☆ जीवनरंग ☆ बोध कथा – तीन मासे ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा १३ . तीन मासे
एका नदीच्या खोल जलाशयात तीन मासे राहत होते. त्या तिघांपैकी एका बुद्धिमान माशाने पाण्याची स्थिती लक्षात घेऊन यापुढे जलाशयात पाणी राहणार नाही हे जाणले. त्याने त्या दोघा माशांना बोलावून सांगितले की “ उन्हाळ्यात या जलाशयातील पाणी कमी होईल तेव्हा कोळी येऊन जाळे पसरवून आपल्याला पकडतील व ठार मारतील. तेव्हा आपण जर प्रवाहाबरोबर हळूहळू दुसऱ्या जलाशयाकडे किंवा समुद्राकडे गेलो तरच आपले प्राण वाचतील. इथेच राहिलो तर संकटे ओढवतील.” बुद्धिमान माशाचे बोलणे ऐकून इतर दोघे त्याला हसले व त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा तो मासा एकटाच ते जलाशय सोडून प्रवाहाबरोबर दुसऱ्या जलाशयात गेला.
काही काळानंतर उन्हाळा आल्यावर जलाशयाचे पाणी कमी कमी होऊ लागले.तेव्हा ही संधी साधून एक कोळी तेथे आला. त्याने जाळे पसरवून त्या दोघा माशांना पकडून जलाशयाच्या तीरावर आणले. त्यातील एक मासा एक उपाय करून स्वतःला मृतवत् भासवत निश्चल राहिला. दुसरा मात्र वारंवार उड्या मारत होता. तेव्हा कोळ्याने त्याच्यावर आघात करून त्याला मारले. कोळी दूर गेलेला दिसताच तो पहिला मासा हळूहळू जलाशयापर्यंत सरकून झटकन उडी मारून त्यात प्रवेश करून सुरक्षित राहिला.
तात्पर्य – भविष्यात येणाऱ्या संकटांचा आधीच विचार करणारा सहज सुखी होतो. संकट आल्यावर बुद्धिबलाने योग्य उपायांनी प्रतिकार करणाऱ्याला सुखप्राप्ती होते. दैवावर अवलंबून राहिल्याने अनभिज्ञ व्यक्तीचा विनाश होतो.
“भूत दादा,आई-बापाविना आम्ही भावंडे!मोठ्या प्रेमाने भावाने आम्हाला इथवर आणले. उच्चशिक्षित झालो,डॉक्टर झालो. आता गावात राहून कसं चालणार ?पोटापाण्याचं काही बघू की नको? पण खरं सांग, सेवाच करतोय ना रे मी सर्वांची ? मग, विठू का रुसला ? वारी का नको म्हटला?” असे म्हणून पाटणकर रडू लागला. आम्ही त्याला सावरलं. आत्ता कुठे पाटणकर खरं खरं बोलायला लागला होता.
“मग तुझी सुटका कशी झाली?” मी मुद्द्याचा प्रश्न विचारला.
“अरे काय सांगू तुम्हाला?” असे म्हणून पाटणकरचे डोळे चमकले. आम्ही त्याला नकळत हरभऱ्याच्या झाडावर चढवले होते.
“भूतच मला सांगू लागले; अरे तुझा विठू ना परवा मला तुझ्या सोबतच दवाखान्यात दिसला. तो पीपीई किट घालून अगदी आम्हा भुतांसारखा दिसत होता. तुझ्या बरोबरीने काम करत होता तो! तूहि त्याला ओळखलंच नाहीस. आम्हा सारखी अशी अनेक भूतं मानव सेवेत लागली आहेत. भुतासारखच काम करतात सगळे. त्यात तूहि आहेस. काय सांगतोस? तुला कसे ठाऊक की विठुराया माझ्यासोबत होता ते? मी भुताला विचारले.
अरे, मला नंतर भेटला तो आणि म्हणाला,यंदा मानवजातीवर कसलेसे संकट आले आहे म्हणे! त्यानं अनेक माणसे आजारी पडायला लागली आहेत त्यामुळे दवाखान्यात काम प्रचंड वाढलं आहे.
माझे वारकरी अथक काम करताहेत. देशाचे पंतप्रधानही अहोरात्र काम करतातहेत. सर्वजण त्यांच्या सादेला प्रतिसाद देत आहेत. पण हात अपुरे पडायला लागलेत रे!
मी ठरवलं, यंदा आपणच मदतीलाधावून जायचं भक्तांच्या. तेवढाच खारीचा वाटा! पंढरी सोडून इथेच आलो आहे मी! म्हणून माझ्या वारकऱ्यांना भक्तांना मी वारीला येऊ नका,कायिक नाही तर मानसिक वारी करा असं म्हणालो.
बरं, सर्वांना चंद्रभागा रुसली आहे असे का बरं वाटलं? ती तर दुथडी भरून वाहते आहे व सगळ्यांना आलिंगन द्यायला उत्सुकआहे.सगळ्या वारकऱ्यांनी उगाच गैरसमज करून घेतला आहे झालं.
बाबा रे, मग तू का माझ्या मानगुटीवर बसला आहेस ?का माझा पिच्छा पुरवतो आहेस? काय हवय तुला? मी भुताला मार्मिक प्रश्न विचारला.”
सडेतोड स्वभावाच्या पाटणकर कडून स्वप्नातही असा बिनधास्त जाब विचारणं अपेक्षितच होतं. उत्सुकता होती ती भुताच्या उत्तराची!…….
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात ना, अगदी तसेच झाले. मी एका दगडावर बसून ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत होतो तितक्यात माझ्या मानेवर एक भूत येऊन बसलं.
पाटणकरने आमचे मनोरंजन विक्रम आणि वेताळ यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथेचा आधार घेऊन करायला सुरुवात केली.
“भुताने मला विचारले, कोणते गाणे म्हणत होतास? माझी अगोदरच भीतीने गाळण उडाली होती आणि त्यातच त्याने मला हा प्रश्न विचारला मी थरथर कापायला लागलो. त्याची माझ्या मानेवरील पकड आणखीनच घट्ट व्हायला लागली.
गाणं ना? ते, हे, आपलं, मी त, त, प, प करू लागलोआणि गडबडीने उत्तर दिले ‘अजि म्या भूत पाहिले’ झालं! त्यानं मला शब्दातच पकडलं!
तुझं भूत, इथंभूत सांग, नाहीतर तुझ्या शरीराची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायात लोळण घेतील. भुताने मला दम दिला.”
“भूत तुलाच तुझा भूतकाळ विचारत होतं?”पेंडसेने पाटण्याला विचारले. “होय! पण मी घाबरून गाणेही विसरलो आणि भूतकाळही!”
“मग काय झालं?” आम्ही सरसावून बसलो.
पाटण्याची कल्पनाशक्ती, सांगण्याची लकब, प्रसंग हुबेहूब मांडण्याची धाटणी इतकी अप्रतिम आहे की त्याच्या वक्तव्यातील निम्मे खरे-निम्मे खोटे असे गृहीत धरले असले तरी पठ्ठ्य प्रसंग असा उभा करतो की ‘एैसा भी होता है?’ असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
एव्हाना पाटण्याने त्याच्या स्वप्ननगरीत आम्हाला बरोबर खेचलं होतं अन् तो बोलू लागला.“माझ्या मानेवरची त्याची पकड आणखीनच घट्ट करीत ते माझ्याशी बोलू लागले,
भूतकाळ बदलता येत नाही पण तो आठवता येतो. म्हणून तर भूतकाळ या शब्दात भूत म्हणजे मी आहे. ते म्हणालं.”
पाटण्या अशी संकटाची वेळ कशी मारून नेतो ही उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती. तल्लीन होऊन आम्हीऐकू लागलो…..
त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.
‘करोना’ नावाच्या एका अस्मानी संकटाने सगळ्यांची बोलती बंद केली हे जरी खरं असलं तरी,आम्ही मात्र सर्व त्याच्याविषयीच बोलू लागलो.
आताशा करोनाच्या नावाने बोटं मोडीत दिवस सुरु होतो अन् त्याला शिव्या शाप देत संपतो. आम्हा चांडाळ चौकडीच्या गप्पांच्या कट्ट्यावर देखील या करोनानेच धुमाकूळ घातला आहे.
त्यात आमचा ‘पाटण्या’ म्हणजे पाटणकर रोजची करोना अपडेट देणार! मग काय विचारता…तो येताच करोना जणू आम्हा सर्वांच्या काया प्रवेश करतो आणि आपले अस्तित्व दाखवू लागतो.
पाटणकर म्हणजे एक अजब रसायन आहे. भविष्याची चिंता नसलेला, भूतकाळात डोकावणारा, आणि वर्तमानाला प्रेझेंट समजून चालणारा असा हा, थापा मारतो की बाता हे आम्हाला अजून उमगलेले नाही.
त्याच्या थापा म्हणाव्यात तर तो आम्हा कुणाचेही थापा मारून नुकसान करीत नाही किंवा त्याच्या बोलण्याने आम्हा कुणाचीही फसवणूक होत नाही. आणि बाता म्हणाव्यात तर त्याच्या बोलण्याला एक सत्याची झालर असते.
थापा असोत वा बाता, स्वतःची टिमकी वाजवायला तो कधीही विसरत नाही.
असाच तो आजही कट्ट्यावर आला ते ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत.
“आज अचानक करोनाला बगल देऊन एकदम विठुरायाचा काया प्रवेश? ‘गो करोना’ म्हटलेलं ऐकलं की काय करोना ने?” मी पाटणकरला टोकलं.
“अरे,आज एकादशी. सकाळी-सकाळी कानावर पडलेलं गाणं मनात रुंजी घालतय तेच गुणगुणत आलोय झालं!” पाटणकरने गाणे गाण्याचं प्रयोजन सांगितलं.
“आता पूर्ण गाणं म्हण” आम्ही आग्रह धरला. आणि आशा ताईंच्या आवाजातील हे गाणे पठ्ठ्याने पूर्ण म्हटलं की हो!
आज ना तो नेहमीसारखा न्यूज रीडरच्या भूमिकेत होता, ना करंट विषयावर बोलायच्या मूडमध्ये! स्वतःचे बूड स्थिरस्थावर करून तो म्हणाला, “अरे यार, मी काल एक स्वप्न बघितले.आणि त्या स्वप्नात एक भूत!”
आम्ही तिघांनीही एकदम एकमेकांकडे पाहिलं. पाटणकरचे स्वप्न म्हणजे एक शुद्ध आणि स्वच्छ थाप असणार असे आम्हा तिघांना एकाच क्षणी वाटलं असा वे. पण दुसऱ्याच क्षणी रोजच्या, करोना भूताच्या चावून चोथा झालेल्या विषयापेक्षा पाटणकरच्या स्वप्न नगरीत जायचे आम्ही तिघांनी ठरवले.
“अरे पाटणकर रात्रभर पाहिलेले स्वप्न एक तासात सांगून पूर्ण होणार का? माझा खोचक प्रश्न त्याला विशेष आवडला नाही. “नाही म्हणजे तीन तासाचा पिक्चर पण त्याची स्टोरी सांगायला तुला सहा,साडे सहा तास लागतात म्हणून म्हटलं, ”मी माझी सफाई दिली.
“अरे ऐका रे” त्याने दटावले. स्वतःच्या स्वप्न सफरीवर आम्हाला न्यायला तो उतावळा झाला होता.
करोनामय वातावरण रंजक होईल म्हणून आम्ही ही त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 10 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
अंदमानच्या त्या रमणीय प्रवासाने माझ्या नृत्याच्या क्षेत्रात आणि माझ्या आयुष्यातही मानाचा शिरपेच खोचला गेला. अंदमान हून परतल्यानंतर मला ठिकठिकाणी नृत्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे येऊ लागली. अनेक छोट्यामोठ्या ठिकाणी अगदी गल्लीबोळातून सुद्धा मी माझे नृत्याचे कार्यक्रम सादर केले आणि माझ्या परीने सावरकर विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. माझी ती झेप आणि प्रयत्न खारुटीचा असला तरी माझ्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात आनंद निर्माण करणारा होता. माझ्या या जिद्दीची दखल मिरजकर यांनी सुद्धा घेतली आणि 2011 च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या मिरज महोत्सवांमध्ये “मिरज भूषण” हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केले.
अपंग सेवा केंद्राच्या संस्थेने मला “जीवन गौरव” हा पुरस्कार देऊन पुरस्कृत केले. मी शिकत असलेल्या कन्या महाविद्यालयात “मातोश्री” हा पुरस्कार देऊन माझ्या विशेष सन्मान केला.
माझा नृत्याचा हा सुवर्णकाळ सुरू असताना माझ्या गुरु धनश्री ताई यांच्या मनामध्ये वेगळाच विचार सुरू होता. त्यांना केवळ एवढ्यातच मला समाधानी ठेवायचे नव्हते. त्यांचा विचार ऐकून मला केशवसुतांच्या कवितेच्या ओळी आठवल्या, “खादाड असे माझी भूक, चकोराने मला न सुख कूपातील मी नच मंडूक, मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला हे साहे. ”
आणि ताईनी मला भरत नाट्य घेऊन एम ए करण्याविषयी चा विचार माझ्यासमोर मांडला. ज्याला मी सहजच होकार दिला. कारण ताईंना अगदी प्राथमिक स्वरूपातली आणि नृत्याच्या वर्गात छंद म्हणून नृत्य करणारी मुलगी नको होती तर त्यांना माझ्यातून एक प्रगल्भ, परिपक्व आणि विकसित झालेली नर्तिका हवी होती कि जिच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य “भरतनाट्यम” या प्रकाराचा प्रचार आणि प्रसार योग्यरीतीने सर्वत्र केला जावा.
ताइनी केवळ प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि स्वतःच्या मनावर अवलंबून न राहता त्यांनी माझे नृत्य त्यांच्या गुरु सुचेता चाफेकर आणि नृत्यातील सहकारी वर्ग यांच्यासमोर सादर करून, त्यांच्याकडून पोच पावती मिळवली आणि मला एम ए करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला.
☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
सईचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले . पळत लांब निघालेल्या त्या स्त्रीला तिने मनापासून आश्वासन दिलं, आणि त्या क्षणी त्या तान्हुलीची जणू खरीखुरी आई झाली ती.–
हॉर्न वाजला तशी सई भानावर आली. हळूच डोळे पुसत ती सलोनीला अलगद हातात धरून गाडीत बसली. अगदी शांत गाढ झोपलेली त्यांची छकुली—दोघेही एकटक तिच्याकडे पहात राहिले होते काही वेळ, आणि मग निघाले—सलोनीच्या घरी—त्यांचा हा निर्णय सासर -माहेरच्या सगळ्यांनीच मनापासून स्वीकारला होता. त्यामुळे घरी सलोनीचं जोरदार स्वागत झालं.
आणि मग एखादी कळी अलवार उमलावी, तशी सलोनी हळुवार उमलत गेली–आणि हे दोघं तृप्त होत राहिले. घरात कशाचीच वानवा नव्हती. ती अगदी लाडाकोडात वाढत होती. तिला हवं ते शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि आता शिक्षण उत्तमरित्त्या पूर्ण झालं होतं–बघताबघता ती लग्नाला आली होती .
तिला अठरा वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हाच मानसोपचार-तज्ञांच्या सल्ल्याने आणि मदतीने, सई आणि सचिन तिचे खरे आईवडील नसल्याचं तिला योग्यप्रकारे सांगितलं होतं. अशावेळी अशी बहुतेक मुलं, आपण ज्यांना आईवडील म्हणत आलोय, ते आपले खरे जन्मदाते नाहीत, आणि खरे आईवडील कोण हे कुणालाच माहिती नाही, हे पचायला अतिशय अवघड असं कटुसत्य कळल्यावर प्रचंड बिथरतात, विचित्र, बेताल वागायला लागतात हे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं–आणि दोघांनाही त्याचंच प्रचंड टेन्शन आलं होतं. सलोनी आपल्याला दुरावणार तर नाही ना, या भीतीने मने धास्तावली होती. पण तिला कधीतरी हे कळणं गरजेचं होतं. आजपर्यंत इतर कुणी भोचकपणाने तिला हे सांगितलं नव्हतं ही त्यातल्यात्यात जमेची बाजू होती. सलोनीला सत्य कळताच तीही अपेक्षेप्रमाणेच वागायला लागली होती. ७-८ दिवस त्या दोघांशीही अजिबात बोलली नव्हती. पण डॉक्टरांचं कॉन्सेलिंग प्रभावी ठरलं आणि एक दिवस उठल्याउठल्याच रडत येऊन ती सईच्या गळ्यात पडली. हमसून-हमसून रडली. मग हळूहळू शांत झाली. तिच्या मनावरचं मळभ दूर झाल्याचं जाणवत होतं. — ”आई, मला पटलंय — मला जन्माला कुणीही घातलं असलं तरी माझे खरे आई-बाबा तुम्हीच आहात आणि तुम्हीच रहाल . तुमचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे मला माहितीये . आणि माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही सोडून दुसरे कोणी माझे आई-बाबा असूच शकत नाहीत.” —आणि सगळ्यांच्याच मनाचा बांध फुटला. त्या क्षणी तिघांमध्येही एक समृद्ध घट्ट नातं नव्याने जन्माला आलं. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तिला आश्रमातून आणतांना झालेला आनंद मोठा, की हा या क्षणाचा आनंद मोठा ,हा प्रश्नच निरर्थक ठरला असता. —-आणि आता बघताबघता सलोनी लग्न करण्याइतकी मोठी झाली होती. तिचा तिनेच जोडीदार निवडला होता—अतिशय डोळसपणे. उत्तम स्थळ होतं . मुलगा अमेरिकेत जॉब करत होता. –आणि लग्न आता अवघ्या चार दिवसांवर आलं होतं .लग्नानंतर अर्थातच ती अमेरिकेला जाणार होती—यापुढे सलोनी दुसऱ्या कुणाचीतरी होणार या विचाराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं –आणि आज इतक्या वर्षांनी अचानक तिला ती बाई आठवली— झाडामागे लपून का होईना, स्वतःच्या मुलीला शेवटचं बघण्यासाठी आसुसलेली– इतक्या दुरून तिला आशिर्वाद देणारी–मनावर कायमचा दगड ठेवून तिथून लांब पळत गेलेली—– सईला प्रकर्षाने जाणवलं —–त्या बाईला समाजाने लाथाडलं होतं , आणि आपण अतिशय सन्मानाने जगत आहोत, हा जमीन-अस्मानाचा फरक दोघींमध्ये असला, तरी दोघींमधली आई अगदी एकसारखीच तर आहे—–दोघींच्या भावनाही त्याच–कासाविशी तीच– आणि मुलीच्या विरहाने मनाला होणाऱ्या वेदनाही त्याच——पण कदाचित तिच्या या सगळ्या भावना जरा जास्तच तीव्र होत्या-असतील, कारण ती तर आयुष्यात पुन्हा कधीही तिच्या मुलीला दुरूनही पाहूसुद्धा शकणार नाहीये. पण माझं तसं नाही——सईला प्रकर्षाने जाणवून गेलं ….
☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
\सई आणि सचिन, दोघांचीही गेले ४-५ महिने नुसती धावपळ चालली होती. मुहूर्त काढून झाल्यावर, त्या दिवशी त्यांना हवं ते कार्यालय उपलब्ध आहे म्हटल्यावर, तातडीने त्यांनी ते बुक करून टाकलं….. आणि त्यांची खरी लगबग सुरु झाली. देणं-घेणं, मानपान हा प्रश्न व्याह्यांनीच निकालात काढल्याने मोठं टेन्शन कमी झालं होतं. पण इतर कितीतरी खरेदी, दागदागिने, घरात लागणारं सामान, पूजेची तयारी, घर-सजावट, आणि आमंत्रणांची यादी — मग आमंत्रण-पत्रिकेचे सिलेक्शन —–कामांचा नुसता डोंगर उभा होता. पण दोघांचं बऱ्याच बाबतीत एकमत झालं होतं. आणि ठरवल्यानुसार एकेक काम हातावेगळं होत राहिलं. बघता-बघता आमंत्रणं करून झाली. फराळाची ऑर्डरच दिलेली होती. जवळच्या माणसांना द्यायच्या भेटवस्तूंचं पॅकिंग करून तयार होतं. स्वयंपाक-वरकाम यासाठी आणखी दोन बायका आठ दिवसांपासून यायलाही लागल्या होत्या. घराची सजावट करणं सुरु झालं होतं. कार्यालयात न्यायाच्या बॅगा भरून तयार होत्या—-म्हणजे झालीच होती की सगळी तयारी—- बघता-बघता देवदेवकाचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला होता. लेकीचा विरह होणार या विचाराने अस्वस्थ होण्यासाठीही इतके दिवस वेळ मिळाला नव्हता सईला—पण आज- आत्ता मात्र फक्त तेवढी एकच जाणीव मनाला सलत होती–आणि तिला तान्ही सई आठवली.
—-सलोनी—-किती गोड आणि साजरं नाव सुचलं होतं त्यांना तिच्यासाठी. ती तान्हुली होतीही तशीच गोड-गोंडस-हसरी, गव्हाळ वर्ण, गालावर पडणारी खळी, आणि अतिशय आकर्षक असे पाणीदार बोलके डोळे–पहाताक्षणीच दोघांनाही खूप आवडली होती ती. आता आणखी बाळे बघायचीच नाहीत हे ठरलं. आश्रमाच्या व्यवस्थापकांना त्यांनी निर्णय सांगून टाकला. कायदेशीर बाबींची पूर्तता झाली, आणि कोजागिरीला ते तिला आणायला गेले. मनात संमिश्र भावनांची खूपच दाटी झाली होती— भीती-दडपण-उत्सुकता-हुरहुर- आणि त्यातच तिच्या खऱ्या आईबद्दल मनापासून वाटणारी कणव— पोटाची पोर कुठल्या अनोळखी लोकांच्या हातात कायमची पडणार आहे, हे त्या माऊलीला कळणारही नव्हतं– आश्रमाची अटच होती तशी.
गेल्यागेल्या तिने त्या मुलीला उचलून नकळत छातीशी धरलं, आणि त्याक्षणी मनातले सगळे विचार जणू कायमचे हद्दपार झाले. ती तान्हुलीही लगेच तिला बिलगली. सईचा ऊर दाटून आला. तिने पटापटा तिचे मुके घेतले. तिच्यासाठी नेलेलं नवीन झबलं-टोपलं स्वतःच्या हाताने तिला घालतांना मन आनंदाने फुलून गेलं होतं तिचं. येतांना दोघे आलेले ते, आता कायमसाठी ‘तिघे’ झाले होते. एक वेगळीच उभारी घेऊन ते बाहेर पडले. मेनगेटपाशी पोचताच सई सलोनीला घेऊन तिथेच थांबली, आणि सचिन गाडी आणायला गेला. काहीही काळात नसलेल्या त्या छोटीशी सई सारखी बोलत होती—’ ती बघ पमपम — आवडली? आणि ते बघ- त्याला झाड म्हणतात– केवढं मोठ्ठ आहे ना? आणि हिरवं हिरवं गार–’ –अचानक तिची नजर त्या झाडामागून डोकावणाऱ्या दोन डोळ्यांनी वेधून घेतली– आसुसलेपणाने ते डोळे त्या मुलीकडे बघत होते. त्यातून टपटप अश्रू ओघळत असल्याचं सईला लांबूनही जाणवलं. तिने झाडाच्या दिशेने पाऊल उचलताच एक बाई हळूच बाहेर डोकावली—बरीच ठिगळं लावूनही कसंबसं अंग झाकणारी साडी, विस्कटलेले केस, कसलीच रया नसलेलं अशक्त शरीर—’पुढे येऊ नका’ असं तिने हातानेच सईला खुणावलं –तिथूनच कानशिलावर बोटं मोडत पोरीची दृष्ट काढली–हात उंचावून ‘छान-छान’ अशा खुणा करत पोरीला आशिर्वाद दिला, आणि झटदिशी मागे वळून, पळतच ती दिसेनाशी झाली. सईच्या मनात प्रचंड कालवाकालव झाली—-’ती आई असेल का हिची? किती काय काय भाव झरझर सरकत गेले होते तिच्या चेहेऱ्यावर–पोटच्या गोळ्याला असं वाऱ्यावर सोडून देतांना नक्कीच मेल्याहून मेल्यासारखं वाटलं असणार तिला. तिचे डोळे मात्र बरंच काही व्यक्त करून गेले होते तिचे—- लेकीला लांबून का होईना,एकदा तरी बघायला मिळालं याचा आनंद– पुन्हा कधीही ती दिसणार नाही याचं अपार दुःख– आणि एक अनामिक समाधान. एकदा आपल्या बाळाला त्या आश्रमाच्या दारात ठेऊन आलं की आयुष्यात पुन्हा कधीही तिच्यासमोर यायचं नाही, हा कडक नियम माहीत असूनही,आपल्या मुलीला कुणीतरी दत्तक घेतंय याचा सुगावा लागताच आज दुरून का होईना तिला शेवटचं पहाता यावं म्हणून तिने हे फारच मोठं धाडस केलं होतं—–
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
विकासला ऑफिसमधल्या एका बाईचा कामासाठी फोन आला.
“सांभाळ ग बाई. तुझ्या नव-याला बायकांचे फोन येत असतात. त्यातून तू दिसायला ही अशी!”
यावर हसावं की रडावं, हेच मला कळेना.
“आता माझंच बघ ना. मी एवढी देखणी असूनही साहेब बाहेरगावी जाताना कोणालातरी घेऊन जातात. तिच्याविषयी जास्त चौकशी केली, तर वस्सकन माझ्या अंगावर येतात.”
“नेहमी एकाच बाईला घेऊन जातात?”
“नाही. नेहमी वेगवेगळ्या बायका असतात. खूप बायका आहेत त्यांच्या ऑफिसात. कधी कधी पुरुषसुद्धा जातात बरोबर. आता अमेरिकेला गेलेत, ते बरोबर एक बाई आणि दोन पुरुष आहेत, असं ऐकलं.”
“अगं, कामाच्या संदर्भात जात असतील ना त्या बायका. त्यांचे वाईट संबंध असतील कशावरून?”
“…….”
“तसं मलाही जावं लागतं बरेचदा बाहेरगावी.”
“पुरुषाबरोबर? आणि विकासला चालतं ते?”
“न चालायला काय झालं? ऑफिसमधल्या लोकांशी आमचे संबंध मैत्रीचेच असतात आणि बाई काय, पुरुष काय, कोणीतरी बरोबर आहे म्हटल्यावर विकास निर्धास्त असतो.”
“म्हणजे ह्यांचंपण असंच असेल का ग?”
“हो ग. तेही कामापुरताच संबंध ठेवत असतील त्यांच्याशी. उलट तूच काहीतरी बडबडून त्यांच्या मनात काहीबाही भरवून देऊ नकोस.”
मग ताई गंभीरपणे विचारात बुडून गेली.
तवा गरम आहे, तोवर पोळी भाजून घ्यायला हवी होती.
“एक सांगू तुला, ताई? मी लहान आहे तुझ्यापेक्षा. पण जग जास्त बघितलंय मी. म्हणून तुला सांगावंसं वाटतं आणि तसंही,माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही तुला या गोष्टी सांगणारं.”
ताई अजूनही गंभीर होती. तिने मानेनेच ‘बोल’ म्हटलं.
“सौंदर्य, देखणेपणा या गोष्टी त्या त्या वयाच्या असतात. जन्मभर पुरत नाहीत त्या. अर्थात तुला दिली तशी त्यांनी साथ दिली, तर उत्तमच. पण फक्त त्यावर अवलंबून राहू नकोस. त्या शरीराच्या आत दडलेलं मन जास्त महत्त्वाचं असतं. मला माझ्या लहानपणीची ताई आठवते. माझ्यावर माया करणारी, माझी काळजी घेणारी, मला सांभाळून घेणारी. तुझं लग्न झालं आणि माझी ती ताई हरवूनच गेली. तिला शोध. ती भावोजींना आणि सलील-समीपला जास्त आवडेल.”
“हो?”
“नक्कीच. आणि मग तुला आलेला हा एकटेपणा जाणवणारी ही असुरक्षितता संपून जाईल.
आपण लहान असताना भावोजींएवढे श्रीमंत नव्हतो. पण आपल्याला आईबाबांनी कसलीच ददात भासू दिली नाही. अगदी लाडात वाढवलं आपल्याला. तशा तेव्हा आपल्या मागण्या, आपले हट्टही फारसे नसायचे म्हणा…….शिवाय आता तुला वाटते आहे, तशी असुरक्षितता कधीच जाणवली नाही आपल्याला. ”
ताई काहीच बोलली नाही.
“बघ. विचार कर यावर आणि दुसरं म्हणजे, तसं होणार नाही. पण समजा,तुझ्यावर घर सोडायची पाळी आली, तर स्वत:ला निराधार समजू नकोस. तुझं हे माहेर तुझ्यासाठी कायम उघडं असेल. मी -आणि हो,विकाससुद्धा- तुला कधीच अंतर देणार नाही….. तू झोप आता. मी मागचं आवरून येते.”
रात्री झोपायला आले, तेव्हा ताईचा चेहरा शांत,समाधानी वाटत होता. माझी चाहूल लागताच तिने डोळे उघडले.
“तुला गंमत सांगू? त्या दिवशी आपण त्या कुठच्या मॉलमध्ये गेलो होतो. त्याच्याशेजारी त्या उंच बिल्डिंग होत्या बघ. फ्लॉरेंझा हाइट्स का काय त्या. तो पत्ता सांगू या ड्रायव्हरला. त्याला वाटेल, तू तिथेच राहतेस म्हणून मला तिकडे नेऊन सोड तू. -असं मी तुला सांगणार होते. पण आता नाही सांगणार तसं. आता हाच पत्ता अभिमानाने सांगणार. तुझा खराखुरा पत्ता. शून्यातून निर्माण केलेल्या विश्वाचा.”
‘माझी ताई हळूहळू डोकं वर काढतेय म्हणायची.’
“दुसरं म्हणजे, मी आणखी थोडे दिवस राहते इकडे. तू त्या इंग्रजीच्या शिकवणीचं बघ. ”
“अरे वा! ताssई! तू मनावर घेतलंस ना, तर लगेच शिकशील तू. आपण घरात इंग्लिशमध्येच बोलूया. तुला प्रॅक्टिस होईल चांगली आणि कॉन्फिडन्स येईल. म्हणजे युएस रिटर्न्ड साहेबांच्या स्वागताला फाडफाड इंग्लिश बोलणारी मड्डम.”
ताई हसायला लागली.खदखदून. आणि मला माझं कौतुक करणारी, माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी माझी ताई सापडली.
☆ जीवनरंग ☆ सांताक्लॉज (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
सांताक्लॉजला बघताच गरीब वस्तीतल्या त्या सगळ्या मुलांमध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. काही क्षणात तिथल्या सगळ्या मुलांच्या हातात सुंदर सुंदर भेटी होत्या. बिल्लूने मात्र या भेटी घेण्यास नकार दिला. सांताक्लॉजने अतिशय प्रेमाने विचारले, `बेटा तुला या भेटी का नकोत? काय कारण? तुला हवय तरी काय?’
बिल्लू अतिशय भोळेपणाने म्हणाला, `मला भेटवस्तू नकोत. त्यापेक्षा तुम्ही मला सांताक्लॉजच करा ना!’
सांताक्लॉज बनलेल्या पीटरने विचारले, `बेटा, इतक्या चांगल्या भेटी सोडून तुला सांताक्लॉज का व्हावसं वाटतय?’
बिल्लू प्रथम गप्प बसला, पण पीटरने पुन्हा पुन्हा विचारले, तेव्हा तो म्हणाला, `अंकल मी गरीब आहे. मला खूप थंडी वाजते. मी डोक्यापासून पायापर्यंत लोकरीचे कपडे कधी घातलेच नाहीत. फक्त त्यासाठीच…’
मूळ कथा – ‘सांता क्लॉज’ – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
“ताई, तुला आठवतं? आपण लहानपणी आई-बाबांबरोबर मुंबई बघायला आलो होतो…….”
“मला लहानपणचं काही सांगू नकोस. मी विसरलेय सगळं.”
“असं थोडंच विसरता येतं मागचं?” मीही हट्टालाच पिटले होते.
“मी प्रयत्नपूर्वक विसरलेय ते. मला पुन्हा आठवायला लावू नकोस.”
“असं काय वाईट होतं ग तेव्हा?”
“ते एवढंसं घर. बाबांचा तुटपुंजा पगार……”
“पण आपण तर समाधानी, सुखी होतो ना?”
“कारण आपल्याला मोठं घर, भरपूर पैसा म्हणजे काय असतं, तेच माहीत नव्हतं ना तेव्हा. तुला ठाऊक आहे? माझ्या सासरच्या बायका मला कमी लेखायची एकही संधी सोडायच्या नाहीत. माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण, माहेरची बेताची परिस्थिती…. खूप अपमान करायच्या त्या. मग साहेब माझी समजूत घालायचे-तुझ्या रूपावर जळतात त्या. म्हणून तर मी माझ्या दिसण्याची एवढी काळजी घ्यायला लागले. तेवढी एकच तर गोष्ट होती माझ्याकडे. दुसरं म्हणजे…. ”
बोलू की नको ,असा विचार करून मग तिने सुरुवात केली.
“साहेबांच्या सुलभाकाकी आहेत ना-. आहेत म्हणजे होत्या. गेल्या बिचा-या पाच-सहा वर्षांपूर्वी. तर काय सांगत होते, त्या काकांनी एक बाई ठेवली होती. ते तिला घेऊन दुसरीकडे घर करणार होते; पण त्यांच्या आईंनी सांगितलं-इथेच राहू दे तिला. मग काय , ती घरातच राहायला लागली.
सासूबाई सांगायच्या ना, त्या सुलभाकाकी रोज रात्री नटूनथटून बसायच्या नव-यासाठी. पण काका, त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता त्या बाईच्या खोलीत जायचे. मग सुलभाकाकी सगळं विसकटून टाकायच्या .बिचा-या!
मला नेहमी भीती वाटायची, म्हणजे अजूनही वाटते, माझ्यावर तशी पाळी आली तर?”
“पण हे घरातल्या इतर बायकांच्या बाबतीतही घडू शकलं असतं की.”
“त्यांच्या बाबतीत घडलं असतं, तर त्यांच्या माहेरचे आले असते जाब विचारायला आणि तशीच वेळ पडली असती, तर त्यांना माहेरी घेऊन गेले असते. एकेकीची माहेरं बघशील तर अशी श्रीमंत आहेत ,माहीत आहे? सुलभाकाकीचं माहेर मात्र माझ्यासारखं. फाटकं.
म्हणून तर सासूबाई मला सांगत राहायच्या-‘डोळ्यांत तेल घालून जप नव-याला.”
मला आतापर्यंत ताईचा राग येत होता पण आता मात्र दया येऊ लागली तिची.