श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘तो….’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆
थोडा वेळ थांबून तो आज्जीचा निरोप घेऊन पुढं निघाला तेंव्हा आज्जी म्हणाली,
“ हायंस तवर येत जा.. अनमान नगं करुस..
ही समदं गाव, हितली मान्सं आप्पानी कवा येगळी मानली न्हाईत…. आप्पांचा नातू हायस तू. … समदी तुजीचं हायती बग.. ”
आज्जीच्या पोटातली माया तिच्या स्पर्शातून आणि चेहऱ्यावरील खुशीतून त्याच्या मनापर्यंत पाझरली होती.
तो मनापासून ‘हो’ म्हणाला.
आई-बाबा अचानक गेले अन तो एकटा पडला.. चार दिवस सगळेच नातेवाईक, परिचित परिचित हळहळले.. त्यांनी त्याच्यावर आधाराचा, मायेचा पांघर घातला होता.. हळूहळू सारे पातळ होत गेले.. कुणासाठी कुणाचे जगणं थांबून राहत नाही.. हे खरं.. पण माया? मामी मात्र येत होती, बोलवत होती.. माया करत होती.. नाहीतरी लहानपणापासून मामा-मामीचा ओढा असतोच.. एके दिवशी मामीने त्याच्या लग्नाचा विषय काढला आणि तिच्या भावाच्या मुलीचा प्रस्ताव पुढे ठेवला.. तो त्या मुलीला कळत्या वयापासून पहात होता… त्याच्या मनाने पहिल्या झटक्यात नकार दिला होता.. पण मामीला सांगायचं कसं?
त्याने एकेदिवशी मामाला सांगितले. नंतर मामी काही बोलली नाही.. पण तिची माया पातळ होत गेली.. महिन्याभरातच येणे, बोलावणे कमी होत गेले. स्वार्थ मनात ठेऊन पांघरलेली मायेची चादर लवकर विरून जाते..
आपण नाही म्हणालो ते आपले चुकले का? तो पुढचे काही दिवस अंतर्मुख होऊन विचार करत होता. त्याची आई म्हणायची, ‘ आपण दुसऱ्याकडे बोट दाखवताना एक बोट त्याच्याकडे असते पण त्याच वेळी चार बोटं आपल्याकडे असतात हे कधीच विसरू नकोस. दुसऱ्याला दोष देताना, आरोप करताना आधी अंतर्मुख होऊन, त्रयस्थपणे स्वतःच्या वागण्याचा विचार करावा. आपले काय चुकलंय? , आपला दोष किती आहे? हे आधी तपासावे. ’
मामीच्या बाबतीत त्याने स्वतःला तपासले होते..
मनातल्या विचारांची सोबत घेऊन चालत तो गावात पोहोचला होता. वाटेकऱ्याचे घर माहीत नव्हते.. झाडाच्या सावलीत भर दुपारचा बैदुलाचा डाव मांडलेल्या छोट्या मुलांपैकी एकाला त्याने वाटेकऱ्याचे घर विचारले. ‘ चला दावतो.. ‘ म्हणत बारक्या त्याला थेट घराजवळ घेऊन गेला आणि अंगणातूनच.. ‘ओ आत्ती, तुमाकडं पावनं आल्यात बगा.. ’ म्हणून ओरडून सांगून ‘जातो खेळाय ‘ म्हणत त्याचा निरोप घेऊन पळत गेलासुद्धा..
बंद असणाऱ्या घराची साफसफाई करवून घेऊन तो आपल्या घरात मुक्कामालासुद्धा गेला होता. आप्पा खोतांचा नातू आलाय म्हणल्यावर कुणी कुणी येऊन भेटत होते.. तिन्हीसांजेला चार लोकं गप्पा मारायला सोप्यात गोळा झाली होती.
तो वाटेकऱ्यासोबत दिवसभर रानात गेला होता. आपली रानं तो पहिल्यांदा पहात होता.. रानभर मोकळेपणाने फिरत होता. त्याचे निद्रिस्त घर ही जागते झाले होतं.. लबकात असणाऱ्या गावात मोबाईला रेंज नव्हती.. रानात गेल्यावर मात्र रेंज मिळायची.. पण त्याला फोन तरी कुणाला करायचा होता? आवर्जून फोन करून कुणाशी बोलावे असं त्याला अलीकडे वाटतंच नव्हते. मामीची माया आटली होती पण मामा अधून मधून फोनवर त्याची चौकशी करत होता. त्याने मामाला फोन करून तो गावी आल्याचे सांगितले होतं…
दुपारचा रानातल्या आंब्याच्या झाडाखाली सावलीला बसला असताना कार्यालयातील सहकाऱ्याचा फोन आला.
‘अरे, कुठं आहेस मित्रा? तुझा फोन किती ट्राय करत होतो.. लागतंच नव्हता.. गुड न्यूज आहे. तुझे सस्पेंशन उठवलंय.. लवकर हजर हो.. आणि पार्टी पाहिजे बरं का… चल, गडबडीत आहे ठेवतो. ‘ तो एक शब्द ही बोलला नाही. त्याला बोलवसंच वाटलं नव्हतं.
कंपनीत कामाला लागल्यापासून समवयस्क असल्याने चार-पाच जणांची चांगली मैत्री झाली होती.. सुट्टीच्या दिवशी एकत्र सहलीला जाणे, चित्रपट पाहणे, अनेकदा सगळे मिळून एकत्र जेवायला जाणे.. गप्पा, मौज, मस्ती.. नुसती धमाल. पण कंपनीत समस्या निर्माण झाली तेंव्हा स्वतःच्या सोईसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी सारा दोष त्याच्यावर थोपवून रिकामे.. तेंव्हा त्यांनी खऱ्या खोट्याचा विचार ही केला नव्हता.. त्याचा, त्याच्या मनाचा, आजवरच्या मैत्रीचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता.. त्यांना स्वतःला त्यातून मुक्तता पाहिजे होती ती तेवढी त्यांनी मिळवली होती.. आणि मानभावी पणे त्याच्याशी बोललेही होते. पण त्यात वास्तवतेची किचिंतशी सावलीसुद्धा नव्हती… त्यानंतर इतके दिवसात त्याची साधी चौकशीही केली नव्हती.. आणि आता कंपनीने निलंबन उठवल्यावर लगेच… किती हा मानभावीपणा.. ते नाटकी, खोटे खोटे वागणे, बोलणे, आपुलकी, आपलेपणा दाखवणे..
बाबा म्हणायचे ‘ नात्याची, मैत्रीची खरी पारख ही आपण संकटात असताना, अडचणीत, अभावात असताना होते.. ’ अडी-नडीला पाठीशी उभी राहणारी माणसे कमीच.. बाकी सारे सुखाचे सोबती.. गरज सरली की सरळ फेकून देणारेच…. त्याच्या मनातले विचारांचे वावटळ वाटेकरी आला त्यामुळे निमाले.
वाटेकरी चांगलाच अनुभवी.. रानातल्या कामातही आणि माणसात वावरण्यातही. रानात जाता-येता, फुरसतीच्या वेळी काही-बाही सांगत रहायचा. “ माणसाला काय लागतं वं जगाय? भुकेला कोंडा न निजेला धोंडा असला म्हंजी बास. अवो, तुकडोबांचं भजन म्हंत्यात न्हवका, ‘राजास जी महाली.. ‘ तशातली गत असती. सुखाला दुसरं काय बी लागत न्हाय बगा. पर
माणसाची हाव त्येला तिच्या मागनं पळवत ऱ्हाती बगा.. मरंस्तवर.. ” वाटेकरी त्याच्याशी असेच काहीतरी बोलत राहायचा.. काही आठवणी सांगत राहायचा.
आप्पांच्या माघारीसुद्धा वाटेकऱ्याने नियमित झाड-लोट ठेवल्याने, उभेकडी- भुई सारवण करत असल्याने, कोणी राहत नसूनसुद्धा घर व्यवस्थित राहिले होते. घरातल्या साऱ्या वस्तू पोत्यात बांधून ठेवल्या होत्या. घरातल्या फडताळात त्याला काही पुस्तके आढळली.. धूळ साठलेली, काहींच्या पानांना कसर लागली होती.. त्याने धूळ झटकून पुस्तके पुसून घेतली.. दोनतीन धार्मिक ग्रंथ, आणि इतर काही पुस्तके होती. तिन्हीसांजेला सोप्यात भरणारी शेजाऱ्यांची गप्पांची मैफल संपली की जेवण झाल्यावर, पडल्या पडल्या तो त्यातील पुस्तक वाचत असे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यापासून घरात मोबाईलला रेंज, नेट नसल्यामुळे त्याची जराही चिडचिड झाली नव्हती. उलट त्याला पहिल्यांदाच बरं वाटलं होतं, आनंद झाला होता.
‘माणूस सुखापाठी, संपत्तीपाठी कितीही पळत राहिला तरी कधीतरी, कुठंतरी त्याला थांबावं लागतेच.. पण कधी आणि कुठं थांबायचे ज्याला कळतं तोच खरा सुखी होऊ शकतो.. ‘
त्याने फडताळातलं पुस्तक वाचायला घेतलं होतं.. त्यातील वाक्य त्याला आठवले.
“ गावात कधी भांडणं होत नाहीत काय? ”
त्याने एकदा वाटेकऱ्याला प्रश्न विचारला होता तेंव्हा वाटेकरी हसत म्हणाला होता,
“ घर हाय आन भांड्याला भांडं लागलं न्हाय आसं कवा हुईल काय? दोन माणसं संगती ऱ्हायली का कवा ना कवा भांडान ही हुयाचंच.. ‘मी’ असतो का न्हाय.. त्यो ‘मी’ च भांडान लावीत आसतो.. पर त्ये भांडान किस्तं दिस चालू ठ्येवायचं ह्येचा ईचार ज्येचा त्येनं कराय पायजेल.. गावातंबी कवा कवा भांडान हुतं पर ती भांडान दुसरा दिस काय बगीत न्हाय बगा.. ”
निवृत्तीच्या वयाच्या पुढं गेलेला वाटेकरी दिवसभर रानात जोमानं राबत होता.. त्याला माहिती देत होता. सांगत- शिकवत होता. शहरी जीवनातल्या, नोकरीतल्या ताण-तणावांनी तो गावात आल्यापासून त्याच्या मनाला स्पर्शही केला नव्हता. गावातली प्रदूषण नसलेली मुक्त मोकळी हवा आणि प्रदूषित मनं नसलेली, मोकळ्या-ढाकळ्या मनाची, काहीशी फटकळ तरीही पोटभर माया असणारी माणसं त्याला आवडू लागली होती. आई-वडील गेल्यावर एक प्रकारचे एकाकीपण, एकटेपण त्याच्या मनाला पोखरत असायचे.. आई-वडिलांची आठवण येत असली तरी गावाकडे त्याला ते एकटेपण जाणवत नव्हते.
“ मी तुमास्नी भेटाय येणारच होतो.. आपलं आप्पा हुतं तवापासनं समदं रान वाट्यानं करतुय.. आता वय झालं, पैल्यागत नेटानं हुईना झालंय.. येक येळ आशी येत आस्ती.. निसतं करतो करतो म्हनून होत न्हाय बगा.. त्या आगुदरच मानसानं थांबाय पायजेल.. आन पोरंबी नोकरीला भाईर गेल्यात.. त्यासनी माघारी इवू वाटत न्हाय.. तवा दुसरा कुनी वाटेकरी बगा आन मला मोकळं करा.. आसं सांगाय याचा हुतो.. तवर तुमीच आलासा.. लई ब्येस झालं बगा. आता तुमीच काय ती येवस्ता बगा.. ”
फुरसतीच्या वेळी वाटेकऱ्याने त्याला सांगितले. त्याने वाटेकऱ्याकडं पाहिले. वार्धक्याच्या खुणा अंगभर पसरल्या होत्या.. त्याला पहिल्या दिवशी भेटलेली आज्जी आठवली.. ऐंशी पार केलेली.. तरीही वस्तीवर काही ना काही कामं करत असलेली.. ‘कर्मयोग याहून वेगळा काय असतो? ‘ त्याच्या मनात येऊन गेले..
काहीसा विचार करून निश्चयी स्वरात तो म्हणाला,
“ दुसरं कोण नाही.. यापुढे तुमीच वाट्यानं करायचं.. मी आहे तुमच्या सोबत.. आणि एक.. मला सगळे शिकवायचं.. शिकवाल ना? ”
वाटेकऱ्याने काहीसे अविश्वासाने विचारले,
“ तुमी हितंच ऱ्हानार हायसा.. खरंच सांगतायसा? मंग तर द्येवच पावला म्हनायचा.. “
वाटेकऱ्याच्या चेहऱ्यावर आगळं- वेगळं खुशीचं, प्रसन्नतेचं आभाळ दाटून आलं होतं..
“ हो.. अगदी खरं.. “
तो निश्चयाने म्हणाला आणि त्याने मोबाईल हातात घेवून कंपनीला पाठवण्यासाठी ‘राजीनाम्याचा’ मेल टाईप करायला सुरवात केली.
– समाप्त –
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








