्ती चालत नाही.

अमेरिकेचे प्रेसिडंट ओबामा यांनी त्यांच्या ऑफीसच्या टेबलावर एक पेपरवेट ठेवला होता. त्यावर लिहिले होते,

‘द बक स्टाॅपस् हिअर.’

म्हणजे पासिंग द बक नाही. आपले काम दुसऱ्यावर ढकलून, किंवा आजचे काम उद्यावर ढकलून मोकळे होणे नाही.

तसेच आपण जेव्हा कंपनी चालवतो तेव्हा त्या कंपनीची प्रतिमा निर्माण करावी लागते.

कंपनीची तत्त्वं, आदर्शमूल्ये ही पाळली गेली पाहिजेत.

ही कंपनी फसवणार नाही, यांचे उत्पादन विश्वासार्हच असणार, कंपनीच्या मालाची गुणवत्ताही इतरांपेक्षा चांगलीच असणार याचा ग्राहकाला विश्वास हवा.

जर प्राॅडक्ट डिफेक्टिव निघाला तर तो परत घेतला जाईल ही विश्वासार्हता हवी.

उदा. आज अमॅझाॅन कंपनीतून आपण का शाॅपिंग करतो?कारण वस्तू पसंत नसेल तर ती आपण परत करतो व त्याचा परतावा आपल्याला मिळतो.

आमॅझाॅन कंपनीचा निर्माता जेफ बोझेस याला १९९९ साली टाईम मॅगेझिनने ‘पर्सन ऑफ द इयर ‘, हा किताब दिला. तेव्हा तर त्याची कंपनी नुकतीच उदयास आली होती.

आज तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की त्याचा उपयोग केला पाहिजे. इनफर्मेशन टेक्नाॅलाॅजी मुळे डेटा कलेक्ट करता येतो. त्यामुळे ग्राहकांकडून फीडबॅक घेता येतो.

ग्राहकांना नेमके काय हवे ते समजून आपल्या प्राॅडक्ट मधे सुधारणा करता येते. ग्राहकाला अधिक चांगली वस्तू आपण देऊ शकतो. अॅमॅझाॅन कंपनी इतकी मोठी होण्याचे कारण अधुनिक तंत्रज्ञानाचा कुशल वापर.

आज डिझ्ने वर्ड आणि त्याचे थीम पार्कस् जगात प्रसिद्ध आहेत. पण हाच वाॅल्ट डिस्ने, १९३४साली त्याच्याकडे फक्त एक कॅमेरा होता. त्याच्या काकांच्या गराजमधे त्याने त्याचा स्टुडिओ थाटला. तिथे एक कार्टून फिल्म बनविली. उद्देश एकच, लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले पाहिजे. मग हळूहळू त्याच्या कंपनीचा पसारा वाढत गेला. पण कंपनीचे ध्येय तेच राहिले, मुलांना हसवायचे.

आज टाटा समूह ही इतका मोठा आहे. कंपनीची मूल्ये आहेत, देशाची प्रगती आणि समाजाची सेवा. जमशेटजी टाटा, जे आर डी टाटा, रतन टाटा या सर्वांनी ही मूल्ये जपली.

कंपनी प्रगतीपथावर ठेवायची, कंपनीची प्रतिष्ठा सांभाळायची, म्हणजे पावलोपावली अडचणी तर येणारच.

संघर्ष तर करावाच लागणार. या संघर्षांवर मात करायची एक मानसिकता बाळगावी लागते.

धीरूभाई अंबानी म्हणायचे, ” माझ्यावर संकट आले की मी स्वतःला समजवायचो की ही एक संधी आहे नवीन शिकण्याची. “

या मानसिकतेमुळे व अथक परिश्रमामुळे त्यांच्या कंपनीने इतकी मोठी भरारी घेतली.

अर्थात या सगळ्या गोष्टी झटक्यात होत नाहीत. त्यासाठी धीर लागतो. यश एका रात्रीत मिळत नाही. संशोधक बुद्धी लागते. वरचेवर तपासणी अथवा आपणच आपले परीक्षण करणे जरूरीचे असते तसेच सातत्य आणि गतीशीलता लागते. जी तुम्ही रोजच्या कामातून प्राप्त करता. मोठ्या चाकाला फिरायला वेळ लागतो. मग त्याला जोडलेले लहान चाक मोठ्या गतीने फिरते. पण एकदा गती आली, की पुढे काहीच थांबवू शकत नाही.

याचं नाव – यशाची गुरुकिल्ली.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

आपण वारीला जाताना कसं जावं? वारकरी जसे जातात तसं जावं. आपलं शिक्षण, आपली सामाजिक ओळख, आपल्या भोवती असलेलं वलय हे सगळं सगळं सोडून निर्मम होऊन वारीला जावं. जाताना आपली मनाची, बुद्धीची झोळी रिकामीच न्यावी अन् वारीच्या वाटेवर ती अपार प्रेमानं, भक्तीनं, जिव्हाळ्यानं गच्च भरुन आणावी. ती अनुभवांची शिदोरी पुढं आयुष्यभर पुरते. “एक तरी ओवी वाचावी आणि एकदा तरी वारी अनुभवावी” असं कुणी उगाचच म्हटलेलं नाही.

कुठल्याही विशेष ओळखीशिवाय केवळ वारकरी म्हणून महिनाभर जगणं, हा मनाचे डोळे उघडणारा अनुभव असतो. आपली ज्ञानेंद्रियं सुद्धा विठ्ठलमय झालेली असतात. डोळ्यांनी संतभार पाहायचा, वाणीतून हरिनामाचा गजर करायचा, कानांनी कीर्तनं- प्रवचनं- हरिजागर ऐकायचे, नाकानं गंध बुक्क्याचा वास साठवून ठेवायचा अन् कुठल्याही अपेक्षेविना पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. निरपेक्ष भावानं आणि अत्यंत साधेपणानं महिनाभर जगता आलं तर खरोखरच खूप मोठं समाधान आहे.

तरडगाव मुक्कामी पालखी तळापाशी बसलो होतो. कालचं नीरा स्नान डोळ्यांसमोरून हलत नव्हतं. आणि आज उभं रिंगण पाहिलेलं.. डोळ्यांचं पारणं फिटायला याहून वेगळं काही लागत नाही. झाडाखाली बसलो अन् मोबाईल मध्ये ब्रेकिंग न्यूज बघत होतो. ब्रेकिंग न्यूज बहुतांशी नकारात्मकच असतात. शेजारी एक माऊली येऊन बसल्याचं जाणवलं होतं, पण चेहरा पाहिला नव्हता. एक चहावाला आला, तसा माऊलींनी दोन कप चहा सांगितला.

“कसं असतंय माऊली, तुमी कशे पन वागा ओ. फक्त काय पन करन्याआदी एक डाव सोताच्या मनाला इचारा. मी जे काय करतोय ते द्येवाला आवडंल काय? बास.. मग तुमचं उत्तर काय येतंय बगा. जर असा इचार करुन मानुस वागंल तर जग लय सुखात नांदल.. ” 

” पण समजा, मी असा विचार केला की, कुणाला आवडो न आवडो, मी मला जे पटेल तेच करणार. तर मग?” मी म्हटलं.

” मग काय.. आता त्येच चाललंय की सगळीकडं. जो तो निस्ता आपलाच इचार करतुय. दुसऱ्याचा इचार कशाला करायचा म्हनत्यात लोकं. त्यामुळंच सगळं बिगडलंय. ” 

” अहो पण आपण जरी दुसऱ्याचा विचार केला तरी कुणीतरी आपला विचार करायला नको का? दर वेळी आपणच सगळ्यांचा विचार करायचा का? मग आपलं काय होणार?” 

“असं म्हनतासा.. बरं.. ” असं म्हणत त्यांनी मांडी बदलली. अन् मला म्हणाले, ” हाच इचार माऊलींनी अन तुकोबांनी क्येला असता तर ओ?” त्यांचा आवाजातला खर्ज इतका अमोघ होता की, मला बसल्याजागी कंप सुटला.

“मी माजं माजं बगतो असं तुकोबा कदी वागले न्हाईत. घरची सावकारी होती त्येंच्या. तालेवार मंडळी.. गावात लय इभ्रत हुती. वाडा हुता. कामाला गडी मानसं हुती. मोप पैसा अडका, सोनं-नानं हुतं. सोतापुरतं बगायचं ठरिवलं असतं तर कुनाला काय येगळं वाटलं नसतं. ” त्यांचं सडेतोड बोलणं मनाला चरे पाडत होतं.

“सगळं आमचंच हाय, आमीच कमावलेलं हाय, असं ते म्हनले न्हाईत. ” 

“अहो पण घरच्यांचं काय? त्यांचा विचार नको का करायला?” मला डोळ्यांसमोर तुकोबांच्या कुटुंबियांचा त्रागा दिसत होता.

“करा की. धा वेळा करा. पन तुमची पिढी इचार करत न्हाई. निस्ता खर्च करती. त्येला तुमी इचार म्हनता. आमी त्येला इचार म्हणीत न्हाई. येडेपना म्हनतो. ” त्यांनी एक भेदक यॉर्कर टाकला.

“असा काय वेडेपणा करतो आम्ही?” विकेट उडायचीच होती, ती उडालीच..

“सांगू म्हनता? बरं.. सांगतो.. ” असं म्हणत त्यांनी पुन्हा मांडी बदलली. माऊली कुणाच्या रूपानं येऊन आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतील, सांगता येत नाही. अन् तुम्ही कितीही सावध असलात तरीही त्याक्षणी ते ओळखता येत नाही.

“आता तुमी वारीला आलासा. आमीबी आलुया. तुमचं एकट्याचं सामान किती अन् माजं किती ? जरा बगा बरं.. ” 

मी बघितलं. माझ्याकडं एक हॅवर सॅक, एक छोटी सॅक आणि एक स्लिंग बॅग होती. आजोबांपाशी फक्त एकच धोपटी होती. माझ्याकडं झील आणि डकथलॉन असे दोन रेनकोट होते, एक योगा मॅट होतं, एक हवा भरून वापरायची उशी होती, एक चादर होती, एक पातळ शाल होती. त्यांच्यापाशी फक्त एक पंचा आणि वीस रुपयांत मिळणारं पॉलिथिनचं ईरलं होतं. तेच ईरलं मल्टीपर्पज होतं. पावसात तेच, वाटेत कुठं बसायला तेच अन् रात्री झोपायला तेच.. पंचासुद्धा मल्टीपर्पज.. आंघोळीसाठी, उन्हासाठी, झोपताना पांघरण्यासाठी तोच वापरायचा.. ! माझ्याकडं कपड्यांचे आठ जोड, यांच्याकडं फक्त दोन.. ! माझ्याकडं सँडल वेगळे, शूज वेगळे, स्लिपर्स वेगळ्या, ह्यांच्याकडं एकच चप्पल, तीही प्लॅस्टिकची.. ! माझ्याकडं वारकरी टोप्यासुद्धा चार होत्या, त्यांच्याकडं एकच.. ! 

मी ओशाळून त्यांच्याकडं पाहिलं. ते हसले. ” कसंय माऊली, तुमी जितके लाड करताल ना, तेवडे सुस्त व्हाल. कशाला येवडे लाड करता शरीराचे ? काई होत न्हाई. मी तीस वर्षं झाली, अशीच वारी करतोय. माजं कुटं काय बिगडलं ओ?” ते हसले. मला हसावंच लागलं.

खरं होतं त्यांचं. आपल्याला नीट जगताच येत नाही. मनात आल्याक्षणी हवी ती वस्तू विकत घेता यायची ऐपत आली की, आपल्याला ते यश वाटतं. घरात ताजं सकस अन्न तयार असतानाही केवळ मूड आला म्हणून आपण बाहेर जाऊन खातो किंवा बाहेरून अन्न घरी मागवतो. मनात आलं की नवे कपडे, मनात आलं की नव्या वस्तू, आणि आजकाल मनात आलं की नवी नातीसुद्धा.. ! सहा सात वर्षं झाली की, आपल्याला घरचं उत्तम इंटिरिअर जुनं वाटायला लागतं, फर्निचर ओल्ड फॅशन्ड वाटायला लागतं. दहा पंधरा लाख रुपये खर्चून घराला नवा लुक देणं ही आपल्याला चैन नसून गरज वाटते. रात्री अपरात्री वाटेल ते मागवून खाणं, वाटेल तेव्हा झोपणं, वाटेल तेव्हा उठणं यात आपल्याला काहीही गैर वाटत नाही. खरंच आपल्याला नीट जगताच येत नाही. एका क्षणात माझ्या मनात किती विचार येऊन थाडथाड थपडा मारुन गेले.. ! 

“वारी आपल्याला जगाया शिकवती ओ. कसं ऱ्हावं, कसं जगावं, काय खावं, कदी खावं, किती खावं, कदी झोपावं, कदी उटावं सगळं हितंच शिकतोय मानुस. पन तयारी होवी ओ. ” 

दरवर्षी नियमितपणे वारी करणारा अगदी साधा माणूस माझ्यासमोर बसला होता. तो काही कीर्तनकार, प्रवचनकार नव्हता. नित्य एकादशी करणारा निष्ठावान माळकरी होता. रोज हरिपाठ म्हणणं आणि उठता बसता ‘राम कृष्ण हरी’ म्हणणं एवढाच काय तो त्याचा सांप्रदायिक अभ्यास. पण प्रभाव मात्र मोठा. आता लहानपणापासून बारा महिने तेरा काळ नाव घेऊन घेऊन त्याची हरिनामाची किती पुरश्र्चरणं झाली असतील, कुणास ठाऊक.. पण हरिनामाच्या सहवासात राहून चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांच्या पल्याड निघून गेलेला एक साधा माणूस किती तत्वनिष्ठ होऊ शकतो, याचं उदाहरण मी समक्ष अनुभवत होतो.

“आपला सोतावर ताबा असला की सगळं बरोबर हुतय. काय पन असो, किती बी आग्रीव झाला तरी दोन भाकरी च्या वर मी जेवीत न्हाई. ठरल्या येळी जेवतो. आज जेवाया काय केलंय म्हनून घरात इचारत न्हाई, समोर वाढलेलं गप खातो. आपन अन्नाचा अव्हेर केला न्हाई तरच पांडुरंगाचा आशीर्वाद. अन्न म्हनू नका, मानुस म्हनू नका, कुनाचाच मान ठेवला न्हाईत अन् दर एकादशीला जरी पंढरपूरला गेलात तरी पांडुरंग भेटनार न्हाई. ” मी जे ऐकत होतो, तोच जगण्याचा खरा नेम होता. भूतदया आणि माणूसधर्म हा माऊलींचा विचारच मला ऐकू येत होता.

पालखी तळावर जाग होती. दिंडी भजन करत होती. बाकी सगळे तंबू, राहुट्या, पाली झोपेच्या अधीन झालेले होते. टाळ मृदंग उशाशी ठेवून वारकरी झोपून गेले होते. कितीतरी दिंड्यांमधून मी फिरून आलो, पण हातात मोबाईल घेऊन बसलेले वारकरी मला जवळपास दिसलेच नाहीत. हरिपाठ, भजन, प्रवचन, भोजन आणि निद्रा.. बास.. ह्यात व्हॉट्स ॲप नसतं, टीव्ही सिरीयल नसतात, ब्रेकिंग न्यूज नसतात, रिॲलिटी शो नसतात. असतं ते फक्त पांडुरंगाचं नामस्मरण.. !

आता हे चालून चालून थकलेले वारकरी पहाटे तीन वाजता उठतील, कुठल्याशा नळावर जाऊन दात घासतील, प्रातर्विधी आटोपतील, त्यांच्या टँकर वर किंवा एखाद्या नळ कोंडाळ्यावर जाऊन आंघोळ करतील आणि गंध बुक्का लावून धावत पळत माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतील. पहाटे पाचाच्या आत दर्शन व्हायला हवं, माऊलींची पहाटपूजा सुरु व्हायच्या आत.. ! हरिनाम अन् हरिदर्शन यांच्याशिवाय तिसरा विचार करायला वेळ आहेच कुणाकडं? ही अशी माणसं जगण्याच्या प्रॅक्टिकल तत्त्वज्ञानाचा ठसा उमटवून जातात.

“दुःख कुनाला चुकलंय व्हय ? आता आमाला काय कमी व्याप हाय काय डोक्याला? थोरला पोरगा सरकारी नोकरीच पायजेल म्हनून पुन्याला गेला, धा वर्षं ऱ्हायला. परीक्षेत नंबर काय आला न्हाई. पन तीस लाख खर्च जाला. दीड एकर शेती इकली. तेवड्या रकमेत गावच्या बाजारात पाच गाळं बांधलं असतं तर वर्षाला पाच लाख तरी मिळालं असतं. पन आता सांगतूय कुनाला ? ज्याचं त्याचं नशीब म्हनायचं अन् पुढं जायाची वाट धरायची. पुढची वाट काय माजा पांडुरंग बंद करीत न्हाय. काई तरी मार्ग दावणारच तो.. !” 

“बाकी कोण कोण असतं घरी?” 

“हाये तर. धाकटा पोरगा हाय. बारावी शिकून घरात बसलाय. म्हनतोय, तेच्यासाठी दीड एकर काढली, तशी माज्यासाठी पन काढा अन् मला जेसीबी घेऊन द्या, नायतर ट्रॅक्टर घेऊन द्या. आता धा एकरातली दीड एकर आदीच गेली, परत दीड एकर काढली तर कसं होनार ओ? अशी तुकड्या तुकड्यानं जमीन गेली तर पोटाला खायाचं काय?” 

पोटातली व्यथा कधीतरी अशी उफाळून वर येतेच. आपण कुणीही असलो तरीही त्रास, कटकटी चुकत नाहीतच. आपण त्यातून तरुन जाण्यासाठी कोणता मार्ग धरतो हे महत्त्वाचं. ज्यांचा मार्ग योग्य असतो, त्यांच्यासमोरचे प्रश्न कितीही कठीण असले तरीही उशिरा का होईना ते सुटतात. ती श्रद्धेची नौका फार भक्कम असते. त्यामुळं, त्या नौकेतली माणसं हिंमत बांधून असतात. ज्ञानोबा- तुकोबांचा खरा पाईक सहसा नैराश्यात अडकलेला दिसत नाही.

