☆ महा-सम्राट… श्री विश्वास पाटील ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पुस्तकाचे नाव – महा-सम्राट
लेखक -विश्वास पाटील
खंड पहिला – झंझावात (छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कादंबरी माला)
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा.लि., १९४१, सदाशिव पेठ, माडीवाले काॅलनी. पुणे ४११०३०
प्रकाशन काल -१ आॅगस्ट २०२२
किंमत – रू.५७५/-
या पुस्तकाचा पहिला भाग आपल्याला शहाजी महाराजांच्या काळातील बऱ्याच गोष्टी सांगून जातो शहाजीराजे मंदिर निजामशाही, आदिलशाही या दोन्ही ठिकाणी कामगिरी गाजवलेले एक मातब्बर सरदार म्हणून माहीत होते. परंतु या पुस्तकात सुरुवातीलाच त्यांनी लढलेल्या अनेक लढाया, गाजवलेले शौर्य आणि त्यांची मनातून असणारी स्वातंत्र्याची ओढ याविषयी अगदी परिपूर्ण माहिती मिळते. शिवराय आपल्या पिताजींबरोबर बंगळूर येथे फक्त सहा वर्षापर्यंत होते. त्यानंतर राजमाता जिजाऊ सह ते पुनवडी म्हणजेच पुणे येथे आले. आणि खरा स्वराज्याचा इतिहास सुरू झाला. पण त्यासाठी त्यांच्या आधीच्या काळात शहाजीराजे किती झगडले हे या पुस्तकात वाचायला मिळते. पुरंदर, जावळी, प्रबळगड, पेमगिरी अशा विविध ठिकाणी त्यांनी युध्दे खेळली.तसेच जे राजकारण केले ते या पुस्तकातून कळते. गुलामगिरी विरुद्ध पहिला एल्गार त्यांनी केला. शिवरायांना स्फूर्ती देणारे हे त्यांचे पिताजी! परक्यांची चाकरी करताना त्यांच्या मनात केवढी मोठी खंत होती हे वाचताना जाणवते.
जिजाऊंच्या माहेरच्या माणसांची त्यांना वैर घ्यावे लागले पण ज्या मुस्लिम राज्यांची त्यांनी सरदारकी पत्करली होती त्यासाठी कर्तव्य म्हणून त्यांनीही युद्ध केली.
शहाजीराजांना घोड्यांची चांगली पारख होती सारंगखेड्याच्या घोड्यांचा बाजार भरत असेल तेथे “दिल पाक” नावाचा अश्व शहाजीराजांनी खरेदी केला होता.
आदिलशाही, निजामशाही आणि मुगल शाही या तीनही मुसलमानी शाह्यांना तोंड देत 30-40 वर्षे शहाजीराजांनी कार्य केले होते. शिवबांना लहानपणीच स्वराज्याचे बाळकडू जिजामातेकडून कसे मिळाले त्याचेही वर्णन या कादंबरीत खूप छोट्या छोट्या प्रसंगातून दिसून येते.
या पुस्तकाचा शेवटचा भाग राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी कशी घडली. तसेच शिवरायांनी छोटे-मोठे किल्ले घेत घेत स्वराज्याची पायाभरणी कशी केली हे सांगतो. अफजल खान महाराजांच्या भेटीसाठी येण्याच्या प्रसंगाचे वर्णन या पुस्तकात शेवटच्या भागात आहे शिवरायांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी चांगले विचार स्वराज्य स्थापनेसाठी दिले. अफजलखानाच्या वधा नंतर ‘देहाचे शत्रुत्व संपले’ या विचाराने त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्यासाठी वेगळी जागा शिवरायांनी दिली.
शिवरायांच्या जीवनावरील कादंबरी मालेतील या पहिल्याच झंजावातात आपल्याला शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने वाचण्याचा आनंद मिळतो!
डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘आर्ट अफेअर’ हा कथासंग्रह वाचण्याआधी त्यांचा परिचय व श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली. उत्साहात मी पण पुस्तक वाचले आणि खूप आनंद झाला.
आनंद अशासाठी की डॉ. विनोद हे C.A.; C PA; P.HD; या पदव्या प्राप्त केलेले प्रथितयश अर्थतज्ञ असूनही, अत्यंत सोप्या साध्या भाषेत त्यांनी सर्व लेखन केले आहे. कुठेही लटांबर वाक्ये नाहीत, बोजड शब्दरचना नाही, तरीही मूद्देसूद लेखन, आर्थिक विषयांवर असलेली पकड, रुक्ष माहितीही रंजकपणे सांगण्याची हातोटी, ही वैशिष्ट्ये कथांमध्ये तर दिसतातच, पण स्फुट लेखनात जास्त दिसतात. काही गोष्टींना दुबई / गल्फ कंट्रीची पार्श्वभूमी लाभली आहे. श्री विनोद यांच्या दुबईच्या वास्तव्याशी जोडलेल्या कथा या संग्रहात आहेत, उदाहरणार्थ अँब्सेंट, Emirates अर्थात emi@rates या कथा.
ह्यातील ‘ अँब्सेंट ‘ ही कथा फार वेगळी आहे आणि मनाला चटका लावून जाते. परिक्षेच्या हॉलमध्ये एका मुलाचे आईवडील येतात. ते का बरं आले असावेत असा विचार करत असेपर्यंतच ते एका टेबलापाशी उभे रहातात. त्या विद्यार्थ्याचे आय-कार्ड, हॉल टिकेट व एक गुलाबाचे फूल त्या जागेवर ठेवतात. एक मिनिट शांतता पाळून ते तिथून निघता निघता सांगतात, की दोन दिवसापूर्वी अपघातात निधन पावलेल्या विद्यार्थ्यांचे ते पालक आहेत. सर्व मुले आणि परिक्षक चित्रासारखे स्तब्ध होतात. हा मुलगा फक्त परिक्षेला अँब्सेंट नाही, तर आता तो त्यांच्या आयुष्यातूनच अँब्सेंट झाला आहे ह्या विचाराने लेखक खिन्न होतो. १८-१९ वर्षाच्या मुलाचा मृत्यु सहन करणे कोणत्याही आईवडिलांना फार कठीण ! ही भावना आपल्यापर्यंत ही जशीच्या तशी पोहोचते.
अशीच ‘ Emirates ‘ ही रमेशच्या आयुष्याची गोष्ट वाचण्यासारखी आहे. १२-१५ वर्षे दुबईत राहिल्यानंतर
१९९८ च्या आर्थिक संकटात रमेशची नोकरी जाते. एक वर्ष तो तेथे कुटुंबाला घेऊन कसेबसे काढतो. पण नाईलाजास्तव त्याला बायको व मुलांना मुंबईला पाठवावे लागते. दोन वर्षानंतर तो सुट्टी घेऊन येतो तेव्हाची बदललेली बायकामुले पाहून तो खंतावून जातो. आर्थिक बदलांबरोबर नीतीमत्तेतीलही बदल तो परिस्थितीप्राप्त म्हणून मान्य करतो. ही खूप कठीण गोष्ट बाजूला सारून तो आयुष्य सावरण्यासाठीची धडपड परत करू लागतो….. श्री. विनोदांच्या भाषेचे वैशिष्ट्य असे की जणू काही घटनास्थळी आपणही प्रत्यक्ष हजर आहोत की काय असे वाटायला लागते. रमेशची सुखदुःखं आपलीच आहेत ही भावना बेचैन करते.
कथासंग्रहात एकूण ८ कथा व ११ स्फुट लेख आहेत.
सगळ्याच कथांचे विषयही वेचक व वेधक आहेत. या सर्व मधमाश्याच्या पोळ्याची राणी आहे ‘आर्ट अफेअर’ ही कथा. एखाद्या वेगवान इंग्रजी थ्रिलरप्रमाणे कथा पुढे सरकत रहाते. खिस्तीजच्या ऑक्शनमध्ये एकाच कॅनव्हासवर मागे/पुढे काढलेले भगवान कृष्ण आणि गौतम बुद्ध यांचे अतिशय वेगळ्या शैलीत काढलेले चित्र विकावयास येते. अतर्क्य किमतीला हे पेंटिंग विकले जाणार, एवढ्यात सेलर ऐनवेळी चित्र ऑक्शन मधून विथड्रॉ करतो. आणि एक जगप्रसिध्द चित्रकार उभ्या करत असलेल्या इन्स्टिट्यूटला, एका खाजगी कार्यक्रमात, भेट म्हणून देतो. हे सगळे का आणि कशासाठी हे प्रत्यक्ष गोष्टीतच वाचण्यासारखे आहे. माणसाच्या आयुष्याचा गुंता लेखक सोडवत असताना वाचकही त्यात गुंततच जातो, आणि हीच त्या गोष्टीची जादू.
मिलिंद विनोद यांना माणसाच्या स्वभावाचा अभ्यास करायला आवडते. माणसाच्या वागण्याचे/कृतींचे ते निरीक्षण करतात, त्याचा विचार करतात, पर्यायांचाही विचार करतात, व त्यातून त्या पात्रांची कथाबीजाला पोषक अशी वर्तनशैली बनते . मग कथा आश्चर्यकारकपणे पुढे सरकते व शेवटी वाचकाला चकित करून सोडते. ‘Flagship of the group’ अशा या कथेचं नाव संग्रहाला दिले यातच सर्व काही आले.
आर्ट अफेअरच्या बरीच जवळ जाणारी अजून एक रहस्यकथा म्हणजे ‘ फोटोप्लॉटर’ . लग्नाचा अल्बम वेळेवर येत नाही म्हणून फोटोग्राफरची शोधाशोध सुरू होते आणि त्यातून एक हाय टेक फायनान्शियल स्कॅमचा गुंता हातात येतो. पुढची गोष्ट लेखकाच्या शब्दातच वाचण्यात मजा आहे.
डॉ. विनोद यांचे स्फुट लेखनही स्वतंत्र विचारांचे आहे. देश सोडून जायचे असल्याने इतक्या वर्षांच्या सवयीच्या असलेल्या आयकिया स्टोअरच्या आठवणी, विमानतळावरील करोनाचा धमाका, द्वयर्थी इंग्रजी न समजल्यामुळे काहीही सांगणारी महिला, हिंदी गाण्यांवरचे प्रेम, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केले आहे. ‘ अंकुर ‘ हा लेख अगदी तरल व भावस्पर्शी आहे. एक छोटे झाड जागा बदलताना हलले जाते. लहान मुलासारखे तेही घाबरते. पण मायेचा स्पर्श, ऊब मिळाल्यावर त्याला छोटा अंकुर फुटतो… सर्वच कल्पनारम्य आहे. दहा एक वाक्यात अतिशय संवेदनशील असा हा लेख आहे. असाच अजून एक लेख म्हणजे ‘ व्यथा बाबांची’ . सर्व आधुनिक बाबा ही अति बिझी माणसं ! मनात इच्छा असूनही त्यांना मुलांजवळ रहाता येत नाही. आता ते आजोबा झालेत तरी त्यांची मुले दूर आहेत, आणि त्यांच्या छोट्या नातवंडात ते आपलं मूल शोधताहेत. परिस्थिती कोणीही बदलू शकत नाही. आपल्या आठवणी मागे ठेवून मुले दूर जातात. त्या आठवणींच्या सोबत आयुष्य काढणे म्हणजे मनावर मोठा दगड ठेवणे, हे सर्व बाबाला करावे लागते. अपरिहार्य अशा ताटातुटीचे वर्णन वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही.
वेगळ्या विषयावरील कथा आणि दर्जेदार स्फुट लेखन ह्यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल याबद्दल मला अजिबात शंका नाही. डॉ. मिलिंद विनोद यांच्या पुढच्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
परिचय : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ क्लिक ट्रिक – अर्चना देशपांडे जोशी ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆
लेखिका : अर्चना देशपांडे जोशी.
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : १२६
किंमत : रु. १७५/-
सध्याच्या मोबाईलच्या जगात सर्वच जण फोटो काढत असतात आणि लाईक मिळवत असतात. “फोटो काढणे” हा एक खेळ झाला आहे. अशावेळी मनात शंका येते, “फोटोग्राफी” ही कला म्हणून आता अस्तित्वात आहे का? याचे उत्तर आपल्याला अर्चना देशपांडे जोशी यांच्या ‘क्लिक ट्रिक’ या पुस्तकात मिळते. खरी फोटोग्राफी, मोबाईल फोटोग्राफी आणि आपले आयुष्य यांचा मेळ घालत, बत्तीस ललित लेखांची मालिका असलेले हे पुस्तक. ‘छायाचित्र कलेवरच सोप्पं भाष्य’ असे सांगत प्रस्तावनेलाच सुधीर गाडगीळसरांनी पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. तर विनायक पुराणिक सरांनी या पुस्तकाचे योग्य शब्दात वर्णन केले आहे. फोटो काढण्याची एक वेगळी नजर या पुस्तकातून मिळते, असे ते सांगतात. तर यापुढे जाऊन मला वाटते, फक्त फोटोच नाही, तर जीवनातील विविध प्रसंगाना वेगळ्या नजरेने बघण्याची दृष्टी यातून मिळते. ‘मनाला मुग्ध करणाऱ्या फोटोंचे मंत्र’ सांगतानाच लेखिकेने ‘आपल्या लक्षात न येणारे सध्याच्या मोबाईल फोटोग्राफीचे तोटे’ यावरही खरपूस भाष्य केले आहे.
हल्ली क्लिक करणे खूप सोप्पे झाले आहे. हवे तेवढे, हवे तसे दशसहस्र क्लिक सारेच सतत करत असतात. पण त्यातील उत्तम क्लिक कोणता झाला? या एका क्लिकचे महत्व आणि तो कसा घ्यायचा, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे .. प्रत्येक लेखातून याचा परिचय होत जातो.
सावली, प्रतिछाया, आपली प्रतिमा. एकच शब्द. अनेक वळणे घेत आपल्या समोर येतो. ‘आधीच उल्हास’ या लेखात फोटोच्या विषयाएवढेच, त्याच्या सीमारेखेचे महत्व सांगितले आहे. फोटोत जिवंतपणा आणण्यासाठी गरज असते थोडा विचार करण्याची आणि शोधक नजरेची. फोटो कंपोझीशनप्रमाणेच त्याच्या बॅकग्राऊंडचा देखील विचार केला पाहिजे. ट्रॅंगल कंपोझिशनची युक्ती स्टील लाईफ फोटोग्राफीप्रमाणे फूड फोटोग्राफीत देखील वापरली जाते. ‘झाले मोकळे आकाश’ या लेखातून वाईल्ड आणि टेली लेन्स मधला फरक सांगताना, लेखिका चिवड्याचे गंमतीशीर उदाहरण देते. कॅमेरा हा कॅनव्हास आणि लेन्स हा ब्रश आहे, हे जर लक्षात आले तर आपले आपणच कलात्मक, सुबक देखणे फोटो काढू शकतो. फोटो एकतर चांगला असतो किंवा नसतो. हल्ली बऱ्यापैकी फोटो सगळेच काढत असतात. फोटो तिथे आधीपासून असतो. तो काढण्यासाठी नजरेबरोबर आपल्या बुध्दीला श्रम घ्यावे लागतात. म्हणजे नेमका फोटो काढल्याचा आनंद आपल्याला मिळतो, असे ‘तो तिथे आहे’ यामधून समजते. ‘जाड्या-रड्या’ तून फोटोग्राफीमधील वेट बॅलन्स म्हणजे काय? हे लेखिकेने नमूद केले आहे. निसर्गात चौकट जागोजागी असते. त्याचा योग्य उपयोग फोटोची चौकट ठरवताना केला पाहिजे. ‘प्रत्येक फोटो काढताना आधी विचार करावा लागतो. हल्ली फोटो काढून झाल्यावर विचार करत बसतात.’ ‘आखीव रेखीव’ मधील लेखिकेचे हे वाक्य आपल्याला विचार करायला लावते. नियम बनवावे लागतात कारण कोणीतरी नियमबाह्य वर्तन केलेले असते म्हणून. ब्रेकींग रूल्स फक्त कुठे आणि किती करायचे असतात, हे सत्य फक्त फोटोग्राफीत नाही तर जीवनात देखील शिकणे आवश्यक आहे. याची जाणीव ‘नियमातील अनियम’ यातून होते. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथला गृहपाठ करणे जरुरीचे आहे. आपल्याला ट्रिपला जायचे असेल तर हे जितके आवश्यक, तितकेच फोटोप्रवासासाठी कोणती सावधगिरी बाळगायाची हे लक्षात घेतले पाहिजे. पावसाळयात फोटोग्राफी करताना कोणती काळजी घ्यायची, याबद्दल लेखिकेने टिप्स दिल्या आहेत. स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे घटनेपलिकडे बघण्याची दृष्टि. ॲग्रीकल्चरल, आर्किटेक्चर आणि इंटीरीयर, मॉडेल, कल्चरल फोटोग्राफी आणि टुरिझम, ऐतिहासिक वास्तू, शिल्प व जंगल असे फोटोग्राफीतील विविध प्रकार आहेत. फोटोक्राफ्ट व कॅन्डीड फोटोग्राफी वाचून आपल्याला आश्चर्य वाटते.
फोटो येण्यासाठी प्रकाशयोजना, कंपोझीशन, ॲंगल, लेन्स, उत्तम गृहपाठ, आपली बुध्दी, विचार, कल्पनाशक्ती आणि नशीबाची साथ लागते. तरीही सर्वोत्तम फोटोसाठी उत्तम कॅमेरा हाच फोटोग्राफरचा उजवा हात असतो, असे लेखिका नमूद करते.
काळ नेहमी पुढे धावत असतो, पण फोटोग्राफीच्या कलेमध्ये काळाला पकडून ठेवायची कला आहे. कलेने ‘आपल्याला श्रीमंत व्हायचे आहे की समृध्द’ असा विचार आपल्याला करायला लावत, लेखिका समेवर येते. प्रत्येक कलेचा मान राखायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे.
मोबईलला ठेवलेले फोटोबाईल हे नाव, योग्यच वाटते. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात कलेतील सौंदर्य लोप पावत आहे, याची खंत लेखिकेला आहे. यासाठी तिने कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंसाठी ‘फोटोफ्राय’ स्पर्धा सुरू केलेली आहे.
एखाद्या विस्तृत कुरणावर ससा मनसोक्त बागडत असतो तशी लेखिका आपल्या लेखात सर्वत्र पळताना दिसते. प्रत्येक लेखात एकेका शब्दांचे अर्थ लिहिताना अनेक अर्थ सहजपणे उलगडले आहेत. आणि त्यातून लेखिका अगदी नकळतपणे आयुष्यातील सत्य सांगून जाते. म्हणूनच फक्त फोटोग्राफी शिकणाऱ्या लोकांनी नव्हे तर आपण सर्व जण हे पुस्तक वाचू शकतो.
फोटोग्राफी इतकाच लेखिकेचा मराठी कविता, चित्रकला याविषयांवर भरपूर अभ्यास झालेला दिसतो.
☆ तर मी का नाही ?… डाॅ. बिंदुमाधव पुजारी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तकाचे नाव – तर मी का नाही?
लेखक – डॉ. बिंदुमाधव पुजारी
पृष्ठे – ३२४ मूल्य – ४५० रु.
नुकतेच एक चांगले पुसताक वाचनात आले. ‘…. तर मी का नाही?’ मिरजेतील ख्यातनाम सर्जन डॉ. बिंदुमाधव पुजारी यांचे हे आत्मचरित्र. वेगळे वाटणारे हे शीर्षक पाहिले आणि मनात कुतुहल निर्माण झाले.
सुरूवातीला त्यांनी लिहिलय, ‘माझा डॉक्टर आणि त्यानंतर सर्जन होण्याचा प्रवास हा योगायोग, दैव, आणि खूप खडतर वाटचाल इत्यादींचे मिश्रण होते. मी वैद्यकीयशास्त्र हे आवडीने घेतले नाही किंवा नाकारले पण नाही. जे नशिबी आले, ते जिद्दीने स्वीकारले. एक गोष्ट मात्र नक्की. कोणताही विषय स्वीकारला की मी त्यात स्वत:ला संपूर्ण झोकून देत असे. मग कितीही कष्ट करावे लागले आणि यातना सोसाव्या लागल्या तरीही माझी तयारी असे. एखादी गोष्ट जर दुसर्याला करता येत असेल, तर ती मला का करता येणार नाही? मी ती करणारच.’ ते पुढे लिहितात, ज्यावेळी इंग्रजी चौथीत इंग्रजीत ते नापास झाले होते, तेव्हा त्यांचे गुरुजी म्हणाले होते, ‘तुझ्या वर्गातील अठ्ठावीस मुले पास झाली आहेत. तर तू का पास होणार नाहीस? अभ्यास कर म्हणजे तूही पास होशील.’ त्यांनी भरपूर अभ्यास केला. ते नुसतेच पास झाले नाहीत, तर चांगले गुण त्यांनी मिळवले. त्यावेळी गुरुवाणीतून स्फूर्ती घेऊन त्यांनी जीवन प्रवास सुरू केला आणि ते उत्तम गुण मिळवत राहिले. अव्वल येत राहिले. त्यांच्या सार्या जीवनाचे सूत्र, ‘हे इतर करू शकतात, तर मी का नाही? (करू शकणार?) हे राहिले. ते त्यांनी हृदयस्थ केले म्हणून मग आत्मचरित्राचे नावही नक्की झाले, ‘…. तर मी का नाही?
नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी) इथे वेदशास्त्र पारंगत, पौरोहित्य करणार्या अशा पुजारी घराण्यात २४ एप्रील १९३५ मध्ये डॉक्टर बिंदुमाधव यांचा जन्म झाला. सुरूवातीला ते नरसोबाची वाडी हे गाव कसं वसलं आणि पुजारी हे आडनाव कसं अस्तित्वात आलं, त्याचा इतिहास देतात. श्रीनृसिंहसरस्वती १४२२साली या स्थानी तपश्चर्येला आले. तेथून जवळच असलेल्या आलास या गावातून भैरव जेरे त्यांचे दर्शन घेऊन पुढे शिरोळ येथे जोसकी करण्यासाठी जात. श्रीनृसिंहसरस्वती जेव्हा गाणगापूरला जायला निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या पादुकांचे ठसे तिथे ठेवले आणि त्यांनी भैरव जेरे यांना तुम्ही वंशपरांपरागत या पादुकांची पूजा करावी, असे सांगितले. पुढे त्यांना एक मुलगा, नंतर त्या मुलाला चार मुले झाली. त्यांचा वंशवेल वाढत गेला. श्रींच्या पादुकांची पूजा करणारे म्हणून जेरे घराणे पुजारी या नावाने ओळखले जाऊ लागले. भैरंभट हा त्यांचा मूळ पुरुष. त्याप्रमाणेच गावाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, लोकजीवन, श्रींची पूजा-अर्चा, सण- उत्सव, इत्यादिंची माहितीही सुरूवातीला सांगितली आहे. त्यावेळच्या समस्या- दुष्काळ, साथीचे रोग, वैद्यकीय (अ)सुविधा, शिक्षणाच्या सोयी, गांधीवधांनंतर गावात झालेले जळीत प्रकरण, त्याचा लोकजीवनावर झालेला परिणाम या सगळ्याचे वर्णन सुरूवातीला येते. ही सगळी माहिती वेधक आणि मनोरंजक पद्धतीने यात येते.
गावातील धार्मिक वातावरण, घरातील जुने वळण, एकत्र कुटुंब, यामुळे, ‘सहनशीलता, समानता, समजूतदारपणा, खिलाडू वृत्ती, सांघिक भावना, कष्टाची तयारी इ. गोष्टी लहानपणीच आमच्या अंगात मुरल्या होत्या. त्याचा पुढील आयुष्यात आम्हाला फार उपयोग झाला’, असे ते सांगतात. त्या काळात, सोयी-सुविधांच्या अभावी, जीवन, विशेषत: ग्रामीण जीवन कष्टप्रद होते. लहान मुलांनाही त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे कष्टाची कामे करावी लागत. डॉक्टर म्हणतात, त्यांचे लहानपण कष्टात, तरीही आनंदात मजेत गेले.
माध्यमिक शिक्षणाची सोय गावात नव्हती. त्यासाठी कुरूंदवाडला जावे लागे. वर्षातले नऊ महीने, प्रथम नावेतून पंचगंगा नदीच्या पलिकडे जावे लागे. नंतर कुरूंदवाडच्या वेशीपर्यंत चालत जाऊन पुढे तीन मैल अनवाणी चालत जावे लागे. पावसाळ्यात, भरपूर पाऊस, प्रचंड वेगाने वहाणारे पाणी, घोंगावणारे वारे, यातून नाव बाहेर काढणे बिकट असे. प्रवास भीतीदायक, धोकादायक वाटायचा. असा सारा त्रास, कष्ट सहन करत वाडीतील अन्य मुलांप्रमाणे डॉक्टरांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. ७८% गुण मिळवून ते शाळांत परीक्षा पास झाले.
पुढे कॉलेज ते एम.बी.बी.एस.पर्यंतच्या खडतर शैक्षणिक प्रवासाची माहिती येते. आर्थिक विवंचनेमुळे हा शैक्षणिक प्रवास खडतर झाला होता. शिष्यवृत्ती होती, पण जेवणाचा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कधी मेसच्या सेक्रेटरीचे काम केले, कधी एका मुलाला तासभर अॅनाटॉमी शिकवून त्याच्या डब्यात जेवणाची सोय करून घेतली.
बिंदुमाधव मुळात मेडिकलकडे कसे गेले, याचाही एक किस्सा आहे. एफ. वाय. ला ते सायन्स विभागात व गणितात विद्यापीठात पहिले आले. इंजींनियारिंगला जायचा त्यांचा विचार होता, पण रिझल्टच्या वेळी काही प्रतिष्ठित मंडळी त्यांना भेटायला आली. त्यांनी सुचवले, त्याने डॉक्टर व्हावे. पंचक्रोशीत कुरूंदवाडच्या डॉ. वाटव्यांशिवाय कुणी एम.बी.बी.एस. डॉक्टर नाही. बिंदू उत्तम डॉक्टर होऊ शकेल. त्यांच्या वडलांनाही ती कल्पना पसंत पडली. त्या सर्वांचा आग्रह पाहून ते मेडिकलला जायला तयार झाले.
या पुस्तकात त्यांनी आपल्या लहानपणाच्या, शिक्षण घेत असतानाच्या, नोकरी करत असतानाच्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यानंतरच्या, कॉन्फरन्स काळातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. पुस्तकात शेवटी व्यवसाय काळातल्या निवडाक बारा आठवणी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे लेखन, व्याख्याने, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्या त्या वेळचे फोटो असा सगळा भाग पारिशिष्टात दिलेला आहे
डॉक्टर१९५९ आली एम.बी.बी.एस. झाले व १९६३ साली एम.एस. झाले. सुरवातीला चार वर्षे त्यांनी सरकारी नोकरी केली. १९६५पासून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९६८साली त्यांचे ‘श्री हॉस्पिटल’ स्वत:च्या वास्तूत गेले.
१९६४साली त्यांचा विवाह बंगलोरयेथील डॉ. इंदुमती कुलकर्णी यांच्याशी झाला. त्या माधवी कुलकर्णी बनून डॉक्टरांच्या घरात आल्या आणि दुधात साखर विरघळावी, तशा त्यांच्या जीवनात विरघळून गेल्या.
प्रत्येक वर्षी ते वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस ला जाऊ लागले. तिथे होणारी भाषणे, चर्चा यातून त्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपल्या ज्ञानाचाही इतरांनाही फायदा करून दिला.
पुस्तक वाचत असताना डॉक्टरांची खास गुणवैशिष्ट्ये लाक्षत येतात, ती अशी— प्रखर बुद्धिमत्ता, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, अभ्यास आणि संशोधनाची वृत्ती, सौजन्यशील-मृदू स्वभाव, अफाट लोकसंग्रह. नीटनेटकेपणा हा त्यांचा आणखी एक विशेष. आपल्या सगळ्या पेशंटसचे व्यवास्थित रेकॉर्ड त्यांनी ठेवले. ओपरेशन्सच्या वेळचे फोटो घेऊन तयार केलेल्या पारदर्शिका (स्लाईडस), प्रबंध-व्याख्यानांची तयारी या सगळ्यात त्यांचा नीटनेटकेपणा जाणवतो.
‘… तर मी का नाही?’ हे आत्मचरित्र जितके माहितीपूर्ण आहे, तितकेच ते रसाळही झालेले आहे. त्याचे श्रेय उत्तम शब्दांकन करणार्या प्रा. डॉ. मुकुंद पुजारी यांनाही द्यावे लागेल. साधी प्रासादिक, ओघवती, उत्सुकता वाढवणार्या भाषेत पुस्तकाचे लेखन झाले आहे. डॉ.चा मोठेपणा सांगणारा त्यांचा स्वत:चा लेखही यात आहेच. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.(श्रीमती) स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना पुस्तकाचे सार आणि महत्व मोजक्या शब्दात सांगणारी, लक्षवेधी अशी आहे. एका कृतार्थ जीवनाची वेधक कहाणी यात आपल्याला वाचायला मिळते.
पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पाय आणि वाटा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – पाय आणि वाटा
लेखक – श्री सचिन वसंत पाटील
प्रकाशक – हर्मिस प्रकाशन
पृष्ठे – १००
मूल्य – १५० रु.
‘पाय आणि वाटा’ हा श्री सचिन वसंत पाटील यांचा ललित लेख संग्रह. दुर्दैवाने त्यांना एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले. पाय असताना ज्या वाटा त्यांनी तुडवल्या, त्याच्या हृदयस्थ आठवणी म्हणजे ‘पाय आणि वाटा’. मनोगतात ते लिहितात, ‘माझी कहाणी सुरू होते वर्तमानात, पाय नसलेल्या अवस्थेत. मग ती वीस वर्षामागील एका बिंदूवर स्थिरावते आणि त्यामागील वीस वर्षात फिरून, हुंदडून येते. तेव्हा पाय असलेला मी तुम्हाला भेटत रहातो, तुकड्यातूकड्यातून…कधी निखळ, निरागस, तर कधी रानभैरी, उडाणटप्पू होऊन… शब्दाशब्दातून.
एका दुर्दैवी क्षणी सचीनना अपघात झाला आणि ते अंधाराच्या खोल खाईत भिरकावले गेले. शेतावर चारा आणायला गेलेले असताना, एका अवघड वळणावर बैलगाडी पलटली. वैरणीने भरलेली गाडी त्यांच्या पाठीवर पडली. यामुळे त्यांच्या मज्जारज्जूला जोराचा धक्का बसला. आणि त्यांच्या कमरेखालचा भाग कायमचा लुळा पांगळा झाला. डॉक्टरांनी वस्तुस्थितीची कल्पना दिली. ते यापुढे कधीही चालू शकणार नव्हते. स्वत:च्या पायावर उभे राहू शकणार नव्हते. पण त्या विकल निराशेतही ते स्वप्न बघत, समोरचा वॉकर धरून ते चालताहेत. आयुष्याच्या अंधार्या रस्त्यावरून ते कणाकणाने पुढे सरकताहेत. या काळात एकमेव विरंगुळा म्हणजे पुस्तके वाचणे. पुस्तकांनीच त्यांना शिकवलं, संकट माणसाला जगणं शिकवतात. मग त्यांनी ठरवलं, संकटांना भ्यायचं नाही. खंबीर मनाने सामोरं जायचं. ते म्हणतात, ‘पुस्तकं वाचली, म्हणून मी वाचलो.’
श्री सचिन वसंत पाटील
वाचनातून सचिनना लेखनाची प्रेरणा मिळाली. लेखन ही काही सोपी गोष्ट नव्हती त्यांच्यासाठी. झोपून, एका कुशीवर वळून लिहावं लागे पण जिद्दीने त्यांनी आपले लेखन चालू ठेवले. त्यातून त्यांचे ‘सांगावा’, ‘अवकळी विळखा’ आणि ‘गावठी गिच्चा’ हे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. अनेक साहित्यिक, अभ्यासक, समीक्षक यांनी त्यावर लिहिलय. या पुस्तकांवरील समीक्षेची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या तीनही पुस्तकांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अलिकडेच त्यांचे ‘पाय आणि वाटा’ हे ललित संग्रहाचे चौथे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. अलिकडे लेखन करणं त्यांना पहिल्यापेक्षा सोपं झालय. आता ते लेखनासाठी लॅपटॉपचा उपयोग कारतात, पण तेही सोपं नाही. आताही त्यांना झोपूनच लेखन करावं लागतं. पोटावर झोपायचं. पुढे लॅपटॉप ठेवायचा. आणि टाईप करायचं. हीदेखील मोठी कसरत आहे. दिवसभरात ते जास्तीत जास्त दोन पाने लिहू शकतात. या लेखन मर्यादेमुळे पुष्कळसं सुचत असलं, तरी ते कागदावर उतरत नाही. मात्र त्यांनी जे काही लिहीलंय, ते उत्तम लिहीलंय.
‘पाय आणि वाटा’ या ललित लेखसंग्रहातील वातावरण अस्सल ग्रामीण आहे. अस्सल ग्रामीण जीवन, अस्सल ग्रामीण भाषेतून यात व्यक्त झाले आहे. खानदानी ग्रामसुंदरीचा डौल, रुबाब आणि ठसका यात आहे. त्यांची शब्दकळा लावण्यामयी आहे. ‘राखण’ या पाहिल्याच लेखात त्यांनी वर्णन केलय, ‘जमिनीच्या पोटातला गर्भ दिसामासांनी वाढायचा’. …. ‘शाळवाच्या धाटातून, केळीच्या कोक्यागत कणसं बाहेर पडायची. कणसांची राखण करणार्यांना पाखरं लांब गेली, असं वाटायचं. पण कुठलं? म्हवाच्या माशा उठल्यागत पुन्हा थवा यायचा. हळू हळू मोठा होत रानावर उतरायचा. एकेका थव्यात दोन-अडीचशे पाखरं असायची. असे असंख्य थवे.’ प्रत्यक्ष दृश्य डोळ्यापुढे उभं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या वर्णनात आहे.
‘राखण’ हा पुस्तकातला पहिला लेख. यात राखणीचं निमित्त काढून हुंदडायला गेलेल्या मुलांसोबत आपणही फिरतो. डोळ्यांनी सारं सारं पहातो. पंचेंद्रियांनी अनुभवतो. लेखाच्या शेवटी ते आठवणीतून वास्तवात येतात. लिहितात – ‘जनावरांच्या कालव्यानं मी जागा होतो. भोवतीच्या पडक्या भिंती मला भानावर आणतात. पण मनात हिरवं रान नाचत असतं. डोळ्यात हिरवी साय. मला आजही आशा आहे, मी माझ्या पायावर परत उभा राहीन. पुन्हा हातात गोफण घेऊन शाळवानं पिकलेलं रान राखीन.’ हा आशावादच त्यांना जगण्याचे बळ देतो.
‘करडईची भाजी’ हा लेख कथेलाच गळामिठी घालतो. हाच लेख नव्हे, तर अनेक लेख कथेच्या जवळपास जाणारे आहेत. या संदर्भात त्यांच्याशी बोलले, तेव्हा ते म्हणाले, ‘ललित लेखांमध्ये ‘मी’ आहे. माझे अस्तित्व आहे. माझे अनुभव आहेत. कथा विविध पात्रांच्या आहेत. त्यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे अनुभव, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यात आहेत. तिथे मी असेन, तर केवळ साक्षीभावानेच.’ ‘करडईची भाजी’ या लेखात, एक दहा-बारा वर्षाचा मुलगा बुट्टीत करडईची भाजी घेऊन विकायला निघालेला लेखकाला भेटतो. लेखक त्याला दहा रुपये देऊन दोन पेंडया विकत घेतो. त्यामुळे तो खूश होतो. त्याचे हास्य पाहून लेखकाला त्याचं बालपण आठवलं. ‘पाय हरवलेल्या अंधेर नगरीतून आठवणींच्या नितळ विहीरीच्या खोल पायर्या मी उतरू लागलो.’ असे ते लिहितात. त्यावेळी ते सहावीत होते. परीक्षेची फी भरायला घरात पैसे नव्हते. शेवटी आई म्हणते, ‘रानात करडा खूप उगवलाय. त्यो काढून पेंडया बांधून वीक जा’ आणि त्याचे काम सुरू होते. चार आण्याला पेंडी. फी होती आठरा रुपये. एक दिवस गोठा साफ करातांना एक कालवड लाथ मारते. वेदना होतात. मांडीवर बॉलगत लालभडक टण्णू उठतो. दु:ख असतंच पण भाजी विकायला जाता येणार नाही, याचं जास्त दु:ख होतं. अखेर पाय सुधारतो. पंध्रा दिवसात फीचे पैसे जमा होतात. लेखाचा शेवट करताना त्यांनी लिहिलय, ‘आज वीस-बावीस वर्षांनंतर त्या भाजी विकणार्या मुलाला पाहून ते सगळं आठवलं. आज विकण्यासारखी भाजी माझ्या शेतात भरपूर आहे पण ती गवभर फिरून विकायला माझ्याकडं पाय नाहीत.‘
‘झुक झुक आगीनगाडी’मध्ये मध्ये मामाच्या गावाचे वर्णन येते. कुरूंदवाड मामाचं गाव. तीन बाजूने पाण्याने वेढलेलं गाव. बेटासारखं गाव. उशाशी कृष्णा आणि पायथ्याशी पंचगंगा घेऊन वसलेलं गाव. गावातील रमणीय निसर्गाचं वर्णन यात येतं. मामाचंही वर्णन यात येतं. ’तो आभाळाएवढा उंच वाटायचा. आपल्या मामाइतका मोठा माणूस जगात कोणी नाही, असा वाटायचं. आपण मागेल ती वस्तू देणारा. म्हंटलं तर जादूगार म्हंटलं तर सांताक्लॉज . मनातली वस्तू न मागता देणारा …’ असं मामाचं वर्णन यात येतं. गावाच्या रमणीय निसर्गाचं वर्णनही यात येतं आणि कालमानाने झालेल्या बदलाचंही. आपलंही गाव कसं बदललं आहे, याचंही वर्णन पुढे एका स्वतंत्र लेखात त्यांनी केलय.
‘पोस्टाचं पत्र हरवलं’मध्ये बदलत्या काळानुसार पत्रलेखन कमी झाल्याची खंत ते व्यक्त करतात. अक्षर चांगलं असल्यामुळे गल्लीतील लोक त्यांच्याकडून पत्र लिहून घेत.त्यांनी सांगितल्या मुद्याला कल्पनेचा मालमसाला लावून ते पत्र लिहित. ते म्हणतात, ‘माझ्या लेखनाची सुरुवात या दरम्यान कुठे तरी झाली असावी.’ यात पायाचा आंगठा आणि तर्जनीत खडू घरून काढलेल्या नाचर्या मोराची आठवण येते आणि आता ते पाय कुठे गेले, या बिंदुशी येऊन स्थिरावते.
‘ती बैलगाडी’, ‘घोडी’, ‘पाठीराखा’ अशी सुरेख शब्दचित्रे यात आहेत. ‘पाठीराखा’मध्ये आपल्या मोठ्या भावाबद्दल त्यांनी अतीव उमाळ्याने लिहिले आहे. लहानपणी रस्त्यावर पळतो, म्हणून अडवणारा भाऊ, अपघातानंतार चालता यावं म्हणून धडपडणारा भाऊ, ऑपरेशन चालू असताना रकतासाठी डोनर शोधणारा भाऊ, हॉस्पिटलचे बील भागवण्यासाठी पैशाची जुळणी करणारा भाऊ, अशी त्याची अनेक रूपे त्यांनी यात वर्णन केली आहेत. तो जवळ असेल, तर कशाचीच भीती नाही, असा ठाम विश्वास आणि तो जवळ नसल्यामुळेच अपघात झाला, असं त्यांना वाटत रहातं. आजही पाय नसल्याचं दु:ख एकीकडे वागवतानाच आपला भाऊ आपल्याजवळ आहे, हे सुख आपल्यापाशी आहे, याचा आनंद ते व्यक्त करतात.
‘कोरडे डोळे ‘ मध्ये आपल्याला भेटतो, एक कंजारभाटाचा मुलगा. त्यांची पाच-सात झोपड्यांची वस्ती कुणी जाळून टाकलीय. बायका- मुले, बापये तेवढे वाचलेत. बाकी सारं सामान जाळून गेलय. त्यातच त्या मुलाचे दप्तरही जळून गेलय. तो रोज शाळेत येतो. कोरड्या डोळ्यांनी काळ्या फळ्याकडे पहातो. जमेल तसं मनात उतरवून घेतो. नंतर कधी तरी तो शाळेत येइनासा होतो. लेखक देवाकडे मागणं मागतो, शिकायची इच्छा असलेल्या कुठल्याही मुलाला शाळा सोडायला लागू नये. बाकी काही नुकसान झालं, तरी त्याची पुस्तकं तेवढी जळू देऊ नकोस.’
‘झाड आणि वाट’ मध्ये भेटतात, भुंडा माळ, त्यातून गेलेली वाट, वाटेवरच्या वाळणावरचं डौलदार आंब्याचं गच्च हिरवंगार झाड आणि त्या झाडाचा म्हातारा मालक. तो रोज त्या झाडाच्या बुंधयाशी पाण्याचा डेरा भरून ठेवतोय. उन्हाच्या रखरखीतून वाट तुडवत येणारा तृषार्त ते पाणी पिऊन तृप्त होतोय. पुढे कालमानाने जग बदललं. इरिगेशनचं पाणी आलं आणि भुंड्या माळाचं भाग्य बदललं. तो हिरवागार झाला. तिथे द्राक्षाची लागवड झाली. वाट डांबरी झाली. बाकी सारं चांगलं झालं. या सार्यात आंब्याचं झाड गेलं, एवढंच वाईट झालं.
‘पाय आणि वाटा’ हा संग्रहातला शेवटचा लेख. आपल्या पायांनी चाललेल्या वाटांच्या आठवणी यात आहेत. त्यात कुरणाची वाट आहे. बुधगावची वाट आहे. वाडीवाट आहे. रानाची वाट आहे. गावाकडून साखर कारखान्याकडे बेंद भागातून जाणारी मधली वाट आहे. त्या त्या वाटेवरचे प्रसंग, व्यक्ती यांच्या आठवणी यात आहेत आणि सगळ्यात विदारक आठवण म्हणजे एकदा त्या वाटेवरून जाताना त्यांना झालेला अपघात, जो त्यांचे पायच घेऊन गेला. ते लिहितात, ‘आता कधी गाडीवरून त्या वाटेवर जायची वेळ आली, तर दिसतात, त्या वाटेवर हरवलेल्या पावलांचे ठसे….’
‘पाय आणि वाटा’ या पुस्तकात गतिमानता आहे. दृश्यात्मकता आहे, भावनोत्कटता आहे. कुठे कुठे कथात्मकताही आहे. शब्दकळा लावण्यमयी आहे. एक चांगले पुस्तक वाचल्याचा आनंद हे पुस्तक नक्कीच देते.
पुस्तक लेखक – श्री सचिन वसंत पाटील
विजय भारत चौक, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली. पिन- ४१६४१६. भ्रमणध्वणी – 8275377049, ईमेल – sachinpatil7049@gmail.com
पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “समर्पण” – संकल्पना – श्री अरूण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
पुस्तकाचे नाव: समर्पण
लेखक:श्री.अरुण पुराणिक
प्रकाशक :आर्या पब्लिकेशन अँड डिस्ट्रीब्यूटर.
प्रथम आवृत्ती:६ऑक्टोबर २०२२
किंमत :१००/—
श्री.अरुण पुराणिक यांचे, ” समर्पण “ हे नुकतेच प्रकाशित झालेले छोटेखानी पुस्तक मी वाचले आणि अक्षरशः मन गहिवरलं.
समर्पण ही, अरुण पुराणिक यांच्या स्वतःच्या सहजीवनाची कहाणी आहे. ती वाचत असताना, पती-पत्नीचं नातं कसं असावं, याचा पावलोपावली बोध होतो.
या कहाणीची सुरुवातच ,” आज जो काही मी आहे तो तिच्यामुळे ” या वाक्याने ते करतात. पत्नीने आयुष्यातल्या चढउतारात, सुखात, दुःखात, अडचणीत, अत्यंत प्रेमाने केलेल्या सोबतीविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता, त्यांच्या या पहिल्या वाक्यातच वाचकाला जाणवते. एका सुंदर नात्याचीच ही कहाणी आहे. ही कहाणी परस्परावरील प्रेमाची, विश्वासाची, आधाराची, आहे.
समर्पण हे पुस्तक वाचताना, वाचक या कथेत मनोमनी गुंतून जातो. लेखकाबरोबरच तोही भावनिक होतो, हळहळतो. हे सारं यांच्याच बाबतीत का घडावं? असं सतत वाटत राहतं. दोघांच्याही हिम्मतीला आणि गाढ प्रेमाला, भरभरून दाद द्यावीशी वाटते.
एका सामान्य शिक्षकी पेशापासून आयुष्याची सुरुवात झालेल्या एका युवकाची ही कथा. तसं पाहिलं तर सर्वसाधारणपणे, मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याची ही एक साधी कहाणी. नोकरी, लग्न, संसार, मुलंबाळं, जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी, बेरजा वजाबाक्या, प्रियजनांचे मृत्यू, घटित अघटित, या साऱ्यांचा एक कडू गोड जीवनपट. तरीही हे पुस्तक वाचत रहावसं वाटतं. रटाळ ,कंटाळवाणं वाटत नाही. कारण अत्यंत प्रामाणिकपणे, सहज, सोप्या, ओघवत्या आणि भावभऱ्या शब्दातून व्यक्त झालेलं हे लेखन. आणि त्यातून झिरपणारं, दवबिंदूसारखं निर्मळ, मनाला भिडत जात असलेलं प्रेम, प्रेमभाव, विश्वासाचं देणं!!
अत्यंत क्लेषदायक परिस्थितीतही पतीचा वाढदिवस प्रेमाने साजरी करणारी पत्नी असो, किंवा पत्नीच्या अगतिक अवस्थेत तिला स्नानासाठी वात्सल्याने मदत करणारा पती असो…हे प्रसंग वाचताना अंग शहारतं. मी वात्सल्य हा शब्द वापरला कारण, प्रीत, प्रेम, माया हे समानार्थी शब्द असले तरी वात्सल्य या शब्दातला ओलावा या द्वयीत मला जाणवला. शारिरिक प्रेमाच्या पलीकडे गेलेला हा अनुभव होता.
समर्पण ही एक विविध रंगी प्रेमकथा आहे असंच मी म्हणेन. संसारात पती-पत्नीचं एकमेकांशी असलेलं घट्ट नातं काट्याकुट्याची वाटही आनंदाने पार पाडू शकतं, याचाच वस्तुपाठ आहे.
एकाच माणसाच्या आयुष्यात इतके वेदनादायक वियोग का असावेत आणि त्यांनी ते कसे सहन केले याचेही धक्के बसतात वाचकाला. पण जेव्हा लेखक म्हणतो की, “आज जो काही मी आहे तो तिच्यामुळेच…” यातली सकारात्मकता ही खूप महत्त्वाची आहे. ही कथा निराशावादी नाही. यात दु:खाला कुरवाळून बसणं नाही. रडगाणं नाही. कसलीही तक्रार नाही. आहे ती फक्त स्वीकृती. हेच नक्षत्राचे देणे, असे समजून केलेला स्वीकार.आणि हाच या कथेचा खरा आत्मा आहे. गीता वाचणे आणि प्रत्यक्ष गीता जगणे यात खूप फरक आहे . समर्पण कथेत गीतेतलं जगणं जाणवतं.
एवढंच म्हणेन की ही एका जिद्दी, चिवट, संस्कारित, चारित्र्यशील, स्थिर, अशा मानसिकतेची सुंदर कथा आहे. जरुर वाचावी अशीच.
श्री.अरुण पुराणिक यांच्या साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! आणि त्यांचे उर्वरित आयुष्य, सुखासमाधानाचे व निरामय आरोग्याचे जावो !!– हीच प्रभू चरणी प्रार्थना !!
– हे पुस्तक पाहिलं, आणि नकळतच मनात प्रश्न उभा राहिला की… ‘‘वार्धक्य… आणि कृतार्थ…?” … आणि तेही आत्ता आजूबाजूला सातत्याने दिसणा-या परिस्थितीत? उत्सुकता स्वस्थ बसू देईना… मग लगेचच हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि अगदी प्रस्तावनेपासूनच पानागणिक मिळणारी वेगवेगळी शास्त्रीय माहिती वाचतांना, वृध्दत्त्वाशी निगडित असणा-या अनेक प्रश्नांचे वेगवेगळे आकृतीबंध डोळ्यासमोर उभे राहिले.
माणसाचे सर्वसाधारण आयुष्यमान ७५ ते ८० वयापर्यंत वाढले आहे हे तर जाहीरच आहे… त्यामुळे या वयोगटातील माणसांची संख्याही वाढली आहे. आणि अर्थातच् वृध्दांसमोरची आव्हानेही वाढली आहेत. इथे वृध्दांसमोरच्या ‘समस्या’ न म्हणता ‘आव्हाने’ म्हणणे, इथेच लेखिकेचा या विषयाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. आणि मग टप्याटप्याने पुढे जात, ही आव्हाने यशस्वीपणे कशी पेलता येतात, याचे लेखिकेने सोदाहरण विवेचन केले आहे… अगदी पटलेच पाहिजे… आणि आचरणातही आणले पाहिजे असे.
‘एखादी व्यक्ती वृध्द होते, म्हणजे नेमके काय होते? ’ हा पहिलाच प्रश्न… इथूनच या पुस्तकाला सुरुवात झालेली आहे. उमलणे… उभरणे… कोमेजणे… थोडक्यात उत्पत्ती-स्थिती-लय… यापैकी ‘ कोमेजत जाणे ’… हा तिसरा टप्पा वृद्धत्वाचा. हे जरी सत्य असले, तरी माणसाचे कोमेजत जाणे कसे असते, हे त्याच्या शारिरिक व मानसिक स्वास्थ्यानुसार, त्याच्या कार्यरत रहाण्याच्या क्षमतेनुसार, अंगभूत कौशल्यानुसार, आणि या अनुषंगानेच, त्याने आयुष्यभर केलेल्या व्यवसायानुसार, प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असते. म्हणूनच वय आणि कार्यमग्न रहाण्याची क्षमता, याचे कुठचेही ठाम गणित मांडता येत नाही, मांडले जाऊही नये, हा विचार नकळत वाचकाच्या मनात भुंग्यासारखा गुणगुणायला लागतो, याचे श्रेय लेखिकेला द्यायलाच हवे. इथेही…१)‘नववृध्द, म्हणजे तरूण जेष्ठ’, २)‘वृध्द किंवा ज्येष्ठ’ , ३) ‘अतिवृध्द किंवा अति ज्येष्ठ’, हे वृध्दत्त्वाचे तीन टप्पे असतात हे सांगतांना लेखिकेने… १ ला टप्पा म्हणणे शिशिरातील चांदणे, २ रा टप्पा म्हणजे हेमंत ऋतूतील पानगळती, आणि ३ रा टप्पा म्हणजे शिशिरातील गूढ शांतता… अशी अगदी सुंदर… सहजपणे पटणारी उपमा दिलेली आहे. आणि अशाच अनेक चपखल उपमा, प्रसिध्द लेखकांच्या साहित्यातले या विषयाला अचूक लागू होतील असे वेचे, काही सुंदर कविता, यांचा अगदी यथायोग्य उपयोग सहजपणे या पुस्तकात केलेला आहे.
याच्याच जोडीने, आत्तापर्यंत विकसित झालेल्या ‘ वृध्दशास्त्राच्या ’ वेगवेगळ्या शाखांचा उहापोहही केलेला आहे, आणि त्याला सहाय्यभूत असणारे कितीतरी आलेख, लहान लहान तक्त्यांच्या माध्यमातून दिलेली प्रत्यक्षदर्शी माहिती, पूरक चित्रे, याद्वारे या विषयाची परिपूर्ण माहिती देण्याचा लेखिकेचा हेतू स्पष्टपणे जाणवतो.
वृद्धत्वाचे स्वरूप, वृध्दांची मनोधारणा, बौध्दिक स्थिती, सामाजिक स्थिती, अशा अनेक गोष्टींचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतांना, वृध्दांनी ‘स्वयंशोध’ घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर लेखिकेने आवर्जून भर दिला आहे, आणि त्यादृष्टीने मांडलेला प्रत्येक मुद्दा कोणत्याही ‘सजग’ वृध्दाला पटलाच पाहिजे असा आहे. कोणाचेही वय विचारायचे असेल तर ‘How old are you?’ असे विचारले जाते. पण वृध्दांच्या बाबतीत मात्र, त्याऐवजी ‘How young are you?’ हा प्रश्न विचारायला हवा, हे लेखिकेचे म्हणणे मला अतिशय आवडले… मनापासून पटले. कारण या प्रश्नाच्या उत्तरातच, माणूस स्वत:च्या वृध्दत्त्वाकडे कशाप्रकारे बघतो… किंवा स्वत:ची निराशेकडे झुकणारी मानसिकता बदलू इच्छितो की नाही, याचे उत्तर दडलेले आहे… वृध्द असणे आणि सारखे वृध्द असल्यासारखे वाटत रहाणे यातला फरक यामुळे आपोआपच ठळकपणे अधोरेखित होतो.
याच अनुषंगाने पुढे वृद्धत्वाच्या गरजा आणि अपेक्षा, नकळतपणेच पण महत्त्वाची ठरणारी मानसिक निवृत्ती, अटळ असे शारीरिक आणि आर्थिक परावलंबन, हे सगळे निरोगी मनाने स्वीकारून, ते आपल्या परीने जास्तीत जास्त नियंत्रणात ठेवण्याची मानसिकता जोपासण्याची गरज, अशा अनेक अतिशय महत्त्वाच्या मुद्यांवर लेखिकेने परिपक्व म्हणावे असे भाष्य केले आहे. खरं तर ते फक्त भाष्य नसून, वाचकांच्या विचारांना अगदी योग्य आणि आवश्यक दिशा देणारे मार्गदर्शन आहे, ज्यातून प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखे, प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखे आहे.
भूतकाळाच्या तुलनेत आत्ताच्या काळात वृध्दांच्या समस्या बदलल्याही आहेत आणि वाढल्याही आहेत हे तर खरेच. लेखिका स्वत: मानसशास्त्र तज्ञ आणि ख्यातनाम समुपदेशक असल्याने, वृद्धत्व या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातली मानसिकता, झेपतील की नाही अशा वाटणा-या या वयातल्या समस्या, याबद्दल फक्त शास्त्रीय माहिती देऊन न थांबता, त्यावरच्या प्रत्यक्षात करता येणा-या उपाययोजनाही त्यांनी सहजपणे समजतील, आणि तितक्याच सहजपणे प्रत्यक्ष आचरणातही कशा आणता येतील, हे अगदी उत्तमपणे, गप्पा मारता मारता महत्त्वाचे काही आवर्जून सांगावे, अशा पध्दतीने अगदी सहजसोप्या भाषेत सांगितले आहे, असे मी ठामपणे म्हणू शकते. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात असलेले उत्तम समुपदेशनपर लेखही पुस्तकातील मार्गदर्शनाला अतिशय पूरक असेच आहेत.
