मराठी साहित्य – विविधा ☆ “चुकेल तो शिकेल” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “चुकेल तो शिकेल” ☆ श्री जगदीश काबरे ☆

एखाद्या व्यक्तीला “मी कधीच चुकत नाही” किंवा “माझी विचारसरणीच अंतिम सत्य आहे” अशी ठाम खात्री वाटू लागते, तेव्हा ती केवळ त्याच्या मतांवर ठाम असते असे नसून, तिच्या संपूर्ण मानसिक रचनेत एक प्रकारचा बंदिस्तपणा निर्माण झालेला असतो. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून ही अवस्था ‘cognitive rigidity’ म्हणजेच विचारांतील कठोरता दर्शवते. अशा व्यक्तीला नवीन माहिती, विरोधी मत किंवा आत्मपरीक्षण स्वीकारणे कठीण जाते, कारण त्यातून तिच्या ‘स्व’बद्दलच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. परिणामी, ती व्यक्ती एकाच विचाराच्या चौकटीत अडकून राहते आणि चकवा लागल्यासारखे त्याच प्रश्नाभोवती वारंवार फिरत राहते. हे वर्तन बाहेरून हट्टीपणासारखे दिसते, पण आतून ते असुरक्षिततेशी जोडलेले असते.

या प्रक्रियेमागे ‘confirmation bias’ ही एक महत्त्वाची मानसिक प्रवृत्ती कार्यरत असते. म्हणजे, माणूस आपले आधीचे मत बरोबर ठरवणारीच माहिती स्वीकारतो आणि विरोधी माहिती नाकारतो किंवा दुर्लक्ष करतो. त्यामुळे “मीच बरोबर आहे” ही भावना अधिकाधिक दृढ होत जाते. यात अहंकाराची जोड, व्यक्तीचे मत आणि तिची ओळख हे सगळे गुणावगुण एकरूप होतात. त्यामुळे मत चुकले आहे हे मान्य करणे म्हणजे स्वतःलाच कमी लेखणे, अशी भीती निर्माण होते. यामुळे व्यक्ती वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी आत्ममग्नतेत गुरफटते.

एखाद्या रुग्णाने “मला काहीच आजार झालेला नाही” असे ठरवले, तर तो निदान, तपासणी आणि उपचार या सगळ्यांपासून दूर राहतो. परिणामी आजार अधिक बळावतो. त्याचप्रमाणे, विचारांच्या पातळीवरही “मी चुकूच शकत नाही” ही धारणा व्यक्तीला आत्मसुधारणेपासून रोखते. ती स्वतःच्या विचारांकडे नव्या दृष्टीने पाहत नाही, त्यामुळे चुका सुधारण्याची संधीच नाकारली जाते. असे वास्तव नाकारणे, हा एक प्रकारचा मानसिक बचावात्मक प्रतिसाद असतो. याउलट, विवेकशीलता म्हणजे स्वतःच्या विचारांवरही प्रश्न विचारण्याची तयारी ठेवणे ही बौद्धिक नम्रता प्रगतीसाठी अत्यावश्यक असते. माणूस चुकतो आणि आपणही चुकू शकतो, हे मान्य केल्यावरच तो नवीन शिकण्यास, बदल स्वीकारण्यास आणि अधिक व्यापक दृष्टिकोन विकसित करण्यास तयार होतो. डोळ्यावरचा धुरकट चष्मा पुसण्याची तयारी असणे हीच खरी प्रगतीची सुरुवात असते.

अशा पार्श्वभूमीवर, “मीच बरोबर” या आत्ममग्नतेत अडकलेली व्यक्ती केवळ स्वतःच्या बौद्धिक विकासालाच अडथळा ठरत नाही, तर व्यापक सामाजिक संवादालाही बाधा आणते. कारण संवादाचा गाभा हा परस्परांचे ऐकण्याची तयारी, स्वतःच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची क्षमता आणि सत्याच्या शोधात लवचिक राहण्याच्या वृत्तीमध्ये असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मतांना अंतिम सत्य समजते, तेव्हा ती प्रत्यक्षात सत्याच्या शोधापासून दूर जात असते आणि स्वतःच्या विचारांच्या प्रतिध्वनीतच अडकून पडते. खरी विवेकशीलता ही अचूकतेच्या दाव्यात नसून, चुकण्याची शक्यता मान्य करण्याच्या प्रामाणिकपणात आणि त्या चुकांमधून स्वतःला सतत सुधारण्याच्या धडपडीत असते. म्हणूनच बौद्धिक प्रगतीचा मार्ग हा आत्ममग्नतेतून नव्हे, तर शंकांना सामोरे जाण्याच्या धैर्य आणि आत्मपरीक्षणाच्या सवयीमधूनच उलगडत जातो, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊ तेवढे बरे. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि AI -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ मी आणि AI – ☆ विभावरी कुलकर्णी ☆

माझे आत्ता पर्यंत जे व्यक्ती विशेष (थोडक्यात म्हणजे बावळटपणा किंवा मूर्खपणा) मी लिहिले आणि आपण वाचले त्यात अजून एक भर पडली. खूप दिवस AI नामक सर्वज्ञात असलेल्या जीन विषयी ऐकत होते. फारसा विश्वास नव्हताच! पण म्हंटले बरेच लोक प्रशंसा करत आहेत, तर बघावे हा जीन काय काय करतो? कारण नवीन नवीन शिकणे, विविध प्रयोग करणे हे जणू रक्तातच आहे.

आज एका वस्तूवर अडले. इमेज तर दिसली आणि उत्सुकता वाढली. म्हणून सर्वज्ञ AI कडे धाव घेतली, तर त्या वस्तुच्या फोटोत आणि याच्या उत्तरात काहीच साम्य नाही. शेवटी त्या विषयी योग्य माहिती घरातूनच मिळाली. म्हणजे आपण पूर्वेचा रस्ता विचारावा आणि AI ने आकर्षक पद्धतीने उत्तरेला नेऊन सोडावे. कालच एक वसंत कानेटकर लिखित एक प्रसिद्ध नाटक बघून आले. वाटलं AI ला कथानक विचारावे. तर मूळ विषय सोडून काहीही कथा येऊ लागल्या. पुन्हा शेवटी प्रश्न आहेच. मी अजून काही मदत करु शकतो का? दोन तास त्यात घालवले तरी इतक्या प्रसिद्ध नाटकाची कथा त्याने अजून सांगितलीच नाही. मग इतर गोष्टी लांबच!

मग या विषयी जे सध्याचे तंत्रज्ञान वापरतात म्हणजे आपलीच लेकरे, त्यांच्याशी चर्चा केली. तर असे कुठे विचारतात का? म्हणून त्यांनी वेड्यातच काढले. मग आमची चर्चा आणि मध्यंतरी काही वाचले होते ते आठवले.

AI विरुद्ध मानव (AI vs Human) हा सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातील सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने प्रगत होत असली तरी, मानवी बुद्धिमत्तेला तिचा पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

मानवी क्षमता सर्वश्रेष्ठ आहे. मुंबईतील ७७% प्रोफेशनल कामाचे मोठे निर्णय घेताना AI पेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतात.

AI ची उपयुक्तता: ७३% प्रोफेशनल AI चा वापर मसुदा तयार करण्यासाठी उपयुक्त मानतात, पूर्ण निर्णयासाठी नाही.

 AI मानवाची जागा घेणार नाही, तर मानवी क्षमतेत वाढ करेल. हे मानवी भावना आणि यंत्रांचे तर्कशास्त्र यांचे मिश्रण असेल.

एआयचे जनक जेफ्री हिंटन यांनीही एआयच्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे नोकऱ्या जाण्याची भीती आहे.

एआय चॅटबॉट्सचा चुकीच्या कामासाठी वापर (उदा. डीपफेक) समाजासाठी घातक ठरू शकतो.

योग्य नियोजन आणि मर्यादित वापर केल्यास AI मानवी जीवनासाठी वरदान ठरू शकते, परंतु मानवी विवेकबुद्धीला पर्याय नाही.

एआय आणि मानव यांच्यातील मुख्य फरक

मानव

माणूस सर्जनशील आहे.

उच्च कल्पना आणि भावनांवर आधारित निर्मिती करु शकतो. निर्णय क्षमता भावना, नैतिकता आणि अनुभव यावर आधारित असतात.

वेग व स्मृती मर्यादित असतात. संदर्भ हे नैसर्गिक समज व भावनांवर आधारित असतात.

AI

सर्वजनशीलता मर्यादित डेटा वर आधारित असते. वेग प्रचंड असतो. निर्णय क्षमता डेटा आणि अल्गोरिदमवर आधारित असते.

संदर्भ हे शिकवलेल्या माहितीवर आधारित असतात.

AI हे एक साधन आहे साध्य नाही.

आत्ता पर्यंत एवढेच समजले. अजून काही ज्ञानात भर पडेलंच! या कामी आपणही मदत कराल ना?

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खाणं आणि पिणं ! ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🕺🤣 खाणं आणि पिणं ! 🤣😅  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

लेखाच शिर्षक वाचून खवय्ये आणि पिवय्ये (हा मी न पिता शोधलेला शब्द) हे दोघंही खूप खूष झाले असतील ! तशी या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांची आपल्याकडे कधीच कमतरता नव्हती आणि पुढील काळात यातील खवय्यांची संख्या जरी डाएटच्या नवं नवीन फ्याडामुळे कमी होतं गेली तरी पिवय्यांची संख्या पुढील काळात वाढतीच राहील, हे सांगायला कोणी कुठलंही पेय प्यायची गरज नाही ! कारण न पिणारा किंवा पिणारी ही जमात हल्ली जवळ जवळ नामशेष होत चालली आहे. त्याची कारणं वगैरेचा उहापोह करण्यासाठी आणि “पिणं” या एका शब्दावर लिहायचं झालं तर त्यासाठी एक वेगळा स्वतंत्र लेख लिहावा लागेल ! आणि तो सुद्धा “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, हे व्होडका आणि डिस्टील वॉटर इतकं पारदर्शक सत्य आहे ! वाचकहो आता नमनाला एवढं तुम्हाला “हाय” करून झाल्यावर, (झाला नसलात तरी) मूळ विषयाकडे माझी गाडी वळवतो.

आज मी हा जो “खाणं” शब्द घेतला आहे त्याचा आपल्या हातांशी आणि तोंडाशी काडीचा संबंध नाही. त्याच काय आहे नां मंडळी, आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की आपल्या या “अभिजात मराठी भाषेत” (इतक्या वर्षांनी कां होईना, पण मिळाला बाबा एकदाचा अभिजात भाषेचा दर्जा आपल्या माय मराठीला !) असे अनेक शब्द आहेत, की त्यातील एकेका शब्दाचे अनेक अर्थ होतात हे आपण सुज्ञ वाचक असल्यामुळे जाणताच. त्यामुळे खाणं हा शब्द वाचल्या वाचल्या आपल्या डोळ्यासमोर नाष्ट्यापासून आपल्याला आपल्या जेवणात असलेले आपले आवडीचे काही पदार्थ येणं, हे आपण खऱ्या अर्थाने खवय्ये नसालत तरी, स्वाभाविकच आहे. त्याला तुमचा इलाज नाही, पण मी “खाणं” या शब्दाचे आपल्याला जे अर्थ सांगणार आहे, त्याचा वर म्हटल्याप्रमाणे खऱ्या खाण्याशी काडीचा, अगदी टूथपीकइतका सुद्धा संबंध नाही ! त्यामुळे आपण थोडा डोक्याला ताण दिलात आणि पुढील लेख, डोक्यातील आणि डोळ्यासमोर आलेले खाण्याचे पदार्थ आणि मनांतली भूक काढून टाकून वाचलात, तर मी काय म्हणतोय ते आपल्या सारख्या प्रगल्भ वाचकांना नक्कीच कळेल. लेख वाचून झाल्या नंतरच आपण आपल्या रसना देवीला आपले आवडीचे खरं खाणं खाऊन तृप्त करावे अशी नम्र विनंती ! असो !

तर मंडळी, लहानपणी आपण सगळेच घरीदारी, शाळेत दंगामस्ती करत मोठे झालो हे जवळजवळ सगळेच वाचक मान्य करतील. त्यामुळे माझ्या पिढीतील (सध्या वय फक्त ७२!) त्या वेळच्या मास्तरांच्या हातचा मार मी कधीच खाल्ला नाही, हे असं कुणी म्हणणं निदान मला तरी न पटणार आहे. अर्थात “त्याकाळी” मुलींनी आणि मुलांनी केलेली दंगामस्ती यात, “हल्लीची” हिंसक दंगल आणि एखादा खरोखरचा निषेध मूक मोर्चा इतकं अंतर होत, हे ही तितकंच खरं. पण आत्ताची मुला मुलींची दंगामस्ती एकमेकांवर सर्वच बाबतीत कुरघोडी करण्यापर्यंत गेली आहे, हे ही एक आजच वास्तव आहे, यात दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून आपले आई, वडील अथवा शिक्षक कितीही प्रेमळ असले आणि त्यांच्या हातचा मार आपण कधीच खाल्ला नसेल असं आपण गृहीत धरलं तरी, आपल्याला त्यावेळेस त्यांच्या हातांच्या ऐवजी कडक “शब्दांचा मार” नक्कीच खावा लागला असेल, हे आपण आत्ता तरी नक्कीच मान्य करायला हरकत नसावी !

कधी कधी आपण एकटेच आपल्या विचारांच्या तंद्रित बाहेर पडलेले असतो. डोक्यात काही ना काही विचारचक्र चालू असतं, काहीतरी टेन्शन असतं, कसली तरी समस्या भेडसावतं असते. बाहेर पडल्यावर फिरून आल्यावर जरा बरं वाटेल, या एकाच उद्देशाने आपण निरर्थकपणे निघालेलो असतो. अशावेळी आपल्या विचारांची तंद्री भंग करणारी आपल्या नावाची हाक आपल्या कानावर पडते. आपण हाक आलेल्या दिशेने चमकून बघतो तर आपल्याला एक ओळखीचा चेहरा दिसतो. त्याच नांव आठवायचा आपण प्रयत्न करतो पण तो पर्यंत तो जवळ येताच, आपण उसन हसून “काय कसा आहॆस?” असं विचारून वेळ मारून नेतो. नंतरचा पाऊण एक तास, आपल्याला ज्या विषयात अजिबात इंटरेस्ट नाही असे अनेक वेगवेगळे विषय काढून तो आपलं डोकं “खाण्यात” घालवतो आणि आपण सुद्धा न रागावता नाईलाजाने मधून मधून त्याच्या भाषणाला प्रतिसाद देत असतो ! त्याला जरा घाईत आहे असं सुचवून देखील, तो अट्टाहासाने आपल्या डोक्याबरोबर आपला (बहुमूल्य?) वेळ सुद्धा “खात” असतो !

Other side of the grass is always greener ! ही इंग्रजी म्हण, काही काही लोकांच्या बाबतीत अगदी बररोब्बर लागू पडते मंडळी ! म्हणजे कसं असतं नां, स्वतःकडे सगळं काही असलं तरी दुसऱ्याकडे असलेली आणि आपल्याकडे नसलेली एखादी वस्तू बघून, त्याच्यावर हे अल्पसंतुष्ट लोकं उगाचच “खार” खात असतात. पण त्यात त्यांचच नुकसान आहे हे कळण्याच्या पलीकडे त्यांची विचारांची उडी तो “खार” खाण्याच्या नादात पोहचतच नाही, त्याला आपण तरी काय करणार ? एखाद्याचा असा “खार” खाण्याचा स्वभाव बदलणं हे महाकर्म कठीण !

एखाद्या कलेत अथवा कुठल्याशा विषयात थोडी फार पारंगत असलेली व्यक्ती त्याला किंवा तिला ती कला कोणी सादर करायला सांगितली, तर काहीतरी कारण सांगून तो किंवा ती उगाच “भाव” खात असते ! अशावेळी आपण त्याला किंवा तिला कितीही आग्रह केला, तरी ती किंवा तो अजिबात बधत नाही म्हणजे नाहीच ! या मागे त्याच किंवा तिच अर्थकारण सुद्धा असू शकत असं मग अनेक माणसांना तसं नसलं तरी, वाटून जातं. या अर्थकारणावरून मला काही काही लोकांचं आजकाल बोकाळलेले दुसरच खाणं आठवलं. म्हणजे कसं आहे नां मंडळी, हल्ली काही काही लोकं कुठल्याही कामात “मेरा क्या?” असा सवाल करून, तर कधी कधी असा सवाल न करताच चक्क “पैसे खातात !” आणि अशी एखादी अती खादाड व्यक्ती जर चुकूनमाकून ACB च्या जाळ्यात अडकली तर त्याला बोल लावणारे लोकं, कारण कळेपर्यंत ऑफिसात “शेण खाल्लं” असेल असं बोलायला मोकळे ! मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याच तोंड कसं धरणार? काय बरोबर नां?

एखाद्या भांडणाचं पर्यवसान हातघाईवर येण्या आधी जेंव्हा फक्त तोंडापर्यंत मर्यादित असतं तेंव्हा, दोन्ही भांडणारे गट एकमेकांना यथेच्छ “शिव्या खायला” घालतात ! अशावेळी झालेला “अपमान खाता” येत नाही आणि त्यासोबत आलेला राग सुद्धा खायचा म्हटलं तरी कोणी खाऊ शकत नाही. पण त्याला पर्याय म्हणजे अशावेळी आलेला राग आणि झालेला अपमान हे दोन्ही “गिळायची” सोय आपल्या अभिजात मराठी भाषेत आहे ! काही काही लोकं त्यांना आलेला राग व्यक्त करण्यात पण कमी पडतात आणि मग नाईलाजाने स्वतःचेच “दात ओठ” खात बसतात ! ही अशा लोकांची हतबलता मानली तरी त्याला सुद्धा काही लोकं ऐन मोक्याच्या ठिकाणी त्यानं “कच खाल्ली” असं म्हणून मोकळे होतात, आता बोला !

काही काही लोकांच बरं असतं, म्हणजे ते लोकं कुठे बाहेर चालले आहेत आणि आपण जर त्यांना हटकून विचारलं की “कुठं पर्यंत?” तर ते लगेच उत्तर देतात “जरा हवा खाऊन किंवा ऊन खाऊन येतो!” आता या दोन्ही खाण्यामुळे त्यांच पोट नक्कीच भरणार नसतं, तरी हवा खाऊन किंवा ऊन खाऊन असे शब्द सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडतात आणि त्या मागचा खरा अर्थ, विचारणारा सुद्धा लगेच जाणतो हीच आपल्या अभिजात मराठीची खरी खासियत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये ! काही लोकं बोलतांना सांभाषणातले अधले मधले “शब्दच खातात. ” जर का अशा माणसाचा तो ड्रॉबॅक संभाषण कर्त्याला ठाऊक असेल तर ठीक, नाहीतर एखाद्या नवख्या माणसाला तो नक्की काय बोलतोय हे कळण जरा अवघडच जातं मंडळी !

वाचकहो, लेखाच्या शीर्षकातल्या पहिल्या “खाणं” या शब्दाचा माझ्या बुद्धीप्रमाणे आणि मला माहित असलेल्या न खाण्याच्या प्रकारांच्या उल्लेखाने उहापोह करून झाल्यावर, आता दुसऱ्या “पिणं” या शब्दाकडे मी कधी येतोय, याची वाट अनेक पिय्यकड लोकं घसा सुखा करून वाट बघत असतील ! पण त्यांच्या पदरी आज तरी निराशा येणार आहे आणि त्याला माझा ईलाज नाही मंडळी ! म्हणजे मी या लेखाच्या सुरवातीलाच आपल्याला क्लिअर केलं होतं, की “पिणं” या शब्दावर लेख लिहायचा झाल्यास तो लिहिण्यासाठी एखाद्या “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, काय आठवतंय का ? आणि न खाणं खायचा हा लेख वाचायच्या नादात आपण जर ते विसरला असाल, तर आपल्याला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. लेखाचा पहिला परिच्छेद पुन्हा एकदा नीट वाचा ! आता तरी पटली खात्री तुमची ? मग आता मला सांगा, “पिणं” या शब्दावर मी लेख लिहावा असं ज्याला वाटतंय, तो मला त्याच्या घरी (अगदी कुठेही!) एखाद्या संध्याकाळी “व्यवस्थित बसायला” कधी बोलावतोय ? काय म्हणता, माझा पत्ता माहित नाही. अहो मंडळी, असं काय करता, लेखाच्या खाली माझं पूर्ण नांव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर पण दिला आहे. मग वाट कसली बघता ? पटकन तुमचा मोबाईल उचला आणि माझी तुमच्या बरोबरची अशी एखादी “व्यवस्थित संध्याकाळ” आजच बुक करा !

आपल्या फोनची वाट बघणारा

आपलाच,

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी ☆

यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे. रविवार तारीख १७ मे ते सोमवार दिनांक १५ जून २०२६ हा तो कालावधी. त्याविषयी थोडी माहिती.

भारतीय कालगणना चांद्र- सौर पद्धतीवरती आधारित आहे. म्हणजे महिन्यांची गणना चंद्राच्या गतीवर आणि ऋतूंची मांडणी सूर्याच्या गतीवर आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला एक महिना लागतो. तोच चंद्रमास- तिथी हे एकक. एका महिन्यात ३० तिथी होतात. अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदेपासून पुढील अमावस्येपर्यंत एक चंद्रमास होतो. हा साधारण २९•५ दिवसाचा असतो. म्हणून बारा महिन्यांचे २९•५ × १२ = ३५४ दिवस होतात. यानुसार सण ठरतात. चंद्र रोज वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राच्या जवळ असतो ते नाव त्या महिन्याला दिले जाते. उदाहरणार्थ चित्रा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तर तो चैत्र महिना. विशाखा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तो वैशाख.

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणारा काळ हा साधारण ३६५ दिवसांचा. हे सौर वर्ष. यानुसार ऋतू ठरतात. त्यामुळे दोन्ही पद्धतीत अकरा दिवसांचा फरक पडतो. सण दरवर्षी ११ दिवसांनी मागे सरकतात. हे असेच सुरू राहिले तर चैत्र हिवाळ्यात किंवा दिवाळी उन्हाळ्यात येईल. ऋतू आणि सण जुळणार नाहीत. ही विसंगती टाळण्यासाठी अधिक महिना ही संकल्पना. चांद्र वर्षात दोन वर्ष आठ महिन्यांनी, सण तीस दिवस मागे पडतात. म्हणून तिसऱ्या वर्षी एक अधिक महिना घेतला जातो. त्यामुळे सण व ऋतू यांचा मेळ बसतो. सूर्याच्या भासमान मार्गावर बारा राशी. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो. मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो तो चैत्र महिना असतो. मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश वैशाख महिन्यात. या बदलाला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. काही वेळा अशी स्थिती येते की एका चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही म्हणजे संक्रांत येत नाही. ती पहिली अमावस्या संपण्यापूर्वी आणि दुसरी अमावस्या संपल्यानंतर येते. असा महिना अधिक ठरतो. उदाहरणार्थ आत्ताचा अधिक महिना जेष्ठ.

सूर्याचा वृषभ राशी प्रवेश शुक्रवार १५ मे ६:२१ मिनिटांनी आहे. नंतर अमावस्या रविवार तारीख १७ मे मध्यरात्री १:३१ ला संपते. आणि नंतरची अमावस्या १५ जून सकाळी८:२५ ला संपते. नंतर सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशी प्रवेश होतो. म्हणजे या महिन्यात सूर्याचा राशी बदल नाही म्हणून हा अधिक मास. जेष्ठ अधिक मास आहे.

आणि पुढील नीजजेष्ठ आहे. सणवार नीज ज्येष्ठात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मागे आलेले सण पुढे जातात. उदाहरणार्थ गेल्यावर्षी १० जूनला असलेली वटपौर्णिमा २९ जूनला येणार. म्हणजे चंद्राचा महिना लहान व सूर्याचा मोठा तेव्हा अधिक मास.

अधिक टाकले म्हणून त्याला मलमास, अशुभ अपवित्र मानले गेले. तेव्हा तो व्यथित होऊन देवाकडे गेला. विष्णूला शरण गेला. विष्णूने श्रीकृष्णाकडे पाठवले. पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाने त्याला स्वीकारले. म्हणून तो पुरुषोत्तम मास झाला. पवित्र, व्रत- वैकल्याचा महिना झाला. मुलगी व जावई लक्ष्मीविष्णू मानून त्याना वाण देण्याची प्रथा आहे. एकंदरीत संयम, नम्रता, आदर यांनी युक्त होऊन कुटुंबासाठी, समाजासाठी श्रेयस्कर काही करणे हे या महिन्यातील कर्तव्य समजावे. सातत्य महत्त्वाचे. पुरुषाकडून पुरुषोत्तमाकडे वाटचाल हा अधिक मासाच्या व्रतांचा उद्देश समजावा.

विज्ञान दृष्टीने हा चंद्र, सुर्य, पृथ्वी यांचा खेळ आहे. सण आणि ऋतु यांच्यात एकवाक्यता केली आहे. आपली सौर-चांद्र पद्धत खगोलशास्त्रावर आधारित आहे. दोन्ही कालगणनांशी जुळणारी सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि खगोलीय सुत्रबद्धता असलेली अशी ही तर्कशुद्ध मांडणी आहे.

 (श्री. विनय जोशी आणि श्री. हेमंत मोने यांचे लेखावरून)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(भारतीय संस्कृतीतील ऋतुचक्र, अध्यात्म आणि उत्सवांचे अद्भुत सौंदर्य)

प्रस्तावना : निसर्गाशी मैत्री करणारी संस्कृती

जंबुद्वीपातील भरतखंड — आपले भारतवर्ष!

जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेली ही भूमी केवळ कृषिप्रधान नाही, तर विज्ञाननिष्ठ, अध्यात्मप्रधान आणि निसर्गपूजक आहे.

येथील ऋषी-मुनींनी जीवनाकडे केवळ भौतिक नजरेने पाहिले नाही; तर मानव, निसर्ग आणि विश्व यांच्यातील सूक्ष्म नाते अनुभवले.

ऋतुचक्राच्या लयीत, सूर्य-चंद्रांच्या गतीत आणि निसर्गाच्या स्पंदनांत त्यांनी जीवनाचे शाश्वत तत्त्व शोधले.

भारतीय संस्कृतीने प्रत्येक ऋतूला अर्थ दिला, प्रत्येक तिथीला पावित्र्य दिले आणि प्रत्येक दिवसाला उत्सवाचे रूप दिले.

मानवाचे आरोग्य, मानसिक संतुलन, सामाजिक ऐक्य आणि आत्मिक उन्नती जपण्यासाठी व्रत-वैकल्ये, उत्सव, पर्व आणि संस्कारांची निर्मिती झाली.

यातूनच जन्माला आला —

भक्तिरसाने ओथंबलेला, रंगांनी नटलेला आणि अध्यात्माच्या तेजाने उजळलेला चातुर्मास!

अधिकमास : भारतीय कालगणनेतील अद्भुत विज्ञान

यावर्षीचे महत्त्वाचे दिनविशेष

 ▫️अधिकमासारंभ : १७ मे २०२६

 ▫️अधिकमास समाप्ती : १२ जून २०२६

▫️चातुर्मासारंभ : २५ जुलै २०२६

▫️चातुर्मास समाप्ती : २१ नोव्हेंबर २०२६

अधिकमास म्हणजे नेमके काय?

भारतीय सण-उत्सव हे चांद्रगतीवर आधारित आहेत, तर ऋतुचक्र सूर्याच्या गतीवर अवलंबून आहे.

या दोन्ही कालगणनांचा अद्भुत मेळ भारतीय ज्योतिषशास्त्राने साधला आहे.

चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांतील सूक्ष्म फरक भरून काढण्यासाठी जो अतिरिक्त महिना येतो, त्याला ‘अधिकमास’ म्हणतात.

तर एखादा महिना लुप्त झाला तर त्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

दोन अधिकमासांमध्ये साधारणतः २७ ते ३४ महिन्यांचे अंतर असते.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे महिने अधिकमास म्हणून येऊ शकतात.

मार्गशीर्ष आणि पौष हे क्षयमास होऊ शकतात; परंतु माघ मास कधीच अधिक किंवा क्षय होत नाही, हे विशेष!

क्षयमास म्हणजे काय?

कधी कधी एका चांद्रमासात सूर्य दोन राशींमध्ये प्रवेश करतो.

अशा वेळी त्या महिन्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

विशेष म्हणजे, एखाद्या वर्षी क्षयमास आला तर त्या वर्षी दोन अधिकमास येतात.

अधिकमासाला पुरुषोत्तम मास किंवा मलमास अशीही नावे आहेत.

हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे भारतीय कालगणनेचे विज्ञान आजही अचूक आहे — ही आपल्या पूर्वजांच्या प्रज्ञेची तेजस्वी साक्ष आहे.

अधिकमासाचे अध्यात्मिक महत्त्व

अधिकमास हा केवळ गणिती समतोल नाही;

तो आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचा पवित्र कालखंड आहे.

या महिन्यात अनेक जण विविध व्रते आणि संकल्प करतात —

▫️ उपवास

▫️ एकभुक्त / नक्तभोजन

▫️ मौनभोजन

▫️ अखंड नंदादीप

▫️ तांबूलदान

▫️ गंगास्नान

▫️ मंत्रजप

▫️ विष्णुसहस्रनाम पारायण

“ॐ नमो भगवते वासुदेवाय”

या मंत्राच्या अखंड जपाने वातावरणही भक्तिमय आणि पवित्र बनते.

या काळात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व असते.

मनातील विकार धुऊन टाकून अंतःकरण अधिक निर्मळ करण्याचा हा आध्यात्मिक उत्सव आहे.

चातुर्मास : उत्सव, साधना आणि संस्कृतीचे महापर्व

आषाढातील शयनी एकादशी ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — हा चार महिन्यांचा कालखंड म्हणजे चातुर्मास.

हा काळ केवळ धार्मिक नसून ऋतुबदल, आरोग्य, पर्यावरण, शेती, अध्यात्म, कला आणि सामाजिक जीवन यांचा सुंदर समन्वय आहे.

आषाढ : भक्तिरसाचा प्रारंभ

🫟 कालिदास दिन

🫟 जगन्नाथ रथयात्रा

🫟 पंढरपूरची वारी

🫟 गुरुपौर्णिमा

🫟 दिव्याची आवस

आषाढात भक्तीचा पहिला वर्षाव मनावर होतो.

वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगात, विठ्ठलनामाच्या गजरात आणि पावसाच्या सरींत भक्तिरस दाटून येतो.

श्रावण : व्रत-वैकल्यांचा हिरवा महिना

श्रावण म्हणजे भक्ती, पावित्र्य आणि मंगलमयतेचा उत्सव!

🪻 रविवार — सूर्यपूजा

🪻 सोमवार — शिवआराधना

🪻 मंगळवार — मंगळागौरी

🪻 बुधवार-गुरुवार — बुध-बृहस्पती पूजन

🪻 शुक्रवार — जिवती पूजन

🪻 शनिवार — बलभीम दर्शन

याच महिन्यात येतात —

🪻 नागपंचमी

🪻 नारळी पौर्णिमा

🪻 राखी पौर्णिमा

🪻 स्वातंत्र्यदिन

🪻 गोकुळाष्टमी

🪻 पिठोरी अमावस्या

🪻 बैलपोळा

श्रावणातील हिरवाई जशी धरतीला सजवते, तशीच भक्ती मनालाही प्रसन्न करते.

भाद्रपद : गणरायाच्या आगमनाचा जल्लोष

🍁 हरतालिका

🍁 गणेश चतुर्थी

🍁 ऋषीपंचमी

🍁 गौरी आगमन

🍁 अनंत चतुर्दशी

🍁 पितृपक्ष

भाद्रपद म्हणजे भक्ती, कुटुंबभाव आणि परंपरेचा मंगल सोहळा.

“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घराघरांत आनंदाचे तरंग दाटून येतात.

अश्विन : शक्ती आणि प्रकाशाचा उत्सव

🔅 घटस्थापना

🔅 नवरात्रोत्सव

🔅 विजयादशमी

🔅 कोजागिरी पौर्णिमा

🔅 वसूबारस

🔅 दीपावली

या महिन्यात संपूर्ण भारत प्रकाश, उत्साह आणि मंगलमयतेने उजळून निघतो.

अंधारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर धर्माचा विजय साजरा केला जातो.

कार्तिक : भक्तीचा परमोच्च क्षण

कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — चातुर्मासाची सांगता.

वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीचा महासागर दुमदुमतो.

असे मानले जाते की आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू या दिवशी जागृत होतात आणि पुन्हा विश्वकारभार सांभाळण्यासाठी सज्ज होतात.

चातुर्मास : भारतीय जीवनसंस्कृतीचा आत्मा

चातुर्मास म्हणजे —

✨ भक्तीचा महोत्सव

✨ ऋतुचक्राचा उत्सव

✨ निसर्गाशी संवाद

✨ कुटुंबसंस्कृतीचा उत्सव

✨ कला, संगीत आणि परंपरेची मेजवानी

या काळात प्रत्येक घर उत्सवांनी, पूजा-अर्चेने, भजन-कीर्तनांनी आणि स्नेहमेळाव्यांनी गजबजून जाते.

समारोप : परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे

हजारो वर्षांच्या चिंतनातून, अनुभवातून आणि विज्ञाननिष्ठ जीवनदृष्टीतून घडलेल्या भारतीय परंपरा या केवळ धार्मिक कर्मकांड नाहीत.

त्या आहेत —

☘️ निसर्गसंवर्धनाची शिकवण

☘️ आरोग्यसंरक्षणाची जीवनपद्धती

☘️ सामाजिक ऐक्याची वीण

☘️ आत्मिक उन्नतीचा मार्ग

म्हणूनच या समृद्ध, बहुरंगी आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण परंपरांची टिंगल किंवा कुचेष्टा करणे हे पुरोगामित्वाचे नव्हे, तर सांस्कृतिक दारिद्र्याचे लक्षण ठरते.

भारतीय संस्कृती ही केवळ इतिहास नाही;

ती अखंड वाहणारी जीवनगंगा आहे —

ऋतूंप्रमाणे बदलणारी, पण मुळात शाश्वत असलेली!

🌼 मंगल शुभेच्छा 🌼

अधिकमास आणि चातुर्मासाचा हा चिरंतन उत्सव आपल्या जीवनात भक्ती, आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संकट हीच संधी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “संकट हीच संधी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

मानवी जीवनात संकटे, आजार आणि अनपेक्षित घटना या अपरिहार्य आहेत; परंतु त्या क्षणी माणसाची मानसिक प्रतिक्रिया त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. एखादे संकट कोसळले किंवा गंभीर आजार झाला की “मलाच का? हे माझ्याच नशीबी आहे का आले?” असे प्रश्न पडणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होय… पण ही अंतर्मुखतेऐवजी आत्मदयेची छटा असलेली प्रतिक्रिया असते. या प्रश्नामागे अन्यायाची भावना आणि स्वतःला परिस्थितीचा बळी समजण्याची प्रवृत्ती दडलेली असते. ही मानसिकता दीर्घकाळ टिकली तर ती निराशावाद, हताशपणा आणि निष्क्रियता वाढवू शकते, कारण यातून समस्या सोडवण्याऐवजी परिस्थितीला दोष देण्याची सवय निर्माण होते. अशा वेळी व्यक्ती आपली उर्जा प्रश्न विचारण्यात खर्च करते, पण उत्तर शोधण्याचा प्रयत्न कमी पडते.

याउलट, “हे का घडले?” किंवा “यातून मी काय शिकू शकतो?” असा विचार हा अधिक रचनात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो. या भूमिकेतून व्यक्ती स्वतःच्या जीवनशैलीकडे, निर्णयांकडे आणि सवयींकडे वस्तुनिष्ठपणे पाहू लागते. उदाहरणार्थ, एखादा आजार झाल्यास त्यामागील कारणे—जसे की आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, किंवा वैद्यकीय दुर्लक्ष—यांचा विचार केल्यास भविष्यात त्यापासून बचाव करण्याचे मार्ग सापडू शकतात. संकटांच्या बाबतीतही तसेच आहे; चुकीचे निर्णय, अपुरी तयारी, किंवा बाह्य परिस्थिती यांचे विश्लेषण केल्यास पुढील वेळी अधिक सजगपणे वागता येते. ही वृत्ती केवळ समस्या समजून घेण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती व्यक्तीला कृतीशील बनवते.

सामाजिक पातळीवरही ही दोन मानसिकता भिन्न परिणाम घडवतात. “माझ्याच वाट्याला का?” हा दृष्टिकोन व्यक्तीला स्वतःपुरता मर्यादित ठेवतो, तर कारणमीमांसा करणारी वृत्ती व्यापक संदर्भ समजून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, एखाद्या आजाराचा प्रसार झाला तर केवळ वैयक्तिक दु:खावर थांबण्याऐवजी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, स्वच्छता, जागरूकता यांसारख्या घटकांचा विचार केल्यास सामूहिक उपाययोजना शक्य होतात. त्यामुळे सकारात्मक वृत्ती ही केवळ वैयक्तिक विकासापुरती नसून सामाजिक प्रगतीसाठीही महत्त्वाची ठरते. याचा अर्थ असा नाही की “माझ्याच बाबतीत का?” हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे; तो मानवी भावनांचा नैसर्गिक भाग आहे. परंतु त्या प्रश्नात अडकून न राहता, पुढे जाऊन कारणांचा शोध घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. संकटांना टाळता येत नाही, पण त्यातून शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी नक्कीच असते. त्यामुळे निराशावादी आत्मदयेपेक्षा विवेकाधिष्ठित, कृतीशील आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे हेच खऱ्या अर्थाने मानसिक परिपक्वतेचे लक्षण आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीतून मार्ग काढताना अथक परिश्रम करण्याची जिद्द निर्माण होते. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाविन्य, अपेक्षा, आणि वास्तव… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ नाविन्य, अपेक्षा, आणि वास्तव… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

सुरुवातीला विशेष आकर्षक वाटणारी गोष्ट, मिळाल्या नंतर सामान्य का वाटते?

असे  बऱ्याच ठिकाणी आढळते. मानवी स्वभावच असा आहे की, जे मिळत नाही त्याची ओढ वाटते आणि एकदा ते मिळालं की त्यातील नाविन्य संपल्यामुळे त्याचा कंटाळा येऊ लागतो. यालाच ‘मानवी तृष्णेचा विळखा’ म्हणता येईल.

​या साठी एक गोष्ट आठवते.

​सोनरी पिंजरा आणि राघू

​एका श्रीमंत सावकाराला पक्षी पाळण्याची खूप आवड होती. एकदा बाजारात त्याला एक अतिशय देखणा, मखमली पिसांचा आणि गोड बोलणारा पोपट दिसला. त्या पोपटाचा रंग इतका हिरवागार होता की सावकार त्याच्यावर मोहित झाला. त्याने खूप पैसे देऊन तो पोपट विकत घेतला.

​घरी आल्यावर सावकाराने त्या पोपटासाठी एक सोन्याचा पिंजरा बनवून घेतला. सुरुवातीचे काही दिवस सावकार खूप उत्साहात होता. तो रोज पोपटाशी गप्पा मारायचा, त्याला बदाम-पिस्ते खायला द्यायचा. पोपटही नवीन घर आणि सोन्याचा पिंजरा पाहून सुरुवातीला खुश होता.

​पण काही दिवसांनी सावकाराचा दृष्टिकोन बदलला. हळूहळू सावकाराला त्या पोपटाच्या त्याच त्या शब्दांचा कंटाळा आला. “किती तेच ते बोलतो हा!” असं म्हणून त्याने पोपटाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. जो पोपट आधी ‘अद्भूत’ वाटत होता, तो आता फक्त एक ‘शोभेची वस्तू’ बनला.

​पोपटाची स्थिती पण काहीशी तशीच झाली. पोपटाचाही त्या सोन्याच्या पिंजऱ्यावरून जीव उडाला. त्याला आता ते बदाम नकोसे झाले आणि बाहेरच्या साध्या कडुनिंबाच्या झाडावरची फळं गोड वाटू लागली. ज्या सोन्याच्या पिंजऱ्याने त्याला सुरुवातीला आकर्षित केलं होतं, तोच आता त्याला ‘तुरुंग’ वाटू लागला.

​या उदाहरणातून काही गोष्टी लक्षात येतात.

​नाविन्याचा फुगा असतो.  कोणत्याही भौतिक गोष्टीचे आकर्षण हे त्यातील ‘नाविन्या’वर अवलंबून असते. एकदा का आपण त्या गोष्टीशी सरावलो की तिचे महत्त्व कमी होते.

​दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.  आपण वस्तू किंवा व्यक्तीला ‘मिळवण्यावर’ जास्त लक्ष देतो, पण ती ‘टिकवून ठेवण्यावर’ किंवा त्यातील आनंद शोधण्यावर मेहनत घेत नाही.

​जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तेव्हा आपण तिचे फक्त फायदे पाहतो. मिळाल्यावर तिचे मर्यादा आणि दोष दिसू लागतात, ज्यामुळे कंटाळा येतो.

​थोडक्यात  सुरुवातीला चमकणारी प्रत्येक गोष्ट ‘हिरा’ वाटू शकते, पण जीवनाचा खरा आनंद हा ती गोष्ट मिळाल्यावर तिचा कंटाळा न येऊ देता, त्यातील समाधान शोधण्यात असतो. म्हणूनच म्हणतात,  “दुरून डोंगर साजिरे!” पण त्याचे खरे स्वरूप डोंगरा जवळ गेल्या शिवाय कळत नाही.

ही मानवी स्वभावाची एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याला मानसशास्त्रात ‘हेडोनिक अडॅप्टेशन’ (Hedonic Adaptation) असे म्हणतात. एखादी गोष्ट मिळेपर्यंत आपली ओढ तीव्र असते, पण ती प्राप्त झाली की तिचे नाविन्य संपते.

​यामागे काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील:

​१. मनाला ‘नाविन्याचा’ शोध असतो.

​मानवी मेंदूला नेहमी नवीन गोष्टींचे आकर्षण वाटते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तेव्हा आपला मेंदू त्याबद्दलची स्वप्ने रंगवतो. पण एकदा ती गोष्ट रोजच्या जगण्याचा भाग झाली की, मेंदू तिला ‘गृहीत’ धरू लागतो (Adaptation). त्यामुळे सुरुवातीचा तो उत्साह ओसरतो.

​२. अपेक्षा आणि वास्तव यांतील फरक लक्षात येतो.

​अनेकदा आपण एखाद्या गोष्टीचे अवास्तव चित्र मनात रंगवलेले असते. ती गोष्ट मिळाल्यावर आपल्याला मिळणारा आनंद हा कल्पनेतील आनंदापेक्षा कमी असू शकतो. ‘ती गोष्ट मिळाल्यावर माझे आयुष्य पूर्णपणे बदलेल’ हा भास जेव्हा संपतो, तेव्हा त्या गोष्टीचे विशेष वाटेनासे होते.

​३. ‘डोपामाइन’चा प्रभाव असतो.

​जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा करतो किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदूत डोपामाइन नावाचे रसायन स्रवते, जे आपल्याला ‘थ्रिल’ किंवा आनंद देते. एकदा का ध्येय गाठले की, या रसायनाचा स्तर कमी होतो आणि आपण पुन्हा पुढच्या नवीन ध्येयाकडे धावू लागतो.

​४. सवयीची शक्ती फार मोठी असते. त्यामुळे सवयीच्या गोष्टींचा कंटाळा येतो.

​कोणतीही मोठी सुखद घटना असो किंवा दुःखद, माणूस कालांतराने आपल्या मूळ स्वभावाकडे (Baseline Happiness) परत येतो. नवीन गाडी, नवीन घर किंवा नवीन पद भूषवल्यानंतर काही दिवसांनी ती आपली ‘सवय’ बनते. सवयीमुळे त्यातील ‘विशेष’ काहीतरी असण्याची भावना संपून जाते.

​यावर उपाय

​कृतज्ञता (Gratitude):

ज्या गोष्टी आपण मिळवल्या आहेत, त्या आपल्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव वारंवार स्वतःला करून देणे.

​वर्तमानात जगणे:

केवळ ‘मिळवण्याच्या’ आनंदापेक्षा, त्या गोष्टीचा रोजच्या आयुष्यात ‘उपभोग’ घेण्यावर लक्ष केंद्रित करणे.

​प्रवासाचा आनंद:

ध्येयापेक्षा ते गाठण्याच्या प्रवासाचा आनंद घेणे शिकले, तर प्राप्त झाल्यावर येणारी रिक्तता कमी जाणवते.

​थोडक्यात सांगायचे तर, मिळवण्याची ओढ ही ‘इच्छे’तून येते, तर टिकवून ठेवण्याचा आनंद हा ‘तृप्ती’तून येतो. जर तृप्ती नसेल, तर प्रत्येक गोष्ट मिळवूनही ती साधारणच वाटत राहील.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ठरवणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ठरवणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

ठरवलं तर माणूस काहीही करु शकतो. पण हे ठरवणंच सोप्प असत का. ?… कधी सोप्प, तर कधी कठीण असतं. फक्त हे सोप्प आणि कठीण आपण ठरवलय, का आपल्याबद्दल कोणी ठरवलंय यावर अवलंबून असत.

आपण कोणासाठी काही ठरवलं असेल तर त्यात बराच अर्थ असतो. पण कोणी आपल्याबद्दल काही ठरवलं असेल तर त्यात आपण अर्थ शोधायचा प्रयत्न करतो.

हे ठरवणं म्हणजे लग्नासारख्या मोठ्या गोष्टींच नाही. तर इतर गोष्टींचच आहे. पण यातही… लहान लहान गोष्टी ठरवायला तुम्ही कशाला पाहिजे… असं म्हंटल की मोठेपणा मिळाल्या सारख वाटत. पण त्याच बरोबर मोठ्या गोष्टी ठरवण्या इतका मोठेपणा कोणी देत नसल्याचही लक्षात आणून दिल जात. शेवटी काय ठरवण्यात आपला सहभाग असावा कि नसावा हे सुध्दा माझ्याबद्दल दुसरेच ठरवतात.

माणसानं स्वप्न सुध्दा मोठ्ठी पहावीत अस म्हणतात. याचप्रमाणे मी काहितरी मोठ्ठ ठरवाव अस वाटलं. पण मी जे ठरवत होतो ते काहितरी मोठ्ठ नव्हतच, काहीही ठरवण्याइतका मी मोठा झाल्याचं मला आठवतच नाही. आणि मी इतरांच्या बाबतीत काही ठरवावं इतके लहान दुसरे वाटलेच नाही. माझ्या बाबतीत इतरांनी माझ्यासाठी ठरवलेल्याच गोष्टी माझ्याकडून ठरवून होतात.

लहान असतांना कोणत्या शाळेत जायचं, अभ्यास कसा, कितीवेळ करायचा हे ठरवलं होत. पण मी नाही. खेळायचं काय हे आम्ही ठरवत असलो तरी खेळायची वेळ मी ठरवत नव्हतो. गणवेश शाळा ठरवत होती. तर कपडे कुठे, कसे, कोणते घालायचे हे घरचे ठरवत होते. त्यावेळी आजच्या सारखा ऑनलाईन जमाना नव्हता, उलट बर्‍याचदा तर सगळ्यांना म्हणजे लायनीने सारखेच कपडे असायचे. आजकाल कपडे आणि केस यावरून मुलगा आहे का मुलगी हे सुध्दा पटकन ठरवता येत नाही. पण आमच्या लहानपणी नुसत्या कपड्यावरून आम्ही भावंड आहोत हे सगळ्यांना सहज समजत होत. बर्‍याच घरी हीच स्थिती होती. त्याचा परिस्थितीशी संबंध असलाच पाहिजे अस काही नव्हत. माझ्या मुलांच्या बाबतीत हे मी ठरवण्याचा प्रश्न आलाच नाही.

नोकरीत मी कोणतं काम करायचं, हे त्यांंच ठरलं कि मला सांगितल जायचं. हं, हे करा. कदाचित मी कोणतं काम नीट करेन हाच प्रश्न त्यांना असावा. किंवा जे काम करायला कोणाला आवडत नसेल ते मला देण्याच ठरत असाव.

मुलांच्या बाबतीत काही ठरवावं, तर त्यांच आधीच काय करायच ते ठरलेलं असत. मग मी आपला त्यांनी ठरवलय तेच करायच ठरवतो. उगाच वेगळं कशाला ठरवा… आणि ठरवलं तरी ऐकणार कोण…

मी चारचाकी शिकावी अस मीच ठरवलं, आणि तसा क्लास लावणार अस सांगितल. तर आता चारचाकी काय दुचाकीसुध्दा अगदी गरज असेल तरच चालवायला द्यायची असच आम्ही ठरवलंय अस घरातून सांगण्यात आलं. फारतर व्यायाम म्हणून सायकल चालवा अस सांगितलं. आणि मी माझ्याचसाठी सायकल चालवायचं ठरवण कठीण होतं.

खाजगी बस ठरलेल्या अचूक वेळेला प्रवास सुरु करेल यावर जितका विश्वास असतो, तेवढाच विश्वास मी ठरवलेल्या गोष्टींबद्दल असतो.

या गोष्टीनंतर माझं वय हा शब्द कायम ऐकायला यायला लागला. आता वय किती हे सुध्दा कॅलेंडरच ठरवतो. आणि या वयात काय करायचं, आणि काय करायचं नाही हे माझ्याबाबतीत डाॅक्टर ठरवतात. काय खावं, किंवा किती खायला पाहिजे हे ते ठरवत नसले तरी सांगतात मात्र तेच. वर तुम्ही ठरवा… अस मला सांगतात. आणि ते सहज आणि आपलेपणाने सांगितल तरी… त्यासाठी फी किती आकारायची हे सुध्दा तेच ठरवतात. फक्त तो ठरवलेला आकार माझ्या खिशाचा किती आकार कमी करतो हे मी ठरवतो.

आता माझी झोपायची, उठायची, फिरण्याची वेळ. खायचं काय, किती, केव्हा हे. यासारख्या अनेक गोष्टी ठरवल्या गेल्या आहेत. व त्या गोष्टी त्या वेळात करायचं मी ठरवलंय. तरीही रोज रात्री उद्या सकाळी लवकर उठायचं असं ठरवतो. पण लवकर म्हणजे नक्की किती वाजता… हेच ठरत नाही. दुसर्‍या दिवशी ऊठतो तेव्हा लवकर हा शब्द हरवलेला असतो, आणि उठायला ऊशीरच झाल्याच लक्षात येतं.

रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कितीतरी छोट्या छोट्या असतात ज्या मनात आणलं तर ठरवता येऊ शकतात. पण ठरवायचच असेल तर छोट्या गोष्टी ठरवण्यात काय मजा… अस म्हणत मी त्या ठरवायच टाळतो… आणि मोठ्या गोष्टी… राहू देत. नंतर सांगतो…

पण माझं ठरवण हे हाॅटेल मधे जेवायला जाण्यासारखं असतं. हाॅटेल मधे ते काय देणार हे त्यांनी ठरवलेलं असत व तेच मेनूकार्ड वर असत. त्यावरून आपल्याला काय, आणि किती मागवायच हे आपण ठरवतो. तसच घरात काय ठरलं आहे, व त्यातलं काय, व किती मी (वेळेत) करु शकतो हे पाहून ते करायचं मी ठरवतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जनगणनेच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धोका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

डाॅ.धनंजय देशपांडे

? विविधा ?

☆ “जनगणनेच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धोका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

आता देशात जनगणना “एप्रिल 2026 पासून टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे” महाराष्ट्रात घरांची यादी 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार आहे. जनगणना ही देशासाठी महत्त्वाची आहे, पण तुमची सुरक्षितता त्याहूनही जास्त. महत्वाची आहे. कारण जनगणनेच्या नावाखाली सायबर भामटेही तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून तुमची सगळी माहिती काढून घेऊन / प्रसंगी बोलण्यात गुंतवून तुमच्याच कडून ओटीपी घेऊन लुटलेही जाण्याची शक्यता आहे म्हणूनच तातडीने मी (डॉ. धनंजय देशपांडे तुमचा सायबर सुरक्षा दोस्त) सर्वाना सावध करण्यासाठी व काय काळजी घ्यायची ते सांगण्यासाठी या पोस्टमधून संवाद साधतोय.

जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकृत व्यक्तीला कसे ओळखावे, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

खऱ्या जनगणना अधिकाऱ्याची ओळख कशी पटवाल?

🛑 अधिकृत ओळखपत्र

प्रत्येक प्रगणकाकडे केंद्र सरकार किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेले अधिकृत ओळखपत्र असते. त्यावर त्या व्यक्तीचे नाव, पद, फोटो आणि संबंधित विभागाचा शिक्का असतो. ते आधी नीट तपासा.

नुसतं ID कार्ड दाखवलं म्हणजे खरा अधिकारी असतोच असं नाही. स्कॅमर पण नकली कार्ड छापून आणतात. तर अस्सल कार्ड ते आहे का ? यासाठी खालील 5 स्टेप्स लक्षात ठेवा.

 ID कार्डवर काय-काय तपासाल

अस्सल ID कार्डवर सरकारी शिक्का/होलोग्राम म्हणजेच Registrar General & Census Commissioner, India – ORGI चा लोगो त्यावर असतो. नकली कार्डवर लोगोची प्रिंट धूसर असते.

QR Code/बारकोड : 2026-27 ची जनगणना डिजिटल आहे. खऱ्या कार्डवर QR कोड असतो. तो स्कॅन केला की अधिकाऱ्याची माहिती अधिकृत साईटवर दिसते. प्रत्येक अधिकाऱ्याला विशिष्ट एरिया दिलेला असतो.

“तुमचा ब्लॉक नंबर कोणता?” विचारा. तो घाबरला किंवा टाळाटाळ केली तर तो संशयास्पद. आहे असं समजून त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवा.

तसेच कार्डवर जिल्हाधिकारी/तहसीलदारची अशा स्थानिक अधिकाऱ्याची सही-शिक्का असतो. तो आहे का पहा.

  1. फोनवरून लगेच क्रॉस-व्हेरिफिकेशन करा

हा सगळ्यात खात्रीशीर उपाय आहे: त्याला सांगा “1 मिनिट थांबा, मी तहसील ऑफिसला फोन करतो”. असं म्हणत जनगणनेसाठी टोल-फ्री हेल्पलाईन 14444 आहे किंवा राज्याच्या सेन्सस हेल्पलाईनवर फोन करा.

स्थानिक पर्यायसुद्धा असून ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, किंवा पोलीस स्टेशन 112 वर फोन करून “या नावाचा प्रगणक आमच्या एरियात नेमला आहे का?” विचारा. त्यांच्याकडे यादी असते. खरा अधिकारी थांबेल. फ्रॉडस्टर पळून जाईल. सिम्पल आयडिया !! 🤣 

  1. गणवेश आणि साहित्य बघा

खरे प्रगणक सहसा:सोबत टॅब/मोबाईल घेऊन येतात ज्यावर CENSUS 2026 अँप असतं. निळ्या रंगाची बॅग/फोल्डर असते ज्यावर “भारताची जनगणना 2026-27” छापलेलं असतं. ते एकटे-दुकटे येत नाहीत. एक सुपरवायझर व हाताखाली 6-7 प्रगणक असतात. तो एरियात फिरत असतो.

फक्त कागद आणि पेन घेऊन कुणी आला, तर लगेच सावध व्हा. त्याला कोणतीही माहिती देऊ नका.

  1. काय विचारतो ते ऐका

खोटे अधिकारी (सायबर भामटे) बऱ्याचदा माहिती विचारताना घाई करतात आणि घाबरवतात. “माहिती दिली नाही तर रेशन बंद होईल”, “दंड बसेल”. अस काहीतरी सांगून तुम्हाला पॅनिक करून नंतर हिप्नोटाईजसारखं करून त्यांना तुमच्याकडून हवी असलेली सगळी माहिती काढून घेतील. आणि नंतर ट्रॅपमध्ये अडकवतील. तेव्हा पॅनिक अजिबात होऊ नका.

आणि अधिकारी जर खरा असेल तर शांतपणे व ठराविक प्रश्नच विचारतो.

तो कधीही OTP, पैसे, बँक डिटेल्स, डेबीट क्रेडिट कार्ड डिटेल्स, पॅन नंबर, मागत नाही.

  1. शेजारी-पाजारी सोबत घ्या

जनगणनेसाठी आलोय असं कुणी म्हणत बेल वाजवली तर एकट्याने दार उघडू नका. सोसायटीच्या ग्रुपवर आधीच मेसेज टाका की “आज आमच्या लेनमध्ये जनगणनावाला आलाय”. म्हणजे सगळे शेजारी अलर्ट होतील. प्रसंगी तुमच्या शेजाऱ्याला सोबत घरी बोलवा. कारण चारपाच 4 लोकांसमोर फ्रॉड करायला सायबर भामटा घाबरतो.

🛑 नियुक्ती पत्र (Appointment Letter):

जर तुम्हाला संशय आला, तर तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या नियुक्ती पत्राची मागणी करू शकता. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना लेखी आदेश दिलेले असतात.

🛑 काय विचारले जाते आणि काय नाही?

सर्वात महत्त्वाचा फरक इथेच आहे.

काय विचारतात : कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, घरातील सुविधा (पाणी, वीज इ.).

काय कधीच विचारत नाहीत : अधिकृत अधिकारी तुम्हाला कधीही तुमचा OTP, बँक खात्याचा तपशील, पिन नंबर, सीव्हीव्ही (CVV) किंवा डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती विचारणार नाहीत.

🛑 प्रश्न काय विचारणार हे ठरलेलं आहे

प्रगणक फक्त ठराविक 33 प्रश्न विचारतात – घराचा प्रकार, पिण्याचं पाणी, शौचालय, वीज, गॅस, TV, गाडी वगैरे. ते तुमच्या उत्पन्नाबद्दल, गुंतवणुकीबद्दल, कर्जाबद्दल सविस्तर विचारणार नाहीत. असले प्रश्न आले तर सावध व्हा.

 🛑 पैशांची मागणी नाही:

जनगणना ही पूर्णपणे सरकारी प्रक्रिया आहे. यासाठी येणारा अधिकारी तुमच्याकडे एका रुपयाचीही मागणी करत नाही. जर कोणी ‘फॉर्म फी’ किंवा ‘नोंदणी शुल्क’ मागत असेल, तर समजा तो स्कॅमर आहे.

 🛑 मोबाइल ॲप आणि तंत्रज्ञान:

आताची जनगणना डिजिटल पद्धतीने होत आहे. अधिकारी त्यांच्या फोनमध्ये किंवा टॅबमध्ये ‘Census App’ वापरतील. तरीही, ते तुमच्या फोनवर कोणतीही अनोळखी लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला सांगणार नाहीत, याची दक्षता घ्या.

 शेवटी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या टिप्स

🔷 घराबाहेरच संवाद साधा : पूर्ण खात्री असल्याशिवाय अनोळखी व्यक्तीला घराच्या आत घेऊ नका.

🔷 स्थानिक प्रशासनाशी संपर्क : जर कोणी संशयास्पद वाटले, तर लगेच तुमच्या भागातील नगरसेवक, ग्रामपंचायत कार्यालय किंवा पोलीस स्टेशनला फोन करून शहानिशा करा.

🔷 सायबर हेल्पलाईन: जर कोणी जनगणनेच्या नावाखाली तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर त्वरित तक्रार करा.

 🛑 Self-Enumeration केलेला ID उपयोगी पडेल

तुम्ही https://se. census. gov. in वर स्वतः माहिती भरली असेल तर तुम्हाला 11-अंकी SE ID मिळते. घरी आलेल्या अधिकाऱ्याला फक्त तो ID द्यायचा आहे. त्याने परत सगळी माहिती विचारली नाही पाहिजे. त्याचा व तुमचाही वेळ वाचेल तसेच फसवणुकीची शक्यता झिरो होईल.

डॉ. डीडी क्लास : शेवटी इतकंच सांगतो… “माहिती द्या, पण सतर्क राहून! जनगणना ही देशासाठी महत्त्वाची आहे, पण तुमची सुरक्षितता त्याहूनही जास्त महत्वाची आहे” त्यामुळे सहकार्य करताना सावधपणे करा. आणि विशेष म्हणजे केवळ तुम्ही एकट्याने हे वाचून सावध होऊ नका 🤣

तर तुमच्या कुटुंबियांनाही हे पाठवा तसेच तुमच्या सोसायटी ग्रुपवर फॉरवर्ड करा ! 🙏

© डाॅ. धनंजय देशपांडे

– Cyber Security Consultant

– 3 National Award winner

– 3 State Award winner

– HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

😊

(लक्षात ठेवा: माहिती देणं कायद्याने बंधनकारक आहे, पण आधी ओळख पटवणं हा तुमचा अधिकार आहे)

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस प्रपंचात अडकलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेत भरपूर अभंग लिहिले आहेत. सर्वसामान्य माणसांना ऐहिक जीवनाचा लोभ असतो, त्यातून त्यांना परावृत्त होणे फार अवघड आणि कष्टाचे असते. तुकाराम महाराज या संदर्भात आपल्यासारख्या सामान्यांना अत्यंत कळकळीने त्यांच्या वाणीत जागोजागी सांगत आहेत.

आहे ते सकळ कृष्णासी अर्पण/

* नकळता मन तुझे भावी*//

म्हणवुनी पाठी लागतील भुते/

येती गिवसीत पाच जणे//

ज्याचे त्या वंचले आठव न होता/

दंड न हा निमित्त कारणे//

 

तुका म्हणे काळे चेपीयला गळा/

मी मी वेळोवेळी करीतसे//

आपण प्रापंचिक लोक हे जाणतच नाही की जी काही कर्मे आहेत, आणि जे जे काही अस्तित्वात आहे ते एका कृष्णाच्या सत्तेने आहे. कर्ता-करविता तोच आहे. आपण अविवेकी, हे जाणत नाही आणि सर्व काही मी केले अशी मनात भावना धरतात. त्यामुळे “येती गिवसित पाच जणे”, म्हणजे आपला पंचमहाभूतांचा हा देह आपल्याला शोधत येतो. याचाच अर्थ आपण जन्म मरणाच्या चक्रातून फिरत राहतो, आपला पुनर्जन्म होतो. सर्व कर्मे हरीचीच असून ती त्याची त्याला अर्पण करण्याची आठवण न ठेवल्यामुळे आपल्याला जगण्याचा आणि मरणाचा दंड मिळतो. हा दंड भोगायचा नसेल त्याने प्रथमतः अहंकाराने मी मी करणे सोडून दिले पाहिजे. ज्यावेळी अशी अवस्था होईल त्याचवेळी लोभ, मोह, सर्व मायापाश यातून माणसाची कायम सुटका होईल.

ते सामान्य संसारी माणसाला सांगतात,

वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जीती/

जाणार त्या निश्चिती देव नाही//

भाडेकरी वाहे पाठीवरी भार/

अंतरीचे सार लाभ नाही//

देवपूजेवरी ठेवूनिया मन/

पाषाणा पाषाण पूजी लोभे//

तुका म्हणे फळ चिंतीती आदर/

लाघव हे चार शिंदळीचे//

फळाची इच्छा मनात ठेवून प्रपंचासाठी अर्थार्जन करणाऱ्या प्रापंचिकांविषयी तुकाराम महाराज वरील अभंगात सांगत आहेत. एखादा चरितार्थाचा व्यवसाय मिळवून जमीन, घर, द्रव्य, राज्य, प्राप्त करून घेणारे जे लोक असतात त्यांनी परमार्थात कितीही धडपड केली, तरी त्यांना परमेश्वर प्राप्ती होणे असंभवनीय आहे. ओझे वाहणारा भारवाहक त्याच्या हमालीचे पैसे घेईल, परंतु त्या ओझ्यातील सारभाग त्याला कसा मिळेल? काही एक प्राप्त करण्याची वासना मनात ठेवून जो देवपूजा करतो तो दगडाची पूजा करणारा दगडच म्हणावा लागेल. अनेक प्रकारचे उद्योग करून त्यापासून फलप्राप्ती इच्छिणारे जे लोक आहेत त्यांची सर्व धडपड म्हणजे तुकाराम महाराजांच्या मते गणिकेच्या शृंगाराप्रमाणे निंद्य आहे.

रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन तुकारामांची सामान्यांना परिस्थिती पटवून, समजावून देण्याची पद्धत खरोखरच आपल्या मनाचा ताबा घेऊन त्या दृष्टीने आपल्याला विचार करण्यास लावणारी आहे. आता हे दोन अभंग पहा…

 (1)

 माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक/

 आपणा सरिसे लोक नागविले//

 विषयी लंपट शिकवी कुविद्या/

 मनामागे नांद्या होऊनी फिरे//

 करुनी खाता पाक जिरे सुरण राई/

 करिता अतित्यायी दुःख पावे//

 औषध द्यावया चाळविले बाळ/

 दावूनिया या गुळ दृष्टी पुढे//

 तरावया आधी शोधा वेदवाणी/

 वांझट बोलणी वारा त्याची//

 तुका म्हणे जया पिंडाचे पाळण/

 न घडे नारायण भेट तया//

 

(2)

मृगजळ दिसे साचपणा ऐसे/

 खोटीयाचे पिसे ऊर फोडी//

 जाणूनी का करा आपुलिया घात/

 विचारा रे हित लवलाही//

 संचित सांगती बोळवण सवे/

 आचरण द्यावे फळ लेणे//

 तुका म्हणे रोखी स्मशान ते वरी/

 संबंध गोवरी आगीसवे//

आपल्या देहाचे पालनपोषण करण्यातच आयुष्य वेचणाऱ्या आणि दुसऱ्यांना उपदेश करून स्वतः पापे करणाऱ्या लोकांविषयी पहिल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की, हे धर्माचे स्तोम माजविणारे लोक माया आणि ब्रह्म एकच आहे असे म्हणतात आणि याच धारणेने स्वैर वागतात व अज्ञान्यांना फसवितात. ( या लोकांना महाराजांनी धर्मठक ही अगदी योग्य संज्ञा दिली आहे.) विषयासक्त मनुष्य दुसऱ्याला कुविद्या शिकवतो आणि स्वतः नंदीबैलाप्रमाणे मन मानेल तिकडे जातो. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ली तरच पचन होते, अन्यथा कच्चे खाणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. आजारी मुलाला कडू औषध देताना त्याची आई त्याला एवढे औषध घेतल्यावर गुळाचा खडा देण्याचे आमिष दाखवते. महाराज सांगतात की, हा भवसागर तरुन जाण्यासाठी त्याचा नीट विचार करून, ज्ञान संपादन करून ( सुरणासारखा शिजवून आणि स्वर्गरूपी गुळाचा खडा महत्त्वाचा न मानता त्याग रुपी औषध घ्यावे) हेच आयुष्याचे सार आहे. माया आणि ब्रह्म एकच आहे असे समजून आणि देहाला सर्वस्व मानून त्याचे चोचले पुरविणाऱ्यांना नारायणाचे दर्शन कधीही होणार नाही.

दुसऱ्याही अभंगात मृगजळापाठी धावणाऱ्या हरिणाचे उदाहरण देऊन तुकाराम महाराज सामान्यांना हीच गोष्ट अधिक पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे मृगजळ हरिणांना खरे वाटते आणि ऊर फुटेपर्यंत मोठ्या आशेने हरणे तेथे धाव घेतात, त्याचप्रमाणे देहादिक प्रपंच खोटा आहे हे जाणूनही स्वतःचा घात करतात. स्वहित कशात आहे याचा विचार करीत नाहीत. जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात येत राहते आणि पूर्वकर्माप्रमाणे ते भोगावे लागते. प्रपंचात्मक माणसाचा देह स्मशानात जातो, तेथे तो अग्नीमध्ये मिसळतो. ( अग्नीशी त्याचे लग्न लागते.) याचाच अर्थ असा की, त्याचा जन्म ईश्वर साधना न करता फुकट जातो.

संसारी लोकांबद्दल महाराज काय म्हणतात ते आपण या अभंगात पाहू.

काय एकाच जाले ते का नाही ठावे/

काय आहे सांगावे का म्हूण//

देखतील डोळा ऐकतील कानी/

 बोलिले पुराणी तेही ठावे/

काय हे शरीर साच की जाणार/

सकळ विचार जाणती हा/

का हे कळो नये आपुले आपणा/

बाळत्व तारुण्य वृद्धदशा//

का हे आवडले प्रिया पुत्र धन/

काय काम कोण कोणा आले//

का हे जन्म वाया घातले उत्तम/

काहे राम राम न म्हणती//

काय भूली यांसी पडली जाणता/

देखती मरता आणिकांसी//

काय करीती हे बांधिलिया काळे/

तुका म्हणे बळे वज्रपाशी//

महाराजांना वाटते की, संसाराच्या संगतीने यांची ही काय दुर्दशा, अवस्था झाली आहे. यांना काय काय म्हणून सांगावे? प्रपंच संगतीने जीवाची किती दैना होते हे ते पाहतात, ऐकतात आणि पुराणातही सांगितलेले त्यांना माहित आहे. हे शरीर खरे आहे की नाशीवंत आहे याचे ज्ञान त्यांना आहे. कारण त्यांनी सर्व ऐकले आहे. आपल्या देहाला बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था अटळ आहेत हे माहीत असूनही त्यांना कळत कसे नाही? बायको, मुले, पैसा याविषयी इतकी प्रीती का असावी? ही माणसे कधी कुणाच्या उपयोगी पडू शकतात का? हे लोक त्यांना मिळालेला उत्तम नरजन्म वाया घालवीत आहेत. रामनामाचे चिंतन का करीत नाहीत? कित्येक लोक मरतात हे पाहिल्यावर आपल्यालाही मरायचे आहे हे जाणूनही लोकहो तुम्ही या वरपांगी देहाला का भुलता? काळाने त्याच्या बलिष्ठ वज्रपाषाने यांना बांधल्यावर हे काय करतील? गीतेमध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, व दोष यांचे जाणीवपूर्वक दर्शन करणे हे ज्ञानाचे लक्षण सांगितले आहे. संसारातील दुःखांची सतत जाणीव ठेवून हरी भजन करावे हेच महाराज आपल्यासारख्या मायाजालात फसलेल्या सामान्य जनतेला सांगत आहेत.

पुढील भागात याच संबंधी गाथेतील आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.

क्रमशः… २१ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares