अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ ताकदीने जगलेला विचार, प्रेमाने घडवलेले कार्यकर्ते – भाग १ – लेखक : प्रसाद चिक्षे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆
विवेकानंद केंद्र -एकनाथजी रानडे -ए. बालकृष्णन
– मा. श्री. ए. बालकृष्णन… विवेकानंद विचार आणि पूर्वांचलाशी आयुष्यभर नातं जोडणाऱ्या एका विलक्षण कर्मयोग्याला श्रद्धांजली… मृत्यू दि. २७/८/२६.
१९६२च्या चीन युद्धानंतर भारतीय मानस पूर्णपणे खचून गेलेलं होतं. त्या युद्धानंतर ईशान्य भारतातून अनेक सैनिक परत येऊ लागले. त्यांनी सांगितलेल्या कहाण्या ऐकून अंगावर काटा यायचा. आजही यूट्यूबवरील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या चिनी आक्रमणाची दाहकता लक्षात येते.
एकीकडे चीनचं आक्रमण आणि दुसरीकडे देशाच्या मनात निर्माण झालेली निराशा—या परिस्थितीत देशाला अधिक सामर्थ्यवान, अधिक आत्मविश्वासपूर्ण बनवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू झाला. याच काळात भारतभर स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरं करण्याची तयारी सुरू झाली.
१९६३ हे स्वामी विवेकानंदांचं जन्मशताब्दी वर्ष.
स्वामीजींना त्यांच्या आयुष्याचं ध्येय ज्या कन्याकुमारीच्या शिलेवर सापडलं, त्याच शिलेवर त्यांचं भव्य स्मारक उभं करावं, असा संकल्प करण्यात आला. पण हे काम काही केल्या पुढे सरकत नव्हतं. त्या स्मारकाला दक्षिण भारतातील काही ख्रिश्चन मिशनऱ्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रचंड विरोध होता. त्या शिलेबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत होते.
आणि अशा वेळी एका जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची एंट्री झाली—एकनाथजी रानडे.
एकनाथजींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व भारतीयांच्या सहकार्याने अखेर कन्याकुमारीचं भव्य विवेकानंद शिलास्मारक उभं राहिलं. ’
पण एकनाथजींना केवळ दगडाचं स्मारक उभं करायचं नव्हतं.
त्यांना विवेकानंदांचं जिवंत स्मारक उभं करायचं होतं.
विवेकानंदांचं जिवंत स्मारक म्हणजे त्यांच्या विचारांनी भारावून जाऊन आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारी माणसं—महिला, पुरुष, युवक, युवती. One Life, One Mission या भावनेने जगणारे कार्यकर्ते.
– – यातूनच विवेकानंद केंद्राची निर्मिती झाली. विवेकानंद केंद्राचा कणा असणारा कार्यकर्त्यांचा वर्ग म्हणजे जीवनव्रती. जीवनव्रती प्रशिक्षणात एकनाथजींनी तरुणांना आवाहन केलं—
“या राष्ट्रकार्यासाठी तुम्ही सहभागी व्हा.”
– – या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या तरुणांमध्ये एअरफोर्समधला एक तडफदार, विलक्षण ऊर्जावान युवक होता—ए. बालकृष्णन.
अफाट ताकद. मनात काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड इच्छा. मनाची विलक्षण शुद्धता. तीव्र इच्छाशक्ती. कोणत्याही परिस्थितीचं तुफान विश्लेषण करून निर्णय घेण्याची क्षमता. आणि त्याला जोडलेली अफाट पॅशन.
… हा तरुण विवेकानंद केंद्राचा जीवनव्रती कार्यकर्ता झाला. एकनाथजींच्या सहवासात त्याच्या या अफाट ऊर्जेला दिशा मिळाली.
त्या काळात पूर्वांचल—ईशान्य भारत—हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता. चीनपासून असलेला धोका तर होताच; पण त्याचबरोबर तिथल्या सांस्कृतिक वैविध्यालाही मोठं आव्हान होतं.
निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी, मानवी जीवन आणि समाजव्यवस्था इतकी वैविध्यपूर्ण आणि सुंदर आहे की तिची विविधता टिकवणं, त्या विविधतेतलं सौंदर्य टिकवणं आणि त्या विविधतेच्या मुळाशी असलेली अंतर्निहित एकात्मता टिकवणं ही काळाची गरज होती.
याच पूर्वांचलाच्या कामाची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पुढे अग्रस्थानी आले—बालकृष्णनजी.
विवेकानंद केंद्राच्या पूर्वांचलातील कामाचे ते प्रमुख संघटक झाले.
पहिली भेट
बालकृष्णनजींना मी पहिल्यांदा कन्याकुमारीमध्ये पाहिलं.
सकाळची वेळ होती. आम्ही काही जीवनव्रती कार्यकर्ते भोजनगृहातून ‘नचिकेता’कडे जात होतो. आपल्याच मस्तीत होतो. एकमेकांची हसी-मजाक सुरू होती.
अचानक समोरून एक व्यक्ती आली… आकाशी निळ्या रंगाचा शर्ट, पांढरी धोती, पांढरीशुभ्र आणि भरीव दाढी, पांढरेशुभ्र केस आणि डोळ्यांवर चष्मा. एका हाताने धोतीचा पदर सावरत ते आमच्याकडे चालत आले.
अचानक एक भारदस्त आवाज कानावर पडला—
“ए, कम हिअर! व्हॉट्स युवर नेम? ”
विवेकानंद केंद्रात ‘तुझं नाव काय? ’, ‘कुठून आलास? ’ असे प्रश्न सहज विचारले जातात, याचा मला अनुभव होता. मी लगेच उत्तर दिलं—
“आय अॅम प्रसाद. ”
पण पुढचा क्षण वेगळाच होता.
त्या व्यक्तीने थेट माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं—
“कसा आहेस? ठीक आहेस ना? बरं वाटतंय का इथे? काही त्रास तर नाही? ”
मी अचंबित झालो.
पाठीवर थाप देत त्यांनी आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
आवाजात जरब. व्यक्तिमत्त्वात भारदस्तपणा. पण बोलण्यात प्रचंड प्रेम.
हे काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन होतं.
आम्ही नंतर शांतपणे ‘नचिकेता’कडे परत आलो. मी रमणमूर्तीजींना विचारलं—
“हे कोण? ”
उत्तर मिळालं—
“बालकृष्णनजी! ”
बालकृष्णनजींबद्दल मी आधी खूप काही ऐकलं होतं. त्यामुळे माझ्या मनात त्यांचं एक वेगळंच चित्र तयार झालं होतं—अतिशय ताकदीचा माणूस, एअरफोर्समधला माणूस, नॉर्थ-ईस्टच्या कुठल्याही अवघड परिस्थितीत फिरणारा माणूस, कोणतंही आव्हान स्वीकारून ते पूर्ण करणारा माणूस.
अखंड पूर्वांचलाचा चप्पा-चप्पा माहीत असलेला माणूस.
प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव माहीत असलेला आणि त्यांच्याशी थेट संपर्क ठेवणारा माणूस.
प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशा असलेला माणूस.
पण हा एवढा जबरदस्त माणूस आपल्याशी इतक्या प्रेमाने बोलू शकतो, ही अनुभूतीच विलक्षण होती.
“Purity is important…”
पुढे सलग पंधरा दिवस बालकृष्णनजींचा सहवास मिळाला.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती प्रशिक्षणाची दीक्षा देण्यात आली. आमचं प्रशिक्षण आणि काम सुरू झालं.
त्या वेळी बालकृष्णनजींनी केलेलं भाषण आजही माझ्या कानात घुमतं—
“Purity is important.
Dedication is important.
Character is important.
Willpower is important.
Learning is important. ”
– – एकामागून एक ते वाक्य फेकत होते, जणू काही बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात!
पण त्या प्रत्येक वाक्यामागे त्यांचा स्वतःचा अनुभव होता.
ते आम्हाला केवळ विचार सांगत नव्हते… ते स्वतः जगलेला विचार आमच्यासमोर ठेवत होते.
कन्याकुमारीमध्ये त्यांच्यासोबत अनेक क्षण घालवता आले. प्रशिक्षणात त्यांनी आम्हाला केंद्र प्रार्थना समजून सांगितली. केंद्र प्रार्थनेचा एक वेगळाच आयाम त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला.
यानंतर ते पूर्वांचलाच्या दौऱ्यावर निघून गेले.
… पूर्वांचल म्हणजे त्यांचा जीव की प्राण! आणि तिथले कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासाठी लाखमोलाची ठेव.
अरुणाचलमध्ये खरा सहवास
माझी पोस्टिंग अरुणाचल प्रदेशमध्ये ‘अरुण ज्योती’च्या कामासाठी झाली. त्यानंतर बालकृष्णनजी अरुणाचलमध्ये आले आणि त्यांच्याबरोबरचा माझा खरा सहवास सुरू झाला.
बालकृष्णनजींची झोपण्याची व्यवस्था जिथे केली होती, त्याच्या बाजूलाच मी झोपायचो. कॉटवर बालकृष्णनजी आणि खाली बाजूला मी… आमच्या खूप साऱ्या गप्पा व्हायच्या.
आमच्या दोघांच्या वयामध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. पण एवढा मोठा माणूस आपल्याशी अगदी लहान भाऊ किंवा मुलगा असल्यासारखा प्रेमाने वागतो, ही अनुभूतीच दिव्य होती.
त्यांची पॅशन जबरदस्त होती. बोलण्यात नेमकेपणा होता. पण त्याचबरोबर ते प्रचंड विनोदीही होते.
एकदा सकाळी उठल्यानंतर काही वेळाने मी उठलो. बालकृष्णनजी माझ्याकडे पाहून हसायला लागले.
म्हणाले—
“अरे प्रसाद, तू तो नींद में बहुत बात करता है! मुझसे बात कर रहा था—‘मुझे घर जाना है, घर जाना है. ’ सही में घर जाना है क्या? ”
मी चकित झालो.
माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला सांगत होतं की मी झोपेत बोलतो!
नंतर मी त्यांना विचारलं—
“मी खरंच झोपेत बोलतो का? ”
तेव्हा ते म्हणाले—
“नाही, तू बोलत नाहीस. मी तुझी मजा करत होतो. ”
इतके अफाट विनोद मी बालकृष्णनजींबरोबर अनुभवले आहेत.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : प्रसाद चिक्षे
ज्ञान प्रबोधिनी
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

