मीही आता “ 72 years young “ आहे, आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आता ‘ मीच माझा दिवा आहे ’ हे मला पूर्णपणे आणि मनापासून पटले आहे. अर्थात याचे सर्व श्रेय मी लेखिकेला द्यायलाच हवे. हे पुस्तक वाचल्यानंतर, त्यात केलेले समुपदेशन मनापासून आचरणात आणण्याचा निश्चय मी तरी नक्कीच केला आहे. आता माझे वार्धक्य नक्कीच “ कृतार्थ “ होईल हा विश्वास या पुस्तकाने मला दिला आहे, आणि तोच विश्वास या पुस्तकातून सर्वांना मिळेल, याची मला खात्री आहे.
या अतिशय वाचनीय, आणि त्याहूनही मननीय अशा पुस्तकाबद्दल लेखिका डॉ.वनिता पटवर्धन यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार !!!
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अर्थवित्त क्षेत्रासारख्या रुक्ष कार्यक्षेत्रात प्रदीर्घ काळ वाटचाल करतानाही जगण्याकडे पहाण्याची सजगदृष्टी अतिशय जाणीवपूर्वक जपणाऱ्या डाॅ .मिलिंद विनोद यांचा ‘आयुष्याचं गणित ‘ हा विविध बाजाच्या, शैलीतल्या,
कधी मिष्किल तर कधी उपरोधिक भाष्य करत अंतर्मुख करणाऱ्या कवितांचा संग्रह.
डाॅ. विनोद यांची कविता आजवर ‘कविता’ या साहित्यप्रकाराला अपेक्षित असणाऱ्या मापदंडांच्या बंधनात अडकून न पडता मोकळेपणाने व्यक्त होऊ पहाणारी कविता आहे. प्रत्येकीचा आशय, विषय, रुप, शैली सगळं वेगळं तरीही तिचं स्वरूप मात्र हे वैशिष्ट्य ल्यालेलंच.
आयुष्यात सहज जाताजाताही खुपणाऱ्या बोचणाऱ्या विसंगती कवितांच्या रूपात व्यक्त करतानाही मिष्किलता जपणाऱ्या, तरीही ती बोच बोथट होऊ न देणाऱ्या यातील कविता मनात रेंगाळत रहाणाऱ्या आहेत.
खुमासदार, गंमतीशीर, विषय-आशयाचे थेट अधोरेखन न करणाऱ्या, चटकन् अर्थबोधही न होणाऱ्या शीर्षकांमागचं रहस्य जाणून घेण्यासाठी ती कविता वाचायला रसिकांना उद्युक्त करते, हे या काव्यसंग्रहाचं मला प्रथमदर्शनी जाणवलेलं खास वैशिष्ट्य ! ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड ‘, ‘ बत्ती गुल’, ‘शेखचिल्ली’,’आर आर आर चा पाढा ‘, ‘रम आणि राम’ ही अशा खुमासदार शीर्षकांची कांही प्रातिनिधिक उदाहरणे !
या संग्रहात मराठी आणि हिंदी अशा दोन विभागात एकूण सत्तर+ कविता आहेत. काही अल्पाक्षरी तर काही दीर्घ.
प्रारंभ होतो ‘हेरंब’ आणि ‘गणराया’ या गणेश-वंदनेच्या रूपातल्या श्री गणेशाला अर्पण केलेल्या दोन काव्यरूपी भावफुलांनी !
त्यानंतरचा एखाददुसरा अपवाद वगळता बाकी कविता मात्रांच्या हिशोबात स्वतःची ओढाताण करुन न घेणाऱ्या, तरीही आपली अंगभूत लय अलगदपणे जपणाऱ्या आहेत. अत्यावश्यक तिथेच आणि तेवढेच इंग्रजाळलेले शब्द पण तेही कवितेला आवश्यक म्हणून आलेले आणि तिला वेगळंच रुप बहाल करुन जाणारे. इतर सर्वच कविता न् शायरींमधे अनुक्रमे मराठी आणि हिंदी/उर्दू भाषांवरील प्रभुत्त्व खास जाणवणारे ! प्रदीर्घकाळ परदेशात व्यतीत करूनही त्या वातावरणाचा कणभरही परिणाम होऊ न देता मराठी भाषेवरील प्रभुत्व अबाधित राखणं आवर्जून कौतुक करावं असंच आहे. याचं प्रत्यंतर सुरुवातीच्याच ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड’ ही कविता देते. मीठमोहरीचं पंचपाळं, मोहरीसारखं तडतडणं,नवऱ्याला कणकेसारखं तिंबणं, पोळीला सुटणारा छानसा पापुद्रा यासारख्या या कवितेला अभिप्रेत असणारं मराठमोळं वातावरण जपणाऱ्या प्रतिमा, तसेच चपखल म्हणी आणि वाक्प्रचार यांचा या कवितेतील वापर हे सगळं आवर्जून दखल घ्यावी असंच.
यात रेखाटलेले सासूसुनेचे नाते आणि त्या नात्यातले संबंध न् संघर्ष, ही कविता टोकदार होऊ देत नाही तर ती त्यातील सामंजस्य जपू पहाते हे तिचे वेगळेपण !
अलगद वेगळीही झालीस ‘ असं म्हणणाऱ्या सासूला ‘मायेच्या उबेत सतत जपलंत त्याला, आता सळो की पळो करून सोडलंय त्यानं मला’ असं म्हणत नवऱ्याच्या वागण्याचा दोष सासूलाच देणारी सून. या दोघींचे पुढचे सगळेच खरपूस संवाद मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. ‘ मापट्याच्या पलीकडची तू सुपातली अन् मापट्याच्या अलीकडची मी– जात्यातली. भरडणं चुकलं नाहीये ते दोघींच्या कपाळी..’ हे सासूचे शब्द सुनेला स्त्री म्हणून समजून घेताना तिला स्त्री जन्माच्या वास्तवाची वेळीच ओळख करून देतात. दोघींनीही नेहमीच फणा न काढता मायेचा गोफही विणावा हे सांगणारी ही कविता आशयाला वेगळेच परिमाण देते.
यानंतर लगेचच येणारी ‘कार्टं ऑफ हॅविंग टू आर्ट ऑफ लव्हिंग ‘ ही कविता परस्परभिन्न जातकुळीतली.
‘आमच्या वेळी सर्रास होते मराठी माध्यम, कळलेच नाही केव्हा झाले त्याचे मराठी मिडियम ‘ अशी विषयाची थेट सुरुवात असणारी ही कविता.ती त्या विषयास आवश्यक अशा इ़ंग्राजळेल्या मराठी भाषेतली प्रदीर्घ कविता आहे.ही एकच कविताही कवीच्या अनुभवविश्वाच्या विस्तृत परिघाचा प्रत्यय देण्यास पुरेशी ठरावी.
बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत आणि एकंदरीत जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे होत गेलेली सर्वदूर पडझड ‘जनरेशन नेक्स्ट’, ‘आजचा सुविचार-मिली भगत’, ‘बत्तीगुल’ अशा अनेक कवितांमधून दृश्यरुप होते.
निसर्ग उद्ध्वस्त करीत विकासाची स्वप्ने पहाणाऱ्या माणसामुळे अस्वस्थ झालेल्या प्राण्यांच्या मनातली घुसमट त्यांना असह्य होते तेव्हा ते प्राणी माणसाला कसा धडा शिकवतात याचे प्रत्यंतर देणाऱ्या भयप्रद स्वप्नातून जाग येताच माणूस खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याचे अस्वस्थ कल्पनाचित्र रेखाटणारी ‘आर आर आर चा पाढा ‘ ही कविता या शीर्षकाचा अर्थ समजून घ्यायला मुळातूनच वाचायला हवी.
‘अक्कलखाते’ मधील माणसांचे विविध नमुनेही आवर्जून पहाण्यासारखे आहेत. ‘प्रिप्रे ते प्रप्र तत पप ते तप्त- प्रवास तीन तपांचा’ ही गंमतीशीर लांबलचक आणि चटकन् अर्थबोध न होणाऱ्या शीर्षकाची मिष्किल,विनोदी शैलीतली कविता म्हणजे तीन तपातील प्रचंड बदल आणि पडझडी पचवलेल्या प्रदीर्घ प्रवासातील विविध स्क्रिनशाॅटस् म्हणता येतील.वाचताना हसवणारे न् हसवता हसवता नकळत फसवत वाचकांना स्वत:चं जगणंही एकदा तपासून पहायला प्रवृत्त करणारे! यातील ‘तोंडसुख’ या शब्दातील श्लेषार्थ, तसेच इतरही अनेक शब्दांत लपलेल्या विविध छटांचा वेध हे सगळं वेगळ्या, अनोख्या शैलीने अधिकच सजलेलं!
‘पॉलिटिशिअन स्पीक्स् ‘ मधे माणसाची होत गेलेली अधोगती ‘स्फटिकासारखा स्वच्छ होता पांढरा माझा पैसा, कळलंच नाही कधी झाला काळा त्याचा कोळसा ‘ अशा थेट वास्तवाला भिडणाऱ्या कथनाद्वारे ठळकपणे अधोरेखित होते.
‘मिस्टर पर्सेंटेज’ ही कविता व्यवस्थेला लागलेली कीड रोखठोकपणे चव्हाट्यावर आणते.यातील भ्रष्टाचाराला लावलेली ‘एजन्सी हँडलिंग चार्जेस’ , ‘फास्टट्रॅक प्रोसेसिंग फीज ‘, यासारखी नवीन शिष्टसंमत लेबल्स त्या किडीचं पोखरणं किती सर्रास सराईतपणे सुरु आहे हे सांगण्यास पुरेशी आहेत.
आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ‘ सल ‘या कवितेचा! या संग्रहातील स्वतःच्या वेगळेपणामुळे उठून दिसणारी ही कविता मला विशेष भावली.
समुद्रकिनारा, लाटा, पायाखालची सरकणारी.. पावलाना गुदगुल्या करणारी वाळू, विशाल विस्तीर्ण क्षितिज, अशा प्रतिमांच्या विविध रंगांच्या शिडकाव्यांनी धुंद होत गेलेल्या वातावरणाचाच एक भाग बनून गेलेली ‘ती’ आणि ‘तो’ यांच्या मनासारख्या कधीच न फुललेल्या नात्याची ‘सल’ ही अनोखी कविता! एखादी रूपक कथा अलगद उलगडत जावी तशी ही कविता उमलत जाते.त्याच्या विशीपासून जीर्ण, जर्जर, विकारग्रस्त वृद्धापकाळपर्यंत त्याला सतत अस्वस्थ करीत राहिलेल्या तिच्या अलवार आठवणींनी व्याकुळ झालेला तो !आणि त्याच्या मनातील भावनांचा कोंडमारा व्यक्त करणाऱ्या या कवितेचा उलगडत गेलेला पट!
‘तो’ म्हणजे कवी पण ‘ती’ म्हणजे नेमकी कोण या प्रश्नाचं कवितेच्या आस्वादकांना गवसणारं उत्तर प्रत्येकाच्या विचारांच्या दिशेनुसार वेगवेगळे असू शकेल कदाचित, पण कवीच्या शब्दातून स्पष्टपणे व्यक्त न केलेली तिची ओळख मला अंधूक का होईना जाणवली ती ‘कवीची प्रतिभा’ या रुपातली! ही ओळख मनात जपत कविता पुन्हा वाचताना तिच्या पाऊलखुणा याच रुपात अधिक स्पष्ट होत गेल्या एवढं खरं!
‘शायरी’ विभागातील उर्दू मिश्रित हिंदी काव्यरचनाही आवर्जून दखल घ्याव्यात अशा आहेत. विषयवैविध्य, व्यंगात्मक शैली, थेट, रोखठोक आणि सुलभ रचनाकौशल्य ही वैशिष्ट्ये इथेही दिसून येतात.
प्रेम, विरह, सहजीवन या विषयांवरील बहुतांशी कवितांचा विषय तोच असला तरी त्या रचनांमधल्या वैविध्यामुळे त्या लक्ष वेधून घेतात.या दृष्टीने परायी काया,एहसास-ए-रुह, गुस्ताखी माफ,शबनबी थी सारी राते, कब्र, जुनून-ए -मजनूॅं, खुदकुशी, जले शोले राख तले, अशा अनेक कवितांचे उल्लेख करता येतील.हिंदी-उर्दूच्या लहेजामुळे तर यातील आशय अधिक तीव्रतेने भिडतो.
वेगळ्या आशय- विषयांमुळे उठून दिसणाऱ्या काही खास कवितांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. पाण्याच्या एका थेंबाची पाऊस,अश्रू,घाम अशी विविध रुपांमधली भावना व्यक्त करणारी ‘बूॅंद’ ही कविता हे एक प्रातिनिधिक उदाहरण.
‘सत्ता संपत्ती संततीने बदले तेरे नूर,बनकर मगरूर तू हुआ अपनोंसे दूर’ हे ‘बुराई अच्छाई का राही ‘ या कवितेतील भरकटलेल्या माणसाचे वर्णन असो, की ‘मुजरा आणि मुशायरा’ मधे कवी आणि अदाकारा या शायरीच्या एकाच नाण्याच्या दोन बाजूंची तुलना करताना ‘जवानी का ढलना मुजरेका मुरझाना, जवानी पलभर शब्द निरंतर’ हे वास्तव अधोरेखित करणारा निष्कर्ष असो, दोन्हीही त्या त्या कविता लक्षवेधी बनवतात.
जीवनाचं अस्वस्थ करणारं बोचरं सत्य व्यक्त करणाऱ्या ‘दो गज जमीन’, ‘शहादत की कुर्बानी’, ‘चादर ए आसमान’ या कविताही दीर्घकाळ मनात रेंगाळतील अशाच!
सहज जाणवलेला एक योगायोग म्हणजे यातील मराठी व हिंदी या दोन्ही विभागात असलेल्या ‘जनरेशन नेक्स्ट’ या एकाच शीर्षकाच्या दोन कविता ! विशेष हे की या दोन्ही कवितांचा आशय आणि विषय एकच असला तरी त्यांची मांडणी मात्र सर्वस्वी भिन्न तरीही भावणारी !
या कवितासंग्रहाचं मला जाणवलेलं वेगळपण ध्वनित करण्यापुरता वानगीदाखल घेतलेला त्यातील काही मोजक्या कवितांचा हा प्रातिनिधिक आढावा आहे.
मा.लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे यातील बहुतेक सर्व दीर्घ कविता वाचनापेक्षाही त्यांचे मंचीय सादरीकरण अधिक परिणामकारक ठरेल अशा आहेत.
‘आयुष्याचं गणित’ या संग्रहातील कविता आयुष्याच्या गणितांची मांडणी, ती गणिते सोडवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी रीत, आणि हाती लागलेल्या उत्तरांची अचूकता ताळा करून पहाण्याची प्रेरणा, या तीनही अंगांनी आकाराला येताना आशय-विषयांनुरुप आपापले वेगळे रूप घेऊन व्यक्त होताना दिसतात. आणि त्यामुळेच त्या रसिकांना काव्यानंद देतानाच विचारप्रवृत्त करणाऱ्याही ठरतील असा विश्वास वाटतो.
पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
सौ ज्योत्स्ना तानवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेलला *’देव’माणूस हा स्मृति संग्रह नुकताच वाचनात आला आणि त्याविषयी आवर्जून लिहावं असं वाटलं म्हणून —
सौ. ज्योत्स्ना तानवडे यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक भावनेने, त्यांचे परमपूज्य वडील कै. श्री. बाळकृष्ण अनंत देव तथा श्री आप्पासाहेब देव, माळशिरस. यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या पुस्तक रूपाने एक आगळीवेगळी श्रद्धांजली त्यांना अर्पण केली आहे.
‘देव’माणूस ही स्मरणपुस्तिका आहे आणि या पुस्तकात जवळजवळ ५८ हितसंबंधितांनी कै. आप्पासाहेब देव यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
ही भावांजली वाचताना कै. आप्पासाहेब देव या महान, ऋषीतुल्य, समाजाभिमुख, लोकमान्य व्यक्तीचे अलौकिक दर्शन होते. वास्तविक तसे म्हटले तर ही स्मरणपुस्तिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांचा समस्त परिवार, नातेवाईक, स्नेही, मित्रमंडळी अथवा त्यांच्या संबंधितांतल्या व्यक्तींचा स्मृती ठेवा असला तरी माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तींसाठी सुद्धा हे पुस्तक जिव्हाळ्याचे ठरते हे विशेष आहे. अर्थातच त्याचे कारण म्हणजे या सर्वांच्या आठवणींच्या माध्यमातून झिरपणाऱ्या एका अलौकिक व्यक्तीच्या दिव्यत्वाच्या प्रचितीने खरोखरच आपलेही कर सहजपणे जुळले जातात. हा देवमाणूस सर्वांचाच होऊन जातो.
नित्य स्मरावा!
उरी जपावा !!
मनी पूजावा !!!
अशीच भावना वाचणाऱ्यांची होते. म्हणूनच हे पुस्तक केवळ त्यांच्याच परिवाराचे न उरता ते सर्वांचेच होते.
नावातही देव आणि व्यक्तिमत्वातही देवच म्हणून हा ‘देव’माणूस!कै. बाळकृष्ण अनंत देव* तथा आप्पासाहेब देव यांचा २९/०५/१९२२ ते १५/०२/१९८८ हा जीवन काल. त्यांचे बाळपण, वंशपरंपरा, शालेय जीवन, जडणघडण, सहजीवन, पारिवारिक, व्यावसायिक, सामाजिक जीवनाविषयीचा त्यांच्या कुटुंबीयांनी आणि संबंधितांनी स्मृतिलेखनातून घेतलेला हा आढावा अतिशय वाचनीय, हृद्य आणि मनाला भारावून टाकणारा आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस या गावी स्थित राहून वकिलीचा पेशा सांभाळून स्वतःच्या समाजाभिमुख, कलाप्रेमी, धार्मिक वृत्तीने गाव आणि गावकरी यांच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने झटणाऱ्या, धडपडणाऱ्या एका लोकप्रिय अनभिषिक्त राजाची, लोकनेत्याची एक सुंदर कहाणी, निरनिराळ्या व्यक्तींनी सादर केलेल्या आठवणीतून साकार होत जाते.
सौ.ज्योत्स्ना तानवडे
वडिलांच्या आठवणीत रमलेली ज्योत्स्ना लिहिते, “…तुमचे व्यक्तिमत्व होतेच चतुरस्त्र! किती रुपे आठवावी तुमची! वकिली कोट घालून कोर्टात बाजू मांडणारे तुम्ही, शाळेत झेंडावंदन करणारे! सोवळे नेसून खणखणीत आवाजात महिम्न म्हणणारे तुम्ही, पांढरा पोषाख, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ घालून वारीत अभंग म्हणणारे तुम्ही,. मुलांनातवंडांच्या गराड्यात,चांदण्यात ओसरीवर पेटी वाजवणारे, कटाव गाणारे तुम्ही… तुमचे व्यक्तिमत्व खूपच खास होते…”
मोहिनी देव त्यांची सून सांगते,
” मला आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा अभिमान वाटला नाही. वाटला फक्त ती. आप्पासाहेब यांची सून म्हणवून घेण्याचा…”
आप्पासाहेब एक दुर्मिळ व्यक्तिमत्व, एक आधुनिक धर्मात्मा, एक देव माणूस, एक स्वयंभू व्यक्तिमत्व, एक ऊर्जा स्त्रोत, अनाथांची माऊली, अशी भावपूर्ण संबोधने देऊन अनेकांनी त्यांना भावांजली अर्पण केली आहे. ते वाचताना मन हरखून जाते.
मोहन पंचवाघ त्यांच्याबद्दल म्हणतात,
“… त्यांचा पहाडी आवाज, बुद्धिमत्ता, कोर्ट कामाची एकूणच पद्धती यामुळे अख्ख्या माळशिरस मध्ये त्यांचा दरारा, दबदबा, वचक होता. पण त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरयुक्त भावना होती. त्यांच्याकडे समस्या घेऊन जाणारी व्यक्ती कधीही विन्मुख परत गेली नाही….”
मदन भास्करे म्हणतात,
” असंख्य पक्षकारांना धीर आणि न्याय देण्याचे महान पुण्य कर्म आप्पासाहेबांनी जीवनभर केले. कित्येकांकडून त्यांनी एक पैसाही फी म्हणून घेतली नाही. उलट कोर्ट फी सुद्धा वेळ आली तर ते स्वतःच भरत. असा हा महात्मा!….”
सर्वांच्या स्मृती लेखनामध्ये उत्स्फूर्तपणा जाणवतो. अत्यंत जिव्हाळ्यांने, आपलेपणाने आणि प्रामाणिकपणे व्यक्त झालेली शुद्ध मने इथे आढळतात. म्हणून हे पुस्तक म्हणजे विचारांची, आचारांची, संस्कारांची चालती बोलती गाथाच वाटते.
या पुस्तकात एका आदर्श व्यक्तीची कहाणी वाचत असताना, अदृश्यपणे त्यांच्या पाठीशी सावलीसारखी वावरणारी एक दिव्य व्यक्ती म्हणजे कै. मालतीबाई देव— या लोकनायकाची सहचारिणी. एक सुंदर, हसतमुख, प्रसन्न, कलाप्रेमी, सुसंस्कृत, धार्मिक, पतीपरायण, सामाजिक जाणीवा जपणारी, सुगरण आणि सुगृहिणी. अनेक भूमिकांतून व्यक्त होणारं, *सौ. मालतीबाई देव हे व्यक्तिमत्वही तितकच मनावर बिंबतं . आणि प्रत्येकाच्या आठवणीतून त्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहात नाही.एक शून्य पुढे टाकल्यानंतर संख्येची किंमत जशी वाढते तद्वतच *कै. मालतीबाई देव यांचं अस्तित्व कै. आप्पासो देव यांच्या जीवनात होतं.
हे पुस्तक वाचून झाल्यावर मी ज्योत्स्नाला म्हटले,
“ही स्मरणपुस्तिका केवळ तुमच्या पुरती नसून ती परिचित अपरिचित सर्वांसाठीच, आपली वाटणारी आहे”
हे स्मरण पुस्तक प्रसिद्ध करण्यामागे ज्योत्स्नाची भूमिका, पुढच्या पिढीला या आदर्श व्यक्तिमत्त्वांची सदैव ओळख रहावी आणि त्यातून त्यांचीही मने संस्कारित व्हावीत ही तर आहेच. पण आज आपण समाजातलं जे तुटलेपण, संवादाचं, नात्यांचं हरवलेपण अनुभवत आहोत त्यासाठीही अशा पुस्तकांचे वाचन, माणसाला जीवनाविषयी, जगण्याविषयी विचार करायला लावणारं, मागे वळून पाहायला लावणारं, आपल्या संस्कृती, परंपरा याविषयीच्या महानतेचा पुनर्विचार करायला लावणारं ठरतं.
आणि खरोखरच समारोपात जेव्हा ज्योत्स्ना म्हणते,
आठवताना स्मृती साऱ्या
कंठ पुन्हा दाटून येतो
त्यांच्या पोटी पुन्हा जन्म दे
विठुरायाला विनवितो …
तेव्हा या ओळींवरच आपले श्रद्धांजली पूर्वक अश्रूही नकळत ओघळतात .
अतिशय सुंदर मुखपृष्ठ, ,,’ती ‘च्या स्वप्तरंगी मनोविश्वाचे जणु प्रतीकच, तिच्या भरारीच्या अपेक्षेत असणारे आभाळ आणि झेप घेणारी पाखरे, तिच्या मनात असणारे पंख लावून केव्हाच ती आकाशात स्वैर प्रवाहित होत आहे परंतु त्याचवेळी जमिनीवरील घट्ट बांधून ठेवणाऱ्या साखळ्या आणि पर्यायाने बेडीमध्येही तिने ‘ती’ चं अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अतिशय अर्थवाही असं हे या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ असून संग्रहाच्या नावाप्रमाणेच सखोल आणि विचार प्रवृत्त करायला लावणारे आहे.
अतिशय संवेदनशीलतेने लिहिलेल्या या संग्रहाला प्रस्तावना ही तेवढीच वस्तुनिष्ठपणे, तरलतेने, आणि अतिशय अभ्यासपूर्ण व डोळसपणे लिहिलेली आहे ती प्राध्यापक आर्डे सरांनी.
डॉ सोनिया कस्तुरे
मनोगतामध्येच कवयित्री डॉक्टर सोनिया यांनी या कवितांची जडणघडण कशी झाली आहे हे सांगितले आहे. अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे सामाजिक मूल्य असणाऱ्या या कविता लिहिताना त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांचा, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा, तात्कालीक घटनांचा खूप उपयोग झाला आहे. तरीही कवयित्रीची मूळ संवेदनशील वृत्ती, समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आणि केवळ स्त्री म्हणून नाही तर एकूणच माणसांकडे पाहण्याची समदृष्टी ही जागोजागी आपल्याला ठळकपणे जाणवते. म्हणूनच केवळ स्त्रीवादी लाटांमध्ये आलेले आणखी एक साहित्य असे याचे स्वरूप न राहता यापेक्षा अतिशय दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण, उच्च सामाजिक मूल्य व अभिरुचीपूर्ण असा हा वेगळा कवितासंग्रह आहे.
हा कवितासंग्रह जरी पहिला असला तरी तो पहिला वाटत नाही. प्रत्येक कवितेमागे असणारी विचारधारा ही गेली अनेक वर्ष मनात, विचारात ,असणारी वाटते. सजगतेचे भान प्रत्येकच कवितेला आहे, म्हणूनच त्यांच्यामध्ये फार अलंकारिकता नाही परंतु जिवंतपणा 100% आहे. या कविता वाचणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रियांना ती आपली वाटणारी आहे. कारण या सर्वच जणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत , ठरत आहेत आणि ही विषमता दूर झाली पाहिजे, समाजव्यवस्था बदलली पाहिजे, याचं भान जवळपास प्रत्येक कवितेत आहे. स्त्री आणि पुरुष यापलीकडे जाऊन व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघण्याची किती गरज आहे, हे हा कवितासंग्रह जाणवून देतो. स्त्रीवादी म्हणाव्या अशा या कविताच नाही, तर त्या आहेत एक उत्तम समाजव्यवस्था कशी असली पाहिजे. त्यामध्ये माणूस हा माणसाप्रमाणे वागला पाहिजे न की रुढी परंपरा, लिंगभिन्नता, दुय्यमतेच्या ओझ्याखाली वाकलेल्या, जातीपाती, धर्म अधर्म, सुंदर कुरुपतेच्या स्वनिर्मित काचामध्ये अडकून स्वतःचे आणि इतरांचे जीवन असह्य बनवलेल्या राक्षसाप्रमाणे– सुंदर कोण या कवितेत या सगळ्या जीवन मूल्यांचा त्यांनी मागोवा घेतला आहे. अतिशय सोप्या, सुबोध आणि छोट्या शब्दांमध्ये सुंदर या शब्दाचा अर्थ सांगताना सध्या समाजात जे समज झाले आहेत सुंदरतेचे, त्यावर त्यांनी अचूकपणे भाष्य केले आहे आणि ते अगदी आपल्याला तंतोतंत पटतेही .
‘मिरवू लागले’, या कवितेत ‘पुरोगामी’ या आजकाल प्रत्येकाने स्वतःला लावून घेतलेल्या बिरुदाचा फोलपणा दर्शवून दिला आहे. प्रत्येक स्वतःला विसरलेल्या बाईने वाचलाच पाहिजे असा हा संग्रह आहे. ‘ती’च्या उपजत निसर्गदत्त शक्तीचे यथायोग्य वर्णन कोणत्या न कोणत्या स्वरूपात प्रत्येक कवितेत वाचायला मिळते. उदाहरणार्थ :-
एक वाट सुटली तिची तरी
दुसरी तिला मिळत राहते
तिच्या उपजत कौशल्याने
ती वळण घेईल नव्याने जिकडे
नवी वाट तयार होते तिकडे…!
समतेचे धडे शिकवण्याची तीव्र गरज या कविता व्यक्त करतात. ते ही अतिशय सौम्य शब्दात. स्त्री पुरुष समानता या विषयावर कोणीही हल्ली उठून सवंग लिहीत असतो परंतु मुळात हा विषय समजून एक उत्तम सहजीवन कसं असावं आणि त्यामध्ये पुरुषांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे ही शिकवणारी कविता म्हणजे,’ शब्दाबाहेर’ अर्थात ती तुम्ही स्वतःच वाचली पाहिजे. याबरोबरच तडजोड आणि स्वतःत बदल या दोन गोष्टीचे महत्त्व ही ‘प्रपंच ‘ नावाच्या कवितेत व्यक्त करून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व त्या निर्विवादपणे स्वीकारतात. तिची आय. क्यु. टेस्ट कराल का? ही कविता तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय वाचून पूर्ण होतच नाही. कारण आपल्या भारतातली प्रत्येक बाई यातल्या कोणत्या आणि कोणत्या ओळीत स्वतःला पाहतेच. यापेक्षा अधिक संवेदनशीलता काय असते ?’आरसा ‘ही कविता तर सर्वांनाच डोळ्यात अंजन घालणारी आहे. समान हक्क आणि वागणूक न देता, सन्मानांच्या हाराखाली जखडून ठेवणारी ही समाजव्यवस्था कधी कधी ‘ती’च्याही लक्षात येत नाही आणि हे स्वभान जागवण्याचं काम ही कविता करते. म्हणूनच ‘माणूस ती’ या कवितेत त्या म्हणतात :–
लक्ष्मी ना सरस्वती। ना अन्नपूर्णा।
सावित्रीची लेक। माणूस ती ।
दुर्गा अंबिका। कालिका चंडिका।
देव्हारा नको। माणुस ती…
सावित्रीचे ऋणही त्यांनी अगदी चपखल शब्दात फेडले आहे. जनावरांपेक्षा हीन,दीन लाचार होतो माणूस, आम्ही झालो माई तुझ्यामुळे । –या शब्दांची ओळख करून देणाऱ्या माईला शब्दफुलांच्या ओंजळीने कृतज्ञता वाहिली आहे, आपल्या सर्वांच्याच वतीने.
‘जोडीदार’ या कवितेत तर प्रत्येक स्त्रीला हा माझ्याच मनातला सहचर आहे असे वाटावे इतपत हे वर्णन जमले आहे आणि शेवटी या कल्पनाविलासातून बाहेर येत ‘हे सत्यात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत राहतो तो खरा जोडीदार’ असे सांगून एक आशादायक वास्तव शेवटी आपल्यापुढे मांडतात.
तर एका लेकीच्या नजरेत बाप कसा असावा हे बाप माणूस– हे तर मुळातूनच वाचण्यासारखं. अशी ही कवयित्री विठ्ठलाला सुद्धा जाब विचारायला घाबरत नाही. सर्व जनांचा, भक्तांचा कैवारी पण त्याला तरी जोडीदाराची खबर आहे का? खरंतर रूपकात्मकच ही कविता. ज्याने त्याने जाणून घ्यावी अशी. ‘मैत्री जोडीदाराशी’ या कवितेत सुद्धा एक खूप आशादायी चित्र त्या निर्माण करतात, जे खूप अशक्य नाही . क्षणाची पत्नी ही अनंत काळची मैत्रीण तसेच क्षणाचा नवरा हा अनंत काळचा मित्र झाला तर नाती शोधायला घराबाहेर जाण्याची गरजच पडणार नाही असं आदर्श सहजीवन त्या उभं करतात. आणि शेवटी अतिशय समर्पक असा शेवट करताना कवयित्री म्हणते—-
‘तिचं शिक्षण बुद्धिमत्ता शक्ती युक्तीचीच गाळ करून चुलीत कोंबले नसते ….
लग्नानंतर त्याच्या इतकं तिच्या करिअरचा विचार झाला असता…. वांझ म्हणून हिणवलं नसतं, विधवा म्हणून हेटाळलं नसतं… तिच्या योनीपावित्र्याचा बाऊ झाला नसता… तर कदाचित मी कविता केली नसती.
हा कदाचित खरोखर अस्तित्वात येण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचे योगदान येथे गरजेचे आहे .आपल्या बरोबरीने जगणाऱ्या एका माणसाला केवळ समाजव्यवस्था म्हणून रूढी परंपरा, जाती व्यवस्था, इत्यादी विषमतेच्या जोखडाखाली चिरडून टाकून ‘पुरोगामी’ म्हणून शिक्का मारून घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. किमान याचे भान जरी समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये अल्प प्रमाणात का होईना जागे करण्याचे बळ या संग्रहामध्ये आहे. त्याबरोबरच जिच्या पंखांना ताकद देण्याची गरज आहे , जिच्या पंखावरचे जड ओझे भिरकावून द्यायची गरज आहे, अशा सर्व ‘ती’ ना आणि सर्व जगातल्या ‘ती’च्यावर आईपण व बाईपण याचे ओझे वाटू देणाऱ्या व्यवस्थेवर लेखणीने प्रहार करणारा हा कविता संग्रह निश्चितच समाजमन जागे करणारा आणि मानवतेच्या सर्व मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देणारा आहे, असे थोडक्यात याचे वर्णन करता येईल. बऱ्याच दिवसातून काही आशयसंपन्न वाचल्याचे समाधान देणारा कवितासंग्रह.
मी अभिनंदन करते कवयित्रीच्या शब्दभानाचे, सौम्यवृत्तीचे, माणूसपण जपणाऱ्या भावनेचे आणि विवेकपूर्ण संयमी विचाराचे.