“आमची मंडळी टीपं गाळती. पन मी आपला पांडुरंगावर हवाला ठिवून बसलोय बगा. आता जायाचंच असंल तर सगळंच धुवून निगंल अन् ऱ्हायाचंच असंल तर राईल बी. त्येचा इचार तरी किती करायचा ओ.. मी आयुष्यात कदी पांडुरंगाकडं काय मागितलं नई. पैसा नई, अडका नई, जमीन नई, काईच मागितलं न्हाई. तुजा ईसर पडू देऊ नगंस येवडं एकच मागनं हुतं. ते त्यानं नेमकं ऐकलं. बास.. अजून काय पायजेल.. ” प्लास्टिकच्या इरल्याची पथारी पसरलेली होती, त्यावर आडवं होत ते बोलले. अन् रामकृष्ण हरी म्हणत एका मिनिटांत झोपलेसुद्धा.. !

ज्ञानोबा- तुकोबांनी माणसांच्या मनांमध्ये भक्तीचं, श्रद्धेचं आणि निर्मळ भावनेचं जे पीक पेरलेलं आहे, त्याचं माप आजही महाराष्ट्राच्या पदरात किती भरभरून पडतंय, याचा दृष्टांत वारीतल्या मुक्कामी झाला. वारीच्या दिवसांत माऊली कधी ना कधी तरी, कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांचं अस्तित्व दाखवून जातातच. ” माझं चांगलं लक्ष आहे हं तुझ्यावर” असं अगदी स्पष्ट जाणवून देतात. झोप केव्हाच उडाली होती अन् मी दिगमूढ होऊन बसून होतो. पालखी तळावर माऊलींच्या समोरच्या अभंगाचे सूर कानी पडत होते…… ” हेचि दान दे गा देवा.. तुझा विसर न व्हावा “…

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सायीचं पातेलं खरवडून खाणे : एक संस्कार” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सायीचं पातेलं खरवडून खाणे : एक संस्कार”  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गेले काही वर्ष हे जाणवतं आहेच आणि वाढतच चाललं आहे. आधीच सांगतो कि माझं बालपण छानपैकी गेलं. दरवर्षी नवीन पुस्तक, दिवाळीला नवीन कपडे, फटाके. सगळ्या सणांना भरपूर पाहुणे आणि गोड-धोड. दारिद्रय वगैरे काही खास सोसावं लागलं नाही. पण तरीही गेल्या २-३ आठवड्यात असे प्रसंग घडले कि हे लिहावं वाटू लागलं.

प्रसंग १ :

हा.. तर परवा एका मित्राकडे गेलो होतो. रात्री सहज गप्पा मारायला. त्याच्या बायकोने छान हापूस आंबे चिरले. अगदी बाठीला लागून चिरले. गोड होते आंबे. आंब्याच्या फोडी खाऊन झाल्या आणि ती ते सगळं टाकायला उठली.

“अहो वाहिनी त्या बाठी राहिल्या आहेत अजून” 

“राहू दे हो भाऊजी इतकी काही गरिबी आली नाही आहे, जाऊदे ते आता. अजून आंबे चिरू का?”

“आहो गरिबीचा प्रश्न नाही, पण अजून गर आहे त्याला. आपल्याला नको पण मुलांना बोलवा. मजेत चोखतील. ”

तेवढ्यात दुसऱ्या मित्राची बायको म्हणाली “नको.. सगळं तोंड बरबटून ठेवतील… मग उठा.. त्यांना धुवा.. जावु देना… छान गप्पा रंगल्या आहेत”

मला पुढच्या गप्पा नीट ऐकूच आल्या नाहीत.

☆ ☆ ☆ ☆

 प्रसंग २:

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून आम्ही चार मित्र फॅमिलीसहित महाबळेश्वर ला गेलो होतो. हॉटेल मध्ये सकाळचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. आम्ही ब्रेकफास्ट घेत होतो. मित्र त्याच्या मुलाला सांगत होता. “सगळं भरभरून घेऊन ठेव, मी परत परत उठुन रांगेत उभा रहाणार नाही” त्याचं ८ वर्षाचं कार्ट दोन हातात दोन डिश घेऊन चालत होत आणि मित्र आपल्याबरोबर त्याची डिश भरून देत होता. टेबलावर तो मुलगा आला तेव्हा त्याच्या डिश मध्ये पुरी भाजी, मेदू वडा, चिकन सॉसेज, फ्रुटस, ऑम्लेट, पाव, अमूल बटर, कॉंफ्लेक्स, मंचुरियन होते. मित्राने त्याला बसवले आणि हातातला ग्लास भर ज्यूस त्याच्यासमोर ठेवला.

अजून दहा मिनिटात त्या मित्राची बायको शेजारच्या टेबलावरून त्यांच्या मुलाला ओरडत होती. “जाईल तेवढंच खा, बाकीचं टाकून दे”

आमच्याकडे वळून म्हणाली.. “नाहीतर खा-खा खातील आणि मग पोट धरून बसतील. दोन दिवस सुट्टी मिळालीये त्यात यांच्या मागे धावायची माझी अजिबात इच्छा नाही आहे. ” 

तसही आम्ही आराम करायला गेलो होतो. पुढचा काही प्लॅन नव्हता. मुलाला २-३ वेळा हवं तेवढच घेऊन दिलं असत तर काही बिघडलं नसतं. वाया तरी गेलं नसतं.. असो.

☆ ☆ ☆ ☆

प्रसंग ३ :

पिझ्झा पार्टी होती. तुडुंब पिझ्झा खाऊन झाला. मी खोकी गोळा करायला उठलो तर प्रत्येक खोक्यात पिझ्य्यांच्या कडांचा गोल केलेला होता. मागवलेल्या ६ 

पिझ्झानपैकी सगळे गोल पूर्ण करायला ५ कडा कमी होत्या. (त्यातल्या दोन माझ्या पोटात होत्या आणि अजून ३ कडांना माझ्यासारखा कोणीतरी धनी होता). म्हणजे बहुतेकांनी कडा खाल्ल्या नव्हत्या. खरं तर.. घरापासून ५ मि वर पिझ्झ्याचं दुकान आहे आणि आम्ही पण आल्याआल्या खाल्ला होता त्यामुळे कडा कडक वैगैरे होण्याचा पण चान्स नव्हता.

☆ ☆ ☆ ☆

प्रसंग ४ :

परवा दोन मित्र घरी राहायला आले होते. बायकोने सकाळचा चहा केला आणि सवयीने तिने दुधाचं रिकामं पातेलं आणि बारीक कड असलेला चमचा माझ्या पुढ्यात ठेवला.

एका मित्राने विचारलं “हे काय”

“विचारू नका भाऊजी. तुमच्या मित्राच्या घरची परंपरा आहे. सकाळी साय वाडग्यात काढायची. मग ते नुसतं दूध दुसऱ्या पातेल्यात गाळायचं. गाळणीत आलेली थोडीशी साय पण सायीच्या वाडग्यात टाकायची आणि मग कर्त्या पुरुषाच्या पुढ्यात दुधाचं रिकामं पातेलं खरवडायला द्यायचं….. मी आहे म्हणून या परंपरा पाळत टिकली आहे. दुसरी असती तर कधीच कंटाळून सोडून गेली असती”

सगळे हसले.

एका मित्राच्या बायकोने चिचारले. “पण मग तुम्ही सायीचे काय करता?”

“दही -लोणी – तूप”. “मग ती बेरी खायचा पण एक कार्यक्रम असतो.. सुंठ… पिठीसाखर…. काही विचारू नको”

माझ्या बायको ने विचारलं “तुम्ही काय करता सायीचं?”

“आम्ही चहाच्या गाळण्यातच दूध गाळतो मग साय पडते त्या गाळण्यातच.. उगाच दोन गाळणी कोण करणार”

“आणि मग तूप ?”

“चितळ्यांचं”

☆ ☆ ☆ ☆

तोपर्यंत सायीचं पातेलं खरवडण्यात माझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती. अशी साय खरवडताना माझी समाधी लागते. त्या चमच्या पातेल्याचा होणार कुर -कुर आवाज माझ्या कानीहि पडत नाही.

साय खरवडता खरवडता मी भूतकाळात गेलो होतो. माझे आजोबा सायीचं पातेलं खायचे, मग बाबा आणि आता मी (मी नसेन तर मुलं खातात आता). घरात दूध-दुभतं कधीच कमी नव्हतं पण काहीही टाकायचं नाही. पूर्णपणे संपवायचं हे संस्कार अशा सायीच्या पातेल्यातूनच झाले. आजी तर बेरीच रिकामं पातेलं पाणी घालून तापवायची, पाण्यावर तुपाचा तवंग दाटून यायचा तो काढून आजीचं निरांजन त्यावर दोन दिवस तेवायच.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आमरस काढून झाला कि मामा सगळ्यांना बाठी चोखायला द्यायचा. ज्याची सगळ्यात स्वच्छ त्याला १ वाटी एक्सट्रा आमरस ठरलेला.

