श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “दृढ निश्र्चयाचा महामेरू ” – इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

 – – आपल्या उदाहरणाने लाखो लोकांना स्फूर्ती आणि हिंमत देणारी ही एक सत्यकथा आहे.

1983 मध्ये मेरठ येथे जन्मलेल्या इरा सिंगला यांना जन्मतःच पाठीच्या कण्याच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्या हातांच्या हालचालींना काही बंधने आली होती. मात्र अशा अवस्थेतही त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कुठलीच वेगळी आणि विशेष वागणूक दिली नाही. आणि म्हणूनच त्या आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकल्या. शिवाय नंतर दिल्ली विद्यापीठाची m. b. a. ची पदवीही मिळवू शकल्या, आणि लगेचच कॅडबरी इंडिया या नामांकित कंपनीत strategic manager म्हणून व कोकाकोला कंपनीत मदतनीस म्हणूनही त्यांनी काम सुरू केले.

2009 मध्ये त्यांनी I. A. S. होण्याचे ठरविले आणि 2010 मध्ये पहिल्या प्रयत्नातच त्या U. P. S. C. ची सिव्हिल सर्विस मधील परीक्षा यशस्वीपणे पास होऊ झाल्या.

त्यांना भारतीय महसूल विभागाची (Revenue Dept.) जबाबदारी देण्यात आली.. पण सरकारकडून, ‘शारीरिक दृष्ट्या असमर्थ’.. हा निकष लाऊन त्यांना नाकारण्यात आले.. सरकारतर्फे असे सांगण्यात आले की त्यांच्यातील गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आहेत.. एखादी गोष्ट ढकलणे.. ओढणे.. किंवा उचलणे या क्रिया त्या करूच शकत नाहीत, आणि म्हणून I. A. S. Officer म्हणून काम करण्यास त्या सक्षम नाहीत.

या गोष्टीचे त्यांना अतिशय दु:ख झाले. पण अतिशय निश्चयाने त्यांनी ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ या विशेष अर्धन्यायिक संस्थेकडे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध तक्रार नोंदवली. बराच काळ लोटला पण सरकार काही त्यांच्या भूमिकेत बदल करायला तयार नव्हते….. आणि आता इराही थांबायला तयार नव्हत्या…

… 2011 साली त्या पुन्हा यूपीएससी च्या परीक्षेला बसल्या आणि पासही झाल्या. या वेळी त्यांना रेल्वे विभाग देण्यात आला, पण पुन्हा त्याच शारीरिक व्यंगाच्या सबबीखाली यावेळीही त्यांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

2013 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेला बसल्या आणि अर्थातच पासही झाल्या. पण याही वेळी सरकारकडून पुन्हा तेच कारण दिले गेले. जगातील सर्वात कठीण असलेल्या एका परीक्षेत एक मुलगी तीन वेळा उत्तम गुणांनी पास होते, पण तिच्यातील शारीरिक व्यंगामुळे नोकरी करण्यास ती असमर्थ आहे हेच दरवेळी अधोरेखित केले गेले.. ही खरोखर फार खेदाची आणि तितकीच संतापजनक बाब आहे.. आणि याही वेळेस केंद्रीय न्यायाधिकरणाकडून त्यांना न्याय मिळाला नाही.

– – आता प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान 2014 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेस बसली. या वेळेस एक विशेष गोष्ट घडली… त्या नुसत्या पासच झाल्या नाहीत, तर संपूर्ण जगातल्या सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्या सबंध भारतात पहिल्या आल्या. आजपर्यंतच्या यूपीएससीच्या इतिहासात प्रथमच इतके जास्त गुण त्यांना मिळाले होते.. म्हणजे एकूण 2025 पैकी 1082 गुण ! 

… आता मात्र सरकारला त्यांचा पवित्रा बदलावाच लागला आणि इरा यांची अलीपुर, नवी दिल्ली येथे “सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट” म्हणून नेमणूक झाली. या नेमणुकीच्या पहिल्याच वर्षात त्यांनी जवळजवळ 340 बालमजुरांचे जीव वाचवले होते. त्यांना सक्तीने बालमजूर म्हणून पाठविले जात असताना इरा यांच्या सक्त आदेशानुसार त्यांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते…

आणि इथेच सरकारची खात्री झाली की IAS Officer ची जबाबदारी स्वीकारल्यावर त्या उत्तम काम करू शकतात… त्यांचे शारीरिक व्यंग कुठल्याही कामात अडसर ठरत नाही.

सध्या त्या अरुणाचल प्रदेशात अतिरिक्त सचिव म्हणून काम करताहेत. या शिवाय त्या भारत सरकारच्या न्याय आणि अधिकारी मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या मुख्य प्रतिनिधी म्हणूनही काम पाहत आहेत.

… या व्यतिरिक्त महिला व बाल संगोपन आणि नीती आयोग यांच्या मुख्य प्रतिनिधी, केंद्रीय निवडणूक मंडळाच्या सुलभ निवडणुकीच्या राष्ट्रीय मंडळावर प्रतिनिधी म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

अशा या जिद्दी आणि संयमी आणि प्रचंड बुद्धिमान असलेल्या इरा सिंघल यांनी तरुणांना केलेला उपदेश खूपच बोलका आहे.

त्या म्हणतात…

” तुमची स्वप्ने दुसरे कोणीतरी सत्यात उतरवून देईल याची वाट बघत कधीच थांबू नका.. त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील रहा “.

दृढ निश्चय आणि दुर्दम्य हिंमत यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हवे अशा IAS ऑफिसर इरा सिंघल यांची ही सत्य गोष्ट लाखो लोकांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.

इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद व प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted