मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाबांचं लग्न… ☆ राधिका माजगावकर पंडित ☆

राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ बाबांचं लग्न… ☆ राधिका माजगावकर पंडित

“काका मला तुमच्याशी थोडं बोलायचयं संध्याकाळी भेटाल का? ” ईशानचा फोन आला आणि मी मनांत म्हणालो, ही वेळ कधीतरी येणारच होती.

ठरल्याप्रमाणे आम्ही भेटल्यावर ईशान म्हणाला “काका शॉक न्यूज आहे. बाबा दुसरं लग्न करायचं म्हणताहेत. अहो काका! त्यांचं वय काय आणि काही वर्षांपूर्वीच आई गेली ते दुःख तिच्यावरच प्रेम, तिच्या आठवणी कुठे गेलं हे सगळं? काका लोकं काय म्हणतील! माझं लग्न ठरलंयहो! पण डिम्पल लग्नाची आहे तिच्या लग्नाचं बघायचं सोडून हेच बोहल्यावर चढायचं म्हणताहेत, हे काही बरोबर नाही! काय म्हणावं बाबांना, त्यातून आई बाबांचं लव्ह मॅरेज झालं होतं तुम्ही तिघं एका कॉलेजातले, आईबाबांची आणि तुमची आधीपासूनची मैत्री होती आई बाबांच्या प्रेमाला तुम्ही साक्षीदार आहात. मग मला सांगा आता कुठं गेलं बाबांचं आईवरचे प्रेम?

ईशानच्या लाह्या तडातड् फुटत होत्या. माझ्या मित्राचं सुधाकरच म्हणजे त्याच्या बाबांचं वागणं त्याला अजिबात पसंत नव्हतं. ईशानला शांत करणं अवघड होतं कारण प्रकरण बरच तापलं होतं. आता तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची असं मी ठरवलं.

कारण सुध्याला कसंबसं लग्नासाठी तयार करून मीचं त्याला घोड्यावर बसवलं होतं आणि मुलांना समजावण्याची तयार करण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली होती. ईशान चिडून मानमर्यादा सोडून पुन्हा पुन्हा म्हणत होता “कसलं खुळ आहे हे? म्हातारचळ लागलय का बाबांना?

आता मात्र मीही चिडलो “ईशान सांभाळून बोल ते बाबा आहेत तुझे. तुम्ही मुलं स्वतःचा विचार करता, लोकांचा विचार करता पण सुधाकरच्या मनाचा विचार कधी तुम्ही केला आहे का? तुमच्या व्यापात, मित्र मैत्रिणीत, पार्ट्यात तू आणि डिंपल मजेत असता तुझी बहीण तर सदा घराबाहेरच असते वहिनी गेल्यापासून तुमचं घर म्हणजे धर्मशाळाच झालीय. बाहेरचं पिझ्झा बर्गर खाऊन पोट भरलेलं असतं तुमचं, पण खाण्याचे हाल होतात ते तुमच्या बाबांचे. दिवसभर एवढ्या मोठ्या घरात तो एकटा असतो वहिनीच्या आठवणीत डोळे गाळण्यात दिवस जातो त्याचा.

तुझी आई अंथरुणावर होती तेव्हा तर खूप सेवा केली त्यानी बायकोची. आणि आता त्यांच्या आजारपणात पथ्य पाणी सांभाळणार, काळजी घेणार त्याच्या सुखदुःखात साथ देणारं जवळचं माणूस हवंच. निराशेच्या डोहातून आम्ही मित्रांनी बाहेर काढलंय त्याला, तेव्हा आली होती का बाहेरची लोकं? आणि तु म्हणतोस, लोकं काय म्हणतील. ” मी संतापून त्याला जाब विचारत होतो.

ईशानचा पारा खाली उतरत होता. तो म्हणाला, “तरी पण.. तरीपण काका. “. ईशान तुझा हा पण मागे घे. नीट ऐक उद्या तुझं लग्न झालं की तु परदेशात स्थायिक होण्याचं ठरवलं आहेस. जाशील तिकडचाच होशील, आता प्रश्न आला डिंपलचा ती लग्नाची आहे पण लग्नाला तयारच नाहीये. स्वातंत्र्याचा वारं तिच्या डोक्यात शिरलयं कारण तिच्या अपेक्षांचा डोंगर वाढतच चाललाय. अटीतटीचा मामला मिटतच नाहीय्ये.

सुधाकरने आणलेल्या स्थळांना धडाधड नकार देण्यात लग्नाचं वय सरतय आणि आता तर ती म्हणतेय मला लग्नच करायचं नाही. माझ्या म्हणण्याला पुष्टी जोडत ईशान म्हणाला. डिंपलचं मलाही काही कळत नाहीये. तिच्या काळजीने आई लवकर गेली.

त्याच्या बोलण्याचा धागा पकडून मी म्हणालो, “ईशान बेटा, पोरीच्या लग्नाची काळजी करून, परिस्थिती पुढे हात टेकले होते रे तुझ्या आईने, शेवटी ती माऊली वेगळ्याच विचारात गढली, रात्रंदिवस तिला फक्त सुधाकरची काळजी वाटायला लागली होती. आजारपणामुळे, भीषण भविष्यकाळ डोळ्यापुढे नाचत होता. तुझ्या बाबांची, सतत कसं होणार ही काळजी वाटत होती रे तिला.

आमच्या तिघांची मैत्री होती ना आधीपासून, त्या विश्वासाने एकदा वहिनी मोकळेपणी माझ्याजवळ म्हणाली, माझी शेवटची इच्छा आहे दीना, मी गेल्यावर ह्यांना एकटं राहू द्यायचं नाही त्यांचं दुसरं लग्न लावून देण्याचे वचन तुझ्याकडून मला हवं आहे 

आणि ईशान त्या माऊलीच्या वचनात मी वचनबद्ध झालो.

बाळा आजच्या जगात खूप स्पर्धा आहे जो तो पुढे पुढे धावतोय. त्यात जवळची माणसं, आईवडिलांकडे बघायला, त्यांच्याजवळ बसायला, मनातलं जाणून घ्यायला कुणालाच वेळ नाहीये. वडीलधाऱ्यांच्या हळव्या मनाची, त्यांच्या मनातल्या काळजीची, एकटेपणाची खिल्ली उडवली जाते. तु समंजस आहेस. शांतपणे विचार कर. बाबांच्या बाजूने विचार केलास त्यांच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात डोकावून बघितलंस तर तुला कळेल, अजूनही ते तुझ्या आईच्या आठवणीत अडकले आहेत. पण आता काही इलाजचं नाहीय्ये अनंताच्या प्रवासाला गेलेली तुझी आई, परत न येणाऱ्या वाटेवरून पैलतीरी पोहोचलीय. पण सुधाकरचं काय! उभं आयुष्य पडलं आहे. तु यूएसला जाणार. डिम्पल लांब रहाणार कारण तिने सांगूनच टाकलयं ‘मी स्वतंत्र रहाणार आहे. कुणाच्यात मला अडकून पडायचं नाही. मग तुझ्या बाबांच्याकडे बघायला, सुखदुःखात, आजारपणात सोबत ही हवीचं नाही का!

ईशान तसा संस्कारी, भावनाप्रधान होता माणसाच्या मनाचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर उमटतं. नकळत त्यांचे डोळे पाणावले होते तो म्हणाला, ” काका इतका विचार आम्ही मुलांनी कधी केलाच नव्हता. आईबाबांशी कधी प्रेमाने बोललो नाही, त्यांच्याजवळ बसून त्यांच्या भावना प्रेम आम्ही कधी समजूनच घेतलं नाही. सतत बाहेरच वारं, मित्रमैत्रिणी पार्ट्या आणि पैशाच्या मागे धावताना फक्त स्वतःचाच विचार करून स्वार्थ साधलाय आम्ही. मला खूप पश्चाताप झाला आहे काका, तुम्ही झणझणीत अंजन घातलंतं माझ्या डोळ्यात.

आई तर आता नाही ह्या जगात पण हे लक्षात आलंय माझ्या, झालेली चूक मी सुधारणार आहे. बाबांना सुखी झालेलं बघायचे मला. तरुणपणी, माध्यान्हकाळी लागत नाही इतकी साथीदाराची सोबत आयुष्याच्या संध्याकाळी आवश्यक असते.

स्वार्थाच्या डोंगरावर चढताना पायथ्याशी असलेल्या आई-बाबांना आम्ही मुले विसरतो हे चुकलचं आमचं “

ईशान मनापासून, भरभरून बोलत होता. तो आता इतका उतावळा झाला होता की असं वाटलं हा पठ्ठया आत्ताच बाबांना बोहोल्यावर चढवतोय की काय असं मनांत आलं आणि हंसू फुटलं.

त्याच्यातला बदल मला जाणवला. माझं काम फत्ते झालं होतं. गड इतक्या लवकर ‘सर’ होईल असं वाटलं नव्हतं. तो पुढे म्हणाला, “काका केवढं मोठ्ठ काम केलंत. आमचे पाय तुम्ही जमिनीवर आणलेत. तुमचे विचार पटले मला. जग पुढे गेलयं. डिम्पलला पण हे पटेल. ती सोशल सुधारक विचारांची आहे.

आता एकच विनंती आमच्यासाठी नवी आई आणण्याचं काम तुमचं. मी यूएसए ला जाण्यापूर्वी लग्नाच्या तयारीला लागतो. माझ्या चेहऱ्यावर खट्याळ हंसू उमटलं पण त्या मिस्कील हास्या मागे दडलेलं गुपित मी त्याच्यापासून क्षणभर लपवलं. कारण सुधाकरसाठी आम्ही मित्रांनी आधीच एक जोडीदारीण शोधून ठेवली होती.

बाबांना भेटण्यासाठी, त्यांना मिठी मारण्यासाठी उतावळा झालेला लेक वळून म्हणाला. “काका पण माझी एक अट आहे माझं लग्न आधी होणार’ ते ऐकून मी चमकलो. मनात म्हणालो, आला का ह्याचा स्वार्थीपणा उफाळून ‘

माझ्या चेहऱ्यावरचा भाव ओळखून तो हसत म्हणाला, “आधी लग्न माझं मग बाबांचं अशी घोषणा मी का करतोय ते समजून घ्या काकामहाराज बाबांच्या लग्नात देवदेवक मी माझी बायको स्नेहा बसवणार. आणि नवीन पद्धत सुरू करणार. लग्न शास्त्र शुद्ध वैदिक पद्धतीने करूयात आपण. नव्या आईच्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचाय मला. आणि आमच्या नव्या पिढीला दाखवून द्यायचय, आपण आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांचं मन जाणायला हवं त्यासाठी नवीन पायंडा पाडावा लागला तरी चालेल.

ईशानचा उत्साह बघून मलाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला जवळ घेऊन म्हणालो, ” बेटा ये हुई ना बात ‘पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा” 

आता हा झेंडा घेऊन मला सुध्याला गाठायला हवं. तो अस्वस्थ होऊन येरझारा घालत असेल.

अरे पण! ईशान– तो तर केव्हाच पुढे पळाला होता. लग्नाची तयारी करण्यासाठी उतावळा झाला होता.

मंडळी विषय वेगळा आहे पण आशय मोठा आहे. जग सुधारलय, अशा गोष्टी घडल्यात, घडतील आणि सगळ्यांच्या सुखसोयीसाठी त्या घडाव्यात. असं झालं तर

सर्वे संतु निरामय: 

असंच होईल.

© राधिका माजगावकर पंडित

सन सॅटॅलाइट पुणे – 51  

मो. 8451027554

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ औरत… (अनुवादित) – भाग २ – मूळ गुजराती लेखिका : गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : राजेन्द्र निगम ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ औरत… (अनुवादित) – भाग २ – मूळ गुजराती लेखिका : गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : राजेन्द्र निगम ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर

(अनुवादित कथा).. (उत्तरार्ध)

 (गडद रंगाच्या दुपट्टयाने आपले केस झाकून, आपल्या लोकांवर हुकूम चालवणार्‍या समीराच्या गालावर जेव्हा तिचे सोनेरी केस यायचे, तेव्हा तो तिच्याकडे एकटक बघत रहायचा. ही सुरमा घातलेली मालकीण त्याला गावात असलेल्या त्याच्या प्रिय बहिणीची आठवण करून द्यायची.) 

इथून पुढे – –

सुश्री गिरिमा घारेखान

एका गुरुवारी रशिद आला नाही. सकाळपासून वाट बघणारी समीरा, दुपारपर्यंत बेचैन झाली. तिने रशिदला फोन लावला.

‘आपली वाट बघतेय! ’

‘अरे, जानेमन इथे काही काम आहे! ’

रशिदच्या या ‘जानेमन’ संबोधनात समीराला आज चैतन्य वाटले नाही.

आणखी काही चौकशी न करता तिने एवढेच विचारले,

‘पुढल्या गुरुवारी तरी येणार ना! ’

‘इंशाअल्लाह’ (अल्लाहची मर्जी असेल तर…) म्हणून रशिदने फोन ठेवून दिला.

त्यानंतर प्रत्येक गुरुवारी सकाळी समीरा खिड़कीजवळ उभी रहायची. आणि रशिदची वाट पहायची आणि नजर बाहेरच्या पोकळीशी धडकून परत फिरायची.

एक दिवस तिने माळ्याला एक मोठा वृक्ष उखडताना पाहिला. तिने कारण विचारताच, तो म्हणाला, ‘ मालकीण इथे अशी तयार मोठी झाडे लावली जातात. काही लागतात. काही लागत नाहीत. हा सुकलाय, म्हणून उखडलाय.

त्यानंतर समीरा जेहा जेव्हा आरशात बघायची, तेव्हा तेव्हा, तिला सुकलेला वृक्ष दिसायचा. तिची बेचैनी दिवसेंदिवस वाढत जायची. रशिदच्या थांबलेल्या भेटी, आवाजातील रुक्षता, ठेवून दिले जाणारे टेलिफोन, तिला काय संकेत देतात?

आता तिला मखमली गालिचे, कारंजाचं पाणी आणि बागेतील फुले आनंद देत नव्हते. आता अंधरातून सुगंध आणि दिवसातून उजेड उडून गेला होता.

महिन्याहून अधीक काळ लोटला. काय रशिदला आता तिच्यात आजिबात रस उरला नव्हता? तिला काय केवळ काम करण्यासाठी इथे आणले गेले होते? हिंदुस्तानी हुशार मुलगी होती म्हणून? एकटेपण आता तिला खाऊन टाकत होतं. पिवळा खजूर आता पिकून लाल चुटूक झाला होता. काही दिवसांनी हे कामही बंद होईल. मग बोलण्यासाठी सईदची साथही मिळणार नाही.

समीराचे मन वारंवार उडून तिच्या गावी पोहोचत असे. तिथे त्या छोट्याशा घरात, किती शांती, आंतरिक समाधान होतं. घरात आणि बाहेर दिवसभर चिमणीसारखी चिवचिवाट करत उडत रहाणारी ती. इथे काय बनली? एक मसाला भरलेली मोरणी जी खोलीची शोभा वाढवत बसलेली. तिला वाटायचं, तिच्या अम्मीने तिला या सुखाच्या विहिरीत का ढकललं? अम्मीने तिच्या चमकणार्‍या भिंती बघितल्या, पण तिला हे माहीत नाही, की या भिंतींवर भावनांची आर्द्रता मुळीच नाहीये. या चमकदार भिंतींच्या विहिरीत मान उंचावून बसलेली समीरा प्रत्येक गुरुवारच्या सकाळी रशिदच्या येण्याची वाट बघायची आणि दुपारनंतर पुढच्या गुरुवारची वाट बघायची.

शेवटी तिच्या दु:खाच्या ढगांना चिरणारा एक गुरुवार उगवला. रशिद भल्या सकाळीच आला. त्याच्या चेहर्‍यावर समुद्राच्या लहरींप्रमाणे आनंद उसळत होता. त्याच्या ड्रायव्हरने गाडीतून मिठाईची पॅकेट्स काढली आणि बागेत काम करणार्‍या लोकांना वाटणं सुरू केलं.

सगळेच लोक मालकांना ‘मबरुक, मबरुक’ म्हणत होते.

रशिद जवळ जवळ पळत पळत समीराकडे आला. तिला उचललं. समीराच्या मनाच्या वळवंटात जसा काही पाऊस पडला. खूप दिवसांनंतर भेटलेल्या या खविंदाला लपेटून ती म्हणाली, ‘इतकी खुशी? धंद्यात काही विकास, प्रगती झाली काय? ’ रशिदने आपल्या हातांच्या ओंजळीत तिचा चेहरा धरला. ‘अरे, जीवनात तरक्की मिळालीय. मी अब्बा बनलो. मुलगा झालाय, मुलगा! ‘

समीराच्या कानातून जसं काही कुणी अ‍ॅसिड ओतलं. ते तिच्या सार्‍या शरीरात पसरलं. तिने रशिदला धक्का दऊन आपल्यासू दूर केलं. अजूनही तिचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आ… प आप अब्बा?

आता रशिद काहीसा बेशरमपणे हसला. ‘आता सगळे प्रश्न विचारून माझा मूड खराब करू नकोस. बायकोशिवाय मी मस्कतमध्ये राहीन कसा? मी मर्द आहे. मर्द, अरब मर्द कळलं? मर्दाला बाई पाहिजेच पाहिजे. प्रत्येक जागी.

समीराचं काळीज फाटलं. बोलायला आता काही उरलं नव्हतं. अरब देशात शादी करून नबाबाच्या मालकिणीसह बक्षिसाप्रमाणे मिळणारी ही कटु वास्तविकता ती चांगल्या तर्‍हेने समजून चुकली. पण आता काय होणार? धागाच टाक्याला तोडू लागाला, तर शिलाई अशी होणार?

रशिद ने दुपारी खजुराचा सगळा हिशेब-ठिशेब बघितला आणि संध्याकाळी परत निघाला. खिडकीजवळ उभी राहून समीरा या उत्फुल्ल अरब मर्दाला जाताना बघत राहिली. सूर्य मावळला. आता बाहेर अंधार पसरला. समीरा खिडकीतून अंधारावर थुंकली. खोलीत आली आणि सात बल्बवाल्या झुंबरातील लाईट चालू केली. खोली झगमगू लागली.

समीराने मोबाईल हातात घेतला आणि सईदला फोन केला. थोड्याच वेळात आकाशात उगवणार्‍या सूर्याप्रमाणे सईद आला. त्याला पाहून समीराला वाटलं, तिचा जणू कोणी आत्मीय तिला मिळाला आहे. मग केरळचा पाऊस डोळ्यातून पाझरू लागला. मग रडत रडत ती म्हणाली, ‘‘सईद, तू मला सांगितलं नाहीस! तूसुद्धा? सईदच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. आपली नजर खाली झुक्वून तो म्हणाला, ‘ आपण खूप निरागस आहात. हा अरब आहे. इथे पुरुष जिथे राहील, तिथे त्याला एक बाई हवीच हवी. समीरा गुपचाप ऐकत राहिली. सईदच्या बोलण्यामुळे तिची निरागसता क्षीण होत चालली. आता मालकाची पहिली ओमानी बायको आपल्या मुलात व्यस्त होत राहील.

‘असं ऐकालय, की आता मालक पाकिस्तानात जाऊन लग्न करून येणार आणि त्या मुलीला मस्कतमध्ये ठेवणार! ’

दगड झालेली समीरा कणा-कणात विखुरली. त्या कणांना एकत्रित करण्यास तिला काही वेळ लागला. मग सईदच्या डोळ्यात आपले सजल डोळे घालत म्हणाली, ‘तुझ्या मालकाने पैशाच्या जोरावर माझं जीवन उध्वस्त केलं. सईद, मी तुझ्यावर भरवसा ठेवू शकते का? मला इथले कायदे-कानू समजावून देशील का? ’

सईदला दिसले, चोवीस तास त्याचा पाठलाग करणारे, केरळच्या घरात बसलेले दोन डोळे. त्याने होकरार्थी मान हलवली. त्याला वाटलं, खुदाने त्याच्यावर महरबान होऊन, कुणाचं कर्ज चुकवण्याचा मौका त्याला दिलाय.

त्यानंतर जवळ जवळ दीड महिन्यांनंतर रशिद आला. नवीन कपडे नि अलकारांनी नव्या नवरीसारखी सजलेली समीरा त्याला येऊन बिलगली ना कुठली तक्रार, ना राग. रशिद मनातल्या मनात हसला. बायकांना कपडे, दागिने मिळाले, की त्यांना काही फरक पडत नाही. शब्दांमध्ये आपलं सारं स्त्रीत्व विरघळवून समीरा रशिदला म्हणाली, ‘दिलबर, आपण खूप काळ येत नाही. त्यामुळे इथे परेशानी होतेय.

‘काय बेगम? आपण बोला! आपल्या सगळ्या समस्या दूर करतो! ’ रशिदला वाटलं, ती एखाद्या नव्या दागिन्याची मागणी करेल.

‘आपण न येण्याने आपल्या घरच्या आणि खजुराच्या धंद्यातील लोकांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत त्यामुळे ते ठीक तर्‍हेने काम करत नाहीत. बघा ना, खजूर उतरवण्यापूर्वीच किती पिकलाय! ’

खरं आहे! ’

आपण मंजूरी दिलीत, तर मला हा कारभार वाढवायचाय. पिकलेल्या खजुरातून बी काढून, त्यात बदाम भरून आपण परदेशी पाठवू शकू!

रशीदला या हिंदुस्तानी मुलीच्या बुद्धीचा गर्व वाटला.

‘मेरे सरताज, आपण मला इथली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी द्या. मग आपण कितीही काळापर्यंत आला नाहीत, तरी अडचण नाही! ’ रशिदच्या ओठांवर आपलं बोट फिरवत समीरा म्हणाली, ‘ आपल्याशिवाय मला मुळीच करमत नाही. पण आपली औरत आहे. मला माझ्या खाविंदांची खुशी पण बघायला हवी ना!

हातात घातलेल्या बांगड्या खणखणत, समीराने एक बदाम भरलेला खजूर रशिद च्या तोंडात घातला. त्या नरम खजुराबरोबर, तिचे बोलणेही रशिदच्या गळ्याखाली उतरलं.

एवढ्या अवधीत या बाईने इथला कारभार मोठ्या कुशलतेने सांभाळला होता. त्यामुळे तिची कुशलता आणि नियत यावर भरवसा न करण्याचं काही कारणच नव्हतं. जर त्याने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिली, तर तो पाकिस्तानहून ज्या उमलत्या कळीला आणणार होता, तिच्याबरोबर तो मस्कतला आरामात राहू शकणार होता.

रशिद शनिवारी निघून गेला. मंगळवारी संध्याकाळी, त्याचा ड्रायव्हर आला आणि सरियात (शरीयत)च्या अदालतीचे सगळे दस्तावेज देऊन निघून गेला. आता रशिदच्या सोहारच्या सगळ्या संपत्तीची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी समीराच्या जवळ होती. दस्तावेज हातात घेऊन हसणारी समीरा मनात म्हणाली, ‘ या मर्दाला प्रथमच कुणी औरत भेटली.’

सूर्यास्त झाला आणि आकाशात चंद्र उगवला. समीराने मोबाईल हातात घेतला आणि सईदला फोन केला. ‘काम झालं. शेवया बनवतीय. ही खुशी, आनंदाने साजरी करू या ना! ’

दूर कोणत्या तरी मशिदीत, सूर्यास्ताच्या वेळच्या नमाजाची अजान झाली. समीराने दुपट्टा डोक्यावर ओढ़ला आणि देवाला शुक्रिया म्हणण्यासाठी तिने नमाज पठण सुरू केलं.

– समाप्त –

☆☆☆☆

मूळ कथा : औरत

मूळ लेखिका : गिरिमा घारेखान. – मो. 8980205909.

गुजरातीतून हिंदी अनुवाद : राजेन्द्र निगम,  मो. 9374978556

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ औरत… (अनुवादित) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : राजेन्द्र निगम ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ औरत… (अनुवादित) – भाग १ – मूळ गुजराती लेखिका : गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : राजेन्द्र निगम ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर

(अनुवादित कथा)..(पूर्वार्ध)

थोडीशी घरघर. मंद होत जाणारा प्रकाश आणि विमान उडू लागले. समीरा हळू हळू छोट्या छोट्या होत जाणा-‍या घरांकडे खिडकीतून बघत होती. या सगळ्यात माझेही घर दिसेल का?  एक दुसर्‍याला लागून असलेल्या अनेक घरात,  तिचेही एक घर होते. कुठून दिसेल ते?  तिला तिच्या बालपणाची आठवण झाली. तेव्हा उडत्या विमानाची घरघराट ऐकू येताच मोहल्ल्यातील सगळी मुले पळत पळत बाहेर येत असत आणि छोटं छोटं होत विमान अदृश्य होत नाही,  तोपर्यंत सगळी मुले तिकडे बघत रहात. आज बरोबर उलटं आहे. ती विमानात बसलीय आणि घरं छोटी छोटी होताना ती बघतेय.

सुश्री गिरिमा घारेखान

थोड्याच वेळात विमान ढगांमधे शिरलं. समीरा,  पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहावं,  तशी काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे दृश्य तिच्या नजरेसमोर साकार होऊ लागले.

‘नाही अम्मी,  मला शादी करून इतक्या दूर जायचं नाही.’

‘अग वेडे,  मस्कत कुठे इतक्या दूर आहे? ’विमानाने फक्त दोन-तीन तासात तिथं पोचता येतं. यापेक्षा जास्त वेळ ट्रेनने कोचीनला पोचायला लागतो.’

समीराला तर परदेश शब्दामुळेच पोटात भिंगरी फिरल्यासारखं गरगरायला लागलं.

‘पण अम्मी,  अगदी अपरिचित देश,  अपरिचित लोक… मी तिथे कशी राहू शकेन? ’

मग अम्मी,  आपल्या मावशीच्या मुलीशी बोलली. ती किती तरी वर्षांपासून दुबईला होती. महालासारख्या घरात रहात होती. जास्त वेळा येणं तिला शक्य होत नसे. परंतु ईद- सणवार या निमित्ताने सगळ्यांसाठी खूप कपडे,  अत्तरं,  खजूर,  सुका मेवा आणि चॉकलेटस पाठवते. तरीही समीराचं मन मानत नव्हतं. पावसाळ्यात त्यांच्या घराच्या गळणार्‍या छताप्रमाणे अम्मीच्या डोळ्यातून पाणी वहाणे सुरू झाले होते.

समीराला आपल्या घरच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. तिला माहीत होतं,  की तिचे अब्बा दिवसभर श्वास घेण्याइतकीही फुरसत न घेता काम करतात,  तेव्हा कुठे घरातील सहा व्यक्तींच्या शरीराला त्यांचा ऑक्सिजन मिळत होता. त्यांच्या पगारानंतरचे दहा दिवस ईदप्रमाणे वाटायचे. नंतर हळू हळू रोजांना सुरुवात व्हायची.

दूरच्या एका नातेवाईकामार्फत,  वीस वर्षाच्या समीराला,  मस्कतमध्ये रहाणाऱ्या एका अरबासाठी मागणी आली. या नातेवाईकाने यापूर्वीही अनेक मुलींचे विवाह खाडीतील देशात रहाणा-यांशी ठरवले होते. त्यामुळे अविश्वासाचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे हुंडा न देता मुलीला तिचा ठिकाणा मिळतोय,  तर समीराची अम्मी, परवीनच्या मनात अविश्वास दाखवण्याचा विचारही आला नाही.

त्या दिवशी समीरा नको… नको… म्हणत होती,  तेव्हा परवीन तिला समजावत होती. आई आणि मुलीच्या अश्रूंची धार एकसारखीच होती. कारणं फक्त वेगवेगळी होती.

समीरा विचार करत होती,  एक अगदी अपरिचित देशात,  एका अपरिचित व्यक्तीबरोबर,  ती सारं आयुष्य कसं व्यतीत करू शकेल?  शिवाय,  अरब देशांबद्दल तिने काय काय ऐकलं होतं. तिथे बुरख्यात रहायला हवं. घराबाहेर जास्त पडता येत नाही,  अशा खूप काही गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या.

इथे भलेही पैशाची कमतरता असेलही,  पण ती स्वतंत्रपणे हिंडू-फिरू शकते.

सरकारने दिलेल्या सवलतीमुळे ती बारावीपर्यंत शिकली होती. मुलांबरोबर एका वर्गात बसली होती. मॉनिटर बनण्याचा रुबाब दाखवला होता. शाळेत मुख्याध्यापिका बनून भाषण दिले होते. मैत्रिणीच्या अ‍ॅक्टिवावर बसून बाजारातून फिरून आली होती. तिच्या अब्बा-अम्मीने या सगळ्या गोष्टी करण्याबाबत तिला कधी नकार दिला नव्हता. बुरख्याखेरीज तिथे आणखी किती बंधने असतील?  काय ती श्वास घेऊ शकेल ना!

पण, अम्मीचे नाईलाजाचे शब्द आणि लाचारीचे अश्रू यात समीरा विरघळली. तिने जेव्हा अम्मीकडे बघत होकारार्थी मान हलवली.,  तेव्हा,  तिची अम्मी इतकी खूश दिसली,  जशी काही तिच्या झुकलेल्या मानेत,  तिला ईदचा चाँद दिसला. समीराचे कपाळ चुंबत,  ती म्हणाली,  ‘ शहाणी माझी बेटी! चल! तुझा चंद्रासारखा चेहरा नीट सजव. करीम चाचा त्या अरबाला घेऊन येणार आहेत. | रशिद – रशिद नाव आहे त्यांचं.’ 

आणि आज ती त्या रशिदची बीबी बनून त्याच्याबरोबर मस्कतला निघाली होती. पहिल्या मुलाखतीच्या वेळी तर समीराच्या पापण्यांवर जसा काही पहाड उभा राहिला. दुसर्‍या मुलाखतीच्या वेळी तिला वाटलं,  रशिदमध्ये आपत्तिजनक काही नाही. उंच,  गहूवर्णी,  बांधेसूद शरीर.

दुसर्‍या मुलाखतीच्या वेळी तो समीराला म्हणाला,  ‘त्या दिवशी आपल्या पापण्या उचलत नव्हत्या आणि माझे डोळे आपल्या चेहर्‍यावरून हटत नव्हते. मी हिंदुस्थानात आलो होतो,  एखाद्या मुलीशी निकाह करायला आणि मला तर नूरजहाँ मिळाली. माझी तर बिना रोजा इफ्तारी (रोजा न करताच,  रोजा केल्याचे पुण्य) मिळाली. हमदुल्ला! (अल्लाची कृपाच म्हणायची की! )’

तेव्हा,  समीराच्या हृदयात एक अंकूर फुटला. निकाहनंतर रशिद,  एखाद्या नाबाबाप्रमाणे सॅटीनचा,  दुधासारखा सफेद,  ज्याला ते,  ‘कंदोरा’म्हणतात,  त्या कुर्त्यावर मन मोहवणारा परफ्यूम शिंपडायचा,  तेव्हा समीरा त्यांच्या वयातील अंतर विसरून जायची. त्याच्या कमरेला लटकणारा चांदीचा खंजीर आणि त्याच्याबरोबर बांधलेला चांदीचा पट्टा याने समीराचं मन पूर्णपणे बांधून टाकलं। हिंदुस्तानी संस्कार असलेलं आणि अजूनपर्यंत कुमारिका राहिलेलं समीराचं मन,  त्या परदेशीविषयी कधी ओतप्रोत ओढीने भरून गेलं,  तिला कळलंच नाही. तो अनोळखी माणूस ‘“शौहर” ची उपाधी प्राप्त होताक्षणी तिचं सर्वस्व बनला होता.

एअर होस्टेस थंड पेय घेऊन आली. रशीदने समीराला ढगांतून बाहेर ओढली. ‘ढगांतून पहिल्यांदा उडताना कसं वाटतय? ’

‘आपल्याशेजारी बसल्यावर वाटतय,  विमान जसं काही सातव्या स्वर्गातून उडतय.’ समीरा रशीदच्या अधीकच जवळ सरकत म्हणाली.

निकाहनंतर ताबडतोब,  तिला बरोबर घेऊन जाण्याच्या कार्यवाहीत व्यस्त असलेल्या रशीदला,  समीराला खूप काही विचारायचे होते. तिने विचारणं सुरू केलं.

‘मस्कत कसं शहर आहे?  आपलं घर कसं आहे?  घरात कोण कोण आहेत? ’

रशीद हसत हसत म्हणाला,  ‘मस्कत खूप सुंदर शहर आहे,  पण आपल्याला सोहारमध्ये राहायचे आहे.’

‘सोहार! ’

‘हो! मस्कतपेक्षा थोडं छोटं शहर आहे. तिथे माझे घर आहे. फार्म हाउस- गार्डनवालं घर आहे. फार्ममध्ये,  घरामध्ये,  खूप नोकर-चाकर आहेत. तिथे तुला एकटेपण मुळीच जाणवणार नाही.’

‘फार्म! ’ समीराला वाटलं,  खुदाने खरोखर तिच्यावर मेहेरबानी केली आहे.

’खूप मोठा फ़ार्म आहे. खजूराची झाडे आहेत. त्यांच्याकडे तुलाच आता बघायचे आहे. ‘हिंदुस्तानातल्या मुली खूप हुशार असतात, ’ असं ऐकून होतो.’

समीराच्या गालावर हलकीशी चापट मारत,  रशीद म्हणाला.

समीरा आश्चर्याने सगळं ऐकत राहिली. तिच्या सचेत डोक्यात लगेचच एक प्रश्न निर्माण झाला,  ‘रशीद असं का म्हणाला, ’तुला एकटं वाटणार नाही? ’ एकटीला तिला कसं आणि काय सांभाळायचं होतं? ’ तिच्या डोक्यात हे सगळं एकदम काही शिरलं नाही. तरीही यातच तिचं मन विमानाप्रमाणे उडत उडत तिच्या विचार-शक्तीच्या पुढे गेलं होतं. यावेळी जसं काही एक वाढलेलं झाड त्याच्या मुळासकट उखडून,  कुठल्या तरी दुसर्‍या जागी,  रुजवण्यासाठी आणलं जात होतं.

फिल्ममधून बघितलेल्या विमान-तळापेक्षा,  अधीक भव्य असा मस्कतचा विमान-तळ बघून तिचे केवळ डोळेच नव्हे,  तर डोकंदेखील चक्रावून गेलं. विमान-तळाबाहेर रशीदचा ड्रायव्हर एक मोठी गाडी घेऊन उभा होता. कोमल,  चमकदार गाडीची चाके एखाद्या आफ्रिकन सुंदरीच्या गालासारखी रस्ता चुंबत पळत होती. जवळ जवळ एकशे पंचवीस किलोमीटर रस्त्यावर,  समीरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लटकणारी खजुरी आणि रांगोळीसारखी दिसणार्‍या फुलांसारखे विखुरलेले बंगले आपल्या डोळ्यांनी न्याहाळत होती.

सोहारमध्ये,  जेव्हा तिने आपल्या बांगल्यात प्रवेश केला,  तेव्हा तिला वाटलं,  तिच्या आधी स्वर्ग या बंगल्यात राहायला येऊन गेला.

राशिदच्या प्रेमात बुडून गेलेली समीरा आपले कुटुंब,  देश,  वेळ व दिवसांची गणना करणं विसरून गेली. तो बंगला,  त्यांच्या हनीमूनची रोमांचक वेळ बघत बघत रंगीबेरंगी प्रकाश पसरत राहिला. बाहेर उभे असलेले खजुराचे वृक्ष आपल्या पिवळ्या खजुरात अधीक माधुर्य भरत राहिले. एके दिवशी सकाळी रशीदच्या परफ्यूमच्या तीव्र गंधाने समीरा जागी झाली.

‘इतक्या सकाळी कुठे?  ‘

‘‘मस्कतला चाललोय. आता काम तर करायला हवं ना! ’

‘म्हणजे? … अनपेक्षित धक्क्याने समीराच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोळे मोठे मोठे करून ती रशिदकडे बघत राहिली. तिची झोप आता पूर्णपणे उडून गेली होती.

आपल्या कंदोर्‍यावर चांदीची पट्टी घालत घालत रशिद म्हणाला,  ‘. ‘जानेमन,  माझा मुख्य बिझनेस मस्कतमधेच आहे. आठवड्यातले पाच दिवस तिथेच रहाणार. जुम्मेच्या आधी आपल्या मलिकेजवळ तिचा शहनशाह हजर! ’

‘पण…’

‘अग,  पाच दिवस कसे बघता बघता सरतील…’ हाताने चुटक्या वाजवत रशिद म्हणाला,  ‘तू हा महाल सगळा नीटपणे बघशील,  तोवर बंदा हजार! ’

रशिदने आलिंगनबद्ध समीराला नजाकतीने दूर केलं॰ ती त्या आघातातून बाहेर येण्यापूर्वीच रशिद निघूनही गेला.

ही गोष्ट त्याने आधी का सांगितली नाही,  हे जाणून घेण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला,  पण जाणू शकली नाही.

जंगलामध्ये निघालेल्या एखाद्या बालिकेचा वेळ,  फांद्यांवर झुलण्यात,  खाली पडलेली फळे उचलण्यात,  पक्ष्यांच्या मागे पळण्यात,  फुलांबरोबर बोलण्यात,  जसा जातो,  तसंच काही तरी समीराबाबत झालं होतं.

ती घरामध्ये हांतरलेल्या मखमली गालीचावर फुलपाखराप्रमाणे बसत होती. बाथरूममध्ये सुगंधित पाण्याने भरलेल्या टबात फेसाबरोबर एकरस होत होती. बगिचात नाचणार्‍या कारंजातील पाण्याच्या शिडकाव्याने ती अनेक वेळा इंद्रधनुष्य होऊन जायची. अनेक वेळा नक्षीदर मोठ्या आरशासमोर बसून अलंकार बदलत राह्यची आणि विचार करत असायची,  रशिद जेव्हा येईल,  तेव्हा ती काय घलेल?  ती एखाद्या चातकाप्रमाणे गुरुवारची प्रतीक्षा करायची.

गुरुवारी सकाळी रशिद हजर व्हायचा आणि समीरा अपल्या या फ़रिश्त्याबरोबर स्वर्गात,  स्वर्गाचा आनंद घेत रहायची.

रशिद हळू हळू खजुराच्या कारभाराबद्दल समीराला सांगत गेला. आणि चतुर समीरा थोड्याच काळात सगळं काम शिकली.

पिवळ्या झालेल्या खजुराला झाडांवरून खाली उतरवायचं. वजन केल्यानंतर पॅकिंग करायचं,  लेबल लावायचं आणि मोठमोठ्या खोक्यात भरून मस्कतला पाठवायचं. ती ही सगळी कामे इथल्या लोकांकडून चांगल्या तर्‍हेने करवून घ्यायची. तिथे या सगळ्या लोकांचा मॅनेजर सईद होता. तो केरळहून आला होता. तो आता तिचा उजवा हात झाल्यासारखा झाला होता. आपल्याच मुलुखातून आलेल्या मालकिणीचा,  त्याच्यावर जो विश्वास होता,  त्याचा त्याला अभिमान वाटत होता.

गडद रंगाच्या दुपट्टयाने आपले केस झाकून,  आपल्या लोकांवर हुकूम चालवणार्‍या समीराच्या गालावर जेव्हा तिचे सोनेरी केस यायचे,  तेव्हा तो तिच्याकडे एकटक बघत रहायचा. ही सुरमा घातलेली मालकीण त्याला गावात असलेल्या त्याच्या प्रिय बहिणीची आठवण करून द्यायची.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ कथा : औरत

मूळ लेखिका : गिरिमा घारेखान. – मो. 8980205909.

गुजरातीतून हिंदी अनुवाद : राजेन्द्र निगम,  मो. 9374978556

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अखेर नातचं जिंकतं…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “अखेर नातचं जिंकतं…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

एखादा दिवस फुल टेन्शन घेऊनच उगवतो.काय चूक, काय बरोबर हे कळत नाही.विचार करून डोकं फुटायची वेळ येते.असीमची सकाळपासून अशीच अवस्था झालेली.द्विधा मनस्थितीमुळं जीवाची उलघाल चाललेली.निर्णय होत नव्हता. एकीकडं आड तर दुसरीकडं विहीर अशी अवस्था. 

“इट्स वेरी सिंपल.आधी कंपनीत जाऊ नंतर बघू.डोन्ट मेक इश्यू, ”नेहा म्हणाली तेव्हा असीमनं डोळे वटारले.

“काही चुकीचं बोलले नाहीये”

“दोन्हीही गोष्टी फार महत्वाच्या आहेत.आय एम कंफ्यूज”असीम. 

“कंपनीला प्रायोरीटी द्यावीस असं मला वाटतं.पुन्हा चान्स मिळणार नाही.ज्याच्यासाठी इतकी मेहनत घेतलीस तो क्षण जवळ आलाय.मिटिंग जास्त इम्पॉर्टंट आहे.इट इज गोल्डन ऑपरच्युनिटी.”

“आणि बाबांचं काय? ”असीम.

“डोन्ट बी इमोशनल.जरा प्रॅक्टिकल विचार कर.”

“बाबांची कंडिशन खूप सीरियस आहे.कधीही काहीही होईल.अशावेळी हॉस्पिटलमध्ये असणं आवश्यक आहे.” 

“मिटिंग संपली की हॉस्पिटलला जाऊ.”

“म्हणजे उद्या जायचं.हो ना.”

“स्पष्टच बोलते.बाबांची तब्येत आता सुधारणार नाही.तेव्हा..”

“शट अप.तोंडाला येईल ते बोलू नकोस.माझे वडील आहेत.रक्ताचं नातंयं.” 

“ते फक्त नावापुरतं.तीन वर्ष एकमेकांशी बोलचाल बंद आहे.यू बोथ हँव बिग ईगो.”

“तो विषय आत्ता काढायची गरज नाही.डॉक्टरांनी सांगितलं की आता बाबांकडे फार वेळ नाहीये”असीमला एकदम भरून आलं.

नेहा संतापली.“कमॉन यार, आठ दिवस झाले बाबा हॉस्पिटलमध्ये आहे.फक्त एकदा भेटायला गेलास आणि आईकडे फोनवर चौकशी करण्यापलीकडं काही केलं नाहीस आणि आज अचानक इतका पुळका…फायनल डिसीजन आपण कंपनीत जातोय.लेट्स गो.”नेहाच्या आग्रहाला बळी पडून असीमनं कंपनीत निघाला.गाडीनं वेग पकडला तेव्हा असीमच्या डोक्यात विचारांची गर्दी झालेली.अजून टेंशन नको म्हणून फोन फ्लाइट मोडवर ठेवला.चौकातल्या ट्राफिकमध्ये गाडी अडकली.तब्बल दहा मिनिटं गाडी एकाच जागेवर.भरिसभर म्हणजे पुढे असलेल्या टेम्पोच्या मागे लिहिलं होतं “प्रेमाचा, मायेचा अबोल आधार म्हणजे वडील” ते वाचून असीम बेचैन झाला. वैतागला.दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करूनही नजर सारखी तिथंच जात होतं.प्रत्येक शब्द खोलवर टोचत होता.गिल्ट वाढत होता.स्वतःवरच चिडलेला असीम जोरात ओरडला.नेहा बिथरली.बडबड करायला लागली पण असीमच्या कानापर्यंत ते पोचत नव्हतं.बाबांसोबतचे आनंदाचे क्षण, चांगले, वाईट प्रसंग, वाद, भांडणं, अबोला आणि आताचं आजारपण सगळं असीमच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होतं.लहानपणी आपले सुपरहीरो असलेले बाबा आता…वास्तवाच्या जाणीवेनं आलेला हुंदका असीमनं आवरला पण काही वेळातच बांध फुटला.डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं.नेहा प्रचंड वैतागली आणि ड्रायव्हर पुरता गोंधळला.त्याचवेळी ट्राफिक मोकळं व्हायला लागलं.गाडीनं पुन्हा वेग पकडला तेव्हा नेहाचा विरोध डावलून असीमनं ड्रायव्हरला यू टर्न घ्यायला सांगितलं.गाडी हॉस्पिटलच्या दिशेनं जायला लागली तेव्हा असीम बाबांसाठी प्रार्थना करत होता.

नियतीचा खेळ सुद्धा अजबच!!

अत्यवस्थ वडिलांना भेटण्याऐवजी मिटिंगसाठी चाललेल्या असीमची गाडी नेमकी ट्राफिकमध्ये अडकते. गाडीच्या पुढे असलेल्या टेम्पोवर नेमकं वडिलांविषयी लिहिलेलं.व्यवहार बाजूला ठेवून असीम योग्य निर्णय घेतो.अखेर नातं जिंकतं ..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाढदिवस… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाढदिवस… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे” ती रडकुंडीला येऊन बोलत होती.)

इथून पुढे – – 

“अरे बापरे!ते डायमंडचे कानातले ना? हो बरोबर. तू इथे आलीस तेव्हा तुझ्या कानात होते. पण घरातच शोध ना. तिथंच कुठतरी पडलं असेल”

“आई दोन तासापासून शोधतेय. घराचा सगळा कानाकोपरा शोधून झालाय” ती आता रडायला लागली होती

“विश्वासरावांना कळवलं का? त्यांनीच तुझ्या वाढदिवसाला घेऊन दिले होते ना? “

” हो. पण ते आता चेन्नईत आहेत. त्यांना कळवायचा धीर होत नाहिये. कळलं तर चिडतीलच ते माझ्यावर. अडीच लाखाचे होते आई ते कानातले. एक गेलं म्हणजे सव्वा लाखाचं नुकसान… “तिला पुढे बोलवेना

“जाऊ दे रडू नकोस. मी शोधते इथे. सापडलं तर तुला कळवते”

सुलक्षणेबाईंनी दोन तास घरात शोधाशोध केली पण काही तपास लागेना.

सकाळी उठल्या उठल्या त्यांनी सिक्युरिटीला फोन केला. झालेल्या घटनेची माहिती देऊन सोसायटीच्या आवारात शोध घ्यायला सांगितलं. घरातही त्यांनी परत शोधायचा प्रयत्न केला. या दरम्यान मुलीचे चारपाच फोन येऊन गेले. कानातलं सापडत नाही म्हणून ती कासावीस झाली होती. पोलिसात तक्रार देऊ या का असं सुलक्षणेबाईंना विचारत होती. सुलक्षणेबाई आणि त्यांच्या मिस्टरांनी तिला धीर धरायला सांगितलं कारण तक्रार केली की सोसायटीत पोलिस चौकशीला येणार. त्याचा सगळ्यांनाच मनस्ताप होणार होता.

दुपारी चार वाजता त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. बाहेर दिनू उभा होता.

“काय रे दिनू? “

दिनूने त्यांच्यासमोर हात उघडला. त्या हातावर ते डायमंडचं कानातलं होतं.

” हेच आहे का ते हरवलेलं?

सुलक्षणेबाईंचे डोळे विस्फारले. हो!तेच तर होतं ते. त्यांच्या लाडक्या लेकीने कौतुकाने त्यांना दाखवलेलं.

” हो. हेच आहे ते “त्या आनंदाने ओरडल्या”कुठं सापडलं हे? “हातात घेऊन त्यांनी विचारलं

“गेटच्या बाहेर. रस्त्यावर. सगळे सोसायटीच्या आत शोधत होते. पण ताईंनी गाडीत बसतांना स्कार्फ काढतांना मी पाहिलं होतं. म्हणून मला शंका आली की ते बाहेरच पडलं असेल. आणि खरंच ते तिथंच सापडलं” दिनू हसऱ्या चेहऱ्याने सांगत होता. सुलक्षणेबाईंनी ते घेऊन आपल्या पर्समध्ये टाकलं. पर्समधूनच त्यांनी शंभरची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली

“हे घे तुझं बक्षीस आणि थँक्यू व्हेरी मच. खरंच खुप गुणी मुलगा आहेस तू”

“नाही. नको”असं म्हणून दिनू वळला आणि निघून गेला. तो गेल्यावर सुलक्षणेबाईंनी मोबाईल उचलून लेकीला फोन लावला.

“अगं ज्योती सापडलं बरं का तुझ्या कानातलं”

ज्योती आनंदाने ओरडली

“कुणाला आणि कुठे सापडलं आई? “

सुलक्षणेबाईंनी दिनूचं नांव आणि कुठे सापडल्याचं सांगितलं.

“हा दिनू खरंच स्मार्ट पोरगा आहे. बरं तू त्याला काही बक्षीस दिलं की नाही? “

“मी त्याला शंभर रुपये देत होते त्याने घेतले नाही”

“काय आई!अगं सव्वा लाखाचं इयरिंग आहे ते आणि तू फक्त शंभर रुपये देत होतीस? अगं कमीतकमी हजार रुपये तर द्यायचेस. मी परत केले असते तुला”

“जाऊ दे गं! या लोकांना फार डोक्यावर चढवू नये”

“कमाल करतेस तू आई. सापडलं नसतं तर सव्वा लाख पाण्यातच गेले असते ना? “

सुलक्षणा बाई काही बोलल्या नाहीत.

दोन दिवसांनी पवार आपल्या कुटुंबासहित जयपूरला लग्नाला गेले. जातांना एकनाथला घरी राहिलेल्या आपल्या आईकडे लक्ष द्यायला सांगून गेले. पासष्ट वर्षांची त्यांची आई प्रवासाची दगदग सहन होणार नाही म्हणून घरीच राहिली. पवार सकाळी गेले आणि रात्री त्यांच्या आईच्या छातीत वेदना होऊ लागल्या. जीव घाबराघुबरा होऊ लागला.

त्रास जास्त वाढला तशी त्यांना दिनूची आठवण आली. त्यांनी एकनाथच्या रुममध्ये फोन करुन दिनूला पाठवायला सांगितलं. दिनू त्यांच्या फ्लॅटमध्ये गेला. आजींनी त्याला कपाटातली औषधं द्यायला सांगितली. ॲसिडिटीने अस्वस्थ वाटत असेल म्हणून पाण्यात इनो टाकून द्यायला सांगितलं. दिनूने त्यांनी जे जे सांगितलं ते केलं पण बऱ्याचदा ऐकून आणि वर्तमानपत्रात वाचून ही लक्षणं हार्ट अटॅकचीसुध्दा असू शकतात हे त्याला माहीत होतं. त्याला इमरजंसी नंबर्स तोंडपाठ होते. आजी नाही नाही म्हणत असतांना त्याने आजीच्या मोबाईलवरुन सोसायटीच्या डाॅक्टरला फोन लावला. तो फोन उचलेना म्हणून त्याने सरळ अँब्युलंस ड्रायव्हरला फोन लावला. सुदैवानं त्यानं तो उचलला. दिनूने त्याला लगेच सोसायटीत यायला सांगितलं. पाचच मिनिटांनी सोसायटीच्या डाॅक्टरचा फोन आला. दिनूने त्यालाही लगेच यायला सांगितलं. जवळच रहात असल्याने तोही लगेच आला. आजीचा बी. पी. चांगलाच वाढला होता. थोड्याच वेळात अँब्युलंस आली. दिनू आजीसोबत एखादी बाई असावी याकरीता आईला उठवून सोबत घेऊन गेला. आजीला हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट केल्या गेलं. उपचार सुरु झाले.

बातमी कळताच सकाळी लोढाशेठ हाॅस्पिटलमध्ये आले. तिथे दिनूला पाहून त्यांचा जीव कळवळला. पोरगा रात्रभर जागा होता. मग त्यांनी पवारांना फोन लावून सगळी कल्पना दिली. पवारांचं संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं. दिवसभरात इतर गाड्यात जागा मिळाली नाही तर ते संध्याकाळीच निघणार होते. त्यांनी लोढाशेठला दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आईची काळजी घ्यायला सांगितलं. लोढाशेठनी ते मान्य केलं.

सात दिवसांनी पवारांची आई एंजिओप्लास्टी करुन घरी परतली. भेटायला येणाऱ्या सर्वांना ती दिनूने तिची किती काळजी घेतली याबद्दल भरभरुन सांगत होती. तोंड फाटेस्तोवर त्याचं कौतुक करत होती.

” अरे सुभाष त्या दिनूला काहितरी बक्षीस दे रे. फार गुणाचं पोरगं आहे. सख्ख्या आजीसारखी माझी काळजी घेत होता तो “

आईने असं म्हंटल्यावर पवारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

“आई मी त्याला पाचशे रुपये दिले होते. त्याने घेतले नाहीत. फार मातला आहे तो. आता काय त्याला लाख रुपये द्यायचे? नाही घेत तर गेला उडत “

” अरे लाख रुपये नाही म्हणत मी. कमीतकमी पाच हजार तर द्यायचे. दोन दिवस त्याने आणि त्याच्या आईने तुझी आणि सुनबाईची कमतरता भासू दिली नाही”

पवार काही बोलले नाहीत. फक्त नाराजीने त्यांनी होकारार्थी मान हलवली. अर्थात ते एवढे पैसे दिनूला देणार नव्हतेच.

एक दिवस एकनाथने लोढाशेठना फोन केला

” शेठजी मला एका कंपनीत नोकरी मिळतेय. वीस हजार पगार देणार आहेत. मी त्यांना पुढच्या महिन्यात येण्याचं कबुल केलंय. सिक्युरिटी एजन्सीला सांगून तुम्ही एखादा सिक्युरिटी गार्ड मागून घ्या “

लोढाशेठ काळजीत पडले. नवीन सिक्युरिटी गार्ड तर त्यांना केव्हाही मिळाला असता पण एकनाथ सारखा केयरटेकर मिळणं मुश्कील होतं. त्यातून दिनूसारखा सर्वांना मदत करणारा पोरगा मिळणं तर त्याहून कठीण होतं. त्यांनी हा विषय सोसायटीच्या मिटिंगमध्ये मांडायचं ठरवलं. दिनूच्या वाढदिवसाला आता सात दिवस उरले होते आणि त्याचा वाढदिवस साजरा करायचा विषय आता बंदच झाला होता. “कुणी नाही केला तरी मी दिनूचा वाढदिवस साजरा करेन”हे मिटिंगमध्ये तावातावाने म्हंटलेलं वाक्य आता लोढाशेठला सलत होतं. सोसायटीचे सदस्य मिटिंगमध्ये हा विषय काढून त्यांची टिंगलटवाळी करणार होतेच. त्यांना काय उत्तर द्यायचं याचाही विचार करणं भाग होतं. पण आता एकट्याने साजरा करायची शेठजींची इच्छा मरुन गेली होती. शेवटी एका सिक्युरिटी गार्डच्या मुलासाठी एवढे पैसे खर्च करणं त्यांच्या व्यवहारात बसत नव्हतं. पण त्यांनी ठरवलं. दिनूला घरी बोलावून त्याला शर्टपँटचं कापड देऊन टाकायचं. त्यासोबत एखादं कॅडबरीचं चाॅकलेट नाहितर मिठाईचा बाॅक्स. बस झालं. चांगुलपणाचा ठेका त्यांनी एकट्याने थोडाच घेतला होता.

१६ ऑक्टोबर. आज दिनूचा वाढदिवस. संध्याकाळची वेळ. क्लबहाऊसला लावलेली लायटिंग चमचम करत होती. हाॅलमध्ये खुप गर्दी जमली होती नव्हे झाडून सगळी सोसायटी हजर होती. सजवलेल्या स्टेजच्या मागच्या भिंतीवर “हॅपी बर्थडे दिनू”चा बॅनर झळकत होता. ठेवणीतली शानदार शेरवानी घातलेला दिनू प्रसन्न चेहऱ्याने स्टेजवर उभा होता. त्याच्या बाजूला त्याचे आईवडील, सोसायटीचे अध्यक्ष पाटीलसाहेब आणि लोढाशेठ उभे होते. समोरच्या गर्दीकडे आणि टेबलवर ठेवलेल्या भल्या मोठ्या केककडे पाहून दिनूचा वाढदिवस खरंच साजरा होतोय यावर लोढाशेठचा विश्वास बसत नव्हता. पाचसहा दिवसांपूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी एकनाथला दुसरी नोकरी मिळाल्याचं आणि एकनाथ आणि त्याचं कुटुंब सोसायटी सोडून जात असल्याचं सांगितलं आणि चमत्कार घडला. एकनाथचा पगार वीस हजार करण्यापासून ते दिनूचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंतचे सगळे मुद्दे धडाधड मंजूर होत गेले. लोकांना दिनू आणि त्याच्या कुटूंबाची किंमत अखेर कळली होती आणि आज तो दिवस उजाडला होता ज्याची ते मनापासून वाट बघत होते.

दिनूने केक कापायला सुरुवात केली आणि “हॅपी बर्थडे टू यू दिनू ” चा जोरदार जल्लोष झाला. लोढाशेठनी दिनूला उचलून घेतलं तसे सगळे स्टेजवर धावत आले. दिनूच्या तोंडात केक भरवण्याची जणू स्पर्धा लागली. केक भरवून झाल्यावर जो तो दिनूशी हात मिळवून, त्याला जवळ घेऊन शुभेच्छा देऊ लागला. मग त्याला गिफ्ट देण्यासाठी भली मोठी रांग लागली. कुणी एक हजार, कुणी दोन हजाराची पाकीटं तर कुणी कपडे देत होतं. जोशी आले. त्यांनी आठ हजाराचा मोबाईल त्याला गिफ्ट दिला. सुलक्षणेबाई आल्या. त्यांनी पाच हजाराची सोन्याची चेन त्याला दिली. मग पवार त्यांच्या आईसोबत आले तेव्हा त्यांच्या हातात होती एक चमचमती नवी कोरी सायकल. जिची किंमत होती बारा हजार.

सगळ्यांचे गिफ्ट्स देणं झाल्यावर लोढाशेठ बोलायला उभे राहिले.

“मित्रांनो खुप खुप धन्यवाद. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या लाडक्या दिनूचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांनी त्याला स्वखुशीने गिफ्ट्स दिलेत. आता माझं गिफ्ट मी जाहीर करतो. दिनूच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी अध्यक्ष असलेल्या “हेल्प” या फाऊंडेशनने स्विकारली आहे”

टाळ्यांचा कडकडाट झाला. मग अध्यक्ष बोलायला उभे राहिले.

” सगळ्यांनी इतके गिफ्ट दिनूला दिले आहेत की मी त्याला काय द्यावं हेच मला समजेनासं झालंय. जितकं दिनूचं कौतुक होतंय त्यापेक्षा जास्त कौतुक त्याच्या आईवडिलांचं व्हायला पाहिजे. कारण त्यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच दिनू आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून येतो. तोही कसलीही अपेक्षा न ठेवता. अशा निरपेक्ष भावनेने कुणालाही मदत करण्याचे संस्कार आपणही आपल्या मुलांवर केले पाहिजेत. आजकालची तरुण पिढी मोबाईल, लॅपटाॅपमध्ये गुरफटून स्वकेंद्रित झाली आहे. त्यांनी दिनूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अशा सुसंस्कारी मुलाला घडवल्याबद्दल माझं गिफ्ट मी दिनूच्या ऐवजी त्याच्या आईवडिलांना देणार आहे. त्यांची मोठी मुलगी आता लग्नाची झालीये. तिच्या लग्नाच्या खर्चाची सर्व जबाबदारी मी उचलणार आहे”

टाळ्यांचा परत एकदा कडकडाट झाला.

लोढाशेठनी माईक हातात घेतला.

“कुणाला दिनूबद्दल दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी स्टेजवर यावं “

दिनूच्या वाढदिवसाला विरोध करणारे पवार स्टेजवर आले. दिनूच्या वाढदिवसाला आपण विरोध केला होता त्याबद्दल सर्वांची माफी मागून त्यांनी दिनूचे एकेक स्वभावगुण सांगून त्याची प्रशंसा सुरुवात केली. मग एकेक जण येऊ लागला. दिनूने केलेल्या मदतीचे प्रसंग सांगू लागला. अनुभव सांगतांना बऱ्याच जणांना गहिवरून येत होतं. सगळ्यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून दिनू अवघडून बसला. त्याच्याच बाजूला बसलेल्या एकनाथच्या आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यातून मात्र आनंदाश्रूंच्या धारा वहात होत्या.

समाप्त

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाढदिवस… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाढदिवस… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

लोढा शेठच्या गाडीचा हाॅर्न वाजला तसा एकनाथच्या ऐवजी दिनू सिक्युरिटीच्या रुममधून बाहेर आला. त्याने लगबगीनं फाटक उघडलं. गाडी जशी गेटच्या बाहेर पडू लागली तसा त्याने आपला बाप जसा ठोकतो तसा सॅल्यूट लोढाशेठला पाहून ठोकला. लोढाशेठच्या चेहऱ्यावर त्याला बघून एक प्रसन्न हास्य झळकलं. “पोरगा खरंच स्मार्ट आहे”ते मनातल्या मनात म्हणाले. गाडी पुढे रस्त्याला लागली तसा कालचा प्रसंग त्यांना आठवला. काल त्यांच्या मुलाचा पंधरावा वाढदिवस त्यांनी सोसायटीच्या क्लबहाऊसमध्ये जोरदार साजरा केला. त्यांचा मुलगा सनी दहावीच्या परीक्षेत ९९%घेऊन पास झाला होता हे खरं वाढदिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण होतं. सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड कम केयरटेकर एकनाथचा मुलगा दिनू वाढदिवसाला आपल्या आईबहिणीसोबत हजर होता. लोढाशेठ सगळ्या पाहुण्यांची चौकशी करतकरत दिनूजवळ पोहचले. दिनू त्यांचाच नाही तर पुर्ण सोसायटीचा आवडता मुलगा. त्याला पाहून लोढाशेठ थांबले. त्याच्या उत्साहाने भरलेल्या चेहऱ्याकडे पहात त्यांनी विचारलं

“काय दिनू कशी वाटली पार्टी? “

“लई झकास ” दिनूनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिलं “पुढच्या महिन्यात माझा पण वाढदिवस आहे आणि माझे पप्पा पण अशीच सगळ्यांना पार्टी देणार आहेत “

ते ऐकून लोढाशेठ जोरात हसले. या पार्टीकरता त्यांना दिड लाख खर्च आला होता. एक सिक्युरिटी गार्ड एवढा खर्च करणं शक्यच नव्हतं. एकनाथने त्याला नको ते स्वप्न दाखवलं होतं. दिनूच्या भाबडेपणाची त्यांना गंमत वाटली पण त्यांना त्याचं मन मोडायचं नव्हतं म्हणून ते म्हणाले

“अरे वा!आम्हांला बोलावणार आहे ना? “

“हो मग!सोसायटीतल्या सगळ्यांना बोलावणार आहे” दिनू उत्साहाने म्हणाला.

शेठजी हसतहसतच पुढे गेले होते.

ते आठवून आताही शेठजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकदम त्यांना जाणवलं की एकनाथची एवढा खर्च करण्याची ऐपत नक्कीच नाही. महिन्याला दहा हजार कमावणारा माणूस एकदिड लाख फक्त वाढदिवसाला खर्च करणार नाही. मात्र सोसायटीत रहाणारे सगळे मिळून तर करु शकतात. या विचाराने त्यांना एकदम उत्साह वाटायला लागला. काय हरकत आहे? प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्वाचं म्हणजे दिनू होताच तसा. सदोदित उत्साहाने फसफसलेला. हाक मारली की कुणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही असं नाही. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल अशीही अपेक्षा नाही. तो शाळेतून आला की सारखा सोसायटीतल्या रहिवाशांच्या कामासाठी वरखाली करायचा. कधी कंटाळा नाही की नाही म्हणणं नाही. “दिनू मला भाजी आणून दे” “दिनू जरा रुम साफ करायचीय. येतोस का मदतीला? ” “दिनू आजीला जरा फिरवून आणतोस का बागेत? ” “दिनू कोपऱ्यावरच्या मेडिकल मधून औषधं आणून दे बरं” “दिनू बाळ रडतोय. त्याला फिरवून आण जरा” अशी शेकडो कामं रोजच दिनूला सांगितली जायची आणि दिनू ती उत्साहाने करायचा. कधी कुणी त्याच्यावर चिडलं, रागावलं तरी दिनूने कधीही उलटून उत्तर दिलंय असं होत नव्हतं.

 सोसायटीला तीन सिक्युरिटी गार्ड होते. त्यातले दोन गावातच रहायचे. एकनाथ मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातून आलेला. एक्स सर्व्हिसमॅन. सोसायटीच्या अगोदरच्या अध्यक्षांनी त्याला आणलं होतं. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या दोन छोट्या रुममध्ये कुटुंबासह रहायचा. सिक्युरिटी गार्ड कम केअर टेकर अशा दोन्ही भुमिका तो निभवायचा. दिनू हा त्याचा छोटा मुलगा. तेरा वर्षाचा. गोरागोमटा आणि चुणचुणीत. एकनाथची बायको आणि मोठी मुलगीही सोसायटीतल्या रहिवाशांची गरज पडली तर बऱ्याचदा धुण्याभांड्याची कामं करायची. एकंदरीत या पुर्णच कुटुंबाची सोसायटीला बरीच मदत व्हायची पण खरा हिरो होता तो दिनू. सर्वांच्या मदतीला ताबडतोब धावून जाणारा.

 लोढाशेठ सोसायटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी ठरवलं सोसायटीच्या मेंबर्सची मिटिंग बोलवायची आणि हा मुद्दा मांडायचा. बारा मजली सोसायटीत ४८ फ्लॅट होते आणि त्यात रहाणारे जवळजवळ सगळेच सधन होते. दोनतीन हजार काढून द्यायला कुणी नाही म्हणणार नव्हतं.

रात्री ते घरी परतले तेव्हा एकनाथ ड्युटीवर होता. त्याला त्यांनी विचारलं

“एकनाथ आपल्या दिनूचा वाढदिवस कधी असतो? “

“सोळा ऑक्टोबर. का बरं साहेब? “

“अरे काल तो म्हणत होता माझे पप्पा पण माझा वाढदिवस सनीसारखाच साजरा करणार आहेत. खरंय का? “

एकनाथ जोरात हसला

“अहो साहेब आपली काय ऐपत असा वाढदिवस साजरा करण्याची. पण काल सनीबाबाचा वाढदिवस पाहून तो माझ्या मागे लागला की माझाही वाढदिवस असाच करायचा. मी त्याला खुप समजावून सांगायचा प्रयत्न केला पण ऐकेचना म्हणून म्हंटलं ठिक आहे करु. तर तो सगळ्यांना तेच सांगत सुटलाय. अर्थात त्याच्यावर कोण विश्वास ठेवायलाय? “

“आम्ही करु त्याचा वाढदिवस “असं सांगायचं शेठजींच्या अगदी ओठावर आलं होतं पण दिनूला सरप्राईज द्यायला पाहिजे या विचाराने ते काही बोलले नाहीत.

जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना फोन लावला.

“पाटिल साहेब, एक विचार मनात आलाय. आपला सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनूचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे. तुम्हांला तर माहितच आहे की दिनू किती कामाचा मुलगा आहे ते. तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्या सोसायटीने मिळून त्याचा वाढदिवस साजरा करावा”

“कल्पना चांगली आहे. पण साजरा करायचा म्हणजे कसा? “

“सोसायटीतल्या प्रत्येक परीवाराने दोन हजार जमा करायचे. साधारण शहाण्णव हजार जमतील. त्यात केक कापणं, सगळ्यांचं जेवण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करु. त्या निमित्ताने एक गेटटुगेदर होऊन जाईल”

“गेटटुगेदर ठिक आहे पण एका सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा वाढदिवस साजरा करणं आपल्यासारख्या उच्चभ्रू लोकांना शोभेल का? सोसायटित असे अनेक जण आहेत ज्यांना आपल्या मुलांचे वाढदिवससुद्धा घरातच साजरे केलेले आवडतात मग दिनूच्या वाढदिवसाला ते तयार होतील का? अजून एक प्राॅब्लेम आहे. हा वाढदिवस आपण आपल्या खर्चाने साजरा केला तर बाकीचे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्या मुलांनी काय घोडं मारलंय? दिनूचा केला तर आमच्याही मुलांचे करा. मग तेव्हा काय उत्तर द्यायचं? “

“अहो साहेब त्यांची फॅमिली इथं रहात नाही. सिक्युरिटी शिवाय इतर कोणतंही काम ते किंवा त्यांची फॅमिली करत नाही. शिवाय तुम्ही पहाता तो पोरगा शाळेतून आला की सोसायटीतल्या लोकांची वैयक्तीक कामं करत असतो तीही फुकट. कधी त्याने कामाचे पैसे मागितले नाहीत की कामाला नाही म्हंटलं नाही. सोसायटीतले लोक त्याला आपल्या स्वार्थाकरीता वापरुन घेतात. मग एक दिवस त्याच्या साठी खर्च केला तर बिघडलं कुठं? “

“ठिक आहे. माझी काही हरकत नाही. ठेवा मिटिंग. बोलावून घ्या सगळ्यांना. पण मला नाही वाटत लोक तयार होतील. एकेक नमुने आहेत सगळे”

” पण मला खात्री आहे, दिनूसाठी ते नक्कीच पैसे देतील. आणि त्यांनी नाही दिले तरी मी एकटा करेन त्याचा वाढदिवस “लोढाशेठ जिद्दीने बोलून गेले

“मग तर प्राॅब्लेमच नाही. व्हा पुढे”

 सोसायटीतल्या सगळ्या परीवारांचा एक व्हाॅटस्अप ग्रुप होता. त्यावर शेठजींनी येत्या रवीवारी पाच वाजता मिटिंग आयोजित केल्याचा मेसेज टाकला. मिटिंगचा विषय त्यांनी मुद्दामच टाकला नाही. विषय पाहूनच बरेच जण मिटिंगला यायचेच नाहीत असं त्यांना व्हायला नको होतं.

रविवार उजाडला. लोढाशेठ पाच वाजताच मिटिंग हाॅलमध्ये जाऊन बसले. कुणीही आलं नव्हतं. हे नेहमीचंच होतं. कोणत्याही विषयावर मिटिंग असो येणारे फार कमी. जे यायचे तेही आपल्या फुरसतीने सेक्रेटरीवर उपकार केल्यासारखे डुलतडालत यायचे.

सहा वाजले तेव्हा अध्यक्ष पाटील उगवले.

“अरे!अजून कुणीच आलं नाही? तुम्ही मेसेज पाठवला होता ना सगळ्यांना? “त्यांनी विचारलं

” हो तर. एकूणएक जणाला मेसेज पाठवलाय”

“मग असं कसं झालं? मेसेज ऐवजी तुम्ही फोनच करायला हवे होते. मेसेज वाचलाच नसेल तर त्यांना कळणार कसं? “

“अहो साहेब सगळ्यांनी मेसेज वाचलाय. मी चेक केलंय”

तेवढ्यात तीन चार जण आले. मग परत तीनचार जण आले. शेवटी सव्वासहा वाजता बारा जणांची उपस्थिती झाली. विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून लोढाशेठनी दहापंधरा मिनिटं थांबायचं ठरवलं.

” लोढा शेठ मिटिंगचा विषय नाही कळवला तुम्ही” लोखंडे जरा रागातच म्हणाले

“साहेब ही ऑफिशियल मिटिंग नाहिये. पण एक पाच मिनिट थांबा सगळा विषय क्लियर होईल “

” शेठजी लवकर आटोपा. आम्हांला शाॅपिंगला जायचंय” गव्हाणे मावशी घाई करत म्हंटल्या.

शेवटी आहे ती मंडळीही निघून जाऊ नये म्हणून शेठजींनी सुरुवात केली.

“माननीय सदस्यांचं मी स्वागत करतो. आज सोसायटीच्या प्रश्नांव्यतिरिक्त एका वेगळ्याच विषयावर चर्चा करण्याकरीता आपण जमलो आहोत. विषय असा आहे की आपण सर्वच जण आपल्या सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनेश उर्फ दिनूला जाणता. एक सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, कसलीही अपेक्षा न करता सगळ्यांची काम चोख करणारा, सदोदित हसतमुख असणारा असा हा मुलगा आपल्या सर्वांचाच लाडका आहे. या दिनूचा वाढदिवस सोळा ऑक्टोबरला आहे. माझा असा विचार आहे की दिनूच्या या कामाबद्दल, त्याच्या आपल्या सर्वांना असलेल्या सहकार्याबद्दल यावेळेचा त्याचा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून साजरा करावा”

शेठ थांबले. त्यांनी कुणी काही प्रतिक्रिया देतंय का याचा अंदाज घेतला. दोन मिनिट शांतता पसरली मग कुलकर्णी म्हणाले

“खरंच दिनू आपली खुपच काम करतो. आपण त्याचा वाढदिवस साजरा केला तर त्याला, त्याच्या आईवडिलांना खुप आनंद होईल. पण वाढदिवस साजरा कसा करणार? “

” सोपं आहे. आपण सर्वांनी दोन हजार रुपये जमा करायचे. ४८ घरांचे ९६ हजार जमा होतील. त्यात केक, दिनूला गिफ्ट, सगळ्या परीवारांचं एकत्र जेवण आणि मनोरंजनाचा हल्काफुल्का कार्यक्रम करता येईल “

“बापरे दोन हजार? खुप जास्त होतात “सुलक्षणेबाई म्हणाल्या.

” अहो मॅडम आपण हाॅटेलमध्ये जातो तेव्हा आपल्या चारपाच जणांचंच बिल तीनचार हजार होतं. ते आपण भरतोच ना? “शेठजी कळवळून म्हणाले

” पण काहो शेठजी, दिनू आपल्यासाठी जे काही करतो त्याचा काही ना काही मोबदला आपण देतोच ना!परवा त्याने माझ्या बाईकचं पंक्चर जोडून आणलं तेव्हा मी त्याला दहा रुपये खुशीने दिलेच होते. मग वेगळा वाढदिवस साजरा करायची गरज काय? ” महाजन मध्येच उठून म्हणाले.

” हो बरोबर आहे ” पवारांनी त्यांची री ओढली “आम्हीसुद्धा त्याने गहू वगैरे दळून आणले की खुशीने पाचदहा रुपये देतोच. आणि शेठजी या लोकांचे असे वाढदिवस साजरे करुन त्यांना मातवू नका. आज तुम्ही दिनूचा वाढदिवस साजरा करताय उद्या त्याच्या बहिणीचा करावा लागेल. मग दुसरे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्याही मुलांचे करा. मग प्रत्येक वेळी आम्ही असेच दोन दोन हजार द्यायचे का? “

शेठजींना शंका आली की पवार दारु पिऊनच आले असावेत कारण आताही त्यांचे डोळेही तारवटलेले होते. पवार सरकारी अधिकारी होते. दाबून वरकमाई करत होते आणि खर्चही तसाच करायचे. प्यायला बसले की पाचपाच हजाराची दारु ते पिऊन जातात असं शेठजींच्या कानावर आलं होतं. आणि आता एका चांगल्या कामासाठी दोन हजार द्यायला खळखळ करत होते

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा रंग एक झाला… ☆ प्रणिता खंडकर ☆

प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ अवघा रंग एक झाला… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

पार्लरची वेळ संपली होती. अपर्णा पर्स घेऊन निघण्याच्या तयारीत होती. पण सायली मात्र विचारात गढल्यासारखी खुर्चीवर बसून होती.

“सायली, चल निघूया ना? ” अपर्णा म्हणाली, तशी सायली पटकन आवरून उठली. दोघींनी शटर ओढून पार्लरला कुलूप घातलं आणि घरी निघाल्या आपापल्या वाटेने. सायलीच्या डोळ्यांपुढे तिचा भूतकाळ अवतरला होता.

पाच वर्षांपूर्वी तिचं आणि समीर’चं लग्न झालं. समीर एका सुप्रसिद्ध वाद्यवृंदात गिटारवादक होता. वाद्यवृंद खूपच जोरात चालला होता. एकामागून एक तारखा लागलेल्याच असायच्या. त्यामुळे समीरची कमाईही भरपूर होती.

