मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वाटी…!” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “वाटी…!” ☆ शीला पतकी 

“अरे वाटीने दिल तर पाटीने गोळा करशील. ” हे आमच्या आजीचे दातृत्वाचे माप! मोलाचा विचार !!आज आपल्यातील थोडं जे आहे त्यातलं लोकांना दिलं तर पुढे जाऊन त्या पुण्य कर्मामुळे आपल्याला खूप काही मिळतं… साधी गोष्ट पण एका ओळीत सुंदर सांगितलेली.

वाटी हे आपल्या भोजनपात्रातले सर्वात लहान भांडे वाटीचे अनेक प्रकार आहेत. नैवेद्याची वाटी, आमटीची वाटी, भाताची मुद पाडायची वाटी, तुपाची वाटी, आमरसाची वाटी, श्रीखंडाची वाटी, दह्याची वाटी, या अशा अनेक वाट्यांना त्यातल्या पदार्थ प्रमाणे मानाचे स्थान असे. त्यांचाही थाट असायचा.. काही वाट्या चांदीच्या काही पितळेच्या नंतरच्या काळात स्टीलच्या जर्मनच्या पण वाट्या असायच्या पण त्या वापरत नव्हते. जगावर राज्य करायला निघालेल्या जर्मनच्या वाटीची अवस्था फारच वाईट होती. कुत्र्या मांजराला खाऊ घालण्याचे पदार्थ त्या वाटीत ठेवले जायचे ती जरा आकाराने मोठी असायची. मला त्या धातूला जर्मन असे का म्हणतात हेच कळत नाही. त्या काळात जर्मनची भांडी हलकी म्हणून प्रसिद्ध होती पण ती घरात वापरायला कोणी तयार नसे. हमालाचं काम करतानाही जगावर राज्य करण्याची महत्त्वकांक्षा बाळगणारा क्रूर माणूस म्हणजे हिटलर… किंबहुना क्रूरतेला हिटलर हा शब्द पर्यायी म्हणून दिला आहे. असो एकूण जर्मनच्या वाट्या फारशा वापरल्या जात नव्हत्या.

नैवेद्याच्या वाटीचे नशीब जोरदार… ती चांदीची, देवापुढे रोज ठुमकत जाऊन बसण्याचा मान तिला! तिच्यामध्ये असलेले पदार्थ म्हणजे केशर काजू बदाम मिश्रित शिरा, केशर घातलेल श्रीखंड तर कधी मस्त घट्ट बासुंदी कधी बेसनाचा लाडू, डिंकाचा लाडू, साखरभात अशा भारदस्त पक्वान्नाना त्या वाटीत सामावून घेण्याचा मान मिळायचा. बाकीच्या वाट्या आमटी भाजी इत्यादीसाठी असायच्या.

आमरसाच्या वाटीचे मात्र वैशिष्ट्य.. ती खास असायची. तिला आपला हा मध्यम आकार चालायचाच नाही. हाताची बोटे पसरल्यावर जेवढा आकार होईल त्यात मावणारी ती वाटी.. ही चांदीची वापरायची. आता मात्र ती स्टीलची असते. चांदीच्या वाटीतला तो आमरसाचा रंग मोठा देखणा दिसायचा.. ते उत्तम मॅचिंग होतं. वाटी पाहिल्यानंतर माणसाच्या जिव्हेला आवर घालणे अवघड असायचे.

तसेच आमटीच्या वाटीचा आकारही थोडा मोठाच असायचा कारण त्यामध्ये कधी चिंच गुळाची आमटी, कधी शेवग्याच्या शेंगाची आमटी, कधी कांद्याची आमटी, उपवासाची शेंगाची आमटी, नवीन मसाला केल्यावर उखळ धुतल्यावर केलेल्या पाण्याची.. मसाला आमटी, वड्याची आमटी, आणि हल्ली प्रसिद्ध असलेली बाजार आमटी – – आमटीचा भुरका मारला की त्या आमटीने माणसाचा मेंदू तरतरीत होत होता.

उसनवारीचा व्यवसाय केला तो वाटीनेच… वाटीभर साखर, वाटीभर डाळीचे पीठ, वाटीभर डाळ, वाटीभर तांदूळ, वाटीभर तेल, ही सगळी उसनवारी या वाट्याच्या माध्यमातून होत असे.

लहान मुलांना तरी वाटीत काहीतरी घालून बसवले.. अगदी चुरमुरे वगैरे कि ती खात निवांत बसायची आणि आईचे काम व्हायचे.. ! शाळेतून आल्यानंतर आईने वाटीत काहीतरी खायला दिले की आनंद व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत केली जाणारी भेळ वाटी वाटीतूनच वर्तमानपत्राच्या कागदावर वाटली जायची. चाळ आणि वाडे यांच्यातील घराघरामधील स्नेह वाढवण्याचे काम या वाटीनेच केले आहे. भाजी आमटी चांगली झाली की शेजाऱ्याकडे ती वाटी जायची किंवा काही खास वेगळे केले तरी वाट्यांची देवाण-घेवाण व्हायची शेजाऱ्याकडे दिलेली वाटी कधीही रिकामी परत येत नसे, आणि आतासारखे चार दाणे साखर टाकून देण्याचा जमानाही नव्हता. त्यामध्ये पुन्हा घसघशीत पदार्थ घालून ती वाटी परत केली जात असे. माझ्या शेजारी असणाऱ्या एका कुटुंबातील मुलगी माझ्या आईच्या हातच्या आमटीसाठी हट्ट धरून बसायची. तिच्या आईला संकोच वाटायचा की रोज काय त्यांच्याकडून आमटी आणायची. माझी आई म्हणायची ‘अगं नेत जा.. मला नाती सारखी आहे ती ‘. पण त्यांनी एक युक्तीच केली आमच्या घरची वाटी घेऊन जाऊन त्यात ते त्यांच्या घरची आमटी घालून ठेवत आणि मग ती आमटी बाईंनी तुला दिली आहे असे सांगितले की ती खुश व्हायची आणि आईला म्हणायची, ” बघ बाईच्या हाताची आमटी किती सुंदर होते “– ही फसवा फसवी तिच्या आईने किती तरी दिवस केली होती. अशी ही गंमत.

या वाटीने सकाळी नळावर झालेली कडाक्याची भांडणे क्षणात विसरून जाऊन बायका पुन्हा चार वाजता गप्पा मारण्यासाठी एकत्र यायच्या. हे वैशिष्ट्य चाळ आणि वाड्यातच पाहायला मिळणार. नळावरची भांडणं त्या वाटीतून कधी बादली, घागरी पर्यंत पोहोचली नाहीत. ते सगळे विचार.. नाराजी वाटीमध्ये विरून जायची !

लग्नात या वाटीचे महत्त्व फार मोठे. मधुपर्कच्या एका विधीला जावयाला चांदीची वाटी देत असत. तसेच संक्रांतीला चांदीच्या वाटीत हलवा घालून जावयाला आहेर करायची पद्धत होती. भाच्याला पहिला दात समोरचा आला तर चांदीची वाटी मामाने आणून मारायची अशी पद्धत होती.. मारायची म्हणजे त्याला आहेरच करायचा. पूर्वी चांदीच्या वाटीचा आहेर करीत असत. बारशाला वाटी चमचा असा आहेर व्हायचा.. आहेरात चांदीची वाटी देणे याला खूप महत्त्व होते. बायका हिंगाच्या डबीत पैसे साठवून एक एक चांदीची वाटी जमा करीत असत. चांदीची वाटी, चांदीचं ताट, चांदीचे ताम्हण हे त्या घराचं वैभव बायकांच्या हिंगाच्या बचतगटाच्या डबीतून आलेलं आहे. आहेरात चांदीची वाटी दिली तर देणाऱ्याचा मान वाढत असे.. “अग बाई चांदीची वाटी का दिली… ” असे कौतुकही होत असे

माणसांच्या संभाषणात सुद्धा वाटीला अनन्यसाधारण महत्त्व होतं. उदाहरण पहा… “वाटीभर रक्त आटवलं याच्यासाठी पण काही उपयोग झाला नाही” यासारख्या वाक्याने वाटीला एक साहित्यिक महत्त्व आलं आहे. तिला ताटाची जोड मिळाली ना की मग तिचं सौभाग्य फुलते. पूर्वी ताटवाटीचा आहेर करायचे – – एकूण आपल्या संस्कृतीत जोडी असणे याला खूप महत्त्व आहे… वाटीतलं ताटात सांडले तर काय बिघडतं… वाटीतलं ताटात काय आणि ताटातलं वाटीत काय… इत्यादी म्हणजे थोडक्यात आपल्या माणसासाठी हे सगळं आहे असं सांगण्याचा तो उद्देश आहे.. त्याला दिले तर काही बिघडत नाही.

– अशा अनेक साहित्यिक वाक्यांमध्ये वाटीला स्थान आहे.

सर्वांना समान वाटणी करण्याची पूर्वी पद्धत होती, म्हणजे अगदी द्राक्ष आणली तरी प्रत्येक मुलाला सहा- सहा आठ आठ अशी मोजून द्राक्ष वाट्यात घालून दिली जात असत. (पूर्वी द्राक्ष दुर्मिळ होती) वाटीत कोणाला तरी गुपचूप काढून ठेवून देणे हे त्याच्यावर असलेल्या मायेच प्रतीक होतं. सुनबाई जर सासूबाईंना म्हणाल्या, ” आई आहो तुम्ही देवळात गेला होता ना म्हणून यांनी आणलेली बर्फी मी तुमच्यासाठी वेगळी काढून वाटीत ठेवली आहे “… सासुबाई सुखावून जातात… ! गपचूप काढून ठेवलेल्या वस्तूंचे महत्त्व विरोधी गटातही प्रेम वाढवण्यासाठी उपयोगी ठरले आहे.

चांदीच्या वाट्या कपाटात असतात. पितळेच्या वाट्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. स्टीलच्या वाट्यांची चलती जोरात आहे. पण त्यांनाही मागे टाकून आता प्लास्टिकच्या वाट्या येऊ लागल्यात. पण या वाट्यांना चांदीच्या आणि पितळेच्या वाट्यांचे शाहीपण नाही…

… पण सगळ्याच वाटी प्रकाराला जे बाईपण लाभलं आहे ना ते वाखाणण्याजोग आहे. बाईपण यासाठी की हा संसारातला स्नेह, समजूतदारपणा, भांडणे मिटवून टाकणं, आपल्यातलं थोडं दुसऱ्याला देणं, हे जे गुण घरातल्या बाईजवळ असतात तेच गुण या वाट्यामध्ये आहेत. वाटी हे वाडे आणि चाळीचे स्नेह वाढवणारे घटक आहेत. बंगल्यात ती देवघेव होत नाही आणि तो स्नेह ही निर्माण होत नाही.

… “एक वाटी आमटी भाजी की कीमत तुम क्या जानो बंगले वालो… ” 

आता हा लेख वाचल्यानंतर शेजारच्या पाजारच्या बंगल्यातून मला वाट्या येतील असं वाटतंय… बघूया एक छोटं भांडं – ‘वाटी‘ – यावर मी माझे विचार प्रकट केले आहेत. आवडले असले तर वाटीभर अभिप्राय द्या आणि ही वाटी पुढच्या घरी पाठवा माझे काही बंधन नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “समजुतीचा घोटाळा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “समजुतीचा घोटाळा…” ☆ श्री मंगेश मधुकर

माणसांच्या विचित्र वागण्यानं समजुतीचा घोटाळा होतॊ.

झालं असं की,

सध्या उन्हाळ्याचे दिवस. रात्र लहान तर दिवस मोठा. सकाळी फार लवकर म्हणजेच साडेपाच-सहालाच जाग येते. नंतर काही केल्या झोप येत नाही. उगीच कूस बदलत लोळत पडायचा कंटाळा येतो म्हणून मग फिरायला जायला सुरवात केली. मोबाइल मुद्दाम घरातच ठेवला. प्रसन्न वातावरण, हळूहळू जागं होणारे शहर, रस्त्यावर गाड्यांची कमी आणि पायी चालणाऱ्यांची संख्या जास्त. आजकाल असलं दृश्य पहायला मिळणं तसं दुर्मिळच.. फार मस्त वाटलं. असो..

सर्वच वयोगटातील लोक बाहेर पडलेले त्यातही ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त. फुटपाथवरुन जात असताना समोरून टी-शर्ट, हाफ पॅन्ट घातलेला, तुळतुळीत टक्कल असलेला पन्नाशीचा माणूस माझ्याकडं पाहत हातवारे करत काहीतरी बोलत होता. आमच्यातलं अंतर जवळपास शंभर फुटांचे होतं. तो नक्की आपल्याकडेच पाहत हातवारे करत आहे ना याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केला पण नीटसा अंदाज आला नाही. त्याचे हातवारे अजूनही चालूच. मी हात उंचावून प्रतिसाद दिला पण शून्य प्रतिसाद.. मला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. अगदी जवळ आल्यावर लक्षात आलं की तो इयर पॉड लावून फोनवर बोलत होता आणि मला वाटलं की.. , , , माझ्याकडे ढुंकुनही न पाहता शेजारून निघून गेला तेव्हा माझं मलाच हसायला आलं. नशीब बायको सोबत नव्हती नाहीतर तिला चिडवायला अजून एक कारण मिळालं असतं.

पुढे गेल्यावर असेच एकटेच बोलणारे, हातवारे करणारे अनेकजण दिसले पण यावेळेला मी अनुभवानं शहाणा झाला होतो.

काळ बदललाय हेच खरं… पूर्वी एकटाच बडबडणाऱ्या, हसणाऱ्याला वेड लागलंय किंवा डोक्यावर परिणाम झाला असं म्हणायचे. तसं पाहिलं तर आताही तीच परिस्थिती आहे. मोबाईलमुळे डोक्यावर परिणाम झालाच आहे. निसर्गानं बहाल केलेल्या सुंदर सकाळचा अनुभव घेण्याऐवजी मोबाइलला चिकटलेल्यांची खरंतर कीव वाटली.

विचारांच्या तंद्रीतच चौकातल्या बसस्टॉपवर बसलो. शेजारचा हातवारे करत, शून्यात पाहत बोलत होता मध्येच मोठ्याने हसत होता. अजून एक फोन पागल… आपल्याच तंद्रीत असलेल्या त्यानं माझी दखलही घेतली नाही. सतत बडबड चाललेली अन मी शांत बसलेलो. तितक्यात समोरून चाललेले आजोबा आमच्याकडे क्षणभर पाहत थांबले. थोडं पुढे जाऊन त्यांनी मला ‘शुक शुक’ करून बोलावलं.

“काय झालं”मी विचारलं.

“भलेतच डेरिंगबाज आहात”

“का?”

“म्हणजे तुम्हाला माहिती नाही की अजूनही लक्षात आलं नाही”आजोबांच्या प्रश्नांनी गोंधळ वाढला. माझा प्रश्नांकित चेहरा पाहून आजोबा म्हणाले..

“अहो, मिस्टर ज्याच्या शेजारी बसला होता तो वेडा आहे. भीती वाटली नाही ? ” आजोबांचं ऐकून नखशिखांत हादरलो. आजोबा मात्र माझ्याकडं कौतुकमिश्रित विचित्र नजरेनं पाहत होते.

“लोक इतके विचित्र वागतात की कोण वेडं की कोण नॉर्मल ओळखणं अवघड झालयं. ”मी म्हणालो.

“बरोब्बर”

“एवढ्या सकाळी सुद्धा बरेचजण फोनवर बिझी??. “

“ स्मार्ट फोन आल्यापासून माणसांचा बावळटपणा वाढलाय ”आजोबा मार्मिक बोलले.

“खरंय!!तुमचे मनापासून आभार!!” 

… हात जोडत आजोबांचा निरोप घेऊन निघालो बसस्टॉपवरच्या वेड्याचं बोलणं सुरूच होतं. तितक्यात समोरून काहीजण एकटेच बोलत येताना दिसल्यावर फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालायला लागलो…… मनात विचार आला की एक खरंच वेडा आणि बाकीचे.????

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

भक्ति सूत्रे ६६ – – 

त्रिरूपभङ्गपूर्वमकम् नित्यदास्यनित्यकान्ताभजनात्मकं प्रेम कार्य प्रेमैव कार्यम् ||६६||”

अर्थ : त्रिपुटीचा भंग म्हणजे नाश अथवा लय करून सर्वकाळ भगवतांचा दास आहे अथवा त्याची कांता आहे असा भाव धारण करून त्याच्यावर प्रेम करावे, प्रेमच करावे.

विवेचन : साधन, साधक आणि साध्य अथवा भक्त, भक्ति आणि भगवंत अशी त्रिपुटी अथवा त्रिकुट मानले जातात. अध्यात्मात या तिन्हीची गरज असते. जेव्हा भगवतांची प्राप्ती होते तेव्हा ही त्रिपुटी संपुष्टात येत असते.

आपण नदीचे उदाहरण पाहू.

नदीचा उगम सागराला जाऊन मिळण्यासाठी होतो. यात नदी, नदीचे वाहणे आणि सागर मिळून त्रिकुट अथवा त्रिपुटी होते. यातील एक जरी नसेल तरी चालणार नाही. नदी सागराला जाऊन मिळाली की तिचे अस्तित्वच संपुष्टात येते, तिचे नदीपण शिल्कच उरत नाही…

भक्त भक्ति करतो, यथावकाश त्याला भगवंताची प्राप्ती होते, मग तो भक्त म्हणून सांगायला शिल्लकच उरत नाही. इथे आपल्याला प्रश्न पडेल की मग संत कसे काय आपल्याला उपदेश करतात. त्याला एकमेव उत्तर आहे. संत कमीपणा घेऊन आपल्यासाठी *”अवतरण”* करीत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याची अनुभूती आपण प्रत्येक संताच्या बाबतीत घेऊ शकतो.

हे सर्व लिहिणे सोपे आहे, प्रत्यक्षात आणणे महाकठीण.

त्यासाठी संपूर्ण शरणागत भाव अथवा हनुमंतासारखी दास्य भक्ति अंगिकारता आली पाहिजे.

साधकाने भगवंताला म्हटले पाहिजे की तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन… ! तुझे चरण मी काही झाले तरी सोडणार नाही. तुझ्या चरणावर डोके ठेवले आहे. आता तू तार अथवा मार. तू तारलेस किंवा मारलेस, तरी दोन्ही मध्ये माझेच कल्याण आहे. अशी दृढ श्रध्दा हवी. असे जमले की विषाचा प्याला पिताना भीती वाटतं नाही, छाटी उडाल्यावर मागचा पुढचा विचार न करता कल्याण गडाच्या तटावरून उडी मारू शकतो, कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले तरी भक्त प्रल्हादाला निश्चिंत रहात नाम घेता येते…

अशी अनेक उदा. आपल्याला सांगता येतील.

… बाळाची आई बाळावर अकारण प्रेम करते. ते बाळ दुध पिताना आईला लाथा मारते, तिच्या अंगावर शी करते, शू करते, रात्री अपरात्री जागरण करवते, तरी आई त्या बाळावर अपरंपार प्रेम करते…

… भक्त आपल्या भगवंतावर असाच प्रेम करतो, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते.

संत तुकाराम महाराज या स्थितीचे खालील अभंगात वर्णन करतात.

“हाचि नेमआतां न फिरें माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ 

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥ 

बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥”

– – – – –

भक्ति सूत्रे ६७ – –

भक्ता एकान्तिनो मुख्याः ||६७||”

अर्थ : भगवंतांची एकनिष्ठपणे भक्ति करणारे भक्त हे मुख्य भक्त होत.

विवेचन: प्रपंचात अनेक गोष्टी मनुष्याला सांभाळाव्या लागतात, याउलट परमार्थ मार्गात मात्र एका भगवंताला आपलेसे करून घ्यायचे असते. गणिती भाषेत बोलायचे झाल्यास अनेक गणिते सोडवण्यापेक्षा एक गणित सोडवणे त्यामानाने सोपे, नाही का?

अनेक वर्षे प्रपंच करून मनुष्याला किती समाधान मिळतं हा प्रश्नच सध्याच्या काळात गैरलागू झाल्यासारखा आहे, असे म्हटले तर नवल वाटू नये… !

समर्थ म्हणतात, ” प्रपंच अवघाचि नासका”

यासाठी प्रापंचिक मनुष्याने, साधकाने दिवसातील काही वेळ एकांतात व्यतित करायला हवा. अनेक लोकांना एकांतापेक्षा एकटेपणाची जास्त भीती वाटतं असते. एकांत म्हणजे एकाचाही अंत. अंतर्यांमी वसलेल्या आत्मारामामध्ये स्वतःचा अंत करणे म्हणजे एकांत सेवन करणे. दुसऱ्या बाजूने विचार करता, आपली आणि भगवंताची इच्छा एक करणे, अर्थात त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळणे. तो जसा ठेवील तसे आनंदाने राहणे म्हणजे एकांत म्हणता येईल.

ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जाते तसे साधकाने भक्तीत विरघळून जावे. एक अर्थात जो आपला अभिमान आहे, अहंकार आहे, मीपणा आहे तो सर्व त्याच्याचरणी वाहून टाकावा, संपूर्ण शरणागत होऊन भगवंताशी समरस होऊन जावे… ! सर्व संतांनी हे करून दाखवले आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“लवण मेळविता जळे| काय उरले निराळे ||१|| समरस झालो `तूज माजी हरपलो ||२|| अग्निकर्पूराच्या मेळी| काय उरली काजळी ||३|| तुका म्हणे होती| तुझी माझी एक ज्योती||४||”

(संदर्भ : अभंग क्रमांक २३७९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

या गुणातीत भक्तीमध्ये व्यवहाराचा, स्वार्थाचा लवलेश नसतो. अशा भक्ताला फक्त भगवंताचे प्रेम हवे असते, आणि त्यासाठीच तो भगवंतावर जिवापाड प्रेम करीत असतो… ! मग, एखादी मीरा म्हणून जाते आणि ते अजरामर होते,

“मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोय||”

असा भक्त सर्वांना आवडतो, अर्थात देवालाही प्रिय होतो.

– – – –

भक्ति सूत्रे ६८, ६९ – – – 

कण्ठावरोधरोमञ्चाश्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवीं च ||६८||”

तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि सुकर्मीकुर्वन्ति कर्माणि, सच्छास्त्रीकुर्वन्ति शास्त्राणि॥ ६९ |

अर्थ : प्रेमातिरेकामुळे कंठ दाटून येऊन शरीरावर रोमांच उभे राहिलेले असतांना आणि डोळ्यांतून अश्रू वहात असताना सिद्ध भक्त बाष्प गद्गद स्वरांनी एकमेकांशी संभाषण करताना उभय कुळे आणि पृथ्वी पावन करतात. इतकेच नव्हे तर असे भक्त (संत) तीर्थांना पावन करतात तसेच, ते जे बोलतात, त्याला वेदांत वाक्य म्हणून मान्यता मिळते.

विवेचन : भक्ति वाढत चालली की साधकाचे अष्ट सात्विक भाव जागृत होत असतात. आता अष्ट सात्विक भाव आपण पाहू.

अष्ट सात्विक भाव म्हणजे भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये स्वाभाविकपणे प्रकट होणारी आठ प्रकारची शरीरिक-मानसिक लक्षणं. हे भाव परम भक्तीच्या अवस्थेत देवाप्रती प्रेम व एकात्मतेमुळे आपोआप उमटतात. हे “सात्विक” (शुद्ध, निर्मळ) स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना सात्विक भाव असे म्हणतात.

अष्ट सात्विक भाव :

  1. स्तंभ (स्तब्धता)

शरीर स्थिर होणे, न बोलणे, हालचाल थांबणे.

  1. स्वेद (घाम येणे)

अनोख्या आनंदाने किंवा भावानं अंगाला घाम फुटणे.

  1. रोमांच (रोमहर्ष)

अंगावर रोमांच उभे राहणे, थरथर सुटणे.

  1. स्वरभंग (गेल्यावर आवाज अडखळणे)

बोलताना गहिवर येणे, आवाज तुटक होणे.

  1. कंपन (थरथर)

शरीर थरथरणे, हातपाय हलणे.

  1. वैवर्ण (रंग बदलणे)

चेहऱ्यावर लाली, पल्लव, पांडूपणा इ. रंग बदल.

  1. अश्रू (डोळ्यांतून पाणी येणे)

आनंद, प्रेम, भक्तिभावाने डोळ्यांतून अश्रू येणे.

  1. प्रलय (संमोहनासारखी अवस्था / शून्यभाव)

शरीर व मन पूर्णपणे विश्रांतीत जाणे, समाधिस्थ अवस्था.

साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर साधकाला या आठही भावांची अनुभूती येत असते. परंतु यामध्ये न गुंतता साधकाने आपली साधना, उपासना सुरू ठेवायला हवी.

जेव्हा अधिकार प्राप्त झालेले दोन भक्त भेटतात किंवा दोन संत भेटतात, तेव्हा त्यांच्यात एकतर मौनात चर्चा होते किंवा ते फक्त आपल्या गुरुबद्दल किंवा आपल्या भक्तीबद्दल चर्चा करीत असतात. तेव्हा त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत होऊ शकतात, किंवा काही वेळा झालेले अनेक साधकांनी पाहिले असेल. जिवंत साधकांच्या डोळ्यात पाणी आले यात नवल कदाचित नसेल, पण श्रीमहाराज (गोंदवलेकर महाराज) जेव्हा नैमिष्यरण्यात जायला निघाले तेव्हा थोरल्या रामाच्या डोळ्यांत पाणी आले. श्रीमहाराज त्याच्याजवळ गेले की त्याला विचारले की अरे, मी नैमिष्यरण्यात जातोय, ते तुला आवडले नाही का ? तसे असेल तर मी जाणार नाही… !

या सर्व गोष्टी परम प्रेमातूनच घडून येऊ शकतात. सर्व संतांनी भगवंतावर निरातिशय प्रेम करून त्याच्या सगुण विग्रहातून चैतन्य प्रकट करविले. चैतन्य सर्वत्र भरून राहिले असेल तर ते कोठूनही प्रगट होऊ शकते, फक्त ते प्रगट करण्याइतकी साधना, तप:श्चर्या आणि संपूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक ठरते.

गंगेचे अवतरण झाले तेव्हा गंगा म्हणाली की पृथ्वीवर पापी लोकं राहतात, ते माझ्या पाण्यात स्नान करतील तेव्हा त्यांची पापे नष्ट होतील, यात बिल्कुल संदेह नाही, पण मी मैली होईन तेव्हा मला कोण शुद्ध करेल. तेव्हा भगवंताने तिला वचन दिले की संतमंडळी जेव्हा तुझ्या स्नान करतील तेव्हा त्याच्या अंतरंगी असलेल्या माझ्या अंशाने तू पुन्हा पुण्यसलीला होशील. आजपर्यंत हे वचन भगवंताने पाळले आहे.

अशा एकनिष्ठ भक्तांमुळे, संतांमुळे कुळ, मूळ आणि धरित्री पावन होत असते, नद्यांना तीर्थत्व प्राप्त होत असते… ! आणि संत जे बोलतात ते शास्त्र म्हणून मान्यता पावते. आदरणीय ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की मी पुस्तकातून जो वेदांत शिकलो तोच वेदांत श्रीमहाराज साध्या साध्या उदाहरणातून आणि स्व-आचरणातून जगाला सांगत आहेत. वेगळा वेदांत अभ्यासण्याची गरजच नाही. श्रींचे प्रत्येक वाक्य हे वेद वाक्य आहे, वेद वचन आहे.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ६६, ६७, ६८, ६९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नजरेआड राहून गेलेले बलिदान ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नजरेआड राहून गेलेले बलिदान ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके

पहाटेचा दीड वाजला आहे. Central Reserve Police Force च्या एका तुकडीवर अंतर्गत भागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या भागातील एका शाळेच्या इमारतीमध्ये तात्पुरते out post उभारण्यात आले आहे.

कारगिल युद्ध समाप्त झाल्याची घोषणा झालेली आहे. बाहेरून आत येऊन सीमेमध्ये खोलवर लपून बसलेला शत्रू आपण फार मोठी किंमत मोजून पिटाळून लावला आहे… पण आधीच देशाच्या अंतर्भागात बस्तान बसवलेले शत्रू आता आतून दगाफटका करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सैन्याने ज्यांचा येथील कार्यकाळ संपलेला आहे, अशाही सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना इथं मुदतवाढ देऊन जबाबदारी दिली गेली आहे. त्यात अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे लागले होते! 

ही outpost तशी काश्मिरातल्या जंगलाच्या भागात, आणि तेथून पाकिस्तान सीमा फारशी दूर नाही.. आसपास बऱ्यापैकी लोकवस्ती. तेथील लोकांशी या outpost मधील सैनिकांशी बराच परिचय झालेला होता. तेथील तरुण या सैनिकांशी क्रिकेट खेळत, दूध वगैरे वस्तू आणून देत असत. एकूण मैत्रीपूर्ण आणि शांत वातावरणात सैनिक कर्तव्यावर तैनात होते!

चक नटनस नावाचे ठिकाण. दिनांक ६ ऑगस्ट, १९९९… कारगिल युद्ध समाप्तीची घोषणा होऊन केवळ दहाच दिवस झालेले होते… पाकिस्तानी अतिरेक्यांच्या आणि स्थानिक अतिरेक्यांच्या एका खूप मोठ्या गटाने या outpost वर मोठ्या आधुनिक शस्त्रांनी हल्ला चढवला! अतिरेकी या OUTPOST पासून अगदी जवळ, म्हणजे सुमारे पंचवीस तीस मीटर्सपर्यंत जवळ पोहोचले होते… व त्यांनी अक्षरश: POINT BLANK RANGE हल्ला चढवला.. त्यांच्याकडे आर. पी. जी. अर्थात ROCKET PROPELLED GRENADES होते… जे खांद्यावरील बंदुकीतून डागता येतात… पिका मशीन गन्सही होत्या… या एक हजार मीटर्सपर्यंत अचूक मारा करीत मिनिटाला सहाशे ते आठशे राउंडस डागू शकतात… अंधार एवढा की केवळ रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्यांमुळे उडणाऱ्या ठिणग्या दिसाव्यात.

Outpost मध्ये सैनिकांची संख्या मर्यादित. शिवाय पहाऱ्यावरील दोन, तीन रक्षक (सेंट्री) वगळता इतरांना रात्री त्यांच्याकडील शस्त्रे शास्त्रागारात जमा करण्याचे आदेश होते! 

अचानक झालेल्या तुफानी गोळीबारात दोन पहारेकरी आणि तीन सैनिक आणि एक अधिकारी मिळून सहा शूरवीर धारातीर्थी पडले!

मदतीला येण्याचा संदेश दिला गेलाय… पण बचाव दल पोहोचायला किमान दोन तास लागतील. हल्ला अगदी पूर्वतयारी करून झाला आहे. क्रिकेट खेळायला येणाऱ्यांनी बहुदा गावाशेजारच्या जंगलात आधीपासूनच लपून बसलेल्या अतिरेक्यांना सर्व माहिती पुरवली आहे! त्यामुळे कोणत्या बाजूला किती जवान असतात, शस्त्रे कोणती आणि किती असतात याची माहिती शत्रूला होती, असे स्पष्ट होते!

४, राष्ट्रीय रायफल्स (बिहार रेजिमेंट) कुपवारा येथे कर्तव्यावर असलेले मेजर मनजीत सिंग यांची खरे तर काश्ममीरातील नेमणूक संपली होती आणि ते लवकरच त्यांच्या गावी, जालंधरला सुट्टीवर जाणार होते… पण प्राप्त परिस्थिती पाहून लष्कराने त्यांच्या सारख्या अधिकाऱ्यांना तिथेच कार्यरत राहण्याचे आदेश दिले होते.

८, माउंटन डिविजन काश्मीर खोर्‍यातून काढून तिला द्रास भागात झालेल्या घुसखोरीचा बिमोड करण्याच्या कामी धाडण्यात आले होते. त्यामुळे उत्तर काश्मीर भागात अतिरेकी विरोधी कारवाईत कार्यरत असलेल्या सैनिक, अधिकारी यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला होता. नेमका याचाच फायदा शत्रूच्या फिदायीन अर्थात आत्मघातकी अतिरेक्यांनी उचलला होता. काश्मीरमधील भौगोलिक परिस्थिती ज्यांना माहीत आहे, अशांना यात काहीही आश्चर्य वाटणार नाही. तेथील परिस्थितीचे यथार्थ ज्ञान भारतातील इतरांना फारसे नाही.

गोळीबाराचा आवाज ऐकून मेजर मनजीत सिंग आपल्या झोपण्याच्या जागेवरून ताडकन उठले आणि बाहेर धावले. मागच्याच वर्षी त्यांनी जगरपोरा येथे झालेल्या चकमकीत एका अफगाणी अतिरेक्यास यमसदनी धाडले होते. तो अतिरेकी बी. एस. एफ. च्या बंकर वाहनावर चढून वाहनात ग्रेनेडस टाकण्याच्या अगदी बेतात असतानाच मनदीप यांनी त्याला ठोकले होते. त्यावेळच्या चकमकीत कॅप्टन तरुण कुमार (मरणोत्तर कीर्ती चक्र) आणि त्यांचे सिग्नलमन श्री. सावंत यांना वीरगती प्राप्त झाली होती. तो आणि असे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी होते. पुढे राहून नेतृत्व करणारा हा शूर अधिकारी होता. मर्यादित शस्त्रे आणि प्रचंड संख्येने चालून आलेला शत्रू… परिस्थिती भयावह होती.

जखमी झालेल्या कनिष्ठ सैनिक अधिकाऱ्याची जागा घेण्यासाठी ते धावत असताना त्यांच्या पोटात, छातीत ग्रेनेडचे तुकडे घुसले… पण तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी इतर सैनिकांना भराभर सूचना देत स्वत: गोळीबार आरंभला.

यात एक गोष्ट आपल्या बाजूची ठरली.. ती म्हणजे पहाऱ्यावर असलेल्या एका सैनिकाजवळ रणगाडा भेदी rocket launcher होता! त्या जांबाज बहादाराने त्या तेवढ्या धुमश्चक्रीत ते शस्त्र चालवले… अतिरेक्यांना त्या शस्त्राची बहुदा कल्पना नसावी. त्या तोफगोळ्याच्या आवाजानेच अतिरेकी हादरून गेले आणि त्याच्या स्फोटात पुढे आलेल्या काही अतिरेक्यांचे तुकडे झाले.

अतिरेकी पांगले. पण तीन अतिरेकी मात्र OUTPOSTच्या आतील भागापर्यंत पोहोचले. त्यातील एकाकडे दोन ग्रेनेड्स होते. पण त्यादिवशी outpost मध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून एके ४७ रायफल जमा करण्याचे चुकून राहून गेलेले होते! 

सैन्यातील प्रत्येकाला शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. त्याचा फायदा झाला. या सफाई कर्मचाऱ्याने एके. -४७ अचूक चालवली. त्या अतिरेक्याच्या हातातील दोन्ही ग्रेनेड्स त्याच्या हातातच फुटले आणि ते तिघेही ठार झाले! 

पूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना कंपनी कमांडर कॅप्टन मनदीप यांनी रायफल चालवली. सैनिकांना मार्गदर्शन करीत राहिले. त्यांनी आणि साथीदार सैनिकांनी खूप अंधार असतानाही केवळ उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर अचूक गोळीबार केला. तब्बल २६ अतिरेकी ठार मारले! 

एका छोट्या OUTPOST वर केला गेलेला हा मोठा हल्ला होता. त्यामुळे आपल्या सैनिकांनी बलिदान आणि उत्तरही मोठेच दिले! नायब रिसालदार नरेंदर सिंग, नाईक मिथिलेश पाठक, सोवार सोहन सिंग सोलंकी यांनीही शौर्य गाजवीत वीरगती पत्करली. अतिरेक्यांच्या हल्याची ही योजना पाकिस्तानी स्पेशल सर्विस ग्रुप (एस. एस. जी. )च्या, भारतात घुसखोरी केलेल्या एका अधिकाऱ्याने आखून दिली होती असं म्हटलं जातं!

१९ मे, १९६९ रोजी जन्मलेले मनजीत सिंग ६ ऑगस्ट, १९९९ रोजी, वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी हुतात्मा ठरले! महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम शरीरसौष्ठवपटू, मिस्टर पंजाब, मिस्टर जालंधर या स्पर्धांत सहभागी होते. कारगिल युद्धाच्या धामधुमीत कॅप्टन मनजीत सिंग यांचे हे बलिदान काहीसे दुर्लक्षित राहिले असल्याची शक्यता आहे. त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले! 

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “सुखाचे गुंफलेले काही क्षण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “सुखाचे गुंफलेले काही क्षण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

▪ कोकिळेच्या मधुर स्वराने आलेली जाग

▪ आलं घातलेला वाफाळणारा चहा

▪ अंगणातला प्राजक्ताचा सडा,

▪ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच हातात पडलेला पेपर,

▪ अवीट गोडी असलेलं… लताचं – “सुनो सजना पपीहे ने कहा सब से पुकारले के… “,

▪ लिंबू पिळलेला आणि वरुन साजूक तूप घातलेला गरम गरम वरण भात

▪ पुलंचं पुस्तक, त्यांचं पेटीवादन… त्यांचं कथाकथन,

▪ आशाच्या हुकमी आवाजातलं – ” जाईए आप कहा जाएंगे…, “

▪ बिस्मिल्लांचे सनईचे सूर,

▪ सुधीर फडके यांचं “धुंदी कळ्यांना …” भावगीत

▪ सोनचाफ्याची फुलं

▪ अगदी आपल्याला हवी तशी बनलेली कॉफी

▪ थोडीशी तिखट भेळ, गरम भजी, चुलीवरची भाकरी, गरम हुरडा आणि चटणी

▪ रातराणीचा सुगंध,

▪ थंडीत खाल्लेलं टेंडर कोकोनट,

▪ गाण्याच्या मैफिलीत जागवलेली पौर्णिमेची रात्र,

▪ पहाटे दिसलेली शुक्राची चांदणी

▪ अचानक नजरेला पडलेला भारद्वाज

▪ आपण लावलेल्या गुलाबाला आलेली पहिली कळी

▪ दवांत न्हाऊन निघालेली मोगऱ्याची फुलं …

 

सुख सुख म्हणतात ते हेच…

… आणखी काय पाहिजे… छोटी छोटी सुखं शोधाल तर जीवन जगाल !

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्या नकळत्या वयापासूनच मनात रूजत गेलेला ‘त्या’च्या अस्तित्वाबद्दलचा विश्वास नंतरच्या असंख्य अनुभवांमुळे अधिकाधिक दृढ होत गेलेला आहे आणि माझ्या स्वेच्छानिवृत्तीनंतरच्या काळातही वेळोवेळी मला जाणवत राहिलेला त्याचा अलौकिक स्पर्श माझं जगणं अधिकच अर्थपूर्ण करतो आहे!

त्या सगळ्याच अनुभवांबद्दल सविस्तर न लिहिता त्यातले प्रातिनिधिक ठरतील असे दोन अनुभव मात्र या संदर्भात मला आवर्जून सांगावेसे वाटतायत.)

पुण्याच्या ‘क्वेस्ट टूर्स’ तर्फे २०१६ साली आम्ही नॉर्थ ईस्टच्या ‘सेव्हन सिस्टर्स’ टूरला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. प्रवास कालावधी २१ दिवसांचा. सहप्रवासीही आमच्यासारखेच प्रवासाची आवड असलेले. पहिल्या दिवशी परस्परांच्या औपचारिक ओळखीचा कार्यक्रम. नंतर अल्पकाळातच त्या ओळखी मनमोकळ्या गप्पांमुळे अधिकच घट्ट झालेल्या. पहिल्या दहा दिवसांचा एक टप्पा पूर्ण होऊन आता नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोराम ही स्थळे बाकी होती. आमचा पुढचा मुक्काम होता नागालॅंडसाठी. त्याआधीचा ‘काझीरंगा’ अभयारण्याजवळ असलेल्या एका हाॅटेलमधील आमच्या वास्तव्यातला तो अखेरचा दिवस होता.

त्यादिवशी चेक आऊट करून आम्ही नागालॅंडला निघालो आणि अचानक दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं. मग तोवरचा आमचा आनंद, उत्साह सगळा नासूनच गेला. कारण ध्यानीमनी नसताना नागालॅंड बाॅर्डरच्या अलिकडे असलेल्या चेकपोस्ट जवळ आमची टुरीस्ट बस अडवली गेली. नागालॅंडमधे दोन दिवसांपासून कांही मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं ज्याला नेमकं आजच अचानक हिंसक वळण लागलं होतं म्हणे. पाठोपाठ नुकतेच दोन बाॅंबस्फोटही झाल्याने १४४ कलम जाहीर होऊन संचारबंदीची घोषणा झाली होती. त्यामुळे पुढे अर्थातच ‘नो एंट्री’! नाईलाजाने बस परत फिरली. आम्हाला पुन्हा आधी चेक आऊट केलेल्याच हाॅटेलवर घेऊन आली आणि अखेर उर्वरीत दहा दिवसांची टूर रद्द होऊन सर्वांची परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली.

अचानक असं विघ्न येऊन टूर अर्धवट सोडून घरी परत फिरावं लागल्याने आम्हा सर्वांचाच विरस झाला पण त्याला पर्याय नव्हता. कदाचित हेच हिंसक वळण आणि संचारबंदी आम्ही नागालँडमधल्या हॉटेलमधे चेकइन केल्यानंतर उद्भवली असती तर? त्या परिस्थितीत याहीपेक्षा भयंकर असं कांहीही घडू शकलं असतं. परिस्थिती अनिश्चित काळापर्यंत चिघळलीही गेली असती आणि आम्ही बंद दाराआड तिथं अडकून पडलो असतो. त्यापेक्षा हे बरं म्हणत आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय कुठे होता? माझ्यासाठी मात्र ते तेवढंच असणार नव्हतं. मी ट्रीप अर्धवट टाकून असं परत यायची वेळ आलीच नसती तर त्यामुळे पुढच्या आयुष्यभराचं सगळंच स्वास्थ्य मी हरवून बसलो असतो असं वाटायला लावणारं एक आक्रित तिथं घरी माझी वाट पहात होतं! मला घरी जाईपर्यंत त्याची कल्पना नव्हती एवढंच!

आम्ही मधेच कां परत येतोय ते तिथून निघाल्यानंतर घरी मोघम कळवून ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही रात्री लवकर घरी पोचल्यावर सलिल/अनघाशी आधी जुजबी चर्चा झाली ती त्यासंबंधीच. पण कां कुणास ठाऊक ते दोघे नेहमीसारखे मोकळे वाटत नव्हते. जेवणं आवरून आम्ही दोघे बॅगा आवरायला आमच्या रूममधे आलो तसे पाठोपाठ सलिल/अनघाही आले.

” बाबा, तुम्ही टेन्शन घेणार नसाल तर एक सांगायचंय. ” सलिल म्हणाला.

” असं कां विचारतोयस? काय झालंय? “

“कोल्हापूरहून उदयदादाचा परवा फोन आला होता. पुष्पाआत्याबद्दल. “

“कां रे? पुष्पाताई बरी आहे ना…? ” हे विचारतानाही माझा आवाज थरथरतोय हे लक्षात येताच मनात येऊ पहाणाऱ्या कुशंका मी झटकून टाकल्या…

उदय माझ्या पुष्पाताईचा मुलगा. काळजी करण्यासारखं कांही असल्याशिवाय तो असा फोन करणं शक्यच नव्हतं.

“सांग ना,.. काय झालंय? ”

सलिलनं सांगितलं ते ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. पुष्पाताईचं डाव्या हाताच्या अंगठ्याजवळचं बोट खूप दिवसांपासून दुखत होतं. अलिकडे त्या बोटाला सूजही येऊ लागली म्हणून लगेच ऑर्थोपेडिकला दाखवलं. ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंटनंतरही बोटाचं इन्फेक्शन वाढतच गेलं. त्या बोटाच्या हाडाचा भुगा होऊ लागलाय हे लक्षात आलं आणि मग नाईलाजाने ते बोट कापायचा निर्णय झालाय. परवा सोमवारी कोल्हापूरला आॅपरेशन करायचं ठरलंय. सलिलने सांगितलं त्याचा हा सारांश.

ऐकता ऐकता मी गंभीर झाल्याचं लक्षात येताच सलिल म्हणाला,

“बाबा, जवळच्या बोटांपर्यंत इन्फेक्शन पोचू नये म्हणून हे आॅपरेशन आवश्यक आहे म्हणालेत डाॅक्टर. आत्ता नऊच तर वाजतायत. आत्या अजून झोपली नसेल. तुम्ही आत्याशी फोनवर बोला हवंतर. तुम्हा दोघांनाही बरं वाटेल. “

” नको. मी उद्या सकाळी लवकरच कोल्हापूरला जाऊन समक्षच भेटतो तिला. तरच माझं समाधान होईल… “

मी वरवर शांतपणे म्हणालो खरं पण रात्रभर माझ्या डोळ्याला डोळ्या नव्हता. आम्हा सर्व लहान भावंडांसाठी तिच्या कोवळ्या वयापासून परोपरीने झटणाऱ्या आमच्या या बहिणीचं माझ्या आयुष्यातलं स्थान ती अशी संकटात असताना मला नव्याने जाणवलं! हे दुखणं आणि ऑपरेशनचा निर्णय सगळं हू़ की चू न करता नेहमीच्याच अतिशय शांत आणि धीरोदात्तपणानं तिनं स्वीकारलं असेलही कदाचित पण मलाच ते स्वीकारता येईना. ट्रीप अर्धवट सोडून इथं आलो म्हणून हे आपल्याला आधीच सगळं समजलं तरी. एरवी ट्रीप निर्विघ्नपणे पूर्ण झाली असती, दहा दिवसांनंतर आपण आलो असतो, तर तिचं बोट कापून टाकलेला पंजाच पहावा लागला असता. नुसत्या कल्पनेनेही माझ्या अंगावर सरसरून काटाच आला! पण हे आधी आपल्याला समजून उपयोग काय? आताही वेगळं काय होणाराय? मी तिचं बोट थोडंसं वाचवू शकणाराय? उघड्या डोळ्यांनी पहात रहाण्याशिवाय काय करु शकतो मी?? अशाच सगळ्या नकारात्मक विचारांनी मन अधिकच अंधारून आलं. त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी स्वस्थता नव्हतीच. मी कांहीतरी करायला हवं होतं पण कांहीच करू शकत नव्हतो…! मनाच्या त्या असहाय, हतबल अवस्थेत प्रवासाने थकलेलं शरीर शांत झोपेसाठी आसुसलेलं पण मनात मात्र हे सगळे उलटसुलट विचार ठाण मांडून बसलेले. अर्धवट ग्लानी, अर्धवट जागेपण याच अवस्थेत माझी घुसमट वाढत चालली. त्यातच रात्र उलटली तरी मिटल्या नजरेसमोरची असंख्य काटेरी प्रश्नचिन्हं बोचतच राहिलेली! आणि.. आणि.. अचानक त्या प्रश्नांचा गुंता दिसेनासा होत अगदी पुसटसा असा एक चेहरा माझ्या मिटल्या नजरेसमोर क्षणभर तरळून अलगद विरून गेला न् मी शहारलो. दचकून जागा झालो. उठून बसत अलगद डोळे उघडले तेव्हा पहाटेचे ४ वाजून गेले होते. मन मात्र माझ्या मिटल्या नजरेसमोर क्षणभर तरळून गेलेल्या त्या चेहऱ्याभोवतीच घुटमळत राहिलं… आणि… आणि अचानक ओळख पटली! .. ते.. ते.. डाॅ. चंद्रशेखर परांजपेच.. हो… नक्कीच. पण मग माझ्या मनातल्या घुसमटीचा अर्थाअर्थी यांच्याशी काय संबंध? असंही क्षणभर वाटून गेलं आणि दुसऱ्याच क्षणी त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यासारखा एक आशेचा किरण मला स्वच्छ दिसू लागला..!

यातून कांहीतरी चांगलंच निष्पन्न होणार असेल. नक्कीच. पण कसं? हे सगळे माझ्या मनाचे खेळच तर नसतील? पण परांजपे डाॅक्टरांचा विचार अलिकडे कणभरसुध्दा मनात नव्हता मग भास म्हंटलं तरी तो परांजपे डाॅक्टरांचा चेहराच कां?? …

हा.. हा ईश्वरी संकेत तर नसेल? हा प्रश्न मनात उभारला आणि तोच मला मी याक्षणी काय करायला हवं त्याची नेमकी दिशा दाखवून गेला. आत्ताच्या माझ्या अस्वस्थतेचं कारण ठरलेल्या ताईच्या प्राॅब्लेमबद्दल सगळं मनापासून बोलून मन मोकळं करायला डॉ. परांजपेंखेरीज माझ्यासाठी दुसरं होतंच कोण?

डाॅ. परांजपे आमचे फॅमिली डॉक्टर. शांत. हसतमुख. अभ्यासू. हुशार. आणि विश्वासू! त्यांना पिढीजात चालत आलेला वैद्यकीचा वारसा तर मिळाला होताच शिवाय त्यांचं वेगळेपण म्हणजे त्यांनी आयुर्वेद(एम्. डी.) नंतर एम्. बी. बी. एस्. पदवीही प्राप्त केली होती. त्यामुळे आयुर्वेदीक औषधांचाच नव्हे तर गरजेनुसार अॅलोपथीचा उपयोगसुध्दा करु शकणारे डाॅ. परांजपे हे आमच्या माहितीतलं अपवादात्मक उदाहरण होतं! त्यांच्याशी बोलून निदान मनावरचं ओझं हलकं तरी होईल असं वाटलं आणि मी लगेच डाॅ. परांजपेना फोन करून त्यांच्या भेटीची तासाभरानंतरची वेळ ठरवली.

त्यांच्याकडे जाण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा मनातला अंधार दूर करणारा त्यांच्या रुपातला तो आशेचा किरण त्या प्रकाशवाटेवर माझी सोबत करीत होता..! !

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”उंबरठा” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “उंबरठा” ☆ संध्या बेडेकर ☆

माझं बालपण एका सुसंस्कृत लोअर मिडल क्लास परिवारात गेलं.

छान होते ते दिवस. आम्ही चार बहिण भाऊ. अगदी सामान्य परिस्थिती, सामान्य घर, सामान्य राहणीमान. पण घरातील नियम मात्र त्या मानानं बरेच होते. घराच्या आतले आणि घराच्या बाहेरचेही

*उंबरठा* के इस पार और उस पार के भी. ***

कसं वागायचं? कसं रहायचं? स्वतः ला कसं सांभाळायचं? काय बोलायचं? सांगायचं? कोणाशी बोलायच? कोणाशी नाही? कपडे कसे घालायचे? अंधार व्हायच्या आधी घरी यायचं. हे बाळकडू (नियम) आम्हाला मिळालेले. त्यात मी मुलगी म्हणून चार जास्तीचे नियम होतेच.

अभ्यासाकडे विशेष लक्ष असायचं, कारण या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एकच निश्चित मार्ग म्हणजे चांगले शिक्षण. त्यामुळे नियमित अभ्यास हा एक प्रमुख नियम होता.

आमच्यावर घरच्यांचीच काय? शेजारी पाजाऱ्यांची पण नजर असायची. त्यांना पण आम्हाला रागवायचा हक्क होता. शाळेतील प्रत्येक गोष्ट घरापर्यंत सहजच पोहचत असे… 

उंबरठा म्हणजे लक्ष्मण रेषा होती.

त्यावेळेस या सर्व गोष्टींबद्दल काही वाटलं नाही. आजूबाजूला सर्व माहोल तसाच होता. आमच्या सारखेच सर्व. Lower middle class चे आमचे शेजारी.

अगदी चाळ वातावरण नसलं म्हणजे एकदम एकदुसऱ्याच्या घरात डोकावत नसलो तरी, सर्वांना आजूबाजूच्या बऱ्याच बातम्या माहीत असतं.

आजच्या पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची सामाजिक व्यवस्था, त्यात मराठी, अजून भर म्हणजे लोअर मिडिल क्लास स्टेटस म्हणजे काहीही करायच्या आधी *लोक काय म्हणतील? * हा million dollars प्रश्न उभा राहात असे. आपल्यापेक्षा लोकांचा विचार जास्त होत असे. समाजाच्या नियमांविरूद्ध जायची हिम्मत नव्हती. त्यावेळेस ही स्मार्ट श्रीमंत लोक होतेच त्यांना प्रथम भेटण्याचा अनुभव आम्हाला कोॅलेजमध्ये आला. त्यांच्या मते आम्ही *बेहेनजी* कैटिगरी चे होतो.

… बरे असो.

 तसंही घरची सामान्य परिस्थिती बघता विशेष काही करायचा स्कोप नव्हताच. जेमतेम पैसा त्यामुळे जेमतेम राहणीमान. आजूबाजूला तसेच सर्व होते, म्हणून वाईटही वाटत नसे. घरी आम्ही मजेत रहायचो, प्रश्न वगैरे विचारायची पद्धत नव्हती.

My word is final. मैने जो कह दिया सो कह दिया।असा अलिखित नियमच होता. ं

फॅशनच्या नावाखाली असं काही खूप सांगण्यासारख काही विशेष नाही. वर्षातून एखादा सिनेमा, एखाद वेळेस हॉटेलिंग एवढीच काय ती चंगळमंगळ. वर्षातून दिवाळीचा एखादा ड्रेस वगैरे. कपडे च जास्त नसायचे, म्हणून आता सारखं कपडे ओसंडून आलमरीतून खाली पडतायेत असं वगैरे कधीच झालं नाही.

आजची मुलं हे ऐकून चकितच होतील नाही का? – – 

– – सकाळी लवकर उठायचं? संध्याकाळी सातच्याआधी घरी यायचं? कुठे जातो? आणि केंव्हा घरी येणार हे सांगूनच बाहेर पडायचे. व्यवस्थित कपडे घालायचे, म्हणजे पूर्ण अंग झाकलेले. मुल मुली एकत्र जातायेत ते तर.. बाप रे! ! अशक्यच.

बापरे! म्हणजे किती कंट्रोल हा? म्हणजे हे घर आहे की जेल? काय समजायचं?

आता अशा सूचना आज मुलांना दिल्या तर मुलामुलींचा स्वतः चां आई वडिलांबरोबर डायव्हर्सच होईल बहुतेक.

 

आजकाल कपड्यांबद्दल काय बोलायचं? (जेवढे फाटके तेवढे छान,), महागडा मोबाईल, रात्री बेरात्री घरी येणे, बॉयफ्रेंड तर मस्टच आहे, त्याशिवाय फ्रेंड सर्कल मध्ये value च नाही. Status च नाही. हे सर्व स्मार्टनेस चे पॅरामीटर्स आहेत.

खरं तर आता आपल्याला पण असं बघायची सवय झाली आहे. बघताना त्रास होतो. स्वतःच्या मुलांबरोबर बोलायची आईवडिलांची किती हिम्मत आहे? आणि किती मुले सहज ऐकतात? माहित नाही… मुलामुलींचा एकत्र गृप, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सहज गप्पा मारणं, एकत्र पिकनिक, हॉटेलिंग या सहज घडणाऱ्या गोष्टी झाल्या आहेत. खूपदा बघायला, पचायला जड जात पण मुलांना कसं सांगायचं? हा एक मोठा प्रश्न बहुतेक प्रत्येक घरी असावा असं वाटतं.

 

आजकाल मुलांना रागावणे मारणे बंदच आहे. म्हणजे अगदी अमेरिकेसारखी परिस्थिती अजून आलेली नाही की मुलं लगेच 911 वर फोन करतील. पण एकुलत्या एक मुलाला मारणं बरोबर नाही. नाही का? कुठे बिथरला तर? मुलं आईवडीलांना घाबरतात, असं वाटतं नाही. याउलट आई वडिलच मुलांना घाबरतात की काय अस वाटत? आता सायकॉलॉजी बदलली आहे. *Friendly relations* या थीमवर सर्वच नाती आहेत.

– म्हणजे एखाद्या मुलीला *ए राजू लवकर ये* असा आवाज देताना ऐकलं की ती मुलाला बोलवतेय? की नवऱ्याला? हे पटकन कळत नाही.

 

आता सर्वच समीकरणे बदलली आहेत.

Middle class ही बराच स्मार्ट झाला आहे. थोडा जास्तच. म्हणजे जे, जेवढ आहे/नाही, त्यापेक्षा जास्त दाखवायचा प्रयत्न फक्त मुलच नाही, तर सर्वच करतायेत.

 

– – जग बदलत आहे. आपल्याला ही बदलावच लागेल. पण दिशा चुकतेय, अस वाटतय. नवीन जगातील काय घ्याव आणि काय नाही? हे समजत नाहीये.

फक्त काय आणि किती? मनाचा आणि घराचा उंबरठा लक्षात ठेवल्यास बरं होईल. शिस्त मग ती वागण्यात, बोलण्यात, पैसे खर्च करण्यात किंवा फॅशन च्या नावाखाली, स्मार्ट नेस, modernization च्या नावाखाली किती आणि कुठे थांबायचे, हे वेळेवर कळलं तर बरं होईल. सध्याची विस्कळीत झालेली सामाजिक स्थिती कदाचित सुधारेल… म्हणजे young generation सुसाट सुटली आहे. आणि Seniors confused आहेत.

 

प्रत्येक 5 वर्षांत समाजात बदल होतातच. पण इतक्यात हा बदल खूप जाणवतोय. *मानसिक तब्येत* बघून तर भीती वाटतेय. * स्वातंत्र्य * च्या नावाखाली वागण्या बोलण्याची पातळी अजून किती खाली जाईल? माहित नाही.

भारतात राहून अमेरिकन्स सारख वागताहेत. आणि जग म्हणे भारताकडे बघतय. खरय का?

आम्हा जेष्ठांना आता खूप कठीण झालय. आम्ही आयुष्यात खूप पेपर सोडवले. खूप परीक्षा दिल्या. आतापर्यंत छान पास होत होतो आम्ही. आम्ही भावनांचा अभ्यास केलाय, पण इतक्यात सर्व प्रश्न पत्र व्यवहारांचे येत आहेत. तेथे आमची गडबड होतेय.

 

हे चतुर युग आहे. जोपर्यत आपली यात्रा पूर्ण होत नाही, तोपर्यंत उतार चढाव बघण आलच.

तेंव्हा कमी आणि मोजक बोलायच. आणि आपला मान जपायचा. कुठं मुकं, कुठं बहिर, कुठं आंधळ व्हायच हे आता लक्षात आल. मी स्वतःच माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधलय.

मला कुठेतरी वाचलेल एक छान वाक्य आठवल, •••

 

जिंदगी परिवर्तनो से ही बनी है।। किसी भी परिवर्तन से घबराए नही ।उसे स्वीकार कीजिए। । कुछ परिवर्तन आपको भी उन्नति का नया मार्ग दिखायेंगे, आपकी सुप्त इच्छांए पूर्ण करने का अवसर देंगे.

 

आयुष्याचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येतील, तस वळावच लागेल.

फक्त प्रत्येक odd situation मध्ये मनाच्या उंबरठ्यावर उभं राहून शांतपणे विचार करायचा.

ठरलं तर मग…..

… नवीन जगात यात्रा करायला मी आता पूर्णपणे तयार आहे.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काय एक एक माणसे असतात! – लेखक : नितीन मांडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

काय एक एक माणसे असतात! – लेखक : नितीन मांडे ☆ प्रस्तुती :  गौरी गाडेकर

काय एक एक माणसे असतात!

 – – वाचाच!

मागे असेच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो!

अचानक एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले! संस्कृत दासबोध! अरे बापरे!

प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद! कसं शक्य आहे?

हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरेच तो एक अति उत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा! त्वरीत गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला व स्कॅन करविला! लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला!

आता आली का पंचाईत! त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा?

समर्थांची प्रार्थना केली मनोमन… अणि दिवस पुढे सरले.

नाव पक्के लक्षात होते लेखकांचे, “राम वेळापुरे”… रामशास्त्री… असो. समर्थेच्छा!

 

वर्षभराने असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी,

बेरकी डोळे, पाय गोल झालेले त्यामुळॆ वजनकाट्यासारखी डौलदार चाल!

त्यात संघाची चड्डी घातलेली त्यामुळॆ काड्यामोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे…

म्हातारा घळ झाडीत होता. उत्कंठेने त्यांचेकडॆ पाहात पहात जवळ जाताच डोके खाजवीत उभा राहिला!

एक डोळा जवळपास मिटलेला व एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला अशा अवस्थेत खेकसला! “कोण रे तु? इथं कुठं वाट चुकलास? “

मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलंय म्हणाला… जा पळ घरी… इथं काय मिळणार तुला?

जा लग्न कर, संसार कर, पोरंबाळं होऊदेत, गाडी बंगला घे, आईबापाला सुख दे, इथं काय ठेवलय दगडं आणि माती!

मी म्हणालो, इथंच तर खर सुख आहे बाबा! हे सर्व असूनही इथं का यावसं वाटतं मग?

बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला! आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, अस्सं! ! ! बर मग जा आत!

मी दर्शन घेऊन परत आलो! म्हाता-याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती!

मी परतून विचारलं, “बाबा आपलं नाव काय? “

“या शेणाला राम वेळापुरे म्हणतात! ” “वेळापुरे? श्याम? ” “अरे श्याम नाही राम! “

आणि अचानक माझ्या डोक्यात ट्युब पेटली! अरे बापरे! रामशास्त्री वेळापुरे? संस्कृत दासबोधाचे कर्ते? मी चटकन विचारले, ते संस्कृत दासबोध कर्ते?

“तिथं तिथं… ” समर्थांकडे हात करीत ते म्हणाले, “तिथंच बसलेत त्या दासबोधाचे कर्ते! मी साधा मास्तरडा रे! मला काय दगड कळतय संस्कृतातलं? यांची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक… त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही! “

मती सुन्न झाली! इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त? इतका निगर्वी? इतका अनासक्त?

नंतर त्यांनी सांगितले की येणा-या काळात संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे! तेंव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय! आणि हे खरे आहे बरे! संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहुन अधिक जर्मनीत आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे!

बाबा बेलसरेंकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखविताच त्यांनी सांगितले घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा! तरच कार्य सिद्धीस जाईल! आणि खरोखरीच पुढची पाच वर्षे रामशास्त्री घळीत बसून राहिले व त्यांनी हा अवघा ग्रंथ एकटाक लिहून काढला! कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून! कठीण शब्दांचे अर्थ त्यांना समर्थ आपोआप स्फ़ुरून देत असत! काय चमत्कार आहे हा! वाचून पहा ग्रंथ! खरोखरीच अप्रतीम झाला आहे!

मग त्यांची आयतीच परवानगीही मिळाली आणी ग्रंथ दासबोध. कॉम वर आला!

ते म्हणाले, “अरे माझी मुर्खाची परवानगी कसली मागतोस? हे सर्व ज्ञान समर्थांचे! त्यांना विचार आणि दे टाकून! माझे काय आहे त्यात! “

डोळ्यात पाणी आले… पायावर डोके ठेवायला गेलो तर जोरात ओरडले! “अरे अरे अरे! सांभाळ! डोक्याला शेण लागेल तुझ्या! “

मला काही कळॆना, बुचकळ्यात पडून उभा राहिलो, तर म्हणाले, “मघाशी म्हणालो नाही मी? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात? मग माझ्या पायावर डोके ठेवलेस तर शेण लागेल ना कपाळकरंट्या! ” आणि खो खो खो हसू लगले!

त्यांची समर्थांप्रती दृढ निष्ठा, श्रद्धा, आत्मनिवेदनभक्ती, आणि टोकाची अनासक्ती, विरक्ती, निरीच्छा पाहून पुन्हा १००० वेळा मनोमन दंडवत घातले!

अशी माणसे आजही निर्माण होताहेत यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचे यश सामावलेले आहे!

हा संस्कृत दासबोध www. dasbodh. com वर नक्की वाचा! आवडॆल तुम्हाला!

 

लेखक : नितीन मांडे 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदिर…’  लेखक : ” रामभक्त ” प्रशांत कुलकर्णी ☆प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदिर…’  लेखक : ” रामभक्त ” प्रशांत कुलकर्णी ☆प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

लोणार सरोवराच्या पाण्यापाशी जाताना उंचावरून एका पायवाटेने खाली उतरत यावं लागतं… हा रस्ता नागमोडी वळणाचा आणि जंगलातून जाणारा आहे. याचं पायवाटेवर जरासं आडवाटने बाजूला काही अंतर चालतं गेलं की डाव्या बाजूला थोडंसं उंचावर हे एक अदभूत आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असे श्रीरामाचे मंदिर आहे. मोडतोड आणि अत्यंत दुर्लक्षित झालेलं हे मंदिर अजूनही त्याच्या पुराणकालीन वैभवशाली श्रीमंतीची साक्ष देत उभे आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त श्रीरामाची मूर्ती आहे, सहसा श्रीराम यांची एकटी मूर्ती कधीही नसते. श्रीरामाच्या एका बाजूला बंधू लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला पत्नी सीता उभे असतात. अजून खास म्हणजे श्रीराम यांची ही मूर्ती निशस्त्र अवस्थेत आहे आणि हे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीरामाच्या हातात कायम धनुष्यबाण दाखवले जाते जे या मूर्तीत नाही.

यामागे एक खास कारण आहे. श्रीराम वनवासात असताना येथे या सरोवराच्या बाजूला वास्तव्यास असताना त्यांचे वडील दशरथ यांचे निधन झाले. श्रीरामांनी आपल्या वडिलांचा दशक्रियाविधी येथून वीस किमी अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या काठी मेहकर येथे केला. तेथेच श्री बालाजी यांची खास मूर्ती आहे त्यावर मागच्या भागात लिहिले आहेच…

श्रीराम यांना आपल्या वडीलांचे पिंडदान करायचे होते आणि ते वनवासात असल्याने त्यासाठी अट अशी होती त्या विधीसाठी श्रीराम निशस्त्र असायला हवेत आणि त्यांच्याबरोबर कोणी स्वकीय असायला नको. हेच पिंडदान श्रीरामांनी या सरोवराच्या बाजूला केले आणि त्याचं ठिकाणी सध्याचे हे निशस्त्र श्रीरामाचे मंदिर आहे.

या मंदिरात एक अचंबित करणारी गोष्ट अशी या ठिकाणी तुम्ही गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर उभे राहून हात जोडून नमस्कार करायला उभे राहिलात की तुम्हाला श्रीरामांच्या मूर्तीच्या एका बाजुला लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला सीता मातेचे दर्शन होते. हे खूपच आश्चर्यकारक आहे. त्यामागे एक खास कारण आहे. या मंदिरात सभामंडपात दगडी सुबक नक्षीकाम केलेले बारा खांब आहेत, जे एका विशिष्ट रचनेत मंदिरात बसवले गेले आहेत. चार मोठे खांब सभामंडपात मध्यभागी आणि चार छोटे खांब उजव्या बाजूला आणि चार डाव्या बाजूला. हे खांब अशा रितीने बसवले गेले आहेत की ज्यावेळी आपण मूर्ती समोर हात जोडून उभे असतो त्यावेळी प्रकाशाची किरणे विशिष्ट कोनातून परावर्तित होईन आपली स्वतःची सावली श्रीरामाच्या मूर्तीच्या बाजूला अशा प्रकारे पडते की आपल्याला त्या मूर्तीच्या एका बाजूला सीतामाता आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत हा भास निर्माण होतो. मी हे प्रत्यक्ष बघितल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले. जरा विचार करा त्यावेळी आजच्या सारखे कॅलक्युलेटर, संगणक, दुर्बीण, होकायंत्र असे कोणतेही अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध नसताना हे त्यांनी कसे निर्माण केले असेल? अहो एक दोन सेंटीमीटर जरी खांबांची लांबी, रुंदी, ठेवण बदलली तरी ही विस्मयकारी गोष्ट साकारणे केवळ अशक्य आहे. यावरून त्याकाळी विज्ञान किती प्रचंड ताकदीचे होते याची प्रचिती येते…

एवढंच नाही तर या मूर्तीच्या समोर उभे राहून तुम्ही आपले दोन्ही हात डोक्यावर सरळ उभे नेऊन डावीकडे उजवीकडे बाय बाय केल्यासारखे हलवले तर श्रीरामांच्या मस्तकाच्या वर मागच्या भिंतीवर या आपल्या हातांच्या सात सात सावल्या पंखा घालत असल्यासारख्या हलताना दिसतात. हे दोन्ही प्रकार मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. असे अजूनही खास वैशिष्ट्य या मंदिरात आढळले…

यावरून जरा विचार करा की आपले पूर्वज किती विद्वान आणि प्रचंड कलात्मक होते. त्यावेळेसची पाषाण शिल्पकला किती अफाट होती. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं हे भव्यदिव्य आहे, पण काळाच्या ओघात अक्षरशः नेस्तनाबूत होत आहे…

अरे हो अजून एक खास बाब अशी या मंदिरात होकायंत्र काम करत नाही. तिथे मंदिरात विश्रांतीसाठी खाली जमिनीवर बसलो असताना होकायंत्र काढून वेगवेगळ्या दगडावर ठेऊन पाहिलं तर त्या होकायंत्राची सुई दक्षिण उत्तर दाखवत नाही. वेगवेगळ्या दगडावर होकायंत्र ठेवलं की ती सुई भरकटत जाते पण स्थिर दक्षिण उत्तर होत नाही. आहे की गमतीशीर? … अर्थात यामागे शास्त्रीय कारण आहे…

या मंदिराची सध्याची अवस्था पाहून मन विषण्ण झालं… इतकं मोठं वैभव आपल्याकडे आहे याचा खरोखरचं अभिमान वाटतो…

लेखक : ” रामभक्त ” प्रशांत कुलकर्णी

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ जगातली सर्वात सुंदर नोकरी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

ब्रेकिंग न्यूज: मुलांनी शेवटी जगातील सर्वात सुंदर नोकरी शोधली आहे… ‘आजोबा’ होणे!

 

एका लहान मुलाला शाळेत निबंध लिहायला सांगितला होता: “माझी महत्त्वाकांक्षा”.

त्याने लिहिले — मला राष्ट्रपती व्हायचे नाही, मला डॉक्टर व्हायचे नाही, मला शास्त्रज्ञही व्हायचे नाही. यापैकी काहीच नको! माझी भविष्यातील महत्त्वाकांक्षा आहे — आजोबा होणे!

कारण आजोबा होणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे!

कारण माझे आजोबा —

 सकाळी उशिरा उठू शकतात,

 दुपारी शांतपणे झोपू शकतात,

संध्याकाळी टीव्ही पाहू शकतात आणि लवकर झोपू शकतात.

 कोणताही गृहपाठ नाही,

 उन्हाळ्याच्या सुट्टीचे कोणतेही असाइनमेंट नाही,

 आणि कोणतीही ट्यूशनसुद्धा नाही.

 जर काहीच काम नसेल, तर ते झाडाखाली बसून वाऱ्याचा आनंद घेऊ शकतात,

किंवा पार्कमध्ये जाऊन कोणासोबत तरी बुद्धिबळ खेळू शकतात.

 त्यांना हवा तितका वेळ ते व्हिडिओ गेम्स खेळू शकतात — कोणीही तक्रार करत नाही!

 सकाळी कॉफी, दुपारी चहा, रात्री वाईन — राजासारखे आनंदी जीवन.

बसमध्ये मोफत प्रवास,

आणि नशीब चांगले असेल तर कोणीतरी जागाही देते.

 हाय-स्पीड ट्रेन आणि चित्रपट — अर्ध्या किमतीत!

त्यांना जे वाटेल ते ते खाऊ शकतात — गरम पदार्थ जसे की कांदा भजी, राईस केक, सूप, ग्रील्ड सॉसेज आणि बरेच काही. थंड पदार्थांमध्ये आईस्क्रीम, पुडिंग, जेली, चीज — आणि त्यांना कोणीही थांबवत नाही (जोपर्यंत ते जास्त खात नाहीत).

 त्यांना आवडेल ते ते करू शकतात — गाणे, डान्स, पेंटिंग, पियानो किंवा ट्रम्पेट वाजवणे, गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगला जाणे!

 आणि खिशात पैसे असतील तर ते जगभर फिरू शकतात!

 आजोबा होणे खरोखरच खूप छान आहे!

प्रेरणा: खुद्द आजोबांनाही कदाचित माहीत नसेल की ते खरोखर किती आनंदी आहेत!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares