कडकडीत उन्हात वाळवून ठेवलेले पदार्थ म्हणजे वाळवण. हे वर्षभराचं तोंडीलावणं असायचं.
“बबर्जी फाजील झाले की स्वयंपाक बिघडतो” ह्या म्हणीला गुंडाळून ठेवून चार पिढ्यांनी एकत्र येऊन केलेले हे पदार्थ अवीट गोडीचे असत. पूर्वी अचानक पाहुणे येत अशावेळी” पान संजगतं ” असं आई म्हणायची. पूर्वी ठराविक मोसमात ठरावीक भाज्या मिळायच्या. त्यावेळी वाळवणाचे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवायचे. सणावाराला हे तळण असल्याशिवाय नैवेद्य पुराच होऊ शकत नसे.
शकुनाच्या सांडग्यांनी सुरुवात व्हायची. उद्या कोणाकडे हे त्याच दिवशी ठरायचे. गव्हाच्या शेवया, कुरडया, बाजरीचे सांडगे, खारवड्या, पापड्या, तांदळाच्या सालपापड्या, खीच्चे, पापड, उडीद डाळीचे पापड, बटाटा चिप्स , वेफर्स कच्चा किंवा उकडून केलेला कीस, चकल्या, साबुदाण्याचे चीप्स, सांडगे, पापड्या, मूग डाळीचे सांडगे, वड्या, शिन्नी चे सांडगे, मिश्र डाळींचे सांडगे , कोहळा भेंडी कलिंगड यांचे सांडगे ” मिळून साऱ्याजणी” करत असत. वाळवण म्हणजे एक प्रकारचे गेट-टुगेदर असायचे. घरातील कर्त्या बाई चे नियोजन, आजीचे सुपरव्हिजन असे. लग्नाळू किंवा नवी नवरी शिकाऊ उमेदवार असत. बच्चे कंपनी “हे दे ते दे,” अशी हरहुन्नरी कामे करत. पुरुष मंडळी परीक्षक असत.
लग्न, मुंज असे मंगल कार्य ठरले की वाळवणाला वेगळे मांगल्य यायचे. सवाष्णींना बोलावून सुरुवात व्हायची. आई वडील व सासू-सासरे असलेली मुलगी मानाने बोलावून तिला रवा मैद्याचा” गणपती” बनवायला सांगत. त्याला सगळ्यांनी हळद-कुंकू अक्षता घालत.मगच इतर कामांना सुरुवात व्हायची. गव्हले, मालत्या, बोटवे, नखुले, काकडीच्या बिया असे शकुना चे पदार्थ तयार करायचे. हातावरच्या शेवया निगुतीने केल्या जायच्या. रुखवतासाठी शेवयांच्या तिपेडी वेण्या, रंगीत गव्हले, कुरडईच्या पिठाचे द्राक्षाचे घोस, गुलाब फुले वगैरे सुगरणीचे पदार्थ तयार होत.
हे सारं करताना गप्पाटप्पा, गाणी, कोडी यातून हास्य विनोद निर्माण होत. एकमेकींच्या सुखदुःखाचे वाटप होई. नवीन काही शिकायला मिळे.
आता सगळे विकत मिळते पण घरी केल्याचा आनंद व पुरवठा वेगळाच असतो.
उगारच्या चाळीतील अंगणात खाट टाकून त्यावर स्वच्छ पांढरे धोतर अंथरून घातलेले सांडगे, पापड , सांगलीला वेलणकर वाड्यात महिनाभर रंगलेला शेवयांचा सोहळा, सातारला तळवलकर वाड्यात अंगणात खेळीमेळीने केलेले वाळवण सारे सारे आठवले की मन भरून येते.
☆ सुस्वागतम् की स्वागतम्? – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆
हा अनुभव बारामतीतच नाट्यसंमेलनाच्या वेळी आला. त्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणून विद्याधर गोखल्यांच्या हस्ते कवी मोरोपंतांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले होते. ठरलेल्या वेळी गोखले, जब्बार पटेल वगैरे प्रतिमा पूजनासाठी सिद्धेश्वर मंदिरामागच्या मोरोपंत स्मारकाच्या जागेत आले. त्या वेळी तो जुना वाडा होता. मोरोपंतांच्या खोलीची नि बाहेरची सजावट करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले होते. मी बाहेर पताका वगैरे लावून रांगोळीने ‘सुस्वागतम्’ असा शब्द लिहून ठेवला होता.
गोखल्यांनी प्रतिमेचे पूजन केले. नंतर त्यांना ‘चार शब्द’ बोलण्याची विनंती केली गेली. गोखल्यांनी कवी मोरोपंतांबद्दल, स्मारकाच्या व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. पण त्यानंतर मात्र “रांगोळी छान काढली आहे, पण मराठीच्या शुद्धलेखनाची किमान मोरोपंतांच्या बारामतीत तरी हेळसांड होऊ नये”, असे शब्द ऐकवले.
रांगोळीत “सुस्वागतम्” हा एकच शब्द होता. त्यात काय चुकले हे मला कळेना. शिवाय गोखल्यांनी ‘चार शब्द’ बोलताना जाहीरपणे हे सांगितल्याने काहीशी अपमानकारक स्थिती झाली होती. शेवटी त्यांनीच खुलासा केला.
“सुस्वागतम् या शब्दाचे मूळ ‘ग’ या संस्कृतमधील धातूमध्ये आहे. त्याला व्याकरणाच्या नियमानुसार ‘तम्’ हा प्रत्यय लागून गतम् असा शब्द बनतो. गतम् शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आगतम्’ असा शब्द बनतो. त्या आगतम् शब्दाला ‘सु’ हा आणखी एक उपसर्ग लागून तो शब्द ‘स्वागतम्’ असा बनतो. एकदा ‘सु’ हा उपसर्ग लावल्यावर पुन्हा ‘सु’ लावून “सु सु” का करता? ” असे त्यांनी बोलून दाखवले.
त्या वेळी सगळ्यांच्या समोर चूक काढल्यामुळे गोखल्यांचा मनातून राग आला होता. पण पुढे त्यातूनच व्याकरणाचा अभ्यास कमी पडतो आहे, हे जाणवले. माझ्या शुद्धलेखनाबद्दल नि मराठीच्या भाषिक प्रभुत्वाबद्दल कौतुकाचे शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतात. त्याचे श्रेय कै. गोखल्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मराठी, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नि गुजराथी, कानडी, बंगाली, उर्दू वगैरे लिपी शिकाव्या वाटल्या. नाट्यसंमेलनाच्या वेळच्या या घटनेला आता निदान २५ वर्षे तरी झाली असतील. पण अजूनही व्याकरणाचा अभ्यास करावा वाटतो. हे सगळे गोखल्यांमुळे घडले. 🙂
– श्री अनिल कुमकर
संग्राहिका : सुश्री सुलु साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक अत्यंत म्हातारी बाई मंदिराच्या समोर बसून भीक मागत असे. एक महात्मा तिला म्हणाला तुझा मुलगा तर खूप मोठा आहे, खूप कमावतो आहे मग तू भीक का मागतेस?
म्हातारी म्हणाली, माझा नवरा कधीच मरण पावला आहे, माझा मुलगा परदेशात नोकरी करत आहे, जाताना मला खर्चाला काही रूपये देऊन गेला होता ते सारे खर्च होऊन गेले आता माझ्याजवळ काहीच पैसा नाही म्हणून मी भीक मागते.
महात्मा म्हणाला, तुझा मुलगा तुला काहीच पैसे पाठवित नाही का? म्हातारी म्हणाली काहीच पाठवित नाही पण दर महिन्याला एक रंगीत कागद पाठवतो तो कागद काय उपयोगाचा सारे कागद भिंतीवर चिकटवून ठेवले आहेत. महात्मा तिच्या घरी आला आणि पाहिले भिंतीवर साठ बॅंक ड्राफ्ट चिकटवून ठेवले होते. प्रत्येक ड्राफ्ट पन्नास हजार रूपयांचा होता. म्हातारी शिकलेली नसल्यामुळे तिला कळले नाही की आपल्या जवळ किती संपत्ती आहे.
महात्म्याने तिला त्याची जाणीव करून दिली की ती किती श्रीमंत आहे.
आमची अवस्था सुध्दा या भीक मागणाऱ्या म्हातारीप्रमाणे झाली आहे. आमच्या जवळ ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, महाभारत, गाथा आहेत. पण तरीही आम्ही विषयांची भीक मागत आहोत, सुखाची भीक मागत आहोत, दुःख भोगीत आहोत कारण हे सारे ग्रंथ फक्त घरात भिंतीवर कपाटात लावून त्यात सजवून ठेवले आहेत, त्यांचा कधी वापर करीत नाही, त्यांचा जर आपण वापर करू, अभ्यास करू, चिंतन करू, नाम घेऊ तर त्यांचा उपयोग होऊन आपले जीवन सुखी होईल.🙏
प्रस्तुती – श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग – ११ वाचन – २ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
एखाद्याच्या चरित्राच्या अभ्यासपूर्ण वाचनाने ती व्यक्ती खूप ओळखीची होऊन जाते, कळते. जवळचीच वाटायला लागते, तसंच, अनेक रुपांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करणार्या आणि मृत्युच्या क्षणापर्यंत आपली प्रतिष्ठा जपणार्या, नेपोलियन बद्दल विवेकानंदांना वाटत होते. विवेकानंदांच्या दृष्टीने नेपोलियन हा गगनाला भिडणारे उत्तुंग शिखर होते. तरुण वयात केलेल्या या वाचनामुळे नरेन्द्रला नेपोलियन ची भुरळ पडली होती.
तत्वज्ञान आणि ललित वाड:मय यांचा अभ्यास तर नरेंन्द्रने महाविद्यालयात शिकत असताना केला होताच. विद्यार्थी दशेत असताना तर त्याने हर्बर्ट स्पेन्सरचे ग्रंथ वाचून त्यावर आपल्या शंका व्यक्त करणारं एक पत्रच, या जगतविख्यात तत्वज्ञाला पाठवलं, त्यांचं नरेंद्रला उत्तर पण आलं आणि त्याच्या बुद्धी सामर्थ्याबद्दल कौतुक मिश्रित आश्चर्य पण वाटलं त्यांना. एव्हढंच काय कॉलेजला शिकत असताना नरेन्द्रने स्पेन्सर यांच्या ‘शिक्षण: बौद्धिक,नैतिक आणि शारीरिक’ या पुस्तकाचा ‘शिक्षा’ हा बंगाली भाषेत स्वैर अनुवाद केला होता.
नरेंद्रला साहित्याची मुळातच आवड होती. त्याच्याकडे प्रखर प्रज्ञा आणि उज्ज्वल प्रतिभा होती. त्यामुळे वैचारिक ग्रंथांप्रमाणेच त्याला अभिजात साहित्यही आवडत असे. संस्कृत, इंग्रजी आणि बंगाली भाषेतले उत्तम ग्रंथ आणि साहित्यकृती त्याने वाचल्या होत्या.’रामायण’ आणि ‘महाभारत’ यांची बंगाली भाषांतरे वाचली होती. शेक्सपियरची नाटकं, वाचली होती. रोमियो आणि ज्युलिएट, मिडसमर नाईट ड्रीम यांचे संदर्भ त्यांच्या व्याख्यानात येत असत.
अमेरिकेतल्या एका व्याख्यानात त्यांनी मिल्टन चे ‘पॅराडाइज लॉस्ट’वाचले असल्याचा उल्लेख केला होता. त्यातली सॅटानची व्यक्तिरेखा खूप आवडायची कारण ते व्यक्तिमत्व सामर्थ्यशाली दाखवले होते म्हणून. दुर्बलता त्यांना आवडत नसे. साहित्यकृतीत सुद्धा. इंग्रजी कविंमध्ये कवी बायरन आणि वर्डस्वर्थ त्यांचे जास्त आवडते होते.
बंगाली मधले बंकीमचंद्र चटर्जी, दीनबंधु मित्र, यांच्या कादंबर्या, ईश्वरचंद्र गुप्त यांच्या कविता, मायकेल मधुसूदन दत्त यांच्या कविता यांचा समग्र अभ्यास केला होता. स्वामी विवेकानंद जेंव्हा जेंव्हा भारतीय अध्यात्मावर भाषणे देत असत, तेंव्हा त्याची तर्कशुद्ध मांडणी आणि लालित्य त्यात दिसत असे. एखाद्या विषयाचा वरवर अभ्यास किंवा वाचन न करता त्याच्या मुळाशी जायचं हा त्यांचा उद्देश असायचा. त्यामुळेच मित्र मंडळींमध्ये जेंव्हा जेंव्हा निरनिराळ्या विषयांवर चर्चा घडून येत असत, तेंव्हा तेंव्हा नरेंद्र युक्तिवाद करताना त्याच्यात ठामपणा आणि आत्मविश्वास असायचा. अशा चर्चेत त्यांच्या पुढे कुणी टिकत नसायचे. प्रतिपक्षाला तो नामोहरमच करून टाके. जेंव्हा तुमच्याकडे त्या विषयाचे समृद्ध ज्ञान असते तेंव्हाच तुमच्याकडे हा आत्मविश्वास येतो. आणि असे ज्ञान वाचनाने, मननाने, योग्य दिशेने विचार केल्याने मिळते. सार्या जगाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद वाचनाने आणि अनुभवाने अतिशय समृद्ध होते. रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटलंच होतं की, “तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांकडे वळा” तेंव्हा सर्व वाचक आणि युवा पिढीने पण वाचनाने समृद्ध व्हावे, स्वामी विवेकानंद आणि भारतीय विचार समजून घ्यावेत आणि आयुष्याला दिशा द्यावी.
“आज मी औषधासाठी नाही आलेय डॉक्टर पण एक काम आहे तुम्ही सवड काढून एक दिवस आमच्या गावी व्याख्यानाला याला का आमच्या खेडेगावात मुलींना जरा आरोग् आणि क्षणाचे महत्व याबद्दल चार शब्द सांगाल का खूप खेडे आहे आमचे आणि फार गरज आहे मुलींना हे तुम्ही सांगण्याची मी विचार करून सांगेन म्हटले ती म्हणाली बाई याच आम्ही तुमची उतरायची छान करू व्यवस्था काळजी नका करू. गाडी आहे ना सरपंचाची आणि मी 24 तास असेन बरोबर मी हो म्हटले आणि ठरलेल्या दिवशी गेले पण गुंजे वाडी लाहोते बरेच लांब पण छान छोटेसे खेडेगाव होते.”
शाळेतच ठेवले होते माझे व्याख्यान मला वाटले त्याहीपेक्षा मुली चुणचुणीत हुशार आणि चौकस होत्या माझे व्याख्यान त्या मन लावून ऐकत होत्या त्यांना या खेड्यातून बाहेर पडून काहीतरी करण्याची खरोखरच इच्छा दिसत होती व्याख्यान झाले आणि समोर लक्ष गेले
समोर थोडासा ओळखीचा चेहरा दिसला माझ्यातही कितीतरी बदल केला असणार ना काळाने. मी त्या बाईना नीटसे ओळखले नाही या अरुणा ताई काळे बर का आमच्या येथे बँकेत ऑफिसर आहेत गेली 5 वर्ष इथे आहेत बर का खूप हुशार आहेत बाई आणि खूप मदतही करतात सगळ्यांना मला आता अरुणाची नीट ओळख पटली अरुणा हसली आणि म्हणाली
“एवढा वेळ लागतो हो मैत्रिणीला ओळखायला काय तू तरी. मी तर तुला पाहताक्षणीच ओळखले आहे तशीच आहेस अगदी चल ग, काही ही काय अरुणा तू।मात्र खूप बदललीस .कुठे कॉलेज मधली मॉडर्न बॉयकट असलेली बिनधास्त अरुणा आणि कुठे की पोक्त चष्मा लावलेली गंभीर बँक मॅनेजर.”
अरुणा म्हणाली “चल आता माझ्याच घरी.”
“सरपंच माझी मैत्रीण आता माझ्याच घरी नेणार हं।” सरपंच हसून बर म्हणाले
अरुणा चा फ्लॅट सुंदरच होता “अग त्यात काय बँकेने दिलाय गाडीही दिलीय बरं. जेवल्यावर
मस्त गप्पा मारुया”
“बाई, तू डॉक्टर झाल्याचे समजले आपल्या वाटा इंटर नंतर वेगळ्याच झाल्या अरुणा रागावणार नसलीस तर एक विचारू?”
“तुझे आणि श्रीरंग चे किती गाजलेले affair होते त्याचे काय झाले?”
“तुम्ही अगदी मेड फॉर इच आदर होतातच मग तुमचे लग्न नाही का झाले?”
“माफ कर हं, पण उत्तर नसेल द्यायचे तर नको देऊ ह.”
अरुणा हसली आणि म्हणाली,
“किती वर्षांनी भेटतोय आपण. तुला हक्कच आहे हे मला विचारायचा. काय सांगू तुला मी पूर्ण बुडूनच गेले होते त्याच्यात त्या वर्षी मी काहीही अभ्यास केला नाही कशीबशी पास झाले मग मी side बदलून कॉमर्स ला गेले, तुम्ही तिघी गेलात मेडिकलला, अंजु इंजिनीअर झाली, मी मात्र झाले बीकॉम श्रीरंग म्हणजे माझा जीव की प्राण होता. त्याच्या शिवाय मला करमायचेच नाही. कित्ती बेत आखले आम्ही आयुष्याचे। छान बंगला बांधू, सजवू, आपली मुले, होतील, त्याच्यासाठी बागेत झोपाळा झुलेल. पण हे सगळे,रांगोळी पुसून जाते तसे एका फटक्यात पुसून गेले. दरम्यान खूप गोष्टी घडल्या. अचानकच काय कसे झाले, पण श्रीरंग इंजिनीरिंग साठी दूर निघून गेला मी इकडे त्याची वाट बघत होते डोळे लावून. पण त्याने परस्पर एका भलत्याच मुलीशी लग्न केले. मला माहित ही नाही मी वेडी व्हायची शिल्लक राहिले बघ, आई बाबांना ही खूप वाईट वाटले बघ, पण मग मी जिद्दीने M Com पूर्ण केले, बँकेत नोकरीही मिळाली मला माझ्याच एका सहकाऱ्याने मागणी घातली. मी आईबाबांना विचारून त्याच्याशी लग्न केले खूप खूप चांगला होता माझा मनोज. मला एक मुलगी आहे ती खूप शिकून अमेरिकेला गेली खूप सुखात आहे ती. मी जाते ना तिच्याकडे। दुर्दैव तरी बघ, लग्ना नंतर 9च वर्षात मनोज कॅन्सर ने गेला माझी इथे बदली झाली अरुणा ने सुस्कारा सोडला, असे आहे बघ सगळे.”
“अरु, , अजूनही तू खरोखर छान दिसतेस, का अशी एकटी राहतेस कर की लग्न.”
“अग माझी मुलगी पण हेच म्हणाली की आई, तरुणपणीच बाबा गेले तू एकटीने मला इतके सुंदर वाढवलेस कर की लग्न. मला आवडेल, आई, अशी एकटी नको राहू ना. तुला गम्मत सांगू? नियती कशी असते बघ पाच वर्षांपूर्वी माझा शोध घेत श्रीरंग मला भेटला. म्हणाला तुला खूप भेटायची इच्छा होती.”
मी म्हटले “हो की काय? मग मला लग्न केलेस ते नाही सांगितलंस ते? लाज वाटली का मला सांगायची? मी तुला अडवले नसते रे। श्रीरंग, तब्बल 5 वर्षे आपले affair असताना खुशाल दुसरीशीच लग्न केलेस तेही गुपचूप. बर,आता का आला आहेस बाबा लोन बीन हवंय का तर बँकेत ये.”
श्रीरंग या सरबत्ती पुढे गप्प बसला. म्हणाला “अरुणा मला माफ कर. मी आहेच तुझा गुन्हेगार
पण ते झाले खरे. पण माझी बायको 3 वर्षांपूर्वी accident मध्ये गेली आम्हाला मूल नाहीच झाले. आता हा एकटेपणा खायला उठतो बघ. मला काही कमी नाही खूप पैसा मिळवला मी लग्न करशील माझ्याशी. माझी चूक दुरुस्त करू दे मला अग हे ऐकून तर मी अवाक झाले
किती हा निर्लज्ज पणा याने गेल्या इतक्या वर्षात माझी चौकशी तरी केली का, आता पन्नाशी उलटून गेल्यावर आला शोध काढत तुला सांगते, इतका संताप झाला माझा मी म्हटले “श्रीरंग, तू निघून जा इथून अरे, माझी मुलगी फक्त 7 वर्षाची असताना माझा नवरा गेला तेव्हा आली का आठवण. कसे रे काढले असतील मी दिवस, देव माणूस होता बर माझा नवरा, मी काहीही लपवून नव्हते ठेवले. त्याने कधीही माझा भूतकाळ उकरून काढला नाही, पूर्ण विश्वास होता त्याचा माझ्यावर. खूप सुख दिले त्याने मला, सगळे तरुणपण मी त्या आठवणींवर घालवले आता तुला एकटे पण खायला उठले म्हणून तू आलास हो? मी घालवून दिले त्याला, मी बरोबर केले ना ग? अपमान केला त्याने माझा, माझ्या त्या कोवळ्या वयातल्या प्रेमाचा.”
अरुणा च्या डोळ्यातून अश्रू वहात होते मी तिला जवळ ओढून घेतले, म्हणाले
“शाब्बास. बाई. आहेस खरी धीराची. काहीही चुकली नाहीस. तू काय हा स्वार्थी माणूस बाई.”
अरुणा म्हणाली, “वठलेला झाडाला कधी मोहोर येतो का याने? माझा कोवळा मोहोर जाळून टाकला आणि आता पानगळ सुरु झाल्यावर हा जुना डाव नव्याने मांडू बघतोय केवळ अशक्य आहे हे. मी एकटी राहीन, पण असला पोकळ तकलादू आधार नकोय मला”
मी अरुणा चे डोळे पुसले, तिला जवळ घेतले “हे बघ अरुणा, तू योग्यच केलेस, आता दैव वशात आपण भेटलोय ना, आता हे हात सोडायचे नाहीत, सतत सम्पर्कत राहू, तू माझ्याकडे हक्काने ये, मीही येत जाईन, एकटी आहेस असे नको म्हणू.”
अरुणाने डोळे पुसले म्हणाली, “बघ दैवाने भेट घडवून आणली, मीच माझ्या कोषात होते आणि कोणालाही भेटायला नकोच वाटायचे. पण आता भेटलोय आपण, खूप बरे वाटले मला आता कायम राहू संपर्का मध्ये मला खूप हलके वाटले तुझ्याशी बोलून अपराधी वाटत होते, की मी चूक तर नाही ना केली, पण आता तू म्हणाल्यावर खूप धीर आला”
पुन्हा पुन्हा भेटण्याचे वचन घेऊनच मी पुन्हा पुण्याला माझ्या जगात परतले, पण अरुणाला आता एकटे पडू द्यायचे नाही, हे मनाशी ठरवूनच।
मंडळी, अगदी काही दिवसापूर्वी आमच्या कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी म्हणून काही कालावधीसाठी आम्हाला दुसरीकडे बसायला सांगितले. आजकाल बरीच कामे संगणकावर जरी होत असली तरी त्याच्या कित्येक आधीपासूनच्या अनेक फाइली या ठेवलेल्या होत्या. शिफ्टींग होताना एवढ्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या फाईलींचे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्ण होता. ज्या अतिशय आवश्यक फाईली आहेत त्या घेऊन नवीन जागी जायचे, ज्या फाईली कदाचित पुढच्या काळात संदर्भासाठी लागतील त्यांना कार्यालयीन वास्तूचे नूतनीकरण होईपर्यंत ‘काँमन स्टोरेज’ मधे ठेवायचे असा निर्णय झाला. हे सोडून उरलेल्या जवळजवळ ८०% फाईली या तिथेच सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोडक्यात त्या सगळ्या फाईली कचरा ठरवल्या जाऊन आता रद्दीच्या भावात जाणार हे पक्के झाले होते.
नुतनीकरणानंतर जेंव्हा आम्ही मुळ जागी परत येऊ तेंव्हा येताना ज्या अती आवश्यक / दैनंदिन लागणाऱ्या फाईली ज्या सोबत घेऊन गेलेलो त्या परत आणू. पण इथे संदर्भासाठी लागतील म्हणून काँमन स्टोरेज मधे ठेवलेल्या किती फाईलीं वरची धुळ परत झटकली जाईल याबाबत मला तरी शंका वाटतीय. कारण जेंव्हा सगळं सुस्थितीत होतं तेंव्हाही फारशा त्या फाईलींना कुणी हात लावला नव्हता.
घर आवरताना हा नेहमीचा अनुभव. आज आवश्यक म्हणून ठेवलेली वस्तू पुढल्यावेळी घर आवरताना मात्र हमखास कच-यात जाते. पण पहिल्यांदाच त्या कच-यात घालायला मन तयार होत नाही वरती जो संगणकाचा उल्लेख केला त्यातील कच-या कडे ही आपले फारसे लक्ष जात नाही. नकळत पणे अगणित फाईल्स तयार होत असतात. अनेक फोल्डर+ फाईल्स आपण तयार करत असतो. यातील असंख्य फोल्डर्स/ फाईल्स , इमेल्स काम झाल्यावर सहज उडवले जाऊ शकतात आणि अनावश्यक कच-याची विल्हेवाट लावली जाऊ शकते. पण जेंव्हा हार्ड डिस्क भरून डेटा वहायला लागतो, नवीन इमेल येणे बंद व्हायला लागतात तेंव्हा जाग येते.
आजकाल हीच गोष्ट ‘मोबाईल ‘उपकरणा बाबतीतही आढळते थोडक्यात वेळोवेळी कचरा साफ होणे आवश्यक. वर उल्लेख केलेल्या ठिकाणचा तर आवश्यकच पण अशी एक जागा आहे प्रत्येकाची वय्यक्तिक, जिथे अशा नको असलेल्या भरमसाठ फाईली अगदी कळायला लागल्यापासून विनाकारण पडून आहेत, ती जागा म्हणजे आपला ‘मेंदू’।
तिथेही एकदा साफ-सफाई करायची का?
निसर्ग सुद्धा स्वतःत बदल दरवर्षी करतो. तो निसर्गचक्राला अनुसरून असला तरी आपल्याला दरवेळेला वेगळी अनुभूती देऊन जातो. झाडांची पानगळी होऊन नवनिर्मिती होत असताना आपण आपल्या मनाला हीच गोष्ट सांगितली तर?
होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैर्याचे दिवस!या तिन्ही गोष्टी रत्नागिरी च्या आठवणींशी निगडित आहेत! लहानपणी मार्च महिना आला की अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरूवात व्हायची! आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून मिक्स करून खाण्याची आमची सुरूवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, त्यामुळे मुंबई चे चाकरमानी या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे!मग खरी होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात खेळे यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे नाच करणारी ठराविक लोकं असायची. पारंपारीक गाण्या बरोबरच नवीन नवीन सिनेमा च्या गाण्यांवर नाच केले जायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे, पण त्यांत उत्साह, जोश इतका असायचा की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने, उत्साहाने गोळा व्हायचे! तेव्हा टिव्हि नव्हता, त्यामुळे ही जिवंत, उत्साहाची करमणूक सर्वांना च फार आवडायची! या सगळ्या सांस्कृतिक होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!
होळीच्या खुंटावर होळी उभी करण्यात येत असे आणि भैरीची पालखीही पाच दिवस असे. दरवर्षी एखाद्या च्या बागेतील माडाचे झाड होळीसाठी निवडले जाई. ते तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणले जाई मुख्य म्हणजे ते माणसे वाहून आणतात . त्यामुळे त्यासाठी ४/५तास लागत असत. आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासून च ते बघण्यात दंग असायचो. एकदा का होळी उभी राहिली की पाच दिवस तिथे जत्राच असे. रोज देवीची पालखी मंदिरापासून मिरवणुकीने येई . तेव्हा खूपच गर्दी उसळत असे. होळीच्या खुंटावर उभे रहाणार्या होळीसाठी सुरमाडाचा उपयोग केला जातो. हा सुरमाड जिथे असेल तिथे देवीची पालखी जाते आणि मिरवणुकीने होळीच्या सुरमाडाबरोबरच खुंटावर येते. रोज दुपारी आणि रात्री वाजत-गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटापर्यत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्या बहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते, पण उत्साह तेवढा जास्तच असतो!
पाच देवीच्या पालखीचे असतात. देवीची पालखी उठली तरी होळी मात्र पंधरा दिवस उभी असते. पाडव्याला ती होळी उतरवतात. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रध्देने देवीकडे मागणे मागत असतात, तिचा कौल मिळाला की ते काम होते असे मनापासून वाटतं असते. मग पुढच्या वर्षी नारळाची तोरणे बांधली जातात!
होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगांचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणार्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ, लोणचं यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते, पण कोकणात मात्र रंगपंचमीची मजा जास्त येते. परिक्षा तोंडावर आलेली असते, पण अभ्यासाबरोबर च हे रंगीबेरंगी दिवस ही मनाला खूप आनंद देतात!रत्नागिरी ची आणि कोकणातील होळी अशीच माझ्या डोळ्यासमोर येते!इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच हेत. काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे! पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळी सणाला अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहू या!
चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासून हिंदूंचे नवे वर्ष सुरू होते. शिशीर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी फुटते, वृक्ष वेली टवटवीत दिसतात. ऋतूंचा राजा वसंत सुरू झालेला असतो. सर्व पृथ्वी चित्रासारखी सुंदर दिसते म्हणून या महिन्याला चैत्र हे नाव दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाचे प्रतीक म्हणून घराघरांतून गुढी उभारली जाते.गुढीसाठी काठी, रेशमी वस्त्र,धातूचा गडू,साखरेची माळ वापरले जाते.या सर्व वस्तू मधून आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवतात म्हणून समृद्धी व आनंद या सर्वांचेप्रतीक म्हणूनच गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची गूळ व मीठ,हिंग घालून केलेली चटणी खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब हा औषधी असल्याने आरोग्य चांगले राहते.
दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले तोच हा दिवस.हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो.
झुंजूमुंजू झालंय… पाखरांचा चिवचिवाट चालू झालाय… हवेत सुखद गारवा आहे. आणि वातावरणात एक शांत प्रसन्न नाद भरून राहिलाय. सगळीकडे सडासंमार्जन चालुये, लगबग चालू झालीय. मधुनच स्त्रोत्र पठणाचे स्वर ऐकु येतायत. काही स्त्रिया तुळशीवृंदावनापाशी वाकून एक सुरात प्रार्थना गुणगुणत रंगावली काढत आहेत. एक सारख्या लयीतल्या त्या मोहक वळणदार रेषा काही उगाच शोभेपुरत्या रेखाटल्या नाहीयेत. तर त्या रंगावल्या जणू साऱ्या विश्वाचं प्रतिक बनून या भुतलावर स्थानापन्न झाल्या आहेत. खरतरं तो आहे कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा. अगदी चैत्राच्या आरंभापासून त्याच्या समाप्तीपर्यंत चालणारा.
अंगणाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या त्या नक्षीदार तुळशी वृंदावनात हिरवा हिरवा शालू नेसलेली तुळस प्रसन्नतेनं डोलत उभी आहे. जणू काही वाऱ्याला सांगतेय पहा बरं ! आज माझ्या भोवतालचं वातावरण किती गंधित, किती विलोभनीय झालं आहे. वाराही त्या दर्शनानं क्षणभर थबकलाय. आणि रक्तवर्णीय पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या त्या शुभ्र रेखीव आकृत्या आपल्या नजरेत सामावून घेतोय. इतक्यात त्या चैत्रांगणाला पाहण्यासाठी सूर्यदेखील आला आणि त्याच्या पदस्पर्शानं त्या चैत्रांगणातल्या सगळ्या प्रतिमा मोहरल्या, चैतन्यमय झाल्या. अखेर सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा आहे मानवानं आपल्या नैसर्गिक संपदेला कृतज्ञता अर्पण करण्याचा. जे जे घटक त्याच्या जगण्याला, त्याच्या अस्तित्वाला सहाय्यक ठरतात, त्याचं जगणं सुसह्य करतात त्यांचं स्मरण करण्याचा. त्याचं जतन, संवर्धन करण्याचा म्हणूनच तर या चैत्रांगणाचं महत्त्व. त्यात रेखाटले जाणारे ग्रह, तारे, पानं, फुलं, पशु, पक्षी, सौरक्षक साधनं, रोजच्या वापरातली साधनं आणि… हे सगळं न मागता देणारी ती आदिशक्ती, या सगळ्यांचं स्मरण सातत्यानं व्हावं. त्यांचा लाभही सातत्यानं व्हावा, म्हणूनच तर हा प्रतीकांचा सोहळा. अचेतनातून सचेतानाकडे नेणारा.
चैत्र पाडवा! नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस! श्री राम वनवासाहून परत आले तो हा दिवस! त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले गेले. मराठी कालगणनेनुसार चैत्र वर्षाचा पहिला महिना! रोजच्या व्यवहारात आपण इंग्रजी कालगणनेनुसार वर्ष सुरू करतो. परंतु हिंदू कालगणनेनुसार चैत्र हा पहिला मराठी महिना आणि नवीन वर्षारंभ सुरू होतो.
तोरण म्हंटले कि सण आठवतात. तसेच कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करताना आपण तोरण बांधतो. दसरा,दिवाळी, पाडवा, चैत्र पाडवा या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरण दाराला बांधतो. तोरण हे शुभ गोष्टींचे प्रतीक आहे.
तोरण म्हंटले की आणखी एक प्रचलित वाक्य आठवते. ‘शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले’ वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी पहिला किल्ला घेतला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. आपल्या नवीन कामाची सुरुवात करतानाही आपण तोरण बांधतो. नवीन आॅफिस, नवीन घर, नवीन कामाची जागा घेतली की तोरण बांधून मगच नवीन जागेत प्रवेश केला जातो.
पण मला आत्ता वेगळेच तोरण डोळ्यासमोर आहे! आकाशात ढग जमून आले आहेत. पावसाचा थेंब फुटला आहे. अशावेळी आकाशात सप्तरंगांची कमान दिसू लागते! जणू आभाळात सात रंगांचे सुंदर तोरण बांधले आहे असं वाटतं! ढगांचे पडघम वाजू लागतात. उंच उंच झाडे वाऱ्याबरोबर डोलू लागतात. चराचरामध्ये चैतन्याची चाहूल लागते. दिवसभर होणारी काहिली जरा कमी होऊन दुपारनंतर आभाळ बदलू लागते. अतिशय गर्मी ओसरून एकदम कुठून तरी धुरळा उठतो. आभाळ मेघाच्छादित होते. ढगांच्या गडगडाटात पावसाची एखादी सर येते. मृदगंधा चे अत्तर दरवळू लागते आणि अशावेळी ऊन-पावसाचा खेळ चालू होऊन आकाशात सप्तरंगी तोरण दिसू लागते. जणू नवचैतन्याची सुरुवात झालेली असते.
तसे तोरणाचे विविध प्रकार आहेत. आंब्याची पानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतात म्हणून दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्याची पूर्वापार पद्धत पडली असावी! झेंडूची फुले आणि आंब्याची पाने या दोन्हीचे एकत्र तोरण आपण बांधतो. अलीकडे प्लास्टिकची झेंडूची फुले किंवा पाने असलेली मण्यांची, टिकल्यांची अशी विविध प्रकारची तोरणे मिळतात.
त्यात पानांवर स्वस्तिक, कलश, श्री, देवी अशी विविध चित्रे वापरून तोरणे बनवली जातात. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे चित्र असलेले तोरण सगळीकडे दिसते. तर साहित्यिक कार्यक्रमात सरस्वतीचे चित्र तोरणावर दिसते. दसऱ्याला विशेष करून झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते.
नवीन लेखनाची सुरुवात करून लेखक साहित्यिक तोरण बांधतो. तर राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी पक्ष कार्यालयाला तोरण बांधून सुरुवात केली जाते. तोरण शब्दावरून आज विविध प्रकारची तोरणे डोळ्यासमोर आली आणि माझ्या नवीन लेखनाचा शुभारंभ करताना मीही आज चैत्र पाडव्याला शब्द मण्यांचे, शब्द कळांचे तोरण बांधत आहे.