☆ “दुडिया” – लेखक : श्री विश्वास पाटील ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर☆
पुस्तक – दुडिया
लेखक-विश्वास पाटील.
प्रकाशक-मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
पृष्ठ संख्या-१४७
पुस्तक मूल्य- रुपये-२००/
दुडिया या एका शरणार्थी नक्षलवादी तरुणीची कहाणी सांगणार्या या कादंबरीत नक्षलवादींच्या प्रश्नामागची उकल करून दाखवतात. यात त्यांची कार्यपध्दती, त्यांच्या नेत्यांची विचारसरणी आणि जीवनशैली, नक्षलवादानं देशापुढं उभा केलेला धोका, आदिवासिंची हलाखीची परिस्थिति, त्याचं सरकारी
कर्मचारी आणि नक्षलवादी यांनी कठीण केलेलं जीवन या सार्याचचं चित्र वाचकाच्या नजरेसमोर उभं करते.
विश्वास पाटील यांच्या छत्तीसगड भागातील सरकारी कामानिमिताने काही काळाच्या वास्तव्यात असताना त्यांच्या सराईत लेखणीनं नक्षलवादाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे आणि भयानक आहे, स्थानिक आदिवासीचं जीवन त्यानं कसं आणि किती व्यापून टाकलं आहे. त्यांचे आयुष्य अनिश्चिततेच्या भोवर्यात अडकलेल हे जग प्रत्ययकारक पध्दतीनं अनेक तपशिलांसह जिवंत केलं आहे. त्यामुळचं ही कादंबरी आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. वाचकाला अस्वस्थ करतानाच त्याला विचारात पाडते.
☆ “श्रीमद् भागवतातील भारत” – लेखक : डॉ. विद्यासागर पाटंगणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : श्रीमद् भागवतातील भारत
लेखक: विद्यासागर पाटंगणकर
पृष्ठ: १६४
मूल्य : २५०₹
श्रीमद् भागवत हा एक अपूर्व ग्रंथ आहे. महर्षी वेदव्यास रचित हा ग्रंथ प्रासादिक तर आहेच, तसाच तो प्रसन्न शैलीतून प्रसाद, माधुर्य, ओज आदी गुणांसह निर्वेद स्थितिप्रत नेणारा व मानवी जीवनाच्या कल्याण, साफल्य व अंतिम उद्देशाचे भान देणारा ग्रंथ आहे. श्रीमद् भागवतात मूळ अध्यात्म ज्ञानाचे चिंतन व विवरण असले, तरी भौतिक सृष्टीतील सर्व विषय त्यात सहज ओघात येऊन गेलेले आहेत. भारतीय ऋषिमुनींची जीवनदृष्टी, त्यांची मूल्यदृष्टी, त्यांची जीवनधारणा व जीवनप्रेरणा या सर्वांचे त्यात सखोल व सूक्ष्म दर्शन घडते. त्यात मानवी जीवनातील सर्वच विषयांचे, शास्त्र विचारांचे दिग्दर्शन घडते. भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यांप्रमाणेच गणित, भौतिकशास्त्र, वास्तुशास्त्र, आरोग्यशास्त्र, स्त्रीरोग विज्ञान, विविध कला, साहित्य, नाट्य, धर्म, तत्त्वज्ञान, विविध कालगती, कालमान व कालभान यांचेही दर्शन घडते. व्यासनिर्मित हे भागवत म्हणजे खरोखरच त्यांनी प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे,
‘निगमकल्पतरोर्गलितं फलम्‘ (वेदरूपी वृक्षाला आलेले व पिकलेले रसमय फलच आहे! )
देवर्षी नारदांच्या अनुग्रहाने या ग्रंथाची निर्मिती महर्षी व्यासांनी केली व त्यांना मनःशांती मिळाली, हीच संहिता त्यांनी शुकमुनींना शिकवली व तेच त्यांनी राजा परीक्षितास कथन केले.
श्रीमद् भागवत हे एक दिव्यपुराण आहे. त्याला ‘महापुराण’ अशी संज्ञा आहे. सामान्य पुराणे पंचलक्षणयुक्त असतात, तर भागवत दशलक्षण युक्त आहे.
पुराणांच्या माध्यमातून द्रष्ट्या ऋषी-महर्षीनी बहुसंख्य लोकांना ज्ञान देण्याचाच शुद्ध विचार केलेला आहे. बहुजन समाजाला, स्त्रिया व शूद्रांना वेदाचा अधिकार नसल्याने, त्यांना पुराणांच्या माध्यमातून वेदज्ञान त्यांनी सांगितले. हे ज्ञान निर्दोष आणि निष्कपट होते. त्यांनीच म्हटले आहे की,
महर्षी वेदव्यासांनी ‘स्त्रीशूद्र द्विजबंधूनाम् त्रयीन श्रुतिगोचरा’ ही भूमिका ठेवून हे ज्ञान पुराणात ग्रंथित केले म्हणून ‘पुराणातील वांगी पुराणात ठेवा, ‘ असे उपरोधाने – उपहासाने म्हणणे म्हणजे त्या द्रष्ट्या महर्षीचा केवळ अपमान आपण करतो! केवळ अज्ञानाने किंवा पुराणांचा नव्या दृष्टीने शोध न घेतल्याने आपणास पुराण / पोथी गतार्थ वाटते; पण हे चुकीचे आहे. पोथी-पुराण हा विषय उपहासाचा परिहासाचा – टिंगलटवाळीचा नसून, खरे शास्त्रज्ञान, त्रिकालज्ञान देणारे ते प्रकाशगर्भ आहेत. म्हणून, पुराण वेद उपनिषद भारतीय परंपरेचे एकूणच ग्रंथ नव्याने, नव्या संदर्भात नवा अन्वयार्थ देऊन तपासणे, ही काळाची गरज ठरते. भागवत पुराणाकडे त्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
या भारताबद्दलचे निरतिशय, प्रगाढ प्रेम, राष्ट्रनिष्ठा व भारतीय जीवनाबद्दलची नितांत ओढ व्यास महर्षीच्या वाणीतून प्रकट झाली आहे. आज ज्याला राष्ट्रप्रेम, देशनिष्ठा (Patriotism, Nationality) म्हणतात, ती फार पूर्वीच ५००० वर्षांपूर्वीच ऋषिमुनींनी प्रकट केली आहे. ती पाहण्यासारखी आहे. या भारतात एक क्षणभर जरी जन्म मिळाला तरी मी धन्य होईन. हे ऋषींचे उद्गार काय सांगतात?
श्रीमद् भागवतातील भारत’ या ग्रंथाचे लेखक विद्यासागर पाटंगणकर यांनी भागवतातील देशभक्तीकडे सर्वांचे लक्ष वेधले, ही अत्यंत अभिनंदनीय व स्तुत्य बाब होय. श्रीमद् भागवतातील ‘भारतवर्षा’चा शोध घेताना व माहिती सांगताना लेखक केवळ भारताच्या भौगोलिक सीमा व तीर्थस्थळे यांच्यात न रमता भारतीय संस्कृतीचे ज्ञानात्मक व भावात्मक हृदय त्यांनी यात उलगडून दाखविले आहे. प्राचीन भारतीयांची जीवनदृष्टी, कालगणना, पर्यावरणविचार, वैज्ञानिक प्रगती, वर्णाश्रम धर्म, स्थापत्य विज्ञान, राष्ट्र विकास, समन्वयाचा संदेश, आध्यात्मिक उपदेश, कथारूपकांचा उलगडा, विश्वकल्याणाची आकांक्षा अशा अनेक विषयांचे सादर व सकस, पण सुलभ व प्रांजळ प्रतिपादन करून लेखकाने भारतीय संस्कृतीचे अंतर्बाह्य मनोज्ञ दर्शन घडवले आहे.
मूळ ग्रंथाच्या वाचन-परिशीलनाने अभ्यासक व वाचक सुखावतील!
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ध्यास ‘वंदे मातरम्’ चा” – लेखक : श्री मिलिंद प्रभाकर सबनीस ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
(एका अमर राष्ट्रगीताची दीडशेवी वर्षपूर्ती होत आहे… त्या निमित्ताने…)
पुस्तक : ध्यास ‘वन्दे मातरम्’ चा
लेखक: मिलिंद प्रभाकर सबनीस
पृष्ठे: १६०
मूल्य: २३० ₹ टपाल ३५ ₹ एकूण २६५ ₹ घरपोच
वन्दे मातरम् हे शब्द शालेय जीवनात रोजच शाळा सुटताना उच्चारत असलो, तरी त्याबद्दलची फारशी माहिती आजही सर्वसामान्यांना नाही. शालेय विद्यार्थ्यांना तर बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलं, एवढीही माहिती फार कमी प्रमाणात असते.
अमरेंद्र गाडगीळ हे त्या काळातील बालकुमारांसाठी संस्कारक्षम आशयाच्या कथा लिहिणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांचा मूळ पिंड संशोधक, अभ्यासक अशा कोशकाराचा होता. अमरेंद्र गाडगीळ हे ‘वन्दे मातरम्’ या विषयावर मराठीत पुस्तक लिहिणारे पहिले लेखक. १९७३च्या सुमारास मराठीत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदीसह आणखी काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात या पुस्तकातील काही भागावर सरकारी यंत्रणेकडून आक्षेप घेण्यात आला. आणीबाणीच्या आसपास सरकारनं सुचवलेला भाग वगळून या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित झाली तरी आणीबाणी उठल्यानंतरच्या काळातल्या सर्व आवृत्त्या मात्र मूळ मजकुरासह प्रकाशित झाल्या व पुढे हे पुस्तक अधिकच लोकप्रिय झालं. पुस्तक पृष्ठसंख्येच्या दृष्टीनं छोटं असलं तरी आशयात्मकदृष्ट्या मोठं होतं. वन्देमातरम् विषयी अधिक उत्कंठा निर्माण करण्याचं सामर्थ्य अमरेंद्रांच्या शब्दांत होतं.
ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे या पुस्तकाबद्दल म्हणतात की – –
‘राष्ट्रभक्तीने भारलेले असंख्य असतात; पण वेदमंत्राइतकेच वंदनीय असणारे ‘वन्दे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय स्तोत्र, राष्ट्रीय गीत! या गीताच्या जन्माला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सुमंगल लेणे लाभले असताना, या परमपवित्र राष्ट्रीय गीताचा, जन्मस्थळाचा व त्याभोवती असलेल्या काहीशा निगूढ पदरांचा वेध घ्यावासा वाटणे, हे संवेदनच विलक्षण दुर्मीळ आहे.
अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या बंकिमचंद्रांच्या छोटेखानी चरित्र पुस्तकातून ‘वन्दे मातरम्’ या मंत्राशी मिलिंद सबनीस यांचे भावोत्कट नाते जुळले. भले हे छोटेखानी पुस्तक असेल, पण त्यामुळे एका अद्भुत यात्रेसाठी मनाने पाऊल पुढे निघण्यासाठी ते आतुर झाले. पुढे मग निमित्ते कशी येत गेली आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समग्र संदर्भाने शोध घेण्याचा ध्यास लेखकाला कसा जडला, याचा प्रवास लेखकाने या पुस्तकात उलगडला आहे. ’
ही ध्यासयात्रा केवळ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या जन्मस्थानाभोवती वा त्यातून प्रसरणाऱ्या मंत्रवत प्रार्थनालहरीपर्यंत न राहता, पुढे नव्या पिढीत हा राष्ट्रीय विचार रुजावा म्हणून त्यांनी अथकपणे जिवाचे जे रान केले, त्या घटनांचेही दर्शन या पुस्तकातून घडते. प्रत्येक देशभक्ताच्या संग्रही असावे असे हे पुस्तक.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “हँगमन” – लेखक : सुश्री ज्योती पुजारी ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर☆
पुस्तक : हँगमन
लेखिका : ज्योती पुजारी
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
पृष्ठ संख्या-२०८
पुस्तक मूल्य- रुपये-२०/
फाशी हा शब्द ऐकताच तनमन थरारते.
‘फाशी देणारा माणूस’ आणि त्याचे अंतर्बाह्य जीवन कसे असते, या प्रश्नांचे उत्तर म्हणजे ज्योती पुजारी
लिखित ‘हँगमॅन’ ही कादंबरी.
जल्लाद! .. फाशी देणारा, दूसरा अर्थ आहे क्रूर, निर्दय.
अशा माणसांचे जीवन जवळून पाहण्याची संधी ज्योती पुजारीनां मिळाली. कादंबरीचा नायक हा फाशीचा साक्षीदार. फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना फाशी देणारा नायक एक सरकारी नोकरदार माणूस.
… माणुसकी जपणारा. आपुलकिने वागणारा. कैद्यांना फाशी देणे म्हणजे एका जीवाने दुसर्याचा जीव घेणे हे पाप आहे असे समजणारा. गुन्हेगार मरतात पण कादंबरीचा नायक मात्र मानसिक यातना भोगत राहतो.
प्रत्येकाला आपला जीव प्यारा.
फाशीचा तेलकट गळफास लावताना मनातल्या मनात जल्लाद माफी मागतो.
प्रत्येक प्रसंग जिवंत करण्याची लेखिकेची अभ्यासपूर्ण शैली आणि वातावरणनिर्मितीची भक्कम पकड
या दोन गोष्टी भाषेची शान आणि प्रवाहीपण कायम राखतात.
अगदीच वेगळ्या विषयावरचे हे पुस्तक निश्चितच वाचण्यासारखे आहे.
☆ “उसवण ” – लेखक : श्री देविदास सौदागर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक : “ उसवण “.
लेखक : देविदास सौदागर.
प्रकाशक : देशपांडे आणि कंपनी पब्लीशर्स. पुणे
पहिली आवृत्ती :अॉगस्ट २०२२
दुसरी आवृत्ती:जून २०२४
पृष्ठे:११६
किंमत: १६० रु
देविदास सौदागर यांची युवा साहित्य पुरस्कार २०२४ ची विजेती कादंबरी वाचण्यात आली जी मनाला भिडली, डोक्यात रेंगाळत राहिली आणि म्हणूनच विचार करायला लावणाऱ्या या कादंबरी विषयी मला लिहावसं वाटलं. विशेष म्हणजे प्रस्तुत लेखकाची ही पहिलीच कादंबरी आहे.
संपूर्ण कादंबरीतले संवाद, पात्रांच्या मनातले विचार हे ग्रामीण भाषेत असले तरीही लेखकाच्या भाषाशैलीमुळे त्यातला गोडवा, गावरान भावना वाचकाच्या मनापर्यंत अलगद पोहोचतात. जो विषय या कादंबरीत हाताळला आहे त्या विषयातला सजीवपणा, ती संस्कृती टिकवण्यासाठी ही बोलीभाषा अत्यंत प्रभावी ठरलेली आहे. पुस्तक वाचताना झालेली माझी ही पहिली महत्त्वाची प्रतिक्रिया.
या कादंबरीतलं मुख्य नायक पात्र आहे “विठू”.
एका लहानशा गावात “विठू”चा शिवणकामाचा छोटासा अगदी पोटापुरताच दाम देणारा व्यवसाय आहे. संपूर्ण गावात कापडं शिवणारा शिंपी हीच विठूची ओळख आहे.
त्याची पत्नी “गंगी” ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते आणि त्याच्या प्रत्येक कामात, सुखात, दुःखात तिची अगदी “नाति चरामि” अशी समर्पित साथ असते. या पती-पत्नीचं प्रेमाचं नातं अतिशय विलोभनीय आणि मनाला भावविभोर करणारं आहे. त्यांच्या प्रेमविवाहाची कहाणीसुद्धा अतिशय गंमतीदार आणि लडिवाळपणे लेखकाने लिहिली आहे. या दांपत्यास दोन मुलं आहेत. मुलगी अतिशय हुशार आणि महत्त्वकांक्षी तर मुलगाही आईबापांवर माया करणारा, काळजी घेणारा, कर्तव्यदक्ष असाच आहे. एकंदर विठूचं दारिद्र्यातलं कौटुंबिक चित्र जिव्हाळ्याचं आहे. संकटात, गरिबीतही प्रेमभावाच्या अतूट धाग्याने बांधलेलं आहे.
गाव, गावातली माणसं, शिक्षक, विद्यार्थी, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि मनोवृत्तीचे गावकरी आणि विठूचा शिवणकामाचा छोटासा धंदा– यांचे परस्परांशी असलेलं कधी स्नेहभावाचं, अप्रामाणिकपणाचं, फसवणुकीचं, गुंडगिरीचं, दादागिरीचं नातं आणि विठूचा जीवन प्रवास हे या कादंबरीतील कथानकाचे मुख्य सूत्र आहे.
लग्नसराई, सणवार याच दिवसात नवे कपडे शिवून वर्षभर पुरेल इतकी तुटपूंजी का होईना कमाई करणाऱ्या विठूच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या खडतर जीवनाविषयी वाचताना वाचकाच्या मनात करुणा, दया भावना, सहजपणे उत्पन्न होते तसेच फसव्या गोड बोलून काम करून घेऊन पैसे बुडवणाऱ्या धनदांडग्या लोकांची मनस्वी चीड येते. लेखकांनी कादंबरीत विखुरलेली पात्रं, त्यांच्या मनोवृत्ती, आपसातले संवाद, भांडणे अतिशय सरळ साध्या शब्दात पण रसाळपणे मांडले आहेत. वाचता वाचता आपणही त्या गावाचा एक भाग बनून जातो.
या कादंबरीत वेगवेगळ्या टप्प्यांवर सर्व भावभावनांचे स्त्रोत अनेक प्रसंगातून अनुभवायला मिळतात.
पती-पत्नीचं नातं, मुलांविषयीची जागृत कर्तव्य भावना, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, आईवडिलांच्या श्रमाची जाणीव ठेवणारी मुलं आणि दुसरीकडे धक्का देणार्या दुनियादारीचा मन कालवून टाकणारा अनुभव याचं एकत्रिकरण इतकं प्रभावी पद्धतीने लेखकाने केलं आहे की ही कादंबरी अक्षरशः वाचकाच्या मनावर गारुड करते.
प्रामाणिकपणे लोकांची गरज, नड जाणून, विश्वास ठेवून काम करणाऱ्या विठूवर, एका खून झालेल्या मृत व्यक्तिच्या अंगावर विठूने शिवलेले कपडे आढळल्यामुळे त्यालाही या गुन्हेगारी प्रकरणात विनाकारण गोवले जाण्याचा प्रसंग उद्भवतो. अनेकदा पोलीस चौकीवर चौकशीसाठी त्याला बोलावले जाते. या साऱ्या प्रकरणात विठू आणि त्याचे कुटुंब अगदी केविलवाणे होऊन भरडले जाते. या सर्व प्रसंगांची वर्णने वाचताना वाचकाला चीड, हळहळ, दया, करुणा, दुःख, सत्याचा वाली कुणीच नसतो वगैरे भावना ग्रासून टाकतात.
साध्या साध्या वाक्यातूनही खूप मोठ्या जीवनतत्त्वांना लेखकाने या कादंबरीतून स्पर्श केला आहे.
“अन्यायाची मांडणी करणारी सगळी सामग्री जाळून टाकली पाहिजे
उरलेल्या मजकुरावर राख उपटेपर्यंत आपणच डोळ्यात तेल घालून पेटवली
पाहिजे ही आग…”
किंवा,
“सरळसोट जगता आलं पाहिजे
रात्रीच्या उरावर बसलेले दिवस
ओळखता आले पाहिजे
बेवारस क्षणाच्या निर्मितीला
चाप लावता आला पाहिजे
डोक्यावर पाय देणारे लोक
कोलता आले पाहिजेत…”
ही एका वेडसर पण नैराश्य आलेल्या सुशिक्षित तरुणाच्या तोंडची सैरभैर वाक्ये काळीज चिरून टाकतात.
कालांतराने रेडीमेड कपड्यांचा नवीन जमाना येतो आणि विठूच्या हातात कामं उरतात ती फक्त उसवलेलं, फाटलेलं, विरलेलं, बिघडलेलं, शिवण्याचं. त्यावेळी विठूच्या मनात येणाऱ्या विचारांचं अगदी हृदयद्रावक शाब्दिक वर्णन लेखकाच्या लेखणीतून उतरलं आहे.
“आपलं आयुष्य चिंध्यासारखं झालय. धड जपता यिना ना धड फेकता यिना. अवघा देह म्हणजे चिंधी झालाय जणू! सगळ्या जगण्यावर ठिगळ लावलेलं ठळक दिसालय. ”
थोडक्यात “उसवण” ही एका शिंप्याच्या जीवनातली पराभवाची, दुःखाची कहाणी आहे. परिवर्तन काळात, लहानसहान जीवने सर्वांगाने उध्वस्त कशी होतात हे विदारक सत्य दर्शविणारं एक वास्तविक कथानक यात आहे. आजकालच्या अराजकतेच्या, अमानवीकरण्याच्या सीमेवर पोहोचलेले लोकजीवन, याचेही दर्शन या कादंबरीत घडते.
या कादंबरीचे “उसवण, हे शीर्षकही खूप अर्थपूर्ण आहे. “जेव्हा आभाळच फाटतं तेव्हा कुठे कुठे ठिगळं लावणार” असा एक असाहाय्य उसाचा या “उसवण” शब्दात जाणवतो. या कादंबरीतला नायक “विठू” तुटू पाहणाऱ्या, मोडकळीस आलेल्या त्याच्या व्यवसायाची भिस्त पुढच्या पिढीवर ठेवून एक सकारात्मक आशावाद बाळगतो. त्यामुळे वाचकाच्या मनातही नकारात्मक वास्तवाला सामोरे जाताना एक आशेचा किरण दिसतो. जिथे गोष्ट संपते तिथूनच ती पुन्हा अद्रुश्यपणे नव्याने सुरू झाल्याचाही भास होतो.
निरनिराळ्या क्लेषदायक प्रसंगातून उलगडणार्या आणि एका होरपळणाऱ्या मानवी जीवनाचं दर्शन देणारी ।उसवण” ही कादंबरी साहित्य प्रेमी लोकांनी जरूर वाचावी.
परिचय – सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)… कवी : अरुण वि. देशपांडे ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
पुस्तक : मला कवीचा चष्मा लागला (काव्यसंग्रह)
कवी – श्री. अरुण वि. देशपांडे
प्रकाशन – संवेदना
किंमत- रु. १५०/-
ज्येष्ठ लेखक कवी श्री. अरुण वि. देशपांडे यांचा ‘मला कवीचा चष्मा लागला’ हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. कवी, लेखक, बालसाहित्यिक, समीक्षक असे साहित्याच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. देशपांडे यांचा ७७ पुस्तकांचा प्रदीर्घ मोठा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे कवीची लेखणी सशक्त समृद्ध बनलेली आहे. हे कवीचे ७८ वे पुस्तक म्हणजे कवीचा ३२ वा. कवितासंग्रह आहे. या पुस्तकांमध्ये ३ कवितासंग्रह पुस्तक स्वरूपात, अनेक बालकवितासंग्रह, ई बुक स्वरूपातले कवितासंग्रह, प्रिंट बुक स्वरूपातील २ हिंदी कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठीसह हिंदी भाषेतही त्यांनी काव्य लेखन केलेले आहे. तसेच त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज यांच्यावरही अनेक रचना लिहिलेल्या आहेत.
या कवितासंग्रहाच्या वेगळ्या शीर्षकाने मन आकर्षून घेतले. सर्वसाधारणपणे चष्मा लागणे हे प्रौढत्वाचे लक्षण आहे. काही अपवाद असू शकतात. पण रूढार्थाने चष्मा लागणारी व्यक्ती ही वैचारिक परिपक्वता येऊन अनुभवसिद्ध असते. तशीच इथे कवीची स्थिती आहे.
आपल्या या दीर्घकालीन काव्य लेखनाबद्दल कवी आपल्या मनोगतात खूप छान व्यक्त होतात. कवी म्हणतात, ” सतत कवितांच्या संपर्कात येण्याने, लिहिण्या, वाचण्याने माझी कवीची नजर अधिक सूक्ष्म, सजग होत आहे असे वाटू लागले आहे. ” आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘दर्शनी’ आणि ‘अंतरंग’ अशा दोन्ही स्वरूपात फार फेरफार झाले आहेत. तसेच कवी- वृत्तीत वाढ झाली आहे असे कवी पुढे म्हणतात. कवी मनाची अस्वस्थता, घालमेल, स्वप्नाळू वृत्ती, व्यक्त होण्याची असोशी हे सर्व कविगुण आपल्यात झिरपत गेल्याचेही कवी सांगतात.
या गोष्टींचा या संग्रहातील कविता वाचताना सतत अनुभव येतो. अतिशय साध्या, सोप्या, सुलभ भाषेत सर्व कविता लिहिलेल्या आहेत. ४ ते ५ कडव्यांच्या या आटोपशीर कविता आहेत.
या सर्व कविता अक्षरवृत्त, अभंग, ओवी, मुक्तछंद स्वरूपातील आहेत. उपमा, अलंकाराची कारागिरी नाही. छंदोबद्ध, वृत्तबद्ध कविता, गझल लेखन अशा तंत्रशुद्ध कविता लेखनासाठी लागणारा अभ्यास, लेखन तंत्रशुद्धता याचा आपल्यापाशी अभाव आहे याची कवी मनोगतात प्रांजळ कबुली देतात. त्यामुळे त्यांची कविता सुबोध आणि वाचकप्रिय झालेली आहे.
त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनातल्या विविध अंगांना स्पर्श केलेला आहे. निसर्ग, पाऊस, आपला गाव, नाती, आई, कुटुंब, आठवणी, संस्कृती, मैत्री, कवी, कविता, ध्येय, स्वप्नं अशा आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असंख्य गोष्टींवरील या एकूण ८३ रचना यात समाविष्ट आहेत.
कवीचा चष्मा लावून आजूबाजूच्या विश्वाचा वेध घेणारा कवी आपल्या शब्दात त्या त्या भावना व्यक्त करतो, कारण
शब्द वश या वेड्याला
वेदनेची कविता लिहायला!
कवी असतो
भावनांचा दूत
म्हणूनच तो तुमच्या आमच्या भावना त्याच्या कवितेतून व्यक्त करतो. कारण संवेदनशील मनात भावना दाटल्या की त्या व्यक्त झाल्यावरच मनाला स्थिरता येते.
अस्वस्थ मनास स्थिरता
देऊ शकते ती कविता
भावनांचे प्रतिबिंब असते
सहज सुंदर ती कविता…
प्रत्येक आई बाईच असते आणि प्रत्येक बाईत आई असते. तिच्याविषयी आदरयुक्त शब्दात कवी लिहतो,
घराची अब्रू बाई
दुःख लपवे आई,
घराचे सुख बाई
घराचे घरपण आहे!
मोह, आकर्षण, लालसा, बेगडी वैभव अशा विविध गोष्टींनी आयुष्य आपल्याला गुंतवून ठेवते आणि त्या गुंत्यात आपण फिरत राहतो.
आयुष्य नावाच्या कोळ्याने
विणून ठेवलंय जगणे नावाचे
सुंदर मोहक फसवेसे जाळे
घेते खेचूनी भक्ष्यास हे जाळे….
आयुष्याचे अगदी सोप्या शब्दात वास्तव दर्शविले आहे. आपल्याला आपली ओंजळ कायम सुखाने, आनंदाने भरलेली आहे असेच वाटत असते. पण ही गळकी ओंजळ कधी रिकामी होते हे समजत नाही. हे पण आयुष्यातले एक वास्तव आहे.
गळक्या ओंजळीचे हात आपले
त्यात कधीही काहीच ना मावले.
जे जे मनाला कधी कधी भावले
नशिबास मात्र कधी ना भावले..
आपली नाती, आपले वागणे, स्वभाव, इच्छा- अपेक्षा, बदलत्या काळातली मनोभूमिका, मनाचे वागणे, मित्रांशी व्यवहार अशा जगण्यातल्या मूलभूत गोष्टी, दुनियादारी, निसर्ग अशा विविध गोष्टींवर कवीने छान भाष्य केले आहे. काही काही कविता खूप छान आहेत.
उदा:- ‘डागडुजी इमारतीची’– आपल्या शरीराला एका इमारतीचे रूपक मानून तिची देखभाल कशी करावी हे छान मांडले आहे.
‘मनात असले तरी’– या कवितेत इतरांशी कसे वागावे हे छान समजावले आहे.
मला कवीचा चष्मा लागला
नवाच नंबर बदलून आला,
दृष्टिदोषात सुधारणा झाली
माझ्या नजरेत फरक पडला….
कवीचा चष्मा लागल्याने आपल्या विचारसरणीत कसा बदल झाला याचे हे आत्मपरीक्षण आहे. आपल्या मातृभाषेचा योग्य सन्मान सगळ्यांनी करायला हवा. त्रिभुवनात गौरव झाला असला तरी घरात तिला मानाचे स्थान द्यावे हे सांगताना कवी म्हणतो
हे मराठी माणसा, ऐक ना
व्यवहारी भाषा योग्य जरी
घरात वावरावी मराठी खरी
तिला तू विसरू नकोस ना….
शेवटची ‘ध्येय’ कविता बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे आवाहन करते.
उजाडलीय पहा पहाट नवी
चला, मोहिमेवर निघायला हवं,
ठरवलंय जे ध्येय मनाशी
ते साध्य करायलाच हवं….
श्री. अरुण देशपांडे यांच्या या कविता विविधांगी विषयातून जीवनस्पर्शी झाल्या आहेत. त्या वाचताना या सगळ्या आपल्याच कविता वाटू लागतात. कारण त्यांनी आपल्याही आयुष्यातील विविध भावना त्यात
व्यक्त केल्या आहेत. त्यातून जगताना वास्तवाचे भान ठेवून कसे जगावे याचे नकळत मार्गदर्शनही केले आहे.
यामधून कवीचे प्रगल्भ विचार आणि अनुभवविश्व जाणवते. सहज सोप्या शब्दात विचार मांडण्याची त्यांची हातोटी सुंदर आहे. यापुढेही कवी कडून अशाच सुंदर कविता रसिकांना वाचायला मिळाव्यात ही अपेक्षा. त्यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा!
परिचय : सौ.ज्योत्स्ना तानवडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पितामह” – लेखक : श्री अनंत तिबिले ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर☆
पुस्तक : पितामह
लेखक-अनंत तिबिले
प्रकाशक-रिया पल्बिकेशन्स
पृष्ठ संख्या-४४०/
पुस्तक मूल्य- रुपये-४३०/
महाभारतात त्यागाचा शोध घेत असताना आचार्य भीष्म पहिले येतात. प्रस्तुत कादंबरीत आचार्य भीष्माचं त्यागमाय, निरीच्छ असं जीवन रेखाटलंय.
पितामह ….
कुरुकुलातले श्रेष्ठ पुरुष. सदाचरण नि सदवर्तनाने वागलेले. वास्तविक अष्टवसुंपैकी एक असलेले.
अल्पायुषी होते, पण उद्याच्या समाजाला आदर्श हवा होता म्हणून दीर्घायुषी ठरून आपली जबाबदारी यथायोग्य पार पाडली.
ज्या कुळात देवव्रतासारखा धर्मज्ञ, सदाचरणी, निरिच्छ, निस्वार्थी योद्धा जन्माला आला, ज्याने आपल्या अतुलनीय त्यागाने एक इतिहास घडविला त्या कुलाच्या प्रतिष्ठेला कधीच बाधा येणं, हे कुल कलंकित होणे अशक्य असच आहे.
… पण जे घडतंय आणि जे घडणार आहे ते देखील कुलाच्याच हिताचंचं असणार आहे.
पण कुरुकुलातील कलह उद्याच्या समाजाचा घृणेचा विषय जरी बनला तरी नव्या पिढीला सावधगिरीचा
सल्ला देणारं साधन ठरेल.
‘पितामह’ ही अनंत तिबिलेंची ब्याण्णवावी कादंबरी हेच सांगते. म्हणूनच ही कादंबरी रसिकांनी वाचावी अशीच आहे.
☆ “मना सज्जना” – लेखक : श्री तुकाराम नारायण विप्र ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : मना सज्जना
लेखक : श्री तुकाराम नारायण विप्र
९६०४३६३६६०
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, कोल्हापूर.
मूल्य : रु. ३५०/-
☆ मन सज्जना… मनोबोधाचा चिंतनाविष्कार… ☆
श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनोबोध अर्थात मनाचे श्लोक माहित नाहीत असा मराठी माणूस सापडणे कठीण आहे. मनाला ‘ सज्जन ‘ असे संबोधून या मनाचे नेमके काय चुकते आहे, त्याला योग्य मार्गावर कसे आणता येईल यासाठी केलेला उपदेश म्हणजे ‘ मनाचे श्लोक ‘. या श्लोकांचा अर्थ समजावून
सांगणारे, निरुपणात्मक ग्रंथ आतापर्यंत अनेक जाणकार अभ्यासकांनी लिहीले आहेत. साधकांना ते उपयुक्तही ठरले आहेत. कोल्हापूर येथील श्री. योगिसुत अर्थात तुकाराम नारायण विप्र यांनी लिहीलेले ‘ मना सज्जना ‘ हे पुस्तकही असेच सर्व अभ्यासकांना मार्गदर्शन करणारे आहे.
ईश्वर उपासनेचा पारंपारीक ठेवा आणि संत साहित्य अभ्यासण्याची मनोवृत्ती यामुळे श्री. विप्र यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत तुकाविप्र यांचे साहित्य, तसेच ज्ञानेश्वरी, भागवत ग्रंथाचे वारंवार वाचन करुन ते आत्मसात केले आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकाविषयी सविस्तर टीका करत असताना त्यांनी या सर्व ज्ञानाचा उपयोग करुन घेतला आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच मनोबोधाची रचना का व कशी झाली याबाबतचा मनोरंजक इतिहास त्यांनी सांगितला आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक श्लोकाचा भावार्थ समजावून दिला आहे. ज्याठिकाणी श्लोक भावार्थात साम्य दाखवतात किंवा एकमेकांशी निगडीत वाटतात त्या ठिकाणी एका पेक्षा जास्त श्लोक एकत्र घेऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. हे सर्व करत असताना धार्मिक व पौराणिक कथा, बोधकथा, संत वचने, ओव्या, दोहे, सुभाषिते यांच्या बरोबरच आजच्या काळातील व्यावहारिक उदाहरणे, आलेले अनुभव, घडलेल्या घटना यांचा भरपूर वापर केला आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोक समजून घेणे अतिशय सोपे झाले आहे. तरीही ते नम्रपणे म्हणतात, ” संत वचनातील काही छटा चिंतनाच्या माध्यमातून आपल्या हाती लागल्या तर ते चिंतन म्हणजे त्या संत वचनांचा अर्थ नव्हे. कारण संत वचने म्हणजे अमृतसरिता आहे. प्रत्येकाने आपल्या ओंजळीत मावेल तेवढे अमृत घ्यावे. संत वचनाचे हे अमृत आपण ‘ मना सज्जना ‘ ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे यथाशक्ती, यथामती केलेले निरुपण आहे. या वचनांचा एवढाच अर्थ आहे असा आपला दावा नाही “.
वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल हे मात्र नक्की. आपल्या जवळील ज्ञान इतरांना वाटून ते अधिक मिळवण्यासाठी वाचकांना उद्युक्त करण्यात लेखक श्री. विप्र यशस्वी झाले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अशाच मार्गदर्शक ग्रंथ निर्मितीची त्यांच्याकडून अपेक्षा!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
देशाच्या आर्थिक क्षेत्रात गेल्या दशकापासून जितके व्यापक आणि वेगाने बदल झाले आणि आजही होत आहेत, तसे पूर्वी कधी झालेले नाहीत. या बदलांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचताना दिसत आहेत. याचा पहिला टप्पा केंद्र सरकारने बँकिंग वाढण्यासाठी राबविलेल्या जन धन योजनेपासून सुरू झाला व एका दशकात सुमारे ५५ कोटी नागरिकांनी बँकेत आपली खाती उघडली, त्यात अर्थात प्रथमच बँकिंग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पुढील टप्पा हा ‘नोटबंदी’ चा म्हणून ओळखतो. त्या पाठोपाठ सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रचंड चालना दिली. गेल्या पाच वर्षांत देशात डिजिटल क्रांती झालेली आज आपण पाहात आहोत.
आर्थिक सामिलीकरणात या बदलांसोबत आणखी एक महत्त्वाची बाब घडते आहे. ती म्हणजे पतपुरवठ्याच्या विस्ताराची. नागरिकांना कमी व्याजदरात आणि सहजपणे भांडवल व कर्ज उपलब्ध होत आहेत.
सध्या देशात क्रयशक्ती वाढत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून राहणीमानात सकारात्मक बदल होत आहे. आतापर्यंत विकसित देशांत असे जे बदल होताना आपण पाहत होतो, नेमके तसेच बदल आपल्या देशात आज पाहायला मिळत आहेत, ही आपल्या देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने उत्साहवर्धक बाब आहे.
पण अशा चांगल्या बदलांसोबत एक धोकाही अर्थव्यवस्थेत प्रवेश करत असतो, तो म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्याची मानवी वृत्ती अधिकच वाढते. त्यामुळे वैयक्तिक कर्जाचे प्रमाण सतत वाढताना दिसते आहे. त्यामुळे कर्ज घेताना काय दक्षता घेतली पाहिजे, या विषयी जागर झाला पाहिजे.
अभिजीत कोळपकर यांचे ‘कर्जमुक्त व्हा’ हे पुस्तक योग्य वेळी वाचकांसमोर या पार्श्वभूमीवर आलेले आहे. श्री. कोळपकर हे स्वतः सीए आहेत आणि आर्थिक साक्षरतेविषयी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत त्यांचे ‘अर्थसाक्षर व्हा! ‘ हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झाले आहे.
धाडसी उद्योजक व व्यावसायिक आपली पत निर्माण करून कर्ज उभे करतात व आपला व्यवसाय सुरू करतात. तसेच स्वतःवर कर्जाचा बोजा उभा करतात व व्यवसाय नीट न चालल्यास ते अडचणीत येतात. त्यामुळे कित्येकदा कर्ज घेताना घ्यावयाची काळजी व त्याचा विनियोग कसा करावा व परतफेड करण्याची व्यवस्था याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
कर्जमुक्त व्हा।
लेखन, वाचन आणि प्रत्यक्ष कृती या तिन्हींचा विचार करून विविध उदाहरणांसह, तक्ते, सूत्रे, चित्रे आणि फ्लो-चार्टर्ड्स यांचा वापर केला आहे. स्मार्ट वर्कशीट्स आणि चेकलिस्ट यामुळे तुम्हाला लवकर कर्जमुक्त होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.
या पुस्तकात वापरलेली चित्रे, रकाने, चौकटी, फ्लो-चार्ट्स, सुभाषिते यामुळे कठीण विषयावरील वाटणारे हे पुस्तक सोपे झाले आहे. पुस्तक वाचायचे हे आपण जाणतो, पण कर्ज, व्याजदर, कर्जफेड असा जो आकड्यांचा किचकट खेळ आहे, तो थेट उदाहरणे देऊन रकान्यांमध्ये मांडल्यामुळे हे पुस्तक आपल्या कर्जशंकांसाठी ‘वापरण्याचे’ पुस्तक झाले आहे.
या पुस्तकाचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी लेखकाच्या ८ सूचना!
थोडे वाचन झाल्यावर थांबा, स्वतःला विचारा: “मी यातून काय शिकलो आणि ते कसे वापरू शकतो? ” तुमच्या मनाला पटणारे मुद्दे पेन्सिल किंवा हायलायटरने अधोरेखित करा, यामुळे नंतर उजळणी करणं सोपं होईल.
“मी कर्जमुक्त होणारच! ” हा सकारात्मक मंत्र रोज म्हणा. त्यातून नवी ऊर्जा निर्माण होईल.
दर तीन महिन्यांनी तुमच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घ्या. पुस्तकातील टिप्समुळे कोणते बदल घडू शकतात ते पाहा.
पुस्तक नेहमी डोळ्यांसमोर ठेवा तुमच्या टेबलावर, कपाटात किंवा अशा ठिकाणी जिथे ते रोज दिसेल. दिसताच प्रेरणा मिळेल.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे एकट्याचं काम नाही. कर्जमुक्त होण्याच्या तुमच्या योजनांबद्दल कुटुंबासोबत चर्चा करा.
पुस्तकात सांगितलेल्या कृती छोट्या टप्प्यांमध्ये विभागा आणि आचरणात सातत्य ठेवा.
डायरी किंवा जर्नलमध्ये दर महिन्याला तुमच्या कर्जमुक्तीच्या प्रवासाची नोंद ठेवा. पुढच्या योजना आणि प्रगती याविषयी लिहा.
कर्जमुक्त भविष्याची कल्पना करा: स्वातंत्र्य, मनःशांती आणि समाधान! हेच स्वप्न तुम्हाला पुढे नेणार आहे.
– – वाचकांच्या अर्थविषयक ज्ञानात मोलाची भर घालून त्यांचे आर्थिक नियोजन सोपे करणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकाने आपल्या संग्रही ठेवावे असे आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “रीलया” – लेखक : श्री रविंद्र लाखे ☆ परिचय – श्री नंदकुमार पंडित वडेर☆
पुस्तक : रीलया
लेखक – रविंद्र लाखे
प्रकाशक – पार पल्बिकेशन्स.
पृष्ठ संख्या – १६९
पुस्तक मूल्य – रुपये-२५०/
या कथा संग्रहातील तेराही कथांमधलं विश्व हे काल्पनिक वास्तव आहे. त्यामुळे ते चमत्कारिक, वेडसर वाटते.
.. या कथा वाचल्यानंतर लक्षात येतं की हे वेड लागणं म्हणजे चाकोरीबाह्य विचार करणं,
.. रूढ सामाजिक, नैतिक, भावनिक आणि वैचारिक चौकटीच्या, संकेताच्या पलीकडे जाऊन आपल्या अवतीभवती वावरणार्या माणसांकडे जवळपास किंवा दूरवर घडणार्या घटनांकडे आणि समग्र
व्यवहाराकडे पाहण्याची सवय लावून घेणं.
.. हे सगळं या सार्या कथांमधून लेखकाने उभं केलेलं आहे.
.. त्याच्या केंद्रस्थानी माणूसच आहे. त्याचं जगणं हे त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार असतं का?
तो त्याच्या आशा-अपेक्षा यांच्यानुसार जगत असतो का?
.. तसं जगणं त्याला शक्य असते का?
…. या साऱ्याचा शोध लेखक श्री. लाखे या सार्या कथांतून घेतात.
आभासी जगात वावरणारी.. स्वप्नात हरवणारी.. वास्तवापासून दूर पळणारी माणसं, आणि त्यांच्या भागध्येयाची तात्विकता.. हे या सर्वच कथांचे एक वैशिष्ट्य आहे.
माणसाकडे अशा जरा वेगळ्याच दृष्टीने बघण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या कथांचा हा संग्रह वाचकांनी जरूर वाचावा असाच आहे.