(मधुराकडे पाहताना रागिणीला एकदम शेवंताची आठवण झाली.)
रागिणीच्या घरासमोरच्या प्लॉटमध्ये वाॅचमन म्हणून तिचा नवरा आणि ती राहत होते. त्यांना तीन लहान मुले होती. शेवंता काही घरी घरकाम करी. नवरा रोज दारू पिऊन यायचा. त्यावरून दोघांचे भांडण व्हायचे.तो सतत तिला ‘घरातून चालती हो’ म्हणायचा. पण तिने कधी घर सोडले नाही. दारू उतरली की नवरा एकदम सरळसोट व्हायचा. एक शब्दही बोलायचा नाही.हे नेहमीचेच होते.
पण काल सकाळी दोघांचे भांडण आणि मुलांचे रडणे खूपच जोरजोरात ऐकू येऊ लागले. दंगा ऐकून रागिणीने पाहिले तर, शेवंता खरंच घर सोडून चालली होती. मागे धावणाऱ्या मुलांना धपाटे घालत दूर ढकलत होती.धाकट्या मुलाने तिच्या पायाला मिठी घातली. नवरा म्हणत होता,” जा,जा. चालती हो.”
शेवंता उसळलीच,” अरं वारं, र वा.बरा मोकळा व्हशील तू.म्या तशी सोडणार न्हाय तुला. म्या कशाला मुलांना घेऊन जातीया? मुलं तुजी बी हाईत.ती तुजी तुला लखलाभ व्हवू देत. त्यांचं काय करायचं ते तुजं तू बग. म्या निघाले.”
नवरा एकदम सटपटलाच.” काय म्हणालीस तू ? ए माजी बाय, आसं काय करू नगस बग.आगं मुलांचं म्या काय करू?तू त्यांना गपगुमान घेऊन जा बग.”
कमरेवर हात ठेवत शेवंता ठसक्यात म्हणाली,” आजाबात नेनार नाय. नीट आईक म्या काय सांगतीया ते.म्या नेनार नाय. या घरात लगीन करून येताना म्या येकलीच आली व्हती. आता जातानाबी म्या येकलीच जानार हाय. मुलांचं भ्या मला दावू नगस. म्या येकलीच जानार म्हनजे येकलीच जाणार.”
आता मात्र नवऱ्याची दारू खाडकन उतरली. पुढे धावत तो शेवंताला अडवू लागला. हात जोडून गयावया करू लागला. मुलं पण तिला बिलगली. तो पुन्हा पुन्हा सांगत होता,” अगं,पुन्ना म्या दारुला हात लावनार न्हाई. खरं सांगतो.तुला तरासबी देणार न्हाई. पन तू घर मोडू नगस. चल घरात चल.” नवऱ्याच्या विनवणीनं तिनं मुलांना जवळ घेतलं आणि ती घरात परत गेली .
ॲडव्होकेट रागिणी ऑफिसात आजच्या कामांची कागदपत्रे पहात होती. तेव्हा मधुरा केबिनमध्ये आली.’नमस्कार मॅडम’, म्हणत समोरच्या खुर्चीत बसली. मधुरा खूप दडपणाखाली दिसत होती. तिच्या आणि रितेशच्या घटस्फोटाची केस सुरू होती.आज मुलाच्या कस्टडी बाबत सुनावणी होती.
मधुरा एका बँकेत चांगल्या पदावर होती.रितेश मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. आर्थिक सुबत्ता होती.त्यामुळे मोठं घर, गाडी सर्व उत्तम होते.मधुराच्या बॅंकेचे कर्ज असल्याने घर दोघांच्या नावावर होते.सहा वर्षांचा राजस आणि तीन वर्षांची रुंजी अशी दोन लहान मुले होती. सगळेच एकदम मस्त चालू होते. मधुरा सगळ्यांशी मिळून मिसळून रहात होती. सासू-सासर्यांशी तिचे वागणे अतिशय जिव्हाळ्याचे होते.
एकीकडे हे सगळं छान होतं.तर दुसरीकडे रितेशचा स्वभाव विचित्र होता. प्रत्येक गोष्टीवर तो शंका घेई. सतत त्यावरून तिला टोकत राही. खरंतर घरातल्या सर्व गोष्टी करणे,मुलांचे संगोपन, शाळा, स्वतःची नोकरी यामुळे मधुराची खूप ओढाताण होई.तरीही ती सतत हसतमुख असायची.पण रितेशला याबद्दल एका शब्दाचेही कौतुक नव्हते. स्वतः रोज कामावरून उशिरा यायचे आणि घरी आल्यावरही ऑफिसचे काम म्हणत फोनवर तासनतास बोलत बसायचे. तो घरात कसलीच मदत करीत नसे. पण तिच्या कामात मात्र सतत खोट काढीत असे. फोन करून सारखी तिची चौकशी करी.तिच्यावर संशय घेई. मधुराने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. पण आता तिला हा जाच वाटू लागला होता. तो तिच्यावर काहीही आरोप करायचा आणि त्याचे स्पष्टीकरण देता देता तिची दमणूक व्हायची.हा मानसिक छळ आता तिच्या सहनशक्ती बाहेर जाऊ लागला होता.
स्वतःचा मूड असेल तर रितेश मुलांना जवळ घ्यायचा.नाहीतर त्यांचे अजिबात लाड करायचा नाही. मुलांना पण त्याचा लळाच नव्हता. घाबरून ती त्याच्यापासून दूर राहायची. हे सततचे वाद, भांडणं, संशय या कटकटींनी मधुरा वैतागून गेली. एक दिवस तिने त्याला बजावले, ” हे बघ रितेश, ही बिनबुडाची भांडणं थांबव. जरा आवर घाल स्वतःला. तू तुझं वागणं बदललं नाहीस तर मी घर सोडून जाईन.”
तिच्या धमकीने उलट तो खूषच झाला. त्याला हेच हवे होते. पण याबद्दल त्याने तिलाच दोष दिला.” खुशाल चालायला लाग. नवऱ्याला कसे खूश ठेवावे याची थोडी तरी अक्कल आहे का? सगळी माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि म्हणे हिनेच संसार सांभाळलाय.गरज नाही मला असल्या संसाराची .”
मधुरावरच ठपका ठेवत रितेशने तिला घरातून जायला सांगितले.ती मुलांसह माहेरी आली. मुले सोडून जाताना त्याला कसलाही अपराधीपणा किंवा दुःख वाटले नाही. उलट त्यानेच घटस्फोटासाठी कोर्टात केस केली. मुले लहान, अर्धवट झालेला संसार, आर्थिक व्यवहार एकत्रित आणि गुंतागुंतीचे यामुळे मधुराची या गोष्टीला मान्यता नव्हती. पण तो माघार घेत नव्हता. त्याच्या आई वडिलांनीही खूप समजावले. पण तो त्यांचेही ऐकत नव्हता. त्यातच त्याने आता राजसची कस्टडी मागितली होती. मधुरा खूप घाबरून गेली. त्यासाठीच आज कोर्टात जायचे होते
मधुराकडे पाहताना रागिणीला एकदम शेवंताची आठवण झाली.
जेव्हां तो सुंदरनगरच्या रेल्वे स्टेशनवर उतरला तेव्हा घड्याळात बरोबर रात्रीचे साडेअकरा वाजले होते. सुंदरनगरहून
मुंबईला जाणारी पहिली ट्रेन पहाटे पाच वाजता होती. याचाच अर्थ त्याच्याकडे त्याच्या कामासाठी मोजून साडेपाच तास होते. आणि त्याच्यासारख्या सराईत इसमासाठी तेवढे नक्कीच पुरेसे होते.
सुंदरनगर मधील उच्चभ्रू लोकांच्या आलीशान बंगल्यांच्या वस्तीचा अभ्यास त्याने नेटवरील गुगल मॅप वरून अगोदरच करून ठेवला होता.
रेल्वेस्टेशन बाहेरील पानाच्या ठेल्यावरून त्याने फोरस्क्वेअर घेतली आणि रुबाबात शिलगावली. पान स्टॉल जवळ उभे राहून तो टू व्हीलर पार्किंगचे निरीक्षण करत थांबला.
त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रुबाबदार होते. सहा फुटाचे व्यायामाने कमवलेले शरीर, गोरापान राजबिंडा चेहरा, ब्लॅक जीन्स, त्याच्यावर डार्क ब्लू कलर चा ओपन शर्ट, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा अतिशय महागडा चष्मा. पायात अॅदिदासचे शुज, मनगटावर रोलेक्स चे घड्याळ आणि पाठीवर महागडी प्रवासी सॅक. जणू काही एखादा राजकुमारच.
ट्रेनमधून उतरलेले प्रवासी पार्किंग मधून आपापल्या टू व्हीलर्स घेऊन निघून गेले. अजूनही पार्किंगमध्ये दहा पंधरा बाईक्स लावलेल्या होत्या. याचाच अर्थ या बाईक्सच्या मालकांनी आजच्या रात्री पुरत्या बाईक्स पार्कमध्ये वस्तीला ठेवल्या होत्या.
रुबाबात तो पार्किंग जवळ आला. जवळच्या मास्टर की ने बुलेटचे लाॅक उघडणे म्हणजे त्याच्यासाठी डाव्या हातचा मळ होता.
सुंदर नगरच्या पूर्वेला अतिशय आखीव रेखीव पण सुंदर नगरशी फटकून असल्याप्रमाणे अलिप्त अशी ती आलिशान बंगल्यांची वसाहत वसलेली होती. त्या गडगंज श्रीमंत लोकांच्या वसाहतीचे नाव देखील तसेच होते, “कुबेर नगरी.”
तो जेव्हां कुबेर नगरीत पोहोचला तेव्हा रात्रीचे सव्वाबारा वाजले होते. वातावरण ढगाळ होते. चंद्र ढगाआड लपलेला होता. रिपरिप पाऊस पडत होता. एकंदरीत वातावरण त्याच्यासाठी बऱ्यापैकी अनुकूल होते. जरी रात्रीचे सव्वा बारा वाजले असले तरीही बऱ्याचशा बंगल्यामधील लाईट चालूच होते. खबरदारी घेणे गरजेचे होते. त्याने बुलेट कोपऱ्यातील झाडाखाली पार्क केली आणि रस्त्याच्या दुतर्फा नजर फिरवत तो चालू लागला.
आणि त्याच्या सराईत नजरेने एक बंगला हेरला. अंधारात बुडालेला तो बंगला उंच उंच झाडांच्या गर्दीत वस्तीतील इतर बंगल्यापासून थोडासा अलिप्त एका बाजूला होता. मोबाईल टाॅर्चच्या प्रकाशात गेटवरचे भलेमोठे कुलुप स्पष्ट दिसत होते. त्याने खुश होऊन हलकेच शीळ वाजवली.
बंगल्याला वळसा घालून तो पाठीमागच्या बाजूला आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच पाठिमागच्या बाजूला छोटेसे गेट होते. त्याने सराईत हाताने छोट्या गेटचे लाॅक उघडले आणि बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. रात्री कदाचित बंगल्याचा मालक आलाच तर पुढच्या गेटने आत आला असता. गाडीचा आवाज ऐकताच तो आरामात मागच्या गेटने पळून जाऊ शकला असता
बंगल्याच्या दरवाजाचे लॅच उघडायला त्याला मोजून सतरा मिनिटे लागली. तो पुरेसा सावध होता. त्याने सर्वप्रथम पळून जाण्यासाठी पाठीमागचा दरवाजा उघडून ठेवला. आतमधला प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणुन त्याने खिडक्यांचे पडदे ओढून घेतले आणि नाईट लॅंम्पच्या प्रकाशातच तो बेडरूम मधे शिरला. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच आतमध्ये एक अवाढव्य भरभक्कम कपाट होते. बँकेमधले सेफ्टी व्हाॅल्वस लीलया उघडणाऱ्या त्याच्या हातांना ते कपाट उघडण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.
2000 रूपयांच्या नोटांचे एक बंडल, 500 च्या नोटांची चार बंडल्स, जवळ जवळ 25 ते 30 तोळ्यांचे सोन्याचे दागिने – – – तो जाम खुश झाला. धडाधड त्याने तो सगळा ऐवज सॅक मध्ये भरला. तेवढ्यात त्याची नजर बाजूच्या भल्या मोठय़ा देव्हाऱ्याकडे गेली. तो 100% नास्तिक होता. चांदीचे जाडजूड ताम्हण, पेला, समई आणि देवांच्या वजनदार मुर्ती त्याने सॅकमध्ये कोंबल्या.
त्याने घड्याळात पाहिले फक्त रात्रीचा दीड वाजला होता. तो चांगलाच दमला होता आणि ट्रेनला अजुन साडेतीन तास अवकाश होता. आणि येवढ्या अपरात्री बाहेर पडून गस्त घालणाऱ्या जीपने हटकले असते तर मुद्देमालासह पकडले जाण्याचा धोका होता.
त्याने थोडावेळ विश्रांती घेण्याचे ठरविले. त्याला आता तहान लागली होती. बिनधास्त पणे किचन मध्ये जाऊन त्याने फ्रीझ उघडला. आज खरच त्याचे नशीब जोरावर होते. फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटली शेजारी चक्क मिलिटरी रमची आख्खी भरलेली बाटली त्याला सापडली. थोडेसे शोधल्यावर किचनमध्ये त्याला खारवलेले काजू सापडले. त्याला चक्क लाॅटरी लागली होती. जवळजवळ साडेतीन वाजेपर्यंत तो बेडरूममध्ये टी. व्ही. लावुन शांतपणे रम एन्जॉय करत बसला होता. चार पेग पोटात जाऊन देखील तो पूर्णपणे सावध होता.
पहाटे साडेतीन वजता त्याने मद्यपान आटोपले आणि तो बाहेरच्या हॉलमध्ये आला. आता शेजारीपाजारी जागे होण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि समजा जागे झाले असते तरी त्याचे मुख्य काम झाले होते. जाता जाता शोकेस मध्ये काही किमती वस्तू दिसल्या तर लांबविण्याच्या हेतूने त्याने हॉलमधला लाइट लावला. आणि त्याने जे पाहिले त्याने त्याचे हृदय, हेलावून गेले. त्याच्यासारख्या निर्ढावलेल्या चोराच्या डोळ्यातून देखील अश्रुधारा वाहू लागल्या. तो धपकन खुर्चीवर बसला खाली मान घालून त्याने एक चिठ्ठी खरडली आणि ती चिठ्ठी आणि चोरी केलेले पैसे आणि किमती चीजवस्तू भरलेली सॅक तशीच्या तशी टीपाॅयवर ठेवून तो मागचे लॅच उघडून अंधारात मिसळून गेला.
सकाळी सात वजता कर्नल अजित पवार हॉलचा दरवाजा उघडून घरत शिरले. कारगिल विजय दिनाच्या समारोहात भाग घेऊन ते घरात शिरत होते. आपल्या करगिल युद्धात शहिद झालेल्या एकुलत्या एका पुत्राच्या आठवणीने ते व्याकुळ झाले होते. रात्रभर गाडी चालवून ते विलक्षण थकले होते.
दरवाजा उघडल्या उघडल्या त्यांच्या नजरेला टीपाॅयवरील सॅक दिसली. अनोळखी सॅक बघून ते थोडेसे दचकलेच. त्यांना सॅकखाली एक चिट्ठी दिसली. आणि ती वाचून येवढा वेळ कोंडून ठेवलेला हुंदका त्यांना आवरता आला नाही.
चिठ्ठीत लिहिले होते.
“आदरणीय कर्नल साहेब,
त्रिवार प्रणाम
मी एक सराईत चोर आहे. कळायला लागले तेव्हापासून मी फक्त चोऱ्या करूनच जगत आहे. आपल्या घरात देखील मी फक्त आणि फक्त चोरीच्या उद्देशानेच शिरलो होतो. मी चोरी केली सुद्धा.
निघताना तुमच्या घराच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर नजर गेली.
भिंतीवरील 99 च्या कारगिल युद्धात शहिद झालेल्या तुमच्या वीरपुत्राचा फोटो बघितला. त्यांना अतुलनीय कामगिरी बद्दल मरणोत्तर मिळालेले महावीर चक्र बघितले. तुम्हाला स्वतःला 71 च्या लढाईतील कामगिरी बदल मिळालेले वीरचक्र बघितले आणि आपण काय पाप करत होतो याची जाणीव झाली.
आमचे रक्षक बनून तुम्ही सीमेवर स्वतःचे प्राण पणाला लावताय, आज त्याच रक्षकाच्या घरात भक्षक बनून शिरण्याचे पाप मी कुठे फेडले असते?
खरच सांगतो कर्नल साहेब, देवांच्या मूर्तींची चोरी करताना माझे हात कचरले नाहीत. पण सैनिकांच्या घरात चोरी करण्यास तेच हात धजले नाहीत.
कारण मी नास्तिक आहे. मी चोर आहे पण मी राष्ट्रद्रोही नाही. म्हणूनच चोरी केलेले सर्व पैसे, चीजवस्तू, देवांच्या मूर्ती मी टीपाॅय वर ठेवून जात आहे.
रमची अर्धी बाटली देखील ठेवून जात आहे.
तुम्हाला दोघांनाही कडक सॅल्युट.
तुमच्या शहिद सुपुत्राला श्रद्धांजली.
शक्य असेल तर मला माफ करा..
कर्नल पवारांच्या डोळ्यात अश्रू होते तर ह्दयात आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान.
आज खऱ्या अर्थाने त्यांच्या शहिद पुत्राचे बलिदान सार्थकी लागले होते.
‘आपल्या घरची परिस्थी तुला माहीत आहे न? मग गीताचे जुने कपडे रीताला घालायला नको का म्हणतेस? रीता आणि गीता सख्ख्या बहिणी तर आहेत.’ रमेशने आपल्या पत्नीला म्हंटले.
‘आपल्या मुली भले दोनच जोड वापरतील पण कुणाचे जुने टाकून दिलेले कपडे वापरणार नाहीत. मग ती भले सख्खी बहीण का असेना.’
यावर काय बोलावं ते रमेशला सुचेना.
रजनी विचारात हरवून गेली. तीन बहिणींमध्ये रजनी सगळ्यात धाकटी. तिचं सगळं लहानपण आपल्या मोठ्या बहीणींचे वापरलेले जुने कपडे घालण्यातच सरलं.
तारुण्याच्या उंबरठ्यावर पोचता पोचताच, तिची मधली बहीण रीताला जन्म देता देता काही तासानंतर इहलोक सोडून गेली. नवजात मुलगी रीता आणि तिच्यापक्षा तीन वर्षाने मोठी असलेली गीता दोघींच्या देखभालीसाठी, तिचे वडील आणि सासरे यांच्या संगनमताने तिचे लग्न विधुर रमेशशी लावून देण्यात आले.
तोही तिच्या मधल्या बहिणीची उतरणंच तर होता.
(2) गळ्याचा फास (भावानुवाद)
‘मिश्रा जी, आपण निवृत्त झाल्यावरही याच ऑफिसमध्ये कॉँट्रॅक्ट बेसिसवर पुन्हा नेमणूक व्हावी, म्हणून प्रयत्न करताय म्हणे… चाळीस वर्ष नोकरी करूनही आपलं पोत भरलंसमाधान झालं नाही का समाधान झालं नाही?‘ डायरेक्टर जनरलनी थट्टेच्या सुरात मिश्राजींना विचारले
सर, मला नोकरीची अतिशय गरज आहे. कर्ण माझ्या कुटुंबात नोकरी करणारा मी एकटाच आहे.’ मिश्राजींनी आपली अगतिकता स्पष्ट केली.
‘काय? मी तर ऐकलं आपला मुलगा रमेश अगदी हुशारआणि गुणी विद्यार्थी आहे. आहे. तो काही करू शकत नाही?’
‘केवळ हुशार आणि गुणी असणं पुरेसं नसतं हल्ली! तेवढ्याने कुठे नोकरी मिळते? अनेक प्रकारची आरक्षणं, प्लेसमेंट एजन्सी आणि कॉँट्रॅक्ट बेसिसवरच्या पुनर्नियुक्तीनंतर व्हेकन्सीज उरतात कुठे? बोलता बोलता बोलणं त्यांच्या गळ्यात अडकलं. कारण ते स्वत:च कुणा हुशार गुणी मुलाच्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते.
मूळ लेखक – डॉ. प्रदीप कुमार शर्मा
संपर्क – पेंशनबाडा, रायपूर, छ्त्तीसगड 49001
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आजी नातवांचा पहिला वाढदिवस डोळे भरून पाहत होती. घर सगळं छान सजवले होते. सगळे नातेवाईक न चुकता आले होते. तशी सुनबाई नाती जपून ठेवायची. अगदी पारंपरिक पद्धतीने पाच सवाष्णीने ओवाळणी केली. आजीने आशीर्वादासाठी हात पुढे केला—
आणि नेमका वृद्धाश्रमाचा नेटवर्क गेला !
????
प्रस्तुती- श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
रात्रीचे अकरा वाजले होते. विश्रामबाग रेल्वे स्टेशन वरचा प्रसंग. प्रवाशांची गडबड, हमालांची लगबग, उतारुंची घाई, फेरीवाल्यांची बडबड,सगळ्या गोंगाटात राधा मात्र छोट्याशा बॅगेचे ओझे वागवत स्टेशनवर उभी होती. रात्री साडे अकरा च्या रेल्वेने ती कायमची सांगली सोडून जाणार होती तिचं प्रेम टिकवण्यासाठी तिने हे धाडस केलं होतं तिच्यासोबत केशवही हे गाव सोडून जाणार होता त्याच्या विश्वासावरच तिने हा धाडसी निर्णय घेतला होता.त्याची वाट पाहत बसली होती.त्याने वचन दिले होते, “तू स्टेशन वर ये.मी तुझ्या आधीच तिथे असेन.आपण दोघेही दुसरीकडे जाऊन आपला सुखी संसार थाटू “.ती विचारात गढून गेली होती. हातातील घड्याळाकडे लक्ष गेले 11:25 झाले. केव्हाही रेल्वे येईल.केशवचाअजून पत्ताच नाही. “कुठे अडकला असेल?”
इतक्यात साडेअकराची ट्रेन आली.पण केशव काही आला नाही.ती त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होती. मन नाना शंकांनी घेरलं होतं.नको ते विचार येत होते. ट्रेन निघून गेली. ती त्याची वाट पाहत तिथेच बसून राहिली. मन भूतकाळात धावू लागलं.चित्रपटाप्रमाणे सगळ्या आठवणी नजरेसमोर फेर धरू लागल्या.
राधा “शांतिनिकेतन “कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती.दिसायला सुंदर आणि हुशार.अशी राधा स्वभावाने समंजस आणि गुणी मुलगी होती. तिथेच असलेल्या छोट्या वस्तीवर ती राहत होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले होते.घरी आई,मोठा भाऊ आणि ती. एवढेच त्यांचे कुटुंब. भाऊ काही शिकत नव्हता.पण ती हुशार आहे म्हणून आईने तिला खूप शिकवायचं ठरवलं होतं.दिवसभर मजुरी करून आई तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. भावाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्यावर कशाचीच जबाबदारी नव्हती.तिने ठरवले होते की खूप शिकून चांगल्या पगाराची नोकरी करायची आणि आईलाही सांभाळायचं. सर्व काही सुरळीत चालू असताना तिच्या आयुष्यात आला “केशव”.
तोसुद्धा त्यांच्याच वस्तीवर राहायला आला होता. नव्याने तिथे राहायला आले होते त्यांचे कुटुंब. त्याला आई-वडील आणि एक बहीण होती.त्याची परिस्थिती जेमतेमच होती.त्याने त्याच कॉलेजमध्ये ATD कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. चित्रकलेत त्याची खूप आवड होती म्हणून त्याने ही शाखा निवडली.चित्र ही खूप सुंदर काढायचा.दिसायला देखणा, सालस,आणि हुशार मुलगा होता तो.
बघता बघता दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.तो तासंतास तिची चित्र काढायचा.हळूहळू दोघांच्या घरात ही गोष्ट कळाली. तिच्या भावाने तर तिला खूप मारले.तिला बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली.फक्त बारावीची परीक्षा होईपर्यंत तिला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली. निकाल लागला त्या दिवशी तिची केशवशी भेट झाली आणि त्या दोघांनी हा निर्णय घेतला.
रात्रीचे तीन वाजले होते. ती विचाराच्या तंद्रीतून बाहेर पडली. तिच्या लक्षात आले आपण एकटेच आहोत.केशव तर आलाच नाही.त्याने आपल्याला फसवले.
पण इतक्यात तिला आई आणि भाऊ समोरून येताना दिसले. तिने काही बोलायच्या आतच आईच्या हाताचा जोरदार फटका तिच्या गालावर पडला.या दोघांनी तिला घरीं नेऊन खूप मारले.आणि दोनच दिवसात तिच्याच नात्यातील मुलाशी लग्न लावले. तो मुंबईत बँकेमध्ये शिपाई होता. तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता.
ती हुशार होती.तिला पुढे शिकायचे होते. तिने नवर्याला खूप समजावून सांगितले.आणि म्हणून त्याने तिला परत सांगलीतच डीएड ला ॲडमिशन घेऊन दिले .ती सांगलीत दोन वर्षासाठी राहायला आली.
दिवसभर केशवला शोधायची आणि संध्याकाळी घरी यायची. आठ दिवस तिने त्याचा शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही.सगळ्यांनी सांगितले की तो गाव सोडून गेला पण कुठे गेला कोणालाच कळले नाही.
शेवटी तिने मनाला समजावले,”आता हेच माझ आयुष्य “.त्याच्याशिवाय आयुष्य काढायला लागली. तिने खूप मन लावून अभ्यास केला आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. तिला नंतर मुंबईमधील कल्याण येथील प्राथमिक शाळेत नोकरी लागली. दोनच वर्षात तिने एक आदर्श शिक्षिका म्हणून मान मिळवला.आता भूतकाळात न रमता वर्तमान काळात जगण्याचा निर्धार केला आणि मनापासून संसारात रमली.एक मुलगा व एक मुलगी आणि नवरा असे चौकोनी कुटुंब ती प्रामाणिकपणे सांभाळू लागली. नवऱ्याची म्हणावी तशी साथ मिळाली नाही.त्यांचे स्वभावही कधी जुळलेच नाहीत. पण” लग्न म्हणजे तडजोड “या उक्तीनुसार तिने वीस वर्ष संसार केला.पण केशव अधून मधून मनात डोकावत होता. त्याला ती विसरू शकली नव्हती.
अचानक एक दिवस तिला व्हाट्सअप वर मेसेज आला,” हाय राधा,ओळखलेस का ?”डीपी पाहिला तर लक्षात आले,” अरे हा तर केशव “तिने पटकन तो नंबर ब्लॉक केला. पण मन काही ब्लॉक होत नव्हते.,”त्याने का मेसेज केला असेल?”,” इतक्या वर्षांनी त्याला काय बोलायचं असेल ?”,”तो कोणत्या संकटात तर नसेल ना ?”अशा नानाविध प्रश्नांनी मन गोंधळून गेले होते.
कोणतीही स्त्री पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाही.वीस वर्ष आठवणींचं ओझं मनावर घेऊन ती जगत होती. आज वेळ आली होती ते ओझ उतरवण्याची..अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची.”का असं वागलास?” याचा जाब विचारण्याची. दोन दिवस असेच गेले शेवटी. तिने ब्लॉक काढला आणि फोन लावला.तिकडून आवाज आला,” हॅलो मी केशव, राधा,मला तुला भेटायचं आहे.” तिलाही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची होती. भेटीचे ठिकाण ठरले आणि दोघे भेटले सुद्धा.
त्यानेच बोलायला सुरुवात केली. वडील आजारी होते.त्या दिवशी रात्रीच वडिलांना ऍडमिट करावे लागले. त्यांना अटॅक आला होता. ते आयसीयूमध्ये ऍडमिट होते. म्हणून मी येऊ शकलो नाही. नंतर तुझ्या भावाने दमदाटी केली. आम्ही गाव सोडून गेलो. वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न झाले.आज मी चित्रकलेचा शिक्षक आहे.मला दोन मुले आहेत.पण मी एकही दिवस तुला विसरलो नाही.
केशव म्हणाला,”राधा नको ही घुसमट.”,”आपण पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करायची का ?” राधा म्हणाली, “हो करूया की! नक्कीच.” पण त्या आधी माझे ऐक.
केशव,” प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुली बरोबर संसार करता येत नाही.पण ती ?व्यक्ती कायमची तुमची झाली नाही तर काय बिघडलं,ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे. खूप छान मैत्रीण म्हणून हे काय कमी ग्रेट फीलिंग आहे.?
पुढेही असेच अनुभव आल्याने नातवंडांच्या सोबत टीव्ही बघणं आजीनं सोडूनच दिलं .
“या आपल्या चार अन् सहा वर्षाच्या छोट्यांमध्ये क्युरिआसिटी फार आहे नाही.. .! त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची म्हणजे…. आजी भयभीत झाल्यासारख्या बोलल्या.”हो ही नवी जनरेशन अतिशय स्मार्ट आहे .आपल्या मुलांच्या पेक्षाही” आजोबांनी दुजोरा दिला.
” ही दोघं मुलं बाहेर तर इंग्रजी बोलतातच…आणि घरात पण ..घरात तरी चांगलं मराठी बोलायला हवं नाही का…!” आजीबाई आजोबांचे मत घेत होत्या.
“अगं त्यांची तरी यात काय चूक आहे.. ?त्यांच्या लालन -पालनमधेही … मी मागच्या दोन तीन वेळा पाहिलंय नं सगळे किडस् इंग्लिश मध्येच बोलतात. त्यातनं ह्यांच्या बाबाची सारखी ट्रान्सफर होते. कधी चेन्नई तर कधी बेंगलोर तर कधी हैदराबाद.. मुलं सारख्या नव्या लॅंग्वेज कशा शिकू शकतील? इथल्या सगळ्याच लहान मुलांची कॉमन लैंग्वेज आहे इंग्लिश.शाळेत पण इंग्लिश बोलणे कंपल्सरी ..घरात त्यांच्याशी चांगलं मराठी बोलायला वेळ कोणाकडे आहे? त्यामुळे घरात इंग्रजी, मराठीची खिचडी लैंग्वेज ती दोघं बोलतात.”हे बोलताना आजोबाही खिचडी भाषाच शिजवत होते.
आता संध्याकाळी हात-पाय धुऊन देवाची स्तोत्रं ,परवचा म्हणून झाल्या की त्यांना गोष्टी सांगायचा उपक्रम आजीने सुरू केला.मुलगा-सून खुश झाली.
“अरे आजीकडून सगळं शिकून घ्या बरं… संस्कृत स्तोत्रेपण…आम्ही पण लहानपणी संस्कृत श्लोक म्हणायचो. संस्कृत पाठांतराने वाणी कशी शुद्ध होते.” मुलगा म्हणाला. ” मग बाबा तू का नाही आम्हाला शिकवलंस?” धाकट्याच्या प्रश्नाकडे अर्थात् त्यानं कानाडोळा केला. तोपर्यंत थोरला विचारता झाला,” वाणी म्हणजे?… संस्कृत म्हणजे?… शुद्ध म्हणजे ?”
“आजीबाई या प्रश्नांच्या एके फोर्टी सेवनला तुम्हीच तोंड द्या इथे असेपर्यंत .”म्हणत,हसत हसत मुलगा तिथून निघून गेला.
मुलगा सुनेचा हाय प्रोफाईल जॉब .त्यांना नव्हता जादा वेळ मुलांसाठी द्यायला. ‘ ‘लालन-पालन’च त्यांच्यावर जे संस्कार करायचे ते करायचा. पण सध्या आजी-आजोबा आल्यामुळे तेही बंद केले होते. आजोबांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम क्लब मध्ये रमायला सुरुवात केली. त्यामुळे बिचारीआजीच ” का ?कोण? कसं? केव्हा? किती?” यासारख्या प्रश्नांच्या बाराखडीत अडकून पडली गेली.
पण आजीही डोकेबाज होती. नातवंडांसाठी गोष्टी सिलेक्ट करताना जास्त प्रश्नांच्या तावडीत आपण सापडणार नाही अशी काळजी ती घेऊ लागली.
(सोहमने सांगितलेलं सकारात्मक विचारांचं महत्त्व पटल्यामुळे सरलाचं टेन्शन नाहीसं झालं. हे पाहून सोहमलाही बरं वाटलं…. आता पुढे )
‘तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, आई. तू मघाशी बाबांचं आणि दादाचं कौतुक करत होतीस. म्हणजे ‘बिचारे ‘, ‘कधी सासू -सुनेच्या मध्ये पडले नाहीत ‘वगैरे वगैरे….’
‘खरंच आहे ते.’
‘खरं असेल, पण त्याला गुण नाही म्हणता येणार.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे बघ हं. समिधा ‘माझी ‘ बायको म्हणून आपल्या घरी येईल. म्हणजे आधी तिचं ‘माझ्याशी’ नातं जुळेल आणि नंतर तुझ्याशी, बाबांशी, आपल्या घराशी.’
सरला काही न बोलता त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत राहिली.
‘तिला या घराशी ऍडजस्ट व्हायला मदत करणं, हे ‘माझं’ काम आहे. त्याचबरोबर तिला तुमच्याविषयी, या घराविषयी आपलेपणा कसा वाटेल, हे बघणं, हे ‘माझं’ काम आहे. हे करत असताना तिला काही अडचणी आल्या, तरी त्या सोडवणं, हे ‘माझं’ काम आहे. उलटपक्षी, ती इथे आल्यावर तुला – बाबांनाही काही बाबतीत प्रॉब्लेम्स येऊ शकतील. तसं झालं, तर तुमचे प्रॉब्लेम्स सोडवणं, हेही ‘माझंच’ काम आहे.’
सोहम बोलत होता. सरला मन लावून ऐकत होती.
‘आता एक सांग आई, सासू-सुनेमध्ये भांडणं का होतात?’
‘कितीतरी कारणं असतात. सासू-सून हे नातंच कुविख्यात आहे. विळ्या-भोपळ्याचं सख्य असलेलं. अगदी पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं चालत असलेली दुष्मनी आहे ती. त्यांच्यातल्या भांडणांची कारणं तरी अगणित असतील.’
‘पण त्या सगळ्यांचं मूळ कारण, रूट कॉज आहे पझेसिव्हनेस -मालकी हक्काचा हव्यास. सासूला वाटतं -हा माझा मुलगा आहे. सुनेला वाटतं -हा माझा नवरा आहे.’
‘बरोबरच तर आहे.’
‘तसं हे बरोबर आहे. पण आतापर्यंत आपला असलेला हा मुलगा आता आपल्या सुनेचा नवरा लागतोय, तिच्याही त्याच्यापासून काही अपेक्षा असणार, याचं भान सासूने ठेवलं पाहिजे. तसंच सुनेनेही, आपला नवरा हा त्याच्या आईचा मुलगा आहे, हे लक्षात घेऊन लग्न झाल्यानंतर त्याने आपलं हे मूळ उखडून टाकावं, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण प्रत्यक्षात घडतं काय? तर दोघींनाही तो पूर्णपणे आपला असावा, असं वाटतं. आणि या वाटण्याचा फायदा कोण घेतो, माहीत आहे? सासूचा मुलगा आणि सुनेचा नवरा. तो दोघींकडूनही स्वतःचे लाड करून घेतो आणि त्याच्यावरून विवादाचा प्रसंग आला, की बिलंदरपणे ‘मी मध्ये पडणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या’ म्हणून नामानिराळा होतो.’
‘बघूया हं आमचा सोहमबाळ काय करतो ते,’ सरलाने चिडवलं. पण सोहम गंभीरच होता.
‘खरं तर त्याचं काम असतं पुलाचं. सासू आणि सुनेमधला सेतू बनलं पाहिजे त्याने. एकमेकींविषयी एकमेकींना वाटणारा जिव्हाळा, कौतुक, चांगल्या गोष्टी परस्परांपर्यंत ‘त्यानेच’ पोहोचवल्या पाहिजेत. एकीच्या मनात दुसरीविषयी कटुता आली, तर सामंजस्याने सुसंवाद साधून, समाधानकारकरीत्या गैरसमज दूर करण्याचं काम ‘त्याचं’आहे. प्रेमाचा त्रिकोण वगैरे म्हणतात ना? पण मला मात्र हा वेगळाच त्रिकोण दिसतोय.’
‘त्रिकोण?’
‘हो. त्रिकोण. तू, मी, समिधा हे त्या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाने आपले दोन्ही हात पसरले आहेत आणि उरलेल्या दोघांचा एकएक हात धरलाय. त्यामुळे तयार झालेल्या त्रिकोणात आपलं विश्व सामावलंय. आपलं सुखीसमाधानी, आनंदी विश्व.’
‘खरोखरच मोठा झाला माझा सोहमराजा.’
‘पण तुझ्यासाठी मात्र सोहमबाळच आहे हं मी,’असं म्हणत त्याने सरलाच्या मांडीवर डोकं ठेवलं.
(होणाऱ्या पत्नीचं मलाही टेन्शन आलंय असं सोहमने म्हटल्यावर सरलाला धक्काच बसला…. आता पुढे )
‘खोटं नाही सांगत. खरंच अगं. मलाही टेन्शन आलंय. आता हेच बघ ना. सध्या घरात आपण इनमिनतीन माणसं. बाबा तसे स्वतःतच असतात. आपल्या दोघांचं कसं मस्त चाललं होतं!दादा बोरिवलीला राहायला गेल्यापासून तर ‘तू फक्त माझीच’ असं मला वाटायचं. एकंदरीत छान चाललं होतं आपलं. पण आता समिधा येणार म्हटल्यावर शांत पाण्यात खडा टाकल्यासारखं वाटतंय. ती आपल्या घराशी कितपत ऍडजेस्ट होईल?’
‘खरं सांगू, सोहम?मलाही तीच भीती वाटतेय. शाल्मलीचं किती कौतुक केलं होतं मी!ऑफिसमधून दमून येणार, भूक लागलेली असेल, म्हणून सगळा
स्वयंपाक तयार ठेवायचे मी. बाकीच्या बायकांसारखी, सून येऊन मदत करील, अशी वाट कधीच बघितली नाही. तर हिचं आपलं भलतंच. भूक नाही म्हणायचं आणि आपल्या खोलीत निघून जायचं. मागचं आवरणं तर सोडाच, पण एवढं शिजवलेलं अन्न -सासू काय करते त्याचं? हेही नाही. रोज फुकट कुठे घालवणार, म्हणून फ्रीझमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी…..’ बोलताबोलता सरलाला रडूच आलं.
‘तू तिला कधी सांगितलं नाहीस, आई, की रात्री जेवायला नसशील तर आधीच फोनवर कर, म्हणून?’
‘सुरुवातीला मी गप्प राहायचे रे -उगीच भांडण नको म्हणून. शेवटी न राहवून म्हटलं तसं. तर म्हणाली -रात्री भूक लागणार की नाही, ते संध्याकाळी कसं कळणार?’
‘आणि दादा?’
‘तो बिचारा कधी मध्ये नाही पडला हं. तो आपला आमच्याबरोबर जेवायला बसायचा. पण बायको जेवत नाही, म्हटल्यावर यालाही जेवण जायचं नाही. एखादी चपाती खाल्ल्यासारखं करायचा आणि ताटावरून उठायचा.’
‘कित्ती गं भोळी माझी आई!’सोहमने तिला जवळ घेतलं- ‘अगं, तोपण तिच्याबरोबर खाऊन येत असणार. पण वाद नको, म्हणून तुमच्याबरोबर थोडंसं जेवायचा.’
‘असेल, असेल. तसंही असेल. माझ्या मात्र हे लक्षात आलं नव्हतं हं कधी. बाकी संकेत हाडाचा गरीबच हं. कधी बायकोच्या बाजूने ‘ब्र’सुद्धा काढला नाही तोंडातून.’
‘आई, एक विचारू? आजीचं आणि तुझं कधी वाजायचं का गं? आणि मग बाबा कोणाची बाजू घ्यायचे?’
‘ते वाजणंबिजणं तुझ्या आजीच्या बाजूनेच व्हायचं. मी आपली गप्प राहून मुळुमुळु रडत बसायचे. कधी एका शब्दाने उलट उत्तर केलं नाही त्यांना.’
‘आणि बाबा?’
‘तेही बिचारे मध्ये पडायचे नाहीत-संकेतसारखेच. सासू-सून काय ते बघून घ्या म्हणायचे.’
‘तू का नाही बोलायचीस काही?’
‘एक म्हणजे त्या मोठया आणि दुसरं म्हणजे मी त्यांच्या घरी आले होते ना? म्हणजे तडजोड मलाच करावी लागणार. तशी बऱ्याच बाबतीत तडजोड केली मी. पण त्या दोघांच्या कधी लक्षातच आलं नाही.’
‘हेच, हेच म्हणतो मी, आई. आपल्या मनात जे असतं, ते आपण बोलून दाखवत नाही. आपण न बोलताच समोरच्याने आपल्या मनात काय आहे, ते समजून घ्यावं, अशी अपेक्षा करतो. हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. लॅक ऑफ कम्युनिकेशन. सुसंवादाची उणीव. मी तुला आत्ताच सांगून ठेवतो, आई. तुझ्या मनात माझ्याबद्दल, समिधाबद्दल काहीही असलं, तरी तू मोकळेपणाने आम्हाला -निदान मला तरी सांग.’
‘म्हणजे सुनेच्या कागाळ्या….’
‘नाही गं. हा ‘कागाळी’ शब्द आहे ना, तोच बिथरवून टाकतो आपल्याला. त्याऐवजी,’संवाद’ म्हण,’सुसंवाद ‘ म्हण.आता, माझं काही चुकलं, तर तू सांगतेसच ना मला? त्याच मोकळेपणाने नंतरही सांग. आणि हेच मी समिधालाही सांगणार आहे.’
‘नको हं. उगीच एकाचे दोन….’
‘हेच ते. तू असा नकारात्मक विचार का करतेस? नकारात्मक विचारांमुळे आपल्या वागण्यालाही नकारात्मक पदर येतात आणि समोरच्या माणसांचे रिस्पॉन्सेसही नकारात्मक मिळतात.’
‘तू बोलतोयस, त्यात तथ्य वाटतंय हं.’
‘हो ना? मग आतापासून पॉझिटिव्ह विचार कर. म्हणजे तुझं वागणंही पॉझिटिव्ह होईल आणि त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रियाही पॉझिटिव्हच असतील.’
सरलाने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. सोहमचं बोलणं पटल्याचीच खूण होती ती. आईचं टेन्शन नाहीसं झालेलं पाहून सोहमलाही बरं वाटलं.
चितळे काका म्हणजे आमच्या बिल्डिंगची शान होते. सत्तरीच्या आसपास वय… पण गडी अजूनही फुल्ल टू एनर्जेटीक होता.
कलप लावून केलेले काळे केस… टिपिकल कोब्रा गोरा रंग, आणि पिढीजात घारे डोळे.
रोज नेमाने योगा करुन मेंटेन्ड अशी सडपातळ, उंच शरिरयष्टी. आणि हसल्यावर आपल्या उजव्या गालावर कातिलाना खळी पडते हे जाणून असल्याने, प्रयत्नपुर्वक हसरा ठेवलेला चेहरा.
घरात शाॅर्ट्स आणि मलमलचे शुभ्र कुर्ते… तर बाहेर म्हणजे अगदी थाटच… जिन्सची पँट, त्यावर लीवाईज्, यू.एस. पोलो, रोडस्टर पैकी कुठलासा ब्रँडेड टी-शर्ट, पायात रेड टेपचे शूज, डोळ्यांना रे-बॅनचा गाॅगल…
असे हे चितळे काका कोपर्यावरुन मिरच्या-कोथिंबीर आणायलाही, इतक्याच तामझामात बाहेर पडायचे… ते ही त्यांची पल्सर काढत.
खरंच पण… त्यांना हे असं पल्सरवरुन कुठे जातांना पाहिलं की, आम्हा मुलांना वेस्टर्न मुव्हीजमध्ये घोडा दौडवत येणारा क्लिंट ईस्टवुडच आठवे.
प्रकरण एकंदर रंगीन तर होतंच पण… विशेषतः आम्हा तरुण, बिन लग्नाच्या मुलांत उठ-बस करण्याची क्रेझ फार होती त्यांना. कदाचीत आमच्याकडून मिळणार्या वाईब्ज, हेच त्यांच्या सदैव चिरतरुण रहाण्याचं टाॅनिक असावं.
पण एवढं असूनही चितळेकाका मुली वा बायकांबाबतीत प्रचंड सोवळे होते. कधीही कुठलीही वात्रट कमेंट वगैरे पास केली नव्हती त्यांनी. आणि त्यामुळेच कदाचित आम्ही मुलं-मुली, खूप कन्फर्टेबल होत असू काकांबरोबर…
तर अशा ह्या आमच्या सदाबहार चितळे काकांची अर्धांगीनी… म्हणजेच चितळे काकू. काकांच्या अगदीच विरुद्धार्थी व्यक्तिमत्व. पासष्टीच्या असाव्यात काकू. एकन् एक पिकलेला केस… त्या पिकल्या तरिही दाट अशा केसांचा, सैलसर बांधलेला शेपटा.
त्या माहेरच्या गोगटे… त्यामुळे त्याही तुकतुकीत गोर्या नी घार्याही. कपाळावर चार आण्याच्या आकाराचं ठसठशीत कुंकू. घरी व बाहेर पण. अंगावर एक साधीशी काॅटनची साडी.
फरक इतकाच की बाहेर असतांना पदर दोन्ही खांद्यांवरुन घट्ट गुंडाळून घेत, त्याचं टोक एका हाताने पकडलेलं. पायात साध्याशा चपला… आणि एका हातात कायम मोठाली पिशवी… जातांना रिकामी, तर येतांना टम्म फुगलेली.
आम्ही मुलांनी काकूंना कधी, काकांच्या मागे बाईकवर बसलेलंही पाहिलं नव्हतं. काकू फार कोणांत मिसळतही नसत. अगदी तीन-चार त्यांच्याच वयाच्या आसपास असलेल्या, बिल्डिंगमधल्या बायका. त्यात एक माझी आई असल्याने, माझ्याशी येता जाता फक्त हसत… बस्स.
एकूणच आम्हा मुलांचच काय पण बिल्डिंगमधल्या प्रत्येकाचंच हे मत होतं की, काकांना अगदीच म्हातारी बायको मिळाली. घरातून बाहेर पडलं की मठात, नी तिथून परत घरात… हे एवढंच विश्व होतं काकूंचं.
पण हे असं अरसिक प्रकरण गळ्यात पडलं असूनही काकांना मात्र आम्ही कधीच काकूंबद्दल, एका शब्दानेही खंत व्यक्त करतांना पाहिलं नव्हतं. चार खोल्यांतून त्या दोघांचा संसार, नेटाने चालू होता. काका कायमच ‘जाॅली गुड फेलो’ वाटत आलेले आम्हाला.
तर एकदा आमच्या सातव्या फ्लोअरवरच्या रेफ्युजी एरियात रात्रीची आम्हा मुलांची पार्टी चालू होती. बिल्डिंगमधल्याच एका मुलाची एंगेजमेंट ठरल्याची पार्टी होती ती. आम्ही जवळ जवळ वीसेक मुलं-मुली होतो… आणि होते अर्थातच एकमेव चितळे काका.
पिझ्झा, पावभाजीचा बेत होता… साॅफ्ट ड्रिंक्स होती… आम्हा चार-पाच जणांसाठी, बिअरचा एक क्रेटही होता. थोडक्यात धमाल चाललेली… मजा, मस्ती चाललेली.
किशोर कुमारची दोनेक गाणी ऐकवून, वाहवा मिळवून काका पावभाजीची प्लेट हातात घेऊन खुर्चीवर बसले होते. आणि…
…आणि अचानक काका खाली कोसळले! छातीला हात लावत कळवळत होते ते. आम्हा मुलांचं अक्षरशः धाबं दणाणलं. कोणीतरी जाऊन चितळे काकूंना कळवलं.
दोन्ही खांद्याभोवती पदर गुंडाळलेल्या काकू, गडबडीतच वर आल्या. एव्हाना चितळे काकांची हालचाल पूर्ण बंद झाली होती. आणि पुढे जे काही आम्ही मुलांनी पाहिलं, ते निव्वळ अविश्वसनीय होतं…
काकांच्या मानेखाली हात घालत त्यांना, काकूंनी सरळ रेषेत झोपवलं. खाली गुडघ्यांवर बसत त्यांनी दोन्ही हातांनी काकांच्या ब्रँडेड शर्टची बटणं अक्षरशः तोडली आणि स्वतःची बोटं ईंटरलाॅक्ड करत काकांना चेस्ट कम्प्रेशन द्यायला सुरुवात केली.
तीस कम्प्रेशन्सचा एक सेट दिल्यावर, काकूंनी त्यांना रेस्क्यू ब्रिदिंग दिलं. पुढच्या तीसच्या सेटकडे त्या वळणार तोच… अचानक काका एक दिर्घ श्वास घेत, शुद्धीवर आले.
मी आधीच बेदम घाबरलेलो… माझे पायच थरथरू लागले. काकूंनी माझी अवस्था ओळखत, माझ्याकडे गाडीची किल्ली मागितली. मी थरथरत्या हातांनी खिशातून काढत अवाक्षरही न बोलता ती काकूंसमोर धरली.
काकूंनी खांद्याभोवती गुंडाळलेला पदर खाली घेत, कंबरेला खोचला. केसांचा सैलसर शेपटा सोडत केस दोन्ही हातांनी एकत्र आणत, घट्ट शेपटा बांधला. आणि बोलल्या एकदम आॕथिरीटीने…
“Lets move…”
आम्ही पाच-सहा जणांनी काकांना उठवून धरत धरत लिफ्टमधून खाली नेत माझ्या गाडीत मागच्या सीटवर झोपवलं. एक मुलगा काकांचं डोक मांडीवर घेऊन मागे बसला.
मी काकूंकडे पाहिलं… त्यांनी डोळ्यांनीच मला खूण केली ‘रिलॅक्स’ अशी… आणि डोळ्यांनीच सांगितलं “बाजूला बस.”
ड्रायव्हींग सीटवर स्वतः काकू बसल्या… अतिशय स्मुथली, लिलया गाडी चालवत त्या गाडी हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. वाटेत एका हाताने स्टेअरींग सांभाळत त्यांनी हाॅस्पिटलमध्ये फोन करत, स्ट्रेचर रेडी ठेवायला सांगितलं. त्यांच्या फॅमिली डाॅक्टरलाही फोन करत त्यांनी हाॅस्पिटलमध्ये बोलावून घेतलं…
गाडी पार्किंग लाॅटमध्ये पर्फेक्टली पार्क करत त्यांनी काकांना ताबडतोब अॕडमीट करवून घेतलं. आणि तातडीने त्यांच्यावर उपचारही सुरु करवले.
सगळं मार्गी लागल्यावर काकू, लाॅबीमध्ये आम्ही दोघं बसलेलो तिथे आल्या. माझ्याकडे गाडीची चावी देत, माझ्या डोक्यावरुन त्यांनी हात फिरवला. आम्हा दोघांच्याही गालांना दोन्ही हातांनी टॅप करत, मंदशा हसल्या आमच्याकडे बघत नी म्हणाल्या…
“Doctor said he is out of danger now… thank you so much for all your support… तुम्ही निघा आता… मी आहे इथे…”
मघा कंबरेला खोचलेला पदर काढत, त्यांनी तो पुन्हा दोन्ही खांद्यांभोवती गुंडाळला. केसांचा चाप सोडत, ते पुन्हा सैलसर बांधले. आणि पाठ करुन आमच्याकडे, त्या चालू पडल्या काकांच्या रुमकडे.
अगदी त्या क्षणी चितळे काकूंचं पिकलेपण… मला चितळे काकांच्या स्वतःला न पिकू देण्याच्या अट्टाहासासमोर, प्रचंड मोठं भासलं होतं.
तारुण्य तर सगळेच गोंजारतात आपापलं, अगदी चितळे काकांसारखे म्हातारेही. पण असं एखादंच कोणी असतं चितळे काकूंसारखं… जे आपलं म्हातारपणही ‘डिग्निटी’ने मिरवू शकतं, कुठलाही उसना आव न आणता!
काकू चालत चालत दिसेनाशा झाल्या… नी अचानक मला जाणवलं की, मी चितळे काकांना पहिल्यांदाच ‘म्हातारा’ म्हणालो होतो.
– अनामिक
संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