रिझल्ट लागला कि सगळ्या जुन्या वह्यातील कोरी पाने फाडायची. बाबांना दाखवायची आणि मग त्याच्या बाइंडिंगच्या वह्या करायच्या. पुढच्यावर्षी शाळेला सगळ्या नवीन मिळायच्या पण बाइंडिंगच्या वह्या रफ वर्क / शुद्धलेखन यासाठी वापरायच्या.

घरी किराणाच्या पुड्या किंवा फुलपुडी यायची. आजीचं दोऱ्याचं एक बंडल होतं. कुठलीही पुडी आली कि आजी त्याचा दोरा सोडून त्या बंडलाबरोबर गुंडाळून टाकायची आणि आजोबा तो पेपर परत व्यवस्थित घडी करून रद्दी च्या पेपरात ठेवून द्यायचे. दोऱ्याचं बंडल नंतर हार/माळ करायला कामाला यायचे.

Reuse-recycle साठी आम्हला कधी शाळेत प्रोजेक्ट करावेच लागले नाहीत. टाकू नये – हवं तेवढंच घ्यावं, कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर वापर करावा हा संस्कार आहे. त्याचा तुमच्या पैशाशी, गरिबीशी, स्टेटस शी, शिक्षणाशी काही संबंध नाही. असं वागणं म्हणजे चिंधीगिरी, कंजूषपणा नव्हे. हा श्रीमंत “मध्यमवर्गीय” संस्कार आहे आणि त्या बाबतीत आम्ही नक्कीच श्रीमंत होतो.

टाकलेली साय, आंब्याची बाठ, पिझ्झ्याच्या कडा, अर्ध टाकलेलं ताट आणि मग हळूहळू टाकून देण्याचं काहीच वाटेनासं होतं. पुढे जाऊन ड्रॉईंग चुकलं म्हणून न खोडता सरळ चुरगळून टाकलेला कागद, सोल झिजला तर तो न चिकटवता टाकून दिलेला बूट, दर २-३ वर्षांनी बोर झालं म्हणून बदललेल्या गाड्या आणि थोडंसं नाही पटलं तर लगेच बदललेले बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड. आणि मग तक्रार “हि आजकालची पिढी म्हणजे…. ” 

“अहो- आता बास… त्या पातेल्याला भोक पडेल” – बायको सांगत होती. सगळे माझ्याकडे बघून हसत होते. मी माझ्या ध्यानातून बाहेर आलो. चमचा भरून सायीचा बोकाणा भरला… आहाहा… सुख!

मग… उद्यापासून सायीचं पातेलं खायला सुरवात करताय ना? ती गरिबी नाही… चिंधीगिरी नाही…

तो संस्कार आहे.

लेखक : योगिया

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळस माझी भाग्याची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “तुळस माझी भाग्याची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सखुबरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती.

पितळेचे तुळशी वृंदावन सखुनी लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून तुळशीची पूजा केली. हार घातला. भक्तीभावानी नमस्कार केला.

“बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल 

श्री ज्ञानदेव तुकाराम 

पंढरीनाथ महाराज की जय “

असा गजर करून सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल. म्हणाली,

तुळशीबाई चला निघुया वारीला…

हा सोहळा ईतरं झाडं कौतुकानी बघत होती.

” किती ग भाग्यवान दरवर्षी वारी घडते तुला “.

” ये गं बाई जाऊन… “

“विठुरायाला रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग”

असं म्हणून झाडांनी तिला हात जोडले.

” मी कुठली जाते…. सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते म्हणून घडतं बघा. येते हं जाऊन…

असं म्हणतं झाडांचा निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला….

खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा. ती या दिवसाची वाट पाहत असायची. दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा…

अभंग, गौळणी, हरिपाठ, ओव्या कानी पडायच्या.

साध्याभोळ्या फुगड्या खेळणाऱ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं. आनंदाने ती हरखुन जायची.

वरूणराजा बरसायचा.. ते पाणी अंगावर पडलं की तिला कृतार्थ झालो अस वाटायच.

रिंगणाचा सोहळा सुरू झाला की पळणाऱ्या आश्वाकडे ती आश्चर्याने बघायची.

दिंडीत चालताना शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग रुक्मिणी होती. तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या….

त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती.

सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याच ओझं सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तुळशीकडे बघायची. तुळशी बाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची….

” किती प्रेम करतेस ग “.. म्हणून सखूची आलाबला घ्यावी असं तिला वाटायचं.

मुक्कामी पोचल्यावर खाली ठेवलं तरी येता जाता वारकरी श्रद्धेनी वाकून नमस्कार करायचे.

सखू तुळशी, मंजिऱ्या पालखीतल्या पादुकांना अर्पण करायची तेव्हा तर तुळशी बाईला अपार आनंद व्हायचा..

देवाच्या पायी जाऊन आपला जीव सार्थकी लागला असं तिला वाटायचं…

वारकऱ्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.

लांबवर पालख्या दिसायच्या….

तो अनुपम सोहळा किती बघु आणि किती नको अस तीला होऊन जायच.. आपल्या भाग्याचा तीला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं.

 “तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला

 कसा बाई तिनी गोविंद वश केला”

तेव्हा डोळ्यासमोर श्रीकृष्णाच मोहक रूप दिसायच…

वारी पंढरपूरला पोहोचल्यावर सखु चंद्रभागेच्या पाण्याने तिला न्हाऊ घालायची.. त्यावेळी तिचे पानं पानं थरथरायचे…..

वारी पंढरपूरला चालली आहे… तुळशी बाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या ताई माईंचे मला अपार कौतुक वाटतं. अगदी सहजपणे डोक्यावर वृंदावन घेऊन या बायका लगबगीने चालत असतात.. त्यांना बघायला मी वारीत जात असते… त्यांच्यातला साधा, निरागस भाव, गोडवा बघण्यासारखा असतो….

आपण काही विशेष करत आहोत हे या बायकांच्या गावी पण नसतं… पायात साध्या चपला नाहीतर स्लीपर असतात आनंदाने भराभर चालत असतात. त्यांच्या तुळस प्रेमाचे मला फार अप्रूप वाटते.

त्यांना माझा साष्टांग दंडवत.

त्यांच्यासाठी हात जोडून देवाला विनवते…

“वारीत वाहता तुम्ही डोक्यावर तुळस…

 म्हणूनच दिसतो तुम्हा विठुरायाचा कळस…

 रुक्मिणी मातेला करते नवस…

 सुखी ठेव माझ्या या आया बहिणीस… “

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…तेथे कर माझे जुळती.’ भाग-३३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी… तेथे कर माझे जुळती’ भाग- ३३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

अण्णा माझे मोठे काका, अविवाहित होते, उंच पुरे रुबाबदार, तगडेबांड प्रत्येक क्षेत्रात उत्साही असलेले आमचे काका, त्यांचा दरारा मिल्ट्रीत काय घरातही आणि घराबाहेरही होता. त्या काळच्या मूक चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार बरोबर त्यांनी काम केलं होतं. जोगेश्वरीच्या अगदी समोरच दोन दगडी दिपमाळी असलेल्या भटांच्या वाड्यात फक्त दोन खोल्यांच्या घरात, आमची मोठी विधवाआत्याअक्का, अण्णा, काका, चौघी बहिणी, भाऊ शरदआप्पा असे नऊ जण दोन खोल्यात आम्ही एकत्र रहातं होतो. माझ्या काकांना अण्णांना उतार वयात दम्याचा त्रास सुरू झाला होता. रात्रभर उशी मांडीवर घेऊन बसल्या बसल्या झोप घेणारे अण्णा डोळ्यासमोर आले, आणि त्यांची आठवण झाली की पोटात कालवा कालव होते. रात्री झोप नाही व्हायची त्यांची. घरात अडचण नको म्हणून दुपारी जोगेश्वरीच्या देवळात कट्ट्यावर ते झोपायचे.

गोष्टी सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. आमचे अण्णा प्रसंग तंतोतंत डोळ्यासमोर आणायचे. त्यांनी ब्रिटिश राजवटीतला 1940 42 सालचा किस्सा आम्हाला सांगितला. जोगेश्वरी कडून बुधवार पेठे कडे जाणारा सरळ रस्ता हल्ली दगडूशेठ गणपती आहे ना! त्याच्या आधी फरासखान्या जवळ एक दीपस्तंभ अजूनही उभा आहे त्यावर नांव आहे ‘हुतात्मा भास्कर दा. कर्णिक. ‘ ह्या थोर व्यक्तीनी देशासाठी फार मोठे बलिदान केले होते.

पुणेकरांनों तुम्हाला एक विनंतीआजही श्रद्धांजली म्हणून हा इतिहास जतन करून ठेवा. कारण हा स्तंभ कसला? कोणाचा? ह्या संबंधित माहिती नसलेली ही एक उपेक्षित वास्तु ठरली आहे. श्री. कर्णिक ऑर्डिनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. हुशार आणि धाडसी तरुण म्हणून त्यांची ओळख होती. ते त्या काळचे, उच्च पदवी विभूषित होते. देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनात विलक्षण तळमळ होती. ऑर्डीनन्स फॅक्टरीत असल्याने त्यांनी धाडसानी गुपचूप बॉम्ब तयार केले आणि जवळजवळ अर्धा ट्रक बॉम्ब, हल्ला करण्यासाठी, मित्रांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून, बॉम्ब हल्ला करण्याचा मनसुबा रचला. त्यांना मदतनीसही मिळाले श्री. गोरे, श्री. दीक्षित इतकच काय जोगेश्वरी देवळातले (भाऊ बेंद्रे)गुरवही त्यांना सामील होते. देवळातही काही बॉम्ब लपवले होते अखेर धाडसी निर्णय ठरला. सगळी व्यवस्था करून ‘कॅपिटलवर ‘बॉम्ब टाकण्यात ते यशस्वी झाले. ठरवल्याप्रमाणे काम फत्ते झाले होते. पण हाय रे देवा ! कसा कोण जाणे ब्रिटिशांना कर्णिकांचा संशय आला. त्यातून ते ऑर्डिनन्स फॅक्टरी मध्ये होते, त्यामुळे संशय आणखीनच बळावला. ते पकडले गेले. त्यांच्या बरोबर असलेले साथीदारही दुर्दैवाने पकडले गेले. मुख्य आरोपी कर्णिकच ठरले. फरासखाना जवळच असल्याने सगळ्यांना पकडून तिकडेच आणले. (आत्ताचा सध्याचा मजूर अड्डा तिथेच आहे.) बाकीचे मदतनीस पुराव्या अभावी सुटले पण मुख्य आरोपी कर्णिकच ठरले होते नां!.

ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचा त्यांचा डाव फसला होता. पण देशप्रेमी कर्णिक डगमगले नाहीत. परिस्थितीचे भान त्यांना आले. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजूला झाले. आणि क्षणाचाही विलंब न करता खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. आणि — आणि चार पावले चालून फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते कोसळले. एका देशाभिमानी हुतात्म्याचा अंत झाला.

मंडळी असा होता त्या पायरीचा इतिहास. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे ब्रीदवाक्य स्मरून तो देशप्रेमी हुतात्मा झाला. ब्रिटिशांनीही त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं होतं. तर अशी होती ही माझ्या अण्णाकाकांनी सांगितलेली देश प्रेमी हुतात्म्याची विलक्षण कथा. स्तंभ आता जुना झालाय. स्तंभावरची अक्षरे पुसट झाली आहेत. पण ह्या क्रांतिकारकाची पुणेकरांना आता परत आठवण द्यावी म्हणून हा आजचा लेखन प्रपंच.. पुणेकरांनो संपली श्री कर्णिकांची कथा.. अण्णा थांबले. काकांनी ही गोष्ट मी लहान होते तेव्हां आम्हाला सांगितली होती. हुबेहूब प्रसंग डोळ्यासमोर उभा केला होता. माझे डोळे भरून आले. मिल्ट्रीत दरारा असलेले कणखर काकाही, भावना विवश झाले होते..

एक दिवस हुतात्मा दिन असतांना काकांनी मला बरोबर घेतलं. त्यांच्या हातात काठी होती. दम्याचा त्रास होत होता, चालवत नव्हतं, तरीही फरासखान्याच्या छोट्याशा बोळातून आम्ही त्या दीपस्तंभाजवळ पोहोचलो. काकांनी तिथल्या जमिनीवरची धूळ मस्तकाला लावली. आणि हुतात्मा कर्णिकांना त्यांनी मानवंदना दिली. मी आदराने काकांकडे बघत होते. देश प्रेमाचं बीज काकांनी माझ्या मनांत त्या बालवयातच रुजवलं होतं.

धन्य ते देशासाठी बलिदान देणारे, हुतात्मा भास्कर दा. कर्णिक आणि धन्य ते माझे देशप्रेमी आण्णाकाका. त्या दोघांना माझा मानाचा मुजरा. मित्र-मैत्रिणींनो कधी तुम्ही त्या बाजूला गेलांत तर हुतात्मा कर्णिकांना मानवंदना द्यायला विसरू नका हं! अभिमानाने त्या देशप्रेमीला नक्कीच आपण सलामी द्यायलाचं हवीय नाही का!

भारत माता की जय !!

– क्रमशः भाग ३३ 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आबई… ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ ‘आबई…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

जन्मांध आबई ही गावकऱ्यांची आधार होती आदिवासी समाजाची प्रतिनिधी. एकटीच. नाही म्ह‌णायला मुंगशी नावाची एक गोरीभराड बहिण, तीचा नवरा दगड्या व त्यांचं एक अपत्य ‘मानीक ‘हा आबईचा गणगोताधार होता. सबंध उमरी गावं आबई‌ची काळजी वहात होता.

आबईच्या हातात काठीचा आधार फार उशीरा आला. मारोतीच्या पारासमोर एका खोपटात ती एकटी रहात होती. समोरच असलेल्या बिन-खिराडीच्या (चाकाच्या) विहीरीवर ही रात्री सुद्धा बिनदिक्कत पाणी भरायची. स्वतःची भाजी भाकर स्वतःच करायची.

दळण कांडण हा तिचा मुख्य धर्म होता. त्याची मजुरी हीच तीची मिळकत. ही मजुरी पैशाच्या तसेच वस्तुरुपानं तर कधी भाजी भाकर तर चहा अशा अनेक स्वरुपात असायची. अर्थात ‘चहा’ हा काही मजुरीचा भाग नसायचा तसेच तीला खाऊ घालणं हे देखील मजुरी म्हणून नसायचे. अर्थात उमरी गावानं तीला सांभाळून घ्यावं हीच तीची अपेक्षा नव्हे पण भावना असावी.

त्यावेळी गावात चक्की (पीठाची गिरणी) नुकतीच सुरु झाली होती. त्यापूर्वीपासून व चक्की सुरु झाली तरी आबईच्या पाठचे दळण कांडण काही सुटले नाही. सपीट, ज्वारीच्या कण्या, बाजरीच्या कण्या, बेसन (चून), भाजलेले तांदूळ, भरडा, उडीद – मुगाच्या डाळी दळून भरडून देणे.

या अव्याहत कामानं आबईचे हात सतत गुंतलेले असत. आज काय पाटलीनबाई कडे तर उद्या काय पांडेबुवाकडलं तर परवा काय महादूमाळयाकडलं असा तिचा संचार असायचा. दुपार झाली की कामाच्याच ठिकाणी तिची थोडी विश्रांती असायची. दुपारचा चहा झाला की परत जात्याची घरघर, खलबत्याचा खणखणाट, तर कधी उखळातील मुसळासोबतची धपधप. घरच्या मिरच्याचं तीखट व विकतच्या हळकुंडा ची हळद हा ही प्रकार तीच्या नित्यकर्माचा भाग होता. अर्थात हे प्रकार वर्षातून एकदा किंवा दोनदा होत असत.

आबई ने लुगडं कधी विकत घेतलं नसावं. पाटील पांडे बुवा कडील बायकांची जुनेरं तिच्या कामी येत असत. काळा म्हणता येईल असा वर्ण, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा कधी तरी डोक्याला लागलेले खोबरेल तेल, अंध असल्याने तीक्ष्ण असेलेले कान, गावातील प्रत्येकाच्या आवाजावरून माणूस ओळखण्याची प्रचंड क्षमता, अंगावर जुनेर, डोक्यावरून नीट पदर घेतलेली, गावचे तीन चारच रस्त्ये पाठ असलेली, कुणाचाही आधार न घेता कामाच्या ठीकाणी पोहचणारी, गावाच्या कुत्र्यांच्याही ओळखीची असलेली आबई-हळूवार पायाने गंतव्य स्थानी सुखरूप पोहचणारी व दिवेलागणीच्या ठीक आधी परत एकटीच आपल्या झोपडीत विसावणारी अशी विलक्षण सर्वांच्या जीवनाची अविभाज्य भाग असलेली.

आम्ही पोरं तिच्या समोर उभे राहून “मला ओळखलं का व आबये’ असं मुद्दाम विचारित असू ”. आम्ही वर्षभर यवतमाळला शिक्षणाकरीता रहात असू, सुट्यात घरी आलो की कुतुहलाने हा प्रश्न आबईला हटकून विचारित असू. ती लगेच म्हणायची ” मले का म्हाईत न्हाई काय रे असोक ” तसेच विलास ला सुद्धा. माहेरपणाला आलेल्या पोरींचा आवाज ऐकला की ” सुमनबाई कवा आली? ” ‘ईमलबाई कवा आली ” असं म्हणायची.

सतत कष्टरत असलेल्या आबईला “पांडुरंग “ प्रिय होता. पण अंध, असहाय्य अशा तिला पंढरपूरची ओढ लागून काय उपयोग होता? तिला ती यात्रा व दर्शन कोण घडविणार? पण नित्यनेमाने पंढरपूर यात्रा करणारे, सात्वीक प्रकृतीचे, अत्यंत साधे भोळे असे आमच्याच गावचे “महादू माळी ‘’, ह्यांनी ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली व इतरही गावकऱ्यांना सोबत घेऊन एकदा आबईला विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले.

आबईने हातातील हार पांडुरंगाकडे दूरुनच फेकला व आश्चर्य असे की तो हार पांडुरंगाच्या गळ्यातच पडला. आबईला महादजी म्हणाले, “बरुबर पडला व माय तुहा हार पांडूरंगाच्या गळ्यात “.