सायलीनी बारावी झाल्यावर ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता आणि नववधूच्या मेकअप’च्या ऑर्डर घ्यायला सुरूवात केली होती.

एका मध्यस्था मार्फत समीरचं स्थळ आलं आणि दोन महिन्यात लग्न झालं सुद्धा. दोघंही खुश होती एकमेकांवर. सगळं काही छान चाललं होतं. सासू-सासरेही जीव लावणारे होते. दीड वर्षानी त्यांच्या घरात विशालचं आगमन झालं. नातवाच्या कौतुकात आजी-आजोबा दंग झाले. सायली आणि समीरचाही तो लाडोबा होता.

डहाणूहून कार्यक्रम संपवून समीर आणि त्याचे साथीदार

ट्रॅक्सनी कल्याणला निघाले होते. शीळफाट्या’च्या अलीकडेच एका भरधाव येणाऱ्या ट्रकची धडक बसली त्यांच्या ट्रॅक्सला आणि तो भयंकर अपघात घडला. जागच्या जागीच सारा खेळ संपला होता. समीर आणि रवी त्याचा मित्र दोघेही जागीच. सायलीचं घर या प्रसंगामुळे पार कोलमडून गेलं. जाणारा निघून जातो, पण मागे राहिलेल्याला तर जगणं चालूच ठेवावं लागतं नां.

समीरचं थोडं फार सेव्हिंग होतं. सायलीचे सासरे शिक्षक होते. एक वर्षापूर्वीच ते निवृत्त झाले होते. त्यांना मिळणारं पेंशन घर चालवायला पुरेसं नव्हतं. सासूबाई गृहिणी. सायली जेमतेम पंचवीस वर्षाची आणि विशाल एक वर्षाचा.

सात-आठ महिन्यांनंतर सायली थोडी सावरली. तिचं माहेरही मध्यमवर्गीय. त्यामुळे आर्थिक मदतीची अपेक्षा करणं शक्यच नव्हतं. आई-वडील तिला ठाण्यात माहेरी येऊन रहायला म्हणत होते. पण तिला ते योग्य वाटलं नाही. तिने मग घरातच पार्लर सुरू केलं. सगळ्यांनाच थोडी गैरसोय होणार होती. पण आत्ता दुसरीकडे जागा घेणं परवडणारं नव्हतंच. शिवाय आजी घरात असली तरी विशालकडे’ही तिला लक्ष द्यायलाच हवं होतं.

हळू हळू तिचा जम बसला. एके ठिकाणी अपर्णाची भेट झाली आणि दोघींनी मिळून ही आत्ताची जागा भाड्याने घेतली पार्लरसाठी. जागा मुख्य बाजारपेठेत होती, त्यामुळे पार्लरचे ग्राहक खूपच वाढले होते.

सुधाताईंशी ओळख पार्लर मध्येच झाली. त्या बरेचदा यायच्या तिथे. सायली पार्लरमध्ये नसताना एकदा त्या फेशियल करायला आल्या होत्या. सहज बोलता बोलता अपर्णाने त्यांना सायली बद्दल सांगितले आणि नंतर एकदा त्या दोघींची ओळखही करून दिली.

त्यांना खूप वाईट वाटलं ऐकून, एवढ्या लहान वयात, असा प्रसंग, सायलीने परत लग्न करून संसार थाटावा, आनंदात आयुष्य घालवावं असं त्यांना मनापासून वाटलं.

त्यांच्या मुलाच्या मित्राची, विवेकची त्यांना आठवण झाली. विवेक तिशीचा, एका मल्टिनॅशनल कंपनीत अधिकारी होता. रंगाने सावळा असला तरी रूबाबदार वाटायचा. शिवाय स्वभावही दिलखुलास. दोन वर्षापूर्वी डेंग्यूचं निमित झालं आणि वैदेही, त्याची बायको, विवेक आणि दोन वर्षाची स्वरा यांना मागे ठेवून देवाघरी गेली.

विवेकचं आयुष्य’ही त्यामुळे भरकटलं होतं. नोकरी आणि स्वराचं संगोपन यात त्याची फरपट होत होती. हसणं-बोलणं जणू विसरूनच गेला होता तो, विवेकचे आई-वडील सध्या त्याच्याकडे येऊन राहिले होते. पण कायम इकडे राहणं त्यांना शक्य नव्हतं. गावाकडे घर आणि आंब्याची बागाईत होती, त्याची व्यवस्था कोण बघणार? भावनिक दृष्ट्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने स्वराला कोकणात पाठवायची विवेकची तयारी नव्हती. विवेकला एक मोठी बहिण होती, ती लग्न होऊन रत्नागिरीला रहात होती.

सायली आणि विवेक तसे समदुःखीच. पण एकत्र आले तर दोघांच्या जीवनात आनंद निर्माण होईल आणि दोन्ही मुलांनादेखील आई-बाबा मिळतील. असा विचार करून सुधाताईंनी विवेकच्या आई-बाबांना सायलीबद्दल सुचवलं. ‘विवेक तयार असेल तर आम्हाला आनंदच आहे’, त्यांनी संमती दर्शविली. कधी स्वतः, तर कधी मुलामार्फत विवेकशी बोलून त्यांनी त्याला तयार केलं.

सायलीचंही मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण सासू-सासऱ्यांना सोडून, पुन्हा एकदा लग्न करायचा विचार तिला पटत नव्हता. शिवाय विशालचा ही प्रश्न होताच. अखेरीस सुधाताईंनी ‘त्यांच्याशी मला बोलू तरी दे एकदा’, म्हणून तिची परवानगी मिळवली. आज त्या तिच्या घरी जाणार होत्या.

सुधाताई, सहा वाजता सायलीच्या घरी पोहोचल्या. त्यांनी स्वतःची ओळख सांगून, मूळ विषयालाच हात घातला. सायलीच्या आयुष्याच्या दृष्टीने हे पटत असले तरी, नातवाला आपल्यापासून दूर करण्याचा विचार त्यांना सहन होण्यासारखा नव्हता. तरीही आपण यावर विचार करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आणि सुधाताई तिथून निघाल्या. म्हणूनच सायलीला घरी जायचं टेंशन आलं होतं.

‘आज सुधाताईंच्या बोलण्यावर विभाताई आणि वसंतरावांची काय प्रतिक्रिया असेल? ‘ तिचं मन सैरभैर झालं होतं. काय झालं होतं. काय करावं हेच तिला कळत नव्हतं.

ती घरी पोहोचली तर घरातलं वातावरण तिला आज वेगळं वाटलं. एक प्रकारचा ताण जाणवत होता. ती मग विशालला घेऊन गॅलरीतल्या झोपाळ्यावर जाऊन बसली. दुपारची भाजी-आमटी शिल्लक होती. त्यामुळे स्वयंपाकाचं जास्त काम नव्हतं. संध्याकाळी चार भाकरी, विभाताईच करायच्या. बाकीचं ती करायची. आज जेवणंही जरा मुकाट्यानेच झाली.

सकाळी उठल्यावर चहा घेताना मात्र त्या दोघांनी तिला पुन्हा लग्न करण्याला त्यांची संमती असल्याचं सांगितलं. विशालला सोडून राहणं त्यांना खूप अवघड होईल हे सांगताना दोघांचे डोळे भरून आले होते. तरीही ‘तू जे ठरवशील त्याला आम्ही होकार देऊ. तुझं आयुष्यही सुखात जावं असं आम्हाला वाटतं’, असं म्हणून विभाताईंनी तिला प्रेमाने जवळ घेतले.

कोणताही निर्णय घेण्याआधी, सायली आणि विवेकची भेट होणं, एकमेकांचे विचार त्यांनी समजून घेणं हे देखील आवश्यक होतंच. मग सगळ्यांनी दुसर्‍या दिवशी विवेकच्या घरी भेटावं असं ठरलं.

विवेकचा फ्लॅट पाच खोल्यांचा, म्हणजे तसा मोठा होता. त्यामुळे मोठ्यांना एका खोलीत आणि विवेक – सायलीला दुसऱ्या खोलीत बसून मोकळे पणाने बोलणं शक्य होणार होतं. मुलांनाही हाॅलमध्ये खेळायला जागा होतीच.

एकमेकांशी बोलून थोडं सैलावल्यावर, सायलीने तिच्या सासू-सासऱ्यांचं मतही विवेकला सांगितलं. विवेकला सायली आणि तिचं एकूण वागणं-बोलणं आवडलं होतं. सायलीच्या मनात काय आहे, ते मात्र त्याला कळत नव्हतं.

“तुझा काय विचार आहे सायली? हवं तर थोडा वेळ घे अजून आणि मग ठरव” विवेकने तिला आपला होकार देत सुचवले.

ते दोघं बाहेर आले तर स्वरा आणि विशालची छान गट्टी जमली होती. ती दादा-दादा करत त्याच्या मागे पळत होती आणि तोही तिच्याशी छान खेळत होता. वडील मंडळींच्याही दुसर्‍या खोलीत गप्पा रंगल्या होत्या. या दोघांना आलेलं पाहून त्यात खंड पडला. विवेकचा चेहरा काहीसा ठाम निर्णय घेतल्यासारखा तर सायली मात्र जरा संभ्रमात वाटत होती. तिचा निर्णय अजून होत नव्हता.

विवेक सायलीला म्हणाला, “साॅरी, पण तुला माझी एक अट सांगायची राहिलीच. “

‘कोणती? ‘, सायलीच्या चेहऱ्यावर अजूनच गोंधळल्याचा भाव.

‘जर विशालचे आजी-आजोबा स्वरालाही नात मानून आपल्याबरोबर रहायला तयार असतील, तरच मी तयार आहे लग्नाला. ‘

सायलीचा चेहरा एकदम खुलला होता आणि ती मोठ्या अपेक्षेने आपल्या सासू-सासऱ्यांकडे पहात होती. ती दोघंही चकित होऊन विवेककडे पहात होती. विवेकच्या आई-बाबांचीही या गोष्टीला संमती होती. ती दोघं अधून-मधून येणार होतीच. पण मुलांना आजी-आजोबांचा सहवास रोजच मिळावा, हे त्यांनाही हवे होते.

हो – ना करता करता, वसंतराव आणि विभाताई, नातवंडांच्या प्रेमासाठी या गोष्टीला तयार झाले. विशाल आणि स्वरा टाळ्या पिटत नाचायलाच लागले. सायली आणि विवेक एकमेकांचा चेहेरा वाचण्यात रंगून गेले.

© प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मेजवानी ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 जीवनरंग 🔅

☆ मेजवानी ☆ विभावरी कुलकर्णी

एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घडलेली ही गोष्ट केवळ दोन जनावरांची नाही, तर मैत्री, भिती आणि जगाच्या अजब न्यायाची एक वेधक कहाणी आहे.

तांबडं फुटायला अजून अवकाश होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात थंडीचा कडाका भयंकर वाढला होता. शेतकरी गणपतराव यांच्या प्रशस्त गोठ्यात नेहमीसारखी गजबज नव्हती. तबेल्याच्या एका कोपऱ्यात गणपतरावांचा सर्वात आवडता आणि नखरेल घोडा ‘तुफान’ पडलेला होता.

तुफान हा काही साधा घोडा नव्हता. त्याचा रुबाब, त्याची चाल आणि त्याची चपळाई संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होती. गणपतरावांच्या शेतीची आणि प्रतिष्ठेची ती एक शान होती. पण गेल्या चार दिवसांपासून तुफानला अचानक कसला तरी आजार झाला होता. त्याच्या अंगात भयंकर ताप होता आणि त्याचे मजबूत पाय त्याला साथ देत नव्हते. तो जमिनीवर असा पडून होता की जणू त्याच्यातील प्राणच निघून गेले आहेत.

तुफानच्या शेजारीच एका खांबाला बांधलेला होता ‘बब्या’.. गणपतरावांचा बोकड. बब्या स्वभावाने अतिशय खोडकर, चतुर आणि प्रेमळ होता. तुफान आणि बब्या यांची मैत्री फार जुनी होती. घोडा जरी आकाराने मोठा आणि ऐटबाज असला, तरी बब्याशी बोलताना तो नेहमी नम्र असायचा. बब्या रोज रात्री तुफानच्या पाठीवर तोंड टेकवून झोपायचा.

पण आज परिस्थिती वेगळी होती. तुफान निपचित पडला होता आणि बब्या चिंतेने त्याच्याभोवती फेऱ्या मारत होता.

सकाळच्या प्रहरी गणपतराव गावातील पशुवैद्यकीय डॉक्टर पाटणकरांना घेऊन गोठ्यात आले. डॉक्टरांनी आपली पिशवी बाजूला ठेवली, स्टेथॉस्कोप लावून तुफानची तपासणी केली, त्याचे डोळे तपासले आणि एक मोठा उदास सुस्कारा सोडला.

गणपतरावांनी चिंतेने विचारले, “डॉक्टर साहेब, काय होतंय माझ्या तुफानला? बरा होईल ना तो? पुढच्या महिन्यात बैलपोळ्याच्या दिवशी मला शहरात जायचंय, त्याच्याशिवाय माझं अडेल. “

डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, “गणपतराव, परिस्थिती नाजूक आहे. तुफानच्या शरीरात भयंकर विषबाधा किंवा संसर्ग झाला आहे. त्याचे स्नायू अजिबात प्रतिसाद देत नाहीत. मी त्याला काही कडक औषधं आणि इंजेक्शन देतोय. आपण तीन दिवस वाट पाहू. “

“तीन दिवस? ” गणपतरावांचा आवाज कापरा झाला.

“हो, ” डॉक्टर ठामपणे म्हणाले. “आजचा पहिला दिवस. जर येत्या तीन दिवसांत हा स्वतःच्या पायावर उभा राहिला नाही, तर याचा अर्थ याचे शरीर पूर्णपणे निकामी झाले आहे. अशा स्थितीत याला वेदना देत जगवण्यात काही अर्थ नाही. जर तीन दिवसांत तो उठला नाही, तर दयामरण म्हणून त्याला मारून टाकावं लागेल नाहीतर हा आजार गोठ्यातील इतर जनावरांमध्ये पसरू शकतो. “

हे ऐकून गणपतरावांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी होकारात मान हलवली. डॉक्टर औषधे देऊन निघून गेले.

गणपतराव आणि डॉक्टर निघून गेल्यानंतर गोठ्यात स्मशानशांतता पसरली. पण या संभाषणाचा एक-एक शब्द शेजारी उभ्या असलेल्या त्या बोकडाने स्पष्ट ऐकला होता. बब्याचे काळीज धडधडले.

डॉक्टर निघून गेल्यावर बब्याने गणपतरावांनी मारलेली गाठ कशीबशी सोडवली आणि तो धावतच तुफानजवळ गेला. तुफानचे डोळे अर्धे मिटलेले होते आणि तो निपचित पडला होता.

बब्याने तुफानच्या कानाजवळ तोंड नेले आणि त्याला ढकलत म्हणाला, “तुफान! अरे भावा, ऐकतोयस का? उठ! तुला उठावच लागेल! “

तुफानने मंद आवाजात हुंकार दिला, “बब्या, मला त्रास देऊ नकोस रे. माझ्या अंगात अजिबात ताकद उरलेली नाही. माझे पाय लाकडासारखे कडक झालेत. मला वाटतं माझं शेवटचं नक्षत्र जवळ आलंय. “

“अरे वेड्या! ” बब्या ओरडला, “तू काय समजतोयस? डॉक्टर काय सांगून गेलाय माहित्येय तुला? त्यांनी तुला तीन दिवसांची मुदत दिलीये! जर तू या तीन दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहिला नाहीस, तर ते तुला मारून टाकतील! औषधाचा डोस देऊन तुझा खेळ खलास करतील! “

तुफानने अंधुक डोळ्यांनी बब्याकडे पाहिले, “मरू दे रे बब्या… या वेदनांपेक्षा मरण सोपं वाटतंय मला. “

“नाही! ” बब्या ठामपणे म्हणाला. “मी तुला मरू देणार नाही. तू तुफान आहेस! वाऱ्याच्या वेगाने पळणारा घोडा! तू असा हार मानू शकत नाहीस. तुला माझ्यासाठी, तुझ्या अस्तित्वासाठी उठावं लागेल. आजचा पहिला दिवस आहे, प्रयत्न कर! “

पहिल्या दिवशी बब्याने दिवसभरात शंभर वेळा तुफानला उठवण्याचा प्रयत्न केला. तो त्याला डोक्याने धक्के देई, त्याच्या कानात ओरडे, त्याला हिंमत देई. पण तुफान अजिबात हलला नाही. संध्याकाळी गणपतराव आले, त्यांनी तुफानची अवस्था पाहून दुःखाने सुस्कारा सोडला आणि निघून गेले. दिवस वाया गेला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर पुन्हा आले. त्यांनी तुफानला दुसरे इंजेक्शन दिले आणि म्हणाले, “गणपतराव, आज दुसरा दिवस संपत आलाय. अजूनही काहीच हालचाल नाही. उद्या शेवटचा दिवस असेल. जर उद्या सकाळी हा उठला नाही, तर मला विषारी इंजेक्शन आणावे लागेल. “

गणपतराव काहीच बोलले नाहीत, त्यांनी फक्त अश्रू पुसले.

डॉक्टर गेल्यावर बब्या अक्षरशः वेडापिसा झाला. काळ वेगाने निघून चालला होता. आपल्या मित्राचे आयुष्य अवघ्या काही तासांचे उरले होते. बब्याने तुफानच्या पाठीवर चढून त्याला शिंगांनी हळूच टोचायला सुरुवात केली.

“तुफान, उठ! अरे मित्रा, बघ बाहेर सूर्य उगवलाय. तू उठणार नाहीस तर उद्या हा सूर्य तुला पाहायला मिळणार नाही! विचार कर, त्या गणपतरावांचा, ज्यांनी तुला लहानसा असल्यापासून पाळलं. विचार कर माझा… तू गेलास तर मी कोणाशी खेळणार? कोणाच्या पाठीवर बसणार? उठ तुफान, ताकद लाव! ” बब्या कळवळून सांगत होता.

बब्याच्या शब्दांतील ती तळमळ, तो त्रास आणि प्रेम तुफानच्या हृदयापर्यंत पोहोचले. तुफानने आपले पुढचे दोन पाय हलवण्याचा प्रयत्न केला.

“हो! असाच! प्रयत्न कर! ” बब्या उत्साहाने ओरडला.

तुफानने संपूर्ण ताकद पणाला लावली, मान वर केली, पण शरीर जड पडल्यामुळे तो पुन्हा धप्पकन खाली कोसळला. तुफानच्या डोळ्यातून अश्रू आले. “बब्या, माझ्याने नाही होत रे… माझे पाय साथ देत नाहीत. “

“होईल! तुला करावच लागेल! उद्या शेवटचा दिवस आहे तुफान, ताकद दाखव तुझी! ” बब्या रात्रभर तुफानच्या शेजारी बसून त्याला जागे ठेवत होता, त्याला सतत प्रोत्साहन देत होता.

तिसरा दिवस उजाडला. थंडी अजूनही तशीच होती. आज डॉक्टरांनी दिलेली अंतिम मुदत होती. गणपतराव आणि डॉक्टर गोठ्याकडे येत असल्याचे पावलांचे आवाज आले.

बब्या मनातून पूर्ण घाबरला होता. त्याने पाहिले, डॉक्टरांच्या हातात एक वेगळीच, मोठी पिशवी होती. ज्यात कदाचित तुफानचा जीव घेणारे औषध होते.

“तुफान! ” बब्या जोरात ओरडला. “बघ, ते आलेत! तुला मारायला आलेत! ही तुझी शेवटची संधी आहे. उठ! उभं राहा! त्यांना दाखवून दे तू अजून जिवंत आहेस! उठ मित्रा, माझ्यासाठी उठ! “

बब्याने तुफानच्या तोंडाजवळ जाऊन त्याला जोराने डोके मारले. बब्याची ती धडपड, त्याचा तो आक्रोश पाहून तुफानच्या आत काहीतरी पेटून उठले. मृत्यू समोर उभा होता आणि मैत्री पाठीशी उभी होती!

तुफानने एक मोठा दीर्घ श्वास घेतला अंगातील उरलीसुरली सर्व ताकद गोळा केली. त्याच्या नसा-नसांमध्ये रक्ताचा प्रवाह वेगाने धावू लागला. त्याने आपले मागचे पाय टेकवले… पुढच्या पायांवर जोर दिला… आणि…

धडपडत, थरथरत, तुफान स्वतःच्या चारही पायांवर उभा राहिला!

बब्याच्या आनंदाचा सीमा उरली नाही. तो आनंदाने गोठ्यात उड्या मारू लागला. “उठला! माझा तुफान उठला! “

तुफानने दोन पावले पुढे टाकली. त्याचे पाय अजून थरथरत होते, पण तो उभा होता! त्याने मान वर केली आणि खणखणीत खिंकाळला.

समोर उभे असलेले गणपतराव आणि डॉक्टर गोठ्याच्या दारातच थांबले. त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

“अरे वा! चमत्कार झाला! ” डॉक्टर आनंदाने ओरडले. “गणपतराव, तुमचा घोडा वाचला! औषधाने काम केलं आणि याच्या अंगातली जगण्याची इच्छा जिंकली. बघा, तो चालू लागलाय! “

गणपतरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन तुफानच्या गळ्याला मिठी मारली. तुफान आता सावकाश सावकाश बाहेर पडला. मोकळ्या हवेत आल्यावर त्याच्या अंगात नवीन ऊर्जा संचारली. तो मोकळ्या मैदानात हळूहळू पळू लागला. वाऱ्याच्या वेगाने नाही, पण एका आजारातून उठलेल्या घोड्यासारखा तो उत्साहाने पळत होता.

आपल्या मित्राला पळताना पाहून गोठ्याच्या कोपऱ्यात उभा असलेला बब्या समाधानाने हसत होता. त्याची मेहनत, त्याची तळमळ यशस्वी झाली होती. त्याने आपल्या मित्राचा जीव वाचवला होता.

दुपार झाली. तुफानची प्रकृती आता पूर्णपणे पूर्ववत होत होती. गणपतरावांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांचा सर्वात मौल्यवान घोडा मरणाच्या दारातून परत आला होता. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

गणपतरावांनी मनात विचार केला, “आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. माझा तुफान वाचला! या आनंदाच्या प्रसंगी देवाला नैवेद्य दाखवायला हवा आणि गावातल्या चार प्रमुख लोकांना, डॉक्टरांना घरी जेवायला बोलवायला हवं. असा मोठा आनंद साजरा करायचा तर घरात काहीतरी विशेष मेजवानी झालीच पाहिजे! “

गणपतराव घरात गेले. त्यांनी आपल्या मुलाला आणि काही गड्यांना बोलावले.

गणपतराव तबेल्याकडे चालत आले. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता. तुफान झाडाखाली शांतपणे घास खात होता. बब्या तुफानच्या शेजारीच बसून आरामात रवंथ करत होता. बब्याला वाटले, गणपतराव तुफानचे कौतुक करायला आले आहेत.

गणपतरावांनी बब्याकडे पाहिले. त्यांच्या मनात एक विचार आला ‘आजच्या या मोठ्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या दिवशी मटणाचा बेत करायला काय हरकत आहे? ‘

गणपतरावांनी गड्याला हाक मारली, “अरे सोमा, इकडे ये! “

सोमा धावत आला, “हो मालक? “

गणपतराव बब्याकडे बोट दाखवत म्हणाले, “आज आपला तुफान बरा झालाय. एवढा मोठा आनंद झालाय आपल्याला! या आनंदाच्या निमित्ताने आज घरात मटणाची छान मेजवानी झाली पाहिजे. डॉक्टर साहेबांना आणि सरपंचांना जेवायला बोलवायचंय. जा, या बकऱ्याला कापा आणि मस्त मटणाचा बेत करा! “

सोमाने दोरी हातात घेतली आणि तो बब्याकडे वळला.

बब्या स्तब्ध झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी त्याने तीन दिवस रात्रीचा दिवस केला, ज्याच्यासाठी तो कळवळून ओरडला, ज्याच्या जीवाच्या आनंदासाठी त्याने देवाला नवस बोलले… त्याच मित्राच्या ‘वाचण्याच्या आनंदाचा’ मोबदला म्हणून आज बब्याचा जीव घेतला जाणार होता!

सोमाने बब्याची दोरी घट्ट पकडली आणि त्याला ओढू लागला. बब्याने तुफानकडे पाहिले. तुफान अजूनही अज्ञानीपणे गवत खाण्यात आणि स्वतःच्या नवसंजीवनीचा आनंद घेण्यात मग्न होता. त्याला बहुदा कळतच नव्हते की त्याला मिळालेले हे नवीन जीवन त्याच्या मित्राच्या मृत्यूच्या किंमतीवर आले होते.

बब्याला आता कळून चुकले होते, जगाचा न्याय किती विचित्र आणि क्रूर असतो. ज्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावता, शेवटी तुमचाच बळी देऊन लोक स्वतःचा उत्सव साजरा करतात.

त्या दिवशी संध्याकाळी गणपतरावांच्या वाड्यात हशा आणि आनंदाचे उधाण आले होते. तुफान सुखरूप बरा झाल्याच्या आनंदात सर्वजण मटणाच्या मेजवानीवर ताव मारत होते… आणि गोठ्यात तुफान, एकाकी उभा राहून आपल्या गायब झालेल्या मित्राची वाट पाहत होता.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फटफटीचा फंडा – – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

☆ फटफटीचा फंडा – – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

मुंबापुरीतील ही गोष्ट. देवेश आणि त्याची बायको देविका दोन-चार दिवसांसाठी कोकणातून दादरला, त्याच्या चुलतभावाकडे – सुधीरकडे, आले होते. अहमद सेलर चाळीतील त्याच्या घरातच उतरले होते. कामं संपल्यावर एक दोन दिवस राहून जीवाची मुंबई करण्याचा मस्त plan होता.

अडचण होती ती मुंबईच्या भरगच्च भरलेल्या लोकल्सची. ना देवेशचा त्यात पाय टाकायचा धीर होई ना देविकालाही ते जमत होतं. पण सुधीरच्या मोटरसायकलचा आधार होता.

“वापरू का रे तुझी फटफटी? ” देवेश विचारता झाला.

“हो, घेऊन जा ना, आम्हाला आमची लोकलच बरी. फक्त बाईकचं handle lock कधी कधी त्रास देतं हां. ही घे किल्ली. “

“कुठली आहे बाबा गाडी तुझी? “

“बजाज बॉक्सर, सगळे गिअर पुढून खाली. “

“एवढं काही सांगायला नकोय, एवढा काही मी वेंधळा नाहीये. माझ्याकडेही गावाला बजाजच आहे बरं. “

कोकणातल्या या दोघांना समुद्राचं नाविन्य नव्हतं पण गेटवे, ताज आणि हो, म्हातारीचा बुटही डोळे भरून बघून झाला. नेपियन सी रोड, फोर्टच्या त्या उत्तुंग इमारती पहाताना डोळे फिरत होते. संध्याकाळी दादरला चाळीत गाडी लावताना सुधीर म्हणाला तसा handle lock ने त्रास दिलाच, काही केल्या लागेचना. पण ‘राहू दे, कंपाउंडच्या आत आहे ना’ म्हणून देवेशने स्वतःचंच समाधान करून घेतलं. भावाच्याही कानावर घालून ठेवलं की नेहमीच्या जागेवर गाडी लावली नाहीये व handle lock ही लागलेलं नाहीये.

” हां, हां. मी जेवण झाल्यावर पाय मोकळे करायला जाईन तेव्हा बघतो. “

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवेशला शिवाजी पार्कला जायची सुरसुरी आली नी तो एकटाच चक्कर मारायला खाली उतरला. पाहिलं तर गाडी परत जागेवर लावून ठेवलेली, handle lock ही नीट लावलेलं. “जेनु काम तेनू थाय; बीजा करे सो गोता खाय” पुटपुटत देवेशराव फटफटीवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने निघाले.

पार्कातून येऊन आंघोळ पांघोळ आटपून देवेश जरा बसतो की नाही तेवढ्यात बायकोचं फर्मान आलं – अहो जरा एक दूध पिशवी घेऊन या. घरातलं दुध अगदीच संपलंय. स्वारी खाली उतरून दुध केंद्राकडे वळणार तेवढ्यात सुधीरच्या मोटरसायकलचे पुढचे चाक आपल्या मोटरसायकलच्या पुढच्या चाकाला कपडे वाळत घालायच्या नायलॉनच्या दोरीने घट्ट बांधताना एक जण त्याला दिसला.

“हेल्लो, तुम्ही ही गाडी बांधून ठेवताय खरं पण एक अर्ध्या तासात मी ही बाईक परत घेऊन जाणार आहे बरं. “

देवेश एवढं बोलला मात्र बनियन लेंगा घातलेल्या, दाढीचे काळे पांढरे खुंट वाढलेल्या, डोळे खोल गेलेल्या त्या माणसाने देवेशकडे रोखून पाहिलं. त्या बाबाच्या घरचं कोणीतरी नुकतंच वारलं असावं, मुंडण केलेल्या डोक्यावरून ते जाणवत होतं.

” म्हणजे ही बाईक कालही तुम्हीच नेली होतीत? ” तो विचारता झाला.

देवेशला काही कळेना, सुधीरची बाईक नेल्याबद्दलचा जाब हा माणूस आपल्याला का विचारतोय.

“हो. का? “

“अशी कशी नेलीत? “

“सुधीरला सांगून नेली होती. “

“सुधीरचा काय संबंध? “

याच्या घरचं जे कोणी वारलं होतं त्याने याच्या डोक्यावर वगैरे काही परिणाम झालाय का काय अशी शंका देवेशला येऊन गेली.

“अहो मिस्टर, तुम्ही कोण आहात? ही माझी गाडी आहे. ” – टकलू हैवान.

“अहो, ही सुधीरची गाडी आहे. “

” तुमचं काय डोकं फिरलंय का? ही माझी गाडी आहे. सुधीरची बॉक्सर ती तिकडे आहे, त्याच्यावर त्याचं नावही लिहीलंय की. “

आता चक्रावायची पाळी देवेशची होती.

“आणि तुम्ही ही गाडी नेलीच कशी? ” टकलू हैवान थांबायचं नावच घेत नव्हता.

“माझ्याकडे किल्ली आहे. ” दीवारच्या शशी कपूरने ज्या ठामपणे मेरे पास मां है म्हटलं त्या सुरात देवेश.

” सुधीरची किल्ली माझ्या गाडीला कशी लागेल? “

आता मात्र वाद न घालता देवेश पुढे आला, handle lock ला किल्ली लावली, एका झटक्यानिशी कुलूप उघडलं, किक मारताच बाईक start झाली.

“अहो, आई वारली त्याला अजून दहा दिवस नाही झाले. काल सकाळी बाहेर जायला निघालो तर गाडी गायब. घरी सगळ्यांना विचारलं, कोणीच नेली नव्हती आणि कोणालाच माहित नव्हतं, मग शेवटी पोलिस चौकीत complaint करून आलो. “

सकाळी वहिनी दुध आणायला उतरली ती म्हणाली गाडी आहे, म्हणून पाहिलं तर खरंच होती. मग तीच गाडी घेऊन पोलिस स्टेशनला गेलो तक्रार अर्ज मागे घ्यायला. तो हवालदार कायदा शिकवायला लागला – एकदा FIR झाली की ती मागे घेता येत नाही म्हणून. मग शेवटी अर्ज मागे घेण्यासाठी त्याला चहापाणी दिलं, घरी आलो; गाडी जागेवर लावली; handle lock लावलं.

पाच मिनीटाने खाली उतरलो तर परत गाडी गायब. डोकं फुटायची पाळी आली. म्हणून आत्ता गाडी परत दिसल्यावर तिला बांधूनच ठेवत होतो; तर तुम्ही तोंड वर करून सांगताय की मी ही गाडी घेऊन जाणार आहे म्हणून. “

चाळीत दोन बॉक्सर होत्या, आपण सुधीरला गाडी नंबर विचारून घ्यायला होता, त्याची किल्ली याच्या गाडीला लागेल याची कोणाला कल्पना होती? आणि देविकाबरोबर फिरताना जर पोलिसांनी चोरीची गाडी घेऊन फिरतोय म्हणून अटक केली असती तर – देवेशच्या डोक्यात मुंग्या येऊ लागल्या. आणि मुंबई दर्शनाची त्याची हौस पुरती फिटली होती.

दोन फटफट्यांच्या फंड्याने त्याची चांगलीच फसगत झाली होती.

 

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ”घराचे Alignment…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

☆ “घराचे Alignment ☆ संध्या बेडेकर ☆

कधी कधी घरच्या प्रमूख व्यक्तीला घराचे Alignment करणे आवश्यक असते.

आज प्रविण जरा शांतच बसले होते. या मागच्या दोन चार महिन्यांत घरात घडलेल्या गोष्टींचा, झालेल्या संवादांचा विचार करत होते.

 मी जे बघतोय, ऐकतोय ती सुरुवात आहे पूढे घडणाऱ्या संभाव्य अप्रिय घटनांची. सध्या छोटे मोठे खटके उडतायेत. सध्या तरी भाषेवर सर्वांनी कंट्रोल ठेवला आहे. संवादाचे texture बरे आहे. पण एकदा का ही धुसफूस वाढली तर मर्यादा ओलांडायला वेळ लागणार नाही. आणि मग महाभारत घडायलाही वेळ लागणार नाही.

मी घरचा प्रमूख या नात्याने माझी जबाबदारी आणि कर्तव्य तटस्थपणे मला पार पाडावेच लागेल.

प्राची किंवा प्रिया, प्रथमेश आणि मला सुध्दा 

What is my role in Family?? हे नेहमी लक्षात ठेवावेच लागेल.

प्रवीण स्वभावाने मिश्किल असला तरी त्याचे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थीत लक्ष असते. He can read between the lines. पूढे येणाऱ्या संभाव्य समस्येचा तो अंदाज लावू शकतो. गाडी रूळावरून घसरण्यापूर्वीच त्यांचे overoiling करणे, servicing करणे जमते त्याला.

आज रविवार ची सकाळ चहा घेताना त्याने प्रथमेश आणि प्राचीला विचारले,

आज काय कार्यक्रम तुमचा??

आज जेवण घरी की बाहेर? आज दिवाळी ची shopping आहे का??

तुमचा कार्यक्रम काहीही असू दे आज संध्याकाळी मात्र तुम्ही दोघे घरात असावेत असं मला वाटतं. वेळेचे बंधन नाही, तुम्ही रात्री जेवायला असाल, तर तसं आधी सांगा म्हणजे आज दिवाळीचा विशेष बेत ठरवू.

घरातील स्वच्छता बऱ्यापैकी झालेली आहे, काही गोष्टींची राहिली आहे. ती वरून दिसत नाही पण वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे.

प्रिया लक्ष देऊन ऐकत होती. तिच्या अनुभवी मनाने या बोलण्याचा गूढ अर्थ ओळखला. पंचेचाळीस वर्षे संगतीचाच परिणाम होता तो.

आज प्रविण चे लेक्चर ऐकायचे आहे. हे तिने ओळखले. मधून मधून हे असं घडतच. आणि हे लेक्चर म्हणजे घरांचे Alignment असते. जबाबदारी, कर्तव्य, वागणूक, सवयी, पैशाचा अंधाधुंद वापर यावर प्रविणचे भाषण म्हणजे सर्वांना विचार करायला लावणारा एक धडा असतो. overall analysis असते ते.

हे सर्व प्रथमेश आणि प्रियाला माहीत आहे. पण प्राचीची यावर कशी प्रतिक्रिया असेल?? तिच्या साठी हे‌ नवीन आहे. प्रिया विचारात होती.

संध्याकाळी प्रथमेश प्राची shopping करून घरी आले. आज प्रविण ने सांगितल्या प्रमाणे प्रियाने पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जीरा राईस घरी केले तंदूरी रोटी, नान, व्हेज मंचुरियन बाहेरून मागविले. दिवाळीचा फराळ, गोड वस्तू भरपूर होत्याच. सर्वांच्याच आवडीचा मेन्यू होता.

प्राची खूप खुश होती. आधी shopping आणि घरी आल्यावर काहीही कष्ट न करता आवडीचे जेवण. मॅडम एकदम Happy होत्या.

प्रथमेश मात्र बाबांच्या भाषणाची वाट बघत होता.

प्राची ने विचारले,

बाबा! झाली का स्वच्छता?

बाबा म्हणाले,

अग!! नाही. थोडी व्हायची आहे. त्यात मला सगळ्यांचीच मदत हवी आहे.

अग!! प्राची घरातील कचरा निघाला ग. पण आपल्या मनातला कचरा पण वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे. ती स्वच्छता सगळ्यांसाठी जास्त गरजेची आहे.

या कचऱ्याचा डोंगर होण्यापूर्वीच त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. कचरा कोणताच चांगला नाही घरातला आणि मनातला.

प्राची बाबांकडे बघतच राहिली.

बरे असो.

मला वाटतं, घरचा प्रमूख म्हणून माझे काही कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मी काय सांगतोय ते नीट ऐका.

प्रिया तू पण ऐक.

आपण नंतर यावर चर्चा करू शकतो. माझ म्हणण तुम्हाला पटेलच असंही नाही.

बाबा पूढे म्हणाले,

प्रिया माझी अर्धांगिनी आहे. आजपर्यंत तिनेच घर सांभाळले. मी बाहेरच सांभाळले. आता मी तर रिटायर्ड झालो. माझी आॅफिसची जबाबदारी संपली. आता मी थोडी बहुत घरची जबाबदारी घ्यायला तयार आहे. प्रियाचे आॅफिशियल retirement as such नाहीच. याबद्दल तिचे किंवा माझे काही म्हणणेही नाहीच. परंतु कामाचे दडपण कंपल्शन नसावे. पंचेचाळीस वर्षानंतर आता थोडा निवांत वेळ मिळाला आहे. तेंव्हा तिच्या बरोबर क्वालिटी टाइम घालवावा, सकाळी फिरायला जावं, एकत्र बसून चहा प्यावा, वर्तमान पत्र वाचावे. संध्याकाळी जेष्ठ नागरिक संघाचे कार्यक्रम अटेंड करावे, सहलीला जावं, सिनेमा, नाटक बघावे असे मला वाटत. आजपर्यंत नोकरी करताना, असा निवांत वेळ मिळाला नाही. आता तिला तिच्या मनासारखं जगू द्यावं. कामाचं दडपण नसावं. तिला आराम मिळावा, हे बघणं पण माझी जबाबदारी कर्तव्य आहे. आणि तिचा अधिकारही आहे.

आमच्या पिढीच्या बहुतेक सर्वांचेच आतापर्यंत असेच आयुष्य गेले असेल.

मी फक्त आमच्या दोघांचाच विचार करतोय असं नाही. मला तुमच्या दोघांची पण काळजी आहे. तुमचे पण रोजचे आॅफिस, दगदग आम्ही बघतोच. तुमच्या वयाच्या सर्वांचीच थोड्या फार फरकाने हीच दैनंदिनी आहे /असेल.

देवाच्या दयेने आज ची पीढी आमच्या पेक्षा financially चांगल्या परिस्थितीत आहे.

कामावरून घरात वादविवाद नको, ते आपण टाळू शकतो. जसा प्राचीला वेळ मिळत नाही तसंच प्रिया ला पण आता तिला तिचा छंद जोपासायला वेळ मिळावा असं मला वाटतं. आतापर्यंत घडाळ्याच्या काट्या प्रमाणे काम करणाऱ्या प्रियाने आताही असेच वागावे अशी तिच्याकडून अपेक्षा करणे चूक आहे.

उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनात कटूता यायला नको. कारण आपण चांगल्या गोष्टी पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करतो. आणि कटूता मनात. हे बरोबर नाही. माझी आणि प्रथमेशची फरफट व्हायला नकोय.

पुरूषांना बायको आणि आई दोघांपैकी एकीची निवड करायला भाग पाडू नये. प्रिया आणि प्राची दोघीही महत्वाच्या.

हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे.

मी कशाचेही स्पष्टीकरण देत नाहिये.

जसे प्रश्न पत्रिकेत MCQs 

असतातत म्हणजे एका प्रश्नाचे Multiple choice options असतात. तेंव्हा चार उत्तरांपैकी एक बरोबर उत्तर निवडायचे असते.

तसेच आपले घर सुव्यवस्थित चालावे. आपण सर्वांनी शांत, आनंदी राहून जीवनाचा आनंद घ्यावा. यासाठी वेगवेगळे options आहेत. म्हणून सर्वांनी मिळून एक उत्तर शोधणे महत्वाचे आहे.

Options हे आहेत।

१. आपापली जबाबदारी समजून काम वाटून घ्यावी.

२. पूर्ण वेळ कामासाठी बाई ठेवावी. मग ती जे जसं करेल ते सहन करायची तयारी ठेवावी. तिला स्पष्ट instructions द्यावे लागतील. म्हणजे अन्न वाया जाणार नाही. अन्न वाया गेलेले प्रिया ला आवडत नाही.

खर्च फक्त तुम्हीच करावा असंही नाही. मी खर्च करायला तयार आहे.

३. आपण वेगळे राहण्याचा ही विचार करू 

शकतो. आमच्या साठी मात्र हा शेवटचा पर्याय असेल. पण तुमच्या दोघांची इच्छा असेल तर आम्हाला मान्य आहे.

४. किंवा प्राचीचे आईवडील तुमच्या जवळ येऊन राहू शकतात. प्राची ला त्यांच्या सोबत जास्त मोकळीक मिळेल. अस प्राची ने बरेचदा बोलून दाखविले आहे. प्राचीला space हवी असते.

यातही आम्हाला काही प्रोब्लेम नाही.

बाबांचे विचार ऐकून प्राची बाबांकडे बघतच राहिली.

बाबा म्हणाले,

प्राची!! तुला एक महत्वाचे सांगायचे आहे. तुम्ही socializing करू नये. पार्टीला जाऊ नये. इतक्या जून्या विचारांचे आम्ही नाही. परंतु मागच्या आठवड्यातील घटना बघून आम्हाला वाईट वाटले. काळजी वाटली आणि हो रागही आला. तुझ्या ड्रिंक्स मध्ये कोणीतरी काहीतरी मिसळत आणि त्याचा तुला दुसऱ्या दिवशी पर्यंत त्रास होतो हे बरोबर नाही. ही घटना चांगली नाही. तुला याबाबतीत सतर्क, सचेत, सावधान राहणे आवश्यक आहे.

शिस्त आणि बंधन गरजेचे आहे. मला वाटतं तुझ्या आईबाबांनाही हे आवडणार नाहीच. तेंव्हा विचार कर. पुन्हा हे असं होता कामा नये.

तुम्ही दोघे आई बाबां होण्याचे स्वप्न बघत आहात, तेंव्हा आधी तुम्ही physically and mentally तयार व्हा. शिस्त पाळा.

बरे असो.

माझे बोलणे झाले आहे. सध्याची परिस्थिती बघता मला जे योग्य वाटल ते मी बोललो. तुम्ही सर्व शांत मनाने आजचा आणि भविष्याचा विचार करा. काही घाई नाही. माझ्या बरोबर फ्रिली बोला. मग निर्णय घ्या.

We both are ready for anything and everything.

आज प्रणव ने सवयी प्रमाणे सर्वांना सद्य परिस्थिती व त्यांचे भविष्यात होणारे परिणाम थोडक्यात पण परखडपणे सांगितले.

प्रथमेशला मनातल्या मनात समाधान वाटले. प्रिया ला पण अशीच काहीशी अपेक्षा होती.

प्राचीला मात्र बाबांचे हे वेगळेच रूप बघायला मिळाले.

दिवाळी च्या मुहूर्तावर बाबांनी घरातील सर्वांना एक संदेश दिला 

जसे आपण धूळ, अडगळ, कचरा, जाळ्या जळमट, रद्दी, जूने कपडे सारे सारं काही आपण काढतो, त्यांची योग्य विल्हेवाट लावतो. घर स्वच्छ लखलखीत झाले की मोकळं आनंदी वाटू लागतं. घर सजवायलाही उत्साह येतो.

तसेच घराबरोबर मनही स्वच्छ कराव.

मनातील विचारांची अडगळ दूर करावी. मनात मनःशांती ची, आनंदाची ज्योत चेतवावी.

बरोबर आहे.

म्हणतात ना,

विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासाठी आहे. तेंव्हा काळजी करत बसण्यापेक्षा स्पष्ट संवाद साधणे केंव्हाही चांगलेच नाही का??

आज प्रवीणने प्रियाची बाजू मांडून आपल्या पत्नीचा ही मान राखला. ज्या घरात नवरा बायकोचा मान ठेवतो, त्या घरातील बाईचा अपमान करायची हिम्मत कोणी दाखवत नाही.

वेळेवर स्पष्ट बोलायला धाडस लागतं हे नक्की पण बोलणही गरजेचेच असते. घरातील प्रत्येकाचा मान ही असायला हवा. एखाद्या ला granted घेऊन चालत नाही. नात्यामध्ये ही मर्यादा असायलाच हवी.

प्रवीण च्या बोलल्या नंतर एक वेगळीच शांतता पसरली. प्रत्येक जण विचारात होता. शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला.

आज नरकचतुर्दशीच्या दिवशी बाहेरच्या उजेडापेक्षा अंतर्मन उजळून निघाले होते.

बरोबर आहे.

आपलं कुठे चुकतंय?? हे शांतपणे सांगणार कोणी तरी आयुष्यात असले की एकतर चूका कमी होतात किंवा त्या वेळेत सुधारता येतात.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares