☆ “गृहीत धरलं जाण्याचा त्रास जास्त होतो…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
संध्याकाळची वेळ, सविताच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ. काय करावं हे सुचत नव्हतं. घरातल्या घरात येरझारा चालू असताना समोर डाळिंब दिसल्यावर सवीताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकाग्र चित्तानं डाळिंब सोलणं हा तिचा आवडता उद्योग. रोजच्या पेक्षा हटके गोष्ट केल्यानं मन शांत होतं हा आजवरचा अनुभव. डाळिंबाची सालं काढून एकेक दाणा साफ करत मोकळा करून भांड्यात ठेवयाचा आणि आख्ख सोलून झाल्यानंतर मगच खायचं. हा ठरलेला कार्यक्रम. थोडं कंटाळवाणं, वेळखाऊ काम पण सविताला छान वाटायचं.
एकाग्र होऊन डाळिंब सोलताना सविताच्या मनातली अस्वस्थता कमी झाली. डोकं शांत झालं.
तितक्यात मोबाईलवर बोलत मुलगी आली आणि तिनं थेट भांड्यात हात घालून डाळिंबाच्या दाण्यांचा बकाणा भरला आणि मूठभर दाणे घेऊन खोलीत गेली. काही वेळानं चिरंजीव आले त्यानीसुद्धा तसंच केलं. सविता मोठ्यानं ओरडली पण दोघांनी साफ दुर्लक्ष केलं. सविताच्या ओरडण्याचा काडीचाही फरक पडला नाही. नंतर ऑफिसवरुन आलेल्या नवरोबांनी मुलांचा कित्ता गिरवला. बघता बघता डाळिंब संपलं. सविता प्रचंड संतापली. रिकामं भांड पाहून आलेला हुंदका कसाबसा आवरला. खूप वाईट वाटलं. डोळ्यात पाणी आलं. घरात आपली गरज फक्त कामापूरती… काही किंमतच नाही या भावनेनं दुखावलेल्या सवितानं रिकामं भांडं जोरात फेकलं. आवाज ऐकून रूममधून मुलं आणि बेडरूममधून नवरा हॉलमध्ये धावत आले. सवीताचा आवेश पाहून “काय झालं” विचारायची हिम्मत कोणीच केली नाही उलट हॉलभर पसरलेल्या डाळिंबांच्या साली मुलीनं निमूटपणे गोळा केल्या. मुलानं भांडं उचललं आणि साफ करून शेल्फमध्ये ठेवलं. झाडू घेऊन साफसफाई सुरू केली आणि नवऱ्यानं ताबडतोब दुसरं डाळिंब सोलायला घेतलं.
—
डाळिंब फक्त एक निमित्त. सविताला खाण्यासाठी आहे की नाही याची जाणीवही कोणाला झाली नाही आणि कोणी तिचा विचारही केला नाही. नेमकं हेच सविताच्या जिव्हारी लागलं.
तसं पहायला गेलं तर ही अतिशय क्षुल्लक बाब पण घराघरात हेच घडतं.
अनेकदा आपल्या माणसाला गृहीत धरतो. त्यांच्या मनाचा विचारच करत नाही. खासकरून घरातल्या महिलांच्या बाबतीत असं सर्रास घडतं. कोणी मुद्दाम असं करत नाही पण बऱ्याचदा होतं.
☆ “एका अजब चोरीची गोष्ट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆
संगीत आणि देवामुळे चोरी सोडून दिलेल्या चोराच्या अजब चोरीची गोष्ट…!
बर्याच वर्षांपूर्वी ‘झाला महार पंढरीनाथ’ नावाच्या चित्रपटाचे एक गीत ग. दि. माडगूळकरांनी लिहिले होते. त्या गीताच्या काही ओळी आजही लोकप्रिय आहेत.
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?
आजच्या कथेत याच ओळी पुन:पुन्हा आठवतील. आम्ही अशा एका चोराची कथा सांगणार आहोत, जो देवाची चोरी करू शकला नाही. फक्त ही कथा भारतात घडलेली नसून, बर्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत घडली आहे.
१९५१ सालच्या एका संध्याकाळची गोष्ट. न्यूयॉर्क शहराच्या १० व्या रस्त्याच्या मागे असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक हाडकुळा तरुण त्याच्या कामाची तयारी करत होता. बाहेर पडलेल्या अंधाराचा अंदाज घेऊन त्याने टेबलवर ठेवलेली एक पातळ छिन्नी खिशात घातली. हा जिम लेसी नावाचा मुलगा चोर होता. चोरांच्याही अनेक जाती असतात. काही दुकानांत, तर काही बंद घरात घुसून चोर्या करतात. चोरांची ज्याची त्याची एक स्पेशालिटी असते. हा चोर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचा दरवाजा उघडून चोर्या करण्यात तरबेज होता.
चालत चालत तो ५७ व्या रस्त्यावर पोहोचला, तेव्हा त्याला हवे ते नजरेस पडले. एका माणसाने घाईघाईत गाडी पार्क केली. गाडीच्या मागच्या सीटवर दोन बॅगा होत्या. गाडीवाला फारच घाईत असावा. त्याच्या कपड्यांकडे आणि हेअर स्टाईलकडे बघून चोराची खात्री पटली की, या इसमाच्या बॅगात नक्कीच भरपूर माल असणार. गाडीच्या दरवाजात छिन्नी अडकवून बॅगा चोरायला त्याला जेमतेम दोन तीन मिनिटं लागली. दोन सूटकेस हातात घेऊन तो पसार झाला. त्याचा आजचा कोटा पूर्ण झाला होता.
दहा मिनिटांनी काम आटपून गाडीचा मालक परत आला आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला. त्याने पोलीसांना फोन केला. काही मिनिटांतच चार पोलीस हजर झाले. “माझ्या दोन बॅगा चोरीला गेल्या आहेत. बॅगांमध्ये असलेलं बाकी काही नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या ऑर्केस्ट्राच्या येत्या कार्यक्रमाचे म्युझिक चार्ट मी बनवून ठेवलेत. ते काही झालं तरी मला मिळवून द्या. ” त्याने पोलीसांना हात जोडून विनंती केली. गाडीचा मालक एका नामांकित ऑर्केस्ट्राचा म्युझिक कंडक्टर *आल्फान्सो डी’आर्टेगन* होता. चार दिवसांनी त्याचा कार्यक्रम न्यूयॉर्कजवळच्या बफेलो शहरातल्या एका चर्चमध्ये होणार होता. हरवलेले चार्ट पुन्हा लिहिणे केवळ अशक्य होते. “त्या चार्टमध्ये माझे अॅव्हा मारीया आणि एक स्पेशल गाणे आहे, जे मला सापडायलाच हवेय हो. ” त्याने पुन्हा कळवळून विनंती केली. पोलीसांनी त्यांच्या कारवाईला सुरुवात केली.
आल्फान्सो डी’आर्टेगन आणि पोलीस यांच्यात चर्चा चालू असतानाच चोर आपल्या घरी सुखरुप पोहचला होता. त्या मोठ्या सूटकेसमध्ये काय काय माल मिळेल याची चोराला उत्सुकता होती. त्यानी घाईघाईने सूटकेस उघडल्या. एका सूटकेसमध्ये महागडे सूट होते आणि दुसरी सूटकेस उघडल्यावर चोराने मनातल्या मनात नशिबाला शिव्या घातल्या. त्यात फक्त म्युझिक चार्टचे कागदांचे गठ्ठे होते. रागाच्या भरात त्याने कागदाच्या चळती फेकल्या. महागडे सूट घेऊन तो चोरीचा माल गहाण ठेवणार्या सावकाराकडे पोहचला. सात सूटांच्या पावत्या देऊन सावकाराने त्याच्या हातावर १४० डॉलर टेकवल्यावर त्याचा मूड बराचसा सुधारला होता. घरी पोहोचल्यावर अस्ताव्यस्त पसरलेले कागद त्याने एका थैलीत भरायला सुरुवात केली. अचानक एका कागदावर त्याला त्याच्या ओळखीच्या अॅव्हा मारीयाच्या ओळी दिसल्या. एका क्षणात त्याचे मन चर्चमध्ये पोहचले. पियानोचे सूर मनात गुंजायला सुरुवात झाली. त्याने तो कागद बाजूला ठेवला आणि त्याला जोडलेला दुसरा कागद वाचला. त्यावर एका प्रार्थनेच्या चार ओळी होत्या.
Everyone must have a friend
To tell his troubles to;
And I found mine, O dearest Lord,
My truest friend is you!
या चार ओळी वाचल्यावर त्या चोराच्या मनात काय भावना निर्माण झाल्या कुणास ठाऊक, पण त्याने ती दोन्ही पाने स्वतःकडे ठेवून दिली. बाकीचे कागद थैलीत भरायला सुरुवात केल्यावर अचानक त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक? त्याने संगीत दिग्दर्शकाचं नाव वाचलं. आल्फान्सो डी’आर्टेगा. एका कागदावर ते टिपून ठेवले आणि सगळे कागद घेऊन तो बाहेर पडला. अर्ध्या तासाने तो परत आला, तेव्हा त्याला थोडं बरं वाटत होतं. गाडी ज्या ठिकाणी पार्क केलेली होती, त्याच ठिकाणी थैली सोडून तो परत आला होता. रात्री बराच वेळ तो त्याच विचारात गुंगलेला होता. त्याला कल्पना नव्हती, पण त्याने रस्त्यावर फेकलेल्या कागदांमुळे आणखी एक आयुष्य बदलण्याची वेळ कहाणी सुरु झाली होती.
दुसर्या दिवशी सकाळी पार्किंग लॉटच्या समोर असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहणार्या बाई बाहेर पडल्या. त्यांना वाटेत दुसर्या एक बाई भेटल्या आणि म्हणाल्या, “समोरच्या फूटपाथवर एका थैलीत कितीतरी म्युझिक चार्ट पडलेत बघ. तुझा मुलगा पियानो शिकतोय ना? त्याला उपयोगी येतील.”
त्या बाई लगबगीने गेल्या आणि त्यांनी ती थैली घरी आणली. दुपारपर्यंत डी’आर्टेगाच्या गाडीतल्या सामानाच्या चोरीची बातमी टीव्हीवर झळकत होती. सोबत डी’आर्टेगाचे चोराला उद्देशून एक आवाहन होते. “मी तुला माफ केलेच आहे, पण प्लीज माझे चार्ट माझ्यापर्यंत पोहोचव. मला कार्यक्रमासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. ” त्या बाई म्हणजे मिसेस ब्रेन यांनी ताबडतोब पोलीसांना फोन केला. थोड्याच वेळात डी’आर्टेगा कागद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. कागदाची थैली घेता घेता त्याचे लक्ष पियानोकडे गेले आणि साहजिक प्रश्न त्याने विचारला “तुमच्या घरी पियानो कोण वाजवतं?”
“माझे पती पियानोवादक आणि म्युझिक अॅरेंजर होते. ते गेल्यावर आता माझा मुलगा पियानो शिकतोय.”
मिसेस ब्रेन यांनी डी’आर्टेगाला त्यांच्या पतीच्या काही रचना दाखवल्या. त्यामध्ये एक रचना होती – ‘SOS ‘Save Our Souls.
एका रात्रीत घडलेल्या प्रसंगांनी भारावून गेलेल्या डी’आर्टेगा मिसेस ब्रेन यांना म्हणाला, “ही रचना मी माझ्या कार्यक्रमात सादर करतो. तुम्ही आणि मुलगा त्या कार्यक्रमाला माझ्या सोबतच चला. “
चार दिवसांनंतर त्या कार्यक्रमात त्याने ती रचना सादर केल्यावर मिसेस ब्रेनना अश्रू अनावर झाले. दुसर्या दिवशी त्यांचा फोटो आणि कार्यक्रमाची माहिती चोराने वर्तमानपत्रात वाचली आणि चार दिवस ज्या विचाराने तो अस्वस्थ झाला होता, तो विचार त्याने पक्का केला.
****
नंतरच्या काहीच दिवसांत डी’आर्टेगाच्या पत्त्यावर पोस्टाने एक पाकीट आले. त्यात गहाणवटीच्या सात पावत्या होत्या. सोबत चोराने लिहिलेली एक चिठ्ठी होती.
“महोदय, तुमच्या सुटकेस चोरणारा मी चोर आहे. तुमचे कपडे मी ज्या पॉन ब्रोकरकडे ठेवले आहेत, त्याच्या या पावत्या आहेत. ते कपडे मी सोडवून घेईन अशी माझी आता परिस्थिती नाही, कारण ही मी केलेली शेवटची चोरी होती. तुमच्या चार्टमधील जी अॅव्हा मारिया आणि आणखी एका कवितेची पानं होती, त्यांनी माझे आयुष्य बदलले आहे. आता मी काम करून पोट भरतो. चोर्या करत नाही. ही प्रेरणा मला तुमच्या रचनांतून मिळाली आहे. पण तुमच्या समोर येण्याचे धैर्य माझ्यात नाही किंवा चर्चमध्ये कन्फेशन देण्याचेही धैर्य आता माझ्यात नाही. ज्या दिवशी तो धीर माझ्यात निर्माण होईल, तेव्हा मी तुम्हाला भेटेन. ” – (जे. एल.)
या घटनेला तीन वर्षं उलटून गेली. डी’आर्टेगा ज्या चर्चचा सभासद होता, त्या सेंट अँथनी चर्चमध्ये एक मुलगा आपल्याकडे रोज बघतो आहे हे त्याच्या कधीच लक्षात आले नाही. डी’आर्टेगा पण न विसरता त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात न विसरता ‘SOS ‘Save Our Souls ही रचना सादर करत असे. अशाच एका कार्यक्रमानंतर एक दिवस चर्चमध्ये एका तरुणाने त्याला ‘भेटायचे आहे’ असे म्हटले. दोघं बोलत बाहेरच्या कॅफेत पोहोचले तेव्हा त्या तरुणाने खिशातून १४० डॉलर काढून डी’आर्टेगाच्या हातात ठेवले आणि म्हणाला, ” मीच तो चोर, ज्याचे आयुष्य तुमच्यामुळे बदलले. आता तुम्ही मला पोलीसांच्या हवाली केले तरी माझी तयारी आहे. “
डी’आर्टेगाने त्यावर उत्तर दिले, “पोलीसांच्या नव्हे, तर मी आता तुला देवाच्या आधीन करतो आहे. चल आपण एकत्र प्रार्थना करू या. “
ती प्रार्थना होती…
Everyone must have a friend
To tell his troubles to ;
And I found mine, O dearest Lord,
My truest friend is you!
… वाचकहो, देवावर विश्वास असणे-नसणे हा तुमच्या श्रध्देचा भाग आहे. पण ही सत्यकथा वाचल्यावर गदिमांच्या या ओळी तुम्हाला नक्कीच आठवतील.
… ” देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई? ”
*******
– – – आपल्या प्रत्येक भावनांची एक स्वतंत्र भूमिती असते, हे वास्तव आपण कधी मान्य करणार?
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५३ आणि ५४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ५३ – –
सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी |
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५३||
अर्थ : नेहमी नम्रतेने बोलणारा आणि आपल्या मधुर वाणीने लोकांना आपलेसे करणारा, सत्यवचनी आणि विवेकी असणारा, त्याचप्रमाणे कधीही वायफळ आणि असत्य न बोलणारा असा जो परमेश्वराचा भक्त असतो तो जगामध्ये खरोखरच धन्य होय.
(आर्जवी – नम्र, मिथ्य वाचा – खोटे बोलणे, त्रिवाचा – त्रिवार /निश्चित / ठामपणे. परंतु येथे बोलण्यात एकवाक्यता नसलेला असा अर्थ घेता येतो)
विवेचन : भक्ताने कसे असावे ते या श्लोकातही समर्थ सांगत आहेत. त्याचे बोलणे आर्जवी असते. आर्जवी म्हणजे नम्र. आर्जवी म्हणजे लाचार नव्हे. ज्याला (ईश्वराचे) ज्ञान झाले आहे असा भक्त आपोआपच नम्र होतो. फळांनी लगडलेले झाड जसे झुकलेले दिसते त्याप्रमाणे खरा ज्ञानी, विद्वान आणि भगवंताचा भक्त नम्र असतो. ही नम्रता त्याला कोठून उसनी आणावी लागत नाही. ती त्याच्या आतूनच उत्स्फूर्तपणे येते.
समर्थांना मधुर बोलणे अतिशय प्रिय आहे. दासबोधामध्ये ते म्हणतात,
पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते|
तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्ये ||
आपण जसे बोलू तसे उत्तर समोरून मिळेल. मग विनाकारण दुसऱ्याला लागेल असे बोलण्यात काय अर्थ? काही लोक बोलण्यात अत्यंत फटकळ असतात. आपल्या बोलण्याने लोकांची मने दुखावतात. अशी माणसे अप्रिय होतात. मग भलेही ती स्वतःला स्पष्टवक्ता म्हणवून घेतात. परंतु त्यांचा स्पष्टवक्तेपणा इतरांना जखम करणारा असतो. आपण गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचली असतील तर त्यातील भाषा किंवा कधी के वि बेलसरे यांचे निरूपण ऐकले असेल तर त्यांचे बोलणे किती नम्र आणि मधुर होते याचा प्रत्यय आपल्याला येतो. हीच खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत.
“सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. ” गोडही बोलायचे आणि सत्यही बोलायचे ही तारेवरची कसरत असते. परंतु दुसऱ्याला न दुखवता देखील सत्य सांगता येते. असा भक्त समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सदा सर्वदा म्हणजे नेहमी सत्य बोलतो. परंतु या सत्य बोलण्यात विवेकाचा वापर तो करतो. एखाद्या अत्यवस्थ किंवा शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या रुग्णाला जर आपण भेटायला गेलो आणि त्याला म्हटले की आता ही तुझी शेवटची अवस्था आहे. त्यातून तू बरा होणार नाहीस. असे बोलणे सत्य जरी असले तरी ते अविवेकाचे आहे. म्हणून अशा वेळी विवेकाचा वापर करून, ” तू बरा होणार आहेस. तुला लवकरच बरे वाटेल. ” अशा प्रकारचा धीर देणे उपयुक्त ठरते.
खोटे बोलणे आणि स्वतःच्या असत्य वागण्याचे लटके समर्थन करीत राहणे ही सवय बऱ्याच लोकांना असते. परंतु काही काळानंतर लोकांना अशा माणसांचा स्वभाव लक्षात येतो आणि मग त्यांच्या बोलण्यावर ते फारसा विश्वास ठेवत नाहीत. ते बोलतात एक करतात दुसरे आणि वागतात तिसऱ्या प्रकारचे. अशा वागणाऱ्यांसाठी समर्थांनी त्रिवाचा हा शब्द वापरला आहे. म्हणजे ज्यांच्या वागण्याबोलण्यात एकवाक्यता नसते अशा व्यक्ती. परमेश्वराचा खरा भक्त कधीही असत्य बोलून आपली जीभ विटाळत नाही. त्याला खोटे बोलण्याची गरजही भासत नाही. कारण त्याला काही लपवायचे नसते. खोटे ते बोलणाऱ्या माणसाला आपल्या बोलण्याची वेगवेगळी कारणे सांगावी लागतात. आणि आपण आधी काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागते. भक्त हा निर्मळ मनाचा आणि सरळ स्वभावाचा असतो. त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता असते. त्यामुळे तो जे बोलतो ते सत्यच असते. त्याचे शब्द त्याच्या निर्व्याज आणि निरलस व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असतात.
– – आणि ज्याच्या शब्दांत सत्य, नम्रता आणि विवेक असतो, तोच खरा “सर्वोत्तमाचा दास” ठरतो.
स्वसंवाद :
१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का?
२) “स्पष्ट बोलतो” या नावाखाली मी कधी दुसऱ्याला दुखावतो का?
३) सत्य बोलताना मी विवेकाचा वापर करतो का?
४) माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का?
– – – –
श्लोक क्र. ५४
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी |
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी |
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५४|
अर्थ : जो भक्त तरुणपणी एकांतात राहून आपला काळ घालवतो, कल्पनेच्या राज्यात जो रमत नाही, ज्याची भगवंतावरील श्रद्धा अढळ असते, असा भक्त खरोखरच त्या सर्वोत्तम असलेल्या भगवंताचा जगामध्ये धन्य असलेला दास आहे.
(सेवि – काळ घालवणे, आरण्य – एकांतवास, मिळेना – मिसळत नाही, मेळी – समूह, चळणे – परावृत्त होणे)
विवेचन : ज्या व्यक्तीला भगवंताची ओढ लागलेली अशी व्यक्ती तरुणपणातच एकांतात राहून त्याचे ध्यान किंवा नामस्मरण करणे पसंत करते. इथे समर्थांनी अरण्य हा शब्द जरी वापरलेला असला तरी प्रत्यक्षात अरण्यातच जाऊन राहिले पाहिजे असा त्याचा अर्थ नाही तर भगवंत प्राप्तीसाठी एकांतात जाऊन तपश्चर्या करणे आवश्यक आहे हा त्याचा अर्थ घेता येतो. आजच्या काळात ही गोष्ट थोडीशी विचित्र वाटेल. तरुणपणातच कसे काय एकांतात राहायचे आणि भगवंताचे ध्यान करायचे? ती तर म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे अशी आपली समजूत असते. पण साधना ही पुढे ढकलण्याची गोष्ट नव्हे तर तरुणपणीच करण्याची गोष्ट आहे.
एकांताची सवय होण्यासाठी घरातील एखादा निवांत कोपरा किंवा जवळचे एखादे शांत मंदिर अशा ठिकाणी जाऊन स्वसंवाद करता येईल. काही काळ टीव्ही, मोबाईल यासारख्या गोष्टींपासूनही दूर राहण्याची सवय करावी लागेल.
पण समर्थ या अनुभवातून गेले आहे. “आधी केले मग सांगितले” असेच त्यांचे बोल आहेत. अगदी तरुणपणी त्यांनी नाशिक जवळील टाकळी येथे राहून बारा वर्षांचा काळ एकांतात घालवला. ज्ञानेश्वरादी भावंडांनी एकांतात राहूनच तपश्चर्या केली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर एकांतात आपला काळ घालवित असत.
तरुण वयात उत्साह असतो, काहीतरी करण्याची जिद्द असते अशावेळी एकांताचे सेवन सहज होऊ शकते. जेव्हा सगळी गात्रे थकलेली असतात अशावेळी एकांतात राहणे मनुष्याला शक्य होत नाही. वृद्धापकाळी मुलांशी पटत नाही म्हणून जंगलात जाऊन राहणे हे लादलेले वैराग्य म्हणता येईल. तीर्थयात्रा, निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास, भजन, प्रवचन, कीर्तन इत्यादी गोष्टी तरुणपणीच उत्तमरीत्या करता येतात. मुखात रामाचे नाव तरुणपणीच यायला हवे. आयुष्यभर जर जिभेवर राम नाही आला तर अंतिम समयी तरी तो कसा येईल? त्यावेळीही कामच आठवेल.
तरुणपणीच भगवत भजनात रमलेला माणूस चुकूनही कल्पनेच्या राज्यात रममाण होत नाही. जी माणसे कल्पनेच्या राज्यात रमतात, ती कोणतेच कर्तव्य नीट पार पाडू शकत नाहीत. एकांताची सुद्धा सवय व्हावी लागते. एकांत पचावा लागतो. त्याची सवय व्हावी लागते. काही लोकांना समूहात राहण्याची एवढी सवय असते की ते एकांत सहन करू शकत नाहीत. पण सदैव लोकांमध्ये राहिले तर काही काळाने माणसाचे मन मलिन होते आणि मग अशा वेळी एकांत आणि स्व चिंतन आवश्यक असते. म्हणूनच पूर्वीची माणसे काही काळ साधनेसाठी म्हणून घरातून निघून जात असत. आणि काही काळानंतर परत येत असत. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, धावपळ इत्यादी गोष्टींना कंटाळलेली काही माणसे वर्षातून काही दिवस नियमितपणे विपश्यनेसाठी जातात त्याचाही उद्देश हाच असतो.
एखाद्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागली तरी त्याचा उत्साह काही दिवस टिकतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होते. कारण लोकांमध्ये राहून त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात. तर कधी त्याचा बुद्धिभेद होतो आणि त्याचा जो निश्चय असतो तो ढळतो. माणसाचे मन अतिशय चंचल असते. बंधनात राहणे, एकच एक गोष्ट करणे त्याला आवडत नाही. म्हणून करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, ” घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणवुनी करुणा हे बोलतो दीनवाचा… “परंतु परमेश्वराचा जो खरा भक्त असतो आणि तरुणपणापासूनच जाऊ भगवंत प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो अशा व्यक्तीचा निश्चय कधीही ढळत नाही अशी व्यक्ती म्हणजे परमेश्वराची खरोखरच प्रिय भक्त असते.
स्वसंवाद :
१) मी साधना/नामस्मरण “नंतर करू” असे पुढे ढकलतो आहे का?
२) माझ्या दिवसात मला एकांतासाठी किती वेळ मिळतो? की मी तो जाणीवपूर्वक टाळतो?
३) मी वास्तवात कृती करतो का, की कल्पनांच्या जगातच रमतो?
४) माझा आध्यात्मिक निश्चय किती दृढ आहे? अडचणी आल्या की तो ढळतो का?
५) आजपासून मी एक छोटी पण सातत्यपूर्ण साधना सुरू करू शकतो का?
आपल्या संस्कृतीची काही खास पवित्र अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवा, दीपक! घरातील देवघरात, मंदिरातील गाभाऱ्यात तेवणारा दिवा जसा मंगलमय, पवित्र असतो तसाच तो चैतन्यदायी असतो. प्रज्वलित दिवा एक मंगलमय वातावरण निर्माण करतो. दिवा जेव्हा अंधाराचे निर्मूलन करतो तेव्हाच तो तेजोमय प्रकाशाचे स्वागत करतो. दिवा लावल्याशिवाय जशी देवपूजा संपन्न होत नाही तसेच सायंकाळी लावलेला दिवा एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो.
दिवा दररोज सकाळी, सायंकाळी देवापुढे लावला जातो. षडरात्र, नवरात्र, दीपावली, नागदिवे/ देव दीपावली, पुरुषोत्तम मास आणि इतर अनेक सणांच्या निमित्ताने अहोरात्र नंदादीप तेवत ठेवण्याची आपली परंपरा आहे. अनेक घरांमध्ये सायंकाळी दिवा लावताना घरातील बालकांना देवापुढे बसवून प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेतून लहानपणापासून दिव्याचे महत्त्व बालकाच्या मनावर बिंबवले जाते. त्यातील काही ओळी…
‘दिव्या दिव्या दीपत्कार,
कानी कुंडल मोतीहार |
दिव्याला पाहून नमस्कार |
दिवा लावला देवापाशी,
उजेड पडला तुळशीपाशी|’
ज्याप्रमाणे अनेक सणांमध्ये तबकात दीप घेऊन ओवाळण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे अधिकमासात दिव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासामध्ये देवाजवळ नंदादीप लावण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्या संदर्भातील काही आख्यायिका ‘अधिकमास महात्म्य’ या अंतर्गत अनेक ठिकाणी वाचायला मिळतात…
अधिक मासाची कहानी
एकदा भगवान नारायण जनहितार्थ तपश्चर्येत ध्यानमग्न असताना तिथे महर्षी नारद यांचे आगमन झाले. “नारायण… नारायण… ” हा स्वर नारायणांच्या कानी पडला. नारद मुनींचे आगमन झाले हे समजताच भगवान विष्णूंनी डोळे उघडले. त्यांनी विचारले,
“होय, नारायणा! सारे काही कुशल आहे. एक प्रश्न विचारायचा आहे.”
“नारदमुनी, तुम्हाला कधीपासून परवानगी घ्यावी लागते? काय मनात आहे ते नि:संकोच विचारावे. “
“नारायण… नारायण…! देवा, दरवर्षी बारा महिने असतात परंतु प्रत्येक तीन वर्षानंतर तेरावा महिना येतो. त्यामागे काही विशिष्ट संकेत आहेत का?”
“मुनी श्रेष्ठ, आपण खूप छान प्रश्न विचारला आहे. जगात सत्कर्म वाढले की कल्याण होते. उलट जगामध्ये वाईट गोष्टींचे प्रमाण वाढले की मग अधोगती सुरू होते. सद्य युगात दुष्कर्मांची संख्या वाढल्यामुळे पाप वाढत चालले आहे. तुम्ही म्हणता त्या बारा महिन्यांनी तक्रार केली होती, की सध्या सर्वत्र वाढलेले पाप आम्ही आमच्या पोटात घेत असतो परंतु ते आम्हाला सहन होत नाही. आम्ही आमच्या पोटात जमा असलेल्या पापाचा तिसरा हिस्सा बाहेर काढून टाकत आहोत म्हणजे तितकाच पापाचा भार कमी होईल. त्याप्रमाणे त्या प्रत्येक महिन्याने तिसरा हिस्सा काढून टाकला. काढून टाकलेल्या पापाच्या हिश्श्यापासून नवीन मास उत्पन्न झाला अर्थात तेरावा महिना जन्माला आला. तो पापमय असल्याने त्याला मलमास किंवा मलिनमास असे नाव मिळाले.
मलमासाला त्याच्या सोबतचे बारा महिने चिडवत होते, त्याची टिंगलटवाळी करत होते कारण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मलमास अयोग्य समजला जात असे. सूर्याची गती मोजताना मलमास गृहित धरला जात नसे. त्यामुळे मलमास दुःखी होत असे. मलमासाने मानवरूप धारण केले. काय करावे म्हणजे हे बारा महिने आपला दुस्वास करणार नाहीत, मलाही इतर महिन्यांप्रमाणे योग्य स्थान, प्रतिष्ठा मिळेल. अशा विचारात असताना त्याला वैकुंठपती श्रीविष्णुचे स्मरण झाले. मलमास वैकुंठात गेला. आसवं गाळत तो श्रीविष्णुला शरण गेला. भगवान विष्णुंची त्याने आराधना केली. विष्णू म्हणाले,
“वैकुंठात केवळ सुख आणि सुख असताना तू दुःखी का आहेस? काय झाले?” तेव्हा अधिकमासाने स्वतःचे दुःख नम्रतेने श्री मधुसूदनाला सांगितले. ते ऐकून माधव म्हणाले,
“ठीक आहे. आपण आता गोलोकात जाऊया. तिथे मुरलीधर कान्हा आहे. सकल भक्तांचे दुःख तो तत्काळ हरण करतो. चल. “
भगवान विष्णुंच्या पाठोपाठ मलमास गोलोकात गेला. तिथे श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. मलमासाचे आसवे थांबत नव्हती. ते पाहून श्रीकृष्णाने भगवान विष्णुला विचारले,
“महाविष्णू, हा मानव कोण आहे? हा सतत अश्रू का ढाळत आहे? याला कोणते दुःख आहे?” दामोदराचे प्रश्न ऐकून विष्णुंनी सारी परिस्थिती कृष्णाला कथन केली म्हणाले,
“हा पीडित मास माझ्याकडे आला. मी त्याचे सारे दुःख ऐकले. त्याचे दुःख केवळ तुम्हीच दूर करू शकाल म्हणून मी त्याला गोलोकात घेऊन आलो आहे. या दुःखिताचा तुम्ही उद्धार करावा, त्याच्या दुःखाचे हरण करावे. “
“महाविष्णू, हे चांगले केले. अगोदर तुम्हाला आणि नंतर मला शरण आलेल्या या मलमासाला मी माझे ‘पुरुषोत्तम’ हे नाव देतो. हा सर्व महिन्यांत श्रेष्ठ असेल. इतकेच नाहीतर माझे ऐश्वर्य ह्यास देतो. जसा मी सर्वत्र पवित्र, पूज्य आहे तसाच हाही पवित्र मानला जाईल. पुरुषोत्तम मासात भक्तगण जी धार्मिक कार्ये करतील त्याचे पुण्य फल त्यांना मिळेल. ” श्रीकृष्णाने मलमासाला जणू पुनर्जिवित केले, त्याला वरदान दिले. त्यामुळे आनंदित झालेला पुरुषोत्तम मास भगवान श्रीविष्णूंसह वैकुंठात परतला. त्याने तिथेच वास्तव्य केले…
००००
अधिकमास: दीप प्रज्वलन!
एकदा विष्णुपत्नी लक्ष्मीने पतीला विचारले, “श्रीहरी, मधुसूदना, मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की, अधिकमासात देवाजवळ दीप लावण्याचे किंवा लावलेल्या दिव्याचे रक्षण केल्याने कोणते फळ मिळते?”
विष्णू म्हणाले, “ऐक. अधिकमासात दीप लावण्याचा विधी आणि महत्त्व सांगतो…
अधिकमासाच्या प्रथम दिवशी सकाळी स्नानादि कार्ये आटोपून स्वच्छ केलेल्या, सजविलेल्या भूमीवर घट मांडावा. त्याच्यासमोर एक दीप ठेवावा, ज्यात सप्ततंतूंची वात घालून तूप किंवा तेल घालून यथाविधी पूजन करून दीप प्रज्वलित करावा. मनोभावे प्रार्थना करावी…
“हे परमेश्वरा, ही माझी दीपसेवा गोड मानून घ्यावी. ह्या दिव्यामुळे अंध:कार दूर होऊन कांतीही उजळून निघावी. ” याप्रमाणे पूजन केल्यामुळे गोदान, भूदानाचे पुण्य लाभते. दीप दान करणारास ज्याप्रमाणे सुकांती लाभते, त्याचप्रमाणे धनसंपदा लाभते, अखंड सौभाग्य मिळते. यासह विद्या प्राप्त होते, आयुरारोग्यासह समृद्धी मिळते, पुत्रपौत्र संतती लाभते, जो ब्राह्मण स्वतः दीप दान करतो त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त होते, कुमारिकेस इच्छित पती मिळतो, सर्व दुःखांचे हरण होते, भीती दूर पळते, इतकेच नाही तर अधिकमासात जे कुणी दीप प्रज्वलनाच्या गोष्टी, महत्त्व सांगतात तेही पापमुक्त होतात… “
“श्रीहरी, अधिक मासातील दिव्याची अतिशय चांगली अशी माहिती सांगितली. ” लक्ष्मी समाधानाने म्हणाली.
००००
वेणीमाधव वात!
श्री लक्ष्मीने भगवान विष्णू यांना विचारले, “देवा, अधिक मासात ‘वेणीमाधव वातीचा’ दिवा लावतात. त्याबद्दल सांगावे. “
“महालक्ष्मी, हिंदू संस्कृतीमध्ये देवापुढे लावल्या जाणाऱ्या वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या घरात सकाळ, संध्याकाळ पूजेच्या वेळी दिवा लावला जातो ते घर पवित्र होते. सहा दिवस, दहा दिवस नंदादीप लावण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे अनेक संकटांचे निवारण होते, एकप्रकारचे चैतन्य निर्माण होते.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक’ मासात देवापुढे वेणीमाधव ही वात प्रज्वलित करण्यात येते. वेणीमाधव वातीचा आकार इतर वातींच्या मानाने मोठा असतो. वेणीमाधव वात लावण्यामागे अध्यात्मिक कारण आहे. वेणीमाधव वात ही नेहमी दिवा लावताना जी वात वापरल्या जाते तशी वात नसते. दररोज जी तुपाची फुलवात वापरण्यात येते त्या तेहतीस फुलवाती एकात एक माळून वेणीमाधव वात तयार होते. ती गुंफण एखाद्या वेणीसारखी दिसते म्हणून त्या वेणीस वेणीमाधव वात असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये तसेच अधिक मासामध्ये तेहतीस अंकाला धार्मिक महत्त्व आहे. तेहतीस हा अंक तेहतीस कोटी देवांचे अर्थात तेहतीस प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिक मानल्या जातो. त्यामुळे तेहतीस फुलवातींची वात प्रज्वलित होताच मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होते. या ऊर्जेमुळे घरातील अपवित्रता, अघोरी शक्तींचे निर्मूलन होते, सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी भक्तांची मान्यता आहे. भक्त असेही मानतात की, ही वात लावल्याने निर्माण झालेली पवित्रता पुढील तीन वर्षे म्हणजे पुढील अधिक मास येईपर्यंत टिकून राहते.
ही वात वेणीमाधव म्हणून ओळखली जाते त्यामागे असलेले कारण म्हणजे, सृष्टीचे निर्माते आणि पालनकर्ते ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीच्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे वेणीमाधव वात होय!
वेणीमाधव वातीचे दुसरे महत्त्व असे की, यातील माधव म्हणजे श्री महाविष्णू! प्रयागराज येथे माधव अर्थात भगवान विष्णू, श्री महालक्ष्मीचे अर्थात आपले वास्तव्य आहे. श्री विष्णू यांना प्रयागराजचे व्दारपाल म्हणून ओळखले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे असे मानले जाते की, या सर्व गोष्टींमुळे वेणीमाधव ही वात आपल्या देवघरात लावल्याने मोठे पुण्य मिळते.
अधिकमासात किंवा धोंड्याच्या महिन्यात एकदा तरी वेणीमाधव वात देवघरात लावल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, सुख-समाधान-आनंद मिळतो. ज्याप्रकारे त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळते तसेच पुण्य वेणीमाधव ज्योत देवघरात लावल्यामुळे प्राप्त होते.
“विष्णू देवा, खूप छान माहिती सांगितली आहे. आपण पाहतोय, वेणीमाधव वातीशिवाय भक्त इतरही वाती लावतात. “
“देवी, खरं आहे. तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. मंजूळ वातही काही भक्त लावतात. हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न आहे. वातीला वेगवेगळी नावे असली तरीही भक्तांचा भाव सारखाच असतो. “
“बरोबर आहे, देवा! खूप छान माहिती सांगितली. “
००००
मनीमाऊला मिळाली मुक्ती!
श्रीविष्णू लक्ष्मीला म्हणाले, “एक कथा सांगतो, सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. एकदा पुरुषोत्तम मासाचा योग साधून त्याने षोडशोपचारे पुजा करून दीप प्रज्वलित केला. दररोज सकाळ- संध्याकाळ दिव्याची पूजा, भजन करणे हा त्याचा नेम होता. त्याच्या घरी असलेल्या उंदरांना पकडण्यासाठी एक मांजर दररोज येत असे. एके रात्री ती मांजर नेहमीप्रमाणे त्याच्या घरात आली असता ब्राह्मण नेहमीप्रमाणे नाम घेत दिव्यासमोर बसलेला होता. दिव्यावर काजळी चढली असल्याने दिव्याचा प्रकाश मंद झाला होता. तितक्यात तिथे उंदीर आल्याचे पाहून टपून बसलेली मांजर उंदराकडे झेप घेत असताना तिचा पाय दिव्याला लागला. त्यामुळे दिवा हलला. परंतु त्यामुळे ज्योतीवर आलेली काजळी गळून पडली. दिव्याचे तेज फाकले. सकाळ होताक्षणी मांजर गतप्राण झालेली आढळली. देवी, नकळतपणे दिवा प्रज्वलित केल्यामुळे मांजराला मुक्ती मिळून ते मांजर वैकुंठाला पोहोचले. दुसरीकडे मनोभावे दीपपूजन करणारा सुशर्मा नावाचा ब्राह्मण समृद्ध झाला, पुत्रपौत्र प्राप्त झाले. उत्तम आरोग्य, सुख मिळून त्यालाही मोक्ष प्राप्त झाला. “
“हे देवा, आपण खूप छान माहिती सांगितली आहे. त्यामुळे दिव्यासंदर्भात अजून काही ऐकण्याची लालसा उत्पन्न झाली आहे… “
००००
विमला नि सुशीला!
“लक्ष्मीदेवी, तुझी इच्छा जाणून एक कथा ऐकवतो…
अनेक वर्षांपूर्वी मथुरा नगरात शाकली नावाचा एक ब्राह्मण राहत होता. शुद्ध आचरण अशी त्याची ख्याती होती. त्याला विमला आणि सुशीला या नावाच्या दोन बायका होत्या. पुरुषोत्तम मासात एके दिवशी सुशीला पाणी आणण्यासाठी नदीवर गेली, तेव्हा तिला तिथे बरेच स्त्री पुरुष स्नान करताना दिसले. सुशीलेने घरी येऊन पतीला नदी स्नानाचे महत्त्व काय आहे ते विचारले. तेव्हा शाकलीने पत्नीला सांगितले, “श्री विष्णूला प्रिय अशा पुरुषोत्तम महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात दीप प्रज्वलित केला असता मोठे पुण्य लाभते. ” ते ऐकून सुशीला म्हणाली,
“पतिदेवा, तुम्ही सांगितलेला या मासाचा महिमा ऐकून संपूर्ण महिना मी दीप लावू इच्छिते. “
पत्नीची इच्छा जाणून शाकलीने तिला परवानगी दिली. सुशीलेने मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने पूजा करून दीप प्रज्वलित के
ला. नंतर पतीला नमस्कार करून त्यांना जेवायला देऊन स्वतः जेवण केले. आपल्या सवतीने केलेले कार्य विमलेस आवडले नाही. तिच्या मनात सवतीमत्सर जागा झाला. ती विचार करू लागली, काय करावे म्हणजे हिच्या पुजेत व्यत्यय येऊन तिची मनोकामना पूर्ण होणार नाही. विमलेच्या मनात एक कुविचार जागृत झाला. घरात कुणीही नाही हे पाहून विमलाने तेवत असलेला दीप शांत केला, त्यातले तेलही काढून टाकले. नंतर उतावीळपणे काय होते हे पाहण्यासाठी बसून राहिली. बाहेरून आलेल्या सुशीलेला शांत झालेला दिवा दिसताच तिला अतोनात दुःख झाले. तिने श्रीविष्णुला प्रार्थना केली. रोज तसाच प्रकार घडत होता.
विमला जाता येता कधी पदराने, कधी फुंकर घालून, कधी सारे तेल काढून दीप शांत करुन सुशीलाच्या भक्तीमध्ये विघ्ने निर्माण करीत होती. तो प्रकार सुशीलाच्या लक्षात आला परंतु ती शांत राहिली. कुणासही काहीही बोलली नाही. तिने पूर्ण पुरुषोत्तम मासात दीप प्रज्वलन करून व्रताची सांगता केली. त्याचे पुण्य तिला लाभले. दुसरीकडे विघ्नकर्ती विमलालाही तिच्या पापाचे फळ मिळाले. तिची तीन मुले मृत झाली. तिला स्वतःला दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले. काही काळानंतर तिलाही मरण प्राप्त झाले… “
“देवी, लक्ष्मी असे आहे, दीप लावण्याचे महत्त्व!”
“स्वामी, केवळ पुरुषोत्तम मासातच नाही तर दररोज मनोभावे दिवा लावणाऱ्या कुटुंबांवर आपला असाच आशीर्वाद असू द्या. “
☆ बॅंकेतल्या मुली ! – लेखक : हेमंत खेर ☆ श्री सुभाष धारणकर ☆
बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बॅंक शाखा उघडण्याचे प्रमाण वाढले आणि सेवा भरतीही वाढली. १९७४ ते १९९२ पर्यंत बॅंका, जनरल इन्शुरन्स, एल्आयसी ह्या मध्ये स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून भरपूर भरती झाली. ह्या भरतीत महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. पांढरपेशा आणि तुलनेने सुरक्षीत वातावरणातील कार्य संस्कृती मुळे ही क्षेत्रे त्यांना भावली. प्रथमच शिक्षीका, नर्सिंग, पोस्ट आणि सरकारी विभागा बाहेर एवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. महिला सक्षमीकरण हा शब्द खूप नंतर आला. त्या आधीच ही शांततापूर्ण क्रांती झाली होती.
बॅंक व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी सुद्धा सहानुभूतीचा आणि काहीसा उदार दृष्टिकोन स्विकारून ह्या महिलांचे जिणे सुखकर केले.
मी १९८४ साली बॅंकेत लागलो. आमच्या बरोबरचे सहकारी जवळपास सगळे गरीब ते कनिष्ठ मध्यमवर्गीय परिवारातून आले होते.
ह्या मुली सुद्धा अशाच परिवारातून आल्या होत्या. आपल्या बरोबर काटकसरीचे, निगुतीने काम करण्याचे, पापभिरू संस्कार घेऊन आलेल्या. जबाबदारीची जाणीव असलेल्या. काही जणींनी बॅंकेत प्रेमविवाह केले. तरी बहुतांशी जणींचे विवाह पारंपारिक मार्गाने झाले. उच्छृंखलपणा अत्यंत अपवादात्मक होता. नटवेपणाही जवळपास नव्हताच (बऱ्याच जणींनी आपल्या मुलीं बरोबर वा मुलांच्या लग्नात ब्युटी पार्लर बघितले असावे)
आणि कधी काळी कुणी केलाच तर केस हाताबाहेर जाऊ न देण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा. मत्सर हा स्त्रीसुलभ असला तरिही सहकार्य आणि सांभाळून घेणं असायचं. अनेकदा सासुरवास भोगणाऱ्यांना बॅंकेत एकमेकींशी बोलून मन मोकळं करता येत असे.
आजच्या तुलनेत तेंव्हा स्वातंत्र्य कमी होतं जबादाऱ्या जास्त होत्या. मुलाबाळांचे करण्यात वेळ मिळत नसे. सासू सासरे छान आणि नातवंडांना सांभाळतायत असं दृष्य कमीच.
खरं तर आमच्या पिढीचे नशीब म्हणजे आधी आई वडिल, सासू सासरे ह्यांची सेवा आणि नंतर मुलांची सेवा.
ह्या मुलींनी हसत हसत सगळं केलं. घरं बांधली, पर्यटन केलं, कर्ज काढून वस्तू केल्या.
अपवाद वगळता फार कोणी प्रमोशनच्या मागे लागल्या नाहीत. पण ज्यांनी घेतली त्या कुठेच कमी पडल्या नाहीत.
एकेकाळी जाड आणि जड लेजर उचलणाऱ्या. काऊंटर, खुर्च्या पुरुषांच्या उंचीच्या विचाराने असत त्यावर उशा टाकून किंवा जुनी लेजर टाकून बसणाऱ्या मुली, सफाईदारपणे संगणक चालवू लागल्या. नाकावर आलेल्या चष्म्यातून स्क्रीन पाहू लागल्या.
जवळपास सर्वांच्याच मुलांनी छान शिक्षण घेतलं. देश विदेशात कर्तृत्व गाजवत आहेत.
ह्या मुलींनी काय दिलं? त्यांच्या मुळे कार्यालयात सभ्यपणा टिकून राहिला.
येणाऱ्या अडाणी महिला ग्राहकांना आधार वाटला. समाजातील महिलांचे स्थान उंचावले.
माझ्या बदल्यांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मला आमच्या पिढीच्या ह्या प्रतिनिधी भेटल्या.
त्यावेळी लढणाऱ्या मुली आज निवृत्त होत आहेत. जवळपास सर्व जणी आज निवृत्त होऊन सासू, आजी ह्या रोल मध्ये गेल्या आहेत. आमच्या पिढीने झगडून मिळवलेली पेन्शन अजूनही त्यांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
त्यांनी चाललेल्या वाटेचा आज महामार्ग झाला आहे.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे मागच्या महिन्यात सिनकर मॅडम निवृत्त झाल्या. आणि ह्या महिन्यात लोटलीकर मॅडम निवृत्त होतील. त्यांना शुभेच्छा.
– वर सांगितलेल्या पिढीतील या बहुतेक शेवटच्या प्रतिनिधी.
त्यांना शुभेच्छा देताना हे विचार मनात आले. ते दिवस पुन्हा आठवले. म्हणून जमेल तसं लिहिलं. (काही चुकलं असेल तर कान उपटायला अजूनही अनेक जणी समर्थ आहेत.)
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५१ आणि ५२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ५१ – –
मदें मछरे सांडिला स्वार्थबुद्धी|
प्रपंचिक नाही जयाते उपाधि|
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|५१|
अर्थ : जो अहंकार आणि द्वेषरहित आहे, ज्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे, जो संसारात राहूनही विरक्त वृत्तीने वागतो, नेहमी नम्र आणि मधुर वाणीनेच बोलतो, असा मनुष्य सर्वोत्तम अशा भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.
(मद – अहंकार, मछरे -मत्सर/द्वेष, सांडिला – सोडून दिले आहे, स्वार्थ बुद्धी – केवळ स्वतःचा फायदा पाहणे, उपाधि – बाह्य पाश /बंधन, सुवाचा – गोड /मधुर बोलणे)
विवेचन :हा फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. खऱ्या भक्ताची लक्षणे आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. खरा भक्त अहंकार आणि द्वेष रहित असतो. त्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केलेला असतो. काही ठिकाणी या श्लोकामध्ये पाठभेद आढळतात. काही पुस्तकांमध्ये सांडली असा शब्द आहे तर काही पुस्तकांमध्ये सांडिला असे म्हटले आहे. या शब्दांमुळे अर्थामध्ये जरा फरक पडतो ज्या पुस्तकामध्ये मदे मत्सरे सांडीली स्वार्थ बुद्धी असे म्हटले आहे, तिथे सांडली म्हणजे त्याग केला या अर्थाने मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी या तिघांचाही खऱ्या भक्ताने त्याग केलेला असतो असा अर्थ घेता येतो. तर जेव्हा सांडीला हा शब्द वापरलेला आढळतो तेव्हा मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी हे दुर्गुण खऱ्या भक्ताला सोडून गेलेले असतात. म्हणजे त्याला ते स्पर्शही करत नाहीत असा अर्थ घेता येतो. तसेच काही पुस्तकात मत्सरे तर काही ठिकाणी मछरे हा शब्द वापरला आहे. अर्थात दोन्हींचा अर्थ मत्सर हाच आहे.
या शब्दांच्या जास्त खोलात न शिरता आपल्याला असे लक्षात येते की खरा भक्त हा अहंकार आणि द्वेषरहित असतो. त्याच्याजवळ स्वार्थ बुद्धी नसते. मद म्हणजे गर्व किंवा अहंकार. माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा खूप गर्व असतो. त्यातूनच मग तो मी हे केले, मी ते केले, माझ्यामुळेच हे झाले अशा प्रकारची अहंकारी विधाने करत असतो. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ आहे असे दिसले की मग त्याचा मत्सर जागा होतो. तो त्याचा द्वेष करू लागतो आणि मग त्या व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही पातळीला जातो.
स्वार्थ म्हणजे स्व -अर्थ. स्वार्थी माणूस केवळ स्वतःचाच फायदा पाहत असतो. पैसा, संपत्ती यासारख्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्याचे समाधान होत नाही. अजून हवे, अजून हवे असे त्याला वाटत राहते. एकदा हातात भरपूर पैसा आला की मग त्याच्या जोडीला मद येतो. अहंकार वाढत राहतो. त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याचा द्वेषही मनामध्ये ठाण मांडून बसतो. पण जो परमेश्वराचा खरा भक्त असतो, त्याची मानसिक अवस्था या सगळ्याच्या पलीकडे गेलेली असते. तो तृप्त असतो. आहे त्या परिस्थितीत संतुष्ट आणि समाधानी राहतो. कोणाचा तिरस्कार किंवा द्वेष करणे त्याच्या मनात येत नाही.
या श्लोकात खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. खरा भक्त प्रपंच तर करतो पण कसा? तर संसारात राहूनही तो त्यापासून अलिप्त असतो. तो विरक्त वृत्तीने जगतो. खरा भक्त असण्यासाठी भगवे कपडे, माळा, टिळा, टोपी, गंध इत्यादी धारण केले पाहिजे असे नाही. त्यासाठी कुठे वनात जावे लागत नाही. आपण संसारात राहून सुद्धा भगवंताचे लाडके भक्त होऊ शकतो.
कमलपुष्पाचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कमळ चिखलात असते पण त्यात राहूनही ते त्यापासून दूर असते. असेच संसारात देखील राहता आले पाहिजे. संसाराची उपाधी खऱ्या भक्ताला असत नाही म्हणजेच त्याला संसाराचे पाश बांधू शकत नाहीत. संसारात असूनही तो मुक्त असतो, विरक्त असतो.
खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. त्याचे बोलणे नम्र असते, बोलण्यात माधुर्य असते. आपल्या बोलण्याने तो कोणालाही दुखवत नाही. यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. खऱ्या भक्ताच्या अंगी हे गुण आपोआप येतात. निवडणूक आली म्हणजे बरेच पुढारी अगदी नम्रतेने जनतेला सामोरे जातात. कार्पोरेट क्षेत्रातही कामाच्या गरजेपोटी नम्रता धारण केली जाते. पण हे सगळे मुखवटे असतात. आतले रूप वेगळ्याच असते. असे आपल्याला अनेक प्रसंगी आढळून येते. खरा भक्त हा अंतर्बाह्य निर्मळ असतो. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. लोणी जेवढं मऊ आणि मुलायम असतं, तसंच सज्जनांचे चित्त असतं असं तुकाराम महाराज म्हणतात.
समर्थ रामदास किंवा संत तुकाराम यांच्यासारखे संत काही वेळा कठोरपणाने बोलताना दिसतात. पण त्यामागे समाज हिताची तळमळ असते. आई सुद्धा आपल्या मुलाला प्रसंगी रागावते, तर कधी चिडून ” मर मेल्या… “असे सुद्धा उद्गारते. परंतु त्यातही तिचे प्रेम असते आणि मुलाच्या कल्याणाचाच विचार असतो. असेच संतांचीही बोलणे असते. जाणीवपूर्वक कोणाचेही मन दुखवावे म्हणून ते बोलत नसतात.
म्हणून आपणही परमेश्वराचे प्रिय भक्त होण्याचा प्रयत्न करावा. अहंकार, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी यांच्यासारख्या दुर्गुणांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचात रहावे, प्रपंच उत्तम करावा. परंतु ज्या काही गोष्टी घडतात, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहायला शिकावे म्हणजे आपल्याला त्या बंधनकारक होत नाहीत. अनावश्यक बोलणे टाळावे आणि जे काही आपण बोलू त्यात नम्रता आणि माधुर्य असावे. असा भक्त हा त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील सर्वोत्कृष्ट असा भक्त असतो.
स्वसंवाद ::
१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का – की ते केवळ गरजेपुरते असते आणि आतमध्ये वेगळेच असते?
२) माझ्या मनात कोणाबद्दल मत्सर किंवा द्वेष आहे का – आणि त्याची मला जाणीव होते का?
३) “संसारात राहूनही विरक्त” – माझ्या जीवनात मी साक्षीभावाने वागण्याचा प्रयत्न करतो का की संसारातील गोष्टी मला पूर्णपणे बांधून टाकतात?
– – –
श्लोक क्र. ५२ – –
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥
करी सुखसंवाद जो उगमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥
अर्थ :खरा भक्त तत्वचिंतनात वेळ घालवतो. अहंकार, दंभ आणि वादविवादात तो वेळ घालवत नाही किंवा त्यात गुंतून पडत नाही. तो उगमाचे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करून स्वतःशी किंवा इतरांशी सुख संवाद साधतो असा भक्त परमेश्वराचा खरोखरच धन्य असा भक्त होय.
(क्रमी – वेळ घालवतो, तत्त्वचिंतन – परमात्मस्वरूपाचे चिंतन, अनुवाद – आचरण /अनुकरण, लिंपे – लिप्त होत नाही किंवा दोष लावून घेत नाही, दंभवाद – फसवा युक्तिवाद, विवाद – निष्फळ वाद, उगम – मूळ स्वरूप)
विवेचन : खरा भक्त आपला वेळ कसा घालवतो हे समर्थ पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत सांगतात तर भक्ताने कसे असू नये हे दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले आहे.
– – क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे…
साधकाचे अंतिम ध्येय परमेश्वराला प्राप्त करून घेणे हे असते एकदा त्याने ही गोष्ट आपल्या मनाशी निश्चित केली की मग त्याचे चिंतन करण्यातच तो आपला वेळ घालवतो. त्याव्यतिरिक्त जो इतर गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतो तो खरा साधक नव्हेच! तो मूळ तत्वाचे म्हणजे परमेश्वराचे चिंतन करतो. याच ओळीत अनुवादे हा शब्द आला आहे याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. साधारणपणे अनुवाद म्हणजे भाषांतर असे आपण समजतो परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ आचरण किंवा अनुकरण असा घ्यायला हवा. म्हणजे ज्याला परमेश्वराच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले आहे तो साधकाने जसे वागायला हवे तसेच वागत असतो. आपल्या गुरूंनी किंवा आपल्या श्रेष्ठ ग्रंथांनी जी गोष्ट सांगितली आहे, त्याचे अनुकरण करत असतो. त्याचा अनुभव घेत असतो. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाबद्दल एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीवाचून उपयोग नसतो तर त्याप्रमाणे वागून त्या ओवीची अनुभूती घेणे, अनुभव प्राप्त करणे हा त्याचा अर्थ आहे आणि खरा भक्त तेच करत असतो.
असा भक्त निष्करण वादविवादात गुंतून पडत नाही. आपल्याला थोडेफार ज्ञान झाले, काही मोजक्या ग्रंथांचे आपण वाचन केले म्हणजे आपल्याला फार कळते आहे असे आपल्याला वाटू लागते. मग आपण ते दाखवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी वादविवाद करत बसतो आणि मी किती श्रेष्ठ आहे, मला किती कळते हे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. खरा भक्त बोलतो, गातो ते फक्त परमेश्वराबद्दल बोलण्यासाठीच. त्याचीच महती तो गात असतो. म्हणून तो व्यर्थ वादविवादात पडत नाही किंवा त्यात स्वतःला गुंतवून घेत नाही.
आपल्याला दिवसाचे चोवीस तास मिळतात. त्यातील आठ ते दहा तास झोपेत जातात. दहा ते बारा तास आपली नोकरी, प्रपंचाचे काम यात जातात आणि उरलेले तीन -चार तास आपण आपल्या मनाप्रमाणे घालवतो. त्यात टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे, मित्रमंडळींमध्ये गप्पा मारणे यासारख्या गोष्टी करतो. खरा भक्त या वेळेत काय करतो? तर तो स्वतःशी संवाद साधतो, आत्मचिंतन करतो. त्यालाच सुखसंवाद असे म्हणता येईल. हा सुखसंवाद उगमाकडे जाण्याचा असतो. गंगा नदी किंवा यमुना नदी आपण पाहिलेली असते परंतु हिमालयात प्रवास करणारे यात्रिक किंवा भाविक गंगोत्री किंवा यमुनोत्री म्हणजेच गंगेच्या किंवा यमुनेच्या उगमपर्यंत जातात. म्हणजेच मूळ स्थान शोधून काढतात.
आपल्यालाही मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. परंतु आपणही आपले मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. कोहम म्हणजे मी कोण आहे, माझे मूळ स्वरूप कोणते आहे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. मग आपण सोहम पर्यंत येतो म्हणजे तो मीच आहे हे आपल्याला कळू लागते आणि मग आपलाच आपल्याशी संवाद होऊ लागतो. ” तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ” आणि जेव्हा भक्ताच्या वागण्यात ही सगळी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तो फक्त खरोखरच परमेश्वराचा धन्य भक्त ठरतो.
स्वसंवाद ::
१) माझा रिकामा वेळ कशात जातो – तत्त्वचिंतनात की मोबाईल, गप्पा यासारख्या गोष्टींमध्ये?
२) मला थोडे ज्ञान झाले म्हणून मी वादविवादात पडतो का – की माझ्या ज्ञानाचे आचरण करण्यावर माझा भर असतो?
३) “कोहम ते सोहम” – मी कोण आहे हा प्रश्न मला कधी पडला आहे का? माझ्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याची माझ्या मनात खरी ओढ आहे का?
☆ तो ‘जादुई डबा’ – – – माहिती संग्राहक/लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆
जॉन शेफर्ड-बॅरन
एका बंद दरवाजातून जन्मलेला तो ‘जादुई डबा’ आणि तुमच्या ४ अंकी पिनचा रंजक इतिहास – – –
लंडनच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर पावसाची रिपरिप सुरू होती. जॉन नावाचा एक माणूस धावत धावत बँकेच्या दिशेने जात होता. घड्याळाचा काटा बरोबर दुपारी एकवर पोहोचला आणि त्याच्या डोळ्यादेखत बँकेचं जड लोखंडी दार बंद झालं. जॉन फक्त एक मिनिट उशिरा पोहोचला होता. खिशात पैसे नव्हते आणि पुढचे दोन दिवस बँक उघडणार नव्हती.
*****
त्या दिवशी झालेली ती चिडचिड एका जागतिक क्रांतीची ठिणगी ठरेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तो माणूस म्हणजे जॉन शेफर्ड-बॅरन. योगायोग बघा, जॉन यांचा जन्म आपल्या भारतातल्या मेघालयातील शिलाँगमध्ये १९२५ मध्ये झाला होता. बँकेचं दार तोंडावर बंद झाल्यावर जॉन घरी गेले, पण त्यांच्या डोक्यात एक विचार चक्रावून गेला.
****
त्या रात्री अंघोळ करताना त्यांना चॉकलेटच्या व्हेंडिंग मशीनची आठवण झाली. जर मशीनमध्ये पैसे टाकल्यावर चॉकलेट बाहेर येऊ शकतं, तर मशीनमधून पैसे का बाहेर येऊ शकत नाहीत? हा साधा विचार घेऊन जॉन बार्कलेज बँकेच्या व्यवस्थापकांकडे गेले. त्यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली.
****
२७ जून १९६७ हा दिवस बँकिंगच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. उत्तर लंडनमधल्या एनफिल्डमध्ये जगातील पहिलं एटीएम (Automated Teller Machine) बसवण्यात आलं. गंमत म्हणजे, तेव्हा आजच्यासारखी प्लास्टिकची कार्ड्स नव्हती. लोक एका विशिष्ट प्रकारचा, केमिकली कोडेड चेक मशीनमध्ये टाकायचे आणि मग मशीनमधून १० पाउंडची नोट बाहेर यायची.
****
जॉन यांना वाटलं होतं की एटीएमचा पिन सहा अंकी असावा. त्यांनी स्वतःच्या आर्मी नंबरवरून तसा विचार केला होता. पण जेव्हा त्यांनी ही गोष्ट आपली पत्नी कॅरोलिनला सांगितली, तेव्हा तिने एक साधी पण महत्त्वाची अडचण मांडली. ती म्हणाली, “सहा अंक लक्षात ठेवणं खूप कठीण आहे, मला फक्त चारच अंक नीट लक्षात राहतात. “
पत्नीचा हा विसरभोळेपणा म्हणा किंवा व्यावहारिक सल्ला, जॉन यांनी पिनची लांबी चार अंकांवर आणली. आज आपण गुगल पे असो वा डेबिट कार्ड, जो ४ अंकी पिन वापरतो, त्याचं श्रेय कॅरोलिन यांच्या त्या एका वाक्याला जातं. एका स्त्रीच्या सोयीसाठी बनलेला हा नियम आज जगाचं स्टँडर्ड बनला आहे.
****
ज्या एटीएमने आपल्याला रांगेतून मुक्त केलं, तेच एटीएम आता एका वेगळ्या वळणावर उभं आहे. आता आपल्याला रोख रकमेसाठी एटीएम शोधत फिरावं लागत नाही. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर असो वा मुंबईच्या खाऊ गल्लीत, खिशात पाकीट नसलं तरी चालतं, फक्त हातात मोबाईल आणि समोर एक क्यूआर कोड (QR Code) असला की काम फत्ते होतं.
****
डिजिटल पेमेंटच्या या लाटेत एटीएमची गरज हळूहळू कमी होताना दिसतेय. पूर्वी महिन्याच्या सुरुवातीला एटीएमबाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता दिसेनाशा झाल्या आहेत. बँकाही आता नवीन एटीएम मशीन बसवण्यापेक्षा डिजिटल ट्रान्झॅक्शनवर जास्त भर देत आहेत.
****
एकेकाळी क्रांती घडवून आणणारा हा ‘जादुई डबा’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे का? कदाचित काही वर्षांनी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सांगावं लागेल, “बाळा, पूर्वी पैसे काढायला रस्त्यावरच्या एका मशीनपाशी जावं लागायचं आणि तिथे एक विशिष्ट आवाज यायचा जो ऐकून खूप समाधान वाटायचं. “
****
काळ बदलला की गरजा बदलतात आणि तंत्रज्ञानही. ज्या जॉन शेफर्ड-बॅरन यांनी आपल्याला २४ तास पैसे मिळण्याची सोय करून दिली, त्यांच्या त्या कल्पनेने बँकिंग सोपं केलं. पण आज मोबाईलच्या एका क्लिकवर होणारे व्यवहार पाहता, एटीएम हे मशीन लवकरच इतिहासाच्या पुस्तकात जमा होईल असं वाटतंय.
☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
(पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
धर्मसंबंधीच्या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्पना आता लयास जावयास हव्यात. धर्मसंबंधीच्या साऱ्या पंथनिष्ठ, जमातनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ कल्पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्येक जाती-जमातीचा फक्त स्वतःचा असा एकेक विशिष्ट देव असावा आणि स्वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्हावयास हवी. असल्या सगळ्या कल्पनांचा सपशेल त्याग करावयास हवा.
धर्मांनी समावेशक वृत्ती धारण केली पाहिजे, ईश्वरविषयीच्या त्यांच्या विशिष्ट कल्पना इतरांहून वेगळ्या आहेत एव्हढ्याचसाठी त्यांनी तिरस्काराने एकमेकांना तुच्छ न लेखले पाहिजे. मी आपल्या आयुष्यात अशी कितीतरी धार्मिक माणसे पाहिली आहेत, अशी समंजस माणसे पाहिली आहेत की ज्यांचा ईश्वरावर, आपण त्या शब्दाचा जो अर्थ करतो त्या अर्थाने मुळीही विश्वास नाही. कदाचित तुम्हा-आम्हाला कधी कळू शकला असेल त्यापेक्षा कितीतरी चांगल्या रीतीने ईश्वर त्यांना कळला आहे.
धर्मांनी, त्यांच्या ठायी प्रचंड शक्ती वसत असल्यामुळे, जगाचे भले करण्यापेक्षा त्याचे नुकसानच जास्त केले आहे, आणि असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा संकुचितपणा आणि विशिष्ट सीमांमध्येच घुटमळत राहण्याची त्यांची प्रवृत्ती.
– स्वामी विवेकानंद (पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
लेखक: स्वामी विवेकानंद
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ # चहाच्या कपातले वादळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
अन चहाच्या कपात वादळ उठले… निमित्त तिचे माझे भांडणाचे झाले… शब्दाने शब्द वाढत गेला.. ना तिने खाली पडू दिला ना मी सोडून दिला… विषय तसा क्षुल्लक होता. नेहमी सारखा वादाला तोंड फोडणारा… तू तू त मैं मैं ने कागाळीला संथ सुरवात झाली… आणि हळूहळू ती तारसप्तका पर्यंत पोहचली… तुमचं हे नेहमीचंच असं असतं आपलं तेच खरं मानायचं… जरा म्हणून कुठे बायकोचं ऐकाल तर शपथ… आम्ही मेलं राब राब राबायचं नि वरती मनं मारायचं… तुम्हाला हवं ते करू द्यायचं आणि आम्ही ब्र सुद्धा काढायचा नाही… बायको म्हणून काही कदर राहिली नाही. मोलकरीण म्हणूनच किंमत दिली गेली… आता अडलयं माझं खेटर… तुम्ही आता खुशाल राहा तुमच्या घरी.. ही मी निघाले माझ्या माहेरी… मग लवकरच कळेल बायको म्हणजे काय चीज असते… तिच्या शिवाय घरी दारी दुसरं कोण झिजते… किती दिवस माझ्या विना इथं तोऱ्यात राहाल… दोन वेळेचे जेवणाचे नि तिनत्रिकाळ चहाचे मिळायचे झाले कि वांधे मग कोण पुसेल तुमचे हाल… फोनवर फोन निरोपावर निरोप धाडाल मला.. सुसरबाई तुझी पाठ बरं मऊ चल ना आता आपल्या घरला… समझोताचा आवाज नरम आला… जावा जावा माफ केले मी तुम्हांला चला आताच येते तुमच्या बरोबर आपल्या घरला… असा तर्हेने वादाचे काटे गळून गेलेल्या प्रीती च्या गुलाबाचा सुंगध पुन्हा दरवळला… अंदर कि बात सांगु का तुम्हाला..
खरं म्हणजे माहेरी जाण्याचा आततायी निर्णयाने माझाही जीव होता चुटपुटला… कसे राहतील घरी धनी माझ्यावाचुनी.. तनाने मी माहेरी नि सासरी मन तगमगुनी… वाट पाहत बसले कधी येतील मला न्यायला… कोणी काही म्हणोत भांड्याला भांड लागतचं कि संसारातल्या खऱ्या प्रेमाला तेव्हा तेव्हा अशी चहाच्या कपातली वादळं उठंत असतात… कुणीच हारत नसतात आणि जिंकत तर त्याहूनही नसतात…