डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(“माणिक, हा बंगला तुझ्या नावावर आहे. तू माझ्यानंतर इथेच रहा. कुठे सह्या करू नको आणि मंगेशला अजिबात देऊ नको घर. आपण मृत्युपत्र करु आणि मग आपल्या पश्चात देऊ त्यालाच. ”त्यांनी माणिकला सांगून ठेवलं. आज त्यांची आठवण येऊन माणिकला अगदी असहाय वाटलं. कशी का होईना, त्यांची सोबत होती तिला.)
इथून पुढे – – –
काळ कोणासाठी थांबतो का?
सहा महिने झाले वामनरावना जाऊन. माणिकच्या मैत्रिणी येत तिला फिरायला नेत. तिचे मन रमवत. मोठा आधार होता तिला या सगळ्या सख्यांचा.
असे आठ महिने झाले आणि एक दिवस मंगेश म्हणाला, ”आई, मी आणि देविका वेगळा फ्लॅट घेऊन रहाणार आहोत. सध्या भाड्यानेच घेतलाय. जवळच बघितला आहे म्हणजे सोयीचे होईल आपल्याला. ”
माणिकला हा मोठा शॉकच होता. मटकन सोफ्यावर बसत तिने विचारलं “अरे पण का? मंगेश, अरे एकदम असं काय घडलं की तुम्हाला माझ्यापासून वेगळं व्हावंसं वाटलं? काय कमी केलं मी आणि कुठे चुकलं माझं? अरे, बाबा जाऊन अजून वर्ष पण नाही झालं आणि खुशाल एवढ्या मोठ्या बंगल्यात मला एकटीला सोडून तुम्ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये जाताय? हे किती चूक आहे रे. ”, माणिक कळवळून म्हणाली.
मंगेश मख्खपणे उभा होता. न बोलता तो आपल्या खोलीत निघूनच गेला. देविकाशी बोलायची तर सोयच नव्हती.
पुढच्या आठवड्यात एक ट्रक आला. आपले बेडस् काही सामान, गोदरेजचे कपाट असं घेऊन मंगेश निघून गेला.
माणिकला किंचाळून विचारावसं वाटलं अरे मीच खर्च करून घेतलेले हे डबल बेड या गाद्या, हे कपाट हे सगळं सामान कसं नेतो आहेस उचलून?
पण माणिक काहीच बोलली नाही. नमस्कारसुद्धा न करता दोघेही ट्रक मध्ये बसून निघून गेले. आता घरात उरली फक्त माणिक.
त्या रिकाम्या घरात ती भुतासारखी सगळ्या खोल्यातून वणावणा हिंडली. रडत रडत स्वतःलाच विचारत राहिली, माझं काय चुकलं?
तिने न राहवून तिच्या जिवलग मैत्रिणीला फोन केला. नीला तिची जवळची मैत्रीण. नीला दहा मिनिटातच माणिकच्या घरी आली. तिला मिठी मारून रडत माणिक म्हणाली, आता मी एकटी कशी राहू इथे? का गेला असेल ग माझा मुलगा मला सोडून? ”
नीलाने तिला शांत होऊ दिलं.
“हे बघ माणिक, हे सत्य आहे आणि तुला ते स्वीकारायला हवंच. वाटेल काही दिवस वाईट. पण होईल तुला सवय. आम्ही आहोत ना?
रोज कोण येणार तुझ्या घरी तुला सोबत म्हणून झोपायला?
आजपासूनच सवय कर. घट्ट कर मन आता. आपलं स्वतःचं घर आहे, त्यात कसली ग भीति? आणि वामनराव कायमआहेत तुझ्यासोबत इथं. ”
नीलाने तिला घरून आणलेला डबा खायला लावला.
म्हणाली “अजिबात कोणाकडे रात्री झोपायला जायचं नाही. आपली नीरा कितीतरी वर्ष एकटी रहातेय. तिला तर मूलबाळ पण नाहीये..
किती आनंदात रहाते ना ती? होईल तुलाही सवय. ”नीला निघून गेली.
माणिकने रात्र तळमळून काढली.
दुसरा दिवस उजाडला. माणिकने चहा करून घेतला.
आज मंगेश देविका नव्हते की नव्हते त्यांचे ब्रेकफास्ट आणि डबे.
कामवाली कलाबाई आली नऊ वाजता. तिला सगळं सांगताना माणिकला पुन्हा रडू कोसळलं. कलाबाई म्हणाली “रडू नका वहिनी.
असलीच पोरं तुमची हल्लीची. गेली तर जाऊद्यात की. आम्ही आहोत की तुम्हाला. उलट त्रास वाचला म्हणा. डबे नकोत करायला त्यांचे आणि स्वयंपाक पण नको रोज करायला त्यांच्या आवडीचा.
होतं ते चांगल्यासाठी. चला.
डोळे पुसा. मी पोहे करते आपल्या साठी. कलाने पोहे केले माणिकला खायला लावले.
त्या दिवशी माणिकला रिकामपण जाणवलं. पण काहीच काम उरलं नव्हतं. तिने घर आवरलं. सगळं पसारा आवरून टाकला.
मैत्रिणीचे फोन आले. गप्पा मारताना माणिक मोकळी होत गेली. आता आपण कायम एकट्या असणार हे हळूहळू मान्य करायचं ठरवलं तिनं.
चार दिवसांनी स्नेहाचा फोनआला.
”माणिक, मला पंचवीसइडलीचटणी करून देशील का प्लीज?
मला उसण भरलीय ग आणि नेमके पाहुणे यायचे आहेत ब्रेकफास्टला.
माझा ड्रायव्हर येऊन घेऊन जाईल. हं. ”
माणिकने स्नेहाला इडलीचटणी पाठवली. ड्रायव्हर बरोबरच स्नेहाने भरपूर पैसे पाठवले होते. आणि चिठ्ठी…हे घ्यायचे मुकाट्याने. नाही म्हणू नकोस. थँक्स माणिक.
माणिकला फार मस्त वाटलं.
कलाबाई म्हणाली” लै भारी की हो ताई. आता घ्यायला लागा अशा ऑर्डरी. मी आहे की. सगळी मदत करीन तुम्हाला. आणि हसत म्हणाली “मग वेगळे पैसे द्या बरं का या कामाचे. ”माणिक हसून, हो ग कला. नक्की देणार तर. म्हणाली. तो दिवस किती छान गेला आपला असं वाटलं माणिकला.
मग बहुतेक स्नेहाने हे ग्रुपमध्ये सांगितलं असणार. तिच्या मैत्रिणीची पावभाजीची ऑर्डर आली. माणिक सुगरण तर होतीच. आणि सढळ हाताने भरपूर द्यायची सवय होती तिला. मैत्रिणीला पावभाजी खूप आवडली.
घरबसल्या माणिकला आता अशा छोट्या ऑर्डर यायला लागल्या.
माणिक अगदी रमून गेली या आवडीच्या कामात.
आणि पैसे खुळखुळू लागले हातात. ऑर्डर आली की कलाबाई मदतीला थांबायची. जास्त ऑर्डर असेल तर कलाची मुलगी यायची मदतीला. त्यांनाही पैसे मिळायला लागले.
आईचा खूप दिवसात फोन आला नाही म्हणून मंगेश जवळजवळ सहा महिन्यांनी घरी आला.
बघतो तर आई खुशीत पेपर वाचत आणि चहा पीत बसलेली.
य म्हणतोस मंगेश? ठीकचाललंय ना सगळं? घे रे चहा. माणिकने विचारलं. तिने मंगेशला विचारलेही नाही की सहा महिन्यांनी आईची आठवण झाली का?
मंगेश म्हणाला”, आई. रहायला येतेस का माझ्याकडे? देविकाला दिवस गेलेत. तिची आई जमणार नाही यायला म्हणाली. तू ये ना. ” देविकाला खूप त्रास होतोय.
माणिकने शांतपणे त्याच्याकडे बघितलं”. छे रे. मलाही अजिबात जमणार नाही यायला. बघितलंस ना, माझा केटरिंगचा व्याप आता खूप वाढलाय. मला उठून तुझ्याकडे यायला जमणार नाही.
फार तर मी डबा देऊ शकेन तुला. न्यावा मात्र लागेल तुला इथून”
चिडून मंगेश म्हणाला, कशाला ग असले भिकार स्वयंपाकीण बाईचे धंदे करतेस? शी. ऐकलं आहे मी लोकांकडून. तुझी आई केटरिंग करते असं.
बंद करून टाक हे सगळं. शोभत नाही माझ्या प्रतिष्ठेला. ”
माणिक आता मात्र संतापली. ”. हो का? कोणती तुझी प्रतिष्ठा? हे तू बोलत नाहीयेस मंगेश. देविका बोलतेय तुझ्या तोंडून. मूर्ख मुलगा. खुशाल एका दिवसात निघून गेलास मला सोडून, तेव्हा नाही लोक काय म्हणतील असं वाटलं रे तुला? तेव्हा लोकांनी कौतुकच केलं असेल ना तुझं.? एकट्या आईला सोडून निघून गेलात म्हणून… हे बघ. हे माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं ते मी ठरवणार.
तुमच्या गरजेला उभं रहायला नक्की आवडलं असतं मला. मला आनंदच आहे तुला मूल होणार म्हणून. पूर्वीची मी भाबडी माणिक असते तर धावत आलेहीअसते. पण आता मी बदलले. तू मला बदलायला भाग पाडलंस मंगेश… ज्या पद्धतीने तू वागलास ते मला नाही, कोणालाच आवडण्यासारखं नाही मंगेश.
देविकाचं सोड. , ती परकीच मुलगी आहे पण तू तर माझा पोटचा मुलगा आहेस ना? जराही वाईट वाटलं नाही का आईला एका दिवसात सोडूनजाताना? देविकाच्या माहेरी जाताना मिठाया घेऊन जाता आणि दिवाळीला आईच्या घरी यावंसं सुद्धा वाटलं नाही? असा काय गुन्हा केला मी?
… उलट आता मला मोकळीकच मिळाली असं वाटतं हल्ली. तुला काय आवडेल देविकाला काय वाटेल हा धाकच राहिला नाही आता. तुमचे डबे करा, भाज्या आणा, तुम्ही केलेले पसारे निमूट आवरा, हे कमी झालं एकदम. आता मी मस्त एकटी रहाते. माझ्या प्रिय मैत्रिणींबरोबर ट्रिप्स करते, फार्म हाऊसवर जाते. आता आम्ही परदेशी ट्रीपला जाणार आहोत. पटाया बँकॉकला. जे तुम्ही असताना मला जमलं नसतं कधी… ते जाऊदे.
… काय रे, इतक्या महिन्यात एकदा तरी बोलावलंत का मला? नवीन घर बघायला तरी? निदान जेवायला तरी? हे बघ… मला गोष्टी समजत नाहीत असं वाटलं का? तिच्या माहेरची माणसं खुशाल राहिलेली चालतात का? मग आता का येत नाहीये तिची आई लेकीच्या मदतीला?
… सॉरी मंगेश. मी येणार नाही. मला माहीत आहे, माझा तू एकुलता एक मुलगा आहेस. माझे हातपाय थकल्यावर तूच येशील मदतीला….. पण मला आता तोही भरवसा उरला नाही तुमचा.
बघू पुढचे पुढे. मी इतका विचारच करत नाही हल्ली. आहेत खूप वृद्धाश्रम. जाईन तिकडे. ”
… माणिकच्या डोळ्यात अश्रू आले.
… मंगेश मान खाली घालून निघून गेला.
शांतपणे माणिकने डोळे पुसले आणि आलेली ऑर्डर पुरी करायला ती किचन मध्ये निघून गेली.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈










