मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “World Password Day – माझा पासवर्ड” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “World Password Day – माझा पासवर्ड” ☆ श्री सुधीर करंदीकर

दरवर्षी मे महिन्याचा पहिला गुरुवार हा जागतिक पासवर्ड दिवस म्हणून सर्वत्र साजरा होतो. नुकताच आपण सगळ्यांनी हा पासवर्ड डे साजरा पण केला असणार

लॅपटॉप उघडायला पासवर्ड पाहिजे, मोबाईल ला पासवर्ड पाहिजे, इंटरनेट बँकिंग ला पासवर्ड पाहिजे, गुगल करता पासवर्ड पाहिजे, थोडक्यात काय तर जमाना पासवर्ड चा आहे.

वापर करताना पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग असावा, सगळ्यांनी सुरक्षित पासवर्ड वापरण्याकडे वळावे, आणि आजच्या स्पॅम युगामध्ये सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि हे महत्त्व पटवण्याकरता जागतिक पासवर्ड दिवस सुरू झाला.

मी अगदी सुरुवातीला जेव्हा इंटरनेट बँकिंग सुरू केले, तेव्हा विचार केला – बायकोचे नाव पासवर्ड ठेवावे, पण लगेचच लक्षात आलं की हा पासवर्ड कोणी पण ओळखू शकेल. मग विचार केला की मैत्रिणीचे नाव पासवर्ड म्हणून ठेवावे, पासवर्ड मेघना ठेवला.

३ महिन्यानंतर लॉगिन करायला गेलो, तर मेसेज आला your password has expired. नवीन पासवर्ड म्हणून दुसरी मैत्रिण मनवा हे नाव टाकले.

३ महिन्यांनी पासवर्ड एक्सपायर झाला. म्हणून आधीचाच पासवर्ड मेघना टाकला. लगेच मेसेज आला – password cannot be same as earlier one. म्हणून मैत्रिण छाया हे नाव पासवर्ड म्हणून टाकले. नंतर सुनीता हे नाव टाकले. अशी चार मैत्रिणींची नावं टाकून झाली. प्रत्येक वेळा पासवर्ड एक्सपायर झाला, आणि चार पैकी एक नाव टाकले की मेसेज यायचा password cannot be same as last two/three passwords. दुसरे नाव टाकले तरी तोच मेसेज. मी टाकलेल्या मैत्रिणींच्या नावांचा काय सिक्वेन्स होता हे लक्षात नसायचे. त्यामुळे आधीची दोन नाव काय होती हे लक्षात नसायचे.

तीन वेळा पासवर्ड चुकीचा टाकला तर अकाउंट होल्ड वर जातो आणि बँकेत जाऊन पुन्हा ऍक्टिव्हेट करावे लागते.

विचार केला की पासवर्ड लिहून ठेवावे पण नंतर लक्षात आले की मिस युज टाळण्याकरता पासवर्ड लिहून ठेवायचा नसतो.

आधीचे किती पासवर्ड चालत नाहीत ते समजण्याकरता गुगलवर गेलो. तिथे समजलं की आधीचे चार पासवर्ड चालत नाहीत.

विचार केला कॉलेजमधल्या मित्राला फोन करून त्याच्याकडून काही गायडन्स घ्यावे आणि मित्राला फोन लावला.

मित्र : तुला पांडवांची नावं माहित आहेत का? आणि सगळ्यात मोठा कोण नंतरचा कोण हे माहीत आहे का?

मी : तुझी कल्पना एकदम बढीया आहे. आधी युधिष्ठिर पासवर्ड ठेवायचा, आणि नंतर एक एक जणाचे नाव ठेवत जायचे, आणि सहदेव पासवर्ड एक्सपायर झाला, की पुन्हा युधिष्ठिर पासवर्ड ठेवायचा.

मित्र : एकदम परफेक्ट.

मी : कल्पना एकदम मस्त आहे. पण एक अडचण आहे – सध्या आधीचे ४ पासवर्ड चालत नाहीत, काही दिवसात हा आकडा ५ वर जाईल, ६ वर जाईल. पुढचे प्लॅनिंग म्हणून १० पर्यंत आकडा जाईल असे धरून चल आणि त्याकरता काय करावे ते सांग. आणि महत्त्वाचे म्हणजे पासवर्ड मध्ये मैत्रिणींची नावं टाकता आली पाहिजेत.

मित्र : दोन मिनिटांनी तुला फोन करतो. बायकोने चहा आणला आहे, तो घेतो आणि काहीतरी आयडिया सुचेल. आणि फोन कट झाला 

दोन मिनिटांनी –

मित्र : वर्षामधल्या इंग्रजी महिन्यांची नावे पाठ आहेत ना!

मी : आहेत. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी असे पासवर्ड ठेवायचे का. कल्पना मस्त आहे पण मैत्रिणींच्या नावाचं काय.

मित्र : कुठल्याही महिन्याच्या स्पेलिंग मधली पहिली तीन अक्षरं घ्यायची. पहिलं अक्षर कॅपिटल. नंतर तुझ्या मैत्रिणीचं नाव पूर्ण, आणि या दोघांच्या मध्ये एखादा सिम्बॉल आणि एक अंक 

जसे Jan@2Chaya.

जो चालू पासवर्ड आहे तेवढाच लक्षात ठेवायचा. सध्या कुठला महिना चालू आहे याचा पासवर्डची काही संबंध नाही.

पासवर्ड एक्सपायर झाल्यावर, किंवा मध्येच तुला पासवर्ड बदलावा असं वाटलं, तर पुढचा महिना पासवर्ड मध्ये घ्यायचा- Feb#5Manava.

Feb च्यापुढे तू कुठलाही सिम्बॉल टाक, कुठलाही अंक टाक, कुठल्याही मैत्रिणीचं नाव टाक, काही प्रॉब्लेम नाही.

आधीच्या पासवर्ड मध्ये कुठली मैत्रीण होती, कुठला सिम्बॉल होता हे लक्षात ठेवायची गरज नाही.

चालू पासवर्ड जर Jan पासून सुरु होत असेल तर पुढच्या पासवर्ड Feb पासून सुरू झाला पाहिजे, Aug पासून असेल तर पुढचा पासवर्ड Sep पासून सुरू करायचा. आणि एक एक महिना पुढे जात जायचं.

आपल्या कॉलेजमधली स्नेहलता किंवा प्रियंवदा, यांची नावं टाकता येतील की नाही हे चेक करावे लागेल, कारण स्पेलिंग खूप लांब आहे, आणि काही बँकेमध्ये पासवर्ड चे किती कॅरेक्टर्स याचे लिमिट असते.

यापुढे तुला बँकेकडून your password can not be same as previous 2/3/4/5… passwords असा मेसेज कधीही येणार नाही.

मी जरी पासवर्ड कसा ठेवायचा हे तुला सांगितलं असलं, आणि तुझ्या शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींची नावे मला माहित असली तरी तुझा पासवर्ड काय असेल हे मला कधीच समजणारच नाही, काळजी करू नको.

जागतिक पासवर्ड दिनाचं औचित्य साधून तुझ्या मित्र-मैत्रिणींना आणि ग्रुप वर पण ही आयडिया दे. म्हणजे सगळ्यांचेच पासवर्ड स्ट्रॉंग राहतील.

इंटरनॅशनल पासवर्ड दिवसाच्या तुला शुभेच्छा. बाय-बाय झाले आणि फोन बंद झाला.

तुम्हा सगळ्यांना इंटरनॅशनल पासवर्ड दिवसाच्या थोड्या उशिराने शुभेच्छा.

मित्रानी सुचवलेली पासवर्ड ची कल्पना तुम्हाला कशी वाटली?

तुम्ही पण असाच स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि तुमची डॉक्युमेंट्स आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवा.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

माझं लहानपण एका खेड्यात गेलं. माझी आई फार शिकलेली नव्हती पण तिला लिहिता वाचता येत होतं. त्या जोरावर ती वाचायला शिकली. अनेक पुस्तके तिने वाचली. ती बहुश्रुत होती. बोलताना तिच्या तोंडातून सहज बोलीभाषेतील अर्थपूर्ण म्हणी आणि वाक्प्रचार बाहेर पडत. सुरुवातीला त्या म्हणींचा किंवा वाक्प्रचारांचा सखोल अर्थ कळण्याइतके माझे वय नव्हते. पण जसजशी समज वाढू लागली, तसतसा त्यांचा अर्थ कळू लागला. पानातली चटणी कशी चटकदार असते तशाच या छोट्याशा अर्थपूर्ण म्हणी. खेडेगावातील लोकही विशेष करून बायका अशा म्हणी वापरत. त्या सहजच कानावर पडत. त्यामुळे नाही म्हटलं तरी भाषिक जाण समृद्ध व्हायला मदत झाली.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अशाच एका अवलियाची जन्मशताब्दी या वर्षी आहे. कोण बरं हा अवलिया? तर त्याचं नाव आहे विश्वनाथ दिनकर नरवणे. संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी भारतीय कहावत कोश आणि भारतीय व्यवहार कोश तयार केला. तोही सोळा भाषांमध्ये. ज्या काळात संगणक, इंटरनेट यासारख्या गोष्टी आजच्यासारख्या उपलब्ध नव्हत्या त्या काळातील त्यांचे हे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे. विश्वनाथजी म्हणजे एकखांबी तंबू होता. साध्या बसने किंवा मिळेल त्या वाहनाने त्यांनी अवघा देश पिंजून काढला.

विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशात फिरताना भाषांची अडचण त्यांना जाणवली. पण अशी अडचण आपल्या देशबांधवांना येऊ नये, भाषा हा देशाच्या प्रगतीतील अडसर बनू नये अशा तळमळीतून त्यांनी हे प्रचंड कार्य उभे केले. विविध लोकांना ते भेटले. देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. नेताजींनी देशवासियांना जसे, ” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा “असे आवाहन केले होते. त्या धर्तीवर त्यांनी लोकांना, ” तुम मुझे शब्द दो, मै तुम्हे धन्यवाद दूंगा, ” असे म्हणून लोकांकडून शब्द आणि म्हणी गोळा केल्या. त्यांचे तीन खंड प्रकाशित केले. या तीन खंडांची पृष्ठसंख्या तब्बल तीन हजार पाने एवढी प्रचंड आहे. आपल्या या कार्यामुळे ते डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर, वा शि आपटे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यासारख्या मान्यवर कोशकर्त्यांच्या पंक्तीत आदराने जाऊन बसले.

रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे या गावी १८ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अतिशय खडतर होते. आधीच आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य. त्यात वडील बालपणीच वारले. आता घरात येणारी आर्थिक आवक बंद झाली. गावातील लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना शिक्षणासाठी मदत केली.

त्यांचं आरोग्य अत्यंत उत्तम होतं. सर्व प्रकारच्या खेळांमध्ये त्यांना गती होती. मैदानी खेळांसोबतच मल्लखांब, पोहणे आदी क्रीडाप्रकारांवर त्यांचे प्रभुत्व होते. शाळेतील शिक्षक त्यांना विद्यार्थ्यांची कवायत घेण्यास सांगत. राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमान त्यांच्या नसानसात भिनला होता. एकदा ते अशीच कवायत घेत असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांच्या कौशल्यावर तो बेहद्द खुश झाला आणि त्यांना म्हणाला, ” सैन्यात भरती होण्यास तयार आहेस का? ” तेव्हा देशभक्ती रक्तातच असलेल्या विश्वनाथने त्या अधिकाऱ्याला बाणेदारपणे उत्तर दिले. ” आमच्या देशाला गुलाम करणाऱ्या ब्रिटिशांची चाकरी मी कदापिही करणार नाही. ” 

शालेय शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी बडोदा गाठले. तेथे त्यांनी खेळांचे प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शिक्षण घेतले. याच सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. ते त्याच्याशी जोडले गेले ते कायमचेच! दादरा -नगर-हवेलीच्या मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. संघाचे प्रचारक म्हणून देशाच्या विविध भागात भ्रमंती केली. स्वामी विवेकानंदांच्या कार्याबद्दल त्यांना अतीव आदर होता. कन्याकुमारीच्या समुद्रात ज्या खडकावर ध्यानस्थ बसल्यानंतर पुढील कार्याची प्रेरणा मिळाली, त्या खडकाचे दर्शन त्यांनी पाच ते सहा वेळा पोहून तिथपर्यंत जाऊन त्यांनी घेतले.

भारतातील विविध प्रांतात फिरताना त्या त्या भागातील शब्द, वाक्प्रचार त्यांनी गोळा केले. भारतातील कोणत्याही प्रांतात फिरताना कोणालाही अडचण येऊ नये म्हणून विविध भाषांतील समानार्थी वाक्ये त्यांनी एकत्र केली. त्यांच्या या सगळ्या प्रचंड खजिन्याचे रूपांतर भारतीय व्यवहार कोशात त्यांनी केले. विशेष म्हणजे देवनागरी लिपी ज्या कोणालाही वाचता येते, त्याला हा कोश वाचून कोणतीही भाषा शिकता येईल. कोठे काही अडणार नाही आणि देशातील बहुतेक सर्व प्रांतात सहजतेने वावरता येईल. तामिळ असो की तेलगू, बंगाली असो की आसामी… प्रत्येक भाषेतील शब्दाला त्यांनी देवनागरीचे सुंदर अस्तर लावले. जणू काही वेगवेगळ्या रंगांची फुले त्यांनी देवनागरीच्या एकाच सुवासिक धाग्यात ओवून भारताची एक सुंदर भाषिक माला तयार केली!

विश्वनाथजींचा शिकण्याचा आणि काम करण्याचा आवाका प्रचंड होता. इंग्रजीसह सोळा भारतीय भाषा त्यांना अवगत होत्या. ज्या भाषा त्यांना येत नव्हत्या, त्या शिकून घेण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. बडोद्यात शिक्षण घेतल्याने गुजराती भाषा त्यांना उत्तम येत होती. बंगाली शिकण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात ते राहिले आणि बंगाली भाषा आत्मसात केली. उर्दू शिकण्यासाठी लखनौ, हैदराबाद इ. ठिकाणी राहिले. काश्मीरी, पंजाबी, मल्याळम, कानडी या भाषादेखील अशाच प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्या.

त्या काळी ते भाषेच्या संवर्धनासाठी घेत असलेल्या कष्टांची जाणीव फारच थोड्याना होती. सरकारकडून मदत मिळणे तर दूरचीच गोष्ट! स्वतःच प्रांताप्रांतात फिरणे, मिळालेली माहिती लिहून ठेवणे, तिचे वर्गीकरण करणे, छापून आणण्यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टी कोणाच्याही मदतीशिवाय त्यांना एकट्यालाच कराव्या लागल्या. मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे, मिळेल ते खाणे यासारख्या गोष्टी त्यांनी आनंदाने स्वीकारल्या. शिवाय त्याचे भांडवल केले नाही. हातामध्ये एक जुनी सॅक, डोळ्यांत एक अद्भूत स्वप्न आणि अंत:करणात भारताच्या विविध भाषांबद्दल अपार आदर घेऊन या माणसाने सतत एक तप देशाच्या कानाकोपऱ्यात पायपीट केली. एका राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यात जाताना बदलणारी माती, तिथली संस्कृती आणि त्या संस्कृतीच्या कुशीत जन्मलेले ‘शब्द’ गोळा करण्याचा हा प्रवास एखाद्या महाकाव्यापेक्षा कमी नव्हता. त्यांच्या या अफाट कार्यात त्यांना आणखी एका व्यक्तीचे मात्र सहकार्य मिळाले. ती व्यक्ती म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती प्रा. कविता नरवणे. कविताबाई या विद्वान तर होत्याच पण आपल्या पतीच्या कार्याचे मोल जाणणाऱ्या होत्या.

त्यांच्या कार्याची दखल घेणारी आणखी एक व्यक्ती त्यांना योगायोगाने मिळाली. ती व्यक्ती म्हणजे एक भाषाशास्त्रज्ञ होती. त्या व्यक्तीने त्यांचा गौरव भारतीय डॉ जॉन्सन म्हणून केला. ही बातमी लंडन टाइम्समध्ये प्रकाशित झाली. योगायोगाने ती तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंच्या वाचनात आली. त्यांनी विश्वनाथजींच्या कार्याची दखल घेऊन अत्यंत आदरपूर्वक विश्वनाथजींना बोलावून घेतलं. त्यामुळे त्यांना पुढील कार्यात मदत प्राप्त होऊन सरकारी पातळीवर आपल्या कोशाची विक्री करता आली. आपल्या या कार्यामुळे त्यांचे अनेक थोर मान्यवर व्यक्तींसोबत संबंध आले. त्यामध्ये डॉ राजेंद्रप्रसाद, स. का. पाटील यांच्यासारख्या व्यक्ती होत्या. परंतु त्यांच्या संबंधाचा वैयक्तिक फायदा त्यांनी कधीही करून घेतला नाही. आपल्या कामाच्या संदर्भात मात्र त्यांचे आवश्यक ते सहकार्य अवश्य घेतले. काही काळ त्यांनी अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. प्रेमचंद, शरदचंद्र आणि सरोजिनी नायडू यांच्या साहित्यावर त्यांनी केलेले लेखन त्यांच्यातील प्रगल्भ रसिकतेची साक्ष देते.

विश्वनाथजींनी कोषनिर्मितीचे एवढे प्रचंड कार्य केले तरी त्यांची वृत्ती एका कवीची होती. शेष सुंदर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या देशभक्तीचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या काव्यसंपदेखेरीज मुन्शी प्रेमचंद यांचे चरित्रही त्यांनी लिहिले आहे. भारतीय व्यवहार कोश आणि भारतीय कहावत संग्रह हे तर त्यांचे चिरंतन प्रेरणादायी असे कार्य! आज पुण्यातल्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या जवळून जाताना रस्त्यातील एका पाटीवर लक्ष स्थिरावते’कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे रस्ता’. गजबजलेल्या शहरातील त्या पाटीकडे पाहून मन क्षणभर थबकते. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. ही पाटी आपल्याला ओरडून सांगतेय की, ही केवळ एका व्यक्तीच्या नावाची पाटी नाही, तर ती साक्ष आहे एका माणसाच्या निस्सीम, मूक, एकहाती आणि झाकोळलेल्या महातपस्येची!

कलंदर आणि रसिक असे हे विश्वनाथजी आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी अखेरपर्यंत धडपडत राहिले. वयाच्या ७८ व्या वर्षी दि. ८ मे २००३ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे अनेक संकल्प मात्र मृत्यूमुळे अपूर्ण राहिले. परंतु असे असले तरी आपल्या अद्वितीय आणि हिमालयाएवढ्या कार्यामुळे ते अजरामर आहेत. अशा या महान व्यक्तिमत्वाला त्यानिमित्ताने वाहिलेली ही आदरांजली.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अफेेअर आणि करंट अफेअर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “अफेेअर आणि करंट अफेअर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काही वेळा काही शब्द फार जपून वापरावे लागतात. आपल्या मनातला अर्थ आणि समोरच्याने त्याचा घेतलेला अर्थ यात गफलत झाली की संपलच. शहाणा, वेडा हे असे काही शब्द आहेत की ते कोणत्या परिस्थितीत वापरले जातात त्यावर त्याचा अर्थ लक्षात येतोच. यात कधी चांगला अर्थ असतो, तर कधी तो टोमणा असतो. तसाच अर्थ करंट अफेअर या एकत्र केलेल्या शब्दात जाणवला.

आपण नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो त्यावर अर्थ अवलंबून असतो. पण दोन वेगळ्या व्यक्ती वेगळा विचार करत असतील तर वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या अर्थात गोंधळ होतो. असच काहीसं मी आणि माझा मित्र यात झालं.

अफेअर आणि करंट अफेअर. असलेेली लफडी आणि सध्या चालू असलेल्या घडामोडी यात गोंधळ झाला. अफेअर खाजगी आयुष्याच्या संबंधी असतं, तर करंट अफेअर याचा संबंध देशात, जगात घडणाऱ्या, सुरु असलेल्या घडामोडी याच्याशी असतो. जे उघड असतं.

आम्ही भेटलो तेव्हा मी सध्या सुरु असलेल्या युध्दाच्या बातम्या पाहिल्या होत्या. तर त्याच त्याच बातम्या पाहून कंटाळा आल्याने तो चंदेरी दुनियाचा कोणता तरी कार्यक्रम. त्यात त्यांनी घातलेले कपडे आणि इतर बरंच काही जे पहायचं असतं, पण त्यावर (आपण) सहसा बोलायचं नसतं (कारण संस्कृती) अस पाहून आला होता.

माझ्या मनात युध्दाचे, तर त्याच्या मनात पाहिलेल्या कार्यक्रमाचे विचार. बाॅॅम्ब कसे पडले याचा विचार मी करत होतो, बातम्यांंमधे दाखवलेल्या त्या धुराळ्यातून मी बाहेर पडलो नव्हतो. तर पाहिलेल्या त्या कार्यक्रमामुळे वेगळ्याच बाॅम्ब वर्षावातून आणि मनात तयार झालेल्या धुराळ्यातून बाहेर पडायच्या मनस्थितीत तो नव्हता. मी अग्निबाणाच्या विचारात, तर तो नयन बाण, आणि मदन बाणांच्या. आणि याच परस्पर विरोधी विचारात या शब्दांनी गोंधळ घातला.

करंट अफेयर काय? अस मी त्याला सहज विचारलं. मग जे विषय निघतील त्यावर तरी गप्पा होतील अस वाटलं.

पण त्यावर तो जे काही बोलला त्यावर मलाच करंट बसला.

कोणाचं करंट अफेयर, काय करायचय आपल्याला, यात खरं खोटं आपल्याला कुठे नक्की माहिती असते. पुुर्वी फक्त सिनेमा, किंवा नाटक यातच हा शब्द ऐकायला मिळत होता. आता सगळ्याच क्षेत्रात अफेअर सुरु असल्याचं बोललं जात. आणि ज्याला आपण करंट म्हणतो ते करंट नसतच. जुनं झाल्यावर आपल्यापर्यंत येतं. आणि त्यावर चर्चा करेपर्यंत एक वेगळं, नवीन (करंट) अफेअर कानावर येतं.

काय त्यांचे कपडे, ते चालणं, तो डान्स. हो तो डान्स असच म्हणाला. नाच म्हणाला असता तर त्या डान्सला कदाचित आदर दिल्यासारख वाटल असत.

आता आम्ही दोघ अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा मारत बसलोय. माझ्या मनातल्या बाणांनी बरंच काही उध्वस्त झालं होतं. तर त्याच्या मनातल्या बाणांनी काही घायाळ झाले असतील. पण बोलतांना आम्ही आमचा बाणा सोडला नाही. माझ्या मनात युध्दामुळे निर्माण होणारी सद्यस्थिती, आणि कलह. तर त्याच्या मनात सद्यस्थितीमुळे निर्माण होणारी काही गृहयुध्द व कलह. युध्दातल्या अग्निबाणांनी काही उंच इमारती जमीन दोस्त झाल्या असतील अस माझं म्हंणण. तर कार्यक्रमातल्या काही गोष्टींमुळे संंस्कृृती जमीन दोस्त व्हायला वेळ लागणार नाही अस त्याच.

युध्दामुळे काही गोष्टींवर नव्याने प्रकाश पडत होता. जे करंट अफेअर मधे होतं. तर त्या झगझगीत प्रकाशा मागच काही प्रमाणात लपवलेलं सत्य त्याच्या (करंट) अफेअर मधून तो सांगायचा प्रयत्न करत होता. माझ्या बोलण्यात युध्दातले स्फोट होते, तर त्याच्या बोलण्यात घटस्फोट. मी आर्थिक हानी बद्दल सांगत होतो. आणि तो सांस्कृतिक हानी बद्दल. अस अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा सुरु होत्या.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आम्हाला ५२ मुलं आहेत…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आम्हाला ५२ मुलं आहेत☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

– – आभाळात आपण इंद्रधनुष्य साकारू शकत नाही…

 पण कोणाच्या दारात रांगोळी तर काढू शकतो…

– – आभाळात आपण फुलांची झाडं लावू शकत नाही…

 पण कोणाच्या दारात फुलांचं झाड तर लावू शकतो…

 

फुलं एकतर आपल्या अंगणात पडतील किंवा दुसऱ्यांच्या… त्याने काय फरक पडतो…?

अंगण पाहून फुलं सुवास द्यायची थोडीच थांबतात…?

– – याच भावनेने या महिन्यात आपल्या सर्वांच्या साथीने जे काही थोडेफार जमलं ते केलं…!

 

आता जून महिना सुरू होईल, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट या मे महिन्यात माझ्या मागे सुरू झाला आहे…

अंकील, काका, मामू, बाबा, बाबू, पप्पा, डाकसाब, भाऊ, भैय्या या नावाने हाक मारत अख्खा मे महिना या पोरा आणि पोरींनी माझा नुसता जीव खाल्ला आहे…

– – नवीन शाळा कॉलेजचा हंगाम आता सुरू होईल…

सर्वांना शाळा कॉलेजमध्ये जायची गडबड आहे, त्याआधी सर्वांना मापाचे युनिफॉर्म, शूज सॉक्स, शाळा, कॉलेजच्या फीया, दुरेघी / एकेरी वह्या, आवडणाऱ्या रंगाच्या वॉटर बॅग, आणि अजून लई काय काय…

पोरांनी नुसतं डोकं उठवलंय…!

 

पण दरवर्षी मी बाप होऊन जातो, दरवर्षी माझ्या घरात जून ते ऑगस्ट दरम्यान पाळणा हलतो…

I am blessed – – 

 

‘ए गपा रे, हाताची घडी तोंडावर बोट… ‘ पोरांवर डाफरून मी शिक्षकाच्या भूमिकेत येतो.

मलाच माझ्या लहानपणी शाळेत जायची इतकी इच्छा का नव्हती याचं कोडं मला अजून पडतं…

माझी इच्छा मग मी याच पोरांवर भागवून घेतो… तुमच्या मदतीने…!

 

तर सध्या मुलांना लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट घेणे, संस्थेला लागणारे आधार कार्ड, फोटो, त्यांचे रिझल्ट वगैरे वगैरे अशा गोष्टी घेणे, शाळेत / कॉलेजमध्ये जाऊन फी कन्फर्म करणे, कोणी ऑनलाईन फी घेतंय तर कोणाला कॅश हवी आहे, त्याचे लिस्टिंग करणे आणि दिवसभर फिरत राहणे…

मनीषा सोडून माझ्याकडे सोबतीला आणि मदतीला कोणी नाही…

… अख्खा महिना या चिमण्यांच्या भविष्यातल्या घरट्यांचा विचार करत गेला…!

 

तुम्हा सर्वांच्या घरात एक दोन किंवा तीन मुले असतील, शाळा कॉलेज जवळ आल्यानंतर ती तुमचं काय डोकं खात असतील? ते तुम्ही जाणताच…

– – शाळा कॉलेज ही मुलांची नसतातच, ती आई बापाची परीक्षा असते…!

… मला आणि मनीषाला 52 मुले आहेत… आता आमची परीक्षा सुरू झाली आहे…

आणि ती किती असेल याची आपण कल्पना करू शकता…

 

आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा संक्षिप्त… (In bulletted points) आपणास सविनय सादर – – 

 

– दवाखान्यात जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना डबा आणून देणारा कोणीही नातेवाईक नाही, अशा सर्वांना जेवणाचे डबे देऊन आपणच नातेवाईक झालो…

… देत आपण आहात आम्ही फक्त हात झालो…

 

– रस्त्यावरील असहाय्य अवस्थेत जगणाऱ्या लोकांना कोणीही जेवण देत नाही अशांना आपण अन्नाचे दान तरी कसे म्हणू? दान करणारा मी कोण? आपल्या साथीने, त्यांची क्षुधा शांती केली आहे…

 

– ज्यांना घराबाहेर काढले आहे, अशा अनेक माऊली रस्त्यावर उन्हात अशाच तडफडत आहेत, जीव तव्यागत तापला आहे, आपल्या साथीने थंडगार पाणी त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडून त्यांना रोज प्यायला थंड पाणी देत आहोत, तृष्णाशांती म्हणतात ती हीच असावी का…?

 

– अत्यंत क्रिटिकल केसेस ज्यांना कोणत्याही दवाखान्यात ऍडमिट केले जात नाही, अशांची जमेल तितकी सेवा रस्त्यावर करत आहे आणि त्यानंतर ओळखीने त्यांना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहे आणि आपण त्यांचे बिल भरत आहोत… आपण म्हणजे पुन्हा “आपणच”आम्ही नव्हे…!

 

– महिन्यात कितीतरी सणवार येतातच, आपल्या या रस्त्यावरील माऊलींना कोणी गोडधोड देत नाही आणि म्हणून त्यांना गोडधोडाचे जेवण दिले आहे, “आपण” आम्ही नव्हे…!

 

– ज्यांना हात नाहीत पाय नाहीत किंवा दोन्ही असून नसल्यासारखे, अशा सर्वांना वैद्यकीय उपकरणे देऊन खऱ्या अर्थाने पायावर उभे केले आहे, त्यांनी आता काहीतरी काम करावे यासाठी प्रयत्नात आहे.

– – अनेक ताईंना हातगाडी देऊन कामाला लावले.

– – 70 वर्षाच्या आजोबांना पुणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर स्वच्छता करण्याचे काम मिळवून दिले आहे.

– – भूक लागली की भीक मागणारे आमचे लोक त्यांच्याकडे जे जमा असेल ते मला जेऊ घालतात, हाताने… शाही जेवण कदाचित यालाच म्हणत असावेत…!

मी त्यांच्यात बसून हे खाताना, या कड़क उन्हात कोणी पदरानं वारा घालतं, कुणी पाणी भरवतं, तर कुणी घास तोंडात घालतं…

– – भिकेमधलं खाऊन सुद्धा, भिक्षेकर्‍यांसाठी काम करताना, मला मी कुठल्यातरी देशाचा राजा आहे किंवा बादशहा आहे असा फील मला येतो…

 

… मी कुणीही नसतानाही, मला हा फील देणाऱ्या माझ्या त्या प्रत्येक माऊलीला साष्टांग नमस्कार.

 

– अजूनही सांगण्यासारखं बरंच बरंच आणि बरंच काही आहे…

– किती लिहू? काय काय लिहू? कुठे थांबू? माझं मलाच कळत नाही.

 

हाताचे चार तुकडे झाले आहेत, पायाचा चुराडा झाला आहे, हाडं मोडून शरीराच्या बाहेर आली आहेत, डोकं फुटून मेंदू बाहेर आला आहे, खून होऊन पोटातली आतडी बाहेर आली आहेत, त्यांचे ऑपरेशन करतानाचे फोटो इत्यादी इत्यादी मी कधीही आजवर शेअर केले नाही. माझ्याकडे अशाच फोटोंची भरमार जास्त असते.

– – असे फोटो टाळून, लेखाजोखा लिहिणे आणि त्यातून खूप काळजीपूर्वक आपल्याला फोटो… तेही कोणाची ओळख न दाखवता मास्क करून दाखवणे… हे सुद्धा माझ्यासाठी महिन्याच्या शेवटी दिव्य असते, वेळ खाऊ असते…!

 

पण मला त्यात अत्यंत आनंद होतो… ,! – कारण आपल्या मदतीमधून काय काम झाले हे साधारणपणे आपल्याला कळवणे हे सुद्धा माझे मी परम कर्तव्य समजतो…

 

तर माऊली काही चुका भुला झाल्या असतील तर माफ करावे…

आज अकरा वर्ष 24 तास मी या क्षेत्रात आहे, केवळ आपल्यामुळे…!

तरीही माझं काहीतरी चुकत असेलच…

चुकत असेन तर पदरात घ्या…

– – आणि नाहीच चुका पदरात घेतल्या, तर मी जाऊ कुठे…????

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Take it easy..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Take it easy.. ☆ संध्या बेडेकर ☆

If your plans are not working out… Take it easy. 

इतक्यातच अजय अनिताचे लग्न झालय. अनिता छान हंसमुख मुलगी आहे. बडबडी आहे. तिच्या पोटात काही रहात नाही. ऑफिस मधल्या गमती जमती, मैत्रीणींच्या गोष्टी, त्या आमच्या ओळखीच्या असो वा नसो सर्व सांगते. मी अगदी मन लावून ऐकते. हा तिच्या स्वभावाचा चांगला पार्ट आहे. उद्या या नवीन घरातील तिला काही आवडल नाही, तर ती स्पष्ट बोलेल. आतल्या गाठीची नाही, हे चांगल आहे. नाहीतर मनात एकत्र केलेल्या गोष्टींचा स्फोट व्हायचा. आम्ही सगळेच खुश आहोत. आमचे हे तसे अबोल आहेत, त्यांच्या बरोबर पण छान गप्पा मारते. यांच्यातला बदल मला आवडलाय. अबोल माणसाला समजायला उशीर लागतो. गैरसमज व्हायचे चांन्सेस जास्त असतात.

संवाद असला तर अनेक प्रश्न उद्भवतच नाही. नवीन माणसांबरोबर आपण सहज adjust होऊ शकतो.. बोलण्याने स्वभावाचा कल कळतो. विचार कळतात. आवडी निवडी कळतात.

नेहमी एकत्र रहाण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात.

हे दोन्ही पार्टी साठी आवश्यक आहे.

आज मी सकाळी बटाट रस्सा केला. बरोबर चार जास्तीचे बटाटे उकडून ठेवले. अनिताला डब्यात रस्सा भाजी आवडत नाही. सूखी भाजी आवडते. हे तिने एकदा बोलताना सहज सांगीतल होत. आज तिला दोसा भाजी डब्यात दिली. हे अस सहजच मला करता आल. कारण माहित होत.

ऑफिस मधून आल्यावर आमचा गप्पा टप्पा सेशन चालतो. तेंव्हा तिने सांगितल होत.

आज अनिताला बर नव्हत. थोडा ताप होताच. बाबांनी तिला कारने ऑफिस मध्ये सोडल. ऑफिस सुटल्यावर किंवा आवश्यकता वाटली तर कळव, घ्यायला येईन म्हणाले.

संध्याकाळी अनिताला रोजपेक्षा यायला

उशीर झाला. आधी मिटिंग्स नंतर तीनदा बुक केलेली टॅक्सी केंसल झाली. यात वेळ गेला.

घरी आल्यावर सर्व किस्सा कळला.

मी म्हंटल… अग! बाबांना बोलवायच ना घ्यायला. आधीच तुला बर नाही.

अनिता म्हणाली… Its ok आई.

अहो! एवढ काही झाल नाही हो.

मी ऑफिसमध्ये दुपारी औषध घेतल होत. मी मुद्दामच बाबाना किंवा अजयला बोलवल नाही. उगाचच संध्याकाळच्या गर्दीत त्याना ड्रायव्हिंग कराव लागल असत.

आई मी आधी अशी नव्हते. मी ठरवलेल काही झाल नाही की मला खूप त्रास व्हाचा, चिडचिड व्हायची. घर डोक्यावर घ्यायची मी. मला पण माझी चूक कळत होती. कधी कधी…

आयुष्यात अशा काही घटनां घडतात. त्याबघून आपल्यात बदल होतो. माझ पण असच झाल.

सुनिता विलियम्स आणि बेरी विलमोर आठ दिवसांसाठी स्पेस मध्ये गेले होते, पण आले मात्र 286 दिवसानंतर. म्हणजे आठ दिवसांच्या ट्रीपवर गेलेला माणूस अक्षरशः वर्षभरानंतर परत येतो. ही ट्रीप काही सामान्य, आनंदाची नव्हतीच. फ्रेश हवा नाही, जेवण नाही परिस्थिती एकदम वेगळीच… unnatural… unfavourable परिस्थितीवर त्यांचा काहीच कंट्रोल नव्हता. फक्त शांत राहण आणि वाट बघण एवढच काय ते करू शकत होते. Return flight चे option त्यांच्याकडे नव्हतेच.

ही घटना माझ्यासाठी एक *learning lesson* च होता. टॅक्सी कैंसल होणे, ऊशीरा मिळणे, interview मध्ये rejection, एखाद महत्वपूर्ण काम डिले होणे, डील कैंसल होणे, या गोष्टी मला आधी खूप डिस्टर्ब करायच्या.. तस बघीतल तर अस होण खरतर किती common आहे.. सहज शक्य असत. पण आपल्याला ते सहन होत नाही.

पेशन्स, तक्रार न करता एखादी डिफिकल्ट सिच्युएशन फेस करण, दीर्घकाळ एखादे कठीण काम चिकाटीने करत राहण. ही क्षमता, सहनशीलता, चिकाटी तेही 286 दिवस… 

Hats off to these legends for not just surviving, but making history. 

आता जेंव्हा कधी मी कधी डिफिकल्ट सिच्युएशन फेस करते, तेंव्हा मी स्वतःलाच समजावते…

Thank god… Atleast I am not stranded in space. 

आयुष्य म्हणजे roller-coaster ride. कधी तरी up-down होणारच. गुगली, बाउन्सर्स खेळावेच लागणार.

So, conclusion is

If your plans are not working out properly… Take it easy. 

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ९ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ९. ☆ प्रा.भारती जोगी ☆

झलकारी बाई 

सन १८५७… स्वातंत्र्य समर पेटलेलं… ब्रिटिश जनरल ह्यू रोज ने संधी साधून झाशी वर आक्रमण केले. राणी लक्ष्मीबाईंच्या किल्ल्याला वेढा घातला, सैनिक किल्यात शिरण्याच्या प्रयत्नात… राणी विचारात पडलीये, तात्या टोपे पराजित झाल्यामुळे, पेशव्यांकडून मिळणा-या मदतीची आशा ही मावळली होती. अशा वेळी *ती* पुढे येते… म्हणते…

” राणी साहेब, तुम्ही लहानग्या दामोदर रावांना घेऊन किल्ल्याच्या मागच्या बाजूने निघून जा. मी बघून घेईन इंग्रजांना! “

राणी लक्ष्मीबाईंना हा प्रस्ताव मंजूर नसावा. कारण त्यांना ठाऊक आहे की, ती समर यज्ञात समर्पित व्हायला निघालेली आहे. त्यांना असं सगळ्यांना संकटात सोडून जाणं रूचेना! राणी सद्गदित होऊन म्हणाली, ” झलकारी, अगं तू सावली, छाया ना माझी! मग सावली देहापासून दूर कशी गं होणार”? राणी जागची हालत नाही असं बघून ती पुन:पुन्हा झाशीच्या आणि दामोदर च्या भविष्याची ग्वाही देते, विनवते आणि राणीला निघून जायला भाग पाडते. अगदी बाजीप्रभू चा तोच बाणेदारपणा दिसला तिच्या शब्दांत… लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा जगो!  

राणी जड अंत:करणाने ती चा निरोप घेते… उराउरी भेटते… जणू… तिच्या उरातलं देभक्तीचं आणि झाशीच्या जबाबदारीचं स्फुल्लिंग ; थेट चेतवून, प्रज्वलित करणारी चेतना ते हृदयीचे ये हृदयी घालते… जणू झाशीच्या जबाबदारी चं पदच तिला बहाल करून, घोड्यावर स्वार होऊन, दामोदर ला पाठीशी बांधून निघून जाते…

कोण होती ती? जिच्या हाती झाशी सोपवून जाण्याइतका विश्वास, खात्री कमावलेली…

ती… झाशीच्या राणीच्या खांद्याला खांदा लावून लढलेली, तिच्या बरोबर सावली सारखी राहून, अगदी सर्वार्थाने तिची सावली झालेली, तिची प्रतिच्छाया, तिचंच प्रतिबिंब वाटावं, इतकी, अगदी तिचीच झलक… झलकारीबाई!!

झाशीच्या इतिहासाच्या मोठ्या पुस्तकातील एका छोट्याशा ओळीतलं, छोटंसं नाव! ऐतिहासिक दस्तावेजांच्या चळतीच्या थरांखाली दडलेलं… दबून गेलेलं… दाबलं गेलेलं नाव! पण तिच्या संपूर्ण कर्तृत्वावर दृष्टी टाकली तर लक्षात येतं ते…

तिच्या सावली चं मोठेपण! आणि आपसूकच मुखातून निघतं…

तिची मोठी सावली!!!

झलकारीबाई… बुंदेलखंड मधील भोजला गावच्या, कोळी समाजातील सदोवरसिंग आणि जमुना देवी या दांपत्याच्या घरी, २२ नोव्हेंबर १८३० या दिवशी जन्माला आलेली ही कन्या! एका निर्धन घरात, संघर्ष आणि कष्टमय जीवन असलेलं तिचं बालपण! तिच्या दुर्दैवाने त झलकारी दोन वर्षांची असताना, तिची आई तिला सोडून गेली. आईची मायेची पाखर गेली तिच्या माथ्यावरची!

पण तिच्या पित्याने तिच्या या दु:खाला तिच्या कमकुवतपणात परिणत न होऊ देता, तिची ताकद बनवलं! दु:खावेगाला प्रवेगाची दिशा दिली. तिला मुलासारखी वाढवली. तिच्या हातात बांगड्या नाही तर घोड्याचा लगाम दिला. तिला युद्ध कौशल्य शिकवून पारंगत केले. घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजी, शिकवली. याचाच परिणाम म्हणून झलकारी एक साहसी, निडर, आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी घडत गेली… घडली. तिचं बालपण म्हणजे साहसकथाच! १० वर्षांची असतांना, एकदा जंगलात नेहमीसारखीच लाकडे तोडायला गेली असतांना, एका वाघाने तिच्यावर हल्ला केला, तर हीने आपल्या कु-हाडीने त्याला ठार मारले. गावात ही वार्ता पोचली, गावक-यांनी तिला दुर्गा  देवीचा अवतार म्हणून गौरवले.

हे साहस कमी होतं म्हणून की काय… एकदा गावात आलेल्या डाकूंना ही मोठ्या हिंमतीने, एखाद्या विरांगनेसारखं, पळता भुई थोडी केलं!

यथावकाश झलकारी चा विवाह तिच्या योग्य अशाच… झाशीच्या राणीच्या सैन्यातील आणि तोफ चालविणा-या शूर वीराशी.. पूरण कोळी शी होतो. आणि झलकारी झाशीत येते. हाच तो क्षण असावा जो एक स्फुल्लिंग ठरला, एक समिधा चेतविणारा!!

बालपणी मातीचा किल्ला बनवण्यात रममाण होणारी झलकारी एक दिवस झाशीच्या किल्ल्यात प्रवेशते. राणी लक्ष्मीबाईंची दृष्टी तिच्या वर पडते आणि राणी… आश्चर्याने बघतंच रहाते… अगदी असाच प्रसंग…

उटूनि दोन्ही आरिसे | वोडविलिया सरिसे |

कोण कोणा पाहातसे | कल्पावे पां?

राणी आपलंच प्रतिबिंब, हुबेहूब डोळ्यासमोर बघून स्तंभित झाली. चौकशी केल्यावर पूरण कडून तिच्या साहसकथा, युद्ध कौशल्यात तरबेज असणं, घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी… सगळंच कळलं. राणीने झलकारी ला आपल्या दुर्गादला ची सेनापती बनवलं. भोजला गावातील दुर्गावतार सेनापती च्या वेषात अवतरणं हा निव्वळ योगायोग नसावाच! काहीतरी संकेत असावा तो विधिलिखिताचा! राणी लक्ष्मीबाई ने त्या काळात, जात पात न बघता, एक क्रांतीकारी पाऊल उचललं आणि…

गावाकडच्या चुलीतल्या ज्वाळांना, क्रांतीच्या ज्वाळांचं रूप दिलं!! जंगलातून लाकडे तोडून आणणा-या झलकारी लाच जणू राणीने चंदनाची समिधा म्हणून आपल्या जवळ ठेवून घेतली.

हीच ती सांभाळलेली समिधा झलकारीबाई!! हीनेच राणीचं प्रतिबिंब असण्याचा, राणी सारखं दिसण्याचा फायदा घेण्याचा निर्णय घेऊनच, राणीला किल्ल्यातून सुखरूप बाहेर काढले. आणि…

उभी ठाकली थेट जनरल ह्यू रोज समोर भेटीला!

सैनिकाने विचारले, ” कोण तू? “

झलकारी ने उत्तर दिले,…

मी राणी लक्ष्मीबाई!!

ऐकताच, सैनिकांनी घेरले तिला, सगळीकडे राणी पकडली गेल्याची वार्ता पसरली. झलकारी ह्यू रोज समोर उभी… त्याने विचारले, ” कोण आहेस तू? ” झलकारी ने पुन्हा तेच उत्तर दिले खड्या आवाजात… मी राणी लक्ष्मीबाई!! राणी जोपर्यंत सुखरूप सुरक्षित जागी पोहोचत नाही तोपर्यंत यांना गुंतवून ठेवायचा तिचा विचार. पण तेवढ्यात एका फितुराने ती राणी नसल्याचे सांगितले. जनरल च्या आपण फसविले गेलो हे लक्षात आले, संताप झाला खूप. कारण रणनीतीत ली चलाखी असलेला अधिकारी होता तो! पण एका स्त्रीने त्याच्या डोळ्यात जणू धूळ फेकली आणि राणी सुरक्षित जागी पोचली.

असं म्हणतात की ह्यू रोज ने तिला विचारले की, ” तुझ्या बाबतीत मी काय निर्णय घ्यावा असं तूला वाटतं? “

त्यावर झलकारी उत्तरली, ” तुम्ही हवं तर मला फाशी देऊ शकता. मला काहीच भिती नाही. कारण, जीव जायची भीती त्यांना असते, ज्यांचा जीव त्यांच्या देहात असतो. माझा जीव तर झाशीत आहे. मग मला तो जाण्याची मला भीतीच नाही ना! “

असं म्हणतात की झलकारी ला सोडून देण्यात आलं. कारण त्यांना झाशी आणि झाशीची राणी याचा कब्जा हवा होता.

झलकारी झाशी च्या दिशेने परतताना समरांगणावरील शवांत तिला आपल्या पतीचे… पूरण चे शव दिसले. त्याच्या शवाजवळ बसली, आणि वदली, “पूरण, तू माझ्या पेक्षा मोठ्या भाग्यशाली ठरलास रे! झाशी साठी माझ्या आधी जीव अर्पण केलास!… बस्स्… आवरला तिने शोक आणि जख्मी वाघिणी सारखी तुटून पडली अत्यधिक त्वेषाने!! तिच्या त्या दुर्गावताराचं वर्णन कवींनी केलयं…

“जाकर रण में ललकारी थी,

वह तो झांसी की झलकारी थी!

 झलकारी की झलक देखकर

 वो बूंदेले भी हां गये,…

 जब उतरी वे समर भूमी में,

 गोरे भी थरथर कांप गये!

 रानी झांसी को बचा गयी,

 ऐसी सन्नारी थी झलकारी!

फिर लौट के घर ना आई,

ऐसी नारी थी झलकारी!!

अशी ही झलकारी बाई! … दाखवून दिलं, सिद्ध केलं तिने की, खरी वीरता महालांत नसते तर ती रोमा-रोमात सळसळणा-या रक्तातल्या देशभक्तीच्या चैतन्यात असते. राणी सारखी दिसत होती, राणी तिच्यावर झाशी चं राज्य सोपवून गेली, पण तिला राज्य आणि राणी पदाचा मोह नाहीच झाला, तिचं खरं प्रेम होतं ते… झाशीच्या भूमीवर, मातीवर!! इस मिट्टी में मिल जांवां… हेच वेड लागलं होतं तिला!! तिच्या साठी ताज नाही तर त्याग महत्वाचा होता. ती राणीची सल्लागार, महत्वपूर्ण निर्णयांची भागीदार बनली. युद्धाच्या कठीण प्रसंगी… धैर्य आणि शौर्य यांचा योग्य समन्वय साधत ती ढाल बनली राणी लक्ष्मीबाई ची! जौहार करणा- या स्त्रियांना आत्मरक्षणासाठी लढण्याचे बळ दिले. स्वातंत्र्याचा अलख जागवण्यासाठी तिने राणीचं वाचणं महत्त्वाचे मानले.

पण झलकारीबाई चं दुर्दैव बघा… तिच्या नावाचा कुठेतरी फक्त छोटासा उल्लेख मिळतो, जो दिसून ही न दिसल्या सारखाच! नगण्य! दुर्लक्षित! उपेक्षित!! जिचं साहस बघून जनरल ह्यू रोज नी सुद्धा तसं पाहिलं तर… गौरवोद्गार च काढले होते की,

 ” भारतातील १% महिला जरी हिच्या सारख्या बनल्या तर इंग्रजांना भारत सोडून जाव लागेल.! “

असं असूनही आपल्याला मात्र या समिधेचं समर्पण दिसलं नाही.

आता- आता कुठे तिच्या समरपणाचं तेज, त्याची आच, सामाजिक धग, जाणवल्या मुळे असेल… पण २००१ मध्ये सरकारने पोस्टाचे एक तिकीट झलकारीबाई च्या नावाने काढलं.

अशी ही झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई ची प्रतिछाया, झाशीची सावली झाली, तिची कहाणी एक प्रेरणा आहे! एक चैतन्य शलाका आहे जी समिधा बनून समर्पित झाली.

 झलकारीबाई एक ज्वाला होती, धगधगती!!

नाही मिळाली तिला जागा, ऐतिहासिक दस्तऐवजांत, कुठल्या पाठ्यपुस्तकात… पण ती आजही लोकगीते, लोककथा आणि बुंदेलखंड च्या लोक हृदयात अढळ पदावर विराजमान झालेली आहे हे ही नसे थोडके!!!

– लेख क्र. ९ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वप्नं आणि जिद्द ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वप्नं आणि जिद्द ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

ईश्वरी पांडे 

६ एप्रिल २०२६, पहाटे ४ वाजताचा सुमार, श्रीलंकेतील तलईमन्नारजवळचा समुद्र. आजूबाजूच्या गावातले बहुतेक सगळेजण गाढ झोपेत होते. पण नागपूरची १७ वर्षांची ईश्वरी पांडे पूर्ण तयारीनिशी तिथल्या उरमलाई पॉइंटवर उभी होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पाक सामुद्रधुनीत (Palke Strait) उतरली.

सभोवताली फेसाळणाऱ्या लाटा तिला दिसत नव्हत्या, त्या तिला फक्त जाणवत होत्या. कारण ती जन्मापासून अंध आहे.

पुढील ११ तास आणि १५ मिनिटे ईश्वरीने जगातील सर्वात किचकट, क्लिष्ट आणि बेभरवशाच्या समुद्री पट्ट्यांपैकी एकामधून पोहत प्रवास केला.

समुद्री प्रवाह तिला मार्गापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करत होते, जेलीफिश तिच्या शरीराला स्पर्श करत होते, मुसळधार पाऊस कोसळत होता. पण ती एकाग्रतेने पोहत होती. सोबतच्या बोटीमधून तिचे प्रशिक्षक संजय बटवे लाऊडस्पीकरवरून तिला सतत सूचना देत होते — “डावीकडे, थोडं डावीकडे… स्थिर राहा… तू छान करते आहेस! ”

संजयसरांशिवाय भावी राजगीरे, ईशांत पांडे, संदीप वैद्य, निरव आणि डॉ. अभय राजगीरे हे तिचे सहकारी, कधी पोहत तर कधी होडीतून, तिच्या दोन्ही बाजूंनी तिला साथ देत होते.

दुपारी ३ च्या सुमारास भारतातील धनुषकोडीचा किनारा दिसू लागला. आणि ३:१५ च्या सुमारास जेव्हा तिचे पाय अरिचलमुनईच्या (धनुषकोडी) वाळूत टेकले, तेव्हा ईश्वरीने २९ किलोमीटर अंतर पार करून इतिहास घडवला होता.

पाक सामुद्रधुनी पार करणारी ती जगातील पहिली पूर्णपणे अंध व्यक्ती ठरली.

नागपूरमध्ये तिचे आई-वडील कमलेश आणि अरुणा यांना आपल्या मुलीचा हट्टी आणि जिद्दी स्वभाव चांगलाच माहिती होता. लहानपणी ती पोहायला शिकली, पोहणे सोपे होते म्हणून नव्हे, तर अंधत्वामुळे आपल्याला मर्यादा याव्यात हे तिला मुळी मान्यच नव्हते म्हणून.

२०२४ साली तिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हा १७ किलोमीटरचा समुद्री प्रवास पूर्ण केला होता. पण पाक सामुद्रधुनी वेगळीच होती — शार्क, डॉल्फिन्स आणि सतत बदलणारे समुद्री प्रवाह, अनेक दृष्टी असलेल्या पोहणाऱ्यांनाही यांनी नमविले आहे.

धनुषकोडीहून ती जेव्हा नागपूरला परतली, तेव्हा फिटनेसप्रेमी, ज्येष्ठ जलतरणपटू, नातेवाईक आणि उत्साही नागापूरकर नागपूर रेल्वे स्थानकावर जमले होते. ईश्वरीचे जल्लोषात स्वागत झालं, तिची खुल्या जीपमधून मिरवणूक निघाली. मेडिकल कॉलेज चौकात, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे, रंग आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तिचे स्वागत केले. अंतिम टप्प्यात अश्वारूढ होऊन तिने मानवंदना स्वीकारली.

तिला गर्दी दिसत नव्हती. पण ती आवाज ओळखत होती, त्यांची नावे घेत होती.

आता तिचे नाव विक्रमांच्या यादीत नोंदले गेले आहे. पण ईश्वरी इथे थांबणारी नाही. तिचे लक्ष्य आता आंतरराष्ट्रीय पॅरा (दिव्यांग) जलतरण स्पर्धांकडे आहे.

तिनं दाखवून दिलंय, स्वप्नं नुसती डोळ्यांनी बघायची नसतात, तर ती जिद्दीने साध्य करायची असतात.

ईश्वरीचे अभिनंदन आणि तिला शुभेच्छा!

 

माहिती संग्राहक / लेखक : श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आम्ही मध्यमवर्गीय होतो…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आम्ही मध्यमवर्गीय होतो…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी ‘मध्यमवर्गीय’ ही जमात अस्तित्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतःचा असा ‘ब्रँड’ होता.

घरात एक कमावता पुरुष, दोन-तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला, अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंडं ५-६, हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही. म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती… एकहाती सत्ता! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं… पक्कं गणित..! त्यावरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत, “पोटाला खा हवं तेवढं, पण नासधूस नको, ” असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची, “खाऊन माजावं, पण टाकून माजू नये. “

कढी, पातळ भाजी, कालवण करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस वगैरे असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या… अशी साधी साधी समीकरणं असायची. घरातली पुरुषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खाऊन घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी-भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा ‘कुचकरा’ किंवा ‘फोडणीचा भात’. जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे ‘टेन्शन’चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. १००-१५० रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज २ वर्ष जायचा.

पुस्तकांचा जरा ‘जुगाड’ असायचा. म्हणजे समजा ‘अ’ ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर ‘ब’ ला ७०% किमतीत विकायचा.. अन् मग ‘ब’ तीच पुस्तकं ‘क’ ला ४०% मधे विकायचपुस्तकाच्या या ३ वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल, अहिल्याबाई अशा ‘दूरदृष्टी’च्या व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.

बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाजं फिरत असायची. पण शाळेत असताना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवॉटर अशी Destinations मला नकाशातसुद्धा कधी भेटली नाहीत.

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा ‘अ’ करून मोकळा व्हायचा… म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त चित्रकलेतच “स्कोप” उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा…

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत. मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं, त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ‘इगो बिगो’ कोणाचा आड येत नव्हता. स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा. त्यातही लहान बाळाचा स्वेटर, कपडे, दुपटे, झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला आठवायचं नाही.

पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना “यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू.. ” आणि मुलांना, “तुला रिक्षा घेवून देवू चालवायला” अशी ‘जागतिक’ धमकी मिळायची..

SSC नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं… Proposals.. हे आजच्या काळातले ‘Highly Personal Issues’ त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात Space. बाकी सगळा ‘लेकुरवाळा’ कारभार!!

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा ‘बाबा’ लोकांचा प्रांत होता. प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी RD, LIC काढलेल्याच असायच्या… आणि त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा ‘एजंट’ त्या काळी उदयाला आलेला नव्हता आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा… Share market म्हणजे जुगार.. हा ‘समज’ अगदी पक्का होता..

‘फॅमिली डॉक्टर’ हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण ‘नीतिमत्ता’ वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया, पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा ‘व्यावहारिक’ पवित्रा असायचा.

जसा ‘फॅमिली डॉक्टर’ तशीच एक फॅमिली ‘बोहारीण’ पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही ‘बोहारिण’ एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी ‘तहा’ ला सुरवात व्हायची.. तिची गाळणी खपवायची घाई.. तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा! खूप घासाघीस करून ‘Deal’ चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या कार्यक्रमात २-३ तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या. शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. मध्यमवर्गीय ही काही ‘परिस्थिती’ नाहीये, ती ‘वृत्ती’ आहे… साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा ‘कणा’.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित ‘कर’ भरणारे, वाहतुकीचे काटेकोर ‘नियम’ पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मतदान’ करणारे. असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..

अचानक १९९०-९१ मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला १०-१२ वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच, ‘ वादळ ‘ झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही… अचानक ‘प्रोफेशनल’ झालो. माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या. Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या ‘गोंडस’ नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ पैकेजेस मध्ये गुंडाळला गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणासुद्धा.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास : महात्म्य!… २ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

अधिक मास : महात्म्य!… २ श्री नागेश शेवाळकर

चित्रबाहू राजाची कहाणी!

महालक्ष्मी विष्णुला म्हणाली, “नाथ, आपण पुरुषोत्तम मासामध्ये दीप प्रज्वलनाची खूप छान माहिती सांगत आहात. आपली वाणी रसाळ आहे त्यामुळे ऐकावेसे वाटते… “

“देवी, तुझी ज्ञानलालसा पाहून मी तुला कथा सांगतो…

सौभाग्य नावाचे एक नगर होते. त्या नगरीचा चित्रबाहू नावाचा राजा होता. तो खूप शूर होता. अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. तो कृष्णाची भक्ती करत असे. दानधर्म करणे ही त्याची आवड होती. एकदा अगस्ती ऋषी त्याच्याकडे आले. चित्रबाहूला खूप आनंद झाला. राजाने ऋषी अगस्ती यांचे स्वागत केले. त्यांची पूजा करताना स्तुतीगान केले. राजा म्हणाला, “ऋषीवर, ‌आपण आलात, मी धन्य झालो. मी माझे राज्य आपल्या चरणी अर्पण करतो. “

“राजा, तुझे राज्य मला नको. तुला भेटून मलाही समाधान वाटले… ” ऋषी बोलत असताना राजाची राणी चंद्रकला तिथे आली. तिने ऋषीला नमस्कार केला. चित्रबाहू राजा म्हणाला,

“ऋषीवर, मला कधीकधी असा प्रश्न पडतो की, माझे असे कोणते पुण्याचे काम आहे की, मला राजपद मिळाले. मोठे वैभव प्राप्त झाले. चंद्रकलेसारखी गुणवान पत्नी मिळाली. “

अगस्ती ऋषी काही क्षण डोळे लावून बसले. थोड्या वेळाने डोळे उघडून‌ ते म्हणाले, “मी डोळे लावून‌ बसलो होते तेव्हा मला तुझ्या पूर्व जन्माची हकिकत समजली. चमत्कार नावाचे एक नगर होते. त्या शहरात मणिग्रीव नावाचा एक मानव राहत होता. मणिग्रीव म्हणजे तू! या जन्मात जसा तू सदाचारी आहेस तसा त्या जन्मात नव्हता. तू अत्यंत पापी होता. तुझ्या पत्नीचे नाव सुंदरी होती. सुंदरी म्हणजेच चंद्रकला! पापी पतीसोबत सुंदरी पत्नीधर्म पाळत त्याच्यासोबत राहत होती. मणिग्रीवाच्या वाईट कामाला, त्रासाला त्याच्या गावातील लोक कंटाळले होते. गावकऱ्यांनी मणिग्रीवाला गावातून‌ हाकलून दिले. बृहद्बल त्या राज्याचा राजा होता. त्याने त्याची सारी संपत्ती जप्त केली. त्याला पत्नीसह जंगलात हाकलून दिले.

अरण्यात राहत असलेले मणिग्रीव आणि त्याची पत्नी प्राण्यांची शिकार करून‌ भूक भागवत असत. त्या दोघांना त्या अरण्यात राहताना बराच काळ झाला. एकेदिवशी त्या अरण्यातून एक तपस्वी जात होता. त्याचे नाव उग्रदेव होते. चालताना थकल्यामुळे उग्रदेवाला चक्कर आली. तो जमिनीवर कोसळला. मणिग्रीव आणि त्याच्या पत्नीने त्याला पाहिले. मणिग्रीवाने त्याच्यावर उपचार केले. उग्रदेव शुद्धिवर येताच त्याला मणिग्रीवाने आपल्या घरी आणले. त्याला फलाहार दिला. मणिग्रीवाने त्याची विचारपूस केली.

“मी यात्रेकरू आहे. चालताना माझा रस्ता चुकला. या अरण्यात फिरत असताना खूप श्रम झाल्यामुळे तसेच खूप भूक लागल्यामुळे गरगरल्यासारखे झाले. मी खाली कोसळलो. बेशुद्ध झालो. तुम्ही मला जीवदान दिले. तुम्ही दोघे या अरण्यात का राहता? तुम्ही कोणत्या नगरीचे आहात. मला तुमची काही मदत करता आली तर आनंद होईल. ” उग्रदेवाने म्हणाला. मणिग्रीव त्याची सारी कहाणी उग्रदेवाला ऐकवून म्हणाला,

“मी अनेक दुष्कृते केली आहेत. त्याची शिक्षा म्हणून मी या अरण्यात राहत आहे. माझ्या या साऱ्या प्रवासात माझी पत्नी माझ्यासोबत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला अशी शिक्षा भोगावी लागत आहे. सध्या आम्ही फार दुःख भोगत आहोत. यातून बाहेर पडण्याचा नि सुख, ‌शांती, सदाचाराने राहता येईल असा मार्ग मला सांगावा. “

“तू माझी सेवा केलीस. माझा जीव वाचवलास यामागे निश्चितच काहीतरी ईश्वरी संकेत आहे. तुम्हा दोघांचा भाग्योदय मला समोर दिसत आहे. काही दिवसांतच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. या महिन्याचे महत्त्व अलौकिक आहे. पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करावी. कृष्णमूर्तीसमोर संपूर्ण महिना नंदादीप लावावा. देवाला नैवेद्य दाखवावा. हे व्रत अत्यंत लाभदायक आहे. हे व्रत केल्याने तुमचा हा अरण्यवास संपुष्टात येईल असा मला विश्वास आहे. ” असे सांगून उग्रदेव पुढील यात्रा करण्यासाठी निघून गेला.

लवकरच पुरुषोत्तम मास आला. मणिग्रीव आणि सुंदरीने उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची मनोभावे, यथोचित पूजा केली. त्याचे फळ त्याला मिळाले. मणिग्रीवाच्या स्वभावातील उग्रता नष्ट झाली. मनाला अभूतपूर्व शांती मिळाली. दुष्कर्म करण्याची वृत्ती नाहीशी झाली…

वरील सारा वृत्तांत कथन करून अगस्ती ऋषी म्हणाले, “चित्रबाहू, असा आहे तुझा मागचा जन्म. उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे तू पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीकृष्णाची मनोभावे सेवा करताना संपूर्ण महिना दीप लावला. ते पुण्य गाठीशी होते म्हणून या जन्मात हे सारे वैभव‌ तुला प्राप्त झाले. ” असे सांगून अगस्ती ऋषिंनी चित्रबाहू राजाचा निरोप घेतला…

“नाथ, आपण अत्यंत सोप्या भाषेत चित्रबाहू राजाची कहाणी मला ऐकवली. मला खूप समाधान मिळाले… ” लक्ष्मीदेवी अत्यंत प्रसन्नतेने म्हणाली.

००००

फलदायी मौनव्रत!

श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णू बोलत असताना लक्ष्मी म्हणाली, “भगवान, आपण सांगितलेल्या कथा ऐकून पुरुषोत्तम मासाबद्दल म्हणजेच त्या मासाच्या कथा ऐकण्याची उत्कट इच्छा होत आहे. एखादी गोष्ट सांगाल‌ का?”

“देवी लक्ष्मी, आपली इच्छा जाणून मी मौनव्रताची माहिती सांगतो… “

“मौनव्रत? म्हणजे चक्क बोलायचेच नाही… “

“होय! तेही संपूर्ण पुरुषोत्तम मास मौन‌ पाळायचे… “

“काय? महिनाभर बोलायचे नाही? कसं शक्य आहे? तेही पृथ्वीवरील मानवाला?”

“का शक्य नाही? भक्ती करणे साधी गोष्ट नाही. कठीण तपस्या केली तर त्याचे फळही तसेच मिळते. “

“देवा, मला मौनव्रताची माहिती द्यावी. “

“देवी, व्रताची माहिती नक्की देईन‌ पण आपण मौनव्रत धारण करू नका… ” असे म्हणत श्रीविष्णू हसले. सोबत लक्ष्मीही हसली.

“ऐका, आता. मौनव्रत म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये दररोज एक वेळ जेवण करायचे आणि जेवण होईपर्यंत बोलायचे नाही… “

“देवा, ‌आपण पण असे आहात ना!‌ अहो, महिनाभर मौन‌ ही कल्पनाच अंगावर भीतीचे शहारे आणणारी आहे. फक्त जेवताना बोलायचे नाही हे व्रत त्यामानाने सोपे वाटत असले तरीही ते तितके सोपे नाही. भगवान, मला सांगा, हे व्रत कुणी केले आहे का?”

“हे व्रत मुनीवरांनी केले आहे. “

“काय? देवर्षी नारदांनी‌ हे व्रत केले आहे? कधी, का, कशासाठी?”

“सांगतो. पूर्वीच्या जन्मात नारद मुनी दासी पुत्र होते. पुरुषोत्तम मासात हे मौनव्रत धारण केल्याने पुण्य मिळते म्हणून त्या दासी पुत्राने ते व्रत मनोभावे केले. हे व्रत केल्याने त्याला साधुंचा सहवास लाभला. साधुंच्या सोबत कुरुक्षेत्र येथे त्याने अधिक मासाचे औचित्य साधून तीन दिवस मौनव्रत पाळले. त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला अनेक विद्यांची शिकवण दिली. आपल्या शिष्याला त्यांनी मानसपुत्र मानले. असा आहे मौनव्रताचा महिमा तोही अधिकमासातील!”

“महाविष्णू, मुनीवराची ही माहिती मला नव्हती. आपण ती सांगितली. मी धन्य झाले. “

“लक्ष्मीदेवी, प्रत्यक्ष इंद्रदेवाला या व्रताचा फायदा झाला हे तुला माहीत आहे का?”

“काय सांगता? इंद्रदेवाने मौनव्रत पाळले पण का? अशी कोणती वेळ इंद्रावर आली की, त्यांनी मौनव्रत धारण केले. “

“सांगतो ऐक. पूर्वी अवंतीनगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव वेदशर्मा! तो अत्यंत ज्ञानी, योगी होता. वेदशर्मा वृद्ध झाला असताना अधिकमास आला. तेव्हा वेदशर्माने उपवास करण्याचा विचार केला. परंतु तो शरीराने थकला होता. इच्छा प्रबळ होती परंतु शरीर साथ देईल का नाही ही शंका होती. तो विचारात असताना चमत्कार घडला. एका रात्री त्याला स्वप्न पडले. ‌‌स्वप्नात एक दिव्य पुरूष अर्थात देव आले. ते म्हणाले, “वेदशर्मा, तू तुझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उपवासाचे व्रत निश्चितच करू शकशील. तू मौनव्रत अवश्य कर. “

ते स्वप्न म्हणजे ईश्वरी संकेत मानून वेदशर्माने मौनव्रत धारण केले. ईश्वरी शक्ती पाठीशी असल्याने त्याने ते व्रत पूर्णत्वास नेले. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले. त्याला आशीर्वाद देताना वरदानही दिले. त्यामुळे वेदशर्माने परोपकाराची अनेक कामे केली. त्याचे भाग्य फळाला आले. त्याला श्रीविष्णुने विमान पाठवून वैकुंठात नेले. वैकुंठात जात असताना प्रत्यक्ष इंद्राने त्याला थांबवले. इंद्र म्हणाला, “वेदशर्मा, तू पुण्यवान आहेस. सध्या माझे वृत्रासुरासोबत युद्ध सुरू आहे. तू पुरुषोत्तम मासामध्ये मौनव्रत पाळले होते. तुला त्याचे फळ मिळाले. माझी अशी इच्छा आहे की, तुला जे फळ प्राप्त झाले आहे, त्यापैकी फक्त एका दिवसाचे पुण्य मला द्यावे. त्यामुळे मी वृत्रासुरासोबतचे युद्ध खातरीने जिंकू शकेल. ” इंद्राची इच्छा परोपकारी वृत्ती असलेल्या वेदशर्माने तत्काळ पूर्ण केली. तो वैकुंठात निघून गेला. इंद्रदेवाने वेदशर्माकडून प्राप्त झालेल्या फळामुळे वृत्रासुराचा युद्धात पराभव केला…

“देवी लक्ष्मी, असा आहे, अधिक मासातील मौनव्रताचा फायदा किंवा फळ!”

“भगवान, खरे आहे. मौनव्रत हे तसे कठीण वाटत असले तरीही त्याचे फळ मात्र अलौकिक आहे. ” लक्ष्मी म्हणाली.

००००

अधिक मासातील पर्वकाळ!

भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या संवादातून भक्तांना‌ अधिक मासासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळत होती. लक्ष्मीने विचारले, “माधवा, मला एका गोष्टीची उत्सुकता लागली आहे. ती म्हणजे, अधिक मासात कोणते पर्वकाळ येतात? त्याची वैशिष्ट्ये नि त्यापासून भक्तांना होणारे लाभ याबाबत माहिती सांगावी. “

“अवश्य!‌ देवी, मला माहिती आहे, हे प्रश्न तू स्वतःसाठी नव्हेतर भक्तांच्या ज्ञानासाठी, उत्कर्षासाठी विचारत आहेस. पुरुषोत्तम मासात व्यतिपात, पोर्णिमा, वैधृती, द्वादशी तसेच अमावस्या हे पाच पर्व येतात. व्यतिपात या पर्व काळात उपासनेमुळे यमधर्म समाधानी होतो. व्यतिपाताच्या दिवशी सुवर्ण दानाचे महत्त्व आहे, तप करून आणि तेरा फळे दान केल्यास पुण्यफळ मिळते. जे भक्त पोर्णिमेच्या दिवशी धार्मिक विधी करतात तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो. ज्या दिवशी वैधृती असते त्यादिवशी स्नान, होमहवन आणि दान करतो त्या भक्ताला इच्छित ते सारे मिळते. पुरुषोत्तम मासातील द्वादशीचा योग साधून खुद्द पुरुषोत्तम प्रसन्न होतो. अमावस्या हे अधिक मासातील शेवटचे पर्व! यादिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून यथाविधी, यथाशक्ती दानधर्म, अन्नदान केल्यास आपले पूर्वज आनंदी होतात. “

“हरीहर, पाच पर्वांची माहिती नि चार पर्वांचे महत्त्व खूप छान, सोप्या भाषेत सांगितले. त्रिविक्रमा, आता द्वादशी ह्या पर्वाचेही महत्त्व सांगावे. “

“रमादेवी, आपण किती एकरुप होऊन ऐकत आहात हे या प्रश्नावरून लक्षात येते. आपली जिज्ञासू वृत्ती खरेच वाखाणण्याजोगी आहे. ऐक. अधिक मासातील एकादशीला उपवास करावा. द्वादशीचे महत्त्व अपरंपार आहे. कुण्या भक्ताला अनेक तीर्थयात्रांचे पुण्य घरबसल्या मिळवायचे असेल तर त्याने आवळीच्या झाडाजवळ जावे. त्या झाडाच्या बुंध्याशी (अर्थात जे झाड नैसर्गिकरित्या नष्ट झालेले असते. परंतु जमिनीवर खोडाचा भाग शिल्लक राहतो) केलेले पिंडदान थेट आपल्या पूर्वजांना मिळते. तसेच ब्राह्मणाला अन्नदान करावे. शक्य असेल त्याने पुढील दाने अवश्य करावीत ती म्हणजे भूमीदान, वस्रदान, गोमाता दान करावे. तुप मिसळून‌ केलेले अन्नदान करावे. हे दान खूप फलदायी आहे. विष्णुप्रिये,

तुझी ज्ञानलालसा पाहून तुला दानाची अधिक माहिती देतो. व्यतिपात, द्वादशी आणि पोर्णिमा या तीनही दिवशी किंवा कोणत्याही एकादिवशी तुपामध्ये तेहतीस अनारसे तळावेत. त्यावर स्वच्छ कापड झाकावे. त्याची पूजा करावी. भोजन दक्षिणेसह ते ब्राम्हणास दान करावे. म्हणजे भरपूर पुण्य मिळते. असा आहे अधिक मासातील पर्वकाळाचा महिमा!”

” हे पद्मनाभा, खरेच अधिक मासातील पर्वकाळाची माहिती आपण खूप छान सांगितली आहे. श्रीहरी!”

 ००००

पुरुषोत्तम मास: स्नान महात्म्य!

पुरुषोत्तम मासाच्या कथा तन्मयतेने ऐकणाऱ्या लक्ष्मीदेवीने पतीला विचारले, “हृषिकेशा, आपण अधिक मासाची भरपूर माहिती दिली आहे. आता फक्त एकच सांगावे, या मासात स्नानाचे काही महत्त्व आहे का?”

“देवी, ‌अगदी योग्य विचारलेस, त्यासंदर्भातील तुला एक कथा सांगतो. त्या कथेतून तुला स्नानाचे महत्त्व समजून येईल. ऐक. शिवपुरी नावाचे एक नगर होते. हे नगर शंकराला अतिशय प्रिय होते. गोकर्ण पर्वताच्या सान्निध्यात हे नगर वसलेले होते. नगरातील लोक अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. पूजा, भजन, वेदमंत्र, प्रवचन, कीर्तन यात रमणारे नागरिक सतत धर्मकार्ये करत. अशा या पावन भूमीत विप्रदास नावाचा मनुष्य राहत होता. सोबत त्याची पत्नी होती. दोघेही सत्शील, धर्मपरायण होते. धार्मिक विधी ते आवडीने करत. गोकर्णाच्या पायथ्याशी गोकर्णी नावाची नदी होती. तिथेच एक शिवलिंग होते. सारणेश्वर या नावाने ते शिवलिंग प्रसिद्ध होते. गोकर्णी नदीत स्नानाचे अपरंपार महत्त्व होते. अधिक मासाचे औचित्य साधून विप्रदासाने त्याच्या पत्नीसह संपूर्ण महिना नदीत स्नान केले. महिन्याच्या शेवटी केलेल्या कार्याचे उद्यापन केले. ब्राह्मणांना भोजन-दक्षिणा देऊन दोघेही मोठ्या आनंदाने घरी निघाले. थोडे चालून जाताच शेकडो प्रेतात्मे अचानक त्यांच्यासमोर आले. दिसताक्षणी कुणीही घाबरेल असेच त्यांचे राहणीमान होते. परंतु विप्रदास घाबरला नाही. तो निर्भीडपणे त्या प्रेतात्म्यांच्या समोर उभा राहिला. त्या प्रेतात्म्यांनीही विप्रदासाकडे पाहिले. त्याचा परिणाम असा झाला की, त्या प्रेतात्म्यांची क्रुरशक्ती नष्ट झाली. अनेक प्रेतात्मे शांत झाले परंतु बरेचसे प्रेतात्मे क्रुर दिसत होते. त्यांच्याकडे पाहताच विप्रदासाची पत्नी खूप घाबरली. ती दूर जाऊन लपली. विप्रदासाने प्रेतात्म्यांना विचारले,

“आपल्या सर्वांची अशी दुर्गती का झाली?” त्यावर अनेकांनी त्यांनी पूर्वजन्मात केलेल्या पापांची माहिती दिली. त्यांची कहाणी ऐकून विप्रदास त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. त्याने अधिक मासात गोकर्णी नदीत केलेल्या स्नानापैकी सात दिवसांच्या स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्यांना दिले. तत्काळ चमत्कार घडला. त्या सर्व प्रेतात्म्यांना पूर्वीचे शरीर प्राप्त झाले. ते स्वर्गात गमन करते झाले. ” असे सांगून भगवान विष्णू थांबले. लक्ष्मीदेवी म्हणाली,

“हे संकर्षणा, पुरुषोत्तमा, आपण पुरुषोत्तम मासाची सर्वंकष महत्त्व खूप उत्कृष्टपणे सांगितले आहे. आपण सांगितलेला महिमा ऐकून भक्तगण मोठ्या भक्तिभावाने अधिक मासाचे व्रत, पूजा करतील हे नक्की!

 जय श्रीकृष्ण! जय भगवान विष्णू!!

अधिकमास महात्म्य समाप्त!

००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आजी…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आजी…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नमस्कार, मी आमच्या भिक मागणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर रोज बसतो, उठतो बसतो जेवतो खातो. त्यांचं काही बीनसलं तर त्या मला शिव्या, (प्रेमाच्या.. एक आई आपल्या मुलाला बोलेल तसं) देतात.. मी चिडलो तर मग मी पण काहीतरी त्यांना बोलतो.. मग त्या रुसून बसतात.. मग मी त्यांना ‘म्हातारे’ म्हणत, लाडीगोडी लावून चिडवत मनवतो.

ती तरी राग किती वेळ मनात ठेवणार..? गालावरून हात फिरवून ती गालाचा मुका घेते.. डोक्यावरून हात फिरवते… हात हातात घेते.. मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून जातो, तिचाही आणि माझाही.. मग तिच्याकडे साठलेला खाऊ ती मला देते..!

हे मी रोजच गणित सांगितलं. असं रोज अर्धा पोतं मला खायला मिळतं.. (त्यासाठी रोज एक रिकामी पिशवी मी घेऊन जातो) दुसऱ्या दिवशी मी ते गरजूंना वाटून टाकतो पण त्यातला एखादा घास प्रसाद म्हणून नक्की खातो…!

आत्ता वरच्या आजीचा फोटो पाठवीत आहे, ती आजी घरात राहते, घरात राहते म्हणजे फक्त शरीराने. सुनेला आजी (सासू) अजिबात आवडत नाही, म्हणून ती तिला दिवसभरातून कोणतेही जेवण किंवा नाश्ता देत नाही. बायकोचा रोष नको म्हणून मुलगा तिला कोणत्याही खर्चाला पैसे देत नाही. या आजीनं जगायचं कसं…? म्हणून ती एका परिसरात भीक मागायला येते. (राहायला घर आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंडं आहेत, परंतु जपत नाहीत, हिच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी मुलाने आणि सुनेने स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत, हिला मात्र जगण्यासाठी भिक मागावी लागते.)

तर… या आजीची आणि माझी काही कारणावरून, या सोमवारी म्हणजे 18 मे ला घनघोर लढाई झाली.. अर्थातच माझा पराभव झाला, हे सांगणे नकोच…! पराभूत योद्धाप्रमाणे मी मान खाली घालून निघालो, “बचेंगे तो और भी लढेंगे”.. अशी शाळेतल्या धड्यात वाचलेली वाक्य मनात घोळवत मी निघालो. तेवढ्यात ही आजी पाठीमागून आली, मी असेपर्यंत जेवढी काही भीक म्हणून अन्न मिळालं असेल ती ते पदराची ओटी करून घेऊन माझ्याकडे येत होती.

आजीचं वय असेल 70 – 75 वर्ष.. जे काही भिकेत मिळालं असेल ते ती माझ्या बॅगेत भरत होती गुपचूप. तिने या वस्तू बॅगेत भरेपर्यंत मी साळसुदाप्रमाणे चूप राहिलो. तिने या सर्व वस्तू भरल्यानंतर मी तिला खोट्या खोट्या रागाने म्हणालो, “आजपासून मी तुझं काहीही खाणार नाही… ”

ती म्हणाली, “माझ्या हातचं तर माझा मुलगा आणि सून सुद्धा खात नाही.. तू तर लांबचा… तू कसा खाशील…?” असं म्हणून ती तोंड पाडून निघाली…!

मला वाईट वाटलं. पाठमोऱ्या जाणाऱ्या आजीचा पदर मी ओढला आणि म्हणालो “मी तुला खरच लांबचा वाटतो…???”

“न्हाय रं बाळा, तूच तर माझा मुलगा हायस.. असं म्हणत तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून बोटं कडाकडा मोडली. युद्ध तिथंच संपलं…

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “म्हातारे, सगळंच जर मला दिलंस तर तू खाशील काय? तुझी सून आणि मुलगा तर तुला खायला काहीच देत नाहीत… ”

ती हसत परंतु रडवेला चेहरा करत म्हणाली, “बाळा माझं पोट केवढं? माझ्या पोटापुरतं मी माझ्यापुरतं काढून घेतलं आणि बाकी सर्व तुला देतेय… पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा, खा माज्या सोन्या…!!!”

तिच्या या वाक्यावर मला खरोखर रडू कोसळलं. ती मला खरोखर भिक्षेकरी समजत होती, याहून अभीची जीत कोणती असेल…??? त्यांच्यातलाच एक आहे हे मी समजतो, ते वेगळं… परंतु त्यांच्यातलाच मी एक आहे हे ते सुद्धा समजतात यात खूप फरक आहे..

स्वतःला लागेल तेव्हढंच ठेवून बाकी सर्व तिने मला दिलं होतं… काय म्हणू या दातृत्वाला..?? एरव्ही शे 200 किलो डोक्यावर, अंगावर, खांद्यावर घेऊन नाचत फिरत असतो मी.. पण आजीने दिलेला खाऊ मात्र मला उचलता येईना. तीच्या या दातृत्वामुळे बॅग जड झाली होती.

बॅग उचलता उचलता ती म्हणाली, “तू हे माझ्यासमोर खा… ”

मग तिने दिलेल्या गोष्टी मी तिच्या समोरच खाल्ल्या. ती भरून पावली.. देवीने आज प्रत्यक्ष हातात प्रसाद दिला म्हणून मी सुद्धा भरून पावलो..

मला नेहमी असं वाटतं, देव, देवी, अल्ला, ईश्वर, येशु हे आता मंदिर, मस्जिद, चर्च, , गुरुद्वारा मध्ये राहत नाहीत, ते वेषांतर करून बाहेर पडले आहेत, माणूस, माणूसच आहे का हे पाहायला..? हि आजी तीच देवी तर नसेल…? वेषांतर केलेली…? मी कोण आहे हे पाहायला आलेली…? माहित नाही…

आजी समोर खाल्लेला एक घास! आता माझी बॅग कापसासारखी हलकी झाली. कशी कोण जाणे? मी ती हलकी बॅग खांद्यावर घेतली. तिने दिलेला प्रसाद माझ्या तोंडी होता. आजीही गालातल्या गालात हसत होती.

खांद्यावरची बॅग इतकी हलकी कशी झाली याचा विचार करत मी पुढे निघालो. सहज मागं वळून पाहिलं. सुरकुतलेल्या चेहऱ्यातून आजी अजूनही हसतच होती.

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1