अनुभूतींच्या विविध रंगांचे रसाळ कोलाज: ‘माझे कथाविश्व‘
जगण्यातील साधेपणा जेव्हा शब्दांचे बोट धरून कागदावर उतरतो, तेव्हा ‘माझे कथाविश्व’ सारखी एक नितांत सुंदर साहित्यकृती आकारास येते. श्रीमती जयश्री लेंभे लिखित आणि मुद्रिका कमर्शिअल प्रिंटर्स (शुक्रवारपेठ) तर्फे प्रकाशित झालेला हा कथासंग्रह म्हणजे केवळ कथांचा पुंजका नसून, मानवी स्वभावाच्या, नातेसंबंधांच्या आणि भावभावनांच्या विविध छटांचे एक देखणे शब्दविश्व आहे. लाभलेले सुबक मुखपृष्ठ (स्वराली लेंभे) आणि मा. किसन चौधरी सरांची पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढवणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालते. लेखिकेचे छोटेखानी पण प्रगल्भ मनोगत वाचकाला या विश्वात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करते.
दैनंदिन जीवनातील तत्त्वज्ञान आणि मिश्कील निरीक्षण यातून साकारलेल्या या संग्रहातील कथांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे लेखिकेची विलक्षण निरीक्षणशक्ती. ‘निर्मलाची पाककृती’ मधील खुसखुशीतपणा असो वा ‘आजीची शाळा’ मधील त्या इवल्याशा बाळाने दिलेली आर्त साद प्रत्येक गोष्ट थेट काळजाला भिडते. ‘भैरवनाथ प्रसन्न’ आणि ‘मान न मान में तेरा मेहमान’ (मांंजराच्या रूपातील पाहुणीची कथा) या कथांमधून लेखिकेचा मिश्कील आणि हसता-हसता अंतर्मुख करणारा स्वभाव दिसून येतो. ‘समज’ आणि ‘वेडी माणसं’ या कथा मानवी मनातील गैरसमज आणि स्वभावातील विक्षिप्तपणाचे अचूक पण तितकेच सहानुभूतीपूर्वक चित्रण करतात.
संस्कार, कर्तव्य आणि भावनांचा त्रिवेणी संगम
दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात घालवलेल्या आदर्श मुख्याध्यापिकेचे संस्कारक्षम पैलू ‘सत्वपरीक्षा’, ‘२५ नंबरचा विद्यार्थी’ आणि ‘चांदण्यातली चांदी’ या कथांमधून प्रकर्षाने जाणवतात. विद्यार्थ्यांबद्दलची प्रामाणिक आपुलकी आणि नातवंडांवर होणारे मूल्यांचे संस्कार वाचकाच्या मनावर गारुड करतात. कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडवणारी ‘कोटाची कोपरी’ आणि प्रत्येक गृहिणीला स्वतःचा शोध घ्यायला लावणारी मैत्रिणीची गोष्ट म्हणजे ‘रखमी’ या कथा कौटुंबिक मूल्यांची वीण घट्ट करतात.
परमेश्वरी अधिष्ठान आणि अध्यात्माची प्रचिती
लेखिकेच्या संवेदनशील मनाला लाभलेली अध्यात्माची जोड पुस्तकाला एक वेगळीच उंची देते. ‘वारी पंढरीची’, ‘अतर्क्य’ (अपघातातून आजोबांचे बरे होणे), आणि ‘विठ्ठला पांडुरंगा’ या कथांमधून विठ्ठलनामाचा गजर आणि परमेश्वरी अस्तित्वाची प्रचिती वाचकाला भारावून टाकते. ‘मेडिटेशन’ सारख्या गंभीर विषयावर स्वतःचीच गंमत सांगत लेखिकेने मांडलेले जीवन जगण्याचे मोठे तत्त्वज्ञान कौतुकास्पद आहे.
ऋतूंचे आणि आठवणींचे सोहळे
दिवाळीच्या फराळाची पंगत डोळ्यांसमोर उभी करणारी ‘फराळ’ ही काव्यात्मक कथा आणि ‘आठवणीतील दिवाळी’, ‘आठवणीतला पाऊस’ या रचना वाचकाला स्वतःच्याच बालपणात आणि भूतकाळात घेऊन जातात, जिथे वाचकही त्या आठवणींच्या पावसात चिंब भिजून निघतो. ‘आनंदाचा चष्मा’ चढवून मस्त आनंदी राहण्याचा संदेश देणाऱ्या आणि ‘येन केन प्रकारेण’ मधून संस्कृत श्लोकांचा मतितार्थ सोप्या भाषेत मांडणाऱ्या कथा संग्रहाची समृद्धी वाढवतात.
अनुभवावर आधारित सुंदर कथाविश्व!
साध्या सोप्या भाषेचे आत्मियता वाढवणारे लेखनविश्व!
वाचकांचा मूड आनंदी करणारे एक नितांत सुंदर शब्दविश्व!
वाचकांना खिळवून ठेवणारे माझे कथाविश्व!
‘माझे कथाविश्व’ हे पुस्तक वाचताना केवळ पानांवरचे शब्द वाचल्याचा भास होत नाही, तर लेखिकेसोबत एका समृद्ध प्रवासाला निघाल्याचा अनुभव येतो. साधी, ओघवती आणि मनाला भिडणारी भाषा, प्रसंगांची जिवंत गुंफण आणि सकारात्मक शेवट ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. वाचकाचा मूड क्षणात आनंदी करण्याचे आणि त्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. प्रत्येक रसिकाने संग्रही ठेवावे आणि आवर्जून वाचावे असे हे एक उत्तम ‘कथाविश्व’ आहे!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ खांद्यावरचे स्टार्स – लेखक : गजानन राजमाने ☆ परिचय – प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
पुस्तक : खांद्यावरचे स्टार्स
— आगळावेगळा पत्ररूप परिचय
लेखक – गजानन शिवलिंग राजमाने.
प्रकाशन – पॉप्युलर प्रकाशन
किंमत – ३००₹
प्रिय मित्र गजानन,
खरंतर हे अनौपचारिक पत्र तुझ्यातल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यापेक्षा मित्र म्हणून असलेल्या प्रवासासाठी. तुझे ‘खांद्यावरचे स्टार्स ‘ हे पुस्तक सध्या सर्वत्र वाचनीय व प्रेरणीय बनलेले आहे. याचा मनस्वी अभिमान वाटतो. तू घडविलेल्या प्रत्येक कथेतल्या नायकाला उकलत असताना त्यांना माणुसकीची वाट दाखण्यासाठी तू आणि तुझ्या टीमने केलेल्या प्रत्येक धाडशी पावलांना मनोमन सलाम करावासा वाटतो.
हा प्रवासच खरंतर खडतर. पण तुझ्या चाणाक्ष नेतृत्वगुणाने तो सुखकर झालेला. तुझं पुस्तक मार्केटमध्ये येण्यापूर्वी त्याचे मुखपृष्ठ मला शेअर करताना ” अरुण आता मी तुझ्या साहित्यिक जातीतला झालो ” हा मेसेज मी मनाच्या स्क्रीनवरून अजूनही त्या स्क्रिनवर पाहतो.
९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सातारा येथे पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर – खांद्यावरचे स्टार्स- बनलेली गर्दी डोळे भरून पाहताना उत्साहाने घेतलेली गळाभेटही दोस्ता काळजात जपून ठेवली आहे.
तसा माझा आणि तुझा प्रवासच खडतर. तुझ्या आणि माझ्या वडिलांची कथा थोडीशी सारखीच. बनपुरीच्या एका आळीतला मी आणि दुसऱ्या आळीतला तू जरी असलो तरी आख्या बनपुरीच्या आळ्या-गल्ल्या- मळ्यात वावरलेलो आपण दोघेही.
लहानपणी भिमराव वस्ताद गावातल्या पोरांना पहाटे लवकर उठवून ओढ्याच्या वाळूत, गांवदरीच्या ढेकळात कुस्त्या शिकवायचे. गावातली तालिम पुन्हा जिवंत होण्याचा तो सदृढ काळ. मल्लखांबावरच्या कसरतीचा काळ अजूनही डोळयापुढून हलता हलत नाही. तू माझ्यापेक्षा तीन ते चार वर्षाहून लहान, पण खेळात चाणाक्ष व चपळ होतास. लहान असणारे आपण सर्वजण पहाटे पहाटे एकमेकांना उठवायला जायचो. ओढयात, रानात शड्डू ठोकायचो. तुझे वडील किश्ताक शिवायचे. ते किश्ताक घालून पैलवानकी गाजवताना हुरूप संचारायचा. डिप्स, उठयाबशा कुथून काढायचो. गांवदरीची विहीर, धेंड्याची विहीर, जाधवाची विहीर मनसोक्त पोहण्याचे त्यावेळी स्विमिंग पूल वाटायचे.
कराटे शिकायचा एक काळही त्यावेळी आकर्षणाचा बिंदू होता. डबलबार, सिंगलबार, कराटे, बॅक किक, साईड किक, जंप किक, नानचाकू याच्या मोहात पडलेलो आपण सगळेच. त्यात तू सगळ्या बाबीत तरबेज होतास. सांस्कृतिक चळवळीच्या प्रत्येक कलेचा आनंद आपण उपभोगलाय. खरंतर ही तुझी स्तुती नाही; पण बालपणाचा कष्टपद पण सुखाचा असणारा तो काळ खराखोटा करण्यासारखा नव्हताच. ते अस्सल जगणं होतं आपलं. हीच सुरवात होती अंधारमय जीवन प्रकाशित करण्यासाठीच्या धडपडीची. कदाचित ती प्रेरणास्थळे असतील आपल्या बालपणीच्या प्रत्येक कृतीची. तुझं माझं शैक्षणिक केंद्र खरंतर समांतर असलेलं आणि योगायोगाने ते एकच असलेलं होतं असं मला पुन्हा पुन्हा जाणवत राहतं. तुझी माझी बनपुरी – खरसुंडी – सातारा – आटपाडी – कोल्हापूर ही या शैक्षणिक जडणघडणीची केंद्रे म्हणजे तुला मला घडवलेली समांतर केंद्रे म्हणजे निव्वळ योगायोग. खरंतर बनपुरीच्या मातीत संस्कारीतपणे घडलेलं बालपणच तुझ्या खांद्यावरच्या स्टार्सचं चमकणं असावं.
मनात धग, मनगटात रग व खांद्यावर जबाबदारी घेण्याची साहसी वृत्ती या मातीने तुझ्या अंगाखांद्यावर दिलीय हे अभिमानानं तुझ्याबद्द्ल सांगताना मला आकाश ठेंगणं ल्यासारखं वाटतंय.
तुझं पोलिस अधिकारी होऊन तरुणांना प्रेरणा देणारं काम मला तर प्रचंड भावलं आहे. तुझ्या सहकार्याने बनपुरीत सुरू असलेली सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक क्रांतीची चळवळ प्रत्येक वर्षी गावातल्या तरुणामध्ये चार चाँद लावत असते. त्यात तु येणाऱ्या पिढीचा प्रेरणा स्त्रोत बनून असतोस सर्वांपुढं. प्रत्येक वर्षी प्रशासकीय सेवेत नवीन भरती झालेल्या तरुणांना व नवीन बनलेल्या अधिकाऱ्यांना गावात बोलवून त्यांचा कौतुक सोहळा गावासमोर करणं ही गावची वैचारिक व प्रेरणादायी दिवाळीच असते. या उजेडातूनच गावातली कितीतरी मुलं मुली प्रशासकीय सेवेत भरती झालेली आहेत. कित्येक त्या वाटेवर आहेत. हे अभिमानाने सांगावेसे वाटते. शहिद विष्णू पुकळे स्मारक म्हणजे गावाचं अत्युच्य प्रेरणा स्थळच आहे. या सर्वांचा तु साहेब नसून मित्र बनून राहतोस प्रत्येकाच्या मनामनात. ही उर्मी, हा जोश तुला पाहिल्यानंतर सळसळत राहतो प्रत्येक नवयुवकांच्या मनात जिद्दीने नवे क्षितिज कवेत घेण्यासाठी.
आता तुझ्या पुस्तकाविषयी – खरंतर हे पुस्तक अंधारमय जीवन प्रकाशित करण्यासाठी अविरत जगण्याचं प्रेरणास्त्रोत बनलं आहे.
तुझे ‘ खांद्यांवरचे स्टार्स ‘ पुस्तक वाचताना तु प्रत्येक पानावर उलगडत जातोस. ती उर्मी, ती धग, ती रग पानापानात सळसळत राहते. फक्त कर्तव्य करायचे म्हणून नाही तर माणुसकीचा धागाही जपायचा हा तुझा निर्धार पुस्तकातील प्रत्येकाच्या कहानीत सकारात्मक जीवन जगायला भाग पाडतो. पोलिस सेवेतील अधिकाराची कर्तव्ये बजावत असताना सकारात्मक दृष्टीने घडविलेले परिवर्तन हा मुख्य गाभा या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
आत्मसमर्पणाच्या वाटेवरचा दिलेर- क्रांतीची आस बाळगून वाट चुकलेला एक तरुण. क्षमा की शिक्षा अशी द्विद्या अवस्था असताना त्याला अंधारातून प्रकाशात आणण्याची आनंददायी बनवलेली क्षमेची वाट तुझे स्टार्स चमकवणारी ठरलीय. एकेकाळच्या मालेगावमधील क्रुर गुन्हेगार भवानीदादाला तुम्ही पैंगबरांचा दाखविलेला मार्ग वाखाणण्यासारखा आहे. ” मैं गुनाह की राह, सब छोड़कर नेकी पर चलूंगा ” असे म्हणणारा भवानीदादा ‘खुदा की कसम ‘ देऊन जातो तेव्हा त्या त्या धर्मातील माणसांच्या मनातील शोध घेत तो पूर्णत्वास घेऊन जाणे ही यापेक्षा सर्वोच्च कामगिरी ती काय असू शकते असे वाटून जाते. पुढे भवानी दादा ‘ पुलिस की दुँवा ‘ हा स्टार आयुष्यभर जोपासणारा नदीम भाई बनतो हा क्षणच परम्मोच्च होऊन गेलाय.
अजान आणि आरती मधील धर्माची शिकवण आणि त्यातील प्रेमाचा विजय पुण्यकर्माचे प्रतिक बनला आहे. तळहाताचा पंजा नसलेला शाहीद ‘ धरती का तारा ‘ बनून जातो. मॉलिवूड, मालेगावचा मुशायरा, ग्रीन मालेगाव ड्राईव, सेल्फी फ्रॉम मालेगाव या सगळ्या कामातून पोलिसांनी सामाजिक साहाय्याचे पोलिसींग करीत सर्वच समाजमनांना एकत्र बांधून ठेवण्याची उदाहरणे दुर्मिळ अशीच आहेत.
आपल्या मौल्यवान शरीराला मादक वस्तूंनी बरबाद करण्यापेक्षा अनेकांची आयुष्ये व्यसनाने बरबाद होण्यापासून वाचविणेचे पूण्यकाम करताना तुझ्या वडीलांनी स्वतःमध्ये केलेला बदल आणि तू नानांना केलेला सॅल्युट यांचा रेशमी धागा बनलेल्या क्षणाला सलाम करावासा वाटतो. त्यांचे प्रेमाने भरलेले डोळे पाहून तुमची झोळी त्यांच्या दुवा आशीर्वादाने भरल्याचे वाटणे हे मनाला खूप भावून जाते. तुझ्या होमगार्ड असणाऱ्या नानाला पोलिस अधीक्षक असणारा तू पोलिसी युनिफॉर्ममध्ये सॅल्यूट करतोस तेव्हा मलाही ऊर भरून त्यांना सॅल्यूट करावासा वाटतो. परमेश्वराने दिलेल्या खाकी वर्दीचा वापर नेक कामासाठी करणे हे शिवधनुष्य तुम्ही उचललं आहे याचा सार्थ अभिमानही वाटतो. कुंटणखान्यातील कमला नावाच्या आईच्या निकिता या मुलीला बारावीला ८२ % टक्के मार्क पडलेले पाहून तिचे कौतुक करताना तिने हातावर ठेवलेला पेढा त्यांच्या कटू कहानीला गोड करून जातो. आणि तिला आयपीएस बनण्याच्या जिद्दीला प्रकाशमय दीप लावण्याचे तुमच्या टिमचे कसब जनामनातली घरं प्रज्वलित होण्यासाठी स्वयंदीपाचे काम करतात.
अविरतपणे पोलिस आपल्या खांद्यावर असणारी अभयदानाची जबाबदारी संभाळत असतात. आपल्या प्राणांची बाजी लावून अविरत अभयदान देणारे तुम्ही सर्वजण गौरवाची प्रतिके बनून स्टार्स चमकवत राहता हे कार्य खूपच महान आहे.
सातारच्या अंध नामदासचे रक्तदानाचे पुण्य काम इन्सानियत के लाल रंग दाखवून जाते. ‘ शहिदों ने बलिदान दिया, हम रक्तदान करेंगे ‘ ही भावना देशप्रेमाच्या रंगात एकरूप होते. समाजाला खरी दृष्टी देणारा नामदास शरिराच्या धमन्यातून जीवनोत्सव बनून वाहू लागतो. छाती पोलिसांची आणि हृदय शिक्षकांचे बनून तुम्ही दिव्य कर्तव्ये पार पाडता तेव्हा ज्ञानाची ज्योत तुमच्या स्टार्सना लख्ख उजळवून टाकते.
एका हातात प्राण आणि दुसऱ्या हातात रायफली घेऊन तुम्ही नक्षलवाद्यांच्या आयुष्याला माणुसकीचा दिलेला आधार तुमच्या टिमच्या निस्वार्थी आणि निर्मळपणाचे उत्तम उदाहरण आहे आणि ते नागणडोह सारख्या गावात दिसते.
आदिवासींची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी माणुसकीचा आधार देत शस्त्र नको पण सन्मानाचे वस्त्र देण्याचे काम तुम्ही प्रशासनाच्या मदतीने केले याचा मनस्वी अभिमान या प्रसंगातून वाटला. स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तनाची कास धरणाऱ्या मरकाम यांना मलाही विसरणे शक्य नाही. अजीम शेखच्या काळोखमय आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडून तु व तुझ्या टिमने दिव्य असे कर्तव्यच पार पाडले हे आणखी विशेष!
फौजदार तयार करणारी फॅक्टरी, पिपरखारी गावावर नक्षलवाद्यांनी पेरलेली दहशत, बंदुकी शिवाय नक्षल बिमोड, कुपोषितांच्या आयुष्यातील लाल क्रांती, केसरी रंगाच्या साडीत कमळासारखी खुलून दिसणारी आजी, नशेत भरकटलेल्या मिनाक्षीच्या आयुष्यातून तिची नशा कायमची उध्वस्त करण्यासाठी केलेला संगदोष उपाय, विदर्भातील डॉनला चड्डीवर अनवाणी फिरविणारी कामगिरी, लोकांना भयापासून मुक्ती देणारी खाकी वर्दितली तुमची सेवा असे कितीतरी प्रसंग या पुस्तकातून प्रेरणा देत राहतात.
ज्यांच्याकडे मूर्त स्वरूपात ‘स्टार्स’ नसले तरी हजारो लाखो जणांचे स्टार प्रशासकीय कर्तव्याने चमकविण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे. त्यामुळेच या पुस्तकातील २१ घटनातील प्रसंग वाचताना समाजातील व्यवस्थेसाठी सकारात्मक दृष्टीने तुम्ही तुमचे ‘खांद्यावरचे स्टार्स ‘ घेऊन केलेले काम आमच्याही मनात तुमच्या खांद्याला खांदा देऊन चमकविण्याची उर्मी निर्माण करते. आम्हालाही तुमच्या ‘खांद्यावरच्या स्टार्स ‘ चा सार्थ अभिमान वाटत राहतो. तुमच्यातल्या या लोकसेवक स्टार्सना कडक सॅल्युट देण्यासाठी नकळत माझे कर कपाळाला स्पर्श करतात आणि गर्वाने माझ्या मातीतल्या तुझ्यासारख्या दोस्ताला उराउरी भेटताना छाती गगनाला भिडते.
(हा लेख लिहीत असताना तुझी मुंबईच्या पोलिस उपायुक्त पदी बढती होणं हे सुद्धा एक चमकणारं विलक्षण स्टारच आहे. मागच्याच आठवड्यात तुझे अभिनंदन करण्यासाठी फोर्स वन च्या कार्यालयात तुला भेटलो तेव्हा तु कडकडून मारलेली मिठी आणि फोर्सवन चा सगळा परिसर फिरवून दाखविलेला तो कतृत्वाचा आणि अभिमानाचा क्षण आणि गप्पात रंगलेले चार तास विसरता येत नाहीत. तो क्षण सदैव माझ्या काळजात कोरून ठेवला आहे. तू भेट दिलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या पानावर तुझ्या हस्ताक्षरात माझ्यासाठी लिहलेल्या ओळी खांद्यावरचे स्टार्स झाल्यासारख्या मलाही भासू लागल्या आहेत.)
अल्पावधीत अनेकांच्या खांद्यावर चमकत राहणारे विक्रमी खपाचे तुझे पुस्तक प्रेरणा देणारे चिरंतन स्रोत बनले आहे. या पुस्तकातल्या सर्व प्रसंगाना आणि पुस्तकासाठी राबलेल्या सर्व हातांना मनोमन सलाम आहे.
अंधारमय जीवन प्रकाशित करणारे तुझे ‘खांद्यावरचे स्टार्स ‘ सदैव चिरंजीवी राहो. प्रशासकीय अधिकारी हा पूर्णतः तुझ्यासारखा समाजसेवक असायलाच हवा ही प्रेरणा तुझ्यामुळे सर्वांना मिळो. हे पुस्तक अनेकांचे दिपस्तंभ ठरो. या सदैव सदिच्छा आणि भरभरून मित्रप्रेम!
तुझा मित्र…
प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
९४२११२५३५७…
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “होर्मुझचे महायुद्ध” – लेखक : श्री विजय लोणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : होर्मुझचे महायुद्ध
लेखक: विजय लोणकर
पृष्ठ: १९२
मूल्य २९५₹
इतिहासाच्या पानांवर नजर टाकली, तर एक सत्य ठळकपणे जाणवते ते म्हणजे, जगातील प्रत्येक मोठ्या युद्धाच्या मुळाशी केवळ भूमी, धर्म वा विचारधारा नसते, तर त्या युद्धाची खरी नाळ असते ती संसाधनांच्या, विशेषता ऊर्जेच्या नियंत्रणाशी हॉर्मुझची सामुद्रधुनी हे त्याचे आजचे जिवंत उदाहरण आहे. जगातील एक तृतीयांश खनिज तेल याच अरुंद जलमार्गातून वाहते, या एका भौगोलिक बिंदूवर जो वर्चस्व गाजवतो, तो जगाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास नियंत्रित करतो; हे कटू, पण अटक वास्तव आहे.
हॉर्मुझच्या अरुंद जलपट्टीत त्याच एका कारणाने आज एक ऐतिहासिक वादळ घोंघावत आहे. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ची गर्जना, दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची अस्तित्वाची लढाई आणि मध्यभागी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा ‘इस्लामी क्रांती’चा अखंड निर्धार, तसेच आता इराणच्या सर्वोच्च नेतेपदी असलेले अली खामेनी यांचे पुत्र मोजताबा अली खामेनी या तीन व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षामध्ये जगाचा नकाशाच बदलण्याची क्षमता आहे.
थोडक्यात सांगायचे तर, या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची आक्रमक आणि सुरक्षिततेकडे झुकणारी भूमिका, त्यांची अनिश्चित पण ठाम धोरणात्मक भाषा आणि यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान, हेही तितकेच महत्वाचे आहे. या तिघांच्या विचारसरणीने (खामेनी आज नसले तरी त्यांच्या मार्गाने जाणारा इराण) आणि या तिघांच्या निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे, हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.
याच अभूतपूर्व संघर्षाचे सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणाऱ्या विजय लोणकर यांच्या ‘होर्मुझचे महायुद्ध’ या पुस्तकात केले आहे.
या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. इतिहास हा केवळ घटनांनी नाही, तर निर्णय घेणाऱ्या माणसांनी घडतो आणि या संघर्षात तीन व्यक्तिमत्त्वे सर्वाधिक निर्णायक ठरली आहेत : डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतान्याहू आणि अली खामेनी.
अमेरिकेचे माजी आणि पुन्हा सत्तेत आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका या संघर्षात अत्यंत गुंतागुंतीची आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या तत्त्वज्ञानाने चालणारे ट्रम्प एकीकडे युद्धाचे समर्थन करतात, तर दुसरीकडे ‘मी युद्ध संपवणारा माणूस आहे’ असा दावाही करतात. त्यांची धोरणात्मक भाषा अनिश्चित असली, तरी ठाम असते. इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादणे, इराणच्या लष्करी नेतृत्वाला थेट लक्ष्य करणे आणि त्याच वेळी वाटाघाटींचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आव आणणे; हे ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची अनिश्चितताच त्यांचे सर्वांत मोठे धोरणात्मक अस्त्र बनते; कारण शत्रूला पुढचे पाऊल कळत नाही. इराणशी थेट युद्ध नको, पण इराणला सतत कमकुवत ठेवायचे: हीच ट्रम्प यांची रणनीती आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका या संघर्षात सर्वाधिक आक्रमक कारवाया करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. इराणच्या अणुतज्ज्ञांच्या हत्या, इराणच्या संगणक प्रणालींवर सायबर हल्ले, गाझा आणि लेबनॉनमधील हिझबुल्लांविरुद्ध एकाच वेळी लढत इराणला उत्तर देणे; हे सर्व नेतान्याहू यांच्या दीर्घकालीन रणनीतीचे भाग आहेत. ते युद्धाला केवळ लष्करी समस्या मानत नाहीत, तर ते अस्तित्वाचे एक संकट मानतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक सवलत म्हणजे इस्रायलच्या भविष्याशी केलेली तडजोड आहे, म्हणूनच ते अनेकदा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या विरोधातही आपला मार्ग धरतात.
अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते. त्यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान या संघर्षाला एक वेगळेच परिमाण देते. खामेनी यांनी चार दशकांहून अधिक काळ अमेरिका आणि इस्रायल यांच्या दबावाखाली इराणला टिकवले आहे. त्यांची रणनीती थेट टकरावाची नाही, तर ती ‘हळूहळू थकवण्याची’ आहे. प्रॉक्सी गट, हिझबुल्ला, हमास, हुती हे सर्व खामेनी यांच्या दीर्घकालीन प्रतिकाराचे विस्तारित हात आहेत. अत्यंत कमी खर्चातील ड्रोनने महागड्या अमेरिकन संरक्षण प्रणालींना थकवणे, होर्मुझची सामुद्रधुनी कधीही बंद करण्याची धमकी जिवंत ठेवणे आणि अण्वस्त्र कार्यक्रम हे अंतिम संरक्षणकवच म्हणून जपणे; ही इराणची तीन मुख्य अस्त्रे होती आणि आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्यानंतरही इराण कडवी लढत देत आहे. इराणला याची जाणीव आहे की, अमेरिका आणि इस्रायल यांना इराणचे पूर्ण पतन परवडणारे नाही; कारण त्यानंतर येणारी अस्थिरता त्यांच्यासाठीही घातक ठरेल. हीच जाणीव खामेनी यांना दशकांनंतरही प्रतिकार करण्याची ताकद देते.
या तिघांच्या विचारसरणी आणि निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सत्य असत्याशी मन केले ग्वाही” – लेखक : श्री जी. डी. पारेख☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : सत्य असत्याशी मन केले ग्वाही
लेखक : जी डी पारेख
प्रकाशक : गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे (पुस्तकासाठी संपर्क : ७७२२००५०८१)
एकूण पृष्ठे : १९६
किंमत : ₹ ३५०
संत तुकाराम महाराजांचे नाव महाराष्ट्रात सर्वांच्या ओठांवर आहे; परंतु त्यांच्या विचारांचे खरे आकलन मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. अभंगांचे पठण, वारीची परंपरा आणि ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष मोठ्या श्रद्धेने केला जात असला, तरी तुकोबांनी मांडलेली समता, बंधुता, मानवता, विवेक, नीतिमत्ता आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष यांचा मूळ आशय अनेकदा झाकोळला जातो. अशा वेळी जी. डी. पारेख लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ संत तुकारामांचे केवळ भक्तिपर दर्शन घडवत नाही, तर त्यांच्यातील मानवतावादी तत्त्वज्ञ, समाजप्रबोधक आणि नैतिक क्रांतिकारक यांचे प्रभावी दर्शन घडवतो. संत तुकाराम महाराजांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, त्यांच्या अभंगांना कंठस्थ केले, त्यांच्या नावाने लाखोंच्या संख्येने वाऱ्या केल्या; परंतु तुकोबांच्या विचारांचा आत्मा किती जणांनी स्वीकारला? हा प्रश्न आज पूर्वीपेक्षा अधिक तीव्रपणे उभा राहतो. कारण एका बाजूला तुकारामांच्या ‘भेदाभेद अमंगळ’चा जयघोष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजात द्वेष, जातीय विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरण, असहिष्णुता आणि अंधश्रद्धांचे पुनरुज्जीवन होताना दिसते. अशा काळात जी. डी. पारेख यांचा ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ केवळ तुकाराम महाराजांवरील आणखी एक पुस्तक म्हणून समोर येत नाही; तो तुकोबांच्या मूळ विचारांचे पुनराविष्कार घडवणारा आणि आपल्या सामाजिक विवेकाला जागवणारा वैचारिक दस्तऐवज म्हणून उभा राहतो.
‘भक्तीला नीतीचे वाहक बनवून मानवतेचा सोपान गाठू पाहणारा वारकरी रूपातील दार्शनिक’ हे या ग्रंथाचे उपशीर्षकच त्याच्या आशयाचे सार सांगून जाते. तुकोबांची भक्ती ही कर्मकांडी नव्हती, ती माणसाला माणसाशी जोडणारी होती. त्यांचा धर्म हा कोणत्याही जातीचा, पंथाचा किंवा सत्तेचा धर्म नव्हता; तो मानवतेचा धर्म होता. त्यांच्या अभंगांतून व्यक्त होणारा ईश्वर हा अन्याय, विषमता आणि दांभिकतेला मान्यता देणारा नसून सत्य, करुणा, समता आणि नीतिमूल्यांचा पुरस्कार करणारा आहे. लेखकाने या सर्व पैलूंचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समकालीन संदर्भात पुनर्विचार केला आहे.
या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो तुकोबांना वर्तमानाशी जोडतो. आज समाजात संविधानिक मूल्यांबद्दल वाढती उदासीनता वाढत असताना, ‘भेदभेद अमंगळ’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या विचारांची नव्याने आठवण करून देण्याची गरज लेखक प्रकर्षाने मांडतो. समता, सामाजिक न्याय, बंधुभाव, करुणा आणि मानवतेची ही मूल्ये भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, तीच मूल्ये संतांनी शतकांपूर्वी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता, हे या ग्रंथातून प्रभावीपणे अधोरेखित होते. या ग्रंथाची खरी ताकद त्याच्या वर्तमानाशी असलेल्या संवादात आहे. आज वारीत संविधान, पर्यावरण, समता आणि सामाजिक न्याय यांचे प्रबोधन करणाऱ्यांवर संशय घेतला जातो; काही वेळा त्यांना ‘अर्बन नक्षल’ या अपमानास्पद विशेषणांनीही हिणवले जाते. अशा वातावरणात लेखक अत्यंत नेमकेपणाने दाखवून देतात की, भारतीय संविधानाचा आत्मा आणि संत तुकारामांचा विचार यांच्यात मूलभूत विरोध नाही, तर विलक्षण साम्य आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये संविधानाने स्वीकारण्याच्या कित्येक शतके आधी तुकोबांनी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच संविधानाची बाजू घेणे म्हणजे संतपरंपरेपासून दूर जाणे नव्हे; उलट तिच्या मूळ आत्म्याशी प्रामाणिक राहणे होय, हा महत्त्वपूर्ण संदेश हा ग्रंथ देतो. अशा पार्श्वभूमीवर ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारीत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणे किंवा समता व संविधानाची आठवण करून देणे हे वारकरी परंपरेशी विसंगत नसून तिच्या मूळ आत्म्याशी सुसंगतच आहे, असा ठाम विचार हा ग्रंथ मांडतो. त्यामुळे वारीचा अर्थ केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक प्रबोधनाची लोकचळवळ म्हणून पुन्हा समजून घेण्याची प्रेरणा तो देतो. तुकोबांच्या वारीत पर्यावरणाचा संदेश नसेल तर तो कुठे असणार? समाजात समतेचा संदेश नसेल तर भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? लेखक असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे वाचक केवळ पुस्तक वाचत नाही, तर स्वतःच्या श्रद्धा, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचाही पुनर्विचार करू लागतो.
तुकारामांचे धर्मयुद्ध हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हते; ते अज्ञान, दांभिकपणा, बुवाबाजी, अन्याय, जातिभेद आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाविरुद्ध होते. भक्तीला विवेकाची आणि नीतिमूल्यांची जोड नसल्यास ती समाजाला मुक्त करण्याऐवजी गुलाम बनवू शकते, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लेखक तुकोबांच्या अभंगांच्या आधारे स्पष्ट करतो. त्यामुळे हा ग्रंथ संतसाहित्याचा तसेच आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाला भिडणारा वैचारिक हस्तक्षेप ठरतो. तुकारामांनी ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, तो ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता तर त्यांच्या वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीच्या विरोधात होता. धर्माच्या नावाखाली चालणारा व्यापार, अंधश्रद्धा, बुवाबाजी, जातिभेद, नैतिक अधःपतन आणि विवेकशून्यता यांच्या विरोधात त्यांनी उभे केलेले धर्मयुद्ध आजही तितकेच सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबांना केवळ टाळ-मृदंगात किंवा दिंडीत शोधून चालणार नाही; त्यांना समाजाच्या विचारविश्वात पुन्हा प्रतिष्ठित करावे लागेल. जी. डी. पारेख यांचा हा ग्रंथ नेमके तेच कार्य करतो.
आज संतपरंपरेचे नाव घेऊन तिच्यात पुन्हा एकदा ब्राह्मणी विचार मिसळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भक्तीला विवेकापासून, धर्माला नीतिमत्तेपासून आणि वारीला सामाजिक प्रबोधनापासून वेगळे करण्याची धडपड होत आहे. अशा वेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ तुकोबांच्या मूळ मानवतावादी परंपरेची आठवण करून देतो. संतांचा वारसा जपायचा असेल, तर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा स्वीकार अधिक महत्त्वाचा आहे, हे तो ठामपणे सांगतो. संतपरंपरेवर जमा झालेली संकुचित विचारसरणीची धूळ झटकून तिच्यातील सार्वकालिक मानवतावादी तेज पुन्हा अनुभवायचे असेल, तर हा ग्रंथ नक्कीच वाचला पाहिजे. आजच्या महाराष्ट्रात संत तुकारामांचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते; आता धार्मिक पुनरुज्जीवनवादाच्या काळात त्यांच्या विचारांनाही तितक्याच प्रामाणिकपणे समजून घेण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने वाट दाखवणारा हा एक महत्त्वपूर्ण, चिंतनगर्भ आणि काळाची गरज ठरलेला हा ग्रंथ आहे.
हा ग्रंथ वाचून तुकोबांची प्रतिमा अधिक स्पष्ट होते. भक्तीतून नीती, नीतितून समता आणि समतेतून मानवतेचा मार्ग दाखवणारे तुकाराम आजच्या महाराष्ट्राला पुन्हा या ग्रंथातून भेटतात. म्हणूनच हा ग्रंथ केवळ संतसाहित्याचा अभ्यास नसून, वर्तमानाला प्रश्न विचारणारा, समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आणि मानवतावादी महाराष्ट्राची दिशा दाखवणारा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहून जी डी पारेख यांनी प्रबोधनाला आणखी सशक्त केले आहे. जी डी पारेख यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम……
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काही पुस्तकं इतकं वेड लावतात की ती कितीही वेळा वाचली तरी समाधान च होत नाही.. ती पुन्हा पुन्हा वाचावीत असच वाटतं राहतं.. त्यातलच एक पुस्तक म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक… मूळ अमेरिकन लेखिका बेट्टी मेहमुदी ह्यांनी लिहलेले आणि लीना सोहनी ह्यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक म्हणजे संकट काय असतात आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी किती पराकोटीची जिद्द असावी लागते याचं उत्तम उदाहरण आहे.. इच्छा असेल तर मार्ग नक्की मिळतो ह्या वाक्याची प्रचिती जागोजागी ह्या पुस्तकात येते… एक पुरोगामी विचारांची आधुनिक अमेरिकन स्त्री आणि तिने तिच्या चार वर्षाच्या मुलीसाठी केलेला संघर्ष ह्याची ही कहाणी… अमेरिकेत नोकरी निमित्त आलेला एक इराणी माणूस “मूडी” आणि एका सुशिक्षित घटोस्फोटित दोन मुलांची आई असणाऱ्या अमेरिकन महिलेची “बेट्टी” ची संघर्षमय प्रेम कहाणी म्हणजे हे पुस्तक..
अमेरिकेसारख्या आधुनिक जगात वावरणारा एक इराणी माणूस मूडी.. पेशाने डॉक्टर असणारा बेट्टी ला भेटतो.. तो तिचा डॉक्टर म्हणून.. पुढे भेटीगाठी वाढतात.. गोष्टी वेल्हाळ स्वभावामुळे मूडी लवकरच बेट्टी ला ही आवडू लागतो.. बेट्टी च्या दोन्ही मुलांना ही हा नवीन बाबा आवडू लागतो… कालांतराने बेट्टी आणि मूडी लग्न करतात.. चौघांचा सुखाचा संसार सुरू होतो.. बेट्टी स्वतःच्या नोकरी मध्ये उच्च पदावर पोहचते.. मूडी ही आपल्या क्षेत्रात नाव कमवत असतो.. पार्टी, पिकनिक, सगळं अगदी छान सुरळीत सुरू असत..
… अशीच काही वर्ष जातात आणि माहतोब चा जन्म होतो.. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची माहतोब सगळ्या घरात आनंद घेऊन येते.. वरून दिसायला तर आनंदी कुटुंब असत.. पण.. मूडी चा भाचा इराण वरून येतो आणि ह्या कुटुंबाला नजर लागते.. हळूहळू मूडी मधला कट्टर इराणी बेट्टी ला दिसू लागतो.. छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना खटकू लागतात.. मूडी चा भाचा आणि तो फारसी भाषेत तासनतास गप्पा मारत असतात..
आणि एक दिवस मूडी जाहीर करतो की आपण इराण ला जाऊन माझ्या कुटुंबीयांना भेटून येऊ.. ते वाट बघतायत.. भावनिक होऊन तो बेट्टी ला समजावतो तरीही बेट्टी च्या मनात पाल चुकचुकत असतेच.. पण त्याचा प्रेमापोटी 15 दिवस त्याच्या सोबत जाण्यास ती तयार होते…
….. इथे कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचत.. बेट्टी, माहतोब आणि मूडी इराणला जायला निघतात.. तिथल्या परंपरे प्रमाणे बेट्टी ने पूर्ण कपडे घालावेत अस फर्मान निघत पण ते ही ती करते.. चादोर (एक इराणी पेहराव) जो की जाड्या भरड्या कपड्यांचा अगदीच विटकरी रंगांचा असतो.. एक केस ही दिसू नये असा पोषाख.. त्या ड्रेस मध्ये बेट्टी ची होणारी घालमेल.. त्या चार वर्षाच्या माहतोब साठी ही हाच नियम.. ती ही एक स्त्रीच ना म्हणून.. इथून सुरू होते एका कट्टर इराणी मुस्लिम छळवादी, स्त्रियांना गुलाम समजणाऱ्या एका नवऱ्याच्या सो कॉल्ड पुरुषी मनोवृत्तीची कहाणी…
इराण ची त्या काळातील ती परिस्थिती.. ते गलिच्छ राहणीमान.. वर्षानुवर्षांपासून अंघोळ न करता राहणाऱ्या स्त्रिया.. अंघोळी मुळे आजार होतात हा समज बाळगणाऱ्या स्त्रिया.. टॉयलेट ची ही सोय नसलेली घर.. अन्नाच्या नावाखाली वाट्टेल ते खाणारी कुटुंब.. स्वागताच्या विचित्र विचित्र पद्धती.. आणि हे सगळं जेंव्हा बेट्टी सारखी अमेरिकेतून आलेली स्त्री पाहते तेंव्हा पुढच्या दिव्याची कल्पना येते आणि ती शहारून जाते.. चार वर्षाची माहतोब केविलवाणी होऊन जाते… आपल्या समोर काय वाढून ठेवलंय ह्याची दोघी माय लेकीना कल्पना येते.. लवकरच मूडी आपले रंग दाखवायला सुरुवात करतो आणि एक दिवस अमेरिकेत कधीही न परतण्याचा विचार जाहीर करून टाकतो.. पायाखालची जमीन सरकते म्हणजे काय ते बेट्टी ला कळून चुकत… तो पर्यंत दोघींचे ही पासपोर्ट मूडी ने ताब्यात घेतलेले असतात… अमेरिके विषयी चा प्रचंड द्वेष, राग.. त्यात बेट्टी अमेरिकन म्हणून तिला घरच्या स्त्रियांकडून मिळणारी वागणूक हे सगळं सहन करण्यासाठी एक परमेश्वर च आपली मदत करू शकतो ह्याची जाणीव माय लेकिना होते आणि सुरू होतो एक जीवघेणा अनुभव.. बेट्टी ला तिच्या घरच्याशी फोनवर ही बोललं दिलं जात नाही.. तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात.. अशा परिस्थितीत ही ती आपण आपल्या मुलीसह ह्या कैदेतून सुटायच हा निश्चय करते.. त्यासाठी केलेले तिचे प्रयत्न तिची जिद्द.. चिकाटी म्हणजे हे पुस्तकं… नवऱ्याची क्रूर मारहाण… मुलीवरचा राग.. प्रचंड मानसिक दडपण.. माहातोब आणि बेट्टी चा विरह… हे सगळं वाचताना रडू नाही आलं तरच नवल… त्या नंतर आहे ही परिस्तिथी स्वीकारली आहे हे मूडी ला दाखवण्यासाठी केलेली धडपड, आणि एका बाजूला सुटकेसाठी चे प्रयत्न ह्याची उत्कंठा वर्धक कहाणी म्हणजे हे पुस्तक.. आपल्या मुलीसाठी तिच्या भवितव्यासाठी.. केलेल्या एका आईच्या संघर्षाची ही कथा… आणि जवळजवळ दिड ते दोन वर्ष ह्या यातनादायी, स्त्रियांना कसपटा समान समजणाऱ्या, अगणित बंधनं असणाऱ्या समाजामध्ये काढणे म्हणजे नरकयातनाच.. तरी ही इच्छा तिथे मार्ग हे आपल्या वडिलांचं वाक्य आठवून आठवून जगणाऱ्या एका जिद्दी आईची ही कहाणी… तिची सुटका ती कशी करून घेते, आपल्या मुलीसोबत मायदेशी जाऊ शकते की नाही हे सगळं एकदा तरी वाचलच पाहिजे…
हे पुस्तक मी आज पर्यंत चार पाच वेळा तरी वाचलं असेन पण प्रत्येक वेळी बेट्टी वेगळीच वाटते.. नवीन काहीतरी वाचतो आहोत असा फिल येतो.. आणि आपल्या समोर असणाऱ्या अडचणी, संकट किती क्षुल्लक आहेत हे कळून चुकत.. आणि जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते.. जेव्हा जेंव्हा अडचणीत आहोत आणि आता काय करू अस वाटतं तेंव्हा मी बेट्टी चा संघर्ष वाचते आणि मग कळत अरे आपल्याकडे तर खूप काही आहे.. स्वातंत्र्य, उत्तम कुटुंब, आपले विचार मांडण्याची संधी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती.. तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हे मानणारा समाज.. हे इतकं असूनही जेंव्हा आपण कुरकुर करतो तेंव्हा हे पुस्तक एकदा वाचलं की खाडकन डोळे उघडतात..
☆ ‘निळी सावळी नभाळी (काव्यसंग्रह)’ – कवयित्री : डॉ. स्वाती पाटील ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆
पुस्तक : निळी सावळी नव्हाळी (कविता संग्रह)
कवयित्री – डॉ.स्वाती पाटील
प्रकाशन – प्रतिभा पब्लिकेशन बुक
मूल्य – 200 /-
“निळी सावळी नव्हाळी’—हे शीर्षकच मनाला एका अनामिक प्रसन्नतेचा अनुभव देते. डॉ. स्वाती पाटील यांच्या या काव्यसंग्रहात निसर्गातील निळाई आणि मानवी मनातील सावळ्या छटांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. श्रीकृष्णाच्या छटांमधून उमटलेली ‘सावळी’ भावना आणि आकाश-पाण्यातील ‘निळाई’ यांच्या माध्यमातून कवयित्रीने मानवी नात्यांमधील ‘नव्हाळी’ म्हणजेच नवेपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचकाला अंतर्मुख करणारी आणि निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी आहे.कवितेशिवाय जगणं अवघड झालं असतं आणि सावित्रीमाय नसती तर लेकींना शहाणपणाचा प्रदेश सापडला नसता, अशा शब्दांत डॉ. स्वाती पाटील यांच्या काव्यप्रतिभेचे कौतुक केले जाते. ‘निळी सावळी नव्हाळी’ हा केवळ एक कवितासंग्रह नसून तो स्त्रीच्या अंतर्मनातील तरल भावभावनांचा, निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा आणि जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा एक अनोखा आविष्कार आहे. या संग्रहातील कवितांमधून लेखिकेने दुःखाला हसतमुखाने सामोरे जाण्याची आणि वेदनेला कलेची किनार लावण्याची किमया साधली आहे.”
मराठी साहित्यातील प्रगल्भ काव्यपरंपरेत डॉ. स्वाती पाटील यांचा ‘निळी सावळी नव्हाळी’ हा कवितासंग्रह आपले स्वतंत्र स्थान निर्माण करतो. या संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कवयित्रीची शब्दकळा आणि त्यातील लयात्मकता. केवळ शब्द मांडणे म्हणजे कविता नव्हे, तर त्या शब्दांतून एक जीवंत अनुभव उभा करणे, हे कौशल्य डॉ. स्वाती पाटील यांना अवगत आहे. घर, पाऊस, निसर्ग ,ती वाहत राहते ,प्रीत नव्हाळी, उसवले श्वास ,भूक ,लेक माझी आणि स्त्री-अस्तित्व अशा विविध कविता विषयांना स्पर्श करताना त्यांची लेखणी कुठेही अडखळत नाही, उलट ती अधिक समृद्ध होत जाते.”
डॉ. स्वाती पाटील यांच्या कवितेचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्या निसर्गाशी साधत असलेला संवाद. ‘निळी सावळी नव्हाळी’ या संग्रहात निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही, तर तो एका जिवंत पात्रासारखा वावरतो. विशेषतः ‘पाऊस’ आणि ‘श्रावण’ या ऋतूंच्या छटा कवयित्रीने अत्यंत हळुवारपणे टिपल्या आहेत. त्यांच्या मते, पाऊस हा केवळ आकाशातून पडणारा जलधारांचा समूह नसून तो मनाच्या गाभाऱ्यात रुजणारा एक भाव आहे.”तुझ्या-माझ्यातला पाऊस देहातीत व्हावा…” अशी साद घालताना कवयित्री पावसाला आध्यात्मिक आणि भावनिक उंचीवर नेऊन ठेवते. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ असो किंवा पावसाच्या सरींनी चिंब भिजलेली सृष्टी असो, त्यांच्या शब्दांतून निसर्गाचा हा उत्सव वाचकासमोर जिवंत होतो. हिरव्यागार माळरानावरील ‘हिरवी दुलई’ पांघरण्याची भाषा करणारी ही कविता निसर्गाच्या सानिध्यात मानवी दुःखाला विसरायला लावते. पावसाच्या थेंबांना आणि निसर्गाच्या रंगांना कवयित्रीने ज्या प्रकारे मानवी भावनांशी जोडले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हा निसर्ग अनुभवताना वाचकही त्या ‘निळ्या सावळ्या’ वातावरणात हरवून जातो.
– – त्यांच्या निळी सावळी नव्हाळी या काव्यसंग्रहास आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!
परिचय :सुरेखा महिपती चिखलकर
गोटखिंडी, तालुका वाळवा
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “हाऊ टू कंट्रोल द अनकंट्रोलेबल” – इंग्रजी लेखिका : बेन ऑल्डरिज – मराठी अनुवाद : संध्या रानडे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : हाऊ टू कंट्रोल द अनकंट्रोलेबल
लेखक : बेन ऑल्ड्रिज
अनुवाद : संध्या रानडे
प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठ: ३०४
मूल्य: २९९₹
“ आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं. ” – एपिक्टेटस
आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर? तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान
ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो. ”
व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील.
हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे.
बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की,
* स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं
* जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं
* निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं
* स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी)
– – – – – –
” तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. –
– – मार्कस ऑरेलियस”
– – – – –
लेखक बेन ऑल्ड्रिज यांच्याबद्दल – –
बेन ऑल्ड्रिज हे व्यावहारिक तत्त्वज्ञान, कम्फर्ट झोन, मानसिक आरोग्य आणि साहस यांवर लेखन करतात. त्यांच्या आव्हानात्मक आणि वेगळ्या प्रयोगांमुळे ते ओळखले जातात.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष – एका डोळस रामभक्तीचा रसाळ प्रवास
लेखक – श्री. विश्वास देशपांडे, ९४०३७४९९३२
प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन
रामायणाच्या आजवर हजारो आवृत्त्या आणि शेकडो भाष्ये उपलब्ध असताना, “यात आणखी नवीन काय असणार? ” या शंकेला पूर्णविराम देणारे हे एक अत्यंत आगळेवेगळे आणि समकालीन काळाला दिशा देणारे पुस्तक आहे. लेखक श्री. विश्वास देशपांडे सरांनी कोणत्याही पारंपरिक पठडीत न अडकता, आधुनिक पिढीच्या मानसिकतेचा विचार करून या ग्रंथाची केलेली मांडणी खरोखरच कौतुकास्पद आहे.
आजच्या ‘रील्स’ आणि वरवरच्या वाचनाच्या युगात, मूळ संहिता न वाचता खलनायकांचे होणारे उदात्तीकरण (उदा. रावणाचे उद्दात्तीकरण) आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक एका दीपस्तंभासारखे काम करते.
१. मानवी मूल्यांचा मेरुमणी : पुरुषोत्तम राम
लेखकाने रामाचे चित्रण करताना त्याला देव्हाऱ्यात कोंडून न ठेवता, एक ‘सर्वगुणसंपन्न माणूस’ म्हणून आपल्यासमोर उभे केले आहे. एक सामान्य माणूस आपल्या आचरणाने, कर्तव्याने आणि नैतिकतेने कशा प्रकारे देवत्वाच्या उंचीवर पोहोचू शकतो, याचे सुरेख विश्लेषण पुस्तकातील तीन भागांमध्ये आले आहे. पुत्र, पती, बंधू, राजा, योद्धा आणि अगदी शत्रू म्हणूनही रामाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व वाचकाला अंतर्मुख करते. राम आणि रावण यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन व्यक्तींमधील नसून, तो “विश्वात्मक विचार विरुद्ध टोकाचा व्यक्तिवाद” आणि “संस्कारित रामवृत्ती विरुद्ध नैसर्गिक रावणवृत्ती” यांमधील फरक स्पष्ट करणारा आहे.
२. स्त्रीत्वाचा स्वाभिमान आणि इतर व्यक्तिरेखा
“जेथे राघव तेथे सीता” या उक्तीप्रमाणे सीतेच्या अलौकिक आणि स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन यात घडते. सीतेवरील कथित अन्यायाचा आणि तिच्या अग्निपरीक्षेचा संवेदनशील प्रसंग लेखकाने अत्यंत निष्पक्ष आणि संयतपणे हाताळला आहे. आजच्या ‘झटपट लग्न आणि झटपट काडीमोड’ या अस्थिर काळात राम-सीतेचे नाते एक आदर्श वस्तुपाठ ठरते.
याशिवाय लक्ष्मण, भरत, उर्मिला, मंदोदरी आणि बिभीषण यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे अचूक आकलन लेखकाने मांडले आहे. त्यातही संकटमोचक आणि परमभक्त हनुमंतावरील दोन प्रकरणे लेखकाच्या आत्मीयतेमुळे प्रचंड वाचनीय झाली आहेत. अगदी नकारात्मक मानल्या गेलेल्या कैकयीच्या मनाचे विश्लेषणात्मक चित्रण करून तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा स्तुत्य प्रयत्न यात दिसतो.
३. प्राचीन व्यवस्था आणि आजची परिस्थिती
एक शिक्षक म्हणून देशपांडे सरांनी रामायणकालीन राजसत्ता आणि गुरुसत्ता (शिक्षण पद्धती) यांच्यातील सुवर्णसमन्वयावर अचूक बोट ठेवले आहे. आजच्या व्यावसायिक आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी ती जीवनपद्धती किती श्रेष्ठ होती, हे प्रकर्षाने जाणवते. अष्टप्रधान मंडळ, ऋषिमंडळ आणि राजा यांच्या त्रिसूत्रीवर चालणारी रामराज्याची न्यायप्रिय शासन व्यवस्था आणि आदर्श कुटुंबसंस्था आजच्या विस्कळीत समाजाला आरसा दाखवणारी आहे. लक्ष्मणरेषेचे सामाजिक महत्त्व, वालीवध यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर लेखकाने अत्यंत परिपक्वतेने भाष्य केले आहे.
४. सांगीतिक गोडवा आणि रसाळ भाषा
पुस्तकाचा शेवट म्हणजे सुग्रास जेवणानंतरचा ‘गोडाचा घास’ आहे! ‘गीतरामायणा’व्यतिरिक्त असणारी, रामाच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतची वेगळी ‘रामगाणी’ समाविष्ट करून लेखकाने आपल्यातील गहिऱ्या संगीततज्ज्ञाची ओळख करून दिली आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि प्रवाही असल्याने ते कुठेही क्लिष्ट वाटत नाही.
हे पुस्तक केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नसून मानवी मूल्यांचा आदर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘संग्रहणीय’ आहे. लेखकाची रामावरील प्रगाढ आणि डोळस श्रद्धा या पुस्तकाच्या पानापानातून पाझरते. आजच्या तरुण पिढीने आणि पालकांनी हे पुस्तक केवळ वाचावे असे नाही, तर त्यावर मनन करून ते आचरणात आणण्याची गरज आहे. अक्षरांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेली ही एक नितांत सुंदर आणि चैतन्यमय ‘भावांजली’ आहे. प्रत्येकाने आवर्जून अनुभवावा असा हा एक “नवनवोन्मेषशालिनी वाङ्मयीन उत्सव” आहे!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “घे गगन भरारी” – लेखक : प्रा. वसंत गिरी ☆ परिचय – श्री विश्वास देशपांडे ☆
पुस्तका : घे गगन भरारी
लेखक : प्रा. वसंत गिरी
प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने प्रकाशित झालेले घे गगन भरारी हे पुस्तक नुकतेच हातात पडले. नावाला साजेशा मुखपृष्ठामुळे हे पुस्तक आकर्षक झाले आहे.
गिरी सर हे प्राध्यापक म्हणून तर विख्यात आहेतच. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते एक उत्तम विचारवंत आणि संवेदनशील मार्गदर्शक आहेत. अध्यापनाच्या व्यासपीठावरून, वर्तमानपत्रातील लेखांमधून, तसेच त्यांच्या असंख्य व्याख्यानांतून त्यांनी जे विचारमंथन समाजापर्यंत पोहोचवले, त्याचा गहिरा ठसा या पुस्तकात उमटलाआहे. त्यांच्या लेखनात केवळ अनुभवाचा गाभा नाही, तर आजच्या समाजस्थितीचे अचूक भान आणि भविष्यातील मार्गदर्शनही आहे. हाती आलेले हे पुस्तक म्हणजे त्या ज्ञानदीपाची नवी ज्योत आहे. या पुस्तकात सरांच्या विचारांचा झरा वाहतो आहे – कधी चिंतनशील, कधी भावस्पर्शी तर कधी वाचकाला जागं करणारा. प्रत्येक लेखात विचारांची ठिणगी आहे जी वाचकाच्या मनाला उजळून टाकते, आत्मपरीक्षणाची ज्योत प्रज्वलित करते.
सरांचे हे सातवे पुस्तक आहे. या आधी त्यांची सहा पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. उगवतीचे उन्मेष, तरुणाचे आयडॉल सुभाषचंद्र बोस, क्रांतिउद्यानाचे तपस्वी, गोस्वामी शौर्यगाथा ही त्यांची पुस्तके म्हणजे तरुणाईसाठी इतिहासाचा प्रेरणादायी असा महान ठेवा आहे. तर हास्यगिरी भाग एक व दोन मधून विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने आजच्या समाजव्यवस्थतील दोषांवर त्यांनी कोरडे ओढले आहेत.
शब्द हे फक्त ध्वनी नसतात; ते विचारांचे दीप असतात. एखादा शब्द अंतःकरणात शिरला, तर तो मनाच्या अंधाऱ्या काना-कोपऱ्याला उजळून टाकतो. प्रा वसंत गिरी सरांचे ‘ घे भरारी ‘ हे पुस्तक हाती घेतल्यावर असाच अनुभव येतो. हे लेखन म्हणजे विचारांचा आणि चिंतनाचा वसंत फुलवणारे एक उत्तुंग पर्वत शिखर. या पर्वत शिखरापर्यंत भरारी घेऊन तेथून दिसणार्या दृश्याचे निरीक्षण मात्र बारकाईने करायला हवे.
या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे वाचकाला विचारांची नवी वाट दाखवणारा दिवा. त्यांची भाषा ओघवती आहे, पण क्लिष्ट नाही किंवा डोळे दिपवणारी नाही. ती साधेपणाच्या कळसावर उभी आहे. वाचकासमोर ते सहजपणे मुद्दे ठेवतात तसेच प्रश्नही ठेवतात. प्रश्नचिन्हांचे हे बीज इतके टवटवीत आहे की वाचकाच्या मनात आत्मपरीक्षणाची पालवी फुटल्याशिवाय राहात नाही.
‘हे बुद्धिनाथा, आम्हाला विवेक दे’ या लेखात गणरायाची स्थापना होत असताना मूर्ती आपण का स्थापन करतो, मूर्तिपूजा का करतो, प्रार्थना का करतो हे सांगताना ते म्हणतात, ” मूर्ती हे देवाचे सूक्ष्म रूप. आपले मन एकाग्र करण्यासाठी मनःशांती, संयम, विचारक्षमता, कार्यक्षमता आणि क्षमाशील वृत्ती वाढावी यासाठी मूर्तीची स्थापना आणि प्रार्थना आपण करतो. मानवी मनाची वाटचाल प्रगल्भतेच्या दिशेने व्हावी हाच त्यामागचा हेतू असावा. मानवी मन उच्चतम मानवतेच्या दिशेने चालावे यासारखी विचारप्रवण करणारी सुंदर वाक्ये लेखात आपल्याला आढळतात. ते उत्सवाच्या गलबल्याला आरसा दाखवतात. मिरवणुकीतील गैरप्रकार उन्माद, दिखाव्याची स्पर्धा, भपकेबाज पूजा याबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त करतात. खरी भक्ती ही साधेपणात आहे, ही जाणीव त्यांनी वाचकासमोर अत्यंत सोप्या पण प्रभावी भाषेत मांडली आहे.
‘आजच्या अर्जुनाचा अभ्यासयोग कोणता?’ या लेखात गीतेतील अर्जुन आजच्या विद्यार्थ्याच्या मनात उभा राहतो. “ मन अत्यंत चंचल आहे. त्याला नियंत्रणात ठेवणे महाकठीण बाब आहे. ” हे वाक्य वाचताना आपल्यालाही आपल्या धडपडीचे आणि चंचलतेचे भान येते. लेखक सांगतात—“अभ्यास आणि वैराग्यात मनोग्रहाचे रहस्य आहे. यालाच अभ्यासयोग म्हणतात. ” हा विचार म्हणजे दिशाहीन तरुणाईसाठी दीपस्तंभच आहे. गिरी सरांमधला चिंतनशील माणूस या ठिकाणी दिसतो. ते म्हणतात, ” वर्तमान स्थितीत अभ्यासयोग विद्यार्थ्याला उमजला नाही; कारण तो गुरुलाही उमजला नाही. त्यासाठी आपल्यातील दोष, उणीवा यांची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. या ठिकाणी एका वक्त्याच्या भाषणातील एक सुंदर उदाहरण लेखकाने दिले आहे. वेरूळ अजिंठ्याच्या पाषाणात जे शिल्प तत्कालीन कारागिरांनी निर्माण केले, त्यात त्या पाषाणमूर्तींच्या चेहेऱ्यावर हास्य, आनंद, दुःख, क्रोध, असूया, प्रेम इ. भावभावना दाखवण्यात ते कलाकार यशस्वी झाले आहेत. जर पाषाणात या भावभावना ओतता येतात, तर सजीव अशा विद्यार्थ्यांच्या मनात आवश्यक असे विचार शिक्षकाला का रुजवता येणार नाहीत ? आजी आम्ही भौतिक सुखसुविधात अडकलो आहोत. आध्यात्मिक पातळीवर जाऊन समाधानाचा मार्ग आम्ही शोधतो का ? जगा आणि जगू द्या यासारखी तत्वे आम्ही आचरणात आणतो का ? यासारख्या मूलभूत तत्वांचा विचार या लेखात आपल्यापुढे सर मांडतात. आजच्या अर्जुनाला यशस्वी होण्यासाठी या तत्वांचा विचार करणे गरजेचे आहे.
‘क्रोधावर नियंत्रण’ या लेखात ते म्हणतात, ” क्रोध हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. नकारात्मक वृत्तीच्या लोकाांना क्रोध विनाशाकडे नेतो. सकारात्मकवृत्तीचे लोक आपला क्रोध संयमाने व्यक्त करतात. तर दुसऱ्या प्रकारचा क्रोध देशाभिमान रुजवतो, सत्कार्य करायला शिकवतो. आपली वृत्ती शांत, संयमी, समाधानी आणि आनंदी ठेवल्यास आपण तणावमुक्त जगू शकतो.
‘सद्गुणाने होते जीवन सुंदर’ हा लेख म्हणजे अंतःकरणातील आरसा. “आपले प्रत्येक कर्म आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविते आणि घटविते सुद्धा. ” या एका वाक्यात जीवनाचे सार सामावले आहे. सद्गुण म्हणजे बाहेरून लावलेला रंग नाही; तो व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यातून उमलणारा सुगंध आहे, हे लेखक जाणवून देतात. या लेखात ते म्हणतात, “सत्कार्यातील आनंदामागे अपार मेहनत आणि अविरत कष्ट असतात. ही माणसे त्यांच्या दैनंदिन जीवनात कमालीची प्रसन्न असतात. शुभ्र, स्वच्छ झऱ्यासारखे वाहत असतात. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याच्या अंतरंगात सत्याचा दीप तेवत असतो. तो आपली तो आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सत्याचा शोध घेत राहतो. त्याचे जीवन म्हणजे निखळ वास्तवतेची प्रयोगशाळा.
तर ‘युवाशक्तीच्या उत्साहाला दिशा हवी’ या लेखात लेखकाने तरुणाईला थेट प्रश्न केला आहे—“उत्साहाला विवेकाची दिशा मिळाली, तरच समाज परिवर्तन घडते. ” ही ओळ तरुणांच्या हृदयात नवी उमेद, नवा संकल्प जागवणारी आहे.
‘जीवनात संयम का हवा?’ या लेखातील ते म्हणतात, ” युवावस्थेत विचारांची दिशा हवी, म्हणजे जीवनाची दशा होणार नाही. ” या लेखातील वाक्य ” भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीला कष्टाचा सुगंध येत नाही ” आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.
तर प्रगल्भ विचारांची मानवी संपत्ती या आपल्या लेखात गिरी सर म्हणतात, ” युवाशक्ती ही देशाची मानवी संपत्ती आहे. हे आपल्या देशातील केंद्र व राज्य शासनालाही कळले पाहिजे. शिक्षणाकडे अनुत्पादक क्षेत्र म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शिक्षण क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे सोपवून त्याचे बाजारीकरण करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत भावी पिढीकडून भरीव कार्याची अपेक्षा कशी करणार ? या लेखातून लेखकाची तळमळ आणि शासनव्यवस्थेतील नाकर्तेपणाविषयीचा संताप तीव्र शब्दात व्यक्त झाला आहे.
आपल्या ‘ घे भरारी ‘ या लेखात ते म्हणतात, ” मनुष्यदेह हे एक साधन आहे, त्याद्वारे आपण व्यापक व चिरंतन ठरणारी कार्यपूर्ती करणार आहोत. हे आपल्या स्मरणात राहील तर आपणास देहासक्ती (शरीराचे आकर्षण) राहणार नाही. आणि आपली अपेक्षित कार्यपूर्ती झाल्यावर देहाची किंमत काहीच नाही. ” या लेखात युवकांसाठी मोलाचा संदेश लेखक देतात.
असे या पुस्तकातील एकूण ३१ लेख वाचकाला विचारप्रवण करतात. या पुस्तकाची एक मोठी ताकद म्हणजे त्याची शैली. लेखक वाचकाला प्रवचन देत नाहीत; ते त्याच्याशी संवाद साधतात. त्यांचे लिखाण म्हणजे एखाद्या हृदय संवादासारखे आहे. या संवादात कधी व्यंगाची धार आहे, कधी आत्मीयतेची ऊब आहे, तर कधी अनुभवाच्या गाभ्याला भिडणारी गंभीरता आहे. लेख वाचताना लेखकावर असणारा स्वामी विवेकानंद तसेच देशभक्तांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. आपले म्हणणे ते विविध उदाहरणे देऊन पटवून देतात.
“ज्ञानाचा दीप जिथे लागतो तिथे अंधार नाहीसा होतो;
आणि जे शिक्षक हा दीप लावतात ते स्वतःच प्रकाशरूप होतात. ”
मला वाटते हे पुस्तक सर्वांसाठी आणि विशेषतः आजच्या तरुणाईने वाचणे आवश्यक ठरते. आजच्या काळात जेव्हा आपण वेग, स्पर्धा, उपभोगवाद यांच्या भोवऱ्यात अडकलो आहोत, तेव्हा ‘ घे भरारी ’ हे पुस्तक आपल्याला शांत पण ठाम आवाजात सांगते, “थांब जरा… स्वतःकडे बघ… विचार कर…आणि जीवनाचे खरे ध्येय शोध. ” त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच वाचक या पुस्तकाचेही मनापासून स्वागत करतील अशी खात्री आहे.
परिचय : श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव, मो. ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ताठ कणा” – लेखिका : श्री अभिनव भुते, अजय कोठारी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ताठ कणा
लेखक : अभिनव भुते, अजय कोठारी
पृष्ठ: २४०
मूल्य: ३५०₹
हे पुस्तक म्हणजे पाठदुखी समजून घेण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि कण्याला नव्याने ओळखण्याचा प्रवास…
“डॉक्टर, माझी पाठ का दुखते?”
हा प्रश्न आज लाखो लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणारा कर्मचारी असो, दिवसभर कष्ट करणारा शेतकरी असो किंवा घराची जबाबदारी सांभाळणारी गृहिणी — पाठदुखी आता प्रत्येक घरात पोहोचली आहे. पण या वेदनेपेक्षा जास्त त्रास देतात ते गैरसमज, भीती आणि अपुरी माहिती.
‘ताठ कणा’ हे केवळ पाठदुखीवरचं वैद्यकीय पुस्तक नाही; तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला विश्वासाचा संवाद आहे. सोप्या भाषेत आणि रोजच्या उदाहरणांतून हे पुस्तक कण्याची रचना, पाठदुखीची कारणं, योग्य व्यायाम, चुकीच्या सवयी, MRI आणि रिपोर्ट्समागचं वास्तव, तसेच ऑपरेशन खरंच कधी आवश्यक असतं हे समजावून सांगतं. प्रत्येक घरात असायला हवं असं हे पुस्तक.. जरूर वाचा.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