मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अंश” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अंश” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक – अंश  

लेखिका – सौ. राधिका भांडारकर

प्रकाशक – अमित प्रकाशन, पुणे

मुखपृष्ठ – श्री राजेश प्रभु देसाई

अमित प्रकाशन, पुणे तर्फे सौ राधिका भांडारकर, पुणे यांचा *अंश* हा ललित लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी *शुभंकरोती साहित्य परिवार* या समूहाच्या काव्य संमेलन प्रसंगी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

… सौ. उमा व्यास यांनी या लेखसंग्रहाला प्रस्तावना देताना म्हटले आहे की, बागेत बसले असताना एखादे रंगीबेरंगी फुलपाखरू या झाडावरून त्या झाडावर बसलेले पाहताना आपले मन जसे त्या फुलपाखराचा ताबा घेते, त्याचप्रमाणे राधिका ताईंचा हा लेख संग्रह वाचताना आपली मनस्थिती होते. त्यांच्या या उक्तीला माझे पूर्णतः अनुमोदन आहे.

या पुस्तकातील अंश आणि इतर लेख वाचताना प्रामुख्याने जाणवते ते विषयांचे वैविध्य! यात पुराणकथांचा आधार आहे, पारंपारिक रितीरिवाज, सणवार आहेत, जुन्या नव्या पिढीतले अंतर आहे, आधुनिक विकसित तंत्रज्ञान आणि त्याचे साधक बाधक परिणाम आहेत आणि खूप काही आहे. पटकन लक्षात येणारी गोष्ट अशी, ती म्हणजे लेखिकेची अनुभूती! प्रत्येक लेखात त्या स्वतः वावरताना दिसतात, प्रत्येक बारीक सारीक तपशीलांचा त्यांनी सखोल विचार करून नंतरच स्वतःचे मत मांडलेले आहे. मग ते तपशील सामाजिक असोत, राजकीय असोत, पौराणिक असोत, धार्मिक असोत, किंवा कोणत्याही क्षेत्रातील असोत.

सौ. राधिका भांडारकर

बाईपणाचा पिंगा या लेखात राधिकाताई सुरुवातीलाच म्हणतात, ” ओठावर हसू, पदरात निखारे, निखारे भिजायला नकोत आणि पदरही पेटायला नको. हे असतं बाई पण.”

“बाई पण म्हणजे प्रकाश.

बाई पण म्हणजे धैर्य

बाई पण म्हणजे वाकणं पण मोडणं नाही

एक तळपणारी मूर्तीमंत तलवार म्हणजे बाई पण. “

या चार वाक्यातच आपल्याला अख्खी बाई म्हणजे काय हे राधिकाताईंनी समजावून दिले. या प्रभावी लेखन शैलीने सुरुवातीच्या पहिल्याच लेखात लेखिकेने वाचकांच्या मनावर ताबा मिळवला असे म्हटले तर चूक ठरणार नाही.

स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य आहे का? 

या लेखात त्यांना प्रामुख्याने हेच सांगायचे आहे की लेखक काय किंवा लेखिका काय

यामध्ये लिंगभेद असण्याचे कारणच नाही.

लेखक पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांच्या मनातील विचार न घाबरता, कोणत्याही बंधनात न अडकता स्पष्टपणे मांडलेच पाहिजेत. मग ते विचार मवाळ असतील अथवा बोल्ड असतील. परंतु स्त्री ही नेहमी कोणत्यातरी बंधनात अडकलेली आहे आणि म्हणूनच तिची क्षमता कुठेतरी कमी पडते हे लेखिकेला सांगायचे आहे. अपवाद म्हणून सुनीता देशपांडे, माधवी देसाई, स्नेहप्रभा प्रधान, अगदी लक्ष्मीबाई टिळक

यांच्यासारख्या स्त्रियांच्या लेखनात निर्भीडता दिसते परंतु बहुतांशी स्त्री लेखिका

एका ठराविक चाकोऱीतूनच लेखन करतात असे राधिका ताईंचे मत आहे.

स्वयंसिध्दा हा लेख स्त्री मधील धाडसी वृत्ती, ती अबला नसून सबला आहे हे वाचकांना पटवून देणारा आहे. एक दुर्दैवी, अकाली वैधव्य प्राप्त झालेली षोडशकन्या, जे वय नाचण्या उडण्याचे, फॅशन करण्याचे, मित्र मैत्रिणीत रमण्याचे, त्या वयात सासू-सासरे आणि पदरात चार महिन्याचे बालक घेऊन शंभर वर्षांपूर्वीच्या काळात संसाराची धुरा पेलण्यासाठी खंबीरपणे उभी राहते, तिच्या बाळाला एक यशस्वी पुरुष बनवते. अशा स्वयंसिध्देवरचा हा लेख वाचताना अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत.

स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक विविध पैलू दाखवणारे आणखीही लेख या संग्रहात वाचावयास मिळतात.

प्रिय तरुणाई हा अत्यंत हलकाफुलका आणि सहज जाता जाता तरुण पिढीला संदेश देणारा असा लेख!

व्यासपीठावरून एका बुजुर्ग स्त्रीने तरुण पिढी बरोबर साधलेला हा संवाद! साधारणतः आजच्या पिढीला पाहून “आमच्या वेळी असं नव्हतं बुवा” हे बोलणं ऐकू येतं. थोडक्यात आमच्या वेळी जे होतं ते चांगलं होतं आणि आत्ताचं सगळं वाईटच अशी बोलण्याची पद्धत सर्वत्र पहायला मिळते. लेखिका मात्र वेगळी आहे. तिने वर्तमानाचा मोठ्या मनाने स्वीकार केला आहे. आजच्या तरुण पिढीकडून किती नवीन गोष्टी जुनी पिढी शिकू शकते हे मान्य करताना तिच्या मनाचा मोठेपणा जाणवतो. हा लेख म्हणजे सत्याची स्वीकृती आहे.

तरुणाईच्या पाठी मी एक मिणमिणता दिवा घेऊन उभी आहे असेही लेखिका सांगते. तरुण वर्गाने मागे वळून पहावे, मोठ्यांकडे दुर्लक्ष करू नये हाही संदेश त्यांना देते. शेवटी जुन्या नव्याची सांगड घालता आली पाहिजे हा फार उपयुक्त बोध वाचकांना या लेखातून मिळतो.

काळ पुढे पुढे सरकत जातो, काळानुसार माणसांतही बदल होत जातात, परंतु कितीही बदल झाले तरी जे मूळ असतं ते तसंच राहतं. त्या मुळाची ओढ कायम असते. परिस्थितीनुसार माणूस बदलण्याचा प्रयत्न करीत असला तरी स्वभाव कसा बदलेल? हेच सत्य लेखिकेने *प्रिय अस्मादिक* या पत्ररूपी लेखात मांडले आहे.

पॉपकॉर्न हा लेख, म्हटलं तर विनोदी, म्हटलं तर उपहासात्मक. पॉपकॉर्न संस्कृतीचा निखळ आनंद कसा घ्यावा हे सांगणारा. हा लेख वाचताना अपूर्वाईतील पु. लं. ची आठवण झाली.

नाचा उडा मुक्त व्हा आणि मुळचा कडक,

कठीण सुका भाव उधळून पिसासारखे हलके व्हा हा पॉपकॉर्न या शब्दात दडलेला संदेश वाचकांना नक्कीच आवडेल.

महाभारतातील अश्वत्थामाची गोष्ट घेऊन *अमरत्व शाप की वरदान*? हा लेख लेखिकेने लिहिला आहे.

अश्वत्थामाला मिळालेल्या अमरत्वाच्या वरदानामुळे आणि त्याच्या कपाळावरील संरक्षक मणी काढून घेतल्यामुळे कपाळावरील भळभळणार्‍या जखमेचे दुःख सहन करीत त्याला जगावे लागले म्हणून त्याचे अमरत्व शापित ठरले.

प्रत्येक माणसाला मरणाची भीती वाटते, परंतु अमरत्व हे खरोखरच आनंददायी आहे का याचा विचार आपण करत नाही.

मरावे परी कीर्ती रुपी उरावे, हेच खरे अमरत्व

हा अत्यंत मोलाचा संदेश देणारा असा लेख आहे.

अंश! पुस्तकाच्या नावाचा लेख. लेखिका स्वतःच्या अंतरंगात डोकावते आणि स्वतःचा शोध घेते. तेव्हा एकाच वेळी तिला तिच्यातील अनेक रंग दिसतात. तिची नेमकी प्रतिमा कशी आहे या संभ्रमात असताना तिला जाणीव होते की ती तर या विश्वाचा एक अंश आहे.

पुस्तक वाचत असताना प्रकर्षाने जाणवते ती राधिकाताईंची लेखनशैली! कोणत्याही क्लिष्ट शब्दांचे अवडंबर नाही आणि अगदी साधी, सरळ, प्रवाही अशी भाषा, त्याचप्रमाणे त्यांच्या दीर्घ आयुष्यातील त्यांनी अनुभवलेले, जपलेले क्षण आणि अभ्यासू वृत्ती! त्यांच्यासमोर ठा- कलेली परिस्थिती कशीही असो, चांगली वाईट, आनंदी, केविलवाणी, त्यांना पहिला प्रश्न पडतो तो हे असे का? या प्रश्नांची उत्तरे त्या शोधत असतात आणि जेव्हा उत्तर सापडते तेव्हा त्यांची शब्दगंगा स्वच्छ नितळ वाहू लागते.

पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी बोलले नाही तर पूर्ण न्याय मिळणार नाही. मखपृष्ठकार श्री. राजेश प्रभुदेसाई यांनी *अंश* या शीर्षकासाठी अगदी योग्य असेच मुखपृष्ठ तयार केले आहे.

आपण सगळेच संसाराच्या भोवर्‍यात सापडलेले एक अंश आहोत. त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार चालला आहे. या पुस्तकाची लेखिकाही याला अपवाद नाही. निसर्ग मात्र या भोवर्‍यातही तटस्थपणे उभा आहे. रात्रीच्या गर्भात उद्याचा असणारा उषःकाल आणि गुलमोहराचे ताठ कण्याने उभे असणे हे या तटस्थ वृत्तीचे द्योतक आहे.

हे सर्व लेख वाचले की आपल्या मनाला त्यात नमूद केलेल्या गोष्टी पटतात. आपणही याच अंशाचा एक भाग आहोत असे वाटू लागते, आणि म्हणूनच एकदा हे लेख वाचायला घेतले की पुस्तक हाता वेगळे करावेसे वाटत नाही. पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवावे आणि जेव्हा केव्हा एकटेपणा जाणवेल, मनात काही शंका कुशंका निर्माण होतील तेव्हा अंश उघडावे आणि प्रथमदर्शनी दिसेल तो लेख वाचण्यास सुरुवात करावी इतका हा लेख- संग्रह वाचनीय झाला आहे यात शंका नाही.

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “रियाना” – लेखिका : सुश्री प्राची राजे ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “रियाना” – लेखिका : सुश्री प्राची राजे ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक : रियाना 

लेखिका : प्राची राजे.

प्रकाशक : शॉपीजन (ऑनलाईन प्रकाशन) 

माननीय प्राची राजे यांनी लिहिलेली आणि शॉपीजन या ऑनलाइन प्रकाशकांनी प्रकाशित केलेली रियाना ही कादंबरी मी शॉपिजनच्या ॲपवरच नुकतीच वाचली. शॉपिजन ॲप द्वारा सातत्याने मराठी दर्जेदार साहित्य प्रसिद्ध होत असतं आणि अनेक वेळा मी ते अत्यंत आवडीने वाचत असते. त्यातलीच माननीय ‘प्राची राजे’ यांची ही ‘रियाना’ कादंबरी.

ही कादंबरी एकूण ५२ भागात लिहिली गेली आहे आणि प्रत्येक भाग वाचताना वाचकाची पुढील भागासाठीची उत्कंठा वाढत राहते हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

मा. प्राची राजे यांची ही पहिलीच मराठी कादंबरी आहे. या कादंबरीचं समीक्षण करण्यापूर्वी मला लेखिकेविषयी काही कौतुकास्पद आणि ठळक बाबी नमूद कराव्याशा वाटतात ज्या समीक्षणाच्या दृष्टीने तितक्याच महत्त्वाच्या असू शकतात.

झारखंड जिल्ह्यात जन्माला आलेल्या, जमशेदपूरवासी, सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या माननीय प्राची राजे यांना त्यांच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा कधीही शिकवली गेली नाही. त्यांनी जे लेखन केलं ते इंग्रजी व हिंदी भाषेतूनच. अगदी पाच सहा वर्षांपूर्वीच त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले आणि इतक्या थोड्या काळातच त्यांनी कथानक, भाषा, शब्दशैली, व्याकरण या सर्व निकषांवर परिपूर्णतेने उतरलेली ‘रियाना’ ही मराठी कादंबरी वाचकांपुढे सादर करण्या इतपत मोठी झेप घेतली. त्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

आता आपण ‘रियाना’ कादंबरीच्या मूळ कथानकाचा संक्षिप्त आढावा घेऊया. मी जरी येथे “संक्षिप्तपणे” असा उल्लेख केला असला तरी ५२ भागातल्या या कादंबरीचं कथानक तसं गुंतागुंतीचं आणि विस्तृत आहे. मात्र वाचकाला पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटेल आणि त्याची उत्कंठा टिकवून ठेवेल इतपतच कथानक इथे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कादंबरीची गोष्ट सांगितल्यासारखं लिहून मला वाचकांची वाचनातली मौज आणि आनंद हिरावून घ्यायचा नाही.

देवग्राम सारख्या खेड्यात, शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन नंतर स्वतःचा विकास, ज्ञानवृद्धी आणि व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी एक जिद्दी हरहुन्नरी, मेहनती, महत्त्वाकांक्षी युवक पुण्याजवळ पिंपरी येथे येतो आणि बघता बघता स्वतःचं भलं मोठं औद्योगिक क्षेत्र विस्तारित करून “जयवंत इनामदार” या नावाने प्रचंड नावलौकिक, प्रतिष्ठा मिळवतो. शेकडो एकर जमिनीवर त्यांचा व्यवसाय बहरतो.

कथा सुरू होते ती जयवंतराव इनामदार आणि त्यांची दिवंगत पत्नी प्रतिभा यांच्या कष्टाळू सहजीवनाने प्राप्त झालेल्या यशापासून आणि हे अधोरेखित करणार्‍या त्यांच्या प्रासादासारख्या घरात साजरा होणार्‍या” सत्तराव्या कौटुंबिक वाढदिवस समारंभाने आणि नंतरची शेवटपर्यंतची कथा त्यांची तीन मुले अनंत, प्रदीप आणि सुदर्शन म्हणजेच सनी आणि सुना वृषाली, मधुरा, नातवंडे आणि इतर सहाय्यक पात्रांच्या भोवती गुंफली जाते. तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व या कादंबरीच्या कथेत आहे.

अनंत आणि वृषालीची तीन नंबरची, दोन मुलांच्या पाठीवर, ” मुलगी हवीच” म्हणून झालेली मुलगी अर्थात ‘रियाना’ हीच या कादंबरीची नायिका आणि मुख्य पात्र असली तरी या कादंबरीतलं प्रत्येक पात्र हे कथानकाच्या गुंफणीत महत्त्वाचं ठरतं.

अनंत आणि प्रदीप हे जयवंतरावांच्या व्यवसायाचा वारसा यशस्वीपणे सांभाळत असतात. सनी थोडा वेगळा म्हणजे वडिलांच्या व्यवसायाचा भाग न बनता स्वतंत्रपणे उद्योगात व्यस्त. भावाभावांच्या नात्यात तसा काही बेबनाव सुरवातीला जाणवत नाही. मात्र जयवंतराव ज्यांना आबासाहेब म्हणून संबोधले जायचे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते त्यांचे “फोर स्टार हॉटेल- प्रतिभा रिसॉर्ट” आणि तिथला कारभार “सनीच्या” नावाने करतात. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा रहस्यमय मृत्यू होतो आणि याच वळणावर कादंबरीचे कथानक अत्यंत प्रभावीपणे पुढे उलगडत जातं. येथे आणखी एक जाणवतं की या कथानकाचे दोन स्वतंत्र भाग आहेत. त्यात पहिला भाग आबासाहेब, त्यांच्या समृद्धीचा आणि रहस्यमय मृत्यूचा. दुसरा भाग रियानाच्या जन्माचा आणि जन्मत:च असलेल्या तिच्या व्यंगांचा, त्यातूनच तिची परिवाराकडून होणारी केवीलवाणी भावनिक आणि शारीरिक हेळसांड याबद्दलचा. मात्र कादंबरीतलं नायिकेचं पद प्रभावीपणे टिकवत कथानकातल्या या दोन्ही भागांचं अतिशय बेमालूमपणे एकत्रीकरण होत कथानक निर्णायक पद्धतीने समाप्त होते.

आबासाहेबांचा मृत्यू की खून, रियानाची आत्महत्या की अपघात आणि या दोन्ही घटनांचे एकमेकांशी असलेले संबंध काय? निष्पाप रियानाचं होणारं शारीरिक शोषण का आणि कोणाकडून? या सर्व प्रश्नांची उत्तरे कादंबरी पूर्ण वाचल्यावरच धक्कादायक पद्धतीने वाचकाला मिळतात आणि या संपूर्ण कथानकाद्वारे जो संदेश लेखिकेला वाचकापर्यंत पोचवायचा आहे तो अत्यंत परिणामकारकरीत्या पोहोचवला जातो आणि त्याच बिंदूपाशी कादंबरी वाचून संपल्यानंतर वाचक उदास, सुन्न आणि “या अनैतिक प्रकाराला आळा बसलाच पाहिजे” या ठाम विचारापर्यंत येऊन पोहोचतो.

या कादंबरीतली मुख्य पात्रे म्हणजे ‘रियाना’, जयवंत इनामदार (आबासाहेब) त्यांचे मुलगे अनंत, प्रमोद, सुदर्शन उर्फ सनी आणि त्यांच्या पत्नी वृषाली आणि मधुरा. या सर्व पात्रांची परस्परांशी असलेली कौटुंबिक नातीही अनेक कंगोरे असलेली आहेत. कधी प्रेमाची, तर कधी द्वेष, मत्सर, चढाओढ आणि स्वार्थीपणाची, तितकीच संशयाचीही. एका धनाढ्य कुटुंबातली ही सारी जवळची नाती वेगवेगळ्या घटनांतून, संवादातून लेखिकेने अगदी सहजपणे उलगडलेली जाणवतात. प्रत्येक पात्राचं व्यक्तिमत्व, स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांच्या मनात चाललेली विविध मानसिक अंदोलने लेखिकेने अत्यंत समरसतेने आणि स्वतःला अलिप्त ठेवत त्या काल्पनिक पात्रांना रंगवलेले असल्यामुळे कादंबरीतल्या या व्यक्ती आणि घटना वाचकांच्या डोळ्यासमोर उभी राहतात. नायिकेच्या भूमिकेत असलेली नऊ दहा वर्षाची निष्पाप, आईवडिलांच्याही प्रेमाला पारखी झालेली, किंबहुना नकोशीच वाटणारी आणि घरातच होणाऱ्या अनोळखी किळसवाण्या शारीरिक शोषणामुळे भयभीत, भेदरलेली बालिका जिला स्वतःच्या भावना व्यक्तही करता येत नाहीत तिच्याविषयी मात्र वाचकाला करुणा, दया, उत्पन्न होऊन तिचं केविलवाणेपण सहन न होउन ठायी ठायी डोळे पाणावतात.

एका श्रीमंत कुटुंबातला, दिखाऊ, बेगडी प्रतिष्ठितपणा, लालसा, लोभ यांचा झालेला परिपाक आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी भक्ष्य बनलेल्या नायिका रियानाचे कथित वाचताना, कल्पनेत बघताना काळीज चिरत जाते.

आबासाहेबांच्या अत्यंत विश्वासातली माणसं म्हणजे वासुदेव आणि पद्माबाई पण ज्यांच्यावर विश्वास ठेवावा त्यांनीच पाठीमागून वार करावा अशी ही खल प्रवृत्तीची माणसे लेखिकेने अत्यंत ताकदीने उभी केलेली आहेत. त्यांच्याबद्दल वाचकांच्या मनात चीड, लज्जा, घृणा उत्पन्न करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

या पात्रांव्यतिरिक्तही अनेक सहाय्यक पात्रे या कादंबरीत आहेत जी कथानकाच्या ओघात चपखलपणे बसतात. त्यामुळे कादंबरी वाचताना जाणवतं की यातलं कुठलंही पात्र अनावश्यक, घुसडलेलं नाही.

या कादंबरीत विश्वसनीय पात्रे विश्वासघातकी होतात, तुटलेली नाती पुन्हा जुळली जातात, पश्चाताप आणि मन परिवर्तन झालेलं इथे अनुभवायला मिळतं. रियानाच्या आणि आबासाहेबांच्या मृत्यूचं कारण आणि रहस्य शोधताना एकेकाळीची अहंकारात वावरणारी आणि म्हणून दुरावलेली नातेवाईक मंडळी, एकमेकांवर संशय घेणारी माणसंही आपल्या हातून झालेल्या अक्षम्य चुकीची एकमेकांना कबुली देत अखेर न्याय मिळवून देण्याच्या एका चांगल्या कारणासाठी कशी एकत्र येतात या सार्‍यांचे शाब्दिक वर्णन अत्यंत अकृत्रिम रित्या आणि वाचकाला पटवत वास्तवापर्यंत नेण्यात लेखिका संपूर्णपणे यशस्वी झालेली आहे.

एखादी नदी जशी उंच सखल भागातून, कधी संथ, खडकातून फेसाळत, वळणावळणांनी वाहत तिची ठरलेली दिशा आक्रमते तशीच या कादंबरीतली गोष्ट पुढे पुढे जात राहते.

या कादंबरीत एका समृद्ध परिवाराच्या माध्यमातून गूढता, रहस्यमयता, औत्स्युक्य, अतिन्द्रियता मृतात्म्याचे अस्तित्व अथवा ऋणानुबंध जे अवैज्ञानिक अथवा अविश्वासनीय वाटत असले तरी मूळ कथेची गरज ओळखून, कथानकाशी पूरक पद्धतीने गुंफलेले आहेत. “असंही होऊ शकतं’ असू शकतं” या विचारापर्यंत वाचक मनाने पोहोचतो हे विशेषत्वाने सांगावसं वाटतं. या कथानकात उणीव भासते ती फक्त थोड्यातरी, गंभीरतेपासून क्षणभर दूर करणार्‍या विनोदाची पण मूळ विषयच गंभीर विचार देणारा असल्यामुळे तेही बाजूला ठेवता येते.

या संपूर्ण घटनात्मक कादंबरीचा मूळ उद्देश म्हणजे समाजात चाललेले बालकांचे लैंगिक शोषण आणि गरिबी, असहाय्यता याचा फायदा घेऊन, चमकती आमिषे दाखवून होणारी मानवी नीच, हीन तस्करी आणि या गुन्हेगारी वृत्तीला, विकृतीला चव्हाट्यावर आणून कायद्याने कडक शासन व्हावे ही अपेक्षा. अशा वृत्तीला कठोर कायद्याची दहशत बसवून या अनैतिकतेला समूळ नष्ट करण्याची तळमळ.

हा एक ज्वलंत सामाजिक प्रश्न माननीय प्राची राजे यांनी रियाना कादंबरीत अत्यंत कळकळीने, धाडसाने आणि प्रामाणिकपणे मांडलेला आहे आणि वाचकाचे डोळे उघडण्यात त्या खरोखरच पूर्णपणे यशस्वी ठरल्या आहेत.

समाजातली नीतीमूल्ये टिकवण्यासाठी एक “आय ओपनर” कादंबरी असेच मी म्हणेन.

सत्तर एम. एम. स्क्रीनवर एखादा सातत्याने उलगडत जाणारा घटनापट पहावा तशी ही कादंबरी वाचली जाते. विचारी मनावर गारुड करते. एकाच वेळी उद्विग्न करते आणि सामाजिक जाणीवही देते. सर्वांनी जरूर वाचावी अशी ही कादंबरी “रियाना”

प्राचीताई तुमचे मनापासून अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

“शॉपीजन” प्रकाशकांचेही इतकी सुंदर कादंबरी प्रकाशित केल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि आभार!

 धन्यवाद!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द्रष्टा” – लेखिका : सुश्री वीणा गवाणकर – परिचय : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“द्रष्टा” – लेखिका : सुश्री वीणा गवाणकर – परिचय : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली

पुस्तकावर बोलू काही : “ द्रष्टा “

लेखिका: वीणा गवाणकर

पृष्ठे : २१०

मुल्य : ५००₹

साध्या प्रवाही भाषेत वीणाताईंनी हे पुस्तक वाचकांसमोर आणले आहे. केवळ थोरोच नव्हे तर तो अमेरीकेतला सगळा प्रदेश त्या काळानुसार शब्दांतुन जिवंत केला आहे. साध्या साध्या घटनांतून थोरोची घडण उलगडून दाखवली आहे.

थोरोची आई… ‘ सिंथिया निसर्गप्रेमी होती. ती आपल्या मुलांना घेऊन नेहमी निसर्गसहली काढी. वॉल्डन सरोवराकाठी तीन दगडांची चूल मांडून त्यावर एखादा पदार्थ शिजवून खाऊ घाली. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही ती मुलांच्या खाण्याबाबत दक्ष असे. ‘

हेन्रीच्या बालपणीच्या आठवणीत तो गायी चरायला अनवाणी गेल्याची नोंद आहे. तसंच, डोळे फुटलेला एक बटाटा त्याला मिळाला. आपल्या मोठ्या भावंडांच्या मदतीनं हेन्रीनं खड्डे तयार करून ते डोळे लावले. थंडीत तिथं खणलं तेंव्हा भरपूर बटाटे मिळाले… (पृ. १५)अशी नोंद लहानपणीची आहे.

थोरोच्या विचारांवर प्रभाव पाडणारं पहिलं पुस्तक म्हणजे राल्फ वाल्डो इमर्सन यांचं ‘नेचर’. या पुस्तकाने थोरोच्या विचारांना दिशा मिळाली. मानवजात आणि निसर्ग यांच्यात सुसंवादी ऐक्य हवं. हा विचार थोरोला पटला. पुढे त्याची इमर्सन यांच्याशी ओळख तर झालीच शिवाय दाट मैत्रही जुळलं.

हॉवर्ड सारख्या प्रतिष्ठीत विद्यापिठांत थोरो शिकला. पण त्याचे विचार मात्र साचेबद्ध न राहता विस्तारत गेले आणि तो स्वतंत्रतावादी विचारांचा बनला. रेव्ह. ब्राऊन्सन यांच्या एका व्याख्यानानं त्याच्यावर इमर्सन सारखाच प्रभाव पाडला. ‘सरकारने पुढारीपणा घेऊ नये. अनुसरावं. लोकांना मोकळीक द्यावी. लोकांनी सरकार चालवावं अशी मोकळीक हवी. मुक्त लोकांशिवाय मुक्त सरकार सामर्थ्यहीन आहे. (पृष्ठ २०)

थोरोनं शाळेत शिक्षकाचं काम करून पाहिलं. पण त्याला कोंडवाड्यासारखी साचेबद्ध मुलांना शिक्षा करणारी ही व्यवस्था मुळीच आवडली नाही..

आपल्या मोठ्या भावासोबत थोरोनं स्वतःच १८३८ मध्ये शाळा सुरू केली. तीन वर्ष हा उपक्रम चालला. या शाळेत आठवड्यांतुन एकदा मुलांना निसर्ग सहलीवर नेलं जाई. नदीत होडीतून जलविहाराची मौज मुलांना अनुभवायला मिळे. आपलं ज्ञान दाखवुन मुलांना दिपवण्यापेक्षा मुलांना त्यात रस कसा निर्माण होईल याची तळमळ थोरोला होती. मुलांना छापखान्यात नेऊन खिळे कसे जुळवतात हे दाखवले जाई. मुलांना जमिनीचा तुकडा देऊन आपले आवडीचे झाड लावायला सांगितले जाई. (पृ. ४२)

१८४४ मध्ये इमर्सन यांनी वॉल्डन सरोवराकाठची जमीन विकत घेतली. याच जमिनीवर अडीच एकराचा तुकडा त्यांनी थोरोला दिला. याच जागेवर थोरोने त्याची ती ऐतिहासीक कुटी उभारली. काटेरी झाडंझुडूपं साफ केली. रेल्वे कामगारांच्या एका पडीक झोपडीचे सामान सव्वाचार डॉलर्सला विकत घेतले. आणि स्वहस्ते आपलं छोटं घर कुटी आश्रम झोपडी घरटं जे काय म्हणायचं ते म्हणा त्याची उभारणी केली. कुटीच्या दाराला कुलूप नव्हते. खिडक्यांना पडदे नव्हते. ४ जुलै १८४५ रोजी थोरो वॉल्डन सरोवराकाठी या कुटीत रहायला आले.

थोरोचे खाणेही साधेच होते. दगडाची चुल मांडून ते त्यावर अन्न शिजवत. चवळीसारखं कडधान्य, पाण्यात पीठ भिजवून तापलेल्या दगडावर भाजुन घेत, याच दगडावर मासेही भाजत. रोटीच्या पीठात मनुका वापरून पाहिल्या आणि त्यातुनच ‘रेझिन ब्रेड’ चा जन्म झाला. (पृ. ८८)

अशी फार सुंदर वर्णनं पुस्तकात जागजागी आलेली आहेत. वीणाताईंना स्वतःला असलेली निसर्गाची विलक्षण ओढ त्यांच्या शब्दांतुन जिवंतपणे आपल्यापर्यंत थोरोच्या चरित्राच्या रूपाने पोचते हे मला फार महत्वाचे वाटले.

थोरोचे पुढचे आयुष्य अनेक रोमहर्षक घटनांनी भरले आहे. कर न भरल्याने तुरूंगात जाणं असो, स्त्रीयांच्या गुलामांच्या हक्कासाठी लढणं असो की त्याचे गाजलेले पुस्तक वॉल्डनचे लिखाण त्याचे प्रकाशन व प्रसिद्धी असो. या नंतरच्या काळात त्याचा भरपुर प्रवास झाला भरपुर दगदग झाली. जवळच्या लोकांच्या मृत्युने त्यांना अजुनच अंतर्मुख बनवलं. थोरोंच्या विचाराची दिशा बदलून टाकली.

मोठा भाऊ जॉन (ज्यु,) याच्या मृत्युनंतर त्यानं आपल्या रोजनिशीत लिहिलं होतं… ‘… मृत्यूकडे अपघात म्हणुन नव्हे तर सृष्टीनियम म्हणुन आपण पाहिलं तर तो सुंदरच होतो. इतक्या शांत आणि जिवंत निसर्गातलं, सृष्ट भावातलं, अखेर काय म्हणुन मागं उरलं आहे, असं आपल्याला म्हणता येतं… सालोसाल पिकं मरून पडतात म्हणुन का भूमीनं आपली धीर वृत्ती सोडली आहे? वनस्पतीसृष्टी आनंदानं फुलायला आणि सुकायला नि नव्याला वाट करून द्यायला सिद्ध असते. मानवी वनस्पतीचंही तसंच आहे..,’ (पृ. ६०)

६ मे १८६२ ला थोरोनं शेवटचा श्वास घेतला. मानवाला वनस्पतीची उपमा देणारा हेन्री डेव्हीड थोरो शांतपणे मृत्युच्या स्वाधीन झाला.

थोरोचे व्यक्तीमत्व अफाट असे आहे. त्याला मोजक्या २०२ पानांमध्ये बसविण्याचे ‘थोरोचे स्वतंत्रतावादी धनुष्य’ वीणाताईंने उत्तम तर पेललेच पण प्रत्यंचा चढवून त्या विचारांचा बाण बरोबर आपल्या मेंदूचा वेध घेणारा असा सोडला आहे. वाचकांना तो अस्वस्थ करत नेमका परिणाम साधल्याशिवाय रहात नाही.

मी मला भावलेल्या थोरोच्या निसर्गविषयक पैलूचा हा परिचय करून दिला. हे पुस्तक तर वाचाच पण थोरोवर आलेली मराठीतली इतर पुस्तके पण जरूर वाचा.

पुस्तक परिचय :  श्रीकांत उमरीकर 

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सर आणि मी” – लेखक : सुश्री ज्योत्स्ना संभाजी कदम ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

“सर आणि मी” – लेखक : सुश्री ज्योत्स्ना संभाजी कदम ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक : सर आणि मी 

लेखिका :ज्योत्स्ना संभाजी कदम.

प्रकाशन :राजहंस.

प्रथम आवृत्ती: २०१०

ज्योत्स्ना कदम यांचं हे आत्मकथन एका वेगळ्याच सहजीवनाची कहाणी सांगणारं आहे. विद्यार्थिनी ते प्रेयसी ते पत्नी या नात्याचा एक अत्यंत थेट आणि सुंदर प्रवास या पुस्तकात अनुभवायला मिळतो. ज्योत्स्ना कदम यांचे पती संभाजी कदम हे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक आणि नंतरच्या काळातले डीन. आणि लेखिका त्यांची विद्यार्थिनी होती. वास्तविक वयात वाजवीपेक्षा जास्त (२५ वर्षे)अंतर असूनही दोन कलाकारांचं हे वैवाहिक जीवन त्यांच्याच शब्दात वाचताना अनेक वेळा थक्क व्हायला होतं. पती-पत्नीच्या नात्यातला एक वेगळ्याच रंगाचा पदर त्यांच्या आत्मकथनातून उलगडत जातो.

या पुस्तकात लेखिकेने अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत. एका वेगळ्या स्तरावरची त्यांची प्रेम कहाणी फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये वाचायला मिळते. त्यांची पहिली भेट, त्यानंतर वाढत जाणारी ओळख, घट्ट होत जाणारं नातं, प्रेमात रुपांतर मग लग्न संसार, मुलं याविषयी त्यांनी विस्ताराने लिहिलेलं आहे पण वाचताना महत्त्वाचं वाटतं ते त्यांचं वेगळं प्रेमातलं पण समंजस आणि वैचारिक नातं.

लेखिकेने स्वतःच्या वैवाहिक जीवनाची कथा सांगत असताना स्वाभाविकपणेच त्यांच्या पतीच्या अनेक सवयी आणि त्यांच्या विचारांबद्दलही जे काही लिहिलं आहे ते अनेक वेळा विचार करायला लावतं. त्या म्हणतात, ”लग्न, विवाह याबद्दलचे ‘कदम’ यांचे विचार अगदी वेगळे होते. त्यांच्या मते विवाह म्हणजे केवळ स्त्री-पुरुषांचं शारीरिक संबंध जोडणं नव्हे तर ते सहजीवन हवं आणि ते मानसिक आध्यात्मिक, ज्ञानात्मक पातळीवर सुसह्य हवं. ही दोन भिन्नलिंगी शरीरं केवळ वंश विस्तारासाठी एकत्र न येता त्यातून जीवन परिपूर्ण व्हायला हवं आणि हे एकरूप जीवन पती-पत्नी याच नात्यापुरतं मर्यादित न राहता त्यात माता, पिता, बहीण, भाऊ, गुरु -शिष्य या नात्यांचं सत्व शोधता यावं. ज्ञ पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर योग्य अयोग्य, बरं वाईट, समाजाचे नीती नियम हे सगळं महत्त्वाचं नव्हतं. मला एकच गोष्ट आतून तीव्रतेने हवी होती ती म्हणजे त्यांचा सहवास. पुढे चांगलं की वाईट होणार हे मला माहीत नव्हतं पण मी जे करते ते माझ्या प्रामाणिक जगण्यासाठी आहे याची मला पूर्ण खात्री होती. वयाच्या पंचविशीतही मी स्वतःच्या अंतः प्रेरणेला पूर्णपणे ओळखून होते. ”

हे सारे किस्से वाचताना जाणवतं ते एक खंबीर, सक्षम, सामाजिक विरोधाला टक्कर देणारं कणखर तरीही हळवं, संवेदनशील आणि स्वतः विषयी अपरंपार विश्वास असणार एक सुंदर स्त्री व्यक्तिमत्व!

घरच्यांच्या विरोधात झालेल्या, आणि परंपराबाह्य लग्नाबद्दल लिहिताना त्या म्हणतात, ” पारंपरिक लग्नातले कोणतेच विधी आम्ही केले नाहीत पण कदमांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. ते घालताना मला म्हणाले, ” हे मंगळसूत्र केवळ आपण लग्न केलं म्हणूनच घालायचं नाही तर ते एक मंगल प्रतीक म्हणून घालायचं. हे जीवनाचे मंगळसूत्र आहे. मी तुला ते आज अर्पण करतो आहे. माझ्याबरोबर तू तुझं सगळं जीवन मंगलकारक बनवायचं आहे. उद्या केव्हाही मी असेन, नसेन तरी तू ते तुझ्याजवळच ठेवायचं आहेस. अगदी गळ्याच्या शपथे सारखं. मी एक व्यक्ती.. तुझा पती म्हणून निमित्त मात्र आहे. आज तुझं लग्न झालं आहे ते ज्ञानाशी, चैतन्य तत्त्वाशी, जे सतत तुझ्याबरोबर राहणार आहे. ही सौभाग्य चिन्हं तू आयुष्यभर जपून ठेव. ”

कारण या लेखनामध्ये सौभाग्य लेण्याविषयीचा जो अर्थ सांगितला होता तो माझ्या मनाला भिडला, पटला आणि त्या सुंदर विचारांच्या प्रवाहात मी अक्षरशः तरंगत राहिले.

अशीच एक अतिशय सुंदर आठवण वाचताना मन हेलावून जातं त्या लिहितात,

“वसंत पंचमीचा दिवस होता. कदम म्हणाले आज मला तुझे स्वागत करायचे आहे. त्यांनी मला पूर्वेकडे तोंड करून बसावयास सांगितले. एका टबामध्ये माझे पाय ठेवून ते स्वतःच्या हाताने पाणी घालून धुतले, पुसले आणि नंतर माझ्या पायावर त्यांनी फुलं वाहिली, कुंकू वाहिले आणि मला त्यांनी नमस्कार केला. “तुझ्यातल्या स्त्रीत्वाची मी आज पूजा केली. तू वयाने जरी लहान असलीस तरी गुणांनी, मानाने मोठी आहेस असं मला वाटतं. ” – – एखाद्या पतीने आपल्या पत्नीच्या गुणांची आणि तिच्यातल्या स्त्रीत्वाची अशा रीतीने कदर करावी, मान ठेवावा आणि तो व्यक्त करावा हे विलक्षण नाही का? वास्तविक दोघेही हाडाचे चित्रकार. कलाकार हे किती मनस्वी असतात आणि जीवनाविषयीची त्यांची दृष्टी, विचार हे किती वेगळे असतात हे या आत्मकथनातून लक्षात येतं.

एके ठिकाणी त्यांनी संभाजी कदम यांच्या चित्रकारितेविषयी लिहिलेलं आहे आणि ते अत्यंत वाचनीय आहे. त्या म्हणतात, ” गर्भवती स्त्रीचं पोर्ट्रेट करायची कदम यांची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती. मला जेव्हा सातवा महिना सुरू झाला तेव्हा कदमांनी मला अशा प्रकारच्या चित्राची कल्पना दिली. पोर्ट्रेट करायच्या दिवशी मला लग्नातली पांढरी सिल्कची साडी नेसायला सांगितली आणि गॅलरी जवळच्या दरवाज्यात उभं रहायला सांगितलं. बाहेरून फार छान प्रकाश येत होता. एखाद्या देवीच्या मूर्तीला सुंदर देव्हार्‍यात स्थानापन्न करावं असं त्यांनी मला त्यादिवशी त्या ठिकाणी उभं केलं. मी पण अगदी डौदारपणे तिथे उभी राहिले. त्यावेळी क्षणभर मलाही आपण देवी असल्याचाच भास होऊ लागला. कदम आपल्या कामात पूर्णपणे मग्न झाले होते. वास्तविक जड पोट, सतत उभे राहिल्यामुळे पायावर आलेली सूज हे असह्य होत होतं. तरी पण मला हे सगळं सहनही करावसं वाटलं कारण प्रत्येक रंगाचा पॅच, रेषेची लय आणि आकाराचा डौल माझं कोड कौतुक पुरवीत होता. माझं दिसणं आणि असणं दोन्ही त्या क्षणी साजरं होत होतं. या चित्राने माझ्यातला कलावंत आनंदी झाला होता आणि तो आनंद आतल्या गर्भालाही मिळत होता. तिसऱ्या दिवशी पोर्ट्रेट पूर्ण झालं. त्यानिमित्ताने एका गर्भवती स्त्रीचं फुलणं, आकारणं कलावंतांच्या नजरेतून अतिशय प्रभावीपणे साकार झालं होतं. पावित्र्य, शुभ्रता, खूप काही भरभरून सांगणारे डोळे, उदराचा गोंडस आकार, प्रसन्न प्रगल्भ वाटत होता. नव्या अंकुराला जन्म देणारी एक वैश्विक माऊली तिथे साकार झाली होती.

असे कितीतरी प्रसंग या पुस्तकात वाचताना मनाची एक वेगळीच अवस्था अनुभवायला मिळते वास्तविक लेखिकेच्या या आत्मकथनात केंद्रस्थानी आहेत ते त्यांचे पती संभाजी कदम. त्यांच्याविषयीची त्यांनी केलेली वर्णने वाचून आणि त्यातला प्रांजलपणा जाणून

एका वेगळ्याच विचारधारेचा वाचक साक्षी होतो. वास्तविक दोघेही उत्तम चित्रकार आणि एकमेकांसाठी मॉडेल्सही होती. कदमांचे मॉडेल करतानाचाही एक सुंदर अनुभव लेखिकेने सांगितला आहे. “कदम दिसायला रुबाबदार नव्हते उलट अगदी सर्वसामान्य होते पण त्यांचं पोर्ट्रेट करताना डोळे, नाक, ओठ, कान, चेहऱ्याची ठेवण या पलीकडे जाणवत होतं ते त्यांचं अंतरीचं दिसणं या अंतरंगात चेहरा नव्हता. तिथे एक परिपूर्ण संपन्न व्यक्तीमत्व होतं ते मला शोधायचं होतं. त्या व्यक्तिमत्वला संवेदनशील पंचेद्रिये होती ती जगण्याचे सगळे सोहळे संपन्न करीत होती. भोगापेक्षा योगाला जवळ करीत होती. ती आतली लय मला जाणून घ्यायची होती.

पती-पत्नीच्या नात्यांबरोबरच त्यांचं मूळ नातं जे होतं ते मात्र गुरु शिष्याचं होत. त्याही नात्याबद्दल त्यांनी जाणीवपूर्वक लिहिलं आहे.

या पुस्तकात लेखिकेने त्यांच्या कामजीवनावरची थेट वर्णनही केलेली आहेत. थेट आणि प्रामाणिकपणे. पण वाचताना ते अजिबात अश्लील, असंस्कृत वाटत नाहीत. कदमांनी काढलेल्या लेखिकेच्या न्यूड्सवरही त्यांनी भरभरून लिहिले आहे. ते वाचताना एक वेगळ्याच अनुभवाच्या पातळीवर वाचक जातो.

हे पुस्तक वाचताना असं पार पलीकडे गेलेलं स्त्री-पुरुषांचं वेगळं, कलात्मक, काव्यमय नातं शब्दरूपात ठायी ठायी व्यक्त होतं.

५००/६०० पृष्ठे असलेल्या या ज्योत्स्ना कदम यांच्या आत्मकथनात अनेक आठवणी त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलेल्या आहेत. विद्यार्थी दशेतल्या, प्रेमप्रकरणाच्या, कुटुंबाच्या, सर्वसाधारणपणे आयुष्यात येणार्‍या समस्यांच्या, मुलांच्या संगोपनाविषयीच्या, आर्थिक चढउताराच्या अनेक भल्याबुर्‍या आठवणी त्यांनी प्रभावीपणे शब्दरूप केल्या आहेत.

त्यांच्या सहजीवनाचा शेवटही वाचताना मन खरोखर भरून येतं. त्या लिहितात, “कदमांची शेवटची गाठभेट, त्यांनी कडकडून मारलेली मिठी आठवली. त्या शेवटच्या आलिंगनात त्यांनी त्यांच्या जवळची सगळी शक्ती मला देऊन टाकली होती. त्यामुळेच की काय मी हळूहळू शांत होत गेले. माझी अगतिकता निवळत गेली. माझ्या मनानं आता हे सत्य स्वीकारलं होतं. यमानं माझ्या सत्यवानाचं शरीर ओरबाडून नेलं होतं पण त्यांचा आत्मा माझ्या प्रेमाने, माझ्या भक्तिभावाने सांभाळून ठेवला. आमचं संपलेलं अलौकिक सहजीवन अश्रू पुसत मी मान्य केलं पण त्यांच्या आत्म्याला मात्र कुठेही जाऊ न देता परत एकदा अगदी कायमचं आपलंसं करून घेतलं. ”

खूप काही आहे या पुस्तकात. ही नुसतीच प्रेम कहाणी नाही तर दोन कलावंतांनी एकमेकांच्या सोबतीनं जगलेली आयुष्यं आहेत. या कलाप्रेमी माणसांनी आयुष्यातल्याही रंग, रेषा, लय डोळसपणे जपून एक स्त्री पुरुषाचं नातं सामान्य पातळीवरून एका आध्यात्मिक पातळीवर नेलेलं आहे. त्यामुळे एक आत्मिक आणि सकारात्मक अनुभव हे आत्मकथन वाचताना नक्कीच मिळतो.

या पुस्तकात त्यांची सुंदर पेंटिंग्ज पाहायला मिळतात. त्या दृष्टीनेही हे पुस्तक मौलिक आणि देखणं आहे.

हे पुस्तक नक्कीच bold आहे. त्या काळात या पुस्तकावर भरपूर टीकाही झाली. पण म्हणून हे पुस्तक अपयशी ठरत नाही. कलाकाराच्या नजरेने आणि कलाकाराच्या विचारांशी समरस होऊन जर हे पुस्तक वाचले गेले तर वाचनाचा स्वर्गीय आनंद या पुस्तकांमुळे मिळतो हे नक्कीच.

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्वराज्याच्या सौदामिनी” – लेखिका : सुश्री वसुधा परांजपे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्वराज्याच्या सौदामिनी” – लेखिका : सुश्री वसुधा परांजपे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : स्वराज्याच्या सौदामिनी

लेखिका : वसुधा परांजपे

पृष्ठ : २००

मूल्य : ३२५₹ 

प्राचीनतम कालापासून आजपर्यंतचा भारताचा इतिहास हा विजिगिषू वृत्तीने भरलेला आहे. निर्भय धडाडी, समग्र समर्पण वृत्ती, अभंग, जिद्द व असीम स्वातंत्र्यकांक्षेने स्वराज्याच्या सौदामिनी शत्रूवर कोसळल्या व अजर अमर कीर्ती प्राप्त करत्या झाल्या. सिंधप्रांत राजकन्या राणी सुदेण्णा, काश्मीरची राणी दिव्दा, उदेपुर समर सौदामिनी राणी कर्मदेवी, चितोडची अग्निज्वाला राणी पद्मिनी, चितोडची रणझुंजार जवाहिरबाई, गोंडावनाची रिपुमर्दिनी दुर्गारानी, स्वामिनिष्ठ पन्नादायी व अक्षया दासी, तुळूनाडूची किरीय अतुलनीय अब्बक्क राणी, केळवाडची स्वामींनी पत्तामाता, राष्ट्रस्वातंत्र्यजननी महाराष्ट्राच्या जिजामाता, तक्षशिला तथा तोंडांतकची राजकन्या ताराशुथान, महाराणी येसूबाई, औरंगजेबाला रडवणारी भद्रकाली ताराराणी, केळदीची राजारामांना मदत करणारी धैर्यशील चेन्नम्मा, इंदूरचे पुण्यश्लोक स्वामींनी अहिल्यादेवी होळकर, कित्तूरची रणरागिणी चेन्नम्मा, कलकत्त्याची रणधुरंदर राणी रासमानी, महेश्वरची रणचंडी राजकन्या भीमाबाई, १८५७ची कीर्ती पताका राणी लक्ष्मीबाई, नागालँडची झुंजार कन्या गाई डिन्ल्यु माँ, जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी, मराठवाड्याची वीरांगना सौ. दगडाबाई शेळके अशांसारख्या मरणाला मिठी मारणाऱ्या हजारो स्त्रियांचे चरित्र वाचले की मन निस्तब्ध होते.

अशा शूरवीर स्त्रियांच्या पराक्रमाची हि गाथा नवीन पिढीला माहित व्हावी, हीच ‘स्वराज्याच्या सौदामिनी’ हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना लेखक आणि प्रकाशकाची भूमिका आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “युक्ताहार” – लेखिका : सुश्री मुनमुन गणेरीवाल – अनुवाद : सुश्री स्वप्ना सचिन ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “युक्ताहार” – लेखिका : सुश्री मुनमुन गणेरीवाल – अनुवाद : सुश्री स्वप्ना सचिन ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक – युक्ताहार

लेखिका – मुनमुन गणेरीवाल 

अनुवाद – स्वप्ना सचिन

पृष्ठ: ३८४

मूल्य: ४८०₹

आपण करत असलेली ‘डाएट्स’ उपयुक्त का ठरत नाहीत, याचं तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं आहे का? आपला आहार यथायोग्य करून आणि पोटात चरबी जाळणाऱ्या जीवाणूंची पैदास वाढवण्याऐवजी आपण डोळ्यांवर पट्टी बांधून डाएटचे नवनवे प्रकार शोधत असतो. त्यामुळे आपल्या पोटातील जीवाणूंचा समतोल आणि वैविध्यता आपण आणखीनच बिघडवतो. तुमच्या वजनात जितके जास्त चढ उतार तितका त्याचा दुष्परिणाम मोठा.

– – युक्ताहार या ‘नॅशनल बेस्टसेलर’ पुस्तकातून मुनमुन गणेरीवाल हेच आपल्यासमोर मांडते.

या पुस्तकामध्ये मुनमुन दहा आठवड्यांचा, सहज पाळता येण्यासारखा एक कार्यक्रम आपल्याला आखून देते. ती आपल्याला आपल्या आतड्यांचं आरोग्य सुयोग्य राखण्यास मदत करते. ज्यासाठी ती ऋतुमानाप्रमाणे अन्नाचं नियोजन, पाककृती, व्यायामाचे नियमन, झोपण्याच्या सवयी आणि योग करणे याचं पालन करायला सांगते. या पुस्तकामध्ये, मुनमुनसोबत काम करून, अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्यात आमूलाग्र बदल कसा झाला या विषयीही सांगितलं आहे. यात ती भर द्यायला सांगते ते पारंपरिक, प्रादेशिक पाककृतींवर. त्यासोबत ती पुरावा देऊन काही सूचनाही करते. ‘युक्ताहार’ तुमचं अन्नासोबतचं नातं घडवतं आणि त्यातूनच तुमच्या आतड्याचं आरोग्य सुधारतं. ते अधिक सुयोग्य (Lean) आणि सुदृढ बनतं…

– सर्वांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक जरूर वाचावे असेच आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “साद मंदिरांची-ओळख संस्कृतीची” – लेखक : श्री आशुतोष बापट ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “साद मंदिरांची-ओळख संस्कृतीची” – लेखक : श्री आशुतोष बापट ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : साद मंदिरांची-ओळख संस्कृतीची

 – – बघायलाच हवीत अशी मंदिरे

लेखक: आशुतोष बापट 

पृष्ठ: १६६

मूल्य: ३५०₹ 

हिंदू मंदिरस्थापत्य ही कला नुसती भारतातच बहरली असे नाही, तर भारताबाहेरही तिचे अवशेष दिसून येतात. भारताबाहेर विशेष करून आग्नेय आशियात हिंदू धर्म पोचला होता आणि त्या वेळच्या राजांनी तिथे विविध मंदिरे बांधलेली आहेत. थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, बाली या प्रांतांतून हिंदू संस्कृती मंदिरांच्या रूपाने आजही आपले अस्तित्व राखून आहे. यातील अभिमानाची बाब अशी की, जगातील सर्वांत मोठे धार्मिक स्थापत्य हे हिंदू मंदिर असून ते कंबोडिया इथले ‘अंकोरवाट’ मंदिर आहे. अफाट, अफलातून, जबरदस्त, भव्य-दिव्य, अद्भुत अशी कितीही विशेषणे लावली तरीसुद्धा ती अपुरी पडतील असा प्रकार म्हणजे अंकोरवाट मंदिर. संपूर्ण जगातील सर्वांत मोठे धार्मिक स्थापत्य. याची भव्यता पाहून आपण नुसते अवाक होत नाही, तर निःशब्द होतो. मती कुंठित होते. हे असे काही मानवनिर्मित असू शकते यावर आपला विश्वास बसत नाही. कितीही वेळा पाहिले तरी बसत नाही. मंत्रमुग्ध अवस्था प्राप्त होणे, बुद्धी न चालणे, झपाटल्यागत फिरत राहणे हे सगळे अनुभव अंकोरवाट बघताना मिळतात. कितीही मनाची समजूत घातली तरी हे सगळे अशक्य कोटीतले काम असणार असेच जाणवत राहते. ख्मेर स्थापत्यशैलीचे सगळे घटक इथे बघायला मिळतात. त्यामुळे त्या मंदिराचा इतिहास, स्थापत्यवैशिष्ट्ये या पुस्तकात समाविष्ट करणे क्रमप्राप्त होते.

या पुस्तकात वर्णन केलेले एकेक मंदिर काही ना काही वेगळेपण जपणारे आहे. खजुराहोचे कंदारिया महादेव मंदिर हे विशिष्ट तत्त्वज्ञान आपल्यासमोर उघड करते. गुरुवर्य देगलूरकर सरांनी या मंदिराला ‘वास्तुब्रह्म’ असे संबोधले आहे. ज्या वास्तूच्या दर्शनाने ब्रह्मतत्त्वाची ओळख होते ते वास्तुब्रह्म. आपण ही मंदिरे का बघायला हवीत तर त्याचे सोपे उत्तर असे की, तत्कालीन राजानी, स्थपतींनी, कलाकारांनी ही मंदिरे जीव ओतून निर्माण केली ती मुळात सर्वसामान्य लोकांनी येऊन बघावीत म्हणून. तत्कालीन राजांनी आपले वैभव, सामर्थ्य या मंदिरांच्या रूपाने आपल्यासमोर सादर केले आहे. मंदिर हे देवाचे निवासस्थान आहे, आपल्या उपास्य देवतेची मूर्ती त्या मंदिरात प्रस्थापित केली जाणे हे साहजिक आहे. पण ते केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने या मंदिरांची रचना, त्यांच्यावर केलेले अफाट शिल्पकाम, समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे, प्रसंगांचे शिल्पांच्या रूपाने त्या मंदिरावर केलेले सादरीकरण म्हणजे जणू एखादा चित्रपटच असतो. मंदिरातील देवाची ओळख त्या देवाच्या विविध कथा आणि पुराणांतून आलेल्या प्रसंगातून शिल्परूपाने उलगडून दाखवणे ही सुद्धा एखाद्या मंदिराची ओळख असते. दगडावर दगड रचून केले जाते ते असते स्थापत्य. मात्र दान देणारा राजा, स्थापत्याचा आराखडा तयार करणारा स्थपती, रचना करणारा सूत्रधार, सगळे स्थापत्य मूर्तीनी सजवणारे शिल्पी या सगळ्यांच्या अथक प्रयत्नानंतर तयार होते ते ‘मंदिर’. इतके भव्यदिव्य बांधकाम, त्यावरील मूर्तिकला, त्यामागे दडलेले तत्त्वज्ञान हे सगळे समजून घेण्यासाठी मंदिरे बघणे अत्यावश्यक ठरते. आणि त्याचबरोबर भारतीय कलेचा मोठा वारसा हा मंदिरस्थापत्याच्या रूपाने आज आपल्यासमोर उभा आहे. प्राचीन भारताचा इतिहास आपल्या समोर मंदिराच्या रूपाने उलगडून दाखवतो आहे तो आवर्जून बघितलाच पाहिजे. तो अभ्यासला पाहिजे. तत्कालीन कलाकारांचे मनसोक्त कौतुक केले पाहिजे. ही मंदिरे उभी असणारी ठिकाणे आज कदाचित सामान्य वाटतील, पण ज्या काळात ही मंदिरे इथे बांधली गेली तेव्हा नक्कीच ती ठिकाणे महत्त्वाची होती. हे महत्त्व व्यापारी कारणामुळे असेल, राजकीय किंवा सांस्कृतिक कारणामुळे असेल, पण ज्या अर्थी एवढे भव्य स्थापत्य इथे निर्माण झाले त्या अर्थी इथल्या स्थानाला त्या काळात मोठे महत्त्व असणार हे नक्की.

आपला देश विविध प्रकारच्या मंदिरांनी बहरलेला आहे. प्रत्येक प्रदेशात एखादे तरी देखणे शिल्पसमृद्ध मंदिर उभे असतेच. भारतातली सगळी मंदिरे बघायची झाली तर किती जन्म घ्यावे लागतील याची गणतीच नाही. तत्कालीन राजेरजवाड्यांनी, स्थपतीनी, शिल्पिनी, कारागिरांनी हा एवढा मोठा अमूल्य वारसा मंदिरांच्या रूपाने आपल्यासमोर ठेवला आहे त्याचे काही अंशी तरी दर्शन घेणे हे क्रमप्राप्त आहे. सगळी मंदिरे नाही बघून होणार पण न चुकता बघायलाच हवीत अशी मंदिरे निवडून ती वाचकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्राच्च विद्येचे अभ्यासक आशुतोष बापट यांनी भारतभर भ्रमंती करून त्यातली नेमकी मंदिरे निवडली. त्यांचा इतिहास, ते बांधणाऱ्या राजांचे पराक्रम, त्या मंदिरांची वैशिष्ट्ये, त्यांच्यावर कोरलेल्या असंख्य मूर्ती, शिलालेख, त्यातून उलगडणारा इतिहास हे सगळे एकत्र गुंफून अभ्यासू वाचकांसाठी हे सगळे या पुस्तकाच्या रूपाने समोर आणले आहे. मंदिरांनी बहरलेल्या या देशातील किमान एवढी मंदिरे तरी आवर्जून बघायलाच हवीत असे सांगणारे हे पुस्तक. मंदिर अभ्यासकांसाठी, वारसा प्रेमींसाठी स्नेहल प्रकाशनाची ही अमूल्य भेट.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अकाउंटिंग फॉर डमीज” – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अकाउंटिंग फॉर डमीज” – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अकाउंटिंग फॉर डमीज  

(सर्वांसाठी हसत-खेळत अकाउंटिंग)

लेखक:- अच्युत गोडबोले 

पृष्ठे :- ३८४

मूल्य:- ३५०₹ 

छोटा किंवा मोठा, कोणताही व्यवसाय असला तरी त्यात अकाउंटिंगला फार महत्त्व असतं. अकाउंटिंग हा विषय अतिशय विस्तृत आहे. प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाच्या फायद्यातोट्याचं गणित बसवण्यासाठी अकाउंटिंगची ओळख असणं गरजेचं आहे. अर्थात, त्याचं ज्ञान प्रत्येकाला असेलच असं नाही. अच्युत गोडबोले यांच्या या पुस्तकात अकाउंटिंग या विषयाचे सर्व पैलू अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.

या पुस्तकात…

— अकाउंटिंगच्या भाषेची तोंडओळख

— फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय?

— कंपनीची फायनान्शिअल पोझिशन कशी समजून घ्यायची?

— जर्नल आणि लेजर पोस्टिंग कसं करतात?

— ट्रायल बॅलन्स म्हणजे काय?

— कॅश फ्लो स्टेटमेंटची माहिती

— शेअर कॅपिटलचे विविध घटक

— रेशो ॲनॅलेसिस कसा करावा?

— लायबिलिटीज आणि ॲसेट्स

लेखक अच्युत गोडबोले आपल्या मनोगतात म्हणतात खरं म्हणजे मी आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पण नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिरलो. त्यावेळी आयबीएममध्ये काम करत असताना एकदा मी एका प्रोग्रॅमसाठी एक स्पेसिफिकेशन लिहिलं होतं. पण त्यामध्ये अकाउंटिंगच्या संदर्भात एक चूक झाली होती. ते स्पेसिफिकेशन बघून मला तिथला एक वरिष्ठ म्हणाला ” Mr. Godbole, don’t you understand even this much of accounting? “. मला हे ऐकल्यावर खूपच स्वतःची लाज वाटली.

अकाउंटिंगच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला होता. आपल्याला येत कसं नाही यांनं पछाडलं जाऊन मग मी बी. कॉम पर्यंतचं अकाउंटिंग आणि कॉस्टिंग वाचून काढलं. त्यातलं मर्म समजल्यानंतर ज्याला त्यातलं काहीही माहित नाहीये त्याला ते कसं शिकवलं पाहिजे यावर मी सखोल विचार केला आणि मी त्यावर चक्क सेमिनार्स घ्यायला लागलो. माझी विषय मांडण्याची पद्धत वेगळी होती पण अतिशय सोपी आणि सहज समजण्यासाठी होती म्हणून लोकांना ती खूप आवडायची. त्याचवेळी यावर एक पुस्तक लिहावं असं वाटलं आणि मग मी अकाउंटिंग, कास्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्स आणि मार्केट्स अशी चार पुस्तक लिहायचं ठरवलं. त्यातलं अकाउंटिंग फॉर डमीज हे पहिलं पुस्तक.

यां पुस्तकात अकाउंटिंगची मूलतत्त्व अत्यंत सोप्या म्हणजे स्टेप बाय स्टेप पद्धतीनं आठवीतल्याही मुलाला कळतील अशा तऱ्हेनं समजावून सांगितलेली आहेत. आणि यानंतर दुसऱ्या भागात पूर्ण विषयाची सेल्फ स्टडी प्रकारातली प्रश्नोत्तरं या स्वरूपात सखोल उजळणीपण केलेली आहे. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि कुठल्याही जिज्ञासू वाचकाला हे पुस्तक आवडेल आणि उपयोगीही पडेल अशी मला अशाच नव्हे तर खात्री आहे.

लेखकाविषयी थोडेसे – – 

अच्युत गोडबोले हे प्रसिद्ध लेखक, तंत्रज्ञ आणि माजी CEO आहेत. आयआयटी मुंबईतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात जागतिक स्तरावर काम केले. पटणी, सिंटेल आणि एल अँड टी इन्फोटेक यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पदांवर कार्य केले आहे. त्यांनी संगणकशास्त्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाची पाठ्यपुस्तके आणि मराठीत विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र व संगीत अशा विषयांवर ७५ हून अधिक लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे १, ००० पेक्षा अधिक लेख विविध नियतकालिकांत प्रकाशित झाले असून त्यांनी असंख्य व्याख्याने दिली आहेत. गुंतागुंतीचे विषय सहज भाषेत मांडण्याच्या त्यांच्या शैलीसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या कार्याबद्दल IBM, आयआयटी मुंबई आणि भारत सरकारकडून त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ध्यास वंदे मातरम् चा” – लेखक : श्री मिलिंद प्र. सबनीस – परिचय : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ध्यास वंदे मातरम् चा” – लेखक : श्री मिलिंद प्र. सबनीस – परिचय : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक: हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन

लेखिका : सुनीला सोवनी 

पृष्ठ: ३९८

मूल्य: ३५०₹ 

७) पुस्तकावर बोलू काही

“ ध्यास वंदे मातरम् चा “ लेखक : मिलिंद प्र. सबनीस परिचय : प्रवीण दवणे प्रस्तुती : हर्षल भानुशाली

 

पुस्तक : ध्यास वन्दे मातरम् चा 

लेखक: मिलिंद प्रभाकर सबनीस

पृष्ठे: १६०

मूल्य: २३०₹

– – एका अमर राष्ट्रगीताची दीडशेवी वर्षपूर्ती होत आहे. त्या निमित्ताने…

वन्दे मातरम् हे शब्द शालेय जीवनात रोजच शाळा सुटताना उच्चारत असलो, तरी त्याबद्दलची फारशी माहिती आजही सर्वसामान्यांना नाही. शालेय विद्यार्थ्यांना तर बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलं, एवढीही माहिती फार कमी प्रमाणात असते.

अमरेंद्र गाडगीळ हे त्या काळातील बालकुमारांसाठी संस्कारक्षम आशयाच्या कथा लिहिणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांचा मूळ पिंड संशोधक, अभ्यासक अशा कोशकाराचा होता. अमरेंद्र गाडगीळ हे ‘वन्दे मातरम्’ या विषयावर मराठीत पुस्तक लिहिणारे पहिले लेखक. १९७३च्या सुमारास मराठीत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदीसह आणखी काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात या पुस्तकातील काही भागावर सरकारी यंत्रणेकडून आक्षेप घेण्यात आला. आणीबाणीच्या आसपास सरकारनं सुचवलेला भाग वगळून या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित झाली तरी आणीबाणी उठल्यानंतरच्या काळातल्या सर्व आवृत्त्या मात्र मूळ मजकुरासह प्रकाशित झाल्या व पुढे हे पुस्तक अधिकच लोकप्रिय झालं. पुस्तक पृष्ठसंख्येच्या दृष्टीनं छोटं असलं तरी आशयात्मकदृष्ट्या मोठं होतं. वन्देमातरम् विषयी अधिक उत्कंठा निर्माण करण्याचं सामर्थ्य अमरेंद्रांच्या शब्दांत होतं.

राष्ट्रभक्तीने भारलेले असंख्य असतात; पण वेदमंत्राइतकेच वंदनीय असणारे ‘वन्दे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय स्तोत्र, राष्ट्रीय गीत! या गीताच्या जन्माला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सुमंगल लेणे लाभले असताना, या परमपवित्र राष्ट्रीय गीताचा, जन्मस्थळाचा व त्याभोवती असलेल्या काहीशा निगूढ पदरांचा वेध घ्यावासा वाटणे, हे संवेदनच विलक्षण दुर्मीळ आहे.

अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या बंकिमचंद्रांच्या छोटेखानी चरित्र पुस्तकातून ‘वन्दे मातरम्’ या मंत्राशी मिलिंद सबनीस यांचे भावोत्कट नाते जुळले. भले हे छोटेखानी पुस्तक असेल, पण त्यामुळे एका अद्भुत यात्रेसाठी मनाने पाऊल पुढे निघण्यासाठी ते आतुर झाले. पुढे मग निमित्ते कशी येत गेली आणि ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समग्र संदर्भाने शोध घेण्याचा ध्यास लेखकाला कसा जडला, याचा प्रवास लेखकाने या पुस्तकात उलगडला आहे.

ही ध्यासयात्रा केवळ ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या जन्मस्थानाभोवती वा त्यातून प्रसरणाऱ्या मंत्रवत प्रार्थनालहरीपर्यंत न राहता, पुढे नव्या पिढीत हा राष्ट्रीय विचार रुजावा म्हणून त्यांनी अथकपणे जिवाचे जे रान केले, त्या घटनांचेही दर्शन या पुस्तकातून घडते.

परिचय : श्री. प्रवीण दवणे (ज्येष्ठ साहित्यिक)

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “माणूस आणि मन” – लेखिका : डॉ. संयोगिता नाडकर्णी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“माणूस आणि मन” – लेखिका : डॉ. संयोगिता नाडकर्णी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : माणूस आणि मन  

 – – माणसाची दृष्टी आणि मनाचा कोन

लेखिका: डॉ. संयोगिता नाडकर्णी

पृष्ठ: २६४

मूल्य: ३९९₹

माझं चुकतंय का?

हा अहंकार आहे का?

माझी चूक नसताना मी का ऐकून घेऊ?

मला नाही जमत, काय करू?

शेवटी माझ्याकडेच यावं लागलं ना!

रागावल्याशिवाय कामं होत नाहीत.

यांना धडा शिकवल्याशिवाय कळणार नाही

मीच नेहमी का सहन करायचं?

होत कसं नाही… झालंच पाहिजे!

लोक काय म्हणतील?

मला काही फरक पडत नाही!

– – मी मी आणि मी! मीला सावरता येत नाही आणि आवरताही येत नाही… मीचं काही करता येत नाही, पण मीचं कोडं सुटलशिवाय पुढं जाताही येत नाही!

.. कोडं सुटणार कसं? मी कळला, तर कोडं सुटेल. मी कळेल कसा? मी कळवून घेण्यासाठीच हा पुस्तक प्रपंच! पण ‘प्रपंच’ म्हटल्याने घाबरून जाऊ नका. तो आपल्या मनाच्या गुंत्याइतका अवघड नाही. उलट गुंता सोपा करणारा आहे.

किचकट संज्ञा आणि कठीण आकृत्या म्हणजे मन नाही… आपलं वागणं म्हणजे आपलं मन! आपल्यासारखी वागणारी, विचार करणारी आणि रागावणारीसुद्धा माणसं आपल्याला या पुस्तकात भेटतील… अगदी आपण आपल्यालाच भेटू तशी!

– – आणि ती तशी का वागतात… खरंच ती मुळातून (की आपण) भित्री, चिडकी, बेरड, लबाड, नीरस असतात का? पृथ्वीच्या पोटाप्रमाणे मनाच्याही पोटात स्वभावाची काही रहस्यं दडली आहेत का? आणि असतील, तर ती सोडवायची कशी?

– – – या सगळ्या आणि याशिवाय इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं आणि स्वत:ला समजून घेण्याचे साधे-सोपे मार्ग आपल्याला या पुस्तकात भेटतील.

ते आपल्याला चूक-बरोबर ठरवणारे नाहीत; उलट मित्रासारखे मन हलकं करणारे आहेत.

‘A simple, relatable guide to understanding your mind, emotions, and ego. Discover why you react the way you do—and learn to befriend yourself with compassion.’ 

जे कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे, ‘Understanding is the beginning of change‘ 

अर्थात – ‘समजणं’ हीच बदलाची सुरुवात आहे.

आपल्याला कित्येकदा स्वतःत बदल हवा असतो, पण त्याचा मार्ग खूप वेळा माहीत नसतो. ‘काहीतरी चुकतंय’ किंवा ‘काहीतरी वेगळं हवंय’ अशी फक्त आपल्याला जाणीव असते. ह्या जाणिवेतून मानसशास्त्राचा जन्म होतो. मात्र मन समजायला तसं सोपं नाही. म्हणून मानसशास्त्र कित्येकदा क्लिष्ट वाटतं. त्यात शब्दांची गुंतागुंत दिसते. म्हणून इंटरनेटवरची एखादी संज्ञा समजून घेताना आपण अनेकदा गोंधळून जातो.

या गोंधळातून वाट काढून ‘मनाचं’ शास्त्र उलगडून दाखवणं, हा ह्या पुस्तकाचा हेतू आहे. त्यामुळे त्यात अनेक उदाहरणं आहेत. ह्या उदाहरणांशी जोडून घेऊन वाचकाला त्याचं किंवा इतरांचं मन समजायला जास्त सोपं जाईल.

‘आजकाल ‘संवाद’ बिघडत चालला आहे’ असं आपण म्हणतो. पण ‘संवाद’ सुद्धा मनातूनच येतो. ‘सांगणं’ आणि ‘ऐकणं’ यांमधून संवाद तयार होतो. सांगण्यापेक्षासुद्धा अधिक ऐकण्यातून संवाद मूळ धरतो. ‘ऐकायला’ मनाची तयारी लागते. ‘ऐकणारा’ जेव्हा ‘बोलणाऱ्या’च्या भूमिकेतून पाहू लागतो, तेव्हा ‘संवाद’ला आकार यायला लागतो.

मन आपल्या प्रत्येक कृतीवर प्रभाव टाकतं. त्यामुळे कुठल्याही बदलाची वाट ‘मना’तूनच जाते. मनाच्या या ‘वाटा’ समजाव्यात, म्हणून पुस्तकात वेगवेगळी ‘तंत्र’ दिलेली आहेत. ही ‘तंत्र’ तुम्हाला व्यवहारात नक्कीच मदत करतील; पण नुसत्या ‘तंत्रां’नी माणसाची मानसिक प्रगती होणार नाही. त्या ‘तंत्रां’ची पार्श्वभूमीही समजून घ्यावी लागेल. म्हणून हे पुस्तक ‘व्यक्तिमत्त्व विकास’ किंवा ‘जीवनाची गुरुकिल्ली’ यासाठी उपयोगी पडेलच, पण त्याहून अधिक स्वतःला “समजून” घेण्यासाठी ते दृष्टिकोन देईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares