शेवटी आज रेवानं दरवाजा उघडला. काय करणार? प्रोजेक्टची डेडलाईन. रियाच्या एक्झॅम्स.
निखीलच्या टूर्स… कुठल्या तोंडानं ” आली माझ्या घरी ही दिवाळी.. ” म्हणणार?
दुनिया सोचती है, आयटीवाल्यांची काय? रोजच दिवाळी..
जिसकी जलती है जान…. जान दो. आजचा रविवार कारणी लावायचा. तिघांचं अमेझिंग शॉपिंग दोन दिवसांपूर्वीच झालेलं.. अँमेझाॅनवर.. आँनलाईन. हल्ली शाॅपींग काय, दर आठवड्याला चालायचं.
दिवाली तो बहाना है…
कुठल्यातरी कंपनीवाल्या लोकांनी, घराची सफाई करून दिलेली. रियानं तर रेडिमेड किल्लासुद्धा आणून ठेवलाय गॅलरीत. फराळ सुद्धा आँनलाईन आँर्डर करून ठेवलाय. सिर्फ चकली छोड के..
– – खरं रेवा तशी हौशी कलाकार. ही आँनलाईन दिवाळी तिला फारशी आवडायची नाही. सगळं चकचकीत असलं, तरी तो दिवाळीचा आनंद आँफलाईन झालेला.. ईस बार नही.. निदान चकल्या तरी घरी करायच्या. थोडा तरी दिवाळीचा फील यायला हवा.. रेवाला स्वतःची ईनव्हाॅल्व्हमेंट हवी होती, दिवाली सेलीब्रेशनमध्ये. चार दिवस फोनाफोनी चाललेली. निखिलच्या आईनं सांगितलं तसं मिक्श्चर. कालच भाजणी दळून आणलेली.
स्टीलच्या सोऱ्यातून सहज गोल गोल चकल्या पडू लागल्या… किती सोप्प झालंय…
रेवाला ती लहान असतानाची दिवाळी आठवली. जड लाकडी सोऱ्यातून, दात ओठ खावून चकली पाडणारी, रेवा…, , रिया आणि निखील पण सपोर्टला होतेच. छोटी रिया बटर पेपरवर, गोल गोल चकल्या पाडू लागली… रेवाला लहान झाल्यासारखं वाटलं. रेवा अन् निखिल चकल्या तळू लागल्या. खमंग वास सुटलेला. रेवाच्या हेअरडूवाल्या काही चुकार बटांनी त्यांची जागा सोडलेली. त्या घुंगराली बटांनी, मध्येच रेवाच्या हातांनी, ओल्या भाजणीचं लोशन लावलं. या अवतारात रेवा क्युटच दिसत होती.
.. प्रिन्सेस रियाचंही चकली करतानाचं सेल्फीसेशन झालं. निखिलसे रहा नही गया.. त्यानं पटकन् रेवाचा अन् त्याचा सेल्फी घेतला.
एकंदर प्रोजेक्ट चकलीचं टीम वर्क जोरात चाललेलं… हसत… खिदळत… आत्ता कुठं दिवाली माहौल वाटत होता… टी. व्ही, लॅपटाॅप, सेलफोन सगळे सगळे पडिक झालेले.. खमंग चकलीचा घमघमाट सुटलेला… सऽही दिवाली माहौल क्रियेट झालेला.
बस… रेवाला हेच तर हवं होतं. आता खरं दिवाळी आल्यासारखं, वाटत होतं. निदान चकल्या तरी झाल्या हे बघून, रेवा चकल्यांसारखी खुशखुशीत झालेली.
रियानं पटकन् डिश घेतली. चकल्या ठेवून खायला सुरवात. एकीकडे चकल्या तळणं चाललेलं. दुसरीकडे आँनलाईन चकली खाणं.. बढिया….
जमली.. चकली छानच झालेली. चटक मटक चकली.. रेवा जाम खुश… तिला ही खुशी कोणाबरोबर तरी शेअर करावीशी वाटू लागली. आईची सवय आठवली.
…. तिनं पटकन् एक डिश घेतली. पाच सहा चकल्या ठेवल्या. अन् शेजारच्या फ्लॅटची बेल दाबली.
साठेकाकू… रेवाच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या… दोघचं दोघं. त्यांचा मुलगा स्टेटस् मध्ये.
गेल्या सात वर्षात सात मिनटंही बोलणं झालं नव्हतं..
रेवाच्या कामाच्या वेळाच… रेवाचं हे असं वागणं.. खरं तर हे फ्लॅटकल्चरमध्ये न शोभणारं… तरीही..
(आजोबा सांगत, ’ माझ्या आजारामुळे फार नुकसान झालं माधवचं. म्हणून तर त्याने सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित केलं बरं सारंग. तू खूप शिकावंस, घराण्याचं नाव पुढे न्यावंस हे ध्येय होतं त्याचं. त्याने फार सोसलंय रे पोरा. त्याला यश दे.’) – इथून पुढे —–
…. आजोबा अचानक एक दिवस झोपेतच गेले. त्या घरात मग राहिले फक्त माझे आईवडील. मला त्यांनी रत्नागिरीला वसतिगृहात ठेवलं. माझी तीव्र बुद्धी बाबांच्या लक्षात आली होती. मी बोर्डात दुसरा आलो… मग मी मुंबईला गेलो. अतिशय धडपड करून, शिकवण्या करून, कॉलेजच्या मेसचे हिशेब ठेवून, त्या बदली जेवण फुकट मिळे. असा पैसे मिळवत, पूर्ण स्कॉलरशिपवर डॉक्टर झालो. मला आणि माझ्या गरीब आईवडिलांना अभिमान वाटावा असं यश मिळवत गेलो मी.
…. हे मी प्रौढीने नाही सांगत हो, पण ही वाट सोपी नव्हतीच आम्हा कोणालाच. मग मी न्यूरो सर्जरीत एम एस केलं. बँकेचं कर्ज काढलं आणि इकडे आलो. पुन्हा इथे चार वर्षे शिकलो. शेवटच्या वर्षी मात्र गोल्ड मेडल मिळवणारा एकटा भारतीय विद्यार्थी होतो मी.
…. मग मात्र मला अजिबात कष्ट झेलावे लागले नाहीत. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बोलावणी येऊ लागली आणि मी इथे स्थिरावलो. हे शहर फार आवडलं मला. भरपूर पगार सुंदर काम. आता मात्र यशाचे दरवाजे उघडे केले मला देवाने…
…. माझ्याबरोबर माझी सहकारी म्हणून सिल्व्ही होती. अत्यंत गरिबीतून जिद्दीने वर आलेली सिल्व्ही. जमैका सारख्या देशातून आलेली. उपाशी राहून एकवेळ जेवून आपलं शिक्षण पूर्ण करणारी सिल्व्ही. तिलाही न्यूरो सर्जरीची ही फार अवघड ब्रॅंचच हवी होती. ज्यात मुली सहसा जात नाहीत.
पण सिल्व्हीचे यशच इतके उत्तुंग होते की तिला इकडे सहज प्रवेश मिळाला… आम्ही कधीतरी कॅफे टेरियात भेटत असू. लाजरी, अबोल, कायम दडपलेली आणि आपल्या वर्णामुळे सतत कॉम्प्लेक्स बाळगणारी सिल्व्ही फार गुणी होती… कोणात न मिसळणारी, अभ्यासू आणि एकटीएकटी रहाणारी.
…. तो दिवस अजून आठवतो मला… एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मी करत होतो. सिल्व्ही माझी फर्स्ट असिस्टंट होती… निम्मी शस्त्रक्रिया झाली आणि अचानकच मला चक्करआली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. भूल देणारे डॉक्टर, असिस्टंटस् नर्सेस सगळे घाबरून गेले. पेशंट तर अजून भूलीखालीच होता. अजून थोडी शस्त्रक्रिया बाकी होती. मला पटकन उचलून इमर्जन्सी मध्ये ऍडमिट केलं… सिल्व्ही माझ्या जागेवर आली. शांतपणे तिने ऍनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टरांना खूण केली की ‘ ऑल ओके? शाल आय कंटिन्यू? ’
– – तिने ती शस्त्रक्रिया अतिशय कुशलतेने पार पाडली. अतिशय उत्तम रीतीने तिने ही उदभवलेली परिस्थिती हाताळली. शेवटचे टाके घालताना मात्र सर्व थिएटरने टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं.
.. रोज राऊंड घेत असताना ती मला सगळा फीडबॅक देत होती. तो पेशंट उत्तम बरा झाला. बंद थिएटर च्या दाराआड काय काय होत असते याची कोणाला कल्पना सुद्धा येत नसते.
. तो पेशंट पूर्णपणे बरा होऊन घरी गेला.
…. दरम्यान सिल्व्ही माझ्याजवळ मोकळी होत गेली. सिल्व्ही अनाथाश्रमात वाढली. चर्चच्या ऑर्फनेज मध्ये काढलेले दिवस मला सांगताना तिला अश्रू आवरत नसत. अत्यंत तल्लख बुद्धी घेऊन जन्माला आलेली सिल्व्ही अपार कष्ट करून इथपर्यंत आली. तिची रेखीव चर्या, चेहऱ्यावरचं हुषारीचं तेज मला भुरळ घालू लागलं.
…. एक दिवस मला म्हणाली, “ माझी आई नक्की गोरी आणि वडील आफ्रिकन काळे असतील ना? म्हणूनच मी खूप काळी नाही झाले. आणि हे घारे डोळे पण माझ्या गोऱ्या आईचीच देणगी मला दिलेली. ”.. हसून सिल्व्ही म्हणे. माझ्या पोटात अपार प्रेम दाटून येई या मुलीसाठी.
…. मी या गुणी मुलीच्या चक्क प्रेमात पडलो. सिल्व्हीला मी प्रपोज केलं.
तिने मला पटकन होकार दिला नाही. म्हणाली ” तू इंडियन आहेस ना? तुमच्या व्हॅल्यूज वेगळ्या असतात कॅरी…” मला हॉस्पिटलमध्ये करकरेन म्हणता कॅरीच म्हणतात लोक.
.. तर सिल्व्ही म्हणाली “मला पूर्ण आदर आहे इंडियन लोकांबद्दल. पण तुझे आईवडील तयार होणार नाहीत मला स्वीकारायला. आणि तेही सहाजिकच आहे कॅरी. तू तुमच्यासारखी इंडियन मुलगीच बघ. तू जास्त सुखी होशील आणि तुझ्या आईवडिलांनाही सुखी करशील. ”
.. पण मी तिच्या प्रेमात आणि गुणांत आकंठ बुडालो होतो.
.. मी जर भारतात कधीही परत जाणारच नव्हतो तर मला काय फरक पडणार होता सिल्व्ही काळी आहे का गोरी आहे का मिक्स आहे याचा? .. उरला प्रश्न माझ्या आईवडिलांचा. मलाही खूप टेन्शन आलं की कोकणातले दशग्रंथी कर्मठ ब्राम्हण असलेले माझे वडील हे मान्य करतील का? आई काय म्हणेल?
इतर नातेवाईक काय म्हणतील? मी माझ्या आईवडिलांना हे काहीही न सांगता त्यांना अमेरिकेला या असं सांगितलं.
…. शेजारच्या बापू साठेला पैसे पाठवले आणि पासपोर्ट व्हिसा सगळयाला माझ्या वडिलांना मदत करायला सांगितलं. त्यानेही सगळं काही केलं आणि मग मी आईबाबांना तिकीट पाठवलं. बापू साठेने त्यांना मुंबई एअरपोर्टला बसवून दिलं.
– – आईबाबा जन्मात पहिल्यांदा विमानात बसले. मी त्यांना एअरपोर्टवर उतरवून घ्यायला गेलो. मला बघून त्यांना आनंदाने रडूच आलं. माझी मोठी गाडी, घर बघून त्यांना धन्यधन्य झालं. “जिंकलंस रे पोरा. शाबास.! “ बाबांनी पाठीवर हात ठेवून म्हटलं. मला आमच्या कुलदैवताचा नीळकंठेश्वराचाअंगारा लावला.
…. संध्याकाळी आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे सिल्व्ही आली. “. नमस्कार आईबाबा. कसा झाला प्रवास? ” तिने हसतमुखाने विचारलं.
“ ही कोण? “ आईबाबांनी विचारलं.
“ मी सिल्व्ही. ” इंग्लिशमध्ये उत्तर देत ती म्हणाली, “ मी कॅरीबरोबर त्याच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. आज तुम्ही येणार म्हणून सुट्टी घेतली आम्ही. ” सिल्व्ही म्हणाली.
आईबाबांना तिने तिच्या कारमधून मॉलमध्ये नेलं. सगळं छान दाखवलं. आईला एस्केलेटर मध्ये कसं चढायचं ते दाखवलं. पटापट ग्रोसरी घेतली. आईबाबांना मजा वाटली. तिने त्यांना माझ्या घरी सोडलं आणि ती निघून गेली.
“सारंग ही मुलगी कोण? तू हिच्याशी लग्न तर करणार नाहीस ना बाबा? ही तर धड गोरी नाही की काळी नाही. कशी काय चालणार आपल्या दशग्रंथी घराण्यात? ” बाबांनी क्षणभरही उसंत न घेता विचारलं.
.. त्यांनी बॅगेतून तीन चार फोटो माझ्या पुढे टाकले. “ बघ बघ या मुली. ही परांजप्यांची मेधा, ही भाटे.. डॉक्टरांची अश्विनी. बघ. अगदी योग्य आहेत तुला. उगीच कसले तरी धाडस करू नको बाबा. ”
मला हे सगळं अपेक्षितच होतं.. मी फक्त आईकडे बघितलं. आई हसली. म्हणाली, ” अहो. ठेवा ते फोटो बॅगेतच. या मुली ना, आपल्या कोकणातच ठीक आहेत. त्यांचा इथे निभाव लागणार नाही. ही अमेरिका आहे आणि आपला मुलगा मोठा सर्जन आहे. त्याला या मुलीने किती समर्थपणे मदत केली आणि ते मोठे ऑपरेशन पूर्ण केलं हे सांगितलंय मला सारंगने. कमाल वाटली मला या पोरीची. प्रेम आपुलकी सगळं सगळं आहे हिच्याकडे. शिवाय आपल्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून शिकलीय सुद्धा. उगीच खोडे घालू नका. गुंतले आहेत हे दोघे मनानं बरं. ”
“ सारंग, तू खुशाल लग्न कर सिल्व्ही शी. आम्हाला पसंत आहे हो ही मुलगी. अरे, मनं गुंतली आहेत ना तुमची? मग आता मागे नको बघू. नातेवाईक आणि लोकांचा कसला विचार करतोस पोरा? आम्ही इथे आलोच आहोत तर बाबा देतील की विधिवत लग्न लावून. काय हो? काय म्हणता? ”.. आईने मला दिलासा दिला.
.. क्षणभर विचार करून बाबा म्हणाले, “ ठीक आहे रे. तू सुखी तर आम्ही सुखी. खुशाल करा लग्न. पार्वतीबाई, पटलं बरं तुमचं म्हणणं. या मुली इथे योग्य नाहीत. त्या कोकणातच ठीक. इथे ही सिल्व्हीच अगदी योग्य आहे हो. ”
पुढच्या महिन्यात आई बाबांनी आमचं विधिवत लग्न लावून दिलं. आणि ते निश्चिन्त मनाने भारतात परत गेले.
– – डॉक्टर सारंग ही हकीगत आम्हाला सांगत होते. ” मावशी, या निर्णयाचा आम्हा दोघांनाही कधीही पश्चाताप झाला नाही. वीस वर्षे झाली आमच्या लग्नाला. दुर्दैवाने चार वर्षांपूर्वी माझी आई अचानकच लहानशा दुखण्याने गेली. आणि मग बाबाही फार राहिले नाहीत. पण मला खूप समाधान आहे की माझं हे वैभव, बायको मुलं बघूनच समाधानाने ते गेले….. मावशी, तुम्हाला त्या लग्नात बघितलं. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या जावयाशी लेकीशी अगदी प्रेमाने बोलत होतात ना, ते बघून मला माझ्या आईचीच आठवण झाली… ती नसती ना तर कदाचित सिल्व्ही पटली नसती बाबांना. पण माझ्या चतुर आईने हे ओळखून माझं लग्न लावून दिलं… काकू खरंच सांगतो.. तुमच्यात माझी आईच दिसली मला. म्हणून मी बोलावलं तुम्हाला… माझी नाळ तर भारताशी पूर्ण तुटलीच आहे आता. माझं तिकडे कोणीच नाही आता. ” डॉक्टर सारंग स्तब्ध झाले.
– – मी त्यांच्या जवळ बसले… ” हे बघ मुला, खूप छान वाटलं तुला भेटून. अशी कर्तृत्ववान मुलं फार कमी असतात रे. खूप चांगलं केलंस तू आम्हाला भेटायला बोलावलंस, मन मोकळं केलंस ”.
…. सिल्व्ही माझ्याजवळ येऊन बसली. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. भाषेपलीकडची भाषा सिल्व्हीला समजत होती… त्या दोघांनी पुन्हा मला वाकून नमस्कार केला.
“ मावशी, फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून. माझी आई भेटल्याचं समाधान मिळालं मला. पुन्हा आलात की नक्की नक्की या. ” असं मनापासून म्हणत डॉ सारंग आणि सिल्व्हीने आम्हाला निरोप दिला.
आज नवरात्र सुरू होतय्. मी एकदम खुश होते. आधीच ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी, देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ह्यांना विचारण्यात काहीच पॉईंट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे. माझ्या जाण्यात पण त्यांनी खो घातला असता.
आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून मोठया बॅगेत भरून ठेवल्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. आता ‘नो फूट् वेअर फॉर नाईन डेज्’. नो स्लीपर्स ऑलसो’.
आजचा रंग निळा होता. निळ्या रंगाची साडी /मॅचिंग ब्लाउज /मॅचिंग पर्स / मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण असते, असो. मुलीला येते कां? विचारले, तर चक्क ‘हो’ म्हणाली.
मुलगी : आई, मी येतेय्, पण, साडी बीडी – नो वे, रंगाचे बंधंन – नो वे, आणि मी पायात बुट घालणार. कबूल असेल, तर बोल?
मी : अग, मनू, ९ दिवसांचा तर प्रश्न आहे! इतर वेळा आम्ही तुला काही म्हणतो कां?
मी : (मनात) आणि म्हणूनहि, ही कुणाचं ऐकते कां? ह्यांचे आणि सासूबाईंचे, तिचे नेहेमी अतिच लाड असतात!
मुलगी : अगं, साडीचं फार ओझं होतं. पॅन्ट आणि टी शर्ट नी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फुटपाथवरच्या फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. कुत्री फिरवणाऱ्यांच्या कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. परदेशात लोक कुत्री फिरवतात, ते बघून इथे पण लोक कुत्री फिरवायला लागले. ते लोक शी गोळा करायला प्लॅस्टीक पिशवी बरोबर नेतात, पण आपल्याला ते कमीपणाचे वाटते. रस्त्यावर अधे-मधे दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काच गेली म्हणजे संपलेच. आई, अनवाणी चालण्याचं, तू पण जरा जास्तच करते आहेस!
मी विचार केला, मुलगी देवीला यायला तयार झाली, हेच खूप झाले. आम्ही दोघी तयार झालो. निघतांना यांना ‘आम्ही जाऊन येतो’ असे सांगितले. तर, हे म्हणाले, ‘देवीला जाताय, का, फॅशन शो ला जाताय’? मी स्वत:कडे बघितले आणि लक्षात आलं, की गळा आणि पाठ जरा जास्तच मॉडर्न आहेत आणि स्लीव्हलेस प्रकार देवीला आवडेल ना? असा पण विचार मनात डोकाऊन गेला. बाय करून, दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालतांना पाहून छान वाटले. दर्शन घेऊन घरी आले. कपाटातली दुसरी निळी साडी काढली आणि ऑफीसला गेले. ऑफीसमधे ८-१० जणी निळ्या साडीत होत्या. अनवाणी मात्र मी एकटीच होते. बॉसनी आणि सगळ्यांनीच त्याबद्दल माझं कौतुक केलं.
सगळ्या म्हणाल्या, सकाळी देवीला अनवाणी जाऊन आलो. बाहेर फारच घाण असते. आता इतर ठिकाणी पायात घातलय, का नाही, हे बघायला देवी कशाला येतेय. त्यामुळे इतर वेळेला आम्ही पायात घालणार.
दिवसभर उपास असल्यामुळे, दुपार नंतर पोटात कावळे काव-काव करायला लागले होते, पण रात्रीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी भाजी आणायला साडी बदलून बाहेर पडले. आज या-ना-त्या कारणानी निळ्या ५ साडयांना बाहेरची हवा लागली. रात्री दिवसांच्या रंगाप्रमाणे, रोज नेसायच्या साडयांचे गठ्ठे करून ठेवले. रोज ५-६ साडया नक्कीच नेसता येतील. अशा रितीनी नवरात्राची सुरूवात छान सुरू झाली.
रोज सकाळी देवी दर्शन, दिवसाच्या रंगाप्रमाणे साडी, अनवाणी बाहेर पडणे, आणि दिवसभर उपास, असे रूटीन सुरू होते. जरा हटके, म्हणून २-३ दिवस छान वाटले. नंतर नंतर, उपास आणि अनवाणी चालणे, याचा त्रास व्हायला लागला. पण आता रेटण्याशिवाय पर्यायच नव्हता.
म्हणता म्हणता नवमी उजाडली. आज गुलाबी रंग होता. आज सुटी घेतली होती. त्यामुळे माझ्या सगळ्या गुलाबी साडया नेसायला, आज भरपूर चान्स होता. सकाळी जरा लवकरच तयार होऊन, देवळात जायला बाहेर पडले. आज मुलीला वेळ नव्हता, त्यामुळे एकटीच होते. देवळात बऱ्याच स्त्रिया दर्शन घेऊन, गाभाऱ्याच्या बाहेर हात जोडून बसल्या होत्या. मी पण पाठ टेकता येईल, अशी जागा बघून, हात जोडून, डोळे मिटून बसले. केव्हा तंद्री लागली समजलेच नाही ~ ~ ~
कोणीतरी डोक्यावर प्रेमानी हात फिरवतय, असा भास झाला. डोळे उघडून बघितलं, तर समोर साक्षात देवी. मी स्वत:ला चिमटा काढायला हात वर उचलला, तर देवी म्हणाली, चिमटा काढून खात्री करण्याची गरज नाही. देवीच तुझ्यासमोर आहे.
देवी : ८ दिवस उपास करून, अनवाणी चालून, खूप दमलेली दिसतेय.
मी : दिवसभर ऑफीसचे काम, नंतर घरचे काम आणि पोटात काही नाही, यामुळे अशक्तपणा वाटतोय आणि अनवाणी चालल्यामुळे टाचा आणि तळवा पण दुखतोय.
देवी : अगं, पण हे सगळं केल्यामुळे मी प्रसन्न होते, असं तुम्हाला कुणी सांगितलं?
मी : देवीमाते, सगळेच सांगतात. पुर्वीपासूनची तशी प्रथा आहे. हे व्रत केल्यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपले इच्छित प्राप्त होते, असे पण सगळे सांगतात.
देवी : जगामधे असे असंख्य लोक आहेत, की, जे स्वत: करता चप्पल विकत घेऊ शकत नाहीत. महिनों-महिने ते अनवाणी चालत असतात, नवरात्रात पण ते अनवाणीच असतात. नवरात्रात अनवाणी चालण्यामुळे, जर मी प्रसन्न होत असते, तर त्यांच्यावर प्रसन्न झाले नसते कां? कित्येक लोकांना, अनेक दिवस एक वेळचे जेवणच नशीब असते, त्यांचे कायमच उपास घडत असतात, त्यांच्यावर मी प्रसन्न झाले नसते कां? तुम्ही लोक जुन्या परंपरा-रूढी आचरणात आणण्यापूर्वी, त्यावर थोडा विचार का करत नाही?
मी : देवीमाते, मग अशा परंपरा तयार कां झाल्या?
देवी : निरनिराळ्या काळांमध्ये, तेव्हाचा संदर्भ लक्षात घेऊन, लोकांचे त्रास दूर करण्याकरता, लोकांना आनंदात ठेवण्याकरता, तेव्हाच्या संतांनी / ज्ञानी लोकांनी उपदेश केलेले असतात. कांही वेळा असे उपदेश, ज्ञानी लोक मुद्दामच देवतांशी / धार्मिक विधिंशी जोडतात, जेणेकरून लोक उपदेशांचे पालन करतील. काळ पुढे पुढे जात जातो आणि संदर्भ मागेच राहतात. काळाप्रमाणे उपदेशांचे भाषांतर बदलत जाते, त्यातले शब्द बदलतात आणि पुढे काय येते तर — नवरात्रात अनवाणी चाला, रोज उपवास करा, रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसा, आणि अशा परंपरा-रुढी तयार होतात. आणि हे कां करा, तर देवीला प्रसन्न करण्याकरता.
नवरात्रात अनवाणी चालण्याऐवजी, जो चप्पल विकत घेऊ शकत नाही, अशा कुणाला, तुम्ही चप्पल देऊन, त्याला अनवाणी चे वाणी (अनवाणी च्या विरूध्द वाणी) केले, तर ते मला आवडेल. नवरात्रात उपवास करण्याऐवजी, एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देऊन, त्याचा उपवास बंद करायला मदत केली, तर ते मला खूपच आवडेल. अशा गोष्टी नवरात्रात करा, दिवाळीत करा, गणपति उत्सवात करा, आणि शक्य असेल तर नेहेमीच करत जा. हीच माझी खरी पुजा समजा, हीच मला नेसवलेली साडी समजा, हाच मला चढवलेला भोग समजा.
नवरात्रात तुम्ही रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसता, हे छानच आहे. नेहेमीच असे कलरफूल रहायला पाहिजे. स्त्री ही प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतिक आहे. निसर्ग जसा रंगांनी भरलेला असतो, तसे मन रंगीबेरंगी ठेवा. जिथे जाल, तिथे आनंद पसरवा, प्रेम पसरवा. तुमचे सौंदर्य तुमच्या कृतिमधून दाखवा, चेहऱ्यावर हास्य ठेऊन दाखवा. त्याकरता अंगप्रदर्शन करण्याची किंवा तू घातले आहेस तसे लो-नेक आणि हाय-बॅक कपडे घालण्याची गरज नाही. स्त्रीयांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्याचे एक कारण आहे, तुमचे वाढते अंगप्रदर्शन! आजपासून आंधळेपणाचे कोणतेहि अनुकरण थांबवा. रूढी-परंपरा-धार्मिकविधि यामधे दडलेला अर्थ शोधा. जे मनाला पटेल, ज्यानी मन आनंदित होईल, ज्यानी इतरांना आनंद मिळेल, अशाच गोष्टी करा. आणि मग अनुभव घ्या, की परमानंद ही काय चीज असते. आणि परमानंद म्हणजेच ईश्वरप्राप्ति.
असे म्हणून देवीनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ~ ~ ~ ~
कोणीतरी मला हलवत होते. त्यामुळे माझी तंद्री मोडली. घंटांचा आवाज येत होता. आरतीची वेळ झाली होती. आरती झाली. प्रसाद घेतला. देवीला नमस्कार करतांना असं जाणवलं, की, देवी मंद स्मित करत मला आशिर्वाद देते आहे. देवीनी आज ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला होता.
उद्यापासून कसे वागायचे, कसे रहायचे, याची मनात उजळणी करत, आणि आपल्याला ईश्वर प्राप्ति झालीच आहे, अशा आनंदात घराकडे निघाले.
राजूपेक्षा माझी सर्विस बरीच जास्त. जवळपास वीस वर्षे. अजूनपर्यंत एकही अपघात नाही. कृष्णामाईची कृपा….
राजू तसा ज्युनियर. बहुधा दहा बारा वर्षे सर्विस. एसटीच्या सर्विसमधे, आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारी, फार कमी लोक पाहिलीयेत. त्यात राजू नं 1. खरंच प्रवाशाला देव मानणारा. एखाद्या म्हातारीला हात देवून गाडीत चढवणार. तिचं बोचकं, स्वतः गाडीत घेणार. चिल्लरला कधी नाही म्हणणार नाही. कुणाचा एक पैसा कधी बुडवणार नाही. जीभेवर साखर. सगळ्यांशी गोड बोलणार. कधी कावणार नाही.
तशी आमची ही जनता गाडी… हात दाखवा, गाडी थांबवा.. राजूनं कुठल्या प्रवाशाला, कधीही नाही म्हणलं नाही. गाडीतल्या पोरीबाळींना, पोटच्या पोरींसारखं जपायचा.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट.
सोमवारचा दिवस. बाजाराचा दिवस. गाडी खचाखच भरलेली. काॅलेजातल्या पोरी. काही ईरसाल पोरं सुद्धा.
चेकाळलेली… आचकट विचकट बोलणं सुरू झालेलं. राजूनं आडवा उभा झाडला त्यांना. त्यांचा म्होरक्या.
उगाच नडायला बघत होता. म्होरक्यानं फोनाफोनी केली. पुढच्या स्टाॅपवर, त्याचे दहा बारा पंटर, हातात दंडुके घेवून ऊभे.
…. मी केबिनमधूनच ओरडलो,
” राज्या, गाडीतल्या म्होरक्याला सोडू नकोस. मी गाडी घेतो पोलीस स्टेशनला. “
.. राजूला त्या म्होरक्याचीच काळजी.
” नको नको. उगा केस झाली तर, साल बरबाद होईल त्याचं. आईबाप रोज रानात राबतात, अन् याची फी भरतात. याला काय नाही, पण आपण फिकीर करायला हवी. काय हुईल ? पाठीत दोन चार रट्टे बसतील.
बसू देत. ह्यो आणि ह्याची गँग.. समजुतीचे चार शब्द सांगून बघतो. नाहीच भागलं, तर होऊन जाऊ दे धूमशान… सरकारी कर्मचाऱ्यावर हात टाकला म्हणूनशान आत जातील पोरं. मंग आपला पण नाविलाज आहे… माझी काळजी करू नकोस. रोज तालमीत जातूया. बाप पैलवान होता माजा. माझा जीव वाचवता येतंय मला… जमलंच तर दोन चार रट्टे मीबी घालीन. “
…. म्होरक्याला अक्कल आली. शब्दांचा मार पुरला. प्रकरण मिटलं.
– – तेव्हापासून गाडीत कुठल्याही पोरीला कधीही, कसलाच त्रास झाला नाही.
.. राजूचा दराराच होता तसा. तो स्वतः रहायचाही अपटूडेट. मस्त इन केलेला शर्ट. पाॅलीश्ड बूट. केसांचा मस्त भांग. इस्त्री केलेला युनिफॉर्म.
‘ एवढ्याशा पगारात कसं काय परवडतं ?’ नाहीच परवडत….
“सौतासाठी नाही, यष्टीसाठी आपण अपटूडेट रहायला हवं. प्रवाशी खूष झालं, तर यष्टीचा इन्कम वाढणार. “
.. पदरमोड करून राजू बरंच काही करायचा. सहा वाजता गडी हजर व्हायचा. डेपो गाठून, गाडीची साफसफाई करून घेणार. स्वतःच्या खर्चाने, गाडीला पडदे लावून घेतलेले. ते वेळच्या वेळी धुवून आणायचा. सीडीप्लेयर लावलेला. चार ताजे पेपर, मासिकं. प्रवाशांना वाचण्यासाठी. गाडीत साईबाबांचा फोटो लावलेला. त्याला मस्त हार घालणार. उदबत्ती लावणार. छान भक्तीगीतांची सीडी लावणार. प्रसन्न वाटायचं. पब्लिक खूष.
त्याच्यामुळे मीही बदललो. मीही त्याच्यासारखाच अपटूडेट राहतो. पावणेसातच्या ठोक्याला गाडी फलाटावर लागते. सात म्हणजे सात… गाडी झोकात कराड स्टॅन्डहून निघते. प्रवाशांनी खचाखच भरलेली.
…. साहेब, तुम्हाला सांगतो, आमच्या गाडीची या रूटवर बुंगाट हवा आहे. लोक वाट बघत असतात आमच्या गाडीची. डेपोला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देते ही गाडी. निम्मे प्रवाशी आम्हाला दोघांना ओळखतात. पब्लिक जाम खुष आहे आमच्यावर.
म्हणून तर…
साडेपाच वर्ष झाली. आमची ड्युटी फिक्स आहे या गाडीवर.. राजू अन् मी. सख्खे भाऊच जणू.
तेरा मेरा साथ.. आणि आमची कराड – चिपळूण. जाऊ दे जोरात…
आजच काय झालं ? एक तर तेरा तारीख. तसा माझा विश्वास नाही. पण..
…. खूप वेळ राजूची वाट बघितली. खूप वेळा मोबाईल ट्राय केला. उचललाच नाही. शेवटी कंट्रोलरनं बदली कंडक्टर दिला. अन् निघालो..
गाडी नेहमीसारखीच झोकात चाललेली. पण गाडीत ‘जीव’ नव्हता.. नेहमीच्या प्रवाशांनी राजूची आठवण काढली.
काय सांगणार ? आम्हालाच ठावूक नाहीये.. बघता बघता पाटण जवळ येवू लागलं. अचानक माझा फोन वाजला. गाडी साईडला घेवून थांबवली.
कंट्रोलरचा फोन.
” आरं, राजूचा एक्सीडेंट झालाय. ड्यूटीवर येताना गाडी स्लीप झाली. डोक्याला मार लागला. अजून बेसुध आहे. काॅटेजला हलवलाय. “
– – मी हादरलो. थांबून चालणार नव्हतं. डोकं बाजूला काढून ठेवलं. उघड्या डोळ्यांनी, गाडी चालवू लागलो. नेहमीसारखा कुंभार्ली ओलांडला. गाडी चिपळूणात शिरली. अकरा वाजलेले. गाडी फलाटावर लावली. भानावर आलो…
…. ड्रायव्हरचा ‘माणूस’ झालो. नवीन जोडीदारास म्हणलं,
” तू घे जेवून. मी आलो डेपोत जावून. “
चिपळूण डेपोत गेलो. दत्तमंदिरात शिरलो.
” दत्तगुरू, सांभाळून घ्या.
आमच्या राजूला बाहेर काढा या संकटातून. “
*
अर्धा पाऊण तास झाला असेल. मला वेळेचं भानच नव्हतं. तसाच दत्तगुरूंपुढे बसलेलो. हातात डबा होता.
हिनं राजूभाऊजींसाठी, खास मटकी डब्यात दिलेली. अन् त्याचाच पत्ता नाही.
फोनची रिंग वाजली. दत्तगुरूंचं स्मरण करत, फोन उचलला.
राजूचा भाऊ फोनवर…
” सुद्धीवर आले हाईती. शीटीस्कॅन केलं. रिपोर्ट चांगले हाईती. धा टाकं पडलं कानामागं. मगाधरनं मागं लागल्याती. आप्पाला फून लावून द्या म्हणूनशान. घ्या बोला त्याच्यासंगट. “
…. माझे डोळे कुंभार्लीतला धबधबा झालेले. बदाबदा वाहू लागले.
राजू खोल आवाजात बोलू लागला.
” आप्पा करमतंय काय ? आज तारीख काय ?”
“ तेरा सात “.
“ आरं, तेरा साथ असा सोडीन काय ? टाकं काढलं की येतू ड्यूटीवर. तोवर सांभाळून घे. “
…. मला पुढे बोलताच येईना. फोन कट केला. आजची तेरा तारीख मला एकदम ‘शुभ’ वाटू लागली.
पुन्हा एकदा दत्तगुरूंचे आभार मानले. जेवून घेतलं. एक वाजता जोडीदारानं, डबल बेल मारली.
” चिपळूण – कराड” निघाली.
.. कधी एकदा कराडला पोचेन असं झालेलं. हायवेला लागलो.
आंघोळ करून आल्यावर कुंकू लावतांना तिचा हात थरथरला. ‘आता हे सौभाग्य लेणं म्हणजे… ‘तिला कापरं भरलं. डोळ्यांची तळी तुडुंब भरली. डॉक्टर म्हणाले होते, “फार हाल होताहेत तुमच्या मिस्टरांचे. त्यांचे हाल देवालाही बघवत नाहीयेत. माझ्याकडून मी प्रयत्न करतोच आहे पण.. बाकी सगळं त्या वरच्याच्या हातात आहे. ” डॉक्टरच ते! स्पष्ट सांगणं त्यांचं काम होतं, पण ते शब्द तिच्या कानात शिसासारखे ओतले गेले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
एकांतात ती खूप खूप रडली. पण मुलांकरीता तिने उसनं चंद्रबळ आणलं होतं. एकांतात तिचा बांध फुटायचा, भीषण भविष्याने तिचे हातपाय गळून जायचे. पण सगळ्यांसमोर अश्रू लपवून वरवर अभिनयाचा मुखवटा चढवावाच लागायचा.
दिवस जात होते. भाद्रपद आला. गौराईचा दिवस उगवला. तिच्या मनात काय आलं कोण जाणे, लगबगीने तिने गौरी समोर पांच सुवासिनींची ओटी भरली. ‘गौरायांनो दर वर्षी अशीच संधी, असाच सवाष्णीचा मान मला द्या. मला न्या, पण ह्यांचं आयुष्य वाढू द्या”.
आलेल्या पाचजणींनी मळवट भरून तिची साडी चोळीने ओटी भरली होती. आणि तो मळवट बघून कसे कोण जाणे तिच्या मिस्टरांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ते म्हणाले, “तु अशीच रहा. ”
पण… पण…. व्हायचं तेच झालं. दुर्दैवाने तिला मागे सोडून 58 वर्षाची साथ सोडून तिला पोरकं करून ते पुढे गेले. दुर्दैव तिचं.
दरवर्षीप्रमाणे तिला माहेरचं सवाष्णीचं बोलावणं भाचेसुने कडून आलं. मनातली खळबळ सांगायला मैत्रिणीसारखी वहिनी पण आता नव्हती. ती पण मैत्रीची साथ सोडून न परतणाऱ्या मार्गावर गेली होती. गौरीचं सवाष्णीचं आमंत्रण द्यायला आलेल्या भाचे सुनेला तिने दाटल्या कंठाने सांगितलं, “हे बघ, आता तू दुसरी सवाष्ण बघ. मी ही अशी ” —
तिला मध्येच अडवत भाचे सून म्हणाली, “आत्या, कोण म्हणतं तुम्ही सवाष्ण नाही, काकांनी तुम्हाला आहे तसं राह्यला सांगितलं होतं, मुलांनी पण मंगळसूत्र ठेवण्याचा आग्रह धरलाय, आणि हो काकांच्या आठवणींचं लेणं हे तुमच्यासाठी सौभाग्य लेणंच आहे नाही का! ते काही नाही, आमचा सगळ्यांचा हट्ट आहे दर वर्षी प्रमाणे माहेरवाशिण म्हणून सवाष्णीचा तुमचा मान चालूच राहणार आहे.
आणि आज गौराईचा प्रसाद घेऊन ती निघाली. हळदी कुंकवाला बायका आल्या होत्या. तिला कुंकू लावतांना एक जण कुजबुजली, “अगं पण आत्या तर…. ” दुसरीने तिला मध्येच दटावलं, पण ते वाक्य ऐकल्यावर ती कावरी बावरी झाली. सकाळपासून गप्पगप्पच होती ती.
भाचेसून हळदी कुंकवाचा करंडा घेऊन तिच्या पुढे उभी राहिली, आणि म्हणाली, “आत्त्या पदर पुढे करा, खणा नारळानी ओटी भरायचीय तुमची. “
क्षणभर ती गांगरली. डोळे पाणावले. कानाशी तिच्या ह्यांचा आवाज आला, ‘कसला विचार करतेस?मी सांगितलं होतं ना तुला, तू आहेस तशीच सवाष्ण म्हणूनच रहाणार आहेस. आणि आता तर नातेवाईकांनी, समाजानी पण ते मान्य केलय. आणि अगं वेडे, तुझ्या मनात, तुझ्याबरोबर तर कायम मी आहेच की. माझ्या आठवणींना, प्रेमाला सौभाग्य लेणंच म्हणायचं. ते तर कायम तुझ्याजवळ असणारच आहे. घे ती ओटी. ‘
आणि मग भाचे सुनेने पुढे केलेली ओटी घेण्यासाठी तिने पदराची झोळी केली. ताटकळलेली सून लगबगीने पुढे झाली.
आधुनिक पिढीने पाडलेला तो नवीन पायंडा होता. समाजाने मांडलेल्या जुन्या विचारांना मागे सारून नवीन विचारांची ती मांडणी होती. इतकंच काय, सुनेच्या भगिनी मंडळांनी पण ही प्रथा सुरू केली होती. काही दिवसापूर्वी त्या मंडळाच्या सहवासात तिने हे अनुभवलंही होतं. खरंच त्यांच्या ह्या आधुनिक विचारांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मनात प्रचंड पोकळी निर्माण झालेल्या एकटेपणाच्या भावनेने व्याकुळ झालेल्या दुःखी मनाला तो एक दिलासाच होता असंच म्हणावं लागेल नाही का!
आत्त्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भाच्याच्या चेहऱ्यावर आत्त्याने परिस्थिती स्विकारली म्हणून समाधानाची रेषा उमटली. कारण आत्याच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून तोही कावराबावरा झाला होता. प्रसंग वरकरणी साधा पण काळजाला हात घालणारा होता. तिच्या जखमी मनावर घातलेली ती ‘फुंकर’ होती. तिच्या मनात आलं, ह्या जवळच्या माणसांकरीता तरी आहे ते वास्तव आपल्याला स्वीकारायला हवंय, आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला हवं.
…. गौराईच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचा, श्रीगणेशाचा आशिर्वादाचा हात उंचावल्याचा तिला भास झाला आणि ती माहेरवाशीण गौरीपुढे नमस्कारासाठी वाकली.
कपाटातला कडक इस्त्रीचा ड्रेस तिने अंगावर चढवला आणि गाणं गुणगुणत आरश्यात बघत केस विंचरताना तिला मनात विचार आला, .. ’ हा ड्रेस जरा जास्तच भारी दिसतोय, एखादा साधासाच घालू या’ विचारात तिने परत घड्या खालीवर केल्या, .. मग तिची नजर सगळ्यात खाली फारच क्वचित घातलेला आणि माहेरचाच असलेला फिकट गुलाबी ड्रेस जो जास्त वापरलाच नाही गेला त्यावर पडली, …. हाच घालू म्हणत तिने तो घातला आणि परत आरश्यापुढे उभी राहिली, ..
“मुळात रूप सुंदर असल्याने ड्रेस स्वस्त असो नाहीतर महाग जातीच्या सुंदराला काहीही शोभतं त्यामुळे अनु ड्रेस नक्की शिव बरं का.. ” म्हणत मामीने मंगळागौरीला हा ड्रेस देऊन ओटी भरली होती आपली, .. आजी आणि मामी तेंव्हा दोघी गळ्यात पडून खुप रडल्या होत्या, …. “तुझ्या घराण्याला साजेसं प्रत्येकवेळी नाही ग देता येणार आता असं आजी सारखी म्हणत होती, .. “
आपणही किती बदललो खरंच हा ड्रेस ह्या सगळ्या श्रीमंत कपड्याखाली हरवून टाकला, .. खरंतर वर्ष झालं असेल पण आजही आजीचा केवड्याचा गंध आहे याला, … तिच्या त्या छोट्याश्या डबीत महालक्ष्मीला आणलेल्या केवड्याचं अत्तर ती नेहमी बनवून ठेवायची, .. अगदी वर्षभर पुरवायची ते, .. हळदी कुंकू असलं की बायका आवर्जून हात पुढे करायच्या तेंव्हा मामी हलकेच अत्तरदाणीतला कापूस खळखळत्या बांगड्यांच्या साक्षीने त्या सवाष्णींच्या हातावर फिरवायची, … अहाहा अंगणभर दरवळ असायचा, .. आपण रोज खुप मागे लागायचो आजीच्या.. आजी अत्तर दे ना ग.. पण आजी पक्की होती अशी लपवून ठेवायची अत्तरदाणी, .. म्हणायची, ” माझ्या देवीला, गणपतीला, महालक्षुम्यांना राहू दे ग बाई, .. वर्षभर टिकवावं लागतं ग, .. ” आपण रुसलो की मग हळूच झोपताना सुगंधी कापुस मुठीत ठेवायची, .. बाकी मामेभावंड नसायचे ना तेव्हा सोबत, .. सगळी गोधडी मस्त सुगंधी असायची, .. जणू आजीची कुशी म्हणजे केवड्याचं पान आणि आपण त्यात लपलेलं सुगंधी कणीस असंच वाटायचं, ….
आईबापाविणा पोर ह्याचं दुःख मनात ठेवून जीव लावायची ती आपल्याला… सुरकुतलेले हात अंगभर फिरायचे, .. गोष्टीत मध्येच आपण झोपलो असं बघून ती देवाला म्हणायची, .. “केवडा आवडतो रे देवा लेकराला, …. केवड्यासारखं सुगंधी, आनंदी आयुष्य दे माझ्या लेकराला “ म्हणत थंडगार हात आपल्या अंगावर फिरवायची, .. “.. सगळं तिच्या डोळ्यासमोर आलं, .. तेवढ्यात अविने हाक मारली, “अनु अग निघतेस ना, .. लवकर पोहचायला हवं, .. “
मग आरश्यापुढे फार वेळ न लावता अनु निघाली, .. अविने गाडी दारासमोर आणली होती, .. अनुने सासुबाईला नमस्कार केला म्हणाली, “आई शक्यतो रात्रीच परत येतो हं, … ”
सासुबाई म्हणाल्या, “अग आजीने फार आग्रह केला तर राहा. आजीला बरं वाटत नाहीए.. तू गेलीस तर लवकर बऱ्या होतील, .. एखादा ड्रेस सोबत ठेवा, .. ” बरं म्हणत अनु परत खोलीत गेली, .. तिने परत कपाट उघडलं, .. तिला परत माहेरचीच साडी घेण्याचा मोह झाला, .. ती गुलबक्षी रंगाची जी आजीने पाच गोधड्या शिवून त्या कमाईतून हिला घेतली होती पहिल्या दिवाळसणाला, .. तिने पटकन अविचे कपडेपण घेतले आणि देवासमोर सुपारी ठेवून ती निघाली, .. सासूबाईंनी मोठी पिशवी मागच्या डिक्कीत ठेवली.. म्हणाल्या, “तुझ्या आजीला सांग पौष्टिक खाऊ दिलाय लवकर बऱ्या व्हा आता, .. “
दिवाळीनंतर वर्षभराने अनु गावाकडे आली होती, .. गावाचा रस्ता लागला तसं अनुला त्या मातीची, त्या उडणाऱ्या पाखरांची वेगळीच ओढ वाटू लागली, .. त्या छोटयाश्या टेकडी गणपतीकडून घरंगळत येणारा रस्ता, .. आपण सुसाट पळायचो आजी आणि मामी तोल सावरत, आपल्याला ओरडत खाली उतरायच्या ते आठवून तिला हसु आलं, .. अविचं लक्ष होतंच म्हणाला, “मलाही कळू दे ना आठवणी तुझ्या, .. आवडेल मलाही हसायला, .. “
ती एकदम गडबडली. तिला मनात आलं शहरात श्रीमंत घरात वाढलेला हा, ह्याला काय सांगावं, .. तरी ती बोलायला लागली, .. “अवि आईबाबा मला आठवत पण नाही.. तेंव्हा गेले पण माझं पोरकेपण आजी आणि मामा मामीने झेललं रे, .. गरिबी असली तरी प्रेमाची श्रीमंती सगळं झाकून नेत होती, … संस्काराची शिदोरी इतकी छान दिली त्यांनी की ती आयुष्यभर पुरणार आहेच मला, .. खरंच आयुष्यात प्रेमाची माणसं असली की जग जिंकता येत ना, .. अवि मला छान नोकरी लागली ना की मला आधी त्यांच्यासाठी काही करायचंय रे, .. “
अवि म्हणाला, “अग आताही कर काही करायचं तर, देऊ का पैसे, … ??”
अनु म्हणाली, “तसं दिलेलं तर त्यांना आवडणारच नाही, .. लेकीकडचा रुपया नको असं आजी म्हणते, .. आजोबा लवकर वारले पण स्वतः कष्ट करून आजीने मामा.. माझी आई मोठी केली, .. कष्ट करणं आणि माणसं जपणं हे आवडायचं तिला, .. म्हणायची आयुष्यात आलेली माणसं अत्तरासारखे कुपीत ठेवायची सुगंधी जगणं करायला, .. ए तिच्यासाठी ना वेगळ्या रूपाने काहीतरी करेन मी, .. तिला केवडा आवडतो ना, मग केवडा शेती सुरू करून देईन तिच्या नदीकडच्या जमिनीवर, .. पण नक्की करायचं त्यांच्यासाठी काहीतरी, .. “
अविनाश म्हणाला, ” खरंच त्यांचा खरा आभारी तर मी असायला हवं ना, कारण त्यांनी घडवलेला हा सुंदर विचारांचा केवडा माझं आयुष्य सुगंधी करायला माझ्या आयुष्यात आला ना, .. “अनु एकदम लाजली, ..
गाडी गावात शिरली तश्या कौतुकाच्या नजरा अनुला मोहरून टाकत होत्या, .. गुलबक्षीने वेढलेलं तिचं छोटंसं माहेर आलं, .. जरा गडबड वाटली अनुला दारातच, .. तिला पाहून मामी तिच्या गळ्यातच पडली, ..
” काल रात्रीपासून तब्येत बिघडली ग आजीची, .. डॉक्टरकाका म्हणालेत ग, की आजचा दिवस निघेल फारतर फार, .. ” अनु स्तब्ध झाली, .. क्षीण झालेल्या आपल्या आजीजवळ आली, .. “आजी तुझा केवडा आलाय ग, .. तुझी केतकी मी उठ ना ग, .. “आजी हलकं हसली, … अर्धवट डोळे उघडत अनुला बघत म्हणाली, “तुझीच वाट होती ग, .. “अनुने हात हातात घेतला आजीचा, “आजी तुला काही होणार नाही, … अग आपल्याला केवड्याच्या अत्तराचा बिझनेस करायचा ठरवलंय आम्ही, … शेती देखिल करून देणार तुझा नातजावई, .. आजी तुझ्यासारखं अत्तर नाही ग कुणी बनवत, …. “
आजी म्हणाली, “अनु अग सुगंध, अत्तर हे सगळं मोह आहे ग, .. एक लक्षात ठेव.. जगणं सुगंधी करता यायला हवं, .. माणूस म्हणून आपली आठवण प्रत्येकाच्या मनात सुगंधी असायला हवी. आता मला बोलावणं आलं ग देवाचं, .. सगळ्यांना माझ्या जवळचं सगळं वाटून टाकलं बघ, .. मामामामीला घर, शेती… पोरांना दागिने.. आता माझ्याजवळ तुझ्यासाठी एक गोष्ट जपली आहे मी ती मी फक्त तुलाच देणार होते, ”.. म्हणत आजीने उशीकडे ठेवलेली अत्तरदाणी अनुच्या हातात दिली, .. ” अनु केवडा हे प्रतीक समज.. पण माणूसपणाच्या सुगंधाची शिंपण करत राहा प्रेमानं, .. “ आजी बोलायचं थांबली होती. अनु निःशब्द होऊन फक्त रडत होती, .. केवड्याचा अर्थ नव्याने आजी सांगून गेली असं अविला वाटलं, ..
खिडकीतून उजेड डोळ्यांवर आला तशी माझी झोप चाळवली. अंथरूणातून उठण्याची इच्छा नव्हती. उठवलेही जात नव्हते. चिकुन गुनीयाने माझी सारी हाडे व सांधे जाम झाले होते. वाॅश रूमपर्यंत जाणंही अवघड झालं होतं. पाय जमिनीवरून उठतच नव्हते, जणू फेविकाॅल लावलाय पायांना, इतक्या वेदना, सहनशक्तीच्या पलिकडे. जवळ जवळ बेडरिडनचं झाले होते मी. तापाने अंग फणफणत होतं. खिडकीतून येणारा उजेडही डोळ्यांना सहन होत नव्हता. मी तोंडावरून पांघरूण ओढलं. पण झोप येत नव्हती. घड्याळ पाहिलं, सकाळचे साडेसात वाजले होते. रोज सहा / साडेसहाला येणारी मोलकरीण अजून आली नव्हती. बाहेर पावसाने जोर धरला होता. आज ही कामाला येते कि नाही, मी अंथरूणात, निलेशचं आँफिस, माझ्या निलाक्षीचं काॅलेज, त्यात मोलकरणीची दांडी झाली तर? माझा जीव कातर झाला. उशीजवळचा मोबाईल उचलला, नंबर डायल केला.
फोन नो रिप्लाय झाला तशी माझी चिंता वाढली, पुन्हा डायल केला, काही सेकंदासाठी फोन उचलला गेला, ” अग अनिता केव्हा येतेस. ” फोन मध्येच कट झाला. काही वेळ थांबून पुन्हा फोन केला, तर नाव आले अनिता सांगळे, अरे नामसाधर्म्याने फोन माझ्या मैत्रिणीलाच लागला. मी लगेच फोन बंद केला. अनिताचा दुपारी फोन आला, पण तो दुसरा नंबर होता. माझ्याकडे तो मिस्ड काॅल झाला. नंतर निवांतपणे नंबर डायल केला. ” बोला, कोणाचा नंबर आहे हा. माझ्या फोनवर मिस्ड काॅल होता’. ‘नाही ताई, तुम्हीच मला सकाळी मिस्ड काॅल दिलात ‘ माझी ट्यूब लाईट पेटली ‘ अनिताताई काय ‘ ‘ होय ‘ ‘ अनिताताई सकाळी तुमचा फोन चुकून लागला हो. पण हरकत नाही या निमित्ताने का होईना, आज आपण पुन्हा संपर्कात आलो बघा. कशा आहात तुम्ही? मग आमच्या साहित्यिक घडामोडींवरील गप्पा, विचारांची देवाण घेवणा, क्षेम कुशलता यावर जवळ जवळ दहा मिनीटे बोलणे झाले. तिच्या पतीचे दुःखद निधन, त्यांची जाणवणारी उणीव, तिचा शोक, अति रडण्याने डोळ्यांना त्रास, माझं आजारपण, या संवादातून मन खूप हलकं झालं. औषधांनी ताप कमी झाला होता. त्यात या मिस्ड काॅलचीही सकारात्मक ऊर्जा दडलेली होती.
असेच जुने मित्र मैत्रिणी माझ्या माणुसकी कथेमुळे पुन्हा संपर्कात आले होते. माझी ही कथा प्रचंड व्हायरल झाली होती. ज्याला आवडली त्याने फाॅरवर्ड केली होती. फेसबुकही कोणी पोस्ट केलेली त्यामुळे ही कथा महाराष्ट्रच नव्हेतर कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान एवढेच नव्हेतर परदेशस्थ भारतीय इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, टांझानिया, मलेशिया, फिजी, पॅरीस अशा अनेक देशातील वाचकांनीही त्या कथेचा आस्वाद घेतला होता. रोज मला वीस /पंचवीस फोन यायचे. सगळेच फोन काही रिसिव्ह करू शकत नव्हते, ते मिस्ड काॅल व्हायचे. मग माझ्या सवडीने मी संपर्क साधायचे आणि वाचकांशी संवाद साधायचे. प्रत्येकाचे अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना शेअर करायचे, त्यातूनच मग माझ्या कथांचा प्रांत अधिकच समृद्ध होत गेला.
विचारांच्या शृंखलेत माझ्या डोळ्यावर झोपेने पुन्हा अंमल चढवला. ” प्रिया, जाऊन येतो ग ” निलेश रूममध्ये डोकावला. माझा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने माझ्या कपाळाला हात लावला, ” बाप रे, प्रिया, किती अंग तापलंय तुझं, थांब मी थर्मामीटर आणतो ” थर्मामीटर लावला 103 डिग्री फॅरनहिट. निलेशने लगेच पॅरासिटेमोलची गोळी दिली. ” मी नाही जात आज आँफिसला. तुला हाॅस्पिटलला अँडमीट करतो. घरी बसून नुसत्या गोळ्या घेऊन बरं होणार नाही हे दुखणं ” ” अहो डाॅक्टरांची ट्रिटमेंट चालू आहे ना. एवढे पॅनिक होऊ नका. हा व्हायरल फिवर तीन / चार दिवस घेतोच. नका टेन्शन घेऊ. ”
अंथरूणात पडूनही कंटाळा येतो. ताप वाढू लागला तसा डोळ्यावरही झोपेचा अंमल चढला. ग्लानी आल्यासारखं झालं नि नेत्रपाकळ्या आपोआप मिटल्या. ऊन/ सावलीसारखं, जाग/ झोपेच्या या लपंडावात स्मृतींचं एक/एक पान उलगडू लागलं. मिस्ड काॅलचं सकाळपासून मनावर गारूड होतंच, त्याला उजाळा मिळाला.
एम ए च्या प्रथम वर्षाला होते मी. सगळे लेक्चर संपले आणि मी ग्रंथालयात जाण्यासाठी निघाले. अर्थशास्त्रासारखा कठीण विषय निवडला होता मी. सिलॅबसमधील प्रिसक्राईब बुक्स आणि रेकमेंडेड बुक्स बरीच होती. सगळीच पुस्तकं घेणं शक्यच नव्हतं ग्रंथालयातही लिमिटेड काॅपीज व विद्यार्थी संख्या अधिक म्हणून घरी नेण्यासाठी लवकर पुस्तकंही मिळायची नाहीत. मग तिथेच रिडींग रूममध्ये बसून अभ्यास करायचा हे माझे धोरण, विशेष म्हणजे ज्या त्या दिवशी शिकवले जाणारे टाॅपिक्सची त्याच दिवशी माझी रिव्हिजन व्हायची.
मी ग्रंथालयाकडे जातांना श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं, यांनी छेडलं मला. शीळ घालत प्रितम गाणं म्हणू लागला,
व्हाट इज मोबाईल नंबर
व्हाट इज युवर स्माईल नंबर
करनी है प्रायवेट बाते
दे दे कोई प्रायवेट नंबर
ए शट अप
टेक इट ईझी बेबी, मोबाईल नंबर दे, लगेच निघालो मी, बाकी बाते रातमे, क्यो? म्हणत तो विकृत हसला.
एव्हाना मी माझं पायताण काढून हातात घेतलंच होतं आणि एक लगावणार तोच प्रितमने माझा हात घट्ट पकडला.
ए ठीक नही है बेबी, हम आपसे प्रेमसे बात कर रहे है और आप हमे दुत्कार रही है, टोळक्यातील त्याचे इतर मित्रही हसू लागले.
देवकृपेने निलेश तिथून जात होता. ” चल यार, क्या बात है, प्यारकी बाते करना चाहते हो, मुझसे करो, म्हणत निलेशने एक त्याच्या मुस्काटात ठेवली, तसे टोळक्यातील सर्व जण निलेशवर तुटून पडले. नेमके प्रा. पेंडसे व प्रा. शानबाग ग्रंथालयाकडे येत होते. ” हे काय चाललंय इथे ” तशी प्रितम व गँगने काढता पाय घेतला.
पण प्रितमला माझा मोबाईल नंबर कोणाकडून तरी मिळाला. मला रात्री अपरात्री फोन करू लागला. काॅलेजात मिस्ड काॅल देऊन हैराण करू लागला. मी साहजिकच अस्वस्थ झाले. घरी आई बाबांना व निलेशलाही सांगितले, निलेश म्हणाला ‘ प्रिया घाबरू नकोस, माझे काका डी वाय एस पी आहेत. चांगलीच समज देतील त्याला.
माझे आई बाबा, निलेश व निलेशचे डी वाय एस पी काका यांच्या मार्गदर्शनाखाली रितसर मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. सुरूवातीला प्रितमने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या श्रीमंत बापाचाही हवाला दिला. पैसे घेऊन तक्रार निकाली काढा असेही त्याने पोलिसांना सुचविले. पण डी वाय एस पी साहेबांनी विशेष लक्ष घातले असल्याने प्रितमची डाळ शिजली नाही. त्याच्या बाबांनीही प्रयत्न केले प्रकरण मिटविण्याचा. पण आम्ही ठाम होतो. शेवटी प्रितमने माफीनामा लिहून दिला.
निलेश त्यादिवसापासून सावलीसारखा माझ्यासोबत होता. प्रितमला चांगलीच समज मिळाली होती व निलेशचा भक्कम आधार यामुळे पुढे त्याने माझ्या वाटेला जाणे बंद केले.
निलेशचं आकर्षक व्यक्तिमत्व, त्याची विनयशीलता, कर्तृत्व, महत्वाकांक्षा, भरारी घेण्याची उमेद, अभ्यासातील प्रगती, नात्यांची जाण, दुसर्यांचा आदर करण्याची वृत्ती यामुळेच मी त्याच्याकडे ओढली जात होते, त्याच्या प्रेमात पडले होते. पण निलेशचंही तसंच असेल काय? कसं समजेल? एक मोठं प्रश्नचिन्ह होतं माझ्यापुढे? आणि माझ्या या प्रश्नांसाठी मला एक मार्ग सापडला. 7 फेब्रुवारी, रोझ डे, निलेशला गुलाबपुष्प देऊन भावना व्यक्त कराव्यात काय? पण एवढी हिंमत होईल काय माझी? मन नुसतं धडधड करत होतं.
7 फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला माझ्या मोबाईलवर मिस्ड काॅल आला. काॅलर माझ्या काॅन्टक्ट लिस्ट मध्ये नव्हता. माझा जीव कातर झाला. मिस्ड काॅलला, काॅल बॅक मी करूच शकणार नव्हते कारण नंबर परिचयातील नव्हता. उद्या निलेशला सांगू या. रात्रभर मला झोप नव्हती. या गदारोळात मी केलेला रोझ डे चा प्लॅनच फिस्कटला.
आजचा पहिला तास इंटर नॅशनल एकाॅनाॅमिक्सचा संपला व मी क्लास रूममधून काॅरीडाॅर मध्ये आले. तेवढ्यात निलेशही समोर आला हातात लाल गुलाब घेऊन. ” प्रिया, या गुलाबाचा स्विकार करशील? . क्षणभर मी गोंधळले, अरे माझ्या मनातले मी न सांगताच याला कसे कळाले. याची माझी विचार शृंखला जुळली तर? माझ्या चेहर्यावरील गोंधळ पाहून व मी लगेच प्रतिसाद न दिल्याने निलेश हिरमुसला. ” साॅरी प्रिया, तुझी इच्छा नसेल तर? ” ” नाही, नाही निलेश, तसं नाही. दे मला तो गुलाब. ” आणि निलेशची कळी खुलली. हा गुलाम सदैव आपल्या सेवेत हजर राहील साहिबा. निलेश पुरे हं. नाहीतर मी रूसेन ” ‘ बाप रे आतापासून रूसवा, माझी तर वाटचं लागेल? ” मग कोणी सांगितलं तुला या वाटेवर यायला. जा तुझ्या मार्गाने ‘ ” साॅरी बाईसाहेब, कान पकडतो “
निलेश एक प्राॅब्लेम झालाय रे. काल मला एकाच फोनवरून तीनदा मिस्ड काॅल आलेत. मी फोन उचलण्याच्या अगोदरच तो बंद व्हायचा. प्रितम आणि गँगने परत डोकं वर काढलं असेल काय? ” ” नाही प्रिया तसं नाही ” ” तू इतक्या ठामपणे कसं सांगू शकतोस ‘. ” कारण प्रिया काल मीच तुला मिस्ड काॅल दिला. मनातील भावना व्यक्त करायच्या होत्या. पण माझी हिंमतच झाली नाही, कारण माहित नव्हते तुझ्याकडून कसा प्रतिसाद मिळेल. म्हणून मी दुसर्या नंबरवरून तुला मिस्ड काॅल दिला. “
” अरे, पण मी काल किती घाबरले होते. रात्रभर किती बेचैन होते. “
” साॅरी प्रिया, आय अँम एक्सट्रिमली साँरी ” ” अरे, साॅरी कशाबद्दल? आज मी ही तुला गुलाबपुष्प देणार होते. पण कालच्या मिस्ड काॅलने मी खूप घाबरले होते. मन अशांत झालं होतं, पण आता मनावरचं सगळं ओझं उतरलंय. निलेश थँक्स अ लाॅट, आभारी आहे मी तुझी. तुझी साथ मिळाली तर आयुष्याचं सोन होईल माझं ” ” प्रिया, आपल्या आयुष्यात आलेला हा मणिकांचन योग आपण आपल्या खास ओळखीने, मिस्ड काॅलने साजरा करत जाऊ.
आमच्या दोघांच्याही कुटुंबातून विरोध नव्हताच. कोणत्याही कटकटीं, शिवाय अगदी गुण्या गोविंदाने, आमचे शुभमंगल पार पडले. आयुष्याची रेशीमगाठ बांधली गेली.
निलेश त्यांच्या आँफिस कामासाठी एक आठवड्यासाठी नवी दिल्लीला गेले होते. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली. झोपेतच होते मी. फोन घेण्यासाठी हात उशीकडे गेले. रात्री झोपतांना फोन उशीजवळ घेऊन झोपण्याची माझी सवय. फोन उचलणार तितक्यात तो बंद झाला, मिस्ड काॅल झाला. अच्छा तर आज रोझ डे ” यासाठी मिस्ड काॅल होता काय? ” जनाब, आप मिस्ड काॅल देते हो, पर हम भी कुछ कम नही, मिस्ड काॅलका जवाब मिस्ड काॅल ही होगा, समझे आप ” अन मी मिस्ड काॅल देण्यासाठी फोन हाती घेतला.
सकाळची वेळ म्हणजे घरात प्रचंड गडबड. घड्याळावर नजर ठेवत सगळी कामं चाललेली. ‘अहो’ऑफिस तर मुलगा, मुलगी कॉलेजला जाण्याच्या तयारीत आणि मी स्वयंपाकात. कधी नव्हे ते उमा वेळेवर आली. जीवात जीव आला. एक टेंशन कमी झालं. धुण्या-भांड्याची काळजी मिटली. इतरवेळी गप्पा मारत काम करणारी उमा आज शांत होती. कामं उरकण्याची घाई चाललेली… चेहऱ्यावरून काहीतरी बिनसल्याचं लक्षात येत होतं. सगळे आपापल्या कामाला गेल्यावर निवांत मोबाइल पाहत बसले. तितक्यात पदराला हात पुसत उमा समोर येऊन उभी राहिली.
“ताई, एक काम होतं”
“पैशे सोडून काहीही माग”
“मग राहीलं काय? हजार रुपये पायजे व्हते. पोरींची फी भरायचीये. ”
“एवढे पैसे माझ्याकडं नाहीत. ”
“सगळे परत करीन पण नाई म्हणू नगा. हात जोडते. लय नड होती. ” उमा काकुळतीनं म्हणाली तेव्हा कसंतरीच वाटलं, तरीही यावेळेला पैसे द्यायचे नाहीत. अशी खूणगाठ मनाशी बांधली होती कारण आधीही उमानं काही ना काही कारणासाठी उसने पैसे घेतलेले. थोडे थोडे करून आकडा तीन हजारापर्यंत पोचलेला आणि परतफेड काहीच नाही. घरातल्यांना माहिती नव्हतं म्हणून बरं नाहीतर… माझं काही खरं नव्हतं.
तिचं “घेणं” थांबणार नाही म्हणून आपणच “देणं” थांबवायचं असं ठरवलं. पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर उमाचा चेहरा केविलवाणा झाला. डोळे भरले. ती खोटं बोलत नव्हती. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. मजुरी करणारा दारुडा नवरा आणि शाळेत जाणाऱ्या तीन मुली असा संसार. उमाच्या कमाईवर घर चाललेलं. पण उसने देण्याला सुद्धा मर्यादा असते. असो..
“ताई, बघा ना काहीतरी.. ” हात जोडत उमाच्या पुन्हा विणवण्या सुरू झाल्या. तेव्हा माझा निश्चय डळमळला.
“नवरात्र चालूयं म्हणून नाराज करत नाही. हे तीनशे घे. ”
“बरं द्या” नाराज उमा पाय आपटत निघून गेली आणि अपेक्षेप्रमाणे पुढचे दोन दिवस कामाला दांडी. खूप चिडचिड झाली पण काही करू शकत नव्हते.
दसऱ्याचा दिवस उजाडला. सकाळपासूनच गडबड होती. संध्याकाळी ओवाळून झाल्यावर ‘सोनं’ देऊन मुलं मित्रांना भेटायला गेली अन आम्ही दोघं टीव्ही पाहत बसलो. अचानक उमा कामासाठी आली. आश्चर्याचा धक्का बसला अन रागही आला. पण सणावारी कटकट नको म्हणून गप्प बसले. पटापट कामं संपवून उमा निघाली.
“ताई येते. ”
“थांब जरा”
“अजून दोन घरची कामं राहिलीत”
“माहितीये. फार कामाचीयेस. पोरींसाठी श्रीखंड घेऊन जा “
डबा पुढे केला पण उमा काही बोलली नाही. तिला दसऱ्याच्या शुभेच्छा अन सोनं दिलं. ‘सोनं घे अन सोन्यासारखी रहा’ म्हटल्यावर उमा मनापासून हसली.
रात्री जेवणं झाल्यावर शतपावली करताना अचानक लक्षात आलं की आपल्या हातात अंगठी नाहीये. काळजात धस्स झालं. आजूबाजूला शोधलं पण अंगठी सापडली नाही. शोधाशोध सुरू झाली. एक तोळ्याची अंगठी हरवल्यानं प्रचंड टेंशन आलं. घरातलं वातावरण तंग. सगळे अंगठी शोधण्याच्या कामाला लागले पण उपयोग झाला नाही. मुलं वैतागली. डोकं भणभणायला लागलं. अहो तर प्रचंड चिडलेले.
“आई, नक्की आठव तूच कुठं तरी ठेवली असशील”मुलगा.
“आईची स्पेशालिटी म्हणजे वस्तू इतक्या सांभाळून ठेवते की वेळेवर सापडत नाहीत. ”
“अंगठी नीट ठेवता येत नाही का? एवढा हलगर्जीपणा!! ”अहो.
“कायम बोटातच असते. संध्याकाळी ओवाळताना काढली होती. ”.. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. लगेच धावत जाऊन ताम्हण पाहिलं पण…..
“ताम्हणात सुद्धा नाही.. मग कुठे गेली. ”.. अहो.
“माहिती असतं तर शोधलं असतं का? ”
“इतका वेंधळेपणा. ”
“त्याविषयी नंतर बोला. आधी अंगठी शोधा. ”
“तुझं नेहमीचच आहे. स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्यांवर डाफरायचं. ”
…. अंगठीचा विषय बाजूला राहून ‘तू तू मै मै’ सुरू झाली. दोघंही तोंड फिरवून बसलो तरी अहोंची बडबड सुरूच. माझी चूक असल्यानं गप्प राहिले. मुलांना मध्यस्थी करावी लागली. पुन्हा शोधकार्य सुरू. घरातला कोपरा अन कोपरा पाहिला अगदी कचऱ्याचा डबासुद्धा.. पण अंगठी सापडली नाही तेव्हा धीर सुटला. खूप रडायला आलं. स्वतःच्या बावळटपणाचा राग आला. या सगळ्या गडबडीत रात्रीचे बारा वाजून गेले. नाईलाजानं सगळे झोपायला गेले पण माझी झोप मात्र उडाली. अंगठीच्या विचारानं रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळीसुद्धा घरात तणावपूर्ण वातावरण होतं. परत शोधलं पण पुन्हा निराशा. इतक्यात दारावरची बेल वाजली. अहोंनी दार उघडलं तर समोर उमा.
“ताई!! ”
“आत आहेत” अहो
“उमा, तू इतक्या सकाळीच आलीस. आत्ताशी सातच वाजतायेत”
“तुमच्यासाठीच आले”
“म्हणजे.. ”
“ताई, काल दसऱ्याला तुम्ही.. ”
“आता अजून काय झालं. ” मी वैतागले.
“सोनं दिलंत.. ”
“बरं मग, उमा जरा टेंशनमध्ये आहे. डोकं ठिकाणावर नाही. नंतर बोलू. ”.. हे म्हणाले.
“तुमचं काही हरवलयं का? ”
“तुला कसं माहीत? ”.
“माजा अंदाज बराबर निगाला”
“कसला अंदाज, काय बोलतीयेस. काही कळत नाहीये. ”
“तुमची पण कमाल आहे. पैशे मागितले तर दिले नाहीत आणि.. ”
“आणि काय??? ”
“अहो ताई, काल दसऱ्याच्या सोन्याबरोबर ही खरी सोन्याची अंगठीपण दिलीत. ”
“काय?? ” मी किंचाळले.
“कामं करून घरी गेले. पिशवी रिकामी केली तवा दसऱ्याच्या सोन्याबरबर अंगठी व्हती. काल तुमच्या शिवाय कुणीच सोनं दिल नाय तवा ही अंगठी तुमचीच असणार असं वाटलं. बॅलन्स नव्हता म्हणून फोन केला नाय. तुमी टेन्शनमध्ये असाल म्हणून सकाळच्यालाच आले. ही घ्या. ”
.. उमानं अंगठी पुढे केली. मी एकदम सुन्न झाले. तिला घट्ट मिठी मारली अन जोरजोरात रडायला लागले. पुन्हा पुन्हा आभार मानले.
“उमा, काय बोलू शब्दच नाहीत. ”म्हणत पाचशेच्या दोन नोटा पुढे केल्या पण उमानं घ्यायला नकार दिला.
“ह्याच्यासाठी नाय केलं. तुमची वस्तू परत केली ह्यातच लई मोठा आनंद हाय. ”
…. हलाखीची परिस्थिती, पैशाची चणचण आणि अत्यंतिक गरज असूनही प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या उमासाठी खूप आदर आणि कौतुक वाटलं. आजच्या व्यवहारी, स्वार्थी जमान्यात प्रामाणिक असणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आज खऱ्या सोन्यापेक्षा हे प्रामाणिकपणाचं सोनं मला जास्त मौल्यवान वाटलं.
साधारण वीस पंचवीस दिवसच झाले असतील, विवाह संस्थेत अनघाचा फॉर्म जमा करून, रोज मुलांची लिस्ट ची वाट बघणे सुरू होते. तसं संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले होते. तरीही दुसऱ्याच दिवसापासून वाट बघणे सुरू होते. मनात दहा विचारही येऊन गेले. का बरं उशीर होतोय ? आपल्या सारख्या सामान्य परिवार, परिस्थिती असणारी मुलं असतीलच की. फॉर्म तर हरवला नसेल. एकदा जाऊन विचारून यावं का ?? ताईची घालमेल बघून मला तिची उत्सुकता कळत होती. ••••
भाऊजी म्हणाले पण.. “ अग!! हे काम काही एवढं सोपं नाही. त्या संस्थेला आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी बरोबर अभ्यास करून एकमेकांना अनुरूप वर वधूची नावे द्यायची असतात. तुमची माहिती, अपेक्षा, अटी सर्व लक्षात घेऊन त्यांच्याशी मिळती जुळती स्थळ शोधावी लागतात. ”
ताई म्हणाली, “ बरोबर आहे. सर्व शोधाशोधच आहे. आधी ते शोधतील, मग आपण शोधू. ”
भाऊजी हसले, म्हणाले “अग! प्रत्त्येक कामाची वेळ यावी लागते. कुठे लपलाय ? माहीत नाही. येथेच आहे की अमेरिकेत आहे? हे पण माहित नाही. आजकाल जगातील एक मुलगा शोधायचा असतो. आपल्या वेळेस बरं होतं, एकमेकांच्या ओळखीने स्थळ येत असत. सध्या शेजारच्या मुलांचे स्थळ सांगताना सुद्धा भीती वाटते. सध्या अशा अशा गोष्टी ऐकण्यात येतात, की सहसा मुलं मुली सांगण्याच्या फंदात कोणी पडत नाही. तरी मी माझ्या दोन मित्रांशी याबाबतीत बोललो आहे. ••••
“चट मंगनी पट ब्याह. “असं होत नाही ग. होईल सर्व व्यवस्थित. आत्ता कुठे आपण या कामाला सुरुवात केली आहे. धीर धर ”
बरे असो, •••
सहजच भाऊंजीनी बघितले तर आज पाच मुलांची माहिती आली होती. ताईने लगेच फोन करून मला सांगितले. ••••
आज संध्याकाळी अजय अनिता आॅफिस मधून घरी आले. जेवण झाली. सर्वांना मुलांची माहिती वाचण्याची उत्सुकता होती. •••
“पुन्हा गोलमेज परिषद भरली. ” ••••
बाबा़नी माहिती वाचायला सुरुवात केली. नाव, उंची, शिक्षण, नोकरी, पगार घरातील सदस्य, प्रोप्रटी, स्वभाव, अति विशिष्ठ गुण, म्हणजे उत्तम खेळाडू, तबलावादक, गाण्याची आवड वगैरे वगैरे. पत्रिका बघणे किंवा बघायची नाही. एवढाच काय तो फरक होता. एखादा एकुलता एक तर, एखाद्याला एक बहिण किंवा भाऊ एवढाच परिवार होता. बहिण -भाऊ, आई- वडील सर्वांची माहिती दिलेली होती. एका घरी आजी आजोबा पण आहेत अशी ठोक माहिती कळली. ••••
प्रत्त्येक मुलांची माहिती ऐकून, सर्वच सर्व गुण संपन्न आहेत, असंच वाटलं. •••
त्या नंतर होणाऱ्या बायको बद्दल अपेक्षा लिहिल्या होत्या. ••••
अपेक्षा पण almost सारख्याच होत्या.
मुलगी गोरी, सुंदर, घर सांभाळणारी, समजदार, नोकरी करणारी असेल तर उत्तमच. म्हणजे मुलगी पण सर्व गुण संपन्न, सर्व क्षेत्रात उत्तम, multi-tasker, efficiently घर, आॅफिस सांभाळणारी. वगैरे वगैरे. मुलगी गोरी ही अट किंवा अपेक्षा बहुतेक प्रत्त्येक मुलाची होतीच. ••••
माझ्या सहज मनात आलं, ” देवाचं जरा चुकलंच, काळा सावळा रंग कोणाला दिलाच नसताच तर बरं झालं असतं. “••••
एक स्थळ. – शशांक कुलकर्णी यांच्या अपेक्षा •••• मध्ये मात्र एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट आढळली. ती म्हणजे मोबाईलचा/ social media चा कमीत कमी वापर करणारी मुलगी असावी. अशी अट होती. •••
एक स्थळ -आरव देशपांडे यांच्या अपेक्षामध्ये लिहिले होते •••
” कोणत्याही विषयावर मला तिच्या बरोबर गप्पा मारता येतील, अशी मैत्रीणीच्या रूपात बायको हवी आहे. “••••
माहिती ‘impressive’ वाटली. ••••
माहिती वाचल्यावर भाऊजी म्हणाले, ”आपण दिलेली माहिती तर सामान्यच होती. ही मुलं तर भारी वाटतायेत. “
दोन चारदा प्रत्येक मुलाची माहिती वाचून झाली. प्रत्येकाने पुन्हा पुन्हा वाचली. फोन नंबर दिले होते. ••••
कोणाला फोन करावा ?? कुठून सुरुवात करावी ?? कळत नव्हते. •••
तसंही आज फोन करायचा नाही, हे ठरलं होतं. ••••
ताईने लगेच पंचांग काढले, चांगला दिवस, वेळ बघीतली. •••
ताई म्हणाली, ••••• ” उद्या सकाळी करा, चांगला दिवस आहे. अजय अनिताला पण सुट्टी आहे. म्हणजे ते दोघेही घरी असतील. “
कशीबशी रात्र पार पडली. कधी ही न बघितलेले राजकुमार डोळ्यासमोर सारखे दिसत होते. त्यांचे नाव आडनाव आणि इतर माहिती यांचा Mix n Match चा गोंधळ होत होता. उत्साह होताच. कसा response मिळेल ??त्याबद्दल शंकाही होती. चांगले नाही बोलले तर ?? छान response मिळेल का ?? वगैरे वगैरे. ••• ही भीती, anxiety वेगळीच होती. परीक्षेच्या वेळी असायची तशी नव्हती. वेगळंच ‘ feeling ‘ येत होत. मन भिरभिरत होतं. पुन्हा पुन्हा तेच तेच विचार येत होते. स्वतःलाच समजाविणे सुरू होते. मुलाला आणि आपल्या अनघालाही पसंत पडलं पाहिजे. •••••
आज सकाळी फोन करायचे ठरले होते. सर्वजण आपापलं आवरून तयार होते. ताईने चहा नाश्ता जरा लवकरच आटोपला. अजय आणि अनिता वही पेन घेऊन बसले होते. अजय म्हणाला, ” बाबा, फोन स्पीकरवर टाका. आजी साहेब, अनघा पण सर्वांमध्ये बसल्या होत्याच. ••••
सकाळी दहा वाजता ची वेळ ठीक आहे. बहुतेक सकाळची कामं उरकलेली असतात. असं समजून बाबांनी देवाचे नाव घेऊन पहिला फोन ‘श्री देशपांडे’ यांचेकडे लावला. ••••
मुलाचे नाव – आरव देशपांडे
वडिलांचे नाव. श्री अरविंद देशपांडे.
भाऊजींनी फोन लावला. दोन तीनदा रिंग गेली, कोणी तरी फोन उचलला.
“ हॅलो, नमस्कार. ••• मी आनंद जोशी बोलतोय. मला श्री अरविंद देशपांडे यांचे बरोबर बोलायचे आहे “ नमस्कार, मीच अरविंद देशपांडे. आपण कोण ?? मी ओळखले नाही तुम्हाला. ”
देशपांडे साहेब, ” बरोबर आहे तुमचे म्हणणे, मी आज प्रथमच तुमच्याशी बोलतोय. तुमच्या मुलाचे स्थळ मला विवाह संस्थेकडून कळले. या संदर्भात मी फोन केलाय. या महिन्याच्या अंकात १८० व्या नंबरवर माझ्या मुलीची ‘ अनघा जोशी ‘ ची माहिती आहे. “
“ मी याच संदर्भात आपल्याला फोन केलाय. ” देशपांडे साहेब म्हणाले.
“ हो का ?? ठीक आहे. मी माहिती वाचतो. घरच्यांना ही दाखवतो. त्याप्रमाणे तुम्हाला दोन दिवसांत नक्की फोन करतो” देशपांडे पूढे म्हणाले, “ हे बघा, जोशी साहेब ! गरज दोघांची आहे. लग्न जमेल की नाही माहीत नाही. त्या जोड्या तर देवाने खूप विचारपूर्वक already बनवून ठेवल्या आहेत. आपल्याला ते माहीत नाही म्हणून आपण प्रयत्न करायचे. मी तुम्हाला नक्की फोन करतो. ”
घरातले सगळेच कानात तेल घालून, लक्ष देऊन ऐकत होते. पहिलाच फोन, अनुभव चांगला होता. बोलण्यावरून देशपांडे परिवार चांगला वाटला. कमीत कमी उत्तर सकारात्मक मिळालं. सुरवात चांगली झाली. हेही खूप होतं. असा response मिळाला तरी खूप आहे. जेथे फोन करू तेथे लग्न जमेलच अशी अपेक्षा पण नाही. •••
“गरज दोघांची आहे. ” हे वाक्य ऐकून खरच खूप बरं वाटलं. ••••
अजय म्हणाला, ••• चांगले लोक वाटतायेत. कमीत कमी बोलण्यावरून तरी. बघूया, दोन दिवस वाट बघू
ताई म्हणाली, ” मग आता दुसऱ्यांना फोन करायचाच नाही का ?? “
“ दोन/ तीन दिवस थांबूया “ भाऊजी म्हणाले… “ असे फोन, लग्नाच्या संदर्भात, तेही अनोळखी घरात, अनेक विचार मनात येतात. कुठेतरी सुरुवातही करायची असते. प्रत्त्येकाचे बोलणे ऐकून त्यांच्या बद्दल काही तरी ‘ impression ‘ करून घेणे, तेही बरोबर नाही. कोणी कमी बोलतात, कोणी दोन तीनदा भेट झाल्यावरच खुलतात. प्रत्त्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. जसे मुलीकडचे विचार करतात, तसेच मुलाच्या वडिलांनाही.. काय बोलावे ?? कुठुन सुरुवात करावी ??? हा प्रश्न पडत असणारच. त्यांनाही काळजी असेलच. एक अनोळखी मुलगी नेहमीसाठी त्यांच्या घरात रहायला येणार आहे. ही जबाबदारीच आहे. हे त्यांनाही समजतच. बरे असो, याबाबतीत बोलणं जेवढं सरळ सोपं मुद्देसूद, असेल तेवढं बरं. दुसरी बाजू ऐकणं पण महत्वाचे. उगीचच गैरसमज व्हायला नको, याची काळजी सगळेच घेत असतील “
ताई म्हणाली, ” त्या जाधव काकू म्हणत होत्या, लग्नाच्या संदर्भात बोलताना सर्व पत्ते एकदम उघडायचे नसतात.
“ म्हणजे काय ??” भाऊजी म्हणाले, “ माहिती पूर्ण द्यायची नाही का ?? नेहमीकरिता संबंध जोडायला निघालो तर घरची पूर्ण माहिती दिलीच पाहिजे. मग ती चांगली असो किंवा नसो. लपवाछपवी येथे चालत नाही. आपले विचार स्पष्ट शब्दात सांगितलेच पाहिजे. नंतर बोलून काही उपयोग नाही. गैरसमज व्हायची शक्यता जास्त असते. बरं, आता या गोष्टींची चर्चा आपल्या मैत्रिणींमध्ये करू नको. या संदर्भात प्रत्त्येक गोष्ट दुसऱ्यांना सांगायलाच पाहिजे असं नाही “ भाऊजीनी ताईला समजाविले.
आता दोन तीन दिवस देशपांड्यांच्या फोनची वाट बघण्यात जाणार. त्यानंतर पूढचे प्लानिंग करायचे
असे ठरले. असे किती तरी फोन करावे लागणारच आहेत. जसं आपल्याला सर्व पसंत पडत नाहीत, तसेच इतरांच्याही आवडी निवडी असतातच. अपेक्षा अटी असतात. म्हणून काही न काही कारणाने, ••• मग ते पत्रिका जमतं नाही, किंवा अजून काही कारण सांगणारच. म्हणजे पूढचा फोन करणे आलंच. एक साडी/ वस्तू घेताना आपण विचार करतो, हा तर आयुष्याचा मोठा निर्णय आहे. तेव्हा दोन्ही पक्ष भरपूर विचार करणारच.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून चांगलं मिळालं तर बघूया ना. हा मनुष्य स्वभाव आहे. ••••
एवढ्याच पैशात यापेक्षा चांगली साडी मिळाली तर बघूया ना.. असा विचार करून आपण दुसऱ्या दुकानात जातो. ‘ अजून साड्या दाखवा ‘ असं दुकानदाराला म्हणतो. या साडीला लाल ऐवजी मोरपंखी काठ असते तर जास्त चांगले झालं असतं.. काठ थोडे जास्तच मोठे वाटताहेत का ?? अशी चर्चा पण करतो … मुलगी / मुलगा चांगला मिळावा याकरिता पण असंच काहीसं होतं असणार नाही का ??
तरी आपल्या अपेक्षा, अटीप्रमाणे तडजोड करून कुठे तरी थांबणं पण जमलंच पाहिजे.
भाऊजी म्हणाले, ” समजा जर नकार आला म्हणजे त्याचा अर्थ माझी किंमत कमी झाली, असा होत नाही. आणि तसा अर्थ घ्यायचाही नसतो.. आपली ‘value ‘ दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमी जास्त करायची नसते. ” ••••
म्हणतात ना ••••
“जीवन एक रंगमंच आहे, या रंगमंचावर कोणता कलाकार केंव्हा प्रवेश करेल हे आपल्याला माहीत नसतं. कारण आयुष्याच्या या नाटकाचा दिग्दर्शक स्वतः देव असतो. आपला रोल आपण व्यवस्थित करायचा, एवढंच आपल्या हातात असतं. नाटक यशस्वीपणे पूर्ण करणे ही देवाचीच जबाबदारी आहे, यावर आपण विश्वास ठेवायचा असतो. “••••
म्हणतात ना, •••
ईश्वर में आस्था है, और स्वयं पर विश्वास है तो, उलझनों में भी रास्ता हैं।••••••
ऑफिसमध्ये कामात असताना केबिनच्या दारावर टकटक वाजलं आणि पाठोपाठ अकौटंट आत आले.
“सर, उद्या सुट्टी हवी होती”
“का ओ, काही विशेष”
“पित्र कार्य आहे”
उत्तर ऐकून डोकं सटकलं पण कंट्रोल केला. सुट्टी मंजूर केली. “थॅंक यू”म्हणून ते गेले आणि लगेच त्याच कारणासाठी परचेस डिपार्टमेंटचा एकजण सुट्टी मागण्यासाठी आला.
दिवस उगवल्यापासून आज पित्राचाच विषय चालू होता. सकाळी सौंनी घरात पित्र कार्य करायचं म्हणून सुट्टी घेण्याविषयी आदेश वजा विनंती केली. स्पष्ट नकार दिला. असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही हे चांगलं माहितीयं तरीही तिचा आग्रह सुरूच. हट्टच धरला. खूप समजावलं पण ऐकलं नाही मग कडाक्याचं भांडण. परिणामी बोलचाल बंद. डोकं पार आऊट झालं त्याच तिरमिरीत ऑफिसला आलो तर तिथं पण तोच विषय. खूप चिडचिड झाली नंतर कामाच्या व्यापामुळे आणि पाठोपाठच्या मीटिंगमुळे पित्र विषय मागे पडला. घरी पोचायला अकरा वाजले. खूप थकलेलो. ऑफिसमध्ये खाणं झाल्यानं जेवलो नाही. सौंबरोबर अबोला होताच त्याविषयी सकाळी बघू असा विचार करत कधी झोप लागली कळलंच नाही.
“रघू, ए रघू”
“कोणयं”अर्धवट झोपेतच मी खेकसलो.
“तुझा बाप”
“आप्पा, तुम्ही”
“रघ्या, मला अजून विसरला नाहीस. बरं वाटलं”
“हे सांगायला तुम्ही आलात. ”
“तसं नाही रे”
“आप्पा, तुम्हांला का विसरेल. ”
“मी खूप त्रास दिला ना”आप्पा
“असं काय बोलताय”
“बोलू दे रे. खूप दिवस मनात होतं. गरजेपेक्षा दहा वर्षे जास्त जगलो. शेवटची तीन वर्ष तर अंथरूणावरच तरीही न चिडता, वैतागता तुम्ही दोघांनी माझं खूप केलंत. ”
“आपल्या माणसांसाठी करायचं नाही तर मग कोणासाठी? आणि तुम्हीसुद्धा आमच्यासाठी खूप केलंतच की… ”
“माझ्यामुळं होणारी तुमची ओढाताण बघून खूप वाईट अपराध्या सारखं वाटायचं. ‘लवकर मोकळं कर’ देवाकडं धावा करायचो. त्यानंसुद्धा मागणी पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष घेतली तोपर्यंत तुमचे खूप हाल झाले. म्हातारे म्हणजे अडगळ असं मानणाऱ्या जमान्यात तुम्ही फार चांगले वागलात. ”
“आम्ही काहीही जगावेगळ केलं नाही. उलट रागाच्या भरात मीच काही वेडंवाकडं बोलून दुखावलं असेल तर माफ करा. टेन्शनमुळे संयम सुटला पण तुमच्याविषयी आदर कायमच आहे. ”
“रघू, माझी काहीही तक्रार नाही. मागच्या जन्माची पुण्याई म्हणून तुझ्यासारखा मुलगा आणि लेकीसारखी सून मिळाली. दोस्तमंडळी माझा हेवा करायची. अनेकांनी तसं बोलूनसुद्धा दाखवलं. ”
“तुमचीच शिकवण आणि संस्कार.! ! ”
“धन्य झालो. मी जिवंत असताना खूप केलस आता काहीही कार्य केलं नाहीस तरी चालेल. ”
“म्हणजे. ”
“आईवडिल असताना विचारायचं नाही आणि गेल्यावर जगाला दाखवण्यासाठी कार्य करणारे अनेक आहेत. ”
“जाऊ द्या. आपल्याला काय करायचं. ”
“ते तर आहेच. अजून एक स्वतःची काळजी घे. जरा धावपळ कमी कर आणि सर्वात महत्वाचं बायकोला जप. फार गुणाची पोर आहे. पोटची पोरगी करणार नाही इतकं माझ्यासाठी केलयं. दोघांनाही खूप खूप आशीर्वाद. ”
एवढं बोलून क्षणार्धात आप्पा नाहीसे झाले अन माझे डोळे खाडकन उघडले.
“अहो, काय झालं. एकदम उठून बसलात”पाण्याचा ग्लास देत सौंनी विचारलं.
“काही विशेष नाही. ” स्वप्नाविषयी सांगितल्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण चेहऱ्यावरून मनात काय चाललयं हे लक्षात आलं.
“तू झोप. मी ठीकयं”असं तिला सांगितलं पण मला काही केल्या झोप येत नव्हती. पहिल्यांदाच आप्पा स्वप्नात आले. त्यांचं आजारपण सौंनं एकटीनं निभावलं. मी ऑफिसच्या निमित्तानं तरी बाहेर जायचो पण ती घरीच असायची. पाच वर्ष हेच रुटीन होतं. आप्पांचं खाणं, औषधांच्या वेळा कधीच चुकवल्या नाहीत. खूप तडजोडी केल्या पण एकदाही तक्रारीचा सुर काढला नाही. आप्पांचासुद्धा तिच्यावर खूप जीव. नंतर नंतर ती लेक आणि मी जावई झालेलो.
आठवणींचे फोल्डर फटाफट उघडल्यानं विचारांची गर्दी झाली. गाढ झोपलेल्या सौ ला पाहून विनाकारणच तिच्याशी वाद घातला असं वाटलं. सकाळी लवकर उठलो. चहा करून सौंच्या हातात दिल्यावर दिला तिला आश्चर्याचा धक्का बसला.
“काल उगीचच भांडलो. सॉरी! ! ”
“जाऊ द्या. ऑफिसला जायचंय. तुम्ही आवरा मी स्वयंपाक करते. ”
“ऑफिसला दुपारी जाईन”
“का? ”
“पित्रकार्य करायचंय”मी बोलताच सौंनी डोळे वटारले.
“अचानक काय झालं. एवढा मोठा बदल? ”
“असंच. आप्पांच्या पोरीला दुखवायचं नाहीये. मला पटत नाही पण केवळ तुझ्यासाठी….. ”
“रोज अनेक गोष्टी मनाविरुद्ध करतो. तसंच हेही.. फक्त नमस्कार केलात तरी चालेल. ”
“तरीही.. ”
“अंधश्रद्धा, कर्मकांड वगैरेच्या चष्म्यातून न बघता याकडे वेगळ्या दृष्टीनं पहा. रुटीनमध्ये पूर्वजांची आठवण फारशी येत नाही. या निमित्तानं त्यांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीही चूक नाही. त्यांच्या नावे घास ठेवल्यानं काहीही बिघडत नाही. ”
“पण लॉजीकली पटत नाही”
“भावना महत्वाची. नाहीतरी आयुष्य म्हणजे सगळा भावनांचा खेळ. लॉजिकचं म्हणाल तर ते आपल्या सोयीनं वापरायचं असतं. ”
“येस मॅडम. यावेळी घास ठेवायला मी जातो”
“जोडीनं जाऊ”
बायको किचनमध्ये गेली. नैवेद्य घेऊन टेरेसवर गेलो. मनात खूप सारे विचार घोळत होते. ज्या हातांनी भरवलं, शिकवलं, मोठं केलं. त्यांच्या नावानं घास ठेवताना खूप भरून आलं. घरी आल्यावर आई-आप्पांच्या फोटोकडं पाहताना डोळ्यातले थेंब कधी फोटोवर पडले कळलचं नाही. कितीही वय झालं तरी आई-वडिल नसण्याची वेदना कमी होत नाही. पोरकेपण जाणवतंच…