आबई कृतकृत्य झाली. जे कधीही घडणे संभव नव्हते ते घडले होते. आबईचा चेहरा शेवटपर्यंत ह्या दर्शनाने प्रसन्नच होता. हाच उजळ चेहरा घेऊन आबई आपल्या गावी परतली होती.

.. जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची ही आठवण.. अजूनही जशीच्या तशी स्मरणात राहिली आहे.

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रात्रशाळेतला गाडीवान… लेख क्र. ४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ रात्रशाळेतला गाडीवान… लेख क्र. ४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

“बाई, आत येऊ का? ” हे शब्द कानावर पडले. मी मान वर करून समोर पाहिले. समोर विक्रांत मोरे (नाव बदललेले) उभा होता. चार वर्षांपूर्वी नाईट हायस्कूलच्या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून गेले असताना तो भेटला होता. कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडले, तर हा नमस्कार करण्यासाठी बाहेर उभा. त्याला बघून आश्चर्य वाटलं, कारण, आठवीपर्यंत तो आमच्या सन्मित्र शाळेत होता. म्हटलं, “अरे, तू इकडे कसा? ” तेव्हा म्हणाला, “बाबांची नोकरी सुटली, बाई. आई घरकाम करते. सगळी भावंडं शिकणारी. घर चालवणं फारच कठीण जात होतं. शेवटी शाळा सोडली आणि हे नाईट स्कूल जॉईन केलं. दिवसा एका गॅरेजमध्ये नोकरी करतो आणि रात्री शिकतो”.

१४-१५ वर्षांचं कोवळं पोर हे, पण किती विचारी आहे! घर चालवण्यासाठी आई-वडिलांच्या बरोबरीने नोकरी करतो. अकाली प्रौढपण आल्याने त्याचा चेहरा पार बदलून गेला होता.

मग मी थांबले आणि तिथेच त्याच्याशी गप्पा मारत बसले. घरची, भावंडांची चौकशी केली. म्हटलं, “काय रे, तुला ड्रायव्हिंग करायला आवडतं का रे? ” तर तो म्हणाला, “हो”.

मग लगेच माझे उपदेशाचे डोस सुरू झाले. विद्यार्थी दिसला की लगेच शिकवायला सुरुवात करायची, ही माझी सवय. त्याच्याकडे पाहिलं तर तोही गप्पा मारायला उत्सुक दिसला. त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हटलं, “गॅरेजमध्ये आहेस तर ड्रायव्हिंग शिकून घे की. हल्ली बँकेकडून कर्ज मिळतं, त्यातून स्वतःची गाडी घेऊन काही व्यवसाय सुरू कर, पण हे सगळं करताना शिक्षण मात्र सोडू नकोस”. रात्रीचे नऊ वाजून गेले होते तरीही माझ्याबरोबर गप्पा मारत मारत तो स्टेशनपर्यंत आला आणि त्याचा आनंदी चेहरा मला खूप समाधान देऊन गेला.

त्यानंतर चार वर्षांनी आज मला भेटत होता. मी विचारलं, “काय कसं चाललंय? “

तो लगेच म्हणाला, “खूप छान चाललंय, बाई. त्यादिवशी तुम्ही सांगितलंत, ते नीट लक्षात ठेवलं. लगेच ड्रायव्हिंग शिकायला सुरुवात केली. दोन वर्षांनी बँकेचे लोन घेऊन एक गाडी घेतली. गाडी भाड्याने देऊ लागलो. गाडीचा लोन फिटत आलं. महिनाभरापूर्वी इंडिका घेतली. शिक्षण पूर्ण करून गाडी चालवू लागलो. घर नवीन केलं. आईला सगळी कामं सोडायला लावली. मला महिंद्रमध्ये नोकरी लागली. सुट्टीच्या दिवशी मी भाडं घेऊन जातो. बाकी एरवीच्या दिवसांसाठी ड्रायव्हर ठेवलाय. खूप छान चाललंय. त्या दिवशी तुम्ही जर सांगितलंत ना, ते लक्षात ठेवून तसेच वागायचं ठरवलं. माझ्या मनातलं नैराश्य कुठच्या कुठे दूर पळून गेलं. काम करायला नवा हुरूप आला. आता आपल्या दोन-दोन गाड्या आहेत. तुम्हाला कुठे जायचं असेल, तर नक्की सांगा. ” 

मी तुडुंब खुश. विचारलं, “काय रे, गाडी किती रुपये किलोमीटरने देतोस? ” 

तो दोन मिनिटं थांबला आणि मग मला म्हणाला, “बाई, तुम्ही तुमच्या मुलाला हा प्रश्न विचारला असतात का? आम्हाला तुम्ही आपली मुलं म्हणता ना? मग असा प्रश्न का बरं विचारता? ” 

त्याचे उत्तर ऐकून मन भरून आलं.

खरंच, काय देतो आपण या मुलांना? थोडंसं प्रेम आणि खूप मोठी स्वप्नं. पण, माझ्या बाईंनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली, तू हे करू शकशील असं सांगितलं, मग मी हे करणारच! ही जिद्द त्याच्या मनात निर्माण होते. तुमचे प्रेमळ आश्वासक शब्द विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलू शकतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्यासमोर होतं.

खूप खूप छान वाटलं.

असे जिद्दीचा पंख लावून आकाशात भरारी घ्या, यश तुमचंच आहे, यश तुमचंच आहे.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॲडमिशन : एक अनुभव…’ – लेखक : श्री. जगतसिंह बिष्ट ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ ‘ॲडमिशन : एक अनुभव’ – लेखक : श्री. जगतसिंह बिष्ट ☆ अनुवाद : श्री अ. ल. देशपांडे ☆

दिवस भर्रकन गेलेत. आम्हाला कळले सुध्दा नाही की मंदार अडीच वर्षाचा झाला आणि शाळेत जाण्याच्या वयाचा सुध्दा. आमच्या वेळी पूर्ण सात वर्ष झाल्याशिवाय शाळेची पायरी चढू देत नसत. कधी कधी प्रवेशाच्या वेळी मुलाचे किंवा मुलीचे वय ६ वर्षे व अकरा महिन्याचे असले तरी प्रवेश नाकारल्या जात असे व मुलाचे वय एक महिन्याने कमी असल्याने पुढल्या वर्षी या, असे ऐकावे लागे. त्यावेळी कदाचितमास्तरांनी मारलेल्या छड्या मुलगा सहन करु शकावा, अशीच धारणा असावी. म्हणून संपूर्ण सात वर्षाचा घोडा झाल्यावरच शाळेत शिरकाव होत असे

श्री. जगतसिंह बिष्ट

पण माझे स्नेही जोशी हयांचा मी ऋणी आहे की त्यांनी माझा मुलगा ॲडमिशनच्या योग्य झाल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. जोशी अत्यंत साधा माणूस. कुणाच्या अध्यात न मध्यात. माझ्याशी सूत कसे जुळले ते सांगता येत नाही. नाही म्हणायला ऑफिसमधे लंच झाल्यावर रस्त्यावर उभे राहून पेरु व केळी एकत्र खाणे हा एकच सकस दुवा होता आमच्यात. ते दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच जन्मले की काय न कळे. कारण इतर वेळी शांत व स्तब्ध असलेला हा गृहस्थ दुसऱ्याच्या फायद्याची गोष्ट असली की एकदम सक्रिय होतो व त्याच्या कार्यात सहर्ष, पूर्णांशाने सामील होतो. हे सर्व करण्यातच की काय त्यांच्या डोक्यावर केस उरलेले नाहीत.

 त्यांनी एक जाहिरात दाखविली आणि ऑफिसच्या वेळेचा सदुपयोग करुन आम्ही संयुक्तपणे जाहिरात वाचली. आमच्या शहरातील कुठल्या एका प्रतिष्ठित शाळेत प्रवेशाच्या संबंधात ती होती. ठरल्याप्रमाणे एके दिवशी शाळेच्या विशाल आवारात निर्दिष्ट वेळेपूर्वीच फॉर्म घेण्यासाठी सहकुटुंब पोहचलो. तशी सुचना होती. स्त्री पुरुष पालकांचे घोळके बाहेरच उभे होते. एखाद्या लग्न समारंभाला जाबे तसे नटून थटून. क्षणभर कुठे मंगलध्वनी ऐकू येतोय का असा भास होत होता.

 कडक इस्त्री केलेले कपडे व चकचकीत पॉलिश केलेले बुट घातलेला मी काय करावे हया संभ्रमात होतो. शेवटी माझ्या लक्षात आले की हा घोळका नसून आपापल्या मुला-मुलींच्या ॲडमिशन संबंधी प्राप्त करावयाच्या फॉर्मसाठी प्रतीक्षारत पालकांची (सहकुटुंब) रांग आहे. मी देखील त्या रांगेची सुरुवात व शेवट शोधू लागलो. अनेक पालक आमच्याच ऑफिसमधे असल्यामुळे हॅलो हॅलो करता करताच रांगेच्या शेवटी येऊन स्थिरावलो. जो पर्यंत काऊंटर उघडत नाही तो पर्यंत काही उद्योग नव्हता. फक्त आलेल्या पालकांच्या रंगीबेरंगी कुटुंबीयांना न्याहाळण्यापलिकडे. नाही तरी भर दुपारी रणरणत्या उन्हात रांगेत उभे राहून करणार तरी काय? न्याहाळतानाच लक्षात आले की, ही रंगीबेरंगी मंडळी देखील रंगीबेरंगी छत्र्यांच्या आडोशाने कुणाला तरी न्याहाळतच होती. आपण आपले केवळ पहात

 पहातच पुढे सरकत होतो. खोटं कशाला बोला, मंदारच्या आईची इतर जमलेल्या आयांशी नजरेनेच तुलना करुन घेतली. तेव्हढयात नंबर लागल्याचे कळले. रु. पंधरा फक्त फेकले, फॉर्म घेतला. तो तेथेच भरुन द्यायचा होता, तो दिला व अर्धी लढाई जिंकल्याच्या आविर्भावात घरी पोहोचलो. फक्त एकच कळले नाही की केवळ फॉर्म प्राप्त करण्यासाठी त्या प्रतिष्ठित शाळेच्या संचालकांनी पालकांना सहकुटुंब का आमंत्रित केले होते? जो पर्यंत ॲडमिशन होत नाही तो पर्यंत असे फाल्तू प्रश्न करणे योग्य नव्हते.

 इन्टरव्हयूचा दिवस ठरला होता. असेही कळले होतें की मुलाबरोबर त्यांच्या आई-वडिलांचा देखील इंटरव्हयु अनिवार्य आहे. फॉर्म सोबतच एक आवश्यक माहिती पत्रक जोडलेलं होतं. त्यातील काही अटी मात्र मिस्किल वाटल्या. उदाहरणार्थ शाळा-प्रवेशासाठी ३० जून रोजी मुलाचे वय साडेतीन व चार वर्षाच्या दरम्यान असायला हवे. आता पालकांनी एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यावी असे मला वाटते. वरील वयाच्या अटीनुसार फक्त तीच मुलं किंवा मुली प्रवेशासाठी पात्र ठरतील, जी जुलै आणि ३१ डिसेंबर या दरम्यान जन्माला आले असतील. वर्षाच्या पूर्वार्धात जन्मलेलं मूल कोणत्याही परिस्थितीत हया गौरवशाली शाळेत प्रवेश घेण्याच्या योग्यतेचे राहणार नाही. सुज्ञ माता पित्यांना हे सांगणे न लगे की त्यांनी तद्नुसार प्लॅनिंग करुन मुलांना जन्मास घालावे.

 इंटरव्हयू कम टेस्ट साठी विस्तृत पाठ्यक्रम पण दिला होता. पालकांच्या इंटरव्हयूचा उद्देश स्पष्ट होता की त्यांच्या आंग्लभाषेवरील प्रभुत्वाची नीट कल्पना यावी (नंतर आम्हाला कळले की ज्या पाल्यांच्या आई-वडिलांचे इंग्रजी चांगले आहे अशा विद्यार्थ्यांना शिकविणे शाळेच्या स्टाफला सोईचे होते.) मुलांना मूळ अक्षरे व संख्या विषयक ज्ञान असणे आवश्यक होते, लेखन क्षमता असल्यास उत्तम. थोडक्यात चांगले लिहिता वाचता येणं ही नर्सरी मधे प्रवेशाची अट होती. सामान्य पशुपक्षी, फळे, फुले, भाज्या, रंग, आकार आदींची मुलांना ओळख असावी. सोबतच नर्सरी राइम्सची देखील. हे सर्व पाहून माझ्या मंद बुध्दिला हे कळेना की एव्हढं सर्व जर मुलाला माहीत असेल तर मग वर्षभर शाळेतील शिक्षकगण मुलांना काय शिकविणार? पण काय करता? अडला नारायण…

अल्लड, नटखट आणि सदैव प्रसन्न असणाऱ्या आमच्या मंदारला आम्ही इन्टरव्हयूसाठी तयार करण्याच्या प्रयत्नास लागलो, मधून मधून शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच छडीचा मार द्यायला लागलो, पिळता येतील तितके कान पिळले. त्याच्या अक्षरी अज्ञानासाठी त्याच्या आईला रीतसर दोष देणे झाले. घरचे वातावरण काश्मीर घाटीसारखे तणावपूर्ण झाले.

हळूहळू संकटाचे क्षण समाप्तीकडे सरकू लागलेत आणि इन्टरव्हयूचा दिवस उजाडला एकदाचा. हसमुख मंदारच्या तोंडावरील हास्य उडालं होतं. आम्ही विशेष वेशभूषेत शाळेकडे रवाना झालो. छाती मात्र धडधडत होती.

 इतर लोक आधीच पोहचले होते. परंतु आजचे वातावरण पहिल्या दिवसासारखे उत्सवी नव्हते. अधिक तर लोकांचे चेहरे लटकलेलेच होते. इंटरव्हयु सुरु झाला. सर्वप्रथम प्राचार्यांनी पालकांशी काही औपचारिक चर्चा केली. त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीवरुन लक्षात आले की, जमलेल्या पालकांचे इंग्रजी प्राचार्यांच्या इंग्रजीपेक्षा जास्त चांगले आहे. परंतु प्रवेशाच्या निर्णयाची दोरी ही प्राचार्यांच्याच हाती होती. मुलांचा इन्टरव्हयू सुरु झाला. त्यांनी मंदारला इंग्रजीतून नाव विचारले. त्याने सांगितले जरा लाजतच. नंतर दुसरा प्रश्न विचारला. आमच्या शाळेत शिकायला आवडेल काय बाळ तुला? मंदार खूप संकोचला व त्याने लाजाळूपणे हळूच मान खाली घातली. प्राचार्यांना वाटले त्याने हो म्हटले आहे. खरं तर मंदारला तो प्रश्नच मुळी समजला नव्हता. वास्तविक अनेक मुलांना देखील तो कळला नसल्याचे नंतर समजले. पुष्कळांनी हया प्रश्नाच्या उत्तरात आपापल्या वडिलांचे नाव सांगितल्याचे मागाहून कळले. नंतर अमुक रंग कोणता? शर्टाचा रंग, भिंतीचा रंग वैगरे फाल्तू प्रश्न विचारुन झाले. इन्टरव्हयूच्या दुसऱ्या भागात त्याला एका वेगळ्या खोलीत नेण्यात आले. तेथे आधीपासूनच शिक्षक बसले होते. मंदार कडून अक्षरे वैगरे लिहून घेतल्याचे समजले. खोलीत काय काय घडले हे बाहेर कळत नाही. टॉप सिक्रेट असतं म्हणे. ॲमिशनबद्दलच्या सगळ्या धांदली येथेच होतात, असे बरेच लोक कुजबुजलेत. कुणी एकाने म्हटले की ॲडमिशनच जर हवी होती तर शाळेच्या एखाद्या टिचरकडे दोन तीन महिने आधीच शिकवणीच्या बहाण्याने का पाठविले नाही? आमचा मंदार हातात टॉफी घेऊन बाहेर पडला व आम्ही घरी येण्यासाठी तयार झालो.

अन्य एक मुलगा शारीरिकदृष्टया थोडा अशक्त होता. त्याच्या आई-वडिलांनी आणलेले त्याचे जन्म प्रमाणपत्र खोटे असल्याची शंका व्यवस्थापकांनी बोलून दाखविली व त्यांना सांगण्यात आले की संबंधित डॉक्टर व दवाखान्यातील जुन्या रेकॉर्डची मूळ प्रत आणून दाखवा अन्यथा रिझल्ट राखून ठेवावा लागेल.

 हे सर्व शांतपणे चालू होते. आम्हाला आश्चर्य त्यावेळी वाटले की, आम्हाला सांगण्यात आले की इन्टरव्हयूच्या प्रोसेसिंगला जवळ जवळ एक महिना लागेल आणि त्यानंतर डाकेने निकाल कळविण्यात येईल. तुमच्या पदरी निराशा पडू नये म्हणून अन्य शाळांमधून सुध्दा तुम्ही प्रयत्न करा, असे सांगण्यात आले. शिवाय तुमच्या मुलाला प्रवेश मिळावा म्हणून कोणत्याही प्रकारचें दडपण आणल्यास तुमचा मुलगा प्रवेशासाठी योग्य असूनही अयोग्य घोषित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

 हे सर्व ऐकून न्यूनगंडाने पछाडलेल्या एका दांपत्याने सांगितले की, आम्ही तर हया शाळेच्या प्रवेशासाठी मुळी उत्सुकच नव्हतो. सहज म्हणून एक अर्ज देऊन टाकला. तुम्ही जर खरोखरच तुमच्या मंदारच्या ॲडमिशनसाठी उत्सुक असाल तर मग मात्र तुम्ही व्यवस्थापकाशी थोडं संधान बांधा अन्यथा येथे प्रवेश मिळणे फारच कठीण आहे.

तूर्तास आम्ही पंधरा रुपये प्रति शाळा हया प्रमाणे जवळ जवळ एक डझन शाळांमध्ये रजिस्ट्रेशन करवून ठेवले आहे. प्रत्येक दुस-या / तिस-या दिवशी कुठल्यातरी शाळेत इंटरव्हयूसाठी चपला घासतो आहे. काही शाळा, शाळेपेक्षा दुकानासारख्याच अधिक वाटतात. छोटयाशा जागेत खुराडयात कोंबडया कोंबल्यासारखा भास होतोय. अशा शाळांमधून ३००/४०० रु. पगाराच्या अध्यापिका पब्लिक स्कूलच्या टीचरसारख्याच भासतात.

 ज्या ज्या शाळांमधून जायचा प्रसंग येतो तेथे तेथे माता पित्यांचे थवेच्या थवे दृष्टीस पडतात… महाभारतासारखे. आम्ही किंकर्तव्य मूढ झाल्यागत श्रीकृष्णाची आस लावून उभे आहोत पण त्या मैदानात आमच्या रथाला पैलतीरी नेण्यासाठी पार्थसारथी दूरदूर पर्यंत सुध्दा दृष्टक्षेपात येत नाही.

(श्री. जगतसिंह बिष्ट हयांच्या “ एडमिशन का चक्कर “ हया दैनिक जागरण मधील हिन्दी व्यंग्य लेखाचा दि. १७/७/१९९० च्या दैनिक तरुण भारत, नागपूर, मध्ये प्रकाशित झालेला मराठी अनुवाद.)

 अनुवादक –  श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐकावे ते नवलच… ☆ संग्राहक व मांडणी – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ ऐकावे ते नवलच… संग्राहक व मांडणी – श्री सुहास सोहोनी

मुद्रित छापील पुस्तकांस स्पर्श केल्यास विटाळ होतो.

– – अगदी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातल्या विद्वान परंतु सनातनी बुद्धीवाद्यांचं या बाबतीत एकमत होतं!

“केवळ धर्मांतराच्या कारणास्तव गोऱ्या साहेबाने छापील पुस्तके आणिली. ती वाचाल तर बाटाल, असा प्रचार आमचे कित्येक भोळे, कर्मठ व नैष्ठिक ब्राह्मण करितात. त्यांस छापिल कागदांस शिवावयांस आणि मजकूर वाचावयांस भय करते. ” असा उल्लेख गो. ना. माडगांवकरांच्या १८६३ साली छापलेल्या पुस्तकात केला आहे.

दादोबा पांडुरंग यांनी आपल्या लघुकौमुदिनीचे हस्तलिखित अभिप्रायासाठी प्रो. बाळशास्त्री जांभेकर यांचेकडे पाठविले असता, “यातील पाणिनीची अष्टाध्यायीतील सूत्रे वेदोक्त असल्यामुळे त्यांस आपल्या बुकांत छापून ओवळी करून ती विटाळू नयेत. ” असा आपला अभिप्राय जांभेकरांनी दिला.

छपाईच्या शाईमध्ये चरबी असते, असे अनेक लोकांचे म्हणणे त्या काळी असे. त्यामुळे बहुतेक सारे धार्मिक साहित्य हस्तलिखित पोथ्या, ग्रंथ या स्वरूपातच होते. एका डोकेबाज छापखानावाल्याने गाईच्या साजुक तुपात स्वतःपुरती शाई तयार करून गुरुचरित्र छापले. त्याची जाहिरात तो “साजुक तुपातले गुरुचरित्र” अशी करत असे!

रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक हे आंघोळ केल्यानंतर छापिल ग्रंथाला शिवतही नसत. लाकडी चिमट्याचा वापर करीत.

छापील पुस्तकांसोबत अनेक विद्वानांचा ग्रंथालयांसही विरोध होता. मुंबईचे एक विद्वान पुढारी रा. रा. धोंडूअण्णा दांडेकरांच्या जून १८६७ रोजी झालेल्या भाषणात ते म्हणाले होते की,

“पुस्तकालये म्हणजे नादान राज्यकर्त्यांच्या नादी लागलेल्या बाटग्या लोकांचा अव्यापारेषु व्यापार! पुस्तकालये हवीतच कशास? तेथे आपल्या धर्माची अनेक परमपूज्य पुस्तके ठेवतील. आणि गांवातील चटोर पोरे बसून अद्वातद्वा बडबड करतील. पान, तंबाखू खात विड्या ओढत बसतील. या करिता आम्हास छापील बुकेही नकोत आणि पुस्तकालयेही नकोत!!

कालांतराने मुद्रणाविरुद्धचे लोकांचे प्रतिकूल मत हळू हळू नष्ट झाले. छापिल पुस्तकांचे राज्य आले. पुस्तकांची शेकडो दुकाने उघडली. ग्रंथालये छापिल पुस्तकांनी भरून गेली आणि हस्तलिखितांचे युग हळू हळू भूतकाळात जमा झाले.

संग्राहक व मांडणी : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माणूस म्हणून जगताना… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माणूस म्हणून जगताना… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

“या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे…. “माणूस म्हणून जगताना मला या गाण्याची ओळ प्रथम आठवते. कारण आपल्याला मानव जन्म मिळाला हीच परमेश्वराची आपल्यावर मोठे कृपा आहे.! चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरता फिरता मानव जन्म मिळतो अशी आपल्या हिंदू धर्मातील श्रद्धा आहे आणि असा हा मानव जन्म जगताना आपण तो चांगल्या तऱ्हेने जगला पाहिजे.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे तो समाजात रमतो. आपण जिथे जन्माला येतो, ते कुटुंब, आई-वडील, भावंडे एवढेच मर्यादित न ठेवता आपण इतर नातेवाईकांच्या कक्षेतही राहात असतो. ही कक्षा जसजशी वाढत जाते तो क्रम कुटुंब, प्रांत, देश, खंड आणि जगातील माणसांचे वास्तव्य असा वाढत गेला की ‘वसुधैव कुटुंबकम् हा विश्वास वाढतो आणि माणूस म्हणून आपण जगतो!

प्रेम, दया, परोपकार, सहकार्य, विश्वास ही पंचसूत्री माणूस म्हणून जगताना आपण लक्षात घेतली पाहिजे. कुटुंबातील सर्वांची एकमेकाविषयी ही तत्वे असतील तर आपोआपच संबंध चांगले राहतात. याच भावना नातेवाईक, शेजारी यांच्याबद्दल असतील तर आपण एकमेकाला संकटात मदत करतो. दुसऱ्याचे काही दोष पदरात घालून आपण चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो.

यावरून मला माझी मुलं लहान असतानाची एक गोष्ट आठवते त्यावेळी यांच्या बदलीचे ठिकाण लांब होते. नातेवाईक मंडळी आमच्यापर्यंत पटकन पोहोचू शकत नसत. तेव्हा माझा मुलगा जेमतेम तीन वर्षाचा आणि मुलगी एक वर्षाची होती. पण तेथील लोक मुले लहान असताना मला मदत करत असत. माझे मिस्टर डॉक्टर होते. त्यांना दवाखान्याचे काम दिवसभर असे. घराकडे लक्ष देण्यासाठी फार कमी वेळ मिळत असे. पण तेथे असणारे सर्व लोक आम्हाला मदत करत असत. मुलांना सांभाळणे, बाहेरून वस्तू आणून देणे, घरातील झाडझूड करणे या सर्व गोष्टी करत असत. सर्वांमध्ये सहकार्याची भावना दिसत असे. माणुसकीचा प्रत्यय अशावेळी नक्कीच येतो. आपल्यालाही दुसऱ्याला मदत करायची प्रेरणा यातून नकळत मिळत असते.

जेव्हा एखाद्या राज्यावर भूकंप पूर अतिवृष्टी अशी काही संकटे येत असतात तेव्हा प्रत्येक जण या गोष्टीचे भान ठेवून परस्परांना मदत करत असतात. आमच्या आठवणीत कोयनेचा, लातूरचा भूकंप, कृष्णेचा पूर, कोकणातील वादळं अशी मोठी संकटे आली, पण माणसाने माणसाशी प्रेम भावाने वागावे याचा चांगला प्रत्यय तेव्हा मिळाला.

आत्ता नुकतेच आपण पहेलगाम हत्याकांडाविषयी वाचत होतो. अतिशय वाईट घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणारी! त्याचा निषेध देशभर झाला आणि त्यामुळे आपला देश हिंदुत्वावर एकत्रित झाला. ही एकत्रित पणाची भावना माणसाने जगताना ठेवली पाहिजे.

परमेश्वराने इतर प्राण्यांपेक्षा माणसाला बुद्धी जास्त दिली आहे माणसाचा मेंदू हा अतिशय कार्यक्षम असा आहे. त्या खालोखाल माकड, कुत्रा, हत्ती अशा सारख्या प्राण्यांचे नंबर लागतात. या सर्वांपेक्षा माणसाला एक गोष्ट जास्त दिली आहे ती म्हणजे व्यक्त करण्याची सुविधा! माणसाला बोलता येते मेंदू आणि तिथे उमटणारे विचार एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेच्या माध्यमातून आपण व्यक्त होऊ शकतो. ही आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. माणूस म्हणून जगताना या गोष्टीचा योग्य तो उपयोग आपण केला तरच आपला मानवी जन्म सार्थकी लागला असे म्हणता येईल असं मला वाटते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares