हे केवळ वेळापत्रक तयार करण्यापुरतं मर्यादित नसून, उद्दिष्ट निश्चित करणं, कामांचं योग्य नियोजन, प्राधान्यक्रम ठरवणं, स्वयंशिस्त, सातत्य आणि डेडलाइनचं पालन यांचा समन्वय आहे. या पुस्तकात वेळेचा अधिक परिणामकारक उपयोग करून स्मार्ट वर्क कसं करावं, याचं सोप्या आणि शास्त्रशुद्ध भाषेत मार्गदर्शन केलं आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांमधून वेळेच्या व्यवस्थापनाची प्रभावी उदाहरणं उलगडत, छोट्या सवयींपासून मोठ्या तत्त्वांपर्यंत प्रत्येक पैलू समजावून सांगितला आहे. अधिक यशस्वी, संतुलित आणि परिणामकारक जीवन जगण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकासाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.
वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय, ते का आणि कसं करावं, याची इत्थंभूत शास्त्रशुद्ध; परंतु सुलभ भाषेतील माहिती. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे फक्त वेळापत्रक आखणं नव्हे, तर त्यात उद्दिष्टपूर्तीकरिता आणि उद्दिष्टं निश्चित करण्यापासून डेडलाइन पाळणं अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. फक्त खडतर कष्ट करत राहण्याऐवजी परिश्रमपूर्वक स्मार्ट वर्क करण्याला अधिक महत्त्व असतं. या मोठमोठ्या शब्दांचा खरा अर्थ महिलांच्या दैनंदिन कामातून स्पष्टपणे दिसून येतो म्हणूनच त्यांना वेळेच्या व्यवस्थापनाच्या गुरू म्हटलं पाहिजे. थेट वाचकांशी संवाद साधत वेळेच्या व्यवस्थापनातील बारीकसारीक गोष्टींपासून मोठ्या सिद्धान्तांपर्यंतच्या अनेक गोष्टींचा केलेला ऊहापोह.
लेखिकेचा परिचय –
मीना शेटे-संभू यांनी दै. सकाळमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून २२ वर्षे काम केले. शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता विषयाच्या मानद प्राध्यापिका आणि कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केले. गेल्या १५ वर्षांत त्यांनी विविध प्रकाशन संस्थांच्या विविध विषयांवरच्या १३७ इंग्रजी आणि ६ हिंदी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला असून, त्यांची सहा स्वरचित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘टाइम मॅनेजमेंट वेळेचे व्यवस्थापन’ हे त्यांचे सातवे स्वरचित पुस्तक आहे. याशिवाय त्यांची तीन इंग्रजी ई-पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शोध पत्रकारिता आणि अनुवाद या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कामगिरींबद्दल त्यांना काही प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ओडिसी” – मूळ लेखक : होमर – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ओडिसी
लेखक : होमर
अनुवाद : प्रणव सखदेव
प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे
पृष्ठ :- १८४
मूल्य: २५०₹
प्रकार:- पुराणकथा, साहसकथा
होमरचं ‘ओडिसी’ हे एका वीराच्या घरी परतण्याची कथा आहे. ट्रॉयचं युद्ध संपल्यानंतर इथाका या आपल्या राज्यात परतण्यासाठी ओडिसियसला तब्बल दहा वर्षांचा संघर्ष करावा लागतो. युद्ध संपलं असलं तरी त्याच्यासाठी खरी लढाई तेव्हाच सुरू होते. समुद्र, राक्षस, जादूगारिणी, देवतांचा कोप, मोह, फसवणूक आणि स्वतःच्या निर्णयांची किंमत आणी प्रत्येक टप्प्यावर त्याची परीक्षा घेतली जाते. दुसरीकडे इथाकामध्ये त्याची पत्नी पेनेलोपी वीस वर्षांपासून त्याची वाट पाहत आहे. सर्वांना ओडिसियस मरण पावल्याचं वाटत असल्याने तिच्यावर दुसरं लग्न करण्यासाठी दबाव टाकला जातो. मुलगा टेलीमॅकस वडिलांचा शोध घेण्यासाठी निघतो. त्यामुळे ही केवळ साहसकथा राहत नाही; ती एका कुटुंबाची, निष्ठेची आणि घरी परतण्याच्या अटळ इच्छेची कथा बनते.
या महाकाव्यात देवतांचं स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे. अथेना सतत ओडिसियसच्या पाठीशी उभी राहते, तर पोसायडन त्याच्या प्रत्येक पावलावर अडथळे निर्माण करतो. त्यामुळे संपूर्ण कथा ही एका माणसाच्या संघर्षाइतकीच दोन देवतांमधील अदृश्य संघर्षाचीदेखील कथा वाटते. ओडिसियस बुद्धिमान आहे, धाडसी आहे; पण हट्टीही आहे. अनेकदा त्याच्या स्वतःच्या निर्णयांमुळे संकटं ओढवतात. त्याच्या चुका, त्याचं चातुर्य आणि संकटांमधून मार्ग काढण्याची वृत्ती हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं वैशिष्ट्य आहे. होमरचं लेखन आजही प्रभाव टाकतं, कारण ते केवळ साहस सांगत नाही; ते युद्धाची किंमत, माणसाची मानसिकता, घरापासून दूर राहण्याची वेदना, सत्तेचा मोह आणि आशा न सोडणाऱ्या मनुष्यस्वभावाबद्दलही बोलतं. म्हणूनच ओडिसी हजारो वर्षांनंतरही तितकीच जिवंत वाटत.
प्रणव सखदेव यांनी केलेला मराठी अनुवाद अत्यंत प्रवाही आहे. ग्रीक पुराणातील अनेक व्यक्तिरेखा, स्थळं आणि प्रसंग असूनही वाचन कुठेही क्लिष्ट वाटत नाही. उलट प्रत्येक प्रकरणासोबत पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढत जाते. तुम्ही यावर आधारित चित्रपट पाहणार असाल तर आधी हे पुस्तक नक्की वाचा, कारण त्यामुळे कथानक, पात्रं आणि त्यामागची पार्श्वभूमी अधिक चांगल्या प्रकारे समजते. आणि जर पुस्तक आधीच वाचलं असेल, तर चित्रपटातील अनेक प्रसंग नव्या दृष्टीने अनुभवता येतात. जर तुम्हाला ग्रीक पुराणकथा, साहसकथा वाचण्याची आवड असेल, तर ‘ओडिसी’ नक्की वाचा. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजही तितकीच ताजी, रंजक आणि विचार करायला लावणारी वाटते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आधुनिक आयुष्यामुळे आपल्याला सतत गोंधळलेलं आणि दबावाखाली असल्यासारखं वाटतं. स्वप्नं आणि उद्दिष्टांच्या दिशेने पुढे कसं जायचं आणि त्याचवेळी रोजची कामं कशी सांभाळायची, हेच समजेनासं होतं. कारण यादीत कितीतरी गोष्टी बाकी असतात आणि कामांची यादी सतत वाढतच जात असते.
यावर उपाय म्हणून सॅम बेनेट एक अत्यंत सोपी पण प्रभावी कल्पना मांडतात : फक्त १५ मिनिटांची छोटी कृतीदेखील तुमच्या आनंदात, समाधानात आणि अखेरीस संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.
या पुस्तकात – – –
… परफेक्शनिझम, स्वतःवर शंका घेणं, इम्पोस्टर सिंड्रोम आणि स्वतःलाच मागे खेचणाऱ्या सवयींपासून मुक्त कसं व्हायचं
… आरोग्य किंवा इतर समस्यांमुळे आयुष्य विस्कळीत वाटत असताना स्वतःला कसं सांभाळायचं
… अवघड आणि मोठी वाटणारी कामं छोट्या, सहज हाताळता येतील अशा टप्प्यांत कशी विभागायची
… गरजेच्या वेळी ठामपणे आणि नम्रपणे “नाही” कसं म्हणायचं
… दिवसातील फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढून संतुलित आयुष्यासाठी नवीन सवयी कशा तयार करायच्या
सॅम बेनेट या लेखिका, वक्त्या आणि सर्जनशीलता-उत्पादकता विषयातील तज्ज्ञ आहेत. व्यावसायिक अभिनेत्री आणि इम्प्रोव्हायझर म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामात विनोदबुद्धी, उत्साह आणि हजरजबाबीपणा यांची खास छाप निर्माण केली. सहज, व्यवहार्य आणि प्रेरणादायी शिकवणीमुळे त्या आज लिंक्डइन लर्निंगवरील जागतिक स्तरावरील लोकप्रिय प्रशिक्षकांपैकी एक असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मन अंकुरे अंकुरे” – लेखिका : डॉ. नेहा विनोद भटकर ☆ परिचय – श्री अशोक ल. देशपांडे ☆
पुस्तक : मन अंकुरे अंकुरे
लेखिका : डॉ. नेहा विनोद भटकर
प्रकाशक : ज्ञानपथ प्रकाशन
पृष्ठसंख्या : ११६
किंमत : रु. २०० /-
‘मन अंकुरे अंकुरे‘ जणू दरवळलेला मृदगंधच……
नुकत्याच २० व २१डिसेंबर २०२५ ला परिवर्तन प्रबोधिनी आयोजित तिसऱ्या विचारवेध साहित्य संमेलनात प्रकाशित झालेले, ज्ञानपथ प्रकाशनाचे डॉ नेहा विनोद भटकर लिखित, वैविध्यपूर्ण अशा एकूण सोळा लेखांचा संग्रह असलेले ‘मन अंकुरे अंकुरे’ हे पुस्तक वाचनात आले आणि त्यासंबंधीचा अभिप्राय लिहिण्यास लेखणी सहजच उद्युक्त झाली. त्याला अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम तर पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून आतील अक्षरधनाचा अंदाज आला. लेखिकेचं नाव ‘डॉ. ‘ ह्या उपधीशिवाय पाहून लेखिकेचा विनय, ऋजुता दिसून आली. मलपृष्ठावर नजर गेली असता, तिथे लेखिकेचा परिचय असेल म्हणून पाहीले तर पुस्तकातील अंतरंग तेथे अवतरलेला. सगळी अवतरणं वाचूनच सहृदय वाचक पूर्णानंदाची अनुभूती घेतो. निसर्गाचं किंवा परिस्थितीचं अचूक, नेमकं निरिक्षण, बारकावे टिपलेले दिसतात व वाचक पुस्तक वाचनास प्रवृत्त होतो. विज्ञानाच्या प्राध्यापिका सेवानिवृत्तीनंतर बालपणीच्या आठवणी इतक्या सुंदर व जश्याच्या तश्याच चित्रित करतात याचे कौतुक आणि नवलही वाटले.
गुलबकावली किंवा सिंदबादच्या सफरी ज्या उत्सुकतेने एकेकाळी वाचल्या जात होत्या त्याच उत्कंठतेशी साधर्म्य साधणारे हे ग्रामीणबाजाचे लेख आहेत, केवळ हळवं मनंच इतके बारकावे टिपू शकतं. ग्रामीण जीवन केव्हढं समृद्ध, परिपक्व, सहज, रोखठोक होतं, ह्याचं दर्शन वर्तमान पिढीला लेखिकेने करून दिलं आहे. ह्या विविध विषयांवरील लेखांमुळे लेखिकेच्या मनातील आजवर सुप्तावस्थेत असलेल्या बीजांना सशक्त अंकुर आले आहेत. वठलेल्या वृक्षांना कोमल पालवी प्रस्फुटित व्हावी तसा लेखिकेच्या मनमोराचा पिसारा डवरून जाऊन अक्षरधनाच्या रुपाने वाचकांसमोर आला आहे, ह्याचा वाचकांना देखील आनंदच होईल. व-हाडी भाषेचा पेरा; जसे की नानीमावशी या लेखातील ‘थांब आमासाक’ किंवा इतरही लेखातील अनेक वऱ्हाडी शब्दप्रयोग, वाचकांना सुखावून जातो. अथांग सागरात बुडी मारून तळाशी असलेल्या शिंपल्यातील मोतीच फक्त मुठीत धरून येणाऱ्या पाणबुड्यासारखीच लेखिकेने स्मृतीच्या अंतराळात झेप घेऊन आठवणींच्या रत्नांची पखरण प्रत्येक लेखात केली आहे. रम्य त्या बालपणातील बारकावे लालित्याने नटलेले आहेत. ‘अनवट मैत्री’ पृ. ७९’ “विचारांच्या भुंग्याने अनेक पावसाळे अगदी सहजपणे मागे टाकलेत हे कळलेही नाही“, अशी लालित्यपूर्ण किंवा त्यापेक्षाही सहज सुंदर व समर्पक वाक्य ठिकठिकाणी आढळतात. रात्रभर भुंग्याने कमलपुष्प दलात स्वतःच्याच धुंदित बंदिस्त करून घ्यायचे व सूर्योदयालाच बाहेर पडून मुक्त संचार करावा तसे विचारांचे /आठवणींचे काहूर स्मृर्तीची परते खुलवून गेली.
.. खेड्यातील लोकांचा जीवनाधार असलेल्या गुलाब भाईचं कामास काम एवढेच मर्यादित असलेलं साधं व निरागस असलेलं वलय लेखिकेने लिहिल्याप्रमाणे ‘कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धूसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालं आहे. ’ आज सामाजिक जाण हरवलेली, उजाडलेली खेडी पहिली की ‘गुलाबभाई’ सारख्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
.. ‘शतदा प्रेम करावे’ ह्या पाडगावकरांच्या कवितेच्या ओळीने संपलेले, माणुसकीच्या वाड्याचे वर्णन संपूच नये असे वाटत असतानाच वाचून संपले. वर्तमान पिढीला सांगूनही विश्वास न बसेल असे ते दिवस, ती माणसं, ते सामाजिक भान, भारतीय जीवन पद्धतीचे दर्शन, संस्कृती व परंपरेला जपणारा समाज लेखिकेच्या ओघवत्या लेखणीने ‘वाडा माणूसकीचा’ मध्ये जिवंत केला. त्या वाड्याचे वैभव जपणाऱ्या अन्नपूर्णांचे; एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे, वर्णन वाचून वाचक तृप्तीची ढेकर देऊन आनंदित झाल्यावाचून राहणार नाही.
.. ‘सामा’ या लेखातील दारकुची अविश्रांत श्रमाची कहाणी अंतर्मनाला स्पर्शूनच जात नाही तर ती त्याला चिकटते. ‘नाना’ सारखी माणसं जेथे जेथे असत ते तेथील सर्वांसाठी जीवनाधारच असत. खेड्यातील नाना सारख्या व्यक्तींना तर आधारवडच म्हटलं पाहिजे. ‘अनवट मैत्री’ ‘ओकरा’, ‘प्राजक्त सडा’ या लेखांत आलेल्या शब्दांना दिलेले प्राणी वा वनस्पती शास्त्रीय शब्द इंग्रजीत दिल्याने फार सोयीचे झाले. त्यातील कीटक आणि वनस्पतींचे बारकावे समजणे सोपे झालेत. वरील लेखांमध्ये आलेल्या बहुतेक सर्व कीटकांसोबत अनेकांची लहानपणी दोस्ती झाली असेल.
.. तिळभर नातं हा लेख संपूच नये असे वाटत असताना बैलगाडी व ढवळ्या पवळ्याच्या गळ्यातील घुंगरांची किणकिण मंदावल्याचा भास झाला. या लेखामध्ये लेखिकेने माहेरचा वारसा फारच ताकदीने उभा केला आहे असे निश्चितपणे वाटते कारण लिहिले ते काल्पनिक नाही याचा लेख वाचताना ठायी ठायी साक्षात्कार होतो आणि वाचकही त्या वाटेचा आनंदी वाटसरु होऊन बसतो.
.. ‘दिवस जून-जुलैचे’ या लेखातील प्रत्येक व्यक्ती, घटना, हेंबाडवानाची वगैरे शब्द, पेरणीच्या सरत्यावरील लक्षुम्या, सुतार, लोहारादि कारागिरांची ठिकाणं, आंब्याचं लोणचं घालण्याचा सोहळा, लहरी मिरुगाच्या सचैल पावसाने प्रफुल्लित झालेले शेतकऱ्यांचे चेहरे आदिचा मनमुराद समाचार घेऊन त्या स्मृतींना कलाबतूची झालर लावली.
.. ‘प्राजक्त सडा’ या लेखातील लालित्याचे मनोहर लेणे लेऊन आलेला प्राजक्त लेखिकेने भरभरून फुलविला आहे. श्रावण भाद्रपद मासी जसा तो पहाटेच्या समयी बरसतो तशीच लेखिकेची लेखणी देखील त्याच्या नाजूक फुलांचा दरवळ घेऊन अक्षरश: ओसंडली आहे. लेखिकेने आत्यंतिक तन्मयतेने ती सुगंधी दरवळाची वलयं, अनेक स्मृतींनी बांधून ठेवली आहेत.
.. ‘नामनिराळे गाव’ नावाचा अतिशय साध्या विषयाला धरून असलेला एक खुसखुशीत लेख, नामनिराळ्या गावातील नामनिराळ्या माणसांच्या नावातील गमतीजमातींवर कटाक्ष टाकणारा हलकाफुलका लेख वाचून चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या नाहीत तरच नवल.
.. ‘गोमटे वैराग्य’ मधील गोमट्याचे भावचित्र; ‘भिकारी नाही मी दादी, मी माह्या फुईच्या घरी पावना आलो’ तसेच ‘हो का, ते ठीक आहे पन मी तुह्या नावानं हे भाजी भाकर काढली, तं आता घरात ये, बस जरासा खाऊन घे कसा… ‘, ही निरागस आजीबाईच्या तोंडची वाक्यं आणि अशा अनेक ग्रामीण घाटाच्या जीवनातील सहजतेने समृद्ध झालं आहे. हा लेख वाचून खरोखरीच त्या नवलाईच्या विश्वातील इतर गोमट्या भटक्या पाहुण्यांची आठवण जागी झाली.
.. ’मार्च एक अनुभूति’ हा नुसती वसंत ऋतूची निसर्गातील रम्य पखरणच नाही तर मार्च महिन्यात घडणाऱ्या व्यावहारिक घडामोडीचे सक्षम दर्शन या लेखात घडले आहे. गोष्टी नित्याच्याच पण त्या देखील वाचनीय झाल्या आहेत व आपणही हा अनुभव घेतला आहे असे वाटून जाते. बाळपणीचा काळ सुखाचा म्हणून शाळकरी असताना खाल्लेल्या कैऱ्या तसेच होळी शिमग्याच्या वेळी केलेल्या चाकोल्याच्या माळांच्या उल्लेखांनी वाचकही त्या लेखात समरसून जातो. शासकीय कार्यातही ठराविक वेळी करावयाच्या कामांच्या घेतलेला आढाव्यात आपणही भागीदार होतो/आहे याची जाणीव करून देतो.
.. ‘लंडन ब्रिज’ लेखामुळे बऱ्याच मनोरंजक व ऐतिहासिक गोष्टी समजल्यात. बालपणी अर्थ न समजलेल्या पण सततच्या उच्चारणामुळे स्मरणात राहिलेल्या इंग्रजी कवितेचा भाव आणि अर्थ लेखिकेला गवसला व त्या आनंदीत झाल्या. अशाच प्रकारचा आनंद हा लेख वाचताना वाचकाला होतो. लंडन ब्रिजचं वास्तुशास्त्र, त्यात कालानुरूप झालेले बदल, पुढे अमेरिकेत ब्लॉकस रूपाने पोहचलेला लंडन ब्रिज, हे सर्व वाचून अचंबित व्हायला होते आणि मुख्य म्हणजे लेखिकेने त्याचा सुसूत्र असा घेतलेला आढावा, त्यामुळे लेख वाचनीय झाला आहे. हा लेख वाचताना पु. लं च्या ‘चितळे मास्तर’मधील वर्ड्सवर्थच्या ‘वेस्टमिन्स्टर ब्रिज’ या कवितेची आठवण व्हावी असाच हा ‘लंडन ब्रिज’.
लेखिकेने ग्रामीण बाजाचा हा रथ छानच सजविला आहे. आता ही संस्कृती वर्तमानात अगम्य आणि सांगूनही कुणाला खरं वाटण्यापलीकडची झाली आहे. टिनाच्या गुंड्या ज्या की आता कुणाला आठवतही नसतील तसेच दौत, टाक, चिंदकाच्या भुलाया (बाहुल्या), लाकडी भोवरे, बालपणी कित्येकांनी फुंकलेल्या आंब्याच्या कोयीतील बाटीच्या पुंग्या इत्यादीची आठवण ताजी करीत ग्रामीण स्मरणरंजनाचा सारीपाठ सुरेख मांडला आहे. या पुस्तकाच्या वाचन प्रवासात वाचक सचैल डुंबण्याचा आनंद उपभोगू शकतो.
…. लेखिकेने चितारलेल हे ग्रामीण भागातील जीवन, एक प्रकारे डॉक्युमेंटेशनच आहे. लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक असून, खूप छान असा हा अभिनंदनीय लेखन प्रपंच आहे.
प्रस्तावनेसाठी उपोद्घात हा शब्द जुन्या पुस्तकांच्या प्रथम पृष्ठावर असायचा तो पाहून बरे वाटले. डॉ. रा. गो. चवरे यांनी खूप विस्तृत आणि जरा जास्तच लांबलेली प्रस्तावना केली आहे.
.. पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ आणि प्रत्येक कथा सौ. प्रज्ञा सोनखासकर यांच्या समर्पक, सुंदर आणि सुबक रेखाचित्रांनी सजली आहे. त्यामुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भरच पडलेली आहे.
.. पुस्तक बांधणी, छपाई, दोन ओळीतील स्पेस, टाईप (फॉन्ट), जाड कागद ही चांगल्या पुस्तकाची लक्षणं आहेत व त्यातील साहित्याला असलेला मृद्गंध हा वाचकांना हवाहवासा वाटणारा आहे.
…. लेखिकेच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देऊन येथेच थांबतो.
परिचय : श्री अशोक ल. देशपांडे
अमरावती
मो. 92257 05884
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “विवेकीयांची संगती” – लेखिका : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : विवेकीयांची संगती
– “वो सुबह हमी से आयेगी…”
लेखक : अतुल देऊळगावकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठः २४७
मूल्य: ३९५₹
एप्रिल १९५०. कंपनीच्या कामासाठी राय यांना पाच महिने लंडनला पाठवायचं ठरलं. राय दाम्पत्य कोलंबोहून जहाजानं लंडनकडे निघालं. राय सोळा दिवसांच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ संबंधी सुचणाऱ्या कल्पना लिहू लागले. त्यासोबत रेखाचित्रं होतीच. रेन्वा, व्हिक्टोरिया डा’ सिका आणि आयझेंस्टाइन यांच्या पावलांवर पाऊल टाकायचं, हे त्यांनी ठरवलंच होतं. वेशभूषा नाही. स्टुडिओ वा सेट नाही. गाणी नाही. प्रत्यक्ष गावात, साध्या माणसांना घेऊन चित्रपट करायचा. कथेतलं वास्तव थेट भिडवण्यासाठी त्यांचे विचार सतत चालू होते. ते लंडनमध्ये सहा महिन्यांत शंभर सिनेमे पाहून परत भारताकडे निघाले. परतीच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ कागदावर पूर्णपणे उतरला होता. ते परत आले तेव्हा भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जाणार होता. त्यात अकिरा कुरोसावा, रोझेलिनी, डी’ सिका यांसारख्यांचे चित्रपट होते. ‘राशोमान’ पाहताच त्याच्या प्रेमात पडलेले राय म्हणतात, ‘ती अस्सल जपानी कलाकृती होती. त्यामुळेच ‘पाथेर पांचाली’तील अस्सलपणाची खात्री पटली आणि ठरवलं की, हे करायलाच पाहिजे. ‘
‘पाथेर पांचाली’ ही हरिहर, त्यांची पत्नी सर्वजया, वृद्ध चुलत बहीण इंदिरा ठाकुरन, मुलं अपू-दुर्गा आणि अनेक छोट्या पात्रांची आहे. पूजापाठ करणाऱ्या दरिद्री हरिहरला दोन वेळचं जेवण मिळवणंसुद्धा कठीण आहे. त्यात या कुटुंबातील व्यवहाराचं चित्रण आहे. माणुसकी, लबाडी, ओलावा आणि निरागस बालपण… सगळं काही त्यात आहे. कादंबरीने कमीत कमी शब्दांत सूक्ष्म तपशील पकडल्यानं कवितेची उंची गाठली होती. राय पटकथा लिहून मोकळे झाले. दरम्यान, विभूतिभूषण वारल्यानं त्यांच्या पत्नी रमाबाईंकडून परवानगी घेतली आणि भांडवल गोळा करायची तयारी सुरू झाली. त्यांनी कल्पना मुव्हीजच्या भट्टाचार्यना गाठलं. त्यांनी शांतपणे कथा ऐकली. रेखाचित्रं पाहिली. दहा दिवसांची मुदत मागितली. चौथ्या दिवशी रमाबाईंचा भाऊ धावत राय यांच्याकडे आला. ‘कल्पना मुव्हीज हक्क मागतेय. प्रसिद्ध दिग्दर्शक देवकी बोस यांना घेऊन ‘पाथेर पांचाली’ करणार, म्हणताहेत. ‘…
डॉ. नॉर्मन बोरलॉग, डॉ. अमर्त्य सेन, मृणाल सेन, डॉ. सुधीर कक्कर, अनिल अग्रवाल, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, भागवत धोंडे, जयंत वैद्य आणि इतर अनेक विचारवंतांच्या कार्याचा प्रेरणादायी वेध या पुस्तकातून उलगडतो.
विचारांना समृद्ध करणाऱ्या आणि परिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात घेऊन जाणारे हे पुस्तक प्रत्येक जिज्ञासू वाचकासाठी अनमोल ठरते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा” – लेखक : श्री वैभव सुरेश मोरे☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा
लेखक : वैभव सुरेश मोरे
पुस्तकासाठी संपर्क : ७०५७५६७२५२
एकूण पृष्ठे : ८०
किंमत : ₹१५०
‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ हे वैभव मोरे यांचे छोटेखानी पुस्तक वाचायला हातात घेतले आणि ते संपल्यावरच खाली ठेवले; एवढे या पुस्तकाने मला गुंतवून टाकले. ‘पृष्ठ संख्या लहान, पण विचारांची समृद्धी महान’ असलेल्या या पुस्तकातील एकेक वाक्य हे एकेका सुविचारासारखे लाख मोलाचे आहे, हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. त्यातील काही वाक्ये वाचल्यावर वाचकहो, तुम्हीही अंतर्मुख होऊन विचार करायला लागाल, याची मला खात्री आहे.
१) एखादा भ्रष्ट अधिकारी जेव्हा लाच घेऊन आपले काम करून देतो, तेव्हा आपण त्याच्या त्या ‘सोयीस्कर’ प्रामाणिकपणाला दाद देतो. पैसे खाऊ दे, पण काम तरी करून देतो, अशी आपली धारणा होते. आजच्या काळात जर कोणी प्रामाणिकपणे सेवा दिली, तर आपल्यालाच आश्चर्य वाटते आणि आपला विश्वास बसत नाही. इतका शुद्ध प्रामाणिकपणा पचवण्याची ताकद आता आपल्या पचनशक्तीत उरलेली नाही, कारण चांगले काही पचवण्याची सवयच आपल्याला राहिलेली नाही.
२) दारूच्या बाटलीवरील, सिगारेटच्या पाकिटावरील किंवा शेअर मार्केटच्या जोखमीवरील वैधनिक इशारे ग्राहकाला सावध करण्यासाठी नसून, उद्या जर कोणी आजारी पडले किंवा कोणाचा मृत्यू झाला किंवा आर्थिक नुकसान झाले तर कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठीची एक ढाल आहे. ‘आम्ही तर आधीच सांगितले होते’, असे म्हणून स्वतःला निर्दोष सिद्ध करणे, हा या व्यवसायातील सर्वात मोठा ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ आहे.
३) कायद्याचा धाक हा शिस्तीसाठी असावा, पण जेव्हा तो दडपशाहीसाठी वापरला जातो तेव्हा तो लोकशाही विरोधी ठरतो. नियमांचा धाक दाखवून मिळालेली शांतता ही खरी शिस्त नसते खरी शिस्त ही परस्परांच्या आदरातून येते.
४) एखादा रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा तो केवळ शरीर घेऊन जात नाही, तर एक विश्वास घेऊन जात असतो. पण जेव्हा हा विश्वास विशिष्ट मेडिकल स्टोअर आणि अनाकलनीय लिपीतील प्रिस्क्रिप्शनच्या आड गहाण ठेवला जातो तेव्हा खरं ‘वैद्यकीय प्रदूषण’ सुरू होतं.
५) आज तंत्रज्ञान प्रगत झाले आहे, पण मानवी नियत मात्र आजही त्याच स्वार्थाच्या अंधारात चाचपडत आहे.
६) ‘बाईला काय कळतंय?’ हा अट्टाहास इतका खोलवर रुजला आहे की, एखादी महिला जर स्वतःहून निर्णय घेऊ लागली तर तिला सहकार्य करण्याच्या ऐवजी पुरुषसत्तेकडून तिची कोंडी केली जाते.
७) आजची प्रशासकीय यंत्रणा ही भीतीवर आधारलेली आहे. या भीतीमुळे माणूस आपली सद्विवेकबुद्धी गमावून बसतो. तो फक्त एक आज्ञाधारक यंत्र बनतो. यंत्राला संवेदना नसतात, त्याला फक्त इनपुट आणि आउटपुट माहीत असते. जेव्हा नियमांची भीती माणुसकीपेक्षा मोठी होते तेव्हा एक जिवंत माणूस केवळ एका मृतयंत्रणेसारखा वागू लागतो.
८) एक मोठा विरोधाभास असा आहे की, आपण निसर्गाने शरीरावर उमटवलेल्या खुणांपेक्षा हाताने बनवलेल्या कागदावर जास्त विश्वास ठेवतो. मानवनिर्मित मतदान कार्डाने नैसर्गिक पुराव्याला हरवणे हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. कारण आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या सत्यापेक्षा कागदावर लिहिलेल्या अक्षरांना जास्त महत्त्व देतो.
९) जिथे नियमामुळे माणुसकीचा गळा घोटला जातो तिथे तो नियम पाळणारा माणूस प्रामाणिक असला तरी तो नैतिकदृष्ट्या अप्रामाणिकच असतो. खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा कागदाच्या तुकड्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील सत्य आणि वेदना ओळखण्याची ताकद व्यवस्थेत येईल.
१०) शिक्षणात आपण विद्यार्थ्यांवर केवळ गुणांची उधळण केली, पण ज्ञानाची पेरणी मात्र शून्यावर राहिली. हाच तो प्रामाणिक व्यवस्थेतील सर्वात मोठा अप्रमाणिकपणा आहे.
११) तुम्ही बाहेरून खूप प्रामाणिक असल्याचा दिखावा आणता, अहवाल चकाचक बनवता. पण आतून त्या उपक्रमाचा आत्माच मेलेला असतो. जेव्हा एखाद्या संस्थेचे यश हे विद्यार्थ्यांच्या परिवर्तनावर नाही तर अल्बममधील फोटोवर मोजले जाते तेव्हा शिक्षण पद्धतीतला प्रामाणिकपणा संपलेला असतो. ही कागदी प्रगती समाजाला पुढे नेण्याऐवजी फक्त फाइल्सची जाडी वाढवत राहते.
१२) ईश्वराच्या दरबारात जिथे माणुसकी आणि समानता शिकवली जाते, तिथेच आता मंदिरातील व्हीआयपी पासमुळे श्रीमंत आणि गरीब अशा दोन रांगा तयार झालेल्या आहेत. ज्या देवाला भक्ती हवी तिथे आज शक्ती आणि पैसा चालतो. हाच तो प्रामाणिक भक्तीतील अप्रामाणिक व्यवहार आहे.
१३) आपण स्वतःला प्रामाणिक म्हणवतो, पण उघड्या डोळ्यांनी अन्याय होत असताना आपण गप्प बसतो, हाच आपला सर्वात मोठा अप्रामाणिकपणा आहे.
१४) जिवंतपणी ज्याला अन्नाच्या एका एका घासासाठी तडफडावं लागतं आणि मेल्यावर मात्र त्याच्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी धडपड केली जाते. हा आपल्या समाजातील सर्वात मोठा आणि क्लेशकारक विरोधाभास आहे. जिवंतपणी ज्याच्या मुखात पाण्याचा थेंब दिला नाही त्याच्यासाठी गंगेच्या काठी पिंडदानाचा सोहळा मांडणारी ही पिढी खरच त्याच्याप्रती कृतज्ञ आहे का?
१५) भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवाचे स्थान दिले आहे. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकतो; पण आजच्या आधुनिक जगात हा मंत्र भिंतीवरच्या फोटो पुरताच उरला आहे की काय अशी शंका येते.
१६) जिवंत माणसाची सेवा करण्यापेक्षा मेलेल्या माणसाच्या नावाने दान करणे सोपे असते. कारण तिथे संवाद नसतो, फक्त दिखावा असतो. थोडक्यात हे वर्षश्राद्ध म्हणजे मृत व्यक्तींबद्दलचे प्रेम नसून समाजासमोर स्वतःची धार्मिक आणि प्रामाणिक प्रतिमा टिकवून ठेवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे.
१७) खरा धर्म कर्मकांडात नसून प्रामाणिकपणे केलेल्या कर्मात आहे.
१८) आपण उत्सवापुरते प्रामाणिक असतो, पण कर्तव्याच्या वेळी अप्रामाणिक होतो.
१९) प्रतीके ही प्रदर्शनासाठी नसून प्रेरणेसाठी असतात.
२०) जोपर्यंत सामान्य माणसाला आपल्या पदाचे कार्ड न दाखवता न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला समाज खऱ्या अर्थाने प्रामाणिक होऊ शकणार नाही.
२१) आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिलं
पण आम्ही त्यांना नागरिक म्हणून घडवू शकलो का?
२२) संविधान केवळ शाळेतील पुस्तकांच्या मुखपृष्ठावर किंवा न्यायालयाच्या भिंतीवर असून चालणार नाही. ते रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकाच्या वागण्यात उतरले पाहिजे.
२३) व्यवस्था म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. आपण बदललो की व्यवस्था बदलते.
२४) भ्रष्टाचाराच्या अंधारावर ओरडण्यापेक्षा स्वच्छ आणि पारदर्शक समाज निर्मितीसाठी स्वतःच्या वाटणीचा एक छोटा दिवा लावणे केव्हाही श्रेष्ठ असते.
२५) ज्या दिवशी आपण आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकू की, आज मी माझं कर्तव्य चोख बजावलं त्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा संपायला सुरुवात होईल.
पुस्तकातील ही वाक्ये वाचल्यावर आपण अस्वस्थच होतो असे नाही तर या अस्वस्थतेतून आपला एक नवा जन्म होत आहे असे आपल्याला वाटते. लेखकाने प्रामाणिकपणे स्वतःबद्दल तसेच जगात वावरताना डोळे उघडे ठेवून केलेल्या निरीक्षणांची मांडणी एवढी प्रभावी केलेली आहे की प्रत्येक वाचकाला हा लेखक आपल्या मनातलेच बोलतो आहे असे वाटते. पण आपण असे वागायला कचरलो, हेही मनातल्या मनात तो कबूल करतो.
मग आपण खरोखर प्रामाणिक आहोत का? हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. आपल्याला वाटतं आपण खूप प्रामाणिक आहोत, पण व्यवस्थेच्या गुंतागुंतीत वावरताना आपण नकळतपणे भ्रष्टाचाराचे छोटे छोटे भाग कसे बनतो? शाळेच्या डोनेशनपासून ते हॉस्पिटलच्या बिलापर्यंत आणि ट्रॅफिक सिग्नलपासून ते व्ही. आय. पी. ट्रीटमेंटच्या मोहापर्यंत… आपण प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणा जपतो आहोत का? हे पुस्तक म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर आपल्या चेहऱ्यावरील ‘प्रामाणिकपणाचा मुखवटा’ सोलून काढणारा एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. म्हणूनच संवेदनाशील माणसाला हे पुस्तक हालवून सोडते, त्याच्या हृदयाला हात घालते आणि त्याच्या बुद्धीला झंझोडते. ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ हे पुस्तकाचे शीर्षक अशाच असंख्य प्रश्नातून जन्माला आले आहे. पण जिथे अंधारच प्रकाशाचा मुखवटा घालून फिरतो तिथे प्रामाणिकपणापेक्षा अप्रामाणिकपणालाच उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही तरच नवल!
आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो की, जग भारताकडे एका वेगळ्या आकांक्षेने पाहत आहे. आपली भारतीय संस्कृती ही उच्च आहे. पण आपण या भारतीय संस्कृतीला आपल्या दुटप्पी वागण्याने काळीमा फासत आहोत, हे आपल्या कसे लक्षात येत नाही? हे पुस्तक आजच्या राज्यकर्त्यांपासून सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाचा दांभिक मुखवटा टराटरा फाडत आरशासमोर त्याला नागडेउघडे करते. या नागडेउघडेपणाला जेव्हा आपण धाडसाने सामोरे जाऊ तेव्हाच आपल्या समाजात परिवर्तनाला सुरुवात होईल. तसे जेव्हा होईल तेव्हाच या पुस्तकाच्या लेखकाच्या लेखणीचे सार्थक होईल. एवंच हे पुस्तक प्रत्येकाने डोके ताळ्यावर ठेवून वाचलेच पाहिजे अशी मी शिफारस करत आहे.
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ऑपरेशन सिंदूर” – लेखक : ले. जन. सुदर्शन हसबनीस (नि.) – अनुवाद : डॉ. प्रसाद कुलकर्णी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ऑपरेशन सिंदूर
लेखक : लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त.)
अनुवाद : डॉ. प्रसाद कुलकर्णी
पाने : २३६
किंमत : ₹३९५ / –
हे पुस्तक एप्रिल 2025 मध्ये घडलेल्या पहलगामवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचे आणि तत्पश्चात भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेल्या निर्णायक लष्करी प्रतिसादाचे सविस्तर आणि प्रभावी वर्णन सादर करते.
पाकिस्तानच्या पाठिंब्याने कार्यरत दहशतवादी पायाभूत संरचनेवर भारताने संयमाच्या भूमिकेतून बाहेर पडत गुप्तचर आधारित, अचूक हवाई व जमिनीवरील कारवाया कशा प्रकारे केल्या, या धोरणात्मक परिवर्तनाचा सखोल ऊहापोह पुस्तकात मांडलेला आहे.
सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण मोहिमा तसेच घटनेनंतर घडलेल्या जटिल राजनैतिक प्रयत्नांचेही यात तपशीलवार विश्लेषण आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, घटनाक्रमांचे तटस्थ विवेचन आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून, या घडामोडींनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात तसेच प्रादेशिक स्थैर्यात कसा महत्त्वपूर्ण व दीर्घकालीन बदल घडवून आणला, हे पुस्तक प्रभावीपणे उलगडते.
… सुस्पष्ट भाषा, तार्किक रचना आणि सोप्या पण प्रभावी शैलीमुळे हे पुस्तक विविध स्तरावरील वाचकांसाठी सहज वाचनीय तसेच पूर्णतः समजण्यास सुलभ ठरते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कर्तव्यपूर्ती” – लेखक / संपादक : कर्नल आनंद बापट (नि.) / प्रा. डॉ. सुभाष भावे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : कर्तव्यपूर्ती
लेखक / संपादक : कर्नल आनंद बापट / प्रा. डॉ. सुभाष भावे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
सशस्त्र सेनादलातील शिपाई व अधिकाऱ्यांविषयी सामान्यजनांच्या मनात नेहमीच एक सुप्त आकर्षण असते. सैन्यदलातील कठोर अनुशासन, खडतर प्रशिक्षण, सीमावर्ती व दुर्गम प्रदेशात कुटुंबापासून दूर राहून व्यतीत केलेला सेवाकाळ, शत्रूसोबत झालेल्या चकमकी आणि त्यामधून सैनिकांनी गाजवलेली मर्दुमकी, अशा विषयांवरच्या रम्य कथा ऐकण्यात सर्वांनाच औत्सुक्य वाटते.
परमवीर चक्र किंवा तत्सम शौर्यपदके प्राप्त केलेल्या वीरांच्या अनेक कथा आजवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु, प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यात कधी ना कधी, अत्यंत अवघड असे परीक्षेचे क्षण येऊन गेलेले असतात. भारतीय सैन्यदलांमध्ये असेही असंख्य वीर आहेत ज्यांनी शत्रूसोबत लढताना किंवा इतर काही कठीण प्रसंगांमध्ये असामान्य कामगिरी केलेली आहे, परंतु त्यांना प्रसिद्धीचे वलय लाभलेले नाही.
भारतीय नौदल, हवाई दल आणि भूदलातील अशाच काही शूर सैनिक व अधिकाऱ्यांच्या एकवीस सत्यकथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. आजवर प्रकाशझोतात न आलेल्या वीरांच्या कथादेखील वाचकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने हे पुस्तक संपादित केलेले आहे. लेखकांचा अल्प परिचयदेखील त्यांच्या कथांसोबत दिलेला आहे.
युद्धाच्या रम्य गोष्टी ऐकता-ऐकता, कधीतरी त्या कथा ऐकणाऱ्यांना स्वतःच अशा एखाद्या युद्धकथेचा भाग होण्याची स्फूर्ती मिळावी हा या पुस्तकाचा खरा हेतू आहे. या पुस्तकातील शौर्यकथा जर अधिकाधिक लोकांनी, आणि विशेषतः किशोरवयीन मुलामुलींनी व तरुण-तरुणींनी वाचल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन असेच शूरवीर घराघरातून उदयाला आले, तर या कथांचे मूळ लेखक आणि प्रस्तुत पुस्तकाचे संपादक भरून पावतील.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका प्रसिद्ध साहित्यिकाने म्हटले आहे. आयुष्य हे एक रियाज आहे. या विचारात जीवनाचे सार आहे. कोणतीही व्यक्ती एका दिवसात प्रगल्भ होत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न, निरंतर अभ्यास, चिंतन मनन, निरीक्षण आणि जीवनाकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन यांच्या रियाजातूनच व्यक्तिमत्व घडत असते. वस्तू व सेवाकर विभागातील सहायक राज्यकर आयुक्त तथा लेखिका सौ. मोहिनी हेडावू-किन्हीकर यांच्या ‘मनातलं’ या ललित लेखसंग्रहाचे वाचन करतांना हा विचार वारंवार मनात येत राहीला. प्रशासकीय जबाबदा-या सांभाळतानाही लेखिकेने आपल्या संवेदनशील मनाला जपले आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनात कार्यालयीन अनुभवांपेक्षा माणूस आणि जीवन अधिक ठळकपणे दिसते. या संग्रहातील प्रत्येक लेख हा जीवनाच्या एखाद्या साध्या अनुभवातून मोठा आशय उलगडून दाखवतो. भाषा अत्यंत सुलभ, कुठेही कृत्रिम अलंकाराचा अतिरेक नाही. म्हणूनच हे लेख वाचतांना ते वाचकाच्या मनात सहज उतरतात. या पुस्तकातील काही निवडक लेखांनी माझ्या मनावर उमटविलेला ठसा येथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘मोनालिसाः सृजनाची अमरता’ या पुस्तकातील पहिल्याच ललित लेखात लेखिकेने मोनालिसा आणि लिओनार्दो दा विंची या फ्रेंच चित्रकारातील काल्पनिक पत्रसंवाद रचला आहे. त्यात मोनालिसा आपले भावविश्व व्यक्त करते. ‘तू तर मर्त्य आहेस; मी मात्र अमर झाले आहे’ हे मोनालिसाचे वाक्य अत्यंत प्रभावी वाटते. कलाकार नश्वर असतो; परंतु त्याची सृजनकृती त्याला अमरत्व प्राप्त करून देते. हा गहन विचार या लेखातून व्यक्त होतो. हा लेख वाचतांना मला विनायक होगाडे यांच्या डिअर तुकोबा या पुस्तकातील काल्पनिक संवादाची आठवण झाली.
‘रिचार्जिंग रिलेशनशीप’ संवाद मनामनांचा आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या माणसांशी संवाद साधायलाच विसरत चाललो आहेत. हा लेख याचे आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. मी इतका व्यस्त आहो का? की दोन मिनिटेही माझ्या माणसांसाठी वेळ देऊ शकत नाही? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. लेखिकेच्या जीवनात लोकसंग्रह आणि संवादाला असलेले महत्व या लेखातून जाणवते. हा लेख वाचतांना डेल कानेंगी यांच्या How to win afriends and influence the people या पुस्तकाचे मला स्मरण झाले. आंतरवैयक्तिक संबंध कसे जोपासावेत याचे मार्गदर्शन दोन्ही लेखनातून मिळते. ‘तुर्कनामा- मीना प्रभू’ प्रवासातून घडणारे संस्कार मीना प्रभू यांच्या तुर्कनामा या पुस्तकावरील लेखिकेचे परीक्षण वाचतांना प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नसून संस्काराची प्रक्रिया आहे हे प्रकर्षाने जाणवते. प्रवासातून इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती आणि समाज समजून घेण्याची दृष्टी विकसित व्हावी हा संदेश या लेखातून मिळतो. तुर्कीतील लोकांनी आक्रमणांच्या काळात जीवितरक्षणासाठी जमिनीखाली उभारलेल्या निवासस्थानांचा उल्लेख वाचतांना प्रतिकुल परिस्थितीतही माणूस जगण्याची आशा कशी जपतो Scanned with OKEN Scanner याची जाणीव होते. त्यामुळे हा लेख वाचतांना मला व्हीक्टर फकल यांच्या ‘मॅन्स सर्च फॉर मिनींग’ (Man’s Search for Meaning) या पुस्तकाची आठवण झाली. संकटातूनही अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा या दोन्ही लेखनातून समानपणे जाणवते. ‘माझी आवड: आंबा’ हा लेख माझ्या विशेष आवडीचा ठरला. कोकणातील हापूस आंब्याचा रंग, सुगंध, स्पर्श आणि चव यांचे लेखिकेने केलेले वर्णन हे फळाचे वर्णन राहत नाही तर जीवनातील आनंदाचा उत्सव बनतो. हा लेख वाचतांना मला एक वैयक्तिक प्रसंग आठवला. एकदा मी माझ्या घरच्या अंगणातील झाडाचे केशर आंबे लेखिकेला दिले होते. त्यावेळी त्यांनी आंब्याचा आनंद अगदी याच संवेदनशीलतेने व्यक्त केला होता. त्यामुळे मला हा लेख अधिक जिव्हाळयाचा वाटला. माझ्या दृष्टीने आंबा हे केवळ फळ नसून लेखिकेच्या बालपणातील आठवणी, साधेपणा आणि जीवनतील आनंदाचे प्रतीक आहे. ‘मनाचे उत्खनन’ आत्मपरीक्षणाचा प्रवास निरंजन घाटे यांच्या फार फार वर्षांपूर्वी या पुस्तकातील उत्खनन या संकल्पनेचा संदर्भ घेऊन लेखिकेने मनाचे उत्खनन ही सुंदर कल्पना उभी केली आहे. या लेखाने मला सर्वाधिक अंतर्मुख व्हायला भाग पाडले. राग, देष, लोभ, मोह, भीती यासारख्या भावनांकडे तटस्थपणे पाहण्याचा संदेश या लेखातून मिळतो. हा लेख वाचतांना तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली विपश्यना साधना आणि वर्षभरापूर्वी मला आलेला विपश्यनेचा अनुभव पुन्हा जागा झाला. आपल्या अंतर्मनात डोळसपणे डोकावणे कसे गरजेचे आहे हा संदेश या लेखातून वाचकांना मिळतो. ‘रोमान्सः अनुभूतीचा नवा अर्थ’ रोमान्स या शब्दाचा केवळ प्रेमाशी संबंध नसतो. जीवनातील साध्या क्षणांचा मनापासून अनुभव घेणे-वाफाळलेला चहाचा घोट, झाडांचा स्पर्श, फुलांचा सुगंध, स्वैर चालणे, समुद्राची गाज हे ही रोमँटिक असू शकते अशी व्यापाक संकल्पना लेखिकेने मांडली आहे. हा लेख वाचल्यानंतर जीवनातील छोटया छोटया गोष्टींकडे नव्या नजरेने पाहावेसे वाटते. ‘मनातलं’ हा ललित लेखसंग्रह वाचतांना मला सतत एक गोष्ट जाणवत राहिली. जीवनातील साध्या अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहिले तर त्यातूनही साहित्य जन्म घेऊ शकते. ‘मनातलं” हा ललित लेखसंग्रह केवळ वाचण्याचा नाही, तर जगण्याचा अनुभव आहे. साध्या अनुभवांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी हा संग्रह वाचकाला देतो. म्हणूनच हा संग्रह केवळ साहित्यप्रेमींनी नव्हे, तर जीवन अधिक समृध्द करु इच्छिणा-या प्रत्येकाने वाचला पाहिजे.
(टीपः हा लेख वाचक म्हणून लिहिलेला वैयक्तिक अभिप्राय आहे.)
परिचय : नारायण काळे
राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवाकर विभाग
प्रस्तुती : मोहिनी हेडावू
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘आहे हे असं आहे’ – लेखिका : गौरी देशपांडे ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆
पुस्तक : आहे हे असं आहे (कथा संग्रह)
लेखिका : गौरी देशपांडे
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
पृष्ठ: १६७
मूल्य: २७० ₹
पुस्तके ही केवळ अक्षरांची मांडणी नसते; ती मानवी मनाचा आरसा असतात. ती विचारांना चालना देतात, भावनांना शब्द देतात आणि जीवनातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रेरणा देतात. काही पुस्तके वाचून संपतात तर काही मनात कायमची रुजतात. मराठी साहित्यात अशा प्रभावी लेखिकांमध्ये गौरी देशपांडे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांच्या ‘आहे हे असं आहे’ या कथासंग्रहाने माझ्या विचारविश्वावर विशेष प्रभाव टाकला.
‘आहे हे असं आहे’ हा केवळ कथासंग्रह नाही तर मानवी मनातील सूक्ष्म भावभावनांचा, नात्यांतील गुंतागुंतीचा आणि आधुनिक जीवनातील वास्तवाचा संवेदनशील वेध घेणारी साहित्यकृती आहे. गौरी देशपांडे यांच्या कथा वाचताना प्रत्येक पात्र आपल्या आसपासचेच वाटते. त्यांच्या आनंदात, वेदनेत, संघर्षात आणि एकटेपणात वाचक नकळत सहभागी होतो. हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकद आहे.
या पुस्तकातील भाषा साधी असली तरी ती अत्यंत अर्थगर्भ आणि काव्यमय आहे. शब्दांचा अनावश्यक डौल न मिरवता लेखिका थेट मनाशी संवाद साधतात. नात्यांमधील प्रेम, अपेक्षा, तुटलेपण, स्वातंत्र्याची ओढ आणि व्यक्तिमत्त्वाचा शोध या विषयांना त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले आहे. त्यामुळे प्रत्येक कथा वाचल्यानंतर मन बराच वेळ विचारमग्न राहते.
या पुस्तकाने मला जीवनाकडे अधिक समंजस नजरेने पाहायला शिकवले. प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे तिचे अनुभव, संघर्ष आणि भावविश्व दडलेले असते, याची जाणीव या कथांनी करून दिली. दुसऱ्यांविषयी सहानुभूती, संवादाचे महत्त्व आणि नात्यांमधील विश्वास यांचे मूल्य या पुस्तकामुळे अधिक स्पष्ट झाले. जीवन काळे किंवा पांढरे नसते त्यात अनेक छटा असतात, हा महत्त्वाचा विचारही या पुस्तकातून उमगला.
गौरी देशपांडे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद, मनोविश्लेषण आणि स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण. त्यांच्या कथा कोणताही उपदेश करत नाहीत.. त्या वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. म्हणूनच त्यांच्या साहित्याचा प्रभाव दीर्घकाळ मनात टिकून राहतो. त्यांच्या लेखणीतून व्यक्त होणारी संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करतो.
आजच्या बदलत्या समाजात नाती, मूल्ये आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांविषयी नव्याने विचार करण्याची गरज आहे. अशा वेळी गौरी देशपांडे यांचे साहित्य अधिक अर्थपूर्ण वाटते. त्यांच्या कथा माणसाला स्वतःकडे आणि समाजाकडे अधिक संवेदनशील दृष्टीने पाहायला शिकवतात.
म्हणूनच ‘आहे हे असं आहे’ हा कथासंग्रह माझ्यावर प्रभाव पाडणारा अप्रतिम ग्रंथ आहे. त्याने मला केवळ साहित्याचा आनंद दिला नाही तर जीवन समजून घेण्याची नवी दृष्टीही दिली. विचारांना समृद्ध करणारे, मनाला स्पर्श करणारे आणि माणुसकीची जाणीव अधिक गहिरी करणारे हे पुस्तक मराठी साहित्यातील एक उल्लेखनीय ठेवा आहे.