श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
|| श्री नारद उवाच ||
निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः ॥ ८ ॥
अर्थ : लौकिक आणि वैदिक (समस्त) व्यापारत्याग म्हणजेच निरोध होय.
विवेचन: निरोध याचा पुस्तकी अर्थ रोखून धरणे. आता साधकाला अथवा भक्ताला काय रोखून धरायचे आहे, कशाचा निरोध करायचा आहे ते आपण समजून घेऊ.
समर्थ मनाच्या श्लोकांत सांगतात.
मना सज्जना भक्तिपंथेंचि जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।
जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।
जनी वंद्य ते सर्वभावें करावे।।२।।
(मनाचे श्लोक ०२)
मनाचा एक गुण असा आहे की ज्या ठिकाणी ते एकदा रमते त्याच विषयाची त्याला तहान लागते. त्याच विषयाचे ग्रहण अधिकाधिक करण्यासाठी ते आसुसलेले असते. समर्थाना मनाच्या या गुणाचा फायदा करून घेऊन मनाला अध्यात्माची गोडी लावावीशी वाटते. यामुळे मन पारमार्थिक विषयावर स्थिर होईल आणि त्यासाठी भक्तिमार्गाचा आधार घ्यायला हवा असा खास सल्ला ते मनाला देताल आहेत. मात्र त्यासाठी मनुष्याला आपल्या वासनांवर विजय मिळवावा लागेलं. या वासना प्रामुख्याने चार प्रकारच्या आहेत.
१. प्रसुप्त वासना:- या पुनर्जन्मातून येतात, मागील जन्माचे अपुऱ्या इच्छांचे संस्कार घेऊन माणूस जन्माला येत असतो.
२. तनु वासना :- क्षणिक शाररिक इच्छा.
३. विच्छिन्न :- मानसिक मूल्यांमध्ये या वासनांचा पाया आहे. या वासना शाररिक, रागद्वेषादी, मानसिक आणि बौद्धिकही असतात.
४. उदार वासना :- या अवस्थेत अशुभ वासना दुर्बल होत माणूस सत्कृत्य करण्याकडे झुकू लागतो. हळूहळू पापवासना क्षीण होत जातात व नंतर स्मृतिरुपाने राहतात.
थोडा वेगळा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मनुष्याला कर्माचा निरोध करायचा आहे. इथे थोड नीट समजून घेण्याची गरज आहे. सर्व संतांनी कर्मत्याग न सांगता कर्मफळ त्याग सांगितला आहे, तसेच साधनेच्या अंतिम टप्प्यात कर्माचा निरोध करायला सांगितले आहे.
कोणत्याही संतांचे चरित्र अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी कधीही कर्माचा त्याग केलेला नाही, किंबहुना सामान्य मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कार्य करून ठेवले आहे. अनेक संतांनी लिहिलेलं साहित्य एका जन्मांत वाचून होईल की नाही याची खात्री देता येत नाही, ते समजून घेणं तर फार पुढची गोष्ट. पटतंय ना?
– – – मग सर्व संत किंवा नारद महाराज असे का बोलत असतील….?
मनुष्याला दैनंदिन आयुष्यात अनेक प्रकारची कर्मे करावी लागतात. त्याचे ढोबळमानाने वर्गीकरण करायचे झाल्यास व्यावहारिक आणि वैदिक कर्मे असे करता येईल. यात कोणत्याही कर्माचा त्याग कसा करायचा हे आपण आधी समजून घेऊ. कर्माचे वर्गीकरण फार महत्वाचे नाही, असे मला वाटते.
एक प्रवाह असा आहे की अमुक एक कर्म करण्यासाठी मनात वृत्ती उठली किंवा निर्माण झाली की तिचे त्वरित दमन करावे…..! काही लोकांना ते जमू शकते. पण सामान्य साधकाला ते शक्य होईलच असे नाही. संत दयासिंधु असतात. त्यांनी एक अधिक सुलभ मार्ग सुचविला. यात आपण केलेले कर्म तत्काळ भगवंताला अर्पण करायचे असते.
– – ही वाचायला, लोकांना सांगायला सोपे आहे, पण आचरणात आणायला महाकठीण.
कोणत्याही आश्रमातील (ब्रह्मचर्य आश्रम, संन्यास आश्रम आदी) मनुष्य असो, त्याला कर्म केल्याशिवाय जगणे अशक्य होईल. त्यामुळे कर्म केलंच पाहिजे. भक्त ते खालील क्रमाने आणि समजून करता आले तर मनुष्य त्या कर्मात अडकणार नाही. त्यावेळी तो फक्त तिथे साक्षीभावाने उपस्थित असेल.
साधकाने आपल्या समोर आलेले कर्म भगवंताचे, भगवंताने दिलेले आहे असे समजून कारणे. श्रीमहाराज एक उदा. नेहमी सांगायचे. वकील एखाद्या अशिलाचा खटला न्यायालयात स्वतःचा म्हणून लढतो, पण त्यात हार झाली किंवा जीत झाली तर त्याच्या सुखदुःखात अडकत नाही. मनुष्याने दैनंदिन व्यवहार करताना वकिलाला समोर ठेवावे.
आणिक एक उदा. पाहू… पावसाळा सुरू झाला की नदी नाले भरून वाहू लागतात. त्यावेळी मुले पाण्यात होड्या सोडतात, काही वेळा किंवा काही वेळ त्या तरंगतात, तर काही वेळा त्या बुडतात. मुले मात्र दोन्हींचा आनंद घेतात. त्या मुलांसारखे आपल्याला व्यवहारात वागता आले तर फारच उत्तम….!
“खेळा ऐसा प्रपंच मानावा ||”
– – श्री. गोंदवलेकर महाराज
अहंकार कमी होण्यासाठी आणि शरणागती वाढण्यासाठी आपला प्रपंच भगवंताने आपल्याला दिला आहे, त्याची मालकी स्वीकारून करण्याचा आपण प्रयत्न केला तर साधकाची प्रगती अधिक वेगाने होऊ शकेल, असे नारद महाराजांना सांगायचे असावे.
॥ जय जय रघुवीर समर्थ॥
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. ६
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







