मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हँगमन” – लेखक : सुश्री ज्योती पुजारी ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर  ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हँगमन” – लेखक : सुश्री ज्योती पुजारी ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक : हँगमन 

लेखिका : ज्योती पुजारी

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन

पृष्ठ संख्या-२०८

पुस्तक मूल्य- रुपये-२०/

फाशी हा शब्द ऐकताच तनमन थरारते.

‘फाशी देणारा माणूस’ आणि त्याचे अंतर्बाह्य जीवन कसे असते, या प्रश्नांचे उत्तर म्हणजे ज्योती पुजारी

लिखित ‘हँगमॅन’ ही कादंबरी.

जल्लाद! .. फाशी देणारा, दूसरा अर्थ आहे क्रूर, निर्दय.

अशा माणसांचे जीवन जवळून पाहण्याची संधी ज्योती पुजारीनां मिळाली. कादंबरीचा नायक हा फाशीचा साक्षीदार. फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना फाशी देणारा नायक एक सरकारी नोकरदार माणूस.

… माणुसकी जपणारा. आपुलकिने वागणारा. कैद्यांना फाशी देणे म्हणजे एका जीवाने दुसर्‍याचा जीव घेणे हे पाप आहे असे समजणारा. गुन्हेगार मरतात पण कादंबरीचा नायक मात्र मानसिक यातना भोगत राहतो.

प्रत्येकाला आपला जीव प्यारा.

फाशीचा तेलकट गळफास लावताना मनातल्या मनात जल्लाद माफी मागतो.

प्रत्येक प्रसंग जिवंत करण्याची लेखिकेची अभ्यासपूर्ण शैली आणि वातावरणनिर्मितीची भक्कम पकड

या दोन गोष्टी भाषेची शान आणि प्रवाहीपण कायम राखतात.

अगदीच वेगळ्या विषयावरचे हे पुस्तक निश्चितच वाचण्यासारखे आहे.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “उसवण ” – लेखक : श्री देविदास सौदागर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “उसवण ” – लेखक : श्री देविदास सौदागर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक : “ उसवण “.

लेखक : देविदास सौदागर.

प्रकाशक : देशपांडे  आणि कंपनी पब्लीशर्स. पुणे

पहिली आवृत्ती :अॉगस्ट २०२२

दुसरी आवृत्ती:जून २०२४

पृष्ठे:११६

किंमत: १६० रु 

देविदास सौदागर यांची युवा साहित्य पुरस्कार २०२४ ची विजेती कादंबरी वाचण्यात आली जी मनाला भिडली, डोक्यात रेंगाळत राहिली आणि म्हणूनच विचार करायला लावणाऱ्या या कादंबरी विषयी मला लिहावसं वाटलं. विशेष म्हणजे प्रस्तुत लेखकाची ही पहिलीच  कादंबरी आहे.

संपूर्ण कादंबरीतले संवाद, पात्रांच्या मनातले विचार हे ग्रामीण भाषेत असले तरीही लेखकाच्या भाषाशैलीमुळे त्यातला गोडवा, गावरान भावना वाचकाच्या मनापर्यंत अलगद पोहोचतात. जो विषय या कादंबरीत  हाताळला आहे त्या विषयातला सजीवपणा, ती संस्कृती टिकवण्यासाठी ही बोलीभाषा अत्यंत प्रभावी ठरलेली आहे. पुस्तक वाचताना झालेली माझी ही पहिली महत्त्वाची प्रतिक्रिया.

या कादंबरीतलं मुख्य नायक पात्र आहे “विठू”.

एका लहानशा गावात “विठू”चा शिवणकामाचा छोटासा अगदी पोटापुरताच दाम देणारा व्यवसाय आहे. संपूर्ण गावात कापडं शिवणारा शिंपी हीच विठूची ओळख आहे.

त्याची पत्नी “गंगी” ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते आणि त्याच्या प्रत्येक कामात, सुखात, दुःखात तिची अगदी “नाति चरामि” अशी समर्पित साथ  असते. या पती-पत्नीचं प्रेमाचं नातं अतिशय विलोभनीय आणि मनाला भावविभोर करणारं आहे. त्यांच्या प्रेमविवाहाची कहाणीसुद्धा अतिशय गंमतीदार आणि लडिवाळपणे लेखकाने लिहिली आहे. या दांपत्यास दोन मुलं आहेत. मुलगी अतिशय हुशार आणि महत्त्वकांक्षी तर मुलगाही आईबापांवर माया करणारा, काळजी घेणारा, कर्तव्यदक्ष असाच आहे. एकंदर विठूचं दारिद्र्यातलं कौटुंबिक चित्र जिव्हाळ्याचं आहे. संकटात, गरिबीतही प्रेमभावाच्या अतूट धाग्याने बांधलेलं आहे.

गाव, गावातली माणसं, शिक्षक, विद्यार्थी, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि मनोवृत्तीचे गावकरी आणि विठूचा शिवणकामाचा छोटासा धंदा– यांचे परस्परांशी असलेलं कधी स्नेहभावाचं, अप्रामाणिकपणाचं, फसवणुकीचं, गुंडगिरीचं, दादागिरीचं नातं आणि विठूचा जीवन प्रवास हे या कादंबरीतील कथानकाचे मुख्य सूत्र आहे.

लग्नसराई, सणवार याच दिवसात नवे कपडे शिवून वर्षभर पुरेल इतकी तुटपूंजी का होईना कमाई करणाऱ्या विठूच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या खडतर जीवनाविषयी वाचताना वाचकाच्या मनात करुणा, दया भावना, सहजपणे उत्पन्न होते तसेच फसव्या गोड बोलून काम करून घेऊन पैसे बुडवणाऱ्या धनदांडग्या  लोकांची मनस्वी चीड येते. लेखकांनी कादंबरीत विखुरलेली पात्रं, त्यांच्या मनोवृत्ती, आपसातले संवाद, भांडणे अतिशय सरळ साध्या शब्दात पण रसाळपणे मांडले आहेत. वाचता  वाचता  आपणही  त्या गावाचा एक भाग बनून जातो.

या कादंबरीत वेगवेगळ्या टप्प्यांवर सर्व भावभावनांचे स्त्रोत  अनेक प्रसंगातून अनुभवायला मिळतात.

पती-पत्नीचं नातं, मुलांविषयीची जागृत कर्तव्य भावना, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, आईवडिलांच्या श्रमाची जाणीव ठेवणारी मुलं आणि दुसरीकडे धक्का देणार्‍या दुनियादारीचा मन कालवून टाकणारा अनुभव याचं एकत्रिकरण इतकं प्रभावी पद्धतीने लेखकाने केलं आहे की ही कादंबरी अक्षरशः वाचकाच्या मनावर गारुड करते.

प्रामाणिकपणे लोकांची गरज, नड जाणून, विश्वास ठेवून काम करणाऱ्या विठूवर, एका खून झालेल्या मृत व्यक्तिच्या अंगावर विठूने शिवलेले कपडे आढळल्यामुळे त्यालाही या गुन्हेगारी प्रकरणात विनाकारण गोवले जाण्याचा प्रसंग उद्भवतो. अनेकदा पोलीस चौकीवर चौकशीसाठी त्याला बोलावले जाते. या साऱ्या प्रकरणात विठू आणि त्याचे कुटुंब अगदी केविलवाणे होऊन भरडले जाते. या सर्व प्रसंगांची वर्णने वाचताना वाचकाला चीड, हळहळ, दया, करुणा, दुःख, सत्याचा वाली कुणीच नसतो वगैरे भावना ग्रासून टाकतात.

साध्या साध्या वाक्यातूनही खूप मोठ्या जीवनतत्त्वांना लेखकाने या कादंबरीतून स्पर्श केला आहे.

“अन्यायाची मांडणी करणारी सगळी सामग्री जाळून टाकली पाहिजे

उरलेल्या मजकुरावर राख उपटेपर्यंत आपणच डोळ्यात तेल घालून पेटवली 

पाहिजे ही आग…”

किंवा,

“सरळसोट जगता आलं पाहिजे 

रात्रीच्या उरावर बसलेले दिवस

ओळखता आले पाहिजे 

बेवारस क्षणाच्या निर्मितीला 

चाप लावता आला पाहिजे

डोक्यावर पाय देणारे लोक

कोलता आले पाहिजेत…”

ही  एका वेडसर पण नैराश्य आलेल्या सुशिक्षित तरुणाच्या तोंडची सैरभैर वाक्ये काळीज चिरून टाकतात.

कालांतराने रेडीमेड कपड्यांचा नवीन जमाना येतो आणि विठूच्या हातात कामं उरतात ती फक्त उसवलेलं, फाटलेलं, विरलेलं, बिघडलेलं, शिवण्याचं. त्यावेळी विठूच्या मनात येणाऱ्या विचारांचं अगदी हृदयद्रावक शाब्दिक वर्णन लेखकाच्या लेखणीतून उतरलं आहे.

“आपलं आयुष्य चिंध्यासारखं झालय. धड जपता यिना ना धड फेकता यिना. अवघा देह म्हणजे चिंधी झालाय जणू! सगळ्या जगण्यावर ठिगळ लावलेलं ठळक दिसालय. ”

थोडक्यात “उसवण” ही एका शिंप्याच्या जीवनातली पराभवाची, दुःखाची कहाणी आहे. परिवर्तन काळात, लहानसहान जीवने सर्वांगाने उध्वस्त कशी होतात हे विदारक सत्य दर्शविणारं एक वास्तविक कथानक यात आहे. आजकालच्या अराजकतेच्या, अमानवीकरण्याच्या सीमेवर पोहोचलेले लोकजीवन, याचेही दर्शन या कादंबरीत घडते.

या कादंबरीचे “उसवण, हे शीर्षकही खूप अर्थपूर्ण आहे. “जेव्हा आभाळच फाटतं तेव्हा कुठे कुठे ठिगळं लावणार” असा एक असाहाय्य उसाचा या “उसवण” शब्दात जाणवतो. या कादंबरीतला नायक “विठू” तुटू पाहणाऱ्या, मोडकळीस आलेल्या त्याच्या व्यवसायाची भिस्त  पुढच्या पिढीवर ठेवून एक सकारात्मक आशावाद बाळगतो. त्यामुळे वाचकाच्या मनातही नकारात्मक वास्तवाला सामोरे जाताना एक आशेचा किरण दिसतो. जिथे गोष्ट संपते तिथूनच ती पुन्हा अद्रुश्यपणे  नव्याने सुरू झाल्याचाही भास होतो.

निरनिराळ्या क्लेषदायक  प्रसंगातून उलगडणार्‍या आणि एका होरपळणाऱ्या मानवी जीवनाचं दर्शन देणारी ।उसवण”  ही कादंबरी साहित्य प्रेमी लोकांनी जरूर वाचावी.

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)… कवी : अरुण वि. देशपांडे ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? पुस्तकावर बोलू काही ?

मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)… कवी : अरुण वि. देशपांडे ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे

पुस्तक : मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)

कवी – श्री. अरुण वि. देशपांडे

प्रकाशन – संवेदना

किंमत- रु. १५०/-

ज्येष्ठ लेखक कवी श्री. अरुण वि. देशपांडे यांचा ‘मला कवीचा चष्मा लागला’ हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. कवी, लेखक, बालसाहित्यिक, समीक्षक असे साहित्याच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. देशपांडे यांचा ७७ पुस्तकांचा प्रदीर्घ मोठा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे कवीची लेखणी सशक्त समृद्ध बनलेली आहे. हे कवीचे ७८ वे पुस्तक म्हणजे कवीचा ३२ वा. कवितासंग्रह आहे. या पुस्तकांमध्ये ३ कवितासंग्रह पुस्तक स्वरूपात, अनेक बालकवितासंग्रह, ई बुक स्वरूपातले कवितासंग्रह, प्रिंट बुक स्वरूपातील २ हिंदी कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठीसह हिंदी भाषेतही त्यांनी काव्य लेखन केलेले आहे. तसेच त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज यांच्यावरही अनेक रचना लिहिलेल्या आहेत.

या कवितासंग्रहाच्या वेगळ्या शीर्षकाने मन आकर्षून घेतले‌. सर्वसाधारणपणे चष्मा लागणे हे प्रौढत्वाचे लक्षण आहे. काही अपवाद असू शकतात. पण रूढार्थाने चष्मा लागणारी व्यक्ती ही वैचारिक परिपक्वता येऊन अनुभवसिद्ध असते. तशीच इथे कवीची स्थिती आहे.

आपल्या या दीर्घकालीन काव्य लेखनाबद्दल कवी आपल्या मनोगतात खूप छान व्यक्त होतात. कवी म्हणतात, ” सतत कवितांच्या संपर्कात येण्याने, लिहिण्या, वाचण्याने माझी कवीची नजर अधिक सूक्ष्म, सजग होत आहे असे वाटू लागले आहे. ” आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘दर्शनी’ आणि ‘अंतरंग’ अशा दोन्ही स्वरूपात फार फेरफार झाले आहेत. तसेच कवी- वृत्तीत वाढ झाली आहे असे कवी पुढे म्हणतात. कवी मनाची अस्वस्थता, घालमेल, स्वप्नाळू वृत्ती, व्यक्त होण्याची असोशी हे सर्व कविगुण आपल्यात झिरपत गेल्याचेही कवी सांगतात.

या गोष्टींचा या संग्रहातील कविता वाचताना सतत अनुभव येतो. अतिशय साध्या, सोप्या, सुलभ भाषेत सर्व कविता लिहिलेल्या आहेत. ४ ते ५ कडव्यांच्या या आटोपशीर कविता आहेत.

या सर्व कविता अक्षरवृत्त, अभंग, ओवी, मुक्तछंद स्वरूपातील आहेत. उपमा, अलंकाराची कारागिरी नाही. छंदोबद्ध, वृत्तबद्ध कविता, गझल लेखन अशा तंत्रशुद्ध कविता लेखनासाठी लागणारा अभ्यास, लेखन तंत्रशुद्धता याचा आपल्यापाशी अभाव आहे याची कवी मनोगतात प्रांजळ कबुली देतात. त्यामुळे त्यांची कविता सुबोध आणि वाचकप्रिय झालेली आहे.

त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनातल्या विविध अंगांना स्पर्श केलेला आहे. निसर्ग, पाऊस, आपला गाव, नाती, आई, कुटुंब, आठवणी, संस्कृती, मैत्री, कवी, कविता, ध्येय, स्वप्नं अशा आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असंख्य गोष्टींवरील या एकूण ८३ रचना यात समाविष्ट आहेत.

कवीचा चष्मा लावून आजूबाजूच्या विश्वाचा वेध घेणारा कवी आपल्या शब्दात त्या त्या भावना व्यक्त करतो, कारण

शब्द वश या वेड्याला

वेदनेची कविता लिहायला!

 

कवी असतो 

भावनांचा दूत 

म्हणूनच तो तुमच्या आमच्या भावना त्याच्या कवितेतून व्यक्त करतो. कारण संवेदनशील मनात भावना दाटल्या की त्या व्यक्त झाल्यावरच मनाला स्थिरता येते.

अस्वस्थ मनास स्थिरता 

देऊ शकते ती कविता 

भावनांचे प्रतिबिंब असते 

सहज सुंदर ती कविता…

प्रत्येक आई बाईच असते आणि प्रत्येक बाईत आई असते. तिच्याविषयी आदरयुक्त शब्दात कवी लिहतो,

घराची अब्रू बाई 

दुःख लपवे आई,

घराचे सुख बाई 

घराचे घरपण आहे!

मोह, आकर्षण, लालसा, बेगडी वैभव अशा विविध गोष्टींनी आयुष्य आपल्याला गुंतवून ठेवते आणि त्या गुंत्यात आपण फिरत राहतो.

आयुष्य नावाच्या कोळ्याने 

विणून ठेवलंय जगणे नावाचे 

सुंदर मोहक फसवेसे जाळे 

घेते खेचूनी भक्ष्यास हे जाळे….

आयुष्याचे अगदी सोप्या शब्दात वास्तव दर्शविले आहे. आपल्याला आपली ओंजळ कायम सुखाने, आनंदाने भरलेली आहे असेच वाटत असते. पण ही गळकी ओंजळ कधी रिकामी होते हे समजत नाही. हे पण आयुष्यातले एक वास्तव आहे.

गळक्या ओंजळीचे हात आपले

त्यात कधीही काहीच ना मावले.

जे जे मनाला कधी कधी भावले

नशिबास मात्र कधी ना भावले..

आपली नाती, आपले वागणे, स्वभाव, इच्छा- अपेक्षा, बदलत्या काळातली मनोभूमिका, मनाचे वागणे, मित्रांशी व्यवहार अशा जगण्यातल्या मूलभूत गोष्टी, दुनियादारी, निसर्ग अशा विविध गोष्टींवर कवीने छान भाष्य केले आहे. काही काही कविता खूप छान आहेत.

उदा:- ‘डागडुजी इमारतीची’– आपल्या शरीराला एका इमारतीचे रूपक मानून तिची देखभाल कशी करावी हे छान मांडले आहे.

‘मनात असले तरी’– या कवितेत इतरांशी कसे वागावे हे छान समजावले आहे.

मला कवीचा चष्मा लागला

नवाच नंबर बदलून आला,

दृष्टिदोषात सुधारणा झाली 

माझ्या नजरेत फरक पडला….

कवीचा चष्मा लागल्याने आपल्या विचारसरणीत कसा बदल झाला याचे हे आत्मपरीक्षण आहे. आपल्या मातृभाषेचा योग्य सन्मान सगळ्यांनी करायला हवा. त्रिभुवनात गौरव झाला असला तरी घरात तिला मानाचे स्थान द्यावे हे सांगताना कवी म्हणतो

हे मराठी माणसा, ऐक ना

व्यवहारी भाषा योग्य जरी

घरात वावरावी मराठी खरी

तिला तू विसरू नकोस ना….

शेवटची ‘ध्येय’ कविता बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे आवाहन करते.

उजाडलीय पहा पहाट नवी 

चला, मोहिमेवर निघायला हवं,

ठरवलंय जे ध्येय मनाशी 

ते साध्य करायलाच हवं….

श्री. अरुण देशपांडे यांच्या या कविता विविधांगी विषयातून जीवनस्पर्शी झाल्या आहेत. त्या वाचताना या सगळ्या आपल्याच कविता वाटू लागतात. कारण त्यांनी आपल्याही आयुष्यातील विविध भावना त्यात

व्यक्त केल्या आहेत. त्यातून जगताना वास्तवाचे भान ठेवून कसे जगावे याचे नकळत मार्गदर्शनही केले आहे.

यामधून कवीचे प्रगल्भ विचार आणि अनुभवविश्व जाणवते. सहज सोप्या शब्दात विचार मांडण्याची त्यांची हातोटी सुंदर आहे‌. यापुढेही कवी कडून अशाच सुंदर कविता रसिकांना वाचायला मिळाव्यात ही अपेक्षा. त्यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा!

परिचय : सौ.ज्योत्स्ना तानवडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पितामह” – लेखक : श्री अनंत तिबिले ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पितामह” – लेखक : श्री अनंत तिबिले ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक : पितामह

लेखक-अनंत तिबिले

प्रकाशक-रिया पल्बिकेशन्स

पृष्ठ संख्या-४४०/

पुस्तक मूल्य- रुपये-४३०/

महाभारतात त्यागाचा शोध घेत असताना आचार्य भीष्म पहिले येतात. प्रस्तुत कादंबरीत आचार्य भीष्माचं त्यागमाय, निरीच्छ असं जीवन रेखाटलंय.

पितामह ….

कुरुकुलातले श्रेष्ठ पुरुष. सदाचरण नि सदवर्तनाने वागलेले. वास्तविक अष्टवसुंपैकी एक असलेले.

अल्पायुषी होते, पण उद्याच्या समाजाला आदर्श हवा होता म्हणून दीर्घायुषी ठरून आपली जबाबदारी यथायोग्य पार पाडली.

ज्या कुळात देवव्रतासारखा धर्मज्ञ, सदाचरणी, निरिच्छ, निस्वार्थी योद्धा जन्माला आला, ज्याने आपल्या अतुलनीय त्यागाने एक इतिहास घडविला त्या कुलाच्या प्रतिष्ठेला कधीच बाधा येणं, हे कुल कलंकित होणे अशक्य असच आहे.

… पण जे घडतंय आणि जे घडणार आहे ते देखील कुलाच्याच हिताचंचं असणार आहे.

पण कुरुकुलातील कलह उद्याच्या समाजाचा घृणेचा विषय जरी बनला तरी नव्या पिढीला सावधगिरीचा

सल्ला देणारं साधन ठरेल.

‘पितामह’ ही अनंत तिबिलेंची ब्याण्णवावी कादंबरी हेच सांगते. म्हणूनच ही कादंबरी रसिकांनी वाचावी अशीच आहे.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मना सज्जना” – लेखक : श्री तुकाराम नारायण विप्र ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “मना सज्जना” – लेखक : श्री तुकाराम नारायण विप्र ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक :  मना सज्जना

लेखक : श्री तुकाराम नारायण विप्र 

 ९६०४३६३६६०

प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, कोल्हापूर.

मूल्य : रु. ३५०/-

☆ मन सज्जना… मनोबोधाचा चिंतनाविष्कार… ☆

श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनोबोध अर्थात मनाचे श्लोक माहित नाहीत असा मराठी माणूस सापडणे कठीण आहे. मनाला ‘ सज्जन ‘ असे संबोधून या मनाचे नेमके काय चुकते आहे, त्याला योग्य मार्गावर कसे आणता येईल यासाठी केलेला उपदेश म्हणजे ‘ मनाचे श्लोक ‘. या श्लोकांचा अर्थ समजावून

सांगणारे, निरुपणात्मक ग्रंथ आतापर्यंत अनेक जाणकार अभ्यासकांनी लिहीले आहेत. साधकांना ते उपयुक्तही ठरले आहेत. कोल्हापूर येथील श्री. योगिसुत अर्थात तुकाराम नारायण विप्र यांनी लिहीलेले ‘ मना सज्जना ‘ हे पुस्तकही असेच सर्व अभ्यासकांना मार्गदर्शन करणारे आहे.

ईश्वर उपासनेचा पारंपारीक ठेवा आणि संत साहित्य अभ्यासण्याची मनोवृत्ती यामुळे श्री. विप्र यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत तुकाविप्र यांचे साहित्य, तसेच ज्ञानेश्वरी, भागवत ग्रंथाचे वारंवार वाचन करुन ते आत्मसात केले आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकाविषयी सविस्तर टीका करत असताना त्यांनी या सर्व ज्ञानाचा उपयोग करुन घेतला आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच मनोबोधाची रचना का व कशी झाली याबाबतचा मनोरंजक इतिहास त्यांनी सांगितला आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक श्लोकाचा भावार्थ समजावून दिला आहे. ज्याठिकाणी श्लोक भावार्थात साम्य दाखवतात किंवा एकमेकांशी निगडीत वाटतात त्या ठिकाणी एका पेक्षा जास्त श्लोक एकत्र घेऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. हे सर्व करत असताना धार्मिक व पौराणिक कथा, बोधकथा, संत वचने, ओव्या, दोहे, सुभाषिते यांच्या बरोबरच आजच्या काळातील व्यावहारिक उदाहरणे, आलेले अनुभव, घडलेल्या घटना यांचा भरपूर वापर केला आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोक समजून घेणे अतिशय सोपे झाले आहे. तरीही ते नम्रपणे म्हणतात, ” संत वचनातील काही छटा चिंतनाच्या माध्यमातून आपल्या हाती लागल्या तर ते चिंतन म्हणजे त्या संत वचनांचा अर्थ नव्हे. कारण संत वचने म्हणजे अमृतसरिता आहे. प्रत्येकाने आपल्या ओंजळीत मावेल तेवढे अमृत घ्यावे. संत वचनाचे हे अमृत आपण ‘ मना सज्जना ‘ ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे यथाशक्ती, यथामती केलेले निरुपण आहे. या वचनांचा एवढाच अर्थ आहे असा आपला दावा नाही “.

वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल हे मात्र नक्की. आपल्या जवळील ज्ञान इतरांना वाटून ते अधिक मिळवण्यासाठी वाचकांना उद्युक्त करण्यात लेखक श्री. विप्र यशस्वी झाले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अशाच मार्गदर्शक ग्रंथ निर्मितीची त्यांच्याकडून अपेक्षा!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कर्जमुक्त व्हा!” -लेखक : सी ए अभिजीत कोळपकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कर्जमुक्त व्हा!” -लेखक : सी ए अभिजीत कोळपकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : कर्जमुक्त व्हा!

लेखक: सीए अभिजीत कोळपकर 

पृष्ठ: ४३५

मूल्य: ४००₹ 

देशाच्या आर्थिक क्षेत्रात गेल्या दशकापासून जितके व्यापक आणि वेगाने बदल झाले आणि आजही होत आहेत, तसे पूर्वी कधी झालेले नाहीत. या बदलांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचताना दिसत आहेत. याचा पहिला टप्पा केंद्र सरकारने बँकिंग वाढण्यासाठी राबविलेल्या जन धन योजनेपासून सुरू झाला व एका दशकात सुमारे ५५ कोटी नागरिकांनी बँकेत आपली खाती उघडली, त्यात अर्थात प्रथमच बँकिंग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

पुढील टप्पा हा ‘नोटबंदी’ चा म्हणून ओळखतो. त्या पाठोपाठ सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रचंड चालना दिली. गेल्या पाच वर्षांत देशात डिजिटल क्रांती झालेली आज आपण पाहात आहोत.

आर्थिक सामिलीकरणात या बदलांसोबत आणखी एक महत्त्वाची बाब घडते आहे. ती म्हणजे पतपुरवठ्याच्या विस्ताराची. नागरिकांना कमी व्याजदरात आणि सहजपणे भांडवल व कर्ज उपलब्ध होत आहेत.

सध्या देशात क्रयशक्ती वाढत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून राहणीमानात सकारात्मक बदल होत आहे. आतापर्यंत विकसित देशांत असे जे बदल होताना आपण पाहत होतो, नेमके तसेच बदल आपल्या देशात आज पाहायला मिळत आहेत, ही आपल्या देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने उत्साहवर्धक बाब आहे.

पण अशा चांगल्या बदलांसोबत एक धोकाही अर्थव्यवस्थेत प्रवेश करत असतो, तो म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्याची मानवी वृत्ती अधिकच वाढते. त्यामुळे वैयक्तिक कर्जाचे प्रमाण सतत वाढताना दिसते आहे. त्यामुळे कर्ज घेताना काय दक्षता घेतली पाहिजे, या विषयी जागर झाला पाहिजे.

अभिजीत कोळपकर यांचे ‘कर्जमुक्त व्हा’ हे पुस्तक योग्य वेळी वाचकांसमोर या पार्श्वभूमीवर आलेले आहे. श्री. कोळपकर हे स्वतः सीए आहेत आणि आर्थिक साक्षरतेविषयी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत त्यांचे ‘अर्थसाक्षर व्हा! ‘ हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झाले आहे.

धाडसी उद्योजक व व्यावसायिक आपली पत निर्माण करून कर्ज उभे करतात व आपला व्यवसाय सुरू करतात. तसेच स्वतःवर कर्जाचा बोजा उभा करतात व व्यवसाय नीट न चालल्यास ते अडचणीत येतात. त्यामुळे कित्येकदा कर्ज घेताना घ्यावयाची काळजी व त्याचा विनियोग कसा करावा व परतफेड करण्याची व्यवस्था याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

कर्जमुक्त व्हा।

लेखन, वाचन आणि प्रत्यक्ष कृती या तिन्हींचा विचार करून विविध उदाहरणांसह, तक्ते, सूत्रे, चित्रे आणि फ्लो-चार्टर्ड्स यांचा वापर केला आहे. स्मार्ट वर्कशीट्स आणि चेकलिस्ट यामुळे तुम्हाला लवकर कर्जमुक्त होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.

या पुस्तकात वापरलेली चित्रे, रकाने, चौकटी, फ्लो-चार्ट्स, सुभाषिते यामुळे कठीण विषयावरील वाटणारे हे पुस्तक सोपे झाले आहे. पुस्तक वाचायचे हे आपण जाणतो, पण कर्ज, व्याजदर, कर्जफेड असा जो आकड्यांचा किचकट खेळ आहे, तो थेट उदाहरणे देऊन रकान्यांमध्ये मांडल्यामुळे हे पुस्तक आपल्या कर्जशंकांसाठी ‘वापरण्याचे’ पुस्तक झाले आहे.

या पुस्तकाचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी लेखकाच्या ८ सूचना!

  1. थोडे वाचन झाल्यावर थांबा, स्वतःला विचारा: “मी यातून काय शिकलो आणि ते कसे वापरू शकतो? ” तुमच्या मनाला पटणारे मुद्दे पेन्सिल किंवा हायलायटरने अधोरेखित करा, यामुळे नंतर उजळणी करणं सोपं होईल.
  2. “मी कर्जमुक्त होणारच! ” हा सकारात्मक मंत्र रोज म्हणा. त्यातून नवी ऊर्जा निर्माण होईल.
  3. दर तीन महिन्यांनी तुमच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घ्या. पुस्तकातील टिप्समुळे कोणते बदल घडू शकतात ते पाहा.
  4. पुस्तक नेहमी डोळ्यांसमोर ठेवा तुमच्या टेबलावर, कपाटात किंवा अशा ठिकाणी जिथे ते रोज दिसेल. दिसताच प्रेरणा मिळेल.
  5. आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे एकट्याचं काम नाही. कर्जमुक्त होण्याच्या तुमच्या योजनांबद्दल कुटुंबासोबत चर्चा करा.
  6. पुस्तकात सांगितलेल्या कृती छोट्या टप्प्यांमध्ये विभागा आणि आचरणात सातत्य ठेवा.
  7. डायरी किंवा जर्नलमध्ये दर महिन्याला तुमच्या कर्जमुक्तीच्या प्रवासाची नोंद ठेवा. पुढच्या योजना आणि प्रगती याविषयी लिहा.
  8. कर्जमुक्त भविष्याची कल्पना करा: स्वातंत्र्य, मनःशांती आणि समाधान! हेच स्वप्न तुम्हाला पुढे नेणार आहे.

– – वाचकांच्या अर्थविषयक ज्ञानात मोलाची भर घालून त्यांचे आर्थिक नियोजन सोपे करणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकाने आपल्या संग्रही ठेवावे असे आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “रीलया” – लेखक : श्री रविंद्र लाखे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “रीलया” – लेखक : श्री रविंद्र लाखे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक : रीलया 

लेखक – रविंद्र लाखे

प्रकाशक – पार पल्बिकेशन्स.

पृष्ठ संख्या – १६९

पुस्तक मूल्य – रुपये-२५०/

या कथा संग्रहातील तेराही कथांमधलं विश्व हे काल्पनिक वास्तव आहे. त्यामुळे ते चमत्कारिक, वेडसर वाटते.

..  या कथा वाचल्यानंतर लक्षात येतं की हे वेड लागणं म्हणजे चाकोरीबाह्य विचार करणं,

..  रूढ सामाजिक, नैतिक, भावनिक आणि वैचारिक चौकटीच्या, संकेताच्या पलीकडे जाऊन आपल्या अवतीभवती वावरणार्‍या माणसांकडे जवळपास किंवा दूरवर घडणार्‍या घटनांकडे आणि समग्र

व्यवहाराकडे पाहण्याची सवय लावून घेणं.

..  हे सगळं या सार्‍या कथांमधून लेखकाने उभं केलेलं आहे.

..  त्याच्या केंद्रस्थानी माणूसच आहे. त्याचं जगणं हे त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार असतं का?

तो त्याच्या आशा-अपेक्षा यांच्यानुसार जगत असतो का?

..  तसं जगणं त्याला शक्य असते का?

….   या साऱ्याचा शोध लेखक श्री. लाखे या सार्‍या कथांतून घेतात.

आभासी जगात वावरणारी..  स्वप्नात हरवणारी..  वास्तवापासून दूर पळणारी माणसं, आणि त्यांच्या भागध्येयाची तात्विकता..  हे या सर्वच कथांचे एक वैशिष्ट्य आहे.

माणसाकडे अशा जरा वेगळ्याच दृष्टीने बघण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या कथांचा हा संग्रह वाचकांनी जरूर वाचावा असाच आहे.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अलौकिक अंटार्क्टिका” – लेखिका : सुश्री गायत्री हर्षे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अलौकिक अंटार्क्टिका” – लेखिका : सुश्री गायत्री हर्षे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अलौकिक अंटार्क्टिका

लेखिका : गायत्री हर्षे

पृष्ठे : १३२

मूल्य : २४०₹ 

निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते.

एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल.

तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते.

त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्ग विज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भ आपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवा ही ठरतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “रोप अमृताचे” – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “रोप अमृताचे” – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर 

पुस्तक – रोप अमृताचे

लेखक – प्रवीण दवणे

प्रकाशक – रिया पब्लिकेशन

पृष्ठ संख्या – १४४/

पुस्तक मूल्य – रुपये-१७०/

प्रस्तुत पुस्तकात चाळीस ललित-वैचारिक लेखांच्या अमृत रोपांची जुडी आहे.

हे लेख म्हणजे मध्यमवर्गीयांच्या बदलत्या जाणींवांचा वेध घेणारे लेखन आहे. 

सामान्य समजल्या जाणार्‍या माणसांतचं खूप वेगळं जगणारी स्फूर्तिदायी माणसही असतात. 

जगण्यावरचा विश्वास वाढावा अशी प्रकारची सुंदर बेटही असते. 

काळोख व उजेड यांच्यामध्ये फक्त एक दरवाजा असतो.समस्या तर प्रत्येकाला असतातच, पण

आयुष्याचं व्यवस्थापन जरा सजगपणे केलं तर आपण

त्यातून सुकरपणे मार्ग काढू शकतो हेही या लेखातून कळत.प्रश्न आणि उत्तरं अगदी खेटूनच उभे असतात;

आपण जरा दृष्टी वळवीत नाही;आणि प्रश्न प्रश्न जपत

आयुष्याच प्रश्नचिन्ह गडद करून टाकतो.समाजाची अशी घायाळ स्थिती पाहून लेखकाचे अश्रू पाझरले आहेत. 

हे पुस्तक वाचताना वाचकांच्या भोवतीच्या काळोखातून एखादा तरी किरण झरोका उघडल्याचा प्रत्यय नक्कीच इथे येतो.

परिचय : श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन” -लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन” -लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन  

लेखिका : सुनीला सोवनी 

प्रकाशक : भारतीय विचार साधना

पृष्ठ: ३९८

मूल्य: ३५०₹ 

हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी कटिबद्ध होऊन अनेक कार्यकर्ते समाज जीवनाच्या अंगोपांगांमध्ये, बहुविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आहेत. हिंदुत्वाचा हुंकार सर्वदूर जसजसा दुमदुमू लागला. तसतशी अनेक प्रसारमाध्यमे, तथाकथित पुरोगामी संघटना, संस्था, यांनी निरनिराळ्या मुद्द्यांवर हिंदुत्वाच्या विरोधात जोरदार आवई उठवायला सुरुवात केलेली आहे.

विशेषकरून अमेरिकेतील अनेक विद्यापीठातून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे अत्यंत विकृत व अयोग्य असे चित्र रंगविलेली पुस्तके व प्रकाशने पाहावयास मिळतात. अशी इंग्रजी पुस्तके वाचूनच मते बनवणारा तथाकथित सुशिक्षित वर्ग हिंदू संस्कृतीतील महान परंपरा, श्रेष्ठतम दृष्टीकोन यापासून फार फार दूर राहतो आहे. विशेषतः स्त्रीविषयक हिंदुत्वाचा दृष्टीकोन हा अत्यंत प्रगल्भ व शारीरिक, मानसिक, बौद्धिक इ. चा समतोल विचार करून मांडला गेलेला आहे व ‘आचार परमो धर्मः’ या न्यायाने प्रत्यक्ष व्यवहारात पुरुषाने ‘स्त्री’ संबंधीचा केवळ समान भाव न ठेवता अत्यंत श्रेष्ठ भावच मनात बाळगला पाहिजे अशी शिकवण लहानपणापासूनच तो संस्कार मुलांच्या मनावर बिंबवण्याची व्यवस्था या देशात निर्माण करण्यात आलेली आहे. ‘मातृदेवो भव’ म्हणून प्रातर्वंदनाची सुरुवात करणारा हा धर्म आहे. राष्ट्राकडेदेखील ही आमची मातृभूमी असे रामायणकालापासून येथे शिकविण्याची पद्धत आहे.

नेहमीच्या रूढ संकल्पनांनुसार व विशिष्ट पद्धती म्हणजेच श्रेष्ठ व योग्य पद्धती असा विचार न करता मुक्त चिंतन, विश्लेषणात्मक चिंतन, भारतीय जीवनमूल्ये उद्ध्वस्त करणाऱ्या कारवायांना सडेतोड उत्तर म्हणून लेखन करण्याची गरज होती, अशा अध्ययनातून सौ. सुनीला सोवनी यांनी हे लिखाण केले आहे.

वारंवार खोटी गोष्ट सांगितल्यावर ती खरी वाटते हे ‘गोबेल्स’ प्रणीत तत्त्व अंगीकारून सध्या देशावर जे अमेरिकन संस्कृतीचे प्रचंड आक्रमण चालू आहे. त्यामुळे हिंदू संस्कृती वाईट, जे-जे भारतीय, ते ते मागसलेले, बुरसटलेले-खराब अशी नवशिक्षितांची धारणा होऊ पाहत आहे. स्वतःच्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल अशी तिरस्काराची, घृणेची भावना देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी-राष्ट्रोत्थानासाठी फार मोठा अडथळा ठरणार आहे. राष्ट्रोत्थान कार्यातील अडथळा दूर करून आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची भावना जागविण्याची गरज आहे. त्यासाठी गहन चिंतन, अध्ययन करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. या गरजपूर्तीसाठीच ‘हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन’ हा शोधनिबंध प्रस्तुत करण्याची आवश्यकता आहे.

अर्थात येथे हे स्पष्ट करायला हवे, की हे चिंतन करीत असताना ते पूर्वग्रहविरहित व्हायचे असेल तर खालील सुभाषित मनात साठवायला हवे… 

“पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम् । सन्तः परीक्ष्यान्यतरत् भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ।।

जे जे पुराणात सांगितलेले आहे, ते सर्व योग्य आहे चांगले आहे. बरोबर आहे असे नव्हे, तसेच एखादे काव्य नवीन आहे म्हणून ते अवध-त्याज्य आहे आहे असेही मानता कामा नये. विधानांची नीट तपासणी करून काय योग्य, काय अयोग्य हे ठरवायला हवे आणि जे विचारी असतात, श्रेष्ठ असतात से विधानांची परीक्षा करूनच त्यांचा स्वीकार करतात, परंतु मूर्ख लोक इतरांचे जे म्हणणे त्यावरच आपले मत बनवतात. हे सुभाषित मनात ठेवून जे जे भारतीय, जे जे जुने, ते ते सर्व चांगले असा समज मनात ठेवून चिंतन करणे योग्य ठरणार नाही व सर्व नवे अयोग्य असेही म्हणून चालणार नाही.

त्याच वेळी ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, ‘जाळूनी’ किंवा ‘फोडूनी’ टाका, ही मानसिक धारणादेखील निःपक्ष चिंतनासाठी उपयोगाची नाही. विशेषकरून प्रचारमाध्यमांच्या द्वारे पश्चिमी संस्कृतीचा प्रभाव अधिकाधिक वाढत असताना समाजात अनेक विकृती निर्माण होऊन समाजस्वास्थ्यच धोक्यात आलेले आहे. अशा वेळी स्वस्थ समाजरचनेसाठी जे योग्य ते स्वीकारार्ह व जे अयोग्य ते त्याज्य अशीच सुस्पष्ट भूमिका घेऊनच चिंतन व्हायला हवे. सुदैवाने ‘हिंदुत्व’ हे सुरुवातीच्या कालखंडापासून आजतागायत अशी सुस्पष्ट भूमिका घेणारे असल्यामुळे ‘हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन’ शक्य आहे आणि आवश्यक आहे. कारण आपण कधीच असे म्हटलेले नाही की जे जे पाश्चिमात्य ते ते वाईट. उलट ऋग्वेदातील ऋचा असे सांगते की ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः’ विश्वातून सर्व बाजूंनी चांगले, शुभ म्हणजेच जे जे भद्र आहे ते ते विचार इ. आमच्याकडे येवोत. त्यामुळे बाह्य गोष्टींचा डोळसपणे स्वीकार करताना हिंदूंना काहीच अडचण वाटणार नाही. हिंदू विचारवंत व ख्रिश्चन संत यांच्या कोणत्याही विषयाकडे पाहण्याच्या मनोधारणा कशा आहेत हे केवळ दोन उदाहरणांवरून स्पष्ट होऊ शकते. आद्य शंकराचार्य म्हणतात ‘शीतो अत्रिन अप्रकाशो वा इति ब्रुवन, श्रुतिशतमपि न प्रामाण्यम् ब्रुवंति ।।’ अग्नी हा थंड अप्रकाशी असतो असे सर्व श्रुती, वेद जर शंभर वेळ सांगतील तर ते केवळ वेदात, श्रुतीत सांगतात म्हणून आम्ही खरे मानणार नाही. कारण प्रत्यक्ष प्रमाण जर अनुभूती देणारे आहे की अग्नी शीत नसून दाहक आहे, प्रकाशमान आहे तर आम्ही श्रुतींवर मुळीच विश्वास ठेवणार नाही. वेदप्रामाण्य मानणाऱ्या शंकराचार्याची ही वैचारिक बैठक हिंदू चिंतन आहे. उलट ख्रिश्चन संत मदर तेरेसा यांना विचारण्यात आले की बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे असे म्हटलेले आहे व पृथ्वी गोल आहे हे जगभर फिरणाऱ्या आपणा सर्वांना प्रत्यक्ष माहीत आहे तर तुम्ही काय म्हणाल? तर त्याचे उत्तर, ‘माझा बायबलवर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा आहे, बायबल चूक असे मी कधीच म्हणणार नाही.’ हिंदू व ख्रिश्चन वैचारिक बैठक इतकी भिन्न आहे हे लक्षात ठेवावेच लागते.

या पार्श्वभूमीवर आज जे स्त्रीविषयक साहित्यांमधून विचार मंथन होत आहे त्यावर प्रकाश टाकण्याची गरजच काय? जे काही होते आहे ते मुक्त आहे, अनिर्बंध आहे, असेना का? असा विचार स्वाभाविक वाटेल. परंतु राष्ट्रपुनर्निर्माणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या समाज घटकांच्या वैचारिक बैठकीसाठी काही सुस्पष्ट विचारसूत्र असण्याची गरज स्त्री संघटनेमध्ये प्रत्यक्ष काम करीत असताना भासत होती.

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या ज्या राजकीय, सामाजिक सुधारणांच्या चळवळी झाल्या, त्यामध्ये हिंदूंच्या पारंपरिक स्वत्वाबद्दलच्या श्रद्धेचा पाया होता. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात त्यातही अलीकडील वीस-पंचवीस वर्षात भारतातील सांस्कृतिक मूल्ये, धर्मसंकल्पना व राष्ट्रीय स्वत्व या सगळ्यालाच जोरदार धक्के बसत आहेत. स्त्रीविश्वाला अपरिहार्यपणे या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना मी कोण आहे? माझ्या जीवनाचे प्रयोजन काय आहे? माझा जीवन उद्देश काय असावा? याची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात आजची स्त्री पडताना दिसत नाही.

जागतिकीकरणाच्या वातावरणात पश्चिमी विचार आचारांचा प्रभाव देशातील स्त्रीजीवनावर अधिकाधिक वाढत आहे. आमची श्रद्धास्थाने, जीवनमूल्ये, नष्टभ्रष्ट होत आहेत याची जाणीव होते. चकचकीत फॅशन शो किंवा तत्सम बाजारूपणाला प्रसिद्धिमाध्यमांकडून जी प्रसिद्धी दिली जाते, त्यावरून हिंदू जीवनमूल्यांवरील असे आघात हे राष्ट्रोत्थानास बाधक ठरतील. या जाणिवेतून हा शोधप्रबंध साकारण्यात आलेला आहे. परंतु तो तसा तयार करीत असताना हा प्रबंध आजकालच्या डॉक्टरेटसाठी केलेला, विशिष्ट चौकटीत बसणारा न करता वेळोवेळी भाषणांमध्ये, लेखनांमध्ये मांडलेल्या विचारांचे संकलन या स्वरूपात केलेला आहे.

अनेक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विचारांची मांडणी करण्यास एकत्रित, संकलित असे अनेक ‘स्त्रीविषयक’ संदर्भ या ग्रंथाद्वारे उपलब्ध होतील असा प्रकाशक (भारतीय विचार साधना) यांना विश्वास वाटतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares