मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गुंतागुंत…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“गुंतागुंत…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“ हे काय? अशी कशी पोलीस चौकीत आलीस तू वेडा बाई! काय तुझा अवतार झालाय हा? .. पिंजारलेले केस… काळवंडलेला चेहरा.. अंगावरच्या वस्त्राची चिंध्या चाळण झालेली.. भात्याने फुगवल्यासारखी उराची धकधक… त्राण संपल्यासारखा देह ठायी ठायी पडत झडत…. इथे कशाला आली आहेस? ‘ साहेब मला एफ. आर. नोंदवायचा आहे… माझ्यावर त्या नराधमाने…’ एवढंच बोललीस.. पुढचे बोल उमटलेच नाहीत… आणि बेशुद्ध झालीस… नेमकं काय झालयं कळल्याशिवाय आम्हाला पुढं कसं जाता येईल? … ” 

– तरीही ती गप्पच..

“ अगं आधी उठ तू.. भानावर ये! आणि सविस्तर काय झालयं ते सांग! … घाबरू नकोस.! .. “ 

– ती जराशी सावरली. पण तिची भीती मात्र अजूनही तिला काहीही सांगण्यापासून जणू रोखून ठेवत होती. तिला कशाबद्दल तक्रार नोंदवायची आहे हे कळल्याशिवाय आम्ही पोलिस तरी तिची मदत कशी करू शकणार होतो? मग मी माझी खुर्ची तिच्याजवळ घेतली आणि तिला समजावू लागलो…….

“ हे बघ, आम्ही तुला नक्कीच तातडीने मदत करू… कारण आम्ही संवेदनशील मनाचीच माणसं आहोत.. ‘खल निग्रहणाय’ या बोध वचनाला आम्ही बांधील आहोत…” माझं बोलणं तिला कळतंय की नाही अशी शंका वाटावी असाच तिचा चेहरा दिसत होता.

“ इकडे लक्ष दे.. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या आम्ही नक्कीच मुसक्या आवळू… पण त्या आधी घडलेली घटना.. का? कशी? कधी? कोणी? …. हे सगळं तू सांगितलंस तरच ना? या अंतहीन प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत… गुन्हेगाराला पकडण्यासाठी, त्याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणि आणि भक्कम पुराव्यांची फायलींची चळत सादर करून गुन्हा करणाऱ्याला गुन्हेगार ठरवल्यावर कायद्याची आंधळी न्यायदेवता तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून कागदोपत्री न्याय तुला देऊन आश्वस्त करेल… “

आता ती जराशी भानावर आल्यासारखी वाटत होती. माझं बोलणं तिला कळतंय असं वाटल्यावर मी पुढे तिला समजावयाला लागलो – – 

“ तुला न्याय मिळवून दिल्याचं समाधान जे तुला मिळेल ना तसंच ते न्यायालयाला आणि पर्यायाने आम्हालाही मिळत असते. तेव्हा एक खरी लढाई जिंकल्याचा, आमच्या कर्तव्य पूर्तीचा आनंद आम्हाला मिळतो… कारण आम्ही संवेदनशील आहोत… पण ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नसली.. छोटीशी वाटत असली, तितकी महत्वाची वाटत नसली, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखी नसते ती. कळतंय का काही? नसलं कळत तरी सांगतो.. आता आलीयेस ना भानावर.. मग आधी नीट सावरून बस आणि मी काय सांगतोय ती ऐक. ”

ती एव्हाना पूर्ण सावरल्यासारखी दिसत होती. आणि मीही समोर जणू माझा एखादा विद्यार्थी बसलाय असं समजून तपशीलवार माहिती द्यायला लागलो… एखादी फिर्याद घेऊन आलेल्या आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हेगाराला शिक्षा करावी अशी अपेक्षा असणाऱ्या सगळ्यांनाच ही माहिती असायलाच हवी असं माझं ठाम मत होतं, आणि म्हणूनच आमची बाजू सांगण्याची संधी मी कधीच सोडायचो नाही… 

“ हे बघ, कायद्याचा बीजमंत्र असा आहे.. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये… आणि यासाठीच आरोपीपेक्षा फिर्यादीवर फार मोठी जबाबदारी असते.. ती म्हणजे आरोपी हाच खरा गुन्हेगार आहे हे न्यायालयाला पटवून देणे… आणि आणि केवळ या एकाच गोष्टीसाठी फिर्यादीला न्यायालयाच्या वर्षानुवर्षे पायऱ्या झिजवाव्या लागतात… तोवर गुन्हा करूनही आरोपी मात्र सुखात जगत असतो… सुटलेल्या शंभर गुन्हेगारातील तो सुद्धा एक असतो…. दाताच्या कण्या करून कायद्याचा कीस पाडून, कंठशोष करून आपला मुद्दा तुझा वकील कोर्टाला सांगत असतो… त्याचवेळेला.. नेमके त्याच कायद्यातल्या पळवाटेचा संधीसाधूपणाने आरोपी ‘ तो मी नव्हेच ‘ असं सांगून कोर्टाची दिशाभूल करून आपली निर्दोष सुटका करून घेतो… ‘ तमाम जलि़लों के बाद ये अदालत इस ऩतीजे पे पहुंची है कि गुनेहगार निर्दोष पाया है अत: ये अदालत उसे बाइज्जत बरी करती है.. कोर्ट इज ॲडजर्न… “ 

.. या माझ्या बोलण्यातलं तिला नेमकं किती आणि काय कळलं ते मला कळायला मार्ग नव्हता खरं तर.. पण तिच्या चेहेऱ्यावर ऐकण्याची उत्सुकता मात्र नक्कीच जाणवत होती. मग मीही उत्साहाने सांगू लागलो..

“.. तर काही वेळेला गुन्हा शाबित झाल्याने गुन्हेगाराच्या शिक्षेचा निकाल दिला जातो… त्या तेव्हढ्याच वेळेपुरतं तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचं परिमार्जनाचं झाल्याचं आणि बराच कालापव्यय झालेला असला तरी मिळालेल्या न्यायाचं सुख नि आनंद मिळतो… क्षणैक असला तरी… आणि ते स्वाभाविक आहे. पण खरं काय आहे माहिती आहे… आपण संवेदनशील म्हणून किती फुशारक्या मारल्या ना तरी… त्या न्यायाला संवेदनेशी काहीही देणंघेणं नसतं.. फक्त नि फक्त फुल प्रुफ साक्षी, अक्षय टिकणारा पुरावा यावरच कोर्टाची भिस्त.. बाकी सगळं व्यर्थ…. मग तिथे चारचौघात कायद्याच्या नावाखाली अधिकच धिंडवडे काढले जातात… एका अन्यायाचा न्याय मिळविण्यासाठी कायद्याच्या आवरणाखाली आणखी हजारो अन्याय केले जातात… तुझ्या सोशिकतेचा अंत पाहिला जातो. न्याय मिळण्याच्या लढाईत प्रसंगी तुलाच संपवलं जातं… आणि शेवटी कोर्ट कागदावर आपली मोहर उठवतं त्याला ‘न्याय ‘ असं म्हटलं जातं… किती किती नि कसं कसं गुंतागुंतीचं होऊन बसलेलं असतं सारं… आपल्याला अखेर न्याय मिळाला हे शेवटी आपल्याच समाजात ओरडून सांगावं लागतं, कारण तो कोर्टाचा न्याय निवाड्याचा कागदच मुळी शब्द गिळून मौनात असतो… समाजमन निष्ठूर असतं. ते सहसा कुणाला आपल्यात सामावून घेत नाही.. त्यांची दृष्टि कलुषित ती कलुषितच राहते… तिकडे तो आरोपी.. कायद्याने शाबीत ठरलेला गुन्हेगार.. राजरोसपणे ताठ मानेने समाजात वावरताना दिसतो… समाजही त्याचा हारतुरे घालून जाहीर सत्कार करत असतं… एका असंवेदनशील जाणीवेची सत्ता दुसऱ्या संवेदनशील जाणीवेला देशोधडीला लावून टाकते…. ही एक अनाकलनीय न सुटणारी गुंतागुंत आहे बघ..! “

तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद करावी की नाही या संभ्रमात मला तिला पाडायचंच नव्हतं. फक्त वास्तवाची जाणीव करून दिली तर ती ठामपणे कोर्टात उभी राहून स्वतःसाठी न्याय मिळवू शकेल हे मला सांगायचं होतं … त्यासाठी पुढच्या सगळ्या गोष्टींना तिने न घाबरता.. न डगमगता तोंड द्यावं.. आम्ही तिच्या पाठीशी असू.. हे मला सांगायचं होतं.

पण.. पण माझा हा प्रयत्न कुचकामी ठरला.. नुसते शब्द ऐकूनच ती पुन्हा घाबरली असावी.. कारण मी बोलायचं थांबताच ती झर्रकन उठली आणि तिथून जवळजवळ धूम ठोकल्यासारखी चौकीतून पळून गेली.

‘मी तरी कशाला तिला इतकं सांगत बसलो ‘.. मलाच आता संभ्रम पडला होता..

– – – शंभर गुन्हेगारातला आणखी एक गुन्हेगार मी माझ्याही नकळत मोकळा सोडला होता का????

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ऐक ना…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “ऐक ना…” ☆ श्री मंगेश मधुकर

“हॅलो.. मी बोलतेय. ”

“डार्लिंग, नंबर सेव आहे”

‘ऐक ना”

“बोल”

“बिझी नाहीस ना. तुला सांगायचं होतं. ”बोलण्यावरून ती अपसेट असल्याचं लगेच त्याच्या लक्षात आलं.

“काय झालं. आर यु ओके”

“काल ऑफिस आणि घरी दोन्हीकडं भांडणं झाली. कुणालाच सोडलं नाही. फुल वादावादी… ”पुढची दहा मिनिटं ती बोलत होती आणि ‘हं, ओके, ’ एवढ्याच प्रतिक्रिया देत तो ऐकत होता.

— 

तो आणि ती दोन वर्षापूर्वी भेटले.

आधी ओळख नंतर मैत्री मग प्रेम.

‘नातं’ एकेक पायऱ्या चढत गेलं.

दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला.

दोघांचाही स्वभाव बोलका,

आपसात बोलताना मात्र नेहमीच तो श्रोता.

रोज फोनवर बोलणं व्हायचं.

‘बिझी नाहीस ना’ विचारून नळ सुरू केल्यासारखी बोलत रहायची.

त्याच्याकडं मन मोकळं करायला आवडायचं.

सगळं शेअर करायची. चिडायची, रडायची.

तो सांभाळून घ्यायचा. समजावून सांगायचा.

गरजेनुसार सल्लासुद्धा द्यायचा.

मात्र स्वतःविषयी फार बोलायचा नाही.

तिला हे कधी जाणवलं नाही.

तो कायम आनंदात असं तिनं गृहीत धरलेलं.

रोजच्याप्रमाणे कॉल आला.

“ऐक ना”म्हणत तिनं बोलायला सुरवात केली.

प्रमोशन मिळालं म्हणून जाम खुशीत होती.

तो ऐकत होता पण चित्त थाऱ्यावर नव्हतं.

कारण कंपनीकडून ब्रेक मिळालेला.

अचानक नोकरी गेल्यानं तो प्रचंड टेंशनमध्ये.

कॉल कट करावा असं वाटलं पण जमलं नाही.

ती प्रमोशनच्या उत्साहात तर तो बेकारीच्या वैफल्यात.

पण त्यानं जाणवू दिलं नाही.

मनापासून अभिनंदन केलं.

सेलिब्रेशनसाठी ती आग्रही पण तो तयार नव्हता.

आनंदी मूड बघून नोकरी गेल्याचं तिला सांगितलं नाही.

त्याला वाटलं,

जसं आपण समजून घेतो. आधार देतो 

तसंच तीसुद्धा करेल.

पण असं काहीही घडलं नाही.

राग आला नाही पण खूप वाईट वाटलं.

एकटेपणाची जाणीव तीव्रतेनं झाली.

आपल्या माणसाकडून झालेला ‘अपेक्षाभंग’ जास्त त्रासदायक असतो.

दाटून आलेल्या भावना आवरताना आवाज कातर झाला.

त्याचा बदललेला सूर तिच्या लक्षात आला नाही.

ती बोलत राहिली अन तो ऐकत राहिला.

— 

दोन दिवसांनी त्याच्या नोकरीविषयी समजल्यावर ती जाम भडकली.

फोनवर झापायला सुरवात केलीतो मात्र नेहमीप्रमाणे शांत.

“आता का गप्प. बोल ना. एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस” 

“खूप खुष होतीस त्यावेळी माझं रडगाणं कशाला?? म्हणून सांगितलं नाही. ”

“खरंतर सगळयात आधी मला सांगायला पाहिजे होतं. तू चुकलास. असं वागायला नको होतं. ”

“काय केलं असतसं” कधी नव्हे ते त्याचा आवाज चढला.

“असं का बोलतोस. नीट बोल.”

“नीटचं बोलतोय. मी कसा आहे असं एकदाही विचारलं नाहीस. तुला माझी कंडिशन समजतच नाहीये. नोकरी गेली यापेक्षा सांगितलं नाही याचाच तुला राग आलाय” त्याचा आवेश बघून ती गप्प झाली. काय बोलावं हे न सुचल्यानं फोन कट केला. फोनकडं पाहत तो खिन्नपणे हसला.

 तिनं आपली मनस्थिती समजून घ्यावी एवढी माफक अपेक्षा परंतु,…

एक गोष्ट पक्की कळली की स्वतःच स्वतःला सावरायला हवं.

जे तो नेहमीच करत आलाय. काहीवेळ डोळे मिटून बसला.

भावनावेग ओसरल्यावर तिला फोन केला पण कॉल कट. पुन्हा पुन्हा फोन करत राहिला.

शेवटी तिनं फोन घेतला. “माझ्यावर विनाकारण चिडलास. वाट्टेल ते बोललास. तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती.”

“सॉरी!!  ते जरा टेंशन मध्ये होतो म्हणून.. ”

“काहीही बोलशील. टेंशन्स मलाही आहेत पण मी बोलून मोकळी होते.”

“तुझ्यासाठी मी आहे पण माझ्यासाठी??”

“म्हणजे.. ”

“जाऊ दे. प्रमोशनची पार्टी कधी देतेस ते सांग. ”त्यानं चतुराईनं विषय बदलला. एक्साईट होऊन ती बोलायला लागली तो ऐकत होता पण डोळ्यात पाणी होतं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रेबन गॉगल – –लेखक : अज्ञात – संकलन : श्री राजेश हजारे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

🌸 जीवनरंग 🌸

☆ रेबन गॉगल – –लेखक : अज्ञात – संकलन : श्री राजेश हजारे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

“काय गरज होती एवढा महागडा फोन घ्यायची, पहिला होता ना” पप्पा चिडले.

“अहो, आता तो कमावता आहे, असेल हौस, तुम्ही नका लक्ष देऊ”आईने समजावले.

“पगार झाला की लगेच उधळपट्टी सुरु, गरज काय फालतू खर्च करण्याची. ”पपांची बडबड सुरुचं.

आई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होती. प्रकाश सगळे बोलणे ऐकत होता. त्यामुळे आईला टेन्शन आले. तिने खुणेने प्रकाशला गप्प राहण्यास सांगितले. हे घरातलं रोजचच वातावरण. बाप-लेका मध्ये नेहमीच खडाजंगी चालायची आणि आईची त्यात मध्यस्ती.

खरंतर पप्पाचा प्रकाश अतिशय लाडका. एकुलता असल्यामुळे लाड जरा जास्तच.

प्रकाश मोठा होऊ लागला तसे दोघांच्यामध्ये अंतर पडायला लागले कारण दोघांचे परस्परविरोधी स्वभाव.

दहावीनंतर पुढे काय करायचे यावरून दोघांचे वेगवेगळे विचार होते. त्यामुळे मोठा वाद झाला पण प्रकाशसुद्धा वडिलांप्रमाणे हट्टी म्हणून त्याने स्वतःला पाहिजे तेच केले. चांगले मार्क्स असूनही तो आर्ट्सला गेला. त्याला कला क्षेत्रात करियर करायचे होते अर्थातच पपांना हे मान्य नव्हते. हळूहळू दोघांमधला संवाद कमी झाला. एकाच घरात राहत असल्यामुळे दोघात जे बोलणे व्हायचे ते फक्त कामापुरते.

वाद घालताना मात्र दोघेही मागे हटत नसत. दोघांमध्ये फार मोठे असे काही भांडण नव्हते पण विचार आणि वागण्याची पद्धत वेगवेगळी होती. जनरेशन गॅपचा परिणाम. पप्पा व प्रकाश यांच्यामध्ये नेहमीच आईचे सँडवीच व्हायचे. दोघेही घरात असले म्हणजे ती बिचारी कायम धास्तावलेली.

शिक्षण पूर्ण करून प्रकाश नोकरीला सुद्धा लागला पण घरातल्या परिस्थितीत फारसा पडला नाही. केवळ आईमुळे घर टिकले.

प्रकाश चांगली चित्र काढायचा त्यामुळे त्यातच त्याने करियर केले. एका अँडव्हटाझिंग कंपनीत त्याला जॉब मिळाला. पहिला पगार झाला आणि त्याने नवीन मोबाईल घेतला, आईसाठी फूड प्रोसेसर आणला. तो पाहून आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले. काहीच बोलली नाही 

आधी फोन, मग फूड प्रोसेसरची खरेदी, पपांना भडकायला निमित्त पुरले. त्यांची बँटींग पुन्हा सुरु झाली पण आश्चर्य म्हणजे यावेळी प्रकाश शांत होता. काही बोलत नव्हता पण आई पपांवर चिडली.

“लेकराने, घरासाठी वस्तू आणली त्याचे कौतुक करायचे सोडून, कुरकुर कसली करत आहात. ”

आईच्या बोलण्याने पपा संतापले आणि दोघांमध्ये भांडण सुरु झाले.

“विनाकारण खर्च करण्याची तुझीच सवय त्याला लागली आहे, सेविंग करायला पाहिजे, आपण करोडपती नाही. पैसे वाचवायचे की असे फालतू खर्च करायचे, आपल्यासारखेच दोन खोल्यांमध्ये हासुद्धा आयुष्य काढणार”

“अहो, काहीही काय बोलताय, आपण केली अडजेस्टमेंट, मन मारून पै पै साठवली पण आता चांगले दिवस आले आहेत. माझा पोरगा हुशार आहे. तो नक्की चार रूमचा फ्लॅट घेईल. ”

आईच्या डोळ्यात प्रकाशविषयी अपार कौतुक होते.

“तसं झालं तर चांगलंच आहे”

“चला जेवायला उगीचच वाद घालत बसता”

“मी वाद घालतो” 

“आज आईस्क्रीम खाऊ, मी आणतो”असे बोलून प्रकाशने हळूच पपांकडे पाहिले. पपा काहीच बोलले नाही.

जेवण झाल्याबरोबर आई वरच्या मजल्यावरील काकूंकडे गेली. पप्पा व्हरांड्यात पेपर वाचत बसले होते, प्रकाश मोबाईल मध्ये हरवला तेवढ्यात कुरियर आले. पपांना वाटले प्रकाशचे पार्सल आले. त्यांनी हाक मारली पण प्रकाश मुद्दामच पुढे आला नाही 

आपल्या नावाचे पार्सल पाहून पपांना फार आश्चर्य वाटले. पार्सल आपलेच आहे का याची त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. कुरियरवाला निघून गेला. बराच वेळ पप्पा पार्सलकडे पाहत होते. पुन्हा एकदा त्यांनी पार्सलवरचे नाव आणि पत्ता तपासला. टिपिकल मध्यमवर्गीय वृत्तीचे पप्पा पार्सल उघडू की नको विचारात पडले होते.

शेवटी प्रकाशच बाहेर आला.

“पप्पा, कसलं पार्सल आहे, उघडा की”

“नको रे, कसलं पार्सल, कोणी पाठवलं आहे ते माहित नाही”

“नाव, पत्ता तुमचाच आहे मग कशाला विचार करताय”

“मग फोडू म्हणतोस”

पपांनी पार्सल फोडले आणि त्यात नवाकोरा “रेबन गॉगल” होता.

आश्चर्याने पपा गॉंगलकडे एकटक पाहत होते.

“पप्पा, आवडला का गॉगल, माझ्याकडून तुम्हांला गिफ्ट” प्रकाशने विचारले 

“रेबनचा गॉगल तोही माझ्यासाठी” पप्पा जोरात ओरडले. त्यांना प्रचंड आनंद झाला.

“ओरीजनल रेबन आहे”

“महाग असेल”

“फार नाही, आवडला का तुम्हांला”

“न आवडायला काय झाले, कसला भारी आहे” पपांनी अलगदपणे गॉगल हातात घेतला.

“पपा, मला माहिती आहे तुम्हांला गॉगलची खूप आवड आहे. आयुष्यात एकदा तरी ओरीजनल रेबन घ्यायचा हेच तुमचं स्वप्न होते. त्याविषयी अनेकदा तुम्ही बोलायचा. तेव्हाच मी ठरवले होते की कमवायला लागेल तेव्हा तुम्हांला ओरीजनल रेबन गिफ्ट म्हणून द्यायचा”

“एवढा खर्च कशाला केलास, परत करून टाक, वडिलांची आवड लक्षात राहिली, काही घ्यावेसे वाटले यातच मला सगळे काही मिळाले, ”.

“हा गॉंगल तुमच्यासाठीच घेतला आहे, तुम्ही तो रोज वापरायचा आणि पप्पा, थँक्यू सो मच”

“कशासाठी” गॉगलकडे पाहत असलेल्या पपांनी विचारले.

“सगळ्याच साठी, खूप काही केलंत माझ्यासाठी, ” पपांनी चमकून प्रकाशकडे पाहिले.

“त्यात काय विशेष. सगळेच आईबाप आपल्या मुलांसाठी करतच असतात” 

“बाकीच्यांचे माहिती नाही पण आई, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात. आतापर्यत तुम्ही मला गिफ्ट देत आलात. अनेकवेळा स्वतःचे मन मारून माझ्यासाठी तडजोड करीत आलात. सगळे ताण-तणाव, त्रास सांभाळून नोकरी करीत राहिलात. स्वतःपेक्षा मला महत्व दिले. तेही आपल्या दोघांचे फारसे पटत नसताना. वाद नेहमीच व्हायचे पण तुमची तळमळ मला समजत होती. ” 

प्रकाशच्या बोलण्याने पपा इमोशनल झाले.

“जे झाले ते झाले फार मनावर घेऊ नकोस, तुझ्या भल्यासाठीच सगळा आटापिटा होता, तुझी फार काळजी वाटायची, ”

“पप्पा, प्रत्येक घरात वडिल आणि मुले यांच्यात एक अदृश्य भिंत असते, मुलं आईशी जेवढं मनमोकळ बोलतात, वागतात तसं वडिलांशी नाही वागता येत. ती अदृश्य भिंत मधे येत असते. माझंही तसचं झालं तुमच्याशी कधीच मनमोकळ बोलता आलं नाही, कारण माहित नाही पण तुमच्याशी वागताना आपसूक बंधने यायची” अचानक प्रकाशने पपांना मिठी मारली.

पपांच्या डोळ्यात पाणी आले, ते लपविण्यासाठी त्यांनी पटकन रेबन गॉंगल घातला.

“कसा दिसतोय, ”

“एकदम कडक” दारातूनच आई म्हणाली.

“आलोच आरशात बघून” लगबगीने पपा घरात गेले. मधले दार बंद केले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

पपांच्या आनंदाश्रुमध्ये नवाकोरा रेबनसुद्धा न्हाऊन निघाला.

लेखक : अज्ञात 

संकलन – श्री राजेश हजारे

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेरचे आलिंगन! (अनुवादित कथा) – मूळ इंग्लिश लेखक : जोएल लोपेझ ☆ अनुवाद – श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ अखेरचे आलिंगन! (अनुवादित कथा) – मूळ इंग्लिश लेखक : जोएल लोपेझ ☆ अनुवाद – श्री संभाजी बबन गायके 

तिच्या डोक्यावरचा सूर्य नुसता चमकत नव्हता… तळपत होता! त्याच्यापासून हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या पृथ्वीवर जणू कुठल्या जन्मातला रागच व्यक्त करत होता… त्याच्या सहस्र किरणांनी… किरणं कसली? जशा नंग्या तरवारीच! आधीच भेगाळलेली भुई.. ती उन्हाच्या मा-याने अधिकच गलितगात झाली होती. त्यात वारा… भुईवरची धूळ आभाळात उधळण्यात त्याला पाशवी आनंदच होत होता…. ही तप्त धूळ म्हणजे धारदार खंजीर… आणि या धुळीने हवा सुद्धा पेटवून दिली होती. कधीकाळी सर्वांगावर हिरवाई मिरवलेली झाडं आता वृद्धापकाळाने जराजर्जर होऊन केवळ पडत नव्हती म्हणून उभी होती… अस्थिपंजर झालेली. पण एका झाडाच्या अशाच सुकलेल्या फांदीच्या सावलीखाली ती बसलेली होती. त्या फांदीमुळे सावली ती कितीशी मिळणार? ती निम्मी तर उन्हातच होती…. पण तिच्या कुशीत असलेल्या तिच्या मुलावर मात्र तिची सावली पूर्ण होती.. तिच्या काळजातल्या मायेसारखी… पण ही सावली तिच्या आणि तिच्या बाळाच्या जठरातील क्षुधाग्नी विझवू शकत नव्हती याचं तिला खूपच वैषम्य वाटत होतं. तिचं नाव होतं लुमा आणि तिच्या लहाग्या मुलाचा नाव होतं.. बेको. बेको हे नाव देखण्या मुलालाही देता येतं आणि देखण्या नसलेल्या मुलालाही. तिच्या साठी बेको देखणा होता… प्रत्येक आईला आपलं लेकरू बेकोच वाटत राहतं… राज्यात राजा एकच असतो… पण प्रत्येक घरात एक राजा असतोच… मातृसाम्राज्य सम्राट!

लुमा त्या उन्हातही तिच्या पूर्वायुष्यातील हिरव्या स्मृतींमध्ये हरवून गेलेली होती… रात्रीच्या अंधारातलं डोक्यावरचं चांदणं, थंड हवा, पोटात भुकेपुरतं अन्न गेलेलं, पाऊसही गरजेपुरताच… जीवनाचा प्रवास संथ होता पण अव्याहत होता… हेच समाधान. पण पाऊस लांबू लागला आणि पुढे तर थांबलाच… पिकं सुकून गेली… जित्राबं टाचा घासून मेली.. माणसं अन्नाच्या शोधात रानोमाळ पांगली… लुमा मात्र त्यांच्यासोबत नाही जाऊ शकली… तिच्या पदरात हे तान्हं बाळ होतं त्यावेळी…. वातावरणात भुकेचा गंध भरून राहिला होता… आणि हा गंध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत गेला. लुमाने आधी खाणं सोडलं… पुढे बेकोला सुद्धा खाणं कमी करावं लागलं… दोघांना पुरेल असं मिळतच कुठे होतं. बेको थोडासा जाणता झाला होता तोवर… त्याला समजू लागलं होतं.. आईचा तोल जातोय ती उभी राहते तेंव्हा… तिचे गालही आताशा खोल खोल जाताना दिसताहेत. बेकोने तिने त्याच्या हाती दिलेला कंदमुळाचा एक तुकडा तिच्या तोंडापाशी नेला… ”आई.. खा ना थोडं! तुला ताकद पाहिजे आता. ” “नको, तू खा. माझ्यात अजून भरपूर शक्ती आहे.. तुझ्यामुळे! ” लुमा खोल गेलेल्या आवाजात म्हणत होती आणि तिने बेकोच्या कपाळाचं हलकेच चुंबन घेतलं… तिच्या सुकलेल्या ओठांनी. लुमा रोज सकाळी अन्नाच्या शोधात भटकत राहिली… मिळेल ते जमा करीत राहिली… अगदी काहीही. पोटात अन्न असलेल्या कोणाही माणसाच्या कल्पनेतही येणार नाहीत असे पदार्थ ती खाण्यासाठी मिळावेत जीवाचं रान करीत होती… तिच्या पाठीवर बेको असायचा.. झोळीत बांधलेला. झोळीचं वजन आणि बेकोचं वजन जवळजवळ सारखंच भरेल असा कृश झाला होता बेको तोवर. संध्याकाळी उशिरा लुमो परतायची… रोज रात्री बेकोला एक गोष्ट सांगायची… भरून वाहणा-या नद्यांची, चुलीवरल्या भरलेल्या भांड्याची आणि भरलेल्या पोटांची, हंबरणा-या गुरांची…! भुकेने रडणारं एकाही मूळ तिच्या गोष्टीत कधी डोकावलं नाही!

अशाच एका रात्री गोष्ट ऐकून झाल्यावर बेको ने लुमाच्या पोटावर त्याचं डोकं ठेवलं… त्याचं अंग गार पडत चाललं होतं… तिने त्याला घट्ट मिठी मारली… जणू तिच्या बाहुपाशामुळे त्याची भूक कमी होणार होती… बेको म्हणाला.. ”आई! उद्या तरी आपल्याला खायला काही मिळेल का गं? ” त्यावर ती म्हणाली, ” हो, रे राजा! उद्या भात आणि मध… अगदी पोटभर! तुला आवडतो ना मध? ” बेकोचा त्याच्या आईवर विश्वास होता… ते ऐकून तो स्वप्नात गुंग झाला आणि झोपी गेला.

दुसरी सकाळ उगवली ती मागील दिवसांसारखीच… काहीच फरक नाही.. तीच धूळ, तेच ऊन आणि तीच भूक. बेको किती तरी तासांपासून काहीच बोलला नव्हता… तिच्या झोळीत केवळ निजून होता. तिने मागे हात करून झोळी चाचपुन पाहिली…. आणि तिचं काळीज हललं… जगायला आरंभ करण्यापूर्वी बेको जगाचा निरोप तर घेणार नाही ना? तिचं मन चिंतेने काळवंडून गेलं… ती मोठ्यानं किंचाळली… पण ऐकायला कुणाला सवड होती…. आभाळ जेवढं निरभ्र तेवढंच मनानं कोरडं.. आणि शांत. देवा, माझे उरलेले श्वास माझ्या बाळाला देशील का? तिने देवाकडे याचना करायला सुरुवात केली! बेको हळूहळू मृत्यूच्या मांडीवर शांत शांत होत गेला… तिने त्याच्या कपाळावर तिचे ओठ अगदी जोर लावून टेकवून ठेवले होते… त्याला देण्यासाठी तिच्याकडे प्रेमाशिवाय काहीही नव्हतं.. आणि प्रेमाने भूक भागत नाही देहाची! त्यानंतर काही दिवस लोटले… परदेशातून आलेल्या काही सहृदय स्वयंसेवकांनी लुमाला पाहिलं… तिच्या कुशीत बेको तसाच होता… निष्प्राण. लुमाही गलितगात्र… अर्धवट बेशुद्धीत पडलेली होती. भूकेपुढे तिच्या हृदयातील प्रेमाचा हुंकार क्षीण झालेला होता… तिचा बेको निघून गेला होता.. आता त्याला भूक सतावणार नव्हती!

त्या स्वयंसेवकांनी तिच्या बाहुपाशांतून बेकोचा देह अलगद बाजूला काढून घेतला… ते असे करीत असताना लुमाने तिला जमेल तेवढा विरोध केला.. बेको.. बेको.. ती म्हणत राहिली… जणू अंगाई गाते आहे! ती म्हणत होती… बेको… उठतोस ना… बघ.. खायला नाही पण पाणी मिळाले आहे थोडेसे… पितोस का माझ्या हातून? बेको उठणार नव्हता कधीच!

तिला हीच तर भीती होती आयुष्यभर… भुकेने मरण्याची… आणि तीच आज खरी ठरली होती. आता तर तिची अवस्था भयावह झालेली होती… ज्याच्या साठी जगायचं तेच मूल आज मरण पावलं… आणि आपण तर जिवंत आहोत… हा जीव जगवणं किती कठीण असेल यापुढे… अन्न मिळून सुद्धा!

बेकोचं पार्थिव शरीर म्हणजे जणू भुकेचं एक शिल्प झालं होतं… भूक सगुण साकार झालेली दिसत होती. स्वयंसेवकांच्या डोळ्यांतही हे दृश्य पाहून आसवं उभी राहिली. त्यांनी बेकोला एका मातेच्या कुशीतून काढून मातीच्या कुशीत पोहोचवलं! लुमाला मदत छावणीत आणलं गेलं.

त्यांनी तिला अन्नपाणी देऊ केलं… ”आता या भाकरीच्या तुकड्यांचं मी काय करू… ज्याच्यासाठी हा तुकडा मिळवण्याचा प्रयत्न करीत होते.. तोच आता नाही! ” ती शोक करीत राहिली न रडता… केवळ बेकोचा शर्ट उराशी कवटाळून बसायची.

नर्सने तिच्या बेडजवळच्या मेजावर पेन्सिल आणि कागद आणून ठेवला… तुला वाटेल तेंव्हा लिही तुझ्या बेको विषयी.. भूकेविषयी… जगाला समजू दे तुझी कहाणी.. नर्स म्हणून गेली. सात दिवस उलटून गेले तरी लुमाने पेन्सिलला हातही लावला नव्हता… पण ज्याक्षणी तिने ती पेन्सिल उचलून कागदावर लिहायला आरंभ केला… वाटलं… दु:खाच्या धरणाचे सारे दरवाजे धाडकन उघडले गेलेत आणि प्रवाह झेपावू लागलाय खाली… पुढे.. चहुदिशांना… ती आणि तिचं मूल… त्याची भूक आणि त्या भुकेने कातरल्या गेलेल्या कित्येक रात्री… आणि त्या फाटलेल्या रात्री सांधणारे प्रेमाचे धागे… बेको म्हणाला होता एकदा… आई, मी शेतकरी होणार.. आणि धान्य पिकवणार…. मग कुणीही उपाशी नाही राहणार!

.. लुमाचे शब्द थांबता थांबत नव्हते… काही काळाने ते शब्द जगापुढे आले… ते वाचून काही हृदये पिळवटून निघाली… त्यांपैकी काहींनी अन्नधान्यासाठी देणग्या जमा करून दिल्या आणि लुमाच्या गावासारख्या आणखी काही गावांना पाठवल्या… हजारो मुखांना अन्न लाभू लागले… भुकेचा राक्षस त्या गावांतून पलायन करता झाला… कदाचित तो आणखी पुढे कुठे गेला असावा…!

लुमाने तिच्या गावातल्या एका कोप-यात आता एक झाड लावले आहे… बेकोच्या स्मरणार्थ. त्या झाडाखाली तिने बेकोचा तो शेवटचा शर्ट पुरला आहे… ते झाड आता वाढते आहे… लुमा त्याला म्हणते… बेको, उंच हो, बहरून जा… फळे दे… इतका उंच हो की भूक तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही…. बेकोच्या झाडावरून वाहणारा वारा लुमाचे शब्द दूरवर पोहोचवत आहे… जणू एखादी प्रार्थना पसरत राहावी!

मूळ इंग्लिश कथा : जोएल लोपेझ 

अनुवादक : संभाजी बबन गायके

पुणे

9881298260

(Joel Lopez नावाच्या लेखकाच्या The Last Embrace नावाच्या इंग्रजी कथेचे हे स्वैर रूपांतर आहे. जोएल फिलिपाईन्स देशातल्या हवाई दलाच्या Search and Rescue Team मध्येही सेवा करत असतो. ही कथा नेमकी कुठे घडते ते काही लक्षात येत नाही. पण भुकेची समस्या ही जागतिक समस्या आहे. गरजूंना अन्नदान करणा-या लोकांना यानिमित्ताने अभिवादन.)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन माहेरं… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री रजनीकांत शाह ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन माहेरं… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री रजनीकांत शाह ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – त्यानंतरचं वर्ष कसं गेलं, मला कळलंच नाही. माझा मेंदू वर्षभर जसा काही मूर्छित अवस्थेतच होता. मला इतकंच आठवतं, माझे आई-बाबा मला घरी नेण्यासाठी वारंवार येत असत आणि माझ्या सासू-सासर्‍यांचे दु:खी चेहरे बघून मी त्यांना येत नाही असं म्हणत असे. आपल्याला आश्चर्य वाटेल, की तोरलच्या दुसर्‍या वाढदिवसानंतर, त्यांनीच माझ्या दुसर्‍या लग्नासाठी मला तयार केले. मलाही वर्षाभरात लक्षात आलं होतं, की एका तेवीस वर्षाच्या विधवेसाठी एकटीने पूर्ण आयुष्य घालवणं किती मुश्कील आहे. माझे मोठे दीर आणि जाऊबाई तोरलला दत्तक घायला तयार होते, पण मीदेखील एक अट घातली, ‘जो माझ्यासोबत तोरलचाही स्वीकार करेल, त्याच्याशीच मी लग्न करेन.’) आता इथून पुढे —- 

एके दिवशी माझ्या सासर्‍यांनी, तुषारने दिलेली, ‘जीवनसाथी हवा’, ही जाहिरात वाचली.

त्यात लिहिलं होतं, एका मुलाचा बाप, तरुण विधुर, याला जीवनसाथी हवा आहे. माझ्या सासर्‍यांनी शोध घेतला. मालवच्या जन्मानंतर हेमा दीदीचा मृत्यु झाला होता. मी व तुषार भेटलो. तो मला तोरलसह स्वीकारणार होता. तो म्हणाला, ‘आईशिवाय मूल कसं कासावीस होतं, ते मला माझ्या मालववरून लक्षात येतय. आई असताना तोरलला आईपासून दूर कशाला ठेवायचं?’

माझ्या आई-वडलांना समजावत, माझ्या सासू-सासर्‍यांनीच माझं कन्यादान केलं. माझे मोठे दीर माझे भाऊ बनले. मी आणि तुषार प्रेमाच्या बंधनात बांधलो गेलो. आमचा चतुष्कोनी परिवार पंचकोनीय बनवायचा नाही, हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. मालव आणि तोरल थोडे मोठे झाले, तेव्हा आम्ही सगळं त्या दोघांना सांगितलं. बाहेरून कुठून तरी कळलं असतं, तर आपली फसवणूक करताहेत, असं त्यांना वाटलं असतं. म्हणूनच हेमा दीदी आणि मिनेशच्या मृत्युनंतर दहा वर्षांनी त्यांच्याकडून श्राद्धविधी करवला. वातावरण शांत होतं आणि मी अगदी स्तब्ध. ‘सावत्र आई’ आणि ‘सावत्र बाप’ या शब्दांना आपल्या समाजाने केवढं भयंकर रूप दिलय! ते जीवतोड प्रेमही करू शकतात, हे तोरलला तुषारबरोबर आणि मालवला मेघाबरोबर पाहिलं, तरच कळेल.

त्या दिवशी तुषार आणि मेघा माझ्या आदराच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झाले. मला वाटू लागलं, ती दोघे नि:स्वार्थ प्रेमाचे साक्षात उदाहरण आहेत. या संसारात कुणी तरी दुसर्‍यासाठी थोडंसं जरी केलं, तरी त्याचा गवभर डांगोरा पिटतात. इथे सावत्र मुलांना आपल्या पापण्यांच्या सावलीत ठेवत हे दोघे आई-वडील जगाला याची खबरदेखील लागू देत नव्हते. माझ्या आणि मेघाच्यामध्ये जो स्नेहबंध निर्माण झाला होता, तो या घटनेनंतर अधीकच दृढ झाला. माझ्या इथल्या अनेक जबाबदार्‍या तिने आपल्या शिरावर घेतलेल्या होत्या. त्यामुळे मालवच्या व्रतबंधासाठी ती जेव्हा महिनाभर राजकोटला गेली, तेव्हा मला वाटलं, मी माझा उजवा हातच गमावलाय. महिनाभराच्या सुटीनंतर जेव्हा ती परत आली आणि मला फोन केला, तेव्हा मला हुश्श्य झालं. माझी खूप काही कामे राहिली होती. पण तिच्या बोलण्यातून वाटत होतं, की महिन्याची सुट्टी तिला खूप कमी पडली आणि कुणाकडेही मनसोक्त रहाता आलं नाही.

यानंतर जानेवारीत ओणमच्या पार्टीत आम्ही वारंवार भेटत राहिलो. दर वेळी ती नव्या साडीत नटून- थटून येत होती. एकदा तिला सहज विचारलं, ‘राजकोटहून खुपशा साड्या खरेदी करून आणलेल्या दिसताहेत!’

‘नाही दीदी! या सगळ्या साड्या मालवच्या मुंजीच्या वेळी माझ्या माहेरून मला आलेल्या आहेत.’

‘इतक्या?’

‘का बरं? आपल्याला तर माहीतच आहे ना, मला तीन तीन माहेरं आहेत. ’

मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत राहिले. मला काहीच कळत नव्हतं. मी म्हंटलं,

‘तीन माहेरं? असं कधी ऐकलं नव्हतं. ’

‘दीदी’, लहान मुलाला समजावावं, तसं मेघा म्हणाली, ‘पहिलं म्हणजे, माझ्या आई-वडलांचं

घर माझं माहेर आहे ना! ’

‘हो! पण मालवचा…’

‘अरे, माझ्या मुलाच्या मुंजीसाठी आजी, आजोबा, मामा यांच्याकडून मामेरा (मामाकडूनआलेली भेट) नाही का होणार? ‘ अगदी सामान्य गोष्ट बोलते आहे, अशा सुरात मेघा म्हणाली. मेघाचे आई-वडील, तिच्या नवर्‍याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाला मामेरा करतील? मी माझं आश्चर्य लपवत तिला विचारलं, ‘आणि दुसरं माहेर? ’

‘अरे दीदी, हेमा दीदीची जागा मी घेतलीय, तेव्हा, तिच्या आई-वडलांची मुलगीच झाले की नाही मी? मी जेव्हा राजकोटला जाते, तेव्हा त्यांच्याकडे जाऊन रहावंच लागत. त्यांनी तर आत्तापासून तोरलच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायला सुरुवात केलीय आणि मालव तर त्यांचा नातूच आहे ना! आपल्याला सांगू का दीदी, चार-पाच दिवसात माझा फोन झाला नाही, तर त्या लोकांना माझी काळजी वाटू लागते. पुढच्या महिन्यात दोघेही आमच्याकडे राहायला येणार आहेत, तेव्हा मी तुमची भेट घालून देईन. “

मला कळेना, की कोण जास्त वंदनीय आहे? पतीच्या पहिल्या बायकोचे आई-वडील…. त्यांना इतका सन्मान देणारी मेघा की आपल्या मृत मुलीच्या जागी आलेल्या स्त्रीला इतकं प्रेम देणारी ती वृद्ध दंपती?

पण तिसरा धक्का तर आता बसणार होता. जेव्हा मी मेघाला विचारलं, ‘आणि तिसरं माहेर? ’ मग हसत हसत म्हंटलं, ‘वाटतय, तुझे सासू-सासरे खूप चांगले असणार. त्यामुळे तुषारचं घर तुला माहेरच वाटत असेल! होय ना! ’

माझी थट्टा समजून मेघाही हसली. माझा हात धरून म्हणाली, ‘हो! ती दोघे चांगलीच आहेत. पण आपण विसरलात, माझं कन्यादान कुणी केलं? ‘

‘पण ते तर मिनेशचे आई-वडील ना! ते का….? ’

‘आपल्या लक्षात येत नाही दीदी! माझं कन्यादान त्यांनी केलं. म्हणजे मी त्यांची पण मुलगीच झाले ना! मग ते घर पण माझं माहेरच की! मला आणि तुषारला आमच्या दोन्ही मुलांना घेऊन, माझ्या त्या माहेरीही रहायला जावं लागतं. मालवसाठी मामेरा तिथूनही झाला.

‘पण मालव तर तुषारचा….. ’

‘अरे दीदी, आपण माझ्या नणंदेला यशोदेला ओळखत नाही. आमच्या विवाहाच्या वाढदिवसाला सगळे इथे येतील, तेव्हा तिला भेटा. मला दुसरा जन्म तीनेच तर दिलाय. कारण, मिनेश गेल्यानंतर मी जिवंत कुठे होते? फक्त श्वास हेत होते, एवढंच! ’

अश्रुभरल्या डोळ्यांच्या मेघाच्या गळ्यातलं, चांदीच्या घंटेच्या किणकिणाटासारखं हसू तितकच मधुर होतं. माझ्या डोळ्यांच्या मेघातून स्नेहवर्षाव झाला.

मी विचार करू लागले, या तरुणीला, तिच्या पतीला, पुर्‍या परिवाराला काय नाव देऊ? प्रेमाचं मेघधनुष्य? आपल्या जगात सख्खी भावंडसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडतात. ईर्षा आणि अहंकारासाठी दुसर्‍याच्या विरुद्ध षडयंत्र रचतात. प्रपंचाच्या भिंती तुटतात आणि दगड ढासळतात. अशा जगात असाही एक संसार वसतोय.

त्यावेळी मला मेघाला साष्टांग दंडवत घालावं, असं वाटू लागलं. मी तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन अवाकशी उभी राहिले.

— समाप्त —

मूळ गुजराती कथा – त्रण पियर

मूळ गुजराती लेखिका – सुश्री गिरिमा घारेखान 

मो. – ८९८०२०५९०९

हिन्दी अनुवाद – तीन मैके

अनुवादक – श्री रजनीकांत शाह

मो – 9924567512 

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नलावडे बाईंची शाळा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ नलावडे बाईंची शाळा…  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती ‘बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा’. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई (8655846810) यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.

बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.

तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.

मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.

सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी कामं देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला ‘धपाटे देईन हं’ असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.

कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.

कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. ‘श्वास’ चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.

खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.

बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.

“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते.

मी तिला सांगितलं ‘तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल’, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. ‘क्लार्कला पैसे द्या’ म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. “

बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.

आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर, पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.

देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.

निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व, पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार ‘धपाटे देईन हं’ म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.

बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.

समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :

महंते महंत करावे,

युक्तीबुद्धीने भरावे,

जाणते करून विखरावे,

नाना देशी.

समर्थच असेही म्हणतात की

आपणासी जे ठावे,

ते ते दुसऱ्यासी सांगावे,

शहाणे करून सोडावे,

सकळ जन.

हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं. बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.

जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!

आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन माहेरं… भाग-१ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री रजनीकांत शाह ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन माहेरं… भाग-१ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री रजनीकांत शाह ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

मी घराला कुलूप लावतच होते, इतक्यात, मागून आवाज ऐकू आला, ‘दीदी, तुम्हाला बाहेर जायला उशीर होणार नसेल, तर मी थोडा वेळ येऊ?

मी वळून मागे बघितलं. बेला होती आणि तिच्या बरोबर एक अपरिचित तरुणी होती.

मी म्हंटलं, ‘या. या. उशीर कसला? मी काही खास कामासाठी बाहेर पडत नव्हते. सहजच चक्कर मारायला चालले होते. आरामात बसू या. ’ 

घरात येताच बेला म्हणाली, ‘दीदी, ही मेघा आहे. मेघा देसाई. आपल्या गुजराती समाजात काही दिवसांपूर्वी तुषार देसाई येऊ लागले आहेत ना, त्यांची ही पत्नी. मेघा, ही आमच्या सगळ्यांची दीदी. खूप वर्षापासून इथे आहे आणि समाजासाठी खूप काही करते. योग शिकवते. मुलांना गुजराती शिकवते. संस्कृत श्लोक शिकवते. आणखीही खूप काही करते. बेंगलोरमध्ये जे कुणी नवीन गुजराती येतात त्या सगळ्यांना मदत करते. आणि…. ’

‘बस, बस, बेला, ’ मी थोड्या संकोचाने म्हंटलं, ‘आता तर मेघा इथेच रहाणार आहे ना, आपोआप ओळख वाढत जाईल. ’

मेघाने वाकून मला नमस्कार केला. आता मी तिच्याकडे नीट बघितलं. सडसडीत कमनीय बांधा, चमकता गव्हाळ रंग, ‘मीनाक्षी’ नाव ठेवावं, असे मोठ्या मोठ्या पापण्या असलेले डोळे, चेहर्‍यावरील कोवळेपणा, नाजुकपणा असा ओघळत होता, की खाली ओंजळ धरून तो धरून ठेवावा, असं वाटत होतं.

‘अच्छा, आज अचानक कसं येणं केलंत? ’ मी दोघींच्या हातात पाण्याचे ग्लास ठेवत म्हंटलं.

‘दीदी, मेघा राजकोटहून आलीय. आपल्या दोन्ही मुलांचं शाळेचं वर्ष संपेपर्यंत ती तिथे राहिली होती. बदली झाल्यामुळे तुषारभाई एकटेच इथे आधी आले होते. आमच्या समोरच्या फ्लॅटमधेच भाड्याने रहातात.

बेलाने मेघाची पूर्वपीठिका मला सांगितली. पण यात माझं काय काम आहे, हे मला कळेना.

‘छान झालं, आता तुला चांगली कंपनी मिळेल! ’

‘मेघाचा मालव सातवीमध्ये आहे, आणि तोरल सहावीत आहे. शाळेत अ‍ॅडमिशन घेतलीय. तसे दोघेही अभ्यासात हुशार आहेत. राजकोटमध्ये इंग्लिश मीडियममधेच होते, पण इथलं शिक्षण थोडं वेगळं आहे. त्यामुळे त्यांना समजायला थोडं कठीण जातय. आपण थोडी मदत केलीत, तर त्यांना शाळेत काही अडचण येणार नाही. ’ 

माझी दोन्ही मुले शिक्षण पूर्ण करून विदेशात स्थायिक झाली होती. पतिदेव ऑफिसच्या कामात हरवून गेले होते. त्यामुळे माझ्याकडे वेळच वेळ होता. गुजरातहून आलेल्या अनेक मुलांना मी अशा प्रकारची मदत करतच होते. तीन-चार महिन्यात त्यांची गाडी रुळावर येत असे आणि मलाही, कुणासाठी काही तरी चांगलं केलं, याचा आनंद मिळत असे.

मी होकार दिला. दिवस, वेळ सगळं ठरलं. मग मालव आणि तोरलला सोडायला आणि न्यायला येणार्‍या मेघाशी माझी खूप जवळीक झाली. तोरल अगदी मेघाची प्रतिकृती होती आणि मालव आपल्या वडलांवर गेला होता. दोन्ही मुले हुशार होती. थोड्याच दिवसात तयार झाली. मग मेघाही बंगलोरमधील गुजराती समाजाच्या कामकाजात व्यस्त झाली. बघता बघता ती माझा उजवा हात बनली.

मेघा आणि तुषार यांच्याबरोबर माझा जसजसा परिचय वाढत गेला, तसतसा माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा सन्मानभावदेखील वाढत गेला. एकदम आदर्श जोडी. त्यांचे डोळे, बोलणं यातून एकमेकांविषयीचा प्रेमभाव प्रगट व्हायचा. पण ते प्रेम दिखाऊ नव्हतं. एकमेकांचा सन्मान राखणारं प्रेम. काही सांगितल्याशिवायच एकमेकांच्या मनातली गोष्ट समजून घेण्याची आंतरिक शक्ती त्यांच्यात होती. दोघेही मुले शहाणी आणिक सर्वसाधारण घरात असतं, तसंच इथेही घडत होतं. तोरल तुषारच्या मागे-पुढे फिरत असायची आणि मालव ‘मम्मी मम्मी’ ची माला जपत राह्यचा. या वयातली मुलं अशीच असतात. मालव थोडा चंचल होता, पण मेघा सांगेल ते ऐकायचा. मेघादेखील दिवसभर ‘मालव… मालव… ’ म्हणत राह्यची. या सुखी, आनंदी परिवाराकडे बघताना मला माझ्या मुलांचं बालपण आठवायचं.

त्या दिवशी रविवार होता. भाद्रपद चालू होता. आदल्या दिवशी रात्री खूप पाऊस झाला होता. त्यामुळे मी आज गुजरातीचे वर्ग कॅन्सल केले होते. माझे पती कामासाठी मुंबईला गेले होते. मी माझी कामं शांतपणे आवरत होते. एवढ्यात मेघाचा फोन आला.

‘दीदी आपण फ्री आहात?’

‘हो! काही काम होतं?’ मला वाटलं मुलांना अभ्यासासाठी पाठवायचं असेल. पण ती म्हणाली, ‘आपण तासाभरात माझ्या घरी येऊ शकाल? ’

तिचं अचानक माझ्याकडे काय काम लागलं असेल, मला कळलं नाही. तरी पण मी ‘हो’ म्हणून टाकलं.

‘ठीक आहे. स्वैपाक करते आणि येते. पण काय काम आहे, ते तर सांग.’

‘नको दीदी! स्वैपाक करू नको. आपण सगळे इथे बरोबरच जेऊ या. आपण या फक्त. मग बोलू या.‘

मला वाटलं, कदाचित मालव किंवा तोरल यांचा वाढदिवस असेल. मी भेट वस्तू घेऊन जाऊ नये, म्हणून सांगितलं नसेल. मी चॉकलेटचा डबा घेऊन मेघाच्या घरी पोचले. तिथलं दृश्य पाहून मी अगदी चकित झाले.

मालव आणि तोरल पूजा करायला बसले होते. मालवच्या पुढे एक छोटा चौरंग होता. त्यावर कुणा तरुणीचा आणि तोरलच्या पुढील चौरंगावर कुणा तरुणाचा फोटो ठेवलेला होता. समोर गुरुजी ( भटजी), जे विधी करायला सांगत होते, त्यावरून लक्षात आलं, की श्राद्ध विधी चालू आहे. पण श्राद्ध विधी ही दोन मुले का करताहेत? कुणाचं श्राद्ध? हे फोटो कुणाचे? मेघा गुरुजींना काही हवं असेल, तर देण्यासाठी तिथे जवळच बसली होती. या सगळ्यात विचारू तरी काय? माझ्या अतृप्त जिज्ञासेतून निघणार्‍या धुरामुळे मला गुदमरू लागलं होतं. एकदा माझी आणि तिची नजरानजर झाली, तेव्हा तिने नजरेच्या इशार्‍यानेच ‘नंतर सांगते’, असं म्हंटलं.

सर्व विधी झाले. दक्षिणा घेऊन गुरुजी निघून गेले. ते दारापर्यंत पोचले असती, नसतील, एवढ्यात माझ्या कंठातून किती काळ कैद असलेले शब्द मोठ्या व्याकुळतेने बाहेर पडले, ‘हे सगळं काय आहे मेघा? हे फोटो कुणाचे आहेत?’ 

मेघाने जसा बॉम्ब फोडला. तिने दोन्ही फोटोंकडे आळी-पाळीने निर्देश करत संगितले ‘हा मिनेश आहे, माझा पहिला पती. तोरल त्याची आणि माझी मुलगी आहे. आणि ती आहे हेमा दीदी. मालवची आई. म्हणजे तुषारची पहिली पत्नी.’

मी जशी काही पुतळाच झाले. ओठ हलत होते, पण शब्द हरवले होते. एकच वाक्य बोलून मेघाने त्या चौकोनाच्या संबंधात असं जाळं बनवलं होतं, की मी त्या जाळ्यात अडकले. काहीच कळत नव्हतं. मला त्याच दशेत तसंच सोडून मेघा उभी राहिली. ‘दीदी, मुलांना भूक लागली असेल. प्रथम जेवण करू या. नंतर आपल्याला सगळं सांगते. आपल्याला हे सगळं सांगितलं नसतं, तरी काही फरक पडला नसता. पण आज मी आणि तुषारनी ठरवलं, की दीदीला सगळं काही सांगून टाकूयात. आपल्यापासून काय लपवायचं? ’

त्या दिवशी मी काय जेवले, मला आठवत नाही. माझं मन ते रहस्य जाणण्यासाठी उतावीळ झालं होतं. जेवण झाल्यावर तुषार मुलांना घेऊन बेडरूममध्ये गेला. आम्ही सोफ्यावर बैठक जमवली. मेघाने हळू हळू पडदा सरकवला. त्या दिवशी तिच्या जीवनाचे जे दृश्य माझ्या काना-डोळ्यासमोर प्रगट झालं, ते कुठल्याही कथा-कादंबरी-नाटकापेक्षा अधीक रसमयी होतं.

मेघाने सुरुवात केली, ‘दीदी आपल्या लक्षात आले असेलच की हा माझा आणि तुषारचा दुसरा विवाह आहे. मिनेशबरोबर माझा विवाह झाला, तेव्हा मी वीस वर्षांची होते. एक वर्षांनंतर तोरलचा जन्म झाला. तिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच एका दुर्दैवी क्षणी मिनेशच्या ऑफिसमधून फोन आला, की तीव्र हार्ट अ‍ॅटॅकमुळे मिनेश खुर्चीवरच कोलमडला होता.

त्यानंतरचं वर्ष कसं गेलं, मला कळलंच नाही. माझा मेंदू वर्षभर जसा काही मूर्छित अवस्थेतच होता. मला इतकंच आठवतं, माझे आई-बाबा मला घरी नेण्यासाठी वारंवार येत असत आणि माझ्या सासू-सासर्‍यांचे दु:खी चेहरे बघून मी त्यांना येत नाही असं म्हणत असे. आपल्याला आश्चर्य वाटेल, की तोरलच्या दुसर्‍या वाढदिवसानंतर, त्यांनीच माझ्या दुसर्‍या लग्नासाठी मला तयार केले. मलाही वर्षाभरात लक्षात आलं होतं, की एका तेवीस वर्षाच्या विधवेसाठी एकटीने पूर्ण आयुष्य घालवणं किती मुश्कील आहे. माझे मोठे दीर आणि जाऊबाई तोरलला दत्तक घायला तयार होते, पण मीदेखील एक अट घातली, ‘जो माझ्यासोबत तोरलचाही स्वीकार करेल, त्याच्याशीच मी लग्न करेन.’

— क्रमश: – भाग १

मूळ गुजराती कथा – त्रण पियर

मूळ गुजराती लेखिका – सुश्री गिरिमा घारेखान 

मो. – ८९८०२०५९०९

हिन्दी अनुवाद – तीन मैके

अनुवादक – श्री रजनीकांत शाह

मो – 9924567512 

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दोन ध्रुव… दोन वाटा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दोन ध्रुव… दोन वाटा…☆ श्री जगदीश काबरे ☆

साताऱ्याच्या डोंगररांगेत वसलेलं एक खेडं – आंधळीवाडी. नाव तसं विचित्र, पण गाव वाईट नव्हतं. शेकड्याने शेतकरी, थोडे शिक्षक, काही गावसेवक, आणि दोन व्यक्ती ज्यांच्याभोवती गाव फिरत असे त्या होत्या गणू बाबा आणि राहूल मास्तर.

गणू बाबा गावाच्या मंदिराचा पुजारी. तो फक्त मूर्तीपूजक नव्हता तर, लोकांचा ‘आध्यात्मिक आधार’ होता. अंगात केशरी शाल, गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर भस्म. अर्धे गाव त्याला साक्षात देवदूत मानत असे. बायका त्याच्या पाया पडून प्रसाद घेत, आणि पुरुष त्याच्या सल्ल्याने जीवन जगत.

दुसरीकडे, राहूल मास्तर सरकारी शाळेतील तत्त्वचिंतक ध्येय्यासक्त शिक्षक, पंचविशीतच मास्तर झालेला. पण त्याचा अभ्यास थेट विद्यापीठातील विद्यावाचस्पतीसारखा! चार्वाक, बुद्ध, आंबेडकर, आणि विवेकानंद यांच्या ग्रंथांनी त्याचं ग्रंथालय समृद्ध होतं आणि गावात तात्विक चर्चा घडवून आणणं तो त्याचं कर्तव्य समजत होता.

गणू बाबा म्हणे, “श्रद्धा ठेवा, देव सर्व पाहतो आहे.”

राहूल मास्तर म्हणे, “विचार करा, मानव स्वतःचं भविष्य घडवू शकतो.”

गावात कोणतंही संकट आलं, की ही दोन मते समोरासमोर येत. एकदा पिकांवर किड पडली. तेव्हा गणू बाबा म्हणाला, “मृत्युंजय यज्ञ करू.” 

मास्तर म्हणाला, “कृषी अधिकारी बोलावू.”

लोक गोंधळले, पण बहुतेक वेळा जसा विचार मागे पडतो आणि धार्मिक भावना जिंकतात, तसंच यावेळीही झालं आणि वैज्ञानिक विचार मागे पडला. लोकांनी उत्साहाने यज्ञ केला. पण पिकावरील कीड काही गेली नाही. शेवटी कृषी अधिकाऱ्याला बोलवून योग्य त्या रसायनांची फवारणी केल्यावरच कीड गेली. अध्यात्म हरलं आणि विज्ञान जिंकलं. विज्ञानाची महती लोकांना कळली पण अजूनही गावकऱ्यांमध्ये धार्मिक पगडा मात्र घट्ट रुजलेला होता.

गावात एकदा गंभीर साथीचा रोग पसरला. मुलं तापाने फणफणली, वृद्धांना धाप लागली. गणू बाबा म्हणाला, “शिव अभिषेक करूया, रोग निघून जाईल. ”

राहूल मास्तर सरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धावला, डॉक्टरांना घेऊन आला, आणि लसीकरण सुरू केलं.

पण त्याच्या या कृतीवर टीका झाली. “मास्तर देवावर अविश्वास दाखवतो”, “पाप ओढतो”, असं गावात बोललं गेलं. एकदा तर मंदिरासमोर त्याच्यावर राग व्यक्त करत, काही गावकरी म्हणाले, “हा नास्तिक गावाला अपशकुन आहे.”

राहूल मास्तर जखमी नजरेने पाहत राहिला. पण लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाने जागवण्याचे कठीण कार्य शांतपणे करत राहिला.

खरं पाहता, गणू बाबा आणि राहुल मास्तर दोघेही बालमित्र. लहानपणी एकाच विहिरीवर पोहायला शिकले, एकत्र अभ्यास केला, पण नंतर वाटा वेगळ्या झाल्या. गणूने वडिलांनंतर मंदिराचा कार्यभार हाती घेतला, आणि राहूल पुण्यात शिक्षणासाठी गेला.

गणू बाबा नेहमी म्हणत असे, “मी देवासाठी जगतो.”

राहूल म्हणत असे, “मी माणसासाठी जगतोय… माणसातच देव आहे असे मी समजतो.”

दोन ध्रुवावर दोघे आपण अशी दोघांची दोन टोकांची मते असली तरी त्यांच्या मैत्रीत अंतराय आला नव्हता. दर महिन्याला एकदातरी दोघं झाडाखाली असलेल्या टपरीत चहा घेत आणि गप्पा मारत. गणू बाबा त्याला म्हणे, “तुझं नास्तिकपण मला समजत नाही रे.”

राहुल मास्तर म्हणे, “तुझं आंधळेपण मला सहन होत नाही बाबा.”

… आणि दोघांनाही एकदम हसू फूटायचं.

ती रात्र मात्र गावासाठी काळरात्र ठरली. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता, ओढ्यानं पुर आलेल्या नदीसारखं रौद्र रूप धारण केलं होतं. गणू बाबाचं मंदिर अर्धं पाण्याखाली गेलं होतं, तर राहुल मास्तरचं घर मोडकळीस आलं होतं.

राहूल मास्तरने गावकऱ्यांना शाळेत नेलं. कारण शाळा उंचावर होती. त्याने प्रत्येक घरात जाऊन, पाण्यातून वाट काढत लोकांना बाहेर काढलं. पण गणू बाबा मंदिर सोडायला तयार नव्हता.

“माझा देव आहे इथे. माझी त्याच्यावर निष्ठा आहे. तोच वाचवेल, ” तो म्हणाला.

राहुल मास्तर त्याच्याजवळ गेला. “बाबा, निष्ठा असली तरी निसर्गापुढे शहाणपण चालत नाही. तू जर खरोखर देवावर श्रद्धा ठेवतोस, तर देवळातून बाहेर ये आणि गावातील माणसांना मदत कर. ” पण गणू बाबा काही हलेना. शेवटी, राहुल मास्तराने त्याला उचलून गाडीवर टाकलं आणि शाळेत घेऊन गेला.

पूर ओसरला. निसर्गाच्या प्रकोपात दोन शेतकरी मरण पावले होते. गाव विस्कळीत झालं होतं. पण लोकांनी एक गोष्ट अनुभवली की, गणू बाबा आता फक्त देवाच्या नावानं बोलत नव्हता. तो मास्तरबरोबर गावात फिरत होता. लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगत होता, अन्नवाटपात मदत करत होता. राहूल मास्तरही आता देवावर टीका करताना लोकांना चिकित्सक प्रश्न विचारू लागला, आणि लोकांना विचार करायला भाग पाडत होता. श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते हे लोकांना तो वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून देऊ लागला. तसेच निष्ठा ही फक्त विचारात नाही, तर कृतीत दिसावी लागते हेही लोकांना प्रत्यक्ष निसर्गाच्या प्रकोपात त्याच्या वागणुकीने दाखवून दिले.

एक दिवस दोघांनी गावात ‘विचारवेध संमेलना’चं आयोजन केलं. विषय होता – “श्रद्धा की निष्ठा? “

गणू बाबा म्हणाला, “माझी श्रद्धा मला संकटात आधार देत होती, पण लोकांसाठी धावून निष्ठा दाखवली राहूल मास्तराने. देवावरच्या माझ्या श्रद्धेमुळे मी जर त्या दिवशी हल्लो नसतो तर कदाचित निसर्गाचा प्रकोपात मेलोही असतो. पण राहुल मास्तरामुळे मी वाचलो. आता मी समजलो आहे की, केवळ देवपूजा नव्हे, तर माणसांची सेवा हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. देव माणसातच असतो हे आता माझ्या लक्षात आले आहे. ”

 राजू मास्तर म्हणाला, “मी नास्तिक आहे, पण भावना नाकारत नाही. गणू बाबासारखी देवावर श्रद्धा ठेवणारी माणसं जर कृतीशील झाली, तर त्यांच्या श्रद्धेला काही अर्थ प्राप्त होतो. तर्क हे शस्त्र असलं, तरी माणुसकीने जगणे हीच खरी वाट आहे. ”

 एके दिवशी दोघं पुन्हा त्याच झाडाखाली भेटले.

गणू बाबा म्हणाला, “मास्तर, तू नास्तिक असून देवासारखं वागतोस. ”

राजू मास्तर हसला, “… आणि तू देवभक्त असूनही सर्व माणसांशी माणसासारखं वागायला लागलायस! “

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव कुठे असतो ? — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

 

?जीवनरंग ?

☆ देव कुठे असतो ? — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(“अग पण आपली जागा एव्हडीशी.. त्यात देवींची पूजा.. ” 

 “ मी करीन ऍडजस्ट बरोबर… आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी नको हा… आता त्यांच्या म्हातारपणात कोण बघणार त्याचेकडे? “) – इथून पुढे —- 

उत्सवाची तयारी जोरात सुरु होती, आधल्या रात्री लाईटची तोरणे पेटली तसेच आंब्याचे टाळ सगळीकडे लागले. वाडीतील प्रत्येक घरातील तरुण उत्सवाच्या तयारीसाठी हजर होता. घरात वाडीतील बायका जेवणाच्या मदतीसाठी आपल्या काखेत विळी घेऊन हजर झाल्या. काही बायका तांदूळ वेचत होत्या, काही पीठ मळत होत्या.. काही भाजी चिरत होत्या… काही नारळ फोडत होत्या.. खोबरे किसणे सुरु होते…

 देवघरात देवीचा मुखवटा पूजेसाठी तयार होता. फुलांनी सुशोभीत करणे सुरु होते. गंध, फुले, अगरबत्ती, कापूर सर्व तयार होते. फुले, वेण्या, तुळशी, बेल, दुर्वा सर्वकाही होते.

सर्व तयारी करून मंडळी रात्री उशिरा झोपली. सकाळी लवकर ब्राम्हण मंडळी येणार होती.. म्हणून सर्वाना पहाटे उठायचे होते.. पूजा आणि घरात जेवणाची तयारी.

पहाटे घरातील सर्व मंडळी उठली. जगदीशमामा पूजेच्या तयारीसाठी देवखोलीत तयार होता. मोठया भावाने अनंताने आंघोळ करून तो पूजेचे सोवळे नेसत होता, लहान भाऊ वसंताने पण आंघोळ केली आणि तो पण सोवळे नेसायला आला. चारही भटजी हजर झाले आणि पूजेची तयारी करू लागले. सर्व तयारी मनासारखी झाली, तसे मुख्य भटजी बोलले “यजमान..

तसा सोवळे नेसलेला अनंता देवखोलीत आला, तेवढ्यात वसंतांची बायको वनिता देवखोलीत आली आणि जगदीशमामाला म्हणाली..

“मामा, पूजा हे करतील.. यांना पण अधिकार आहे ना?

मामा तसेच भटजी तिच्याकडे पहात राहिले.

“अधिकार दोन्ही भावांका आसता.. पण ज्येष्ठ भाऊ असताना..

हे बोलणे ऐकून मोठया भावाची बायको अंजली आत आली..

“मामा, पूजेला माझा नवरा बसेल, कारण वडिलांनंतर मोठया भावाचा अधिकार.. त्याला शक्य नसेल तर दुसरा.. पण इथे मोठा भाऊ सोवळे नेसून तयार आहे, काय हो भटजी?

 भटजी गडबडीने म्हणाले “हो.. हो.. बरोबर आहे.. म्हणजे मोठा भाऊ..

“भटजीना काय विचारतेस? तू मोठी पैसेवाली ना.. त्याना मोठी दक्षिणा देत असशील म्हणून..

“मी भटजीना कधी दक्षिणा देत नसते.. हे मामाच देतात.. भटजी शास्त्राप्रमाणे बोलणार..

 हे मोठयामोठ्याने बोलणे ऐकून त्त्यांची आई बाहेर आली.

“जगदीश, काय झाला?

“दोन्ही भावांनी पूजेक बसण्याची तयारी केल्यानी.. वनिता म्हणता माझो नवरो पूजेक बसतलो..

“मोठया भावान पूजा करुची आसता.. तेव्हा अनंता तूच पूजेक बस.. सावित्रीबाई म्हणाली. तशी वनिता आणि वसंता रागाने बाहेर गेले.

पूजा सुरु झाली.. आत वाडीतील पंधरा बायका जेवण करण्याच्या गडबडीत होत्या.. एक एक पदार्थ शिजत होता.. सावित्रीबाई सर्व गोष्टीवर लक्ष ठेऊन होत्या.. बाहेर जगदीशमामा पूजेच्या ठिकाणी काय हवे काय नको ते पहात होते. हळूहळू गावकरी जमू लागले.

एवढ्या बायका पुरुष घरी आले होते पण वसंता आणि त्याची बायको वनिता कशात नव्हते. त्याना राग आला होता… पूजेला बसायची इच्छा होती. पण सर्वांनी मोठा भाऊ म्हणून…

“म्हणून त्त्यांची भरभराट होत असते, कळले काय? त्याना मोठया कंपनीत नोकरी.. ती मास्तरीण.. तिचा पोरगा हुशार… म्हणून ती भांडत आली.. माझा नवराच पूजेला बसणार.. पण यावेळी मागे हटायचे नाही.. देवी आपल्यच घरी न्यायची.. ती परत हट्ट करेल.. पण ऐकायचे नाही..

वनिता आपल्या नवऱ्याला सांगत होती.

घरी पूजा झाली.. मग महा आरती.. मग महाप्रसाद… सायंकाळ पर्यत लोक जेवत होती आणि आपसात बोलत होती..

” या देवीचो या गावातलो शेवटचो उत्सव.. आता देवी मुंबईक जातली.

आता यापुढे उत्सव मुंबईक..

गावातल्या स्त्रिया भावुक झाल्या होत्या… मंदा काकू सांगत होती

“माजा चेडू अभ्यासात मागे व्हता.. या देवीक नवस बोललयय.. पुढच्या वरसा पासून कधी नापास झाला नाय..

संध्या सांगत होती”माझो नवरो दारू पी, मी देवीक नवस बोललंय.. तेची दारू सुटली.

प्रत्येक बाई आपला अनुभव सांगत होती. सावित्रीबाईना नमस्कार करत होती.

सावित्रीबाई पण भावुक झाल्या होत्या.. आता देवी मुंबईला चालली, म्हणजे आपण पण मुंबईक.. पुढचे देवीचे उत्सव मुंबईत. आपण लग्न करून आलो या गावात त्या दिवसापासून या गावात आणि या घरात राहिलो.. आता देवी आणि आपण.. दोघेही…

देवीचा उत्सव झोकात पार पडला.. आता देवी चालली मुंबईला म्हणून अनेकांचे डोळे पाणावले.

दुसऱ्यादिवशी विसर्जन करून उत्सव संपला.

सावित्रीबाई, जगदीशमामा, दोन भाऊ आणि त्यान्च्या बायका एकत्र बसल्या. मामा म्हणाले 

” तुमी दोघांनी देवीचा रुपडा मुंबईक न्यायचा असा ठरविलात.. पण मुबंईत खय? दोघांची दोन घरा आसात आणि तुमची आई.. तिका पण न्हेवक व्हया.

“मी मागेच सांगितले आहे, देवी माझ्याकडे आणि आई वसंताकडे.. माझी मोठी जागा..

“तुजी मोठी जागा.. मोठी जागा.. देवीला जागा कितीशी लागते.. एक फूट फळी ठोकली की देवी राहते.. बाबा गेल्यापासून तू देवींची पूजा करत राहिलास म्हणूंन तुला दिवस बरे आले.. आता मला तिची सेवा करू द्या.. माझे पण दिवस बरे येउदे.

तेवढ्यात अनंताची बायको मध्ये बोलली “देवी आम्हीच नेणार.. तिचा वार्षिक उत्सव करावा लागतो.. त्याचा खर्च किती होतो माहित आहे काय? काल उत्सव झाला, त्याला तीन लाख खर्च आला.. दरवर्षी आम्हीच खर्च करतो.. एक रुपया तरी देता काय देवीला? नुसती देवी नेतो.. देवी नेतो..

काय चालवलंय.. त्यापेक्षा आईला न्या तुमच्याकडे.

वनिता आता चिडली आणि बोलू लागली “म्हातारी आई आमच्या कपाळी आणि देवीचा मुखवटा तू नेणार.. कशी नेतेस ते बघते मी.. हात लाऊन बघ त्या मुखवट्याला….

“अग जा ग.. तुझा बाबा खाली आला तरी मला कोण थांबवू शकणार नाही.. चला हो.. घ्या तो मुखवटा.. अनंता आणि अनिता पुढे झाले आणि मुखवटा उचलू लागले तसा वसंता पुढे झाला आणि त्याने मोठया भावाला ढकललं… वसंता खाली पडला आणि देवीचा मुखवटा खाली पडला आणि मुखवटा मोडला.

 मघापासून दोन्ही मुलांचे बोलणे ऐकणारी त्त्यांची आई भडकली. चिडून म्हणाली..

“, चालते व्हा.. चालते व्हा.. माझ्या डोळ्यासमोर रवा नकात..

आई खाली वाकली आणि तिने खाली पडलेल्या देवीच्या मुखवट्याला उचलले. आता जगदीशमामा बोलू लागले..

“मघापासून गप्प रवान बघतय.. तुमका दोघांका देवीचो मुखवटो होयो कारण कोणी तरी सांगितलं म्हणे ज्या घरात देवींची पूजा होता, त्या घराची भरभराट होता.. म्हणून दोघांका देवी होई पण म्हातारी आई नको.. अरे मुर्खानो.. तुमका देव.. देवी म्हणजे काय कळलाच नाय.. अरे अशी तांब्याची नायतर पितळेच्या देवी साठी भांटतात आणि ही रक्तामासाची आई ही देवी तुमका नको? चालते व्हा.. चलत रवा.. ह्या देवीचो मुखवटो तुमका दोघांका मिळाचो नाय.. जा..

 आईने आणि मामानी पण देवीचा मुखवटा मिळणार नाही, हे सांगताच दोघे आपल्या पत्नीसोबत बाहेर पडले.

 सावित्रीबाई डोक्याला हात लाऊन बसल्या होत्या. जगदीश मामा तिला म्हणाले

“ताई, तूझ्या झिलंका खरी देवी कोण ह्या कळलाच नाय… अरे मेल्यानू.. खरी देवी तुमी विसरलास.. आणि त्या मुखवट्याचो मुको घेवंक धावतास.. ताई, घाबरा नको.. तुजा हक्काचा माहेर आसा.. तुज्या माहेरक काय कमी नाय.. धान्यगोटो आसा.. दूधदुभाता आसा.. मानसा आसात.. उचल तो देवीचो मुखवटो आणि चल माझ्याबरोबर….

– समाप्त –  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ☆ देव कुठे असतो ? — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ देव कुठे असतो ? — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

सावित्रीबाई घाईत होत्या. देवीचा उत्सव जवळ आला होता.. त्याना एकटीला एवढी तयारी करायची होती.. मदतीला त्त्यांचा भाऊ जगदीश येतो दरवर्षी, पण त्याचा संसार मोठा, वीस गुर होती गोठ्यात, शेती मोठी शिवाय आंब्याच्या बागा.. घरी गाडीमानस रोज.. त्याचे दोन मुलगे, सुना सर्वजण राबत होती म्हणून.. तरी ताईच्या मदतीला जगदीश येतोच.

सावित्रीबाईचें दोन मुलगे अनंता आणि वसंता. दोघेही मुंबईत. अनंता फायझर मध्ये चिकटला, त्याचा पगार, बोनस मोठा.. शिवाय त्याची बायको अंजली शाळामास्तरीण. त्याला एक मुलगा.. अनंताचा मोठा ब्लॉक मुलुंडमध्ये. शिवाय चारचाकी गाडी, घरी एसी वगैरे.

वसंता एका स्कुलबसवर ड्रायव्हर, त्याची बायको वनिता कपड्याच्या दुकानात कामाला. त्याना दोन मुली. मुंब्राच्या चाळीत संसार. सतत ओढातांड पैशाची. त्यामुळे सतत भांडण नवराबायकोमध्ये.

सावित्रीबाईंनी ऐशी पार केलेली, आता पाय गुढगे कामातून गेलेले, नजर कमी झालेली, ऐकू कमी येऊ लागलेले. घरवाले गेले त्यापासून एकटी राहिलेली.. त्यामुळे जेवण करायचा आळस, त्यामुळे खाणे कमी. त्यामुळे अंगात ताकद कमी झालेली. भाऊ जगदीश किंवा त्याचे मुलगे अधूनमधून यायचे.. घरी केलेले माशाचे कालवण आणुन दयायचे.. मग त्या दिवशी त्या भात शिजवायच्या आणि दोन घास जेवायच्या.. बाकी दिवशी चहा आणि दोन बिस्किटे यावर दिवस काढायच्या.

त्यान्च्या भावाला जगदीशला ताईची काळजी वाटायची, तो ताईला आपल्या घरी चल असं म्हणायचा. पण सावित्रीबाईना ते योग्य वाटायचे नाही. एकतर रोज देवींची पूजा करायची असायची आणि वर्षातून एकदा देवीचा उत्सव असायचा.

तो माघ पौर्णिमेचा देवीचा उत्सव म्हणजे त्या गावची शान होती. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या दिवशी देवींची पूजा व्हायची. चार ब्राम्हण चार तास पूजा करायचे… मग महा आरती दोन तास चालायची. मग देवीचा प्रसाद.. तो प्रसाद घयायला लोक गर्दी करत. सायंकाळी बायका ओटी भरायला येत.. गाऱ्हाने घालत. रात्री भजने होत.

सावित्रीबाईंचे दोन्ही मुलगे मुंबईत. त्याना आधी यायला जमायचे नाही. कसेबसे आधल्या रात्री येऊन पोचत. त्त्यांचा नवरा होता, तोपर्यत त्याना काळजी नसे, , पण आता थकायला झाले.. एकदिवस त्या आपल्या भावाशी बोलायला लागल्या..

“जगदीशा, माका आता झेपणा नाय रे.. डोळ्यांनी धड दिसणा नाय.. हे दोघे झील आधल्यादिवशी येतले.. पुढे पुढे या देवीचो उत्सव कसो होतलो?

“, मी इचारतंय अनंताक.. काय तरी मार्ग काढुक होयो.

दुसऱ्यादिवशी जगदीशमामाने भाच्याला म्हणजे अनंताला फोन लावला..

“अनंता, तुझी आई आता थकली रे.. वय झाला ना.. आता तूझ्या आईचो आणि देवीच्या उत्सवाचो काय तरी विचार करा.. तुम्ही दोघांनी.

“होय मामा.. आता आई थकली.. देवीच्या पूजेचो पण प्रश्न आसा.. आणि वार्षिक उत्सव पण. देवींची पूजा बंद होता नये.. या देविमुळे आमच्या कुटुंबाची भरभराट झालीया.. यंदा गावक देवीचो उत्सव करूया आणि पुढच्या वर्षीपासून माझ्या घरी मुलुंडमध्ये… “

“आणि आई तुझी.. तिका आता झेपत नाय रे.. तिका पण घेऊन जा.

“मी अंजलीक विचारून सांगतय.. नायतर आई वसंताकडे रवात.. थोडे दिवस माझ्याकडे रवात.

“काय ता ठरवा.. मी वसंताक पण फोन करतय..

असं म्हणून जगदीशमामांनी फोन खाली ठेवला.

जगदीशमामाने वसंतला फोन लावला..

“वसंता, यंदा उत्सवाक इलास काय देवीच्या पूजेचो, वार्षिक उत्सवाचो आणि आईचो प्रश्न मिटवूक होयो. तुझी आई आता थकलीया.. तिका दिसत नाय.. कानाने व्यवस्थित ऐकू येना नाय.. अनंताक फोन केल्लय.

“मग काय म्हणता माझो दादा? तो पैसोवालो आसा.. तेची जागा मोठी आसा.. मी चाळीत दोन खोल्यात रवतंय..

“पण दोघांनी काय ता ठरवा.. अनंता म्हणालो मी देवी माझ्याकडे नेताय.. आईक वसंता नेता काय विचारा..

“माझी जागा केदी? माझे दोन मुली..

“बरा बरा.. तू इलंस उत्सवक. मग बोलूया.

अनंताने भावाला फोन केला आणि दोन्ही भावांनी गावच्या घरातील देवी मुंबईला आणायचे ठरविले. मग दोन्ही भावांनी जगदीशमामाला फोन करून हा निर्णय सांगितला. मामा आपल्या ताईकडे आला आणि तिला म्हणाला 

“ताई, तूझ्या दोन्ही झिलांनी फोन केल्लो, दोघांचा मत देवी मुंबईक नेऊया, कारण रोजची पूजा कारणा आसाच पण येदोमोठो वार्षिक उत्सव, तेची तयारी करुची तुका जमाचा नाय.. तेंका तयारीसाठी लवकर गावक येना जमणा नाय आणि दुसरा महत्वाचा म्हणजे या घर पण पडाक झाला, एकतर दुरुस्थ करूंक होया, नायतर नवीन बांधूक व्हया.. त्यापेक्षा देवी मुंबईक नेणा बरा. देवी बरोबर तू पण झिलाकडे जा.. झील, सुनो, नातवंडा यांच्यात म्हातारपण घालवशीत.

“होय बाबा.. आता झेपणा नाय.. आता नातवंडाबरोबर पुढचा आयुष्य..

सगळ्या गावात बातमी पसरली. खानोलकरा देवी मुंबईला नेत आहेत, त्यामुळे यावर्षीचा या गावातील शेवटचा देवीचा उत्सव. सगळ्या गावाची विशेषतः महिलांची या देवीवर श्रद्धा होती, त्या श्रद्धेने देवींची ओटी भरत, तिला नवस बोलत.

जगदीशमामाला माहित होते, या गावातील देवीचा शेवटचा उत्सव, हे लोकांना कळले आहे, त्यामुळे यावर्षी गर्दी होणार, म्हणून त्यानी आपल्या मुलाला सांगून मंडप उभा केला. चारही बाजूला पताका लावल्या, इलेक्टिक तोरणे लावली. मुख्य रस्त्यापासून घरापर्यत वाट सारवली.. सारं घर शेणाने सारवले.. रांगोळ्या घातल्या. मग देवीच्या पूजेची तयारी. देवीचा मुखवटा रंगवून घेतला.. देवघराची झाडलोट केली.. रंग काढला.

एक दिवस आधी अनंता आणि त्याची बायको आली. आल्या आल्या अनंताने घरात काय काय हवे आहे, त्याचा अंदाज घेतला, तसे जगदीशमामाने बहुतेक सर्व तयारी केली होती, किराणा सामान, पंचे, केळीची पाने तयार होती. अनंताने कुडाळला जाऊन फुले, वेण्या आणल्या आणि तो पूजेसाठी येणाऱ्या भटजीना भेटायला गेला.

वसंता आणि त्याची बायको वनिता दुपारी आली. थोडे खाऊन ती दोघे वाडीत आमंत्रण द्यायला गेली. प्रत्येक घरी जाऊन उद्या देवीच्या उत्सवाला या, असे आमंत्रण देत होती. राजाभाऊ हे त्यान्च्या वडिलांचे मित्र. वसंतला पहाताच ते म्हणाले..

“काय आता हो शेवटचो उत्सव देवीचो गावातलो..

“होय काका, आईक आता जमणा नाय.. तिचा वय झाला.. ह्या उत्सवाची तयारी मोठी… जगदीशमामाचा पण वय झाला… मामा म्हणाले, तुम्ही आता ही देवी तुमच्याकडे न्या, कारण तिची रोज पूजा होऊक होयी आणि हो उत्सव सुद्धा..

” मामाचा बरोबर आसा.. पण वसंता.. तुका एक सांगतय.. मी तूझ्या बाबाचो दोस्त.. ही देवी म्हणजे लक्ष्मी देवीचो अवतार.. तुजा पणजोबानी काशी हुन घरात आणलेली. जो हेची पूजा करीत आणि ज्या घरात हिची पूजा होईत, त्या घराची ही देवी भरभराट करतली. तुज्या पणजोबाकडे काय व्हता? भिकारी होतो.. पण देवींची पूजा करूंक लागलो आणि परिस्थिती बदलली.

काकांचे हे बोलणे ऐकून वसंतांची बायको चमकली. तिने नवऱ्याला खुणा केली.. चला म्हणून.

वसंता बाहेर पडला तशी वनिता पण त्याच्यासोबत बाहेर पडली. ती नवऱ्याला म्हणाली 

“ऐकलेत ना.. काका काय म्हणाले ते.. जो कोण या देवींची पूजा करेल आणि ज्या घरात ही देवी असेल, त्या घराची भरभराट होईल.. तुमचे बाबा गेल्यापासून तुमचा मोठा भाऊ दरवर्षी पूजा करत आलाय.. तरीच त्त्यांची परिस्थिती एकदम टॉप.. चार खोल्यांचा ब्लॉक, मोटर.. आता या वर्षी तुम्ही पूजा करा आणि देवी आपल्या घरी नेऊया आणि तुमची आई तुमच्या भावाकडे….

“अग पण.. तो मोठा आहे ना.. त्याचाच मान असतो पूजा करण्याचा.

“पण यावर्षी तुम्ही पूजा केलीत तर काय होईल? मी सांगते मामांना.. यावर्षी आमचे हे पूजेला बसतील म्हणून. आणि देवी मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी न्यायची… तरच आपली परिस्थिती सुधरेंल.. मला पण ब्लॉकमध्ये राहायचय.. माझ्या मुलींना चांगले नवरे मिळायला हवेत…

“अग पण आपली जागा एव्हडीशी.. त्यात देवींची पूजा..

” मी करीन ऍडजस्ट बरोबर… आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी नको हा… आता त्यान्च्या म्हातारपणात कोण बघणार त्याचेकडे?

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares