☆ “ द अल्टिमेट इन्व्हेस्टर” – लेखक : आशिष मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : द अल्टिमेट इन्व्हेस्टर “…
गोष्ट जन्मजन्मांतरीची
जन्मजन्मांतरीच्या वैचारिक गुंतवणूकीची गोष्ट
लेखक : आशिष मुळे
प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे
काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की काही अवांतर वाचन करणे शक्य नव्हते. त्यानंतर वाचनासाठी वेळ उपलब्ध झाला. पण वाचायचे इतके राहिले होते की कुठून सुरुवात करावी हे समजानेसे झाले होते. त्यामुळे आवडीचा विषय–कविता– आणि त्यासंबंधीचे साहित्य वाचायला घेतले. पण बरेच वर्षे कादंबरी मात्र वाचनात आली नव्हती. आणि अचानकपणे एक नवी कोरी कादंबरी हातात आली. कादंबरीही नवीन आणि लेखकही नवीन. तरीही ती वाचण्याचा योग येईना. अखेर काही दिवसांपूर्वी वाचून झाली. मात्र मनाला एक गोष्ट पटेना. ती म्हणजे लेखकाची म्हणजे श्री. आशीष मुळे यांची ही पहिलीच कादंबरी आहे. एखाद्या अनुभवी लेखकाने कथानक गुंफत जावे, नवीन पात्रे त्यात वाढत जावीत, मूळ कथानकाशी एकरूप व्हावीत आणि कथानक अगदी शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारे होत जावे… ही भट्टी नव्या लेखकाला जमू शकते हे आशिष यांनी दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी संपूर्ण कथानकाचा आवाका आणि त्यातून व्यक्त करायचा असलेला आशय प्रथम लेखकाच्या मनात स्पष्ट असायला हवा. श्री आशिष मुळे यांना ते साधले आहे याबद्दल शंका नाही.
श्री आशिष मुळे
खरं तर ही एक कादंबरी नसून एकात एक गुंफलेल्या दोन कादंब-या आहेत. एकीकडे राघव आणि सायली, शिरीन यांची कथा आणि त्याच वेळेला हळूहळू फुलत जाणारी निम आणि नादिया यांची कथा. दोनही कथानकांना पोषक असे वातावरण, त्यानुसार पात्र निर्मिती आणि त्याला उचित ठरेल अशी भाषाशैली… त्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. शिवाय निसर्ग, शहरी वातावरण, हिमालयाचे वर्णन, संवादाची भाषा या बाबतीत अचूकता आहे आणि या सगळ्याला आध्यात्मिक विचारांची असलेली किनार! दोन्ही कथानकांमध्ये समतोल साधून मूळ सूत्र सुटू न देता कथानक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
आवश्यक त्या ठिकाणी गंभीरपणे व्यक्त केलेले विचार हे लेखकाच्या परिपक्व विचारांचे प्रतिबिंब आहे. उदाहरणार्थ, सागराला उद्देशून काढलेले उद्गार पहा :
“माणसाचा दुराभिमान आणि अहंकार क्षणात नाहीस करण्याचं आणि त्याच्या क्षुद्रपणाची जाणीव करून देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे “. किंवा
“आदमी बादशाह नहीं है, वक्त बादशाह है |” हे वाक्य.
तर दुसरीकडे, ‘ दारुडा माणूस सगळं विसरत असला तरी स्वतःच्या घरी व्यवस्थित कसा काय पोचतो? ” असा मजेशीर पण खरा प्रश्न त्यांना पडतो. पुढे बिलावाला यांच्या मृत्यूच्या प्रसंगी राघवच्या तोंडी आलेले
“मृत्यू थांबवण्याचं काम विज्ञान करु शकत असेल पण मृत्यू टाळण्याचं नाही. ” हे वाक्य आपल्याला नकळत एका सत्याची जाणीव करून देते. इनव्हेस्टसंबंधी ‘ बेसीक रुल ‘ राघवच्या तोंडून सांगताना लेखकाच्या अंगभूत व्यावसायिक विचारांची दिशा दिसून येते. तसेच अध्यात्माविषयी आचार्यांनी मांडलेले विचार हे लेखकाच्या अध्यात्म विषयक चिंतनाचे प्रकटीकरण आहे हे जाणवते.
कादंबरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लेखकाने केलेले वर्णन, विवेचन, संवाद वाचल्यानंतर महाभारतातील पांडवांच्या अखेरच्या प्रवासाच्या वर्णनाची आठवण होते. या अखेरच्या लिखाणात दोन जन्मांची घातलेली
सांगड अत्यंत कठीण पण कौशल्यपूर्ण आहे. गुंतवणूक संबंधी असलेल्या आपल्या व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव, चिंतनशीलतेची जोड, मातोश्रींकडून आलेले लेखनाचे कौशल्य, जगण्याकडे पाहण्याचा चौकटी पलीकडचा दृष्टिकोन या सर्वांच्या घुसळणीतून मिळालेले ‘ रिटर्नस’ म्हणजे *द अल्टिमेट इन्व्हेस्टर.. गोष्ट जन्मजन्मांतरीची*.. असे म्हणणे उचित ठरेल असे वाटते.
अशाच वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रकाशक ~ सौ. अलका भुजबळ, न्यूज स्टोरी पब्लिकेशन्स
संपादक ~ श्री. देवेंद्र भुजबळ
निर्मिती ~ ग्रंथाली, माहीम, मुंबई
मुखपृष्ठ~ सौ राधिका भांडारकर (ए आयच्या सहाय्याने)
न्यूज स्टोरी टुडे या श्री देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेल्या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या सौ. राधिका ताई भांडारकर यांच्या *माझी जडणघडण* या लेखमालेच्या पहिल्या भागानेच मला जितके आक्रुष्ट केले तितकेच पोर्टलच्या सर्व वाचकांनाही केले. प्रस्तावनेत संपादकांनी सांगितल्याप्रमाणे या सदराचे ७८ भाग दीड वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झाले. एकेक भाग वाचताना वाचक त्यात इतके तल्लीन झाले होते की, सोमवार कधी उजाडतो आणि राधिका ताईंच्या जडणघडणीचा पुढील भाग कधी वाचावयास मिळतो असे सर्वच रसिक वाचकांना होऊन गेले होते. ही मालिका संपूच नये असेही आम्हा वाचकांना मनापासून वाटत होते.
सौ. राधिका भांडारकर
माझी जडणघडण हे पुस्तक म्हणजे लेखिकेचे आत्मचरित्र नव्हे, तर ते एक आत्मकथन आहे. आजवरच्या आयुष्यात तिच्या जीवनात अगदी बालपणापासून जी नानाविध माणसे आली, अनेक प्रकारचे जे अनुभव आले, त्यातून लेखिका कशी घडत गेली याचे एक सुंदर चित्र म्हणजे *माझी जडणघडण* हे पुस्तक असे या पुस्तकाविषयी एका वाक्यात सांगता येईल.
[ ] धोबी गल्ली या पहिल्याच माळेत लेखिका तिच्या बालपणातील काही रम्य, ह्रद्य अशा आठवणी सांगते. धोबी गल्लीतलं त्यांचं ते छोटसं घर, त्यांचा शेजार, बालपणीचे गल्लीतले सवंगडी या सर्वांविषयी वाचताना आपणही आपल्या बाल्यात अगदी सहज शिरतो आणि त्यातून पुनःप्रत्ययाचा आनंद आपल्या वाट्याला येतो. लेखिकेने *”आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं* ” अशी सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष जीवनात सगळ्यांचीच घरे बदलतात. लग्न होऊन सासरी गेल्यावर, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदल्यांमुळे, लहान घरातून मोठ्या घरात जाताना, इत्यादी विविध कारणांनी आयुष्यात घरे बदलण्याचा अनुभव प्रत्येकच वाचकाने घेतला असेल. ही गोष्ट मात्र सत्य आहे की आपल्या स्वप्नात नेहमी आपले पहिलेच घर दिसते. सांगायचा मुद्दा हा की सुरुवातीपासूनच वाचक लेखिकेच्या आयुष्यातील घटनांशी असा सहज जोडला जातो. हे कथन वाचताना, अरे माझीही कथा याहून काही फार वेगळी नाही असे वाटू लागते आणि त्यामुळेच पुढे वाचण्याची उत्कंठा वर्धित होते.
संस्कार बाल्यावस्थेतच होत असतात आणि त्यानुसार बालक हळुहळू घडत जाते. लेखिकेला नेमके हेच सांगायचं आहे. त्या म्हणतात की मोठ्यांचा मान ठेवणे, रीती परंपरा पाळणे, नम्रता, सत्य वदणे वगैरे हे संस्कार आहेतच पण याहूनही त्यांना वेगळे काही सांगायचे आहे. त्यांच्या मते संस्काराची व्याख्या, *”संस्कार म्हणजे स्वतः केलेले निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली- वाईट, भली- बुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रीतीने शोधणं. ते शोधता येण्याची क्षमता म्हणजे संस्कार. * ” अत्यंत प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांनी केलेल्या संस्कारांच्या या व्याख्येतून वाचकांना घडते.
शाळा, कॉलेज, त्यांची बँकेतील नोकरी यातून त्यांच्या आयुष्यात ज्या नानाविध स्वभावाच्या व्यक्ती आल्या त्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार सखोल निरीक्षण केले आहे. त्यातूनच अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे त्यांना ज्ञान मिळत गेले आणि आज ताठ मानेने उभ्या असलेल्या राधिकाताई घडल्या असे मला म्हणावेसे वाटते.
त्यांच्या विद्यार्थी जीवनातील अनेक रंगी किस्से वाचताना वाचक अगदी गुंगून जातो.
लेखिका जडणघडणीच्या एका प्रकरणात वाचकांना सांगते की माणसाला भांडता सुद्धा आलं पाहिजे, आणि हा धडा त्यांना त्यांच्या तीर्थ रूपांकडूनच मिळाला होता. त्या लिहितात, ” *एकीकडे शालिनीता, नम्र वाणी, शब्दातील गोडवा जपणे, कुणाला दुखावलं जाईल असे न बोलणे अशा तऱ्हेचे बोधामृत प्राशन करीत असताना मध्येच ‘ तुला उत्तम भांडताही आलं पाहिजे’ असं जेव्हा पप्पा सांगायचे तेव्हा या विरोधाभासाची नुसती गंमत नव्हे तर आश्चर्यही वाटायचं. ” कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही हीच शिकवण त्यांना लहान वयात मिळाली होती. याविषयी त्यांनी केवळ गणित वेगळ्या पद्धतीने सोडवल्यामुळे बाईंनी त्यांचे गणित चूक दिले, आणि लेखिकेने ती चूक नव्हती, ती कशी बरोबर होती हे बाईना पटवून दिले, हा किस्सा मनोवेधक वाटतो.
जीवनात या अशा बाळकडूची किती आवश्यकता असते याची जाणीव आज परिपक्व झाल्यावर वाचकांनाही नक्कीच आली असेल.
कुटुंबातील माणसे, मित्र-मैत्रिणी, शिक्षक वर्ग, भोवतालचा समाज, पुस्तके, रेडिओ या सर्वांचाच लेखिकेच्या जडणघडणीवर फार मोठा प्रभाव कसा आहे हे त्यांनी सांगितलेल्या एकेक रंगतदार किश्यांवरून, त्यांच्या अनुभवांवरून आपल्याला जसजसे वाचत जातो तसतसे उलगडत जाते. त्यांच्या आयुष्यातील काही खास व्यक्तींवर त्यांनी स्वतंत्र प्रकरणे या पुस्तकात लिहिल्याचे आढळून येते. यात त्यांचे वडील, जीजी, आजोबा, वहिनींसारख्या शेजारी, रत्नाकर मतकरींसारखे साहित्य गुरु, आप्पा, वासंती वगैरे लेखांना विशेष महत्त्व आहे.
जीजीचे (लेखिकेची आजी) स्थान लेखिकेच्या आयुष्यात अनमोल आहे, हे त्यांनी वर्णिलेल्या जिजीच्या व्यक्तिमत्वावरून आपल्या लक्षात येते. लहान असताना त्यांना त्यांच्या मोठ्या टपोर्या डोळ्यांवरून, त्यांच्या श्यामल वर्णावरून काही लोक हिणवीत असत, या गोष्टीचे त्यांना फार वाईट वाटायचे, परंतु त्यांची एक आजीच होती जी त्यांना “विठोबा सुद्धा काळाच होता” “तुझे डोळे तर तुझी ओळख आहे” असे सांगून त्यांच्या मनाला उभारी देत
असे. राधिकाताईंच्या जडणघडणीत जिजीचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. (राधिका ताईंचे जीजी हे जीजी चे जीवन कथा सांगणारे पुस्तक अवश्य वाचावे)
त्यांची हरवलेली लहान बहीण केवळ ढग्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डोळ्यांवरून विमलताई रांगणेकर या ठाण्यातील प्रसिद्ध समाजसेविकेने ओळखावी आणि हरवलेल्या मुलांना घरी घेऊन यावे, हा त्यांच्या आयुष्यातील प्रसंग खरोखरच अविस्मरणीय असा आहे.
त्यांना लहानपणी, ” श्रावण भेटायचा तो तोंड पाठ केलेल्या बालकवी, बा भ बोरकर, पाडगावकर, यांच्या कवितांतून. , ” श्रावण महिन्यातील एकेका सणांचे त्यांनी जगलेले क्षण फारच वाचनीय आहेत. हे वाचताना मला राधिका ताईंना *शब्दांची धनी* अशी संज्ञा द्यावीशी वाटते.
लग्न हे मुला मुलींच्या, विशेषतः मुलींच्या जीवनातील फार मोठे स्थित्यंतर असते. राधिकाताईंनीही हा अनुभव घेतला. आई-वडील आजी आणि बहिणी या छोट्याशा कुटुंबातून त्या लग्न होऊन मोठ्या कुटुंबात गेल्या, शहरी वातावरणातून अंमळनेर सारख्या ग्रामीण वातावरणात त्यांना मिसळायचे होते. माणसे निराळी, भोवतालचे वातावरण निराळे, उठण्या बसण्याची पद्धत निराळी, अशा परिस्थितीत त्यांचे या जडणघडणीतले एक एक अनुभव मनाला मोहवून टाकणारे आहेत.
लहानपणी आई-वडिलांकडून आणि विवाहानंतर सासू-सासर्यांकडून बरेच काही शिकत असतो हे त्यांचे मत आपल्याला पटते. राधिका ताईंच्या जीवनात त्यांच्या सासूबाईंचा वाटाही फार मोठा आहे. त्यांच्यावरचे खानदेशी संस्कार त्यांच्या सासूबाईंकडूनच झालेले आहेत.
राधिका ताई त्यांच्या आई या प्रकरणाची सुरुवातच ” मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले ” अशी करतात. लेखिका ही कोणी वेगळी आई नाही. आई झाल्यावर आईची वेगवेगळी रूपे त्यांना उलगडत गेली. सगळ्यात कठीण काळ म्हणजे मुलाला नोकरावर सोपवून कामाला जाणे. काय घालमेल होते जीवाची? प्रत्येकच वाचक आईचा हा अनुभव आहे. वाचताना भावूक व्हावयास होते.
जळगावला मांडलेला स्वतंत्र संसार, दोन मुलींचा जन्म, बँकेतील नोकरी, मुलींचे परदेश गमन, त्यांचे विवाह नातवंडे या सर्व गोष्टी एका मध्यमवर्गीय पठडीतल्या असल्या तरी वाचताना हे आपलेच जीवन आहे ही भावना निर्माण होते त्यामुळे ही जडणघडण आपलीच आहे या जवळिकतेने वाचनात आपण मग्न होतो.
खरं सांगायचं तर जडणघडणीच्या एक एक लेखा विषयी लिहावे तेवढे थोडेच आहे, परंतु सगळ्या ७८ भागांवर लिहिणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे. त्यापेक्षा वाचकांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि वारंवार वाचत जावे असा मला सल्ला द्यावासा वाटतो.
सौ. राधिका ताई या अतिशय दमदार अशा लेखकांपैकी एक आहेत. त्यांची प्रवाही भाषा वाचकांचे रंजन करते यात संशयाला जागाच नाही. वैशिष्ट्यपूर्ण शब्दप्रभुत्व त्यांच्यापाशी आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आतापर्यंत त्यांचे पाऊल, आंतर्बोल, लव्हाळी, गमभन, अंश इत्यादी अनेक कथा व ललित लेखांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांच्या जीजी या पुस्तकाला तितीक्षा पुरस्कारही मिळाला आहे.
या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिकेचे मला आणखी कौतुक करावेसे वाटते की त्या कालानुरूप चालणाऱ्या आहेत, अभ्यासू आहेत. त्यांना शेक्सपियर, कालिदास समजतो, तसेच आजची कृत्रिम बुद्धिमत्ताही(AI) समजते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी एआय च्या मदतीने स्वतः बनविले आहे.
राधिका ताई तुमचा हा लेखन प्रवास असाच अखंड चालू राहण्यासाठी माझे तुम्हाला अनेकोत्तम आशीर्वाद.
परिचय : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बालगंधर्व, ” ‘लोकमान्य’ टिळक आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात भूमिका केलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या सुबोध भावे यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या लेखांचा संग्रह..
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून आपण सुबोध भावे यांना ओळखतो. या पुस्तकाचे शब्दांकनकार अभय अरुण इनामदार आहेत.
प्रकाशकाच्या मनोगतात पुस्तक ‘उस्ताद’ असतात, जसं ‘उस्ताद’ ठरलेल्या वेळी रियाज करतात आणि शागिर्द समोर बसून ऐकतात. तसे हे पुस्तक व्यक्तीकेंद्रित न करता विचारकेंद्रित आहे..
पुस्तकाच्या अंतरंगात पाच विभाग केलेले आहेत..
पहिल्या विभागात सुबोध भावे यांनी त्यांची वैयक्तिक जडणघडण कशी झाली यावर भर दिला आहे. बालपणापासून पुण्यात वास्तव्य असल्यामुळे नाट्य, साहित्य क्षेत्र चांगले माहिती होते. लहानपणी शाळेत असताना नाटकात फारसा सहभाग घेतला नव्हता. परंतु कॉलेजला गेल्यानंतर रंगमंचावर त्यांचे मन रमले. कसं बसं कॉमर्स कॉलेज चालू होतं, पण नाटकात अधिक इंटरेस्ट होता. पुरुषोत्तम करंडक हा मानाचा करंडक कॉलेजला मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार होता. पुढे या क्षेत्रातच त्यांनी प्रगती केली. हळूहळू टीव्हीवरील मालिकांमध्ये प्रवेश केला. पुण्यात भरत नाट्यगृहाच्या कट्ट्यावर बसून नाटकाच्या चर्चा करणे चालू असे. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. जिच्याशी त्यांनी लग्न केले त्या मंजिरीने घराची बाजू सांभाळून धरली. आणि सुबोध भावे नाट्य-चित्रक्षेत्रात पूर्णपणे शिरले!
बालगंधर्वांची व्यक्तिरेखा साकार करताना त्यांना अनेक गोष्टींची जाणीव झाली. नाटकासाठी किंवा त्या सिनेमासाठी स्वतःची तब्येत योग्य कशी करावी लागते, व्यक्तिरेखेशी एकरूप होण्याच्या दृष्टीने त्यावेळेचा काळ, त्या व्यक्तीची वैशिष्ट्यं, त्याचं सादरीकरण या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते सुबोध भावे यांच्या पुस्तकांमधल्या लेखांवरून दिसून येते.
‘बालगंधर्व’ मधील स्त्री व्यक्तिरेखेसाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागले हे या पुस्तकात त्यांनी
विस्तृतपणे लिहिले आहे. लोकमान्य टिळकांची भूमिका करताना केस पूर्ण काढलेले आणि त्याचवेळी इतर कुठल्या सिनेमा नाटकाचे प्रयोग आले की होणारी कसरत त्यांनी छान व्यक्त केली आहे. “कट्यार काळजात घुसली” या सिनेमाबद्दल सुबोध भावे म्हणतात की, “हा सिनेमा म्हणजे माझी ध्येयपूर्ती होती. ” या सिनेमाबद्दल त्यांच्या मनात एक उदात्त भावना होती. ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमात शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांनी संगीताची बाजू सांभाळली. सचिन पिळगावकर यांनी खाॅ साहेबाची भूमिका साकारली. स्वतः सुबोध भावेंनी सदाशिवची भूमिका केली. या सिनेमाने सुबोध भावे यांना नावलौकिक मिळवून दिला.
लोकमान्य टिळकांची भूमिका करताना प्रथम त्यांच्या मनावर दडपण होते. लोकमान्य टिळकांची करारी, कणखर, भारदस्त व्यक्तिरेखा आपण साकार करू शकू की नाही, याबद्दल सुरुवातीला मनात भीती होती.. परंतु एकदा भूमिकेत झोकून दिल्यावर मनापासून काम करणे हे सुबोध भावेचे वैशिष्ट्य त्यातून व्यक्त होते.
एकंदर पुस्तक वाचताना असं जाणवलं की ‘ *बालगंधर्व* ‘, ‘ *लोकमान्य टिळक’* आणि ‘ *कट्यार काळजात* *घुसली* ‘ हे तीनही पिक्चर्स आपण बघितले आहेत. तेव्हाही ते आवडले होतेच, पण हे पुस्तक वाचल्यावर सुबोध भावेंच्या दृष्टिकोनातून ते पुन्हा पहावेत असा विचार मनात आला.
कोणत्याही भूमिकेसाठी कलाकाराला किती कष्ट करावे लागतात हे या सुबोध भावे यांच्या कथनातून दिसून येते. तसेच जे जे घडलं ते प्रांजळपणे वाचकांच्या समोर त्यांनी उलगडून दाखवलेले आहे आणि ते अधिक सच्चे आहे.
सुबोध भावे म्हणतात, ‘ हा पुस्तक प्रपंच सर्वांच्या सहकार्याने घडून आला. शौनक अभिषेकींमुळे शास्त्रीय संगीत आयुष्यात आले. गवयाची नजर मिळाली आणि माझ्या आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण टप्पा संगीतामुळे मला अनुभवता आला. ‘
सुबोध भावे मूळचे पुण्याचे, सदाशिव पेठी वातावरणात वाढलेले, स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेलेला कलाकार म्हणून आपल्या मनात त्यांना कौतुकाचे स्थान आहे. हे पुस्तक वाचल्यावर ते कौतुक अधिकच मनात उतरते. अवश्य वाचावे असे हे पुस्तक ‘घेई छंद’
हे पुस्तक म्हणजे “निरोप, पुनर्भेट आणि नवा जन्म मिळाला” या तीन विषयांचे सुंदर गुंफण!
“अंतरंगातील प्रवास “ हॆ इचलकरंजी येथील चित्कला कुलकर्णी यांनी संकलित केलेले एक सर्वांग सुंदर वाचनीय पुस्तक आहे. याचे मुखपृष्ठ आपल्याला खिळवून ठेवते. व्यक्तीच्या जीवनातील आणि निसर्गातील उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंची ओळख या चित्रातून आपल्याला मिळते. मनोरमा प्रकाशन ने प्रकाशित केलेले आणि माय मराठी आणि इचलकरंजी मायबोली लेखन, वाचन कट्ट्यास अर्पण केलेले हे पुस्तक सर्व सजग वचकांसाठीच आहे.
या पुस्तकामध्ये आपल्याला 57 लेख वाचायला मिळतात. प्रत्येक लेख आपल्याला वेगळा अनुभव नक्कीच देते. निरोप देता घेता या भागातील नावच आपल्याला त्यातील आशय सांगून जातो. चित्कला ताईंनी निसर्गाच्या सहवासात रमत उसळीसारख्या इवल्याशा गवताच्या निरोपाचे मन हेलावून टाकणारे भावस्पर्शी वर्णन मनाला थेट भिडते. शाळेचा, कॉलेजचा, मामांच्या निरोपाच्या नारळाची गोष्ट, इंग्लंड मधल्या इपस्वीच गावाचा लागलेला लळा आणि त्या गावाचा निरोप घेताना लेखिकेच्या मनाची झालेली घालमेल वाचून आपले हे डोळे ओलेते होतात. माहेरचा निरोप तर सगळ्यांनाच रडवतो. विनयाताईंनी या निरोपाचा उपयोग सासरी आल्यावर संसाराचे नंदनवन फुलवायला करायचा, हे सांगून निरोप सुखद केला आहे. अशा निरोपाचे वर्णन वाचताना वाचक आपल्याही आयुष्यातील निरोपाच्या आठवणींमध्ये रमून जातो.
पुस्तकातील पुनर्भेट या दुसऱ्या भागामध्ये, पुनर्भेटीच्या अनेक अनुभवांमध्ये वाचक ही रमून जातो. पहिल्याच लेखामध्ये नागपूरच्या प्रज्ञा ताईंनी पहिल्याच बोलला सिक्सर मारली आणि वाचकाला धो धो पावसामध्ये ओले चिंब केले. निसर्गाला अनुभवत श्रीकृष्ण चरणी अर्पणही केले. माझा बल्लव या लेखामध्ये दीपा ताईने सात पानी ” यादों की बारात “लिहून आपल्या मनाची घालमेल, दोन ध्रुवावर दोघे आपण, ही कातर उल घाल अशी वर्णन केली आहे की आपण त्यात पूर्ण समरस होऊन जातो. म्हणूनच नक्की सांगावेसे वाटते की प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. श्रीनिवास दादांनी “इन्ही लोगोने ” या गाण्याचे केलेले विश्लेषण मनाच्या तळापर्यंत नक्कीच पोहोचते.
या पुस्तकातील प्रत्येक लेखच मनाला थेट जाऊन भिडतो. किती आणि काय वर्णन करावे हे समजेनासे होते. वैजयंती ताईंनी अल्लडवयामध्ये वाचलेल्या व पु काळे यांच्या “पार्टनर ” पुस्तकाची पुनर्भेट उतार वयामध्ये कशी पटली हे फार सुंदर शब्दात गुंफले आहे.
आणि नवा जन्म मिळाला या पुस्तकाच्या तिसऱ्या भागांमध्ये 23 लेख वाचताना वाचकाचे भान हरपून जाते. साध्या सरळ आयुष्यामध्ये एखादी घटना किती हादरवून टाकू शकते हे वाचून आपला जीवही थरारून जातो. त्या थरारक अनुभवांमधून मिळालेले पुढील पेनल्टी आयुष्य अर्थातच कसे आनंदात, समाधानात जगले जाते हे वाचून वाचकही हुश्य केल्याशिवाय राहत नाही. यासाठी चित्कला ताईंची निवड, लेखक निवड, आणि सुंदर सुंदर लेख यासाठी त्यांना दाद ही दिलीच पाहिजे. नंदनजींचा निरोप छोटा लेख. पण कलाकार कुटुंबाची आठवण त्यांनी किती जपून ठेवले आहे हे समजते.
फिनिक्स या नावामधूनच डॉक्टर असूनही सुरुवातीपासून नाट्य क्षेत्रात नट म्हणून चमकणाऱ्या नागपूरच्या डॉक्टर विजय या चमकणाऱ्या ताऱ्याचे मेडिकलच्या पहिल्याच वर्षी अपघाती हादऱ्याने आयुष्यातील भयानक परिस्थितीला कुटुंबाने कसे तोंड दिले हे वाचून खरोखरच मिळालेल्या पुनर्जन्माचे सार्थक त्यांनी केले हे समजून येते.
इचलकरंजीच्या डॉक्टर सुरेश यांनी वंध्यत्वाचे स्त्रियांवर होणारे मानसिक परिणाम आणि त्या समस्यांमधून त्यांची सुटका करून त्या कुटुंबाला मिळवून दिलेला आनंद खूप छान वर्णन केला आहे. त्या कुटुंबाला आईला आणि बाळाला नवा जन्म देण्यामध्ये डॉक्टर निश्चितच यशस्वी ठरले आहेत.
कैलास दर्शनाचा सुमुख यांचा सुखद अनुभव प्रभाताई यांनी कुशलतेने लिहिला आहे. गाभाऱ्यातल्या कारुण्य सिंधूचे दर्शन घेणारा शब्द गोठलेला मी केवळ सूक्ष्म मानवी बिंदू झालो होतो जणू! या मधूनच या यात्रेची सार्थकता आपल्यापर्यंत पोहोचते.
हर्षदा ताईंना आलेला भयानक अपघाताचा अनुभव वाचून मनाचा थरकाप होतो. पण त्यांच्या मनामध्ये इनरव्हील सेवा रुजल्यामुळे त्यामधून किती मोठे समाजकार्य पुढील आयुष्यात घडले हेही समजते जे खूप वाचनीय आहे.
घरच्या जर्मन शेफर्ड च्या हल्ल्याने घडलेला थरकाप तो प्रसंग स्मिता ताईंनी खुबीने रेखाटला आहे. त्या प्रसंगाचे परिणाम वाचताना वाचकही भीतीने थरारून जातो.
एकीची समाजसेवेची आवड गृहिणी असूनही या कार्यामध्ये झोकून देऊन कसे कार्य करते, केले हे अनुपमा ताईंनी थोडक्यात शब्दात छान सांगितले.
फक्त या भागातलेच नाहीत तर सर्व पुस्तकांमधले सर्वच लेख अप्रतिम! प्रत्येक लेखांमधून खूप काही शिकायला मिळते. सगळे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. पुस्तक वाचायला घेतले की पूर्णत्वाला नेल्याशिवाय खाली ठेववतच नाही.
चित्कला ताईंचे मार्गदर्शन, सर्व लिहित्या हातांचे प्रयत्न, वैचारिक मनाचे स्पंदन असलेले ” अंतरंगातील प्रवास ” पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचलेच पाहिजे.
चित्कलाताई, आणि त्यांच्या सर्व टीमला नवोदित उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
परिचय : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
☆ “इस्त्रायल हमास हिजबुल्लाह” – लेखक : श्री रोहन अंबिके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : इस्रायल हमास हिजबुल्ला
– – – एक अविरत संघर्ष
लेखक : रोहन अंबिके
पृष्ठः २००
मूल्य: ३००₹
आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सतत चालू असलेल्या संघर्षांपैकी एक म्हणून इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्षाकडे पाहता येईल. हा संघर्ष खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक शत्रुत्व, विचारधारा आणि उदयास येत असलेल्या जागतिक युतींमुळे प्रभावित झाला आहे.
‘इस्रायल-हमास-हिजबुल्लाह’ हे पुस्तक या संघर्षाची सुरुवात, निर्णायक लढाया आणि त्याचे दूरगामी परिणाम यांचे सखोल विश्लेषण करते.
हे पुस्तक ऑक्टोबर २०२३ च्या युद्धाचे परीक्षण करते. हा एक असा निर्णायक टप्पा होता ज्याने या संघर्षाला एक नवीन दिशा दिली. त्याचबरोबर समकालीन युद्धतंत्रात सोशल मीडियाच्या वाढत्या भूमिकेचाही आढावा घेते. जिथे करण्यात येणारा प्रचार आणि दिशाभूल करणारी माहिती जागतिक कथानकांना आकार देत असतात. हे पुस्तक भारताच्या बदलत्या भूमिकेवरही प्रकाश टाकते, ज्यात ऐतिहासिक संबंधांपासून ते अधिकच ध्रुवीकरण झालेल्या जगातील राजनैतिक उपक्रमांपर्यंतच्या बाबींचा समावेश आहे.
सखोल संशोधन केलेले आणि सूक्ष्म बारकावे असलेले ‘इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह’ हे पुस्तक केवळ बातम्यांच्या मथळ्यांपुरते मर्यादित राहत नाही. तर ते जागतिक भू-राजकारणाला सतत आकार देणाऱ्या या युद्धावर अधिक अभ्यासपूर्ण दृष्टिक्षेप टाकणारे ठरले आहे.
आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सतत चालू असलेल्या संघर्षांपैकी एक म्हणून इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्षाकडे पाहता येईल. हा संघर्ष खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक शत्रुत्व, विचारधारा आणि उदयास येत असलेल्या जागतिक युतींमुळे प्रभावित झाला आहे.
पुस्तकाचे मुख्य विषय व वैशिष्ट्ये
इस्रायल या ज्यू राष्ट्राची निर्मिती, पॅलेस्टाईनचा प्रश्न आणि १९४८ पासून सुरू झालेल्या अरब-इस्रायल युद्धांचा ऐतिहासिक आढावा यात घेतला आहे.
हमास (गाझा पट्टी): हमासची स्थापना, त्याची विचारधारा, पॅलेस्टाईन मुक्ती चळवळीतील त्याची भूमिका आणि इस्रायलविरोधी सशस्त्र संघर्ष यावर प्रकाश टाकला आहे.
हिजबुल्लाह (लेबनॉन): शिया मुस्लिम संघटना म्हणून लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा झालेला विस्तार, इराणकडून मिळणारा पाठिंबा आणि इस्रायलसोबतचे उत्तर सीमेवरील युद्ध याचे विश्लेषण यात आढळते.
इराणची भूमिका: या संपूर्ण संघर्षामागे ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ (Axis of Resistance) च्या माध्यमातून इराण कशा प्रकारे हमास आणि हिजबुल्लाहला मदत करतो, हे पुस्तकात स्पष्ट केले आहे.
७ ऑक्टोबर २०२३ चे युद्ध आणि परिणाम: हमासने इस्रायलवर केलेला अभूतपूर्व हल्ला, त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये सुरू केलेली लष्करी कारवाई आणि या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर झालेले दूरगामी परिणाम याचे ताजे विश्लेषण पुस्तकात समाविष्ट आहे.
तटस्थ मांडणी: लेखकाने कोणत्याही एका बाजूचा पूर्वग्रह न ठेवता भौगोलिक, धार्मिक, राजकीय आणि लष्करी दृष्टीकोनातून या संघर्षाचे तटस्थपणे मूल्यमापन केले आहे.
मध्य पूर्वेतील हे युद्ध फक्त दोन देशांपुरते मर्यादित नसून जागतिक अर्थकारण आणि महासत्तांच्या राजकारणाशी कसे जोडलेले आहे, हे समजून घेण्यासाठी रोहन अंबिके यांचे हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि वाचनीय आहे.
अनुक्रमणिका ::
१. ज्यू ओळखः इतिहास आणि आंतरधर्मीय संबंध
२. संघर्षाची पार्श्वभूमी
३. पूर्वइतिहास
४. संघर्षाची धगः लेबॅनॉन आणि गाझा युद्धे
५. ७ ऑक्टोबर २०२३
६. हमास आणि हिजबुल्लाह
७. इस्रायलचा दृष्टीकोन
८. आधुनिक संघर्षांमध्ये समाज माध्यमांची भूमिका
९. आंतरराष्ट्रीय सहभाग आणि शेजारी देश
१०. भारताचा दृष्टिकोनः मुत्सद्दीपणा आणि शांतता प्रयत्न
११. तंत्रज्ञान आणि युद्धः ड्रोन, सायबर वॉरफेअर आणि पाळत ठेवणे
१२. शांतता आणि भविष्यातील परिस्थितीची संभावना
१३. शेवट की सुरुवात?
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू” – लेखिका : सुश्री शोभा भालेकर ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆
पुस्तक : निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु (कथासंग्रह)
लेखिका : शोभा भालेकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
काही पुस्तकांची नावंच इतकी सुंदर असतात की कुठलाही संवेदनशील वाचक त्या पुस्तकाकडे आकर्षित होतोच. असंच रोहन प्रकाशनच्या ‘निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु’ या शोभा भालेकर यांच्या कथासंग्रहाबाबत घडलं.
या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. प्रत्येक कथेचा अवकाश हा भिन्न आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबतीतलं वैविध्य आपल्याला जाणवतं. या वेगवेगळ्या समाजातल्या कथा तितक्याच ताकदीने हाताळायला अफाट निरिक्षण शक्ती लागते, याबाबत लेखिकेचं खरंच कौतुक. भाषाशैलीही सोपी पण दर्जेदार आहे, त्यामुळे कथेच्या भावविश्वाशी आपण क्षणात तादात्म्य पावतो.
‘ अस्तित्व ‘ नावाचीच पहिलीच कोकणातल्या ग्रामीण भागात घडणारी कथा हा कथासंग्रह वाचण्याचा प्रवास रंजक असणार याची जाणीव करून देते. ही कथा कोकणात प्रत्येक वाडीत किमान एक दिसणाऱ्या दिशाहीन, सांगकाम्या, व्यसनी, व्यवहार आणि संवेदनाशून्य तरुणाचं आयुष्य दाखवते.
‘ अंग झिम्माड झालं ‘ या कथेत संसारी जबाबदारीत पिचलेल्या एक फरफटलेलं आयुष्य जगणाऱ्या नायिकेचा प्रवास तिने घेतलेल्या व्यक्तिगत निर्णयांना फार आदर्शवादाच्या सोयीस्कर फुटपट्या लावून जज न करता अनुभवतो. तिचं हे परिवर्तन कमाल आहे.
असाच नायिकेचा कायापालट पुढे ‘ चक्रव्यूह ‘ या कथेतही पहायला मिळतो. पण ‘ चक्रव्यूह ‘ या कथेतल्या नायिकेचा तरुण दिसण्याच्या अट्टाहासाला, किंवा त्या अनुषंगाने स्वतःच्या केलेल्या बेढब उपहासाला आपण निश्चित वेगळ्या चष्म्यातून पाहतो, जज करतो. म्हणजे एक स्त्री लेखिका असूनही ब्लॅक, व्हाईट, आणि ग्रे यात फरक करण्याची लेखिकेची वैचारिक स्पष्टता आपल्याला एकाच कथासंग्रहात पडताळता येते.
‘ या पंखावरती मी नभ पांघरती ‘ ही कथाही पंखांना स्वच्छंद विहारायचं बळ देणारी आहे. सुखासीन आयुष्यात लढायचं की नियतीपुढे झुकायचं हा प्रश्न पडतो तेव्हा फार क्वचित लढा निवडला जातो. आततायी पणा न करता या कथेतील नायिका आसावरी राखेतून भरारी घेऊन शून्यापासून विश्व निर्माण करण्याची धमक दाखवते, ते खरोखर स्फूर्तीदायक वाटतं.
‘ हिरकणी ‘ या कथेतही मोलकरणीचं काम करणारी श्रमिक नायिका रेखाटली आहे. आपल्या मुलाला चाळीत घर घेऊन देण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती काबाडकष्ट करते. तिच्या या स्वप्न पाहण्याच्या हिमतीचं आणि ते पूर्ण करू पाहण्याच्या जिद्दीचं खरंच कौतुक वाटतं.
श्रमिकांचंच बोलायचं झालं तर ‘रातकिडा’ ही एका बापाची कथा फारच संवेदनशीलतेने हाताळली आहे. यात खांदेदुखीने त्रस्त एक रिक्षावाला आपलं दुखरं शरीर विसरून मुलाला इंजिनियर बनवायची खटपट करतो. त्याचं ही शारीरिक दुखणी पचवून मुलाच्या इंजिनियरिंग सारख्या खर्चिक शिक्षणासाठी दिवसरात्र एक स्वप्नासाठी झोकून देणं पाहून खरोखर डोळे पाणवतात.
‘ निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु ‘ ही कथाही वेगळ्या धाटणीची आहे. ही कथा आहे वृद्ध आईसाठी झटणाऱ्या सुषमाची. सुषमाचं लग्नाचं वय सरत आलेलं असतं पण तिने जणू आपलं तारुण्य, संसाराची स्वप्न सारं बाजूला सारून आईच्या सुश्रुषेसाठी स्वतःला डांबून घेतलं असतं. म्हणजे आईची सुश्रुषा वाईट नव्हें, पण आपल्या आयुष्यातली सुख नाकारणं हे खटकतं. कारण तिच्या भावंडांनी जबाबदारीतून सोयीस्कर पाय बाहेर काढून आपापले संसार सुखाचे केलेले असतात. हिने मात्र स्वप्नातल्या राजकुमाराच्या कहाणीची पानं स्वतःहून मिटलेली असतात, त्यामुळे तिचं आयुष्य हे प्रवाही न राहता त्याचं डबकं होऊ लागतं. आयुष्यातल्या एका सुवर्णमध्यापर्यंत येण्याच्या प्रवासाची ही एक सुंदर कथा आहे.
‘ तराने पुराने ‘ या लॉकडाउन काळात घडणाऱ्या कथेत आजीआजोबांच्या घरी रहायला येण्याने घरच्या खास करून लहान मुलांच्या बदलेल्या दिनचर्येचं खेळीमेळीचं गणित मांडण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.
या साऱ्याच कथा फार संवेदनशीलपणे हाताळल्या आहेत. वाक्य फार पल्लेदार नाहीत, उगाच बोजड शब्द नाहीत. वाक्यरचना सोपी आहे, त्यामुळे आशयगर्भ कथानकही एखाद्या नाजूक फुलासारखं सुरेख उमलतं. त्यामुळे आपल्यासारख्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मंडळींना ट्रेनमधून येताजाता वाचायला सोईचं ठरतं. अर्थात वाचायला कितीही सोपं असलं तरी सोपं लिहिणं ही कला मात्र अवघडच, त्यामुळे लेखिकेला विशेष दाद द्यावीशी वाटते.
परिचय : श्री प्रसाद साळुंखे
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9664027127
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दीपपूजा’ हे सौ. दीपा नारायण पुजारी या माझ्या मैत्रिणीचे मनोरमा प्रकाशनने प्रकाशित केलेले ललितबंध संग्रहाचे पहिले पुस्तक! एखादी लेखणी पहिल्या प्रयत्नातच आपली चाहूल देते. दीपाच्या या लेखणीने अनेक वळणं घेतली आहेत. अनेक माणसं तिला भेटली. अनेक ऋतूंतील रंगांची चित्रकारी तिने केली आहे या पुस्तकात… पहिल्या पुस्तकातूनच मनात साठलेले वाचकांपर्यंत पोहोचवण्याची तिची आतुरता जाणवते. साध्या प्रसंगातून असाधारण शोधाची दृष्टी या लेखिकेला आहे. घर, माणसं, नाती, निसर्ग आठवणी, अनुभव या रोजच्या जगण्याला लेखिकेने आपल्या संवेदनशील नजरेने पाहिलेलं आहे. विषय फार मोठे नाहीत परंतु त्यातला आशय मोठा आहे.
‘माझी अस्मिता’ या ललित बंधातून तिने स्वतःला प्रतिबिंबित केले आहे. अभंगाच्या ओळी, ओव्या पेरून लिहिलेले काही विषय चिंतनशील असे आहेत. त्यातून तिने सात्विक जीवनशैलीचे दर्शन घडवलंय.
‘सावळगंध’ ‘नाचे मयुरी’ ‘फुलपाखरू’ अशा विषयातून तिने निसर्गाशी अनुसंधान साधलंय.
‘कपडे पटाची दंगल’ ‘पैठणी’ अशा ललितबंधातून तिच्यातील गृहिणी डोकावते.
‘राजस मोमोज’ ‘चकुल्या’ अशा काही पाककृतीतून ती सुगरण असल्याची प्रचिती येते.
वाचकांशी फारसं अंतर न ठेवता अगदी शेजारी बसून एखादी आठवण सांगणारी अशी ही लेखिका, छोट्याशा घटनेतून जीवनाचा अर्थ आपल्यासमोर ठेवते. तिच्या निरीक्षण शक्तीला दाद दिली पाहिजे. भाषाशैली ओघवती, वाचकाच्या मनाची पकड घेणारी, रसाळ, काव्यमय, विनोदी अशी आहे.
काही पुस्तकं आपण वाचतो, बाजूला ठेवतो पण काही पुस्तकं मनाच्या कोपऱ्यात शांतपणे वाचत राहतात. त्यामुळे आपल्यालाही आयुष्यातील विस्मृतीत गेलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवतात. तसेच काहीसे हे पुस्तक… संग्रही ठेवावं आणि पुन्हा पुन्हा वाचावं असं हे पुस्तक… या नव्या लेखणीचं स्वागत!! तिच्या पहिल्या पावलाला प्रेम मिळो! लेखणीला बळ मिळो!! तिच्या पुढच्या वाटचालीतून अशीच अनेक सुंदर शब्दफुले उमलत राहोत. ही मनापासून शुभेच्छा!!!
शब्दांनी सजवलेलं अंगण आणि त्यावर दीपाच्या विचारांची रांगोळी यांनी केलेली ही दीपपूजा…
☆ “भारतीय नास्तिकतेचा मागोवा” ☆ लेखक आणि परिचयकर्ता – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : भारतीय नास्तिकतेचा मागोवा
लेखक : जगदीश काबरे
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन, पुणे
किंमत : रु. २५०/- (घरपोच मिळण्यासाठी संपर्क : 9322688872)
आपल्या समाजात ‘आस्तिक’ आणि ‘नास्तिक’ या संज्ञांबद्दल अनेक गैरसमज आहेत. नास्तिक म्हणजे देवाला शिव्या घालणारा, धर्मविरोधी किंवा समाजविघातक व्यक्ती, अशी एक चुकीची समजूत अनेकांच्या मनात आढळते. प्रत्यक्षात भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास पाहिला, तर चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. हा खरा इतिहास सामान्य वाचकांपर्यंत पोहोचावा, हा या पुस्तकामागचा मुख्य उद्देश आहे.
प्राचीन भारतात विविध तत्त्वचिंतनातून अनेक दर्शने निर्माण झाली. या दर्शनांनी विश्व, मनुष्य, आत्मा, ज्ञान, ईश्वर, कर्म आणि मोक्ष यांसारख्या प्रश्नांची स्वतंत्र उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमध्ये मतभेद होते; परंतु हे मतभेद वैचारिक होते. आजच्या भाषेत सांगायचे तर हा एक मुक्त बौद्धिक संवाद होता. कोणताही विचार अंतिम नाही, त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याची चिकित्सा केली जाऊ शकते, अशी ही भारतीय परंपरेची मोठी ताकद होती. ‘भारतीय नास्तिकतेचा मागोवा’ हे पुस्तक केवळ नास्तिकतेवर नाही; तर भारतीय बौद्धिक परंपरेच्या वैविध्यावर आहे. हे पुस्तक वाचताना वाचकाला अनेक प्रस्थापित समजुती नव्याने तपासून पाहाव्या लागतील. काही निष्कर्ष आश्चर्यचकित करतील, काही प्रश्न अस्वस्थ करतील आणि काही विचार नव्या अभ्यासाची प्रेरणा देतील. त्यातून विचारांचा पराभव बंदी घालून होत नाही; तो अधिक सक्षम विचार मांडूनच होतो हे लक्षात येईल. विवेक, तर्क, संवाद आणि चिकित्सक दृष्टी हीच भारतीय तत्त्वज्ञानाची खरी ओळख आहे. त्या परंपरेचा एक छोटासा मागोवा या पुस्तकातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी हे पुस्तक पूर्वग्रह न ठेवता, खुल्या मनाने आणि जिज्ञासेने वाचावे, हीच अपेक्षा.
सर्वसाधारणपणे बौद्ध, जैन आणि चार्वाक ही दर्शने नास्तिक मानली जातात. कारण त्यांनी वेदांचे अंतिम प्रामाण्य स्वीकारले नाही. परंतु या वर्गीकरणाकडे बारकाईने पाहिले, तर अनेक मनोरंजक प्रश्न उभे राहतात. उदाहरणार्थ, सांख्य आणि वैशेषिक या दर्शनांनी विश्वाच्या निर्मितीसाठी सर्वशक्तिमान ईश्वराची आवश्यकता मानलेली नाही. विश्वाचे स्पष्टीकरण त्यांनी नैसर्गिक तत्त्वांवर करण्याचा प्रयत्न केला. तरीही भारतीय परंपरेत त्यांना आस्तिक दर्शनांमध्ये स्थान मिळाले. याचे कारण त्यांनी आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म यांसारख्या संकल्पना स्वीकारल्या. म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञानात ‘आस्तिक’ आणि ‘नास्तिक’ या संज्ञा केवळ देवावर विश्वास आहे की नाही, एवढ्यावर ठरत नाहीत. त्या अधिक सूक्ष्म आणि ऐतिहासिक संदर्भात समजून घ्याव्या लागतात. या पुस्तकात याच गुंतागुंतीचा मागोवा घेतला आहे.
☆
परिचयकर्ता : लेखक जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “राम रामेति रामेति..” – लेखक : डॉ. राहुल देशपांडे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : राम रामेति रामेति
लेखक: डॉ. राहुल देशपांडे
पृष्ठ: १६८
मूल्य: ३००₹
हे पुस्तक कोणासाठी?
… जीवन जगत असताना आपल्या ठरविलेल्या ध्येयाकडे जायचा प्रवास सहज करायचा असेल त्यांच्यासाठी…
… रोजच्या प्रवासात अडथळे येऊन योग्य मार्ग सापडत नसेल आणि अति विचारांनी जे स्वतःचेच नुकसान करून घेत असतील त्यांच्यासाठी…
… जगणे अवघडच असते आणि मीच केवळ वेदना भोगत आहे असे समजून ईश्वराला दोषी ठरविणाऱ्या माझ्या अनेक मित्रांसाठी…
… आत्ता जरी मार्ग खडतर असला तरी जगणे खूप सोपे आणि सुंदर आहे यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी…
… ज्यांनी रामायण वाचले त्यांच्यासाठी, ज्यांनी वाचले नाही, त्यांच्यासाठीही. श्रीराम आणि सीतामाई यांना मानतात त्यांच्यासाठी आणि मानत नाहीत त्यांच्यासाठीही…
… प्रभू राम आणि सीता माई यांना आजच्या जीवनशैलीत नव्याने समजून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी…
… मला सगळा रस्ता माहिती आहे असे प्रवास सुरू करताना शंभर वेळा सांगतात आणि नंतर हळूच गुगल मॅप लावतात त्यांच्यासाठी… एकूणच सुखी व्हायचे आहे अशा सर्वांसाठी…
‘मी यशस्वी आहे का? ’ हा प्रश्न कधीही स्वतःला विचारू नये. कारण त्याचे उत्तर कठीण आहे. तेही खूप सापेक्ष आहे.
मात्र, ‘मी सुखी आहे का? ’ हा प्रश्न नक्की विचारावा आणि याचे उत्तर जर ‘हो’ आले तर तुम्ही नक्की यशस्वी आहात, यावर विश्वास ठेवा.
‘मात्र सुखी राहायचे कसे? ’ हा प्रश्न आजच्या ताणतणावाच्या, धावपळीच्या जगण्यात पडतो. ते पण साहजिक आहे.
गदिमा-बाबूजींच्या गीतरामायणाचा आधार घेत रामकथेतील विविध पात्रांच्या मदतीने मला सुखी जगण्याचा कानमंत्र मिळाला. तो या पुस्तकरूपाने तुमच्यासमोर ठेवत आहे. इथे तुम्ही राम मानता का नाही मानत, हा प्रश्न नाही. कारण इथे राम केवळ देव नाही, तर resilience, emotional intelligence आणि ethical leadership यांचा भारतीय रूप उलगडणारा दिशादर्शक आहे.
हे केवळ पुस्तक नाही.
क्रॅश कोर्स आहे – सुखी जगण्याचा.
आपल्या सुखी जगण्याच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे…
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अंधाराच्या पारंब्या” – लेखक : श्री जयवंत दळवी ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆
पुस्तक : अंधाराच्या पारंब्या
लेखक : जयवंत दळवी
मुंबईहून पुण्यात एका ऑफिसच्या मीटिंगला जात होतो. तेव्हा चहा नाश्ता करण्यासाठी म्हणून एका फूडमॉलमध्ये थांबलो. तिकडे पहिल्या मजल्यावर एका पुस्तकांच्या दुकानात काही नवी जुनी पुस्तकं चाळली. म्हणजे वरवरच पहिली आणि खात्रीशीर लेखक किंवा दर्जेदार प्रकाशनं पाहून काही जुनी पुस्तकं विकत घेतली. त्यात ही सोनं सापडलं. जुनं म्हणून नव्हे, तर कुठल्याही काळात सोनं हे सोनंच. ही कादंबरीही अगदी तशीच कालातीत कलाकृती.
१९७२ साली जयवंतदळवीयांची‘ अंधाराच्यापारंब्या‘ ही कादंबरी पहिल्यांदा ‘ अनुराधा ‘ या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली. पुढे १६ सप्टेंबर १९९५ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.
या कादंबरीवर आधारित ‘ बॅरिस्टर ‘ हे नाटकही अमाप लोकप्रिय झालं. पण माझी आठवण आहे साधारण २००३ च्या सुमारासची. तेव्हा अल्फा (आताचं झी) मराठीवर ‘ पिंपळपान ‘ नावाची एक दर्जेदार मालिका लागायची. ही मालिका मला अफाट आवडायची. विशेषतः अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली ‘ बॅरिस्टर ‘ ही भूमिका. कादंबरी वाचताना वाटलं की मधली वर्षे झरझर सरत चाललीत, आणि अगदी तसाच अस्वस्थतेकडून अस्वस्थतेचा प्रवास आपण अनुभवतोय.
यात दाखवलेला काळ साधारण इ. स. १९२० च्या सुमारासचा. तत्कालीन महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजाच्या काही जुनाट रूढींचा मागोवा या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. त्याकाळी सभोवताल हळूहळू बदलायला सुरुवात झाली होती. म्हणजे बॅरिस्टर सारखी सुशिक्षित, विलायतेतून शिक्षण घेऊन आलेली मंडळी त्यांची सौंदर्यदृष्टी, जीवन समरसून जगण्याची स्वच्छंदता, कौतुक करायची, वैचारिक विरोध दर्शवायची स्पष्टवक्तत्ता एकीकडे. आणि भाऊरावांचा देवभोळेपणा, निरागसता, रूढींना धर्माला चिकटून राहण्याची वृत्ती, बॅरिस्टरांबद्दल आदरयुक्त भिती, बॅरिस्टरातल्या स्वभावात दडलेल्या लहान मुलावर जीवापाड माया हा लटका संघर्ष वाचायला रंजक वाटतो, क्वचित प्रसंगी अस्वस्थ करून सोडतो.
यातली एकेक पात्र जयवंत दळवी यांनी खरोखर लाजवाब रंगवली आहेत. बॅरिस्टरांच्या स्वच्छंद पण संवेदनशील स्वभावाचे पैलू, भाऊरावांच्या रूढी परंपरा बाबतच्या ठाम भूमिका आणि त्यातूनही दुसऱ्या वैचारिक प्रवाहाला दिलेला आदर, राधाक्कातल्या नववधूची स्वप्न, मानवी हेतूंची चाचपणी आणि एक अबोल घालमेल, विशेष कौतुक वाटतं ते मावशीबाईंचं, दैवाने लहानपणी दिलेल्या वैधव्याचा आणि समाजाने त्याचवेळी दिलेला कुरूपतेचा शाप भोगून, दिवसभर जीव कामात गुंतवणं आणि हसतमुख रहाणं, ही अन्यायाची मूक स्वीकृती, शरणागती आपल्याला अंतर्मुख करते. म्हणूनच मावशीबाईंचा लहानपणीच्या आठवणीतला विधवा केशवपनाचा प्रसंग राधाक्कासोबतच आपल्यालाही मूळातून उन्मळून टाकतो.
दुसरीकडे तितकाच सतावतो, कादंबरीभर गूढ कायम ठेवतो तो वाड्याला लागलेला खुर्चीत बसायचा शाप. घरातल्या धडधाकट कर्त्या पुरुषानं अचानक एक दिवशी डोळ्यात थंड वेडसर झाक घेऊन एकटक जमिनीकडे पहात बसणं, ही कल्पनाच श्वास कोंडण्याइतपत, जीवाची घालमेल होण्याइतपत अंगावर येते.
भाऊराव आणि त्यांची नववधू राधाक्का या वाड्याला चार सुखाचे क्षण देऊन क्षणभराचं घरपण देतात. म्हणजे बघा मालक घर बांधतो पण भाडोत्री घरपण देतात. पैशांनी वाडा बांधता येतो पण घरपण भावनेच्या नात्यांनीच तयार होतं. अर्थात भाऊराव आणि बॅरिस्टर यांचं नातं भाडोत्री आणि मालक या सदरातलं टिपिकल व्यवहारी कधीच नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला बॅरिस्टर आणि राधाक्का यांच्यातलं नातंही अस्फूट, सौम्य आणि मर्यादांच भान ठेवून उमलू पहात होतं. नात्यांचा हा सारा प्रवास खरोखर वाचण्याजोगा आहे.
बऱ्यापैकी लोकांनी ही कादंबरी वाचली असेलच. प्रेमाची परिणीती कशात होते? याला कधी कधी काहीच अर्थ नसतो, कारण शेवटी तो प्राक्तनाचा भाग असतो. पण त्या आठवणींचा ताळेबंद आयुष्यभर जोखत बसणं हेही त्या प्रेमाचं यशच नाही का? असेच अनेक तिमिरपंथी प्रश्न घेऊन आपल्यातल्या माणसाला चाचपडतात या ‘अंधाराच्या पारंब्या’
परिचय : श्री प्रसाद साळुंखे
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9664027127
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