☆ “स्वातंत्र्यायण” – लेखक : श्री सचिन शरद कुसनाळे ☆ परिचय – श्रीशैल चौगुले ☆
स्वातंत्र्यायण
लेखक : श्री सचिन शरद कुसनाळे
प्रकाशक : तेजश्री प्रकाशन इचलकरंजी.
पृष्ठे : २०५.
मूल्य “ रु. २००/-
नुकतेच “स्वातंत्र्यायण” हे अभ्यासात्मक चिंतनयुक्त पुस्तक वाचून हातावेगळे झाले.
शिक्षक आदरणीय सचिन कुसनाळे यांनी हे पुस्तक अतिशय चोखंदळ विचार व अंतर्मुख चिंतनातून तात्वीक दृष्टीकोनातून सूक्ष्म अध्ययनातून लिहिलेले दिसून येते.
सचिन कुसनाळे सर यांचे “ मी अस्तिक का? “ हे पुस्तक अस्तिक नास्तिक या विषयातून स्वविचारातून अस्तिकच का हा मुलभूत प्रश्न वैचारिक, तात्वीकतेने मांडले होते. तद्नंतर “ स्वातंत्र्यायण ” या पुस्तकात नेमकी स्वातंत्र्याची व्याख्या, अतिशय व्यापक व सजीव निर्माल्य स्वरुपात कशी आहे याचे विस्तारात्मक विचार आध्यात्मिक, तात्विक, सामाजिक ,राजकीय, नैतिक-अनैतिक व बऱ्याच अर्थाने आपणास ज्ञान देऊन जाणारे अभ्यासात्मक लेखन या पुस्तकाद्वारे दिसून येते.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ ‘ सामाजिक राजकीय क्रांती ‘ ही मर्यादित वैचारिकता नसून, ती ‘स्व’ पासून ‘स्व’ च्या भौतिक अभौतिकत्वाचे कारणातूनही निर्माण होणे गरजेचे आहे असे लेखक यातून स्पष्ट करतात.
मुक्तानुभाव हा स्वातंत्र्याचा प्राण आहे. या वाक्यापासूनच या पुस्तकातील विवेकबुद्धी विचाराची प्रचिती येऊ शकते.
एकुण ५४ पाठात हे पुस्तक विविधांगाने, स्वातंत्र्य म्हणजे काय ? यातील नेमकेपणा साधून – “ स्वातंत्र्य म्हणजे इतिहास नागरिकशास्त्र राजकारण नसून, एक सर्वांनी आत्मसात करणेचे जीवनतंत्रच आहे “असे प्रबोधनात्मक अंतर्मुख विचार ते मांडतात. ‘ स्वातंत्र्यायण ‘ हे पुस्तक एक अभ्यासास अनुकूल असे पुस्तक आहे. आज स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त अशी यशस्वी लेखननिर्मिती सचिन कुसनाळे सरांच्याकडून झाली आहे असे म्हटले, तर मराठी भाषेतील चिंतनात्मक दर्जा उंचावणारे हे लेखन आहे असेच म्हणावे लागेल.
सर्वांनी फक्त एकवेळ नाही, तर अनेकवेळा वाचन करून संग्रही ठेवण्यासारखी ही उज्वल ग्रंथनिर्मिती आहे., असेच म्हणावेसे वाटते.
लेखकांना या निर्मीतीसाठी ज्ञानदायी शुभेच्छा !
परिचय – श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ Energize Your Mind – लेखक – गौर गोपाल दास ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆
पुस्तक – Energize Your Mind
लेखक – गौर गोपाल दास
पृष्ठ संख्या – ३०९
प्रकाशक – पेंग्विन इंडिया
किंमत – रुपये २९९
सध्याच्या काळात अध्यात्मिक, आयुष्याला प्रेरणा देणारे विचार विनोद बुद्धीने जगासमोर मांडणारा एक योगी पुरुष — अशी ज्याची जगभर ख्याती आहे असा आघाडीचा योगीपुरुष…. गौर गोपाल दास. स्वामी प्रभुपादजी यांच्या पंथाचा एक शिष्य. प्रभु गौर गोपाल दासजी सकारात्मक ऊर्जा देणारे,जीवनशैली प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते आहेत .
“Energize Your Mind“ हे त्यांचे दुसरे इंग्लिश पुस्तक. स्वतःच स्वतःचे विचार, मनाची अवस्था, भावना यांवर ताबा कसा मिळवायचा आणि आयुष्यात यशस्वी कसे व्हायचे, यावर बाजारात अनेक पुस्तके, सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. असे असताना या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय?
“आपल्याला आनंदी राहायचे असेल तर आपण कसे बदलले पाहिजे?” हे सांगताना लेखक लोकांना पोकळ सल्ले देत नाही. तर त्या अनुषंगाने स्वतःला आलेले अनुभव तो कथन करतो. स्वतःच्या उदाहरणांवरून त्यांनी एक एक मुद्दा विशद केला आहे. त्यातून मी कसा घडत गेलो हे त्यांनी मांडले आहे. एका योगीचे जीवन आणि सर्व सामान्य माणसांना येणारे रोजच्या आयुष्यातील प्रश्न यात फरक आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचताना, आपण आपल्या आयुष्याशी त्याचा संबंध सहजरित्या जोडू शकतो.
दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पुस्तकाची भाषा. अतिशय साधी सरळ सोपी भाषा. भाषा इंग्रजी असली तरीही सर्व साधारण वाचकांना तितक्याच सहजपणे समजेल आणि आत्मसात होऊ शकेल, असे हे पुस्तक. प्रत्येक प्रकरणाची सुरवात एखादे सुंदर वाक्य उद्घृत करून केली आहे. तसेच प्रकरणाच्या शेवटी सारांश दिलेला आहे. यात आपल्याला अभ्यास करायला प्रश्न दिलेले आहेत. यातून आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघू शकतो.
आपले आयुष्य, आपल्या मनात येणारे विचार, त्यामुळे होणारी मनाची स्थिती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना याला कारणीभूत कोण असतो? यावर आधारित लेखकाने पुस्तकाचे चार विभाग पाडले आहेत. ते अतिशय चपखल आहेत. पहिला भाग, मी व माझे मन. दुसरा भाग इतर व माझे मन. तिसरा, मी व इतरांचे मन आणि शेवटचा भाग म्हणजे हे चराचर विश्व व माझे मन. चार विभागात मिळून एकूण पंधरा प्रकरणे या पुस्तकात आहेत.
या पुस्तकाची सुरवातच अशी होते की , “आपण सोफिया नाही. आपण माणूस आहोत.” म्हणजे काय तर आपण रोबो नाही. मनुष्य आहोत. याचाच अर्थ आपल्याला भावना आहेत. त्याची जाणीव व अनुभव घ्यायला शिकले पाहिजे. त्यांच्याशी सामना करता आलं पाहिजे. त्यांना बरं करता आलं पाहिजे. आपल्या मनातल्या भीती, चिंता- काळजी, नैराश्य आणि सर्वात शेवटची व महत्वाची भावना म्हणजे अपराधीपणाची यातून बाहेर पडण्याची गरज असते. या भावना बऱ्या करताना गरज पडली तर बाहेरच्या समुपदेशनाची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. हे स्वानुभवातून लेखकाने सांगितले आहे. एकाच भावनेला अनेक छटा असतात. त्याचा एक तक्ताच या पुस्तकात दिला आहे.
इतरांच्या वागण्याचा आपल्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा? यासाठी त्यांनी स्वतःबद्दल एक किस्सा सांगितला आहे. हा योगी पुरुष आयुष्यातील तत्व किंवा अध्यात्मिक विचार हलक्या फुलक्या रितीने आपल्या भाषणातून मांडत असतो. विनोद करत आयुष्यातील विरोधाभास उलगडून दाखवणे, ही त्यांची खासियत आहे. पण याच कलेवरून त्यांना त्यांच्याच आश्रमातील एक वरिष्ठ योगी उलट सुलट बोलून जातो, ते देखील पहाटेच्या वेळी ध्यानाला बसलेले असताना. अशावेळी योगी असला तरी लेखकाची काय अवस्था होते? ते या गोष्टीला कसा प्रतिसाद देतात? ही गोष्ट आपण वाचून समजून घेतली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक वागण्याची यादी दुसऱ्या भागात दिली आहे. प्रत्येकामध्येच यातील गुण कमी-अधिक प्रमाणात असतात. ते प्रसंगानुरूप दिसून येत असतात. त्यापासून आपला बचाव करत स्वतःला शक्तिशाली करण्याची जबाबदारी आपली असते. वाईट आठवणी पुसून टाकायच्या व आयुष्यातील तीव्र दुःखाच्या वेदनेतून जातांना स्वतःला वृध्दिंगत करायचे असते. दुःखाचे पाच टप्पे असतात. नाकबूल असणे, राग, दुःखाचा सौदा, नैराश्य व नंतर त्याचा स्वीकार. दुःखाचे हे पाच टप्पे आपण कदाचीत परत परत अनुभवत असतो. पण त्याला सामोरे जायला आपण खंबीर झालेले असतो.
लोकांच्या वागण्या-बोलण्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल; तर आपल्या वागण्या-बोलण्याचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम नाही का होणार? याचा सुध्दा विचार आपण केला पाहिजे. आपल्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे ना, याकडे थोडे लक्ष दिले पाहिजे. समोरच्या माणसाच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि सुरी, खंजीर व बाण यापेक्षा शब्द हे किती धारदार अस्त्र आहे, याचा विसर पडता कामा नये.
भारतीय संस्कृती, रामायण-महाभारतातील दाखले देत, योगविद्येने या पुस्तकाचा शेवट होतो. आपल्या मनाचा अन्नमय कोषापासून सुरु होणारा प्रवास सरतेशेवटी आनंदमयकोषात कसा करता येईल, याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात लिहिले आहे. आपण योगी नसून योग्यासारखे म्हणजे आनंदमय जीवन जगू शकतो. ही जाणीवच मनाला आनंद देते.
लेखकाने पुस्तकात अगदी थोडे संस्कृत श्लोक उद्धृत केले आहेत. संस्कृत श्लोक इंग्रजी लिपीमध्ये वाचायला आपल्याला थोडे कठीण वाटते. लेखकाने मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. पुस्तकात अनेक ठिकाणी त्याचे संदर्भ दिले आहेत. त्याचबरोबर आपला मुद्दा सांगताना वेळोवेळी अनेक छोट्या- छोट्या गोष्टी लेखकाने सांगितल्या आहेत. कधी कधी त्या लांबवल्यासारख्या वाटतात.
असे असले तरी हे छोटे पुस्तक एकदा हातात घेतल्यानंतर आपण झपाटल्यासारखे वाचून पूर्ण करतो व मगच खाली ठेवतो.
☆ “माझं चीज कोणी हलवलं?“ – मराठी अनुवाद – शरद माडगूळकर ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆
मूळ इंग्रजी पुस्तक – “Who Moved My Cheese?“
मराठी अनुवाद – शरद माडगूळकर
प्रकाशक – मंजुल पब्लिशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड
किंमत – 125-/ रुपये
पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो, काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही मनात खूप दिवस घोळत राहतात. काही खूप काही शिकवतात, काही अंतर्मुख करतात. आज ज्या पुस्तकाबद्दल सांगतेय ते एक लहानसे पण फार मोठं तत्व शिकवणारे पुस्तक आहे. “माझं चीज कोणी हलवलं?” हे ते पुस्तक! अगदी छोटेसे, एका बैठकीत पूर्ण होणारे, खूप काही सकारात्मक बदल आपल्यात घडवण्याची शक्ती असलेले डॉ. स्पेंसर जॉनसन ह्यांच्या ओघवत्या भाषाशैलीतील हे पुस्तक. मूळ इंग्रजीतील “Who Moved My Cheese?“ ह्या पुस्तकाचा शरद माडगूळकर ह्यांनी केलेला हा अनुवाद.
ह्या पुस्तकात आपल्याला भेटतात दोन छोटे उंदीर, स्निफ आणि स्करी नावाचे आणि त्याच आकाराची दोन छोटी माणसेही हेम आणि हॉ! या चार काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन जगण्यातील एक शाश्वत सत्य लेखकाने मांडलंय. जगात प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा संघर्षाचा सामना करावा लागतो. ह्यात अनेकदा आपण रस्ता चुकतो, भरकटतो, गोंधळून जातो. पण आपण ज्या परस्थितीत आहोत ती परिस्थिती कायम तशीच राहावी अशी आपली अपेक्षा असते. त्यामध्ये काहीही बदल झाला तर आपण गडबडून जातो. तो बदल आपल्याला अजिबात सहन होत नाही.
अगदी साधे उदाहरण द्यायचे तर आपल्याकडे रोज येणारी कामवाली बाई! ती आपलं सगळं काम व्यवस्थित करत असते. घरातलं तिला सगळं माहिती झालेलं असतं. त्यामुळे आपण निश्चिंत असतो. तिचे दोन तीन खाडे वगैरे आपण गृहीत धरलेले असतात. अन अचानकच एका दिवशी ती सांगते की ती उद्यापासून येणार नाही. ती कुठेतरी जाणार आहे किंवा तिची काहीतरी वैयाक्तिक अडचण आहे. आता त्या क्षणाला कुठल्याही गृहिणीची काय अवस्था होते ते सांगायलाच नको. अगदी आभाळ कोसळल्यासारखी गत होते! कारण तिची आपल्याला इतकी सवय झाली असते की त्या क्षणी सगळं त्राणच निघून जातं. आता कसं होणार आपलं म्हणून? वास्तविक पाहता दुसरी बाई शोधणं काही फार कठीण नसतं. थोडंसं चार दोन दिवसात तिलाही कामाचं तंत्र अवगत होणारच असतं. पण बदल म्हटला की मनुष्यस्वभाव त्याचं स्वागत करायला तयार होत नाही पटकन! खरं तर असलेल्या बाई बद्दल अनेक तक्रारी असतात आपल्या. पण दुसरी बाई हिच्यापेक्षाही चांगली मिळू शकते असा सकारात्मक विचार फार क्वचित करतो आपण!
तर हे छोटेखानी पुस्तक माणसाच्या नेमक्या ह्या स्वभाववैशिष्ट्यावर प्रकाश टाकते. वर उल्लेख केलेली चारही पात्रे चीज च्या शोधात एका भुलभुलैय्यात जातात. खूप शोधल्यावर एके दिवशी त्यांना हवे असलेले भरपूर स्वादिष्ट चीज त्यांना सापडतं. चौघेही निश्चिंत होऊन त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात. भरपूर स्वादिष्ट चीज आपल्याला मिळतच राहणार हे ते गृहीत धरायला लागतात. थोडक्यात त्याची त्यांना सवय होऊन जाते. असे अनेक दिवस मजेत गेल्यावर हळूहळू कमीकमी होत जाणारे ते चीज एकदा पूर्णपणे संपते. आता मात्र ‘असंही कधी होऊ शकतं!’ हे अजिबातच गृहीत न धरल्याने चौघेही हतबल होतात. पण त्यानंतर चौघे त्या परिस्थितीला कसे कसे सामोरे जातात आणि त्याचा काय परिणाम होतो ते लेखकाने खूप छान परिमाणकारक रीतीने रंगवले आहे.
ह्या छोट्याश्या गोष्टीत चीज म्हणजे तुमचा जॉब, तुमचा उद्योग, पैसे, ऐश्वर्य, स्वातंत्र्य, आरोग्य ह्यापैकी काहीही जे तुम्हाला आयुष्यात मिळवावेसे वाटते ते ते! आपली प्रत्येकाची चीज ची कल्पना वेगवेगळी असते आणि आपण ह्या जगरूपी भूलभुलैय्यात ते शोधत असतो. कधीनाकधी ते आपल्याला मिळतंही. एकदा मिळाल्यावर हे चीज आपण सहजासहजी सोडत नाही. मात्र हे कधी परिस्थितीनुरूप हरवले किंवा नाहीसे झाले तर आपल्याला सहन होत नाही. थोडक्यात आपल्या दैनंदिन आयुष्यात कालानुरूप झालेला बदल आपण सहजासहजी पचवत नाही. पण ज्या व्यक्ती बदल घडल्यावर योग्य निर्णय घेऊन त्याला सामोरे जातात त्याच शेवटपर्यंत तग धरू शकतात. ज्या चीजचा तुम्ही आम्ही आस्वाद घेताय ते कधीतरी संपणारच आणि ते संपल्यावर नवीन चीज शोधायला तुम्हाला हातपाय हलवावेच लागणार, त्या बदलाचा स्वीकार केला तरच पुन्हा नवीन चीज सापडेल आणि तुम्ही परत आनंदी व्हाल हा सोपा पण महत्वाचा जगण्याचा मंत्र ह्या छोट्याश्या रूपकात्मक गोष्टीतून आपल्यासमोर येतो. पुस्तकाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यात मधून मधून चीजच्या मोठमोठ्या तुकड्यांची चित्रे आहेत अन प्रत्येक तुकड्यावर सारांश रूपाने सोप्या भाषेतली सकारात्मक वाक्ये आहेत जी आपणाला खूप काही शिकवून जातात अन सोबतच आनंददायी जगण्याचा एक सुंदर, सोपा मंत्र देऊन जातात.
किती वेळेस मी वाचलं असेल ह्याची गिनतीच नाही “नॉट विदाऊट माय डॉटर ” कुठलाही निराशेचा क्षण अलगद पुसून काढते हे पुस्तक. परक्या देशात परक्या माणसात आपल्या मुलींसाठी दिलेला एका आईचा एकाकी लढा. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही सत्य कथा.
बेट्टी महमुदी यांचे पती मुडी महमुदी हे अमेरिकेत डॉक्टर होतें. मूलतः इराणी आणि कट्टर धार्मिक, त्यांची मुलगी महातोब यांच्या भोवती ही कथा फिरते. लग्नानंतर चार वर्ष अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर स्वतःच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणायला मुडी दोघीना इराण मध्ये घेऊन जातो. तुम्हाला तिथलं वातावरण खूप आवडेल तुम्हाला हवं तेव्हा परतव येवू ह्या अटीवर दोघीना घेऊन इराण ला येतो.पण इथे आल्यावर तो एकदम बदलतो. आपल्या कुटुंबियांसमवेत मिळून अनेक बंधने लादतो.कट्टर धार्मिक वातावरण असलेल्या घरात तो बेट्टी आणि माहतोब ला घेऊन येतो. तिथे कट्टर धार्मिकता पाळाली जातं असतें. अस्वच्छता अज्ञान आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या ठिकाणी दोघी राहण्यासाठी अजिबात खूष नसतात मोकळ्याविचारांच्या बेट्टीला हे सहन करणे आणि बुरखा सॉक्स चादोर सह वावरणे असहाय्य होतें. ती अमेरिकन एम्बसीतून मदत मिळवण्याचा प्रयत्न करते पण पकडली जाते आणि तिच्या शारीरिक व मानसिक अत्याचारांना सुरुवात होते सुटकेचे सगळमार्ग संपलेले असताना बेटीने पुन्हा तसे करू नये म्हणून महातोब ला ठेवुन घेऊन तिला अमेरिकेत जायचे असल्यास जावे असेही तिला सांगण्यात आले. पण बेट्टी अजिबात तयार नव्हती योग्य संधी मिळे परियंत ती परिस्थितीशी समझोता करते आणि मुलीला जराही डोळ्याआड न करता जगत असतें अशातच अमेरिकेसोबत इराण चे युद्ध सुरूहोते आणि बेट्टीच्या हलामध्ये जास्त वाढ होतें. एका खासगी एजंटच्यामदतीने डोंगराळ भागातून बर्फाने आच्छादलेल्या डोंगरांमधून कधी चालत कधी घोड्यावर कधी टेम्पोने असा प्रवास करत ती तुर्कस्तानात दाखल होतें तिथे अमेरिकन एंबसी ची मदत घेऊन अमेरिकेत आपल्या आई वडिलांना जवळ पोहचते.
मुली साठी वाट्टेल ती हाल अपेष्टा सहन करत बेट्टी अमेरिकेत पोहचते पण मुलीशिवाय परतणे तिला नामंजूर असते.
एका आईच्या सहसची आणि चिकाटीची सत्य कथा प्रत्येकाने जरूर वाचावी.
कथेत खूप काही असे प्रसंग आहेत जिथे बेट्टीची जिद्द आपल्याला अतिशयोक्ती वाटते पण एक आई म्हणून विचार केला की एक आईसाठी हे अशक्य नाही असेही वाटते..
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “विवेकी पालकत्व” – डॉ. अंजली जोशी ☆ श्री ओंकार कुंभार ☆ ☆
पुस्तक -विवेकी पालकत्व
लेखिका – डॉ. अंजली जोशी
प्रकाशक – शब्द प्रकाशन
पृष्ठ संख्या – 204
किंमत – 275
नावावरून पालकांसाठीच वाटणारं हे पुस्तक पालकांसाठी तर महत्वाचे आहेच, त्याचबरोबर सर्वच स्री-पुरूषांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे.
या पुस्तकाच्या लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्राच्या अनुषंगाने संशोधन करून पी.एच.डी ही पदवी संपादन केली आहे. एवढेच नाही तर स्वतःच्या मुलांचे संगोपन ही या पद्धतीने केले आहे. त्यामुळे हे लेखन अनुभवसिद्ध असे आहे.
विवेकी पालक होणे ही तशी सोपी गोष्ट नाही. परंतु, निश्चितच ती अशक्य गोष्ट नाही. फक्त त्यासाठी नियमित सजगता मात्र हवी. आपल्या धारणा तपासून घ्यायला हव्यात. आपल्यात बदल झाल्याशिवाय त्याची रुजवात पाल्यात होणार नाही हेही लक्षात घ्यायला हवे.
त्यासाठी आपल्याला हे पुस्तक सर्वतोपरी मदत करते. पुस्तकाची मांडणी खूपच सुंदर आहे. विविध उदाहरणांद्वारे रंजक पद्धतीने विवेकी पालकत्व हा विषय लेखिकेने मांडला आहे. त्यामुळे विषय व आषय समजायला सोपे जाते.
हे पुस्तक ज्यांच्यामुळे माझ्या वाचनात व संग्रहात आले व सातत्याने आम्हा मंडळींना वाचनास नेहमी प्रोत्साहित करत असतात, त्या श्री. राजेंद्र घोडके सरांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.
शेवटी सर्वांना विनंती की, आवर्जून सर्वांनी हे पुस्तक लवकरात लवकर वाचावे.🙏
सुनीताबाई देशपांडे! मराठी साहित्यसृष्टीतील एक अढळ तारा, महाराष्ट्राचे सर्वाधिक लाडके अन लोकप्रिय लेखक, पु. ल. देशपांडे ह्यांच्या अर्धांगिनी! हे एक सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व! प्रखर, तीक्ष्ण बुद्धीमत्तेचं वरदान लाभलेली ही स्त्री मंगला गोडबोलेंच्या “सुनीताबाई” ह्या पुस्तकातून आपणासमोर विविध मनोज्ञ रूपात उलगडत जाते. पुस्तकाच्या सुरवातीलाच मंगलाताई म्हणतात की हा काही गौरव ग्रंथ किंवा स्मृती ग्रंथ नाही किंवा आरतीसंग्रह नाही तर त्यांना उमगलेल्या ह्या विलक्षण व्यक्तिमत्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे संस्मरण नुसतेच रंजक नसून अनेक वेगवेगळ्या अर्थांनी उदबोधक झाले आहे. 1990 साली प्रसिद्ध झालेल्या सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी …’ ह्या परखड आत्मचरित्रपर पुस्तकाने साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली होती. अगदी मुखपृष्ठापासूनच आगळ्या वेगळ्या ठरलेल्या ह्या पुस्तकावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सुनीताबाईंवर भरपूर टीकाटिप्पणी ही झाली आणि तरीही त्यावर्षीच ते सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरलं. मंगला गोडबोलेंनी “सुनीताबाई” पुस्तकात “आहे मनोहर तरी..” मधले बरेच संदर्भ वापरले आहेत.
“सुनीताबाई” हे पुस्तक तीन भागांमधे विभागले आहे. “असं जगणं”, “असं लिहिणं” आणि “असं वागणं” !
“असं जगणं” मधे सुनीताबाईंच्या अगदी बालपणापासूनचे सगळे वर्णन आलेले आहे. सुनीताबाईंचे वडील म्हणजे रत्नागिरीचे प्रसिद्ध फौजदारी व सरकारी वकील सदानंद महादेव ठाकूर उर्फ अप्पा! त्यांच्याकडून आपण निवृत्ती तथा निर्मोहीपणा उचलला तर आई सरलादेवींकडून आपणास मोठ्यांदा बोलणं, कुणाचंही तोंडावर कौतुक न करता येणं, स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा, दीर्घोद्योगीपणा आणि लक्ख गोरा रंग ह्या गोष्टी वारसाहक्काने मिळाल्या असं त्या म्हणत. ही सारी स्वभाव वैशिष्ट्ये त्या आठही भावंडांमध्ये थोड्याफार फरकाने आलेली होती. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत रत्नागिरीत राहिलेल्या सुनीताबाईंसाठी ‘रत्नागिरी’ हा कायम जिव्हाळ्याचा विषय होता. लहानपणा पासूनच त्या अतिशय बुद्धिमान, मेहनती, ध्येयवादी, कलासक्त आणि जिद्दी होत्या. हातात घेतलेलं कुठलंही काम परफेक्ट करण्याकडे त्यांचा कल असायचा. सोळाव्या वर्षी मॅट्रिक च्या परीक्षेत अतिशय चांगले यश मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या भावासोबत मुंबईला आल्यात. पण त्याचवेळी ‘चले जावं’ चळवळीला तोंड फुटलं आणि सुनीताबाईंनी शिक्षणाला रामराम ठोकून स्वतः ला त्यात झोकून दिलं. चळवळीने त्यांच्या विचारांना आणखी समृद्ध करत जीवनाला एक वेगळी दिशा दिली. स्वतः मधल्या क्षमतेची त्यांना जाणीव झाली. साधेपणातल्या मूल्यांची ओळख पटली. स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी मग माटुंग्याच्या एका शाळेत नोकरी पत्करली. तेथेच त्यांची पुलंशी ओळख झाली आणि हळूहळू ओळखीचे रूपांतर स्नेहबंधात झाले. आणि बघता बघता पुलंमधल्या उमद्या कलावंताच्या प्रेमात सुनीताबाई केव्हा पडल्या त्यांनाही कळले नाही! त्या काळातही सुनीताबाईंचे विचार खूप सुधारक होते. लग्न नावाचे कृत्रिम बंधन त्यांना अनावश्यक वाटत होते. परंतु पुलंना कोणत्याही पद्धतीचे का होईना पण लग्न हवेच होते. त्यामुळे मग अतिशय साध्या नोंदणी पद्धतीने 12 जून 1946 ला त्यांचे लग्न पार पडले. त्यासाठी लागणारा आठ आण्यांचा फॉर्म सुद्धा दुसऱ्याला त्रास किंवा भुर्दंड नको म्हणून सुनीताबाईंनी स्वतःच आणून ठेवला होता! पुलंनी आपल्या ह्या लग्नाला “भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातला अभूतपूर्व विवाह” म्हणून गमतीने गौरवले आहे तर सुनीताबाईंनीही “आठ आण्यातलं लग्न” ह्या आपल्या लेखात हे सगळं वर्णन खूप खुमासदार केलंय! लग्नानंतर त्यांना अनेक बदलांशी जुळवून घ्यावे लागले. स्वतःच्या तत्वांना मुरड न घालताही त्यांना ते छान जमले. त्यामुळेच सासर आणि माहेर दोन्ही कडे त्याची पत कायम राहिली. “माईआत्या वॉज द फायनल ऑथॉरिटी इन ठाकूर हाऊस” असा अभिप्राय त्यांची भाचरं नेहमी देत.
लग्नानंतरचा काही काळ दोघांसाठीही खूप संघर्षाचा गेला. पण अत्यंत अल्प पैशात आपण जगू शकतो ह्या विचारधारेमुळे त्यांना त्याचे काही वाटले नाही. कष्ट करण्याची त्यांची नेहमी तयारी असायची. मित्रमंडळींच भरपूर पाठबळही होतंच. हळूहळू नाटक, सिनेमा, लेखन अशा सर्वच आघाडींवर पुलं नावारूपाला यायला लागले आणि नंतर त्या सगळ्याचे नियोजन करण्यात सुनीताबाई आकंठ बुडून गेल्यात. हे सगळं होत असताना ह्या विलक्षण बुद्धिमान स्त्रीने स्वतः च्या करिअर बद्दल कुठली ठोस विचार केला नाही. त्यादृष्टीने बघितलं तर त्या सर्वार्थाने आधुनिक काळातल्या डोळस पतिव्रता होत्या असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग हे छानच अधोरेखित करतो. सुनीताबाईंच्या एका वाढदिवसाला पुलं त्यांना म्हणाले, “सुनीता, तुला उद्या कोणती भेट देऊ सांग?” तर सुनीताबाईंनी काय मागावे? “तुझं आहे तुजपाशी” चा तिसरा अंक पुलंनी अर्धवट लिहून ठेवून दिला होता. सुनीताबाईंनी त्यांना तो अंक पूर्ण करून देण्याची मागणी केली आणि पुलंनी सुद्धा आपल्या पत्नीची ही मागणी आनंदाने मान्य केली आणि काही तास सलग बसून त्यांची तो अंक पूर्ण केला! वाढदिवसाची अशी अनोखी भेट मागणारी सहचरी मिळणं हे पुलंचं सुद्धा भाग्यच म्हणायचं! पुलंच्या पुढच्याही सर्व यशस्वी कारकिर्दीचे भरपूरसे श्रेय दर्जा बद्दल कुठलीही तडजोड न करणाऱ्या सुनीताबाईंकडे निश्चितच जाते. ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक सुप्रसिद्ध सहृदय, त्यांच्या कारकिर्दीचा चढता आलेख ह्या सगळ्यांबद्दल ह्या पाहिल्या भागात सविस्तर प्रकाश टाकला आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग आहे “असं लिहणं!”. ह्यात सुनीताबाईंच्या एकूणच लेखनप्रवासाचा एक आढावा घेतला आहे. कुशाग्र बुद्धी, विपुल आणि विविध प्रकारचे वाचन, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, चिंतनशील वृत्ती इत्यादि सगळ्या गुणांमुळे त्यांना स्वतंत्र लेखन करणे अगदी सहज शक्य होते. परंतु वयाच्या साठीपर्यंत त्यांनी कधी फारसं लिखाण केलं नाही. मात्र त्यांचे पत्रलेखन अव्याहत सुरू होते. जी. ए. शी त्यांचा पत्रव्यवहार तर कित्येक दिवस सुरु होता. तेव्हा जी. ए. नी त्यांना अनेकदा स्वतंत्र लिखाणाबद्दल सुचविले. पण सुनीताबाई तो विषय तेथेच झटकून टाकत असत. बऱ्याच पुढे त्यांचा आणि जी. ए. चा हा पत्रसंवाद ‘प्रिय जी. ए..” ह्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. दोन भिन्नलिंगी व्यक्तींमधली निकोप, निर्मळ मैत्री अशी असावी म्हणून त्याचे वाचकांनी मनापासून स्वागतही केले. काही दिवसांनी 1983 साली त्यांचे वडील गेले आणि सुनीताबाईंना वयाच्या त्या टप्प्यावर आतापर्यंत काय मिळवलं अन काय गमावलं ह्याचा लेखाजोखा मांडावासा वाटला. आणि गतजीवनातलं जे जे आठवले ते ते त्या लिहायला लागल्या. पुढे जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेला लेख ‘मौज’ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. आणि त्यांनी लिहिलेल्या काही आठवणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रसिद्ध झाल्या त्या वाचकांना इतक्या आवडल्या की त्याचे पुस्तक व्हावे अशी चहुबाजूने मागणी होऊ लागली आणि अखेर “आहे मनोहर तरी ..” पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीस आले. ह्या पुस्तकाचे बाकी अभूतपूर्व असे स्वागत झाले. आणि सुनीताबाई एक प्रभावी, दखलपात्र लेखिका म्हणून वाचकांच्या समोर आल्या. ह्या पुस्तकावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा, टीकाटिप्पण्णी झाली. अनेक बाजूंनी त्याची चिकित्सा झाली. त्याच्या सुमारे अठरा हजार प्रति हातोहात विकल्या गेल्यात. अनेक मानाचे पुरस्कार ह्या पुस्तकाने पटकावले. हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवादही झाले. महत्वाचे म्हणजे 1990-91 मध्ये खुद्द पुलंच्या पुस्तकां पेक्षा जास्त विक्री “आहे मनोहर तरी..” ची झाली! त्यानंतर ‘समांतर लेख’ , ‘सोयरे सकळ’ , ‘मण्यांची माळ’ वगैरे पुस्तकांबद्दल सविस्तर वर्णन आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळते.
पुस्तकाचा तिसरा भाग म्हणजे “असं वागणं..” ह्यात सुनीताबाईंच्या एकूणच स्वभाव वैशिष्टांविषयी वर्णन आहे. त्यांची काव्याप्रती असलेली ओढ, त्यांच्यातली कर्तव्यतत्पर पत्नी, कठोर व्यवस्थापिका, आप्तस्वकीय आणि स्नेहीजण ह्याच्याशी त्याचे असलेले संबंध, त्याच्यामधला वात्सल्यभाव, कळवळा, वेदनेबद्दलची ची सहानुभूती, स्त्रीवादाचा पुरस्कार करत असूनही त्यांच्यातली गृहकृत्यदक्षता, संसारदक्षता अशा नानाविध पैलू अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना, प्रसंग ह्यात सविस्तर आलेले आहेत. मुख्य म्हणजे पुलंनी सुनीताबाईंचं हे सार्वभौमत्व जाहीरपणे मान्य केलं होतं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी तर ‘माणुसकीचे आकाश” मध्ये त्यांचा गौरव करतांना म्हटलंय की ‘कलावंताच्या पत्नीला पदराखाली दिवा नेणाऱ्या बाईसारखे दिव्य करावं लागतं. दिवा विझू द्यायचा नाही, भडकू द्यायचा नाही आणि पदरही पेटू द्यायचा नाही. हे दिव्य सुनीताबाईंनी अतिशय समंजसपणे आणि आनंदाने केलं आहे.’ पुलंची प्रतिभा आणि प्रतिमा दोन्ही असोशीने जपणाऱ्या सुनीताबाईंसाठी ही महत्वाची पावतीच होती.
सरतेशेवटी ‘ऐसे कठीण कोवळेपण’ हा अरुणा ढेरेंचा एक स्वतंत्र लेख आहे ज्यात त्यांनी सुनीताबाईंचं एकूणच आयुष्य, त्यांचं कविताप्रेम, त्यांच्या स्वभावातले विविध कंगोरे, त्यांची प्रगल्भता, पुलंच्या एकूणच यशस्वी कारकिर्दीच्या मागे असलेले त्यांचे अथक परिश्रम, कुठलीही गोष्ट सर्वोत्तम करण्याचा ध्यास, पुलंच्या जाण्यानंतर त्यांनी वरवर तरी सहज स्वीकारलेले एकटेपण, अगदी शेवटी त्यांना आलेलं परालंबीत्व इ. अनेक गोष्टींविषयी विस्ताराने लिहलंय. वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोर सुनीताबाई नावाचं लखलखीत व्यक्तिमत्व साकारत जातं आणि आपण नतमस्तक होतो !
☆ “कृष्णकन्या संत सखू” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆
पुस्तक – कृष्णकन्या संत सखू
लेखिका – सुश्री अनुराधा फाटक
प्रकाशक – रावा प्रकाशन
पृष्ठ संख्या – 64
किंमत – 120 रु
परिचय – मंजिरी येडूरकर.
श्रीमती अनुराधा फाटक
लेखिका अनुराधा फाटक यांची एक नवीन लघुकादंबरी, ‘कृष्णकन्या संत सखू’ रावा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने संत सखूचा अगदी बालपणापासून विठ्ठलाच्या पायावर देह ठेवेपर्यंतचा जीवनपट उलगडून दाखवला आहे.आत्तापर्यंत आपण संत सखू भजनातून, गाण्यातून ऐकली होती, इथे मात्र कधी न बघितलेली सखू आपण सरूप पाहतो. नुसती पहात नाही तर हळूहळू आपण तिच्या डोळ्यात तिची कहाणी वाचायला लागतो, अनुभवायला लागतो. इतकी ती कथा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दचित्रात आहे. तिचा कृष्ण, तिचा विठ्ठल, तिची कृष्णामाई सगळं आपलं होतं. अर्थात कृष्णामाईच आपल्याला सखू ची गोष्ट सांगते आहे म्हणजे तिला आपल्यासमोर सरूप यायलाच हवं नं! अनुराधाताईंच्या शब्दात, वर्णनात इतकी ताकद आहे की त्या सखूची आपल्याला ओढ लागते. तिच्या अनिवार विठ्ठल भक्तीत आपणही कुठेतरी हरवून जातो. असं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं!
विशेष – छंद – वाचन, लेखन. सद्या लहान मुलांचे क्लासेस घेते.
पुस्तकावर बोलू काही
☆ “वन पेज स्टोरी” – डॉ. विक्रम लोखंडे ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆
पुस्तक – वन पेज स्टोरी
लेखक – डॉ विक्रम लोखंडे
प्रकाशक – साकेत प्रकाशन प्राइवेट लिमिटेड, औरंगाबाद
पृष्ठ संख्या – 128
आयुष्य हे एक अनुभवांचे पुस्तकच तर आहे असं आपण सहजच म्हणतो तसंच डॉ विक्रम लोखंडे यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपले काम करताना येणारे अनुभव या पुस्तकातून आपल्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने पोहचवले आहेत . रोज नवनवीन लोकांशी भेटी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात ,पेशंटच्या तसेच त्याच्या नातेवाईकांच्या भावना समजून घेताना डॉक्टरांना काय वाटतं होतं,त्यांच्या मनात कोणकोणते विचार येत होते आणि त्यातून जी कथा सुचत गेली त्याचे हे पुस्तक..वन पेज स्टोरी या नावातच पुस्तकाचं मोठं गुपित आणि यश दडलेले आहे कारण प्रत्येक कथा एका पानातच संपते. कथा एका पानावर संपते म्हणून ती कुठंही अर्धवट किंवा अर्थहीन,बोधविरहित मात्र नक्कीच वाटत नाही तर अगदी कमी वेळात बसल्या बसल्या एखादी कथा खूप काही सांगून जाते,एखादा छानसा बोध आणि वाचनाचा आनंद ,समाधान देवून जाते. आपल्या मनोगतात लेखक म्हणतात की, नवीन पिढी खूप फास्ट आहे, त्यांचा संयम कमी आहे, लांबलचक लेख वाचायला खूप कमी लोकांना आवडते. जास्त वेळ एकाग्र न राहू शकणाऱ्या,सगळं झटपट,थोडक्यात पटकन हवं असणाऱ्या या पिढीची आकलन क्षमता मात्र खूप जास्त आहे.नेमकं सांगितलेलं त्यांना पटकन समजतं आणि आवडतही. म्हणून हा लेखन प्रयोग. नेमका आशय,भावना पोहचवताना शब्दांची जी कसरत करावी लागत होती ती रोमांचक होती. लेखकाचे हे पुस्तक लिहितानाचे अनुभव वाचून खूप छान वाटले पेक्षा बऱ्याच गोष्टींची खरोखर गंमत वाटली. लिहणं ही मला सर्वोत्तम क्रियेटीव्हीटी वाटते . यात तुम्ही न जगलेली खूप सारी आयुष्यं जगता येतात. लेखकाचे हे वाक्य वाचून आपण जे थोडफार तोडकं मोडकं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो याबद्दल कौतुक वाटले.
या पुस्तकांत काही बोलक्या चित्रांसहित तब्बल 42 कथा आहेत. सर्वच्या सर्व हृदयस्पर्शी.
कथांमधून नाती, त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि आपेक्षाभंग याचं दर्शन लेखक करून देतात. प्रत्येक कथेतून लेखकाचा व्यापक दृष्टीकोन लक्षात येतोच पण कथेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून प्रत्येक कथा आपल्याला आपल्या आयुष्याचा एक भाग वाटू लागते. एक एक छोट्या कथांमधून लेखक आपल्याला वेगळ्याच मार्गावर घेवून जात आहे हे आपल्या लक्षात ही येते आणि या कथा म्हणजे लेखकाने आपली केलेली आनंददायी फसवणूक वाटू लागते. एक डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना एक लेखक म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टीकोन खरोखर खूप कौतुकास्पद वाटतो. या पुस्तकातून मला काय मिळालं हे सांगणं अवघड आहे कारण 42 कथा 42 नव्या गोष्टी सांगून गेल्या त्यातल्या नेमक्या एक एक बाबी सांगणं म्हणजे वाचकाची सत्वपरीक्षा ठरेल म्हणूनच मला इथे कथांचा सारांश देणे उचित वाटत नाही. शिवाय लेखकाने पुस्तकांत इतक्या कमी शब्दांत आपल्या भेटीला इतक्या छोट्या पण छान कथा आणल्या आहेत तर प्रत्येकीने त्या वाचूनच पाहायला काहीच हरकत नाही.. हो ना?
क्षणक्षणात नवं आयुष्य
पुस्तकाच्या पानापानांत
उलगडताना दिसतं
प्रत्येक पानावर नवं काहीतरी भेटतं..
प्रत्येक दिवशी नवं जगणं
नव्या अनुभवातून नवं शिकणं
रोज नवं कोणी भेटणं
भेटीतूनच एक कथा फुलणं…
त्याचं सुंदर पुस्तक बनलं
नाव त्याचं वन पेज स्टोरी ठरलं
एकाच पानात एक कथा
कधी आनंदी गाथा तर कधी सांगे व्यथा….
परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती” – लेखक – अतुल कहाते ☆ परिचय – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆
पुस्तकाचे नाव – भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती”
लेखक – अतुल कहाते
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन
पृष्ठ संख्या – ५०
पहिल्या भागात पॅरिस शहरातील आपले काम संपवून मैसूरला परतण्याआधी साम्यवादी देशांचा फेरफटका मारण्याच्या हेतूने ‘निस’ गावात पोहोचलेल्या तरुणास हादरवून सोडणारा अनुभव सांगितला आहे. रेल्वेच्या डब्यात स्थानिक तरुणीने सहज तिथल सरकारी वातावरण किती कडक आहे यावर काही संभाषण केलं. त्यावरून त्या दोघांनी बल्गेरियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकार विषयी टीकात्मक चर्चा केली या आरोपावरून त्या युवकाला व तरुणीला पोलिसांनी अटक केली. 72 तास अन्न पाण्याविना त्या युवकाचे झालेले हाल, तिथून त्याची झालेली सुटका, व त्याची विचारसरणीच पालटवून टाकणारा हा अनुभव यात वर्णन केला आहे.
हा युवक म्हणजे इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नागवार रामाराव नारायण मूर्ती.
मूर्ती यांचा जन्म म्हैसूर मधल्या ब्राह्मण कुटुंबातला. वडील शिक्षक,आई पाचवी शिक्षण झालेली,ही पाच मुली आणि तीन मुलं अशी भावंड,समाधानी कुटुंब. मुलांनी शिकावं अशी इच्छा असणारे आई-वडील. वडिलांना पुस्तक वाचन व शास्त्रीय संगीताची आवड तीच आवड मूर्तीनाही जडली.कमी पगार असल्यामुळे काटकसरीने, जबाबदारीने, विना तक्रार जगण्याचे कौशल्य आईकडून त्यांनी लहानपणी अंगीकृत केले. मूर्ती शाळेत हुशार होते.विज्ञान, गणित त्यांचे आवडते विषय.
घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी महाविद्यालयाची निवड करताना केलेली तडजोड, महाविद्यालयात त्यांना मिळालेले यश, शिक्षणाबाबतची त्यांची वाटचाल इथे सांगितले आहे. वडिलांनी मूर्तींच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च करण्यास आपण सक्षम नसल्याचे सांगूनही त्यांच्या वरती राग न धरता स्वतःच्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे.
उच्च पदवीचे शिक्षण घेऊनही नोकरी न करता कृष्णय्या या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार संगणक शास्त्राचा अभ्यास करण्याचे मूर्तीनी ठरवले. त्याबद्दलचे शोध निबंध वाचन त्यांनी सुरू केले संगणक शास्त्राचे ज्ञान संपादन करण्यासाठी केलेली वाटचाल इथे सांगितली आहे. त्यांची कम्युनिस्ट विचारसरणी विषयीची आपुलकी ही इथं नमूद केली आहे.मूर्तींचे संगणक शास्त्राचे ज्ञान बघून’सेसा’ या फ्रेंच कंपनीने त्यांना सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी पॅरिसला बोलवले.
पॅरिसमधील त्यांचे अनुभव, उद्योजकांबद्दल त्यांचा बदललेला दृष्टिकोण येथे सांगण्यात आला आहे. डाव्या विचारसरणीचे वारे डोक्यात असल्यामुळे मिळालेले पैसे गरजे पुरते ठेवून बाकीचे ते दान करत. तिथलं काम पूर्ण करून ते भारतात परतले. इथलं वातावरण त्यावेळी खूप तणावपूर्ण होतं. इथं आल्यावर मूर्तींनी एम.आर.आय नावाची कंपनी सुरू केली ज्यात त्यांना अपयश आलं.
या भागात सुधा मूर्ती यांची कौटुंबिक-शैक्षणिक माहिती, शैक्षणिक प्रवास, त्यांची जिद्द याची सविस्तर माहिती दिली आहे. मूर्तींची सुधा यांच्याशी झालेली भेट त्यातून त्यांचा प्रेममय प्रवास, सुधा यांच्या वडिलांचा विरोध, त्यांचा विवाह या भागात सविस्तर सांगितला आहे.
पुढील भागात नरेंद्र पटणी यांनी स्वतःच्या कर्तुत्वावर संगणकाच्या टेप्स आणि डिस्कमध्ये डेटा एन्ट्री करण्याचा उद्योग सुरू केला. त्याचे सविस्तर वर्णन येथे आहे. तिथेच मूर्ती कामाला लागले. तिथला त्यांचा प्रवास, सहकाऱ्यांची माहिती, त्यांच्या कामाचा आढावा इथे सांगितला आहे. इन्फोसिसच्या निर्मितीची पाळमुळं ही इथेच रोवली गेली. सुधा यांचा त्यासाठीचा दृष्टिकोन आणि सहकार्य देखील आपल्याला समजते.
पुढे इन्फोसिसच्या जन्माची माहिती, ती निर्माण करण्यामागचा हेतू, त्यासाठी केलेली धडपड, अनेक तडजोडी, कंपनीतले कामाचे आराखडे, सहकाऱ्यांची आणि मूर्तींची विचारसरणी, पटणी यांची नाराजी, इन्फोसिसच्या यशाचा प्रवास इथे वाचायला मिळतो.
कंपनीला भांडवल मिळवण्यासाठी बँकेकडून कर्ज न घेता शेअर बाजारातून पैसे उभा करण्याचा निर्णय इथे सांगितला आहे. त्याची सविस्तर माहिती इथे वाचायला मिळते.
पुढील भागात भारतामध्ये संगणक क्षेत्रासाठी बदललेलं चित्र, भारतात आयटी क्षेत्रात झालेला बदल, शैक्षणिक- औद्योगिक प्रगती इथे वाचायला मिळते.कंपन्यांच्या नफ्या-तोट्याचा,कर्मचाऱ्यांची काही माहिती इथे वाचायला मिळते.
सुधा मूर्ती यांचं मूर्तींच्या आयुष्यातले योगदान इथे सांगितलं आहे. त्यांनी कुटुंबाची उचललेली जबाबदारी,केलेल्या तडजोडीत,वाद न होऊ देता काढलेला मार्ग खूपच विचार करायला लावतो. इन्फोसिस फाऊंडेशनची धुरा त्यांनी कशी सांभाळली हेही यात समजतं.
इन्फोसिस मधून निवृत्त होऊन मूर्तींनी घरच्या वडीलधाऱ्याने वागाव तसं त्यांचं इन्फोसिसशी नातं ठेवलं पण त्यानंतर इन्फोसिस मध्ये झालेले चढ-उतार, इन्फोसिस वर-मूर्तींवर झालेल्या टीका इथे वाचायला मिळतात.
नुकसानीकडे चालणाऱ्या इन्फोसिसला तारण्यासाठी मूर्तींनी पुनरागमन करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय,इन्फोसिस मधलं वातावरण,त्यांचं झालेलं कौतुक, काही टीका इथे सांगितल्या आहेत.
साधेपणातही सुंदर,समाधानी आयुष्य जगता येतं स्वतःच्या प्रगती सोबत इतरांचीही प्रगती व्हावी हा उदात्त हेतू असणाऱ्या या मूर्तींबद्दल वाचताना अभिमान वाटतो. हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे.
मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आणि श्री. अच्युत गोडबोले व डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी संयुक्तपणे लिहिलेलं “गणिती” हे अतिशय माहितीपूर्ण आणि तितकेच रंजक असे पुस्तक! गणितावर प्रेम करणाऱ्यांसाठी तर ही एक मेजवानीच! गणितासारख्या अतिशय रुक्ष आणि क्लीष्ट समजल्या जाणाऱ्या विषयावर तब्बल 465 पानांचे पुस्तक लिहिणे आणि वाचकाला अगदी शेवटच्या पानापर्यंत त्यात गुंतवून ठेवणे ही किमया अच्युत गोडबोलेच करू शकतात ह्याची हे पुस्तक वाचतांना खरोखरच प्रचिती येते!
तसं पाहिलं तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गणित असतं. पण आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा माहिती नसते. पशु, पक्षी, वनस्पती सगळ्यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या घरांमध्ये, फर्निचर मध्ये, घरट्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे गणित दडलेले असते. झाडांना येणारी पाने एक विशिष्ट क्रमाने येतात असे आढळून आले आहे. मधमाश्यांची उत्पत्तीही एका ठराविक क्रमाने होते, बऱ्याच फुलांच्या पाकळ्यांतही काही विशिष्ट क्रम दिसून येतो. ही क्रमरचना फिबोनाची क्रमिकेशी (Fibonacci series) मिळतीजुळती असते. 1,1,2,3,5,8,13,21,…. ह्या क्रमवारीला फिबोनाची सिरीज म्हणतात. ह्यातली प्रत्येक संख्या ( पहिले दोन वगळता) आधीच्या दोन संख्याची बेरीज असते. निसर्गातल्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला ही सिरीज आढळते.
तसेच सुवर्ण गुणोत्तर (Golden ratio) हा सुद्धा निसर्गात आढळणारा एक अफलातून प्रकार! तुम्ही पोस्ट कार्ड, ग्रिटिंगकार्ड, खिडक्या, दारांच्या चौकटी, फोटो, आरसे ह्यांचे आकार किंवा मनुष्य किंवा इतर प्राणी यांच्या शरीराचे आणि चेहऱ्याचे आकार बारकाईने बघितले तर एका विशिष्ट गुणोत्तरात असतात. तोच हा Golden ratio! त्यामुळेच ते आकार डोळ्याला आल्हाददायक वाटतात आणि म्हणूनच चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला ह्या सगळ्यांमध्ये हा रेशो वापरलेला असतो. ह्या गोल्डन रेशो चा शोध सर्वप्रथम पायथॅगोरस ची पत्नी थेओना हिने लावला आणि नंतर यूक्लीड ने सर्वप्रथम त्याची व्याख्या केली.
सामान्यतः आपणास आपल्या आजूबाजूला सगळीकडेच गणित आहे ह्याची कल्पनासुद्धा नसते. अर्थात त्याने बिघडत काहीच नाही पण जेव्हा ते कळतं तेव्हा गणितातलं हे सौंदर्य आपल्या मनाला भुरळ पाडतं. प्रस्तावनेतच दोन्ही लेखकांनी हे अधोरेखित केलंय की हे पुस्तक लिहिण्याचा त्यांचा उद्देशच मुळी लोकांना गणित किती सुंदर असू शकतं हे समजावं, ती शोधणाऱ्या गणितज्ञांची आयुष्ये कशा विविध चित्रविचित्र अनुभवांनी, घटनांनी भरलेली आहेत हे कळावं हा होता. आणि त्यांचा तो उद्देश ह्या पुस्तकाने अगदी सफळ संपूर्ण केलाय! आपल्या आजूबाजूला असलेल्या कित्येक गोष्टींमध्ये दडलेल्या गणितातलं मुलतत्व सोप्या भाषेत वाचकांना समजावून सांगितले आहे.
पुस्तकात आर्यभट , ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, वराहमिहीर, रामानुजन, नीलकंठ यांच्यासारख्या भारतीय गणितज्ञांसोबतच पायथॅगोरस, युक्लीड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, पास्कल, फर्मा, नेपिअर ह्यांच्याविषयी, त्यांच्या अनमोल शोधांविषयी अतिशय रंजक माहिती दिलेली आहे. निसर्गातल्या प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तूंचं अचूक वर्णन आपण गणितामुळेच करू शकतो. विश्वरचनेचं कोडं उलगडण्यासाठी आज ज्या भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानातल्या अतिप्रगत थिअरीज वापरल्या जाताहेत त्याचा पाया हजारो वर्षांपूर्वी अनेक गणितज्ञांनी शोधलेल्या गणितावरच आधारलेला आहे. मात्र त्यासाठी त्यांना समाजाविरुद्ध कसा लढा द्यावा लागला त्याचीही इत्यंभूत माहिती आपल्याला ह्या पुस्तकात मिळते. पुस्तकाच्या सुरवातीलाच विश्वनिर्मिती झाल्यानंतर अंकांचा शोध कसकसा लागत गेला, त्यानंतर निरनिराळ्या आकृत्या त्यांची गणितं, त्यांचा देवळं, पिरॅमिड, घरं बांधण्यासाठीचा उपयोग इ बद्दल सुंदर विवेचन केलंय. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर प्रचंड असे इजिप्शियन पिरॅमिड बांधताना त्या लोकांनी खगोलशात्र आणि गणिताची सांगड घातली होती. आजसुद्धा जगभरातल्या पर्यटकांचे ते एक आकर्षण स्थळ आहे.
आपल्याकडे इ. स. पूर्व 800 च्या सुमारास यज्ञवेदींच्या रचनेसंदर्भात काही विशिष्ट गणिती सूत्रांचा वापर केला जायचा. त्याला “शुल्वसूत्र” असं म्हटलं जायचं. त्या काळात गणिताचे सर्व ज्ञान मंत्रांच्या स्वरूपात होतं. Trigonometry चे अख्खे टेबल आर्यभटाने फक्त एका श्लोकात मांडले होते! अशा अनेक गोष्टी वाचतांना आपण आश्चर्यचकित होत जातो.
आर्यभटानंतर भारतीय गणितात अत्यंत मोलाची कामगिरी करणारा गणितज्ञ म्हणजे ब्रह्मगुप्त. त्याने जगाला “शून्य” म्हणजेच काहीही नसणे किंवा अस्तित्वविरहितता ही संकल्पना देऊन सगळ्याच गणितात प्रचंड क्रांती केली. मानवी मनाची ही सर्वात प्रगल्भ कृती होती असे लेखक म्हणतो. संपूर्ण जगाच्या गणिताचा चेहरामोहराच ह्या आविष्काराने बदलून टाकला!
आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त यानंतर महावीराचार्य, रंगाचार्य, भास्कराचार्य, नीळकंठ, माधवाचार्य यांनी भारतीय गणितात फार मोलाची कामगिरी करून ठेवली. भास्कराचार्यांचे “सिद्धान्तशिरोमणी” आणि “लीलावती” हे ग्रंथ त्यांच्या अमूल्य योगदानाची साक्ष देतात. काही लोकांचे म्हणणे आहे कि लीलावती भास्कराचार्यांचे पत्नीचे नाव होते. काहींच्या मते ते त्याच्या अतिशय लाडक्या मुलीचे नाव होते. लग्नानंतर लवकरच वैधव्य आल्यामुळे भास्कराचार्याने तिला माहेरी आणले आणि तिचा वेळ चांगला जावा म्हणून तिला गणित शिकवले. तसेच तिचेच नाव आपल्या ग्रंथाला दिले. आज सुद्धा गणित कसं शिकावं ह्याचा आदर्श म्हणून ह्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. तसाच केरळ मधला विद्वान गणितज्ञ म्हणजे नीळकंठ. त्याचेही “तंत्रसंग्रह” हे पुस्तक खूप गाजले. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या निश्चित वेळा काढण्याचं काम सर्वप्रथम नीलकंठाने केलं.
गणित म्हणजे केवळ मोजणे किंवा आकडेमोड करणे ह्यापलीकडेही काहीतरी आहे हे जगाला दाखवून देण्याचं श्रेय ग्रीक विचारवंत थेल्स याला जातं. त्यानंतर गणिताच्या इतिहासात अजरामर झालेला ग्रीक गणितज्ञ म्हणजे पायथॅगोरस! पायथॅगोरस ची ओळख प्रत्येकाला सातवी आठवीतच झालेली असणार. त्यामुळे सगळ्यांच्याच परिचयाचा! म्हणूनच त्याच्याविषयी सांगितली जाणारी एक छोटीशी कथा पुढे देते आहे.
ग्रीस मधल्या एका लहानश्या गावात डेमॉक्रिटस नावाचा एक अतिशय विद्वान गृहस्थ राहायचा. त्याला एकदा एक तरतरीत मुलगा लाकडाची मोळी विकण्यासाठी नेतांना दिसला. अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटक्या बांधलेल्या त्या मोळीने डेमॉक्रिटसचं लक्ष वेधून घेतले. त्याने त्या मुलाला “तुला मोळी कुणी बांधून दिली?” अशी पृच्छा केली असता तो मुलगा उत्तरला , “माझी मोळी मीच बांधतो, मला आईवडील नाहीत” “मोळी विकून काय करणार?” ह्या प्रश्नावर तो मुलगा उत्तरला की मोठेपणी त्याला डेमॉक्रिटस सारखे विद्वान व्हायचे आहे. ते ऐकताच डेमॉक्रिटस ला त्या मुलाबद्दल कुतूहल वाटले व त्याने त्याला मोळी सोडून पुन्हा पहिल्यासारखी बांधून दाखवायला सांगितले. त्या मुलाने तसे केले. त्याचे मोळी बांधण्यातले कौशल्य, सुसंगती, अचूकता अन नेटकेपणा बघून डेमॉक्रिटस खुश झाला अन त्याने त्या मुलाच्या पोटापाण्याची अन शिक्षणाची जबाबदारी घेतली. हाच तो सुप्रसिद्ध पायथॅगोरस!
अशा अनेक गणितज्ञांच्या आयुष्यातील आख्यायिका, कथा आपल्याला ह्या पुस्तकात भेटतात. अतिप्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये गणिताची सुरवात कशी झाली, त्याच्या वेगवेगळ्या शाखा कशा निर्माण झाल्यात त्याचा रोचक इतिहास आणि त्यांच्या सगळ्याच प्रवासाची एक सुंदर झलक आपल्याला ह्या पुस्तकातून दिसते .
खरं सांगायचं तर पुस्तकाचा आवाका इतका प्रचंड आहे की इतक्या थोडक्यात त्याबद्दल सांगता येणं खूपच कठीण आहे. एवढं बाकी नक्की की ज्यांचा गणित हा विषय आहे, ज्यांना गणितामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी तर हे विस्तृत पुस्तक म्हणजे एक अनमोल खजिनाच आहे! मात्र असे असूनही ज्यांचा गणित विषय नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाहीच असे बाकी मुळीच नाही. ते सुद्धा पुस्तकातला काही भाग वगळून ह्या पुस्तकाचा आनंद निश्चितच घेऊ शकतात. एकंदरीतच प्रत्येक वाचकाला गणिताच्या अतिशय अद्भुत आणि रंजक विश्वाची एक सुंदर सफर हे पुस्तक घडवून आणतं ह्यात शंकाच नाही !